हिंदुसमाज संघटना आणि विघटना/हिंदुपदपातशाही

विकिस्रोत कडून







हिंदुपदपातशाही


हिंदुपदपातशाही
 राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र व पंजाब (शीख) या ज्या चार राष्ट्रांनी मुस्लीम आक्रमणास तोंड देऊन हिंदुधर्म व हिंदु संस्कृती यांचे रक्षण केले, त्यांपैकी पहिल्या दोघांच्या यशापयशाचा विचार गेल्या प्रकरणात केला. रजपुतांनी सातशे वर्षे अखंड संग्राम करून आरबी आक्रमणास पायबंद घातला. पण तुर्की आक्रमणास पंजाब, अयोध्या, काशी, बंगाल, बिहार, ओरिसा, माळवा, गुजराथ हे प्रदेश बळी पडत असताना त्यांच्या रक्षणाचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. राजस्थान सोडून हिंदुधर्माच्या व स्वराज्याच्या रक्षणासाठी रजपूत बाहेर पडलेच नाहीत. आणि राजस्थानातही सगळे श्रेय मेवाडचे आहे. जयपूर, जोधपूर यांनी फार लवकर पारतंत्र्य स्वीकारले. तेव्हा रजपूत असे म्हणताना मेवाडचा सिसोदे वंशच मनात अभिप्रेत असतो. विजयनगरचे यश यापेक्षा मोठे आहे. त्यांनी तुंगभद्रेच्या दक्षिणेस कर्नाटक, आंध्र, तामीळनाड व केरळ या चार प्रदेशांवर एकछत्री साम्राज्य स्थापून अविरत तीनशे वर्षे संग्राम केला आणि मधून मधून विजापूर, अहंमदनगर, गोवळकोंडा येथील बहामनी राज्यांवर आक्रमण करून त्या सत्ता काही काळ तरी हतबल करून टाकल्या. पण विजयनगरच्या सम्राटांनी नर्मदेच्या उत्तरेकडच्या दिल्लीच्या सलतनतीचा उच्छेद करण्याचा कधी संकल्पही केला नाही. तिकडे त्यांनी कधी पाऊलही टाकले नाही. आणि बहामनी शाखांपैकी सर्वच किंवा एखादी तरी उखडून टाकून तेथे हिंदुसत्ता प्रस्थापित करण्याची आकांक्षाही त्यांनी कधी धरली नाही.
 अखिल भारतातून मुस्लीमसत्तेची पाळेमुळे खणून काढण्यात मराठ्यांना यश आले याचे एक कारण हे की प्रारंभापासून त्यांचा संकल्पच तसा होता. पंधराव्या वर्षीच शिवछत्रपती 'हिंदवी स्वराज्याचे' स्वप्न पाहात होते आणि छत्रपतींपासून पाटिलबाबांपर्यंतच्या दीडशे वर्षांच्या काळात प्रत्येक मराठ्याच्या मनापुढे हिंदुपदपातशाहीचे हेच भव्य स्वप्न सारखे उभे होते. दिल्ली सर करावयाची आहे, रूमशामपर्यंत जावयाचे आहे, अवनिमंडल निर्यवन करावयाचे आहे हाच मराठ्यांना ध्यास होता. या भव्य आकांक्षेमुळेच त्यांना अटकेपासून म्हैसुरपर्यंत आणि अहमदाबादेपासून जगन्नाथपुरीपर्यंत मराठा साम्राज्याची प्रस्थापना करता आली. आपला प्रारंभापासूनचा हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी त्यांनी सामर्थ्य संघटना कशी केली, संघटनतत्त्व कोणते अवलंबिले, त्यावरील निष्ठा कशा जोपासल्या हे आता पाहावयाचे आहे; पण हे पाहण्याआधी जरा पूर्व- इतिहासाचे अवलोकन करणे अवश्य आहे. मराठ्यांच्या या स्वराज्य- स्थापनेच्या उद्योगाला प्रारंभ झाला तो सतराव्या शतकाच्या मध्याला, छत्रपतींचा उदय झाला तेव्हा. त्याच्या आधी महाराष्ट्र तीनशे-साडेतीनशे वर्षे पारतंत्र्यात होता. १२९६ सालीच अल्लाउद्दिनाने देवगिरीच्या रामदेवरावाला मांडलिक करून टाकले होते. मग तेथपासून शिवोदय होईपर्यंत एवढ्या प्रदीर्घकाळात मराठे काय करीत होते हे पाहणे उद्बोधक ठरेल. विजयनगरच्या धुरीणांनी पारतंत्र्य आल्यावर पंचवीस-तीस वर्षांतच ते नष्ट केले व स्वराज्याची स्थापना केली. मग हीच गोष्ट महाराष्ट्रात मराठ्यांना का शक्य झाली नाही हे पाहिल्यावाचून पुढे जाणे युक्त ठरणार नाही.

दुबळी बहामनीसत्ता :
 मदुरेला स्थापन झालेल्या मुस्लीम सत्तेपेक्षा कलबुर्ग्याला हसन गंगू याने स्थापिलेली बहामनी सत्ता जास्त प्रबळ होती असे मुळीच नाही. मागल्या प्रकरणात सांगितलेली एकंदर मुस्लीम सत्तांच्या ठायीची सर्व भेदकारणे, सर्व विघटन बीजे बहामनी सत्तेच्या ठायीही होती. शिया व सुनी हा भेद तर दर पिढीला जाणवत असे. एक सुलतान शिया तर त्याचा मुलगा सुनी. यामुळे दरवेळी सर्व कारभाराला हादरा बसे. दक्षिणी- परदेशी हा भेद तर इतका विकोपाला गेला होता की, राजधानीत त्यामुळे वरचेवर तीन-तीन चार-चार दिवस वेबंदशाही माजे, रक्तपात होई. दर पिढीला वारसाचे कलह कायम चालू असत. बहुतेक सुलतान व्यसनासक्त, मद्यपी, विलासमग्न असत. सरदारांची वैमनस्ये एकमेकांच्या खुनापर्यंत जात. अशा स्थितीत कोणत्याही सत्तेला दृढता येणे शक्यच नव्हते; पण तरीही मराठ्यांना तो बहामनी सत्ता नष्ट करता आली नाही. १४९० च्या सुमारास बहामनी सत्तेची पाच शकले झाली व आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा त्या एकीच्या पाच शाह्या झाल्या. यामुळे तर ती सत्ता आणखीच कमजोर झाली. पण यांपैकी एकाही शाखेचे राज्य हिंदूंना साडेतीनशे वर्षांत घेता आले नाही. विचित्र गोष्ट अशी की, एलिचपूरला इमादशाही स्थापन करणारा फत्तेउल्ला व अहमदनगरला निजामशाही स्थापन करणारा बहिरी हे मूळचे हिंदु ब्राह्मण होते. ते हिंदू असताना स्वतंत्र राज्य स्थापणे त्यांना शक्य झाले नाही; पण मुसलमान होताच ते कर्तृत्व त्यांच्या ठायी सहज आले, याचा हिंदुधर्मशास्त्राने फार गंभीरपणे विचार केला पाहिजे. विजापूर स्थापणारा यूसफ आदिलशहा हा तुर्कस्थानातून आलेला व बेदरचा कासम बेरीद येथलाच पण गुलाम होता. त्या दोघांना स्वतंत्र सत्ता स्थापन करणे सहज शक्य झाले. पण हिंदूंतील चंद्रसूर्यवंशांतल्या, छत्तीस कुळांतल्या, मौर्य, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांच्या कुळांतल्या कोणालाही हे जमले नाही. बहामनी राज्य स्थापन झाले त्या वेळची हकीकत अशीच उद्वेगजनक आहे. या राज्याचा संस्थापक हसन ऊर्फ जाफरखान हा मूळचा एक गुलाम. केवळ आपल्या कर्तृत्वाने वर चढत जाऊन सरदार झालेला आणि तघ्लखाचा सेनापती म्हणून दक्षिणेत आलेला. त्याला दिल्लीच्या सत्तेला शह देऊन दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापिता आले. याच वेळी सिसोदे कुळातील दोन पुरुष सजनसिंह व क्षेमसिंह हेही दक्षिणेत, महाराष्ट्रात आले होते. त्यांनी काय पराक्रम केला ? त्यांनी दक्षिणेत राज्य स्थापण्यास जाफर खानाला साह्य करून त्याच्याकडून दहा गावांची जहागीर मिळवली ! तो गुलाम, त्याने राज्य स्थापिले आणि हे राजपुत्र, यांनी पाटिलकी मिळवली व गुलामी स्वीकारली ! कारण तो मुसलमान होता व हे हिंदू होते.

मुस्लीम धर्म व राज्य :
 हे विधान जरा विचित्र व अत्युक्त वाटेल; पण मागल्या प्रकरणातील स्वराज्य व स्वधर्म यांच्या अभेदाविषयीचे विवेचन पुन्हा जरा बारकाईने वाचले तर ते अगदी यथार्थ आहे असे ध्यानात येईल. मुस्लिमांनी या अभेदाचा कधी विसर पडू दिला नव्हता. जेव्हा जेव्हा ते स्वाऱ्या करीत, आक्रमणे करीत, राज्ये स्थापीत तेव्हा त्यामागे धर्मप्रसार हा एक प्रधान हेतू निश्चित असेच असे. जो जो मुस्लीम तो जवळचा व हिंदू हा निश्चित शत्रू ही भूमिका त्यांनी, काही अपवाद वजा जाता, कधी सोडलीच नाही. त्यामुळे राज्य स्थापन करताच सक्तीने धर्मांतर करणे आणि हिंदूंच्या कत्तली करणे किंवा त्यांवर जिझीया कर लादून व इतर बंधने घालून, त्यांचा अनन्वित छळ करून त्यांना जगणे असह्य करून टाकणे हे धोरण ते अवलंबीत. आज पाकिस्तानात हेच चालले आहे. मग त्या मागल्या काळी काय असेल याची कल्पनाच करणे बरे. सत्ता हाती येण्यापूर्वीही मुल्ला, मौलवी, अवलिया हे त्या प्रदेशांत ठाण मांडून धर्मप्रसाराचा उद्योग चालू करीत आणि या धर्मप्रसारातूनच राजसत्तेचा पाया रचीत. उलट हिंदू या काळच्या सुमारास संन्यास, निवृत्ती, मायावाद, मोक्ष, परलोक यांच्या आहारी जाऊन स्वराज्य, साम्राज्य यांविषयी उदासीन होत चालले होते. त्यामुळे हाती राजसत्ता असूनही राज्य चालविण्यासाठी जो साक्षेप, जी सावधता, जी दूरदृष्टी अवश्य असते ती त्यांच्या बुद्धीतून नष्ट होत चालली होती.
 यादवांचे राज्य असतानाच सूफी पंथाच्या मुस्लीमांनी महाराष्ट्रात जो धर्मप्रसार केला त्यावरून या विधानाची सत्यता ध्यानी येईल. दौलताबाद (देवगिरी) व त्याच्याजवळचे खुल्ताबाद येथे मोमीन आरीफ व जलालुद्दिन गुंजरवा या मुसलमान साधूंच्या कबरी आहेत. हे दोघेही तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात, म्हणजे यादवांच्या राजवटीतच, दक्षिणेत धर्मप्रसाराचे कार्य करीत होते. सूफी सरमस्त हाही अरबस्थानातून तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे येऊन स्थायिक झाला होता. त्याच्याबरोबर शेकडो फकीर व शिष्य होते. दिल्लीहून त्याच्या मदतीकरिता आलेल्या पठाणांच्या साह्याने तेथील सुभेदाराला मारून त्याने मुस्लीम धर्मप्रसाराचे कार्य सुरू केले. हा १२८० च्या सुमारास मृत्यू पावला. दुसरा एक सूफी हयात कलंदर हा वऱ्हाडात मंगरूळपीर येथे याचे आधीच ते कार्य करीत होता. मंगरुळ गावी मंगळ नावाचा राजा होता. त्याची व कलंदरची झटापट होऊन मंगळ मारला गेला. त्यामुळे कलंदराचा वचक सर्वत्र बसून हिंदूंना इस्लामधर्माची दीक्षा देण्याचे कार्य त्याला निर्वेधपणे करता आले. हा इ. स. १२५८ मध्ये मृत्यू पावला. १२७० च्या सुमारास वरंगळमध्ये काकतीयांचे राज्य होते. त्यांच्या राजवटीत अतिशय दंडेली करून मुस्लीम सूफी लोक धर्मप्रसार करीत होते. त्यांत जे मारले जातील त्यांना ते शहीद समजत व त्यांचे गुणगान करून लोकांना चेतवीत आणि हे सर्व हिंदू राजांच्या राजवटीत चाले.

हिंदुधर्माची तरुणता :
 १२९६ साली अल्लाउद्दिनाने देवगिरीवर स्वारी केली. त्याच्या पाठोपाठ मुंतजबोद्दिन जर्जरीबक्ष हा सातशे सहकाऱ्यांना बरोबर घेऊन इ. स. १३०० मध्ये दक्षिणेत येऊन दौलताबादेजवळ खुल्ताबाद येथे स्थायिक झाला. मोईजोद्दिन हा त्याचा सहकारी त्याच्याबरोबरच आला होता. हा नंतर पैठणास गेला व तेथे असलेली महालक्ष्मी, रेणुकादेवी व गजानन यांची मंदिरे पाडून तेथे त्याने मशिदी उभारल्या. महानुभावांच्या स्थानपोथीत 'महालक्ष्मीचे देऊळ, पूर्वाभिमुख, एकवीरा दक्षिणाभिमुख विनायेकू, त्याची मसीद केली' असा उल्लेख आहे. पैठणला असा जम बसल्यावर पुणे, पेण, विजापूर, येथे आपले शिष्य पाठवून त्याने हिंदूंना इस्लामची दीक्षा देण्याचे काम सपाट्याने सुरू केले. लक्ष्मी, रेणुका, गजानन यांची मंदिरे पाडली गेली तेव्हा पैठणला यादवांचीच सत्ता होती; पण त्यांनी या इस्लामी आक्रमणाचा कसलाही बंदोबस्त केला नाही. (सूफी संप्रदाय- सेतुमाधवराव पगडी- प्रकरण ९ वे.) एक राजा फार तर गाफील असेल; पण इतर सरदार, सेनापती, हेमाद्रीसारखे पंडित काय करीत होते ? या अत्याचाराची कोणीही दखल घेऊ नये याचा अर्थ काय होतो ? या अत्याचारांचा अर्थ काय, त्यांतून कोणते संकट कोसळण्याची शक्यता आहे, त्याचा राज्यनाशाशी किती निकट संबंध आहे हे काही जाणण्याची ऐपतच देवगिरीला कोणाच्या ठायी नव्हती असे दिसते. राज्यनाश लांब राहिला. या हिंदुदेवता आहेत, ही धर्मपीठे आहेत, त्यांचा धर्माशी संबंध आहे हे तर त्यांना कळत होते ना ? पण तरीही त्यांना चीड आली नाही, त्यांचा संताप झाला नाही. ते सर्व याविषयी उदासीन होते. यादव राजांची स्तुती करताना, हेमाद्रीने म्हटले आहे की, कलियुगामुळे धर्म क्षीण झाला होता, त्याला त्यांनी पुन्हा तरुणता प्राप्त करून दिली. पण या तरुणतेत मंदिरांचे व स्त्रियांचे रक्षण हे येत नव्हते. मग काय येत होते ? हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणीवरून ते कळेल. व्रते- वैकल्ये, उपासतापास, तिथिवार, नक्षत्र, त्यांची त्यांची पक्वान्ने, देवांच्या आवडी- निवडी, या सर्वात धर्माचे तारुण्य होते. मंदिरांच्या रक्षणाचा, आक्रमणाच्या प्रतिकाराचा त्याशी काही संबंध नव्हता. विद्यारण्य, विद्यातीर्थ यांनी आक्रमणाच्या प्रतिकाराचा व धर्माचा संबंध अविभाज्य मानून त्या तत्त्वाचा प्रसार कर्नाटकात केला तसा देवगिरीच्या पंडितांनी केला असता तर मलिक काफूरला नर्मदेच्याखाली उतरता आलेच नसते. पण महाराष्ट्रात हिंदुधर्माला राजधर्मांचे, राष्ट्रधर्माचे रूप आलेच नाही. तीनशे वर्षांनी छत्रपतींनी व समर्थांनी ते रूप दिले, धर्मक्रान्ती केली तेव्हा स्वराज्यस्थापना झाली.
 या तीनशे वर्षांच्या काळात ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम हे संत महाराष्ट्र समाजाचे धर्मक्षेत्रातील नेते होते. पण हे संत व त्यांचे अनुयायी पूर्णपणे निवृत्तिवादी होते. संसार, स्त्रीपुत्र, धनवित्त, राज्य, ऐश्वर्य यांची त्यांनी कमालीची निंदा केली आहे. त्यांचा भक्तिमार्ग हा व्यक्तिधर्म होता. लो. टिळकांनी म्हटल्याप्रमाणे भागवतधर्म हा मूळचा प्रवृत्तिवादी. गीतेतला कर्मयोग तो हाच. पण भागवतपुराणाचा भागवतधर्म हा त्याहून निराळा आहे. तो निवृत्तिवादी व व्यक्तिनिष्ठ आहे. संतांनी त्याचाच महाराष्ट्रात प्रसार केला. या धर्मामुळे हिंदू हे निदान हिंदू तरी राहिले, नाही तर सर्व महाराष्ट्र व हिंदुस्थानही इस्लाममय झाला असता, हे राजवाड्यांचे म्हणणे काहीसे खरे आहे; पण विजयनगरचे साम्राज्य झाले नसते, तेथील सम्राटांनी इस्लामच्या प्रसाराला लष्करी सामर्थ्याने पायबंद घातला नसता, महाराष्ट्रातील बहामनी राज्यावर सारखी धाड घालून त्याला हतप्रभ केले नसते तर महाराष्ट्र इस्लाममय होण्याचे कितपत टळले असते याची शंकाच आहे. आणि येथे नंतर शिवछत्रपतींचा उदय झाला नसता तर हिंदुस्थानवरची ती आपत्ती टळली असती असे वाटत नाही. या दोन प्रवृत्तिधर्मांच्या शक्ती निर्माण झाल्या नसत्या तर सिंध, अयोध्या, बंगाल, बिहार येथल्याप्रमाणे मुमूर्षू स्थितीत फार तर, हिंदू टिकून राहिले असते.

विठ्ठलाच्या लीला :
 बहामनी इतिहासाचे समालोचन करताना नानासाहेब सरदेसाई लिहितात- 'त्या काळचे सर्व इतिहास मुसलमानांनी लिहिलेले आहेत. हिंदूंनी लिहिलेला एकही इतिहास- ग्रंथ नाही. त्या राज्यामध्ये मुसलमानांचे वर्चस्व असे. हिंदू लोक हलक्या नोकऱ्या व शेतीभाती करून स्वस्थ असत. ब्राह्मणी राज्यात इतकी बंडे झाली, इतक्या लढाया झाल्या व इतक्या राज्यक्रान्त्या झाल्या, पण कोणत्याही खटपटीत हिंदू लोक अग्रेसर असल्याचे आढळत नाही.' (मुसलमानी रियासत, भाग १ ला, आवृत्ती १८९८, पृ. २७२) बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यावर अनेक मराठा सरदार उदयास आले; पण आश्चर्याची गोष्ट अशी की, एकही सरदार कधी विजयनगरच्या हिंदू राजांना मिळाला नाही किंवा एकाही पंडिताने विजयनगरपासून स्फूर्ती घेऊन राजधर्म, प्रवृत्तिवाद शिकविणारा ग्रंथ लिहिला नाही. स्वराज्य, स्वातंत्र्य या कल्पनांना ते किती पारखे झाले होते हे त्यांनी विठ्ठलाच्या ज्या लीला वर्णन केलेल्या आहेत त्यांवरून स्पष्ट दिसते. परमेश्वर नेहमी भक्तांसाठी धावत येत असे आणि तो काय करीत असे ? मुस्लीम सत्ता नष्ट करावी, हिंदू सन्य निर्माण करावे, लढायांत हिंदूंना जय मिळवून द्यावा, असे उद्योग त्याने केले काय ? मुळीच नाही. जनाबाईला दळण- कांडणाला मदत करणे, सेना न्हाव्याचे रूप घेऊन बादशहाची हजामत करणे, महाराचे रूप घेऊन पैशाचा भरणा करणे, देवळाचे तोंड पूर्वेकडून पश्चिमेला फिरविणे या लीलांत तो मग्न असे. सेना न्हावी किंवा दामाजी या भक्तांना छळणाऱ्या बादशहांना पदभ्रष्ट करून मराठ्यांना सत्तारूढ करावे असे देवाच्या कधी स्वप्नातही आले नाही ! पण माणसांच्या स्वप्नांत जे आले नाही ते देवाच्या कसे येणार ? माणसांना त्या काळी स्वराज्य, स्वातंत्र्य हे स्वप्नातही दिसत नव्हते. तीनशे वर्षांनी समार्थाना ते दिसले आणि 'स्वप्नीं जें देखिलें रात्रीं तें तें तैसेंचि होतसे' या न्यायाने ते प्रत्यक्षात घडूनही आले.

रूढ धर्माचा उच्छेद :
 तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर शिवछत्रपतींना स्वराज्याची स्थापना करण्यात यश आले ते त्यांनी आधी धर्मक्रान्ती घडवून आणली यामुळेच होय. व्यक्तिधर्माला समाजधर्माचे रूप देणे, राजधर्मात सर्व धर्माचा समावेश होतो हे लोकांच्या मनावर ठसविणे, स्वराज्य व साम्राज्य यांना पाठमोरा झालेला धर्म त्या ध्येयाच्या मागे उभा करणे, थोडक्यात म्हणजे स्वराज्य व स्वधर्म यांचा संयोग घडवून धर्माला समाज संघटनेचे तत्त्व मानणे हीच ती क्रान्ती होय. महाराजांनी विचार केला, "आपण हिंदू, सर्व दक्षण देश म्लेंच्छांनी व्यापला. धर्म बुडविला. हा रक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षू व आपले पराक्रमाने नवीन दौलत संपादू. पुरुष प्रयत्न बळवत्तर, दैव पंगू आहे, यास्तव प्रयत्ने अचल करावे, त्यास दैव जसजसे सहाय होईल तसतसे अधिक करीत जावे, देव परिणामास नेणार समर्थ आहे." धर्मरक्षणासाठी प्राण वेचावे लागतात, हा विचार या भूमीतून नाहीसाच झाला होता. छत्रपतींनी तो येथे रूढविला आणि त्यामुळे तीनशे वर्षांत येथे जे घडू शकले नव्हते ते चमत्कारासारखे पाचपंचवीस वर्षांत घडून आले. महाराजांना नवी दौलत संपादावयाची होती आणि रूढ हिंदुधर्म तर दर पावलाला त्यांना अडवीत होता. त्यामुळेत्या रूढ धर्मकल्पनांचा उच्छेद करीतच त्यांना मार्ग क्रमावा लागला. समुद्र- गमननिषेधाची रूढी त्यांनी झुगारून दिली व जलदुर्ग बांधून आरमार निर्माण केले. पतितांची शुद्धी रूढ धर्मशास्त्राला मान्य नव्हती, पण ते धर्मशास्त्र बाजूस ठेवून त्यांनी नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना परत स्वधर्मात वेतले. 'कलावाद्यंतयोः स्थितिः।' कलियुगात ब्राह्मण व शूद्रच फक्त आहेत,क्षत्रिय वैश्यांचे अस्तित्वच नाही, हे महामूर्ख वचन तर त्यांनी अगदी हेटाळून टाकले व 'क्षत्रियकुलावतंस' असे स्वतःला म्हणवून घेऊन विधियुक्त राज्याभिषेकही त्यांनी करवून घेतला. त्या काळी हिंदुधर्माला इतके हीन व समाजघातक रूप आले होते की, ज्याला काही 'नवे साधावयाचे' होते त्याला त्यात आमूलाग्र परिवर्तन घडविल्यावाचून गत्यंतरच नव्हते आणि 'नवे साधावे हेच या कुलात जन्मल्याचे सार्थक' हे तर छत्रपतींचे ब्रीद होते.

छत्रपतींची नवी सृष्टी :
 छत्रपतींनी हे 'नवे' काय साधले? त्यांनी या महाराष्ट्रभूमीत नवे राष्ट्र निर्माण केले सुर्वे, मोरे, सावंत, जेधे इ. मराठा देशमुख, सरदेशमुख, सरंजामदार, वतनदार हे सर्व विजापूरचे ताबेदार होऊन आपापल्या मुलखातील प्रजेकडून महसूल वसूल करून पातशहाकडे त्याचा भरणा करणारे त्याचे मुनीम झाले होते आणि आपल्या वतनापलीकडे त्यांना कसलीच दृष्टी नसल्यामुळे त्यासाठी आपसात त्यांच्या कायमच्या लढाया चालू असत. अवचित छापा घालून एकमेकांची घरेदारे जाळून टाकणे, बायकामुलांसकट सर्वाची कत्तल करणे, कपटाने खून करणे, हे त्यांचे नित्याचे उद्योग होते. अशा या मराठ्यांना छत्रपतींनी एक नवी दृष्टी दिली. त्यांच्या ठायी आपण सर्व 'मराठे' आहो ही भावना निर्माण केली आणि स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांना देऊन त्यांच्यांत नवचैतन्य निर्माण केले. जदुनाथ सरकार यांनी शिवछत्रपतींच्या कार्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. ते म्हणतात: "शिवाजी हा हिंदुजातीने निर्माण केलेला शेवटचा महाप्रज्ञासंपन्न असा राष्ट्रनिर्माता होय. त्याची सृष्टी- त्याची सेना, त्याचे आरमार व त्याच्या संस्था- ही त्याची स्वतःची होती. त्यात इतरांच्या अनुकरणाचे काही नव्हते. त्याच्या उदयापूर्वी मराठा समाज अनंत सवत्या सुभ्यांमुळे छिन्नभिन्न झाला होता. त्यांना संघटित करून त्यांचे त्याने एक राष्ट्र घडविले आणि दिल्लीचे मोगल, विजापूरचे पातशहा, गोव्याचे पोर्तुगीज व जंजिऱ्याचे हबशी या सत्तांशी मुकाबला करून त्यांची आक्रमणे निर्दाळून, त्याने हे साधले, हे विशेष होय. त्याच्यापूर्वी मराठे हे सरदार होते; पण ते परक्यांचे दास होते. राज्यकारभारात त्यांना कसलेही स्थान नव्हते. ते लढाईत पराक्रम करीत, आपले रक्त सांडीत; पण ते परक्यांचे सेवक म्हणून. लढाईचे नेतृत्व त्यांच्याकडे नव्हते. अशा स्थितीत दिल्ली व विजापूर यांना आव्हान देऊन आपण स्वतंत्रपणे युद्धाचे नेतृत्व करू शकतो हा आत्मविश्वास शिवाजीने त्यांच्या ठायी निर्माण केला. हिंदुजात ही राष्ट्र निर्माण करू शकते, सेना व आरमार निर्माण करू शकते व स्वराज्य स्थापून ते यशस्वी करू शकते हे त्याने सिद्ध करून दाखविले. हिंदुत्व हा वठलेला वृक्ष नसून अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतरही तो पुन्हा फुटू शकतो, शाखापल्लवांचा त्याला अजूनही बहर येणे शक्य आहे आणि अनेक शतकांच्या अत्याचारांनंतरही पुन्हा उठून गगनाला भिडण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी आहे हे शिवाजीने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले." (शिवाजी अँड हिज टाइम्स, ५ वी आवृत्ती, पृ. ३८५-८६).

नवे संघटना-तत्त्व :
 ही महाक्रान्ती घडविण्याच्या कार्यात छत्रपतींना समर्थांचे सर्वतोपरी साह्य झाले हे विश्रुतच आहे. समर्थांनी प्रवृत्तिधर्माचा उपदेश केला, 'मनासारिखी सुंदरा ते अनन्या' हे स्तोत्र लिहून संसाराचा गौरव केला, धनाचे माहात्म्य जाणून लोकांना 'प्रपंची पाहिजे सुवर्ण' हे समजावून दिले, 'शक्तीने मिळती राज्ये,' हे रोकडे सत्य समाजमनावर बिंबविले, 'यत्न तो देव जाणावा' 'साक्षेपी वंश देवाचे, आळशी वंश दानवी' हे सांगून दैववादाची निर्भर्त्सना केली आणि अशा रीतीने मराठासमाजाला काही अंशी भौतिक दृष्टी दिली. हे त्यांचे कार्य असामान्यच आहे; पण त्यांचे खरे कार्य म्हणजे या समाजाला त्यांनी एक नवे संघटनतत्त्व दिले हे होय. 'मराठा तितुका मेळवावा' हे ते महातत्त्व होय. शिवछत्रपतींना याच तत्त्वाचा साक्षात्कार झालेला होता. त्यांनी मराठा समाजाची संघटना करण्याचे कार्य आरंभिले ते याच तत्त्वावर. समर्थांनी याच तत्त्वाचे विवेचन केले आणि त्याच्या दृढीकरणासाठी मठांची स्थापना करून सर्व समाजात ते प्रसृत करण्याचा प्रयत्न केला.
 पूर्वपरंपरा, मातृभूमी व भाषा यांच्या अभिमानाने पृथगात्म झालेल्या समाजाची जी संघटना ते राष्ट्र होय. या राष्ट्रकल्पनेचा उदय युरोपात नुकताच झाला होता आणि इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली अशी भिन्न राष्ट्रे तेथे उदय पावत होती. त्यांपैकी राष्ट्रतत्त्वावर प्रत्यक्ष समाजसंघटना करण्याचे साधले ते फक्त इंग्लिशांना. इतर लोकांना एकुणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यात यश आले नव्हते. अशा या 'राष्ट्र' शक्तीचे दर्शन भारतात सतराव्या शतकात समर्थांना व्हावे यातच त्यांचे अलौकिकत्व आहे. 'राष्ट्र' तत्त्वाच्या बुडाशी समाजशक्तीची जागृती, हा विचार प्रधान आहे हे जाणूनच समर्थांनी त्या शक्तीचे महत्व समाजाला पटवून देण्याचे यावत्शक्य प्रयत्न केले. 'सकल लोक एक करावे, गलीम निवटून काढावे, ऐसे करिता कीर्ती धावे दिगंतरी ॥ बहुत लोक मेळवावे, एकविचारे भारावे, कष्टे करूनि घसरावे म्लेंछावरी ॥ आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥' या संभाजीला लिहिलेल्या पत्रातील तीन ओव्यांत समर्थांचे सर्व तत्त्वज्ञान स्पष्ट झाले आहे. राष्ट्र घडवावयाचे म्हणजे 'लोक' ही शक्ती जागृत व संघटित केली पाहिजे हे समर्थांनी अचूक जाणले होते. हे लोक एका मर्यादित भूभागातील असून काही वैशिष्ट्याने इतरांपासून पृथक असले पाहिजेत, त्यांना स्वतंत्र अस्मिता निर्माण झाली पाहिजे हेही त्यांनी आकळिले होते. म्हणूनच 'मराठा तितुका मेळवावा, आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा' हा त्यांचा आग्रह होता. हे नवे तत्त्व आहे हे लोकांना समजावून दिले पाहिजे, त्यांच्या रक्तात उतरविले पाहिजे, हे ध्यानी घेऊन त्यांनी शेकडो ठिकाणी फिरून फिरून ते विवरिले आहे आणि 'विवरिले तेचि विवरावे' असा आपल्या महंतांना आदेश दिला आहे. 'सर्वही पेरणे विद्या लोकांमध्ये हळूहळू, नेणते-जाणते करणे, कथा निरूपणे सदा!' 'लोक हे राखिता राजी सर्व राजीच होतसे.' 'जन हे वोळती तेथे अंतरात्माचि वोळला.' 'समर्थापाशी बहुतजन, राहिला पाहिजे साभिमान', 'जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक,' 'जनी जनार्दन वोळला, मग काय उणे तयाला?' 'जो मानिला बहुतांसी, कोणी बोलो न सके त्यासी, धगधगीत पुण्यराशी महापुरुष' या वचनांमधून समर्थांना लोकशक्तीचा, राष्ट्रकल्पनेचा साक्षात्कार कसा झाला होता आणि 'जे आपणांसि ठावे झाले ते इतरांस शिकवून सकळ जन शहाणे करण्याचा' त्यांनी केवढा प्रयत्न चालविला होता हे ध्यानी येईल.
 भारतातल्या इतर प्रदेशांत हे संघटनतत्त्व त्या काळी कोणी जाणले नव्हते. 'रजपूत तेवढा मेळवावा', 'गुर्जर तेवढा मेळवावा' बंगाली, पंजाबी, कर्नाटकी, तामिळी यांची या तत्त्वावर संघटना करावी, असे स्फुरण महाराष्ट्राखेरीज अन्यत्र कोठेही झाले नव्हते. इस्लामी आक्रमणाचा निःपात करण्यात मराठ्यांना इतरांपेक्षा जास्त यश आले आणि एका शतकाच्या आतच त्यांनी ते कार्य पुरे करून टाकले याचे हे कारण आहे. स्वराज्य व स्वधर्मं यांचा संयोग तर त्यांनी घडवून आणलाच. 'देवद्रोही तितुके कुत्ते, मारूनि घालावे परते' देवदास पावती फते, यदर्थी संशय नाही ॥, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुखबडवा का बुडवावा, धर्मसंस्थापनेपाठी ॥ या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हांकरिता ॥ या वचनांवरून ते स्पष्टच आहे; पण त्याशिवाय मराठ्यांचे एक राष्ट्र घडवावे, या नव्या तत्त्वावर या समाजाची संघटना करावी, हे या दोन महापुरुषांचे प्रयत्न होते, हे वरील विवेचनावरून ध्यानी येईल. महाराष्ट्रात सतराव्या व अठराव्य शतकांत जी भारतव्यापी अशी एक प्रचंड शक्ती निर्माण झाली ती संघटनेच्या या नव्या तत्त्वातून निर्माण झाली यात शंका नाही.

स्वातंत्र्य युद्ध :
 या शक्तीचेच प्रत्यंतर औरंगजेबाशी झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात आले. संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ अठरा वर्षे हा संग्राम चालू होता. त्या काळात मराठ्यांचे नेतृत्व करील असा राजपुरुष कोणीच नव्हता. अखिल महाराष्ट्राचा एकमेव नेता असा अन्य पुरुषही या वेळी कोणी नव्हता. तरी औरंगजेबासारख्या अत्यंत प्रबळ शत्रूला मराठ्यांनी खडे चारले. पूर्वीच्या काळात एकेक दोन वर्षांत मुस्लीमांनी हिंदु राज्यांचा पाडाव केला होता. मलिक- काफुराने नर्मदेखालची अवघी दक्षिण पंधरा-वीस वर्षांत पादाक्रांत केली. तेथल्या चारही सत्ता अल्पावधीत धुळीस मिळविल्या; पण आता औरंगजेबासारखा अत्यंत बलाढ्य पातशहा आपल्या सर्व सामर्थ्यानिशी जातीने लढत असताना त्याला मराठ्यांना जिंकता आले नाही. त्याची अफाट सेना, त्याचे धुरंधर सेनापती, पोक्त सरंजाम, अक्षय्य खजिना हे सामर्थ्य मागल्या कोणत्याही मोहिमेपेक्षा भारी होते; पण ते सर्व व्यर्थ झाले, फजीत पावले ! सर्वश्रेष्ठ अशा मुस्लीमसत्तेचाही निःपात करील अशी एक भारी शक्ती महाराष्ट्रात त्या वेळी निर्माण झाली होती याचेच हे द्योतक होय.

निष्ठाहीन सरदार :
 रामचंद्रपंत अमात्य, संताजी, धनाजी, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक, खंडो बल्लाळ या थोर पराक्रमी पुरुषांनी एकजुटीने कार्य करून औरंगजेबासारख्या बादशहाला नामोहरम केले. 'बादशहाने राज्यानिमित्त आपला संपूर्ण पराक्रम व अर्थवैभवादि सर्व शक्ती वेचली. तथापि परिणामी हतोद्यम होत्साता, पराङ्मुख होऊन यमलोकास गेला.' आणि अशा रीतीने मराठ्यांनी स्वातंत्र्ययुद्ध जिंकले. त्यानंतर औरंगजेबाचा पुत्र अजमशहा याने शाहूला सोडून दिले व तो दक्षिणेत आला; पण राजारामाची राणी ताराबाई हिला आपला पुत्र शिवाजी हाच खरा गादीचा वारस आहे असे वाटत होते. त्यामुळे शाहूला सर्व प्रकारे विरोध करण्याची तिने सिद्धता केली आणि त्या तिच्या कृत्यामुळे मराठ्यांची स्वामिनिष्ठा दुभंगली आणि त्याबरोबर स्वराज्यालाही तडा गेला. चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, हिंदुराव घोरपडे इ. प्रमुख सरदार ताराबाईस मिळाले व शाहूचा पक्ष उघडा पडला; पण हे येवढ्यानेच भागले नाही. धनाजी जाधवाचा मुलगा चंद्रसेन जाधव यास शाहूने धनाजीच्या मागे सेनापतिपद दिले होते. तो प्रथम ताराबाईस मिळाला; पण पुढे तिचाही पक्ष सोडून तो सरळ मोगलांना जाऊन मिळाल आणि त्याच्या मागून रंभाजी निंबाळकर, दमाजी थोरात, हिंदुराव घोरपडे, उदाजी चव्हाण, सर्जेराव घाटगे यांनीही तेच केले. याचा अर्थ असा की, स्वराज्य नाही, स्वधर्म नाही आणि स्वामीही नाही ! त्यांच्या ठायी कसलीही निष्ठा नव्हती. त्यांना फक्त स्वतःचे वतन दिसत होते. जो पक्ष प्रबळ होईल, आपल्या वतनाची हमी देईल, त्या पक्षाला ते मिळत. मग तो मोगल असो की मराठा असो. या सरदारांचीच वृत्ती अशी होती असे नाही. कोल्हापूरचा संभाजी हा तर छत्रपतींचा वंशज; पण तोही शाहूविरुद्ध निजामाला मिळाला. खुद्द शिवछत्रपतींचे पुत्र संभाजीमहाराज हे ते जिवंत असतानाच मोगलांना जाऊन मिळाले होतेः मग इतरांचे काय ? पण संभाजीमहाराजांनी शेवटी स्वधर्मासाठी आत्मार्पण करून आपल्या मागल्या दुष्कृत्यांची भरपाई केली. त्या त्यांच्या दिव्य त्यागामुळेच मराठ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आणि त्यांनी महापराक्रम करून स्वातंत्र्ययुद्ध जिंकले; पण संभाजीमहाराज असे एकटेच निघाले. बाकीचे जे वर सांगितलेले लोक त्यांना स्वराज्य वा स्वधर्म यांचे कसलेही सोयरसुतक नव्हते.

नवा मनू :
 सेनापतीसकट सर्व मोठे सरदार मोगलांना जाऊन मिळाल्यामुळे शिवछत्रपतींनी स्थापिलेल्या स्वराज्याचे अस्तित्वच धोक्यात आले होते. या वेळी बाळाजी विश्वनाथाचा उदय झाला आणि त्याने या सर्व प्रकारे विघटित व छिन्नभिन्न अशा मराठा समाजातून पुन्हा एक संघटित शक्ती निर्माण केली. ती शक्ती इतकी प्रभावी झाली की, स्वराज्याचा संभाळ तर तिने केलाच आणि शिवाय चढाईचे, आक्रमक धोरण स्वीकारून मराठा स्वराज्याचे साम्राज्य करण्याच्या उपक्रमाचा तिने पाया घातला. मोगल पातशहाचा दक्षिणचा सुभेदार सय्यद हुसेन व त्याचा भाऊ यांना दिल्लीच्या राजकारणात आपले वर्चस्व स्थापित करावयाचे होते. यासाठी त्यांनी या नवनिर्मित मराठा शक्तीचे साह्य मागितले. ही संधी साधून बाळाजी विश्वनाथाने लष्करासह दिल्लीला जाऊन स्वराज्याच्या व दक्षिणच्या साही सुभ्यांच्या चौथाईच्या व सरदेशमुखीच्या सनदा आणल्या. बाळाजीच्या या कर्तृत्वाचे वर्णन करताना नानासाहेब सरदेसाई म्हणतात, 'मराठमंडळाचे लक्ष घरगुती भांडणातून काढून बाहेरच्या उद्योगात लावण्याचा बाळाजी विश्वनाथाचा मतलब सिद्धीस गेला, आणि मराठ्यांच्या उद्योगाला नवीन क्षेत्र प्राप्त झाले. चौथाई- सरदेशमुखीचे हक्क मिळाल्यामुळे बाहेर संचार करण्याची मोकळीक मराठ्यांना मिळाली. स्वहित संभाळण्यासाठी आजूबाजूच्या सत्ताधीशांसंबंधाने चढावाची राज्यपद्धती स्वीकारावी लागते तसा बहुतेक प्रकार मराठ्यांचा झाला. या सनदांमुळे मराठ्यांच्या कारभारास नवीन वळण लागले. नवा मनू सुरू झाला. मराठशाहीचे हे रूपांतर बाळाजी पेशव्याने घडविले आणि पुढील पुरुषांनी त्याच्या परिपोषाचा उद्योग केला.' (मराठी रियासत, ५ पृ. १३८)

चौथाई सरदेशमुखी :
 मराठा साम्राज्याचा विकास पुढल्या पन्नास वर्षांत जो झाला तो या पद्धतीने झाला. चौथाईसरदेशमुखीची पद्धत शिवछत्रपतींनी सुरू केली होती व मराठ्यांच्या स्वराज्याच्या बाहेरचा जो मुलूख त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घ्यावयाची व त्याच्या बदल्यात एकंदर महसुलाचा चौथा हिस्सा त्यांनी व्यावयाचा आणि ही चौथाई वसूल करण्यासाठी जो खर्च होईल त्यासाठी महसुलाचा दहावा हिस्सा- सरदेशमुखी- त्यांना मिळावयाचा. शेजारच्या राज्यात आपली सेना बसवून तेथे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे व नंतर हळूहळू त्या प्रदेशात आपले राज्य स्थापावयाचे असे हे धोरण होते. ब्रिटिशांनी तैनाती फौजेची पद्धत अवलंबून याच प्रकारे आपले राज्य स्थापिले. तैनाती फौज म्हणजे चौथाई सरदेशमुखीचीच सुधारलेली आवृत्ती होती.
 दिल्लीच्या बादशहाने चौथाईचे हक्क मान्य केले तरी ते बादशहा अत्यंत दुबळे, कर्तृत्वशून्य व नालायक असल्यामुळे त्यांचे निरनिराळ्या प्रांतांवरचे सुभेदार मराठ्यांचे हे हक्क कधीच मान्य करीत नसत. त्यामुळे मराठ्यांना लढाया करून चौथाईचा ऐवज नेहमी वसूल करावा लागत असे. दक्षिणच्या सहा सुभ्यांचे- बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, कर्नाटक, बेदर व हैद्राबाद या प्रदेशांचे- चौथाईचे हक्क बादशहाने बाळाजी विश्वनाथाला दिले; पण या सहा सुभ्यांचा सुभेदार जो निजाम त्याने ते कधीच मान्य केले नाहीत. त्यामुळे मराठ्यांना त्याच्याशी वारंवार युद्धे करूनच ऐवज वसूल करावा लागत असे. निजाम व मराठे यांच्या लढाया झाल्या त्यांचे कारण हेच होते. त्यातूनच निजामाचा उच्छेद होऊन तेथे मराठी राज्याची प्रस्थापना झाली असती. ती का झाली नाही याचा विचार पुढे करू. सध्या या पद्धतीने मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान आक्रमून मोगली सत्ता हतबल कशी करून टाकिली ते पाहावयाचे आहे.

स्वराज्याचे साम्राज्य :
 १७२८ साली पालखेड येथे निजामाचा पूर्ण पराभव केल्यावर बाजीराव व चिमाजी यांच्या मनात मोठ्या आकांक्षा निर्माण झाल्या व हिंदुपदपातशाहीचे शिवछत्रपतींचे स्वप्न साकार करण्याचा उद्योग आता हाती घ्यावा असे त्यांनी ठरविले. मनाचा असा निश्चय होताच त्यांची नजर माळव्यावर गेली. माळवा हे दिल्लीच्या पातशाहीचे मर्मस्थान होते. ज्याच्या हातात माळवा तो उत्तर हिंदुस्थानचा स्वामी, हे ठरलेले होते. शिवाय औरंगजेबाशी युद्ध सुरू असतानाच त्याला शह देण्यासाठी, मराठ्यांनी माळव्यावर हल्ले सुरू केले होते. त्यानंतर आता बादशाही अमलात माळव्याच्या रयतेवर व तेथील रजपूत सरदारांवर अतिशय जुलूम होऊ लागला होता. रयत अगदी गांजून गेली होती व सरदार हैराण होऊन गेले होते. याच वेळी पेशव्यांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांनी ऐकली व स्वसंरक्षणासाठी त्यांना बोलावून सवाई जयसिंग, नंदलाल मंडलोई, वढवाणीचा ठाकूर अनूपसिंह व मांडवगडचे ठाकूर यांनी त्यांना सर्व प्रकारे साह्य करण्याचे आश्वासन दिले. या राजपुतांच्या साह्याच्या आधारावरच बाजीरावाने चिमाजीअप्पाची रवानगी माळव्यावर केली व त्यानेही अपूर्व पराक्रम करून गिरिधर व दयाबहादुर या बादशाही सरदारांस बुडवून माळवा जिंकला. शिंदे, होळकर, पवार या नवोदित मराठा सरदारांनी या वेळी पराक्रमाची शर्थ केली. म्हणूनच माळवा सर करून तेथे मराठ्यांना आपले राज्य प्रस्थापित करता आले. मराठ्यांनी माळव्यात उत्तम व्यवस्था लावून रयत इतकी सुखी केली की पाश्चात्य पौर्वात्य, सर्व इतिहासकार त्यांची यासाठी मुक्तकंठाने आजही प्रशंसा करतात. (माळवा इन ट्रॅझिशन- महाराज कुमारसिंग; सेंट्रल इंडिया- मालकम, खंड २ रा, पृ. ८२) माळव्यानंतर बाजीराव स्वतः बुंदेल खंडावर चालून गेला. या वेळीही बुंदेले रजपूत व त्यांचा राजा छत्रसाल यांनीच मराठ्यांना साह्यार्थ बोलाविले होते. महंमदखान बगष याने जैतपूरच्या लढाईत त्यांचा पराभव करून जैतपूरच्या किल्ल्यात छत्रसाल व त्याचे पुत्र यांना कैदेत ठेवले होते. बाजीरावाने जैतपूरला वेढा देऊन बंगषाची अन्नान्नदशा केली. तेव्हा बंगष शरण आला. माळव्याप्रमाणेच हाही विजय अपूव झाला व मराठ्यांचा अंमल यमुनातीरापर्यंत झाला. नानासाहेब सरदेसाई म्हणतात, 'हे एकंदर प्रकरण म्हणजे मराठे व रजपूत यांचे मोगल बादशाहीविरुद्ध धर्मयुद्धच होय. ते जिंकल्यामुळे 'हिंदूंचा पुरस्कर्ता' अशी बाजीरावाची कीर्ती झाली.' (मराठी रिसायत, ५।२, पेशवा बाजीराव, पृ. १४२) या मोहिमांपासूनच इन्दूर, धार, ग्वाल्हेर, सागर येथे मराठ्यांची कायमची ठाणी बसू लागली व तेथून त्यांचे उत्तरेतले उद्योग सुलभ होऊ लागले. याच वेळी शाहूच्या आज्ञेने कर्नाटक व गुजराथ या प्रदेशांत मराठ्यांनी मोहिमा सुरू करून तेथूनही ते चौथाई वसूल करू लागले. गुजराथेत तर त्यांनी माळव्याप्रमाणे राज्यच प्रस्थापित केले.

कालचक्र उलटविले :
 माळवा, गुजराथ व बुंदेलखंड पडल्यामुळे दिल्लीची पातशाही हादरून गेली व तेथल्या दरबारातच, मराठ्यांच्या आश्रयावाचून पातशाही तरणे यापुढे शक्य नाही, असे म्हणणारा एक पक्ष निर्माण झाला. दिल्लीच्या पातशाहीची अशी विकल स्थिती असतानाच श्रीमंत प्रौढ प्रताप राऊस्वामी तथा थोरले बाजीरावसाहेब यांनी २८ मार्च १७३७ रोजी दिल्लीवर स्वारी केली. ही स्वारी करून बाजीरावाने कालचक्रच फिरवून टाकले. १२९६ साली अल्लाउद्दिनाने दक्षिणेवर स्वारी केली तेव्हापासून पाचशे-साडेपाचशे वर्षे तुर्कांची, मोगलांची दक्षिणेवर स्वारी, असाच काळाचा लोट चालू होता. बाजीरावाने दोन्ही बाहूंनी त्याला कव घालून तो उलटून टाकला आणि मराठ्यांच्या दिल्लीवर, लाहोरवर, अटकेपार स्वाऱ्या सुरू झाल्या.
 दिल्लीच्या स्वारीने पातशाही तर हादरलीच; पण सर्व हिंदुस्थानही हादरले. मराठे ही एक नवी महाशक्ती निर्माण झाली हे अखिल भारतातील सत्ताधीशांनी व जनतेने जाणले. राजस्थानातील अनेक रजपूत सरदार पातशहाचा आश्रय सोडून उघड उघड मराठ्यांच्या आश्रयाला आले. यातच चिमाजीअप्पा याने कोकणात पोर्तुगीजांवर स्वारी करून वसई वेऊन भोवतालचा मोठा प्रदेश पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त केला. यामुळे, मराठे हे केवळ तुर्कांनाच भारी आहेत असे नसून पाश्चात्य सत्तांनाही निर्दाळू शकतात, असा त्यांचा लौकिक सर्वत्र झाला व बाजीरावाच्या रूपाने आपल्याला एक नवा समर्थ नेता लाभला असा हिंदूंना दिलासा मिळाला.
 दिल्लीच्या स्वारीनंतर पुढील दहा-पंधरा वर्षांत, चौथाईच्या पद्धतीने अखिल भारतावर वर्चस्व प्रस्थपित करण्याचा मराठ्यांचा उद्योग पूर्ण झाला. मराठ्यांच्या शक्तीला या वेळी सर्व बाजूंनी उधान येत होते व मोठमोठे कर्ते, पराक्रमी पुरुष महाराष्ट्रात निर्माण होऊन ते हिंदुस्थान आटोपीत होते. नागरपूरचा रघूजी भोसले हा अशा पराक्रमी पुरुषांपैकीच एक होता. १७४० साली अर्काटच्या नबाबाचा जावई चंदासाहेब हा, तंजावरच्या गादीवर असलेला शहाजीचा वंशज प्रतापसिंह भोसले याला उखडून टाकण्याच्या विचारात होता. त्या वेळी छत्रपती शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून रघूजी मोठी सेना वेऊन कर्नाटकात उतरला व त्याने घनघोर युद्ध करून नबाबाला ठार मारले, चंदासाहेबाला कैद केले व एक कोट रुपये खंडणी घेऊन नवाबाचा मुलगा सफदरअली यास अर्काटचा नबाब केले. याच वेळी मुरारराव घोरपडे यास त्रिचनापल्लीस ठेवून तेथे त्यानं मराठ्यांचे कायमचे ठाणे बसविले. कर्नाटकातून परत गेल्यावर बंगाल, बिहार व ओरिसा या पूर्व हिंदुस्थानातील प्रदेशांवर रघूजीने स्वाऱ्या करण्यास प्रारंभ केला. अलीवर्दीखान या पराक्रमी सरदाराने पातशाही सुभेदार सर्फराजखान यास मारून तो सर्व मुलूख बळकावला होता. १७५२ सालापर्यंत बंगालवर चार स्वाऱ्या करून भोसल्यांनी अलीवर्दीस वठणीवर आणले तेव्हा त्याने तीनही प्रांतांवरचा मराठ्यांचा चौथाईचा हक्क मान्य करून तसा तहनामा करून दिला. कर्नाटकाप्रमाणेच ओरिसातील कटक शहरी रघूजीने शिवरामभट साठे याला नेमून तेथेही मराठ्यांचे ठाणे कायम केले.

उत्तर हिंद :
 पूर्वेप्रमाणेच उत्तरेचे-दिल्लीचे- राजकारणही साधारण याच सुमारास शिजून तयार झाले. या वेळी मुसलमानांतच दोन पक्ष पडून बादशहाला मराठ्यांच्या संरक्षणाची गरज भासू लागली. बादशहा अहंमदशहा याने मनसूरअली सफदरजंग यास वजीर व गाजीउद्दीन यास बक्षी- सेनापती- नेमिले. याच वेळी रोहिल्यांचा उदय होत होता हे मूळचे अफगाण. नादिरशहाच्या स्वारीपासून यांच्या झुंडीच्या झुंडी भारतात येऊन राहू लागल्या. हळूहळू गंगा-यमुनांच्या दुआबाच्या उत्तरेकडच्या कटेरा प्रांतात त्यांची वसाहत होऊ लागली. रोहिले हे भयंकर आडदांड, तामसी व क्रूर होते. त्यांनी मूळच्या हिंदूंना कटेरातून हुसकून लावून तो प्रांत बळकावला. त्यामुळे त्याला रोहिलखंड असे नाव पडले. रोहिले हे सुनीपंथी असून वजीर सफदरजंग हा शिया होता. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला; पण हे निमित्त कारण होय. दिल्लीची पातशाही अगदी दुबळी झालेली रोहिल्यांना दिसत होती. तेव्हा पूर्वी लोदी व सूर या अफगाण वंशांनी जसे दिल्लीस राज्य स्थापिले होते, तसे पुन्हा स्थापण्याची स्वप्ने त्यांना पडू लागली, म्हणून त्यांनी दुआबात व अयोध्याप्रांतात बंडाळ्या माजविण्यास प्रारंभ केला. बादशाही सरदारांना व वजीराला त्यांना पायबंद घालणे शक्य होईना. म्हणून त्यांनी मराठ्यांची मदत घेण्याचे ठरविले. जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर या वेळी उत्तरेत होतेच. त्यांनी १७५० साली चौथाईचा करार करून दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी घेऊन पेशव्यांतर्फे तसा करार करून दिला. या कराराअन्वये ठठ्ठा, मुलतान (सिंध), पंजाब, रजपुताना व रोहिलखंड एवढ्या प्रदेशांत चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला आणि याच्या बदल्यात सिंधपासून काशीपर्यंत सर्व प्रदेशाचा बंदोबस्त मराठ्यांनी करावयाचा होता. यानंतर थोड्याच दिवसांनी बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांचे चौथाईचे हक्क मराठ्यांना कसे मिळाले ते वर सांगितलेच आहे. अशा रीतीने श्रीशिवछत्रपतींनी सुरू केलेल्या चौथाईच्या पद्धतीने मराठ्यांनी एका शतकाच्या आत सर्व हिंदुस्थान व्यापला व हिंदुपदपातशाहीच्या स्थापनेची सिद्धता केली.

धर्मसंग्राम :
 या वेळी दिल्लीची पातशाही जरी दुबळी झाली असली तरी तिचे निरनिराळ्या प्रांतांचे सुभेदार हे बरेच प्रबळ होते. दक्षिणेत निजाम व बंगालमध्ये अलीवर्दीखान यांनी मराठ्यांची सत्ता कधीच जुमानली नाही. मराठे त्यांना नमवीत तेवढ्यापुरते ते नमत; पण पुन्हा झगडा चालू करीत. अखिल हिंदुस्थानवर मुस्लीमांचे राज्य पुन्हा स्थापावे अशा त्यांच्या आकांक्षा होत्या. मराठ्यांना नमविण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही हे ध्यानात येताच त्यांनी वायव्येकडून पठाणी सुलतानांना बोलविण्याची पूर्वपरंपरा पुन्हा चालू केली. निजामाने नादिरशहाला याच कारणासाठी पाचारण केले होते; निदान तो यावा अशी त्याची प्रबळ इच्छा होती व म्हणूनच दिल्लीचा या वेळी तो वजीर असतानाही त्याने नादिरशहाला तोंड देण्याची कसलीच व्यवस्था केली नाही. निजामाप्रमाणेच रोहिल्यांच्याही आकांक्षा होत्या. त्यांचा तर अफगाणिस्तानशी घनिष्ठ संबंध होता. ती त्यांची मायभूमीच होती. निजाम व रोहिले या दोघांनाही दिल्लीच्या बादशहाबद्दल कसलेच प्रेम नव्हते. ते प्रचळ असते तर त्यांना हवेच होते; पण ते दुबळे असून हळूहळू मराठ्यांच्या आहारी जात आहेत व यामुळे कालांतराने दिल्लीला हिंदुसत्ता प्रस्थापित होईल, याचे त्यांना पराकाष्ठेचे वैषम्य वाटत होते. १७४५ पासून दिल्लीला शह देण्याचा मराठ्यांचा उद्योग स्पष्ट दिसू लागला होता आणि १७५० साली बादशहाने त्यांना चौथाईचे हक्क दिले तेव्हा रोहिल्यांना कसलीच शंका राहिली नाही. म्हणून त्यांनी अफगाणिस्तानचा सुलतान अहंमदशहा अब्दाली- दुराणी- याशी संधान बांधून त्याला पाचारण केले व अशा रीतीने दिल्लीला पठाणी सत्ता स्थापून हिंदुपदपातशाही निर्माण होण्याचा संभवच नष्ट करून टाकण्याचा डाव त्यांनी टाकला. मराठे व अबदाली यांचा संघर्ष सुरू झाला तो या कारणाने. बादशहाच्या वतीने सर्व उत्तर हिंदुस्थानचे रक्षण मराठ्यांना करावयाचे होते. बादशहाला व त्याच्या सरदारांना अवदाली व रोहिले सारखेच शत्रू वाटत असत. त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणूनच त्यांनी मराठ्यांचा आश्रय केला होता. आणि यातून होणारा अनर्थ दिसत असल्यामुळे रोहिल्यांचा त्याला कडवा विरोध होता. म्हणजे हा धर्मसंग्रामच होता.

अटकेपार :
 अबदालीने १७४८ सालीच हिंदुस्थानवर स्वारी केली होती. पुढील दहा-बारा वर्षांत त्याने आणखी तीन स्वाऱ्या केल्या. त्याच्या प्रतिकारार्थ मराठे सज्ज होते. अशा एका स्वारीतच रघुनाथरावाने अटकेपार मराठ्यांचा झेंडा रोवला व मराठ्यांच्या आकांशांना गगन ठेंगणे आहे, हे दाखवून दिले. शिंदे-होळकरांचा तर अबदाली व त्याचे सरदार यांशी सतत संघर्ष चालू होता. यातूनच पानपतचा संग्राम उद्भवून मराठ्यांचा त्यात पराभव झाला. या पराभवाने मराठ्यांच्या हिंदुपदपातशाहीच्या आकांक्षांना जबरदस्त धक्का बसला. त्यांचे ते स्वप्न जवळ- जवळ भंगूनच गेले; पण माधवराव सारखा कर्ता पुरुष पेशवाईवर आल्याने मराठ्यांनी ते स्वप्न पूर्णपणे भंगू दिले नाही. पुढील आठदहा वर्षांत पुन्हा उत्तरेत त्यांनी पाय रोवले व १७७० साली रोहिलखंडात शिरून तेथे रोहिल्यांचा संपूर्ण निःपात केला आणि बादशहाला ताब्यात घेऊन दिल्लीच्या तख्तावर आणून बसविले. अशा रीतीने पानपतच्या पराभवाची त्यांनी भरपाई केली. 'हिंदुपदपातशाही' या ग्रंथात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले आहे की, '१७७० नंतर मुस्लीमसत्ता भारतात निष्प्रभ झाली. हिंदुपदपातशाहीच्या मार्गातील एक विरोधी प्रभावी शक्ती म्हणून तिचा विचार करण्याचे आता कारण राहिले नाही!' सावरकरांचे हे म्हणणे सर्वथैव खरे आहे. अवनिमंडल निर्यवन करण्याचे मराठ्यांनी आरंभिलेले कार्य येथे पुरे झाले.

स्वप्न भंगले :
 पण हिंदुपदपातशाहीच्या मार्गातील एक विरोधी सत्ता ज्या शतकात मराठ्यांनी नष्ट केली त्याच शतकात तिच्याहून किती तरी पटींनी जास्त समर्थ अशी दुसरी सत्ता भारतात निर्माण होत होती आणि आता तिचा प्रभाव भारतात सर्वत्र जाणवू लागला होता. मराठ्यांनी पातशहा व दिल्ली यांना पुन्हा ताब्यात घेतले तेव्हा इंग्रजांनी सर्व बंगाल आक्रमिला होता व दिल्ली आक्रमिण्याच्या उद्योगास त्यांनी प्रारंभही केला होता; पण या वेळी महादजी शिंदे हा एक थोर, कर्ता व महापराक्रमी पुरुष मराठमंडळात उद्यास आला व त्याने पुढील पंचवीस वर्षे इंग्रजांच्या त्या उद्योगाला पायबंद घातला. त्याच्या मृत्यूपर्यंत इंग्रजांना दिल्लीकडे दृष्टी टाकण्याची छाती झाली नाही. या काळात राघोबा मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला गेल्याकारणाने, पुण्यावरच चालून जाऊन तेथे पेशव्यांच्या गादीवर त्याला स्थापून, मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणण्याचा डाव इंग्रजांनी टाकला होता; पण तळेगावच्या लढाईत त्यांचा पराभव होऊन त्यांना मराठ्यांशी अत्यंत नामुष्कीचा तह करावा लागला. त्यानंतर दक्षिणेत नाना फडणीस व उत्तरेत महादजी यांच्या प्रभावामुळे इंग्रजांना काही हालचाल करता आली नाही. १७९२ साली महादजीने दिल्लीच्या बादशहाकडून वकील इ-मुतलीकच्या सनदा आणून पेशव्यास अर्पण केल्या. या सनदांमुळे पेशवे पातशहाचे वजीर झाले व महादजी शिंदे बक्षी म्हणजे सेनापती झाले व अशा रीतीने पातशाही संपूर्णपणे हिंदूंच्या ताब्यात आली. यानंतर कालांतराने दिल्लीस हिंदुपदपातशाहीचीही स्थापना झाली असती; पण इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे मराठ्यांचा टिकाव लागला नाही. कदाचित आणखी काही वर्षे मराठेशाही टिकली असती; पण या सुमारास महादजी, हरिपंत फडके, रामशास्त्री असे कर्ते पुरुष काळाधीन झाले. सवाई माधवराव मृत्यू पावल्यामुळे नाना फडणिसाच्या मागची पुण्याई संपून तो निष्प्रभ झाला सर्व मराठा मंडळाची शक्ती संघटित करील असा प्रतापी पुरुष आता कोणीच राहिला नाही व नवा निर्माण झाला नाही. यामुळे हिंदुपदपातशाहीचे स्वप्न साकार होत येते न येते तोच ते भग्न झाले आणि इंग्रजांनी अखिल हिंदुस्थान आक्रमून तेथे आपले अधिराज्य स्थापन केले.

मूल्यमापन :
 मराठ्यांनी भारतातून मुस्लीम सत्तेचा समूळ नाश करून आपले वर्चस्व कसे प्रस्थापित केले त्याचे वर्णन व विवेचन येथवर केले. आता त्यांच्या या कार्याचे हिंदुसमाजाच्या संघटनेच्या व विघटनेच्या दृष्टीने मूल्यमापन करावयाचे आहे. हा मूल्यमापनाचा विचार मनात येताच अनेक प्रश्न समोर उभे राहतात. 'मराठ्यांचे साम्राज्य' असा शब्दप्रयोग नेहमी केला जातो त्याचा नेमका अर्थ काय? मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर माळवा, गुजराथ, ग्वाल्हेर व नागपूर या प्रांतांतच फक्त राज्य स्थापिले होते. संरक्षण, न्यायदान, करवसुली, चोरा- चिलटांचा बंदोबस्त ही शासनाची कर्तव्ये ते या प्रांतांपुरतीच पाहात असत. भारतातल्या इतर प्रांतांत ते फक्त चौथाईच्या वसुलीसाठी जात आणि ती लढाईवाचून कधीच वसूल होत नसल्यामुळे त्या वेळी अमाप लूटमार सहजच होई; पण याचा परिणाम फार वाईट होत असे. हे केवळ लुटारू आहेत असा तेथील लोकांचा समज होत असे आणि आजही बऱ्याच अंशी तो कायम आहे. वास्तविक प्रारंभी माळवा, गुजराथ मराठ्यांनी घेतले तेव्हा त्यांचे धोरण असे नव्हते. ते प्रांत चौथाईसाठीच त्यांनी घेतले; पण लगेच तेथे त्यांनी राज्य स्थापून रयत सुखी केली. मग बंगाल, बिहार, ओरिसा, पंजाब, मुलतान, कर्नाटक या प्रदेशांत त्यांनी हेच धोरण का अवलंबिले नाही ? आपल्या नावाला लुटारू, दरोडेखोर अमा कलंक का लावून घेतला ? आणि असा कलंक लागलेला असताना 'मराठा साम्राज्य' हा शब्दप्रयोग कितपत सार्थ आहे ? दुसरा प्रश्न असा की, अगोदर दक्षिणेत दृढ अशी राज्यस्थापना न करता ते उत्तरेत कशासाठी गेले ? अटकेपार त्यांनी झेंडा नेला खरे. पण तो किती दिवस टिकला ? एक भरारी यापलीकडे त्याला काय विशेष अर्थ आहे ? मराठे दरसाल दसऱ्यानंतर मुलुखगिरीसाठी बाहेर पडत. आणि अनेक प्रांतांतून चौथाई, सरदेशमुखी या हक्कांसाठी आणि इतर अनेक प्रकारे अमाप धन मिळवून स्वदेशी परत येत. असे असताना ते कायमचे कर्जबाजारी का राहिले ? बाजीराव, नानासाहेब, माधवराव यांना कर्जाची अहोरात्र चिंता असे. त्यापायी त्यांचे निम्मे रक्त आटले असेल. इंग्रज हे परमुलखातून आलेले. त्यांनाही सर्व हिंदुस्थानभर फौजा न्यावा लागत; पण ते असे कर्जबाजारी कधीच झाले नाहीत! पुढचा प्रश्न असा की निजाम, हदर, अलीवर्दीखान, अर्काटचे नवाब, महंमदखान बंगष, यांना मराठ्यांनी अनेक वेळा जवळ जवळ प्रत्येक लढाईत पराभूत केले होते. तरी त्या मुस्लीम सरदारांनी मूळच्या सत्ताधाऱ्यांना नष्ट करून तेथे आपली राज्ये स्थापिली तसे मराठ्यांनी का केले नाही ? पन्नास वर्षे त्यांच्या कायमच्या कटकटी मागे ठेवून देण्यात त्यांनी काय साधले ? पानपतावर मराठयांचा अहंमदशहा अब्दालीशी संग्राम झाला. हिंदुपदपातशाहीची स्थापना हे मराठ्यांचे ब्रीद होते. त्यांचे ते घोषवाक्यच होते. असे असून रजपूत, जाट, शीख यांपैकी कोणीही हिंदुराजे, सत्ताधारी वा सरदार पानपताला त्यांच्या बाजूने लढण्यास का उभे राहिले नाहीत ? त्या सर्वांना मुस्लीम सत्तेचा जुलूम अगदी असह्य झाला होता. त्यातून मुक्त व्हावे अशी त्यांची उत्कट इच्छा होती. माळव्याच्या स्वारीच्या वेळी रजपुतांनी मराठ्यांना सर्वतोपरी साह्य केले होते ! तरी पानपतावर मात्र त्यांनी व जाट- शिखांनी मराठ्यांना काडीमात्र साह्य केले नाही. उलट त्या वेळी ते मराठ्यांना शत्रूच लेखीत असत. त्यांची अशी विपरीत वृत्ती का झाली ? आणखी एक प्रश्न मनात उद्भवतो तो असा- बाबराच्या वेळेपासून मुसलमान आक्रमक लढाईत तोफांचा वापर करीत होते. तरी १७५० पर्यंत म्हणजे दोनशे-सव्वा दोनशे वर्षे होऊन गेली तरी मराठ्यांनी आपला तोफखाना का तयार केला नाही ? बाजीरावाने आपल्या अद्वितीय रणकौशल्याने पालखेड व भोपाळ येथे निजामाचा तोफखाना पोचणार नाही अशा ठिकाणी त्याला गाठून पराभूत केले हे निराळे. पण तोफा असत्या तर द्राविडी प्राणायाम करण्यात शक्ती खर्च झाली नसती; आणि मराठ्यांचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढले असते. असे असूनही मराठे गहाळ का राहिले ? बाजीरावासंबंधाने लिहिताना यदुनाथ सरकार यांनी प्रथम त्याचा अतिशय गौरव केला आहे आणि शेवटी एक प्रश्न उपस्थित करून त्याच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन केले आहे. ते म्हणतात, 'बाजीराव अत्यायुषी झाला म्हणून मराठा राज्याचा तोटा झाला हे मान्य आहे; पण तो किंवा त्याचा पुत्र नानासाहेब पेशवा हे दीर्घायुषी झाले असते तरी भारताचे पारतंत्र्य- इंग्रजांचे अधिराज्य- टळले असते असे नाही. फारफार ते लांबणीवर पडले असते.' यदुनाथ सरकार यांच्या या म्हणण्याचा अर्थ काय ? (पेशवा बाजीराव- सरदेसाई, प्रस्तावना- यदुनाथ सरकार, पृ. १२) प्रा. शेजवलकर यांनी नानासाहेब पेशवे व इंग्लंडचा त्याचा समकालीन नेता चॅथॅम याची तुलना करून नानासाहेबाला अगदी हिणकस ठरविले आहे आणि हे विवेचन करताना म्हटले आहे की, 'नानासाहेबाच्या जागी आमच्यात त्या काळी चॅथम का निर्माण झाला नाही, याचे उत्तर, आमच्या मते, हिंदी समाज हा इंग्रजी समाजाप्रमाणे नव्हता हे आहे.' (नानासाहेब पेशवे- चरित्र, सरदेसाई, प्रस्तावना- शेजवलकर, पृ. ७) याचा अर्थ असा की हिंदी समाजात चॅथॅम निर्माण करण्याची ऐपतच नव्हती! याचे कारण काय ? याच प्रस्तावनेत जपानशी भारताची तुलना करून शेजवलकर म्हणतात, 'ज्या काळी पाश्चात्यांनी आमच्या किनाऱ्यावर प्रवेश केला त्याच सुमारास जपानच्या किनाऱ्यावरही केला, पण ते श्वेतेतर (आशियाई) राष्ट्र पाश्चात्य गिधाडांच्या तडाख्यातून सुटून पुन्हा त्यांच्याच जोडीस बसले. कोणत्याही पाश्चात्य राष्ट्राने इतक्या अल्प अवधीत एवढी कर्तबगारी दाखविलेली नाही. या जपानी मुत्सद्दयांच्या पासंगालाही पुरणारी हुषारी दाखविणारा पेशवाईत कोणी निघाला नाही ही केवढ्या शरमेची गोष्ट आहे?' 'मराठे व इंग्रज' या तात्यासाहेब केळकरांच्या ग्रंथाला वासुदेवशास्त्री खरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा समारोप करताना त्यांनी म्हटले आहे की, 'हिंदुस्थान इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता त्यांतले कोणते फुटावयाचे, मातीचे की लोखंडाचे, हे ठरलेलेच आहे!' हिंदुस्थानचे पारतंत्र्य हे अटळ होते असा यदुनाथ सरकारांच्या म्हणण्याप्रमाणेच खरेशास्त्री यांच्याही म्हणण्याचा भावार्थ आहे. या इतिहास पंडितांनी असा निष्कर्ष का काढावा ?

आतापर्यंतची मीमांसा :
 वर मराठ्यांच्या सत्तेसंबंधी, साम्राज्यासंबंधी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांची उत्तरे आजवर अनेकांनी दिलेली आहेत. वर ज्या थोर इतिहासवेत्त्यांचा उल्लेख केला आहे त्यांनी आपल्या लेखांत त्यांचे विवेचनही केले आहे. सवत्या सुभ्याची आवड, राष्ट्राभिमानाचा अभाव, आपसातील फूट, मध्यवर्ती सत्तेचा कमकुवतपणा आणि कवाइती लष्कर व सुधारलेली युद्धसामग्री यांचा अभाव ही केळकरांच्या मते मराठेशाही बुडण्याची खरी कारणे होत. मराठयांच्या साम्राज्यात घटनात्मक राज्यव्यवस्था नव्हती, लष्करात व्यवस्था व शिस्त नव्हती, भौतिक ज्ञानाची, विज्ञानाची, त्यांनी उपेक्षा केली, त्यांनी जगप्रवास कधी केला नाही ही कारणे सरदेसाई देतात. आणखी एक महत्त्वाचे कारण त्यांनी दिले आहे. सर्वांस धाकात ठेवून सर्वांकडून योग्य कामगिरी घेणारा चालक राष्ट्राला मिळाला नाही हे, त्यांच्या मते, राज्यनाशाचे आद्य कारण होय. इंग्रजांचे जबरदस्त राजकारण हेही एक कारण ते सांगतात. खरेशास्त्री यांच्या मते देशाभिमानशून्यता, समूहरूपाने कार्य करण्याची नालायकी, स्वार्थसाधनाची बेसुमार हाव, आळस, हेळसांड, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय हे दुर्गुण आमच्या राज्यनाशाला कारण झाले आहेत. कडवा धर्माभिमान, करडी राजनीती, करारीपणा, चिकाटी, निश्चय या गुणांचा अभाव ही कारणे शेजवलकर देतात. 'मराठाज् अँड पानिपत' या नावाचा एक ग्रंथ पंजाब विद्यापीठाने १९६१ साली प्रसिद्ध केला आहे. त्या विद्यापीठातील इतिहासशाखेचे प्रमुख प्रा. हरिराम गुप्ता हे त्याचे संपादक आहेत. 'अठराव्या शतकातील हिंदु- समाजात जातिभेद अत्यंत तीव्र होता. या समाजास ऐक्य, संघटना यांचा कसलाही पाया नव्हता. बंधुभावाला कसलाही आधार नव्हता. भिन्न भिन्न हिंदुसत्ता सांघिक वृत्तीने कार्य करू शकत नसत, त्यामुळे मुत्सद्देगिरी व रणांगण यांत त्यांचा पराभव झाला. हिंदुसमाजाचे ऐक्य हा एक भ्रम होता. उलट मुस्लीम समाजात धर्म हे प्रबळ संघटनतत्त्व होते. जिहाद- धर्मयुद्ध- या घोषणेने मुस्लीम समाज चटकन् एकत्र येई.' पानपतावरील मराठ्यांच्या अपयशाची कारणे देताना त्यांनी हे मत मांडले आहे. (प्रस्तावना, पृ. १२) दुसरे एक प्राध्यापक श्री. सनगर यांनी, वतनदारी, सरंजामदारी, शिवाजीच्या वेळच्या उच्च ध्येयनिष्ठेचा अभाव व मुत्सद्देगिरीचा अभाव, ही कारणे दिली आहेत. (पृ. २५६). नित्याची दुही, व्यवस्थितपणाचा अभाव, जुटीने काम करण्याच्या वृत्तीचा अभाव,– अशी कारणे न्या. मू. रानडे यांनी 'मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष' या आपल्या ग्रंथात दिली आहेत.

कारणांचे मूलकारण :
 वर दिलेली कारणे सर्वमान्य अशीच आहेत. शिवाय वरील सर्व इतिहास-पंडित मराठ्यांचे अभिमानी आहेत. पंजाब विद्यापीठातील लेखकही अनेक ठिकाणी मराठ्यांचा मुक्तकंठाने गौरव करताना दिसतात. तेव्हा त्यांनी काही पूर्वग्रह ठेवून ही कारणे दिली आहेत असे म्हणता येणार नाही. त्यांच्या ग्रंथांचा व एकंदर मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना मला याहून काही निराळी कारणे सापडली आहेत असे नाही. पण मी येथे एका निराळ्या दृष्टीने विचार करणार आहे. वर या पंडितांनी दिलेले दुर्गुण मराठ्यांच्या ठायी का उद्भवावे ? दीडशे वर्षांच्या वाढत्या वैभवाच्या काळातही ते लोप न पावता जास्तच प्रबळ का व्हावे ? याचा विचार केला पाहिजे असे वाटते. हिंदुसमाजात त्या काळी चॅथॅमसारखे कर्ते पुरुष निर्माण होणे शक्य नव्हते, हिंदुस्थानचे पारतंत्र्य अटळ होते, मराठ्यांचे राज्य म्हणजे मातीचे भांडे होते, ते फुटणे अपरिहार्य होते, अशी विधाने काही पंडितांनी केली आहेत. तेव्हा हा समाज कुठल्या तरी जुनाट रोगाने ग्रस्त झालेला असला पाहिजे, वरवरच्या औषधोपचारांनी तो रोग समूळ नष्ट होणे शक्य नव्हते, असे स्वच्छ दिसते. याची काही कारणमीमांसा केली पाहिजे. राष्ट्रनिष्ठा नाही, संघटनतत्व नाही. शिस्त नाही, ज्ञानार्जनाची हौस नाही, विज्ञानाचा अभ्यास नाही, जग पाहाण्याची जिज्ञासा नाही, चिकाटी नाही, निश्चय नाही यांमुळे मराठे पराभूत झाले हे खरे. पण हे सद्गुण त्यांच्या ठायी का निर्माण झाले नाहीत, आणि या समाजाला जय मिळणे शक्यच नव्हते, असे इतिहासत्त्ववेत्ते का म्हणतात, हे अधिक खोल जाऊन पाहिले पाहिजे. कारणांचेही मूलकारण शोधले पाहिजे.

अधर्मशास्त्र :
 माझ्या मते अकराव्या बाराव्या शतकापासून त्या वेळेच्या धर्मशास्त्रकारांनी जे हिंदुधर्मशास्त्र- किंवा खरे म्हणजे अधर्मशास्त्र- या समाजात रूढ केले ते या सर्व अनार्थाच्या बुडाशी आहे. भिन्नभिन्न आचार्यांनी उपदेशिलेली ती निवृत्ती, तो पुराणप्रणीत (गीताप्रणीत नव्हे) निष्क्रिय भागवतधर्म, चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता ही ती सनातन विघटक तत्त्वे, ते शब्दप्रामाण्य, तो कर्मवाद, ती शुद्धिबंदी, तो समुद्रगमननिषेध, ती कलियुगकल्पना, ते कर्मकांड, ती व्रतेवैकल्ये, ती संसारनिंदा, धननिंदा, भौतिक ज्ञानाची निंदा,– हे अधर्मशास्त्र या विनाशाच्या बुडाशी आहे असे मला निश्चित वाटते. शिवछत्रपती व समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने रूढ धर्मातले हे दोष जाणून त्यांतील बरेच नष्ट करण्याचा प्रयत्न कसा केला ते वर सांगितलेच आहे. त्यामुळेच या भूमीत एक अद्भुत शक्ती निर्माण होऊन तिने शंभर-दीडशे वर्षांत हिंदुस्थान आक्रमिला हे खरे; पण त्या दोन महापुरुषांनी घडविलेल्या क्रांतीची तत्त्वे समाजात दृढमूल करून टाकण्याचे कार्य कोणीच न केल्यामुळे त्यांचा प्रभाव उत्तरोत्तर कमी होत गेला. खुद्द शिवछत्रपतींच्या वारसांनाच त्या महाराष्ट्रधर्माची कल्पना आली नाही आणि रामदासांच्या एकाही शिष्याला त्यांच्या प्रवृत्ति- धर्माचे आकलन झाले नाही, यापरते दुर्दैव ते काय ? वास्तविक या वेळी शास्त्री- पंडित, आचार्य, भिन्नभिन्न संप्रदायांचे धुरीण, मठाधिपती यांनी शिवसमर्थांचा नवा धर्म- महाराष्ट्र धर्म- जाणून घेऊन अखिल महाराष्ट्रात व भारतात कथा, कीर्तने, प्रवचने, पुराणे, भारुडे, लळिते, यांच्या द्वारा त्याचा अहोरात्र प्रचार करावयास हवा होता. पण ते बाजूलाच राहिले आणि शास्त्री, हरिदास, पुराणिक आचार्य, सर्व सर्व त्या जुन्या व्यक्तिनिष्ठ, परलोकवादी, दैववादी कर्मकांडात्मक धर्माचेच कीर्तन करीत राहिले. चार-पाचशे वर्षांची जुनी परंपराच त्यांनी चालू ठेविली. राज्य, साम्राज्य, क्षात्रधर्म, पराक्रम, विजीगिषा, यांचा कसलाही संबंध त्यांनी धर्माशी येऊ दिला नाही.

नवे संस्कार नाहीत :
 बाजीरावाला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली तेव्हा प्रतिनिधी, अमात्य, सुमंत, सेनापती या सर्वांना हा लहान पोर आपल्या डोक्यावर आणून बसविला याचे वैषम्य वाटले. यामुळे त्याच्याशी सहकार्य करण्याचे, त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्यांनी साफ नाकारले. येथपर्यंत ठीक; पण यानंतर शाहूमहाराजांनी प्रत्येकाला आखून दिलेल्या प्रदेशात काही पराक्रम करण्याऐवजी ते एकेक निजामाला जाऊन मिळाले ! कोल्हापूरचा संभाजीसुद्धा निजामाला मिळून शाहूला उखडण्याचा डाव रचू लागला. त्या वेळी कोणी शंकराचार्यांनी, कोणी महाराजांनी, स्वामींनी, वारकरीपंथाच्या व दत्त, आनंद, चैतन्य या संप्रदायांच्या धुरीणांनी हा अधर्म आहे असे त्यांना सांगितले काय ? यवनसेवा, तुर्कसेवा हा अधर्म आहे हे शिवछत्रपतींनी सांगितले होते. हे महातत्त्व वरीलपैकी कोणा तरी धर्माचार्यांनी समाजाला उपदेशिले काय ? त्याच्या हाडीमासी खिळविण्याचा प्रयत्न केला काय ? हरिदासांनी, पुराणिकांनी, कीर्तनकारांनी याचा उच्चार तरी केला काय ? शेकडो वर्षे मनावर झालेले ते जुने संस्कार जाऊन धर्म हे संघटनतत्त्व होय, परधर्मीयांना मिळून स्वधर्मीयांवर घाला घालणे अधर्म होय, या नव्या विचारांचे संस्कार एरवी व्हावे कसे ? पश्चिम युरोपात इटली, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, इग्लंड या देशांत राष्ट्रधर्म, बुद्धिप्रामाण्य, इहवृत्ती, प्रवृत्तिधर्म विज्ञाननिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता या विषयांवर शेकडो ग्रंथ या काळात झाले. तेव्हा त्या जुनाट शब्दप्रामाण्यवादी, परलोकनिष्ठ धर्माचे संस्कार पुसून जाऊन तेथे नवा मानव निर्माण झाला आणि याला धर्मक्रान्तीपासूनच प्रारंभ झाला. तशी धर्मक्रान्ती येथे झालीच नाही. ती एकट्यादुकट्याने होत नसते. ग्रंथ, प्रवचने, व्याख्याने यांचा पाऊस त्यासाठी पडावा लागतो. कृतिशील आदर्श त्यासाठी डोळ्यांपुढे असावे लागतात; पण येथल्या कवींनी, ग्रंथकारांनी, आचार्यांनी, पुराणिकांनी, कीर्तनकारांनी या धोरणाने काही केले नाही. स्वराज्य, स्वातंत्र्य यांचा त्यांच्या साहित्याशी, काव्यांशी, धर्माशी, कसलाही संबंध नव्हता. दुही, फूट, स्वजनद्रोह, स्वामिद्रोह, देशद्रोह यांचा त्यांच्या धर्मप्रवचनात केव्हाही, कवीही अधिक्षेप झाला नाही. कोणी इतर जातीच्या हातचे पाणी प्याला, कोणी सोवळे केले नाही, कोणी अभक्ष्यभक्षण केले, एकादशीला कांदा खाल्ला, कोणा मुलीच्या लग्नाला उशीर झाला तर मात्र हे आचार्य, हे शास्त्रीपंडित तत्काळ खवळून उठत व बहिष्काराचे अस्त्र उपशीत. बाजीराव मद्यमांस सेवन करीत असे, त्याने मस्तानी ठेविली होती यासाठी त्याच्यावर बहिष्कार घालण्यास पुण्याचा ब्रह्मवृंद उद्युक्त झाला होता. कारण त्यामुळे हिंदुधर्म रसातळाला जाणार होता. त्याच्या पराक्रमामुळे, दिल्लीवरील स्वारीमुळे, निजाम, बंगष यांना त्याने पराभूत केल्यामुळे हिंदुधर्माचा काही फायदा होतो, त्याचे रक्षण होते असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.

पराक्रमाची यंत्रे :
 शाहूच्या प्रारंभकाळी सर्व प्रमुख सरदार मोगलांना जाऊन मिळाले आणि नंतर निजामाला ! याचा अर्थ असा की, मराठ्यांवर राष्ट्रनिष्ठेचे वा धर्मनिष्ठेचे संस्कार तर नव्हतेच पण स्वामिनिष्ठाही ते ओळखीत नव्हते. म्हणजे मराठा सरदार हा एक पराक्रमाचे यंत्र बनला. ती एक जडशक्ती झाली. इंग्रजांनी यावे, मोगलांनी यावे, फ्रेंचांनी यावे, पोर्तुगीजांनी यावे, हबशांनी यावे, त्यांना ही यंत्रे पैसा टाकताच मिळत आणि मग ती स्वधर्मीय, स्वदेशीय लोकांवर, स्वतःच्या स्वामीवर वाटेल तो भडिमार करण्यास सज्ज होत. जमीन, वतन, पैसा एवढेच त्यांना दिसत असे. समर्थांनी म्हटलेच आहे, 'आम्ही पोटाचे पाईक, आम्हा नलगे आणिक, आम्ही खाऊ ज्याची रोटी, त्याची कीर्ती करू मोठी ॥' हीच टीका नानासाहेब सरदेसाई यांनी केली आहे. ते म्हणतात, 'अमात्याच्या कारस्थानाचा विचार मुद्दामच केला आहे. त्यावरून मराठमंडळाच्या मनोभावनांची बरीच कल्पना करता येते. आपण एक राष्ट्र आहो, आणि सर्वांनी मिळून हिंदुस्थानावर आपले स्वराज्य स्थापन करावयाचे आहे, ही कल्पना थोड्याबहुत चालकांच्या मनात कितीही असली तरी सामान्य महाराष्ट्र- जनतेच्या मनात ही राष्ट्रीय भावना बिलकुल नव्हती. स्वार्थ साधेल ते कृत्य करण्यास मराठमंडळापैकी बहुतेक सर्व व्यक्ती नेहमीच तयार असत. मग त्या ब्राह्मण असोत किंवा ब्राह्मणेतर असोत.' (मध्यविभाग- २, १९२१ आवृत्ती, पृ. २४३) यावरून दुही, फूट हीच मराठ्यांची प्रकृती होती आणि ऐक्य, संघटना, राष्ट्रभावना ही त्यांची केवळ विकृती होती, हे ध्यानात घेतले म्हणजे त्यांच्या सर्व कर्तृत्वाचा ग्रंथ नीट लागतो.

शत्रू रक्षिला पाहिजे :
 आपल्या धर्माच्या, देशाच्या, स्वामीच्या शत्रूला, पिढ्यान् पिढ्यांच्या हाडवैऱ्याला जाऊन मिळणे, त्यांच्याशी द्रोह करणे याची मराठ्यांना कसलीच खंत वाटत नसे. प्रारंभापासून अखेरपर्यंत एकही कालखंड मराठेशाहीत असा नव्हता की, जेव्हा मोठमोठे सरदार शत्रूला फितूर नव्हते. पेशवे आणि शिंदे ही दोन घराणीच याला अपवाद होती. त्यांच्याही निष्ठा ढळल्या तेव्हा साम्राज्यच बुडाले. नजीबखान, निजाम, हैदर यांचा एकदाच कायमचा निःपात का केला नाही असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर सोपे आहे. प्रत्येक वेळी त्यांना संभाळायला मराठे सरदारच, त्यांचा पक्ष घेऊन उभे असत. नजीबखान रोहिल्याला अनेक वेळा मल्हारराव होळकरांनी वाचविला. त्याला मारले तर पेशव्यांना कोणी शत्रू राहणार नाही व मग त्यांना शिंदे-होळकरांची गरजच राहाणार नाही व ते आपल्याला धोतरे बडवायला लावतील, ही मल्हाररावांना चिंता होती, म्हणून नजीबाला ते मानसपुत्रच मानीत. हैदराचा पूर्ण पराभव झाला तरी त्याला तहाच्या वेळी झुकते माप साधवरावांना द्यावे लागले. कारण राघोबा व तत्पक्षीय सरदार त्याच्या पाठीशी उभे होते. या लोकांनी निजामाचे व हैदराचे रक्षण केले ते याच हेतूने. शत्रू संभाळून ठेविला पाहिजे. उद्या माधवरावाविरुद्ध लढावे लागले तर त्याचे साह्य होईल ! प्रत्यक्ष सरदारांची ही भावना होती. यातून त्यांचे दिवाण, सल्लागार यांनी काही या देशद्रोही वृत्तीस आळा घालावा, तर ते बाजूस राहून तेच स्वामिद्रोहाचा सल्ला देऊन सर्व कारस्थाने शिजवीत असत. राक्षसभुवनच्या लढाईच्या आधी देवाजीपंत चोरघडे हा जो भोसल्यांचा कारभारी त्याने जानोजी भोसले यास सल्ला दिला की, 'निजामास घेऊन खानदेशात छावणीस जावे, आजपर्यंत पेशव्यांनी कारभार केला, आता त्यास निर्दाळून आपणच दौलत करावी.' (रियासत, मध्यविभाग, आवृत्ती १९२५, पृ. ५५) सखारामबापू हा राघोबाचा कारभारी. त्याने फितुरीची किती कारस्थाने शिजविली हे प्रसिद्धच आहे. सरदेसाई लिहितात, 'प्रत्येक सरदाराजवळ शहाणपणाची घमेंड मिरविणारे व येनकेनप्रकारेण पेशव्यास गोत्यात आणून आपला वैयक्तिक स्वार्थ साधणारे कारभारी लोक असत. हे कारभारी बहुधा ब्राह्मणवर्गातले असत. ब्राह्मणांतच सारस्वत, प्रभू इत्यादींचा अंतर्भाव समजावयाचा. ताराबाईजवळचे पुराणिक व उपाध्ये, प्रतिनिधीचा यमाजी शिवदेव, दाभाड्यांचा यादो महादेव, भोसल्याजवळचा कोन्हेरेराम, शिंद्यांचे रामचंद्रबाबा, होळकरांचे चंद्रचूड या मंडळींस मराठी राज्य, त्याचे हेतू, पुढील कर्तव्य व प्रस्तुतच्या अडचणी यांची जाणीव बहुधा नसे.' (मध्य विभाग २, पृ. २३५) पेशव्याला गोत्यात आणावे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता, पण तो वैयक्तिक स्वार्थासाठी; देशासाठी वा मराठी दौलतीसाठी नव्हे आणि पेशव्याला गोत्यात आणायचे ते निजाम, हैदर, रोहिले यांच्या साह्याने, स्वतःच्या हिमतीने नव्हे. सर्व मराठमंडळाने एकजूट करून शाहूच्यानंतर सातारच्या गादीवर जानोजी भोसल्यासारखा कर्ता तरुण पुरुष बसविला असता आणि अभेद्य एकी करून मग पेशव्यास दूर केले असते तर मराठी दौलतीचे हितच झाले असते; पण ती हिंमत, ते धैर्य व ते कर्तृत्व व तशी उदात्त निष्ठा कोणाच्याही जवळ नव्हती. माधवरावांच्यानंतर पुढील पेशवे नाकर्ते झाले, तेव्हा तरी हे करावयाचे ! पेशवेपद तरी दुसऱ्या कोणा कर्त्या पुरुषाला द्यावयाचे; पण त्यासाठी सर्व मराठमंडळ संघटित असणे अवश्य होते. सर्व धर्मनिष्ठेने प्रेरित झाले असते तर ते अशक्य नव्हते; पण त्यांचा धर्म म्हणजे स्नानसंध्या, उपासतापास, सोवळेओवळे हा होता. त्याचा संघटनेशी संबंध नव्हता. अशा स्थितीत 'पेशवे कशीबशी धडपड करून, मराठमंडळाची जुळेल तशी एकत्र मोट बांधून, पुढे पाऊल टाकीत होते. आणि हिंदुस्थानभर पराक्रम गाजविण्याची त्यांस संधी देत होते. सरदारांची महत्त्वाकांक्षा मात्र अशी की, आपण संपादिलेले वतन आपल्या पश्चात आपल्या संततीस मिळावे. मुख्यतः लाचलुचपतीवरच मराठे सरदार पराक्रम गाजवीत. दर एक सनदेत व पत्रात प्रत्येकाची ही ऐहिक हाव स्पष्ट सांगितलेली असते.' (सरदेसाई कित्ता, पृ. २४४, २३६) अशा प्रकारे वतनाचा, धनाचा, सत्तेचा लोभ हीच बहुतेक सर्वांची प्रधान प्रेरणा असल्यामुळे पंजाब, रोहिलखंड, बंगाल, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आंध्र या प्रदेशांत मराठ्यांना माळवा व गुजराथ येथल्याप्रमाणे प्रत्यक्ष राज्यस्थापना करता आली नाही.

ध्येयशून्य पराक्रम :
 श्रीशिवछत्रपती व समर्थ यांच्या महाराष्ट्रधर्मांच्या उपदेशाने व प्रत्यक्ष आचरणाने महाराष्ट्रात अनेक पराक्रमी, बलशाली व कर्तबगार घराणी निर्माण झाली; पण पुढे ती धर्मनिष्ठा ढळल्यामुळे त्यांना सत्ता, वतने व सरंजाम यांपुढे काही दिसेचना. याचा एक घोर परिणाम असा झाला की, यांतील अनेक घराण्यांची शक्ती एकमेकांशी भांडण्यात, प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढाई करण्यात खर्च झाली. संताजी व धनाजी यांच्यापासून हा प्रकार जो सुरू झाला तो थेट शिंदे-होळकरांच्या लढाईपर्यंत अखंड चालू होता. मराठी राज्याचे शासन एकमुखी असावे हे अनेक मराठा सरदारांना मान्यच नव्हते. त्यामुळे कोल्हापूरचा संभाजी, त्र्यंबकराव दाभाडे, रघूजी भोसले, राघोबा, मोरोबा यांना नमविण्यातच शाहूमहाराज व पेशवे यांची निम्मी शक्ती खर्च झाली. मराठ्यांत राष्ट्रनिष्ठा जागृत असती, 'मराठा तितुका मेळवावा' याचा अर्थ त्यांना उमगला असता तर आपसात लढण्यात वाया गेलेली शक्ती संघटित झाली असती व मग तिला 'महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे' हे ध्येय सिद्ध करता आले असते. त्यातही आणखी खेदाची गोष्ट अशी की, वतने व सरंजाम हे पराक्रमासाठी असतात, मराठा राज्याची सेवा करण्यासाठी असतात एवढाही समज मराठा सरदारांनी संभाळला नाही. कार्य न करता, सेवा न करता, सरंजाम आणि वतने कायम राहिली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. बाजीराव पेशवा असताना प्रतिनिधी, सेनापती, अमात्य, सुमंत हे सर्व निष्क्रिय झाले होते; पण त्यांचे सरंजाम मात्र चालू होते. शाहूमहाराजांना ते खालसा करणे मंजूर नव्हते. त्यामुळे इकडे अमाप धन या निष्क्रिय वतनदारांना पोसण्यात खर्च होत होते आणि अखिल भारतभर मोहिमा चालविण्यासाठी जे लष्कर उभारावयाचे त्यासाठी पैसा उभा करताना पेशवे हैराण होत होते. ते कायम कर्जबाजारी राहण्याचे हे कारण होते. ऐतखाऊंचे सरंजाम खालसा झाले असते तर तो पैसा हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी उपलब्ध झाला असता आणि मग शस्त्रशक्ती व धनशक्ती यांचा संयोग होऊन मराठ्यांना आले याच्या शतपट जास्त यश आले असते. भावार्थ असा की, सातारा व पुणे येथे छत्रपतींची व पेशव्यांची दृढ, स्थिर व अविचल अशी सत्ता असती व त्यांचे सरदार एकनिष्ठ, धर्मनिष्ठ व स्वामिनिष्ठ असते तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक प्रदेशात मराठ्यांना स्थिरपद राज्य स्थापून उत्तम राज्यकारभार करता आला असता. इंग्रजांची मूळ इंग्लंडमधील सत्ता दृढ होती व क्लाइव्ह, हेस्टिंग्ज, वेलस्ली या त्यांच्या सरदारांची राष्ट्रनिष्ठा संशयातीत होती. या बळावर त्यांनी जे करून दाखविले ते मराठ्यांनीही केले असते; पण मूळ राज्याला स्थैर्य नाही, सरदारांत निष्ठा नाही आणि खजिन्यात धन नाही अशा स्थितीत चौथाईच्या निमित्ताने सर्व दिशांना संचार करून मुस्लीम सत्ता नष्ट करणे येवढेच मराठ्यांना शक्य होते. थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकीर्दीपर्यंत मराठे हे हिंदुधर्माचे संरक्षक, पेशवे हिंदूंचे त्राते अशी उदात्त भूमिका मराठ्यांची होती व ती उत्तर हिंदुस्थानातही सर्वांना मान्य होती; पण पुढे मराठा सरदारांचे हे ध्येय सुटले. धनलोभाने ते रजपुतांवर, जाटांवर अत्याचार करू लागले. शिंद्यांनी एका रजपूत वारसाचा पक्ष घेतला तर होळकरांनी दुसऱ्याचा घ्यावा व दोघांनी आपसात लढाई करावी हा प्रकार नित्याचा झाला. यामुळे मराठ्यांची प्रतिष्ठा गेली व त्यांच्या नावाला लुटारू, दरोडेखोर असा कलंक लागला. रजपूत, जाट, बुंदेले हे हिंदू असूनही त्यांचे वैरी बनले. पानपतावर नजीबखानाने अबदाली, रोहिले, सुजाउद्दौला इ. सर्व मुस्लीम सत्तांची एकजूट केली; पण हिंदुसत्तांची एकजूट करणारा पुरुष हिंदूंमध्ये झाला नाही. त्या धर्मात ते तत्त्वच नाही. विघटना हेच त्याचे प्रधान लक्षण होऊन बसले होते. त्यामुळे अखिल हिंदुधर्मीयांची संघटना ही कल्पनाच शक्य नव्हती. या वेळी सर्व शंकराचार्य, पंथाचार्य, मठाधिपती, संतमहंत यांनी एकत्र येऊन अखिल भारतभर भ्रमण करून हिंदुधर्माला हे रूप दिले असते तरच हिंदुशक्ती संघटित होऊन हिंदुपदपातशाही प्रत्यक्षात अवतरली असती; पण मुस्लीम, इंग्रज, पोर्तुगीज यांची कृपा संपादून आपापल्या गाद्या संभाळण्यात व वतनाप्रमाणेच त्यांसाठी भांडण्यात अखंड मन असलेले हे धर्मधुरीण हिंदुधर्मसंघटनेकडे कसे लक्ष पोचविणार ?

जातिभेदाचा गळफास :
 जातिभेद हे मराठ्यांच्या अपयशाचे एक प्रधान कारण म्हणून यदुनाथ सरकार, हरिराम गुप्ता इ. काही पंडितांनी दिले आहे. तात्यासाहेब केळकर, नानासाहेब सरदेसाई यांनी हे मत खोडून काढले आहे. मराठ्यांत जी दुही झाली, फळ्या पडल्या, पक्ष पडले ते जातीअन्वये पडले नाहीत, प्रत्येक पक्षात सर्व जाती पोट- जातींचे लोक होते, असे दाखवून देऊन विनाशाला जातिभेद मुळीच कारण झाला नाही असे मत या दोघा थोर इतिहासवेत्त्यांनी मांडले आहे. त्यांनी मांडलेला युक्तिवाद बरोबर आहे; पण पक्ष पडणे, फळ्या पडणे एवढीच हानी जातिभेदाने होते असे नाही. जातिभेदामुळे हिंदूंचे शंकराचार्यादी धर्मधुरीण शूद्र, अस्पृश्य यांच्यात मिसळू शकत नाहीत. त्यांच्याविषयी आपले काही कर्तव्य आहे असेही त्यांना वाटत नाही. जातिभेद नसता तर हे धर्मवेत्ते त्यांच्यात जाऊन राहिले असते आणि इंग्रज मिशनऱ्यांनी बहुजनसमाजाला जसा राष्ट्रधर्म शिकविला, तसा यांनी शिवसमर्थांचा धर्म बहुजनांना शिकविला असता. जातिभेद नसता तर हिंदूंनी परदेशप्रवास केला असता व युरोपातले नवीन भौतिक ज्ञान हस्तगत केले असते आणि मग परत येऊन आपल्या समाजात विज्ञाननिष्ठा निर्माण केली असती. तिच्या अभावी आपला विनाश झाला हे तर उघडच आहे. जातिभेद नसता तर या देशात तरी प्रवास करून इंग्रज, मुस्लीम यांच्यात आपले लोक मिसळले असते आणि इंग्रजांचे जवळून अवलोकन केल्यावर त्यांची विद्या, त्यांची राजनीती, त्यांची निष्ठा, त्यांची कारस्थाने यांचा तरी संस्कार आपल्यावर होऊन विज्ञाननिष्ठा व राष्ट्रनिष्ठा यांचे आकलन येथल्या येथेच आपल्याला झाले असते; पण इंग्रजांच्या सहवासात गेल्यावर त्यांचा संसर्ग होणार, मग जात बाटणार व मग त्या व्यक्तीवर बहिष्कार पडणार! 'गेल्या शतकात गंगाधर दीक्षित फडके हा मनुष्य इंग्रजांस शिकविण्याकरिता पंडित म्हणून ५ वर्षे मुंबईस राहिला होता. तो परत आल्यावर, पाच वर्षे मुंबईत राहिलेला माणूस बाटल्याशिवाय कसा राहिला असेल, असे ठरवून त्यांवर सर्वांनी बहिष्कार घातला. शेवटी तो संन्यास घेऊन मेला.' अशी एक गोष्ट लोकहितवादींनी दिली आहे. त्याच सुमारास 'एक हिंदुधर्माभिमानी' या सहीने 'प्रभाकर' या पत्रात एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. लेखक म्हणतो, 'मुंबईत हिंदुधर्म रसातळाला गेला हे ऐकून मी मुंबईत पाऊल ठेवणार नव्हतो; पण नाइलाजाने जावे लागले. तेथील हिंदु लोकांची मने बहकून गेली आहेत. कोणी म्हणतात पुनर्विवाह करा, मुलींना शाळेत पाठवा. सरकारी शाळेतून महारधेडांच्या मुलांना प्रवेश द्यावा, असेही काही म्हणतात. यावरून हिंदुधर्मविनाशास आपलेच लोक कारणीभूत आहेत असे दिसते.' (नाना शंकरशेट चरित्र, पृ. ११०) मुंबईस इंग्रजांच्या संसर्गात येणे, मुलींना शिकविणे, अस्पृश्यांना शाळेत घालणे ही हिंदुधर्म रसातळाला गेल्याची लक्षणे गेल्या शतकात ठरत. मग मराठेशाहीत काय असेल ! ही हिंदुधर्माच्या विनाशाची लक्षणे असे मानणारे हिंदुधर्मशास्त्र हे अधर्मशास्त्र होय, हे कोणाच्याही लक्षात येईल. वरील चरित्राच्या लेखकाने हा धर्म नसून अधर्म होय, असेच मत दिले आहे. इंग्रज वा मुस्लीम यांचे राज्य आमच्यावर झाले, आम्ही त्यांचे गुलाम झालो, तर त्यांत हिंदुधर्महानी नाही. त्यांच्या सहवासात जाण्यात किंवा हिंदुधर्मीय जे महारधेड त्यांच्या सहवासात जाण्यात मात्र आहे ! हा सर्व जातिभेदाचा प्रभाव आहे. तेव्हा हे स्पष्टच आहे की, परदेशगमन, ज्ञानार्जन, विज्ञानसंशोधन, बहुजनांना राष्ट्रधर्माची शिकवण देणे हे सर्व जातिभेदामुळे अशक्य झाले होते. आमच्या सर्व कर्तृत्वाला जातिभेदामुळे गळफास बसला होता.
 छापखाना हे अर्वाचीन युगातले मोठे ज्ञानसाधन. पोर्तुगीजांनी गोव्यात १५५० च्या सुमारास तो आणला होता. त्याच वेळी भारतात त्याचा प्रसार झाला असता तर ? पण ते होणे अशक्य होते. कारण जातिभेद! शाईमध्ये चरबी असते त्यामुळे वरिष्ठ जातींतील धर्मशील लोक गेल्या शतकातही छापील ग्रंथांना शिवत नसत. बाळशास्त्री जांभेकरांना 'दिग्दर्शन' हे तुपाच्या शाईत छापलेले आहे, असा खुलासा मुद्दाम करावा लागला होता. अशा स्थितीत छापखान्यात काम करण्याला जातिभेद आड येणारच ! हे एका साध्या कारखान्याचे झाले. मग शास्त्रीय संशोधनात किती पदार्थांच्या बाबतीत ब्राह्मण्य आड आले असते याची कल्पनाच करावी. तेथे अनेक जीवांची हत्या करावी लागते. त्यांची चरबीच काय, त्यांचे रक्तमांस तपासावे लागते. त्यांच्यापासून व इतर अशाच वर्ज्य ठरलेल्या वस्तूंपासून झालेले पदार्थ संशोधनात वापरावे लागतात. अर्थात त्यामुळे जात बाटणारच. तेव्हा शास्त्रीय संशोधन ही कल्पनाच भारतात त्या काळात शक्य नव्हती. (श्रीशिवछत्रपतींनी याही बाबतीत रूढ धर्म बाजूस ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी छापखाना काढण्याचा प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी न झाल्यामुळे १६७४ साली तो भीमजी पारेख याला विकला, अशी आख्यायिका आहे.) संशोधन लांब राहिले. सतराव्या-अठराव्या शतकात इंग्रज जसे येथल्या भाषा शिकत होते तसे मराठे इंग्रजी शिकले असते, तरी येथे धर्मक्रान्ती घडण्याचा संभव होता; पण एकोणिसाव्या शतकातही इंग्रजी भाषा शिकल्याने ब्राह्मणपणा जातो, अशी समजूत होती. जे इंग्रजी शिकले ते नास्तिक, निर्दय, अधर्मी, अमर्याद आहेत, असे लोक मानीत होते. (माडखोलकर-चिपळूणकर, काल आणि कर्तृत्व', पृ. ५९, ४२, ४३ चतुर्थ संस्करण इ. स. १९५४) परदेशगमन, परभाषाअध्ययन, ग्रंथाभ्यास ही ज्ञानाची द्वारे. तीच जातिभेदाने बंद केली होती.

स्वल्पमप्यस्य धमस्य :
 हिंदूंच्या अधर्मशास्त्राने भारताची स्थिती अशी करून टाकलेली असताना त्या धर्मशास्त्राचा उच्छेद केल्यावाचून येथे कसलीही प्रगती होणे शक्य नव्हते. तसा थोडासा प्रयत्न शिवसमर्थांनी केला. त्यांच्या तेजस्वी महाराष्ट्रधर्मामुळे, त्याच्या स्वल्प प्रसारामुळेसुद्धा हिंदुसंस्कृती नष्ट होण्याच्या महान भयापासून भारताचे संरक्षण करण्याची महाशक्ती मराठ्यांच्या ठायी आली. इ. स. १७०७ नंतर शंभर वर्षेपर्यंत दिल्लीच्या तख्तावर अत्यंत नादान, कर्तृत्वशून्य, व्यसनासक्त, बेजबाबदार असे पातशहा होते. त्यांचे वजीरही त्याच मासल्याचे होते. (इंग्रज, मुस्लीम इ. अनेक लेखकांचे आधार देऊन यदुनाथ सरकार यांनी हे दाखवून दिले आहे. फॉल ऑफ दि मुघल एंपायर, खंड ला, पृ. १ ते १५) अशी स्थिती असूनही पंजाबचे शीख, राजस्थानचे रजपूत, बुंदेले, बंगाली, बिहारी, उरिया, आसामी यांपैकी कोणीही त्या सत्तेवर आघात करून तेथे हिंदुवर्चस्व स्थापन केले नाही. ते कार्य दक्षिणेतून जाऊन मराठ्यांनी केले आणि वरील प्रदेशही मुस्लीम वर्चस्वापासून सोडविले. तेव्हा मराठ्यांच्या ठायी एक नवीन जोम, एक नवीन शक्ती निर्माण झाली होती यांत शंका नाही. पण शिवसमर्थांनी आरंभिलेली धर्मक्रान्ती सर्व क्षेत्रांत पूर्ण करून नवधर्मतत्त्वांचा प्रसार सर्व समाजात करण्याचा उद्योग येथले आचार्य, शास्त्री, पंडित, कवी, तत्त्ववेत्ते, कीर्तनकार यांनी न केल्यामुळे त्या शक्तीला जडत्व आले, अंधत्व आले. त्यामुळे मराठ्यांना मुस्लीमसत्ता भारतातून निर्मूल करण्यापलीकडे काही साधले नाही.

धर्मक्रान्ती होती तर :
 मराठ्यांना पानपतावर जय मिळाला असता तर भारतात व्यवस्थित साम्राज्य स्थापण्यात त्यांना यश आले असते काय ? काही पंडितांनी यश आले असते, असे म्हटले आहे. पंजाब विद्यापीठातील इतिहासाचे एक प्राध्यापक प्रेमराज वर्मा यांनी तसे म्हटले आहे. त्या वेळच्या अनेक सत्तांपैकी मराठ्यांच्याच ठायी फक्त भारतीय साम्राज्य स्थापन करण्यास अवश्य ते नैतिक, बौद्धिक व भौतिक सामर्थ्य होते, असे ते म्हणतात. (मराठाज ॲण्ड पानिपत- हॅड दि मराठाज वन, पृ. २७०) असा पूर्ण संभव होता असे निश्चित वाटते; पण यानंतर जपानप्रमाणे अत्यंत वेगाने अवश्य ती धर्मक्रान्ती व मानसिक क्रान्ती मराठ्यांनी केली असती तरच ब्रिटिश आक्रमणापासून भारताचे संरक्षण त्यांना करता आले असते. कमोडोर पेरी या अमेरिकन सेनापतीने तोफांच्या बळावर अपमानास्पद तह जपानवर लादताच सत्सुमा, चोशियु, टोसा व हिझेन या चार मोठ्या सरदारांनी आपले सरंजाम खाली करून सम्राटाच्या स्वाधीन केले. शिंदे, होळकर, गायकवाड, नागपूरकर भोसले, पवार, पटवर्धन यांनी तसे केले असते तरच येथे संघटित सामर्थ्य निर्माण झाले असते. सम्राट मुटसुहिटो त्या वेळी बाल होता. त्याला नवे पाश्चात्य संस्कार करून त्या सरदारांनी कर्तृत्वसंपन्न केले. तेथला शोगुन म्हणजे पेशवा हा येथल्याप्रमाणेच सर्वसत्ताधारी होता. त्यानेही सत्तात्याग केला. प्रिन्स इटो, मार्क्विस इनोई व आणखी तिघे सामुराई- वरिष्ठ वर्णाचे लोक– इंग्लंडला गेले व परत येताना पाश्चात्य विद्या घेऊन आले. अशी क्रांती १७६२ ते ७० या काळात येथे मराठ्यांनी केली असती तरच मराठ्यांना अखिल भारतात साम्राज्य स्थापून इंग्रज, फ्रेंच इत्यादी पाश्चात्य आक्रमणाचेही निर्दालन करता आले असते. (तशी क्रान्ती अजूनही येथे झालेली नाही. त्यामुळे अजूनही आपल्याला आपल्यावरील आक्रमणांचा निःपात करता येत नाही.) पण ती तेव्हा झाली नाही. त्यामुळे, 'येथे इंग्रजांचे राज्य झाले नसते तर फ्रेंचांचे झाले असते', 'बाजीरावाला दीर्घायुष्य मिळूनही पारतंत्र्य टळले नसते', 'चॅथॅमसारखे कर्ते पुरुष येथे निर्माण होणे शक्य नव्हते' ही मते मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.

समाजधर्माच्या अभावी :
 हिंदुधर्मं हा व्यक्तिनिष्ठ धर्म आहे. त्याला समाजधर्माचे, राष्ट्रधर्मांचे रूप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो स्वधर्मीयांना संघटित करू शकणार नाही. आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की, धर्माला समाजनिष्ठ धर्माचे रूप आले नाही तर व्यक्तिधर्मही तगू शकत नाही. संतांचा पुराणप्रणीत भागवतधर्म तर भारतात प्रचलित होता ना ? मग कमालीची वतनासक्ती, त्यापायी वाटेल ती पापे आचरण्याची वृत्ती या मराठ्यांच्या दुर्गुणांना आळा का बसला नाही ? राजस्थानातही संतसाधू होतेच; पण असे एक पाप नाही व दुष्कृत्य नाही की जे रजपुतांनी आचरले नाही. यदुनाथ सरकार म्हणतात, '१७०७ नंतर तर पाशवी वासनांचे राजस्थानात सैतानी तांडवच सुरू झाले. बाप मुलाचा, मुलगा बापाचा खून करतो आहे, थोर घराण्यांतल्या स्त्रिया आप्तांवरही विषप्रयोग करण्यास कचरत नाहीत, राजे मंत्र्यांचे खून पाडीत आहेत, स्वकीयांना मारण्यासाठी रामाच्या वंशातले राजेही परकीय लुटारूंचे साह्य घेत आहेत; दारू, अफू, व्यभिचार यांना तर सीमाच नाही, अशी रजपुतांची स्थिती होती.' (फॉल ऑफ दि मुघल एंपायर, पृ. २३६, ३७) मराठ्यांना राष्ट्रधर्माची काही तरी जाणीव होती. त्यामुळे इतकी घोर पापे या प्रमाणात त्यांनी केली नाहीत, इतकेच. त्यांपासून ते मुक्त होते असे मात्र नाही. समाजनिष्ठ धर्मामुळे, राष्ट्रनिष्ठेमुळे मनुष्याचे मन व्यक्तिनिष्ठ धर्मापेक्षा जास्त उदार व उदात्त होते. व्यक्तिधर्मात हे चैतन्य नाही. समाजदृष्टिहीन व्यक्तिनिष्ठधर्म लोकांना विघटित करतो. मग तो समाज दुबळा होऊन परतंत्र होतो आणि त्याचा नैतिक अधःपातही अटळ होतो. भारताच्या गेल्या अनेक शतकांच्या इतिहासाचे हे सार आहे स्वराज्य व स्वधर्म यांचा संयोग घडवून विजयनगरने या अधःपातापासून दक्षिण भारताचे संरक्षण केले. मराठ्यांनी धर्मनिष्ठेला राष्ट्रनिष्ठेची जोड दिली. त्यामुळे अखिल भारताचे त्यापासून रक्षण करून हिंदुपरंपरा व हिंदुधर्म यांचे मुस्लीम आक्रमणापासून रक्षण करण्यात त्यांना यश आले. त्याच निष्ठांचे येथील धर्मवेत्त्यांनी संवर्धन करून त्या जनतेत दृढमूल केल्या असत्या तर पाश्चात्य आक्रमणापासूनही आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यात मराठे यशस्वी झाले असते आणि भारतात त्यांनी अत्यंत दृढ व बलशाली अशी हिंदुपदपातशाही स्थापन केली असती यात शंका नाही.

§