हिंदुसमाज संघटना आणि विघटना/राज्य करेगा खालसा

विकिस्रोत कडून






'राज्य करेगा खालसा'


प्रास्ताविक :
 इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या अखेरीस गझनीचा सुलतान सबक्तगीन याने पंजाबचा राजा जयपाळ याचा पराभव केला आणि तेव्हापासून त्या प्रदेशाचे स्वातंत्र्य नष्ट झाले. सबक्तगीनाचा मुलगा महंमद याने अनंगपाळाचा पराभव केला आणि तेव्हापासून पंजाब हा आपल्या राज्याचा एक अंकित प्रदेश आहे. असे गझनीचे अफगाण राजे मानू लागले. पंजाबवर हक्क सांगण्याची पठाणांची ही वृत्ती आठशे साडेआठशे वर्षे कायम होती. १८१० च्या सुमारास महाराजा रणजितसिंग यांनी पंजाब मुक्त करून तेथे स्वराज्याची स्थापना केली तरी पठाणांनी ते कधीच मान्य केले नाही. १८३७ पर्यंत ते भारतावर स्वाऱ्या करीतच होते. त्यांना यश मिळाले नाही हे निराळे. पण पंजाब हा आपला आहे ही त्यांची भावना अखेरपर्यंत कायम होती. आणि तो परत घेण्यासाठी ते वारंवार जिहाद पुकारीत, हे आपण विसरू नये.
 मागील लेखात सांगितल्याप्रमाणे शतकानुशतकांचे दीर्घकालीन पारतंत्र्य हे भारतातील बंगाल, बिहार, गुजराथ, माळवा, अयोध्या इ. अनेक प्रदेशांच्या नशिबी आले होते. पण पंजाब हा वायव्य सरहद्दीचा प्रदेश असल्यामुळे पारतंत्र्य, गुलामगिरी यांच्या भरीला कायमचे अराजक, रणधुमाळी, लूटमार, जाळपोळ, विध्वंस, कत्तल, बलात्कार हीच पंजाबच्या जीवनाची प्रकृती होऊन बसली होती. पंजाबचा इतिहास वाचताना, हे लोक जगले तरी कशाच्या आधारावर, असा प्रश्न पडतो. मानवी जमाती अगदी समूळ अशा नष्ट सहसा होत नाहीत. कसे तरी प्राणधारण त्या करीत असतात. पण परंपरेचा धागा अखंड टिकवून, पूर्वसूरींचा वारसा सांगत जो समाज टिकून राहतो तोच जगला असे म्हणणे सार्थ आहे. दीर्घकालीन पारतंत्र्यात पंजाबचे लोक अशा अर्थाने जगले काय, आणि जगले असले तर कशाच्या बळावर, कोणाच्या सामर्थ्याने या प्रश्नाचा आपल्याला विचार करावयाचा आहे.
 पंजाबचे लोक खऱ्या अर्थाने जगले असे इतिहास निःसंशय सांगत आहे. आणि याचे श्रेय बव्हंशी शीख या क्षात्रधर्मी, शूर, मर्द समाजाला, या लढाऊ जमातीला, गुरू नानक, गुरू गोविंदसिंग यांचा वारसा सांगणाऱ्या या पराक्रमी लोकांना आहे. ही पराक्रमाची प्रेरणा या समाजाला कोठून मिळाली, त्याला सामर्थ्य कसे प्राप्त झाले, त्याने संघटनतत्त्व कोणते अवलंबिले व परकीय आक्रमकांचा प्रतिकार करून भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात त्याला कितपत यश आले, याचा या लेखात विचार करावयाचा आहे.
 मागील अनेक लेखांत सांगितल्याप्रमाणे या काळात हिंदुधर्माला अत्यंत हीन व विकृत रूप आले असल्यामुळे स्वसमाजाचे रक्षण करण्याचे सामर्थ्य हिंदु- समाजाच्या ठायी राहिले नव्हते. शतकेच्या शतके मुस्लीमांनी इतके भयानक अत्याचार हिंदूंवर केले होते की, पूर्वीच्या शतांश जरी स्वाभिमान त्यांच्या ठायी असता तरी त्यांनी या सैतानी आक्रमणाचा प्रतिकार केला असता. पण निवृत्ती, शब्दप्रामाण्य, जातिभेद, अस्पृश्यता, दैववाद, कर्मवाद, कलियुग, कर्मकांड, अपरिवर्तनीयता, असे एकाहून एक दुर्धर रोग या समाजाला जडलेले असताना, त्याच्या ठायी स्वभिमान जागृत होऊन त्याला सामर्थ्य प्राप्त होणे शक्यच नव्हते. तसे होण्यासाठी धर्मक्रान्तीचीच आवश्यकता होती. मराठे, विजयनगर यांनी धर्मक्रान्ती घडविली म्हणूनच त्यांना यश आले, हे मागील लेखात सांगितलेच आहे. बंगाल, गुजराथ, राजस्थान येथे अशा तऱ्हेची क्रांती झाली नाही म्हणून ते देश पारतंत्र्यात कायमचे खितपत पडले हेही तेथे दाखविले आहे. पंजाबमध्ये शीखांचा उदय झाला नसता तर तेथेही हेच झाले असते, यात शंका नाही. शीखांचा उदय होण्यापूर्वी व नंतरही ते संघटित होईपर्यंत, पंजाब पारतंत्र्यातच होता. त्याला मुक्त केला तो शीखांनी. पंजाबात स्वराज्याची स्थापना होऊन काश्मीर, पेशावर व पंजाब हे प्रदेश बलुचिस्थान, अफगाणिस्थान या प्रदेशांप्रमाणे हिंदुधर्माला व हिंदुसंस्कृतीला कायमचे मुकले नाहीत, याचे श्रेय गुरुगोविंदांच्या या शिष्यांना- शीखांना आहे.
 आधीच्या पाच-सहाशे वर्षांत पंजाबी जनतेला जे साधले नाही ते शीखांना कसे साधले, त्यांच्याच ठायी प्रतिकारसामर्थ्य कोठून आले, त्यांचाच पुरुषार्थ जागृत कसा झाला, त्यांनी काही धर्मक्रान्ती केली काय, काही नवे संघटनतत्त्व अंगीकारले काय, धर्मक्रान्ती केली असल्यास तिचे स्वरूप काय होते, त्या क्रांतीच्या तत्त्वांवरील निष्ठा शीखांनी अचल राखली काय, या व अशा सर्व प्रश्नांचे विवेचन आता करावयाचे आहे. 'शीख' या शक्तीच्या स्वरूपाचे, तिच्या यशापयशाचे संपूर्ण परीक्षण करून हिंदुसमाजाच्या संघटनक्षमतेविषयी काही निर्णय करावयाचे आहेत. 'राज्य करेगा खालसा' खालसाचे- शीखपंथाचे अनुयायी- स्वराज्यस्थापना करतील ही गुरुगोविंदसिंग यांची भविष्यवाणी कोणत्या अर्थाने खरी ठरली, किती सार्थ झाली हे पहावयाचे आहे.

धर्मक्रांती :
 शीख पंथाचे संस्थापक गुरुनानक यांचा जन्म पंजाबातील तळवंडी या गावी इ. स. १४६९ साली झाला आणि १५३९ साली त्यांनी इहलोक सोडला. या दीर्घकाळात त्यांनी जो संप्रदाय प्रवर्तित केला त्याचे स्वरूप बाह्यतः इतर भक्तिमार्ग संप्रदायांसारखे असले तरी प्रथमपासूनच त्यात फार महत्त्वाचे भेद होते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. गुरुनानक यांनी निवृत्ती, संसार- त्याग, संन्यास यांचा अत्यंत तीव्र निषेध केला आहे. भक्तिमार्गी साधुसंत हे संन्यासाचा उपदेश करीत नाहीत. संसारात राहूनच मोक्ष मिळतो असे सांगतात. अरण्यवासाची केव्हा चेष्टाही करतात. पण त्याचबरोबर ते संसाराची अत्यंत बीभत्स अशी निंदाही करतात. स्त्री-पुत्र, धन-दौलत, कीर्ती, वैभव यांची साधुसंतांनी कमालीची हेटाळणी केली आहे. यांबद्दलची उदासीनता हाच तर हिंदुसमाजाचा त्या काळी मुख्य रोग होता. गुरुनानक यांनी अशी संसाराची निंदा केली नाही. इतकेच नव्हे तर संसारत्यागाचा उपदेश करणाऱ्यांना आपल्या पंथात स्थानच दिले नाही. नानक यांचे पुत्र श्रीचंद हे संन्यासपक्षाचे होते. पूर्ण संसारत्याग केल्यावाचून मोक्ष मिळत नाही, असे त्यांचे मत होते. त्यांच्या पंथाला उदासी पंथ म्हणतात. त्या पंथाच्या अनुयायांना शीख समाज स्वकीय मानीत नाही. नानकानंतरचे गुरू अंगद (१५३९- १५५२) यांनी तर एवढ्याच कारणासाठी उदासी पंथीयांना संप्रदायाच्या बाहेर घालविले. निवृत्ती हा विघटक धर्म आहे हे गुरू अंगद यांनी नेमके जाणले होते. त्यामुळेच त्यांनी श्रीचंदाच्या अनुयायांना थारा दिला नाही. पुढे पुढे शीख गुरूंनी अनेक शहरे वसविली, व्यापार, उद्योगधंदे यांकडे लक्ष पुरविले व आपल्या अनुयायांना तशी प्रेरणा दिली, यावरून गुरुनानक यांचा धर्म मुळापासूनच प्रवृत्तिरूप होता हे ध्यानी येईल. नानकांनी केलेल्या धर्मपरिवर्तनाचे हे पहिले लक्षण होय.

प्रवृत्तिधर्म :
 पण गुरुनानकांच्या प्रवृत्तिपरतेचे यापेक्षा मोठे लक्षण म्हणजे ते परिस्थितीविषयी केव्हाही उदासीन राहिले नाहीत, हे होय. भक्तिमार्गी संत हे मुस्लीम आक्रमणाचा, त्यांनी केलेले जुलूम, अत्याचार, स्त्रियांची विटंबना यांचा उल्लेखही करीत नाहीत. भोवतालच्या परिस्थितीविषयी ते जळातल्या कमळाप्रमाणे अलिप्त असतात. पण गुरुनानक यांची वृत्ती अशी नव्हती. त्यांनी मुस्लीम अत्याचारांचा, बाबराच्या सैतानी वृत्तीचा अत्यंत जळजळीत शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणतात, "क्रूर बाबर आपल्याबरोबर पापाची सेना घेऊन भारतावर चाल करून आला आहे. तो बलात्काराने धन व संपत्ती मागत आहे. लोकलज्जा व धर्म दोन्ही पळून गेले आहेत. सर्वत्र असत्य व पाप यांचा अंमल चालू आहे. निरपराधी जनतेवर मोगल राजे भुकी व्याघ्राप्रमाणे तुटून पडत आहेत. आणि त्यांचे साहाय्यक शिकारी कुत्र्यांप्रमाणे त्यांना मदत करीत आहेत. बाबराने आपल्या दूतांना सांगितले की, स्त्रियांचे सौभाग्य लुटा, आणि त्याच्या या घोषणेमुळे कोणाही राजाला सुखाने जेवता येत नाही. हे परमात्मा, तुम्ही खुरासानवर कृपा केली व भारतावर कोप केला आहे. कोणी तुम्हांला प्रत्यक्ष दोष देऊ नये म्हणून यमरूपी यवनांना तुम्ही येथे अत्याचार करण्यास धाडलेले दिसते. हे भगवान, हिंदूंनी पुष्कळ सहन केले आहे, मार खाल्ला आहे, पण तुम्ही तर सर्वाचे आहा ना?" (शीखांचा इतिहास, न. वि. गाडगीळ, पृ. १०, ११, ३४ ). पारतंत्र्य व मुस्लीम आक्रमण यांची गुरुनानक यांना अशी खंत वाटत होती. शीख पंथीयांनी पुढे पंथाचे एक तंत्र म्हणूनच क्षात्रधर्माचा अंगीकार केला. गुरुनानकांनी पंथाला अशी दीक्षा दिलेली नव्हती, हे खरे. पण ज्या कारणामुळे शीखांना शस्त्र हाती घ्यावे लागले त्या कारणाची म्हणजे मुस्लीम आक्रमणाची, ह्या पापी सत्तेची जाणीव गुरुनानक यांनी स्पष्ट शब्दांत दिलेली आहे. इतर धर्मपंथ व शीखपंथ यांत हाच भेद आहे.

समता :
 भारतातील भक्तिपंथांनी जातिभेदाचा निषेध केला आहे. पण तो परमार्थ- क्षेत्रापुरता. परमेश्वराच्या पायांशी सर्व जाती सारख्या असा उपदेश ते करीत. पण प्रत्यक्ष व्यवहारातील जातिभेदाचे ते कटाक्षाने समर्थन करीत. शूद्राच्या घरी उत्तम पक्वान्ने असली तरी ब्राह्मणाने ती खाणे योग्य नव्हे, असे ज्ञानेश्वर म्हणतात. वरिष्ठ वर्णांची सेवा हाच शूद्राचा धर्म, असे ते सांगतात. आणि हा धर्म 'गोरेया अंगी गोरेपण' इतका जन्मजात व म्हणूनच अटळ आहे, असे त्यांचे मत होते. एकनाथ, तुकाराम या इतर भागवतांनी सर्व जातींनी एकत्र अन्नपानादी व्यवहार करणे हे धर्महानीचे, कलियुगाचे लक्षण म्हणून सांगितले आहे. पण गुरुनानक यांनी व्यावहारिक पातळीवरूनही जातिभेदाचा निषेधच केला आहे. भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, सोवळेओवळे यांचा विचार ते कधीच करीत नसत. खाण्यापिण्यावर काही एक अवलंबून नाही, असे त्यांचे मत होते. शीखांच्या गुरुद्वारात लंगर ही संस्था आहे. तीत मुक्तद्वार सहभोजन चालते. स्वतः गुरुनानक अशा लंगरात जेवीत असत. त्यांचा पहिला शिष्य मर्दाना हा मुसलमान होता. प्रवासात तोच त्यांच्याबरोबर असे. पण स्पर्शास्पर्शाचा वा खाण्यापिण्याचा विधिनिषेध गुरूंनी कधीही पाळला नाही. याप्रमाणे शीखांची समताबुद्धी केवळ परमार्थापुरतीच मर्यादित नसून प्रत्यक्ष व्यवहारातही ती आचरणात आणली जात असे.
 खाणेपिणे, स्पर्शास्पर्श, यावरील निर्बंधांमुळेच भारतातील जातिभेदाला फार कडक व घातक रूप प्राप्त झाले आणि त्यांमुळेच पूर्वी हजारो वर्षे चालू असलेले परदेशगमन, समुद्रपर्यटन हे हिंदूंना निषिद्ध ठरले. गुरुनानक यांनी परदेशगमनाचे हे सर्व नियम झुगारून दिले व आपल्या चवथ्या यात्रापर्वात ते मक्का, मदिना, बगदाद या शहरांना भेटी देऊन आले. तेथे असताना त्यांनी अनेक इस्लामी पंडितांशी वादविवाद केले व अनेकांना आपली तत्त्वे पटवून दिली. बगदादला ज्या घरात शेख बहलोल यांच्याशी गुरुनानक यांचा वाद झाला तेथे 'बाबा नानक, फकीर अवलिया यांच्या स्मरणार्थ' अशी पाटी लावलेली आहे. तीवर हिजरी वर्ष ९२७ दिले आहे. म्हणजे ही गोष्ट इ. स. १५२०-२१ साली घडली.

मुस्लीमांना दीक्षा :
 पारंभापासून हिंदू व मुसलमान यांत भेद नाही असा उपदेश नानक करीत असत. आणि हा त्यांचा उपदेश पटल्यामुळे अनेक मुसलमान शीखपंथात त्या काळी आले. अन्य धर्मीयांना संस्कार करून आपल्या धर्मात घेणे ही हिंदू- धर्मीयांची प्राचीन परंपरा पुढे पूर्ण बंद पडली, हे मागे सांगितलेच आहे. पुढे हिंदूंचे सोवळे इतके वाढले की स्वधर्मातून, जुलमामुळे, फसवणुकीमुळे जे च्युत झाले त्यांनाही शुद्ध करून घेण्याचे त्यांनी नाकारले आणि पुढील अनेक अनर्थांचा पाया रचून ठेवला. गुरुनानक यांनी मुस्लीमांनाही शीखपंथात समाविष्ट करून घेण्याचा उपक्रम केला. ही प्रथा कायम टिकली असती तर भारतावरची अनेक संकटे मुळातच नाहीशी झाली असती. पण मुस्लीमांचे धर्मांतर करणे हे दिल्लीच्या मोगल पादशहांना व त्यांच्या मुल्लामौलवींना सहन होणे कधीच शक्य नव्हते. हिंदू सत्ताधीशांना हिंदूंच्या धर्मातराची खंत कधीच वाटली नाही. देवगिरीचे यादव, वरंगळचे काकतीय यांची सत्ता चालू असतानाच सूफी पंथाच्या मुल्लामौलवींनी अनेक हिंदूंना इस्लामची दीक्षा दिली, येवढेच नव्हे तर हिंदू राजे सत्तारूढ असताना त्यांनी हिंदुदेवतांची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारल्या. हिंदूंच्या धर्मातराची हिंदू राजांना व हिंदू धर्मपंडितांना कधी खंत वाटलीच नाही. पण इस्लामी सुलतान व त्यांचे मुल्लामौलवी याबाबतीत पराकाष्ठेचे जागरूक असत व आजही आहेत. गुरुनानक यांनी आपली धर्मतत्त्वे इस्लामपेक्षा श्रेष्ठ आहेत असे सांगितले आणि अनेक मुस्लीमांना शीख पंथात समाविष्ट केले. यामुळेच पुढे शीखपंथ व दिल्लीचे पादशहा यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला. गुरुनानक यांच्या काळी दिल्लीची सत्ता विशेष प्रभावी नव्हती. त्यानंतर अकबर हा फार मोठा बलाढ्य पादशहा झाला. पण त्याची इस्लामनिष्ठा कडवी नव्हती. त्याची शीखपंथाला सहानुभूतीच होती. पण त्याच्यामागून १६०५ मध्ये जहांगीर गादीवर येताच मुस्लीमांच्या धर्मांतराला पायबंद घालण्याचा त्याने निर्धार केला व तेथपासूनच शीख व मुस्लीम हे हाडवैरी झाले. येथून पुढचा शीखपंथाचा सर्व इतिहास हा पंजाबातून मुस्लीम सत्तेचा उच्छेद करण्याचे शीखांनी प्रयत्न केले त्याचा इतिहास आहे.

पृथगात्मता :
 गुरुनानक यांच्यानंतर गुरु अंगद (१५३९-५२) हे त्यांच्या स्थानी आले. हे गुरु अंगद व त्यांच्यानंतरचे चार गुरू अमरदास, रामदास, अर्जुन व हरगोविंद यांच्या काळात (१५५२- १६४५) शीख संप्रदायाची पृथगात्मता निश्चित झाली. सभोवार पसरलेल्या हिंदुसमाजापासून हा संप्रदाय स्पष्टपणे निराळा दिसू लागला. त्याला त्याची अशी अनेक वैशिष्ट्ये या गुरूंनी प्राप्त करून दिली आणि त्यामुळे या पंथाच्या विशिष्ट धर्माला संघटनतत्त्वाचे स्वरूप येऊन शीख समाज संघटित झाला. शीख समाज इतर हिंदूंपेक्षा जास्त प्रबल झाला, मोगली सत्तेचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य काही अंशी त्याला प्राप्त झाले, ते या नवधर्मतत्त्वांवरील श्रद्धेमुळे आणि त्या श्रद्धेमुळे जी पृथगात्मता आली तिच्यामुळेच होय.
 गुरू अंगद व गुरू अर्जुन यांनी 'ग्रंथसाहेबा' ची रचना पूर्ण करून शीखांना एक स्वतंत्र धर्मग्रंथ प्राप्त करून दिला. वेदप्रामाण्य त्यांनी त्याज्य ठरविले. हिंदूंची पुराणे, त्यांतील अवतारकल्पना, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये त्यांनी शीखांना वर्ज्य केली. आणि यापुढे शीखांचे विवाहादी सर्व संस्कार ग्रंथसाहेबांतील मंत्रांनी झाले पाहिजेत असा दण्डक वालून दिला. गंगा, यमुना, काशी, प्रयाग, रामेश्वर या सर्व तीर्थक्षेत्रांचे पुण्य अमृतसर येथील सरोवरात साठविले आहे, असे त्यांनी सांगितले आणि वैशाख, माघ व कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे शीखांसाठी नवे सण रूढ केले. गुरुगोविंदसिंगांनी शीखांना पृथगात्म करण्याचे हे कार्य पूर्णतेस नेले. पोल नावाचा दीक्षाविधी प्रत्येक शीखाला अवश्य म्हणून त्यांनी सांगितला, केश, कंगवा, कछ, कडे व कृपाण ही शीखांची वैशिष्ट्ये सदैव त्याच्याजवळ असलीच पाहिजेत, असा नियम केला, 'वाह गुरू की फत्ते' हे नमनवाक्य म्हणून ठरवून दिले व प्रत्येक शीखाने दीक्षा घेताच सिंग हे उपपद आपल्या नावापुढे लावले पाहिजे असा दण्डक घालून दिला. अशा तऱ्हेने शीखसमाज हा एक संप्रदाय झाला. वारकरी, रामदासी यांना आपण संप्रदाय म्हणतो. पण त्याचे नियम असे कडक नाहीत. माळ घातली नाही, टिळे लावले नाहीत, विठ्ठलाहून किंवा रामाहून अन्य देवतांचे भजन केले तर त्या मनुष्याला पंथात स्थान नाही असे कधी घडत नाही. अमुक एक मनुष्याला अमक्या कारणासाठी संप्रदायातून घालवून दिले, असे या संप्रदायात कधीच घडले नाही. अशा बाह्य आचारावर अनुयायित्व अवलंबून ठेविणे हे त्या पंथाच्या प्रवर्तकांना मुळीच मान्य नव्हते. कारण शेवटी हे बाह्य कर्मकांड तेवढे शिल्लक राहून मूळ आत्मा निघून जातो, असे त्यांचे मत होते. पण शीखगुरूंनी या आचारांवर भर देऊन आपल्या पंथाची भिन्नता करकरीत करून टाकली व त्याला एक स्वतंत्र अस्मिता प्राप्त करून दिली.
 पृथगात्मता, भिन्नता यांत शक्ती आहे, सामर्थ्य आहे, बल आहे. अखंडात खंड निर्माण झाला, अनंतात सांतता आली, अरूपाला रूप आले की कर्तृत्व निर्माण होते, असे ब्रह्मासंबंधी बोलताना, तत्त्ववेत्ते म्हणतात. मानवाबद्दल ते तितकेच खरे आहे. आपण समूह म्हणून इतरांच्यापेक्षा भिन्न आहो, निराळे आहो अशी जाणीव ज्या समाजात निर्माण होते तो समाज हळूहळू उन्नत होऊ लागतो. अर्थात ज्या कारणांमुळे, ज्या तत्त्वांमुळे तो समाज इतरांपासून आपल्याला पृथक मानतो त्यावर म्हणजे त्या संघटनतत्त्वावर त्याची निष्ठा किती दृढ आहे, अविचल आहे, उत्कट आहे यावर ही उन्नती अवलंबून आहे, हे उघडच आहे. शीखसमाजाने काही धर्मतत्त्वे निराळी मानून त्यांवर आपल्या संप्रदायाची संघटना केली आणि काही आचार, विचार, नियमने ही प्रत्येक घटकाला अवश्य म्हणून लावून देऊन त्याच्या भिन्नपणाची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न केला. अखिल हिंदुसमाज हा त्याच्या धर्मतत्त्वामुळेच इतरांहून पृथक झालेला आहे. पण त्याने आपल्या अंतरातच इतके भेद निर्माण करून ठेविले की त्याला समाज हे रूप राहिलेच नाही. इतरांहून भिन्न होताच आपल्या संप्रदायाच्या अंतरात आपण सर्व अभिन्न आहो ही जाणीव भिन्नतेच्या जाणीवेपेक्षा दसपटीने जास्त परिपोषावी लागते. हिंदुसमाजाने हे कधीच केले नाही. उलट आपल्या अभ्यंतरातही भिन्नतेचाच तो परिपोष करीत राहिला. त्यामुळे त्याचे सामर्थ्य क्षीण होऊ लागले. आणि पंजाबात शीखांच्या उद्याच्या वेळी तर तो अगदी मृतप्राय होऊन पडला होता. या वेळी शीखांनी स्वतंत्र संप्रदाय स्थापून त्यात काही तरी सामर्थ्य निर्माण करण्यात यश मिळविले.

क्षात्रधर्माची दीक्षा :
 शीख संप्रदायाची अनेक वैशिष्ट्ये वर सांगितली. पण त्या सर्वाहून क्षात्रधर्माची दीक्षा प्रत्येक शीखाला देणे, हे त्याचे खरे वैशिष्ट्य होय. त्याच्या ठायी मोगली सत्तेचा, तिने चालविलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचे जे काही सामर्थ्य निर्माण झाले ते त्यामुळेच झाले. हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे चार वर्णांपैकी क्षत्रिय वर्णानेच फक्त शस्त्र धारण करावयाचे असते. इतर वर्णाना केवळ आपत्काळापुरते सशस्त्र होण्यास शास्त्राची अपवादात्मक परवानगी आहे. याचा परिणाम हळूहळू असा होत गेला की, बहुसंख्य जो शेतकरीवर्ग आणि शूद्र वर्ण तो स्वराज्य, युद्ध, परकीय आक्रमण यांविषयी उदासीन झाला. आणि युद्धाचा भार एकट्या क्षत्रियवर्णावर पडू लागला. मुस्लीमांमध्ये वर्णव्यवस्था नसल्याने त्या समाजात सर्वच जनता राज्याच्या भवितव्याशी निगडित झालेली असे. आणि स्वराज्य हे त्यांच्या धर्माचेच एक अविभाज्य अंग असल्यामुळे प्रत्येक मुसलमान आपोआपच शस्त्रधारी होई. हिंदुधर्माने निवृत्तीची व अहिंसेची जोपासना करून बहुजन समाजाला स्वराज्य, स्वातंत्र्य यांपासून अलग करून टाकले आणि बहुसंख्य कर्त्या पुरुषांनाही यांविषयी उदासीन केले. त्यामुळेच आत्मरक्षणाचे सामर्थ्य त्या समाजातून नष्ट झाले. हे सर्व ध्यानी घेऊन शीखगुरूंनी शस्त्र हे शीखाच्या धर्मनिष्ठेचेच एक लक्षण आहे, असे ठरवून टाकले. आणि अशा रीतीने तो सर्व समाजच क्षात्रधर्मी बनविला.

आत्मबलिदान :
 तो तसा बनविला नसता तर शीख समाज जगलाच नसता. मुस्लीमांचेही धर्मांतर करून, आणि इस्लामपेक्षा आपली धर्मतत्त्वे श्रेष्ठ आहेत असे जाहीर करून, शीखांनी मोगल साम्राज्यसत्तेला आव्हानच दिले होते. त्यामुळे पहिल्यापासूनच त्या सत्तेची शीखांवर वक्रदृष्टी होती. १६०५ साली जहांगीर तख्तावर येताच त्याने शीखांच्या बंडाचे निर्मूलन करावयाचे ठरविले. आणि त्याचा मुलगा खुश्रू बापाविरुद्ध बंड करून उठला असताना, त्याला गुरू अर्जुन यांनी साह्य केल्याचे निमित्तही त्याला मिळाले. त्याने गुरू अर्जुन यांना कैद करून हालहाल करून ठार मारिले. शीख समाजाने धर्मासाठी केलेले हे पहिले बलिदान होय! तेथून ही परंपरा सुरू झाली आणि जवळ जवळ एक शतकभर शीखांनी ती चालविली. या प्रकारच्या आत्मबलिदानातूनच त्या समाजाच्या ठायी मोठी प्रतिकारशक्ती निर्माण झाली.

दिल्लीशी संघर्ष :
 मोगली सत्तेने गुरू अर्जुन यांचा बळी घेतल्याने शीख समाज अत्यंत संतप्त झाला, आणि त्यामुळेच त्यात मोठे परिवर्तन घडून आले. शीखांच्या हे ध्यानात आले की, नुसत्या हरिनामगजराने किंवा ग्रंथसाहेबाच्या पठनाने धर्मरक्षण होणार नाही. आध्यात्मिक उन्नतीसाठीसुद्धा भौतिक लप्करी सामर्थ्य व धन ही आवश्यक आहेत. गुरू अर्जुन यांनी मृत्यूपूर्वी आपला मुलगा हरगोविंद याला हाच संदेश दिला. त्यामुळे गुरुपदी येताच हरगोविंद यांनी आपल्या समाजाला क्षात्रधर्माची दीक्षा देण्याचा निर्धार केला. इतके दिवस शीख समाज केवळ भक्तिमार्गी होता; तो आता शक्तिमार्गी झाला. वारकरी होता तो धारकरी झाला. हरगोविंद यांनी स्वतःचे घोडदळ तयार केले, तोफखाना उभा केला आणि सरळ सरळ लष्करच सज्ज केले. जहांगीरच्या हे कानी जाताच त्याने गुरूंना पकडून कैदेत ठेविले. पण एक दोन वर्षांनी काही लोकांच्या मध्यस्थीने त्यांची सुटका झाली. त्यानंतर शहाजहान गादीवर येईपर्यंत शीखांचा मोगलसत्तेशी संघर्ष झाला नाही. पण तो सत्तारूढ होताच, गुरूंचा बंदोबस्त केला नाही तर इस्लाम भारतातून नष्ट होईल, असे मुल्ला मौलवी त्याला सांगू लागले. त्यामुळे संघर्षाला पुन्हा प्रारंभ झाला. निरनिराळी कारणे काढून शहाजहान शीखपंथ नष्ट करण्यासाठी आपले सरदार धाडू लागला. प्रथम मुखलीसखान सात हजार फौज घेऊन आला. त्याने अमृतसरवर हल्ला केला, शहर लुटले व हरगोविंद यांचा वाडा लुटला. पण त्या लढाईत खान स्वतःच मारला गेला. यानंतर तीन वर्षांनी क्वायरवेग व आणखी तीन वर्षांनी पैंदाखान व कालेखान असे सरदार स्वारी करून आले, पण हे सर्व सरदार मारले गेले. (ठाकुर देशराज- सिख इतिहास, आठवा अध्याय.) पण असे विजय मिळाले तरी, युद्धप्रसंग सारखे येत गेले तर, आपला टिकाव लागणार नाही, हे जाणून गुरू हरगोविंद यांनी अमृतसरहून आपले ठाणे हलविले व लांब पहाडात कीरतपूर येथे ते जाऊन राहिले. आणि तयारी करण्यास शीखांना वेळ मिळावा म्हणून काही काळ सबुरीचे, नरमाईचे, धोरण स्वीकारून दहा बारा वर्षे धर्मप्रसाराच्या कार्यात त्यांनी शांतपणे वालविली. त्यांच्यामागून आलेले गुरू हरिराय (१६४५-६१) व गुरू हरकिशन (१६६१-६४) यांच्या कारकीर्दीत विशेष काहीच घडले नाही. त्यानंतर १६६४ साली गुरु तेगबहादुर हे गुरुपदी आले.

तेगबहादुर :
 गुरू तेगबहाद्दुर गादीवर आले त्या वेळी शीख समाजात फार बेदिली माजली होती. गुरू अर्जुन यांच्या बलिदानामुळे तेवढ्यापुरती धर्माभिमानाची लाट समाजात उसळली, पण त्या अभिमानातून दृढ व दीर्घकालीन ऐक्यभावना निर्माण झाली नाही. गुरू अर्जुन यांचा भाऊ पृथिया मोगलांना जाऊन मिळाला होता. गुरूंना तो जन्मभर छळीत राहिला. गुरू हरगोविंद यांच्याविरुद्ध दिल्लीच्या सुलतानांना चिथावण्यात शीख भाईबंदांचा बराच हात होता. अमृतसरच्या मंदिराचे अधिकारी बडवे, पंडे यांच्याच वळणावर गेले. गुरू तेगबहाद्दुर तेथे गेले तेव्हा मंदिराचे दरवाजे त्यांनी बंद करून घेतले व गुरूंनाच आत येण्याची बंदी केली. आणि आश्चर्य असे की गुरूंनी ती मानली व क्षात्रधर्माची दीक्षा देऊन गुरू हरगोविंद यांनी संघटित केलेल्या शीख समाजानेही काही प्रतिकार केला नाही. या पुजाऱ्यांना मसंद म्हणत. मसंद ही एक संस्थाच होती. गुरू अर्जुन यांनी प्रत्येक शीखाने गुरुपीठाला काही दक्षिणा दिलीच पाहिजे, असा दण्डक घालून देऊन त्याच्या वसुलीसाठी ही मसंदसंस्था निर्मिली होती. प्रारंभी काही दिवस ही व्यवस्था ठीक जमली. पण पुढे पुढे हे मसंद इतके भ्रष्ट झाले, दक्षिणेसाठी लोकांना इतके छळू लागले की, गुरू गोविंदसिंग यांना ती संस्था बंद करावी लागली.
 गुरू तेगबहाद्दुर हे अमृतसरहून निघाले ते कीरतपूरला आपल्या वडिलांच्या गावी जाऊन राहिले. तेथेही त्यांचे भाऊ, धीरमल, पुतण्या रामराय व अमृतसरचे मसंद यांनी त्यांना रहाणे अशक्य करून टाकले. रामराय याने तर औरंगजेबाकडून गुरूंना पकडण्याचे हुकूम मिळविले. पण या वेळी हे प्रकरण फार चिघळले नाही. थोड्याच दिवसांत गुरूंची मुक्तता होऊन ते यात्रेला निघाले व प्रयाग, पाटणा, डाक्का या भागांत हिंडून त्यांनी धर्मप्रचार केला. कदाचित याच कार्यात त्यांनी शांतपणे आपले आयुष्य घालविले असते. पण प्रचार करताना मुसलमानांनाही ते शीख धर्माची दीक्षा देत. अर्थातच औरंगजेबासारख्या कडव्या धर्मांध बादशहाला हे सहन होणे शक्यच नव्हते. या वेळी हिंदूंना सक्तीने बाटविण्याची त्याने मोहीमच काढली होती. काश्मीरमध्ये त्याचा सुभेदार शेख अफगाण याने यापायी अनन्वित अत्याचार चालविले होते. तेव्हा तेथील काही ब्राह्मण तेगबहादुर यांचेकडे आले व काश्मीरची सर्व कहाणी त्यांनी त्यांना सांगितली. त्या वेळी गुरूंच्या वृत्तीत एकदम पालट झाला व त्यांनी धर्मासाठी आत्मबलिदान करावयाचे ठरविले. त्यांनी त्या ब्राह्मणांना सांगितले की औरंगजेबाला सांगा की, 'गुरू तेगबहादुरांना तू आधी मुसलमान कर. त्यात तुला यश आले तर मग आम्ही सर्व मुसलमान होऊ.' हा निरोप पोचताच औरंगजेब पराकाष्ठेचा खवळून गेला व त्याने गुरूंना पकडून नेऊन हाल हाल करून ठार मारले.
 गुरू तेगबहादुर यांच्या आत्मबलिदानाची कथा ही शीख इतिहासात अमर झाली आहे. आजही शीखांना ती स्फूर्तिप्रद वाटते. गुरूंच्या बरोबर मतिराम, दयालदास इ. पाच शीखांना बादशहाने पकडून नेले होते. एक दिवस तुरुंगात मतिराम गुरूंना म्हणाले की, 'आपला धर्म रक्षावयाचा तर ही मोगल सल्तनत नष्ट केली पाहिजे.' हे औरंगजेबाच्या कानी जाताच त्याने मतिरामला पकडून दरबारात नेले व त्याला जाब विचारला. मतिराम याने अत्यंत धैर्याने तेथेही जबाब दिला की, 'अरे, ज्यांच्या हृदयात निष्ठा आहे व जे सत्याचे उपासक आहेत ते एकच काय, अनेक मोगल बादशाह्या नष्ट करून टाकतील.' अर्थात् औरंगजेबाने मतिरामला तेथल्या तेथे कापून टाकण्याची आज्ञा दिली. शरीराचे तुकडे होत असतानाही मतिराम अकाल पुरुषाचा जयजयकार करीत होता. याच वेळी दयालदासानेही असेच वीरमरण पत्करले. त्याने औरंगजेबाला सांगितले की, 'तू मतिरामाच्या शिरावर तलवार चालवीत नसून मोगल सल्तनतीच्या शिरावर चालवीत आहेस.' औरंगजेबाने त्यालाही तेलाच्या कढईत घालून ठार मारले. यानंतर गुरू तेगबहाद्दूर यांचाही शिरच्छेद करण्यात आला. मरतेसमयी त्यांनी आपल्या मानेवर एक चिट्ठी गुंडाळून बांधून ठेवली होती. तिच्यावर लिहिले होते की, 'सिर दिया, सर न दिया!' शीर दिले पण धर्म दिला नाही. ह इतिहास देऊन ठाकुर देशराज म्हणतात, 'गुरू तेगबहादुर यांच्या या बलिदानाची महती वर्णन करण्याची शक्ती माझ्या ठायी नाही. मी इतकेच सांगतो की, मृतप्राय झालेल्या हिंदुजातीमध्ये यामुळे एक फार मोठे सामर्थ्य निर्माण झाले व त्याने अनेक विजय मिळविले.' (सिख इतिहास- पृ. २२६, २२७, १७३)
 या सामर्थ्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच गुरू गोविंदसिंग होत. पिताजी गेले (इ. स. १६७५) तेव्हा हा मुलगा नऊ वर्षांचा होता. पण तेव्हापासूनच त्याच्या बुद्धीला एक विशेष समज, विशेष प्रौढता आली होती. त्या वेळेपासूनच त्याने पिताजी गुरू तेगबहाद्दुर यांच्या वधाचा बदला घेण्याचे ठरविले होते. पण हा बदला खुनास खून करून त्याला घ्यायचा नव्हता, तर मुस्लीम सलतनतीच्या सामर्थ्याला दुसरे सामर्थ्य भिडवून घ्यावयाचा होता. हे कार्य एक-दोन दिवसांचे नव्हते. त्यासाठी लोकजागृती अवश्य होती. म्हणून प्रारंभीची वीस वर्षे गुरु गोविंदसिंग यांनी मनन, चिंतन व संघटन यांत घालविली. वर सांगितलेच आहे की, शीख समाज या वेळी अगदी अल्पसंख्य असला तरी त्याच्यात दुही, फूट, स्वजनद्रोह, भ्रष्टाचार हे फार माजले होते. गुरुनानक यांनी केलेल्या धर्मक्रान्तीची बीजे पुरतेपणी रुजली नव्हती. म्हणून पुन्हा एकदा त्या धर्मतत्त्वांना उजाळा देणे अवश्य होते. हे जाणून गुरू गोविंदसिंग यांनी ते कार्य प्रथम हाती घेतले.

हा धर्मच नव्हे :
 धर्मतत्त्वांना उजाळा देणे याचा अर्थ काय ते मागील अनेक लेखांत स्पष्ट केलेच आहे. हिंदुधर्माला आलेल्या विकृतीपासून त्याला मुक्त करणे आणि समता, प्रवृत्तिवाद, राष्ट्रभक्ती, बुद्धिनिष्ठा या तत्त्वांचा उपदेश करून ती समाजात दृढमूल करणे याचेच नाव धर्मतत्त्वांना उजाळा देणे असे आहे. शीख समाजात प्रारंभापासूनच जातिभेद, वर्णभेद, जन्मनिष्ठ उच्चनीचता यांस विरोध होता, सर्व जातीचे लोक त्या पंथात समाविष्ट होत आणि मग त्यांच्यात खाण्यापिण्याचा विधिनिषेध मुळीच पाळला जात नसे, हे मागे सांगितलेच आहे. पंजाबातील पहाडी भागात अनेक क्षुद्र रजपूत राजे व त्यांची क्षुद्र संस्थाने मोगल बादशहांच्या कृपाछत्राखाली सुखाने नांदत होती. त्यांना स्वातंत्र्याशी, स्वराज्याशी काहीच कर्तव्य नव्हते. पण सर्व जातींत समता निर्माण होणे, सर्वांनी एकत्र खानपान करणे, शेंडी, जानवे, यांचे आकार कमी होणे यांबद्दल मात्र ते अत्यंत चिंताग्रस्त होते. शीख गुरूंनी हा अधर्म चालविला आहे, भ्रष्टाकार माजविला आहे, असे त्यांना वाटत होते. म्हणून राजा अमेरचंद याच्या नेतृत्वाखाली त्यांचे एक शिष्टमंडळ गुरु गोविंदसिंग यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, 'महाराज, आपण खालसानामक पंथ काढून हे काय चालविले आहे ? यात शिखासूत्राचा विचार नाही, जातिपातीचाही नाही, खानदानीलाही तुम्ही किंमत देत नाही. सर्वांची रसोई एकत्र होते आणि वाटेल त्याच्या हातचे लोक खातात. हे काय आहे ?' हिंदुधर्माचा आत्मा स्वराज्य-स्वातंत्र्यात आहे, स्त्रियांच्या व मंदिरांच्या रक्षणात आहे, सर्व हिंदूंचे संघटन करण्यात आहे, असे त्या रजपूत राजांना मुळीच वाटत नव्हते. शिखासूत्र, उच्चनीचता, भक्ष्याभक्ष्य यांतच तो कोठे तरी आहे अशी त्यांची श्रद्धा होती. मोगलांना मुली देण्यामुळे धर्महानी होते, असा विचारसुद्धा त्यांना शिवत नव्हता. पण इतर हिंदूंबरोबर खाण्यापिण्याने ती होते याविषयी त्यांना शंका नव्हती. गुरू गोविंद सिंग त्यांना म्हणाले, "अरे, तुम्ही ज्याला धर्म म्हणता तो धर्मच नाही. ज्या धर्मात एक माणूस दुसऱ्याला हीन लेखतो तो सर्व समाजाचा धर्म होऊ शकत नाही. माझा प्रयत्न असा आहे की कोणालाही उच्चनीच मानू नये, असे धर्मसंस्कार लोकांवर करावे. राजा, आपल्या देशाची काय अवस्था झाली आहे हे तुला दिसत नाही का ? आपल्या धर्मबांधवांवर कोणते संकट आले आहे आणि तुम्ही स्वतः आपले पूर्ववैभव कसे गमावून बसला आहा, याची तुम्हांला काही कल्पना नाही ? तुम्ही रजपूत आपल्या मुली मोगलांना देऊन त्यांच्या सेवेला हजर राहता. तुमचे धन व तुमच्या कन्या यांवर आपला अधिकारच आहे, असे हे तुर्क समजतात. आणि ते तुम्ही मान्य करता ! तरी तुमच्या अंगी काही क्षात्रत्व आहे असेच मानावयाचे काय ? तुर्कांनी चालविलेल्या घोर अन्यायाचा प्रतिकार करण्याचा उद्योग आम्ही चालविला आहे. पण त्यामुळे तुमच्या धर्मभावना दुखावतात ! हा तुमचा जो धर्म त्याला काय म्हणावयाचे !"
 अर्थात रजपूत संस्थानिकांवर याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. त्यांनी सर्व राजांची एक सभा घेतली व गुरू गोविंद यांना लिहून धाडले की, 'मोगल बादशहा आज शेकडो वर्षे या देशात राज्य करीत आहेत. त्यांचे राज्य नष्ट करण्यात आपल्याला यश येईल हे संभवत नाही व बलशाली मोगल पातशाहीला विरोध करण्यापासून काही लाभ आहे, असेही आम्हांला वाटत नाही.' (सिख इतिहास- देशराज ठाकुर, पृ. १८४.)

खालसा :
 एकंदर हिंदुसमाजाची ही मृतावस्था, ही पौरुषहीनता, ही अवकळा ध्यानी घेऊनच गुरू गोविंद यांनी शीख संप्रदायालाच 'खालसा' असे नाव ठेवून, त्यांना काही नवी आचारबंधने लावून त्या पंथात नवे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका सभेत 'धर्मासाठी आत्मबलिदान करण्यास कोण तयार आहेत?' असा सवाल त्यांनी विचारला. आणि जे पाच लोक तयार झाले त्यांना गुरूंनी 'पंचप्यारे' म्हणून संबोधिले. आणि त्यांच्या साह्याने पंथाचे संघटन पुन्हा दृढ करून, त्याला क्षात्रधर्माची दिलेली दीक्षा पुन्हा एकदा उजळण्याचा संकल्प त्यांनी केला. खालसा म्हणजे शुद्ध, पवित्र; खालसा म्हणजे समता, बंधुता; खालसा म्हणजे स्वतंत्र, स्वत्वनिष्ठ ! या खालसा अनुयायांना केस, कडे, कृपाण इ. पाच चिन्हे गुरूंनी आवश्यक म्हणून सांगितल्याचे वर निर्देशिलेच आहे. या सर्वामुळे शीख समाजात नवी शक्ती, नवे चैतन्य निर्माण करण्यात गुरू गोविंदसिंग यांना इतके यश आले की, आज गुरू गोविंदसिंग व शीख संप्रदाय यांत अभेद मानला जातो.

गुरु गोविंदसिंग :
 धर्मजागृतीचे हे कार्य चालू असतानाच गुरूंनी लष्करी सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष पुरविले होते. किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांनी त्यांचे निवासस्थान जे आनंदपूर त्याच्या भोवतालच्या टापूत लोहगड, फत्तेगड, फूलगड, आनंदगड असे किल्ले बांधले व एक मोठी सेना उभी करण्यासही त्यांनी प्रारंभ केला. त्यांना प्रथम विरोध झाला तो पहाडी राजपूत राजांकडून. आनंदपूर हे एका राजाचे हद्दीत होते. त्याने ती जागा खाली करण्याची गुरूजींना आज्ञा दिली. आणि ती मानली जात नाही असे पाहून वीस-बावीस संस्थानिकांना जमवून त्याने गुरूंवर चाल केली. हे रजपूत राजे औरंगजेबाविरुद्ध असे कधी एकत्र होऊन उठले नव्हते. तो त्यांचा शत्रू नव्हता ! कारण तो फक्त मंदिरे पाडीत असे, हिंदू लोकांना सक्तीने बाटवीत असे व त्यांच्या कत्तली करीत असे. पण जातिभेदाला त्याने हात लावला नव्हता, की भक्ष्याभक्ष्यांच्या नियमांचे उल्लंघन करण्याची सक्ती केली नव्हती. गुरू गोविंदसिंगांनी तो भ्रष्टाकार करून धर्मनाश चालविला होता. म्हणून रजपूत राजे एक झाले होते. पण भंगाणी येथे मोठी लढाई होऊन राजपूत राजांचा पराभव झाला. गुरूंचा असा अनेक वेळा प्रभाव दिसून आल्यावर बरेचसे पहाडी राजे त्यांना वश झाले व ते औरंगजेबाला वार्षिक खंडणी देईनासे झाले. यावेळी औरंगजेब दक्षिणेत असून मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याच्या उद्योगात गुंतला होता. त्याला ही खबर मिळताच, अत्यंत चिडून जाऊन, त्याने आपल्या लाहोरच्या सुभेदाराला खरमरीत पत्रे लिहिली व गुरू गोविंदसिंग यांना जिवंत पकडून आपल्यासमोर हजर करण्याचा हुकूम दिला. त्या अन्वये अलीफखा, दिलावरखा, रुस्तुमखा अशा अनेक सरदारांनी आनंदपूरवर स्वारी केली. पण त्या सर्वांचा शीखांनी पराभव केला. त्यानंतर बादशहाने शहाजादा मुअज्जम याला मोठी सेना देऊन गुरूवर पाठविले. पण त्याचीही काही मात्रा चालली नाही. तेव्हा औरंगजेबाने पंजाबच्या सर्व सुभेदारांना कडक पत्रे लिहून सर्वांनी मिळून शीखांना जमीनदोस्त करण्याचा हुकूम दिला. या वेळी पहाडी राजपूतही उलट खाऊन मोगल सैन्याला मिळाले. राजपूत व मोगल मिळून एक लाख फौज जमा झाली होती. एवढ्या सेनेने आनंदपूरला वेढा घातला असताना अल्पसंख्य शीखांचा टिकाव लागणे शक्यच नव्हते. त्यातही अन्नाचा तुटवडा पडू लागला. तेव्हा एके दिवशी आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला घेऊन गुरू गोविंदसिंग रात्रीचे गुप्तपणे किल्ल्याबाहेर निसटले. मोगलांना याचा सुगावा लागताच त्यांनीही लगोलग त्यांना पकडण्यासाठी फौज धाडली. या धावपळीत निभाव लागणे कठीण आहे, हे पाहून गोविंदसिंग यांनी आपली माता, दोन स्त्रिया व धाकटे दोन मुलगे जोरावरसिंग व फत्तेसिंग यांना एका खेड्यात गंगाराम नावाच्या विश्वासू माणसाकडे धाडून दिले, आणि आपण स्वतः चमकौरच्या किल्ल्यात अजितसिंह व जुझारसिंह या दोन मुलांसह जाऊन राहिले. तेथेही मोगल सेनेने त्यांना घेरले. त्या वेळी त्यांच्याजवळ अवघे ४० शीख होते. कोणाच्या मते ५०० होते. या वेढ्याच्या प्रसंगी अफाट मोगल सेनेवर स्वतः होऊन चालून जाऊन गुरूंच्या दोन पुत्रांनी अभिमन्यूप्रमाणे बलिदान केले. पण चमकौरच्या किल्ल्यातही निभाव लागेना तेव्हा गुरुजी तेथून निसटून गेले व त्यांनी अरण्यवास पत्करला. तेथेही मोगल सेना त्यांचा पिच्छा पुरवीत होतीच. पण ते तिच्या हाती सापडले नाहीत. पण याच काळात त्यांच्यावर एक भयंकर आपत्ती कोसळली. गंगाराम हा त्यांचा पूर्वीचा शिष्य व स्वयंपाकी. त्याच्याकडे त्यांनी आपल्या मातेला व धाकट्या दोन मुलांना विश्वासाने ठेविले होते. पण त्याने दगा दिला व सरहिंदचा सुभेदार वजीरखान यास गोविंदसिंगांचा हा परिवार आपल्याकडे असल्याची बातमी दिली. खानाने लगेच त्यांना पकडून नेले आणि 'मुसलमान व्हा नाही तर तुम्हांला देहदंड सोसावा लागेल' अशी धमकी दिली. मुलांनी उत्तर दिले की, 'आम्ही गुरू गोविंद यांचे पुत्र आहो. आम्ही मरणाला भीत नाही. पण ध्यानात ठेवा की, आमच्या रक्ताच्या थेंबातून अनेक जोरावर सिंग व फत्तेसिंग उत्पन्न होतील व तुझ्यासारख्या जुलमी मोगलांचा प्राण घेतील.' अर्थातच दोन्ही मुलांना भिंतीत चिणून ठार मारण्यात आले. यानंतर लौकरच औरंगजेब मृत्यू पावला. त्याच्या मागून गादीवर हक्क सांगणाऱ्या बहादुरशहाला गुरू गोविंद यांच्या मदतीची जरूर होती. मुअज्जमशी झालेल्या लढाईत गुरूंनी त्याला खूप मदत केली व त्यामुळेच बहादुरशहाला विजय मिळाला व तो गुरूंचा मित्र बनला. त्याने गुरुजींना लाख मोहरा नजर केल्या व आपल्याबरोबर दक्षिणेत येण्याचा आग्रह केला. गोविंदसिंगांनी तो मान्य करून ते दक्षिणेत नांदेड येथे जाऊन राहिले. तेथून मराठ्यांच्या मदतीने पुन्हा पंजाबात जाऊन तेथे स्वराज्यस्थापना करण्याचा त्यांचा विचार होता, असे म्हणतात. पण एके दिवशी रात्री गुरुजी झोपले असताना दोन पठाणांनी त्यांचा खून केला. त्यांच्या मुलांना भिंतीत चिणून मारणाऱ्या वजीरखानानेच या पठाणांना पाठविले होते. इ. स. १७०८ साली ही दुःखद घटना घडली आणि शीखसमाजाच्या सर्व आशा धुळीस मिळण्याची वेळ आली व खालसा स्वराज्यस्थापना करतील- 'राज्य करेगा खालसा' या गुरूंच्या भविष्यवाणीचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला.

मूल्यमापन :
 गुरू गोविंदसिंग या शीख महापुरुषाच्या अखेरीपर्यंत शीखसंप्रदायाच्य कार्याचे स्वरूप येथवर आपण पाहिले. आता त्याच्या त्या कार्याचे थोडे मूल्यमापन करू! या दृष्टीने विचार करता एक गोष्ट स्पष्ट दिसते की पंजाबातील अखिल हिंदुसमाजात उठाव करण्यात शीखांना यश आले नाही. त्यांनी धर्मक्रांतीची तत्त्वे उपदेशिली. पण ती शीखसमाजापुरतीच राहिली. शिवसमर्थांनी अखिल महाराष्ट्र जागृत केला होता. तसा शीखांना पंजाब जागृत करता आला नाही. याचे एक कारण असे दिसते की, शीखसंप्रदाय हिंदुसमाजापासून फुटून निघाला होता. पंथाला किंवा संप्रदायाला स्वतंत्र अस्मिता आणण्यासाठी पंथाचे म्हणून काही विशिष्ट आचार, विशिष्ट गणवेश आणि काही भिन्नतादर्शक चिन्हे ही अवश्य असतात. पण त्यामुळे, हे लोक आपले नव्हेत, असे सर्व समाजाला कधीही वाटता कामा नये. रामदासी संप्रदायाने आपल्यासाठी स्वतंत्र आचारपरंपरा व गणवेश निश्चित केला होता. पण रामदासी हा हिंदुसमाजापासून वेगळा आहे, असे कधी कोणाच्या स्वप्नातही आले नाही. शीखसमाजाविषयी हळूहळू तशी भावना हिंदुसमाजात निर्माण होऊ लागली. हिंदूंची दैवते, हिंदूंचे अवतार, हिंदूंची तीर्थक्षेत्रे, हिंदूंचे धर्मग्रंथ यांचा शीखगुरूंनी बुद्धिपुरःसर अव्हेर केला. त्यांच्या पूजनास बंदी केली आणि पूर्वपरंपरेचा धागाच अशा रीतीने त्यांनी तोडून टाकला. गुरू गोविंदसिंगांपर्यंत हिंदुसमाजाच्या उद्धाराची भाषा शीखांच्या तोंडी असे. आणि शेवटपर्यंत हिंदुसमाजाचे मित्र व मुस्लीमांचे हाडवैरी अशीच शीखांची भूमिका कायम होती. पण पूर्वपरंपरेचा जाणूनबुजून त्यांनी विच्छेद केल्यामुळे, हिंदुसमाजाचे नेते, अशी भूमिका शीखांना यशस्वीपणे प्राप्त करून घेताच आली नाही. त्यामुळे मुस्लीमांविरुद्ध चालविलेल्या लढ्यात त्यांना अखिल पंजाबची शक्ती आपल्यामागे उभी करता आली नाही, आणि स्वतः शीख अल्पसंख्य पडल्यामुळे त्यांचे बळ तोकडे पडले.

दुही-यादवी :
 अल्पसंख्य असूनही शीखसंप्रदायाचे ऐक्य अत्यंत दृढ व अभंग असते तरीही त्याला यापेक्षा किती तरी पटीने जास्त यश आले असते. पण तसे ऐक्यही शीखसमाज निर्माण करू शकला नाही. येथून पुढचा ८०-९० वर्षांचा म्हणजे महाराजा रणजितसिंग यांच्या उद्यापर्यंत शीखांचा इतिहास हा जितका शौर्य, त्याग, आत्मबलिदान या गुणांचा आहे तितकाच तो दुही, फूट, यादवी या दुर्गुणांचाही आहे. नाही तर अखिल पंजाबची शक्ती मागे नसतानाही शीखांना गुरू अर्जुनसिंग ते गुरू गोविंदसिंग या काळात पंजाबात स्वराज्याची स्थापना निश्चित करता आली असती. पण ते त्यांना जमले नाही. मराठे आणि शीख यांच्यांत या बाबतीत केवढे जमीनअस्मानचे अंतर दिसते पहा. औरंगजेब मोगल बादशाहीच्या सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरला होता. त्या वेळी शिवछत्रपती दिवंगत झाले होते. आणि काही काळाने संभाजीमहाराजही मृत्युमुखी पडले. पण त्यानंतरच्या १८ वर्षांच्या काळात, मोठा नेता नसतानाही, मराठ्यांनी मोगलशाहीशी लढा देऊन तिलाच खिळखिळी करून टाकली व आपल्या स्वराज्याचे रक्षण केले. उलट पंजाबापासून या वेळी मोगली सामर्थ्य फार दूर गेले होते. मागे उरले होते ते दुय्यम तिय्यम दर्जाचे सरदार. पण औरंगजेबाने हजारो मैलांवरून केवळ पत्रे लिहून त्यांना कार्यप्रवण केले व शेवटी त्यांनीच शीखस्वराज्यस्थापनेचा संभव नष्ट करून टाकला. शीखसमाजाला हिंदुसमाजात तर नाहीच, पण आपल्या संप्रदायातही विपुल संख्येने कर्ते पुरुष निर्माण करता आले नाहीत. शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा काळ अवघा तीसपस्तीस वर्षांचा होता. पण तेवढ्या अवधीत तान्हाजी, नेताजी, प्रतापराव, हंबीरराव, मोरोपंत, मुरारबाजी, बाजीप्रभू, बाळाजी आवजी, अण्णाजी दत्तो, रघुनाथपंत हणमंते, मायनक भंडारी, कान्होजी आंगरे असे किती तरी स्वतंत्र कर्तृत्वाचे पुरुष त्यांनी निर्माण केले. त्यांच्यानंतर ही स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक, धनाजी, संताजी, खंडो बल्लाळ ही पिढी महाराष्ट्रात निर्माण झाली. त्यानंतर मध्यंतरी ही परंपरा खंडित होते की काय असा क्षण आला होता. पण त्या वेळी पेशव्यांचा उदय झाला. आणि बाजीराव, नानासाहेब यांनी तर अखिल भारताच्या मुक्ततेला पुरे पडेल असे कर्तृत्व शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पवार, पटवर्धन, फडणीस, फडके यांच्या रूपाने निर्माण केले. शीखसमाजाला असे विपुल कर्ते पुरुष निर्माण करता आले नाहीत. गुरू गोविंदसिंग हे शीखांतले सर्वात श्रेष्ठ पुरुष. पण प्रारंभापासून अखेरपर्यंत ते एकटेच होते. त्यांच्या नावाचा जयजयकार करीत आनंदपूरहून दशदिशांना शीख सेनापती व सरदार मोहिमांवर जाऊन फत्ते करून येत आहेत असे महाराष्ट्राप्रमाणे पंजाबात कधी घडलेच नाही. त्यामुळे शीखांचा इतिहास वाचताना, स्वतंत्र राज्यस्थापनेचा संभव कोठे निर्माण झालेला या काळात दिसतच नाही. कारण पंजाबी कर्तृत्वाला धुमारे फुटत आहेत असे त्यात कधी आढळून येत नाही.

बंदाबैरागी :
 अपवादामुळे मूळ सिद्धान्त निश्चित सिद्ध होतो, असे म्हणतात. त्यात तथ्य असेल तर बंदा बैरागी याच्या अपवादाने वरील विचाराची सत्यता डोळ्यांत जास्त भरते, असे दिसून येईल. बंदाबैरागी हा मूळचा पंजाबी गृहस्थ. तरुणपणीच काही कारणाने विरक्त होऊन त्याने संसारत्याग केला आणि तो दक्षिणेत येऊन राहिला. तेथे गुरू गोविंदसिंग यांच्या सहवासात आल्यावर त्यांच्यापासून त्याला स्फूर्ती मिळाली. गुरूंनी त्याला शीखपंथाची दीक्षा देऊन पंजाबात धाडले त्याच्याबरोबर आपले पंचवीस शिष्यही त्यांनी दिले व पंजाबातील प्रमुख शीखांना पत्रे देऊन त्यांना बंदाबैरागी यांचे नेतृत्व स्वीकारण्याची आज्ञा केली. बंदा पंजाबात पोचला व त्याने गुरू तेगबहादुर व गुरू गोविंदसिंग यांचे पुत्र यांवर मुस्लीमांनी भयानक अत्याचार करून त्यांचा वध केला याचा सूड घेण्याची आपली आकांक्षा जाहीर केली. गुरू गोविंदसिंगांची आज्ञा, त्यांच्या शिष्यांनी केलेला प्रचार व बंदाचे प्रभावी नेतृत्व यांमुळे बंदा बैरागी याच्याभोवती शीख फार झपाट्याने गोळा झाले व थोड्याच अवधीत शीखांची चाळीस हजार सेना जमा झाली. तिच्या साह्याने पुढील सात-आठ वर्षात बंदा बैरागी याने असे अद्भुत पराक्रम केले की, पंजाबच्या इतिहासात ते अजरामर होऊन राहिले आहेत. बंदाबहादुराचा सगळा रोख सरहिंदकडे होता. तेथील सुभेदार वजीरखान यानेच गोविंदसिंगांच्या पुत्रांना भिंतीत चिणून मारले होते. प्रथम त्याने समाना या सरहिंदजवळच्या ठाण्यावर हल्ला करून ते गाव उजाड करून टाकले. त्याचे पराक्रम ऐकून शधोरा, बनोर या गावचे हिंदू त्याच्याकडे धावत आले. तेथे त्यांच्या तरुण मुलींवर भरदिवसा मुसलमान नवाब, काजी बलात्कार करीत व एकंदर हिंदूंचा अनन्वित छळ करीत. बंदाने दोन्ही गावे उजाड करून तेथील मुसलमानांची कत्तल केली. नंतर १७१०, ३० मे रोजी बंदाने सरहिंदवर हल्ला केला व ते शहर धुळीस मिळवून वजीरखानास कापून काढले. यानंतर शीखांना प्रचंड विजय मिळत गेले व थोड्याच दिवसात तीनचतुर्थाश पंजाब बंदाच्या ताब्यात आला. या वेळी दिल्लीचा मोगल बादशहा दक्षिणेत होता. तो त्वरेने दिल्लीस परत आला व बंदाचा व शीखांचा निःपात करण्याचा त्याने दृढनिश्चय करून एक मोठी फौज बंदावर पाठविली. आता मोठ्या बादशाही सेनेशी शीखांची गाठ पडली आणि युद्धातले चढउतार सुरू झाले. शीखांना अजूनही मोठे विजय मिळत होते, पण त्यांचे सामर्थ्य कमी पडत आहे हे आता स्वच्छ दिसू लागले. बहाद्दुरशहा मरण पावल्यावर १७१२ साली फरुखसियर गादीवर आला. त्याने चढ्या जोमाने शीखनिःपाताची मोहीम चालू केली. शेवटी गुरुदासपूर किल्ल्यात अन्नपाण्यावाचून हाल होऊन शीख सेना मरू लागली; तेव्हा बंदाने बाहेर पडून अफाट मोगलसेनेवर चालून घेतले. अर्थातच तो पकडला गेला. त्याचे पाचशे सैनिकही त्याच्याबरोबर पकडले गेले. सर्वांना दिल्लीला नेऊन अतिशय विटंबना व हाल करून ठार मारण्यात आले. कत्तलीपूर्वी प्रत्येकाला, मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल, असे सांगण्यात आले. पण एकानेही धर्मत्याग केला नाही. सर्वांनी स्वधर्मे निधनच श्रेयस्कर मानले. आणि अशा रीतीने जिवंतपणी जसा त्यांनी अद्भुत इतिहास केला तसेच मृत्यूतही एक अत्यंत तेजस्वी पर्व रचून ठेविले.

परंपरा नाही :
 वीर बंदावैरागी याच्या चरित्राचा विचार करू लागताच वर सांगितलेला विचार पुनः पुन्हा मनात येतो. त्याच्यासारखे पाच- सहा शूर सेनापती व सरदार गुरू गोविंदसिंगांना मिळाले असते तर पंजाबात त्याच वेळी स्वराज्यस्थापना झाली असती. आणि मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य आठ-पंधरा वर्षांत समूळ नष्ट झाले असते. पण गुरुगोविंदांना असा एकही सेनापती मिळाला नाही. एकटा बंदा बैरागी गुरूंच्या मदतीला असता तरीसुद्धा पुष्कळ कार्यभाग झाला असता. पण गुरूंच्या निधनानंतर त्याची कारकीर्द सुरू झाली. आणि तोही पुन्हा एकाकीच होता. त्याच्या काळीही शीखसमाजात मोठे कर्ते पुरुष निर्माण झाले नाहीत. दुसरी गोष्ट शीखांच्या दुहीची. सर्व शीख त्याला मिळाले नाहीत. खालसा पंथ मनापासून त्याच्या मागे उभा राहिला नाही. बंदाचे अनुयायी स्वतःला बंदिया म्हणवीत. स्वतः बंदा याने 'वाहा गुरुजी की फत्ते', 'वाहा गुरू का खालसा' या गुरू गोविंदांनी ठरवून दिलेल्या घोषणा बदलून 'फत्तेधर्म', 'फत्तेदर्शन' अशा घोषणा चालू केल्या. त्यामुळे शीखांत आणखी फूट पडली. त्याच्यापासून फुटलेले शीख नुसते दूर राहिले असे नव्हे तर ते बादशहा फरुखसियर याच्या सैन्यात सामील झाले. बादशहाने अमृतसरला देणग्या देऊन, सक्तीने धर्मांतर केले जाणार नाही, खालसांकडच्या जहागिरी कायम ठेविल्या जातील, अशी आश्वासने देऊन, अनेक शीखांना फोडले आणि वीर बंदाचे सामर्थ्य खच्ची केले. (गोकुळचंद नारंग, ट्रॅन्सफॉरमेशन ऑफ सिखीझम्).
 मागे एके ठिकाणी सांगितलेच आहे की मूळ समाजापासून निराळे होऊन जे भिन्न अस्मिता स्थापू पहातात त्यांनी आपल्या नव्या संप्रदायाच्या अंतरात वज्रासारखे अभंग ऐक्य टिकविले पाहिजे. शीखांना हे कधीच जमले नाही. अगदी प्रारंभीच्या लेखात संघटनेचे एक प्रधान लक्षण सांगितले आहे. जे लोक आपसात लढत नाहीत; किंवा निदान आपल्याच लोकांविरुद्ध शत्रूला मिळून स्वकीयांशी लढत नाहीत त्यांना संघटित म्हणता येईल. शीखसमाज यांपैकी कोणत्याच अर्थाने केव्हाही संघटित झाला नाही. निराळा पंथ काढून शीखांनी हिंदूंपासून दुरावा मात्र निर्माण केला. त्यामुळे अखिल हिंदुसमाजात त्यांना कान्ती करता आली नाही, उठाव करता आला नाही. आणि भिन्न अस्मितेचा जो लाभ मिळावयाचा तोही दुहीमुळे त्यांना मिळाला नाही. यामुळे गुरू गोविंदसिंग किंवा बंदा यांसारख्या थोर पुरुषांना यश आले नाही. हिंदुसमाजाबद्दल शीखांची दृष्टी शेवटपर्यंत आपलेपणाची होती. पानपतनंतर अबदालीने गुलाम करून चालविलेल्या २०,००० स्त्रियांना मुक्त करून त्यांनी महाराष्ट्रात परत पाठविले. हे सर्व खरे, पण शीख हिंदुसमाजाशी एकरूप झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे बळ तोकडे पडले.

शिरकाण :
 बंदाबहाद्दर याचा वध १७१६ साली झाला. यानंतरच्या ५० वर्षाचा शीखांचा इतिहास अनेक दृष्टींनी अभ्यसनीय आहे. कोणी इतिहासकार त्याची मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाशी तुलना करतात, कोणी त्यापेक्षाही त्याचे महत्त्व जास्त मानतात. बंदानंतर शीखसमाजाला समर्थ असा नेता लाभला नाही. आणि बंदाच्या नेतृत्वाखाली शीखांनी मुस्लीमांवर इतका भयानक सूड उगविला होता की, सर्व मुस्लीमसामर्थ्य एकवटून शीखांचा नायनाट करण्याचा मुस्लीम सत्ताधाऱ्यांनी निर्धार केला. बादशहा फरुखसियर याने तर असे फर्मानच काढले की, मोगल अधिकाऱ्यांना जेथे जेथे शीख सापडेल तेथे त्यांनी त्याला सुसलमान तरी करावे किंवा त्याची कत्तल करावी. पंजाबच्या मुस्लीम सुभेदारांनी तर जो कोणी शीखाचे मुंडके आणून देईल त्याला ५० रु. बक्षीस मिळेल असे जाहीर केले. यामुळे शीखांचे पद्धतशीर शिरकाण सुरू झाले आणि ते जवळ जवळ ४०-५० वर्षे चालू राहिले.
 या काळात दिल्लीचे बादशहा अत्यंत नादान व दुबळे असून त्यांचे वजीर त्यांच्यापेक्षाही कर्तृत्वशून्य होते. पण या काळातले पंजाबचे सुभेदार झकेरियाखान, मीर मन्नू, आदिनाबेग व सादिक यांसारखे सरदार हे कर्तबगार होते. त्यांनी शीखांचा संहार करण्यात आपले शक्तिसर्वस्व वेचले. शिवाय याच काळात अहमदशहा अबदालीने पंजाब- दिल्लीवर आठ स्वाऱ्या केल्या. नजीबखान रोहिल्यासारखे सरदार त्याला वारंवार आमंत्रणे देत आणि त्याला सर्वतोपरी साह्य करीत. मोगलांनी १५२६ साली अफगाणी पठाणांची सत्ता नष्ट करून तेथे आपले राज्य स्थापिले. पण पठाणांनी पंजाब हा आपला आहे ही भावना कधीच विस्मृतीत जाऊ दिली नाही. अबदालीने इतक्या स्वाऱ्या केल्या त्याच्या मागे पंजाबचे गेलेले राज्य परत मिळवणे, हीच आकांक्षा होती. पहिल्या स्वारीतच त्याने लाहोर जिंकून तेथे आपला सुभेदार नेमला. आणि त्या सत्तेवर शीख सतत आघात करीत राहित्यामुळेच अहंमदशहा वारंवार हिंदुस्थानवर चालून येत होता. तेव्हा दिल्लीची पातशाही जरी क्षीण व निर्बल झाली असली तरी मुस्लीमवर्चस्वाचा जोर कमी झाला नव्हता. त्यामुळे शीखांना या स्वातंत्र्यसंग्रामात फार मोठे अग्निदिव्य करावे लागले.
 फरुकसियर १७१९ साली मेला. त्यानंतर दिल्लीला बंडाळ्या माजल्यामुळे पंजाबच्या शासनात जरा ढिलाई आली. त्याबरोबर शीखांनी उचल करून शीखांना छळणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले केले आणि लाहोरच्या सुभेदाराने पाठविलेल्या, फौजांचा मोड केला. याच सुमाराला झकेरियाखान हा लाहोरचा सुभेदार झाला व त्याने पुन्हा हत्याकांड सुरू केले. तो व त्याचे अधिकारी शेकडो शीखांना पकडून आणीत आणि लाहोरच्या दिल्लीवेशीजवळ त्यांची कत्तल करीत. त्यामुळे त्या जागेला शहीदगंज असेच नाव पडले होते. अशी घोर कत्तल सुरू होताच शीख घरादारांचा त्याग करून वनवासात गेले आणि डोंगरदऱ्यांत राहून तेथून सरकारी रसद व खजीना यांवर हल्ले चढवून त्यांची लुटालूट करू लागले. पुढच्या चाळीस वर्षांचा शीखांचा इतिहास असा आहे. दिल्लीच्या पातशाहीचे सुभेदार मोठमोठ्या फौजा घेऊन शीखांच्या शिकारीस बाहेर पडत आणि हजारो शीखांना ठार करीत. अशा वेळी शीख घरेदारे सोडून अरण्यात जात आणि मोगलांच्या मोहिमा ढिलावल्या की पुन्हा परत येत, आपल्या लहानमोठ्या टोळ्या पुन्हा उभ्या करीत आणि सर्वत्र लांडगेतोड करीत. पुन्हा कोणी कर्तबगार सरदाराने मोहीम काढली की कडेकपारीत नाहीसे होत.

वनवास :
 चाळीसपन्नास वर्षे शीखांनी हा जो लढा चालविला त्याला भारताच्या इतिहासात खरोखर तोड नाही. धर्मासाठी एवढे घोर बलिदान फार थोड्या जमातींनी केले असेल. झकेरियाखान, मीर मन्नू, सादिक यांनी केलेल्या हत्याकांडाची वर्णने वाचताना सारखे मनात येत असते की दुसरी कोणतीही जमात पहिल्या मोहिमेतच गारद झाली असती व शरणागती पत्करून तिने कायमचे दास्य स्वीकारले असते. पण गुरू गोविंदसिंगांनी दिलेली क्षात्रधर्माची शिकवण, बंदाबहाद्दराच्या पराक्रमामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास आणि गुरू नानकांच्या धर्मावरील अचल श्रद्धा यामुळे शीखांत काही अद्भुत बळ संचरले होते. त्यामुळे केवढाही भयंकर संहार झाला, कसल्याही यमयातना सोसाव्या लागल्या, रानावनात, गिरिकंदरात कितीही कष्टाचे जीवन कंठावे लागले तरी शीख दबले नाहीत. जरा संधी सापडताच ते पुन्हा उसळून येत व मुस्लीमसत्तेवर सर्व सामर्थ्य एकवटून आघात करीत.

स्वातंत्र्य :
 चाळीसपन्नास वर्षे असा लढा चालवून १७६८-६९ च्या सुमारास शीखांनी पंजाब स्वतंत्र केला. अबदालीने पुन्हा हिंदुस्थानवर स्वारी केली नाही. आणि दिल्लीच्या सुभेदारांचाही दम उखडला होता. त्यामुळे शीखांनी आक्रमकांशी चालविलेला लढा समाप्त होऊन शीखांचे नष्टचर्य संपले. यामुळे शीखांच्या सत्तेविषयी पंजाबी जनतेच्या मनात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. शीखसत्ता पंजाबात प्रस्थापित होऊन आपलेही नष्टचर्य संपेल व सुखशांतीचे दिवस आपल्याला लाभतील अशी आशा तिला वाटू लागली. पण या अपेक्षेचा संपूर्ण भंग झाला. कारण सर्व पंजाब हाती आला असूनही शीखांना तेथे एकमुखी केंद्रसत्ता प्रस्थापित करता आली नाही. स्वातंत्र्यलढा चालू असतानाही शीखांना एकमुखी नेतृत्व निर्माण करता आले नव्हते. त्यांच्या निरनिराळ्या पासष्ट टोळ्या सर्व पंजाबभर संचार करीत आणि स्वतंत्रपणेच लूटमार करीत. त्याकाळीही शीख- जमातीत शिस्त अशी काही नव्हती. स्वातंत्रलढ्याचा काळ म्हणजे मोठा गौरवाचा काळ गणला जातो. पंजाब विद्यापीठाचे इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. हरिराम गुप्ता यांनी तीन खंडांत 'हिस्टरी ऑफ दि सिख्स्' हा ग्रंथ लिहिला आहे. त्यातील पहिला खंड १७३९- १७६८ या काळाविषयीचाच आहे. त्यांनी त्यात शीखांच्या पराक्रमाचा खूपच गौरव केला आहे. कलकत्ता विद्यापीठाचे डॉ. नरेंद्र कृष्ण सिन्हा यांनी आपल्या 'राइज ऑफ दि सिख पॉवर' या पुस्तकातही शीखांचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. आणि वर सांगितल्याप्रमाणे शीखांचा तो गौरव सार्थच आहे. पण याहीपलीकडे जाऊन समाजसंघटनेच्या दृष्टीने विचार करता, असे दिसते की, याही काळात शीख आपले बल संघटित करू शकले नव्हते. कपूरसिंग, जसासिंग असे जरा समर्थ नेते त्यांना मिळत तेव्हा काही टोळ्या एकमेकीत विलीन होत. आणि असे होता होता स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस शीखांच्या बारा टोळ्या राहिल्या. त्यांना मिसली म्हणत. हे सर्व शीखच होते. पण ते एकमुखी संघटना संग्रामकाळीही निर्माण करू शकले नाहीत.

संघटना नाही :
 याचा अर्थ असा की 'खालसा धर्म' हे शीखांचेही संघटनतत्त्व होऊ शकले नाही. याचे एक स्पष्ट प्रमाण असे की सतलजच्या दक्षिणेचे शीख हे स्वातंत्र्य- संग्रामातही सहभागी झाले नाहीत. सतलजच्या उत्तरेच्या शीखांना मंझा शीख व दक्षिणेच्या शीखांना मालवा शीख म्हणतात. मंझा शीख अबदालीशी लढत असताना पतियाळाचा अल्लासिंग त्याला शरण गेला व पुढे तर तो अबदालीचा सहकारीच झाला. पुढील काळी अबदालीचा नातू झमानशहा स्वारी करून आला तेव्हा पतियाळाच्या साहेबसिंगाने जबरदस्तापुढे नमण्याचे कुलव्रत तसेच चालू ठेविले. (रणजितसिंगाचे चरित्र- लेखक कुशावतसिंग, पु. २८,३१) नरेंद्र कृष्ण सिंह म्हणतात, 'मालवा शीख अंतर्वेदीत नित्य लूटमार करीत, वरचेवर मोहिमा काढून जाळपोळ, विध्वंस करीत, पण ही केवळ दरोडेखोरी होती. त्याच्यामागे राष्ट्रीय भावना मुळीच नव्हती. अबदालीशी लढणारे मंझा शीख काही उच्च भावनेने प्रेरित झाले होते. तसे मालवांचे काही नव्हते. अंतर्वेदीत प्रभुत्व नजीबखान रोहिल्याचे होते. त्या प्रदेशात वर्षानुवर्ष लूटमार करून त्यांनी नजीबला नामोहरम करून टाकले. पण हे मालवा शीख कधी ऐक्य करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना स्वकीय शासन असे कधीच निर्माण करता आले नाही. शेवटपर्यंत ते लुटारू पेंढारीच राहिले. पुढील काळात महादजी शिंदे यांनी इंग्रजांविरुद्ध मराठा- शीखांची एक आघाडी करण्याचा प्रयत्न केला. दोघांत तहनामाही झाला. पण शीखांनी तो पाळला नाही. त्यांनी उलट इंग्रजांशीच सहकार्य केले. 'हा परका मनुष्य (महादजी) आमच्या देशात घुसला आहे. तो सर्वनाश करील. अशा वेळी आमच्याशी स्नेह जोडावा अशी आपली इच्छा असेल तर आम्ही आपलेच आहो' असे इंग्रजांना त्यांनी कळविले. महादजींनी त्यांना लिहिले होते की 'इंग्रज हा तुमचा, आमचा, सर्वांचा शत्रू आहे. म्हणून वेळीच उपाययोजना करणे आपल्या हिताचे आहे.' पण याचा काही उपयोग झाला नाही. (राइज् ऑफ दि सिख पॉवर; प्रकरण ६ वे- पृष्ठे १३७,१४५,१४७,१८२)

संधी घालविली :
 मंझा व मालवा शीख दोघेही खालसाचेच अनुयायी होते. पण मुस्लीम सत्तेच्या लढ्यात ते संघटित होऊ शकले नाहीत. मंझा शीख ४०-४५ वर्षे लढत राहिले. पण तेही आपले सामर्थ्य संघटित करू शकले नाहीत. तसे त्यांनी केले असते तर दिल्लीला शीखसत्ता तेव्हाच प्रस्थापित झाली असती आणि अबदालीच्या स्वाऱ्यांचा संभवच नष्ट झाला असता. सर जोगेन्द्रसिंग म्हणतात, "या शीख टोळ्यांना एकमुखी नेतृत्व निर्माण करून संघटना करता आली नाही. ते कोणत्याही नाईकाशी एकनिष्ठ रहात नसत. त्यामुळे सर्व पंजाबचे ऐक्य करून स्वराज्य व सुराज्य स्थापन करण्याचे आपले ऐतिहासिक कार्य ते करू शकले नाहीत. सर्व शीखांची अभंग निष्ठा स्वतःच्या ठायी खेचील असा नेता त्यांना मिळाला असता तर भारताच्या इतिहासाला वेगळे वळण लागले असते. पण गुरू गोविंदांनी निर्माण केलेले ऐक्यबंध तोडून खालसासमाज भग्न झाला. त्याच्या अनेक फळ्या झाल्या, शकले झाली. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊन ते अबाधित राखण्याच्या व त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला वैभवसंपन्न करण्याच्या कार्यात शीख यश मिळवू शकले नाहीत. भारताला संघटित करण्याची संधी खालसाला आली होती. पण ती त्याने घालविली." (हिस्टरी ऑफ दि सीख्स्. खंड २ रा- प्रा. हरिराम गुप्ता प्रस्तावना- जोगेन्द्रसिंग) 'आजचा विसाव्या शतकातील शीख असाच विघटित आहे,' असे सांगून जोगेन्द्रसिंग म्हणतात, 'जमात—संस्कृतीतून वारशाने आलेले विघटित वृत्तीचे, दुहीचे जे रक्तातले संस्कार त्यांवर शीखधर्म जय मिळवू शकला नाही व आजही मिळवू शकत नाही.' (कित्ता)
 १७२० ते १७६९ या काळात मंझा शीख विघटित होते. तरी त्यांच्या ठायी धर्मनिष्ठा, त्यागबुद्धी, प्राणार्पणाची सिद्धता हे गुण जिवंत होते. पण पुढच्या १७६९ ते १७९९ या कालखंडात त्यांचा फारच अधःपात झाला. शत्रू निःशेष होताच त्यांच्यातील ध्येयवाद संपुष्टात आला आणि धनलोभ व सत्तालोभ हे प्रबळ झाले. पंजाबात शीखांच्या बारा स्वतंत्र सत्ता- मिसली- स्थापन झाल्या. यातील प्रत्येक मिसल दुसरीवर धाड घालून शीखांचे रक्त सांडू लागली.

अधःपात :
 प्रा. हरिराम गुप्ता यांनी आपल्या 'हिस्टरी ऑफ शीखस्' या ग्रंथाच्या दुसऱ्या व तिसऱ्या खंडात शीखसमाजाच्या यादवीच्या वृत्तीवर, दुही, फुटीरपणा, विद्वेष, धर्मलोप, ध्येयशून्यता यांवर फार कडक टीका केली आहे. पहिल्या खंडात त्यांनीच शीखांच्या पराक्रमाचा गौरव केला असल्यामुळे या टीकेला महत्त्व आहे. ते म्हणतात, "या काळात शीखसमाजाची सर्व शक्ती यादवीत खर्च होत होती. शीखांच्या मिसलींची स्थापना लोकशाहीतत्त्वावर झाली होती. अशा स्थितीत एक प्रबळ लोकसत्ताक राष्ट्र पंजाबात स्थापन करण्यासाठी पाया सिद्ध झाला होता आणि ते त्यांनी स्थापन केले असते तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने हे जसे पश्चिमेस तसेच हे लोकसत्ताक पूर्वेस भूषणभूत झाले असते. पण वॉशिंग्टन एकच होता. आणि तो व त्याचे सहकारी हे कायदा, स्वातंत्र्य व स्वजनप्रेम या निष्ठांनी प्रेरित झाले होते. उलट शीख स्वार्थ, अहंकार व राज्यविस्तार यांनी प्रेरित झाले होते. त्यामुळे पंजाबात वॉशिंग्टन- सारखा नेता किंवा त्याच्यासारखी राष्ट्रीय वृत्ती निर्माण झाली नाही. (चॅथॅम- सारखा पुरुष भारतात त्याकाळी निर्माण होणे शक्यच नव्हते हे शेजवलकरांचे मत मागील लेखात सांगितले आहे. येथे वाचकांनी त्याचे स्मरण करावे.) जनहितात स्वहित विलीन करण्याऐवजी प्रत्येक माणूस स्वहित हे ध्येय मानू लागला व अशा रीतीने शीखांनी गुरूंच्या समतेच्या कल्पनेचा विपर्यास केला. गुरूंच्या सर्वच धर्मतत्त्वांना शीखांनी विकृत रूप दिले. त्यामुळे स्पर्धा, मत्सर, कलह, संघर्ष हेच शीख मिसलींचे लक्षण झाले आणि अराजक, विघटना व अधःपात यांत त्याची परिणती झाली." (खंड ३ रा- पृ. ३३)
 अशा धर्मभ्रष्टतेमुळे व विघटनेमुळे शीखसमाज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बलशाली होण्याऐवजी उत्तरोत्तर क्षीणबलच होत गेला. अबदालीचा नातू झमानशहा याच्या स्वाऱ्यांनी शीखांचे हे दौर्बल्य अगदी उघडे केले. १७९७, व १७९९ या साली त्याने स्वाऱ्या केल्या त्यावेळी शीखांना आपली सत्ता दृढ करण्यास पुरी तीस वर्षे मिळाली होती. पण त्यांच्यात तर यादवीचे थैमान चालू होते. विघटना पराकोटीला गेली होती. त्यामुळे दोन्ही स्वाऱ्यांत झमानशहाने थेट लाहोरपर्यंत येऊन पंजाबची ती राजधानी दोन्ही वेळा लुटून नेली व जाळून विध्वंसून टाकली. अबदालीच्या वेळेप्रमाणेच शीख याही वेळीं वनवासी झाले व गिरिकंदरात गेले ! तीस वर्षांत त्यांच्यांत कसलीही प्रगती झाली नव्हती. त्यावेळी मंझाशीखांपैकी अबदालीच्या बाजूला कोणी गेले नव्हते. यावेळी अनेकांनी तोही धर्मद्रोह केला. प्रगती झाली ती अशी !

हिंदूंप्रमाणेच :
 या झमानशहाच्या वेळच्या भारतातील हिंदूंच्या व मुसलमानांच्या वृत्ती लक्षिण्याजोग्या आहेत. झमानशहा येणार हे कानी येताच अखिल भारतातले मुस्लीम त्याच्या स्वागतार्थ सिद्ध झाले. कसूरचा निजामुद्दिन, रोहिले, अफगाण, अयोध्येचा वजीर, म्हैसूरचा टिपू, आणि दिल्लीचे काही सरदार यांनी स्वारी करून येण्याची त्याला निकड लावली. भारतातला प्रत्येक मुस्लीम तयमूरच्या वंशजाला पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची भाषा बोलू लागला. तो आपल्या धर्माचा संरक्षक आहे अशी त्यांची भावना होती. (हिस्टरी ऑफ दि सीखस्, हरिराम गुप्ता, खंड ३ रा. पृ. ६४-६५) यावेळी 'शरबत खालसा' ही अखिल शीखांची सभा भरली होती. 'रानावनात निघून जावे,' असा ठराव सभेत संमत झाला. अनेक रजपूतराजे व मालवा शीख तर झमानशहाला जाऊन मिळालेच होते ! हिंदुधर्म हा हिंदूंचे संघटनतत्त्व कधीच होऊ शकला नाही. दुर्दैवाने शीखधर्माची तीच स्थिती झाली. यावेळी झमानशहाला प्रतिकार केला तो एकाच शक्तीने. ती शक्ती म्हणजे रणजितसिंग !
 शीखसमाज स्वार्थ, सत्तालोभ, धर्मभ्रष्टता, अराष्ट्रीय वृत्ती यांनी असा शतधा भग्न झालेला असल्यामुळे त्याला भवितव्य असे काहीच नव्हते. आणि याच वेळी महाराजा रणजितसिंगाचा उदय झाला नसता तर शीखांचे मागले कर्तृत्व हे तरी इतिहासविषय झाले असते की नाही, याची शंकाच आहे. एक धार्मिक संप्रदाय म्हणून फारतर इतिहासाने त्याची नोंद केली असती. पण भारताच्या, हिंदूंच्या आणि शीखांच्या सुदैवाने महाराजा रणजितसिंगासारखा एक थोर, कर्ता, संघटना कुशल असा नेता पंजाबला लाभला आणि त्यामुळे त्या प्रदेशाचे भवितव्य उजळून निघाले.

शीखांचे एकछत्र :
 महाराजा रणजितसिंग यांचा जन्म इ. स. १७८० साली गुजराणवाला येथे झाला. बारा मिसलींपैकी शुकरचाकिया या मिसलीचा संस्थापक चरणसिंग याचा रणजितसिंग हा नातू. त्याच्या वडिलांचे नाव महानसिंग. ते १७९२ साली वारले. पुढील पाच वर्षे शुकरचाकिया मिसलीचा कारभार त्याची आई राजकौर हिने पाहिला. १७९७ साली महाराजांनी आईला व दिवाण लखपतराय यांना बाजूस सारून सर्व कारभार आपल्या ताब्यात घेतला. प्रारंभापासूनच सर्व शीखांचे एकछत्री राज्य निर्मावयाचे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. झमानशहाला निश्चयाने प्रतिकार केला असेल तर तो त्यांनीच. पण त्या वेळी बारांपैकी एका मिसलीचा एक तरुण प्रमुख सरदार येवढीच त्यांची प्रतिष्ठा होती. १७९९ साली झमानशहा परत गेल्यानंतर महाराजांनी आपल्या अंगीकृत कार्याला प्रारंभ केला आणि पुढील दहा वर्षांत साम-दाम-दंड-भेद या उपायांनी बहुतेक सर्व मिसली विलीन करून त्यांनी पंजाबवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. हे कार्य सुखासुखी झाले नाही. काही मिसालदारांनी कसूर, मुलतान येथील मुस्लीम खानांची मदत घेऊनसुद्धा महाराजांशी लढा केला. पण महाराजांनी आपल्या शौर्याने, राजनीतीने, संघटन कौशल्याने सर्वांना जेर केले व सतलजच्या उत्तरेच्या व दक्षिणेच्याही मिसली जिंकून शीखांचे एकछत्र निर्माण केले. आणि स्वधर्म व स्वराज्य यांच्या अभेदाचे महातत्त्व शीखांच्या ठायी रुजले असते तर शीखांचे हे स्वराज्य दुर्भेद्य होऊन कदाचित त्याचे साम्राज्यातही रूपांतर झाले असते. पण सतलजच्या दक्षिणेचे पतियाळा, नाभा, झिंद येथले शीख सरदार धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा यांपासून सर्वस्वी अलिप्त होते. त्यांनी रणजितसिंगापासून संरक्षण मिळावे म्हणून इंग्रजांकडे धाव घेतली. इंग्रजही आपल्याला खाऊन टाकतील अशी भीती त्यांना होती. पण रणजितसिंग म्हणजे अर्धांगवायू व इंग्रज म्हणजे क्षय, असा त्यांचा दृष्टिकोन होता. अर्धांगवायू हा तत्काळ मनुष्याला लुळा करतो. क्षय हा कालांतराने ठार मारतो. असा पोक्त विचार करून या मालवा शीखांनी क्षयरोग पत्करण्याचे ठरवून इंग्रजांचा आश्रय घेतला. त्यांनी तत्काळ आपला वकील मेटकाफ याला महाराजांकडे धाडले व मागून सैन्य धाडले. ब्रिटिशांचे सामर्थ्य महाराज जाणून होते. त्यामुळे सर्व आयुष्याचे स्वप्न धुळीस मिळणार हे दिसत असून, मालवा शीखांचा पराकाष्ठेचा संताप आला असून त्यांनी मन विकाराधीन होऊ दिले नाही व १८०९ साली सतलज ही आपली दक्षिण सरहद्द, हे मान्य करून तसा इंग्रजांना तहनामा करून दिला. अशा रीतीने शीख स्वराज्याचे, एकछत्री शीख राज्याचे साकार होत आलेले त्यांचे स्वप्न कायमचे भग्न झाले. ते कोणामुळे ? शीख मिसालदारांमुळे ! गुरू नानक, गुरू गोविंदसिंग यांचा धर्म हा शीखांना संघटित करू शकला नाही !
 प्रश्न असा येतो की यात सनातन हिंदुसमाजापेक्षा निराळे काय झाले ?

कर्ते पुरुष :
 मालवा शीखांनी धर्मद्रोह करून इंग्रजांशी हातमिळवणी केली व महाराज रणजितसिंग यांचे स्वप्न धुळीस मिळविले तरी महाराज हताश होऊन स्वस्थ बसले नाहीत. वायव्येकडे साम्राज्यविस्ताराला अजून खूप अवसर होता. तिकडे आपले शक्तिसर्वस्व खर्चून मुस्लीम सत्तांपासून तो प्रवेश मुक्त करावयाचा, असे त्यांनी ठरविले. सतलजच्या उत्तरेच्या सहा मिसलींवर त्यांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले होते तरी कसूर, मुलतान ही सिंधूच्या पूर्वेची ठाणी आणि डेरागाझीखान, डेरा इस्माइलखान ही पश्चिमेची ठाणी अजून मुस्लीम नवाबांच्या ताब्यात होती. वायव्य सरहद्दीचा पेशावर प्रांत आणि काश्मीर यांवर तर त्यांचेच राज्य होते. हा सर्व प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट करण्याचे ठरवून १८०९ नंतर महाराज त्या उद्योगाला लागले. त्यांच्या कर्तृत्वाचा हा विशेष की, दिवाण मोकमचंद, हरिसिंग नलुआ, बाबा फुलासिंह, मिश्री दिवाणचंद, अमरसिंह, रामदयाळ, दिवाण मोतीराम, फकीर अजिजुद्दिन यांसारखे सेनापती, कारभारी व मुत्सद्दी त्यांनी आपल्याभोवती निर्माण केले. आजपर्यंत कोणत्याही शीख नेत्याला हे साधले नव्हते. महाराजांना हे साधले म्हणूनच त्यांचे स्वराज्य- साम्राज्याचे ध्येय काही अंशी तरी सिद्ध झाले.

ध्येयपूर्ती :
 कसूरचा नवाब कुत्बुद्दिन, मुलतानचा मुजफरखान, मुंधेर म्हणजे डेरा इस्माइलखान येथील नबाब हाफीज अहंमद यांना पंजाबवर शीखांचे प्रभुत्व स्थापन झाले हे सहन झाले नाही. त्यांच्या निष्ठा अफगाणिस्थान- काबूल येथील सुलतानावर होत्या. महाराजांना त्यांनी सतत विरोध केला होता. यांपैकी प्रत्येक नबाबापाशी २०-२५ हजार लष्कर रणांगणात उभे करण्याचे सामर्थ्य होते आणि जिहादची घोषणा करून त्यांच्या शौर्याला कडवेपणाची धार आणण्याचे कौशल्यही त्यांच्या ठायी होते. शीखांची धर्मनिष्ठाही अशीच कडवी होती. पण इतके दिवस ते संघटनविद्या पढले नव्हते. रणजितसिंगांनी त्यांना व पंजाबांतील हिंदूंना संघटित करताच त्या समाजात एक अभूतपूर्व सामर्थ्य निर्माण झाले व त्याने विजयामागून विजय मिळवून मुस्लीमांपासून पंजाब तर मुक्त केलाच पण वायव्यप्रांत व काश्मीर हेही मुक्त केले. या कार्याच्या सिद्धीसाठी महाराजांना जे संग्राम करावे लागले त्यांत हजरोचा व नौशेराचा असे दोन संग्राम विशेष उल्लेखनीय आहेत. महाराजांनी अटकेचा किल्ला घेतला हे काबूलचा वजीर फत्तेखान याला सहन न होऊन त्याने प्रचंड सैन्यानिशी किल्ल्याला वेढा घातला. यावेळी किल्ल्याजवळच्या हजरोच्या मैदानात मातबर झुंज होऊन शीखांना जय मिळाला. या विजयाचे महत्त्व फार आहे. वायव्येकडून येणाऱ्या पठाण सैन्याशी समोरासमोर लढाई करून, गेल्या सातशे वर्षांत हिंदूंनी कधी विजय मिळविला नव्हता. दहाव्या शतकाच्या अखेरीस जयपाळ, अनंगपाळ यांचा पराभव झाल्यापासून तीच लांछनास्पद परंपरा शतकानुशतक चालू राहिली होती. हजरोच्या लढाईने कालचक्र उलटून टाकले व तो कलंक धुऊन काढला. १८१९ साली वजीर फत्तेखान याचा भाऊ महंमद जबारखान याचा सोपियाच्या लढाईत पराभव करून शीख सेनेने काश्मीर जिंकले. १८२२ साली नवाब हफीज अहंमदखान याच्या २५००० पठाणांचे निर्दालन करून सेनापती हरिसिंग नलुआ याने डेरा इस्माइलखान परगणा जिंकला. नौशेराची लढाई १८२३ साली झाली. तीत विजय मिळवून महाराजांनी पेशावर जिंकले आणि भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आपले प्रभुत्व नेऊन भिडविले. कुशावतसिंग म्हणतात, 'हा पराभव अगदी निकाली झाला. पंजाबी खड्ग हे टोळीवाल्यांच्या खड्गापेक्षा श्रेष्ठ आहे याची त्याने पठाणी टोळ्यांना खात्री करून दिली.' [रणजितसिंग- पृ. १५२] मराठ्यांनी आरंभिलेले कार्य या विजयाने पुरे झाले. पेशावरपासून कन्याकुमारीपर्यंत मुस्लीम सत्ता नि:शेष झाली.

जुनी कहाणी :
 महाराजा रणजितसिंग यांचे हे पराक्रम म्हणजे शीख समाजाच्या कर्तृत्वाचा कळस होय. पंजाबचा व शीखसमाजाचा इतिहास या यशाने धवळून निघाला आहे. एवढे थोर कार्य करून हा असामान्य पुरुष १८३९ साली कालवश झाला आणि दुर्दैव असे की त्याच्याबरोबरच शीखांची संघटनविद्याही कालवश झाली. अत्यंत खेदाची गोष्ट अशी की एवढ्या मोठ्या कर्तृत्वातूनही कर्त्या पुरुषांची नवी पिढी निर्माण झाली नाही. चाळीस वर्षांच्या या यशस्वी कारकीर्दीतही शीखसमाजावर धर्म, राष्ट्र अशा संघटनतत्त्वांचे टिकाऊ असे संस्कार होऊ शकले नाहीत. आणि महाराजांचा मृत्यू होताच यादवीची पूर्वीची कहाणी सुरू झाली. हा सर्व दुःखद् इतिहास आर. सी. मजुमदार यांनी सविस्तर दिला आहे. (ब्रिटिश पॅरामाउंटसी- भाग १ ला) महाराजांचे वारस अगदी नादान व नालायक निघाले. खरकसिंग व शेरसिंग हे त्यांचे दोन पुत्र गादीसाठी भांडू लागले. त्यांतील एक अर्धवट होता व दुसरा चारित्र्यहीन होता. दरबारातही अनेक फळ्या पडल्या असून प्रत्येक पक्षांची कारस्थाने चालू झाली होती. महाराजांनी उभारलेली सेना अति उत्कृष्ट होती. पण त्यांच्यामागे तिलाही चारित्र्य, ध्येय, निष्ठा काही राहिले नाही. जो पक्ष जास्त पगार कबूल करील त्याच्या बाजूने ती कत्तली करू लागली; खून पाडू लागली. सेनाधिकारी पराकाष्ठेचे उद्धट व वेजबाबदार झाले. यामुळे भारताच्या इतिहासातील नित्याचा रोग बळावून एका पक्षाने इंग्रजांना निमंत्रण दिले. ते याची वाटच पहात होते. त्यांच्याजवळ सामर्थ्यही होते. दोनतीन लढायांतच त्यांनी शीखांचा निःपात केला आणि पंजाब खालसा करून टाकला. रणजितसिंगांच्या पराक्रमाची परंपरा दहा वर्षेसुद्धा टिकली नाही.
 गुरू नानक यांच्यापासून महाराजा रणजितसिंग यांच्यापर्यंत शीखसमाजाच्या संघटन-विघटनेचा इतिहास येथपर्यंत आपण पाहिला. आता भारतावर होणाऱ्या परकीय आक्रमणाचा प्रतिकार करणारी, रजपूत, कर्नाटकी, मराठे यांच्यासारखी एक शक्ती या दृष्टीने शीखांच्या यशापयशाचे विवेचन करू.

यशापयश :
 मुस्लीम आक्रमणाचा प्रतिकार करणारी पंजाबात एक स्वतंत्र शक्ती शीखांनी निर्माण केली हे त्यांचे पहिले मोठे यश होय. मराठ्यांनी औरंगजेबाच्या प्रचंड सेनासामर्थ्याचा दक्षिणेत निःपात केला आणि नंतरच्या ८०-८५ वर्षाच्या काळात दिल्लीची सलऩनत निर्जीव व नामशेष करून टाकली हे खरे. पण पंजाब, पेशावर या प्रदेशांत एकदोन भराऱ्या मारण्यापलीकडे त्यांना काही साधले नाही. अशा स्थितीत शीखांचा उदय तेथे झाला नसता तर सिंध, बलुचिस्तान, अफगाणिस्थान यांच्याप्रमाणेच पंजाब, पेशावर, काश्मीर हे प्रदेश हिंदुत्व, हिंदुसंस्कृती व हिंदुस्थान यांना पारखे होऊन मुस्लीम जगतात विलीन झाले असते. पण गुरू गोविंदसिंग, बंदा बहाद्दर, सहस्रसंख्येने धर्मार्थ आत्मबलिदान करणारे त्यांचे अनुयायी, अहंमदशहा अब्दालीसारख्या कसलेल्या कडव्या मुस्लीम सेनापतीशी सतत तीस वर्षे लढा चालू ठेवणारे मंझाशीख आणि महाराजा रणजितसिंग यांच्या पराक्रमामुळे भारतावरचा तो अनर्थ टळला. एका फार मोठ्या भयानक विपत्तीतून हिंदुसमाजाचे शीखांनी रक्षण केले. हे पराक्रमी शूर पुरुष तेथे पहाडासारखे उभे राहिले नसते तर पठाणांनी पंजाब सर्व गिळून कदाचित उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश यांवरही आक्रमण केले असते. रोहिले, नबाब, मालवा शीख व रजपूत संस्थानिक त्यांच्या स्वागताला कसे सिद्ध होते हे मागे सांगितलेच आहे. तेव्हा ही सर्व घोर आपत्ती टळली याचे श्रेय शीखांनाच आहे याबद्दल वाद होऊच शकणार नाही.
 पण शीखांनी प्रारंभी घडविलेली सामाजिक क्रान्ती, स्वसमाजाला प्राप्त करून दिलेली स्वतंत्र अस्मिता, धर्मासाठी त्यांनी केलेले बलिदान यांचा विचार करता हे त्यांचे यश फार मर्यादित आहे, असे म्हणावे लागते. सर जोगेन्द्रसिंग यांनी म्हटल्याप्रमाणे, अखिल भारताला संघटित करण्याची संधी खालसाला आली होती ती त्याने घालविली. प्रा. हरिराम गुप्ता, डॉ. नरेन्द्रकृष्ण सिन्हा, कुशावतसिंग, ठाकुर देशराज हे सर्व जे शीखांच्या कार्याचे विवेचन करणारे इतिहासकार यांच्या सर्वांच्याच शीखसमाजाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, असे दिसते. पण त्या सफल झाल्या नाहीत. याच्या कारणांचा शोध आपण घेतला पाहिजे.

विकास नाही :
 याचे पहिले कारण असे स्पष्ट दिसते की, गुरू नानक यांनी जी क्रान्तिबीजे हिंदुसमाजात रुजविली त्यांचा विकास पुढे झाला नाही. त्यांनी वेद, पुराणे इ. धर्मग्रंथांचे प्रामाण्य मानले नाही, आपल्या स्वतंत्र बुद्धीने काही धर्मतत्त्वांचा उपदेश केला. पण पुढे बुद्धिप्रामाण्याची ही परंपरा अल्पावधीतच नष्ट झाली. शीखांचा 'ग्रंथसाहेब' हा वेदांच्या ठायीच येऊन बसला आणि धर्मकान्तीची मूळ प्रेरणाच नष्ट झाली. संगतपंगत निर्माण करून गुरूंनी समाजातील उच्चनीचता नष्ट केली याची कथा अशीच आहे. एकत्र रसोई शीखांनी केली, कोणाच्याही हातचे ते अजूनही खातात; पण याच्याच पुढची पायरी म्हणजे जे आंतरजातीय विवाह, तिच्याकडे शीखसमाज वळलेला नाही. सर्व शीखसमाजात सरमिसळ तर विवाह होत नाहीतच; पण जाती-पोटजातींच्या पलीकडेही ते फारसे जात नाहीत. समाजात कोणी मुसलमान नाही, कोणी हिंदू नाही, असे गुरू नानक सांगत. जो धर्म कोणत्याही प्रकारची उच्चनीचता मानतो तो धर्मच नव्हे, असे गुरू गोविंदसिंग म्हणत. पण या उपदेशाची साहजिक परिणती म्हणजे सर्व समाज एक रक्ताचा होऊन जाणे ती शीखांनी केली नाही. वैवाहिक क्षेत्रात उच्चनीचता हिंदूंच्याप्रमाणेच जपून ठेवली. परदेशगमनाचे तेच झाले. गुरू नानक बगदाद, रोमपर्यंत जाऊन आले. चीनमध्येही ते गेले होते. त्यानंतर काही शीख व्यापारी दर्यावरचा व्यापार करीत असा उल्लेख सापडतो. पण इतकेच. समुद्रगमननिषेध या रूढीचा शीखांनी त्याग केला असे दिसत नाही. गुरूंनी ती बंधने नष्ट करताच इंग्लिश, पोर्तुगीज, फ्रेंच, डच यांच्याप्रमाणे जर शीख जगभर फिरू लागले असते तर त्यांच्या देशातल्याप्रमाणे येथेही विद्येचे पुनरुज्जीवन झाले असते आणि सोळाव्या-सतराव्या शतकातच शीखसमाज त्या पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे भौतिक विद्येने संपन्न झाला असता. पण ती विद्या येथे येण्यास एकुणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला. कारण शीख हे समुद्रगमन- निषेधाच्या रूढीचे शेवटपर्यंत गुलामच राहिले. १८२३ साली महाराजा रणजितसिंग यांना अटक नदी ओलांडून सेना पलीकडे न्यावयाची होती. पण लष्कराधिकारी हात जोडून विनवू लागले की, 'अटक ओलांडण्यास सांगू नका. कारण ते धर्म्य नाही.' त्यावेळी महाराज संतापले आणि म्हणाले, 'ज्यांच्या मनात बंदी असते त्यांना अटकबंदी योग्य आहे. खालसाला हे बंधन नाही.' गुरु नानक यांनी हेच सांगितले होते !

हेही नाही, तेही नाही :
 शीखांच्या निष्फळ पृथगात्मतेचे विवरण मागे केलेच आहे. गुरू नानक यांच्या उपदेशात हिंदुसमाजासुन पृथक् होण्याविषयी एक वाक्यही सापडत नाही. त्यांचा धर्म हा गीतेतील कर्मयोग होता. तो पुढे रामदासांनी सांगितलेला प्रवृत्तिधर्म होता. 'शीखिझम ॲज प्रीच्ड् बाय नानक' या आपल्या लेखात डॉ. एल्. रमा कृष्ण यांनी गीतेतील व नानकांच्या उपदेशातील अनेक वचने देऊन नानकांचा धर्म हा गीतेतला कर्मयोगच होय, हे स्पष्ट केले आहे. (महाराजा रणजितसिंग सेंटेनरी व्हॉल्यूम- पृ. ९५) पण पुढील गुरूंनी याच क्रांतिबीजांचा विकास करण्याऐवजी शीखसमाजाला हिंदुधर्मग्रंथ, आचारविचार, तीर्थक्षेत्रे ही वर्ज्य ठरवून त्याला नवे आचार लावून दिले. याने त्या समाजाला स्वतंत्र अस्मिता प्राप्त झाली. पण पुढे ती केवळ बाह्याचारापुरतीच राहिली. इतरांपासून विभक्त पण अंतरात अत्यंत संघटित अशा समाजाच्याच स्वतंत्र अस्मितेला किंमत असते. पृथगात्म समाज अत्यंत क्रांतिप्रवण व अत्यंत संघटित असावा लागतो. शीखसमाजात पुढच्या काळात ही दोन्ही लक्षणे दिसेनाशी झाली. आणि गुरू गोविंदसिंगांनी घालून दिलेल्या केस, कछ, कडे इ. आचारांना निर्जीव कर्मकांडाचे रूप आले. यामुळे शीखांना अखिल हिंदुसमाजात क्रांतीची बीजे पेरताच आली नाहीत. आगरकरांनी सुधारणेचा उपदेश करण्यास प्रारंभ केला तेव्हा 'तुम्ही वेगळी जात का करीत नाही ?' असे सनातनी त्यांना विचारू लागले. तेव्हा 'मला या समाजातच राहावयाचे आहे, कारण मला या समाजाची सुधारणा करावयाची आहे. वेगळी जात मी करणार नाही.' असे त्यांनी उत्तर दिले. रामदासी, वारकरी यांनी वेगळी जात केली नाही. ते पृथगात्म झाले नाहीत, जुन्या परंपरेचा धागा त्यांनी तोडला नाही. शीखसमाजाने ते केले. आणि पृथगात्मतेची पथ्येही पाळली नाहीत. त्यामुळे दोन्हीकडूनही त्याला अपयश आले.
 महाराणा रणजितसिंग यांनी शीखसमाज संघटित केला. त्यामुळे ३०-४० वर्षे त्यांना पठाण आक्रमणापासून वायव्य भारत मुक्त ठेवता आला. त्याचवेळी इंग्रजी सत्ता प्रबळ होत होती. त्या आक्रमणापासून भारताचे रक्षण करण्याचे सामर्थ्य मात्र महाराजांना किंवा त्यांच्या राज्यातील पंडित, मुत्सद्दी यांना निर्माण करता आले नाही. ते सामर्थ्य पाश्चात्य विद्येच्या अभ्यासाने प्राप्त होणाऱ्या ज्या राष्ट्रनिष्ठा, लोकशाही व विज्ञाननिष्ठा या विद्या त्यामुळे अधिगत झाले असते. १८०९ नंतर स्वतंत्र सत्ताधारी शीखसमाजाला हे अशक्य नव्हते. महाराजांच्या दरबारी मंडळींना ही दृष्टी असती तर त्यांनी त्याच वेळी युरोपला विद्यार्थी धाडले असते; जर्मनी, फ्रान्स येथून शास्त्रज्ञ, पंडित यांना बोलावून पंजाबात विद्यापीठे उघडली असती. बंगालमधील राजा राममोहन रॉय यांनी १७९५ सालीच युरोपीय भाषांचा अभ्यास सुरू केला होता आणि १८१४ च्या सुमारास पाश्चात्य विद्याप्रसारासाठी कॉलेजही काढले होते. इंग्रजांनी भारताला जिंकले ते भौतिक विद्या व संघटनविद्या यांच्या बळावर. अमेरिकेशी १८५४ साली संबंध येताच जपानी नेत्यांनी १०-२० वर्षांतच त्या विद्यांची उपासना सुरू केली. महाराजा रणजितसिंग यांनी लष्कराच्या बाबतीत पाश्चात्य विद्येचा अंगीकार केलाच होता. त्यांची सेना यामुळेच अत्यंत कार्यक्षम झाली होती. या दृष्टीने शीखसमाजातील नेते, पंडित, इतर प्रमुख नागरिक यांनी १८१० च्या सुमारास पाश्चात्यांची भौतिकशास्त्रे, त्यांची राष्ट्रनिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, ज्ञानलालसा, ऐहिकता इ. त्यांचे इतर जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचा प्रसार पंजाबात करण्याचे ठरवून त्यासाठी शाळा, प्रशाळा, महाशाळा, ग्रंथालये, प्रयोगशाळा स्थापन केल्या असत्या तर इंग्रजी आक्रमणापासूनही शीखांना भारताचे रक्षण करता आले असते. पण शीखधर्मातील क्रांतितत्त्वांचा त्यांना विसर पडल्यामुळे त्यांना ती दृष्टी प्राप्त झाली नाही. त्यामुळे चाळीस वर्षे दृढ अशा शासनाचा लाभ होऊनही त्यातून कोणत्याही प्रकारचे नवे कर्तृत्व, नव्या परंपरा निर्माण झाल्या नाहीत आणि रणजितसिंग जाताच शीख पराभूत झाले.
 रजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांना गेल्या हजार वर्षांत परकीय आक्रमकांपासून स्वदेशाचे रक्षण करण्यात कितपत यश आले, ते यश कोणत्या प्रेरणेमुळे आले, त्यांनी आपल्या समाजात कोणती क्रान्तीबीजे पेरली, कोणत्या संघटनतत्त्वांचा अंगीकार केला याचा विचार येथवर आपण केला. त्याचप्रमाणे या चार राष्ट्रांच्या यशाच्या मर्यादा कोणत्या, त्या मर्यादा त्यांच्या सामर्थ्याला का पडल्या, मुस्लीम आक्रमण त्यांनी नष्ट केले पण पाश्चात्य आक्रमणापुढे ते पराभूत का झाले याची आपण मीमांसा केली. त्या सर्व यशापयशाच्या मीमांसेचा इत्यर्थ असा की, इ.स. १००० च्या सुमारास हिंदुधर्माला जी विकृती जडली होती ती या राष्ट्रांनी काही अंशी नष्ट केली, काही प्रमाणात धर्मक्रान्ती केली म्हणूनच त्यांना त्या प्रमाणात यश आले. पण प्रारंभीच्या नेत्यांनी रूढविलेल्या क्रांतिबीजांचा विकास पुढीलांनी न केल्यामुळे पुढे समाजाचा विकास झाला नाही. त्याची सामर्थ्ये, त्याच्या सुप्तशक्ती आविष्कृत झाल्या नाहीत आणि त्यामुळे ही सर्व राष्ट्रे पाश्चात्य आक्रमणापुढे नामोहरम झाली.
 यानंतर पुढील प्रकरणात गेल्या शतकात भारतात झालेल्या क्रान्तीचा विचार करून त्या क्रान्तीमुळे पाश्चात्य सत्तांशीही लढून भारताला पुन्हा स्वतंत्र करण्यात आपल्याला कसे यश आले त्याचे विवेचन प्रथम करावयाचे आहे. आणि नंतर स्वातंत्र्यानंतर उद्भवलेल्या समस्या सोडविण्यासाठी हिंदुसमाज संघटित, बलशाली व समर्थ कसा होईल व त्या दृष्टीने नुकत्याच प्रस्थापित झालेल्या विश्वहिंदुपरिषदेने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याचे विवेचन करून या लेखमालेचा समारोप करावयाचा आहे.

§