स्वरांत/शेष प्रश्न

विकिस्रोत कडून




शेष प्रश्न

 


 ऊर्मिलेला माहित आहे तू माझ्यासाठी इथे येतोस ते ?
 ... ... ... ..'
 मी हा प्रश्न विचारायला नको होता का?
 गेली आठ वर्षे मी न चुकता इथे येतो.
 तूही येतेस...
 पहिल्यांदा वाटलं. तू येणार नाहीस.
 पण तू आलीस.
 मनाला धास्ती होती की तू हा प्रश्न विचारशील. पण तोही तू विचारला नाहीस.
 तू माझ्यावर आजही अपार विश्वास टाकला आहेस, या जाणिवेने मी आत्ममग्न... आत्मतृप्त व्हायचो.
 आजही तू हा प्रश्न विचारला नसतास तर...
 विचारणार नव्हतेही.
 तू येतोस. वर्षाची मरगळ टाकून जातोस. तृप्त नि ताजातवाना होऊन जातोस. पण मी इथून जाते रिती होऊन. तीन चार दिवस जगायचं नि पुन्हा अंधार सोसायसाठी निघून जायचं.
 मी हा प्रश्न विचारायला नको होता.
 पण उद्याच्या वेदनांची चित्रं मनासमोर पिंगायला लागतात आणि मग हे सुख सोसवेनासं होतं.
 मी तृप्त होऊन जातो! इथून परतताना माझ्या मनाचे पिसार फुलारून येतात !! तरीही.. मी सतरा वर्षापूर्वी तुला दिलेली निळी साडी नेसून तू एअर पोर्टवर आलेली असतेस. मला माहीत असतं की तुझ्या उसन्या हसण्यामागं प्रचंड थैमान आहे अश्रूचं. अश्रू, जे. मी माझ्या हातांनी निर्माण केले.
 त्या अदृश्य अधूंनी माझ्या तृप्त रक्ताच्या साऱ्या जखमा उलून येतात.
 वाटतं, स्वतःलाच संपवून टाकलं तर सगळ्या यातना...
 मी हा प्रश्न विचारायला नको होता...
 पण आज विचारावासा वाटला. गेली सात वर्ष हा प्रश्न मनात निर्माणच झाला नाही.
 पण यावेळी फार असुरक्षित वाटतंय.
 हे इथं असं किती वर्ष यायचं ? का यायचं?
 रक्तात गुलमोहरी बसंत फुलवून घेण्यासाठी केवळ यायचं ? की दोन हजार मैलांवर घरकुलातले व्यवहार सांभाळणारा तू फक्त माझाच आहेस या जाणिवांचे आभाळ कवेत घेऊन तृप्त होण्यासाठी इथं यायचं ?
 रक्त खरं की मनाचं आभाळ खरं ?
 आज प्रत्येक क्षण हातातून सुटलेला...... असुरक्षित वाटतोय...
 तरीही हा प्रश्न मी विचारायला नको होता
 तू हा प्रश्न पहिल्या वर्षीच विचारला असतास तर कदाचित नंतरची सात वर्ष निर्माणच झाली नसती.
 तुला लिहिण्यापूर्वी शेकडो रात्री मी माझ्याशीच झुंजत होतो.
 मिल्कबरीला आल्यापासून घरचे, दारचे सारे संबंध तोडून टाकले मी.
 पूर्वेकडून येणारा वाराही मला नको होता. अनील... जेकब वा सागर कुणाच्या पत्राला उत्तर पाठवलं नाही मी. त्यांच्या पत्रातला तुझा ओझरता उल्लेख माझ्या सहनशक्तीपलीकडचा होता. सगळे दोर मी माझ्या हातांनी छाटले होते. एका दुबळ्या क्षणानं माझ्यासमोर परदेश प्रवासाचं... तिथल्या झगमगीत जीवनाचं स्वप्न उभं केलं. त्या स्वप्नांसाठी मनाचा बळी देताना काहीच वाटलं नाही. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी ऊर्मिलाला घेऊन स्वप्नांच्या देशात भरारी मारली. पहिल्याच रात्री लक्षात आलं की दोन तपकिरी डोळे माझा पाठलाग करताहेत. त्या डोळयांचा सूड घेण्याच्या इर्षेनं मी ऊमिलेवर प्रेमाचा वर्षाव करीत राहिलो. पण तृप्तीच्या प्रत्येक क्षणी अंतर्मनाला जाणवायचं, हा वर्षाव वासनांचा आहे. ही तृप्ती वासनांची आहे. पूर्ततेच्या प्रत्येक क्षणी भिंत खोल खोल खचत जायची.
 तू असं बोलताना ऊर्मिलेवर अन्याय करतो आहेस.
 तुझ्या रक्तातली वासना तिनं भावनांचे कोष विणून झेलली असेल. स्वतःतच हरवून जाणारी माणसं, स्वतःला जोजवण्यात इतकी मग्न होतात की इतरांच्या मनाचा विचार त्यांच्यासाठी असंभवनीय ठरतो. हातांनी कुरतडून टाकलेल्या फुलांच्या वेदना, आणि रक्तकोमल पावलांखाली चुरडल्या गेलेल्या फुलांच्या वेदना ...
 दोन्हीही वेदनाच!
 जन्माचं अस्तित्व चिरत जाणाऱ्या ...
 खरंच हा प्रश्न मी विचारायला नको होता.
 असं म्हणून माझ्यावर अन्याय करू नकोस.
 तिच्या माझ्यातलं नातं शरीराच्या माध्यमातूनच निर्माण होणार होतं. मंत्रांच्या अक्षरांची उदात्त झालर लावली तरी सर्वांच्या साक्षीनं दिला गेलेला तो परवानाच होता. आमच्या शरीरांना एकत्र येण्याचा ! पण मलमली शरीरांच्या आत गुंडाळलेलं असतं एक मन.
 शरीराचे पापुद्रे सोलताना मनाची नाती जुळतील असं वाटलं होतं. एका बेसावध क्षणी घेतलेला निर्णय ... तपकिरी व्याकूळ डोळे विसरायला लावणारा नवा बंध निर्माण होईल अशी आशा वाटली होती.
 पण ...
 बापाचा प्रचंड पैसा, त्या पैशाच्या बळावर मिळालेला देखणा पती आणि परदेशातलं अद्भुत जीवन यांच्या नव्या कैफात ऊर्मिलेला मला शोधावंसंच वाटलं नाही.
 मी वरवर चढत होतो. युनिव्हर्सिटीत स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचा प्रमुख झालो. दोन पुस्तकं माझ्या नावावर आली. पैशाचा प्रचंड ओघ अंगावर आदळत होता.
 पण आम्ही एकमेकांना सापडलोच नाही. हाती लागली फक्त शरीरं. भर प्रवाहात आत्महत्या करणाराचे कपडे हाती यावेत तशी. मग दोन तपकिरी डोळे चुकवणं अशक्य होऊ लागलं. त्या दोन डोळ्यांनी मला दिलेला विश्वास, स्वप्नांचे कोवळे कोंभ ... सारं आठवू लागलं. प्रतारणेच्या पापानं आतल्या आत जळणाऱ्या मला एकाच प्रायश्चित्ताचा ध्यास लागला. त्या दोन डोळ्यांना भेटण्याचा.
 तुला पत्र लिहिलं.
 तुझं उत्तर आलं.
 तुझा पत्ता जुनाच होता. नावही तेच, न बदललेलंल. मी पराभूत झालो होतो. डंख सोसूनही तू उभीच होतीस.
 मरण नाकारता येत नाही तशा वेदनाही नाकारता येत नाहीत.
 त्या कुरवाळाव्याच लागतात. दुखऱ्या हातांनी त्या कुरवाळतानाच कधीतरी, नकळत
 त्यांच्यावर प्रेम करायला लागतो आपण !
 वेदनांच्या वळांचा जांभळा धुंद थर आयुष्यावर चढत जातो.
 त्या थराखाली भूतभविष्यवर्तमान सारेच गाडले जातात. तो थर कुरतडून काढण्याचं ... नव्या आभाळाखाली जाण्याचं बळ, बळी गेलेल्या मनात कधीच येत नाही. एकच गोष्ट फक्त हातात उरते. आपली इमेज आपणच जपत राहणं.
 तू स्टेटस्मध्ये सेटल झाल्यावर दोन वर्षांनी अनिलनं मला विचारलं होतं.
 तुझ्या माझ्या प्रेमाचा मनस्वी साक्षीदार तो.
 तू केलेल्या प्रतारणेचं प्रायश्चित्त घेण्याच्या त्याच्या उदात्त कल्पनांना बळी जाणं मला नको होतं.
 त्यापेक्षा माझ्या वेदनांच्या स्वयंभू चांदण्या कुरवाळणे अधिक परवडणारं होतं.
 उदात्त कल्पनांचं काहूर मनात बाळगणाऱ्या माणसांचे पाय जमिनीच्या आधारानं उभे असतात, याचं भान मला तू देऊन गेला होतास.
 तुझं पत्र आलं. पंधरा शब्दांचं.
 ऋता.
 तुला विसराचा प्रयत्न करतोय.
 अशक्य आहे.
 बावीस मे ला माथेरानला येत आहे.
 तू येशील ना?
 -विश्वनाथ.
 शब्दांचं वांझपण भोगलेली मी.
 आनंदाच्या पलीकडं केव्हाच गेलेली.
 पण शब्दांना गर्भ देण्याची सवय जाता जात नाही.
 त्या शब्दांतून तुझ्या अतृप्त मनाचा तळ मला दिसला. इच्छा नसतानाही यावं लागलं.
 वाटलं. एकदा बळी दिला आहे. तो पुरा द्यायला हवा.
 सगळं साग्रसंगीत व्हायला हवं. होऊन जाऊ दे ...
 बळी देण्यासाठी तू इथं आलीस? आठ वर्ष येत होतीस?
 नाही फक्त पहिल्यांदा आले. पण बळी जाण्याऐवजी फूलतच गेले. माझ्यावरचा काळाजांभळा थर तुझ्या हळुवार हातांनी खरवडून टाकलास. निळया आभाळाचा रेशमी रंग पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांनी पाहिला.
 मी कुठं असते ? कोण आहे ...? कशी आहे ? असले प्रश्न विचारले नाहीस. मलाही प्रश्न विचारावेसे वाटले नाहीत. वर्षांतून फक्त चार दिवस जगत होते मी. ते जगणं इतकं सुंदर ... इतकं निहार की उरलेल्या तीनशेसाठ दिवसांचं रितेपण सहज सोसता यावं. तू येत राहिलास.
 मीही येत राहिले.
 गेली आठ वर्ष येतेय. पण आज नितांत असुरक्षित वाटतंय. फार असुरक्षित ... ! ! !
 गेल्या आठ वर्षांत एवढाही विश्वास निर्माण करू शकलो नाही मी ?
 त्या विश्वासावरच येत होते, पण तो एक गोड भास होता असं आज वाटतंय.
 स्पर्शाची ओढ तुला नव्हती. मलाही नव्हती.
 जुन्या आठवणींचे बिलोरी तुकडे जुळवीत राहायचं. जुनी, वेडी नि खुळी प्रतिबिंब पाहताना मोहरून जायचं. मुक्त मनानं भटकायचं. खूप बोलायचं. कित्येक लेखकांच्या कवींच्या साक्षी निघायच्या. तुझ्या डिपार्टमेंटमधल्या गमती जमती ... जीवनातले कुबट चिखली वास उडून जायचे. एकमेकांच्या जवळ यायला शब्द अधुरे पडले तेव्हा अपरिहार्यपणे ... नकळत एकमेकाचे झालो. स्पर्शाला नाकारण्याचा करंटेपणा मनातही आला नाही.
 अंधाऱ्या रात्री काळ्या पाण्यातून लक्षावधी दिवे तरंगत जावेत तसं रक्त झगमगून जायचं. रक्तातून गुलमोहर फुलायचे.
 पण आज रक्तातले निखार विझू आले आहेत.
 या अवघड क्षणी वाटतंय, हे गुलमोहर पेटवून घेण्यासाठी तर येत नव्हतो आपण?
 गेल्या दोन वर्षात निर्मुक्त हिंडणं ... अनिमिष गप्पा मारणं कमी झालंय. कळत नकळत आपणही रक्ताच्या प्रवाहात वाहून गेलो होतो.
 कळत नकळत मलाही ध्यास लागला होता, रक्तातून उसळणाऱ्या चन्द्रफुलांचा. चन्द्रफुलांचा बहर उतरत आला आहे. उद्या उतरणार आहे.
 मग उरेल विझलेली मातीची कुंडी. त्या मातीच्या कुंडीच्या ओढीनं येशील तू ? येईन मी?
 अन्याय करते आहेस ऋता ...
 हा अन्याय नाही. सत्यालाही सामोरं जावं लागतं. व्यवहार म्हणून का होईना, तू ऊर्मिलेला दोन मुलं दिली आहेस. सुरक्षितता दिली आहेस.
 चौकटीतल्या सुरक्षिततेच्या पलीकडं गेले आहे मी. मला हवी आहे पाखर. अपार मायेची. अस्फुट शब्दांच्या निरंतर उबेची दोन हजार मैलांवरून कशी देणार आहेस तू?
 तू इथं येतोस हे माहीत असूनही 'तीन चोक बारा' च्या हिशोबानं तुझा संसार करणारी ऊर्मिला या क्षणी खूप सेफ आहे ...
 तिला माहित आहे तू इथं येतोस ते ?
 नाही.
 ज्ञाताच्या कुंपणापलीकडचं जग मला निर्माण करायचं होतं.
 ते मी इथं निर्माण केलं. माझ्या जगातले वारे मला इथं नको होते.
 दिव्याकृतींच्या दिव्य गीती गात झपूर्झा व्हायचं होतं मला.  तुझे हिसकाटून घेतलेले क्षण तुला द्यायचे होते. मला हवं असलेल निगूढ गीत देण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यात होतं.
 फक्त तू हवी होतीस मला. तुझ्या माझ्यावर असलेल्या विश्वासासकट. निष्ठेसकट.
 शिरीषाबरचा पोपटी बहार फक्त चार दिवसांचा असतो.
 झुलत्या झिळमिळयांतून मोकळे होणारे गंध उत्तर रात्री वाऱ्यावरून दूऽऽर दूऽऽर पसरतात.
 त्या गंधांनं अवघं मन भरून जातं.
 मग त्या गंधांच्या स्मतींनी ग्रीष्मालाही ओलावा येतो.
 वर्षभर मी जगायचो, मे महिन्याची वाट पाहात. इथून परतताना तृप्तीत असायची निरंतरची अतृप्तता.
 आणि अतृप्ततेत तृप्तीची अथांग जाणीव ... पण आज लक्षात येतंय.
 तृप्तीसाठी धावणारा मी, नकळत तुझ्यातल्या 'स्त्री'ला जागवतोय याचं भानच उरलं नाही.
 या प्रश्नानं तू ते भान दिलसं.
 या क्षणी वाटतंय या पूर्वीच तू हा प्रश्न विचारला असता तर ...?
 होय फार उशीर झालाय.
 मला हवी असलेली सुरक्षितता देण्याचं बळ तुझ्या या जगात नाही आणि त्याही जगात नाही.
 हा प्रश्न विचारायलाच नको होता.
 तुझ्या तृप्तीचं सुख नासवून टाकायचं नव्हतं मला.
 पण बळी जाताना ... मरणाची गुदमर सोसताना एक अस्फुट किंकाळी नकळत उमटून जाते.
 तसाच हा प्रश्न.
 हा प्रश्न विचारायला नको होता मी ... नको होता नको होता ...

* *