स्वरांत/स्वरांत

विकिस्रोत कडून




स्वरांत

 पावलावर लोळणारा हिरवाजर्द निऱ्यांचा घोळ, तो अलगद वर उचलून ती आत आली. तिची गव्हाळ पावलं. मधल्या बोटात एकेक चंदेरी वेढं. टक् ... टक् ... वाजणारं. शिवाय घुंगरांचा चिमणा चाळा. ती पाटावर बसली. तिला धड बसताही येईना. कसंही बसा, पोट मध्येच यायला लागलं. मोगरीची कळी ऐन संध्याकाळी फुलायला यावी, तसं पोट ! मग सगळ्या बायका खुदुखुदल्या. आठवणींनी खुळखुळल्या क्षणभर. ती खूप लाजली. गालाला खळी पाडत.
 तिचं हसणं, तिचं पानसळी रूप मी पाहतेय. पाहता पाहता हरवून जातेय.
 मग मीच तिच्या रक्तातून वाहू लागते.
 मग मीच लाजते.
 गोऱ्यापान पारिजातकाची फुलं विखरून पडतात, ती माझ्याच झाडाची असतात.

* * *
 चहा बशीत सांडतोय.
 तो बहुधा सगळ्यांच्याच हातून आणि प्रत्येक वेळीच सांडत असावा. मग एक रागीट नजर. बहुधा बापाची किंवा कर्त्या भावाची.
 एकूण चहापोहे बरे आहेत. या दिवसातही खोबरं नि शेंगादाणे घातले आहेत.
 'पोरगी निबर वाटते नाही ?'
 'नाकही पसरट आहे.'
 'रंगही बेताचाच. तकाकी नाही.'
 ' च्यायला अंगानं तरी गच्च असावी की! नोकरीचे पाचशे पंचाहत्तर रुपये एवढीच जमेची बाजू.'
* * *
 उषानं आजही रजा दिलीय.
 'आजारी आहे ?'
 'इश्श्य ! इंदे, तू तरी फालतू इनोसन्सचा आव आणतेस. लग्न झाल्यावर कोणता आजार होणार ग ? '
 'आता तर झालंय लग्न. महिना झाला असेल.'
 'लग्नात न्हायली होती. नि लगेच मुटुरगुम्. नि मग नवव्या महिन्यात पोर-'
 'खर्रऽऽच्च ? इश्श्य ऽऽ !'
 दोन वांझ कळा. ओटीपोटाकडे धावणाऱ्या.
* * *
 'आपले डोळे मिटायच्या आत पोर उजवायला हवी!
 'तुम्ही रात्रीच्या बाहेर गप्पा मारीत बसता. सैपाकघरात अरुण नि सूनबाई. पोर मधे एकटीच. आता जा कशा-'
 'बिजवर का होईना, बघायला हवा... आताशा पाय नि कंबर फार धरते.'
* * *
 'भूक लागलीय.'
 'इतक्या रात्री? चला.'
 'हूं.'
 'पोहे देऊ लावून? की भाकरी टाकू ? '
 'अहं,'
 'मग?'
 ' ..................'
 गोऱ्या पोटरीवरून वर सरकणारी पावलं.
 'हे काय?'
 'तू हवीस. अगदी पूर्ण- '
 'शूऽऽ. बाहेर वन्सं आहेत.'
 'माहितेय. मुक्यानी आटोपलेले व्यवहार नकोत आता. तुझं कातीव रूप. मिटलेल्या डोळ्यांतून सळसळणारी गोड वेदना. दुखऱ्या ओठांतून झिरपणारे सीत्कार. सारं उजेडात निरखायचंय मला.'
 खूप भूक लागलीय.
* * *
 घोषा.
 रानावनात भटकणारी. वैराण मनं. वर पांढरं आभाळ. पांढरे ढग वांझ असतात.
 ...तर घोषा रानात उगाचच भेटकतेय. अंगभर उतलेलं पांढरं कोड वागवीत नुस्तं भटकायचं.
 तर, तिला एकदा दोन पानं सापडली. कोवळी नी रसरशीत. इतकी ताजी की सहज तोंडात टाकावीत. घोंषानं तेच केलंन्. दाताखाली पान रगडलं असेल नसेल तोच अश्विनीकुमार दत्त म्हणून उभे!
 अश्विनीकुमार... त्यांच्या नाकाला सोमरसाचा घमघमाट सोसवेनासा झालेला. तोंडाला पाणी सुटलेलं.
 घोषा सावध. ओठ गच्च मिटून.
 'देवी, सोमरसासाठी धावत आलोय. ती सोमवल्ली आम्हाला देशील?'
 '...............'
 'देवांचे वैद्य अश्विनीकुमार म्हणतात आम्हाला. त्या सोमरसाच्या केवळ 'गंधानं रक्त उत्तेजित झालं आमचे. देवी, ती पानं. तो रस...'
 'पानं मिळतील पण...'
 'काय पाहिजे ते माग.'
 'सुंदर रूप हवंय मला... सुंदर रूप इंद्राणीहून सरस असं...'
 मग पुन्हा घोषा...
 विवाहाच्या वेदीभोवती फेरे घालणारी. आनंदनिर्भरा.
* * *
 साडे - सहा वाजून गेलेले. ऑफिस भणाण रिकामं. फक्त बॉस थांबलाय. टाईप केलेले कागद हातात घेताना त्याची नजर बोचते.
 'उशीर झाला आज ?'
 'हं.'
 'थेट घरीच का आता ?
 'होय.'
 'सम् टाइम्स यू मस्ट बी फिलिंग लोनली. इजंट इट?'
 '... ... ...'
 'आय वुड लाइक टू गिव यू कंपनी. ... ... अर्थात अधूनमधून'
 मग ही ... ही ... ही ...
 बिच्चारी बायको. गोरीभुरकी. कुरळ्या केसांचे फुलोर चाचपीत चालणारी. बिनबाह्यांचं पोलकं नि लिपस्टिकवाली.
 'यू मस्ट बी नीअर थर्टी. बट यू हॅव मेंटेंड युवर फॉर्म. एक पोर झालं की बायका एकतर बरण्यातरी होतात नाहीतर धुणं वाळत घालायच्या काठ्या तरी ! '
 '... ... ...'
* * *
 स्वप्नात मी घोषाच असते.
 पण अश्विनीकुमार येतच नाहीत.
 किती वाट पाहायची ?
 'अफालीचं रक्तदोषान्तक घ्या आणि लॅक्टोकॅलमिनमध्ये प्लॅसेन्ट्रेक्सच्या दोन ॲम्पुलस् फोडून मिसळा. रोज तीन वेळा ॲप्लाय करा. शिवाय तीन वेळा कोमट पाण्यानं तोंड धुवायचं. तोंडावरचा मुरूम गेलाच पाहिजे. बट, युवर अेज?'
 'थर्टी-टू.'
 इंग्लिशमध्ये वय सांगितलं की जरा कमी भासतं.
 'ओह ! बत्तीस?..पण करा उपाय'
 अदरवाअीज, विशीतल्या मुलींना हमखास गुण येतो. सो. ... ? ' तर मग अश्विनीकुमारांची किती वाट पहायची?
 कदाचित भेटतीलही...
 मग मीही होईन घोषा. भांगातून सिंदूर रेखलेली आनंदनिर्भरा.
* * *
 उषाचं पोर खूप छान आहे. गुलाबी गुलाबी. एस्. टी. तून घाट उतरताना एक पिंपळाचं कोवळं झाड पाहिलं होतं.
 गुलाबी पानांनी झुळझुळणारं. कोवळं नि तकतकीत. हलू की नको, हलू की नको. असं हालणारं !
 बाळ दूध पितंय चुरूचुरू.
 'स्सस्स हाय ! किती जोरात ओढतो, गाढव ! '
 तिच्या गालावरून हलका गुलाबी रंग सांडतो.
 कितीतरी आठवणी.
 ह्याच्या नि त्याच्या.
 त्याच्या नि ह्याच्या.
* * *
 इंदीला आज फोन आला होता. फोन आला की अिंदी लवकर पळते आणि जरा तंद्रीतही असते.
 'इंदे, आज फोन आलाय. मग घाई असेल.'
 'चल चहाटळ ! '
 'मारलास कुठं पाचर?'
 'तिशी ओलांडलीय बये मी ! पाचर ठोकायला धार लागते. तो वर्मा नाही का ग येत माझ्याकडे अधूनमधून ?'
 'ते ठोक्यांचं भांडं ? काळा गॉगल ? '
 'हं. त्याचा बिझिनेस आहे. डान्सिंग स्कूलसारखा. पण घरगुती हं. तो फोन करतो कधीतरी.'
 डोकं खूप जड पडलं ना? की अगदी हल्लकं होऊन जातं एका क्षणात.
* * *
 ते कोवळं बाळ सारखं दिसतं. मला का नको बाळ ? हलत्या पाखरांसारखे त्याचे गुवरे गाल. गुलाबाच्या पाकळीसारखे तळवे. जवळ घेताना किती छान वाटत असेल!
 मला बाळ का नको?
 मला हवंय.
 मी कुरूप. काळी.
 म्हणून लग्न नाही.
 आणि म्हणून बाळ पण नाही.
 का?
 असं का?
 माझा रंग नको असेल कुणाला. पण माझ्या बाळाभोवती कुंपण का?
 कुंपण का?
* * *
 सिंडरेलाला त्या राजपुत्रानं हाकलून दिलं म्हणे! मग सिंडरेला पुन्हा शिळीपाकी झाली. कळकट, तेलकट, झिपऱ्यांचं टोपलं.
 अशी कुठं राणी असते?
 मग राजपुत्र म्हणाला, 'ए भिकारडे ! निकल जाव यहाँसे. अभी के अभी.'
* * *
 उषाचं बाळ घरभर रांगतं. मातीचे पोपडे उकरून खातं. दात येताहेत त्याला. काल खूपदा शी पण केली. उषा नर्व्हस आहे आज. त्याला कॅलशियम द्यायला हवं. कॅलशियम डेफिशियन्सी असली की मुलं माती खातात. केळं खायला द्यायला हवं. शिवाय मोसुंव्याचा रस. टोमॅटोचं पाणी. मग कसं गुब्बु ... गुब्बु होअील. मर्फीच्या वाळासारखं!
* * *
  बॉस बरा की वर्मा ?
 बॉस गोरागोमटा आहे. मग बाळही केवड्याच्या पानासारखं होईल. पण माझा रंग घेतला तर?
 कसं का असेना ते हिरवळीसारखं लुसलुशीत नक्कीच असेल.
* * *
 'आटोपलं का?'
 त्रासिक स्वर.
 'आयला, उगाच रडण्याची ढोंगं. मेली नि अब्रू सवालाखाची राहिली.'
 'चार महिने झाले होते, म्हणे ! '
 'अहो, थांबा जरा. बाहेर आणतील तेव्हा बांधताना नीट पाहून घ्या. हो, खऱ्याखोट्याचा समक्ष पडताळा.
 'कोण होता?'
 'होता? ... ... अहो, होते म्हणाना ! नेमकं कुणाचं म्हणून सांगावं ? सुटला भाऊ.'
 'या वाढत्या पोरी म्हणजे न विझणाऱ्या दिवट्या. कधी नि कुठं आगी लावत सुटतील नेम नाही.'
 'कुणास ठाउक ! तिनंच विष घेतलंन की भावानं दिलंन. हल्ली काही कुणाचा भरोसा देऊ नये. इंदी म्हणत होती की तिला मूल वाढवायचं होतं'
 'इश्श्य ऽऽ काहीतरीच ! !'

* *