सोलिव सुख
Appearance
<poem>
- श्रीसमर्थ रामदास स्वामींनी त्यांचे लाडके शिष्य कल्याण स्वामींना दासबोधाचा अर्थ वा सार सांगितले. ते सार समर्थांनी व कल्याण स्वामींनी ज्या काव्यरचनेतून व्यक्त केले तिला 'सोलीव सुख' असे नाव आहे.
- जयजयाजी सद्गुरूवर्या । पूर्णब्रह्म प्रतापसूर्या ।
- तुज नमोजी आचार्या । करूणासिंधो ॥ १ ॥
- जे भवसमुद्रीं पोळले । विषयमदे अंध जाहले ।
- चौर्यांशीत वाहूं लागले । मार्ग सुचेना तयांसी ॥ २ ॥
- ऐसे विश्व बहुत बुडालें । मी जीव म्हणोनी धावू लागलें ।
- मुळीचे स्मरण विसरलें । मी कोण ऐसें ॥ ३ ॥
- तयासी मुक्त करावया पूर्ण । तू बा उतरलासि ज्ञानघन ।
- रोगिया औषधी देऊन । भवमोचन करिशी ॥ ४ ॥
- ऐसे औदार्य तुझें सघन । म्हणोनि आलों मी शरण ।
- दयार्णवा कृपा करून । मज दातारें तारावें ॥ ५ ॥
- आपण आपणातें पावें । ऐसे माझें मनीं बोलावे ।
- तें दातारें गोचर करावें । रोकडें ब्रह्म ॥ ६ ॥
- ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनि । ज्ञानाचें भरतें आले स्वामीलागोनि ।
- आसन सांडोनिया तये क्षणी । कडकडोनि भेटले ॥ ७ ॥
- रे बाळका, ऐक निर्धार । तुझा प्रश्न तो वाग्दोरें ।
- माझे कंठी बैसला साचार । बरें घेई निजा वस्तु ॥ ८ ॥
- मग स्नेहाळें नवल केलें । वोसंगासी शिष्या घेतलें ।
- अर्धा मात्रा रस काढिले । पूर्ण फुंकिले कर्णरंध्री ॥ ९ ॥
- खडतर औषधी दिव्य रसायन । नयनी झोंबले जाऊन ।
- डोळियाचा डोळा फोडून । चित् सूर्य भेदिले ॥ १० ॥
- पूर्ण अंश गगनीं भेदिलां । अर्क तो पिंडीमाजी उतरला ।
- त्रिकुट श्रीहाट चुराडा केला । सेखीं भरला गगन गर्भी ॥ ११ ॥
- उग्रतेज लखलखाट । तेथें जाला चौदेहाचा आट ।
- भ्रांति पडली बळकट । तेव्हा बाळ निचेष्टीत पडे ॥ १२ ॥
- ऐसे पाहोनि सद्गुरुनाथ । पद्महस्त मस्तकीं ठेवित ।
- वत्सा सावध त्वरित । निजरूप पहा आपुले ॥ १३ ॥
- जागृत करोनि ते वेळीं । अजपाची दोरी देऊनि जवळी ।
- विहंगम डोल्हारी तयेवेळीं । अलक्ष्य लक्षीं बैसविलें ॥ १४ ॥
- धैर्याचें आसन बळकट । आणि इंद्रियें ओढूनि सघट ।
- धरे उर्ध्वपंथे वाट नीट । अढळपदीं लक्ष लावी ॥ १५ ॥
- पुढें करोनिया जाणीव । मागे सारोनि नेणिव ।
- जे जे जाणीव अभिनव । तें तूं नव्हेसि तत्वता ॥ १६ ॥
- तै मार्गाची करू नव्हाळी । प्रथम घंटानादाची नवाळी ।
- दुसरी किंकिणीची मोवाळी । तिसरी अनुहत कोल्हाळ ॥ १७ ॥
- आता अग्रीं लक्ष लावी । काय दिसेल तें न्याहाळी ।
- चंद्रज्योति प्रकाशली । व्यूह बांधिला बळकट ॥ १८ ॥
- तें सुख अंतरी घेऊनि । पुढें चाल करी संगमीं ।
- तेथें विजु ऐशा कामिनी । चमकताती सुवर्ण रंग ॥ १९ ॥
- तेहि जाणोनि मागें सारी । पुढें सूर्यबिंब अवधारी ।
- ज्वाळा निघती परोपरी । डंडळू नको कल्पांती ॥ २० ॥
- वायोमुख करोनि तेथें । गिळी वेगें सूर्यकिरणातें ।
- मग देखसी आनंदमार्तंडातें । तेजोमय मम पुत्रा ॥ २१ ॥
- अनंतभानुतेज अद्भुत । खादिरांगार ज्वाळा उसळत ।
- धारिष्ठ तेथें न निभत । दुर्घट व्यूह तेथींचा ॥ २२ ॥
- तेथें हुशारीचे काम । अग्रीं लक्ष लावोनि नेम ।
- तीरें लावोनि सुगम । मागें सारी सुर्यातें ॥ २३ ॥
- पुढें दिसेल जे नवल । ते पाही हंसमेळ ।
- चंद्रकिरण शीतल । पाहसी तूं मम वत्सा ॥ २४ ॥
- तेव्हा मागील दाह शमेल । शीतळाई सर्वांग होईल ।
- चंद्राची प्रभा सुढाळ । फडफडीत चांदणे ॥ २५ ॥
- तेचि डोळियाचा डोळा पाही । देहातीत वर्म विदेही ।
- चिन्मय सुखाची बवाई । भोगी आपुलें की गा ॥ २६ ॥
- अनुभवाची शीग भरली । आग्रापरी उसळली ।
- भूमंडळी प्रभा पडली । कर्पुरवर्ण नभ जाहलें ॥ २७ ॥
- तया मध्यभागीं सघन । अढळपद दैदिप्यमान ।
- उर्वरित ब्रह्म जाण । ध्रुव बैसला आढळ तें ॥ २८ ॥
- ते तुझे स्वरूप नेटें वोटें । जेथें समस्त जाणणें आटे ।
- ऐकें जालासी थिटें । बळकटपण बलाढ्य ॥ २९ ॥
- ऐसे सुख योगिया लाधलें । तेव्हा देहाचे मरण गेलें ।
- सांगणे ऐकणें मुरालें । एकत्वपणें एकचि ॥ ३० ॥
- शांति येवोनि माळ घाली । अलक्ष्यसेजे निजेली ।
- हंसपदें ऐक्य जाली । सुख सुखातें निमग्न ॥ ३१ ॥
- तेथील अनुभव घेऊनि । स्वानुभव पाहे कलटुनि ।
- आला मार्ग ते क्षणीं । दिसेनासा जाला की ॥ ३२ ॥
- त्रिकुट श्रीहाट गोल्हाट । बुडाले ते औटपीट ।
- इडा- पिंगळा - सुषुम्नातट । विराले ते स्वात्मसुखें ॥ ३३ ॥
- स्थूळ सूक्ष्म कारण । नेणों काय जालें महाकारण ।
- इंद्रियें चुबकली जाण । धाव मोडली तयांची ॥ ३४ ॥
- पंचभूतांचे खवले । तयांचे ठावची पुसले ।
- अपरिमित आनंदले। निमग्न जाले सुखांत ॥ ३५ ॥
- सखोल भूमी ऐसें जाले । सुख सुखासि घोटलें ।
- स्वयें आत्मत्व प्रगटलें । माझे देहि रोकडें ॥ ३६ ॥
- मग सहज समाधी जिरवून । शिष्ट उठला घाबरा होऊन ।
- हे सद्गुरू देणे (वरदान) । काय उत्तीर्ण म्या व्हावें ॥ ३७ ॥
- जरी स्तुती तयाची करावी । माझी मती नाही बरवी ।
- अनिर्वाच्य गती बोलावी । परा वाचा कुंठित ॥ ३८ ॥
- आता जी मी लडिवाळपणें । तुमचे कृपें करितो स्तवन ।
- सूर्यापुढें खद्योत जाण । तैशापरी बोल हे ॥ ३९ ॥
- जयजयाजी करूणा सिंधू । जयजयाजी भवरोग - वैदु ।
- जयजयाजी बाळ बोधु । कृपाघना समर्था ॥ ४० ॥
- जयजयाजी अविनाशा । जयजयाजी परेशा ।
- जयजयाजी अध्यक्षा । दयार्णवा ॥ ४१ ॥
- जयजयाजी पूर्णचंद्रा । जयजयाजी अलक्ष्यविहारा ।
- जयजयाजी भवसिंधु भास्करा । आनंदप्रभु ॥ ४२ ॥
- तुझी स्तुती करिता सांग । वेदस्तुति जाले अव्यंग ।
- तेथें प्राकृत मी काय । वर्णावया योग्य नव्हे ॥ ४३ ॥
- कल्याण म्हणे जी रामदासा । माझा मुकेपणाचा ठसा ।
- ते मोडोनी वसोसा । मज आपणां ऐसें केलें ॥ ४४ ॥
- ऐकोनि मृदुवचन । कुरवाळिले तयालागून ।
- गुरूशिष्य हें बोलणे । उरले नाही ते वेळीं ॥ ४५ ॥
- एकपण एकचि जाले । ऐक्यरूपीं सम मिळाले ।
- करूनिया सुख उसळले । नाहींपण जाऊनि ॥ ४६ ॥
- सुगरिणीचा पाक जाहला । नभाभाजणी वाढिला ।
- अक्षयपदीं सुगरावला । संत जेवती स्वानंदे ॥ ४७ ॥
- अनिर्वाच्य बोल बोलिले । साधकाचे उपेगा आले ।
- सिद्ध तरी डोलों लागले । बद्ध मुमुक्षु होताती ॥ ४८ ॥
- यापरतें आन नाही बोलणें । श्रीराम दशरथाची आण ।
- एकपत्नी तो सुजाण । आपुले पद दे दासा ॥ ४९ ॥
- इति - श्रीदासबोध - ग्रंथ । त्यातील हा सोलीव अर्थ ।
- श्रोते ऐकता यथार्थ । समाधिस्त होती ॥ ५० ॥
- ॥सार्थ सोलिव सुख॥
- जयजयाजी सद्गुरूवर्या । पूर्णब्रह्म प्रतापसूर्या ।
- तुज नमोजी आचार्या । करूणासिंधो ॥ १ ॥
- भावार्थ :-
- करूणा म्हणजे दया. सद्गुरू अधोगतीपासून रक्षण करून परागती प्राप्त करून देतात. म्हणून ते करूणा सिंधू असतात. दया, करूणा, अनुकंपा इ. लक्षणे सद्गुरूंच्या ठायी एकवटलेली असतात. अशा सद्गुरूंना स्वत: ब्रह्मानंदात रत होण्याची योग्यता असताना देखील अज्ञानी जीवांविषयी अपार करूणा वाटत असते. अशा पूर्णब्रह्मस्वरूप व सुर्यासारखी दैदीप्यपान पराक्रमी सद्गुरूंचा शिष्योत्तम कल्याण स्वामी वंदनपूर्वक जयजयकार करीत आहेत. [१]
- जे भवसमुद्रीं पोळले । विषयमदे अंध जाहले ।
- चौर्यांशीत वाहूं लागले । मार्ग सुचेना तयांसी ॥ २ ॥
- भावार्थ :-
- भवसागरात (संसारात) गटांगळ्या खाणार्या जीवाला आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या तापांचा वडवानल सतत चटके देतो. 'सुख पाहता जवाएवढे ! दु:ख पर्वता एवढे !' अशी त्यांची अवस्था असते. प्रारब्धवशात शब्द-स्पर्श रूपादी विषय मिळत गेले की त्या विषय सुखाची धुंदी चढून आत्मसुखाची शक्यताच मावळून जाते. आरंभी गोड वाटणारे विषय सुख नंतर विषाप्रमाणे फलिते देते. एकदा हाती आलेला मनुष्य देह विषय सुखात गुंतून नष्ट झाला की इतर योनीच्या शरीरात मोक्षाचे ज्ञान संपादन करण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे त्यांना त्यातून सुटण्याचा मार्ग सुचण्याची शक्यताच नसते. आपल्या सर्वांचे नेमके वर्णन योगिराज कल्याण स्वामी समर्थांपुढे या ओवीत करीत आहेत. [२]
- ऐसे विश्व बहुत बुडालें । मी जीव म्हणोनी धावू लागलें ।
- मुळीचे स्मरण विसरलें । मी कोण ऐसें ॥ ३ ॥
- भावार्थ :-
- योगीराज कल्याणस्वामी महाराज समर्थांना पुढे म्हणतात की, अशा अज्ञानाच्या भवसमुद्रात या जगातील कोट्यवधी जीव बुडाले आहेत. ते सर्व मूळचे ब्रह्मरूप असताना देहतादात्म्यामुळे 'मी जीव आहे' अशा मोहाने 'मी व माझे' या भ्रमामध्ये आयुष्य घालवितात. असे आयुष्य केव्हांच संपून जाते. जागृती, स्वप्न व सुषुप्ती अशा जीवांच्या तीन कल्पीत अवस्था, तीन गुणांच्या अभिव्यक्तींचा गोंधळ, द्वंद्वाचे तडाखे व त्रिपुटींच्या खेळामध्ये आयुष्य वेगाने सरून जाते. त्यात आपल्या खर्या स्वरूपाच्या स्मरणाला सवडच मिळत नाही.
- तयासी मुक्त करावया पूर्ण । तू बा उतरलासि ज्ञानघन ।
- रोगिया औषधी देऊन । भवमोचन करिशी ॥ ४ ॥
- भावार्थ :-
- शिष्योत्तम कल्याणस्वामी महाराज पुढे म्हणतात, स्वत:चे मूळचे स्वरूप विसरल्याने जे बद्ध झाले आहेत त्यांना कायमची मुक्ती देण्यासाठी तूम्ही स्वत: ज्ञानरूप ढग असून त्यांच्यावर ज्ञानाची वृष्टी करता. अज्ञान हेच बंधनाचे कारण असल्याने ज्ञान हा सहजच मुक्तीचा एकमेव उपाय ठरतो. सद्गुरू ज्ञानरूप असतात. त्यांना 'केवळ ज्ञानरूप' असे म्हणतात. भव म्हणजे जन्माला आलेला किंवा निर्माण झालेला जो प्रपंच त्याचे ठिकाणी सत्यत्व, सुखत्व व ममत्व हाच रोग आहे, हाच भवरोग. त्या रोगाला तूम्ही उपचार करून दूर करता. प्रपंच मिथ्या आहे, सुख आत्म्याचे ठिकाणी आहे व ममत्व भ्रम आहे, असे त्या औषधोपचाराचे स्वरूप आहे. [४]
- ऐसे औदार्य तुझें सघन । म्हणोनि आलों मी शरण ।
- दयार्णवा कृपा करून । मज दातारें तारावें ॥ ५ ॥
- भावार्थ :-
- हे सद्गुरू माऊली, तुझे औदार्य कृष्ण ढगा सारखे परिणामकारक आहे. पांढर्या ढगाप्रमाणे निरर्थक किंवा नुसत्या शोभेचे नाही, हे जाणून मी आपल्याला शरण आलेलो आहे. हे दयासिंधो, तुम्ही अत्यंत उदार आहात, माझ्यावर कृपा करून मला भवसागरातून तारावे. गीतेच्या 'तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया' या आज्ञेनुसार योगीराज कल्याण स्वामी समर्थांना शरण गेले व त्यांनी परिप्रश्नाऐवजी भवसागरातून तारण्याची त्यांना विनंती केली. [५]
- आपण आपणातें पावें । ऐसे माझें मनीं बोलावे ।
- तें दातारें गोचर करावें । रोकडें ब्रह्म ॥ ६ ॥
- भावार्थ :-
- इथे पट्टशिष्य कल्याण स्वामी जणू आधिकार वाणीने समर्थांना प्रार्थितात, "ब्रह्म प्रमाणांचा विषय होत नाही. ते पंचज्ञानेंद्रिये, मन व तर्कादिकांनी अनुभवाला येत नाही. ते स्वसंवेद्य आहे. " पहावे आपणासी आपण । या नाव ज्ञान ॥" असे दासबोधातही म्हटले आहे. ही सर्व बोलणी मला चांगली ठाऊक आहेत. आपण अत्यंत उदार आहात. या बोलण्याचा मला साक्षात प्रत्यय आणून द्यावा."
- ब्रह्म इंद्रियगोचर नसल्याने येथे 'गोचर' शब्दचा अर्थ प्रत्यय असा घ्यावा लागतो व रोकडे या शब्दाचा अपरोक्ष, प्रत्यक्ष, साक्षात असा अर्थ घ्यावा लागतो.
- ७
- ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनि । ज्ञानाचें भरतें आले स्वामीलागोनि ।
- आसन सांडोनिया तये क्षणी । कडकडोनि भेटले ॥ ७ ॥
- भावार्थ :-
- शिष्याची ही जगावेगळी विनंती ऐकताच सद्गुरूंची दयाबुद्धी पान्हावली आणि अंत:करण ज्ञानाकार झाले. केवळ शिष्यावर अनुग्रहासाठी आवश्यक इतकी वृत्ती शिल्लक राहिली. त्या वृत्तीच्या योगे सद्गुरू आपल्या स्थानावरून उठले, त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. केवळ गदगदून जाऊन सद्गुरूंनी शिष्याला हृदयाशी धरले. सद्गुरू सत् शिष्यासाठी जेव्हा आसन सोडतात तेव्हा शिष्याचा आधिकार किती प्रगल्भ असला पाहिजे. इतर शिष्य काय काय मागत असतात ? आणि कल्याणस्वामी नेमके काय मागत आहेत याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शिष्योत्तम कल्याणस्वामींची परमार्थातील उंची नेटकी उकलते. अधिकारी सत् शिष्याचा विश्वावेगळा प्रश्न ऐकताच क्षणाचाही वेळ न दवडता सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी शिष्याच्या कल्याणाचा मार्ग त्याला दर्शविण्याचा निर्णय घेतला. कल्याण स्वामींनी तुमच्या आमच्या उद्धाराकरता हे मागणे सद्गुरूकडे मागितले. कल्याण स्वामींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.
- ८
- रे बाळका, ऐक निर्धार । तुझा प्रश्न तो वाग्दोरें ।
- माझे कंठी बैसला साचार । बरें घेई निजा वस्तु ॥ ८ ॥
- भावार्थ :-
- समर्थांनी कल्याणस्वामींस उपदेशिले की, "हे वत्सा, मी तुझ्या बाबतीत केलेला निश्चय तुला सांगतो तो तू ऐक. ज्या शब्दांनी तू मला विनंतीरूप प्रश्न केला आहेस त्या शब्दांचा आता एक जणू मजबूत दोरखंड बनला असून तो माझ्या मानेभोवती घट्ट आवळला गेला आहे ! आता तुला तुझ्या खर्या स्वरूपाचा अनुभव द्यावाच लागेल !!
तो तुझा तू घे."
- शिष्याचा सद्गुरूवर किती अधिकार चालतो हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. अधिकारी शिष्याचा सद्गुरुवर अधिकार चालून नंतर शिष्य सद्गुरूच्या आधिकाराखाली राहिला की खरे गुरु-शिष्य नाते सुप्रतिष्ठीत होते. [८]
- ९
- मग स्नेहाळें नवल केलें । वोसंगासी शिष्या घेतलें ।
- अर्धा मात्रा रस काढिले । पूर्ण फुंकिले कर्णरंध्री ॥ ९ ॥
- भावार्थ :-
- नंतर स्नेहाने अंत:करण भरून गेलेल्या सद्गुरूंनी एक आगळे नवल केले. शिष्याला स्वत:च्या मांडीवर वात्सल्याने बसवून घेतले. आणि केवळ वचनमात्रेच्या साह्याने (मंत्रसामर्थ्याने) शिष्याला शक्तिपाताची दिक्षा दिली. म्हणजेच ॐकाराच्या अर्ध मात्रेचा रस म्हणजे तात्पर्य/ लक्ष्यांश शिष्याच्या कानामध्ये पूर्णपणे घालून, तो आत गेला की नाही याची तो रस फुंकून फुंकून खात्री करून घेतली. म्हणजेच त्याला आत्मज्ञानाचा दृढ बोध केला. अशा प्रकारे सोहं तत्वज्ञान सदुरूंनी शिष्याला समजावून सांगितले.
- जे साधण्यासाठी योग्यांना प्रचंड देह यातनांना सामोरे जावे लागते तेच उद्दिष्ठ कल्याणस्वामींनी भक्ती मार्गाने सद्गुरूला जिंकून साध्य केले. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला असाध्य असणारा योग मार्ग, कठीणातला कठीण ज्ञानमार्ग टाळून सुलभ अशा भक्तिमार्गाने तेच उद्दिष्ठ गाठणे कसे श्रेयस्कर आहे ते दर्शविले. [9]
- १०
- खडतर औषधी दिव्य रसायन । नयनी झोंबले जाऊन ।
- डोळियाचा डोळा फोडून । चित् सूर्य भेदिले ॥ १० ॥
- भावार्थ :-
- अर्धमात्रेचा रस हे एक दिव्य रसायन आहे. पण या रसायनाचे औषध म्हणून सेवन करू गेले तर ते फार जहाल आहे. ते कानात घातले अन् डोळ्यात जाऊन झोंबले ! त्यामुळे कल्याणस्वामींना ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. या ज्ञानदृष्टीला डोळ्याचा डोळा म्हणजे आत्मा पाहून अंत:करणवृत्ती तदाकार करून देण्याचे मोठे सामर्थ्य आहे.
- केनोपनिषद म्हणते - आत्मा हा कानाचा कान, मनाचे मन, डोळ्याचा डोळा इ. आहे. आत्म्यापाशी डोळा जात नाही म्हणजे डोळ्याने आत्मा दिसत नाही. मनाला आत्मा कळत नाही.
- मग दिव्य रसायनाने नेमके काय केले ? त्या रसायनाने बुद्धीतील अविद्या काढून टाकली. त्या बुद्धीला ज्ञानचक्षू दिले. [१०]
- ११
- पूर्ण अंश गगनीं भेदिलां । अर्क तो पिंडीमाजी उतरला ।
- त्रिकुट श्रीहाट चुराडा केला । सेखीं भरला गगन गर्भी ॥ ११ ॥
- भावार्थ :-
- ॐकाराच्या अर्धमात्रेवर आधारलेल्या सोऽहं या पूर्ण साधनाने आकाश तत्वाचे आधिष्ठान असलेल्या ब्रह्माशी ऐक्य साधले. ब्रह्मांडाचा निरास करून व्यापक ब्रह्माचा अनुभव घेतला. त्याच बरोबर 'सोऽहं' साधनारूप अर्धमात्रेचा अर्क अंत:करण वृत्तीच्या साह्याने शिष्याच्या देहात शिरला. म्हणजे अंत:करण वृत्ती 'सोंऽहं' च्या चिंतनात गढून गेली.
- त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत झाली. ती जागी झाल्यावर त्रिकुट प्रदेशातील (त्रिगुणांवर आधारीत) मुलाधार चक्र व श्रीहाट प्रदेशातील (बुद्धी/ प्रज्ञा प्रदेश) स्वाधिष्ठान चक्र या अधोभागातील मार्गाचा भेद करून कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी झाली.
- ती उर्ध्वगामी झाल्यावर औटपीठ प्रदेशातील अनाहत चक्र, गिरीश्वेत प्रदेशातील विशुद्ध चक्र व भ्रमर गुंफेतील द्विदल आज्ञाचक्र यांचाही भेद करून सहस्त्रार चक्रातील गगन गर्भात (ब्रह्मात) लीन झाली.
- मूळ ओवीतील सेखी यापदाने पातंजल योगातील हा प्रवास सूचित केला आहे. चक्र व ॐकाराच्या साडेतीन मात्रा यांचा असा संबंध आहे.
- अ, ऊ, म या तीन मात्रा अन् अर्धचंद्र ही आर्धी मात्रा मिळून साडे तीन , मात्रांचा ॐकार होतो.
- मूलाधार - 'अ'
- स्वाधिष्ठान - अ
- मणिपूर - ऊ
- अनाहत - म
- विशुद्ध - म
- आज्ञा - अर्धमात्रा
- सहस्त्रदल - अर्धमात्रेवरील बिंदू
- ब्रह्मापासून गगन (आकाश तत्व) प्रथम निर्माण झाले असल्याने ब्रह्माला गगनगर्भ असे नाव मिळाले.
- १२
- उग्रतेज लखलखाट । तेथें जाला चौदेहाचा आट ।
- भ्रांति पडली बळकट । तेव्हा बाळ निचेष्टीत पडे ॥ १२ ॥
- भावार्थ -
- आज्ञाचक्राला अग्नितत्वाचे चक्र म्हणतात. म्हणून ते कृतीशील आहे. कुंडलिनी जेव्हा या आज्ञाचक्राचा भेद करून सहस्त्रदल चक्राकडे गेली तेव्हा अग्नीतत्वाच्या अग्नीच्या उग्रतेचा लखलखाट कल्याण स्वामींच्या अनुभवाला आला. त्यांना या टप्प्यावर अनेक सुर्यांचा प्रकाश दिसला.
- पुढे कुंडलिनी सहस्त्रदल चक्रात गेली असता त्या चक्राचा ज्ञानाग्नी हा उन्मनी अवस्थेमध्ये असल्याने स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारही देहांचा या टप्प्यावर निरास होतो. या चारही देहांचा कल्याणस्वामींना या टप्प्यावर निरास झाला. ते देहातीत झाले. याच अवस्थेला पातंजल योगाने 'बळकट भ्रांती' असे म्हटले आहे. भ्रम या अर्थाने येथे भ्रांती हा शब्द वापरलेला नाही. या अवस्थेचा परिणाम म्हणून कल्याणस्वामी निश्चेष्ट झाले. त्यांना या सहस्त्रदल चक्राची उन्मनी अवस्था प्राप्त झाली. विज्ञान हा या चक्राचा देह असल्याने ते चक्र कुंडलिनीने पार करताच कल्याण स्वामींना या ठिकाणी विज्ञान प्राप्त झाले. ही नंतरची व शेवटची स्थिती आहे. [१२]
- १३
- ऐसे पाहोनि सद्गुरुनाथ । पद्महस्त मस्तकीं ठेवित ।
- वत्सा सावध त्वरित । निजरूप पहा आपुले ॥ १३ ॥
- भावार्थ :-
- शिष्योत्तम कल्याण स्वामी निश्चेष्ट जमिनीवर पडलेले होते. कल्याण स्वामी याच अवस्थेत पडून राहणे योग्य नाही हे समर्थांना ज्ञात होते. कल्याण स्वामींनी याच अवस्थेला सर्वोत्तम अवस्था समजू नये म्हणून समर्थ रामदासांनी या सत् शिष्याच्या मस्तकावर हात ठेवला. समर्थ म्हणाले,
- " रे बाळा, चांगला जागा हो. असा निश्चेष्ट पडू नकोस. आता सावध होऊन स्वरूपाचा अनुभव घे. या निश्चेष्ट अवस्थेत गर्क होऊ नकोस. सावध हो. ते पहा तुझे स्वरूप तुला दिसू लागेल.
- आत्ता जो अनुभव आला तो शक्तिपाताने मी तुला दिला. तो तात्कालिक अनुभव आहे. तो पुर्णानुभव नाही. तो अनुभव स्थिर होऊन त्याचे पूर्ण ज्ञानात रूपांतर होण्यासाठी तू आत्ता सावधानतेने पुढील साधना करणे फार फार आवश्यक आहे. "
- १४
- जागृत करोनि ते वेळीं । अजपाची दोरी देऊनि जवळी ।
- विहंगम डोल्हारी तयेवेळीं । अलक्ष्य लक्षीं बैसविलें ॥ १४ ॥
- भावार्थ :-
- या वेळी समर्थांनी कल्याण स्वामींना पूर्णपणे जागे करून पुन्हा सावधान केले व त्याला 'सोऽहं'चा अजपा जप करण्यास सांगितले. नेहमीच्या जपाला जपमाळ लागते. येथे नुसतीच दोरी आहे. त्यात मणी नाहीत. म्हणजे जपसंख्या निश्चित असल्याने मोजण्याची गरजच नाही !
- अजपा हा श्वासावर बसविलेला जप आहे. श्वास व उच्छवास प्रतिक्षिप्त क्रियेने (Reflex Action) चालतो. त्यांची संख्या एका मिनीटाला १५. एका तासाला ९००. व २४ तासांना २१, ६०० इतकी आहे. हे सर्व दासबोधात सांगितले आहे. श्वास आत घेताना 'सो' व बाहेर सोडताना 'हम्' असा नाद निसर्गताच होतो.
- अंत:करण वृत्ती या श्वासामध्ये स्थिर करून वृत्तीने कुठलेच अनुसंधान न ठेवावे. सोहं चा हा अजपाजप फार श्रेष्ठ दर्जाचा आहे.
- सोहंच्या साधनेने पूर्णब्रह्माला लक्ष करावे. अंत:करण वृत्ती अजपाद्वारा ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी शिष्य प्रमाद शुन्य असला पाहिजे हे समर्थांना उत्तमपणे ज्ञात होते. मद, उर्मी, विकार यांचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय अजपाचे साधन ब्रह्मावर केंद्रित होणार नाही. अशी साधना करण्यासाठी समर्थांनी कल्याण स्वामींकडून पुढील पूर्वतयारी करून घेतली. [१४]
- १५
- धैर्याचें आसन बळकट । आणि इंद्रियें ओढूनि सघट ।
- धरे उर्ध्वपंथे वाट नीट । अढळपदीं लक्ष लावी ॥ १५ ॥
- भावार्थ :-
- साधनेचे सातत्य सांभाळण्यासाठी धैर्याची फार गरज असते. धैर्य कमी पडल्यामुळे कित्येकांची साधने मोडतात. पूर्वतयारीचा अभाव निश्चयाची उणीव, भयभीत करणारे अनुभव, रजतमांचा प्रभाव,इ. अनेक कारणांनी धैर्य कमी पडते. म्हणून धैर्यबैठकीचे महत्व लक्षात घेऊन समर्थांनी (बद्धासन, बद्धपद्मासन इ. आसनांचा उल्लेख न करता) धैर्याच्या आसनाचा उल्लेख केला आहे. असे धैर्यासन घालून पुढे समर्थ कल्याण स्वामींना सर्व इंद्रियांचे सर्व व्यापार पूर्णपणे थांबविण्यास सांगतात.
- समर्थ येथे कल्याण स्वामींना सांगतात की, " सर्व इंद्रियांना आवरून (अकरव्या ओवीत पाहिल्याप्रमाणे) तू कुंडली ऊर्ध्वमार्गाने ने. त्या मार्गाचा आत्ताच तू चांगला अनुभव घेतला आहेस. त्या अनुभवाच्या अनुक्रमावर नीट लक्ष ठेऊन जीव व आत्मा यांचे ऐक्य झाल्यानंतरची जी अवस्थारहीत अवस्था (अढळपद) ! त्या अवस्थेच्या अनुसंधानात रहा. ध्यानाभ्यास करणार्या सूक्ष्म बुद्धिवृत्तीला त्या अढळपदाच्या अलीकडे म्हणजे मागे येऊ देऊ नकोस. त्या अढळपदापाशीच आता एकाग्र हो."
- १६
- पुढें करोनिया जाणीव । मागे सारोनि नेणिव ।
- जे जे जाणीव अभिनव । तें तूं नव्हेसि तत्वता ॥ १६ ॥
- भावार्थ :-
- येथे ध्यानाभ्यास करणार्या सूक्ष्म बुद्धीवृत्तीला समर्थांनी 'जाणीव' असे म्हटले आहे. कारण खर्या धारणा ध्यानाच्या शांत लयीमध्ये देह, देश, कालादि सापेक्ष स्थूल बुद्धीवृत्ती उरत नाही. या जाणीवांना या टप्प्यावर जागाच नाही. सूक्ष्म बुद्धीवृत्ती अजपा जपाचे अनुसंधान करीत असता अचानक तिला नेणीवेचा म्हणजेच शुन्याचा अनुभव येतो.
- या नेणीवेलाही समर्थ या टप्प्यावर मागे सारावयास सांगतात. म्हणजे नेणिवेचा प्रांत लागताच 'ही नेणीव आहे' असा बोध त्या वृत्तीला स्पष्टपणे झाला पाहिजे. त्या वृत्तीने नेणीवेचे प्रकाशन केले पाहिजे.
- 'नेणिवेचा प्रकाशक मी आहे' 'सोहं' अशा निश्चयाने पुन्हा अजपाजपाशी त्या वृत्तीने स्वत:ला बांधून घेतले पाहिजे. कदाचीत असे पुन्हा पुन्हा करावे लागेल.
- असा अभ्यास सातत्याने चालू राहिल्यावर जे जे अनुभव येतील ते सर्व तुझ्या स्वरूपाहून भिन्न असतील, मिथ्या असतील. या अनुभवांच्या प्रभावामुळे सुख - भयादी विकार मुळीच होता कामा नयेत.
- कारण काही अनुभव सुखप्रद, काही आश्चर्यकारक तर काही भयप्रदही असतील. हे सर्व अनुभव घेताना, अभ्यास करणार्या सूक्ष्म बुद्धीवृत्तीने अखंड सावधान राहून ते अनुभव म्हणजे 'अढळपद' नाही असा निश्चय सतत सांभाळला पाहिजे. [१६]
- आता अग्रीं लक्ष लावी । काय दिसेल तें न्याहाळी ।
- चंद्रज्योति प्रकाशली । व्यूह बांधिला बळकट ॥ १८ ॥
- समर्थ पुढे म्हणतात, "आता तू अभ्यास करणार्या सूक्ष्म बुद्धी - वृत्तीने एकाग्र होऊन या अग्राच्या अनुसंधानात राहिले असता काय दिसते ते नीट पाहा. आता या टप्प्यावर तुला चंद्राचा प्रकाश दिसतो आहे. तुझी अभ्यास करणारी सूक्ष्म अंत:करणवृत्ती व चंद्रप्रकाश या दोन्हींच्या बळकट व्यूहरचनेशिवाय, अन्य काहीच विचार असू नये."
- व्यूह म्हणजे रचना. साधकाच्या साधनरचनेत चंद्रप्रकाश व वृत्ती या खेरीज कोणताच विचारतरंग उमटू नये. त्याच रचनेला घट्ट धरून बसावे. वृत्ती चंद्रप्रकाशकार व्हावी. अर्धचंद्र हे स्वाधिष्ठानचक्राचे यंत्र आहे, तर पूर्णचंद्र हे आज्ञाचक्राचे यंत्र आहे. मधल्या विशुद्ध चक्राचे केवळ गोलाकार हे यंत्र आहे. म्हणजे अर्धचंद्र, पूर्णचंद्र सूचक वर्तूळ व पूर्णचंद्र अशा क्रमाने यंत्राचा विकास झाला आहे.
- १९, २०, २१, २२
- तें सुख अंतरी घेऊनि । पुढें चाल करी संगमीं ।
- तेथें विजु ऐशा कामिनी । चमकताती सुवर्ण रंग ॥ १९ ॥
- तेहि जाणोनि मागें सारी । पुढें सूर्यबिंब अवधारी ।
- ज्वाळा निघती परोपरी । डंडळू नको कल्पांती ॥ २० ॥
- वायोमुख करोनि तेथें । गिळी वेगें सूर्यकिरणातें ।
- मग देखसी आनंदमार्तंडातें । तेजोमय मम पुत्रा ॥ २१ ॥
- अनंतभानुतेज अद्भुत । खादिरांगार ज्वाळा उसळत ।
- धारिष्ठ तेथें न निभत । दुर्घट व्यूह तेथींचा ॥ २२ ॥
- भावार्थ :-
- या चार ओव्यांच्या गटामध्ये, अग्निस्वरूप व अग्नीबीज मणिपूर चक्रापर्यंत अंत:करणवृत्तीने कसे प्रवास करते त्याचे विलक्षण वर्णन समर्थांनी केलेले आहे. या टप्प्यावर कल्याण स्वामी पोहोचल्यावर समर्थ पुढे म्हणतात,
- "चंद्राच्या शीतल प्रकाशाशी एकरूप झालेल्या अंत:करणवृत्तीला सुखाचा अनुभव येतो. त्या सुखाच्या अनुसंधानात राहून त्या वृत्तीने, त्या सुखाच्या समागमे पुढील चक्रावर ध्यान केंद्रीत करावे. त्यावर संयम करावा. या मणिपूरचक्राचे अग्नी (तेज) हे तत्व असून त्याचा रंग लाल आहे. त्यामुळे त्यावर अंत:करणवृत्ती जडताच अग्निसुचक अनुभव येऊ लागतील. प्रथम आपल्या सौंदर्य व वस्त्रप्रावरणाने झळकणार्या तरूणी प्रमाणे सोन्याच्या रंगासारख्या विजा चमकू लागतील. त्यांच्यावर तू क्षणभर लक्ष केंद्रीत कर.
- परंतु त्याच्या मोहपाशात न पडता नंतर त्यांच्यावरील लक्ष काढून घे व त्या संपूर्ण चक्रावर ध्यान कर. आता तुला तळपणारा सूर्य दिसतो आहे. त्यातून भयानक ज्वाळा बाहेर निघताहेत. हा अनुभव कितीही भयानक वाटला तरी तू आपली बैठक विचलीत होऊ देऊ नकोस. ध्यान करणार्या सूक्ष्म अंत:करण वृत्तीने अग्नीतत्वाचा वायुतत्वामध्ये लय कर. या झळकणार्या ज्वाळा वायूत बंदिस्त केल्यावर जे सूर्यबिंब दिसते आहे ते आता तेजस्वी असले तरी पूर्वीच्या अनुभवाइतके खास दाहक नाही. उलट त्याच्या दर्शनाने अद्भूत आनंदाचा अनुभव येतो. मात्र असे दर्शन होण्यापूर्वी अनंत सुर्याच्या तेजाचा डोळे दिपविणारा प्रकाश व अत्यंत दाहक अशा अग्निच्या ज्वाळा तुझ्या धैर्याच्या अतुलनीयतेची कसोटी पाहतील."
- {१९, २०, २१, २२}
- २३
- तेथें हुशारीचे काम । अग्रीं लक्ष लावोनि नेम ।
- तीरें लावोनि सुगम । मागें सारी सुर्यातें ॥ २३ ॥
- भावार्थ :-
- समर्थ या ठिकाणी कल्याण स्वामींना अतिशय सावधपूर्वक सांगतात, " रे कल्याणा, आता या टप्प्यावर तू यत्नपूर्वक आला आहेस, पण सावधान बर ! अतिशय हुशारीने येथे व्यूह सांभाळावा लागतो. अखंड सावधानता, अतुलनिय धैर्य, महामेरू पर्वताप्रमाणे निश्चय व साधन प्रक्रियेचे परिपूर्ण भान या सर्व बाबींचा हुशारीत समावेश होतो. येथे तू साधना करणार्या सूक्ष्म अंत:करण वृत्तीला जराही मागे वळू देऊ नकोस.
- येत असलेला अनुभव, त्या अनुभवाचे पृथक्करण, तो अनुभव मागे टाकून पुढील प्रक्रियेची वाटचाल, एवढ्यामध्येच वृत्ती ठेवावी ! मागे घडून गेलेल्या अनुभवांमध्ये या वृत्तीला रमू देऊ नये. अशी ती वृत्ती नीट जम बसवून घ्यावी व पूढील प्रवासा साठी तिला सज्ज करावे. कारण अढळपद अजून दूरच आहे.
- अशा सुसज्ज वृत्तीनीशी मोठ्या धैर्याने जणू शरसंधान करून त्या सुर्याला मागे टाकावे. सूर्याच्या अंशाची कल्पना करून एका एका वृत्तीबाणाने एक एक अंश उडवून लावावा. सूर्याचे पूर्ण ग्रहण जसे क्रमाक्रमाने सूर्याच्या अंशांना गिळीत जाते त्याप्रमाणे त्या भयंकर दिसणार्या सूर्याला अंश अंशाने उडवून द्यावे. असे अचूक शरसंधान करून अखंड करून सूर्याला मागे टाकून वृत्तीला अजून पुढे न्यावे. हे सर्व महाकठीण आहे. पण, 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्वभूमंडळी कोण आहे ?' असा तूझा रामदासी बाणा आहे. त्यामुळे हे रोमांचकारी अनुभव घे, आणि पूढील अनुभव घेण्यास सिद्ध हो !" [२३]
- २४, २५
- पुढें दिसेल जे नवल । ते पाही हंसमेळ ।
- चंद्रकिरण शीतल । पाहसी तूं मम वत्सा ॥ २४ ॥
- तेव्हा मागील दाह शमेल । शीतळाई सर्वांग होईल ।
- चंद्राची प्रभा सुढाळ । फडफडीत चांदणे ॥ २५ ॥
- भावार्थ :-
- समर्थ पुढे सांगतात, " अंत:करण वृत्तीने पुढे सहस्त्रार (सहस्त्रदल) चक्राकडे झेप घ्यावयाची आहे. तेव्हा मोठे आश्चर्यकारक दृष्य दिसेल. आतापर्यंत अनुभवलेली सूर्याची व त्याच्या ज्वाळांची दाहकता पूर्णपणे नाहिशी होईल. आश्चर्य वाटण्याचे कारण असे की ही भयानक उष्णता व प्रकाश दूर होणे शक्य नाही, अशी आतापर्यंत आपल्या वृत्तीची खात्री झालेली असते. परंतु प्रत्यक्षात तसे घडल्यामुळे विलक्षण नवल वाटते. हा दाह शमल्याने तुला त्या चंद्रप्रकाशाची शीतलता पुन्हा अनुभवाला येईल. तो चंद्रप्रकाश हंसाप्रमाणे पांढरा स्वच्छ असेल. (हंसमेळ - हंसाच्या वर्णाशी ज्याचा मेळ बसतो, तुलना होऊ शकते असा). सहस्त्रदल चक्राची "प्रकाश-श्री" ही शक्ती असून "ज्ञानाग्नी" हा अग्नी आहे. त्यांचाही वर्ण शुभ्र (पांढरा नव्हे) असल्याने हे चंद्रकिरण तसेच राहतात. त्यांच्या शीतलतेत फरक पडत नाही. याचमूळे तुझ्या अंगाचा झालेला दाह शमून तुझे सर्वांग शीतल होईल. तुझी अंत:करणवृत्ती पुन्हा लख्ख चांदीण्याने भरून जाईल. ती शुभ्र ज्योत्सेनेने पुलकीत झालेली वृत्ती तशीच सांभाळून ठेव." { २४, २५ }
- २६
- तेचि डोळियाचा डोळा पाही । देहातीत वर्म विदेही ।
- चिन्मय सुखाची बवाई । भोगी आपुलें की गा ॥ २६ ॥
- समर्थ पुढे सांगतात, "सहस्त्रार चक्रामध्ये श्री चक्राची भावना विलीन करावी लागते. श्री चक्रातील त्रिकोणात मध्यभागी एक बिंदू आहे. त्यावर आता वृत्ती केंद्रीत कर. हाच तो 'डोळ्याचा डोळा' ! या बिंदूवर लक्ष केंद्रित करून राहिले असता, स्थूल सुक्ष्मादी चारी देहांचा विसर पडतो. विदेही अवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव येतो. ज्ञानस्वरूप आत्म्याशी अंत:करण वृत्ती एकरूप झाल्याने आत्मसुखाच्या खोल पाण्यात ( बवाई = बावी = पाण्याने भरलेली खोल विहीर) ती बुडून वाहते. ज्ञानाकार होते. आता या खर्या ज्ञानाचा तुझा तू भोग घे. तुझेच स्वरूप तू भोग." [२६]
- २७
- अनुभवाची शीग भरली । आग्रापरी उसळली ।
- भूमंडळी प्रभा पडली । कर्पुरवर्ण नभ जाहलें ॥ २७ ॥
- भावार्थ :-
- समर्थ कल्याणस्वामींना म्हणतात, " ही अनुभवाची परिसीमा आहे. हा अनुभव आता परिपूर्ण झाला आहे. लौकिक अर्थाने ज्याला अनुभव म्हणता येणार नाही असा हा अनुभव आहे. जेथे अनुभव घेऊ पहाणारा त्या अनुभवात बुडून जातो. अनुभवाला आलेल्या 'फडफडीत' चांदण्याने जणू पृथ्वी व आकाश कापुरासारख्या वर्णाने भरोन गेले. तो एकच वर्ण कसा सर्वत्र भरून राहिला आहे बघ !"
- २८
- तया मध्यभागीं सघन । अढळपद दैदिप्यमान ।
- उर्वरित ब्रह्म जाण । ध्रुव बैसला आढळ तें ॥ २८ ॥
- भावार्थ :-
- येथे मध्य भाग या शब्दाचा केंद्रभाग असा अर्थ नसून 'मध्यभाग' म्हणजे पोटात असलेला किंवा तद्रूप झालेला असा अर्थ आहे. ब्रह्म निरवयव व निराकार असल्याने त्याला मध्यभाग संभवत नाही.
- हे ब्रह्म सघन म्हणजे घनदाट रूप. मनाच्या श्लोकात वर्णिलेले 'अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे' हे रूप !
- ज्या अढळपदावर भक्त धृव बसला ते ब्रह्मांडातील धृवतार्या सारखे अढळ स्थान कल्याण स्वामींना लाभले. कल्याण स्वामींचे स्वरूप आता मनाच्या श्लोकांत वर्णन केल्या प्रमाणे, " फुटेना तुटेना चळेना ढळेना' या प्रमाणे अढळपदी जावून बसले. [२८]
- २९
- ते तुझे स्वरूप नेटें वोटें । जेथें समस्त जाणणें आटे ।
- ऐकें जालासी थिटें । बळकटपण बलाढ्य ॥ २९ ॥
- भावार्थ :-
- समर्थ पुढे म्हणतात, " नेटाने बोट लावले तरी जे ढळत नाही असे ते तुझे स्वरूप आहे. त्याचा तुला आता अनुभव आलेला आहे. तो अनुभवही आता ढळणार नाही. 'जाणणे' म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून मनाच्या साह्याने जीवाला किंवा परमात्म्याला होणारे ज्ञान. अशा होणार्या ज्ञानाला सविषय व सविशेष ज्ञान असे म्हणतात. निर्विषय व निर्विशेष अत्म्याच्या सत्तेवर असे ज्ञान होते.
- आता तुला जो ज्ञानाचा अनुभव आलेला आहे तो निर्विषय व निर्विशेष ज्ञानस्वरूप आत्म्याचा आहे. त्या अनुभवात बुडून गेलेल्याला कशाचेही व कोणाचेही ज्ञान होत नाही. हा या अनुभवासंबंधी अनुभवी आत्मवेत्त्यांचा निश्चित (नेमस्त) अनुभव आहे. ' मला अनुभव आला' असे जो म्हणतो त्याला तो आलेला नसतो. 'मी आता ज्ञानसंपन्न झालो' असे ज्याला वाटते त्याच्यामध्ये तसे वाटणे हीच उणीव आहे.
- हे कल्याणा, तुला आता तुझ्या धैर्यामुळे (धिटे) सात्विक वृत्तीच्या बळाने ती अवस्था बळकटपणे लाभलेली आहे. त्या स्थितीतून तू आता जाग्रतावस्थेत आलास तरी मागे फिरणार नाहीस." [२९]
- ३०
- ऐसे सुख योगिया लाधलें । तेव्हा देहाचे मरण गेलें ।
- सांगणे ऐकणें मुरालें । एकत्वपणें एकचि ॥ ३० ॥
- भावार्थ :-
- कल्याण स्वामींना आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर, अढळपद प्राप्त झालेल्या अवस्थेनंतर, साधकाचे सिद्धावस्थेत रूपांतर झाले. या पूढील ओव्यांमध्ये सिद्ध व्यक्ति संतपदास पोचताच त्यांना कोणती फलप्राप्ती होते त्याचे अतिशय सुंदर विश्लेषण दिलेले आहे.
- आत्मा जसा ज्ञानरूप आहे तसा तो आनंदरूपही आहे. त्यामुळे आत्मज्ञानातच आत्मसुखाचाही समावेश आहे. 'संतुष्ट सततं योगी' हा त्याचा परिणाम आहे. असा ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच होतो. जन्म मरणाच्या ८४ लक्ष योनीतून कायमचा मुक्त होतो. जीवन्मुक्ताला साधनेचे तत्वज्ञान सांगावे लागत नाही. सांगण्याचा जो विषय तो आत्मा व ऐकण्याचा विषय तोच आत्मा यांचे अनुभवात ऐक्य झाल्याने सांगणे ऐकणे दुरावते. त्या स्वरूपाचा 'बळकट' अनुभव आल्यावर अंतरात्म्याला सांगण्या ऐकण्याचे कारणच काय ? [३०]
- ३१
- शांति येवोनि माळ घाली । अलक्ष्यसेजे निजेली ।
- हंसपदें ऐक्य जाली । सुख सुखातें निमग्न ॥ ३१ ॥
- पराशांती हा जीवन्मुक्ताचा फार मोठा अलंकार आहे. " मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे सन्त श्रीमंत ।" (दासबोध) असा मोक्षश्रीने नटलेल्या संतांचा हा थाटमाट आहे ! ही शांती मनाची समजूत घालून आणलेली नाही. कृत्रीमपणे पत्करलेली नाही. तर ब्रह्म शांत असल्यामुळे ब्रह्मानुभव येताच ती शान्ती आपण होऊन जीवन्मुक्त्तापाशी अखंड राहते, अशा सिद्धाला माळ घालते.
- 'अलक्ष्य' म्हणजे पांच ज्ञानेंद्रिये व मनाने ज्याचा वेध घेता येत नाही असे ब्रह्म. या अलक्ष्यरूप गादीवर कोण झोपली ? येथे अंत:करण वृत्ती झोपली असा अध्याहार घ्यावा लागतो. अलक्ष्य ब्रह्मात अंत:करणवृत्ती 'मुराली' असता ती ब्रह्मरूप होते. शांती त्या गादीवर झोपली असे म्हणणे सुसंगत नाही. त्या अंत:करण वृत्तीने सोऽहं जपाचा ध्यास घेतला असता ती 'स:' शी एकरूपता झाल्याने पुढे 'ह स:' असे म्हणू लागते ! 'सोहं' चे 'हंस:' मध्ये रूपांतर होते. तत्वत: एकरूप असलेला जीव व ब्रह्म यांत उपाधीमुळे जो वेगळेपणा झाला होता तो नाहीसा झाला. सुखी होऊ पाहणारा, सुखासाठी धडपडणारा जीव सुखरूप झाला. केवळ अज्ञानामुळे दु:खात असणारा जीव आता मात्र सुखात निमग्न झाला. [३१]
- ३२
- तेथील अनुभव घेऊनि । स्वानुभव पाहे कलटुनि ।
- आला मार्ग ते क्षणीं । दिसेनासा जाला की ॥ ३२ ॥
- हा आलेला अनुभव लक्षात घेऊन, त्याच मार्गाने जर मागे जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याक्षणी ज्या साधनाक्रमाने सिद्ध हे अनुभवापर्यंत पोहोचलेले असतात, तो साधनाक्रम (मार्ग) पूर्णपणे पुसून गेलेला दिसतो. कारण साधना ही कृत्रीम/ तात्कालीक असते. ब्रह्मानुभव अकृत्रीम व कायमचा असतो, सद्गुरूने बसवून दिलेली साधना अंत:करण वृत्तीला ती आत्माकार होईपर्यंत मदत करते. ती एकदा आत्माकार झाली व आत्मरूप झाली की स्वयंप्रकाश अकृत्रीम आत्मस्वरूपात हरवून जातो. [३२]
- ३३
- त्रिकुट श्रीहाट गोल्हाट । बुडाले ते औटपीट ।
- इडा- पिंगळा - सुषुम्नातट । विराले ते स्वात्मसुखें ॥ ३३ ॥
- अकराव्या ओवीत ज्या योगमार्गाच्या खास संकल्पनाचा विचार केला त्या सर्व जागच्या जागीच विरून गेल्या, बुडाल्या. कुंडलिनी जागृत होताना ती शक्ति सुषुम्ना नाडीच्या जणू नदीतून वर जात होती. ज्ञान झाल्यानंतर तिच्या जागृतीचे व गतीचे कारणच न उरल्याने तिचे दोन्ही काठ (तट) विरून गेले. तिच्या माध्यमाची गरजच उरली नाही. आत्मज्ञानाचा परिणाम म्हणून अनुभवलेल्या आत्मसुखात त्यांच्या साधनकाली असलेल्या अस्तित्वाची जाणीव नष्ट झाली, विरून गेली. [३३]
- ३४
- स्थूळ सूक्ष्म कारण । नेणों काय जालें महाकारण ।
- इंद्रियें चुबकली जाण । धाव मोडली तयांची ॥ ३४ ॥
- वेदान्तशास्त्राच्या प्रक्रिया ग्रंथातून देहाच्या चार घटकांची किंवा चार देहांची संकल्पना साधकाच्या सोयीसाठी केलेली आहे. ध्यानाभ्यासात एक एक देह किंवा कोश मागे टाकीत अंत:करण वृत्तीने आत्माकार व्हावे अशी त्यात व्यवस्था आहे. वृत्ती आत्माकार झाल्यावर ही व्यवस्था त्या साधकाच्या दृष्टीने निरर्थक ठरते. सुखासाठी विषयचिंतन करणारे मन व ते मन ज्या इंद्रियांवाटे कर्मेंद्रियांच्या साह्याने सुख भोगू पाहते त्या इंद्रियांच्या सर्व हालचाली थांबून जातात. [३४]
- ३५
- पंचभूतांचे खवले । तयांचे ठावची पुसले ।
- अपरिमित आनंदले। निमग्न जाले सुखांत ॥ ३५ ॥
- माशाला खवले असतात. प्रत्यक्ष त्वचेपासून ते बाहेर आलेले असतात. त्याच प्रमाणे आत्मस्वरूप ब्रह्मचैतन्याचा व देहाचा संबंध असतो. खवले जसे त्वचेबाहेर असतात तसा देह आत्म्याला उपाधीरूप असतो. ती उपाधी बाधीत झाली. विषयसुख परिमित म्हणजे कालदृष्टीने अतिमर्यादित असते. आत्मसुख अखंड असते. [३५]
- ३६
- सखोल भूमी ऐसें जाले । सुख सुखासि घोटलें ।
- स्वयें आत्मत्व प्रगटलें । माझे देहि रोकडें ॥ ३६ ॥
- भावार्थ :-
- आता कल्याण स्वामी आपला अनुभव सांगत आहेत, "चिन्मय सुखाच्या बवाईच्या (ओवी २६) अनुभवामुळे सुखाने जणू सुखाचा घोट घेतला आहे. सुखाने सुखात विश्रांती घेतली. सुख सुखी झाले. या आनंदाच्या अनुभवाच्या रूपाने माझ्या शरीरात प्रत्यक्ष आत्माच प्रगट झाला."
- ३७
- मग सहज समाधी जिरवून । शिष्ट उठला घाबरा होऊन ।
- हे सद्गुरू देणे (वरदान) । काय उत्तीर्ण म्या व्हावें ॥ ३७ ॥
- भावार्थ :-
- अशा दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनिय (पक्का, साक्षात व न बदलणारा) अनुभवातून उत्थान झाल्यानंतर शिष्याला त्या समाधीच्या अवस्थेतून नित्याच्या जाग्रतावस्थेत येणे झाले. जाग येताक्षणी कल्याण स्वामींची कृतज्ञता बुद्धी उफाळून वर आली. ज्यांच्या अपूर्व, समर्थ व सार्थ कृपेमुळे हा जन्मजन्मांतरीच्या पुण्याईने, तपाने व साधनाने प्राप्त होणारा अनुभव आला, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास उशीर तर होत नाही ना या कल्पनेने ते घाबरेघुबरे झाले. हे देणेच असे आहे की त्यातून उतराई होण्यासाठी शिष्याने दिलेले कोणतेही लौकिकातील देणे पुरे पडत नाही. [३७]
- ३८
- जरी स्तुती तयाची करावी । माझी मती नाही बरवी ।
- अनिर्वाच्य गती बोलावी । परा वाचा कुंठित ॥ ३८ ॥
- भावार्थ :-
- कल्याणस्वामी म्हणाले, " सद्गुरूंची स्तुती करण्यासाठी योग्य शब्द सुचतील म्हणावे तर तसे शब्दभांडार माझ्यापाशी नाही. म्हणून योग्य शब्दांनी सद्गुरूस्तवन गाण्याइतकी माझी बुद्धी नाही. सद्गुरूंच्या तात्विक स्वरूपाची (एकं, नित्यं, विमलम्, अचलम् इ.इ.) स्तुती करावी तर ते स्वरूप परावाणीच्याहि पलीकडचे आहे. [३८]
- ३९
- आता जी मी लडिवाळपणें । तुमचे कृपें करितो स्तवन ।
- सूर्यापुढें खद्योत जाण । तैशापरी बोल हे ॥ ३९ ॥
- भावार्थ :-
- कल्याण स्वामी पुढे म्हणतात, " आपण सद्गुरू माऊली आहात. मी आपले लेकरू आहे. आपल्या असीम कृपेच्या बळावर मी सद्गुरूस्तवन लडीवाळपणे करणार आहे. पण खरे सांगु का ? सद्गुरूमाऊली, सुर्यापुढे काजवा जसा फिका पडतो, तसे हे शब्द आपल्या स्वरूपा समोर दुर्बळ आहेत." [३९ ]
- ४०
- जयजयाजी करूणा सिंधू । जयजयाजी भवरोग - वैदु ।
- जयजयाजी बाळ बोधु । कृपाघना समर्था ॥ ४० ॥
- अर्थ :-
- कल्याण स्वामी म्हणतात, " सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज, आपला जयजयकार असो. आपण करूणासागर आहात. या जुनाट अविद्या - मायारूपी भवरोगावर उत्तम इलाज करणारे निष्णात वैद्य आहात. माझ्यासारख्या अनाधिकारी शिष्याला सुद्धा (ही विनयाने व्यक्त झालेली भावना आहे, वस्तुस्थिती नव्हे) बोध करण्याचे सामर्थ्य असलेले आपण कृपारूप मेघ आहात. वैराण वाळवंटाकडे मेघ वळत नाहीत. गर्द झाडी व उंची असेल तिकडे वळतात. पण मी वैराण वाळवंटासारखा असूनही आपण माझ्यावर कृपावर्षाव केलात." [४०]
- ४१
- जयजयाजी अविनाशा । जयजयाजी परेशा ।
- जयजयाजी अध्यक्षा । दयार्णवा ॥ ४१ ॥
- "आपण प्रत्यक्ष ब्रह्म आहात. निरवयव व निर्विकार असल्याने अविनाशी आहात. सृष्टीच्या कल्पित बंधनातून सोडविणारे दयावन्त आपणच आहात. अशा सद्गुरूमाऊलीचा जयजयकार !" [४१]
- ४२
- जयजयाजी पूर्णचंद्रा । जयजयाजी अलक्ष्यविहारा ।
- जयजयाजी भवसिंधु भास्करा । आनंदप्रभु ॥ ४२ ॥
- "पूर्णचंद्राला - पौर्णिमेच्या चंद्राला - कला नसतात. तो पूर्णप्रकाशमान असतो. ब्रह्मरूप असलेले आपण निराकार, निरवयव आहात. ब्रह्म अलक्ष आहे. म्हणजे ते ५ ज्ञानेंद्रिये, मन यातील कोणत्याच साधनाने जाणले जात नाही. ते स्वसंवेद्य आहे. त्या ब्रह्माशी आपण एकरूप होऊन, ब्रह्मच होऊन जीवनमुक्तिचा विहार करीत आहात. भवसागर कितीही मोठा व खोल असला तरी त्यातील मायाजळ क्षणार्धात आटवून टाकणारे आपण तेजस्वी सूर्य आहात." [४२]
- ४३
- तुझी स्तुती करिता सांग । वेदस्तुति जाले अव्यंग ।
- तेथें प्राकृत मी काय । वर्णावया योग्य नव्हे ॥ ४३ ॥
- "प्रत्यक्ष वेदांनी सुद्धा तुमची परिपूर्ण स्तुती केली तेव्हा त्याच्यामधील अपुरेपणा जाऊन त्यांना पूर्णत्व आले. वेदांमध्ये कर्मकांड, उपासनाकांड, मंत्रतंत्रकांड (अथर्व वेद) अशी अंगे फार मोठया प्रमाणात सांगितली असली तरी त्यांनी तुमचे तत्व सांगणारे ज्ञान कांड (वेदान्त, उपनिषदे) सांगितल्यावरच त्यांना पूर्णता आली. या वेदांच्या ज्ञानकांडाच्या राजहंसापूढे मी तर केवळ कावळा आहे ! म्हणून माझ्याकडून तुमची पूर्ण स्तुती होणेच शक्य नाही !! तुमचा जयजयकार करणे एवढेच माझ्या हातात आहे." [४३]
- ४४
- कल्याण म्हणे जी रामदासा । माझा मुकेपणाचा ठसा ।
- ते मोडोनी वसोसा । मज आपणां ऐसें केलें ॥ ४४ ॥
- अखेर कल्याण स्वामी म्हणतात, " श्री समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराज, मी असा कावळा असल्यामुळे मे कायम मुकेपणा स्विकारला होता. अज्ञानाचा मी जणू वसाच (वसौसा) घेतला होता. तो वसा आपण मोडून टाकलात. माझ्या अंत:करणावरील अविद्याग्रंथीचा भेद करून मला ब्रह्मानुभवी केलेत. आपली स्थिती मला दिलीत." [44]
- ४५
- ऐकोनि मृदुवचन । कुरवाळिले तयालागून ।
- गुरूशिष्य हें बोलणे । उरले नाही ते वेळीं ॥ ४५ ॥
- अर्थ :-
- सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी कल्याणस्वामींचे हे नम्र कृतज्ञभावाने भरलेले व गोड बोलणे ऐकले आणि त्यांच्या सर्वांगावर मोठ्या कौतुकाने हात फिरविला. त्यांनी कल्याणस्वामींना मोठ्या कौतुकाने जवळ घेतले. त्याक्षणी त्यांच्यामधील गुरूशिष्याचे नाते ब्रह्मरूप झाले ! एकमेकाला सद्गुरू व सत् शिष्य म्हणण्यासाठी जे द्वैत लागते ते उरलेच नाही.[४५]
- ४६
- एकपणे एकचि जाले । ऐक्यरूपी सममिळाले ।
- करूनिया सुख उधळले । नाहीपण जाऊनी ॥ ४६ ॥
- समर्थ व कल्याण हे सद्गुरू व सत् शिष्य मुळचे जे ब्रह्मरूपाने एक होते ते पुन्हा जणू ऐक्य पावले. कल्याणाला अज्ञानामुळे द्वैताचा - भेदाचा -अनुभव येत होता. त्याचे ज्ञान सद्गुरूंनी दूर करताच त्या उभयतांना समत्व म्हणजे ब्रह्मत्व प्राप्त झाले. सद्गुरू आधीच ब्रह्मरूप होते. पण शिष्याशी ऐक्याच्या निमित्ताने त्यांनाही जणू पुन्हा ब्रह्मानुभव आला. समर्थांनी कल्याण स्वामींना उपदेश करण्याच्या निमित्ताने द्वैत पत्करले होते. द्वैतात सुखरूपता नाहिशी होते. कल्याणही सुखरूप झालेले नव्हते तोपर्यंत द्वैतातच होते. पण जेव्हा दोघे ब्रह्मस्वरूपानुभवात ऐक्य पावले तेव्हा सुखरूपत्व प्रकटले.{ ४६ }
- ४७
- सुगरिणीचा पाक जाहला । नभाभाजणी वाढिला ।
- अक्षयपदीं सुगरावला । संत जेवती स्वानंदे ॥ ४७ ॥
- अर्थ :-
- आकाश हे अती सुक्ष्म महाभूत ब्रह्माच्या सुक्ष्मतेच्या मानाने स्थूलच आहे. श्री समर्थरूप श्रीगुरूंनी ज्ञानरूप स्वयंपाक अतिशय चांगल्या रीतीने शिजवून शिष्यरूपी आकाश तत्वाला भोजनासाठी वाढला. कल्याण हे शिष्योत्तम ब्रह्मानुभूतीच्या अगदी शेवटच्या पायरीवर (आकाश) उभा होता. त्याला कृतार्थ करून त्या नभाला आकाशाला आधारभूत असलेल्या अक्षय अशा ब्रह्मपदावर नेऊन सोडले. कल्याणासाठी तयार केलेला हा स्वयंपाक अनेक साधकांना तृप्त करणारा आहे.
- ४८
- अनिर्वाच्य बोल बोलिले । साधकाचे उपेगा आले ।
- सिद्ध तरी डोलो लागले । बद्ध मुमुक्षु होताती ॥ ४८ ॥
- अर्थ :-
- वास्तविक जे तत्व केवळ अनुभवरूप आहे त्याविषयी काही सांगणे शक्य नाही. तरीही काही सांप्रदायिक शब्दसंकेताच्या सहाय्याने तेही सांगितले. शास्त्रकारांनी बसविलेल्या काही अनुभव-सिद्ध संकल्पना वापरून व त्यांचा स्वतः अनुभव घेऊन मांडणी केली. असे करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक साधकांना त्यामुळे मार्ग सापडतो. जे या मार्गाने जाऊन अनुभवाने सिद्ध झालेले आहेत त्यांना अशा मांडणीमुळे पुनःप्रत्ययाचा आनंद मिळून ते समाधानाने डोलू लागतात. त्यांची मान्यता मिळते. जे बद्ध आहेत त्यांनी हे 'सोलीव सुख' मनःपूर्वक वाचले व समजावून घेतले तर त्याची अत्यंत जिज्ञासा निर्माण होते. हा अनुभव येण्यासाठी कोणती पूर्वतयारी (अधिकार) करावी लागते याविषयी जबर कुतूहल वाटते व असे बद्ध 'सोलीव सुखाने' लाभणार्या मोक्षाची इच्छा करतात. ते मुमुक्षू होतात. हा फारच मोठा लाभ आहे.
- ४९
- यापरतें आन नाही बोलणें । श्रीराम दशरथाची आण ।
- एकपत्नी तो सुजाण । आपुले पद दे दासा ॥ ४९ ॥
- भावार्थ :-
- अखेर समर्थ म्हणतात ,"एकपत्नी असलेले दशरथ पुत्र सर्वज्ञ श्रीराम हे माझ्या सद्गुरूंचे सद्गुरू (हनुमंताचे सद्गुरू) आहेत. त्यांची शपथ घेऊन मी सांगतो की हे 'सोलीव सुख' सांगण्यात माझा दुसरा काहीच हेतु नाही."
- 'एक पत्नी' या पदाने सूचीत झालेले मर्यादापुरूषोत्तम व धर्मज्ञ श्रीराम साधकांना आचरणासाठी आदर्श आहेत त्यांच्या कृपेने समर्थांना कळलेले व समर्थांच्या कृपेने कल्याणस्वामींना अनुभवास आलेले हे 'सोलीव सुख' अखेरचा शब्द आहे. त्यापलीकडे सांगण्यासारखे काहीच नाही. [४९]
- Quote
- [~ ॐकार ~ Ψ 卐 Ψ]
- ~ ॐकार ~ Ψ 卐 Ψ - Aug 3, 2009
५०
- इति - श्रीदासबोध - ग्रंथ । त्यातील हा सोलीव अर्थ ।
- श्रोते ऐकता यथार्थ । समाधिस्त होती ॥ ५० ॥
- भावार्थ :-
- ग्रंथराज दासबोधाची जणू समाप्तीच केली जात आहे अशा थाटात ही समाप्ती केली आहे. 'श्री दासबोध ग्रंथाचे' तात्पर्य म्हणजे सोलीव सुख. हे बर्याच दासबोध भक्तांना मान्य होणे कठीण आहे ! पण कल्याण स्वामींना नेमके तेच सांगावयाचे आहे. कारण ब्रह्म सुखाची प्राप्ती हाच दासबोधाचा एकमेव हेतू आहे.
- अभ्यासकांना येथे एक प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तो म्हणजे दासबोधामध्ये तर नवविधा भक्तिचा सोपान दर्शविणारा भक्तिमार्गच सांगितला आहे. पण सोलिव सुखात योग मार्गाच्या खुणा दिसताहेत, हे कसे ? तर, त्याचे स्पष्टिकरण असे की, दासबोधात जे सांगितले आहे तो मार्ग शिरोधार्य मानून नवविध भक्तिमार्गाने सद्गुरूकृपा संपादित केली की पुढील अंतिम मार्ग दर्शविण्यास सद्गुरू समर्थ असतातच.
- वीस दशक दोनशे समास सांगून सुद्धा काहीतरी राहिले - राहिले असे वाटल्याने कल्याण स्वामींनी समर्थांकडे सोलीव सुखाची मागणी केली. आणि म्हणूनच आपल्या पदरात सोलीव सुखाची रचना लाभली. आत्माराम व सोलीव सुख या दोन्ही रचनांचा उगम दासबोधात आहे. तिन्ही ग्रंथांचे असे परस्पर नाते आहे. अभ्यासकांनी ते लक्षात घेऊन कृतार्थ व्हावे.
- नवविधा भक्तिचा दासबोधात दर्शविलेला सोपान कल्याणस्वामींनी यशस्वीरीत्या चढून सद्गुरूकृपा जिंकली व समर्थांकडून शक्तिपात दिक्षा केवळ मंत्राद्वारे संपादित केली. त्या करीता त्यांना इतर अगम्य व दुर्धर मार्ग धुंडाळीत बसावे लागले नाहीत.
- समर्थांनीच सांगितले आहे की,
- माझी काया आणि वाणी ।
- गेली म्हणाल अंत:करणी ।
- परी आहे मी जगजीवनी ।
- निरंतर ॥ १ ॥
- आत्माराम दासबोध ।
- माझे स्वरूप स्वत:सिद्ध ।
- असता न करावा खेद ।
- भक्तजनी ॥ २ ॥
- नका करू खटपट ।
- पाहा माझा ग्रंथ नीट ।
- तेणे सायुज्यमुक्तिची वाट ।
- गवसेल की ॥ ३ ॥
- त्यामुळे समर्थांच्याच आदेशानुसार दासबोधालाच त्यांचे स्वरूप जाणून उपासना केली पाहिजे. पैसा - प्रापंचिक सुख - सांसारीक अडचणींचे निराकरण असल्या फुटकळ गोष्टी न मागता, जसे कल्याण स्वामींनी सोलीव सुखाची याचना समर्थांकडे केली आणि समर्थांनीही ती याचना लडीवाळपणे पूर्ण केली, त्या प्रमाणे तुम्हा आम्हालाही अशी योग्यता अन् सद्भाग्य लाभो हीच सद्गुरूंकडे प्रार्थना करतो.
- समाप्त [५०]
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
[[]]
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.