साहित्यातील जीवनभाष्य/मूल्य संघर्ष

विकिस्रोत कडून




५ मूल्य संघर्ष



 मूल्य - महत्त्व मानवी जीवनात मूल्यांना फार महत्त्व असते. पूर्वीच्या काळी ते होते, आजही आहे व पुढेही ते तसेच राहील. मूल्यावाचून मानवी जीवन संभवतच नाही. जीव सर्वांना प्रिय असतो, पण स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे हजारो स्त्रीपुरुष इतिहासात होऊन गेलेले आपण पाहतो. स्वातंत्र्य या मूल्यापुढे प्राण हे मूल्य त्यांना तुच्छ वाटते. धर्म, सत्य, ही मूल्ये अशीच आहेत. पूर्वी 'तत्त्व' हा शब्द वापरीत. आता 'व्हॅल्यूज' या इंग्रजी शब्दावरून 'मूल्य' हा शब्द मराठीत रूढ झाला आहे. पण त्यातील भावार्थ जुनाच आहे. हा भावार्थ अत्यंत उच्च श्रेणीच्या समाजात जसा आढळतो तसाच अगदी रानटी समाजातही दिसून येतो. रानटी माणसाच्या मनातही देव कल्पना असतेच. आणि काही सुखे त्यासाठी टाकली पाहिजेत हा विचार त्या समाजातही रूढ झालेला दिसतो. समाजरक्षणासाठी, त्याच्या संवर्धनासाठी वेळोवेळी समाजधुरीणांनी अनेकविध मूल्ये स्थापन केलेली असतात आणि समान त्यांना प्रमाण मानून त्यांची जपणूक करीत असतो. अहिंसा, पातिव्रत्य, राष्ट्रप्रेम, समता, भूतदया, दिलेला शब्द, केलेली प्रतिज्ञा ही सर्व अशीच तत्त्वे किंवा मूल्ये आहेत. या मूल्यांवरील भक्ती इतकी सर्वव्यापी आहे की, मानवी इतिहास म्हणजे मूल्यांचा इतिहास म्हटले तरी चालेल.
 मूल्य संघर्ष अनेक वेळा दोन भिन्न मूल्यांचा व्यक्तीच्या जीवनात संघर्ष होऊन कोणत्या मूल्याचा आदर करावा हे तिला कळेनासे होते. लो. टिळकांनी गीता रहस्यात कर्म जिज्ञासा या प्रकरणात सत्य, अहिंसा, सर्वभूतहित इ. सर्वमान्य वाटत असलेल्या तत्त्वांनाही धर्मशास्त्रज्ञांनीच कसे अपवाद सांगितले आहेत याचे तपशिलाने वर्णन केले आहे. स्वजनहत्या की राज्यलाभ हा अर्जुनापुढे आलेला प्रश्न मूल्यसंघर्षातूनच उद्भवला होता. असा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात केव्हा ना केव्हा तरी निर्माण होतोच. आणि ललित लेखकाला त्याचे दर्शन घडविण्यासाठी जीवनाचा खोल अभ्यास करावा लागतो. मूल्यांमुळे मानवी मनात निर्माण होणारे हे द्वंद्व हा मानवी जीवनातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असल्यामुळे जीवन भाष्यात त्याला अर्थातच महत्त्वाचे स्थान प्राप्त होणे अपरिहार्य आहे. जगातल्या महाकवींनी तसे ते दिलेलेही आहे. जगातल्या थोर काव्यग्रंथांत हा मूल्यसंघर्ष महाकवींनी कसा वर्णिला आहे व त्यावर कसे भाष्य केले आहे ते आता पहावयाचे आहे.
 १ सिंह आणि दिलीप  महाकवी कालिदास याने रघुवंश या महाकाव्यात राजा दिलीप व सिंह यांच्या संभाषणातून 'ध्येयवाद व उपयुक्ततावाद' या मूल्यांच्या द्वंद्वाचे उत्तम चित्रण केले आहे. पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठांच्या आज्ञेवरून दिलीप राजा नंदिनी या कामधेनूची सेवा करीत होता. एक दिवस तो तिला रानात चरावयास घेऊन गेला असताना त्याची परीक्षा पाहण्यासाठी नंदिनीने आपल्या मायेने एक सिंह निर्माण केला. त्या सिंहाने एकदम नंदिनीवर झडप घातली. तेव्हा तिच्या रक्षणासाठी राजा धनुष्याला बाण जोडू लागला. पण एकाएकी त्याचा हात रुद्ध होऊन त्याला हालचालच करता येईना. हे पाहून राजा अत्यंत संतप्त झाला व आता आपल्या कपाळी फार मोठे अपयश येणार हे ध्यानी येऊन, तो मनातल्या मनात अगदी जळू लागला. पण इतक्यास तो सिंह मनुष्यवाणीने त्याच्याशी बोलू लागला. तो म्हणाला, 'राजा, मनाला वाईट वाटू देऊ नकोस. भगवान शंकरांनी या समोर दिसणाऱ्या देवदारु वृक्षाच्या रक्षणासाठी मला येथे ठेवले आहे. आणि जवळपास येणाऱ्या पशूंवर मी आपली उपजीविका करावी अशी मला अनुज्ञा दिलेली आहे. त्याप्रमाणे या गाईला मी धरली आहे. तेव्हा तू उगाच धडपड करू नको.' परमेश्वरी सत्तेपुढे तुझे काही चालणार नाही. आणि गाईचे रक्षण करणे तुझ्या शक्तीबाहेरचे आहे. तेव्हा ते करता आले नाही म्हणून क्षात्रधर्माला कलंक लागला, असेही तुला वाटण्याचे कारण नाही. सिंहाचा हा युक्तिवाद राजाला मुळीच पटला नाही. तो म्हणाला, 'त्रैलोक्यनाथ शंकरांची आज्ञा मला मान्य आहे. पण माझे गुरूदेव वसिष्ट यांच्या या गोरूप धनाचे रक्षण करणे हेही माझे कर्तव्य आहे. तेव्हा असे कर मी माझा देह तुला अर्पण करतो. तो घेऊन नंदिनीला सोड, राजाचा हा विचार ऐकुन सिंहाला हसू आले. तो म्हणाला 'राजा, तू अगदी वेडा आहेस. अरे जगाचे एकछत्री राज्य, स्वतःचा कांतिमान देह आणि तारुण्य हे सर्व महाधन एका क्षुद्र गाईसाठी टाकायला तयार होतोस ? तुला म्हणावे तरी काय ? भूतदयेमुळे तुला हा त्याग करावा असे वाटत असेल तरी ते युक्त नाही. स्वतःचा प्राण देऊन फार तर तू ही एक गाय वाचविशील. उलट जगलास तर आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे रक्षण करशील. तो लाभ मोठा आहे. गुरूदेव वसिष्ठ रागावतील अशी तुला भीती वाटत असेल तर त्यावरही उपाय सांगतो. तुझ्या राज्यातून या एका गाईच्या बदल्यात त्यांना लक्षावधी गाई देऊन त्यांचा क्रोधाग्नी शमविता येईल. तेव्हा इंद्रासारखे तुझे जे राज्य त्यापासून मिळणाऱ्या अनंत सुखांचा भोक्ता असा हा तुझा देह त्यांचा असा बळी देऊ नकोस.'
 सिंहाचा हा उपयुक्ततावाद मोठ्या चतुराईने त्याने मांडला होता. पण राजाच्या मनातील ध्येयवाद हे मूल्य अणुमात्र विचलित झाले नाही. तो सिंहाला म्हणाला, 'हे मृगेन्द्रा, अरे क्षतापासून, संकटांपासून रक्षण करतो तो क्षत्रीय, आम्हा क्षत्रियांची जगात अशी कीर्ती आहे. क्षात्रधर्माचि ते यश गेल्यानंतर, मला राज्य किंवा प्राण मिळून तरी करावयाचे आहे काय? तेव्हा तू माझा हा देहच नंदिनी ऐवजी घे. माझ्या या जड भौतिक देहावर दया न दाखविता माझ्या यशरूप देहावर दया दाखवा. माझ्या सारख्याला क्षात्रधर्माच्या पालनापुढे या मर्त्य देहाची मुळीच किंमत वाटत नाही.' असे म्हणून राजाने आपला देह सिंहापुढे झोकून दिला त्याच्या या ध्येयनिष्ठेमुळे नंदिनी प्रसन्न झाली क्षणार्धात सिंह लुप्त झाला. व 'वत्सा ऊठ' अशी प्रेमळपणे तिने राजाला हाक मारली. राजा धरणीवर पडला असताना देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली, असे सांगून ध्येयवाद व उपयुक्ततावाद यातील श्रेष्ठ मूल्य कोणते या विषयीचा स्वःतचा अभिप्रायही कालिदासाने प्रगट केला आहे. कवीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्या काव्यात सहजासहजी प्रगट होतो असे म्हणतात, त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
 २ शिव प्राप्तीचा मार्ग ?  कुमारसंभवात कालिदासाने दुसऱ्या दोन मूल्यांचे असेच द्वंद्व वर्णिले आहे. शिवप्राप्ती, ध्येयप्राप्ती, कोणत्या शक्तीने सुलभ होईल ? तपःसामर्थ्याने का धनैश्वर्य, स्त्रीरूपसौंदर्य या सामर्थ्याने ? तारकासुराने देवांवर आक्रमण करून त्यांना पराभूत केले होते. देवांचे सर्व सामर्थ्य, इंद्राचे वज्र, यमाचा दंड, वरुणाचा पारा, सर्व सर्व त्याच्यापुढे हतप्रभ झाले होते, निष्फळ ठरले होते. देव- सर्व अगदी हैराण होऊन गेले, दीन झाले. तेव्हा ब्रह्मदेवाचा त्यांनी धावा केला. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले, 'शिवापासून पार्वतीला जर पुत्र झाला तर तोच फक्त तारकासुराला जिंकू शकेल. सध्या शिव हिमालयात तपःश्चर्या करीत आहे. पार्वती तेथेच त्याची सेवा करण्यासाठी राहिली आहे. तेव्हा शिवाचे मन तिच्याकडे आकृष्ट करणे जर तुम्हाला शक्य झाले तर पहा. त्यांच्या पुत्रावाचून दुसऱ्या कोणालाही तुमचे संकट निवारणे शक्य होणार नाही.'
 आपल्या राजधानीला परत येताच इन्द्राने मदनाला बोलावणे पाठविले. आज्ञेप्रमाणे येऊन त्याने देवेश्वराला नमस्कार केला व काय आज्ञा आहे, म्हणून विचारले. तो म्हणाला, 'देवेन्द्रा तुमच्यावर काय संकट आले आहे, मला सांगा. क्षणार्धात मी त्याचे निवारण करतो. ऊग्र तपश्वर्या करून तुमचे पद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कोणी करीत आहे काय? त्याचे नाव मला सांगा. प्रमदांच्या कटाक्ष बाणांनी त्याला विधून मी तत्काळ त्याला तुमच्या पुढे लोळवितो. का असे नसून कोणी शृंगार लता नितंबिनी तुमच्या मनात भरली आहे. मग अडचण काय आहे ? ती पतिव्रता आहे, ती कशी वश होणार, अशी चिंता तुम्हाला वाटते आहे काय ? तिचे पातिव्रत्य हेच तुमच्या इच्छेच्या आड येत असेल तर मला सांगा. सगळा संकोच, सगळी लाजलज्जा सोडून ती आपण होऊन तुमच्या कंठात मिठी घालील असे करतो. तुम्ही पहात रहा. ...'
 मदनाचे हे भाषण ऐकून 'को व्हॅडिस' कादंबरीतील पेट्रोनियसच्या भाषणाची वाचकांना आठवण होईल. प्लॅटियसची स्त्री पांपोनिया हिचे पातिव्रत्य ही त्याला मार्गातली अडचण वाटत होती. धन, ऐश्वर्य, सत्ता, रूप, सौंदर्य, यांनी जगात काय वाटेल ते मिळविता येइल अशी धुंदी त्यावेळी रोमन लोकांना चढली होती. तीच मदांधता तारकासुराच्या काळी देवसमाजाला आली होती. ते पराकाष्ठेचे भोग विलासी झाले होते. त्यामुळेच इंद्राचे वज्र, यमाचा दण्ड, वरुणाचा पाश ही सर्व आयुधे निष्फळ ठरत होती. त्यांच्यातील सत्त्व नष्ट झाले होते. शंकरपार्वतीचा पुत्रच तुम्हांला यातून तारील असे ब्रह्मदेवाने सांगितल्यावरही त्यांचे डोळे उघडले नाहीत. शंकराची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घ्यावे असे त्यांच्या मनातही आले नाही. पार्वती हे 'सुकुमार प्रहरण' त्याच्यावर फेकून त्याला सहज जिंकता येईल असाच इन्द्राचा समज होता. म्हणून त्याने तपाचा मार्ग न अनुसरता मदनाची त्याकामी योजना केली.
 मदनाने त्या अन्वये एक दिवस पार्वती शंकराची पूजा करीत असताना तिच्या ठायी असे भाव निर्माण केले की क्षणभर शंकरहि चलचित्त झाले. पण दुसऱ्याच क्षणी ते सावध झाले व आपल्यावर आघात करणारा शत्रू कोण ते दिसताच तृतीय नेत्र उघडून त्यातील प्रखर ज्वालेने त्याचे भस्म करून टाकले.
 पार्वतीला या सर्व प्रकाराने अत्यंत लज्जा उत्पन्न झाली. आपले रूप, आपले सौंदर्य, आपला शृंगार हे सर्व व्यर्थ आहे. शिवाला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग हा नव्हे, हे तिने जागले आणि तपश्चर्या करण्याचा निश्चय करून ती निघून गेली.
 ३ ध्येय आणि संसार वा. म. जोशी हे मानसशास्त्राचे प्राध्यापक-अध्यात्मशास्त्र, नीतीशास्त्र यांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला. हे विषय शिकविणारे अनेक प्राध्यापक प्रत्येक विद्यापीठात असतातच. पण त्यांचा विषय व त्यांचे जीवन यांचा प्रत्यक्षात फारसा संबंध येत नाही. वामनरावांचे तसे नव्हते. या शास्त्रातील सिद्धान्तांनी, विशेषतः त्यांतील मूल्य चिकित्सेने, त्यांचे जीवन भरून गेले होते. त्यांच्या मनात मुल्य चिकित्सा इतकी पराकोटीला गेली होती की, दोन मूल्यांतील श्रेष्ठ मूल्य कोणते याचा निर्णय देण्याची त्यांच्या ठायी शक्तीच पुढे पुढे राहिली नव्हती, असे म्हणतात. त्यांचे मित्र व लोकही त्यांना संशयात्मा म्हणत. अशा या तत्त्ववेत्त्याच्या साहित्यात मूल्यांचा संघर्ष न दिसेल तरच नवल. आरंभी सांगितलेच आहे की, कोणतीही ललितकृती घेतली तरी तीत मूल्यसंघर्ष कोठे ना कोठे असतोच. कारण मानवी जीवनातच तो निरपवादपणे आलेला असतो. पण वामनरावांनी आपल्या कादंबऱ्यांचा प्रधान विषय म्हणूनच तो निवडलेला आहे. 'रागिणी' व 'इन्दु काळे आणि सरला भोळे' या कादंबऱ्यांत तरी निश्चितपणे तो विषय आहे. त्यांत निर्माण होणारे प्रधान व गौण सर्व समरप्रसंग या मूल्यसंघर्षातूनच निर्माण झालेले आहेत.
 'रागिणी' कादंबरीतील भय्यासाहेब व आनंदराव आणि 'इन्दु काळे व सरला भोळे' या कादंबरीतील विनायकराव भोळे व नारायणराव पाठक या तरुणांच्या जीवनात मूल्यांचे द्वंद्व निर्माण झालेले आपल्याला दिसते, गीतारहस्यात लो. टिळकांनी चर्चिलेली कर्माकर्म जिज्ञासा ती हीच होय. या चारही ध्येयवादी तरुणांच्या चित्तात निर्माण झालेल्या या द्वंद्वाचे स्वरूप बरेचसे सारखे आहे. या चौघांनाही काही महत्कार्य करावयाचे आहे. आणि त्या कार्यसिद्धीच्या आड विवाह, स्त्री, संसार है येईल अशी त्यांना शंका येते. त्यामुळे विवाह करू नये, संसार मांडू नये किंवा मांडलेल्या संसारातून उठून जावे असे त्यांच्या मनांत येते. संघर्षाचे स्वरूप असे सगळीकडे सारखे असले, तरी समरप्रसंगाचे स्वरूप बरेचसे भिन्न असल्यामुळे व प्रत्येकाची स्वतःची त्याविषयीची प्रतिक्रिया व त्यांच्या सहचरांची प्रतिक्रिया वेग. वेगळी असल्यामुळे त्यांच्या कथांना साचेबंद रूप आलेले नाही.
 भय्यासाहेब व आनंदराव हे दोघेही तरुण मित्र मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. वैद्यकीचा अभ्यास चालू असतानाच थिऑसफीकडे भय्यासाहेबांचे मन आकृष्ट झाले व कॉलेजच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ते अध्यात्मविद्येचा अभ्यास करू लागले. मोक्ष हे प्रत्येक मानवाचे अंतिमसाध्य असून त्यासाठी घरादाराचा त्याग करून अरण्यात निघून जाणे अवश्य आहे, असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. ते मूळचे विजयगावचे राहणारे. त्यांचे वडील रावसाहेब गुपचुपे हे एक जहागीरदार असून ते चांगले बडे श्रीमंत आणि तितकेच कंजुष होते. त्याच गावात राहणारे भाऊसाहेब यांची कन्या रागिणी ही याच सुमारास भय्यासाहेबांना सांगून आली होती. रागिणी ही अतिशय सुरेख असून मोठी बुद्धिमान व विनयशील होती. भय्यासाहेबांच्या मनात डॉक्टरीचा अभ्यास आणि थिऑसफी यांचे द्वंद्व आधी चालूच होते. आता रागिणी समोर आल्यामुळे धर्म जिज्ञासा आणि रागिणी हे दुसरे द्वंद्व सुरु झाले. स्वतःच्या मनाची ते समजूत घालीत की, रागिणी ही आत्म प्राप्तीच्या आड येईल ही कल्पनाच चुकीची आहे. धर्माच्या आड संसार येतो हे सयुक्तिक नाही.' त्यांचा हा प्रयत्न काही काळ यशस्वी झाल्यामुळे त्यांनी विवाहाला संमती दिली व त्याप्रमाणे रागिणी त्यांची पत्नी झाली. पण विवाहानंतर त्यांचे मन पुन्हा जास्तच जोराने थिऑसफीकडे, ब्रह्मविद्येकडे वळून ते हिमालयात निघून जाण्याची भाषा बोलू लागले. रागिणीने परोपरीने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. 'संसारात राहून कामक्रोधादि मनोविकार जिंकील त्यानेच खरे षड्रिपू जिंकले. अरण्यात जाऊन जिवाचे हाल करून घेतल्यानेच आत्म्याची उन्नती होते असे थोडेच आहे ?' असे ती वरचेवर त्यांना सांगे, त्यांचे मित्र आनंदराव यांनी तर रागिणीसारख्या पत्नीचा त्याग करणे हा नीचपणा आहे, असे म्हणून त्यांची निर्भत्सना केली आणि अशा माणसाशी स्नेह ठेवायची मला इच्छा नाही, असे त्यांना साफ सांगितले. पण याचा कशाचाच उपयोग झाला नाही व भय्यासाहेब संसार सोडून निघून गेले.
 पुढे त्यांनी अनेक वर्षे भ्रमंतीत घालविली. अनेक साधूसंतांच्या सहवासात ते राहिले पण विरागी साधूपेक्षा ढोंगी, आपमतलबी साधूच फार, असा त्यांना अनुभव आला. शेवटी हिमालयात त्यांना प्रियब्रह्म नावाचे स्वामी भेटले. स्वामी पाश्चात्त्य विद्या विभूषित होते. त्यांना योगसिद्धीही प्राप्त झाली होती. त्यांनी 'कर्तव्यकर्म सोडून ब्रहाविद्येच्या मागे लागणे योग्य नव्हे' असा त्यांना उपदेश केला. स्वजनांना सुख देणे, देशाची सेवा करणे, लोकांत धर्मश्रद्धा जागृत करणे, प्रेमबुद्धीचा परिपोष करणे ही कर्तव्ये डावलून आत्मप्राप्ती होत नसते, असे त्यांनी सांगितले व तू पत्नी समवेत गृहस्थाश्रमात रहा आणि योग्यकाळी तुम्ही दोघेही वानप्रस्थाश्रम स्विकारा, अशी आज्ञा दिली. आणि अशा रीतीने आत्मप्राप्ती की संसार हे भय्यासाहेबांच्या मनातले द्वंद्व संपून ते परत गृहस्थाश्रमी झाले. स्त्री ही धर्मजिज्ञासेच्या आड येत नाही असा त्या द्वंद्वाचा निर्णय लागला.
 भय्यासाहेबांचे मित्र आनंदराव यांच्या मनात ध्येयवाद की संसार असेच द्वंद्व होते. पण ते फारसे महत्त्वाचे नव्हते. त्यांच्या जीवनाचा तो महत्त्वाचा घटक नव्हता. तेहि ग्रँट मेडिकल कॉलेजात वैद्यकीचा अभ्यास करीत होते. पण तेथे असतानाच मंगोपार्क, स्वेन हेडिन यांच्या सारखे भूसंशोधनाचे कार्य आपण करावे, असे त्यांना वाटू लागले. ते म्हणत, 'आपल्या लोकांनी असल्या शोधांचे काम हाती घेऊन, हिंदी लोकांमध्ये जिज्ञासा व धाडस आहे, हे जगाच्या निदर्शनाला आणून दिले पाहिजे.' मग पुढे आपण आपले आयुष्य या कामासाठी खर्ची घालावे, असे त्यांना वाटू लागले. आणि यासाठी विवाह, संसार हे वर्ज्य मानले पाहिजे असे त्यांच्या मनात येऊ लागले. पण याच वेळी त्यांच्या मनात उत्तरेविषयी प्रेम निर्माण झाले होते आणि यामुळे देशसेवा की प्रेम हा संघर्ष त्यांच्या मनात निर्माण झाला होता. एकद त्यांनी त्या प्रेमाचा त्याग करण्याचा अगदी निर्धार केला. ते मनात म्हणाले, 'उत्तरे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर बरं झालं असतं. मग माझं प्रेम मला आवरता येऊन स्वदेशाकडे अधिक उत्साहाने लक्ष द्यायला सापडला असतं. पण ते काही नाही. मी हा त्याग करणारच. बस्स. ठरलं ! उत्तरे, स्वदेश सेवेपुढे, तुझ्या प्रेमाचा मी होम करणार. मी उद्या तुझा व तुझ्या प्रेमाचा त्याग करून जाणार.' पण त्यांचा हा निर्धार फार काळ टिकला नाही. उत्तरेने त्यांन आपल्या प्रेमाने जिंकले व त्यांनीही तिला तसे जिंकू दिले.
 मोठी उणीव भय्यासाहेब व आनंदराव यांच्या मनातील ध्येय व संसार या मूल्यांचा संघर्ष वामनरावांनी दाखविला आहे. इतर कोणत्याच कादंबऱ्यात हे उच्च पातळीवरचे द्वंद्व आढळत नसल्यामुळे त्याला महत्व आहे हे खरे. पण स्त्री ही ध्येयाच्या आड येत नाही' हा जो त्या द्वंद्वाचा निर्णय तो मूर्त करण्याचा त्यांनी या कादंबरीत प्रयत्नसुद्धा केला नाही, ही फारच मोठी उणीव वाटते. संसारात राहूनही आत्मप्राप्ती होऊ शकते असा अनुभव भय्यासाहेबांना कसा आला, या दोन मूल्यांत संघर्ष मुळीच नाही, याचा प्रत्यय त्यांना केव्हा कोणत्या प्रकारे आला, याचे चित्रण त्यांनी केले असते तर प्रियब्रह्मस्वामींचा निर्णय ललितसाहित्यात साकार झाला असता. आहे या स्थितीत तो फक्त शाब्दिकच राहतो. त्याला साहित्याचे रूप येत नाही. आनंदरावांच्या बाबतीत तेच झाले आहे. भूसंशोधनाच्या कार्यासाठी ते जग प्रवासाला निघाले आणि उत्तरेने त्यांना पायबंद न घालता साथच केली, अनेक हाल अपेष्टा, यातना त्यांच्याबरोबर आनंदाने सोसल्या अशा चित्रणामुळे, स्त्री ही पुरुषाची सहचरी आहे, या विचाराला मूर्त रूप आले असते. रागिणी या कादंबरीत तसे झालेले नाही. त्या दृष्टीने पाहता 'इन्दुकाळे व सरला भोळे' या कादंबरीतील विनायकराव व सरला यांच्या संसाराचे चित्र जास्त प्रत्ययकारी व मनोज्ञ झाले आहे.
 ४ भ्रमरी विनायकरावांनी एम्. ए. झाल्यावर नोकरी न करता महात्माजींच्या आश्रमात जाऊन देशसेवेला वाहून घ्यावयाचे ठरविले होते. त्याचवेळी त्याच्या लग्नाचे घाटत होते. ते ज्या कॉलेजात फेलो होते त्याच कॉलेजातील सरला काळे या मुलीवर त्यांचे प्रेम होते. यावेळी देशसेवा की संसार असे काहीसे द्वंद्व त्यांच्याही मनात होते. पण त्याचे स्वरूप भय्यासाहेबांच्या मनातील द्वंद्वाइतके तीव्र नव्हते. कारण स्त्रीला पुरुषाइतकाच ध्येयवाद समजतो, त्यापायी होणाऱ्या हालअपेष्टा सोसण्यास तिचीही पुरुषाप्रमाणेच तयारी असते, याविषयी त्यांना शंका नव्हती. तरी याविषयी खात्री करून घ्यावी म्हणून, सरलाने त्यांच्या मागणीस संमती दिली, तेव्हा तिला मुद्दाम पत्र पाठवून त्यांनी मी एम्. ए. झाल्यावर देशकार्याला वाहून घेणार आहे, पुढे आपत्ती येतील याची पूर्ण जाणीव मनात बाळगूनच होय म्हटले आहेस ना ?' असे विचारले, सरलेला या विचारण्याचा सुद्धा राग आला. 'माझ्याबद्दल एवढी खात्री नव्हती तर मागणी तरी कशी घातली ?' असे तिने उलट पत्र लिहून विचारले. आणि त्यांना आश्वासन दिले की, 'मी आपल्याला मनाने वरिले ते आपल्या थोर विचारांना, उज्वल देशभक्तीला व पवित्र आचरणाला भाळून व त्यावर भ्रमरीप्रमाणे लुब्ध होऊन वरिले. तेव्हा आपल्या उच्च आकांक्षांच्या आणि देशभक्तीच्या आड मी कशी येईन ? ज्या गुणांनी देवाला देवत्व आले, ते गुण त्या देवाला मी सोडण्यास सांगेन आणि दगडाच्या मूर्तीची पूजा करीन, असे वाटले तरी कसे ?'
 पुढे लग्न झाल्यावर आधीच्या विचारांप्रमाणे विनायकराव साबरमतीला गांधीच्या सत्याग्रहाश्रमात गेले. त्यावेळी त्यांचे श्वशुर त्यांना विलायतेस पाठविण्यास व जावई आणि मुलगी या दोघांचा ही खर्च करण्यास तयार होते. कॉलेजात त्यांना प्राध्यापकाची जागाही मिळाली असती. पण ते सर्व सोडून ते साबरमतीला गेले. त्यानंतर सरला आपल्याला विरोध करील असे त्यांना कधीच वाटले नाही. पण आपल्यामुळे तिला दुःख होते याचे मात्र त्यांना वाईट वाटत असे. एका पत्रांत तर त्यांनी असे लिहिले की मला दुःख इतके होते की, 'तू माझा त्याग केला असतास तर मी सुटलो असतो. पण तू सीतासावित्री आहेस. गडकऱ्यांची सिंधू आहेस. हे सर्व चांगले आहे, पण मला ते आता दुःखदायक होत आहे.' विनायकरावांच्या इच्छेला त्यांच्या ध्येयवादाला विरोध करावा, असे सरलेच्या स्वप्नांतही कधी आले नाही. पण विनायकरावांना तुरंगवास घडणार, यामुळे तिला दुःख होत होते यात शंका नाही. शिवाय तिच्या आईवडिलांना तर या सर्व प्रकाराने धसकाच बसला होता. ते तिला पहावत नव्हते. या वेळीं पत्रात तिने लिहिले आहे. 'आपण सत्याग्रहात शिरणार आणि सरकारचे पाहुणे होणार याबद्दल मी अभिमान बाळगू की शोक करू? आपल्या उच्च ध्येयाबद्दल मला अभिमान वाटतो. पण मी आपले मन आपल्याजवळ नाही तर कोणाजवळ मोकळं करूं ?'
 सहधर्मिणी पुढे विनायकरावांना दीड वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर ते कोकणातील पांचबावडी या खेड्यात जाऊन राहिले व गांधीच्या आज्ञेप्रमाणे तेथे ग्रामीण जनतेची सेवा करू लागले. अर्थात त्यांचा संसार दरिद्रीच राहिला. पण सरलाने या सर्व प्रसंगी त्यांना मनोभावाने साथच दिली. तेथे त्यांच्यावर बदनामीकारक आरोप तेथील धर्ममार्तडांनी केले. ते पुन्हा शेतसाऱ्याच्या चळवळींत पडल्यामुळे त्यांना पुन्हा शिक्षाही झाली. खेड्यात एका वर्षी त्यांची दोन्ही मुले साथीला बळी पडली. पण सरलाने विनायकरावांना कधीही दोष दिला नाही. कधी तक्रार केली नाही. इतकेच नव्हे तर या हाल अपेष्टांनी त्यांना मृत्यू आल्यावर त्याच खेड्यात राहून त्यांचेच कार्य पुढे चालवण्याचे तिने ठरविले. स्त्री ही खरोखरीच पुरुषाची सहधर्मिणी आहे, त्याची साथी आहे, ध्येयवाद, उच्च आकांक्षा, देशसेवा तिलाही समजतात, त्यासाठी पडेल ती किंमत देण्यास तिचीही सिद्धता असते, हे या कादंबरीवरून जसे प्रत्ययाला येते, तसे 'रागिणी' वरून येत नाही.
 कल्पना काय आहे? या कादंबरीतील नारायणराव पाठक यांचे मत भय्यासाहेबांच्या सारखेच होते. शिक्षण संपल्यानंतर इतिहास संशोधक व्हावयाचे त्यांनी ठरविले. काशी ही त्यांची बालमैत्रीण होती. पुढे तारुण्यात आल्यावर त्यांनी तिला लग्नाचे वचनही दिले होते. पण, संसार आपल्या ध्येयाच्या आड येईल, असे त्यांच्या मनाने घेतल्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. त्यांचे मित्र विनायकराव, भाऊ काळे यांनी त्यांचे मन वळविण्याचा फार प्रयत्न केला. काशीची व त्यांची आपल्या घरी मुद्दाम भेटही घडविली. पण त्यांनी आपला विचार बदलला नाही. उलट माझे मन यामुळे कमकुवत होते, तेव्हा पुन्हा भेटूही नको, असे त्यांनी काशीला सांगितले. या कादंबरीतले काशीचे चित्र अत्यंत मनोरम आहे. तिला खरे दुःख आहे ते हे की, बायकांना उच्च आकांक्षा समजत नाहीत, असा पुरूषांचा ग्रह असावा ! तिने नारायणरावांना लिहिले की, 'आपल्या उत्कट ज्ञानलालसेच्या मी आड येईन, असे वाटल्यामुळेच आपण लग्नाला नकार देत आहात. पण मी आपल्या ऐतिहासिक संशोधनाच्या आड येईन अशी कल्पना तरी मनात का यावी ? आम्हा बायकांना उच्च आकांक्षा समजत नाहीत ? का आम्हाला दारिद्र्यात राहता येत नाही ? कल्पना तरी काय आहे ?' हे लिहून काशी पुढे म्हणते 'मी आपल्या सारख्या पुरूषांना आपण लग्न करण्याचे नाकारले तरी थोरच समजते. किंबहुना ध्येयाकरिता नाही म्हणू शकता म्हणूनच थोर समजते. आपण योग्य तेच करावे मी ही योग्य तेच करीन. म्हणजे आपण नाही म्हटल्यास मी जन्मभर अविवाहित राहीन.'
 आणि ही थोर मनाची मुलगी खरोखरच तशी राहून अखेर झुरून झुरून, क्षय लागून त्यातच मृत्युमुखी पडली. नारायणरावांचे मन अखेर पालटले होते. त्यांनी काशीच्या घरी जाऊन तिला व तिच्या आईला तसे सांगितलेही. पण आता फार उशीर झाला होता, अखेरचा निरोप घेताना काशी म्हणाली, 'आपण केलेत ते योग्यच केलेत. ध्येयापुढे प्रेमाची मातब्बरी नसावी. आपण असे ध्येयनिष्ठ आहात म्हणूनच माझी प्रेमाची एकनिष्ठता कायम राहिली.' पण हे सांगून शेवटी मात्र तिने त्यांना विचारले, 'बायका ध्येयाच्या आड येतात, असे तुम्ही मानता कोणत्या आधारावर? सरलावहिनी ध्येयाच्या आड आल्या का ?'
 काशी गेली तरी ही वाक्ये नारायणरावाच्या मनात घुमतच राहिली.
 ५ ध्येय व मातृपद ध्येय आणि संसार, उच्च आकांक्षा की संसार असे द्वंद्व बहुधा पुरुषांच्याच मनात निर्माण होते. स्त्रियांना या दोन मूल्यांच्या संघर्षाच्या यातना बहुधा अनुभवाव्या लागत नाहीत. निदान पूर्वीतरी लागत नव्हत्या. कारण संसार, मुलेबाळे या पलीकडे त्यांच्या मनात आकांक्षा निर्माण होतच नसत. समाजाने त्यांच्यावर तशीच बंधने घातली होती. अर्वाचीन काळात स्त्री शिक्षण घेऊ लागली, बरीचशी स्वतंत्र झाली तेव्हा संसारापलीकडे त्यांच्याही चित्तात आकांक्षा निर्माण होऊ लागल्या हे खरे. पण तरीही बहुसंख्य स्त्रिया संसाराकांक्षीच असतात. डॉक्टर व्हावे, प्राध्यापक व्हावे, कलोपासना करावी असा ध्येयवाद अनेक स्त्रियांच्या चित्तात निर्माण होतो. नाही असे नाही. पण या तऱ्हेचा ध्येयवाद बहुधा संसार संभाळूनही त्यांना साध्य करिता येतो. पण तो येत नाही असे झाले म्हणजे मग मात्र त्यांच्या मनात हे द्वंद्व निर्माण होते. दोन मूल्यांमुळे निर्माण झालेल्या अशा एका द्वंद्वाचे एक सुरेख चित्र ना. सी. फडके यांनी आपल्या 'उद्धार' या कादंबरीत रंगविले आहे. विषया ही सर कोदंडराव यांची मुलगी. ती नटी होती. व चित्रपटाच्या क्षेत्रात तिला चांगले यश मिळू लागले होते. पण या क्षेत्रात अगदी शिखर गाठावयाचे अशी तिची महत्त्वाकांक्षा होती. अशा स्थितीत विद्या या आपल्या मैत्रिणीला बरोबर घेऊन ती लोणावळ्याला रहात असताना तिचा प्रियकर श्यामकान्त तिला भेटावयास आला होता. रात्री विद्या आपल्या खोलीत एकटीच निजली होती. तिने दार लावून घेतले होते. तेवढ्यात दाराबाहेर विषया व श्यामकान्त यांचे काही बोलणे चाललेले तिला ऐकू आले. चांदणे चांगले पडले होते. आणि बाहेर डोंगरावर हिंडावयास चल म्हणून श्यामकान्त तिला आग्रह करीत होता. आणि आश्चर्य म्हणजे विषया त्याला टाळीत होती. दोघांनी जावयाचे तिच्या मनात नव्हते. म्हणून ती विद्येला हाक मारू लागली. 'त्या निजल्या आहेत, त्यांना कशाला त्रास देतेस, आपण दोघेच जाऊ' असे श्यामकान्त म्हणत होता. आणि विषया तिला जोरजोराने हाका मारीत होती. विद्येला हे विचित्र वाटत होते. म्हणून जागी असूनही तिने ओं दिली नाही. शेवटी मला फारच झोप आली आहे, असे म्हणून विषयाने जाण्याचे टाळलेच.
 आदल्या दिवशी विषया विद्येजवळ म्हणाली होती की, माझे श्यामकान्तावर प्रेम आहे, पण मी ते पुरते दाखविणार नाही. मला दाखवता कामा नये. विद्येला ते आता आठवले. पण असे का, याचा मात्र तिला उलगडा झाला नाही. दुसऱ्या दिवशी दोघीच फिरायला गेल्या असताना मात्र विषयेने आपले सर्व हृद्गत तिला सांगितले. ती म्हणाली, 'माझी तऱ्हा मुलखा वेगळी आहे हे खरं. पण मला उच्च महत्त्वाकांक्षा आहे. मला टॉकीच्या क्षेत्रात उंच स्थान मिळवायचं आहे. त्यामुळे स्वतंत्र राहून कर्तृत्वाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेमाच्या स्वातंत्र्यावर मला पाणी सोडलंच पाहिजे. स्वतंत्र स्त्रीला आपलं प्रेम स्वतंत्र न ठेवता, त्याचा कोंडमारा करावा लागतो. मला वाटतं स्त्रीचे जिणेच निसर्गाने असे चमत्कारिक अन गुंतागुंतीचे करून ठेवले आहे की, या नाही त्या रूपात तिला गुलामगिरी पतकारलीच पाहिजे. लग्न झाल की माझ्या महत्त्वाकांक्षेचा मार्ग बंद होणार हे उघड आहे. माझे श्यामकान्तावर प्रेम आहे. पण त्याची पूर्तता होऊ देणे मला शक्य नाही. लग्न झाल्यावर मातृपद येईल. अन मग संपलीच माझी कला नि महत्त्वाकांक्षा. याची मला चीड येते. पण निसर्गावर चिडून उपयोग काय ? प्रेमाची सांगता झाली तरी पुरुष स्वतंत्र राहतो. पण स्त्रीचे हातपाय बांधले जातात. हा निसर्गाचाच न्याय आहे !'
 ६ शंभुराव व केशवकाका 'अटकेपार' या कादंबरीत फडके यांनी सुधीरच्या मनातील जुनी संस्कृती व नवी संस्कृती या दोन मूल्यांचा संघर्ष फार उत्कृष्ट वर्णिला आहे. त्याचे वडील शंभुराव जोग व काका केशवराव हे दोघे सख्खे भाऊ, पण त्यांच्यात दोन ध्रुवाचे अंतर होते. त्यांचे वडील वेदान्ती होते, ब्रह्मावर निष्ठा ठेवून संसाराचे मायापाश हळूहळू कमी करावे अशी त्यांची वृत्ती होती. पण एवढ्यामुळे काहीच बिघडले नसते. या वेदान्ताबरोबरच त्यांची जुन्या कर्मकांडात्मक आचार धर्मावर निःसीम श्रद्धा होती. केशवकाका हे चित्रकार होते, अखिल भारतात त्यांची कीर्ती पसरली होती. पण चित्रे काढणे हा शंभुरावांच्या मते, छाकट्याचा धंदा होता. आणि तो पतकरून केशवकाकांनी कुळाला कलंक लावला, असे त्यांना वाटत असे. सुधीरने त्यांच्याकडे जाणे त्यांना मुळीच पसंत नसे. पण सुधीरची वडिलांच्यावर मूल्य संघर्ष जशी भक्ती होती तशीच काकांच्यावरही होती. वेदान्त, कर्मकांड यांमुळे शंभूरावांच्या मनातील प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य यांचे झरे आटून गेले असून बाह्यतः तरी ते अगदी शुष्क होऊन गेले होते. सुधीरची आई नवज्वराने आजारी होती. पण जाता- येता, ताप कसा काय आहे, असे विचारण्या पलीकडे ते तिची चवकशी करीत नसत. त्यांचे जप जाप्य, वेदान्तचर्चा हे सर्व नित्याप्रमाणे चालू होते. प्रेमाने, जिल्हाळ्याने बायकोशी, मुलाशी दोन शब्द बोलणे, हे त्यांना माहीतच नव्हते. केशव काकांच्याकडे याच्या उलट स्थिती होती. त्यांच्याकडे सुधीर गेला की ते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत. आनंद, उल्हास यांनी त्यांचे घर नेहमी भरलेले असे. तर शंभूरावांच्या घरावर नेहमी सुतकी कळा असे.
 शंभुरावांचा कर्मकांड हा धर्म होता, पण मानवता, प्रेम, वात्सल्य, औदार्य, स्नेह यांचा त्यांच्या चित्तातून लोप झाला होता. उलट ते सर्व मृदु, कोमल भाव केशवकाकांच्या हृदयात ओसंडून जात असत. पण रूढ धर्माचाराच्या दृष्टीने ते पाखंडी होते. ते पंजाबात गेले असताना सकीना नावाची मुसलमान मुलगी त्यांच्या आश्रयाला आली. तिचा मामा तिला कुंटणखान्यात विकणार होता. त्यातून केशवकाकांनी तिला सोडविले व तिलाच आपली सहधर्मचारिणी बनविले. लग्नाची त्यांना आवश्यकता वाटलीच नाही. पण ती त्यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ असल्यामुळे त्यांचे तिच्यावर अलोट प्रेम होते. ती आजारी पडली तर कामधंदा सोडून ते सारखे उशापायथ्याशी बसून तिची शुश्रूषा करीत. सुधीरवर तिची फारच माया होती. तो आला म्हणजे त्याच्या आवडीचे पदार्थ करून त्याला घालण्यात तिला आनंद वाटे. काका, सकीना व सुधीर एकत्र बसून आनंदाने गप्पा मारीत जेवण करीत. सुधीरच्या स्वतःच्या घरी हे केव्हाच शक्य नव्हते.
 साऱ्याचे मूळ ही दोन दृश्ये नित्य डोळ्यासमोर सतत राहिल्यामुळे सुधीरच्या मनात नेहमी जुनी संस्कृती व नवी संस्कृती, श्रद्धा व प्रेम, कर्मकांड व मानवता या मूल्यांचा संघर्ष चाले. वडिलांच्यावर त्याची निरतिशय भक्ती होती. त्यांचे शुद्ध आचरण, करारी स्वभाव, त्यांच्या मुद्रेवरचे पावित्र्य यांचा त्याच्या मनावर वचक असे. पण यात जिव्हाळा, वात्सल्य, सहानुभूती मुळीच नाही याची त्याला खंत वाटे. कोणत्याही विषयावर त्यांच्या घरात मनमोकळेपणे बोलणे होतच नसे. दादा नेहमी तुसडेपणाने, कजागपणे बोलत. सुधीरचा साहेबी पोशाख, हाताने दाढी करणे हा त्यांना अधर्म वाटे. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या बाबतीत आपण लक्ष घालावयाचे नाही, असे त्यांनी ठरविले व लक्ष्मीबाईना तसे सांगितले. त्या मुलाच्या बाजूने बोलावयास गेल्या तर संतापून ते पानावरून उठून गेले आणि रात्रीचे जेवणच त्यांनी बंद केले. आईला अशा यातना सोसाव्या लागतात याचे सुधीरला वाईट वाटले व त्याने आईला सांगितले, 'आई, तुझ्या पसंतीची मुलगी तू पहा. मी तिच्याशी लग्न करीन. घरात असंतोष नको.'
 पण मुधीरची आई फार विवेकी होती. शंभुरावांप्रमाणे तिचे मन कर्मकांडामुळे नीरस, शुष्क झाले नव्हते. तिची मुलावरची माया आटली नव्हती. त्यामुळे ती म्हणाली, 'अरे, त्यांचा असंतोष दूर करण्यासाठी तू वाटेल ते दिव्य करशील हे मला माहीत आहे. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांच्या असंतोषाची कारण फार खोल आहेत. त्यांना जुनं हवं आहे अन तुला नव हवे आहे. यात साऱ्याचं मूळ आहे. मी तुला एकदाच सांगते की घरात कशीबशी सून आलीच पाहिजे, असा माझा आग्रह नाही. तुझी बायको जी कोणी घरात येईल ती मला लक्ष्मीसारखी वाटेल. हे औदार्य, हे प्रेम, ही माया सुधीरच्या वडिलांच्या ठायी नव्हती. आणि काकांच्या ठायी ती पुरेपूर होती. त्यामुळे सुधीरचा ओढा त्यांच्याकडे असे. पण पितृभक्ती, कर्तव्यबुद्धी, कुटुंबभावना यामुळे वडिलांना संतुष्ट करावे अशीही एक विचारधारा त्यांच्या मनात होती. अशा दोन विचारधारांच्या कात्रीत त्याचे मन सापडल्यामुळे तो अनेकदा अगदी व्याकुळ होऊन जाई.
 संस्कृती म्हणजे छत्री जुन्या नव्या संस्कृतीचा हा जो संघर्ष त्याच्यावर फडके यांनी केशवकाकांच्या तोंडून मोठे मार्मिक भाष्य केले आहे. काका म्हणतात, 'संस्कृती म्हणजे काय ? परिस्थितीचा ताप न होता तिच्या प्रकाशाचा उपभोग मात्र घेता यावा म्हणून चालीरीतीची जी छत्री आपण तयार करतो ती म्हणजे संस्कृती. सूर्य बदलला की आपण छत्रीचा झोक पालटतो. सूर्य पश्चिमेला गेला तरी, मी छत्री जुन्या पद्धतीने पूर्वेलाच धरीन, असे म्हणणारा माणूस शहाणा ठरेल काय ? हट्टानं छत्री पूर्वेला धरून त्यामुळे होणारे क्लेश सोसण्याचा करार त्यानं दाखविला म्हणून त्याचं मत बरोबर ठरत नाही. माईच्या आयुष्याचं मातेरं त्या हट्टामुळेच झालं.'
 सुधीरला माई नावाची बहीण होती. तिच्यासाठी जयंत बापट या तरुणाचें सुधीरने चांगले स्थळ आणले होते. जयंत हुषार होता, होतकरू होता, सुस्वभावी होता. पण बापट घराणे सुधारकी थाटाचे म्हणून शंभुरावांनी माईला तेथे देण्याचे नाकारले. जयंताचे माईवर प्रेम होते. पण प्रेमाच्या पांचट खुळाचा त्यांना तिटकारा होता, म्हणून कराचीच्या भाऊ शास्त्रांच्या मुलाला त्यांनी मुलगी दिली. भाऊशास्त्री जुन्या संस्कृतीचे होते. आणि असा व्याही मिळाला हे त्यांना भाग्य वाटले. पण भाऊशास्त्रांचा मुलगा वसंता हा केवळ पशू होता. दारू पिऊन माईला वाटेल तशी मारझोड तो करीत असे. घरी वाटेल त्या बाया आणीत असे. शेवटी ती या यातनांनी मरेल अशी भीती वाटल्यामुळे सुधीरने बहिणीला घरी आणले. पण दादांना- शभुरावांना- हे मुळीच पसंत पडले नाही. 'यात तिच्या पारलौकिक कल्याणाचा विचार सुधीरने केला नाही' असे ते म्हणाले. तशाही स्थितीत त्या नरकात माईने राहिले पाहिजे, यातच तिचे कल्याण आहे, असे त्यांचे मत होते.
 आपली आई व बहीण हे दोन जुन्या संस्कृतीचे बळी आहेत, असे सुधीरला वाटे, आणि यामुळे त्याचे मन हळूहळू वडिलांच्या वर्तनाला विटत चालले. त्यांच्या विचित्र कल्पनांचा जुलूम किती सहन करावयाचा? असे त्याच्या मनात येऊ लागले अशाच एका प्रसंगी काकांशी बोलताना तो म्हणाला, 'मी तुमचा मुलगा असतो तर बरं झालं असत.' हे शब्द तोंडून गेल्याबद्दल मग त्याला वाईट वाटले, हा पितृद्रोह आहे, असेही त्याच्या मनात आले. पण तो काकांना म्हणाला, 'काका श्रद्धा व प्रेम यातील ही झुंज मला कधी कधी सहन होत नाही.' यामुळेच शेवटी या अटकेपार जाण्याचे त्याने ठरविलें. उमरखान नावाच्या एका मुसलमान व्यापाऱ्याच्या मीनाक्षी नावाच्या कन्येवर त्याचे प्रेम जडले होते. वडिलांना ते पसंत पडणार नाही हे निश्चितच दिसत होते. तरीही ही अटक आता ओलांडावयाचीच असा त्याने निश्चय केला. आणि त्याप्रमाणे त्याने वडिलांना पत्रद्वारे कळविले व माईला तसे सांगितले, माईसुद्धा यावर रागावेल असे त्याला वाटले होते. पण ती म्हणाली, 'बहिणीचं मन कसं असतं तुला कळलं नाही सुधीरभाऊ. तुझं अंतःकरण माझ्यासाठी कसं तिळतिळ तुटतं मला माहीत आहे. देवानं असा भाऊ जन्मोजन्मी द्यावा अशी मी प्रार्थना करीत असते. अन मग केवळ लौकिका वेगळं तू लग्न केलस म्हणून माझी प्रीती टळेल असे तुला वाटतं तरी कसे ?'
 सुधीरच्या मनात आले 'तर्कशक्तीच्या अभिमानाने जुन्याला मिठी मारणारा पुरुष आणि प्रेमाच्या माणसाने लौकिकाविरुद्ध काही केले तरी ते प्रिय मानणारी- स्त्री यातील खरे प्रगमनशील कोण ?'
 आई, माई, व काका यांच्या या निरपेक्ष प्रेमानेच शेवटी सुधीरच्या मनातले द्वंद्व संपले.
 ७ गारंबीतील संग्राम कर्मकांड व मानवता, जड आचारधर्म आणि सचोटी, निष्ठा, औदार्य, दान-धर्म यांच्यामधल्या द्वंद्वाचे जरा निराळ्या तऱ्हेचे चित्रण श्री. ना. पेंडसे यांनी 'गारंबीचा बापू' या आपल्या काबदंरीत केले आहे. आणि मानवता, निरपेक्ष प्रेम, एकनिष्ठा हाच श्रेष्ठ धर्म होय असा अंतीम निर्णय दिला आहे. गारंबी हे कोकणातले एक खेडे. विठोबा सामल हा तेथला एक गरीब, दीन, दरिद्री पाणक्या ब्राह्मण. बापू हा त्याचा मुलगा. एशी ही विठोबाची बायको. तरुणपणी ही फार सुरेख होती. गावचे अण्णाखोत यांनी तिला नादी लावले व तिला गर्भ राहिल्यावर प्रथम तिला औषधे दिली आणि त्यांनी जमले नाही तेव्हा विठोबा या आश्रित पाणक्याशी तिचे लग्न लावून दिले. बापू हा अशा रीतीने खरा अण्णा खोतांचा मुलगा. पण जाहीरपणे तो विठोबाचा मुलगा होता. बापू स्वतः तसेच मानीत असे. कारण त्याला सत्य माहीत नव्हते. बापूची आई एशी ही लग्न झाल्यावरही गावभवानीच राहिली. त्यामुळे विठोबाकडे व बापूकडे सर्व गाव तुच्छतेने पाही, त्यांच्याबद्दल कुत्सिततेने बोले. बापूला वागवणूकही आश्रिताच्या, गावभवानीच्या पोरासारखीच मिळे. आणि दुसरा एखादा मुलगा तसाच मोठा होऊन बापासारखाच पाणक्या किंवा हॉटेलातला पोऱ्या झाला असता.
 पण बापू हा मानी होता. हळूहळू त्याला मान अपमान समजू लागले. आईच्या वागणुकीचीही शंका येऊ लागली. त्यामुळे तो अण्णाखोताबद्दल व गावातल्या भंपक ढोंगी लोकांबद्दल तिरस्काराने बोलू लागला. तेव्हा आईचे व त्याचे खटके उडू लागले. ती त्याला पाण्यात पाहू लागली, वाटेल ते बोलू लागली व गावात त्याच्याबद्दल अण्णा खोत कंड्या पिकवी त्यांवर विश्वास ठेवून खोताचा पक्ष घेऊन त्याला हिडिस फिडिस करू लागली. बापूने शाळा सोडून दिली व तो रावजीच्या हॉटेलात कामाला राहिला. रावजी हा जातीने गुरव. त्याची बायको राधा ती बापूसारखीच दुर्दैवी होती. ती मुंबईच्या शाळेत होती. बारा तेराव्या वर्षी तिला काही चारगट मुले प्रेमपत्रे लिहू लागली. ती मास्तरांच्या हाती लागली. आणि समाजाच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे राधा हीच चवचाल ठरली. वडिलांनी तिला शाळेतून काढली. व तिचे लग्न होणे मुष्कील आहे हे जाणून गारंबीचा एक भिकार हॉटेलवाला रावजी याच्याशी त्या नक्षत्रासारख्या सुरेख मुलीचे लग्न लावून दिले. रावजी केवळ पशू होता. तो अगदी गुरासारखी तिला वागवी आणि सदैव घरात डांबून ठेवी. बापूला समाजाने चिखलात फेकून दिले होते, तसेच समाजाने राधेलाही उकिरड्यावर टाकून दिले होते. रावजीच्या हॉटेलात त्या दोघांची गाठ पडे. आणि मग त्यावरून बापूच्या नावाचा गावात बभ्रा होऊ लागला. पण बापूसारखीच राधा मनाने खंबीर होती, विवेकी होती. तिच्या मुद्रेवर सात्त्विकपणाचे तेज होते. बापूवर त्याचा परिणाम होऊन त्याच्या जीवनाला चांगले वळण लागले. त्याचाच आत्मविश्वास वाढला, आपल्या अंगच्या गुणाची जाणीवही त्याला होऊ लागली आणि त्यामुळेच कर्मकांड हाच परमधर्म मानणारे गारंबी गाव आणि शुद्ध मन हा धर्म मानणारा बापू यांच्यात संग्राम सुरू झाला.
 बापू ब्राहाण, रावजी गुरव, राधा अर्थातच गुरव. बापूची बैठक या गुरव मंडळीतच फार. खाणेपिणे तेथेच व त्यांच्याच हातचे. साखरपेंडीला गेला की तो मुसलमानाच्याही हातचे खात असे. खाण्याच्या पदार्थाबद्दलही त्याला विधिनिषेध नव्हता. त्यामुळे गावात त्याची फार निंदा होऊ लागली. हा एक भ्रष्ट, मवाली, गुंड आहे असे गाव म्हणे. पण बापू म्हणे की, मी गारंबीच्या तोंडावर थुंकतो. माझं गारंबीनं काय भलं केलं आहे ? आईशी बापूचा उभा दावा होता, तरी पलीकडे भूतवाडीला राहणारी त्याची मावशी, तिला तो फार मानीत असे. कारण तिची बापूवर माया होती. गारंबीने लाथाडले तरी ती त्याच्या पाठीशी नेहमी उभी असे. बापूचे वाह्यात वागणे तिला पसंत नव्हते. तरी अंतर्यामी ती जाणून होती की बापू चांगला आहे. मावशी विधवा होती. तोंडाची फटकळ होती, पण उद्योग, सचोटी, करारी वृत्ती यामुळे लोक तिला वचकून असत. बापूला तिचा नेहमी पाठिंबा असल्यामुळे बापू जास्त निर्भय होत चालला.
 ब्राह्मणाचे शिक्कामोर्तब हळूहळू बापू सुपारीचा व्यापार करू लागला व त्यात त्याला चांगला पैसा मिळू लागला. तेव्हा तो अण्णा खोत, पांडभट, नाना भट या गावच्या कर्मठ पण नीतिहीन ब्राह्मणाच्या वर्तनावर वाटेल तसे तोंड सोडू लागला. नानांचा मुलगा दिनकर हा त्याचा बालमित्र. तोही आता भिक्षुकी करू लागला होता. त्याच्या ध्यानात येई की खरा धर्म बापूजवळच आहे. पण उघडपणे तसे बोलण्याची त्याची छाती नव्हती. कारण त्याचा धंदा भिक्षुकीचा. पण गुप्तपणे तो बापूला येऊन भेटे. रावजी मेल्यावर बापू राधेजवळ उघडपणे राहू लागला. प्रथम दिनकरही यामुळे जरा दुरावला. पण त्याच्या ध्यानात आले की राधा ही लग्नाच्या बायकोपेक्षाही बापूशी एकनिष्ठ आहे. त्याने मावशीला स्वतः तसे सांगितले. तो म्हणाला, 'राधा लाख माणूस आहे. ती वापूची फार काळजी घेते. ती आहे म्हणून बापू कह्यात आहे.' बापूने नवे घर बांधले. तेव्हा वास्तूशांतीला सर्व गारंबी लोटली. पण दिनकर मात्र गेला नाही. तो व्याघ्रेश्वराच्या मंदिरात जाऊन बापूच्या कल्याणासाठी अभिषेक करीत बसला होता. पण पुढे हळूहळू तो धीट झाला व बापूच्या घरी जाऊन राधेशी बोलू लागला. ती त्याला भावजी म्हणे, तोही तिला वहिनी म्हणू लागला. आणि अशा रीतीने या भिक्षुकाकडून लेखकाने बापूच्या धर्मावर शिक्का मोर्तब करविले.
 कर्मकांड आणि मानवता या दोन धर्मतत्त्वात सनातन काळापासून चालू आहे. टिळे, टोपी, माळा, भस्म, गंध, व्रते वैकल्ये, पूजाअर्चा हे बाह्याचार दिमाखाने पाळून खाजगी रीतीने वाटेल ते अनाचार करणारे लोक समाजात नेहमी असतात. आणि त्या बाह्याचारांना समाज खरा धर्म मानीत असल्यामुळे अशा लोकांना समाजात मोठी प्रतिष्ठा असते. अण्णा खोत तशापैकी मनुष्य होता. पांडभटादी गावचे भिक्षुकही त्यांतलेच होते. अशा समाजात दया, सहानुभूती, वात्सल्य, माया, एकनिष्ठा लोकसेवा, परोपकार, सचोटी, मनाची शुद्धता हाच खरा धर्म, असे मानणारा कोणी तरी धाडसी माणूस मधूनच निर्माण होतो. प्रारंभी त्याचा छळ होतो. पण स्वतःच्या तेजाने, कर्तृत्वाने तो त्यावर मात करून वर येतो. बापू हा त्या जातीचा मनुष्य होता. राधा ही त्याची सहचरी त्याच्याच जातीची होती. ब्राह्मणांनी त्यांचे लग्न लावण्याचे नाकारले तरी सूर्याच्या साक्षीने त्या दोघांनी लग्न लावले. अशा लग्नानंतरही ती खरीखुरी पतिव्रताच राहिली. कारण माणुसकी हाच तिला खरा धर्म वाटे. मावशी आजारी पडली तेव्हा ती धावत तिच्याकडे गेली आणि शेवटपर्यंत तिने, खऱ्या सुनेने करावी, तशी तिची सेवा केली. बापूनेही हाच धर्म मानला होता. गारंबीला त्याने शाळा बांधून दिली, नदीवर पूल घातला, विहीर खणली व सीमेटचा पाट काढून दिला. दीनदुःखितांना तो मुक्त हस्ताने मदत करी. आणि यामुळे आपणच खरे नीतिमान, खरे आस्तिक, खरे धर्मशील असा त्याचा दावा होता. तो म्हणे 'मी फक्त माझ्या मनाला भितो.' सर्व धर्मांनी धर्माची अंतिम कसोटी हीच सांगितली आहे. बापू एकदा दिनकराला म्हणाला, दिन्या अरे या गारंबीत खरं पाप पुण्याच्या मिजाशीत वावरतं आहे, आणि माझ्यासारख्या गरिबावर पापी म्हणून शिक्का पडतो आहे. पण ध्यानात ठेव, एक दिवस या पापाच्या भाराखाली गारंबी पिचेल. देशोधडीला लागेल. त्यावेळी माझ्यासारख्याचं पुण्यच उपयोगी पडेल.'
 कादंबरीकाराचा स्वतःचा जीवनविषयक स्वतंत्र दृष्टिकोण असतो. तो प्रगट करण्यासाठी, त्या आत्माविष्कारासाठी तो कादंबरी लिहितो. मात्र तो शक्य तो स्वतः पडद्याआड राहून आपल्या व्यक्तिरेखांकडून आपले तत्त्वज्ञान प्रगट करीत असतो. ललित साहित्याची शोभा त्यातच असते. अटकेपार कादंबरीत माईच्या मुखाने फडके म्हणाले की, केशवकाकांचा संसार जरा जनरीतीहून वेगळा खरा, पण किती सुखाचा आहे, नाही ? या कादंबरीत मावशी, दिनकर, राधा व बापू यांच्या मुखांनी पेंडसे यांनी आपले तत्त्वज्ञान ठायी ठायी प्रगट केले आहे.
 अपेक्षाशून्य दया एशी, बापूची आई. म्हातारपणी तिला कोणी विचारीना. रोगांनी ती जर्जर होऊन गेली. पण तिला कोणी आसरा देईना. दिनकर तिला बापूकडे घेऊन गेला. तेव्हा राधा धावत बाहेर आली व सासूला मोठ्या भक्तीने घरात घेऊन गेली. संबंध जन्मभर राधा व बापू या दोघांना ती शिव्या मोजीत होती. पण राधेने ते मनातही आणले नाही. आता मात्र एशीला स्वतःचीच लाज वाटत होती. त्यामुळे बापू दृष्टीस पडताच तिने त्याच्या पायाला मिठी मारली.
 'आई, ऊठ!' बापू म्हणाला व त्याने तिला अलगद उचलले. अपेक्षाशून्य प्रेमाचा तो स्पर्श !
 आपल्याला पावन करण्याच सामर्थ्य फक्त त्या प्रेमात आहे असं तिला वाटलं.