साहित्यातील जीवनभाष्य/अंतरंग दर्शन

विकिस्रोत कडून




 अं त रं ग द र्श न



 सुप्त मन मानवी मनाचे अंतरंग स्पष्ट करून दाखविणे याला जीवनदर्शनात फार महत्त्व आहे. पुष्कळ वेळा मानवाच्या वर्तनावरून केलेले अदमास, त्याचे अंतरंग पाहिल्यावर, अगदी चुकीचे ठरतात. व्यवहारात अमुक मनुष्य धीट आहे, अमुक भित्रा आहे, हा उदार आहे, तो कंजुष आहे, अमका चंचल आहे, अमका दृढ आहे, हा गरीब आहे, तो भांडखोर आहे, असे लोक म्हणत असतात. पण काही प्रसंगी याच्या अगदी उलट अनुभव येतो. अलीकडे मनोविश्लेषणाचे स्वतंत्र शास्त्रच तयार झाले आहे. हे शास्त्रज्ञ माणसाच्या बोलण्यावरून, त्याला पडलेल्या स्वप्नांवरून, त्याने काही प्रश्नांना दिलेल्या उत्तरांवरून, त्याच्या मनाचे असे काही चित्र काढतात की, त्या माणसाला स्वतःलाच धक्का बसावा. या शास्त्रज्ञांनी अंतर्मन व बहिर्मन, जागृत मन व सुप्त मन अशी दोन मने किंवा एकाच मनाचे दोन भाग कल्पिले आहेत. आणि त्या शास्त्राच्या साह्याने मानवाच्या सुप्त मनाचे पापुद्रे उकलून दाखविणे हा अनेक साहित्यिकांना छंदच लागलेला आहे. प्राचीन काळी दोन मनाचे हे शास्त्र कवींना माहीत नसले तरी मानवी मनाच्या अंतरंगात शिरून त्याचे बहुविध व्यापार कसे चालतात ते वर्णन करून सांगण्याची शक्ती त्यांच्या ठायी निश्चित होती. अशा कवींनी आपल्या साहित्यात मानवाच्या अंतरंगाचे जे दर्शन घडविले आहे त्याचे सौंदर्य आता आपणास पहावयाचे आहे.
 १ स्तुतीचा लोभ 'ज्यूलियस सीझर' या शेक्सपीयरने लिहिलेल्या नाटकातील उदाहरण पहा. सीझरच्या वधाचा कट चालला आहे. त्याची रूपरेखा निश्चित करण्यासाठि कॅसियस, कॅसका, डेसियस ब्रूटस, मार्कस ब्रूटस इ. कटवाले यांनी बैठक भरविली आहे. कॅपिटॉलमध्ये सभा भरेल त्यावेळी हे काम करावयाचे असे जवळजवळ निश्चित झाले. पण तेवढ्यात कॅसियसला शंका आली. आज हवा वादळी आहे. अनेक अशुभ लक्षणे होत आहेत. तेव्हा आज सीझर कॅपिटॉलमध्ये एखादे वेळी येणारही नाही. मग सगळाच घोटाळा होईल. यावर डेसियस ब्रूटस म्हणतो, 'ते तुम्ही माझ्यावर सोपवा. तुम्ही मुळीच काळजी करू नका. त्याने न येण्याचे ठरविले तरी मी त्याचे मन वळवीन.' डेसियसच्या बोलण्याचा इतरांना विस्मय वाटला. तसे त्यांच्या मुद्रेवर दिसू लागले. तेव्हा डेसिस म्हणाला, 'सीझर हा स्तुतिवश आहे. माणसे प्रशंसेच्या शब्दांनी चढून जातात व फसतात असे तो नेहमी म्हणतो. पण तो स्वतःच स्तुतिप्रिय आहे!' वास्तविक सीझरची याच्या अगदी उलट ख्याती होती. त्याला तोंडपूजा लोकांचा तिटकारा होता. आणि तो प्रशंसेला मुळीच भुलत नाही हे प्रसिद्ध होते. त्यामुळे इतर कटवाल्यांना विश्वास वाटेना. तेव्हा डेसियस पुढे म्हणतो, 'तुमची शंका बरोबर आहे. पण मी सीझरशी बोलताना त्याला हेच सांगतो. आपल्याला आत्मस्तुती आवडत नाही, खुशमस्कऱ्यांचा आपल्याला तिटकारा आहे. आपण स्तुतिप्रिय नाही, आपण कधी प्रशंसेच्या शब्दांनी भुलणार नाही! आणि मौज अशी की, हीच स्तुती सीझरला इतकी आवडते की, तो अगदी भुलून जातो. तेव्हा तुम्ही चिंता करू नका. त्याला आणणे माझ्याकडे लागले' आत्मस्तुतीचा अत्यंत तिटकारा असलेला मनुष्य 'तसा तिटकारा तुम्हाला आहे' या स्तुतीने भुलून जातो, ही स्तुती त्याला प्रिय होते ! हे अंतरंगदर्शन.
 रामचंद्रांचा धैर्यलोप श्रीरामचंद्रांची कीर्ती अशी की, ते परम पितृभक्त होते. पित्याच्या वचनासाठी त्यांनी राज्यत्याग केला. त्यांची तशी कीर्ती आहे व त्यांनी राज्यत्याग पित्राज्ञेसाठी केला, हे खरे आहे. पण रामायणातील पुढील प्रसंग पहा. सीतेसह रामलक्ष्मण अरण्यातून चालले असता, एका वृक्षाखाली एक महाभयंकर विकटमुख, घोरदर्शन, बीभत्स असा विराध नावाचा राक्षस त्यांच्या दृष्टीस पडला. त्या विराधाची दृष्टी त्यांच्याकडे वळताच घोर गर्जना करीत तो धावून आला आणि त्याने सीतेला उचलून खांद्यावर घेतली. रामलक्ष्मणाला तो म्हणाला, 'अरे तुम्ही तापसी दिसता. मग ही स्त्री तुमच्या बरोवर कशी ? तुमची घटका भरली म्हणून तुम्हाला येथे येण्याची बुद्धी झाली आहे. आता ही स्त्री माझी बायको होईल. तिच्या देखत मी तुम्हाला कंठस्नान घालणार आहे.'
 हे भयंकर दृश्य पाहून क्षणभर रामचंद्रांचे धैर्य लुप्त झाले. त्यांच्या तोंडाला कोरड पडली. ते लक्ष्मणाला म्हणाले, 'काय विपरीत गोष्ट झाली ही! अरे आज कैकेयीचे मनोरथ खरे पूर्ण झाले. पुत्राला राज्य मिळूनही ती संतुष्ट झाली नाही. मला तिने वनात धाडले. पण वनात मला दुःख झालेच नाही आज मात्र तिची इच्छा तृप्त झाली. कारण वैदेहीला परपुरूषाचा स्पर्श व्हावा यापेक्षा मला जास्त दुःख कशाचेही नाही. लक्ष्मणा, पिताजींच्या मृत्यूमुळेही मला इतके दुःख झाले नव्हते. राज्य गेले त्याचेही मला काही वाटले नाही. पण आजचे दुःख मात्र असह्य आहे.' हे बोलताना रामचंद्रांच्या डोळ्यांला अश्रुधारा लागल्या. हे पाहून लक्ष्मणं अत्यंत विस्मित झाला तो म्हणाला, 'रामचंद्रा, आज तुम्हाला काय झाले आहे ? सर्व भूतांचे नाथ तुम्ही. आज अनाथासारखे अश्रू ढाळता ? हे आहे काय ?'
 पुढच्याच क्षणी रामचंद्र स्थिरमन झाले व त्यांनी धनुष्यावर बाण सज्ज केला.
 रामचंद्रासारख्या महाधनुर्धराचे धैर्य क्षणभर तरी लुप्त होईल, हे आपल्याला शक्य वाटत नाही. आणि पितृमरणापेक्षा दुसरे कोणते दुःख त्यांना जास्त जाणवेल. हेही खरे वाटत नाही. पण तसे झाले, क्षणभर का होईना तसे झाले. असे महाकवी वाल्मीकी यांनी लिहून ठेविले आहे.
 श्रीकृष्णांचाही असा एकदा धैर्यलोप झाल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांचे शाल्वाशी युद्ध चालू होते. शाल्वाने त्यांचा पिता वसुदेव याची मायेने एक मूर्ती निर्माण करून तिचा शिरच्छेद केला. ते खरे भासून श्रीकृष्णांना भोवळ आली. त्यांच्या हातातून शार्ङधनुष्य गळून पडले. आणि मुहूर्तभर ते मूर्च्छित झाले !
 ३ निर्णय शक्ती नाही हॅम्लेट या नाटकात कवीने हॅम्लेटच्या दोलाचलवृत्तीचे, निर्णयशक्तीहीन मनाचे, शंकाविकल बुद्धीचे कसे वर्णन केले आहे पहा. या नाटकाचे कथानक शेक्सपीयरने उसने घेतलेले आहे. त्यातील स्वभावरेखाही त्या मूळच्या नाटकातल्याच आहेत. मग यात शेक्सपीयरचे स्वतःचे काय आहे ! त्याने लाविलेला त्यातील घटनांचा अर्थ ! शेक्सपीयर आपल्याला तेथे भेटतो. नाटकातील घटनात किंवा व्यक्तिरेखांत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनाचे रहस्य उकलून दाखविणे, त्या घटनांची संगती लावून दाखविणे यांत कवीचे कवित्व आहे.
 दुभंग मन हॅम्लेटच्या वडिलांचा त्याच्या चुलत्याने खून केला होता. आणि सर्पदंशाने त्याला मृत्यू आला, असे जाहीर करून भावाचे राज्य व त्याची पत्नी यांचा त्याने अपहार केला होता. हॅम्लेटला या प्रकरणी शंका येत होती. पण वस्तुस्थिती माहीत नसल्या कारणाने त्याला काही करता येत नव्हते. पण एका रात्री भुताच्या रूपात वडिलांनी येऊन त्याला खरी गोष्ट सांगितली आणि 'माझ्या या खुनाचा तू सूड उगवला पाहिजे' अशी त्याला आज्ञा दिली. दुसरा कोणी तरूण हॅम्लेटच्या जागी असता तर संतापाने बेभान होऊन सुरा घेऊन धावला असता व क्षणार्धात त्याने चुलत्याला ठार केले असते. हॅम्लेटची पहिली प्रतिक्रिया तशीच झाली. वडील 'तुला त्याचे नाव सांगतो,' असे म्हणताच एकदम, 'सांगा, सांगा, लवकर सांगा, म्हणजे वायुवेगाने, मनाच्या वेगाने मी जातो आणि बदला घेतो' असे तो म्हणाला होता. आणि भूत अंतर्धान पावताच त्याने तशी शपथही घेतली होती. पण हॅम्लेटच्या हातून हे त्वरेने तर नाहीच घडले, पण केव्हाही पुढे घडले नाही. का ? हॅम्लेटची अतिविचारी वृत्ती ! द्विधा वृत्ती ! या नाटकाचे वर्णन करताना एका टीकाकाराने म्हटले आहे की द्विधावृत्तीच्या मनाची ही शोकांतिका आहे. अति विचाराने माणसाच्या मनाची कार्यशक्ती विकल होते. कोठल्याच बाबतीत त्याचा निर्णय म्हणून होत नाही. त्यामुळे तो कृती करूच शकत नाही. स्वतः हॅम्लेटच्या तोंडीच मानवी जीवनाचे हे रहस्य शेक्सपीयरने घालून ठेवले आहे. तो म्हणतो, 'विवेक, विवेक ! या विवेकामुळेच मनुष्य दुबळा होतो, भित्रा होतो !' हॅम्लेट म्हणजे या अतिविवेकाचे मूर्त रूप.
 चुलत्याला ठार करावयाचे असे हॅम्लेटने ठरविले, पण त्याला शंका आली की, "त्या भुताने सांगितले ते खरे कशावरून ? सैतान पुष्कळ वेळा मनुष्याला पापप्रवृत्त करण्यासाठी अनेक रुपे घेऊन त्याला फसवतो. तसेच या वेळी झाले असेल. सैतानाने माझ्या पित्याचे रूप घेऊन मला मुद्दाम खुनाला प्रवृत्त करण्याचा विचार केला असेल, शक्य आहे. तेव्हा यापेक्षा जास्त भक्कम पुरावा हवा. याच वेळी गावात एक नाटक कंपनी आली होती. तिच्याकडून आपल्या पित्याच्या खुनाच्या प्रसंगाचे नाटक बसवून घ्यावयाचे आणि ते पाहत असताना आपल्या चुलत्याच्या मुद्रेवर काय भाव दिसतात, ते निरखावयाचे आणि त्यावरून निर्णय करावयाचा, असे हॅम्लेटने ठरविले. त्यावेळी जर तो गडबडला, आपले रहस्य फुटले म्हणून घाबरुन उठला तर मात्र तोच खुनी हे निश्चित आणि मग......
 पण या मधल्या काळात हॅम्लेटचे चित्त सारखे दुभंग राहिल्याने तो अगदी हैराण होऊन गेला. आणि जीवनाचा अंत करुन टाकावा असे त्याला वाटू लागले. पण त्याही बाबतीत त्याचा निर्णय होईना. जगावे की मरावे, हाही प्रश्न त्याला सोडविता येईना. कारण काय ? आत्महत्या कशासाठी करावयाची ? मनाला इंगळ्या लागल्या आहेत, यातना असह्य झाल्या आहेत, दगाबाजी, विश्वासघात, कृतघ्नता, यामुळे झालेला संताप सहन होत नाही. तो सर्व ताप एका क्षणात नष्ट व्हावा, मन मुक्त व्हावे. म्हणूनच ना मरण पत्करावयाचे? पण मेल्यावर माणूस मरतो हे तरी निश्चित आहे का? हा देह टाकल्यावर आत्मा तसाच रहात असला, मन मागे उरतच असले, तर जिवंतपणीच्या सर्व यातना तशाच राहणार. मग मरुन तरी काय उपयोग'
 मरणाच्या बाबतीतही आपण निर्णय करू शकत नाही, हे पाहून हॅम्लेट स्वतःवरच चिडून गेला. तो म्हणाला, 'विचार, विचार ! हा अतिविचार ! यानेच माणूस दुबळा होतो आणि कोणतीच कृती त्याच्या हातून घडत नाही'
 आपला दोष हॅम्लेटच्या ध्यानी आला, पण तो त्याच्या रक्तातच भिनला होता. त्यामुळे जाणीव होऊनही तो त्याला घालवू शकला नाही. नाटक कंपनीच्या लोकांनी राजाच्या खुनाचा प्रसंग बरोबर वठविला. तो पाहून हॅम्लेटचा चुलता घाबरून उठला व नाट्यगृहातून निघून गेला. आता हॅमलेटला हवा होता तो पुरावा मिळाला होता. तेव्हा पित्याच्या आज्ञेप्रमाणे चुलत्याला ठार मारून खुनाचा बदला घ्यावयाचा हा त्याचा निश्चय झाला. पण निश्चय टिकला तर तो हॅम्लेट कसला ?
 सुरा घेऊन हॅम्लेट चुलत्याच्या महालात गेला. आणि आता त्याला ठार करणार तोच त्याला शंका आली. राजा गुडघे टेकून प्रार्थना करीत होता. हॅम्लेटच्या मनात विचार आला, 'माझ्या पित्याला याने झोपेत असताना मारले. झोपेत माणसाच्या मनात वेडेवाकडे, पापमय, विचार चालू असतात. अशा स्थितीत मरण आले म्हणजे मनुष्याला पापाची देवापुढे कबुली देऊन पापक्षालन करण्याची संधी मिळत नाही. म्हणजे माझे पिताजी नरकातच गेले असणार. आणि राजाला प्रार्थना करीत असताना मी ठार केले तर तो निश्चितच स्वर्गाला जाणार ! म्हणजे मी साधले काय ? तर पिताजींना नरकाला धाडल्याबद्दल मी याला स्वर्गात धाडणार ! वाः ! काय पण हा सूड ! छे छे ! आता याला मारता कामा नये. हा जेव्हा एखाद्या पाप विचारात किंवा दुष्ट कृत्यात गुंतला असेल तेव्हा याला ठार केले तरच तो सूड होईल. तेव्हा माझ्या खड्गा, तू परत ठिकाणी जा. तुला उपसण्याची वेळ अजून. आली नाही.'
 दुदैव असे की, ती पुन्हा केव्हाच आली नाही. हॅम्लेटच्या या निर्णयहीनतेने ती येऊच दिली नाही. आणि त्याच व्याधीने शेवटी या राजबिंड्याचा बळी घेतला.
 हॅम्लेटची मूळ कथा अगदी सामान्य होती. साहित्यात तिला स्थान नव्हते. शेक्सपीयरने मानवी जीवनाच्या, मनुष्याच्या मनाच्या एका अंगाचे दर्शन घडवून कार्यकारण भाव या शृखलेने त्या मूळच्या घटनात एक नवी, संगती दाखविल्यामुळे ती कथा विश्वसाहित्यात अक्षर होऊन बसली.
 ४. अंतःकरणाचा निर्णय हॅम्लेटशी तुलना करता कालिदासाचा दुष्यंत जास्त शहाणा ठरतो. कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतला दृष्टीस पडताच त्याचे मन तिच्यावर जडले. पण लगेच त्याच्या मनात शंका आली. तो क्षत्रिय होता. आणि शकुंतला ही कण्वांची कन्या आहे, असे तिच्या सख्यांच्या तोंडून त्याने ऐकले होते. कण्व हे ब्राह्मण. त्यांची कन्या क्षत्रियाने वरणे हे त्या काळच्या चातुर्वर्ण्य नियमाच्या विरुद्ध होते. म्हणजे तो अधर्म होता. आणि धर्माचा रक्षणकर्ता जो राजा त्यानेच असा अधर्म करणे उचित नव्हते. म्हणून आपले मन हिच्यावर जडणे योग्य की अयोग्य अशी शंका येऊन त्याचे चित्त द्विधा झाले. पण लगेच त्याला दुसरी एक आशा वाटू लागली. तो म्हणाला की, ही शकुंतला कण्वांना ब्राह्मणेतर वर्णाच्या स्त्रीपासून झाली असण्याचा संभव आहे. तसे असल्यास मग मी हिला वरू शकेन. कारण मग ती ब्राह्मण वर्णाची असणार नाही. हा आशादायक विचार मनात येताच तसे निश्चितच आहे, असे त्याने स्वतःच ठरवून टाकले. तो म्हणाला, 'ज्या अर्थी माझ्यासारख्या श्रेष्ठ, पुरुषाचे सुसंस्कृत मन हिच्यावर जडले आहे, त्या अर्थी ही क्षत्रियाने वरण्यास योग्य अशी कन्या असलीच पाहिजे. कारण कोणत्याही बाबतीत संदेह निर्माण झाला असता. सज्जनांच्या अंतःकरण प्रवृत्तीने दिलेला निर्णय हाच प्रमाण असतो.'
 तत्त्वान्वेश दुष्यन्ताने असा निर्णय करून शकुंतला ही क्षात्रपरिग्रहक्षमा आहे, असे ठरविले तरी त्याचे मन पुनः पुन्हा साशंक होतच होते. तेवढ्यात एक भृंग कमलावरून उठून शकुंतलेच्या मुखाभोवती फिरू लागला. त्याला पाहून स्वतःचीच निर्भत्सना करू लागला. तो भृंगाला उद्देशून म्हणाला, 'अरे तू हिच्या इतका जवळ जातोस, तिला स्पर्श करतोस, तिच्या कानात काही रहस्य सांगतोस, आणि तिच्या अधराजवळ जाऊन तिचे चुंबनही घेतोस. हे सर्व आपण करावे, असा अभिलाष माझ्याही मनात निर्माण झालेला आहे. पण आम्ही थोरपदी असलेले राजे पडलो ! तेव्हा हे योग्य की अयोग्य, धर्म्य की अधर्म्य याची चिकित्सा करीत बसणारच. ही जी चिकित्सा, हा जो तत्त्वान्वेष म्हणजे योग्यायोग्य मीमांसा, हा जो अति विचार, त्याने आम्ही जखडून पडलो, गमावून बसलो. तू मात्र अशा तत्त्वान्वेषाच्या फंदात क्षणभरही न पडल्यामुळे आपला कार्यभाग साधून घेतलास आणि धन्य झालास.' हॅम्लेट म्हणाला की या अतिचिकित्सेमुळे, तत्त्वान्वेषामुळे मनुष्य दुबळा होऊन निष्क्रिय बनतो. दुष्यन्ताने त्याच शब्दात हा विचार सांगितला आहे. 'वयं तत्त्वान्वेषात् मधुकर, हताः ।' 'धर्माधर्ममिमांसेत गुंतल्यामुळे आम्ही वंचित झालो. येथपर्यंत दोघांची व्याकुळता सारखीच आहे. पण दुष्यन्ताने त्यातून चटकन स्वतःची मुक्तता करून घेतली. 'माझ्या मनाने दिलेला निर्णय हाच प्रमाण होय' असा ठाम सिद्धान्त त्याने केला. म्हणून तो कृतार्थ झाला. ते सामर्थ्य हॅम्लेट जवळ नव्हते. म्हणून त्याचा सर्वतोपरी नाश झाला.
 ५ अनन्यत्व गेले रघुवंशाच्या अकराव्या सर्गात कालिदासाने परशुरामाच्या अंतःकरणातील एक खोल कप्पा असाच उघडून दाखविला आहे. रामाने शिवधनुष्याचा भंग केला, हे ऐकून परशुरामाला संताप आला होता. कारण ते धनुष्य जनकाला त्याने दिले होते. त्यावर आपल्या खेरीज कोणीही प्रत्यंचा चढवू शकणार नाही असा त्याला अभिमान होता. धनुर्भंगाचे वर्णन करताना कालिदासाने म्हटलेच आहे की, 'मोडता मोडता, त्या धनुष्याने, क्षत्रिय हा पुन्हा उदयाला आला आहे, असेच जणू परशुरामाला सांगितले.' परशुराम त्यामुळे डिवचला गेला होता. तशात रामचंद्र अयोध्येला परत जात असताना परशुरामाची त्यांशी गाठ पडली. तेव्हा त्याने स्पष्ट परखड शब्दात रामचंद्रांना सुनावले की 'हे धनुष्य आतापर्यंत कोणालाच वाकविता आले नव्हते. ते वाकवून तू माझ्या शौर्य - पराक्रमाचाच अपमान केला आहेस.' येथपर्यंत परशुरामाच्या मनातला जो भाव प्रकट झाला आहे तो सहज समजण्याजोगा आहे. त्यात गहन असे काही नाही. आपल्या पराक्रमाचा अपमान झाला की वीरपुरुष संतापतो हे सत्य सर्वत्र महशूर आहे. पण त्यानंतर पुढच्या वाक्यातले त्याचे जे उद्गार आहेत. ते मात्र नित्याच्या पलीकडचे आहेत. ते ऐकल्यावर सयुक्तिक आहेत, असे आपल्याला सहज पटते. पण हे नवीन दर्शन आहे असे मात्र वाटते. व त्यामुळे निराळा आनंदही लाभतो. परशुराम म्हणाला, 'अरे आजपर्यंत जगात 'राम' शब्द उच्चारला की, मी परशुधारी राम एवढाच त्याचा अर्थ होत असे. राम शब्दाने एकच एक राम निर्देशिला जात असे. आणि आता मात्र त्या शब्दाने तूही निर्देशिला जाशील. माझे अनन्यत्व, असामान्यत्व ते काय राहिले? त्या शब्दाने आता मला लाजच निर्माण होणार.'
 मानवाच्या हृदयसरात खोलवर दडून राहिलेले असे भाव न्याहाळून त्यांना प्रकाशात आणणे हे महाकवी खेरीज अन्यांना साधत नाही.
 ६ मातृहृदय परशुरामासारख्या वज्रकठोर तापसाच्या हृदयाचे दर्शन जसे कवीने घडविले आहे तसेच मातृहृदयाचे, त्यातील अत्यंत कोमल भावांचे, विरघळत्या वात्सल्याचे पण लोभस वर्णन त्याने केले आहे. रामलक्ष्मण लंकेहून परत आले. कौसल्या व सुमित्रा यांना त्यांना पाहून इतका आनंद झाला की डोळ्यांत आसवे जमल्यामुळे त्यांना पुत्र दिसेनातच. त्यांना जवळ घेतल्यावर केवळ स्पर्शानेच त्यांनी ज्यांना ओळखले. पण स्पर्श होताच त्यांच्या हाताला काय जाणवले ! रामलक्ष्मणांच्या अंगांवर राक्षसाच्या हत्यारांनी केलेल्या जखमांचे पुष्कळ वण होते. मातांची भावना अशी की ते वण अजून ओलेच आहेत. म्हणून त्या त्यांच्यावरून मायेचा हात फिरवू लागल्या. आणि तसा हात फिरविताना मनात काय आले ? कालिदास म्हणतो, 'क्षत्रिय कुळात जन्मलेल्या स्त्रियांना 'वीरमाता' होण्याची आकांक्षा असते. ती त्यांची सर्वश्रेष्ठ स्पृहा असते. पण पुत्रांच्या त्या जखमा पाहून त्यांना असे वाटले की 'वीरमाता' ही पदवी आपल्याला कधीही न मिळाली तरी चालेल. पुत्रांना त्यासाठी या यातना सोसाव्या लागत असतील तर नको ती ख्याती, नको ते भूषण. बाळ सुखात असले की झाले'
 ७ निःशब्द आत्मयज्ञ कविवर्य तांबे यांनी हिंदू विधवेच्या अंतरीचे सूप्त भाव असेच मोठ्या कौशल्याने वर्णिले आहेत. त्यांच्या काळी यमनियमांची इतकी बंधने तिच्यावर घातलेली असत आणि इतक्या निष्ठेने व भक्तीने ती पाळताना दिसत असे की, हिच्या मनात संसाराच्या काही वासना असतील, अशी शंकासुद्धा कोणाला येऊ नये. तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, कथापुराणे यांमुळे तिच्या मनातील वासना दग्ध झालेल्या असत, त्यांचे उन्नयन झालेले असे, असे सनातन पक्षांचे अभिमानी वर्णन करीत, आणि यातच हिंदुधर्मशास्त्राचे अलौकिकत्व आहे, असे सांगत असत. पण त्या अंतरंगाचा ठाव घेण्याचा कधी कोणी प्रयत्नच न केल्यामुळे त्याचे खरे रूप कधी कोणाला कळलेच नाही. कवीने आपल्या काव्यात त्याचे दर्शन घडविले आहे. 'निःशब्द आत्मयज्ञ' या कवितेत हिंदू विधवा ही मनातल्या मनात कशी जळत असली पाहिजे, ते स्पष्ट करून सांगितले आहे. कोणी तरुण पुरूष त्या कुटुंबाच्या नात्यातला होता. तो त्या घरी वरचेवर येत असे. पण त्याच्याशी ती बोलताना कधी कुणाला दिसली नाही. त्यांची दृष्टादृष्ट झालेलीही कधी कुणी पाहिली नव्हती. तो जेवायला आला तरी तिच्या चित्ताला हर्षविषाद कधी स्पर्शत नसत. त्याला मदनासारखे सुंदर रूप होते. पण तिने कधी डोळा उचलून त्यांच्याकडे पाहिले नव्हते. पण एक दिवस तो विधवांच्या दैन्याबद्दल बोलत असताना ती आतल्या बाजूस उभी राहून कानोसा घेत आहे, असे मला वाटले. तिने कधी पत्र लिहिलेले कुणाला माहीत नाही, पण एक दिवस तिच्या बोटाला शाई लागलेली मात्र दिसत होती, आणि कागदाचे तुकडे भोवती पसरलेले दिसले. रात्री ती अंथरुणावर जागत असलेली आढळली नाही, पण कधी कधी तिची उशी भिजलेली असावी असे वाटे. या नंतर ती हळूहळू खंगू लागली व शेवटी 'दीन दयाळा मरणा, सोडव यातून' असे म्हणत तिने जगाचा निरोप घेतला.
 सूर्य फूल 'बघुनि तया मज होय कसेसे' या कवितेत विधवेच्या तोंडूनच तिच्या मनातले भाव व्यक्त केले आहेत. वरच्या कवितेत कवीने तिच्या वर्तनावरून ते जाणले होते. अर्थात त्याला तिच्याविषयी सहानुभूती होती. म्हणूनच त्याला ते जाणवले. एरवी काही व्रतवैकल्यात चूक झाल्यामुळे, किंवा यात्रेला जायला न मिळाल्यामुळे, ती रडत असेल असे इतरांनी भाष्य केले असते. या कवितेत कवीच बोलतो आहे, पण तो तिच्या मुखाने बोलत आहे, 'मना, तुला वेड तर लागले नाही ना ? तू त्याच्यासाठी का झुरतोस ? मी एक हीन दीन ब्राम्हण विधवा, प्रेत उचलून टाकून द्यावे, तशी मला समाजाने टाकलेली आहे, माझे शरीर म्हणजे थडगेच आहे. मी सदैव त्यात असते. पण त्यामुळेच मनातल्या वासनांची भुते मला सारखी छळीत असतात. हातांनो, त्याच्या धोतरांच्या निऱ्या करून ठेवाव्या असे तुम्हाला वाटते, त्याच्यासाठी आसन घालावे अशी वासना तुम्हाला होते, पण याची जाणीव त्याला कधी तरी होणे शक्य आहे का ? तो कधी काही विचारणार आहे का ? तो आला म्हणजे डोळ्यांनो तिकडे का वळता ? कानांनो, त्याचे शब्द चोरून ऐकण्याची का धडपड करता ? माझ्या मनात जळजळ का व्हावी ? दुष्ट दैवा, मला अशी का छळतोस ? त्याच्या नेत्रांच्या प्रकाशात माझा जीव आनंदून जातो, त्याच्या सुखासाठी आपली आहुती द्यावी असे मनात नित्य येते, पण हे सर्व व्यर्थ आहे. हे मना, तुला कळत नाही का ? मग ही तडफड कशासाठी ? सूर्य आकाशात असतो, सूर्यफूल जमिनीवर असते. तो फिरतो तसे हे फिरते. त्याला त्याची दादही नसते. शेवटी तो मावळला त्या बाजूला मुख झुकवून फूल गळून जाते. तसं माझं आहे ! मग मना, उगीच आशा का धरतोस?'
 मी करंटी 'हिंदुविधवेचे मन' ही तिसरी कविता. पहिल्या कवितेत कवीने तिच्या दुःखाला शब्दांचा स्पर्शही होऊ दिला नाही. दुसरीमध्ये शब्द उमटले आहेत, पण ते मनातल्या मनात. त्या शब्दांना नाद नाही. या कवितेत एका उदार मनाच्या तरूणाने तिला मागणी घातली असताना तिने त्याला जे उत्तर दिले. त्यातून तिच्या भावनांना वाट करून दिली आहे. हिंदूविधवेच्या मनात संसार, मुलेबाळे यांचा मोह असतो, तिला सर्व वासना असतात, हे खरे. पण रुढी, धर्मशास्त्र, समाजाची जरब ज्यामुळे ती इतकी भयभीत झालेली असते की, संसाराची संधी चालून आली तरी तिचा धीर होत नाही. आपल्यामुळे त्या तरूणाचा अधःपातच होईल, अशी भीती तिला वाटते. त्या पापाचे धनी व्हावे असे तिला वाटत नाही. ती त्यांचा म्हणते, 'जे अशक्य आहे ते बोलून काय उपयोग ? तुम्हाला मी कसे समजून सांगू ? माझे, दैन्य, माझे दुर्दैव पाहून तुम्हाला दया आली, व हे साहस करायला तुम्ही तयार झाला, हे औदार्य मला दिसत का नाही ? चराचरात सर्वत्र प्राणी जोडीने राहतात, वेल सुकली तरी पाणी मिळाल्यावर तिला फुले येऊ शकतात, असं तुम्ही परोपरीने सांगता. पण मला विधवेला हे कशाला ! सुखमंदिराशी मी आले. तेवढयात परमेश्वराने त्याचे दार बंद केले. देवाने बंद केलेले ते दार, तुम्ही मनुष्य असून उघडू पाहता. मला त्या मंदिरात न्यावे, अशी तळमळ तुम्हाला आहे. हे तुमचे ऋण मी फेडू शकणार नाही. पण मी पापिणी आहे, करंटी आहे, या मंदिराच्या बाहेर घिरट्या घालाव्या एवढीच माझी योग्यता. एखाद्या अनुरूप सखीला घेऊन तुम्ही आत जा. आणि आता आणखी काही बोलू नका. माझे धैर्य त्यामुळे ढासळेल आणि मोह पडून भलतेच उत्तर माझ्या तोंडून जाईल. तेव्हा असे नरकाचे भागीदार होऊ नका ! माझा कलंकित हात तुमच्या हाती न देता कोणाचा तरी शुभ, मंगल असा कर परमेश्वराने तुमच्या हाती यावा, अशी मी देवाजवळ नित्य प्रार्थना करीन.
 या तीन कवितांत हिंदूविधवेच्या मनातल्या सर्व भावना, वासना, विकार, तिच्या कल्पना, तिचे विचार यांचा कवीने भिन्न भिन्न भूमिका घेऊन उत्तम आविष्कार केला आहे. विधवा स्वतः बोलू शकत नाहीत, त्यांना काही अशा भावना असतात, हे समाजाला मान्यच नाही. तेव्हा त्यांचे दर्शन घडविण्याचे काम कवीने केले आहे. या हतभागी स्त्रियांच्या चित्तात केवढी जळ जळ, केवढा प्रक्षोभ, केवढा वडवानळ धग धगत असतो, याची सम्यक कल्पना, अगदी थोड्या शब्दांत कवीने दिली आहे. काव्यकलेचे यश ते हेच.
 ८ न पेलणारी गोळी अंतरंग दर्शनाचे आणखी एक असेच मनोवेधक उदाहरण सांगून हा विभाग संपवू. पु. ल. देशपांडे यांनी 'तुझे आहे तुजपाशी' या आपल्या नाटकात 'आचार्य' यांच्या अंतर्मनातले धागे दोरे फार उत्कृष्ट रीतीने पिंजून दाखविले आहेत. गांधी पंथाचा हा माणूस, कमालीचा कडक, व्रतस्थ, निग्रही, यमनियम संभाळणारा असा दिसतो. खाणेपिणे, स्नान, कपडे करणे, बोलणे, बसणे, या प्रत्येक बाबतीत आचार्यांना कमालीची शूचिर्भूतता हवी असते. यात कोणाचा काही प्रमाद झाला तर तेथे क्षमा नाही. आणि भीडभाडही नाही. उषा, काकाजी यांचा त्यांचा काही परिचय नसताना पहिल्या भेटीच्या वेळीसुद्धा आचार्य निरनिराळ्या कारणांवरून त्यांची कानउघाडणी करण्यास कमी करीत नाहीत. ते जीवनाचा सारखा गंभीरपणे विचार करतात, व इतरांनी तसेच करावे, असा उपदेश करतात. चित्तशुद्धी, आचारशुद्धी, मोह जिंकणे, अहिंसा, मौन, पश्चात्ताप, सत्यकथन, प्रार्थना, अनासक्ती हे शब्द सारखे त्यांच्या तोंडी असतात. आणि त्यांचे आचरणही त्यांना साजेसे असते.
 त्यांचे हे तत्त्वज्ञान कोणालाच मान्य नसते हे खरे. त्यांचा भाचा सतीश तर त्यांची सांरखी टिंगल करीत असतो. काकजींनाही मनात तसेच वाटत असते. उषा त्यांची मोठी भक्त, पण तिचे मनही डळमळले आहे. श्याम त्यांचा शिष्य झाला आहे. पण त्याचे वागणे व बोलणे म्हणजे आचार्यांचे मूर्तिमंत विडंबन आहे. पण असे आहे तरी, म्हणजे आचार्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे वर्तन कोणाला पसंत नसले तरी, त्यांची स्वतःची त्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा नसेल अशी शंकाही कोणाला आलेली नव्हती. सतीश त्यांच्या तोंडावर व इतर लोक त्यांच्या मागे त्यांची चेष्टा करतात. पण ती त्यांच्या तत्त्वज्ञानाची, यमनियमांची, एकांतिक मनोवृत्तीची. ते हट्टाग्रहीं आहेत. त्यांना सामान्य विवेकही नाही. ते दुर्वास आहेत हे सर्वांना मान्य आहे. पण त्यांच्या अंतरात याहून काही भिन्न असेल असे मात्र कधी कोणाला वाटले नव्हते. पण शेवटी सर्वच त्यांच्यावर उलटली, उषा देवासकर फिरली. त्यांच्यावर, त्यांच्या सर्व जीवनक्रमावर व त्यांच्या तत्त्वज्ञानावर तिने कडक टीका करण्यास सुरवात केली. त्यांनी मुलीसारखी वाढविलेली गीता हीही उलटली. तिच्याही भावना उषासारख्याच आहेत, हे उषाच्या बोलण्यावरून त्यांना कळले तेव्हा त्यांचे मन ढासळू लागले, आणि शेवटी गीतेने 'त्यांना कुणीतरी सांभळले पाहिजे, लहान मुलासारखे सांभाळले पाहिजे. हल्ली ते लवकर चिडतात, रागावतात, ते आता थकले आहेत.' असे म्हणून त्यांना दयाविषय बनविले तेव्हा, आपण जगात संपूर्ण अपयशी झालो, हे त्यांच्या ध्यानी येऊन त्यांनी अट्टाहासाने टिकवून धरलेले निष्ठेचे आवरण फाटून गेले व त्यांनी स्वतःच आपले अंतरंग उघडे केले. ते म्हणाले; 'जवानीत सार्वजनिक कार्यात उडी घेतली; पण पुढे पोहता पोहता हात थकू लागले. तरी बाहेर निघून किनाऱ्याला येण्याची सोय नव्हती. सारा समाज मी किनाऱ्यांशी आलो की, मला परत आत ढकलायचा, आणि म्हणायचा; आचार्य, तुम्ही असंच धडपडत राह्यलं पाहिजे. संन्याशाची वस्त्रं एकदा अंगावर चढवली की, ती उतरून संसारी माणसाची वस्त्र चढवणं म्हणजे गुन्हेगाराची वस्त्र वढवण्यापेक्षा भयंकर. म्हणून मग तसाच निर्भयतेचे पाठ बडबडत राहिलो. माझा अहंकार मात्र जबर होता. जे बुद्धाला जमलं, जे ख्रिस्ताला जमलं, आम्ही हुरळलो- मलाही, आपण दीपस्तंभ असल्याचा अहंकार झाला. म्हणून शेवटी स्वतःला मी हास्यास्पद करुन घेतलं. गीता, तुझा आचार्य शेवटी दया करावी, कीव करावी असा वस्तू झाला.'
 याचा अर्थ असा की, आचार्यांनी न पेलणारी गोळी घेतली होती. कोणत्याही पंथातला आरंभीचा जोष गेला की त्या पंथात पडलेल्याची अशीच स्थिती होते. त्यांना ती गोळी पेलत तर नसते. पण तसे म्हणण्याइतका प्रामाणिकपणा किंवा धैर्य त्यांच्या ठायी नसते. राजकारणातच नव्हे तर धर्म, समाजकारण प्रत्येक क्षेत्रात असा एक वर्ग नेहमीच असतो. त्याचे फार सुंदर चित्रण देशपांडे यांनी या नाटकात केले आहे. भिकू, वासू, यांनी गांजाची न पेलण्याइतकी मोठी गोळी घेतली होती, आणि आत्मा अमर आहे, असा बकवा ते करीत होते. आचार्यांच्या सबंध वर्गाचे हे अगदी बोजड रुपात केलेले, पण अत्यंत परिणामकारक विडंबन आहे. श्यामच्या व्यक्तिरेखेतून त्या वर्गाचे जे प्रतीक लेखकाने उभे केले आहे ते जास्त सूक्ष्म आणि म्हणूनच जास्त हृद्य आहे. उषा ही काही काल त्याला बळी पडली होती. पण ती लवकरच सावरली. गीता ही लहानपणीच त्या पोकळ तत्त्वांना बळी गेली होती. तिचे परिवर्तनही त्या वर्गाच्या भोंदू आचरणावर केलेली कडक टीका आहे. सतीश व काकाजी मात्र या कैफात कधी सापडले नाहीत. नाटकाच्या आरंभापासून शेवट पर्यंत 'न पेलणारी गोळी' हे एकच सूत्र गुंफले आहे. त्यामुळे त्या कलाकृतीला सुरेख घाट आला आहे. आणि आचार्यांच्या अंतरंग दर्शनाने त्याची शोभा द्विगुणित झाली आहे.
 सर्व जीवनाचा आलेख आतापर्यंत 'साहित्यांतील जीवनभाष्य' या विषयाचे दीर्घ विवेचन केले. या भाष्याची कल्पना स्पष्ट होण्यासाठी संस्कृत, मराठी इंग्रजी, फ्रेंच, अमेरिकन इ. भाषांतील अभिजात साहित्याची उदाहरणे दिली आहेत. ही उदाहरणे देताना एकेका ललित- कृतीतून त्या त्या विषयापुरतेच उदाहरण निवडले आहे. वामनराव जोशी, फडके यांच्या कादंबऱ्यातून मूल्यसंघर्षाचीच फक्त उदाहरणे निवडली आहेत. पण या लेखकांनी याच जीवनाच्या फक्त अंगावर भाष्य केले आहे, असे नव्हे. एक कादंबरी किंवा नाटक हे काही जीवनाच्या एकाच अंगाचे चित्र नसते. व्यापक जीवनाचा, कधी कधी सर्व जीवनाचा आलेख त्यात येत असतो. आणि त्या जीवनाचे प्रत्येक अंग लेखक आपल्या विशिष्ट दृष्टिकोणातून पाहूनच वर्णीत असतो. म्हणजे सर्वच जीवनावर तो आपल्या कृतीत भाष्य करीत असतो. वा. म. जोशी किंवा फडके यांच्या आपण विचारार्थ घेतलेल्या कादंबऱ्यात मूल्यसंघर्षाप्रमाणेच स्त्रीजीवनाचे दर्शन आहे, कला व नीती यांच्या संबंधाचे विचार आहेत, गांधीवाद आहे, हिंदु- मुस्लीम प्रश्न आहे, निसर्गसौंदर्य, चित्रकला यांचे मानवी जीवनातील महत्त्व आहे. मानवी जीवनाची अनेक अंगे आहेत. आणि त्यांविषयी दोघांनीही आपल्या दृष्टिकोणातून चित्रण केले आहे व विचार प्रदर्शनही केले आहे. पण आपण त्यातील आपल्या चालू विषयाची तेवढीच उदाहरणे घेतली आहेत. विषय व्यवस्थेच्या दृष्टीने तसे करणे अवश्यच होते. पण कवी किंवा लेखक सर्व जीवनाचा अवलोक आपल्या साहित्यात कसा करतो हे पाहणेही आपल्या विषयाच्या पूर्ततेसाठी अवश्य असल्यामुळे मराठीतील दोन थोर लेखक कविवर्य तांबे व पं. महादेवशास्त्री जोशी यांनी समग्र जीवन कसे पाहिले ते येथे सांगण्याचा विचार आहे.
 कविवर्य तांबे संसाराचे मर्म उकलून दाखविणे हे काव्याचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे असे तांबे यांनी 'रिकामे मधुघट' या आपल्या काव्यात सांगितले आहे. आणि, म्हातारपणामुळे मला तो मधू आता पिळता येत नाही, असे म्हणून क्षमा याचना केली आहे. याचा अर्थ असा की संसाराचे मर्म उकलण्यासाठी, या जीवनावर भाष्य करण्यासाठी माणसाच्या प्रज्ञा, बुद्धी, प्रतिभा, या सर्व शक्ती जागृत व कार्यक्षम असाव्या लागतात. त्या क्षीण झाल्या की काव्याचे ते उद्दिष्ट साधण्यास मनुष्य असमर्थ होतो. या शक्ती तरुण असताना मात्र तो संसाराचा, जीवनाचा मधू पिळून वाचकांना अर्पीत असतो. ताब्यांनी पिळून काढलेल्या मधूचे रूप काय आहे ते आता पहावयाचे आहे.
 या विश्वाला काही अंतिम हेतू आहे काय त्याला कोणी रचयिता आहे काय, त्यातील घडामोडीच्या मागे काही नियम, काही न्यायनीती दिसते काय, का हे विश्व म्हणजे एक केवळ पसारा आहे, व्यवस्थाशून्य ढिगारा आहे, यातील सर्व घटना बेबंद, बेतंत्र आहेत? काय आहे तरी काय ? हे व अशा तऱ्हेचे प्रश्न कोणत्याही विचारी मनाला सतावीत असतात. प्रत्येक मनुष्याला याचे, स्वतःपुरते तरी, काही तरी उत्तर निश्चित करावे लागते. कवी ते व्यक्त करतो इतकेच. या बाबतीत तांबे यांचे मत काय आहे ? कलेचे 'हृद्गत' या काव्यावरून असे दिसते की, त्यांच्या मते या विश्वरचनेला अर्थ आहे. चंद्र, सूर्य, तारे, नद्या, पर्वत, अरुण, संध्या, रात्र, तारांगण यांचे व्यापार काही हेतूने चालले असून त्यांच्या मागे या सर्वांचा नियंता निश्चित आहे, असे त्यांना वाटते. पर्वत परमेश्वराचे प्रवचन करतात, रात्र त्याच्याच यशाचे गान करते, सागर त्याचा रोष प्रगट करतो आणि दुष्टांना दण्डन होईल असे सांगतो. विद्युल्लता त्याच्या रूद्ररूपाचे दर्शन घडविते. हे जग म्हणजे परमेश्वराचे एक सुख स्वप्न असून संध्या ही त्या सुखस्वप्नात जगाला गुंगवून टाकते. 'तृणाचे पाते' या कवितेचा भावार्थ हाच आहे. ते पाते म्हणजे एक खड्ग असून दुष्कृतांना दंडण्यासाठी परमेश्वराने ते उगारले आहे, असे कवी म्हणतो. तृणाचे पाते. ही वस्तु सर्वांना दिसते. पण सर्वाना त्याच्याबद्दल असे वाटत नाही. कवी तसे म्हणतो याचे कारण त्याच्या दृष्टिकोणातून त्याला तसे दिसते. त्याला त्या पात्यातून कृष्णाची मुरली ऐकू येतो. नरसिंहाचे गुरगुरणे समजते व वामनाने दडपलेला बळीराजा त्याला त्यात दिसतो. हा सर्व कवीला विश्वरचनेचा समजलेला हेतू आहे. त्याने सांगितलेले संसाराचे मर्म ते हेच.
 मरणाविषयी तांबे यांनी निरनिराळ्या कवनांतून जे विचार मांडले आहेत, त्यांच्या मागे विश्वाविषयीची हीच श्रद्धा आहे. 'मरणात जग जगते' ही त्यांची विचारसरणी प्रसिद्धच आहे. पण जो त्याग करील, यज्ञ करील, सर्वस्वाचा होम करील' त्यालाच मरणाला मारून अमरता मिळविता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणूनच मरणाला भिण्याचे कारण नाही, मरण म्हणजे केवळ गाडी बदलणे आहे, असे ते म्हणतात. 'निरोप घेताना' या कवितेत वरूण, वायू, सूर्य यांनी आपले लालन पालन केले असे सांगून विश्वरचना सार्थ आहे व मरण म्हणजे नाश नव्हे, हाच दृष्टिकोण व्यक्त केला आहे.
 तांब्यांच्या सर्व कवितांमधून आशावाद भरून राहिलेला दिसतो, सारखा ओसंडत असतो, त्याचे रहस्य हेच आहे. मरणी अमरता आहे, ते सुखाचे दार आहे. ती हरिकरुणा आहे, तेथे तुला कवळण्यासाठी 'आई बाहू पसरून उभी आहे, असे त्यांना वाटते, भासते, जाणवते त्यांची तशी श्रद्धा आहे. म्हणूनच स्वतःच्या मनाभोवती 'घनतम पसरले असताना ते त्याला शुक्राकडे पाहायला सांगतात. रात्र अंधारी असते, अवसेची रात्र जास्तच अंधारी, तरी तीतूनच अरुण जन्माला येतो व सूर्य उगवतो. म्हणून निराश होण्याचे कारण नाही. भोवताली काटे असले तरी मध्ये फूल असते. हिमानंतर वसंत नियमाने येतो, हे ध्यानात घेतले तर तुझी कळ दूर पळेल, असा तांबे मनाला धीर देतात. पुढल्या कडव्यात तर आपत्ती, संकटे, विनाश यांमुळेच वैभव, उत्कर्ष, उन्नती होते, असे त्यांनी सांगितले आहे. फूल गळते खरे, पण त्यामुळेच फळ मिळते, चीज नष्ट होते व त्या विनाशातूनच वृक्ष निर्माण होतो, आणि तेल जळते म्हणूनच ज्योत गाजळते. मरणात अमरता असते ती अशी.
 दृष्टिकोण व्याक्तिगत साहित्यात मांडलेले विचार कवीचे व्यक्तिगत विचार असतात. तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोण असतो, हे आपण कधीही विसरता कामा नये. कवीच्या अनुभवास जे येते, त्याला जे वाटते ते तो सांगतो. आपले सत्य शास्त्रीय निकषावर तो कधी पडताळून पहात नाही आणि त्यामुळेच साहित्याला निराळे स्वतंत्र स्थान प्राप्त होते. साहित्याची गोडी वैयक्तिकतेतचं आहे. कारण प्रत्येक मानव एक स्वतंत्र, भिन्न व्यक्ती असते. तिच्यासारखी तीच. दुसरी नाही. आणि अशा या व्यक्तीच्या स्वतंत्र अनुभूतीतून जग कसे दिसते ते पाहण्यात मौज असते. कारण तशा स्वतंत्र अनुभूतीमुळेच प्रत्येक कवीचे काव्य स्वतंत्र, भिन्न, विशिष्ट झालेले असते. प्रत्येक वस्तूला विकास आणि नाश असतोच. कोणी विकासावर लक्ष केंद्रित करून आशावादी होतात, कोणी नाशावर भर देऊन निराशावादी होतात. गोविंदाग्रज गुलाबाला पाहून आनंदित होतात. पण लगेच त्यांच्या मनात येते, 'नाश व्हायासाठीच हा विकास !' दहाबारा तासापलीकडे फूल टिकत नाही. आणि यावरून परमेश्वराचा हा उफराटा न्याय आहे असा निष्कर्षही ते काढतात. दुष्ट, नीच माणसांना शंभर, शंभर वर्षे आयुष्य, आणि गुणसंपन्न गुलाबाला एक दिवसही पुरते नाही ! इन्द्रधनुष्य रेंदाळकरांना सुंदर दिसते. पण ते अल्पजीवी आहे म्हणून त्यांना दुःख होते. मोराचे नृत्य हे अत्यंत रम्य दृश्य आहे. पण त्याला ब्रह्मदेवाने कर्कश आवाज दिला, मधुर- स्वर दिला नाही म्हणून ते त्याला दोष देऊन खिन्न होतात. तांबे यांचा दृष्टिकोण अगदी उलट आहे. आपल्याला जे विसंगत वाटते. दुःखद भासते, त्यातूनच मानवाचा विकास होत असतो अशी त्यांची श्रद्धा आहे. हे त्यांचे जीवनभाष्य आहे.
 उपयुक्ततावाद आणि ध्येयवाद यातील संघर्ष कालिदासाने वर्णिला आहे, हे वर आपण पहिलेच आहे. तांबे यांनी उपयुक्ततावाद व सौंदर्यवाद यातील द्वंद्व कसे असते, ते 'किती महामूर्ख तू शहाजहां !' या कवितेत सांगितले आहे. शहाजहानाने ताजमहाल बांधून हृदयातले प्रेम मूर्त केले. पण अर्थशास्त्रज्ञांना वाटते, या एवढ्या इमारतीचा उपयोग काय ! येथे स्टेशन होणार नाही, हॉस्पिटल नाही, प्रयोगशाळा नाही, कशालाच या इमारतीचा उपयोग नाही ! तेव्हा एवढा पैसा असल्या इमारती वर खर्च करणारा वाहशहा अगदी मूर्ख असला पाहिजे, या ताजाच्या पायाशी बसून काळ टकमक पाहतो. आपल्याला याचा ग्रास करता येणार नाही हे त्याच्या ध्यानात येते. पण बाजारात जोपर्यन्त त्याची किंमत नाही तोपर्यन्त अर्थस्त्रज्ञांना त्याची किंमत शून्य !
 जन म्हणति सावळी, भयचकित नमावे तुज रमणी, कुणि कोडे माझे उकलिल का? चल जळो ज्ञानविज्ञान गड्या, रुद्रास आवाहन अशा अनेक कवितातून तांबे यांचे प्रेम, क्रान्ती इ. जीवनाच्या अंगांविषयीचे तत्त्वज्ञान व्यक्त झालेले आहे. सर्व संसारच कवीचा विषय असतो आणि त्यांतील प्रत्येक घटना, वस्तू, विचार यांवर कवी आपल्या दृष्टिकोणातून भाष्य करीत असतो, एवढे स्पष्ट करण्यास वरील उदाहरणे पुरेशी असल्यामुळे येथे जास्त विवरण करीत नाही.
 २ पं. महादेव शास्त्री महादेव शास्त्री जोशी यांचे भाववळ, कल्पित आणि सत्य, मोहनवेल, खडकातले पाझर, पुत्रवती इ. आठ दहा लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. प्रत्येकात नऊ दहा कथा आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांनी शंभर एक कथा तरी लिहिल्या आहेत. हा मानवी संसार आपल्याला कसा दिसला ते सांगण्यास एवढ्या साहित्यातून त्यांना विपुल अवसर मिळाला आहे. आणि त्यांनी आपली अनुभूती या कथांमधून सविस्तर प्रगट केलेली आहे.
 जीवनाचे दर्शन घडविले नाही, त्या जीवनाविषयी आपला अभिप्राय व्यक्त केला नाही असा साहित्यिक बहुधा नसतोच. कारण सर्व साहित्यिकांचा मानवी जीवन हा जो विषय तो अर्धा अधिक स्त्रीनेच व्यापला आहे. या जीवानचा स्वरूप निश्चय तिच्यामुळेच होतो. शास्त्रीबुवांच्या अनेक कथा स्त्री जीवनभाष्या- साठीच लिहिल्या आहेत असे दिसते. 'पुत्रवती' ही कथा पहा, ही स्त्री बाळंतपणी अडली. डॉक्टरांनी पतीला विचारले की, 'ऑपरेशन करावे लागेल. त्यातून आई किंवा मूल कोणीतरी एक जगेल. तेव्हा कोणाला वाचवू' पतीने सांगितले की, मूल वाचवा..' ते त्या स्त्रीला कळले, तेव्हा तिला धक्का बसला. आपल्याला स्वतंत्र महत्त्व नाही, पुरुषांच्या लेखी आपण म्हणजे एक वंश वाढविण्याचे साधन, एवढीच आपली किंमत, व हा विचार तिच्या जिव्हारी लागला. ती पतीला म्हणाली, 'हे अनादिकाळापासून ठरलेले आहे. बायकोची गरज तेवढीच. तिनं नवऱ्याचा वंश वाढवायच यांच्या खस्ता खायच्या, आणि मरून जायचं !' पतीने परोपरीने तिची समजूत चालण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते पटले नाही. 'हे आपल्या जिवावर उदार झाले' हा विचार तिच्या काळजात रुतून बसला. तिच्या पतीची दृष्टी तशी नव्हती. पण सामान्यतः पुरुष स्त्रीकडे वंश वाढवायचे साधन म्हणूनच पहातो. यामुळे पुत्रवतीने हाय खाल्ली आणि त्यामुळेच ती मृत्युमुखी पडली.
 'यथा वाचां तथा स्त्रीणां साघुल्वे दुर्जनों जनः ।' हा स्त्रीजीवन विषयक दुसरा सिद्धान्त आहे. खडकातले पाझर, पूर्वग्रह, कसोटी इ. अनेक कथांतून शास्त्री बुवांनी तो व्यक्त केला आहे. 'खडकातले पाझर' या कथेतील शिवरामभाऊची इन्दू ही बाल मैत्रीण. ती गोपाळ भटजीची बायको. आपल्या बायकोची -सुमाची प्रकृती दाखविण्यासाठी शिवरामभाऊ वेळगावला आले व इन्दूने आग्रह केला म्हणून तिच्याकडेच राहिले. बायकोचा आजार वाढत चालला म्हणून त्यांचा इन्दूकडचा मुक्कामही वाढत चालला. पण तेवढ्या काळात शेजारणी पाजरणींनी इन्दू आणि शिवरामभाऊ यांच्याविषयी कंड्या उठवून आग लावून दिली. सुमाच्या मनातही ते चित्र त्यांनी भिनविले. त्यामुळे सर्व औषधोपचार थांबवून तिला घेऊन त्यांना गावी परत जावे लागले ! स्त्रीजातच स्त्रीची वैरी होते ती अशी. पुरुषांचा दृष्टिकोण स्वार्थी, आपमतलबी असेल. पण स्त्रीने तरी स्त्रीकडे जरा उदार दृष्टीने पहावे. पण ते शक्य नाही. हाही स्त्रीजीवनाचा अनादिकाळापासून चालत आलेला नियम आहे.
 स्त्रीची खरी गुणसंपदा कोणती ? सौंदर्य, शृंगारभाव, बुद्धिमत्ता, चतुरभाषण, यौवनाचा उन्माद हे तिचे खरे धन आहे काय ? शास्त्रीबुवांना तसे वाटत नाही. त्या धनाने संपन्न असलेली लीला जयंताला मिळत होती. जवळ जवळ मिळालीच होती. पण त्याच वेळी त्यांच्याकडे आलेल्या सोनूमामांच्या तारूने लीलेवर मात करून त्याला जिंकले. समर्पणबुद्धी, शरणता, सेवाभाव, आत्मलोप मुग्धता, अबोलवृत्ती ही तिची संपदा होती. तारूने याच गुणांवर डाव जिंकला आणि लीलेने आपल्या विनयहीन, उद्धट, उठवळ, माजोरी वर्तनाने तो घालवला. स्त्रीला यशस्वी व्हायला केवळ रूपसंपदा पुरी पडत नाही. तेवढ्या गुणाने संसार यशस्वी होत नाही. 'भावबळ ' या कथेत शास्त्रीबुवांनी अत्यंत कलात्मकतेने हे सत्य विशद केले आहे.
 कर्मकांड आणि मानवता धर्म या दोन मूल्यातील संघर्ष महादेवशास्त्री यांनी 'गोपी' या कथेत चित्रित केला आहे. तिच्यातील पुराणिक हा ब्राह्मण होता. तो प्लेगने आजारी पडला. त्यावेळी गावातील धर्म मार्तंडांनी कोणीही त्याला आश्रय दिला नाही, त्याची शुश्रूषा केली नाही. ती केली देवळात कामाला असणाऱ्या सोनारणीच्या मुलीने, गोपीने. त्या प्रसंगाने पुराणिकबुवांचे तिच्या घरी खानपानही घडले. त्यामुळे, पुन्हा पुराण चालू करण्या आधी, त्यांनी प्रायश्चित घेतले पाहिजे, असा गावातल्या कर्मठांचा आग्रह पडला. पुराणिकबुवाना याचा फार संताप आला. पोथीतल्या धर्माहून निराळा असा एक अलिखित धर्म आहे, आणि गावातल्या ब्राह्मणांना त्याचे मुळीच ज्ञान नाही, हे या प्रसंगाने त्यांच्या ध्यानी आले. त्यांनी प्रांजळपणे म्हटले आहे की, हा धर्म त्यांना गोपीने शिकविला होता. भागवताचा सप्ताह करणाऱ्या एका पुराणिकाला एका सोनारणीच्या मुलीने खरा धर्म शिकविला होता ! आणि म्हणूनच त्याने त्या धर्ममार्तडांना सांगितले की, 'गोपीच्या हातचे पुण्यपावन अन्न सेवून मी शुद्ध झालो आहे. मी प्रायश्चित्त घेतले आहे.'
 धर्म, अधर्म, नीती अनीती या संबंधीचा शास्त्रीबुवांचा दृष्टिकोण 'घररिघी' या कथेत असाच प्रगट झाला आहे. माणूस धर्माधर्म नीतिअनीती यांचा विचार केव्हा करील ? पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळाल्यानंतर. एरवी, नीती, धर्म सर्व व्यर्थ आहे. शिवराम भाटीकराची मुलगी चिमा-घररिघी- हिच्या तोंडून अगदी सांध्यासुध्या भाषेत शास्त्रीबुवांनी हे सत्यं वदविले आहे. त्या मुलीचे आईबाप दोघेही आळशी, निलाजरे व बेजबाबदार होते. बापांने पैशासाठी मुलीला विकायला काढली होती. तो माणूस काळा डोम होता. त्याच्या एका डोळ्यात फूल पडले होते: त्यांची बायको मेली होती आणि घरी खंडीभर पोरांची फटावळ होती. बाप चिमाला या माणसाला विकणार होता. म्हणून ती घरातून पळाली होती. काकींनी तिला जेवायला घातले आणि त्या तिला म्हणाल्या, 'चिमे, अशी भटकत राहिलीस तर बिघडून जाशील, आणि अशी कीर्ती करून ठेवलीस तर कोणी पत्करायचं नाही तुला.' त्यावर चिंमी म्हणते, 'मग काय करू तर ? तू मला घालतेस जेवायला दोन्ही वेळा पोटभर ! मंग बंघ तुझ्या अर्ध्या वचनात राहते का नाही. कोणाकडे डोळा उचलून बघितले तर थोबाडीत मार माझ्या.' यावर काका म्हणतात, 'चिमाचा सवाल सरळ होता. तिला कोरडा उपदेश नको होता. तिच्या पोटात भूक पेटली होती. आणि प्रेमाच्या पाशानं तिला कोणी बांधलेलंच नव्हत.' तिच्यापुढे नीतीचा उपदेश व्यर्थ होता.
 'नवऱ्याची जात' या कथेत शास्त्रीबुवांनी मानवी जीवनासंबंधी एक फार महत्त्वाचं सत्य सांगितलं आहे. माणसे काही श्रद्धांवर जगत असतात. त्या श्रद्धेला ती गेला की त्यांचा जीवनाधारच संपतो, मग ती जगू शकत नाहीत. प्रभाचा नवरा घनःश्याम हा नाटकात पेटी वाजविणे, पात्रे रंगविणे असली कामे करून कधी कधी पैसे मिळवी. एरवी सर्व शून्याकारच होता. व्यसने त्याला सगळी होती आणि त्या पायी तो वाटेल तसा वागत असे. पण बायकोला थापा देण्यात तो वस्ताद होता. तो इतका गोड बोले, स्वतःच्या कर्तृत्वाचा इतका व्यवस्थित बडेजाव सांगे की, प्रभा अगदी भुलून जाई. त्याच्या शब्दाबद्दल तिला कधी शंकासुद्धा आली नाही. तिची त्याच्यावर अपरंपार श्रद्धा होती, प्रेम होते. आणि थापा देऊन त्याने ते टिकविले होते. त्याच्या संसर्गामुळे प्रभाला वाईट रोग जडला, तेव्हा त्याने तिला माहेरी आणून टाकली व तो निघून गेला. तिच्या आईबापांना जावयाचे सर्व वृत्त माहीत होते. म्हणून वैतागून ते तिच्या देखत त्याची निंदा निर्भर्त्सना करीत. प्रभाला ते सहन होत नसे. 'त्यांच्याबद्दल असं बोलणार असाल तर मला आपली तिकडे पोचवा. मग माझं काय व्हायचं असेल ते होईल,' असे ती म्हणे. तिचे वडील गरीबच होते. प्रभाच्या औषधपाण्यापायी त्यांची ओढ होऊ लागली. तेव्हा प्रभाने हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांना दिल्या व त्या विकायला सांगितल्या. वडील सोनाराकडे गेले, तो बांगड्या पितळेच्या निघाल्या. घरी आल्यावर वडील काहीच बोलेनात. पण ते औषधे इंजेक्शनेही आणू शकले नव्हते. प्रभाने विचारले, प्रथम ते टाळाटाळ करू लागले. पण शेवटी त्यांना सत्य ते सांगावे लागले. त्यामुळे मात्र प्रभाला धक्का बसला. आईबापांच्या बोलण्यामुळे, गावातून येणाऱ्या वार्तांमुळे तिचे मन नवऱ्याविषयी जरा साशंक झालेच होते. आणि आपल्या हातात सोन्याच्या म्हणून त्याने पितळेच्या बांगड्या घातल्या, हे जेव्हा तिला कळले, तेव्हा तिची श्रद्धा भंगली. तिच्या मनातल्या पतीच्या मूर्तीला तडा गेला आणि रोगाने आधीच खंगलेल्या त्या मुलीने प्राण सोडले.
 तिच्या बापाला मुलीच्या मरणाचे तर दुःख झाले, पण तिच्या मरणाला आपण कारण झालो, या विचाराने त्याचे मन त्याला खाऊ लागले. त्याने सत्य न सांगता प्रभाची श्रद्धा तशीच टिकू दिली असती तर !
 दुरावलेला जीव, पुरंदरची शिकार, पर्जन्यकुंड, पाठराखीण, आश्वासन, रगाडा, भवचक्र, हंसे मुक्ता नेली, येरे माझ्या मागल्या, जगावेगळे सासर या कथांत शास्त्रीबुवांनी जीवनातली अशीच सत्ये मूर्त करून मांडली आहेत. मानवी विकार, वासना, वेदना, मानवाचा ध्येयवाद, त्याच्या अंतरांतल्या सुप्तशक्ती, त्याच्या श्रद्धा, त्यातून निर्माण होणाऱ्या मूल्यांचा संघर्ष, या सर्वांनी हा संसार चाललेला असतो. तो नीट न्याहाळून या सर्व विकार विचारांची मीमांसा करून त्यांचा अर्थ सांगणे, मानवी जीवनातले त्यांचे स्थान कोणते ते सांगणे, आणि संसाराचे मर्म आपल्या मतीप्रमाणे उकलून दाखविणे हे साहित्यिकाचे काम आहे. कविवर्य तांबे व पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या साहित्याचे जे विवेचन येथे केले आहे त्यावरून यातील भावार्थ स्पष्ट होईल असे वाटते.
 जीवनातील संगती संस्कृत, इंग्लिश, मराठी, फ्रेंच इ. भाषांतील अभिजात साहित्यातील उदाहरणांच्या आधारे येथपर्यन्त जे विवेचन केले आहे त्यावरून जीवनभाष्य, याची विवक्षा स्पष्ट होईल असे वाटते. साहित्यिक हा स्वतःचा संसार पाहतो. समाजाचा पाहतो. जगातल्या घडामोडींचे अवलोकन करतो; निसर्ग त्याला दिसत असतो. आकाशस्थ ग्रह, गोल, तारे, त्याच्या दृष्टीस पडत असतात आणि या पलिकडे मनाची दृष्टि फेकून तो विश्वाच्या पलिकडे काय असेल, याचे चिंतन करीत असतो. अशा रीतीने संसार पहात असताना अनेक मित्रांशी, पंडीतांशी तो चर्चा करतो. त्यांचे ग्रंथ वाचतो स्वदेशी-विदेशी अनेक स्त्रीपुरुषांच्या सहवासात राहतो. नानाविध बऱ्यावाईट प्रसंगांचा अनुभव घेतो, सुख भोगतो, दुःखे सोसतो, इतरांची सुखदुःखे न्याहाळतो, त्या प्रसंगीच्या त्यांच्या क्रिया प्रतिक्रियांचे निरीक्षण करतो आणि अशा रितीनें प्रतिदिनी, प्रतिक्षणी आपल्या अनुभूतीच्या भांडारात तो नित्य भर टाकीत असतो. या अनुभूतीवरून या संसाराविषयी त्यातील व्यक्तीविषयी, समाजातील, विश्वातील घटनाविषयी त्याचे काही मत बनते. त्याच्या मनाशी काही मूल्ये निश्चित होतात, त्यावरून त्याचे काही तत्त्वज्ञान बनते, आणि या सर्वातून त्याचा जगाविषयी काही दृष्टिकोण सिद्ध होतो. या दृष्टिकोणातून तो या संसाराकडे पाहू लागले की, त्याला त्यांतील घटनात काही संगती दिसू लागते. अनेकविध घडामोडींच्या मागे काही सूत्र दिसू लागते. आणि मग त्या सूत्राअन्वये अनेक घटना एकत्र बांधून त्यांची तो कथा तयार करतो व तीतून आपले तत्त्वज्ञान आविष्कृत करतो. जगातल्या घटना अशा सूत्रबद्ध करून त्यांवरून कवीने सांगितलेले हे जे तत्वज्ञान यालाच साहित्यातील जीवनभाष्य असे म्हणतात.
 अनुभूतीचा अर्थ या अर्थाने पाहिले तर आपल्या हे ध्यानात येईल की, जीवनभाष्यावाचून साहित्य याला अर्थच नाही. नुसती अनुभूती हे साहित्य नव्हे. त्या अनुभूतीचा कवीला प्रतीत झालेला अर्थ म्हणजे साहित्य. इंद्रधनुष्य पाहून या विश्वात रचना आहे, सुसंगती आहे. जग रम्य आहे असे एका कवीला वाटते तर दुसऱ्याला असल्या रम्य वस्तुला क्षणभंगुर करून ठेवणाऱ्या विधात्याला उद्देशून 'अहह ! कष्टं अपंडितता विधेः' असे उद्गार काढावेसे वाटतात. इंद्रधनुष्य पाहाणे ही अनुभूती आणि ते पाहून कवीने आनंदाचे वा कष्टाचे काढलेले उद्गार हे काव्य होय. कॅमेरॅने काढलेला फोटो व कुंचल्याने काढलेले चित्र यांतील भेद साहित्याच्या विवेचनात नेहमी उदाहरणादाखल घेतला जातो. फोटो ही केवळ अनुभूती होय. तिला कला म्हणत नाहीत. चित्र ही कला आहे. कारण त्यात कवीचा दृष्टिकोण व्यक्त झालेला असतो. एच्. डब्ल्यू. लीगेट याने 'दि आयडिया 'ऑफ फिक्शन' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत या विचाराचे उत्तम विवेचन केले आहे. तो म्हणतो, केवळ अनुभूती हा वाड्मयाचा विषय नाही. त्या अनुभूतीचा लेखकाने बसविलेला अर्थ हा खरा विषय होय. कादंबरी म्हणजे केवळ जीवनाचे प्रतिबिंब नव्हे तर ती एक पुनर्निमिती असते. आणि तिचे मुख्य लक्षण मुख्य सूत्र म्हणजेच हा लेखकाला दिसलेला अर्थ हे होय. यालाच त्याचे मूल्यमापन किंवा भाष्य असे म्हणतात. जीवनाचा अर्थ शोधणे, त्याचे चिंतन करणे. हेच लेखकाचे खरे कार्य होय. या चिंतनातून त्याची जी मते बनतात, निर्णय ठरतात, तो जे मूल्यमापन करतो, त्यातूनच कादंबरी निर्माण होते. यावरून विशिष्ट दृष्टिकोणावाचून, जीवन भाष्यावाचून काव्याची, कथेची, कादंबरीची निर्मिती होऊच शकत नाही हे ध्यानात येईल.
 मूल्यमापन काव्य म्हणजे निसर्गाचे आरशात प्रतिबिंब दाखविणे, असे शेक्सपीयरने म्हटले आहे. यावरून केवळ यथार्थ वर्णन म्हणजे काव्य, फोटो हेच काव्य, असा त्याचा अभिप्राय आहे, असे कोणाला वाटते. पण ते चूक आहे. कारण आपल्या त्या विधानाचे स्पष्टीकरण करताना शेक्सपीयरने म्हटले आहे की, 'सत्त्वगुणाला आणि तमोगुणाला त्याचे त्याचे रूप या आरशात दिसले पाहिजे. आणि त्या काळाला व परिस्थितीलाही आपली रूपरेखा ध्यानात आली पाहिजे.' शेक्सपीयरचे हे वचन देऊन लीगेट म्हणतो, 'यावरून शेक्सपीयरच्या हॅम्लेटच्या मनातला आरसा नेहमीच्या आरशाहून फार निराळा असला पाहिजे. आणि तो निराळ्या कोनातून लाविलेल असला पाहिजे. त्यातून दिसणारे सत्त्व-तमांचे रूप नेहमीचे रूप असणे शक्य नाही.'
 पण यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा असा की, निसर्गात सत्त्व किंवा तम, पुण्य किंवा पाप असे काहीच नसते. कोणते पुण्य व कोणते पाप ते मानव-कवी ठरवितो. म्हणजेच तो आपल्या दृष्टिकोणातून पाहून निसर्गाचे चित्र काढतो. काळाचे वा परिस्थितीचे रूप दाखवावे असे हॅम्लेट म्हणतो. पण नित्याच्या अर्थाने काळाला किंवा परिस्थितीला कसलेही रूप नसते. त्यात नुसत्या घटना असतात, व्यक्ती असतात. त्या घटनांचे कवीने मूल्यमापन केले, त्या घटनातले सूत्र दाखविले तरच काळाचे रूप दाखविता येईल. शेक्सपीयरने स्वतःच्या नाटकात हेच केले आहे. केवळ संसाराचे प्रतिबिंब असे कोणत्याच नाटकात त्याने दाखविलेले नाही. ज्यूलियस सीझर, कॉरायलेनस, ऑथेल्लो, हॅम्लेट, ट्वेल्थ नाइट, हेन्री दि फोर्थ, ॲज यू लाइक इट इ. नाटकांत त्याला जगाचे जे रूप दिसले ते त्याने चितारले आहे. आणि जागजागी त्या जगातल्या घटनांचे मूल्यमापनही केले आहे. संसृतिटीका ती हीच. ही टीका मनाशी निश्चित झाल्यावाचून साहित्य जन्माला येत नाही.
 दृष्टिकोण याच प्रस्तावनेत लीगेटने म्हटले आहे की, जीवनात सुसंगती अशी कधीच कोठे नसते. त्याला पूर्णता किंवा अखेर अशीही नसते. त्याचप्रमाणे त्याला प्रारंभही नसतो. म्हणजेच त्याला आकार नसतो. हा आकार कवी देतो. आता हा आकार- फॉर्म- कसा देतो ? आपल्या विचार सूत्राप्रमाणे 'आयडिया' प्रमाणे, तत्वाप्रमाणे कवी जीवनाला आकार देतो. जुनी संस्कृती व नवी संस्कृती याविषयी फडके यांच्या मनात काही विचार निश्चित झाले. संस्कृती ही एक छत्री आहे, असे त्यांच्या मनाशी ठरले. आणि मग शंभूराव जोग, केशवकाका, उमरखान, सुधीर, मीनाक्षी, या व्यक्ती व मुंबई, धेनुकुंज या ठिकाणी घडलेल्या घटना- त्या विचार सुत्रात बसतील, त्याचा अर्थ विशद करतील अशा घटना त्यांनी निवडल्या आणि कथा तयार केली. म्हणजे जीवनाला आकार येतो तो या सूत्रामुळे, निवडीमुळे. कवी वा लेखक जी निवड करतो त्या निवडीवरूनच त्याचा दृष्टीकोण, त्याचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान ध्यानी येते. फ्रान्समधील जेसुइट कॅथॉलिक पंथ. त्या पंथाचे धर्मगुरु यांच्या धर्मतत्त्वांविषयी, त्यांच्या आचरणाविषयी आणि त्यामुळे फ्रान्सच्या जनतेवर होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांविषयी एमिल झोला यांचे काही विचार निश्चित झाले, मते ठरली व मग त्या सूत्रात बसतील अशाच घटना व व्यक्ती निवडून त्याने भोवतालच्या जीवनाला आकार दिला. तीच 'ट्रूथ' ही कादंबरी. तेव्हा साहित्याला आकार येतो तो लेखकाच्या मनातल्या विषयामुळे, त्यातील आशयामुळे म्हणजे त्याच्या दृष्टिकोणामुळे. याचाच पर्यायाने अर्थ असा होतो, कवीच्या दृष्टिकोणावाचून, त्याच्या जीवनाविषयीच्या तत्त्वज्ञानावाचून साहित्य निर्मिती होऊच शकत नाही.
 विचार सूत्रामुळे सुरेखा पर्सी लवॉक याने 'दि क्राफ्ट ऑफ फिक्शन' या आपल्या पुस्तकात 'वॉर अँड पीस' या टाॅलस्टायच्या कादंबरीचे विवेचन करताना लेखकांचा आशय, विचारसूत्र किंवा आयडीया, किवा सबजेक्ट आणि ललितकृतीची रेखा- फॉर्म किंवा आकार ही अविभाज्य कशी आहेत याचे मार्मिक विवेचन केले आहे. लबॉकच्या मते 'वॉर अँड पीस' या कादंबरीला चांगली रेखा, चांगला आकार-फॉर्म- आलेला नाही, याचे कारण काय ? कारण असे की, टॉलस्टॉलने मनात एक विषय सुनिश्चित करून ती कादंबरी लिहिलेली नाही. लेखकाने जमा केलेली सर्व सामग्री सर्व कच्चा माल, सर्व द्रव्य (घटना, प्रसंग व्यक्ति, विचार इ.) जेव्हा विषयांशी पूर्ण बद्ध, निगडीत, एकजीव झालेले असेल तेव्हाच उत्तम रेखा उत्तम फॉर्म साधला, असे म्हणता येईल. सर्व द्रव्य सूत्रबद्ध असणे हीच लबॉकची फार्मची व्याख्या आहे. आणि टॉलस्टॉयने यात घोटाळा केल्यामुळे 'वॉर ॲन्ड पीस' या कादंबरीला फॉर्म आला नाही, असे तो म्हणतो, 'तारुण्य व वार्धक्य' हा एक 'युद्ध आणि शांतता' हा दुसरा असे दोन विषय टॉलस्टायच्या मनात आहेत. ते दोन्ही परस्परसंबंद्ध नाहीत. आणि एका सूत्राची गुंफण चालू असताना त्यात टॉलस्टॉय दुसऱ्याचे धागे घसडून जबरदस्तीने विणून टाकतो. म्हणून शेवटी ते वाण बिघडन जाते. लबॉक म्हणतो, 'एकाच विषयावर लक्ष केंद्रित करून त्या संबंधीचे जे अंतिम उद्दिष्ट त्यासाठीच सर्व द्रव्य लेखकाने उपयोजिले असते तर कादंबरी जास्त परिणामकारक झाली असती. आहे या स्थितीत दोहोंपैकी एकही गोष्ट पुरी झालेली दिसत नाही. विस्तार अमर्याद झाला असूनही कादंबरीला पूर्णता आलेली नाही. आणि याचे कारण एकाच आरंभापासून लेखकाच्या डोक्यात दोन सूत्रे घोळत होती. आणि तो दोन गुंफणी करीत होता.
 जीवनभाष्य-प्रारंभबिंदू टीकाकारांच्या या विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, जीवनभाष्य हाच सर्व साहित्याचा प्रारंभबिंदू आहे. संसाराचे अवलोकन करताना कवीला त्याविषयी काही विचार स्फुरतो, काही कल्पना त्याच्या मनाची निश्चित होते आणि जमिनीत टाकलेले बी जसे आपल्याला पोषक अशीच जीवनद्रव्ये तेवढी शोषून घेते, तशी कवीची कल्पना स्वतःच्या विकासाला पोषक अशा जीवनातल्या घटना निवडते. जमिनीतल्या बीजाची कृती अबोधपूर्व घडते. कवीची कृती बोधपूर्व घडते. म्हणून तो या घटना आपल्या कल्पनेच्या परिपोषासाठी निवडतो असे आपण म्हणतो. पण साहित्याची निर्मिती या पद्धतीने होते यात शंका नाही. इब्सेन, झोला, हार्डी, वा. म. जोशी, फडके, तांबे इ. साहित्यिकांच्या साहित्यातून जी उहाहरणे या प्रबंधात दिली आहेत ती पाहता, आपल्या दृष्टिकोणातून जग पाहताना या साहित्यिकांना प्रथम काही तत्व सुचले, विचारसूत्र ध्यानी आले म्हणजे त्यांच्या मनात बीज तयार झाले व मग त्यांनी त्यातून वृक्ष तयार करण्यासाठी भोवतालच्या जीवनातून अवश्य ती पोषक द्रव्ये शोषून निवडून घेतली अशीच प्रक्रिया झालेली दिसते. 'स्त्रीला पुरुष एखाद्या बाहुलीसारखी वागवितो,' भांडवलदार हे जे समाजाचे आधारस्तंभ ते अधर्म अनीती या पायावर उभै आहेत, 'स्त्री, संसार हे ध्येयाच्या आड येत नाहीत, 'विश्वरचनेला अर्थ आहे, 'ध्येयवाद हा उपयुक्ततावादापेक्षा श्रेष्ठ होय,' 'संस्कृती ही एक छत्री आहे' अशी काही मते संसाराच्या अवलोनावरून कवींची निश्चित होतात. त्याचा असा दृष्टिकोण तयार होतो. आणि मग जीवनाच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानाचा छाप मारुन तो वाचकांना जीवनाचे दर्शन घडवितों. जीवनावर भाष्य करण्याची साहित्यिकाची हीच पद्धत असते.
 आत्माविष्कार हेच भाष्य अलीकडे आत्माविष्काराला साहित्यात फार महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. किंबहुना कवीचा आत्माविष्कार म्हणजेच साहित्य अशी व्याख्याही कोणी करतात. तो आत्माविष्कार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून संसारातील घटनांविषयी कवीनें व्यक्त केलेला, किंवा त्याच्या साहित्यावरून ध्यानात येणारा त्याचा दृष्टीकोणच होय. मुळात निसर्गघटना किंवा व्यवहारातल्या घटना यांना स्वतःचा असा काही अर्थ नसतो. कवी त्या घटनांचा अर्थ लावतो आणि आपल्या साहित्यातून तो अर्थ प्रगट करतो. हा जो संसाराचा कवीने लावलेला अर्थ तोच आत्माविष्कार होय. आणि तेच त्याचे जीवनभाष्य होय. हे जर आपण मान्य केले तर साहित्याचे समीक्षण करताना साहित्य मूल्ये व साहित्यबाह्यमूल्ये असा जो टीकाकार भेद करतात तो अनाठायी आहे, भ्रामक आहे हे सहज ध्यानात येईल. धर्म, नीती, तत्त्वज्ञान, समाजरचनेची तत्त्वे, काही व्यावहारिक सत्ये, अर्थशास्त्रीय तत्त्वे, संस्कृती, प्रगती, परागती, यासंबंधी कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार यांच्या मनात काही तत्त्वे निश्चित झालेली असतात. ती ते शास्त्रीय पद्धतीने तार्किक पद्धतीने निश्चित करतात असे नाही. म्हणून त्यांना तत्त्वे असे न म्हणता कवीने बसविलेला घटनांचा अर्थ, असे आपण म्हणतो. पण त्याचे स्वरूप त्या तत्त्वांसारखेच असते. असे काही तत्त्व साहित्यात आले की, त्या साहित्याला हेतुप्रधान म्हणून हेटाळण्याची सध्या चाल आहे. त्या हेतूमुळे साहित्याला प्रचाराचे रूप येऊ नये, हे म्हणणे युक्त आहे. कलात्मकतेवाचून लेखनाला साहित्य पदवी लाभणार नाही, हे खरे. पण हेतु असणे यातच काही अक्षेपार्ह आहे, हे म्हणणे युक्त नाही. कारण आहे या हेतूतूनच साहित्याचा जन्म होत असतो. हेतू जेव्हा स्पष्टपणे व्यक्त होतो तेव्हाच लेखकाचा आत्माविष्कार झाला, असे म्हणता येते. तेव्हा हेतूवर आक्षेप घेतला तर आत्माविष्कारावरच आक्षेप घेतला असा अर्थ होईल आणि आत्माविष्कार तर सर्व श्रेष्ठ असे साहित्यमूल्य, असे आज मानले जाते. तेव्हा साहित्यमूल्ये व साहित्यबाह्य मूल्ये असा भेद केला तर या सर्व श्रेष्ठ मूल्याला साहित्य बाह्यमूल्यांच्या वर्गात जमा करावा लागेल. पण तसे करण्यास कोणी धजावेल असे वाटत नाही. आणि कवी आत्मविष्कार करतो म्हणजे नुसती अनूभूती प्रगट करतो असे नसून जीवनाचा त्याला प्रतीत झालेला अर्थ प्रगट करतो हे जर खरे असेल तर आत्माविष्कार म्हणजे जीवनभाष्यच होय हे समीकरण कोणाला नाकारता येईल असे वाटत नाही.
 साहित्यातले सर्व श्रेष्ठमूल्य असे हे जे जीवनभाष्य त्याचा अर्थ, त्याची विवक्षा स्पष्ट करण्याचा या प्रबंधात प्रयत्न केला आहे. ड्यूई, अर्नोल्ड, ग्रीन, गॅराड, लबॉक अशा टीकाकारांच्या मतांची चर्चा करून आणि संस्कृत, मराठी, इंग्रजी, फ्रेंच इ. भाषांतील नामवंत साहित्यिकांच्या ललितकृतीतील उदाहरणे देऊन या मूल्याचे स्वरुप मी माझ्या मताने स्पष्ट केले आहे. टीकाकारांत या मूल्याच्या महत्वाच्या बाबतीत मतभेद असू शकतील. पण साहित्यिकांत मात्र नाहीत. असू शकतील असे मला वाटत नाही. जगात आजपर्यंत अमर, अक्षर कलाकृती म्हणून सरस्वतीच्या मंदिरात ज्या ललितकृतींना स्थान मिळाले आहे त्यांतील प्रत्येक कृती या संसारावर भाष्य करण्याच्या हेतूनेच त्या त्या साहित्यिकाने लिहिलेली आहे. जीवनावर असे उद्बोधक भाष्य ज्याने केलेले नाही त्या कवीला वा त्याच्या कृतीला सरस्वतीच्या मंदिरात अद्याप तरी स्थान मिळालेले नाही. त्यामुळे टीकाकारांच्या मतभेदाविषयी फारशी फिकीर करण्याचे कारण आहे असे वाटत नाही. अभिजात साहित्यिकांच्या एकमुखी आधारावर कलात्मक जीवनभाष्य हेच अमर साहित्याचे लक्षण होय असे निश्चितपणे म्हणता येईल. या प्रबंधात तेच प्रतिपादन केले आहे.