संस्कृती/अयोध्याकांड २ भरतभाव

विकिस्रोत कडून

 राम राज्यातून गेला, तेव्हा राज्याचे जे वर्णन आहे, तेही पुढील काव्यपरंपरेला साजेसे वाटते-
 चैत्यशतैः जुष्टः दैवस्थानैः उपशोभितः जनपथः ।
 (झाडांखालच्या शेकडो चैत्यांनी व देवस्थानांनी नटलेला प्रदेश) हे वर्णन पुरातन वाटत नाही.
 राम त्या रात्री तमसेच्या तीरावर निजला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून, आपल्याबरोबर आलेल्या नागरिकांना चुकवून तो राज्याची हद्द जे शृंगवेरपुर तेथे आला. तेथे त्याला गंगा दिसली. येथेही सीतेने गंगेला नमस्कार करिताना "आम्ही चौदा वर्षांनी येऊ. रामाला राज्याभिषेक होईल, तेव्हा मी तुझी पूजा करीन,” असे म्हटले आहे. तेथे गुहराजाच्या मदतीने सर्वजण गंगापार झाले. गंगापार होण्याआधी रामाने व लक्ष्मणाने केसांना उंबराचा चीक लावून त्यांच्या जटा बनविल्या.
 गंगेच्या उत्तर तीरावरच रामाने सुमंत्राला परत धाडले. रामाने लक्ष्मणाला सांगितले, “तू पुढे हो. मध्ये सीता राहू दे व मी तुम्हा दोघांचे रक्षण करीत मागून चालतो (२.४६.७६). 'लक्ष्मण भावोजी मागे, पुढे स्वामी' हे मोरोपंतांचे वर्णन ह्यावरून चुकीचे वाटते.
 राम नंतर प्रयागी भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेला. तेथे एक दिवसाचा पाहुणचार घेऊन, त्यांनाच वाट विचारून तेथून काही कोसांवर असलेल्या चित्रकूट-पर्वतावर तो गेला. ते स्थान त्याला इतके आवडले की, त्याने लक्ष्मणाला लाकडे तोडून पर्णकुटी बांधावयास सांगितले, व ती बांधून झाल्यावर तीत रहायला जाण्याआधी एक मोठा ऐण (काळवीट) मारून त्याच्या मासाचे हवन केले व आता चौदा वर्षे चित्रकूटावर रहावयाचे, असा त्यांनी बेत केला. येथे राम इतक्या सुखात होता की, त्याने सीतेला नाना सौंदर्यस्थळे दाखविली व म्हटले, "लक्ष्मण माझ्या आज्ञेत आहे, तू मला अनुकूल आहेस. मी आनंदात आहे. कित्येक वर्षे जरी इथे राहिलो, तरी मला वाईट वाटणार नाही."

२२

।। संस्कृती ।।

अयोध्याकांड . २

भरतभाव


 ह्या भागाला 'भरताचे दिव्य' असे नाव मी पहिल्याने दिले होते, वामनपण्डितांनी हाच कथाभाग 'भरतभाव' ह्या अर्थवाही सुंदर शब्दाने सांगितला आहे. ('करूनि वंदन जानकिनायका । भरतभाव निरोपिन आयका') त्याची मला आठवण झाली. तेव्हा 'दिव्य' वगैरे मूल्यांनी ठासून भरलेल्या (loaded) शब्दापेक्षा 'भाव' हाच शब्द सर्व तऱ्हांनी जास्त स्वीकरणीय वाटला. वामनपंडितांना स्मरून तोच शब्द मी उचलला. त्यांनी हा कथाभाग हृद्य तऱ्हेने सांगितल्यावर मी तेच खडबडीत गद्यात सांगण्याचे प्रयोजन काय? एवढेच की, माझ्यापुढे रामायणाची संशोधित आवृत्ती आहे, ती त्यांच्यापुढे नव्हती.
 रस्त्यावर पडलेल्या दशरथाला उचलून कौसल्येच्या महालात आणिले. स्वतःच्या कृत्याने तो शरमिंदा झाला होता. सुमंत्राने लक्ष्मणाचा निरोप आणिला होता. त्यात म्हटले होते, वरदानाच्या निमित्ताने सर्वथैव वाईट कृत्य राजाच्या हातून घडलेले आहे. (२.५२.२७). वरदान हे सर्वांनाच निमित्त वाटत होते.
 रामासाठी शोक करून करून त्याचा जीव कासावीस झाला होता. पण एवढ्याने भागले नाही. कौसल्येचा धिक्कार त्याला ऐकायचा होता. रामाने तिला सांगितले होते, "राजाला जास्त तापवू नकोस; दुःख देऊ नकोस." पण कौसल्येने ते ऐकिले नाही. तिने तीव्र शब्दांनी राजाचा धिक्कार केला- राममात्रा क्रुद्धया राजा परूषं वाक्यं श्रवितः । (२.५६.१.).
 हतं त्वया राज्यमिदं सराष्ट्रं हतस्तथात्मा सहमन्त्रिभिश्च ।
 हता सपुत्रास्मि हताश्च पौराः सुतश्च भार्या च तव प्रहष्टौ ।। (२.५५.२०).

।। संस्कृती ।।

२३

 "तू राज्याचा, स्वतःचा, मंत्र्यांचा, सगळ्यांचा घात केलास. मला व माझ्या पोराला मारिलेस. तुझी बायको व तुझा मुलगा ह्यांना मात्र आनंद झाला आहे." कैकेयी व भरत तुझे, आम्ही तुझे कोणीच नव्हत, असे ती म्हणत आहे. चौदा वर्षांनी राम येईल व राज्य घेईल, असे कदाचित राजा म्हणेल म्हणून त्याआधीच ती म्हणते-

 एवं कनीयसा भ्रात्रा भुक्तं राज्यं विशांपते ।
 भ्राता ज्येष्ठो वरिष्ठश्च किमर्थं नावमंस्यते ||
 न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति ।
 तथा ह्यात्तमिदं राज्यं हृतसारां सुरामिव ।
 नाभिमन्तुमलं रामो.. ।। (२.५५.११,१३).
 "धाकट्या भावाने ज्या राज्याचा उपभोग घेतला, त्या राज्याला थोरला भाऊ का झिडकारणार नाही? दुस-याने आणिलेले भक्ष्य वाघ कधी खात नसतो. अशा प्रकारे मिळालेले राज्य म्हणजेच चव गेलेली (शिळी) दारूच. राम मुळीच कशाचा स्वीकार करणार नाही. "
 दोघी सवती- सवतींची मने अगदी सारखीच. ज्या शब्दात त्या बोलतात, तेही सारखेच. एका भावाने उपभोगलेले किंवा ज्यातून श्रीमंत, कोशकार व इतर निघून गेले आहेत अशा राज्याला दोघीही शिळ्या, चव गेलेल्या दारूची उपमा देतात. धाकटा भाऊ राज्यावर बसला व मागून थोरल्याला ते मिळाले, तर ते जणू उष्टे होते, अशा तऱ्हेने कौसल्या बोलत होती. राजाने वर दिले होते व ते पाळले पाहिजेत, हे कारण फक्त राजाला, कैकेयीला व रामाला मान्य होते. इतरांना ते एक स्त्रैण माणसाने पुढे केलेले निमित्त वाटते.
 इमां गिरं दारुणशब्दसंश्रितां निशम्य स्वदुष्कृतं चापि पुनस्तां स्मरन् । (२.५५.२१)
 "हे दारुण शब्द ऐकल्यावर स्वतःच्या दुष्कृत्याची राजाला (परत) आठवण झाली." ह्या श्लोकात राजा स्वतःच्या कृत्याला दुष्कृत्यच म्हणतो. राम वनवासाला निघाला, तेव्हा राज्याबाहेरच त्याला ठेवून भरपूर द्रव्य वगैरे

२४

॥ संस्कृती ॥

देऊन त्याने रहावे, अशी व्यवस्था करावयास तो निघाला होता. त्यावरूनही असे वाटते की, चौदा वर्षांनंतर रामाला राज्य द्यावयाची किंवा त्यासारखीच दुसरी काही व्यवस्था तो करणार होता. कैकेयीने रामाला बरोबर काही नेऊ दिले नाही; तर कौसल्या म्हणते आहे की, असले उष्टे राज्य रामाला नकोच म्हणून.

 ह्या सर्व प्रकारात स्वतःचा मुलगा चौदा वर्षे दिसणार नाही, हे दुःख सोसूनही संयम ढळू दिला नाही तो सुमित्रेने तिने कौसल्येला शुद्धीवर आणिले व कौसल्येने हात जोडून दशरथाची क्षमा मागितली. पण रामाबद्दलचा शोक व स्वतःबद्दलची कीव काही तिला आवरता आली नाही.
 ह्याच अवस्थेत अति थोडक्यात दशरथ आपण तरुणपणी म्हाताऱ्या आईबापांच्या एकुलत्या-एक मुलाला कसे चुकून मारिले ते सांगतो. आपल्याला ही गोष्ट 'श्रावण' नावाच्या पितृभक्त मुलाची म्हणून माहीत आहे. संपादित रामायणात त्या मुलाचे नाव येत नाही. दशरथ सांगतो, "जसं करावं, तसं भरावं. मी वृद्ध माता-पित्यांना पुत्रशोकाने मारिले; त्यांच्या शापाने मी मरतो आहे.” दशरथ तरूण, लग्न न झालेला असतांना त्याला शिकारीचा षोक होता. नुसत्या शब्दवेधाने लक्ष्यावर बाण मारण्याचे तो शिकला होता. ही आपली नवी शक्ती त्याला खरोखरच शिकारीत अजमावून पहावयाची होती, म्हणून शरयूतीरावरच्या रानात तो शिकारीला गेला. तेथे त्याला नदीवर सावज (हत्ती) पाणी पिते आहे, असा आवाज आला व त्याने बाण सोडला. खरोखरच बाणाने शब्दवेध घेतला व 'हाय ! मेलो!' असे शब्द दशरथाला ऐकू आले. दशरथ बावरून त्या ठिकाणी आला, तो एक तरूण वर्मी बाण लागलेला असा त्याला दिसला. तो तरूण आपल्या तहानलेल्या आईबापांसाठी पाणी नेण्यास आला होता. भांडे पाण्यात बुडविताना बुडूबुडू असा जो आवाज झाला, तो एखाद्या जनावराचाच, असे दशरथाला वाटले. त्या तरूणाला वाचविता आले नाही; पण दशरथ पाण्याचे भांडे घेऊन तरूणाने सांगितलेल्या ठिकाणी आला; कापत कापत, भीतीने व दुःखाने झाला प्रकार दशरथाने त्यांना सांगितला; त्यांच्या सांगण्यावरून मुलाचे प्रेत

।। संस्कृती ।।

२५

पडले होते तेथे तो त्यांना घेऊन गेला. दोघेही पुत्र-शोकाने मेले व तूही असाच मरशील,' असा शाप पित्याने दशरथाला दिला. श्रावण आई-बापांना कावडीत घालून काशीला नेत होता, असे वर्णन मराठी गाण्यातून आहे. तसा काही प्रकार नव्हता. आई-बाप अति वृद्ध, सर्व काही त्यांचे तोंड धुण्यापासून जेवू घालण्यापर्यंत मुलगाच करी, अशी हकीकत आहे. कालिदासाने ही कथा देताना दशरथाचे लग्न झाले होते व मूल होत नव्हते, अशा वेळी त्याच्या हातून तो तरूण मारला गेला व म्हाताऱ्यांचा शाप म्हणजे पुत्रप्राप्तीचा वरच असे तो समजला, असे वर्णन केले आहे. रामकथा व रामायणकाव्य हे मागाहूनच्या कवींचा एक खजिना होता. त्यातून ज्याला पाहिजे ते तो घेत होता. त्यात फेरबदल करीत होता. कालिदासाने जे केले, तेच भवभूतीने केले. प्रत्यक्ष प्रसंग नाही, तर वर्णने व निरनिराळ्या साहित्यिक लकबी मागाहूनच्या कवींनी व नाटककारांनी रामायणातून कशा उचलल्या, हे वाचताना जागोजाग प्रत्ययाला येते.

 मुलगा वनवासात गेल्यापासून दशरथ कौसल्येच्या महालात अर्धवट भ्रमात निजलेला होता. तरूण मुलाला मारल्याची गोष्ट कधीतरी मध्यरात्री त्याने कौसल्येला सांगितली व तो निजला असला पाहिजे. त्या वेळीही "मला तू दिसत नाहीस. तुझा स्पर्श जाणवत नाही" वगैरे म्हणालाच. सकाळी मागध व बंदिजन त्याला उठवावयास आले, तेव्हा तो मेलेला आढळला. ही बातमी कौसल्या सुमित्रेला व नंतर इतरांना कळली. म्हणजे राजाच्या प्राणांतिक अवस्थेत त्याच्याजवळ कोणीही नव्हते.
 दशरथ मेल्याचे कळल्यावर वसिष्ठ व मंत्री येऊन त्यांनी ताबडतोब भरताला आणण्याची व्यवस्था केली व मुलगा येऊन अग्नी देईपर्यंत राजाचे शरीर नीट रहावे, म्हणून ते एका तेलाच्या हौदात ठेविले. भरताचे आजोळ गिरिव्रज होते. पुढे जरासंधाने प्रसिद्धीला आणिलेले मगधातील गिरिव्रज है नव्हे. हे गिरिव्रज विपाश् (बियास) नदीच्या काठी मोठमोठ्या डोंगरांत, हिमालयाजवळ वसलेले होते. हस्तिनापूर, कुरुजाङ्गल ओलांडून उत्तरेकडे थेट सध्या ज्याला 'कुलू' म्हणतात तेथल्या प्रदेशापर्यंत जावे लागे. अयोध्येत

२६

॥ संस्कृती ॥

काय वर्तमान घडले, हे भरताला न सांगण्याची जासुंदांना आज्ञा होती. अतिशय त्वरेने जासूद पाच दिवसांनी गिरिव्रजाला केकय- देशात अश्वपतीच्या राजधानीत पोहोंचले. 'तुला अयोध्येला बोलाविले आहे,' एवढाच निरोप भरताला कळला व तो लागलीच निघाला. लाडक्या नातवाला व भाच्याला खूप आहेर, उत्तम घोडे वगैरे देऊन अश्वपतीने परत पाठविले. भरताला परत येण्यास आठ दिवस लागले. अयोध्येत तो पोहोंचला, तर सर्व वातावरण त्याला चमत्कारिकच दिसले. बाप कुठे दिसेना. तो हटकून कैकेयींच्या महालात असणार. तेथे त्याच्या पाया पडावयास म्हणून गेला, तो एकटी कैकेयीच त्याला दिसली. तिने त्याला मिठी मारली, "आजोबा कसे आहेत ?" वगैरे प्रश्न विचारिले त्याने त्या प्रश्नांना उत्तरे दिली व उताविळीने विचारिले की, "महाराज कुठे आहेत?" ह्यानंतरची प्रश्नोत्तरे फारच मासलेवाईक आहेत. ती देण्याआधी एक मुद्दा, कैकयी विधवा झाली आहे ह्याचे कोठचेच चिन्ह भरताला दिसले नसले पाहिजे. त्या वेळच्या स्त्रिया कुंकूही लावीत नव्हत्या व मंगळसूत्रही बांधीत नव्हत्या.

 भरत विचारितो, 'काय झालंय तरी काय? कोणी आनंदी दिसत नाही. राजा बहुतकरून आईच्या (कैकेयीच्या) घरी असतो, म्हणून मी येथे आलो, तर तो दिसतच नाही. मला बापाच्या पाया पडायचंय. तो थोरली (कौसल्ये) कडे आहे का ? सांग पाहू."
 कैकेयीने उत्तर दिले, "बाबा, जन्माला आलेल्यांची शेवटी जी गत होते, तीच तुझ्या पित्याची झाली. "
 हे ऐकून तो बेशुद्धचं पडला व मग शोक करु लागला. (महाभारताशी तुलना करिता रामायणातील सर्व पुरुष वारंवार रडतानाच आढळतात.) त्याची आई म्हणाली, "ऊठ, पडला आहेस तो. तुझ्यासारखे असा शोक करीत नाहीत."
 भरत म्हणाला, "रामाला अभिषेक तरी होत असेल किंवा राजा एखादा मोठा यज्ञ करीत असेल, म्हणून मी मोठ्या आनंदाने व उत्सुकतेने आलो, तर हे घडले. कोठच्या रोगाने राजा गेला? मला पाह्यलाही मिळाला नाही.

।। संस्कृती ।।

२७

रामाला निदान त्याचे अंत्यसंस्कार तरी करिता आले. राम कुठे आहे, हे तरी लौकर सांग; म्हणजे दशरथाच्या शेवटच्या क्षणाची मला वार्ता कळेल." असे विचारिल्यावर कैकेयी म्हणाली, "हा राम! हा सीते! हा लक्ष्मणा! असा आक्रोश करीत राजा वारला. राजाचं शेवटचं भाषण होतं- 'राम सीतेबरोबर परत येईल व प्रजेला आनंद देईल.".

 ही दुसरी अप्रिय वार्ता ऐकल्यावर भरताने विचारिले, "म्हणजे राम, सीता, लक्ष्मण आहेत तरी कुठे?"
 कैकेयीचे उत्तर "तो वल्कले धारण करून दण्डकारण्यात गेला आहे." भरताला भीतीने कापरे भरले. "झाले तरी काय असे?” त्याने त्रस्तपणे विचारिले, "रामाने काय एखाद्या ब्राह्मणाचे धन हरण केले का ? एखाद्याला ठार मारिले का ? परस्त्रीचा अभिलाष धरला का? दण्डकारण्यात हद्दपार करण्याची शिक्षा त्याला कशामुळे मिळाली?" हे ऐकून त्याला अभिषेक होणार हे ऐकिल्यावर रामाला वनवासात पाठविण्याची बहादुरी आपणच कशी केली, हे कैकेयीने सांगितले व ती म्हणाली, "बाबा, हे सर्व मी तुझ्यासाठी केले. आता राज्यावर बैस शक्य तितक्या लवकर राजाचे अन्त्यसंस्कार कर व मग स्वतःचा अभिषेक करवून घे." संबंध ६६ वा अध्याय ह्या संवादात गेला आहे. किती वाकडेपणे एखादी घडलेली हकीकत सांगायची ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. मला वाटते लोकांत रूढ असलेल्या अशाच तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टींचे हे मूळ असावे. एक गोष्ट चमत्कारिक वाटून विचारावी, तो तीहीपेक्षा चमत्कारिक व वाईट गोष्टीवर ती अवलंबून असावी. अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत.
 'एकादशीच्या दिवशी सुपारी का हो खाता?' असे एका ब्राह्मणाला विचारिले, तो म्हणाला, 'कांद्याचा वास जाण्यासाठी!' वगैरे वगैरे अशी गोष्ट लहानपणी ऐकल्याचे स्मरते. अशा गोष्टी विनोदी म्हणून सांगितल्या जात. त्यांचे मूळ रामायणाच्या अयोध्याकांडाच्या ६६ अध्यायात असेल, अशी त्या वेळी कल्पनाही नव्हती.

२८

॥ संस्कृती ॥

 भरताने कैकेयीची निर्भर्त्सना केली. "ना बाप, ना भाऊ, अशा मला राज्य घेऊन करायचे काय ? धार्मिक अश्वपतीची ( हेच नाव सावित्रीच्या बापाचे होते.) तू मुलगी नसून कुळाचा समूळ नाश करणारी अशी राक्षसीणच जन्माला आली आहेस." येथे भरताने कैकेयीला एक मजेदार गोष्ट सांगितली आहे. "एकदा देवांची गाय सुरभी हिने हाडे निघालेले, श्रान्त असे दोन बैल कसेबसे नांगर ओढताना पाहिले. मुलांचे दुःख पाहून ती रडू लागली. तिचे अश्रू इन्द्रावर पडले. तो म्हणाला, 'बाई, रडतेस का? आम्ही काय केले आहे ?' ती म्हणाली, 'तुम्ही नाही, पण पृथ्वीवर पहा माझ्या लेकरांचे काय हाल चालले आहेत ते अग कैकेयी, लक्षावधी मुले असलेल्या सुरभीला दोघांचे दुःख पाहवले नाही. तर एकपुत्रा कौसल्येला काय झाले असेल? मी अस्सा जातो; रामाला परत आणतो किंवा ते शक्य न झाले, तर मी वनात जातो."

 भरताचा शब्द कानांवर पडताच कौसल्या तरातरा आपल्या वाड्याबाहेर त्याला भेटावयाला आली. पहिले शब्द ती काय बोलली ? "बाबा, हे निष्कंटक राज्य तुला मिळाले आहे, ते भोग. आता कैकेयीने मला पण माझा मुलगा आहे, तेथे हाकलून द्यावे. नाहीतर तू तरी मला तिकडे नेऊन टाक?" बिचारा भरत! त्याच्या क्लेशांना सुरुवात झाली. "आर्ये, ह्यातले मला काही माहीत नाही. मला का बरं दोष लावितेस जगातील सगळी पापे व फळे मला लाभोत, जर ह्यातले मला काही माहीत असेल तर!" अशा नाना शपथा भरताने घेतल्या व कौसल्येचे सांत्वन केले.
 वसिष्ठाने भरताला सांगितले, “बाबा आता शोक पुरे. बापाचे कार्य कर." रीतीप्रमाणे राजाचे सर्व संस्कार झाले व भरत आणि इतर परत राजधानीत येऊन दहा दिवस जमिनीवर निजून राहिले. पित्याचा बारावा व तेरावा दिवस भरताने केला.
 तेराव्या दिवशी शत्रुघ्न भरताचे सांत्वन करीत असता त्याला कुब्जा मंथरा दिसली. तिला शत्रुघ्नाने भरताच्या सांगण्यावरून मारून काढले. पण राम रागावेल, म्हणून जिवानीशी सोडले.

।। संस्कृती ।।

२९

 चौदाव्या दिवशी सर्व अधिकारी पुरूष (राजकर्तारः) एकत्र येऊन त्यांनी भरताला विनंती केली की, "आता तू आमचा राजा हो. अभिषेकाची सर्व तयारी झाली आहे. भरताने ठाम सांगितले की, मोठा भाऊ राम राजा होईल. मी कदापि अभिषेक करून घेणार नाही. चला रानात जाऊ व त्याला परत आणू."

 भरताने सर्व गोष्टी अंतःपुरातून व तेथील क्षुद्र कारस्थानातून बाहेर चव्हाट्यावर काढल्या. आईचेही ऐकले नाही, मंत्र्यांचेही ऐकले नाही. तो स्वाधीन होता. काय करायचे, ते त्याचे ठाम ठरले होते. कोठे एका क्षणीही चित्त विचलित न होता त्याने ठरविलेल्या गोष्टी केल्या. मी करतो, ह्याखेरीज दुसरा काही मार्ग आहे हेच त्याला दिसत नव्हते. रामाने "कैकेयी किती दुष्ट आहे! बसू दे भरताला आता निर्वेधपणे राज्यावर " असे शब्द वनात काढले होते. भरत असे काहीच बोलला नाही. त्याचे मन द्विधा नव्हतेच मुळी. रामावर त्याचा विश्वास अचल होता. त्याची प्रत्येक कृती ही त्याच्या आंतरभावाची निदर्शक होती. त्याने राजसभा बोलाविली. तो कोणाचाच नावडता नव्हता. पुरोहितांनी त्याला राज्यावर बस, म्हणून विनंती केली. पण भरताने ती झिडकारून लाविली व मी रामाला आणायला जातो, म्हणून त्याने सांगितले.
 वनात निघायचे ठरल्यावर सगळीच बरोबर आली. सर्व मंत्री, वसिष्ठ, तिन्ही आया, पौरजन व रस्ते साफ करणारे एक सबंध पथक त्यांत सुतार होते, खणणारे होते, यन्त्रकोविद ( ? ) होते, म्हणजे ज्याला हल्ली फौजेचे इंजिनिअर म्हणतात ते सर्व होते. ते पुढे जाऊन रस्ता करीत व मागून बसून राजपुरूष व राजस्त्रिया जात, असे वर्णन आहे.
 रामाने जेथे जेथे मुक्काम केला तेथे तेथे भरताचाही मुक्काम झाला. पण प्रत्येक ठिकाणी भरताबद्दल संशय उत्पन्न झाला. गुहाला वाटले हा सैन्य घेऊन चालून तर आला नसेल? तो आपल्या सर्व बांधवांना व होड्यांना सज्ज होण्याचा आदेश देऊन भरतापुढे गेला. भरताने आपण का आलो ते सांगितले तेव्हा गुह म्हणाला,

३०

।। संस्कृती ।।

 "धन्यस्त्वं न त्वया तुल्यं पश्यामि जगतीतले ।

 अयत्नादागतं राज्यं यस्त्वं त्यक्तुमिहेच्छसि ।।"२-७९-१२
 "धन्य तुझी! अनायासे हातात आलेले राज्य तू नाकारलेस. तुझ्यासारखा माणूस पृथ्वीवर अजून आढळला नाही." गुहाचे शब्द हेच भरताच्या जिविताचे योग्य मूल्य करतात.
 गुहाने लक्ष्मणाचेही शब्द सांगितले. "आम्ही गेल्यावर राजा मरणारच. कौसल्येचे, सुमित्रेचे काय होईल, कोण जाणे? सुमित्रेचा शत्रुघ्न राहील, म्हणून तिला काहीतरी सुख. पण कौसल्येचे काय? मेलेल्या बापाचे सर्व संस्कार यथासांग नीटपणे होतील आणि मग सर्व इच्छा पूर्ण झालेले असे (सिद्धार्थाः) भरताच्या बाजूचे ते लोक राजधानीत सुखाने राहतील. प्रतिज्ञा पूर्ण होऊन आम्ही परत सुखाने अयोध्येला जाऊ की नाही कोण जाणे?" (अध्याय ८०) बिचारा भरत हे शब्द ऐकून बेशुद्धच पडला. त्यानंतर तो तेव्हाही भारद्वाज आश्रमात गेला व राम कुठे गेला म्हणून विचारू लागला, त्याला असाच अनुभव आला. भारद्वाजाने विचारले, "त्या बिचाऱ्या निरपराध रामाचे काही वाईट करण्यासाठी तर नाहीस ना तू आलास?" (२.८४.१५) भरत काय म्हणणार?
 "हतोऽस्मि यदि मामेवं भगवानपि मन्यते” २.८४.१६
 "आपणालाही असं वाटलं म्हणजे मी मेलोच."
 येथे एक सबंध अध्याय (८५) भारद्वाजाने आपल्या तपःसामर्थ्याने राजपुरूष, राजस्त्रिया व पौर आणि सैनिक ह्यांचे आतिथ्य कसे केले, याचे वर्णन आहे. सर्व स्वर्गातून मिळविले. भरतापुढे अप्सरा येऊन नाचून गेल्या. ब्राह्मणांचा महिमा अतिशयोक्तीने वर्णन केलेला आहे. दुःखीकष्टी भरताला व त्याच्या आयांना असले आतिथ्य नकोच होते. हा सर्वच अध्याय अतिशय हीन रुचीचा वाटतो. प्रक्षिप्त असावा काय ?
 येथेच पुढच्या घटनांची नांदी सूचित केली आहे. कैकयीने शरमिंदी होऊन ऋषीचे पाय धरले तेव्हा भारद्वाज म्हणतो, "भरता, कैकेयीला दोष लावू नको. रामाचे वनवासात जाणे हे सुखदायीच होणार आहे." (२.८६.२८)

।। संस्कृती ।।

३१

कसे काय हे ऋषींनी स्पष्ट केले नाही पण देवांची गुप्त योजना त्यांना माहीत होतीशी दिसते. शेवटी भारद्वाजाने सांगितलेल्या मार्गाने सर्वजण चित्रकुटाला पोचतात. लक्ष्मण लांबूनच भरताला पाहतो व त्वेषाने म्हणतो, "आपल्याला मारावयाला हा, कैकयीचा मुलगा भरत येतो आहे" (२.९०.१३) "राज्याचा लोभ धरणाऱ्या कैकयीला आज आपला मुलगा लढाईत माझ्या हातून मारलेला दिसेल. (२.९०.२०)

 रामाने ज्याला म्हटले, "भरताने कधीतरी तुझे अप्रिय असे केले होते का ? आज तुला एवढी भीती का वाटते की, तू भरताबद्दल शंका घेऊ लागला आहेस?" हे रामाचे वाक्य वाचून आनंद वाढतो; कारण भरताबद्दल त्यात सद्भाव व्यक्त केला आहे. पण पूर्वी वनात जाताना त्याने भरताबद्दल फारच कटू उद्गार काढले होते. "हाय, आता कैकयीचा मुलगा भरत, संपन्न कोसलाचा एकमेव भोक्ता होऊन सुखी होईल.”
 सुखीबत सभार्य च भरतः कैकयीसुतः ।
 मुदितान् कोसलाने एको यो भोक्ष्यत्यधिराजवत् । (२.४७.११)
 "म्हातारपणाने वडील मेल्यावर व मी अरण्यात असल्यावर तोच आता एकटा राज्याचे मुख होणार (२.४७.१२) " भरत कौसल्येला व सुमित्रेला छळील असे तो म्हणत नाही. पण
 "अपीदानीं न कैकयी.... कौसल्यां च सुमित्रां च ।
 संप्रबाधेत मत्कृते" ।। (२.४७.१५)
 "कैकयी आता कौसल्या - सुमित्रांना माझ्यावरील द्वेषाने छळणार तर नाही?" अशी शंका व्यक्त करतो. अर्थात हे उद्गार वनवासाला जायचे हे कळल्यानंतर लगेचचे आहेत. त्या वेळी आघात एवढा मोठा होता की, क्षणभर रामसुद्धा गडबडला. पण वनवासात एक पंधरवाडा शांतपणे राहिल्यावर त्याने भरताच्या मनाची नीट परीक्षा केली असे दिसते.
 भावा-भावांची भेट होते. राम भरताला मांडीवर बसवून प्रेमाने विचारतो, "अरे, तुझ्या वडिलांनी तुला अरण्यात कसे येऊ दिले? दशरथ राजा कुशल आहे ना?" हे प्रश्न विचारून नंतर त्याच्या उत्तराची वाटही न पाहता

३२

।। संस्कृती ।।

पन्नासएक श्लोक, राज्यात सर्व कसे काय चालले आहे असे 'कच्चिद्' शब्दाने सुरुवात होणारे प्रश्न विचारतो. हे प्रश्न महाभारतावरून घेतले असावेत, असा संपादकाचा तर्क आहे. महाभारतात प्रश्न प्रसंगानुरूप आहेत. येथे मात्र सर्वस्वी अप्रासंगिक आहेत. पण ह्या असल्या प्रश्नांची एक काव्यपद्धती निर्माण झाली. राजाने ऋषींना असे प्रश्न रघुवंशात व शाकुंतलात विचारिले आहेत. कालिदासापुढे महाभारताचा नव्हे, पण रामायणाचा कित्ता होता. हा सबंध अध्याय निरर्थक व अप्रासंगिक आहे. दशरथ मेलेला रामाला माहीत नाही. भरताला यौवराज्याभिषेक झाला, हे तो धरून चालतो आहे. राज्य सोडून रामाला जेमतेम महिना झाला होता. अशा वेळी राज्याचे कुशल विचारिल्याबरोबर जणू आपल्या शिरावरच सर्व भार पडला आहे, अशा तऱ्हेने "लोक नीट वागतात ना? मुले बापाची आज्ञा पाळतात ना? पाऊस नीट पडतो ना? (वैशाख संपल्यावर!)? परिस्थिती ठीक आहे ना?" विचारिलेले हे सर्व प्रश्न अगदी अप्रासंगिक वाटतात.

 राम विचारायचा थांबून भरताला उसंत मिळाल्यावर भरताने पितृ- मरणाची हकीकत सांगितली: रामाने शोक केला; वन्यफलांचा पिंड देऊन पितृकार्य केले व मग भरताने त्याला परत देण्याची विनंती केली. राम म्हणतो, "राज्य तुझे आहे." भरत म्हणाला, "बरे, तसे का होईना. मी ते तुला देत आहे.” तरी राम ऐकेना. भरताने फार चांगला युक्तिवाद केला; थोडी हेटाळणी केली;
 क्व चारण्यं क्व च क्षात्रं क्व जटाः क्व च पालनम् ।
 ईद्दशं व्याहतं कर्म न भवान् कर्तुमर्हती ।। (२.९८.५६).
 "अरण्य कोठे व तुझा क्षात्रधर्म कुठे? कसल्या जंटा आणि कसले प्रतिज्ञापालन ? हे असलं काही तुम्हांला शोभत नाही. "
 ह्या संबंधात रामाने एक फारच चमत्कारिक व आतापर्यंत व पुढे कोठेही रामायणात न आलेली गोष्ट सांगितली. तो म्हणतो, "भाऊ पूर्वी आपल्या पिल्याने जेव्हा तुझ्या आईशी लग्न केले, तेव्हा हुंडा म्हणून राज्य देण्याचे तुझ्या आईच्या वडिलांना कबूल केले होते. "
 पुरा भ्रातः पिता नः स मातरं ते समुद्वहन् !

।। संस्कृती ।।

३३

 मातामहे समांश्रौषीद्राज्यशुल्ममनुसत्तम् ।। (२.९९.२).

 रामाने सांगितलेली गोष्ट खरी मानिली, तर दशरथाने भरत नाही ही संधी पाहून जाणूनबुजून कैकेयीला फसवून रामाला यौवराज्याभिषेक करण्याचा कट केला होता व राम त्यात सामील होता, असे होईल. हा श्लोक प्रक्षिप्त असावा का? त्याला किती किंमत द्यायची? शंभराव्या अध्यायातील जाबालीचे भाषण हे असेच सर्वथैव अप्रासंगिक व विरस करणारे आहे. त्यात जाबाली रामाला व्यवहारी शहाणपण सांगतो. हेही महाभारताचे अनुकरण असावे का?
 राम ऐकत नाही, हे पाहून भरत प्राणांतिक उपोषण करावयास बसला. तेव्हा वसिष्ठ व पौर मध्ये पडले. सर्वांच्या संमतीने असे ठरले की, रामाच्या पादुका सिंहासनावर बसवून भरताने १४ वर्षे राज्यकारभार पाहावा. भरताने बरोबर रत्नजडित पादुका आणल्या होत्या. त्या त्याने रामाला घालावयास दिल्या व नंतर त्या काढून घेऊन स्वतःच्या डोक्यावर धारण केल्या.
 परत प्रश्न उपस्थित होतो. १४ वर्षे बायको व रात्रंदिवस चाकरी करणारा भाऊ घेऊन वनवासात जाणाऱ्या रामाचा त्याग श्रेष्ठ की मिळालेल्या राज्याचा त्याग करून नगरीत तपस्व्यासारखे राहून भावाच्या राज्याचे रक्षण करणाऱ्या भरताचे चारित्र्य श्रेष्ठ ?
 ज्याच्यासाठी प्रतिज्ञा घेतली, तो पिता मेलेला. कैकेयी दीन झालेली. ज्याला राज्य मिळायचे, तो ते घ्यायला तयार नाही. म्हणजे प्रतिज्ञा केलेली सगळी कारणे नाहीतशी झाली, तरी प्रतिज्ञेला चिकटून राहण्यात रामाने काय साधले? भीष्माच्या वेळीही मी हाच प्रश्न काढला होता. प्रश्नाचा रोख रामावरही नाही की भीष्मावरही नाही, तर 'नैतिक मूल्ये कशावर अवलंबून रोख असावीत? नैतिक वर्णन केवळ स्वसापेक्ष व परनिरपेक्ष असावे का?' असा प्रश्न आहे. याचे उत्तर फारच गुंतागुंतीचे, अर्धवट 'होय' व अर्धवट 'नाही' असे. आहे. त्या प्रश्नाचा विचार येथे करण्याचे कारण नाही. पण माझ्यापुढे आलेला विचार इतरांना सांगावा, म्हणून येथे निर्देश केला आहे. 'टू हॅव द केक अँड ईट इट टू' असा वाक्संप्रदाय इंग्रजीत आहे. 'केक खायचीपण.

३४

।। संस्कृती ।।

आणि (सबंध ठेवायचीपण.' ही गोष्ट तर्कशास्त्राने अशक्य म्हणून सांगितली आहे. पण ही अशक्य गोष्ट रामाने करून दाखविली. त्याने राज्य सोडलेही. आणि अगदी खुंटा हलवून घट्ट करून राज्य आपलेसेही केले. भरताने 'न उष्टवता' भरलेले ताट रामासाठी तयार ठेवले.

 परत येताना कौसल्या फारशी रडली नाही. रामाचा वियोग १४ वर्षे होणार होता, तो काही कमी झाला नाही. पण राज्याची जी व्यवस्था झाली, ती पाहून रामवियोगाचे तिचे दुःख कमी झालेले दिसते.

।। संस्कृती ।।

३५