Jump to content

श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ मार्च

विकिस्रोत कडून

३१ मार्च

स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.



'आपणच काय ते सर्व करणारे' अशी भावना आपण ठेवतो, आणि पुढे दुःख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म 'मी' केले असे म्हणण्यात काय पुरूषार्थ आहे ? 'मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो' असे म्हणतो, याचासुद्धा अभिमान आपल्याला होतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण 'मी करतो' हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर, नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही; 'कर्ता मी नाही' हे समजले म्हणजे सर्व साधते. नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे कर्तेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे.

खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते. देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो, तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का ? पण त्याच्यापलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाच चांगला म्हणून ! त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा कैद्याला लागली म्हणजे माणूस नाही विषयात राहणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही. बुजार घोडयाला जसे चुचकारून घेतात, तसे मनाला करावे. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध राहावे. भगवंताचे स्मरण चुकले की काही तरी अवघड वाटायला हवे. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे, म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावे ? जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसते गिरिकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का ? तसे असते तर तो माकडांनाही साधला असता ! खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो. पण मनुष्याला चांगलेवाईट कळते, त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे, ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये; त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे, पण 'मी त्याला सुधारीनच' हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.