Jump to content

श्रीग्रामायन/सिंहगड : पाठीमागून

विकिस्रोत कडून

सिंहगड, पाठीमागून



‘परवा तुमची सारखी आठवण येत होती' सायकलवरून येणाऱ्या आमच्या पूर्वीच्या पवार दूधवाल्यांना थांबवून मी म्हटले.

घागरी रिकाम्या करुन ते आता परत गावाकडे निघालेले होते. पुण्यापासून दहा बारा मैलांवर, सिंहगडच्या पायथ्याशी वसलेले गो-हे हे त्यांचे गाव. रोज सकाळी सायकलीला घागरी बांधून पुण्याला यायचे, दिवसभर रतीब घालायची, संध्याकाळी मुक्कामाला गावाकडे. रोज पंचवीस-तीस मैल सायकलिंग तर सहजच होत असावे. ऊन नाही, वारा नाही, पाऊस काळात तर भिजत, वाहते ओढे ओलांडून यायचे-जायचे ! वर्षानुवर्षे हा त्यांचा क्रम सुरूच आहे.

‘का बुवा ? आमची आठवण व्हायचे कारण ? ' सायकलवरून उतरून पवारांनी मला विचारले.
‘तुमच्या गावावरून परवा गेलो. डॉक्टर (पळसुले)-तुम्ही-आम्ही मागे तोरण्याला गेलो होतो तसेच !' मी.
'मग घराकडे आला नाहीत ?' पवार.
'थोडी वाट वेगळी पडली.' मी
'कसे गेलात ? '
'अगदी अचानकच ठरलं. मला वेल्ह्याला जायचं होत. सकाळी स्टॅडवर गेलो. जत्रेचा दिवस असल्याने गाडीला फार गर्दी होती. मनाने तर घेतले होते, आज वेल्ह्याला जायचेच. शेजारी सिंहगडची एस. टी. रिकामी उभी होती. आठवले, दहा-बारा वर्षापूर्वी आपण तिघेजण सिंहगडला वळसा घालून पायी वेल्ह्याला पोचलो होतो पंधरा-सोळा मैलाची चाल पडली होती. म्हटलं, बघू पुन्हा जमतं का. म्हणून सिंहगड गाडीत बसलो.' मी.
'उतरलात कुठे ? वाट कुणी दावली ?'
आपली पूर्वीची वाट वेगळी होती. डोंजाला उतरून आपण रात्री तुमच्या घरी मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी खानापूरवरून, पाब्याची खिंड ओलांडून आपण संध्याकाळी वेल्ह्यात पोचलो. तिसरे दिवशी सकाळी आपण तोरणा गडावर होतो. या वेळी थेट सिंहगडच्या पायथ्याला उतरलो. तिथेच एक वाटाड्या भेटला. प्रवाश्यांना सिंहगड दाखविण्याचे काम तो नेहमी करीत असतो. तिथल्याच अतकरवाडीचा. तो बरोबर यायला तयार झाला. निम्मा डोंगर या वाटेने चढावा लागतो. मेटावर पोचले की पश्चिमेकडे वळायचे. तशीच आणखी दोन मेटे लागली. उजव्या हाताला खानापूर. आपलं गोर्हं सगळं वरून दिसत होतं. ' मी.
'उतरलात तेव्हा गाव कोणतं लागलं ?' पवार.
'विझरच्या पुढचं दापोडं. तिथून चार मैल सरळ गाडीरस्त्याने वेल्हे.' मी.
'म्हणजे डोंगरावरून सगळी चाल झाली.'
' होय. पण त्रास काही झाला नाही. मागच्या ट्रिपची सारखी आठवण येत होती.'
'त्या वेळची गोष्ट वेगळी होती. बरं, तिकडचं पीकपाणी ? एका पावसाने पार दडी दिली आहे आमच्याकडे...' पवार.
'वाचलं खरं परवा वर्तमानपत्रात. मुळशी भागातील शेतकऱ्यांनी मामलेदार कचेरीवर एक मोर्चा नेला होता तो. तुम्ही होतात का त्यात ? ' मी.
'नाही. आता सगळं सोडून दिलं ते. पाच वर्ष पंचायतीचे काम केलं. भानगडीच फार. एक व्यवहार सरळ नाही. आपल्याला ते काही मानवलं नाही.'
'आता गावात निवडणकीची तयारी सुरू असेल ?'
'पाच वर्षात कुणी फिरकले नाही गावाकडे. गावकरीही आता तयार आहेत. टाक इतके पैसे देवळाला नाही तर शाळेला. नाहीतर फुट -हो, सरळ सौदा'
'दिल्लीवाल्यांच्या नावाने आपण उगाच ओरडायचे. गावात आपणही दुसरे काय करतो आहोत ? ' मी.
'खरं आहे' म्हणून पवार हसले. आणखी दोन-चार वाक्ये बोलून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

'कशाला कोण येतय इथं मरायला. गांडुळे खाऊन जगणारी आम्ही माणसं ... '
सिंहगडच्या पश्चिम उतारावरील कळकीच्या मेटावर विसाव्यासाठी बसलो असता ती म्हातारी चटकन बोलून गेली. मी सहज आधी गंमतीने म्हटलं होतं, 'काय भावाला चहापाणी वगैरे केलं की नाही?' माझ्याबरोबर आलेल्या अतकरवाडीच्या वाटाड्याची म्हातारी बहीण येथे रहात होती. मला बसायला घोंगडं वगैरे टाकून वाटाड्या आधीच आत गेला होता. त्याची काहीतरी खुडबुड सुरू होती. पण चहा वगैरे तर काही झालेला दिसत नव्हता. म्हणून गंमतीने मी सहज बोलत होतो.

गुळाचा चहा मला कसा द्यायचा म्हणून बहीण अडखळली होती. घरात साखरेचा दाणाही नव्हता.

असेच हे लोक वर्षानुवर्षे येथे रहात आहेत. कोणी चौकशीला येत नाहीत, जात नाहीत. माझ्यासारख्या अवचित येणाऱ्याजाणाऱ्यांवर त्यांचा विश्वासही नसतो. वाटाड्या सांगत होता, असे एकदम कोणी आले की हा सरकारी माणूस काहीतरी माहिती गुप्तपणे काढायला हिंडतोय, अशीच या माणसांची प्रथम समजूत होते. त्यामुळे खरे दुःख सहसा सांगायला ती तयार होत नाहीत. मी त्यांच्या ओळखीच्या नात्यातल्या माणसाबरोबर आलो होतो. म्हणून बक्कन ती म्हातारी गांडूळ ओकून मोकळी झाली होती.

सकाळपासून मी अशा दोन वस्त्यांवर थांबलो होतो. एकच रड, तीच ओरड. पाणी नाही, पाणी नाही. हे तर ऐन थंडीचे दिवस होते. तरी लांबून पाणी आणायला सुरुवात झाली होती. उन्हाळ्यात तर थेट किल्ल्यावर जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठीही. गुरं कुठे न्यायची ही काळजी आतापासूनच लागली होती. म्हणून या वस्त्या ओस पडत चालल्या होत्या, जवळजवळ पडलेल्याच होत्या. दोन-चार झोपड्या-गोठेच ते ! म्हातारं माणूस आणि गुरे वळण्यासाठी ठेवलेली एक-दोन मुले ! पूर्वी वेगळं होतं. काहीतरी उद्योग हाताशी होता. मुख्यतः गुरं सांभाळण्याचा. चारा पाण्याची सोय होती. आता डोंगर उजाड झाला, पाणी आटले. माणसे उद्योगासाठी शहरात पळाली. कुणाची हातगाडी, कुणी स्टेशनवर हमाल, ऑफिसमधील शिपाई, असा जो तो कुठेकुठे चिकटला आणि झोपडपट्टयांच्या ढिगाऱ्यात हळूहळू दिसेनासा झाला. शहरात बसून, सचिवालयात बैठक बोलावून आम्ही झोपडपट्टी निर्मूलनाच्या योजना आखीत आहोत, त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे वगैरे निघतात. याने हा प्रश्न कधी सुटणार आहे का ? हा ओघ जिथून निघतो, तिथेच तो अडवला पाहिजे. रोगाचे मूळ उपटले पाहिजे. हे वाटते तितके अवघड नाही. फक्त दृष्टी हवी. कार्यक्षम यंत्रणा हवी. डोंगरावरची शेती, बागायती वाढवली पाहिजे. दगडधोंड्यांनी भरलेल्या उतरत्या निकृष्ट जमिनीत आबा करमरकरांसारखा उपक्रमशील शेतकरी ज्वारीचे विक्रमी पीक घेऊ शकतो, मी हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे. इथे, या डोंगरांवर मग काही पिकू शकणार नाही ? खाजगी जंगलांच्या लागवडीचा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. पशुधनाच्या विकासाची एखादी योजना येथे यशस्वी होऊ शकेल. बांबूची वने येथे माजावीत, आंबा-काजूच्या बागा येथे डोलाव्यात. समोर पानशेतचा विस्तीर्ण जलाशय आहे. खडकवासला जवळ आहे. उद्या वरसगावचे धरण तयार होईल. वर गडावर पाण्याची टाकी आहेत- आणि येथे वस्तीला माणूस राहू शकत नाही ! कमरेत वाकलेल्या ऐंशी वर्षांच्या म्हातारीला दोन-दोन मैलांवरून पिण्याचे पाणी वाहून आणावे लागते ! गांडुळे कुठली तर मग ? ही माझ्यासमोर चिडून बोलणारी हाडामांसाची माणसे की, दिल्ली-मुंबईतल्या एअरकंडिशन्ड खोल्यात बसून यांच्या विकासाच्या योजना आखणारे थोर थोर नेते ? त्यांचे सचीव, उपसचीव? त्यांच्यासाठी अहवालांचे ढीग रचणारे बडे बडे विद्वान, तज्ज्ञ, जाणकार ?

याच परिसरात तो तपस्वी भागवत आपले प्रयोग करीत करीत झिजून मेला. पण या तथाकथित संशोधकांना, अधिकाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना तिकडे ढुंकूनही पाहण्याची कधी बुद्धी झाली नाही. भागवत एस्. आर. एकांडे होते, हेकट होते, लोकांचे आणि त्यांचे यामुळे कधीच जमू शकले नाही हे खरेच; पण त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न मूलभूत समजून त्याचा काही अधिक पाठपुरावा होऊ नये, हा त्यांच्यावर झालेला अन्यायच आहे. ज्या भागात डोंगरमाथ्यावर दीडशे-दोनशे इंच पाऊस पडतो तेथे तळाशी राहणाऱ्या लोकांना वर्षातून तीन-चार महिने पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण भटकावे लागावे, हा विरोधाभास त्यांना खटकला, ही विसंगती त्यांना बोचली आणि एकट्याच्या बळावर हा विरोधाभास, ही विसंगती कमी करण्याचा त्यांनी दहा-बारा वर्षे सतत प्रयत्न केला. डोंगरउतारावर ताली घालता घालता त्यांच्या हाडाची काडे झाली, रहात्या घरादारासकट सर्व संपत्तीची धुळधाण उडाली. किती शेतीतज्ज्ञांनी, जलसंशोधकांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचा हा प्रयोग समजावून घेतला, त्यातील उणीवा दूर करून अधिक शास्त्रीय पायावर, व्यापक प्रमाणावर तो यशस्वी व्हावा यासाठी धडपड केली ? बहुतेक धेडांनी त्यांची त्या वेळी टिंगलटवाळीच केली. केंद्रीय मंत्री के. एल्. राव यांचा अपवाद वगळता एकही मंत्री इकडे फिरकलादेखील नव्हता त्या काळात. दोन इंच पाऊस पडणाऱ्या भागात इस्रायलने नंदनवने कशी फुलवली यावर रसभरीत व्याख्याने मात्र दिली गेली-दिली जातातही; तो चमत्कार अभ्यासण्यासाठी येथून तज्ज्ञांची टोळकी तिकडे पळत असतात. पण कुठल्याही देशाची प्रगती असे दुसऱ्याचे पाहून, अनुकरण करून होत नसते. त्यासाठी स्वतंत्र प्रश्न उपस्थित करणारे संशोधकच लागतात. आपल्या आसपासचे विरोधाभास कुठेतरी, कुणालातरी बोचावे लागतात. विसंगती खटकावी लागते. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी वडिलांना गीता वाचून दाखवीत असताना सुरुवातीला शस्त्र खाली ठेवणारा अर्जुन अठराव्या अध्यायाच्या शेवटी ज्या अर्थी युद्धाला प्रवृत्त झालेला दिसतो, त्या अर्थी गीतेत संन्यासाचे प्रतिपादन नसावे, दुसराच काहीतरी गीतेचा संदेश असावा, अशी शंका एखाद्या बाळ गंगाधराला येते आणि नंतर स्वतंत्र संशोधनाच्या वाटेने जाता जाता अखेरीस तो गीतारहस्याचा निष्काम कर्मयोगाचा उद्गाता होऊन जातो. भौतिक शास्त्रातील संशोधनाची वाटचालही यापेक्षा वेगळी नसते. 'पीसा' च्या मनोऱ्यावर गैलीलिओ चढला तेव्हाच युरोपात विज्ञानाचा उदय झाला. तोवर हजार-बाराशे वर्षे पढिक पांडित्य तेथेही ज्ञान म्हणून मिरवीतच होते. चार यंत्रे धडधडली, विज्ञानविषयक भाषांतरित पुस्तकांची रेचचेल माजली की, देशात शास्त्रीय प्रगतीचे युग अवतरले अशी आपली उथळ समजूत आहे. ही यंत्रे चालविणारे, भाषांतरे करणारे-वाचणारे मन शास्त्रीय दृष्ट्या अगदी आंधळे, सामाजिक दृष्ट्या अगदी जुनाटही असू शकते. नव्हे, आपल्याकडे ते बहुतांशी तसेच आहे. असंख्य भागवतांच्या अपयशातूनच वैज्ञानिक यशाची वाटचाल सिद्ध होत रहाते. एक नाही, चार कृषी विद्यापीठे जरी काढली तरी जोवर भागवतांसारखे कुणी अस्वस्थ होऊन विचार करणारे त्यातून बाहेर पडत नाहीत, त्यांची समाजाकडून बूज ठेवली जात नाही, त्यांच्यासारख्यांच्या प्रयत्नांचा पाठपुरावा करणारी संशोधकांची साखळी निर्माण होत नाही, तोवर ही बाहेरून आयात केलेली शास्त्रीयता, हे उसने विज्ञानप्रेम पोकळच आहे. प्रगत औद्योगिक देशांनी फेकलेली चार उष्टी शिते एवढीच याची मातब्बरी.

चार संशोधक -चार अधिकारी यांना काही दिवस वर किल्ल्यावर बंद करून ठेवले पाहिजे. या भागातील पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना शोधून काढल्याशिवाय त्यांची सुटका न केली पाहिजे-माझे मन या स्वप्नरंजनात सारखे दंग होत होते आणि वाटाड्या मात्र मला त्याच त्या जुन्या कथा, मला त्यातले काही माहीत नसावे या समजुतीने ऐकवीत होता. उदयभानूने देवलदेवी–कमलकुमारीला कसे अडकवून ठेवले होते, लग्नाची त्यांच्यावर कशी सक्ती केली जात होती, तान्हाजीला हे कसे कळले, वगैरे. मला मात्र आज या भागातील सर्वच गरीब रयतेला कुणीतरी अडकवून ठेवले असल्याचे जाणवत होते. उपासमारीत खितपत पडण्याची, पाण्यासाठी तडफडण्याची तिच्यावर सक्ती केली जात आहे आणि तान्हाजी तर कुणी दृष्टिपथातही नाही. दोर कापण्याच्या गप्पांना मात्र खूपच रंग चढला आहे.

वेळ ऐन दुपारची असली तरी ऊन बाधत नव्हते. प्रवास मजेत चालला होता. वरून चालताना डावी-उजवीकडची, तळची गावे वाळवण टाकल्यासारखी दिसत होती. तहानेने मात्र जीव व्याकुळला होता. एका वस्तीवरून घेतलेली चार लिंंबे या वेळी उपयोगी पडली. पाण्याची जागा बघून बरोबरचा जेवणाचा डबा उघडावा असे म्हणत होतो; पण दुपार टळत चालली, भुकेने पाऊल पुढे पडेना, तरी पाणी दिसायला तयार नव्हते. शेवटी तसेच जेवण उरकले. वाटाड्याची नाचणीची भाकर आणि लाल तिखटही चापले. तासाभराने मात्र एक धनगरवस्ती लागली. येथे आता नक्की पाणी मिळणार या विश्वासाने एका रिकाम्या खोपटात सरळ शिरलो व मातीवरच आडवा झालो. ही गुरे बांधण्याची जागा होती. काटक्यांचा सडा पडलेला होता. पण स्वच्छता पहात बसण्याइतके शरीर आणि मन थंड होतेच कुठे? तास-दोन तास येथून हलूच नये असे वाटत होते. रात्रही येथे काढण्याचा विचार येऊन गेला-चोहोबाजूंंनी घोंघावणाऱ्या पहाडी वादळवाऱ्याची झुंज ऐकत! दोन बुलंद आवाजीच्या गवयांप्रमाणे चालणारी! त्या विराट संगीताचा अंतःस्वर पकडावा, ते निळे अथांग आरपार पहावे! शिवाय आज पौणिमा...पूर्णत्वाला आज सर्व बाजूंनीच उधाण आलेले असणार. पूर्णत्वाकडे सतत झेप पहाणारे हे मानवी मन...

पाण्याच्या शोधासाठी बाहेर गेलेला वाटाड्या परतला. आसपासच्या दोन-चार झोपड्यांतून त्याने डोकावून पाहिले होते. पण कुणी माणूस त्याला दिसला नव्हता. ब-याच वेळानंतर दुरून एक मुलगा येताना त्याने पाहिला. त्याला हाक मारून त्याने पाणी मागितले. मला वाटत होते, आता दोन-चार मिनिटात पाणी येईलच. कारण मुलगा या वस्तीपैकीच होता. पण पोरगं इरसाला निघालं. त्याने माणसं सगळी बाहेर गेलीत, मी कुणाच्या घरात शिरून कसं पाणी आणू, असं वाटाड्याला सांगून अळंटळं चालविली. त्याचा काका शेजारच्याच खोपटात झोपलेला होता. पण तोही उठायला तयार नव्हता मला राग तर मुळीच आला नाही, आश्चर्य मात्र वाटत होते. यापेक्षाही पाण्याची तगमग असलेल्या मुलखातून मी, रणरणत्या उन्हात असाच, अनेकदा प्रवास केलेला आहे. कित्येकदा एकमेकांची भाषाही समजत नव्हती. पण कुठेही मला पिण्यासाठी पाणी मिळाले नाही, असे घडले नव्हते. माणुसकी इतकी आटलेली मी यापूर्वी कधीही अनुभवलेली नव्हती. वाटाड्याला मात्र फारच वाईट वाटत होते. मला तो उठून पुढे चलण्याचा आग्रह करीत होता. मी, पाणी नसले तरी इथेच अर्धा-पाऊण तास विसावण्याच्या मनःस्थितीत होतो. कदाचित थोडी डुलकी लागून गेली असती. पुढील वाटचालीला हुशारी आली असती.

थोड्या वेळाने झोपेतला त्या मुलाचा काका उठला. वाटाड्याचे व त्याचे काहीतरी बोलणे चालू होते. अर्धवट डोळा लागत होता, उठू नये असे वाटत होते; पण वाटाड्याने झोपू दिले नाही. झोपडीसमोरच्या स्वच्छ सावलीच्या जागेवर घोंगडे अंथरले गेले. माझी तेथे अळेबळेच स्थापना झाली. दुसरे कुणी शेजारी मोकळपणे बसूच शकत नव्हते, इतके ते अंथरूण आखूड होते.

काकाचे दोन्ही पाय गेलेले होते. खुरडत खुरडत तो इकडेतिकडे सरकत होता, मुलाला सूचना देत होता, आमच्याशीही बोलत होता. चेहरा मात्र या गिरीमानवाचा फारच तरतरीत वाटला. दाढी असल्याने बरेचदा सिनेमा-नाटकातल्या शिवाजी-संभाजीचाही भास होई. सरळ उभट चेहरा, लहान निमुळती हनुवटी, टोकदार नाक, डोळ्यांतली चमक-बोलताना मधूनच ते बारीक करण्याची लकब, वळणदार भुवया, गळ्यात जाड मण्यांची माळ, कपाळावर गोल टिळा. कानात बहुतेक काहीतरी अडकवलेलं असावं. आता नीटसं आठवत नाही. हसतही मोठा छान होता-मोकळा, झुळझुळणाऱ्या स्वच्छ झऱ्यासारखा. चित्रकार असतो तर हे हास्य कागदावर उतरविण्यासाठी जिवाचे रान केले असते.

एखादी व्यथा, अडचण तो सांगे आणि चटकन हसून मोकळाही होऊन जाई. चिंंता करण्यासारखे खूप होते. पण चिंंतेपासून तो मुक्तही वाटत होता. ही विद्या त्याला कोणी शिकवली असावी ? या उघड्या पहाडांनी की स्वैर वाऱ्यांनी ?

गुरांना चारा नाही, पाण्यासाठी आत्तापासूनच ती लांबलांब न्यावी लागतात. आठ-दहा आणे लिटर या भावाने दूध खाली विंंझरला नेऊन घालायचे, जे पुण्यात दीड-पावणेदोन रुपये भावाने विकले जाते. सरकार आता पाच एकर जमीन देणार म्हणते. पण रानात गुरे चारण्याचा हक्क काढून घेणार. डोंगराळ जमीन लागवडीखाली कशी आणायची ? त्यासाठी भांडवल पुरवले जावे किंवा जमीन शेतीयोग्यच करून दिली जावी. हे शक्य नाही. म्हणजे ही वस्ती उठणार. हातचा दुधाचा धंदा जाणार. उद्याची शेती अनिश्चित.

माझ्याबरोबरचा वाटाड्या महादेव कोळी होता. गळ्यात जानवे घालणे हे मोठेपणाचे लक्षण आहे अशी त्याची समजूत होती. 'आमच्यात पण जानवे घालण्याची चाल आहे, साहेब. पण सोन्याचे असले तरच आम्ही घालतो,' असे त्याने मला वाटेत सांगितले होते. 'कधी पाहिले आहेस का सोन्याचे जानवे ?' मी त्याला थट्टत विचारले होते. आजोबांच्या वेळी घरात होते म्हणाला. त्याची आज ही अवस्था. येणाऱ्या जाणाऱ्याला सिंहगडची खरीखोटी माहिती सांगून जेमतेम पोट भरायचे. शेतीवाडी होती ती दुष्काळात गेली. चार-चार रुपयाला दुभती गाय त्या काळात काढावी लागल्याचे त्याला अजूनही वाईट वाटत होते. तसे हे कोळी आदिवासीच. मावळात यांची वस्ती बरीच आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हारचा राजा महादेव कोळ्यांपैकीच. तसेच हे धनगर. मला आपले वाटून गेले, 'धनागर' या शब्दाचा धनगर अपभ्रंश असावा. एके काळी ही कुटुंबे म्हणजे धनाची आगरे असावीत. यांची ती श्रीमंती कुठे, कशी आणि केव्हा आटून गेली ते समजत नाही. सिंहगडच्या पश्चिम उतारावरच केवळ दहा-बारा धनगरवाड्या आज आहेत. हळूहळू त्याही ओस पडताहेत.

समोरच्या डोंगरावर निलगिरीची लागवड झालेली दिसते आहे. नुकतेच कुठेतरी वाचले, कोरड्या भागात ही लागवड हानिकारक आहे. ही वनस्पती पाणी फार शोषून घेते. लवकर वाढते हा एकच फायदा जंगलखात्याने विचारात घेतलेला दिसतो. लाकूड म्हणून उपयोगही कमी. इथेही वेगळा, स्वतंत्र विचार असू नये ? सरकार हे असे आंधळे, आम्ही लोक पांगळे. कुणाला मुळातच पाय नाहीत. बहुतेक पाय असूनही न चालू शकणारे. बुद्धी आणि श्रम यांचा कुठे मेळच नाही. त्यामुळे सर्व समाजालाच आलेलं हे पांगुळपण !

कितीतरी वेळ हा सिंहगडच आज पाठीमागून पाहतो आहे ! अगदी बेढब दिसतो. इकडून पाहात असता यावर इतिहास घडला असेल, हे मानायला मन तयार होत नाही. पुण्याकडून हाच पहाड कसा किल्ला म्हणून डोळ्यात भरतो ! पाय पसरून रखवालीसाठी ताठ बसून असलेल्या एखाद्या इमानी जनावरासारखा ! आणखी खूप वर्षे हा असाच येथे उन्हापावसात तापत, भिजत, धुपत बसून राहील. ज्याची रखवाली याने वास्तविक करायची तो माणूस येथून अदृश्य झाला तरी !

नाही. पण हेही भाग्य याला लाभणार नाही. हवा खाण्याचे ठिकाण म्हणून या परिसराचा विकास करण्याच्या योजना आहेत. म्हणजे लवकरच येथे पुण्या-मुंबईच्या नवश्रीमंतांचा गजबजाट वाढणार. कॉन्व्हेन्टमधील मुले आपल्या बापाला विचारणार, 'डॅडी, हू वॉज धिस तानाजी ?' डॅडी सांगणार, ' डोन्च्यु नो ? ही वॉज ए ब्रेव्ह लेफ्टनंट ऑफ शिवाजी'....

अरे! कम से कम येथे भात संशोधन केंद्र तरी काढा ! देशी खेळांसाठी एखादी ॲकेडेमी ! फुप्फुसाचे विकार बरे करणाऱ्या एखाद्या सुसज्ज रुग्णालयासाठी हा परिसर उत्तम आहे. हवापाण्यानेच निम्मा विकार बरा होईल. गांधीजींच्या उपोषणकाळात येथल्या देवटाक्याचे पाणी त्यांच्यासाठी खास नेले जात होते ना ? मोठे औषधी आहे हे पाणी असे म्हणतात.

धार काढण्याची ही वेळ नव्हती. पण बाबुराव धनगराने त्या इरसाल मुलाला हे काम सांगितले. पितळेचे स्वच्छ तांब्या भरून धारोष्ण दूध माझ्यासमोर ठेवले गेले. मला तर दूधाचे अगदी वावडे. जेमतेम भांडे-अर्धा भांडे घेतले आणि उरलेले सर्वाना घोट घोट दिले. कारण तोपर्यंत आणखी तीन-चार माणसे जमलेली होती. पलीकडच्या वस्तीवरचा असाच एक धनगर, कुणी सुतारकाम करणारा बलुतेदार, दोन-तीन एकरवाला एक शेतकरी, कामावरून मधूनच परतलेल्या या वस्तीवरच्या दोन-तीन स्त्रिया...

वाटाड्याने घाई केली नसती तर हत्तीदांड धनगरवस्तीवरील ही बैठक आणखीही खूप वेळ चालली असती.

*

फेब्रुवारी १९७०