श्रीग्रामायन/जाग

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

जाग!


माणूस जेव्हा जागा होतो तेव्हा गवत कापण्याची मजुरी रोज चार आण्यांवरून दोन रुपयांवर जाते.

सावकाराची मारहाण थांबते. मालकाचे न ऐकणाऱ्या एखाद्या नाठाळ मजुराला कोळशाच्या जळत्या भट्टीत ढकलून जिवंत जाळण्याचे राक्षसी अत्याचार थांबतात. माणूस जेव्हा जागा होतो तेव्हा वारल्यांच्या मुलीबाळी, स्त्रिया ही आपलीच मालमत्ता समजण्याचे धाडस सावकार करेनासा होतो.

जेमतेम कमरेला फडके गुंडाळणारा आदिवासी शर्ट-पँटीत दिसू लागतो. स्त्रियाही साडी बरोबर चोळी-काचोळी वापरू लागतात.

क्वचित एखाद्या झोपडीत घड्याळ दिसते.

ठाणे जिल्ह्यातील डहाणू-तळासरी या वारली आदिवासी भागात माणसाला आलेली ही जाग तेथे जाऊनच पाहण्यासारखी आहे. 'आज आम्ही येथे काही राष्ट्रसेवेचे काम करतो. काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत. वाहने, एस. टी. येऊ-जाऊ शकतात. पण पंचवीस वर्षांपूर्वी पायी हिंडणेदेखील मुश्कील होते. त्या काळात गोदाराणी येथे आली, वारल्यांना तिने जागे केले, अन्यायाविरूद्ध बंड पुकारले. ही कामगिरी अलौकिक होती. अद्यापही तिच्या लाल बावट्याचा प्रभाव येथे जबरदस्त आहे. लाल महालच म्हणतात या भागाला'–एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचे हे विचार पहिल्या दिवशीच्या मुक्कामातच मला ऐकायला मिळाले. आचार्य भिसे, नारगोळकर पतिपत्नी या सर्वोदयी सेवकांचे परिश्रमही खूप आहेत. परंतु अन्यायाविरूद्ध झगडा देऊन माणुसकीच्या प्राथमिक हक्कांचे माप आदिवासी वारली समाजाच्या पदरात टाकणेऱ्या महत्कृत्यातील सिंहाचा वाटा लाल बावट्याकडे जातोत्यातल्या त्यात शामराव व गोदावरी परुळेकर पतिपत्नींकडे-हे कट्टर विरोधकही नाकारू शकत नाहीत.

हा भाग पाहण्याची ओढ तशी कॉलेजमध्ये असल्यापासून होती. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या अभ्यास-मंडळाच्या बैठकीत हा विषय एकदा डॉक्टरांनी निवडला होता. त्या सुमारासच ‘गोदाराणी' ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. लेखक हडप असावेत. तिच्या आधारे डॉक्टरांनी वारल्यांची भयानक दुःस्थिती फार प्रभावीपणे आम्हा विद्यार्थ्यांसमोर उभी केली. गोदाराणी हे नाव प्रथम तेव्हाच कानी पडले. बैठकीनंतर नेहमी काही खाण्याचा कार्यक्रम असे. मला इतके आजही आठवते की, त्या दिवशी पुढे आलेली साबुदाण्याच्या खिचडीची बशी आम्हा सर्वांनाच त्या वारल्यांची फार क्रूर थट्टा वाटून गेली होती. बशा संपल्या पण अपराधी भावनेची टोचणी कायम राहिली. कानांनी ऐकले, कानांनी सोडून दिले. हातापायात काही संचारलेच नाही. स्मृतीचा एक बारीकसा ठिपका मात्र तळाशी कुठेतरी दडून राहिलेला होता.

पुढे सहज शक्य असतानाही या राणीला मी कधी भेटलो नाही, तिच्या राज्यात कधी डोकावलो नाही. गेल्या वर्षी मात्र ती फार आजारी आहे असे कळले. तेव्हा समाचाराला म्हणून गेलो. दरम्यान प्रकृती खूपच सुधारलेली होती. मग बोलणे वाढले, गप्पा रंगल्या, चर्चेतून मतभेदाचे व मतैक्याचे मुद्दे स्पष्ट होत गेले. वृद्ध असली तरी राणी अद्याप खचलेली वाटत नव्हती. या वयात, या अवस्थेतही, शब्दाशब्दात आत्मविश्वास ठासून भरलेला होता. ध्येयवादाचा एकही पीळ सुटलेला नव्हता. स्वरातील धार जराही बोथटलेली नव्हती. मध्येच थोडा मिशनऱ्यांचा विषय निघाला होता. ठाणे जिल्ह्यात हे संकट बरेच आहे. राणी उसळून म्हणाली होती 'आमचे हात काही केळी खायला गेलेले नाहीत. त्यांनी फार गडबड केली तर चोवीस तासांत त्यांना चंबूगबाळ्यासकट फेकून देऊ.' यावेळी राणीच्या क्षीण हाताची पाच बोटे एखाद्या पात्यासारखी पदराआडून बाहेर चमकत आली होती. सावरकरांची बोटे यापेक्षा अधिक नाजूक, निमुळती व गोरीपान होती. संभाषणात ती अशीच वीजेसारखी चमकून जात. त्यांची आठवण या राणीच्या बोटांनी मला यावेळी करून दिलेली होती. क्रांतीच्या दाहातून तावून सुलाखून निघालेली एक सतेज, रसरशीत मूर्ती खूप काळानंतर मी पहात होतो. शेकडो कार्यकर्त्यांना मी आजवर भेटलेलो असेन. ध्येयसिद्धी दुरावल्याने बहुतेकजण निराशेने कोमेजलेले दिसले. कोणी स्पष्टपणे आपली निराशा शब्दातून व्यक्त करतो, कोणी आध्यात्मिक परिभाषेचे अवगुंठन चढवून ती लपवू पाहतो. तसे पाहिले तर राणीच्या राज्याला खिंडार पडावे, निष्ठेला तडे जावेत असे खूपच काही गेल्या पंचवीस वर्षांत जगात आणि भारतात घडलेले आहे. पण राणीची लाल निशाणावरील श्रद्धा अढळ आहे. ना. म. जोशांपासून दलित सेवेचे व्रत तिने उचलले. शेकडो संस्थातून विविध प्रकारची दलितोद्धाराची कामे केली. शेवटी कम्युनिझमशिवाय तरणोपाय नाही या विचारावर ती येऊन ठेपली. हे वादळी वारे पिऊन, पंचवीस वर्षांपूर्वी ही वाघीण जेव्हा डहाणू-उंबरगावच्या जंगलात झेपावली, तेव्हा, त्या कडेकपाऱ्यातून हिंडताना,एखाद्या पाड्यावर विसावताना, सावज दिसताच डरकाळी फोडताना, गुहेत लपून रहाताना, अंगावर चालून जाताना, घायाळ झाल्यावर चडफडताना ती कशी दिसली असेल ? नंतर बराच वेळ हे दृश्य कल्पनेने मी डोळ्यासमोर आणीत होतो. राणीच्या जोडीदाराचे-शामराव परुळेकर यांचे-काही वर्षांपूर्वी निधन झाले. उभयतांच्या आठवणींचे एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याचे नाव जाहिरातीत वाचले तेव्हाच मी जरा चपापलो होतो-माणूस जेव्हा जागा होतो! लाल घणाघाताखाली हे प्राजक्तपुष्प कसे काय उमलले?

कैनाडचा डोंगर हाकेच्या अंतरावर पहुडलेला होता. एका पाड्यावर माझी आजची वस्ती होती. उद्या जो डोंगर साद घालील, जे गाव खुणावेल तिकडे जायचे होते. नाहीच कुणी हाक मारली तर सरळ घरी परतायचे होते. आजची वस्ती तर सोयिस्कर होती. मधून मधून गप्पा, प्रश्नोत्तरे, झोप, वाचन असा संथ क्रम सुरू होता. आसपासची शेतीची कामे दुपारनंतर चालू झालेली दिसली नाहीत, म्हणून सहज चौकशी केली. 'मंडळी सगळी आज आशागडच्या सभेला गेलेली आहेत' असे कळले. डहाणूपासून पाच-सहा मैलांवरचे आशागड हे एक मध्यम आकाराचे आदिवासी गाव. जेवणाची सुटी न घेता काम लवकरच संपवून किंवा अर्धवट सोडून शेतावरील सर्व स्त्री-पुरुष मजूर आशागडला सभेसाठी धावल्याचे पाहून माझे कुतूहल जागे झाले. थोडी विचारपूस केली. तर कळले की, सभा लाल बावट्याची असली तर न जाऊन येथे चालतच नाही. दमदाटी होते. मारहाण केली जाते. मजुरी बंद पडते. या छळवादाला तोंड देण्यापेक्षा सर्वसामान्य माणूस म्हणतो-सभा परवडली. मग इकडे शेतीचे कितीही नुकसान होऊ दे.

एखादा तंटा उपस्थित होतो. लाल बावटा तेथे असला तर हिरव्या गर्द बागाच्या बागा सुकवल्या जातात; पण कामाला एकाही माणसाची हात लावण्याची हिंमत होत नाही. कोणी लावलाच तर त्याची गठडी वळली गेलीच. रात्री-अपरात्री त्याच्या झोपडीवर जमावाचा हल्ला होईल, ती कदाचित् जाळूनही टाकली जाईल, हात-पाय बांधून मारपीट होईल, कोंबडी-बकरे वगैरे त्या कुटुंबाजवळ जे असेल ते हिसकले जाईल-ग्रामीण दहशतीची सर्व तंत्रे लाल बावट्याच्या नावावर उपयोगात आणली जातील.

पण सावकाराकडील जमीन कमी झाली का? जी जमीन कुळांकडे आली ती तरी कुळे नीट कसतात का? त्याचा सारा सरकारला किंवा सावकाराला भरतात का? सरकारी योजनांचा फायदा कुळांना मिळतो का?

सकाळच्या वाटचालीत मध्येच एक प्रचंड बाग लागली होती. सहज तीन-चारशे एकरांचा मळा असावा. विजेचे खांब, तारेचे कुंपण दिसले-त्यावरून आत विहिरी, पंप्स वगैरे जामानिमा भरपूर असला पाहिजे. गोठ्यात जनावरे पंधरा-वीस तरी दिसत होती. शिवाय मोटारसायकल, स्कूटर, व्यवस्थित बांधलेला पक्क्या विटांचा बंगला यावरून कुळ मोठे असावे हे सहज लक्षात येत होते. या ठिकाणापासून जवळच कम्युनिस्टांचे एक 'स्टॉर्म सेंटर' पूर्वी होते अशी माहिती नंतर मला मिळाली. या स्टॉर्म सेंटरचा प्रभाव गोरगरिबांवर दहशत बसविण्यापलीकडे काही नसावा? मी जी बाग पहात होतो तिच्या मालकाचे तर म्हणे पक्ष-कार्यकर्त्यांशी घनिष्ठ संबंधच आहेत. हप्ते अधून मधून पोचवले जातात, निधींना वेळोवेळी देणग्या दिल्या जातात, बंगल्यावर पक्षसदस्यांची उठण्याबसण्याची, उतरण्याची सोयही होत रहाते. या व्यवहाराला तात्विक मुलामाही चढविण्यात येतो. 'आज या चोरांचे घ्यायला काय हरकत आहे? उद्या सत्ता हाती आल्यावर यांच्याकडून सर्वकाही काढून घ्यायचेच आहे' तत्त्व आणि व्यवहार यातील भयानक विसंगती अशा तऱ्हेने साधली जाते.

बहुतेक सावकारांकडे जमिनी पूर्वीप्रमाणेच आहेत. कुळकायद्यामुळे म्हणावा असा फरक पडलेला नाही. सरकारी मालकीच्या जंगलजमिनीवरील अतिक्रमणांचे प्रमाण त्यामानाने बरेच मोठे आहे; पण आदिवासींच्या ताब्यात आलेल्या अशा दोन-दोन, चार-चार एकर जमिनींच्या मशागतीबाबत मात्र लाल बावट्याचा प्रचार उलट सुरू असतो.

मी पहात होतो, विहिरी खणण्याबाबत सर्वसामान्य आदिवासी शेतकऱ्यात येथे उत्साह किती आहे? एका शेतीतज्ज्ञाशी आदल्याच दिवशी या विषयावर चर्चा झालेली होती. माझ्या आणि त्यांच्या विचाराचा खटका याबाबत बरोबर जमत होता. दिंडोशीचे आबा करमरकर. दुधात थेंबभरही पाणी न मिसळता डेअरीचा धंदा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करून दाखविणारा मला भेटलेला पहिला माणूस! एक पैचीही लाच न देता यांच्या दुधाच्या ट्रक्स लांबवर पळत असतात. पारगावसारख्या पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागात व दिंडोशीच्या भरपूर पावसाच्या जमिनीत यांचे शास्त्रोक्त शेतीचे प्रयोग नेहमी चालू असतात. मुंबईच्या गोरेगाव उपनगर विभागात समाजवादी पक्षाचे आबा जुने कार्यकर्तेही होते. अलीकडे आबांचा एकूणच पक्षपद्धतीवरचा विश्वास उडालेला आहे, म्हणून फारसे ते कुठे चळवळीत दिसत नाहीत. युवकक्षेत्राविषयी मात्र त्यांना आजही आस्था आहे. या क्षेत्राला काही विधायक वळण लावावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. 'साधने'त त्यांचा एक लेख अलीकडेच प्रसिद्ध झाला होता- ‘भायल्या मंगलची हाक.' मी तो वाचला होता. बोरिवली तालुक्यातील मागाठणे गावचा भायल्या एक आदिवासी शेतकरी. त्याच्या शेतात विहिरी खणण्याचा कार्यक्रम गोरेगाव येथील उत्क्रांती दलासमोर आबांनी ठेवला होता. इतरांनाही त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे या लेखात आवाहन केलेले होते. या लेखाच्या अनुरोधाने दिंडोशीला जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केली, माझ्या सुप्याचा अनुभव सांगितला, भायल्या मंगलच्या शेतात जाऊन आबांनी योजलेली विहिरीची जागा नजरेखालून घातली.

पाण्याची निश्चित जागा ठरविण्याची खात्रीलायक सोय आपल्याकडे नाही. अपेक्षित पाणी लागले नाही तर खर्च-मेहनत सारे वाया जाते. सुप्याला सुरुवातीला असेच घडले. पंचवीस-तीस फूट खणल्यावर जेवढे पाणी लागेल असे वाटले होते, पाणी पहाणान्याने सांगितले होते, त्यापेक्षा ते कमी लागले. सर्वांनी हातपाय गाळले. पहिला पावसाळा उलटला. विहिरीचा खड्डा पावसाच्या पाण्याने खूप भरला. दिवाळीच्या आसपास पिकासाठी एक पाऊस लागत होता, तो पडला नाही. हातीतोंडी आलेले पीक सुकून चालले. यापूर्वी अनेक वर्षे ते असेच वाळून जात असे; पण यंदा नवीन खणलेल्या विहिरीतील साठलेल्या पाण्याचा आधार होता. मंडळींनी इंजिने लावून पाणी खेचले व एरव्ही वाळून गेले असते ते पीक वाचवले. गेली दोन वर्षे या साठवणीच्या पाण्याचा अशा मोक्याच्या वेळी उपयोग होत आहे. शंभर टक्के नाही तरी पन्नास-साठ टक्के श्रम आणि पैसा त्यामुळे सार्थकी लागलेला आहे. शंभर टक्के यशासाठी हा विहीर-कम-खड्डा प्रयोग हमखास पावसाळी भागात हाती घेतला जावा ही आबांची सूचना होती. पाणी लागले तर बांधकामाचा खर्च करून विहीर पूर्ण करायची. नाही लागले तर साठवणीचा खड्डा म्हणून उपयोग आहेच. ठाणे-कुलाबा-रत्नागिरी हे आपल्याकडील हमखास पावसाचे जिल्हे. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसमोर मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम ठेवण्यासारखा आहे. श्रमाचे तंत्र लवकर आत्मसात होऊ शकणारे. उत्पादनवाढीला निश्चित हातभार. खर्चही बेताचा. आबांच्या घरी आदल्या रात्री हाच विषय चर्चेला होता. प्रा. गोपाळ राणे व उत्क्रांती दलाचे काही कार्यकर्ते हजर होतेच. भायल्या मंगलच्या शेतातील विहीर या दृष्टीने नाताळाच्या सुटीत पुरी करण्याचे ठरले.

आणि मी चर्चेचे निष्कर्ष अधिक बारकाईने तपासून पहाण्यासाठी तसाच पुढे ठाणे जिल्ह्यातील डहाणू-तलासरी भागात - गोदाराणीच्या लाल महालात शिरलो.

तेथे पाहतो तो लाल बावट्याचे प्रचारयंत्र नेमक्या उलट दिशेने फिरत आहे असे कानावर आले.

सुपे येथील कामात आणखी एक दोष होता. ते मदतभावनेने सुरू झालेले होते. १९६८ साली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. शासनाप्रमाणेच विविध सामाजिक संस्थांनीही दुष्काळनिवारण कार्यात भाग घेतलेला होता. सुपे हा नेहमीचाच दुष्काळी भाग. रतनलाल भंडारी सारखा प्रामाणिक व तळमळीचा कार्यकर्ता येथील दैनंदिन कामाची जबाबदारी उचलण्यास तयार होता म्हणून 'माणूस प्रतिष्ठान'चे काम येथे सुरू करण्यात आले. परंतु कामामागील भूमिकेचा व्यवस्थित प्रचार अगाऊ झाला नाही. धर्मार्थ काम अशीच कामावरच्या मजुरांची, ज्या छोट्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर खणली जात होती त्याची व ज्या आसपासच्या दोन-चार शेतकऱ्यांना विहिरीचे पाणी दिले जाणार होते त्यांची भावना होऊन बसली. काम चालू झाल्यावर, ज्यांची खूप शेतीवाडी आहे व पैसांही ज्यांच्याजवळ कमी नाही, अशांनीही नवीन विहिरींसाठी हात पसरला. हा एक चीड आणणारा अनुभव होता. मजुरीत वाढ व्हावी अशा मागण्या मजुरांकडून वरचेवर पुढे येत होत्याच. मालकही जादा मजुरी जिकडे मिळेल तिकडे अधूनमधून जात होता. सामुदायिक पुरुषार्थाची भावना निर्माण होऊ शकली नाही. स्वावलंबी होण्याची धडपड चाल झाली नाही. भंडारी होते तोवर कामामागील हा विचार निदान सांगितला तरी जात होता. पुढे उद्योगानिमित्त त्यांनीही स्थलांतर केले. त्यामुळे विहीर जरी कायम राहिली व तिचे पाणी जरी वापरले गेले तरी तिच्या मागील विचार, भावना पुसली गेली. नुकतेच भंडारी तिकडे गेले होते. त्यांनी पत्रातून वस्तुस्थिती कळवली आहे. आपल्या सर्वच ग्रामीण भागावर सध्या भिकाऱ्या रोगाची साथ कशी पसरत आहे याचे मोठे विदारक चित्र त्यांनी रेखाटले आहे. भंडारींनी पत्रात लिहिले होते-

सुप्याला एका छोटेसे काम सुरू करताना केवढ्या मोठ्या आशा उराशी बाळगल्या होत्या. गेल्या दोन वर्षात देशाचे राजकीय, सामाजिक चित्र बदलले आहे. एक फसवे मृगजळ सर्वत्र पसरत चालले आहे. मधल्या काळात खूप पाणी वाहून गेले. अनेकांचे बुरखे फाटले. काहींनी नवे धारण केले. एक गतिमान संभ्रम, भरकटणे, फार तर फरपटणे म्हणा हवे तर, सुरू आहे. माझ्याही जीवनात गाडीने रूळ बदलले आहेत. पण .

शेजारीच पडलेल्या वृत्तपत्रातील मजकुरामुळे मी आज पूर्वीसारखाच अस्वस्थ आहे. कुठेतरी आमच्या स्वाभिमानाला खग्रास ग्रहण लागले आहे. ते वृत्त म्हणते, त्याचा भावार्थ तरी असा आहे-आम्हाला पी. एल. ४८० चे एखाद्या गुंगी आणणाऱ्या औषधासारखे व्यसन जडले आहे. करारामागून करार आपण करीत आहोत. अमेरिकेतून वस्तू आयात करण्याची आम्हाला सवय जडली आहे. आपण १९६८ च्या डिसेंबरमध्ये एक करार केला. २.३ लाख टन गहू मागविला. त्यापेक्षा थोडा लहान करार एप्रिल १९६९ मध्ये केला. वस्तूंच्या संख्येतही आता वाढ होऊ लागली आहे. नुकताच आणखी एक करार तीन लाख टन गहू, ४९,००० टन खाद्य तेल आणि १००,००० कापडांच्या गाठी आपण मागवीत आहोत. या सर्व मालाची किमत आहे १४३.६३ कोटी. या सर्वांचा अर्थ एकच आहे. तो म्हणजे अधिक गुलामी. अधिक आर्थिक पारतंत्र्य. सुप्याला विहीर काढताना डोळ्यासमोर एक ध्येय होते. माणसांना स्वतःच्या पायावर उभे राहावयाला शिकवायचे. अन्न स्वतंत्रतेच्या आंदोलनात कुठेतरी मुहूर्ताची कुदळ टाकायची. या छोट्या प्रतीकांच्या रूपाने, या देशात, निदान शिवरायाची परंपरा मिशीला तूप लावून सांगणऱ्या महाराष्ट्रात, समर्थ अशा स्वावलंबी स्वातंत्र्याची गुढी उभारावयाची. या इवल्याशा प्रारंभाच्या वेळेपासून या विहिरीचे सुईणपण मी आजीबाईच्या काळजीने केले. आज विहीर तेथेच आहे. विहिरीत पाणीही आहे, मधून मधून शेतीला पाणीही दिले जाते; पण जो माणूस आपण घडवू इच्छित होतो, तो घडलाच नाही. या भागातल्या दुष्काळी परिस्थितीची आम्ही खूप दवंडी पिटली. या साऱ्याचा परिणाम काय झाला आहे हे आता स्पष्ट शब्दात सांगण्याची वेळ आली आहे.

यामुळे सुपे विभागाला शासनाने दुष्काळात 'अ' वर्ग दिला आहे. (दुष्काळी प्रदेशांचीही म्हणे आता ग्रेड ठरविण्यात येते ! ) देशभर असल्या ठिकाणांचा शोध घेत असलेल्या ख्रिश्चन मंडळींची गिधाडदृष्टी नेमकी येथेच येऊन पडली. अधिकारारूढ अदूरदर्शी नेतृत्वाला यातच आयती संधी चालून आली. फुकट गव्हावर तलावाच्या योजना घाईघाईने सुरू झाल्या. पावसात काही तलाव फुटलेदेखील. एका गावाला तर (देउळगाव रसाळ) एकाच लहानशा ओढ्यावर तीन तीन तलाव तयार करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेने सुरू केलेले लहान लहान प्रकल्प मागे पडले. कामावर हजेरी लावली की गहू आणि तेलाचा रतीब सुरू होतो. पुणे जिल्हा परिषदेचा सुपे गावठाणचा तलाव तर त्यामुळेच गेली तीन वर्षे पूर्ण झाला नाही. गावगन्ना झालेल्या 'जी हुजूर' मंडळींनी मुकादमी पत्करून एक नवीन पकड सगळयांवर कायम केली आहे.

आता इथली मंडळी दुष्काळाला भीक घालणार नाहीत. सारा हवाला ‘कासा' संस्थेच्या शिरावर. या मंडळींनीही आपली नखे हळू हळू बाहेर काढावयास सुरुवात केली आहे. आता संस्थेचा अधिकृत माणूस आल्याशिवाय आठवड्याचा गव्हातेलाचा पगार होत नाही. लवकरच ‘प्रभूची करुणा' भाकल्याशिवाय ‘पगार' होणार नाही असे सांगितले जाण्याचा दिवस दूर नाही. आता तर योजनेची ‘लागण' पुरंदर तालुक्यालाही मोठ्या जाहिरातबाजीसह चालू करण्यात आली आहे. माजगावकर, कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण इथला मजूरदेखील पूर्वीसारखा अंग मोडून काम करीत नाही. हा अर्धशेतमजूर स्वतःचे शेतही धडपणे कसत नाही. तो म्हणतो, 'हतं कितीबी काम केलं तर चार पैसं थोडंच पदरात पडायच्यात ? सालं, गव्हाच्या तलावाव निस्तं हजेरी दावली की रोज लागू होतुया.'

तुम्ही मागे जेव्हा अन्न स्वतंत्रता संचलनात भाषणे करीत होतात, माणूसमध्ये लिहित होतात, डॉ. दांडेकर माणूसमध्ये लिहित होते, तेव्हा क्षणभर वाटायचे, हे सारे बुद्धीला आव्हान आहे. पण आज गावी परत आल्यावर समाजाचे एक भयाण आणि लाचार रूप पहायला मिळतं. आता लाचारी हळू हळू रक्तात भिनायला लागली आहे.

परवा एका कार्यकार्त्याशी बोलायचा प्रसंग आला. नुकतीच त्याने टोपी बदलली आहे. पहिल्यापेक्षा स्वारी जरा ऐटबाज वाटत होती. माझ्या कानाला लागून तो सांगत होता, ‘साथी, दुसरा इलाजच नव्हता. तिकडे गेलो म्हणून तर हा गव्हाचा बंधारा होतोय बघा.'

एक प्रकारची घृणा, शिसारी मला गिळून टाकण्याचा प्रयत्न करीत होती. आणि तो कार्यकर्ता मला आपण आपल्या पूर्वीच्याच राजकीय विचारांवर भक्कम असल्याचे असहाय्य मुद्रेने समजावून सांगत होता.

परवा 'माणूस' च्या विहिरीजवळचा एक शेतकरी मला हाक मारून सांगत होता- 'शेठ, आवंदा हुरडा खाया या. सायबास्नीबी बोलवा.'

का ? आपल्या विहिरीचे पाणी दिलेस वाटते ?
अजून न्हाय. पर आता द्यावं म्हणतुया.
विहिरीत पाणी किती आहे ?
पाऊसकाळात बरं होतं. तांब्या कलांडल्यावानी वाटायचं. आता असल परसभर.
म्हणजे अजून बरेच आहे. एक वेढा येईल की.
ईल म्हंजे इलच.
विहिरीतले दगड, गोटे काढलेस ?
लईदी इचार करतुया, पर ह्या भानगडींनी जमतच न्हाय.
भानगड ? ..... कसली रे ?
न्हाय. पोटापायी कुणी कुणी तलावाव जात्यात. आमचं ह्ये असलंच.

हॉटेलातल्या पोराला स्पेशलची ऑर्डर जाते.

मी शून्य चेहऱ्याने त्याला विचारतो, विहिरीतले गबाळ काढायला किती दिवस लागतील ? आठवडाभर ?

अवं येडं का शानं तुमी. दिड दोन दिसांच्या म्होरचं काम न्हाय.
गबाळ काढल्यावर पाणी किती वाढेल ?
वाढल की अर्धा परस.
मग ? पुन्हा माझा मख्ख प्रश्न आणि चेहऱ्यावर न आवरता येणारा वैताग.
आता ह्ये माझ्या एकल्यानं व्हनार हाय व्हय! आता एवढं केलसा, थोडं राह्यल्यालं......

पुन्हा एक शिसारी मला गिळण्याचा प्रयत्न करते. मी कसाबसा उठतो. तरातरा चालायला लागतो. हॉटेलातल्या चहाच्या कपाजवळ एक जंतू वळवळत असतो. विहिरीतले स्वच्छ, सुंदर जल वाकुल्या दाखवून नाचत असते. तेवढ्यात हॉटेलच्या मागून दोनचार बाया बाजारला येताना दिसतात. मी उगीचच समोरच्या पर्णहीन बाभळीच्या झाडाकडे पहात उभा रहातो. कुणीतरी विचारते, कवा आलासा ?

परवाच आलो वहिणी.

माझ्या उत्तराने वहिणी मोकळेपणाने बोलायला लागतात. जवळच्या बाया अवघडून उभ्या असतात. डोळ्यात भोळे कवतिक असते.

कोकण मानावल्यालं दिसतंया . घराकडंं आला न्हाई ? हिरीवर वेढ्याला यालच की.
नाही वहिणी. मला यावसं वाटत नाही. माझे बोलणे त्यांना मुळी 'उमजलं' च नाही.

त्या पुन्हा विचारतात, आमच्यावर रागावला तुमी ?

नाही हो. पण येऊन काय करू. उगीच विहीर पाडली.
उगीच का ? जाणारं येणारं वाईच टेकतंया. भाकर तुकडाबी खातंया. तुमास्नी नि साहेबास्नी मोप आसिर्वाद देत्यात पघा.
अहो, पण ती विहीर धान्याला पाणी देण्यासाठी साहेबांनी काढलीय ना ?
ते खरं हाय वो. पर ह्येंच्या अकलंत दिवा लागल तवा. चांगलं पाणी हाय. जमीन हाय. पर ह्यास्नी हिडाया हुवं गावातनं. आमची आपली बायकांची म्हन हाय, 'दैव देतं न् कर्म नेतं.' चांगलं सौताच्या जमिनीत राबावं, रक्ताचा घाम करावा, कुणाचं फट् म्हणून घेऊ नाई, शिवार फुलवावं. पर समदी उलथल्यात फुकटच्या गव्हावं......

असंच आणखी काही रतनलालने आपल्या ३ नोव्हेंबर ६९ च्या पत्रात मला कळविलेलं आहे.

पश्चिमेचे, श्रीमंत भांडवलशाही देशांचे, दुसऱ्या गरीब देशांना गुलाम करण्याचे हे गव्हाळी तंत्र. फुकट खायला प्यायला घालून माणूस लुळा पांगळा करून ठेवायचा; कामाची त्याची प्रवृत्तीच नाहीशी करून टाकायची. दुसऱ्याकडे नोकर म्हणून तर सोडाच, स्वत:च्या शेतावरही राबण्याचा तो हळूहळू कंटाळा करू लागतो. श्रीकैलास ते सिंधुसागर अन्नस्वतंत्रता संचलनात जवळजवळ प्रत्येक सभेत मी सांगत असे : पंधरा मिनिटे दिवसाकाठी काम करून पिशवीभर गहू आणि बाटलीभर तेल मिळते म्हणून तुम्ही खुशीत असाल. पण काम संपल्यावर तुमचे हातपायच गेल्याचे तुम्हाला आढळून येईल. ग्रामीण भागातील बेकारांना काम मिळते म्हणून या योजना आपले पुढारी आणतात. उत्पादनवाढ होते म्हणून विचारवंतही असल्या योजनांचे स्वागत करतात. उत्पादन कदाचित वाढतही असेल. पण उत्पादक संपतो. क्रयशक्ती वाढली तरी कार्यशक्तीचा ऱ्हास होतो. मग ऐषारामात किंवा दारिद्रयात लोळत राहण एवढाच मार्ग उरतो. आपण गरीब होतो म्हणून इंग्रजी राज्य आले नाही. स्वतंत्र कर्तबगारीची आपली धडपड संपलेली होती म्हणून साहेबाला हा देश चटकन गिळता आला. महत्त्व धडपडीला आहे, श्रीमंतीला वा गरिबीला नाही. जे धडपडतात तेच जिवंत असतात, राहू शकतात. बाकीचे मेलेले. फुकटचा गहू खाऊन असे मरू नका. हातपाय हलवलेत तर आहे त्यातूनही खूप काही निर्माण होऊ शकते. मदतीची, सध्याच्या प्राथमिक अवस्थेत तरी मुळीच गरज भासणार नाही. ‘चालत्याला शक्ती येई, मार्गही अन् सापडे' ...... आपल्यालाही एखादा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. प्रथम स्वतंत्र धडपड मात्र सुरू झाली पाहिजे...

गोदाराणीच्या लाल टापूतही, डहाणू-तलासरी महालातही श्रमशक्तीचे असे खच्चीकरण चालूच आहे. प्रकार आणि पद्धत फक्त वेगळी. सावकाराकडचे कामाचे माप व्यवस्थित न भरण्याची वृत्ती एकवेळ समजू शकते. पण कुळकायद्यामुळे प्राप्त झालेल्या म्हणा किंवा अतिक्रमणे करून ताब्यात घेतलेल्या जमिनींच्या मशागतीबाबत विपरीत लाल प्रचार ही खास चिंतनीय बाब आहे. गरीब आदिवासीला जमिनी मिळवून देण्यासाठी चळवळींचा आटापिटा. पुढील मशागतीची मात्र उपेक्षा नव्हे तर विरोध व टिंगलटवाळी. 'विहिरी कशासाठी खणायच्या ? पिकवलेली वांगी दलाल-व्यापारी, सावकाराच्या घशात दोन-चार आणे किलो भावाने धाडण्यासाठीच ना ? यापेक्षा त्यांनाच' खणू द्यात विहिरी, करू द्यात जमिनीच्या मशागती. वेळ येताच आपण अशा तयार जमिनी ताब्यात घेऊन टाकू. आताच कशाला ही गद्धेमेहनत ! सरकारी उंबरठे झिजवा, लाच द्या, कर्जाचा बोजा डोक्यावर घ्या कशासाठी उपद्व्याप ? प्रथम पिळवणूक संपली पाहिजे. यासाठी राज्य बदलले पाहिजे. लाल बावट्याशिवाय हे कोणीही करू शकणार नाही. एकदा जनतेचे राज्य स्थापन झाल्यावर'

उघडे मैदान, तुडुंब जमाव. भोवतालच्या झाडीतून कलत्या सूर्याची किरणे काळ्या पाठींवर कोसळताहेत - ढालींचा चमचमणारा एक समुद्रच. एखादी फिआट-अँबेसेडर रस्त्यावरून धुराळा उडवीत सुसाटात निघून जाते. जंगलची हवाच मुळात माणसाला बेभान करणारी. मनाच्या वारूला मोकाट सोडणारी. त्यात ताडीमाडीचा चढलेला कैफ. पसरलेल्या पंखांसारखे समोर दिसणारे लाल निशाण. वृक्ष, आज्ञेची वाट पाहणाऱ्या सेनानायकासारखे खडे. वारा घोगावत असतो. वक्ता गर्जत असतो पिळवणुकीची जहाल वर्णने. क्रांतीचा जोष. उद्याच्या स्वर्गाची सोनेरी स्वप्ने. बस्स. काय हवे आणखी उत्साह ओसंडायला. हे तप्त रसायन एकदा डोक्यात घुसले की, सहसा त्याचा अंमल उतरतच नाही. कष्ट करून मोठा हो या सांगण्यात फक्त उपदेशच आहे. त्यामुळे तो कंटाळवाणा, रटाळ ठरतो. समुदायचे समुदाय त्याने उठत-उसळत नाहीत. पण 'हे समोरचे वाडे-बंगले तुझेच आहेत, तुझ्याच श्रमामुळे या बागा आशा लगडलेल्या आहेत. घे ताब्यात, आण लुटून'- हे शब्द विलक्षण धुंदी चढविणारे आहेत. काहीही घडवायचे, जोपासायचे, उभारायचे म्हणजे तपश्चर्या हवी, वर्षानुवर्षाचे एकाग्र परिश्रम हवेत. पण इतरांनी उभारलेले, जोपासलेले, घडविलेले केवळ झडप घालून बळकवायचे, लूट म्हणून आपल्या भोगासाठी दडपायचे! यासाठी केवळ हवा एखादा महत्त्वाकांक्षी नायक, एखादे बेहोषी निर्माण करणारे तत्त्वज्ञान ! बौद्धांचा अपवाद वगळता, समतेसाठी म्हणून उसळलेल्या आजवर सर्वच चळवळीत हे रसायन वापरले गेलेले आपल्याला आढळून येते. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्' मध्येही हे असंस्कृत आवाहन असले पाहिजे. मध्यपूर्वेत उगवलेला हिरवा चाँद एक शतक पुरे होण्यापूर्वीच थेट स्पेनपर्यत पश्चिमेकडे फडफडत जातो, यातील रहस्य काय केवळ इस्लामी तत्त्वांची श्रेष्ठता ? गझनीचा महंमद हिंदुस्थानात येतो तो लूट गोळा करण्यासाठी, मूर्ती फोडण्यासाठी. इस्लामच्या समतास्थापनेशी त्याला कर्तव्य नसते. अर्थात केवळ लूट ही पशुता. शकहूणांच्या टोळधाडी आणि इस्लामची आक्रमणे यात म्हणूनच थोडा फरक पडला. चालू शतकात आशियात फैलावणाऱ्या कम्युनिझमचेही असेच एक अर्धसुसंस्कृत-अर्धरानटी, पण उन्मादक रसायन तयार झालेले आहे. गुलामीच्या जोखडाखाली शतकानुशतके ठेचून-पिळवटून निघालेल्या आशियातील कोट्यावधी भुकेकंगाल जनतेला मुक्तीचा एक नवा किरण या तत्त्वज्ञानात दिसला हे नाकारता येत नाही; पण हेही नाकारले जाऊ शकत नाही, की यशप्राप्तीसाठी या तत्त्वज्ञानाच्या पाईकांनी हिणकस आणि हीन अशा मानवी प्रवृत्तींना आवाहन केलेले आहे. माणसातील पशुला चाळवून संस्कृतीला लाजवणारी कृत्ये त्याच्या हातून घडविलेली आहेत.
'माणूस जेव्हा जागा होतो' तेव्हा तो असे वागत नाही.

डहाणू- तळासरी भागात शिक्षणाच्या सोयी आता बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत. पण लाल बावट्याचा या सोयी सवलतींवर बहिष्कार आहे. शाळेत जाऊन काय उपयोग ? पुढे खर्डेघाशीच करावी लागेल. कशाला मुलांना शाळेत पाठवून आजची मजुरी घालवायची ? लाल बावट्याचा असा प्रचार या भागात चालू असतो. मला मिळालेल्या माहितीनुसार तळासरी महालातील लाल वर्तुळात वावरणाच्या वारली आदिवासींपैकी एकही व्यक्ती गेल्या वीस-पंचवीस वर्षात कॉलेजचा उंबरठा ओलांडू शकलेली नाही. अपवाद अर्थात असतीलही. पण प्रचाराचा मुख्य भर शिक्षणविरोधी आहे ही वस्तुस्थिती त्यामुळे बदलत नाही. निरनिराळ्या वर्तुळात मी फिरत होतो. वस्तुस्थिती अशीच असल्याचे मला सर्वत्र सांगितले गेले.

नऊ वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग सहज आठवतो. महाबळेश्वरला मी चाललो होतो. बरोबर एक परिचित कम्युनिस्ट होते. दहा वर्षांपूर्वी मतभेदामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला होता. प्रतापगड-महाबळेश्वर भागात घडलेला शिवकालीन इतिहास मी अधूनमधून, मला माहीत होता तेवढा, त्यांना ऐकवीत होतो. तेवढा ऐकूनही ते चकित झालेले होते. शिवाजीविषयीचा त्यांचा अभिमान जागा झाल्यासारखा दिसत होता. संभाषणात मधूनच ते आपली प्रामाणिक व्यथा सांगून गेले. व्यथा कोणती? ‘आमच्यासमोर हे कधी ठेवले गेलेच नाही. मी बी. एस्सी. फर्स्ट क्लास. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा तो काळ. घरी गडगंज पैसा. वडिलांनी परदेशी पाठविण्याची तयारीही केलेली होती. सगळे सोडून पक्षकार्याला लागलो. पण काम दिले गेले युनियनच्या ऑफिसमध्ये कारकुनी करण्याचे. वर्षानुवर्षे आपले मजुरांसाठी अर्ज भरतोय, अंगठे उठवून घेतोय. वाचन नाही. ज्ञानात वाढ नाही. माझ्यासारख्या बुद्धिमान कार्यकर्त्याला कुजवून पक्षाला तरी काय मिळाले ? आमचे तर आयुष्याचे नुकसान झालेच. व्यापक सामाजिक जीवनाशी, सांस्कृतिक क्षेत्रांशी संबंधच आला नाही. पक्ष सोडल्यावर त्यामुळे पोकळी निर्माण झाली. रामायण, महाभारत, आपली परंपरा, इतिहास यापासून अलग पडल्यासारखे वाटते. प्रवाहात सामील होता येत नाही. हे सगळे जुनाट, टाकाऊ असे पढविले गेले ना? वेरूळच्या शिल्पाकडे त्यामुळे कधी आकृष्ट होताच आले नाही. कार्यकर्त्यांच्या या सांस्कृतिक उपासमारीची फळे पक्षालाही भोगावी लागलीच. वास्तविक हे सगळे सामावून, प्रवाहाचा स्वीकार करून कम्युनिझमने येथे यायला हवे होते'...वगैरे वगैरे.

अजूनही 'असे' येथे येण्याची कम्युनिझमची तयारी नसावी. एरव्ही लाल महालातील शिक्षणविरोधी प्रचाराचा अर्थच समजू शकत नाही.

आपण मुल्लामौलवींबाबत नेहमी म्हणतो, की यांच्यामुळे बहुसंख्य मुसलमान समाज अज्ञानात राहिला. नवे ज्ञान, वेगळे वेगळे विचारप्रवाह मुल्लामौलवी आपल्या अज्ञ बांधवांपर्यंत पोहोचूच देत नाहीत. मला वाटते सर्वच बंदिस्त तत्त्वज्ञानांची ही शोकांतिका असावी. मनुच्या सनातन धर्मानेही शूद्रांचे शिक्षण हा अपराध ठरवला. कठोर शिक्षा यासाठी घालून दिल्या. कम्युनिझम हा आधुनिक धर्म. पण त्यालाही 'शहाणे करून सोडावे । सकळ जन' ही प्रेरणा नाही. सकळ जन आहे, पण शहाणे करून 'धरावे' असे तो सांगतो. असा 'धरून' ठेवलेला माणूस मोकळा-मुक्त-जागा कसा मानायचा ?

चालू शिक्षण कुचकामी आहे, व्यक्तीला ते कुटुंबापासून-समाजापासून अलग करते, खेड्यातून शहराकडे खेचते, नोकरीच्या सुरक्षित कुंपणाआड जगण्याची वृत्तीच फक्त या शिक्षणाने पोसली जाते, इत्यादी आक्षेप अगदी खरे आहेत. अनेकांनी आजवर ते घेतलेले आहेत. पण यावर उपाय ‘शिक्षण घेऊ नका' हा प्रचार नाही. गांधीवाद्यांनाही ही आधुनिक शिक्षपद्धती मान्य नव्हती. त्यांनी 'नई तालीम' काढून नव्या शिक्षणाचे प्रयोग सुरू केले व स्वराज्याचा लढाही चालू ठेवला. हे दुहेरी प्रयत्न गांधीजींना साधले याचे एक कारण म्हणजे त्यांचा भर माणसावर होता, त्याच्या मुक्त विकासावर होता. सत्ताप्राप्तीवर नव्हता, एखाद्या तत्त्वज्ञानाच्या साखळदंडात माणसाला अडकवण्यावर नव्हता. आजही गांधीवाद्यांचे ठिकठिकाणी प्रयोग सुरू आहेत. ते बहुतेक अपयशी आहेत हेही खरे आहे. पण ती Creative failures वाटतात. उद्याच्या यशाची पायाभरणी अशा अनेक अपयशातून होण्याची शक्यता दिसते. याउलट गोदाराणीचे यश आहे. उद्याच्या अपयशाची बीजे त्यात दडलेली आहेत. फळ चटकन पदरात पडते. पण चाखल्यावर ते कडू असल्याचेही अनुभवास येते. अनुयायांना अंधारात डांबून-कोंडून मिळविलेले यश हे मानवतेचे यश कधीही ठरत नाही. गुलामीचा नवा प्रकार म्हणून तो नोंदला जातो. लाल क्रांतीचे हे सर्वत्रचे आजवरचे अपयश आहे. लाल महाल तरी त्याला अपवाद कसा ठरणार ?

तळासरी भागात माणसाला अशीही एक नवीन जाग येत आहे.......

एका वसतीगृहात माझा आजचा मुक्काम आहे. वेळ संध्याकाळची आहे. मुले प्रार्थनेसाठी एकत्र जमलेली आहेत. स्वच्छ सारवलेल्या जमिनीवर सर्वजण रांगेने बसलेले आहेत. समोर गुरुजी व वसतीगृहाचे व्यवस्थापक विद्यार्थ्यांबरोबरच प्रार्थना म्हणताहेत. गीतेचा बारावा अध्याय झाला. गीताई झाली. रामरक्षा म्हटली गेली. विद्यार्थी सर्व आदिवासी-वनवासी. बारावा अध्याय स्पष्ट शब्दोच्चारांसह त्यांनी तोंडपाठ म्हटलेला पाहून मी चकीतच झालो होतो. मग परिचयाचा कार्यक्रम. पंचवीस की सत्तावीसजण असतील. आसपासच्या टापूतून आलेले होते. घरची बहुतेकांची गरिबी. आईवडिलांचा मुख्य उद्योग गवतकापणी. मोकळ्या वेळात घरच्या २-४ एकर पावसाळी शेतीची देखभाल. हा शांताराम रामू झोले, इयत्ता नववी; हा वसंत देवजी लहांगे; हा धनंजय माह्या करमोडा. सगळे सातवी ते अकरावीतले. कुणी खेळात चमकलेला आहे. कुणी निबंधात बक्षिसे मिळविलेला आहे. शरीरे बहुतेकांची काटक वाटली. वसतीगृहात सकाळी व्यायामाचा व संध्याकाळी खेळाचा कार्यक्रम नियमित घेतला जातो. कपडे स्वच्छ आहेत, बोलणे-चालणे मर्यादशील आहे. आल्यागेलेल्याचे स्वागत करून त्याची सगळी सोय पाहण्याचे अगत्य आहे. मला तर शहरातही इतके चांगले शैक्षणिक वातावरण आढळत नाही. आईबाप येऊन भेटून जातात. कुणी शेठ-सावकार येऊन खाऊ वाटतो. नुकताच गणेशोत्सव सुरू केला आहे. गावातले सर्वजण जमतात. अगदी ख्रिश्चन असलेले विद्यार्थीमित्र व त्यांचे पालकही. आरत्या होतात, प्रसाद वाटप होते. 'जास्तीत जास्त दोन वर्षात पळ काढतात की नाही ते पहा' हे या वसतीगृहाच्या चालकांबाबत लाल बावट्याच्या एका कार्यकर्त्याने काढलेले उद्गार निदान आज तरी खरे ठरलेले नाहीत. वसतीगृह वाढविण्याच्या चालकांच्या खूप योजना आहेत. सुरू होऊन दोन वर्षांचा काळ उलटून गेलेला आहे.

असा हौशी गुरुजी तर कित्येक दिवसात भेटला नव्हता. फक्त मुलांच्या अभ्यासावर व आरोग्यावर लक्ष नाही. प्रत्येक मुलामार्फत थेट कुटुंबाशी संबंध. त्यातून नवे नवे कार्यक्रम. यंदा, ६९ मध्ये, या संबंधातून एक विहीर झाली. वसतीगृहातील एका विद्यार्थ्यांचे पाच मैलावरील गाव. घरची जमीन तीन-चार एकर. कुटुंबाची गरज ओळखून गुरुजींनी आपली विद्यार्थी फौज फावल्या वेळात तिकडे गुंतविली. आळीपाळीने सर्वच विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी या कुटुंबाच्या मदतीला जात. कोणावरही ताण न पडता विहीर चार-सहा महिन्यात तयार झाली. आता इंजिन-पंप वगैरे मिळवून देण्याची खटपट सुरू आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमाचे मोल करायचेच म्हटले तर ते सहज सात-आठशे रुपयांच्या घरात जाते. एक कुटुंब यातून स्वावलंबी होत आहे हा सगळ्यांचा आनंद. यंदा किती कुटुंबे अशी स्वावलंबी करायची ? किती ठिकाणी विहिरींची गरज आहे ? कितीजण स्वतः राबायला यासाठी तयार आहेत ?. पाण्याच्या जागा कशा नक्की करायच्या ? कोणकोणाला कामाला पाठविता येईल ? त्यांचा अभ्यासाचा वेळ कसा राखून ठेवायचा ? गुरुजींसमोर असेच काही प्रश्न नेहमी उभे असतात.

वसतीगृहाच्या बाजूला असलेला पाव एकराचा तुकडा वाया जाऊ नये म्हणून असाच एक कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी भात लावला. जपानी पद्धतीचे शिक्षण सहजच मिळन गेले. निर्मितीशी, उत्पादनाशी लहानपणापासून नाते जडले. गुरुजींनी नोंद ठेवली. पिकांबाबत अंदाजाच्या स्पर्धा घेतत्या. चुका ध्यानात आणून दिल्या. आसपासची आणखीन् थोडी जमीन मिळवून यंदाही हा कार्यक्रम चालू ठेवण्याची सर्वांची उमेद दिसली.

विद्यार्थ्यांना सुटीत घरी जाताना काकडी, भोपळा, वांगी, निरनिराळ्या वेलांचे, भाज्यांचे बियाणे गुरुजी देतात. घरच्या दोन-चार एकरात मुले या भाज्या लावतात, पालक पुढे देखभाल करतात. गुरुजींची चक्कर असतेच. अधिक माहिती, नवे प्रकार यांची देवाणघेवाण चालू असते. शतकानुशतके भाताशिवाय ज्याला जेवण माहीत नाही असा आदिवासी नव्या चवींना हळूहळू सरावतो. संस्कृती म्हणजे तरी अखेर काय ? चव बदलणे, अभिरुची सुधारणे, एवढेच ना ?

असे गुरुजी घरी आले, की ताडीमाडी पुढे करून त्यांचे स्वागत करू नये हे आदिवासीलाही कळते. नाहीतर केवढा समरप्रसंग ? असे स्वागत एखाद्याने नाकारले, तर चहा नाकारल्याने आपल्याला जसा राग येईल तसाच तो आदिवासीलाही येतो. लग्नात दारू पाजली नाही म्हणून रुसणी-फुगणी, मानापानाची भांडणे सर्वसामान्य आदिवासी घरात चालूच असतात. नवी पिढी, नवे संस्कार हाच यावरील उपाय आहे.

वसतीगृहातील पुस्तकांचा संग्रहही निवडक वाटला. Exodus कादंबरीचे ‘शूरा मी वंदिले' हे नुकतेच प्रसिद्ध झालेले मराठी रूपांतरही मला गुरुजींच्या टेबलावर दिसले. यापूर्वी मी न पाहिलेले व ऐकलेले एक पुस्तक मात्र मीच या संग्रहातून परतबोलीचा शब्द देऊन उचलून आणलेले आहे- भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : लेखक-विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. नागपूरच्या नवभारत ग्रंथमालेचे १९३३ मधील प्रकाशन.

'या वसतीगृहात कोणाला प्रवेश मिळू शकतो ?' मी
'या विभागात राहणाऱ्या आदिवासी-वनवासी कुटुंबातील कुणाही मुलाला-'चालकांचा खुलासा.
वसतीगृह 'विश्व हिंदू परिषदे'चे आहे. त्यामुळे मी आणखी एक चौकशी केली. या विभागात ख्रिश्चन झालेल्यांचे प्रमाण पुष्कळच आहे. मुसलमानही असतील. म्हणून मी विचारले, 'सगळ्यांना प्रवेश दिला जातो का ?'
'या विभागातील सर्वांना आम्ही हिंदूच समजतो.' चालक.

उत्तर मोठे पेचबंद वाटले. आपण इतरांना काय समजतो यापेक्षा इतर आपणा स्वतःला काय समजून वागतात याला महत्त्व आहे. या विभागात रहाणाऱ्या प्रत्येकालाच हिंदू समजायचे म्हणजे हिंदुस्थानात रहाणाऱ्या प्रत्येकालाच हिंदू म्हणायचे. हिंदुत्वाची ही व्याख्या व्यवहार्य नाही. हिंदू हा शब्द राष्ट्रवाचक आहे, धर्मवाचक नाही हे सिद्ध करण्याचा सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथात प्रयत्न केला. ऐतिहासिक दृष्ट्या त्यांचे प्रतिपादन निर्दोषही असू शकेल. पण परंपरेचा संस्कार सुटत नाही. हिंदू हा शब्द धर्माशीच जोडला गेलेला आहे. 'भारतीय' हा सोज्वळ शब्दही येथे मान्य करण्यासाठी खळखळ सुरू आहे तेथे त्याचाच प्रतिशब्द


ग्रा.•••८ म्हणून 'हिंदू' शब्दाला मान्यता लाभेल हे संभवनीय दिसत नाही. सर्व मुसलमान, खिस्ती, धर्म बदलून हिंदू होतील याचीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत चालकांची भूमिका काय राहील ? समजा वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरायचा आहे. प्रवेशेच्छू आपला धर्म म्हणून मुसलमान-खिस्ती असे काहीतरी नोंदविल. चालक ते खोडून त्याजागी हिंदू हा शब्द लिहितील. प्रवेशेच्छूला हे मान्य होणार नाही. मग त्याला प्रवेश तरी नाकारला जाईल, किंवा चालकांना आपले धोरण तरी बदलणे भाग पडेल. धोरण बदलून मुक्त प्रवेशाला वाव दिला गेला तर वसतिगृह हे एकात्म राष्ट्रनिर्मितीचे एक आशास्थान ठरेल, फक्त हिंदूंनाच प्रवेश चालू राहिला तरीही त्यात गैर काहीच नाही. हिंदुधर्मांतर्गत अस्पृश्यतेला, उच्चनीचतेला येथे मूठमाती मिळत आहे, हेही यश काही थोडे नाही. अस्पृश्यता, उच्चनीच भाव हटवला पाहिजे हे सर्वांनाच आज मान्य आहे. पण यासाठी व्यवहार्य कार्यक्रम मात्र कोणालाच सादर करता आलेला नाही. बडबड मात्र उदंड माजली आहे. यापेक्षा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न शतपटीने श्रेष्ठ आहे. मला खूप वाटते, की 'विश्व हिंदू परिषद' ही 'विश्व मानव परिषद' व्हावी. सर्वांना उद्याच्या मानवधर्माचे शिक्षण येथून लाभावे. पण काही कारणास्तव आज हे घडू शकत नसेल, तर जे मजबूत यश पदरात पडते आहे ते मर्यादित म्हणून झिडकारावे, नाकारावे असेही मला वाटत नाही. तो एक नतद्रष्टपणा ठरेल. पुरोगामित्वाच्या पोकळ बडेजावासाठी मी तो करणार नाही.


*


जानेवारी १९७०