श्रीग्रामायन/वेल्होळी : जि. नाशिक

विकिस्रोत कडून


वेल्होळी : जि. नासिक


एखादी मैफल रंगावी तशी वेल्होळीची सभा रंगली. कुठल्याही, कुणाच्याही अभिप्रायाची अशा वेळी गरज नसते. आपले आपल्यालाच कळत असते, जाणवत असते की, आज जम बसतो आहे, मेळ साधतो आहे, रंग भरतो आहे.

तरी पण 'आज सभा छानच झाली' असे सभा संपल्यावर मोकाशी म्हणाले तेव्हा सर्वांनाच समाधानाच्या दुधात साखर पडल्यासारखे वाटले. कारण आजवर पाचपन्नास सभा मोकाशींनी ऐकलेल्या होत्या. रोज तेच तेच विचार ऐकण्याचा त्यांनाही कंटाळा येणे स्वाभाविक होते. आम्हालाही कधीकधी येतच होता-नवीन असे सांगितले जाण्याची शक्यता कमी होती.

पण त्या दिवशी सुरुवातच नव्या पट्टीत, नव्या लकेरीने झाली. आजवर आमचा परिपाठ असा. आपण परदेशांकडून अन्न-मदत घेत राहिल्याने आपली ‘ पत' कशा घसरली आहे, अनेकदा मानहानी कशी पत्करावी लागली आहे हे राजाभाऊ कुलकर्णी यांनी प्रास्ताविकादाखल सांगायचे. यामुळे आम्ही राजाभाऊंना किंवा त्यांचा भूमिका पार पाडणाऱ्या प्राथमिक परिचयवक्त्याला ' पतवाले' म्हणत असू.

यानंतर आमचे जोशीबुवा सरसावत. ते सर्वोदयी कार्यकर्ते. शेतीची. खतांची बरीच माहिती त्यांच्याजवळ तयार. 'आपली गेलेली पत परत मिळवायची असेल तर परदेशांवर अवलंबून रहाण्याची सवय आपण सोडून दिली पाहिजे. आपल्या आसपास जी नैसगिक संपत्ती वाया जात आहे तिचा आपण कटाक्षाने वापर केला पाहिजे.' अशी प्रस्तावना करून ते 'खते' या विषयावर बरीच माहिती शेतकऱ्यांना सांगत. सोनखत, शेणखत, हिराखत इत्यादी खतांचे प्रकार, ते जमा करण्याची पद्धता वगैरे त्यांनी सांगितलेले ज्ञान बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्सुकतेने ग्रहण केले, तुरळक ठिकाणी त्यावर चर्चाही झाल्या. शिवाय जोशीबुवांच्या सांगण्यात एक प्रकारचा ठाशीवपणा असे, त्याचाही परिणाम होई. अमुक अमुक पद्धतीने खत गोळा करा, शेतात टाका. उत्पन्न इतके वाढेल. आम्ही प्रयोग करून पाहिले आहेत. नाही उत्पन्न वाढले तर मला विचारा. जोशीबुवांचे 'हे मला विचारा' इतक्यांदा होई की, आम्ही त्यांना विनोदाने म्हणत असू, 'जोशीबुवा, खरोखरच या लोकांनी तुम्हाला विचारायचे ठरवले तर त्यांनी तुम्हाला गाठायचे कुठे ? तुमचा ठिकाणा काय ? तुम्ही तर आज इथे उद्या तिथे. तुमचा काही कायमचा पत्ता आहे का?' पण जोशीबुवांना हे काही पटत नसे. त्यांचे आपले 'मला विचारा' हे शेवटपर्यंत चालूच राहिले. वर पुन्हा शेतकऱ्यांना हे असेच ठासून ठोकून सांगावे लागते. तुमची ' विचार करा' ही भाषा इथे चालायची नाही' हे त्यांचे आम्हालाच सांगणे असे.

यामुळे जोशीबुवांचे नाव 'खतवाले' असे पडले होते.

शेवटी मी 'शेती, उद्योगधंदे, शिक्षण या सर्वच क्षेत्रांत आज बोकाळलेली परावलंबी वृत्ती आपल्याला नष्ट केली पाहिजे. त्याशिवाय आपले कुठलेच प्रश्न सुटणार नाहीत. अन्नापासून ही सुरुवात आहे. 'परदेशी अन्न-मदत बंद करा' असे आपण सरकारला एकमुखाने सांगू-' असा समारोप करी व या आशयाचा एखादा ठराव सभेपुढे ठेवून त्याला मान्यता घेई. यामुळे ‘मतवाले' ही पदवी मला मिळाली होती.

असे आम्ही 'पत' वाले, 'खत' वाले आणि ‘मत' वाले गावोगाव सभा घेत, नगर जिल्ह्यातील नेवाशाच्या पुढे ‘बेलपिंपळगाव' येथे पोहोचलो, तेव्हा गावातल्या ९ भिंतीवर, आम्हाला या तिन्ही शब्दांचा उपयोग करून एक म्हण मोठ्या अक्षरात लिहिलेली आढळली-

गावात एकमत

शेतात सोनखत

सुधारा देशाची पत

नुकताच यागावी ग्रामगौरवसमारंभ पार पडला होता. ग्रामगौरव म्हणजे शंभर टक्के गाव साक्षर झाल्याची निशाणी. या समारंभापूर्वी गावातल्या भिती निरनिराळ्या म्हणींनी रंगवून काढण्याचा एक कार्यक्रम बहुतेक ठिकाणी होत असतो. या म्हणीही गावकऱ्यांनी व विशेषतः गावशाळेच्या शिक्षकांनीच तयार केलेल्या असतात. महाराष्ट्रभर अशा गावातून हिंडून कोणी या म्हणी नुसत्या एकत्रित या तरी लोकसाहित्यात काही नवीन भर पडेल ; निदान स्वातंत्र्योत्तर काळातील, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासप्रवृत्तींचे काही रेखाटन तरी त्यावरून खचित करता येईल, असे काही भिंती पाहून तर तीव्रतेने वाटले.

वेल्होळीला राजाभाऊ कुलकर्णी नसल्याने घडी वेगळी बसणार, खत-पत-मताचे नेहमीचे त्रिकूट विस्कटणार याची कल्पना थोडीफार होतीच; पण नवीन घडी इतकी चांगली जमेल असेही वाटले नव्हते. संचलनाच्या सुरुवातीला काही दिवस बरोबर असलेले, नंतर गावी परतलेले व पुन्हा आज सामील झालेले मराठवाड्यातील कार्यकर्ते श्री. गंगाधर नलावडे यांनी सभेची सुरुवातच वेगळ्या भाषणाने केली. ते म्हणाले-

'काल दिवसभर आम्ही प्रवासात होतो. संचलन सोडल्यावर मधल्या महिन्याभरातही मराठवाड्यात कामासाठी सारखे हिंडत होतो. आम्ही संचलनासोबत काही दिवस होतो, असे कळल्यावर लोक उत्सुकतेने माहिती विचारीत. ज्या भागातून संचलन गेले तेथे तर घरच्या मंडळींची चौकशी करावी, तशा आस्थेने संचलनाच्या पुढील मुक्कामांची हालहवाल, ख्यालीखुशाली विचारली जाई. संचलन कुठवर आले, कार्यक्रम कसे होतात, मराठवाड्यात जशी लोकांनी साथ दिली, तशी इतर मिळते की नाही, सरकारवर याचा काही परिणाम होणार आहे का, संचलना नंतरचा कार्यक्रम काय, अशा अनेक शंका, प्रश्न आम्हाला विचारले जात आणि आम्हीही सुचतील तशी उत्तरे देत असू. यावरून इतके निश्चित की, निदान आमच्या भागात तरी या वेगळ्या विचारांविषयी कौतुक आहे. तो पसरावा, त्याच परिणाम दिसावेत, अशी लोकांची मनापासून इच्छा आहे. मला स्वतःला हा विचार फार पटला. यात पक्षबिक्ष काही नाही, निवडणुकांची दृष्टी नाही, म्हणून तो जास्त आवडला आणि म्हणून मी सुरुवातीलाच सामील झालो. मी स्वतः तिथे कम्युनिस्ट पक्षाचे काम करतो. माझ्याप्रमाणेच इतरही पक्षांचे कार्यकर्ते याकडे . ओढले गेल्याचे मला माहीत आहे. पुढे काय हे आज कोणीच सांगू शकणार नाही: यांनी विचाराची दिशा सांगितली, पुढची जबाबदारी वास्तविक आपली आहे- विशेषतः शेतकरीसमाजाची'...

आणखी बरेच काही नलावडे सांगत होते. त्यांच्या सांगण्यातला नवीनपणा, ताजेपणा जाणवत होता. त्यामुळे भाषण लांबले तरी ऐकावेसे वाटत होते.

यानंतर विनायकराव पाटील बोलले. शेतकऱ्यांनी जबाबदारी कशी उचलायची याचे उदाहरण म्हणून त्यांनी निफाड तालुक्यातल्या अकरा गावांची माहिती सांगितली. 'निफाड तालुक्याला वास्तविक बाहेरून धान्य आणण्याची काही गरज नव्हती, नाही. खूप पिकवणारा हा भाग आहे; पण हजारो क्विंटल परदेशी धान्य या तालुक्यात येतच होते, अजूनही येते. आमच्यापैकी अनेकजण हे धान्य स्वस्त मिळते, म्हणून गुराढोरांना खाऊ घालण्यासाठीही याचा उपयोग करतात. यात काही तरी चूक आहे, आपल्या देशाचे फार नुकसान होत आहे, याची कुणाला जाणीवच नव्हती. शिवाय आपल्या अब्रूचाही प्रश्न आहे. किती बदनामी परदेशात आपली होत आहे! म्हणून आमच्या तालुक्यातल्या अकरा गांवांनी ठरवले की, परदेशी अन्नधान्याचा एक कणही गावात येऊ द्यायचा नाही. जी काही तूट आहे ती आपापसात भरपाई करून वाटून घ्यायची. परदेशातील लहान मुलांनी आपल्यासाठी उपास काढावेत आणि हे मुलांच्या तोंडचे घास आम्ही गिळावेत, याची शेतकरी म्हणून मला तरी लाज वाटली. आपल्या सर्वांनाच हे कळल्यावर ती वाटल्यावाचून रहाणार नाही. तूट-तूट ती आहे किती ? फक्त दहा टक्के. मला वाटतं आपण मनावर घेतले तर ही अन्नतूट भरून काढणे मुळीच अवघड नाही. नुसते उंदीर मारले तरी हा प्रश्न मिटल. शिवाय आपली उत्पादनाची ताकदही काही कमी नाही. आमच्या आजोबांना एकरी वीस टन ऊस निघाला की खुप निघाला असे वाटत असे. आज आम्ही एकरी शंभर शंभर टन पीक घेतो. गव्हाच्या, ज्वारीच्या बाबतीतही तेच. दोन वर्षांपूर्वी ' कुठूनही पाणी उचला' अशी सरकारने नुसती परवानगी दिली तर जामच्या तालुक्यातले गव्हाचे उत्पादन चौपट वाढले. आपण आता सरकारला सांगितले पाहिजे की, ही परदेशी अन्नमदत बंद करा, तूट भरून काढण्याइतकी ताकद आमच्यात आजही आहे ..'

'विनायकरावांनी निफाड तालुक्यातील 'परान्नमुक्त' अकरा गावांचे उदाहरण आपल्याला दिले. तुम्ही तेच गिरवा असे माझे म्हणणे नाही. स्थानिक परिस्थिती वगळी असण्याचा संभव आहे, तुमचा आविष्कार तुमच्या परिस्थितीनुरूप वेगळा असला तर काही बिघडणार नाही. स्वावलंबनाची प्रेरणा महत्त्वाची आहे, मार्ग वेगवेगळे असतील, नव्हे असणे चांगलेही. एकच चित्र सगळ्यांनी कशाला गिरवायच? प्रत्येकाने वेगळे रंग भरावेत, नवे नवे प्रयोग करावेत. हे सारखं नवं नव वडवण्याची, सतत धडपडण्याची वृत्ती आपल्यात निर्माण झाली नाही हे आपले गेल्या पास वर्षातील नियोजनाचे खरे अपयश आहे. परक्या, श्रीमंत देशांची नक्कल करून नाट होण्याचा आपण प्रयत्न चालविला आहे. तो चुकीचा आहे. याने आपण केंव्हाही मोठे होणार नाही, श्रीमंत होणार नाही. मोठेपणाचे व श्रीमंतीचे जे एक वेगळे तेज असते ते कधीही आपल्यावर चढणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही मंडळी येथे आलो आहोत. अन्न हा एक निकडीचा विषय निमित्त म्हणून घेतला आहे; पण त्यामागची मुख्य भावना आहे स्वतंत्रतेची. या संचलनाला अन्न विलंबन संचलन असेही म्हणता आले असते; पण मुद्दामच स्वतंत्रता संचलन असे म्हटले आहे. वीस वर्षांपूर्वी राजकीय स्वातंत्र्य आपल्याला लाभले; पण आपल्या पायांवर उभे रहाण्याची विद्या आपण हस्तगत केली नाही म्हणून आज आर्थिक गुलामगिरीत पुन्हा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपले तंत्र, आपली बुद्धी व आपली साधनसामग्री यांच्या बळावर, आपल्यालाच विकसित करावे लागते, शोधावे लागते. परदेशातून आयात करता येण्यासारखी ही वस्तु नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. परदेशातून फार तर निर्जीव, जड यंत्रसामग्री येऊ शकते; पण मागचे बुद्धिचैतन्य, ज्ञानविज्ञान येथेच खस्ता खाऊन, येथल्याच मातीत पिकवावे लागते. स्वाभाविक वाढ होण्यासाठी आपण प्रथम परदेशातील आयात कमी केली पाहिजे. अन्नाची तर प्रथमच. वीस वर्षे आपण परदेशातून अन्न आणतो ही केवढी लाज आणणारी गोष्ट आहे ! आणि म्हणे हा देश शेतीप्रधान आहे. एके काळी सुवर्णभूमी म्हणून या देशाचा लौकिक होता ! पुन्हा हा लौकिक प्रस्थापित करणे शक्य आहे. निर्धाराची, थोड्या आत्मविश्वासाची फक्त निकड आहे'–असा काही तरी मी केलेला शेवट होता. नक्की व सुसंगत आज इतक्या दिवसांनंतर काही आठवत नाही.

तसे नक्की आणि संगतवार असे या सभेचे, दिवसाचे काहीच आठवत नाही. आठवते ते इतकेच की, दिवस फार चांगला गेला, सभा खूप रंगली. रात्रीही गाढ शांतता वाटली. माणसे किती छान वागली ! वेशीवर पाच पन्नास माणूस तरी सकाळी घ्यायला जमला होता. उतरण्याची सोय शाळेत होती. जागा किती स्वच्छ सारवून ठेवली होती ! पिण्याचे पाणी, वापरायचे पाणी दोन वेगवेगळ्या, घासूनपुसून चकचकीत केलेल्या पितळी पिंपात ठेवलेले इथे प्रथमच आढळले. जेवायची वेळ चुकली नाही, जेवताना अवाजवी आग्रह झाला नाही. विश्रांतीच्या वेळात कोणी येऊन बोलत बसले नाही. धुळवडीचा हा दिवस होता. संध्याकाळ मुलांचे खेळ पाहण्यात गेली. खेळ संपल्यावर सभा. तीच मंडळी सभेसाठी येऊन बसली. वोनतीन सरकारी अधिकारी सभेसाठी मुद्दाम आलेले होते. एका फळ्यावर हिंदुस्थानचा नकाशा काढून त्यावर ' वेरूळ ते मुंबई' हा अन्नसंचलनाचा मार्ग खडूने रेखित केलेला होता. कसलाही औपचारिकपणा सभेत दिसत नव्हता, तरीही एक अदब होती, शिस्त होती. स्वागताची भाषणे नाहीत, आभाराची लांबड नाही. सारे कसे रेखीवपणे चालू होते.

सभा संपल्यावर तीन मैलांवर असलेल्या सभापतींच्या गावी जाऊन त्यांच्याकडे जेवून आलो. सगळ्यांना वाटत होते या चांदण्यात लहानशी सहल काढावी. शेजारच्या टेकडीवर चढून जावे, लांबवर पसरलेल्या रस्त्याच्या काळ्या मातीत पडून रहावे, नाचावे, सूर लावावेत ! मला मात्र स्वस्थ, एकट्याने उघडयावर कुठे तरी बसून रहावेसेच फक्त वाटत होते. कारण एकान्तात गेल्याशिवाय हे समाधानाचे कढ मला आवरता येणार नव्हते.

तसे काहीच नवीन घडले नव्हते; पण ही झुळझुळणारी प्रसन्नता, ही सळसळणारी शांतता आज नवीन होती. इथे व्याकुळता होती; पण दुःख नव्हते. ओढ होती, आतुरता होती; पण अस्वस्थता नव्हती. एक रुखरुख मात्र जाणवून गेली. आपण कवी असायला हवे होते ! ही अवस्था आपल्याला शब्दात साठवून ठेवता यायला हवी होती...


एप्रील १९६८

*