Jump to content

श्रीग्रामायन/चला

विकिस्रोत कडून




चला....


 आपला देश गरीब आहे हे एक सत्य आहे.
 आपला देश ‘ मागासलेला' आहे हे एक अर्धसत्य आहे.

आमचे उद्योगधंदे मारून, पुन्हा ते कधीही वर येऊ नयेत म्हणून इंग्रजांनी 'हा देश शेतीप्रधान आहे ' हा भ्रम दीडशे वर्षांपूर्वी आपल्या साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी येथे हेतुपुरस्सर पसरवला, दृढमूल केला. आमचेही पुस्तकी पोपट बोलू लागले, 'खरंच, हा देश शेतीप्रधानच आहे.' म्हणजे आपला औद्योगिक वारसा विसरून आम्ही चिरकाल कच्चा माल निर्यात करून, पक्क्या मालाची वसाहत बनून निपचीत पडून रहावे हा परकीयांचा उद्देश आम्हीच सिद्धीस नेऊ लागलो.

आज इतिहासाची अशीच पुनरावृत्ती सुरू आहे. स्वतंत्र होऊन वीस वर्षे झाली तरी अजून आम्ही ' मागासलेले' आहोत हे ऊठसूट आम्हाला ऐकंवले जात आहे. हा शब्द फारच बोचत असेल तर घ्या, 'विकसनशील देश' हा जरा सभ्य किताब ! अर्थ एकच. स्वतःला विसरा, आपल्या नैसर्गिक साधनसामग्रीची आबाळ करा, परक्याला घरात हातपाय पसरू द्या. श्रीमंत राष्ट्रांच्या तयार मालाची कायमची बाजारपेठ बनून रहा. आयात जास्त, निर्यात कमी. तूट भरून काढण्यासाठी भीक; पण स्पर्धेसाठी मैदानात उतरू नका.हा विकसनशील देश असल्याने याला बराच काळ आधुनिक यंत्रतंत्रासाठी दुस-यावर अवलंबून रहावे लागणारच! यासाठी मदत घ्या, कर्ज मागा, काही सहयोग-सहकार्य वगैरे जमवा, वाटल्यास भीकही मिळेल. या आश्रितपणाची लाज-खंत कशासाठी ?

अशाने आमची गरिबी हटेल, मागालेपणाचा आमच्यावरचा डाग पुसला जाईल, अशी ज्या विद्वानांची समजूत असेल त्यांची असो बापडी. वास्तवात ही एक शुद्ध फसवणूक आहे. स्वतःची कदाचित् नसेल; पण देशाची निश्चित आहे.

गरिबी हटवण्याचा, पुढारलेले राष्ट्र म्हणून जगण्याचा राजमार्ग म्हणजे प्रयत्न आणि परिश्रम. स्वावलंबनाशिवाय गरिबाला दुसरा आधार नाही, हा एक अपरिवर्तनीय निसर्गनियम आहे. हे सत्य दृष्टीआड करून, परिश्रमांचा राजमार्ग सोडून गेली वीस वर्षे आपण कुठल्या मृगजळामागे भरकटत आहोत, याचा काही विवेक? दारिद्र्याशी समोरासमोर झुंज घ्यावी, त्यासाठी अवश्य असणारे ज्ञानविज्ञान, यंत्रतंत्र येथे जन्माला घालावे, येथली शक्तीबुद्धी आणि नैसर्गिक साधनसामग्री यांचा काही मेळ साधावा, घासूनपुसून, वेळप्रसंगी पणाला लावून येथले स्वाभाविक सामर्थ्य वाढवावे, येथली प्रतिभा जागी करावी, खुलवावी, विस्तारावी आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तिचा लौकिक नेऊन भिडवावा ही जिद्दच येथे नाहीशी झाली. आयते तंत्र आयात करून झटपट गबर होण्यात येथील कारखानदारांना भूषण वाटू लागले, आयते अन्न आणून येथील दुष्काळ आणि उपासमार थांबवण्यात येथील राज्यकर्त्यांना कसलाही कमीपणा वाटेनासा झाला. आडमार्गाने दुसऱ्याच्या ज्ञानावर व श्रमावर डल्ला मारून झटपट सुखी व श्रीमंत होण्याची स्वप्ने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांनाच पडू लागली. श्रम नाहीत, साहस नाही. आयते जगण्याजेवणाची चीड नाही. पौरुषाचा ऱ्हास अटळ होता आणि आता तर तो सर्वत्र अगदी गृहीतच धरला जातो.

परवाची घटना.'भारतीय साहित्या'वर व्याख्याने देण्यासाठी नुकतेच एक बंगाली विद्वान-लोकनाथ भट्टाचार्य-फ्रान्समध्ये गेले होते. पॅरिसमधल्या त्यांच्या व्याख्यानाच्या शेवटी अठरा वर्षांच्या एका तरुणाने (पदार्थविज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवणा-या एका शास्त्रज्ञाचा तो नातू होता) नम्रपणे विचारले,'आपले धान्यही न उत्पादणा-या देशास कल्पना-विचार-साहित्य प्रांतात म्हणण्यासारखं काही निर्मिता येईल असं तुम्हास खरंच वाटतं ?'
बंगाली बाबूंचे रवींद्रपुराण तिथेच संपले.

सर्वच क्षेत्रातील आमचे परावलंबन वाढविणारे कसले हे नियोजन ! पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अन्नधान्याव्यतिरिक्त आपण दीडशे कोटी रुपयांची परकीय मदत घेतली. दुस-या योजनेसाठी नऊशे कोटी रुपये उचलले. तिसरीच्या कालखंडात आकडा गेला दोन हजार कोटींच्या घरात. चवथी, परकीय मदत किती मिळणार हे नक्की कळल्यावाचून सुरूच होऊ शकत नाही ही अवस्था ! मागच्या योजनेत खरेदी केलेली यंत्रसामग्री दुरुस्त राखण्यासाठी पुढच्या योजनेतील नवीन तरतुदी आणि त्यासाठी पुन्हा नवीन परकीय मदत, असे हे न थांबणारे चक्र आहे.गेल्या दहा वर्षांत देशात प्रस्थापित झालेल्या मूलभूत उद्योगधंद्यांपैकी बहुतेक सर्व उद्योगधंदे अजूनही त्यांच्या उत्पादनाच्या २५ ते ५० टक्केपर्यंत परदेशी आयातीवर अवलंबून आहेत. हे देशाचे औद्योगीकरण की परदेशीकरण ?

शेतीची व अन्नधान्याची कहाणी तर यापेक्षाही लाजिरवाणी. कृत्रिमरीत्या देशातील अन्नधान्याचे भाव खाली ठेवून समृद्धीची व वैपुल्याची खोटी व फसवी भावना देशात निर्माण करण्यासाठी ही परकीय अन्नमदत घेण्याची क्लृप्ती निघाली. गरजेपेक्षा तेव्हा पाच टक्के अन्नधान्य देशात कमी होते. भाव वाढले असते, गरीब वर्गात कदाचित् असंतोष फैलावला असता या भीतीने तूट भरून काढण्याचा हा आडमार्ग तेव्हा स्वीकारण्यात आला. सरळ मार्ग हा होता की, एकतर गरज कमी करणे किंवा उत्पादन वाढविणे; परंतु यासाठी शेतीव्यवस्थेच्या संपूर्ण पुनर्घटनेची जोखीम पत्करावी लागली असती. ही आव्हाने कोण स्वीकारतो ? त्यापेक्षा आयातीचा बिनधोक मार्ग सोयीस्कर. पुढे या मार्गाची इतकी सवय झाली की, इकडे समस्या उद्भवली की, झोळी मोठी पसरायची, इतकेच काम राज्यकर्त्यांना शिल्लक उरले. कधी वाढत्या लोकसंख्येला जबाबदार धरायचे, कधी चीन-पाकिस्तान युद्धाची निमित्ते सांगायची ; काहीच नसेल तर निसर्गाची अवकृपा आहेच. उत्पादन वाढले तरी तूट कायमच; त्या वेळी पाच टक्के होती, आता ती दहा टक्क्यांवर आली. यंदा तर पीकपाणी भरघोस आहे. आपल्या मानेवर बसलेला हा भिकेचा समंध उठवण्याची ही नामी संधी आहे. तरीही आम्ही अमेरिकेकडे पंचाहत्तर लाख टन अन्नधान्याची मागणी केलीच आहे. अमेरिका यातली निम्मी मागणी पूर्ण करणार आहे. प्रांतबंदी उठवलीत तर यापेक्षा अधिक भीक वाढू असे अमेरिकेकडून सूचित केले गेले असल्याची वार्ता आहे. आपल्या अंतर्गत कारभारात इतका उघडउघड हस्तक्षेप करून, आमच्या उरल्या-सुरल्या प्रतिष्ठेचे अमेरिकेने अगदीच धिंडवडे काढू नयेत म्हणून मूळ पंचाहत्तर लाख टनांची मागणी साठ लाख टनांपर्यंत खाली आणण्याची केंद्रीय अन्नमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे असेही कळते.

विवेकभ्रष्टांचा शतमुखांनी अधःपात होत असतो तो असा.

या प्रकारच्या नियोजनाला आता सुटी दिलीच पाहिजे. आमचे मनुष्यबळ, आमची साधनसामग्री गतिमान करणारे, स्वावलंबनाच्या पायाशुद्ध आधारावर उभे असलेले स्वदेशी संयोजन आपल्याला हवे आहे. गरिबी निश्चित वाईट आहे व ती हटवली पाहिजे याविषयी दुमत नाही; पण रक्त, अश्रू आणि घाम याशिवाय गरिबी हटविण्याचा दुसरा पर्याय अद्याप कुणाला कुठेही सापडलेला नाही, हे आपण आता लोकांना आणि सरकारलाही हडसूनखडसून सांगितले पाहिजे. भांडवलशाही देश आर्थिक प्रलोभनाने हे कार्य साधतात, साम्यवादी देश हुकुमशाहीच्या बळावर श्रमशक्ती जागृत करतात. आपला अर्धवट समाजवाद यापैकी काहीच करू शकत नाही. श्रमाच्या काटेरी मार्गाऐवजी भिकेचा आरामी आणि हरामी मार्ग आपण पत्करला ; स्वाभिमान विकला, सोय पाहिली. परिणाम झाला देशाच्या पुरुषार्थशक्तीवरच. आपणच नाही, दोनतृतियांश गरीब जग या सोयिस्कर पळवाटेने श्रीमंत होण्यासाठी बेभान धावत आहे. कदाचित् काही दिवस, यापैकी काहींना श्रीमती लाभेलही; पण त्यांच्या हातून पुरुषार्थ कधीही घडणार नाही. कारण पुरुषार्थाच्या मुळाशी असणारी आत्मशक्तीच येथे प्रथमपासून खच्ची होत आलेली आहे, पद्धतशीरपणे केली जात आहे.

तेव्हा हे परदेशी मदतीचे नवे साखळदंड आपण खटाखट तोडले पाहिजेत. निदान अन्नाबाबत तरी आत्ताच, या क्षणीच निर्णय घेऊ. दहा टक्केच तूट आहे ना ? हरकत नाही. भागवून घेऊ; पण ताबडतोब परकीय अन्नमदत थांबवा, असे शासनाला एकमुखाने सांगू. ती पावबिस्किटे आणि दुधाच्या पावडरी तर समुद्रात फेकून द्या. लहान वयात, कोवळया बालमनावर कसले गुलामीचे, लाचारीचे घाणेरडे संस्कार करता ? एकही 'श्यामची आई' निघू नये की जिने या पसरल्या जाणाऱ्या हातांवर चरचरून डाग द्यावा आणि मुलाची वेदना स्वतःलाही डागून घेऊन भोगावी ?

एक वेळ भूकबळी होऊ; पण हे भीकबळी होणे नाही, हे आता सर्वांनी ओरडून सांगितले पाहिजे. शक्यता आहे की भूकबळी ठरण्याची वेळ येणार नाही. कारण दहा टक्के तूट आहे तर दहा टक्क्यांच्या आसपास नासधूसही आहे. जास्तीच पण कमी नाही. पाकिस्तानकडे, चीनकडे चोरट्या मार्गांनी किती धान्य जाते याचा काही हिशेब ! साठेबाजांविरुद्धही लोकमत जागृत केले पाहिजे. मग ही साठेबाजी श्रीमंत शेतकऱ्यांची असो, व्यापाऱ्यांची असो की शिलकी अन्नधान्यांच्या राज्यांची असो. प्रांतबंदी आडवी येत असेल तर ती उठवली पाहिजे, जिल्हाबंदी तोडली पाहिजे. एकदा परकीय मदतीचे दोर कापले की, पळ काढण्याला आपल्याला वाव रहाणार नाही; युद्धपातळीवरून सर्वच शेतीव्यवस्थेच्या पुनर्घटनेचा विचार आपण सुरू करू. लढा नाही तर मरा असे दोनच पर्याय तेव्हा आपल्यासमोर असतील आणि शक्यता आहे, एखाद्या सूर्याजीच्या नाही तर शेलारमामाच्या नेतृत्वाखाली गडावर स्वातंत्र्याचे आणि समतेचे निशाण फडकू लागेल.

यासाठी आम्ही निघायचे ठरविले आहे. ज्यांना शक्य आहे, येणे योग्य आहे असे वाटत आहे, ते येतील अशी आशा आहे. एक आवाज तर उठवू ! संघटना, पक्ष येतील न येतील, शासन ऐकेल न ऐकेल. पण इतकी विटंबना चालू असताना आपण निपचीत पडून राहणे हे पाप तरी टाळू ! वेरूळच्या भव्य कैलासलेण्यापासन थेट मंबईच्या चौपाटीपर्यंत चालत चालत, लोकांशी हे विचार बोलत बोलत, मा घेत. प्रचार करीत जायचे आहे. निघण्याचा दिवस : २६ जानेवारी. तीस वर्षापूर्वी रावीच्या तीरावर स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र होण्याचे महान् स्वप्न जेव्हा देशाला पडले तो दिवस! हे स्वप्न अजूनही अपुरेच आहे. स्वतंत्र झालो. सार्वभौम आहोत की नाही याची शंका आहे. या सार्वभौमत्वाच्या साक्षात्कारासाठी, समर्थ राष्ट्रीयत्वासाठी, प्रचीतीच्या पुरुषार्थासाठी, आत्मसन्मानासाठी हे संचलन आहे. प्रवास थोडा जिकिरीचा आहे, सावकाशीचा आहे. हरकत नाही. हेच तर आपले म्हणणे आहे- सावकाश चालू, पण स्वतःच्या बळावर चालू. थोडा वेळ जास्त लागला तरी काही बिघडणार नाही. दुसऱ्याचा आधार सोडला पाहिजे. फार काळ तो घेतला. आता घेतला तर कायमचे पांगळे राहू. ज्यांनी आधार दिला त्यांचे आभार मानू. यापुढे जे देऊ करतील त्यांना साभार नकार देऊ. म्हणू, ‘आमचे आम्ही पाहून घेऊ. धन्यवाद!'

वाटेत होळीचा दिवस येईल. करू पुन्हा एकदा परदेशी वस्तूंची होळी. निदान त्या दूधभुकट्यांची नाही तर अमेरिकन गव्हाची तरी ! सगळ्यांनी आले पाहिजे!

आणि २९ मार्चला मुक्काम मुंबई. वर्षप्रतिपदेला-नव्या वर्षाच्या नव्या दिवशी नव्या गुढ्या उभारू, नवे संकल्प उच्चारू.त्या अथांग दर्यात आपलीही स्वतंत्र अस्तित्वाची नाव निर्भयपणे लोटून देऊ. त्या वेळी आपल्या सर्वांच्या मुखात असतील 'कोलंबसाची गर्वगीते;' आपल्या अंतःकरणातील स्फूर्ती असेल 'वंदे मातरम् वंदे मातरम्...... '

या गर्वगीतांच्या आणि स्फूर्तीमंत्रांच्या सामगायनासाठी,
मित्रांनो ! चला
कैलास ते सिंधूसागर
एक-दोन, एक-दोन, एक-दोन, एक...
संचलन सुरू होत आहे.
स्वयंचलनाचे पहिले पाऊन उचलले जात आहे.
श्री कै ला स ते सिं धू सा ग र...

*

डिसेंबर १९६७