श्रीग्रामायन/पॅरिस आणि पुणे

विकिस्रोत कडून


पॅरिस आणि पुणे


वेळ संध्याकाळची. एक शनिवार. दि. के. बेडेकरांच्या प्रशस्त गच्चीवर काही तरुण आणि मी 'अन्नस्वतंत्रते' विषयी चर्चा करण्यासाठी एकत्र जमलो होतो. या तरुणांची एक छोटीशी संघटना आहे. संघटनेचे नाव काय ते विचारायचे विसरलो; पण मार्क्स हे या तरुणांचे दैवत असावे असे स्पष्ट दिसत होते. तशी संख्या फार नव्हती. सुरुवातीला चार-पाचजण होते. नंतर आणखी चार-पाचजण आले. न आलेले, येऊ न शकलेले गृहीत धरून संघटनेची संख्या तीस-चाळीसपेक्षा अधिक नसावी.

विद्यार्थी कामगारांनी पेटवलेली चळवळ आटोक्यात आणण्यासाठी द गॉलने सैन्याच्या काही तुकड्या, रणगाडे पॅरिस शहराच्या वेशीजवळ आणून उभे केले आहेत ही त्या दिवशीच्या वृत्तपत्रातील एक ठळक वार्ता होती. आमच्याकडचा विद्यार्थी यामळे किती प्रभावित झाला आहे, त्याच्या या उठावाबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याची मलाही उत्सुकता होती.

'पॅरिसमध्ये सध्या काय घडत आहे असं तुम्हाला वाटतं ?' मी सुरुवात करतो.

'महागाई, बेकारी यामुळे फ्रान्समधील कामगारवर्ग हैराण झाला आहे ! ' कोणी तरी उत्तर देतो.

'पण कामगारवर्गाने हा उठाव केलेला नाही. प्रथम विद्यार्थी खवळले. मागाहून कामगार संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांना साथ दिली आणि विद्यार्थी फक्त फ्रान्समध्येच खवळलेला नाही. तो पूर्व युरोपतही उठावण्या करतो आहे. प्रस्थापित व्यवस्थेला आव्हाने देतो आहे.' मी

'तरीपण महागाई, बेकारी, भांडवलशाही अर्थव्यवस्था हीच या असंतोषाची कारणे आहेत. पूर्वयुरोपातील व इतर कम्युनिस्ट राष्ट्रातील विद्यार्थी असंतोषामागील भूमिका वेगळी आहे. त्यांना अधिक स्वातंत्र्य हवे आहे; पण समाजव्यवस्था बदलावी अशी त्यांची मागणी नाही.' कुणीएक. 'फ्रान्समध्ये गेल्या दहा वर्षांत भरपूर सुबत्ता नांदत होती. महागाई होती; पण बेकारीचे प्रमाण काळजी करण्यासारखे नव्हते. अमेरिकेसारख्या धनाढ्य भांडवल शादी राष्ट्राला शह देऊन द गॉलने फ्रान्सची प्रतिष्ठाही खूप उंचावली होती फ्रान्सने ज्यांचा नक्षा उतरवला त्यांनी या असंतोषाला खतपाणी घालून द गॉलवर आपला सूड उगवला, अशीही एक कारणमीमांसा आहे, ती कितपत बरोबर वाटते ! ' मी.

'सुबत्ता ही समाजवादाचा पर्याय ठरू शकत नाही. सुबत्ता असली तरी फ्रान्समध्ये विषमता होतीच.' विद्यार्थी.

'खवळलेल्या विद्यार्थ्यांना समाजवादच हवा होता अशी तुमची खात्री आहे का ? कारण इंग्लंडमध्ये समाजवादी राजवट असूनही तिथला विद्यार्थी खवळतोच आहे. 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' वर कुणी तरी क्रांतीचा झेंडा फडकवला आहे. लंडनमधील फ्रेंच वकिलातीसमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केलेली आहेत.' मी.

'इंग्लंडमध्ये समाजवाद आहे असे आम्ही मानीत नाही.' विद्यार्थी.

'मग पॅरिसमधल्या बंडखोर विद्यार्थ्यांना हवा असलेला समाजवाद कुठला? समाजवाद म्हटला तरी त्याचा नमुना काही एकच नाही. हिंदुस्थानातही समाजवाद आहे. असं म्हटलं जातं. पूर्वयुरोपात, रशियातही समाजवादाची निरनिराळी रूपे आहेत. यापैकी नेमकं कुठलं रूप पॅरिसमधल्या बंडखोरांना अभिप्रेत आहे ? ' मी.

'तसं काही सांगता येत नाही ; पण बंडखोरांच्या हातात विळाकोयत्याचा लाल झेंडा होता यावरुन त्यांना कम्युनिझमकडे जायचे आहे हे स्पष्ट होते.' विद्यार्थी.

'बंडखोरांच्या हाती लाल झेंड्याबरोबरच अराज्यवादाचे (Anarchy) काळे झेंडेही खूप होते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.' मी.

'विद्यार्थ्यांना डावीकडे जायचे आहे एवढे तरी स्पष्ट आहे. अराज्यवादाची परंपरा फ्रान्समध्ये जुनी असल्याने काहींनी काळे झेंडे नाचवले असतील.' विद्यार्थी.

'मार्क्सच्या बरोबरीने अलीकडे पॅरिस-बर्लिनमधल्या विद्यार्थीवर्गावर मार्क्युजच्या (Marcuse) विचारांचा पगडा आहे याचा उलगडा काय ? आणि हा मार्क्युज तर यंत्रसंस्कृतीच्या मुळावरच आघात करतो. आजकालच्या यंत्रसंस्कृतीने माणसाला गुलाम केलेले आहे असे त्याचे मत आहे. डावीकडे जायचे आहे एवढे नक्की असले तरी कशाच्या डावीकडे हाही प्रश्न आहेच. मार्क्युजचे भक्त तर मार्क्सच्याही डावीकडे जाऊ इच्छितात असे दिसते.' मी. 'हे खरे असले तरी पुढची पायरी म्हणून भांडवलशाहीच्या नाशावर आधारलेली पूर्वयुरोपाप्रमाणे एखादी कम्युनिस्ट राजवटच स्थापन व्हावी असे पॅरीसमधल्या बडखोरांना वाटत आहे.' विद्यार्थी एकमताने सांगतात.

'बंडखोरांची प्रेरणा स्पष्ट आहे पण प्रचलित अशी कुठलीच डावी व्यवस्था त्यांना मान्य नसण्याची शक्यता मला अधिक वाटते. त्यांना प्रचलित उजवे नकोत आणि डावेही नकोत असे दिसते. त्यांचा राग सर्वांवरच आहे. कुणावरच त्यांचा विश्वास दिसत नाही.' मी.

कुणीच या माझ्या विधानाला मनापासून होकार देत नाही. मार्क्स-लेनिन परंपरा क्रांतिकारक असली तरी कालबाह्य ठरू शकते हा विचारच त्यांना कदाचित या वयात मानवण्यासारखा नसावा.

चर्चा पुढे चालूच राहते. पण तत्पूर्वी...

बावीस मार्च १९६८. नाँतेर या उपनगरातील पॅरिस विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तर व्हिएटनामला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एक मोर्चा काढला. मोर्चात काही गैरप्रकार घडले, कॉलेज अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांवर रोष झाला, काहींवर शिस्तभंगाचा इलाज केला गेला. यातून परिस्थिती चिघळत गेली व शिस्तभंगाला बळी पडलेल्या विद्याथ्र्यांना पाठिंबा वक्त करण्यासाठी आणखी काही मोर्चे निघाले, निदर्शनांना सुरुवात झाली. प्रथम नाँतेर, नंतर लेटिन क्वार्टर्स, पॅरिस आणि शेवटी फ्रान्सच्या इतर भागातही हे लोण हळूहळू पसरत गेले.

ही बावीस मार्चची चळवळ सुरुवातीला एका लहानशा अतिजहाल डाव्या क्रांतिकारक गटापुरतीच मर्यादित होती. मुख्यतः या गटात अराज्यवादी, ट्रॉट्स्कीवादी, माओवादी विचारांच्या तरुणांचा भरणा होता. तेवीस वर्षाचा, याच कॉलेजचा 'समाजविज्ञान' शाखेचा कोहन बेंडिट हा विद्यार्थी या गटाचा नेता होता. याचा जन्म फ्रान्समध्ये, आई-वडील निर्वासित जर्मन ज्यु. बोलण्या-चालण्यात, वागण्यात-विचारात ज्वलज्जहाल व डोक्यावरचे केसही लाल यामुळे हा 'डॅनी दि रेड' या टोपण नावानेच विद्यार्थीवर्गात जास्त प्रसिद्ध होता. हर्बर्ट मार्क्युज (Marcuse) या अमेरिकन तत्त्वज्ञाचा हा आपल्याला शिष्य मानीत असल्याने मार्क्सवादी विद्यार्थी-संघटनांना व कम्युनिस्टांनाही तो कधीच जवळचा वाटला नाही. त्याच्या 'बावीस मार्च' चळवळीला तर या सर्वांनी प्रथमपासून विरोधच केला. उलट

ग्रा...६ येथील कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेने, एका प्रख्यात कम्युनिस्ट नेत्याला भाषणासाठी नाँतेरला पाचारण केले असता, या बावीस मार्चवाल्यांनी आरडाओरडा करून त्याचे भाषण बंद पाडले व आपण डाव्यातीलही डावे आहोत हे सिद्ध केले. नाँतेरचे महापौर कम्युनिस्ट पक्षाचे आहेत. त्यांच्या सल्ल्यावरूनच या बावीस मार्चवाल्या निदर्शकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला व परिस्थिती चिघळत गेली अशी वस्तुस्थिती आहे. कम्युनिस्ट विद्यार्थीसंघटनांचे प्रमुख व कम्युनिस्ट वृत्तपत्रे आपल्या अनुयायांना या बावीस मार्चवाल्यांपासून लांब राहण्याचे आदेश वारंवार देत होते हेही ध्यानात घेण्यासारखे आहे.

'ऑक्सिडेंट' नावाची उजव्या गटाची विद्यार्थी संघटनाही नाँतेरमध्ये अस्तित्वात होती व या ऑक्सिडेंटवाल्यांच्या आणि वावीस मार्चवाल्यांच्या मधूनमधून चकमकीही झडत असत. मे महिन्याच्या दोन तारखेला बावीस मार्चवाल्यांनी 'साम्राज्यवाद विरोध दिन' साजरा केला. परिस्थिती थोडीशी तंग झाली. कॉलेज अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन वातावरण शांत करण्याऐवजी सूडबुद्धीने कॉलेजच बंद करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा जवळ आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा वर्षाचा प्रश्न होता. अशा मोक्याच्या वेळी कॉलेज अधिकाऱ्यांनी आपली कोंडी करून आपल्याला शरण आणण्याचे ठरविले आहे अशी भावना विद्यार्थ्यांत बळावली व ते खवळले. दुसऱ्या दिवशी, तीन मेला कॉलेज आवारात अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांची सभा झाली. सभा संपून विद्यार्थी शांतपणे परतत असतानाच आवारात पोलीस घुसले आणि त्यांनी बडवाबडवीला व धरपकडीला सुरुवात केली आवारात पोलीस बोलविण्याचा निर्णय कॉलेज अधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या सल्ल्याने घेतला होता असे म्हणतात.

तशी फ्रान्सच्या शिक्षणसंस्थांमधून असंतोषाची दारू फार पूर्वीपासून ठासून भरलेली होती. नेपोलियनच्या काळापासून चालत आलेल्या या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा हवी अशी मागणी सतत केली जात होती. इतर पाश्चिमात्य देशांच्या मानाने, फ्रान्समधल्या फारच कमी विद्यार्थीसंख्येला पदवीपरीक्षेपर्यंत शिक्षण घेण्याची संधी लाभत होती. परीक्षा फार कडक घेतल्या जात. संस्थेच्या मानाने प्राध्यापक कमी, जागा कमी, अभ्यासक्रम जुनापुराणा, सरकारची जाचक बंधने, नोकरशाहीचा वरचश्मा अशा अनेक तक्रारी होत्या. विद्यार्थ्यांचा विकास साधणारी ही ज्ञानमंदिरे नसून त्यांची मने मारणारे हे कैदखाने आहेत अशी टीका सर्रास होत होती. या दारूच्या कोठारावर ठिणगी पडण्याचाच काय तो अवकाश होता, ते पेट घेणार हे उघड होते. ही ठिणगी तीन मे या दिवशी पडली आणि धडाड्धुमला सर्वत्र सुरुवात झाली. संघटना नाही, निश्चित योजना नाहीत, प्रस्थापित डाव्या-उजव्या कोणत्याच नेतृत्वाचा पाठिंबा नाही-तरी डॅनी दि रेडचा आगलावा पंथ आता चोहीकडे भराभर फैलावू लागला. चौकाचौकात, गावोगाव डॅनी गर्जत होता- अखेरचा भांडवलशहा सुळावर चढला पाहिजे. त्याबरोबरच अखेरच्या नोकरशाहीची आतडी लोंबकळताना दिसली पाहिजेत. त्याशिवाय मानवजात सुखी होणार नाही. मागे वळून पाहू नका, जुने जग कोसळत आहे. रस्ते रोखून धरा. सोडू नका-' आणि खरोखरच सहस्रावधी विद्यार्थी रस्ते रोखून धरीत होते, हटत नव्हते, पोलिसांशी दोन हात करू लागले होते, शिक्षणसंस्थांवर चालून जात होते, वाहनांची मोडतोड करीत हाते, बॉम्ब्स फेकीत होते, आणि कायदा धाब्यावर बसवून लाखालाखांच्या मिरवणुका-मोर्चे काढीत होते.

पॅरिसमध्ये व्हिएटनामच्या वाटाघाटींची तयारी पूर्ण झाली होती. अमेरिकन व व्हिएटकॉग शिष्टमंडळांना विद्यार्थी-उठावाचा उपसर्ग पोचू नये म्हणून वाटाघाटींच्या स्थानाकडे जाणाऱ्या सर्व वाटा पोलिसांनी रोखून धरल्या होत्या. तरी एक विद्यार्थी-मोर्चा तिकडे निघालाच. सेन नदीच्या एका पुलावर पोलिसांनी तो अडवला. विद्यार्थी पांगण्याऐवजी तटबंद्या रचून त्यांच्या आड दडले व त्यांनी ' खुनी द गाॅलचे हस्तक' म्हणून पोलिसांवरच हल्ला चढवायला सुरुवात केली. फूटपाथवरचे दगड उपसून, झाडे तोडून, वाहने अडवून विद्यार्थ्यांनी या तटबंद्या रस्त्यात उभ्या कल्या व त्याआडून पोलिसांशी आपले प्रतिकारयुद्ध जारी ठेवले. लॅटिन क्वार्टर्स विभागात रात्ररात्र या चकमकी चालू राहिल्या. ऐनवेळी या तटबंद्या रचण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना कोणी दिले ? तोडमोडीला लागणारे साहित्य कुठून जमा झाले? विद्यार्थ्यांची मानसिक तयारी केव्हा झाली ? रुमाल आडवे धरून विद्यार्थी अश्रधुरापासून स्वतःचा बचाव करून घेत, काहींनी शिरस्त्राणे, ढाली यांचाही वापर कला, हे सारे त्यांना कोणी पुरवले? जखमी विद्यार्थ्यांना नागरिकच आपल्या घरात घेऊन उपचार करीत होते, पोलिसांचे लक्ष जाऊ नये म्हणून कोवळीकोवळी मुले आडोशाला लपून आपल्या जखमावर आपणच गुपचूप इलाज करीत होती.

पाच-सातशे विद्यार्थी जेव्हा जखमी होऊन इस्पितळात पडले, घराघरात शिरून जेंव्हा पोलिसांनी अत्याचार केले, रेडक्रॉससारख्या संघटनेला जेव्हा विद्यार्थ्यांच्या शुश्रुषेला व मदतीला जाण्यास सरकारतर्फे बंदी करण्यात आली, तेव्हा संतापाची तीव्र लाट साऱ्या देशभर उसळली आणि शिक्षणसंस्था धडाधड बंद पड लागल्या. काहींवर तर विद्यार्थ्यांनी आपला अंमलच सुरू केला. देशातील तेवीस विद्यापीठांवर विद्यार्थ्यांचा ताबा होता, इतर अनेक विद्यापीठांनी सर्व सरकारी बंधने झुगारून आपली स्वायत्तता उद्घोषित केली होती. शिक्षक-प्राध्यापक वर्ग आता उघडउघड विद्यार्थ्यांबरोबर मिरवणक-मोर्च्यात, निदर्शनात सहभागी होऊ लागला होता. विद्यार्थ्यांच्या ताब्यात आलेल्या विद्यापीठातून, कॉलेजातून नव्या शिक्षणक्रमाविषयी, नव्या समाजव्यवस्थेसंबंधी घनघोर चर्चा झडू लागल्या. विद्यार्थी-कामगार यांचे संबंध, विद्यापीठांचे समाजातील स्थान, संस्कृती आणि भांडवलशाही-अशा गंभीर विषयांवरही ही खवळलेली मुले रात्ररात्र जागून विचारविनिमय करीत होती. जिन पॉल सार्त्रसारखे लेखक, मोनोडसारखे नोबल पारितोषिक विजेते कधी स्वतः उपस्थित राहून, कधी पत्रके प्रसिद्ध करून या विद्यार्थ्यांना 'आगे बढो' म्हणून सांगत. सोरबोन विद्यापीठाच्या सभागृहात, उसळणाऱ्या विद्यार्थी-श्रोत्यांच्या सभेत भाषण करणाना सार्त्र ‘डॅनी दि रेड' ला उद्देशून म्हणाले होते- 'तुझ्यातून असे काही बाहेर फेकले गेले आहे की, ते झपाटून टाकणारे आहे, आश्चर्य करायला लावणारे आहे. जे जे म्हणून आज या समाजव्यवस्थेत मान्यता पावलेले आहे ते ते तुझ्यातील ‘त्या'मुळे झुगारले जात आहे. शक्यतेच्या मर्यादा तुझ्यामुळे विस्तारत आहेत. हे अर्धवट सोडू नकोस'...

संघटित पक्षाचे आणि त्यांच्या नेत्यांचे डोळे आता हळूहळू उघडत होते पोलिसांच्या अत्याचारामुळे सर्वसामान्य फ्रेंच नागरीक विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखविण्यासाठी आसुसला होता. आता जागलो नाही तर 'क्रांती' ची आपली बस चुकेल, आपल्याला बाजूस फेकून ही लोकगंगा कदाचित् पुढे उसळत निघून जाईल या भयाने आता सगळेच पक्ष, सगळ्या संघटना-डाव्या, अतिडाव्या, अधल्या-मधल्या-अहमहमिकेने पुढे सरसावल्या. १३ मेला पॅरीस शहरातून पाच लाखांचा प्रचंड मोर्चा निघाला. त्यात हे सगळे पक्ष, सर्व संघटना सामील झाल्या होत्या. यात मेंडेस फ्रान्स होते, मिटेरँड होते, वॉल्डॅक रोचेट होते, काही गॉलवादीही होते. पण गाजत गर्जत होते, डरकाळ्या फोडीत चालले होते. विशी-पंचविशितले नवे चित्ते, नवे छावे. चाळीस चाळीसच्या रांगात, हातात काळे, लाल, दुरंगी, तिरंगी-सर्व प्रकारचे झेंडे नाचवीत, International हे प्रसिद्ध क्रांतिगीत गातगात, मुठी फेकीत, 'गॉल चालते व्हा, म्युझियममध्ये बसा' अशा घोषणा देत ही अक्राळविक्राळ लोकगंगा जेव्हा पॅरीसच्या राजपथावरून फेसाळत-फुसाटत धावू लागली तेव्हा दोनशे वर्षापूर्वीच्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या दिवसांची जाणत्यांना आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. कुठल्याच जुन्या साच्यात ही क्रांती, हा उठाव बसू शकत नव्हता, कुठल्याच क्रांतिशास्त्राचा याला आधार सापडत नव्हता. सारेच नवे, सारेच उन्मादक - 'Youngest, most dynamic' - 'अत्यंत जोषपूर्ण अत्यंत वेगवान' अशी या मोर्च्याची वृत्तपत्रांतून वर्णने झळकली. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच पॅरीस शहराला असा चैतन्याचा स्पर्श होत होता. पाच लाखांचा मोर्चा पाच तास सतत वहात होता, एकही पोलीस बंदोबस्तासाठी ठेवला गेला नव्हता, तरीही अनुचित प्रकार घडला नाही याची सर्व निरीक्षकांनी आवर्जून नोंद केली आहे.

तीन मेला सुरू झालेल्या आंदोलनाचे पहिले विद्यार्थीपर्व कामगारांनी व सर्वसामान्य जनतेने असे पुढे झेलत नेले आणि हे असेच पुढे पुढे गेले तर आवरता आवरणे कठीण होईल, म्हणून राज्यकर्त्यांनी नमते घेण्याचे ठरविले. आपले परदेशदौरे अर्धवट सोडून पंतप्रधान पाँपेदू, अध्यक्ष द गॉल पॅरीसमध्ये वाटाघाटींसाठी दाखल झाले. ‘डॅनी दि रेड' जर्मनीमध्ये हद्दपार केला गेला होता, तो जंगलातून वाट काढीत, आपले लाल केस काळेभोर करून, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ्रान्समध्ये उगवला, तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला, बंद करण्यात आलेली कॉलेजे, विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याची तयारी दाखविण्यात आली, अटक झालेल्या विद्यार्थ्यांची बिनशर्त सुटका झाली, ‘वाटाघाटींसाठी या' असे कामगार संघटनांना आवाहन केले गेले. तरी वणवा भडकायचा तो भडकलाच. विद्यापीठे बंद पडली, तसे आता कारखाने बंद पडू लागले. पहिली काडी ओढली नाँतिस (Nantes) येथील दोन हजार कामगारांनी. पोलिसांनी आत प्रवेश करू नये म्हणून त्यांनी कारखान्याची प्रवेशद्वारे वेल्डिग करून पक्की बंद करून टाकली. व्यवस्थापकाला ओलीस म्हणून कोंडून ठेवले. कामगारांची मागणी अर्थात पगारवाढीची. पाठोपाठ सरकारी मालकीचा रेनॉल्ट हा मोटार कारखानासमूह थंडावला-कामगारसंख्या दहा हजार ! As Renault goes, working class go-' 'रेनॉल्ट पुढे कामगार मागे' अशी या कारखानासमूहाची ख्याती आहे. भराभर हे लोण इतरत्र पसरले. कुठे कुठे कामगारांनी कारखानेच ताब्यात घेतले. रेल्वे, बसवाहतूक थंडावली. विमानांची घरघर थांबली, बंदरावरची धावपळ संपली. शस्त्रास्त्रनिर्मितीचे कारखानेही संपात सामील झाले. एकूण दोन कोटी कामगारसंख्येपैकी जवळजवळ निम्मी संख्या संपावर होती. बँकांचे व्यवहार आखडले. परदेशी बँकांवर ताण पडला. अपंगावर, वृद्धांवर उपासमारीची पाळी आली. पेट्रोलचा तुटवडा जाणवू लागला. रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग मजल्यांएवढे उंच चढले. शेतकरीही मागे राहिला नाही-रस्त्यात ट्रॅक्टर्स उभे करून त्याने ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण करून ठेवले. शिक्षणसंघटनांनी पाठिंबा व्यक्त कला-शाळा बंद पडल्या. पॅरीसच्या 'नाईट क्लब्स' चे रंगही वितळले-आम्ही अंगप्रत्यंगप्रदर्शन करणार नाही, असे त्या नर्तिकांनी जाहीर केले. कलावंत, चित्रकार सारेच या वावटळीत ओढले गेले-नाट्य चित्रपटगृहे ओस पडली. सरकारी मालकीचे बाराशे आसनांचे ' ओडियन' थिएटर तर विद्यार्थ्यांच्या ताब्यातच होते व तेथे विद्यार्थीचर्चांचा आणि वादसभांचा आखाडा चोवीस तास घुमत होत. विषयः ‘समृद्धीची भूल' किंवा असेच दुसरे कोणतेतरी.

कामगार-किसान-शिक्षक-कलावंतांच्या असहकारामुळे साऱ्या फ्रान्सच्या नाड्या अशा आवळल्या गेल्या असल्या आणि गॉल सरकारला नाक मुठीत धरून वाटाघाटींच्या मेजावर यावे लागले असले तरी विद्यार्थी आपली आघाडी सोडायला काही तयार नव्हते.

-लिअॉन्स येथे एका पोलीस कमिशनरच्या अंगावर दगडाने भरलेला ट्रक घालून विद्यार्थ्यांनी त्याला ठार केला.

-भांडवलशाहीचे प्रतीक असलेल्या पॅरीसच्या शेअर बाजारावर हल्ला चढवून विद्यार्थ्यांनी तेथे जाळपोळ केली.

-फ्रेंच सेनेटरवर बाँब्स फेकले.

-कामगारवर्गाने साथ द्यावी म्हणून विद्यार्थ्याच्या झुंडी काही कारखान्यांपर्यंत चालत गेल्या.

कामगारांनी साथ दिली; पण फार सावधपणे. 'आमच्यात लुडबुड करू नका' अशा काही ठिकाणी कामगारांकडून विद्यार्थ्यांना कानपिचक्याही मिळाल्या. 'अती जहाल विद्यार्थीचळवळींपासून दूर रहा' असे कामगारनेत्यांकडून आदेशही सुटले. 'स्टॅलीनचे संधीसाधू बगलबच्चे' हा घरचा आहेर विद्यार्थ्यांनीही इमानेइतबारे कामगारनेत्यांपर्यंत पोचविला.

अहोरात्र मंत्रिमंडळाच्या बैठका चालू होत्या. कामगार नेते आणि पाँपेदू मंत्रिमंडळ यांच्या वाटाघाटी संपतच नव्हत्या. पंचवीस मेला अखेरीस उभयपक्षी मान्य झालेली तडजोड कामगारांच्या गळी उतरविण्यासाठी सी. जी. टी. या प्रचंड कम्युनिस्ट संघटनेचे नेते जॉर्ज सेगू बिलिनकोर्ट येथील रेनॉल्ट कारखान्याकडे धावले. पण कामगार नमायला तयार नव्हते. संध्याकाळच्या पन्नास हजारांच्या विद्यार्थी-कामगारांच्या संयुक्त सभेत 'द गॉल चालते व्हा' बरोबर 'सेगू चालते व्हा, विश्वासघात करू नका' अशा घोषणा दुमदुमल्या तेव्हा सगळ्यांचीच डोकी गरगरायला लागली. दहा लाख सभासदसंख्या असलेल्या कामगार संघटनेच्या नेत्याची यावेळची ही अवस्था पाहून एक समाजवादी विचाराचा स्तंभलेखक आपल्या समाजवादी विचारसरणीच्या साप्ताहिकात लिहितो, 'It was a most pathetic sight, most pathetic-ते दृश्य फार केविलवाणे होते, फार केविलवाणे.' विद्यार्थ्यांना काय हवे ते कामगारांना कळत नव्हते, कामगारनेते कामगारांना समजू शकत नव्हते, द गॉलची राजवट तर साऱ्या फ्रेंच जनतेपासून दूर दूर गेली होती. इकडे कम्युनिस्ट कामगारसंघटनेचा चिटणीस राजीनामा देत होता. तिकडे द गॉलच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री बाहेर पडत होते. या गदारोळात सगळेच उलथेपालथे होत होते, जवळचे समजले जाणारे दुरावत होते. दूर वाटणाऱ्यात अचानक जवळीक निर्माण होत होती. अखेरचा रामबाण सत्याला स्मरून सुटला. पक्षपाती वार्ता आम्ही प्रसारित करणार नाही,' असे सरकारी मालकीच्या रेडिओ-टेलिव्हिजन कर्मचाऱ्यांनी जाहीर कल्यामुळे द गॉल सरकारची प्रचार आघाडीच कोसळली. चुकीचा मथळा देऊ देण्यास कामगार-कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली म्हणून पॅरीसचे सर्वाधिक खपाचे ‘ला पॅरिशिअन लिबरे' हे प्रभातदैनिक प्रसिद्ध होऊ शकले नाही. आमच्या सदसद्विवेकबुद्धीला क्लेष होतील असे कृत्य करण्याची पाळी आमच्यावर येऊ देऊ नका, असे पोलीस संघटनांनी शासनाला कळविल्यावर तर ही केवळ विद्यार्थ्यांची, कामगारांची, एखाद्या पक्षाची चळवळ नसून समग्र फ्रेंच जनतेचा हा नैतिक उद्रेक आहे, कुठली तरी खोल मानवी व्यथा येथे चित्कारून उठली आहे, बऱ्याच काळ कोंडल्या, दडपल्या गेलेल्या भावनांना ही वाट सापडली आहे. एका राजवटीची ही केवळ मृत्युघंटा नसून पश्चिमेने प्रमाण मानलेली मुल्येच येथे उन्मळून पडत आहेत, हे स्पष्ट झाले. फ्रान्सपूर्वी पश्चिम जर्मनीत हे घडले. फ्रान्सपाठोपाठ स्पेनमध्ये हे घडले. स्वित्झर्लंड, डेन्मार्क, इटली, ब्राझील, अमेरिका, जपान, इजिप्त, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया-कुठे ही लाट उसळायची राहिली आहे !

या लाटेचा अर्थ काय हे समजून घेण्यासाठी आम्ही सगळे बेडेकरांच्या गच्चीवर दोन तास चर्चा करीत होतो.
विद्यार्थी सांगत होते : ' आम्हाला भांडवलशाही नको, कम्युनिझम हवा,' असा या लाटेचा आवाज आहे.

मी म्हणत होतो : ‘डॅनी दि रेड' ज्याला गरुस्थानी मानतो त्याची शिकवण वेगळी आहे. मार्क्युजचे सांगणे आहे- To-day individuals are dominated and manipulated by big institutions of Government and business. Man has the obligation to oppose them'-' आज व्यक्ती ही प्रचंड संघटनांच्या हातचे बाहुले बनली आहे. संघटनांचे व्यक्तिजीवनावरील हे आक्रमण थोपविणे प्रत्येक मनुष्यमात्राचे कर्तव्य आहे.'

डॅनी आणि त्याचे जगभरचे साथी हे कर्तव्य तर बजावीत नसतील ?

*

जून १९६८