श्रीग्रामायन/पोचमपल्लीकडे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
पोचमपल्लीकडे


लांबवरूनच दहाचे टोल ऐकू येत होते. बाजूच्या स्टेशनात गाडी धडधडत शिरत होती. बहुधा सिकंदराबाद एक्सप्रेस. याच गाडीने मी दहा वर्षांपूर्वी ओरिसातील ग्रामदान पहाणीचा माझा दौरा संपवला होता. आताही मी याच चळवळीच्या उगमस्थानाकडे-गंगोत्रीकडे निघालो होतो. 'पहाणी' हा मात्र आता उद्देश नाही. कारण तिथे काय आढळेल याची पूर्वानुभवामुळे स्थूल कल्पना होतीच. आज मी यात्रिक होतो आणि यात्रेकरूने का कुठे काही ‘पहायला' जायचे असते ! त्याने जायचे असते ते भावसमृद्धीसाठी, दृढतेसाठी-जे पहायचे असते ते त्याचेपाशीच असते. भूदानग्रामदान चळवळीमागील मला समजलेला, जाणवलेला भाग 'अंत्योदया' चा आहे. समाजातील अखेरच्या, तळच्या माणसाला स्पर्श करावा, तो वर उचलावा ही या आंदोलनामागील नैतिक प्रेरणा मला भिडते व अविरोधाच्या, सर्वात्मकतेच्या भूमिकेवरून करण्यात आलेली या आंदोलनाची मांडणी माझ्या भारतीय मनाला जवळची वाटते. अखेरच्या माणसाला जाग यावी ही या काळाचीच प्रेरणा आहे. हा आजचा युगविशेष आहे. जो विचार, जे आंदोलन, जो पक्ष, जे राजकारण या प्रेरणेतून उगम पावत नाही, या युगविशेषावर आधारित नाही ते आधुनिक नव्हेच. त्याची नैतिकताही सदैव शंकित आणि शबलित रहाणार आहे. कम्युनिझम (समाजवाद यात आलाच) हा या प्रेरणेचे प्रतिनिधित्व करतो म्हणून तो प्रभावी ठरतो. पुरोगामित्वाच्या नावाखाली कम्युनिझमने भीषण हत्याकांड घडविली असतील, वंचनेची आणि विश्वासघाताची महापापे केली असतील. महापापे फॅसिझमही करतो, कम्युनिझमही करतो. पण कम्युनिझमच्या मुळाशी आधुनिक युगाची, समतेची तलस्पर्शी प्रेरणा जागी असते, फॅसिझमच्या मुळाशी ती नसते, एवढाच काय तो मौलिक, मूलभूत फरक. त्यामुळे इतिहास लेनिनला युगनेता मानतो, क्रांतीचा उद्गाता म्हणून गौरवतो, हिटलरला भस्मासुर ठरवतो. पण हत्याकांडांचा, हिंसेचा, रक्तरंजित संघर्षाचा हा कम्युनिझमचा वारसा टाळून अखेरच्या माणसाला भारतात न्याय मिळवून देता येतो का ! भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या मुळाशी ही भूमिका होती असे मला वाटते. ओरिसात १४०० ग्रामदाने मिळूनही हे आंदोलन का फसले याची सविस्तर चर्चा मी त्या वेळी लिहिलेल्या 'ग्रामदानाची प्रयोगभूमी' या पुस्तकात केली होती. या पुस्तकाचे त्यावेळी खूप स्वागतही झाले. डॉ. धनंजयराव गाडगीळांनी सोळापानी प्रदीर्घ प्रस्तावना लिहून या पुस्तकाच्या यशाला मौलिक हातभार लावला. तर पां. वा. गाडगीळांनी दोन स्वतंत्र अग्रलेख लिहून या पुस्तकाचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसवले. अग्रलेखातील पहिलेच वाक्य असे होते- 'अवघ्या शंभर पानांचे हे पुस्तक असूनही हा एक मराठीतील श्रेष्ठ दर्जाचा ग्रंथ ठरावा एवढी याची योग्यता आहे हे सुरुवातीसच आम्ही सांगून ठेवतो.' अर्थात ही अतिशयोक्ती होती हे उघड आहे. कारण पुस्तकाची योग्यता मी मनोमन जाणून होतो. पण स्तुती कोणाला आवडत नाही ! डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी कळविले होते, 'निबंध उत्कृष्ट झाला आहे. माहिती जमा करण्याची कसोशी, अवलोकन, त्यातून निष्कर्ष काढण्याची बुद्धी–सर्वच गुण यात दिसून येतात. पण याहीपेक्षा स्वतंत्रपणे चिंतन करण्याचे जे सामर्थ्य या लेखात दिसून येते ते विशेष अभिनंदनीय आहे. मला निबंध वाचून अत्यंत आनंद झाला. यातील ‘स्वतंत्र' या शब्दाचा मलाही अत्यंत अभिमान वाटला होता, हे नाकारण्यात काय अर्थ आहे ? 'मौज' ने आठदहा स्तंभ लिहून या पुस्तकाचा परामर्ष घेतला होता, प्रा. ठाकुरदास बंग यांनीही 'साधने'त दोन-तीन लेख तेव्हा या पुस्तकासंबंधी लिहिल्याचे अंधुकसे आठवते. ‘टाईम्स ऑफ इंडिया' मध्ये या एका मराठी पुस्तकावर कॉलमभर परीक्षण यावे याचे तर माझ्यासकट सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता, इतका काळ उलटल्यानंतर हे त्या वेळेचे पुस्तकाचे स्वागत आठवून वृत्तपत्रीय प्रसिद्धीची क्षणिकता तीव्रतेने जाणवते. आणि या क्षेत्रातच आपण गेली दहा वर्षे रमलो ! अजूनही रमत आहोत !

तसे सगळेच क्षणिक असते म्हणा ! तरीही सापेक्षतेने जे चिरंतन आहे असे वाटते त्याचे रहस्य कशात असते ? काळ कोणती अक्षरे विसरतो आणि कोणती जवळ बाळगतो !

काळालाही प्रवाहाच्या मर्यादेतच रहावे लागते.

ज्याला मर्यादा नाही, जे अनंत आहे, अतीत आहे, मुक्त आहे, त्याचा काही सुगंध ज्यांना लाभतो, तीच शब्दपुष्पे काळ आपल्या लाटांवर आनंदाने मिरवीत नेतो काय ?

का त्याचेच संगीत जो गातो, तेच सूर आणि तेच शब्द तो जतन करतो ! ज्ञानेश्वरांचा 'परस्पर्श' की गोंविदाचा पावा ?

अतीताची ओढ की आत्मगानाची आवड ? सत्याचा शोध की सुंदरतेचे ध्यान ?

हा शोध तरी कसा घ्यायचा ?

हे ध्यान तरी कसे करायचे ?

वाट कुणाला पुसायची ?

थकला आहेस ! छेः तसे काही नाही. सकाळपासून चार तास अखंड, एकटा चाललास म्हणून कंटाळला आहेस ! कबूल. स्वाभाविक आहे कंटाळा येणं. कुठेही तोचतोचपणा आला की कंटाळाही येतोच. पण थोडी कळ काढलीस तर ही महानगराची हद्द आता संपतच आली आहे. ती एकदा ओलांड आणि मग कुठेही सावलीखाली थांब. विश्रांतीची तुला गरज आहे. विश्रांतीला तू आता पात्रही आहेस.

महानगरसीमा. शेकडो वेळा गाडीने, मोटारने या मार्गाने पूर्वी प्रवास केला होता. पण याच वेळी या सीमारेषेवर मन असे रेंगाळल्यासारखे का करते आहे ? पायाखालून काहीतरी सुटते आहे, आपण कशाला तरी अंतरतो आहोत, अशी शंका आताच का वाटू लागली ? यापुढचा मार्ग एकट्याचा, बराचसा अनिश्चित. काही प्रमाणात धोक्याचा, म्हणून ही भीती तर उभी राहिली नाही ! पण निदान आजतरी भीतीचे कारण नव्हते. एकवेळची शिदोरी बरोबर घेतलेली आहे. पुढच्या वाटेवर बऱ्यापैकी १-२ हॉटेल्स आहेत आणि रात्रीचा मुक्काम तीस मैलांवर असलेल्या एका ओळखीच्या पेट्रोलपंपावर करायचा हे सकाळी निघताना ठरलेले आहे. धोका, अनिश्चितता आणि त्यातून उद्भवलेली काळजी असली तर ती उद्यापासून वाटायला पाहिजे. आताचा हा थरकांप काही वेगळाच आहे. का सुरक्षित दिनक्रमात बदल होणार ही जाणीव या क्षणी तीव्रतेने झाल्यामुळे आपण अस्वस्थ झालो ? नाही. दिनक्रम बदलेल, बदलावा म्हणून तर आपण मुद्दाम हा वेगळा प्रवास योजला. ही अवस्था अधिक सूक्ष्म दिसते. हातचे काहीतरी सुटत असल्याची, पण पळते दृष्टिपथातही आले नसल्याची ही वेदना असावी ? तसे हातचे पूर्ण सुटतही नव्हते. कारण पंधरा-वीस दिवसात, फार तर महिनाभरात मी परतणार होतो. प्रवास जेवढा जमेल, झेपेल, आवडेल तेवढाच पायी होता. शरीराचे अकारण हाल करून घेण्याची मुळीच तयारी नव्हती. पण वीस वर्षे अंगवळणी पडलेली चाकोरी आचारविचारांचा साचा थोडा बदलता आला तर पहावा, प्रयत्नांना काही स्वतंत्र नवी दिशा, वेगळा अर्थ आणि आशय प्राप्त करून देता आल्यास पहावे, हा या पदयात्र मागे जरूर उद्देश होता. निदान तशी प्रेरणा होती. ही प्रेरणा अपुरी राहिली, उद्देश असफल झाला तर ! आपली विघटना थांबवणारी, आपल्या साऱ्या शक्ती केन्द्रीभूत करून आपल्या हालचालीत, प्रयत्नात एक व्यापक सुसंगती निर्माण करणारी, आपल्याला तळापासून वर उचलणारी एखादी जाणीव, एखादे सूत्र, एखादा आधार या पदयात्रेमुळे प्राप्त झाला नाही तर ! तर हा आटापिटा, श्रम वायाच जाणार. नुसती पायपीट होणार. यात्रा निष्फळच ठरणार.

वास्तविक सगळे सुरळित पार पडत गेले असते तर या वेळी मला असे पंधरा-वीस दिवस घराबाहेर काढताही आले नसते. सुप्याच्या 'माणूस प्रतिष्ठान'च्या विहिरीचा उद्घाटन सोहळा याच सुमारास केव्हातरी करण्याचे ठरत होते. पाडवा म्हणा, शिवजयंती म्हणा. पण विहिरीचे काम ठराविक मुदतीत पुरेच होऊ शकले नाही. दिवाळीच्या पाडव्याला कामाला सुरुवात झाली. दोन महिने काम अगदी नेटाने झाले. नाताळाच्या सुटीत विद्यार्थ्यांचा श्रमसप्ताहाचा कार्यक्रम योजला, तोही अपेक्षेपेक्षा जास्तच यशस्वी ठरला. पण पुढे कामाचा वेग मंदावला. कारणे दोन : एक सुरुवातीस लागलेले पाणी बरेचसे आटले व नवीन झरेही लागले नाहीत. त्यामुळे कामावरच्या मजुरांचा, जमिनीच्या मालकमंडळींचा उत्साहही थोडा ओसरला. दोन : शेतीचा हंगाम सुरू झाल्यामुळे विहिरीवर काम करणाऱ्या संचाची पांगापांग झाली. बाहेर अधिक रोजगार मिळत असल्याने माणसे मिळेनाशी झाली. हे काम । ठेकेदाराला देऊन व्याप व त्रास वाचवावा असे सुरुवातीपासूनच अनुभवी लोकांचे म्हणणे होते. पण केवळ विहिर खणून देणे एवढाच ‘प्रतिष्ठान'च्या कार्यामागचा उद्देश नव्हता. अन्नोत्पादन वाढीला हातभार लावण्याबरोबरच छोटा शेतकरी व शेतमजूर यांच्याशी प्रत्यक्ष संबंध यावा, त्यांच्या स्थितीचे आकलन व्हावे, त्यामुळे ग्रामीण जनतेचा व शहरी सुशिक्षितांचा श्रमाचा व बुद्धीचा तुटलेला दुवाही जोडण्यास मदत व्हावी असे अनेक उद्देश या प्रकल्पामागे होते. नाहीतर विद्यार्थ्यांचे तसे महाग ठरलेले शिबिर योजण्याचे काय कारण होते ? विद्यार्थी हौसेने आले, तळमळीने आले, त्यांनी कामही उत्तम केले. पण त्यांच्या येण्याजाण्याचा खर्चच कामाच्या किमतीपेक्षा जास्त होणार, हे उघड दिसत असूनही हा कार्यक्रम योजला, तो, वरील सामाजिक उद्देश डोळ्यांसमोर होते म्हणूनच. हा श्रमसप्ताहाचा कार्यक्रम पूर्ण यशस्वी ठरला याचा एक पुरावा म्हणजे कार्यक्रम संपल्यावर विहिरीवर काम करणाऱ्या अडाणी मजुरांनाही चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले. काही दिवस करमेनासे झाले आणि विद्यार्थ्यांनीही कबुली दिली, ‘काम थ्रिलिंग होते. सुप्याला काहीतरी नवीन पहायला, अनुभवायला मिळाले.'

विहिरीचे काम ठरल्याप्रमाणे पूर्ण झाले असते तर या उन्हाळी सुटीत एखादा वेगळा कार्यक्रम सुपे भागात पुन्हा योजलाही असता; पण वरच्या दोन अडचणींच्या जोडीला तिसरी आणखी अडचण उभी राहिली. वीस-एकवीस फूट खोदाई झाल्यावर खडक इतका कठीण लागू लागला की, तयार गड्यांनाही साध्या सुरुंगाने तो निघेना. मग ब्लास्टिग मशीनची योजना, सरकारी शेतकी खात्याशी संबंध. थोडीफार दिरंगाई. याहीपेक्षा काळजी वाटू लागली अनिश्चित पाणीपुरवठ्याची. एवढे अवघड खोदकाम करून, मूळ ठरलेल्या बजेटपेक्षा खर्च वाढवून, शेवटी विहिरीला पाणी लागणार की नाही ! आणि लागले तरी किती ! किती एकर जमीन या पाण्यावर भिजू शकेल ! हा सगळा परिसरच दुष्काळी. आसपासच्या बऱ्याचशा विहिरी उन्हाळ्यात नेहमीच कोरड्या असतात. मग एकाच विहिरीवर खूप खर्च वाढविणे कितपत योग्य आहे ? त्यापेक्षा छोट्या छोट्या पावसाळी विहिरींची योजना अशा दुष्काळग्रस्त भागासाठी अधिक उपयुक्त ठरणार नाही का ? शेवटचा एक पाऊस झाला नाही तर छोट्या शेतकऱ्याची हातची पिके जातात असा पुणे जिल्ह्यातील या भागाचा नेहमीचा अनुभव. मग पावसाळी विहिरीमुळे तो हे पीक तर वाचवू शकेल ! बारमाही बागाईत नाही तरी उपासमार तर टळेल ! साठवण म्हणून त्याला अशा पावसाच्या पाण्याने भरणान्या छोट्या छोट्या विहिरींचा खूप उपयोग होऊ शकेल असे वाटते ; किंवा दुष्काळी भागाच्या पाण्याची, जमिनीची शास्त्रशुद्ध पहाणी करून या भागासाठी योग्य अशी काही वृक्षयोजनाही आखता येईल. या वृक्षारोपणासाठी व संवर्धनासाठी अवश्य असणारा पाण्याचा साठा म्हणूनही या छोट्या पावसाळी विहिरी चांगले काम देऊ शकतील. असे अनेक पर्याय 'प्रतिष्ठान' च्या विहिरीच्या कामाच्या अनुषंगाने डोळ्यासमोर येतात. यावर साकल्याने, सातत्याने विचार व्हायला हवा, विधायक चळवळच यासाठी उभारावी लागेल. नाहीतर दर दोन वर्षाआड एक वर्ष दुष्काळाचे उजाडते, सरकार घाईघाईने दुष्काळी कामे काढते, ती वर्ष-सहा महिन्यातच वाहून जातात, पुन्हा दुष्काळपुन्हा कामे-हे चक्र काही थांबत नाही. तात्पुरत्या उपायांनी व दुष्काळ पडल्यावर केलेल्या आरडाओरडीने हा प्रश्न कधीही सुटणार नाही. दुष्काळ कायमचा हटविण्याची प्रतिज्ञा हवी, क्षेत्रनियोजनाची व्यापक शास्त्रीय दृष्टी हवी आणि लोकमतांचा पाठिंबा हवा, तरच महाराष्ट्राच्या व देशाच्याही पाचवीला पुजलेला दुष्काळाचा प्रश्न दहा-पंधरा वर्षात निकालात निघेल. सुपे-विभागाचे असे नियोजन होऊ शकेल का ? हा विचार तेथील काही कार्यकत्र्यांसमोर बोलून ठेवला आहे. 'माणूस प्रतिष्ठान'च्या एकट्याच्या बळावर हे कार्य होणे अर्थातच अशक्य आहे. पण या कार्याला महत्त्व देणाऱ्या काही खासगी किंवा निमसरकारी संस्थांनी एकत्र येऊन, सरकारशी विचारविनियम करून असे क्षेत्रसंयोजनाचे प्रयोग हाती घेणे निकडीचे आहे, असे जरूर वाटते. 'माणूस प्रतिष्ठान' यातील आपला वाटा उचलायला केव्हाही सिद्धच आहे.

ग्रा...४ पण या पुढच्या गोष्टी आहेत. तूर्त हाती घेतलेले विहिरीचे काम पूर्ण करणे, निदान पावसाळी विहिरीचे उद्दिष्ट गाठणे अवश्य आहे. पंचवीस फूट खोल विहीर खणून झालीच आहे. या पावसाळ्यात एवढ्या साठवणाने गरज भागते असे दिसून आले तर उत्तमच. साठा कमी पडतो असे वाटले तर पावसाळ्यानंतर पुन्हा काम सुरू करता येईल. कुठे थांबायचे यासाठी तज्ज्ञ आहेतच. शिवाय 'प्रतिष्ठान'चे या विहिरीसाठी ठरलेले बजेटही . !

आता प्रश्न आहे ‘माणूस प्रतिष्ठान'चा. या पावसाळ्याअखेरचा-येत्या चार महिन्यातला-कार्यक्रम काय ! सुप्याला काम नाही, मग जिकडे काम आहे, सुप्याच्या धर्तीचेच काम आहे, तिकडे 'माणूस प्रतिष्ठान' आपला मोर्चा का वळवीत नाही ? 'माणूस'च्या असंख्य वाचकांनी बिहारचा निर्देश केला आहे. 'माणूस प्रतिष्ठान' ने आपल्या शक्तीच्या प्रमाणात या तातडीच्या व निकडीच्या कार्यातील आपला वाटा उचलावा अशी आग्रहाची सूचना करणारी अनेक पत्रे गेल्या काही दिवसात 'माणूस' कडे येत होती. पण एकंदर बिहारसाठी लागणाऱ्या किमान निधीच्या मानाने सुप्याच्या विहिरीचा खर्च भागवून शिल्लक रहाणारा 'माणूस प्रतिष्ठान' चा निधी अगदीच किरकोळ आहे. वाचकांना व सर्वसामान्य जनतेला आवाहन करून 'माणूस प्रतिष्ठान'कडे देणगी वा मदतरूपाने नवा निधी गोळा करावा तर या सार्वजनिक पैशाचा किमान हिशेब वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी लागणारी कार्यालयीन यंत्रणा ‘माणूस' कडे नाही. अशा अवस्थेत हा निधी उभा करण्याची व बिहारसाठी त्याचा व्यय करण्याची अवघड जोखीम 'माणूस'ने स्वीकारावी की नाही, यावर कार्यालयात बरीच भवती न भवती सुरू होती. सर्वांच्या आधी, आपला खास प्रतिनिधी पाठवून 'माणूस'ने बिहारविषयीचे आपले वृत्तपत्रीय प्राथमिक कर्तव्य पार पाडलेले होतेऱ्याबद्दल कौतुकादराची शेकडो पत्रे वाचकांकडून आलेली होती. अधिक जबाबदारी उचलावी की नाही याबाबत मतभेद होते. मधूनच सुप्याच्या श्रमसप्ताहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून निरोपही येत होते, 'उन्हाळ्याच्या सुटीसाठी काय कार्यक्रम योजता आहात ! बिहार दुष्काळ निवारणासाठी काही काम करण्याची इच्छा आहे. परीक्षा संपल्याबरोबर येतो आहोत.'

पंचाईत होती ! युवकांची शक्ती संयोजित करणे किती अवघड असते याचा थोडा फार अनुभव श्रमसप्ताहात घेतलेला होता. त्यांच्या उसळत्या रक्ताला, साहसी वृत्तीला वाव राहील असा कार्यक्रम हवा. त्यांच्या स्वाभाविक चंचलतेने कार्यहानी होणार नाही याकडे पहावे लागते. वातावरण आनंदी हवे. शेवटपर्यंत सर्वांचा उत्साह टिकून राहिला पाहिजे. बिहार लांब आहे तोवर ठीक. तेथे गेल्यावर भाषेची अडचण जाणवेल, हवामान सोसवणार नाही, किमान स्वच्छता राखता, येणार नाही, खाण्याचेच काय, पिण्याच्या पाण्याचेही हाल होतील ! ओरिसात ग्रामदान पुनिनर्माण कार्यासाठी देशातील विविध भागातून जमलेल्या शेकडो ध्येयवादी पदवीधर तरुण कार्यकत्र्याची मानसिक अवस्था मी जवळून पाहिली होती. केवढी उच्च स्वप्ने उराशी बाळगून ते तेथे आले होते. आणि महिनाभरातच तेथील गोंधळाला कंटाळून पार मरगळून गेले बिचारे ! तशीच अवस्था आपल्या विद्यार्थ्यांची होऊ नये ! कारण छायाचित्रे पाहून व वर्णने वाचून दुष्काळाचे एक भयानक भेसूर चित्र कल्पनेने रेखाटलेले असेल व विहारात गेल्यावर यांना उघड्या डोळ्यांना प्रथम वस्तुस्थिती दिसेल ती धान्याच्या काळ्या बाजाराची, राजकारण्यांच्या सत्तास्पर्धेची, सुशिक्षितांच्या उदासीनतेची, विद्याथ्र्यांच्या दंगलखोरीची, शहरातल्या चैनबाजीची. ' माणूस 'मधील वार्तापत्रे वाचल्यावर बिहारमध्ये 'पहाणी' करून आलेले एक नामवंत पत्रकार मला म्हणाले देखील, तुमच्या प्रतिनिधीने लिहिले आहे, तेवढा दुष्काळ मला काही कुठे दिसला नाही. बरोबरच आहे. सुखसोयी असणाऱ्या ठिकाणी आरामशीर वाहनातूनच त्यांनी प्रवास केला तर दुष्काळ त्यांना दिसणार कसा ? दोन्हीही चित्रे वास्तवतेला धरूनच आहेत. चैन, काळाबाजार, आळस, सत्तास्पर्धाही आहे आणि भूक-भूक-भूकही आहे. कार्यकर्ता केवळ भूकनिवारण कार्याला जातो, त्याला हे दुसरे काळे चित्र पाहून हादरा बसतो. कशासाठी आपण जीव धोक्यात घालून, हालअपेष्टा सोसत येथे राबायचे? असा त्याला प्रश्न पडतो आणि निराश होऊन, बधीर होऊन, संशयात्मा बनून तो परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. आपल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाची अशी परवड होऊ नये, त्यांच्या शक्तीचा असा अपव्यय, त्यांच्या भावनांचा असा अनादर आपल्याकडून होऊ नये, अशीही टोचणी होतीच.

पण महिन्याभराचा अवधी होता विचार करायला. पहिल्या आठवड्यात विद्यार्थी मोकळे होणार ! तोपर्यंत जरा भटकून तर येऊ ! ‘माणूस प्रतिष्ठान'च्या उद्दिष्टांशी सुसंगत व युवकांना प्रेरक असा एखादा कार्यक्रम योजता आला तर उत्तमच ! नाहीतर आपले ' अपरोक्ष' काम चालू आहे तेवढ्यावरच तूर्त समाधान !

अरे हो हो हो ! पण ही गाडी चालली आहे कुठे ? महानगराची सीमा कुठे, ‘माणूस प्रतिष्ठान' कुठे, बिहार कुठे, विद्यार्थी कुठे ? आता ही थांबलेली बरी. शिदोरीची वेळ झाली आहे. उजव्या हाताला शेतात, रस्त्याच्या कडेला विहीरही आहे. फक्त समोरून येणाच्या मुलाला विचारून घेऊ, या विहिरीचे पाणी पिण्यासाठी कसे आहे !

घर सोडल्यापासून उच्चारलेले पहिले शब्द ! साडेचार तासांचे मौन...पण यावेळी कोंडल्यासारखे मुळीच वाटले नाही...।

ज्या मातीच्या जागरणासाठी सर्वांचा आज एवढा आटापिटा सुरू आहे, निदान असला पाहिजे, तिचा प्रत्यक्ष स्पर्श, अंगसंग इतका खुपणारा, रुतणारा असावा ? जिला माता म्हणून एवढया भक्तिभावाने वंदिले जाते ती वास्तवात एवढी कडवट, एवढी जाडीभरडी वाटावी ? हिला मातृत्व केव्हा व कसे प्राप्त झाले ? सर्वच मानवांना, सर्व कालात ही सारखीच पवित्र वाटत आली आहे काय ? आज इथे तर उद्या तिथे भटकणाऱ्या लमाणांच्या तांड्यांना जमीन ही ‘काळी आई' वाटते का ? आदिवासी समाजाची जमिनीकडे पहाण्याची भावना वेगळीच असते असे त्या समाजाचा विशेष अभ्यास केलेले लोक सांगतात. का मानवी समाज भटक्या टोळ्यांच्या अवस्थेतून शेतीवाडीच्या अवस्थेत उत्क्रांत झाल्यानंतरच भूमी ही त्याला देवतास्वरूप भासू लागते आणि कृषिसंस्कृतीच्या अस्तानंतर ही भावना लोप पावते ? उद्या वैज्ञानिक प्रगतीमुळे अवश्य ते अन्नपाणी समुद्रातून किंवा केवळ वातावरणातूनच मनुष्यमात्राला उपलब्ध होऊ शकले किंवा अन्य काही मार्गाने भुकेचा परिहार झाला तर आज जसे आकाशाकडे आपण पाहातो, तसेच जमिनीकडेही पाहू लागू काय ? वेदातला ऋषी म्हणतो, 'माता भूमी, पुत्रोऽहं पृथिव्या '_' भूमी माझी माता आहे, मी तिचा पुत्र आहे.' आपण 'वंदे मातरम्' म्हणतो. पण आपल्या केवळ पादस्पर्शाने ती अवमानित होईल, दुखावेल, म्हणून वेदातील ऋषी प्रातःकाळी उठल्याउठल्याच क्षमस्व मे ! क्षमस्व मे ! म्हणून जिला विनम्रभावे वंदन करतो ती माता पृथ्वी आणि रिपुदलसंहारार्थ जिला आपण सभासभातून आवाहन करतो ती सुजला, सुफला, माता भारती–मातृत्वकल्पना समान असली तरी आशय किती भिन्न आहे ! प्राचीन काळची ती विशाल कल्पना आधुनिक काळात अशा लहान रूपात का प्रकट व्हावी ? ही सगुणरूपे लहानमोठी का होतात, का बदलत असतात ?

प्रहर उलटला होता. उठावेसे वाटत नव्हते पण उठणे भाग होते. कितीही वेग घेतला असता तरी तीस मैलांचे सकाळी ठरवलेले उद्दिष्ट यापुढे गाठणे शक्य नव्हते. निदान वीस मैलांवरचे ठिकाण तरी गाठावे म्हणून चाल सुरू केली होती; पण वेग हळू हळू मंदावतच होता. ठणका वाढत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांचे कुतूहलही सकाळपेक्षा वाढले होते, कारण पोशाखात आणखीनच क्रांती घडली होती. डोक्यावर उन्हाळी टोपी चढली होती. डोळ्यांवर गॉगल होता, बुशकोट निघाला होता-कुणी हौशी अमेरिकन टीनएजर ! रंग फक्त खास भारतीय ! माझा खिसा चांगलाच गरम असणार या कल्पनेने एक इसम चहासाठी पैसे मागून मागून दमला: पण मला काही पाझर फुटला नाही. शेवटी त्याची सहानुभूती जागी झाली व ' निर्वासित का ? कुठून निघालात ?' अशी त्यानेच मला पृच्छा केली. मी 'हो' म्हटले आणि ब्याद कटवली. वेग आणखीनच मंदावला. वीस मैलांचा मुक्कामही दूरचा वाटू लागला. निदान वाटेवरची एखादी बऱ्यापैकी वस्ती तरी ! नाही. एकदमच हातपाय गळाले. जिवाची तगमग सुरू झाली. असे एकदमच त्राण का जावे ? ऊन बाधले का ? ज्या वेळात घरी आपण आरामात वर्तमानपत्रे वाचीत लोळत पडायचे त्या वेळी आपण भर ऊन्हातून चालत राहिलो हे चुकले का ? कुणास ठाऊक. आपल्याकडे यावर गोळी वगैरे काही नाही, औषध नाही. थांबले पाहिजे. जेमतेम रस्त्याच्या कडेला लागलो. बांध ओलांडून पलीकडे शेतात जाणेही अशक्य झाले. दिले उंचवट्यावरच अंग झोकून. एवढेच पाहिले की, हाकेच्या अंतरावर एक-दोन माणसे शेतात काम करताहेत, पलीकडे दोन खोपटी आहेत, विहीरही असावी. रात्र काढायचीच झाली तर अगदीच चिटपाखरांच्या संगतीत नको.

लोळणच घ्यावी लागावी एवढी उलघाल झाली होती ! आठवले. राजगडावरचा आचार्य भागवतांचा शेतीप्रयोग पहायला गेलो होतो तेव्हा ऊन्हाने असाच कलमललो होतो. कोलमडलो होतो. खरोखर भागवतांच्या प्रयोगाचा अधिक विचार आणि विस्तार का होत नाही ? त्यांना संपूर्ण वेड्यात काढणारे जाणकार मला भेटलेले आहेत, त्यांना लाभलेली तज्ज्ञांची प्रशस्तीही मी पाहिलेली आहे. पावसाचे पाणी वाहू जाऊ न देता जमिनीत मुरवून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे हा जर भागवतांच्या प्रयोगाचा मुख्य आशय असेल तर त्यावर अधिक संशोधन का होऊ नये ? बर्वे समितीचा अहवाल सांगतो की, आहे ते पाण्याचे सर्व साठे उपयोगात आणले तरी महाराष्ट्रातील फक्त तेवीस टक्के जमिनीला पाणीपुरवठा होऊ शकेल. म्हणजे आपला मुख्य प्रश्न कोरडवाहू शेती पिकवणे हाच आहे. धरणे, कालवे यांच्यामुळे होते आहे असे की, ८० टक्के कोरडवाहू शेतीत काहीच प्रगती नाही आणि ऊसाच्या, तंबाखूच्या व इतर नगदी पिकांच्या बागायती मात्र विषमतेची साक्ष पटवीत अधून मधून वर येतात ! कोरडवाहू दुर्लक्षितच राहते. आणि हा कोरडवाहूचा मुख्य प्रश्न पावसाच्या पाण्यालाच साठवून, मुरवून ठेवण्याच्या चळवळी हाती घेतल्याशिवाय अन्य कशाने सुटेल असे वाटत नाही. बांधबंदिस्ती, वृक्षारोपण या चळवळी सुटीत विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांच्या मदतीने हाती घेण्यास खूप वाव आहे. एरवी गाव उदासीन असते. पण अशी बाहेरून कुमक आली, ताजे विचार आले, नव्या प्रेरणा आल्या तर गावकऱ्यांची साथही मिळते, असा बहुतेक ठिकाणचा अनुभव आहे. सरकारी यंत्रणा नेमकी येथेच अपुरी पडते. योजना चांगल्या असतात, अधिकारीही कित्येकदा प्रामाणिक असतात. पण सारा व्यवहार निर्जीव असतो. गावाचे मन प्रथम तयार करण्याचे, आपलेसे करण्याचे महत्त्व पटलेले नसते, पटले तरी सरकारी चाकोरीतून तसा प्रयत्न करण्यास फारसा वावही नसतो. म्हणून कित्येकदा असे वाटते की, हे काम आता खाजगी संस्थांनी, वजनदार व्यक्तींनी हौस आणि गरज म्हणूनही हाती का घेऊ नये ? सरकारने अवश्य ते सर्व सहाय्य, सामग्री तत्परतेने पुरवावी. थोडेफार नियंत्रणही असावे. पण उभारणीची जबाबदारी समाजातल्या इतर सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक संस्थांवर टाकण्याचा प्रयोग जरूर करून पहावा. कोल्हापूरला कुठल्यातरी एका कॉलेजने विद्याथ्र्यांच्या मदतीने गेल्या काही वर्षांपासून नवीन जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयोग चालवला आहे, असे वर्तमानपत्रात वाचल्याचे आठवते. हा प्रयोग पहायचा, हेही ठरले. योग अद्याप आला नाही एवढेच. असे प्रयोग इतरत्र व्हायला काय हरकत आहे ? नाही तरी एन्. सी. सी. वर नऊशे कोटी रुपये खर्च केले आणि ते पाण्यात गेले असे होतेच. शिक्षणसंस्थांनी काळाची गरज ओळखून, फारशी सक्ती न करता जेवढे विद्यार्थी आपणहून तयार होतील त्यांच्या मदतीने, गावकऱ्यांना बरोबर घेऊन असे शेतीविकासाचे प्रयोग करण्यासारखे आहेत. सगळ्यांसाठी सुंदर अशी कोणतीच योजना नसते. पण सक्तीने चांगल्या योजनांचेही मातेरे होते असा अनुभव आहे. म्हणून शक्यतो भर स्वयंप्रेरणेवर हवा, गुणवत्तेवर हवा. काम लहान का मोठे रहाते हा प्रश्न गौण समजला जावा. शास्त्रशुद्ध, टिकाऊ आणि काम करणाऱ्याच्या शक्तीबुद्धीचा विकास साधणे, हे उद्दिष्टच हवे. भले चार गोष्टी कमी होतील; पण, होतील त्यांचा अभिमान बाळगता आला, त्यापासून इतरांना प्रेरणा लाभली तरी खूप साधले.

शिक्षणसंस्थांप्रमाणेच सामाजिक कार्याची हौस असणारे उद्योगपती-कारखानदारही प्रयोगक्षेत्रे उभारू शकतात ! एकमेकांची तुलना, स्पर्धा, देवाण-घेवाण होईल. जरा काही नवे रक्त या क्षेत्रात सळसळू लागेल. विकासाची सर्व जबाबदारी सरकारने स्वतःच्या एकट्याच्या शिरावर घेऊन, या योजनांद्वारे, समाजाच्या मानसिक सामर्थ्याची किती कोंडी करून टाकली आहे ! ज्यात समाज माझ्यासारखा असा लोळागोळा होऊन निपचित पडतो त्याला म्हणायचे मात्र समाजवादी नियोजन ! समाजवादी का सरकारी ? समाजवाद वेगवेगळ्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळ्या मार्गानी, वेगवेगळ्या प्रकारांनी आणण्याची दृष्टी अधिक वास्तववादी ठरणार नाही काय ! आमच्या समाजवादाच्या कल्पना रशियन ठोकळयावरून बनलेल्या आहेत. हे ठोकळयांचे आकर्षण केव्हा संपणार ! आम्ही स्वतंत्र विचार, स्वतंत्र मार्ग केव्हा पत्करणार !

थोरामोठ्यांच्या विचारांवरही या परकीय आदर्शाचा पगडा ! 'माणूस प्रतिष्ठान'चा सूपे-प्रयोग सुरू झाला. स. गो. बर्वे यांचे तिकडे लक्ष गेले. मुंबईच्या निवडणुकीच्या धामधमीतही थोडा वेळ काढून यासंबंधी त्यांनी आस्थेने चौकशी केली, त्यामागील भावनेचा आदर केला. पण सल्ला असा दिला, की ' ही कामे करायला सरकार आहे, तुम्ही कशाला निष्कारण तुमची आधीच तुटपुंजी असलेली आर्थिक शक्ती या कामासाठी खर्च करता ?' मला त्यांच्याशी यासंबंधी सविस्तर चर्चा करायची होती. नियोजनविषयक त्यांच्या खोल व्यासंगाचा माझ्या विचारांशी, अनुभवांशी ताळमेळ बघायचा होता. सारी सत्ता आणि मत्ता जर सरकारजवळ आहे तर पंचवार्षिक योजना अपेशी का ? जनतेचे पाठबळ नाही म्हणून सरकारने खंतावण्याचे कारण काय ? जनतेच्या पाठबळाशिवाय योजना यशस्वी होत नाहीत हे एकदा ध्यानात आल्यावर, हे पाठबळ मिळविण्याची काय सोय केलीत ? चीनमध्ये जनतेच्या आदरास व विश्वासास पात्र ठरलेला कम्युनिस्ट पक्ष होता म्हणून हा जनतेच्या पाठबळाचा प्रश्न तेथे सहज सुटला. रशियात सर्वच विकास सरकारने करण्याची पूर्वापारची परंपरा होती. तेथे भांडवलशाहीदेखील झारने आणलेली आहे. इंग्लंडअमेरिकेप्रमाणे काही धाडसी, कल्पक व कष्टाळू व्यक्तींच्या स्वयंप्रेरित धडपडीतून ती विकास पावलेली नाही. आपल्याकडे या देशांच्या लोकशाहीच्या कल्पना रुजवण्याचा एकीकडे प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे आर्थिक क्षेत्रात मात्र रशियाचे तंत्र उचलायचे, हे कसे जमणार ? इथे जनमानस विचारात न घेता केलेले नियोजन कसे यशस्वी होणार ?

हे सगळे मला बर्व्यांशी नीट बोलायचे होते. पण हा सुजन आता आपल्यात नाही, तेव्हा काय बोलणार ?

हा सुजन पुरंदऱ्यांच्या शिवचरित्राचा एक चहाता होता. 'It's a character building book' हे बर्वे यांच्या तोंडचे शब्द. घरोघर हा ग्रंथ जावा ही यांची तीव्र इच्छा. महाराष्ट्र शासनाने या ग्रंथाची स्वस्त आवृती काढावी यासाठी बर्वे यांनी खटपटही केली; पण यांचेच झाले थोडे आणि त्यात हे शिवचरित्राचे घोडे ! ते दिल्लीला गेले, इतर कुणालाच आस्था दिसली नाही, आम्हीही नसलेली आस्था निर्माण करण्याची पर्वा बाळगली नाही आणि अशा रीतीने शिवचरित्राच्या स्वस्त आवृती योजनेची इतिश्री झाली. पण छत्रपतींच्या पुण्याईवर, नावावर राज्य करणाऱ्या शासनात छत्रपतींच्या चरित्र-चारित्र्यप्रसारकार्यासाठी खटपट करणारा बर्वे हा एकच मंत्री निघावा, इतरांनी दरबारी देखावे करावेत, हा एक लक्षात राहिलेला अनुभव आहे.

हा सुजन मुंबईच्या निवडणुकीत मेनन यांचे विरूद्ध निवडून यावा असे आपल्याला जरूर वाटत होते. पण मेनन कम्युनिस्ट आहेत ही बर्वे यांची भूमिका 'माणूस'ला साफ नामंजूर होती. ज्या लोकशाही समाजवादाचे पाईक म्हणून बर्वे निवडणूक लढवीत होते तीच मेनन यांची विचारसरणी होती. फक्त मेनन यांची उपयुक्तता नेहरूंनंतर व एकदा काँग्रेसचा त्याग केल्यावर संपली आहे, असे आपल्याला वाटत होते. मेनन आता लिहित का नाहीत ? विशेषतः चिनी आक्रमणाबाबत, लंडनमधील भारतीय स्वातंत्र्यचळवळीबाबत, त्यांच्या सहवासात आलेल्या जागतिक कीर्तीच्या व्यक्तींबद्दल, स्वतःबद्दल ! त्यांच्या पार्लमेंटमधील खुर्चीपेक्षा या लिखाणाचा भावी पिढ्यांना अधिक उपयोग होईल.

हा सुजन रसिकही होता. पुरंदऱ्यांनी जेव्हा त्यांना सांगितले की, मस्तानी ही छत्रसालाने बाजीरावाच्या पराक्रमावर फिदा होऊन त्याला नजर केलेली एक खुबसुरत नाची पोर होती, तेव्हा भारताच्या नियोजन मंडळाचा हा सदस्य एकदम उद्गारला, 'नका सांगू बुवा पुरंदरे-हे ऐतिहासिक सत्य असले तरी ! It's a great romantic loss of history.'

पण शेतात काम करणारे हे दोन सुजन आपल्याकडे लक्ष का देत नाहीत ? उठून चालू लागण्यासाठी आपण दोन-तीन वेळा केलेली केविलवाणी धडपड यांनी पाहिली नसेल का ? नाही कशी ? पाहिली असणारच. पण ‘धरतीची लेकरं ' आहेत ही. सहजासहजी विरघळणार आहेत थोडीच ! उलट आपण झिगल्यामुळे झोकांच्या जाऊन या ओहोळात पडलो आहोत अशीच त्यांची समजूत झाली असणार ! आपल्यालाच जावे लागणारा तेथवर हे उघड आहे !

ठरले. ठीक सहावर काटा आला की उठायचे. नक्की !


ठरल्याप्रमाणे घड्याळाचा काटा सहावर आल्याआल्या मी निकराने उठून चालू लागलो होतो. पाच-पन्नास लटपटती पावले टाकून वस्ती गाठली होती. तिथे फक्त दोन म्हाताच्या बायका. पाणी मागितले. वास्तविक हवा होता चहा. रात्रीचे जेवण, झोपण्याची सोय.

विचारपूस चालू होती, सकाळचीच पंचाईत पुन्हा. यात्रेला निघालो इथवर ठीक, पुढे काय ! भूदान काय, गंगोत्री काय, सांगून कळणार तरी काय इथे ? रामेश्वराचे नाव आठवले म्हणून सांगून टाकले. पण ही पायपीट का ? विषय बदलेल म्हणून आणखी एक सबब पुढे केली-आईची इच्छा. चांगलीच अंगलट आली. म्हाताऱ्यांनी जो सुरू केला आहे पट्टा तोंडाचा म्हणता-' असली कसली ही आई ! मुलाला काय हो कहार !' वस्तुस्थिती अशी होती की, मी पायी प्रवास करणार आहे याची आईलाच काय, इतर कुणालाही फारशी कल्पना नव्हती. बोललेले परत घेणे शक्य असते तर ! आपण उगीच खोटे बोललो याची रुखरुख काही केल्या जाईना.
वस्तीवर एकूण तीन खोपटं. एका खोपटाचा मालक आला आणि चहा झाला. रात्री मी इथेच मुक्काम करणार आहे म्हणून सांगून टाकले.
‘प्रवासात जेवणाची काय सोय ?' म्हातारीने विचारले.
‘पैसे देऊन वाटेत भाकरी वगैरे करून घ्यायच्या.' तिने आजच्या रात्रीचे जेवण घालावे व उद्यासाठी दोन-तीन भाकरी बरोबर द्याव्यात म्हणून मी दिलेले सूचक उत्तर.

‘रात्री जेवा आणि पडा. मी येतोच जरा खालून' असे म्हणून मालक जो सायकल घेऊन गेला तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मला दिसलाच नाही.

दुसऱ्या खोपटाचा मालक आला. आल्याआल्या बायकोवर तडकला. नंतर माझी विचारपूस. बायकोला पातळ भाकरी, पिठले टाकण्याचा हुकुम. अंड्याची पोळी वगैरे चालेल का?' म्हणून मला विचारणा. मी पहिल्याच मालकाकडे जेवणार आहे हे सांगितल्यावर हा आग्रह थांबला. या मालकाच्या खोपटाबाहेर पलंग होता. तो स्वच्छ करण्यात आला. आतून गादी-उशी आणून त्यावर टाकण्यात आली. पांघरूण मात्र मला घेववेना. थंडीत काकडणे मी अधिक पसंत केले.

पहिल्या मालकाकडे जेवायला बसलो. यात्रेला निघालेल्याला असा भाकरतुकडा खाऊ घालावा. पुण्य लागतं !'

पहिला घासच तोंडात फिरला. पाण्याबरोबर मी तो कसाबसा गिळला आणि उठलोच.

आवराआवर करून पलंगावर अंग टाकले. दुसऱ्या मालकाने उशाशी ट्रान्झिस्टर आणून ठेवला.

मी चक्रावून गेलो. कडब्याच्या पेंड्या उभ्या करून, वर ताडपत्री टाकून कसेबसे उभे केलेले खोपटे आणि त्यात ट्रान्झिस्टर ?

या मालकाची दोन-अडीच एकर शेती आणि दुधाचा धंदा होता. पाणी मिसळून रोज दोन-तीन रुपये तर आम्ही कमावतोच,' अशी मघाशीच त्याने फुशारकी मारली होती. महिन्याभरावर सोसायटीच्या निवडणुका आल्या होत्या. यात उभे राहून हजार-पंधराशे रुपये खर्च करण्याची याची तयारी होती. ‘पडलो तरी वरच्या लोकांशी संबंध येतो, कामे होतात,' असा निवडणुकांमागचा साधा हिशोब होता. इतका पैसा हाती असताना हा असा खोपटात का राहतो ? याच्या मुलांच्या, बायकोच्या अंगावरचे कपडे इतके फाटके का ? चहा घेतला ते पहिले खोपट यापेक्षा जरा बरे होते. त्या मालकाची बागायती जमीन ८-१० एकरांची होती. ऊस लावणारा हा शेतकरी गुळाचा चहा का पितो ? घरात सायकल आहे, धाकट्या भावाच्या हातात घड्याळ आहे, भाऊ पाच मैलावरच्या गावातील शाळेत शिकतो आहे. तरी पण घर असे का ? शिक्षणाचा, आर्थिक सुबत्तेचा प्रभाव घरा-दारावर, वागण्या-बोलण्यावर का नाही ? हा विकास आहे की केवळ उचल ? सांस्कृतिक प्रबोधनाशिवाय होणारी ही शैक्षणिक व आर्थिक वाढ समाजाला वर नेऊ शकेल काय ? सांस्कृतिक प्रबोधन ही कोणाची जबाबदारी ? आम्ही शहरी सुशिक्षित काय करीत आहोत ? खेड्यात विद्या नाही, शहरात श्रम नाहीत, हा सांधा जुळणार कसा ? जोडणार कोण ? केवळ रहाणीमान वाढण्याचा, वाढविण्याचा हा प्रश्न नाही. ते वाढतेच आहे. खोपटात रेडिओ आहे आणि दुधात पाणी मिसळण्यात संकोचही वाटेनासा झाला आहे. प्रश्न आहे जीवनाचा समग्न स्तरच वर उचलण्याचा. हे कार्य राजसत्ता करू शकते काय ? केवळ उत्पादने साधनांची मालकी बदल की समाजाचा स्तर उंचावतो हा समाजवादी विचार तरी कितपत शास्त्रीय आहे ? मग संपूर्ण राजसत्ता हाती आल्यावर, मालकी हक्कावर आधारित अशी अर्थव्यवस्था नष्ट केल्यावरही माओला चीनमध्ये ‘सांस्कृतिक क्रांती'चे शस्त्र नव्याने पुन्हा का उपसावे लागत आहे ?

खोपट, ट्रान्झिस्टर, लक्तरे, घड्याळ, निवडणुका, शिक्षण......चित्रात कुठलाच सलगपणा जाणवत नव्हता. येथे समृद्धीची आयात दिसत होती; पण ती चिकटवल्या सारखी, उपरी वाटत होती. शिक्षण होते पण त्याचा घरादारावर, वातावरणा प्रभाव नव्हता. रहाणीमानातील वाढ दाखविणारी काही नवीन ठिगळे जुन्या लक्तरांवर लोंबत होती एवढेच. कुठेही आंतरिक सूत्र नव्हते, आतला आणि बाहेरचा मेळ नव्हता. समान पृष्ठभूमी नव्हती. एखाद्या ढासळणाऱ्या ऐतिहासिक बुरुजाला सिमेंट काँक्रीटचा पिलर आधार म्हणून उभा रहावा, पवित्र गाभाऱ्यात विजेची टयूब चकाकावी, ‘सा' नीट जमला नसतानाच कुणी इकडून तिकडून ऐकलेले तानपलटे गळयातून काढीत रहावेत, तसा हा स्वातंत्र्यानंतरचा सारा विकास त्या तीन खोपटांच्या वस्तीत, त्या चांदण्या रात्री मला भेडसावीत होता. विकासाचे हे बेगडी आणि अनुकरणग्रस्त स्वरूप मला अस्वस्थ करीत होते. बेगडीपणा, ही भ्रष्टता आमच्यात कुणी आणली ? याला जबाबदार आम्ही सुशिक्षितच नाही काय ? आमचे समाजातील कार्य काय ? आमच्या अस्तित्वाचा अर्थ कोणता ? चार कथा-कादंबऱ्या-नाटके लिहून लोकांची करमणूक करणे, ज्ञानाच्या नावाखाली शाळाकॉलेजातून, वृत्तपत्रातून, पाठ्यपुस्तकातून माहिती पुरविणे, गाईडे लिहून, क्लास काढून शिक्षणाचे कारखाने चालविणे, एवढेच आमचे इतिकर्तव्य ?वास्तविक अन्वयार्थ सांगण्याची, कार्याकार्य निश्चित करण्याची, समतल वैचारिक पार्श्वभूमी निर्माण करण्याची जबाबदारी समाजातील बुद्धिजीवी वर्गाकडे. पण गेल्या सतरा वर्षांत आमच्यापैकी काही फुटकळ विचारविनिमयावर संतुष्ट राहिले. बहुसंख्येने उदासीनतेचा वा सुखासीनतेचा मार्ग पत्करला. गरज होती मुळापासून हादरण्याची, हलण्याची. एका समग्र आचारविचारदर्शनाची. एक भूदान-ग्रामदान आंदोलनाचा अपवाद सोडला तर स्वातंत्र्यानंतर हे तत्त्वजिज्ञासेचे आणि कर्तव्यात कर्तव्याचे थैमान आमच्यात निर्माणच झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. विनोबांच्या व सर्वोदय सांप्रदायिकांच्या अव्यवहारी आणि अशास्त्रीय मांडणीमुळे आम्ही सुशिक्षित त्या आंदोलनापासून दूर राहिलो आणि नेहरूंच्या लोकशाही समाजवादाचे वरवर गोडवे गात रहाण्यापलीकडे आमच्या ध्येयवादाच्या अपेक्षा आणि कक्षा वाढविण्याची आम्हाला कधीच गरज भासली नाही. सरकारी यंत्रणेने सतरा वर्षांच्या समाजवादी वाटचालीत देशातील मलेरियाचे जसे निर्मूलन केले तसे आम्ही सुशिक्षितांनी फार तर एवढे जरूर केले, की शाळा-कॉलेजांचा व वृत्तपत्र-पुस्तकांचा प्रसार वाढवून ज्ञानाच्या गोणी शहरातून खेड्यांपर्यंत वाहून नेल्या. तेथल्या बऱ्याचशा आळशी आणि निरुद्योगी समाजाला तशी फारशी गरज नसताना, करमणुकीची व छानछोकीपणाची चटक लावली. समाज बऱ्याच प्रमाणात साक्षर केला, सज्ञान आणि सुसंस्कृत नाही. परिषदा आणि परिसंवाद भरवून शुष्क काथ्याकूट कला, विद्वत्तेचे प्रदर्शन मांडले, शिफारशींचे आणि अहवालांचे ढीग रचले; पण जिवंत विचार आणि प्रामाणिक आचार लोकांसमोर ठेवला नाही. करमणूक केली, माहिती पुरवली ; विवेकाचे खडे बोल ऐकवले नाहीत. ज्या काळात एखादा रामदासआणि शिवाजी जन्मास यायला हवा त्या काळात थिल्लर तमासगिरांच्या, शुष्क शास्त्रीपंडितांच्या आणि शून्य बाजीरावांच्या पलटणी येथे उभ्या राहिल्या.

होय ! पेशवाईची अखेर आणि आजचा काळ यात खूपच साम्य आहे. उभी मराठी दौलत इंग्रजांच्या घशात जात असता एका शब्दाने कुणी ब्राह्मणपंडिताने समाजाला जाग आणली नाही. कुचाळक्या करण्यात, अनुष्ठानांची आणि होमहवनांची प्रदर्शने मांडण्यात येथले पांडित्य गढून गेले होते आणि येथील कलावंतांची प्रतिभा बावनखणीतील बाजीरावांच्या रंजनात गुरफटून राहिली होती. 'इंग्रज समुद्रातून येतो' यापलीकडे 'भले बुद्धीचे सागर' असलेल्या नाना फडणीसांचे भूगोलाचे ज्ञान जाऊ शकत नव्हते. आणि गोऱ्यांचे राज्य कलियुगात अटळ असल्याची शिकवण खुद्द पेशव्यांना लहानपणापासून दिली जात होती. इंग्रज सत्तेची मर्मस्थाने हुडकून, ती हस्तगत करून, आपल्या समाजाची प्रतिकारशक्ती व संघटित सामर्थ्य यांची नवा मांडणी करण्याची पुसटती जाणीवही त्या काळात निर्माण झालेली दिसत नाही. तोंड फाटेपर्यंत नव्या राज्यकर्त्यांचे स्तुतिपाठ गाणे, त्यांच्या शिस्तप्रियतेचे कोडकौतुक करणे, त्यांच्या शास्त्रीय शोध-बुद्धीमुळे चकित होणे, ही त्या वेळच्या सुशिक्षित शास्त्रीपंडितांची कामे होऊन बसली होती. इंग्रजांनी आणलेल्या कायद्याच्या राज्यामुळे, चार सुधारणांमुळे हा सारा समाजच भारून गेला होता, दिपून गेला हाता, बावरला होता, बावचळला होता. लाचारी, गुलामी, सुखासीनता, लांगूलचालनाची वृत्ती प्रथम या सुशिक्षित वर्गाने धारण केली आणि इतरेजनांनी नंतर तिचे अनुकरण केले.

आज दुसरे काय चालू आहे ? रशिया-अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला, या परदेशातील ज्ञानविज्ञानांवर व कलासाहित्यावर निर्वाह करणारा, त्या देशात शिक्षणासाठी आपली मुले लहानपणापासून पाठवून त्यांना कायमचे गुलाम बनविण्यास उत्सुक असलेला, रहाणीमान वाढविण्याच्या आदर्शामुळे झपाटून जाऊन कोणतीही बौद्धिक प्रतारणा करण्यास संकोच न बाळगणारा, परदेशप्रवासात जीवनाची इतिकर्तव्यता मानणारा, परकीय मदतीवर येथल्या विकासाचा डोलारा उभा करून देश स्वयंपूर्ण करू पहाण्याच्या अज्ञानाला अर्थशास्त्र समजणारा, श्रीमंत देशांनी आपली पकड आणि वर्चस्व कायम राखण्यासाठी सुरू केलेल्या अनेक सांस्कृतिक देवाणघेवाणींच्या कार्यक्रमात स्वतःस गुंतवून, गुरफटवून घेऊन 'मानवी स्वातंत्र्या'वर भरल्यापोटी प्रवचने झोडणारा, भ्रष्ट आणि चारित्र्यशून्य राजकर्त्यांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या स्तुतिसुमनांनी वर्तमानपत्रांचे स्तंभच्या स्तंभ भरून काढणारा आजचा सुशिक्षितांतील बहुसंख्य वर्ग आणि इंग्रजी राज्यापुढे वाकलेला पेशवाईतील ब्राह्मणवर्ग यात फरक कसा करावा ते समजत नाही. फारतर पोशाख बदलले एवढे म्हणता येईल; पण वाकण्याची, झुकण्याची, गुडघे टेकण्याची, दिपून जाण्याची, तात्कालिक सुखलाभ पाहण्याची वृत्ती तीच आहे. हिटलरच्या आक्रमणापुढे नेपालियनचा फ्रान्स दोन आठवड्यात प्रतिकाराचा एक आवाज न उठवता लोळण घेतो याचे लास्कीने दिलेले कारण फ्रेंच सुशिक्षित वर्गाची सुखासीनता आणि नैतिक अधःपात, हे आहे. लोकसत्तेच्या, जनतेच्या शक्तीच्या कितीही गप्पा मारल्या तरी सामाजिक, सांस्कृतिक पुरुषार्थाची जबाबदारी विशिष्ट शक्तीने व बुद्धीने युक्त असलेल्या निवडक वर्गाला पार पाडावी लागते असा इतिहास आहे. ही जबाबदारी सकळिकांसाठी, अखिलांसाठी-त्यातल्या त्यात जे रंजले-गांजलेले असतील त्यांच्या उद्धारासाठी--स्वीकारणे एवढीच पुरोगामित्वाची जन्मखूण असते. म्हणून 'बुद्धिस्तु भा गानमम' असे चाणक्य म्हणतो. हा आपल्या स्वतंत्र बुद्धीचा प्रत्यय, अभिमान, ताठपणा ही तर सुशिक्षितांची खास मिरासदारी ! वेळ पडल्यास निष्कांचन होऊनही ती पेलली पाहिजे, मिरवली पाहिजे. प्रतिष्ठेच्या आणि पैशाच्या मागे धावणाऱ्या आजच्या सुशिक्षित वर्गात असे प्रत्ययाचे पौरुष प्रकट करणारे मिरासदार किती सापडतील ?

चैत्राच्या अलिकडचा मास. तीथ असावी अष्टमी किवा नवमी. चंद्र थांबला होता आणि · बिलोरी रजताने रात्र शिंपडली जात होती.' निळावंती प्रसन्न होती, आकाशाचा सौधतल तारकांनी खचून गेला होता. किती युगे उलटली, व्याधाला अजून आपला नेम साधता येत नव्हता, अरुंधतीला सप्तर्षीच्या समीप जाता येत नव्हतं. आकाशगंगा फेसाळून वहात होती आणि तिच्या तीरावर सुरु असलेली ध्रुवाची तपश्चर्या अजून संपलेली नव्हती. अथांग रुपेरी दर्या, संथ उभी असलेली चंद्रनौका आणि मी! एकटा, मस्त, धुंद ! वारा जोराचा होता. थंडीचा कडाका एकदम वाढला होता. उघड्यावर निजण्याची बऱ्याच वर्षात संवय नव्हती. पांघरूण एकच होते.

खोपटाच्या मालकाने उशाशी ट्रान्झिस्टर आणून ठेवलाच होता. ' विविध भारती 'वर अमीरखाँ गात होते. मारव्याचा ऋषभ अशी काही आर्त कळ उठवून जात होता-कट्यारीचं टोकच जणू अंतराला झोंबत होतं, अंतर वर उचलीत होतं.

ज्या जगात दिवस इतके श्रमाचे आणि रात्री इतक्या आनंदाच्या असतील ते जग स्वर्गापेक्षाही सुंदरच आहे.

रात्र सरली होती. थंडी संपून गारवा जाणवत होता. तुरा असलेला एक कुर्रेबाज मित्र जवळ आला आणि त्याने तुतारी फुंकून जाग आणली. उजाडले होते.

*


[भूदानाचे जन्मठिकाण पोचमपल्ली. हैद्राबादजवळचे. या गावाकडच्या यात्रेतील पहिला दिवस. मार्च १९६७.]