श्रीग्रामायन/कम्युन्स आणि ग्रामराज्ये

विकिस्रोत कडून

कम्युन्स आणि ग्रामराज्ये



'फ्रान्समधील घटनांची भारतात पुनरावृत्ती होणार नाही' असे काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात अस्वस्थचित्त सभासदांना मोरारजीभाई देसाई छातीठोकपणे सांगत आहेत.

'राज्यकर्त्यांनी येथील असंतोषाची, वैफल्याची दखल घेतली नाही, तर पॅरीस काही दूर नाही,' असा कॉम्रेड मिरजकर यांचा एका जाहीर सभेतील इशारा आहे.

दि. के. बेडेकरांच्या गच्चीवर, आणखी एका संध्याकाळी मी आणि काही मार्क्सवादी विद्यार्थी, पॅरीसमध्ये नेमके घडले तरी काय याचा कसून शोध घेण्याचा पुन्हा एकदा मनःपूर्वक प्रयत्न करीत आहोत.

'विद्याथ्र्यांनी दंगली केल्या, कामगारांनी संप पुकारले, यापेक्षा फ्रान्समध्ये यावेळी एक वेगळी घटना बऱ्याच प्रमाणात घडलेली दिसते, ती कोणती ?' मी विद्यार्थ्याना खोदून खोदून हा प्रश्न विचारीत आहे.

बऱ्याच वेळानंतर, एक अगदीच कोवळ्या वयाचा तरुण मला सांगत आहे,' कम्युन्स! फ्रान्समधील विद्यार्थ्यांनी आणि कामगारांनी यावेळी बऱ्याच ठिकाणी 'कम्युन्स' स्थापन केलेली आहेत.'

मला हवे ते उत्तर मिळते. माझा पुढचा प्रश्न असतो-
'कम्युन्स'चा अर्थ काय ?'
मला चटकन उत्तर मिळतं- ‘सर्व समाईक मालकीचं.'
'एवढाच ' कम्युन्स' चा अर्थ असेल तर अशी 'कम्युन्स' आपल्याकडेही सर्वोदयवाद्यांनी पूर्वी स्थापन केलेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावातून अशी व्यवस्था आजही आहे. खाणे-पिणे-रहाणे सर्व सामायिक. कोणाची मालकी कशावरच नाही. मग ही सर्वोदयाची ‘ग्रामराज्ये' आणि पॅरीसची ‘कम्युन्स' यात काही साम्य तुम्हाला आढळते का ? 'मी.

'मुळीच नाही. सर्वोदयाचे विचार अगदी जुनाट आहेत. ग्रामराज्ये म्हणजे औद्योगिक क्रांतीपूर्वीची जुनी व्यवस्था टिकवून धरण्याची दुबळी धडपड आहे.' विद्यार्थी. ‘चीनमध्ये औद्योगिक क्रांती पूर्णत्वाला पोचली नसताना व साम्यवादी क्रांती खूप दूर असतानाच माओने ' कम्युन्स'चा प्रयोग केला.' मी.

‘चीनमध्ये भांडवलशाहीचा नाश केल्यानंतर हे प्रयोग माओने केले म्हणून ते यशस्वी ठरले. विनोबाप्रणीत ग्रामराज्ये म्हणजे कावळ्याच्या छत्र्या वाटतात. त्या टिकणाऱ्या नाहीत.' विद्यार्थी.

'चीनमध्ये माओलाही कम्युन्सचा प्रयोग थांबवावा लागला असे माझ्या वाचनात आलेले आहे आणि पॅरीसमध्ये स्थापन झालेली ही कम्युन्स तरी किती दिवस टिकणार आहेत अशी तुमची कल्पना आहे ? अशी कम्युन्स शंभर वर्षांपूर्वीही परसिमध्ये स्थापन झाली होती व काही दिवसात ती कोलमडूनही पडली होती. तरीही माक्र्स-लेनिन यांना या ‘कम्युन्स'चे विलक्षण आकर्षण वाटत होते. किबहुना ‘कम्युनिझम' हे ध्येय म्हणून युरोपात पुढे आले ते अशा तुरळकपणे उगवलेल्या कावळ्यांच्या छत्र्यांमुळेच, हेही आपण विसरता कामा नये. ध्येय म्हणून कम्युनिझमचा शोध मार्क्सने लावलेला नाही. हा शब्द, हे स्वप्न मार्क्सपूर्वकालीन आहे. मार्क्सने हे स्वप्न कम्युन्सच्या अपयशी व तुरळक प्रयोगातूनच उचलले आणि ते सत्यसृष्टीत उतरवण्याचा मार्ग मात्र नवा सांगितला- शास्त्रीय समाजवाद. तेव्हा आपल्याकडील ग्रामराज्ये तुरळक, अपयशी व जुनी म्हणून टाकाऊ का ठरावीत ?' मी.

'माक्स ने जसा खाजगी मालकीहक्काचे विसर्जन हा कम्युनिझमकडे जाण्याचा मार्ग सांगितला तसे विनोबांचे सांगणे कुठे आहे ? 'विद्यार्थी.

'सब भूमी गोपाल की' या विनोबांच्या घोषणेचा अर्थ काय ? घोषणा देऊनच विनोब थांबले नाहीत, त्यांनी भूदानग्रामदानाचा मार्गही दाखवून दिला.' मी.

'भूदान–ग्रामदान तर साफ फसले आहे. टाकाऊ जमिनी जमीनमालकांनी विनोबांना 'दान' म्हणून दिल्या आणि त्यांची फसवणूक केली.' विद्यार्थी.

'हे व्यावहारिक अपयश झाले. आपण तात्विक बाजूचा विचार करीत आहोत. 'नाबाचा ‘दान' या शब्दाचा अर्थ 'संविभागः', समान वाटप असा आहे. 'कयुन्स कोसळली; भूदान, ग्रामदान, ग्रामराज्ये ही कोसळण्यासाठी आहेत असे समजू. प्रश्न आहे तात्त्विक सारखेपणाचा.' मी.

'कयुन्स' आणि ‘भूदान-ग्रामदान–ग्रामराज्ये' यात काही सारखेपणा असेलही पण तो फार थोडा व दुर्लक्षणीय आहे. विद्यार्थी.

'डाव्या पक्षांनी या चळवळीकडे लक्ष पुरविले असते तर तो तसा थोडा' व 'दुर्लक्षणीय' राहिला नसता, असे नाही का तुम्हाला वाटत ? माओने एके ठिकाणी म्हटले आहे की, भूमीचा प्रश्न सुटल्याशिवाय हिंदुस्थानचे-सर्वच मागास लेल्या देशांचे-कुठलेच प्रश्न सुटू शकणार नाहीत. विनोबांनी हा मूलभूत भूमिप्रश्न हाती घेतला. भूमिहीनांच्या प्रश्नांकडे साऱ्या देशाचे लक्ष वेधले. खऱ्या अर्थाने भारतीय मजूरचळवळीचा पाया घातला. कारण आजही वर्षातून सहा महिने अर्धपोटी आणि वर्षभर अर्धवस्त्र असणारा आपल्याकडील आदिवासी-हरिजनभूमिहीन हाच मजूरसमाजाचा खरा तळ आहे आणि तो विनोबांनी ढवळून काढला आहे. दहा-बारा वर्षांपूर्वीच्या तेलंगण लढ्याने आणि कालपरवाच्या नक्षलबारी उठावाने तरी यापेक्षा अधिक काय साधले आहे? हे दोन्ही उठाव व्यावहारिक अर्थाने तर पूर्ण फसलेलेच आहेत. तरीही भूमिहीनांचे लढे म्हणून माक्र्सवादी त्याकडे पाहतात. तसेच विनोबांच्या आंदोलनाकडे पाहिले गेले असते तर येथल्या परिस्थितीशी मिळता-जुळता असा एखादा नवा पर्याय पुढे येण्याची शक्यता होती. मी.

'भूदान प्रयोग यशस्वी ठरला असता तर माक्र्सवाद्यांना आनंद वाटला असता. पण तरीही तो उचलून धरून यशस्वी करावा असे त्याचे मोल अजूनही पटत नाही.' विद्यार्थी.

कोणाला त्याचे मोल पटो, न पटो मला मात्र फ्रान्समधील कम्युन्सच्या प्रेरणा आणि आपल्याकडील गांधी-विनोबांच्या ग्रामराज्यप्रेरणा यामध्ये समानतेचे एक सूत्र सारख जाणवत आहे. 'समाईक मालकी' ही आज फ्रान्समध्ये उगवलेल्या व काही दिवसातच मावळणाऱ्या ' कम्युन्स' मागील प्रेरणा आहे असे मला वाटत नाही. तशी समाईक मालकीची व्यवस्था तर इस्राईलमध्ये 'किबुत्स' च्या रूपाने आजही अस्तित्वात आहे व तिथे ती चांगली स्थिरपदही झालेली आहे. फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांनी व कामगारांनी स्थापन केलेली 'कम्युन्स' ही समाईक मालकीच्या तत्त्वापेक्षाही स्वयंशासनाचा आग्रह व्यक्त करण्यासाठी स्थापन केली असावीत, असे मला वाटते. 'आमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय आजच्या समाजव्यवस्थेत आम्हाला न कळत, आमच्यापासून फार दूर असणाऱ्या व्यक्तींकडून व यंत्रणेकडून घेतले जात आहेत. ही निर्णयव्यवस्था त्यामुळे आम्हाला परकी व निर्जीव वाटत आहे. या निर्णयव्यवस्थेत आमचाही काही वाटा, काही सहभाग असल्याशिवाय आम्हाला ती आपलीशी व जिवंत वाटणार नाही,' ही तेथील विद्यार्थीवर्गाची व्यथा आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ दंगली माजवून स्वस्थ न रहाता शिक्षणसंस्थातून आपला कारभार सुरू केला, कामगारांनी संपाच्या पलीकडे जाऊन कारखान्याचा यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हे खाजगी मालकीच्या कारखान्यात घडल तसेच समाजवादाचे बालेकिल्ले असणाऱ्या सरकारी मालकीच्या कारखान्यात घडले. फ्रान्स-जर्मनी या भांडवलशाही देशात जशी ही प्रवृत्ती उफाळून वर आले तशीच ती युगोस्लाव्हिया, झेकोस्लोव्हाकिया या कम्युनिस्ट देशातही व्यक्त झाली. आपण एका निर्जीव अजस्त्र यंत्रणेचे गुलाम बनलो आहोत अशी ही सार्वत्रिक अगतिकता होती आणि 'कम्युन्स' हा या अगतिकतेचा विधायक उद्रेक होता. हुकुमशाहीमध्ये--मग ती डावी असो की उजवी असो-- ही अगतिकतेची, परकेपणाची भावना पराकोटीला पोचते, म्हणून तेथील उद्रेकांचे स्वरूपही जहाल रहाते. परंतु लोकशाही देशातही सर्वसामान्य नागरिकाला हा स्वयंशासनाचा प्रत्यय येईनासा झाला असल्याने तेथील जनतेत अराजकाचे आकर्षण वाढीस लागले आहे. फ्रान्समधील उठावाच्या कितीतरी अगोदर इंग्लंडमधील विचारवंत 'लोकशाहीचा साचा बदला, नाहीतर ती टिकणार नाही, असे प्रतिपादन करू लागले होते. आजच्या मजूर मंत्रिमंडळातील एक मंत्री, प्रख्यात मजूर नेते वेजवुड बेन यांनी शासनकर्ते, शासनव्यवस्था आणि जनता यांच्यामधील दुरावा हेच फ्रान्समधील उद्रेकाचे कारण आहे असे सांगून इंग्लंडमध्येही लोकशाही व्यवस्थेत काही मूलगामी बदल केले नाहीत, सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या निर्णयात सहभागी होण्याची संधी आपण प्राप्त करून दिली नाही, तर परिस्थिती असुरक्षित आहे असा आपल्या सहकाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे. अमेरिकेतील परिस्थिती तर याहीपेक्षा असुरक्षित आहे. 'Wanted : Relevance and Involvement-' (संदर्भ हवा, नाते हुवे) अशी तिकडची मागणी आहे. मॅनहॅटनचे प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठ नुकतेच काही काळ विद्यार्थ्यांच्या ताब्यात होते.

लोकशाहीच्या माहेरघरात हे धक्के जाणवत असताना आपल्या नकली लोकशाहीतले मोरारजींसारखे नेते जेव्हा 'तसे काही हिंदुस्थानात घडणार नाही' म्हणत डोळ्यावर कातडे ओढून घेतात, तेव्हा या मनःशांतीचे कौतुक वाटल्यावाचून रहात नाही.

आणि मिरजकर जेव्हा आपल्या राज्यकर्त्यांना पॅरीसचे इशारे देतात तेव्हा आपली क्रांतीही किती नकली आणि अनुकरणग्रस्त आहे याचा नकळत ते एक पुरावा देऊन जातात, असेही जाणवल्यावाचून रहात नाही.

स्वयंशासनाचा आग्रह हा तर आपल्याकडील ग्रामराज्यकल्पनेचा मुख्य आशय नाही का ?

*


जून १९६८