Jump to content

श्रावणमासी हर्ष मानसी

विकिस्रोत कडून



श्रावणमासी हर्ष मानसी
__________________

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे.
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर ऊंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळची ते
उतरूनी येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाई तयाचा श्रावणमहिमा एक सुरे
सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजात हि बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुलेपत्री खुडती
देव दर्शना निघती ललना हर्ष मावेना ह्रदयात
वदनी त्यांच्या वाचुन घ्य़ावे श्रावण महिन्याचे गीत
कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.