Jump to content

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/इडा पिडा टळो, शिवाचे राज्य येवो

विकिस्रोत कडून



 इडा पिडा टळो| 'शिवा'चे राज्य येवो ||


 शिवाजीराजांच्या इतिहासातील कामगिरीवर या पुस्तिकेत एका वेगळ्या दृष्टीने पाहिले आहे. देशाकरिता लढणारे राजे त्या काळात किंवा त्या आधीही काही कमी नव्हते. परकियांनी बळकावलेल्या स्वदेशास स्वतंत्र करण्यासाठी धडपडणारे वीरही इतिहासात कमी नाहीत. शिवाजीराजे स्वराज्य संस्थापक होते तसेच महाराष्ट्राच्या तख्ताचीही स्थापना करणारे होते. त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी महाराष्ट्रात एका मर्यादित भूखंडात का होईना एक नवीन पद्धतीचे राष्ट्र तयार करणे ही होती. या राष्ट्रातील लोकांचे एकमेकातील संबंध लुटणारे आणि लुटले जाणारे असे नव्हते. सर्व लोकांना आपला पोटापाण्याचा व्यवसाय निर्धास्तपणे करता यावा, त्या व्यवसायाचा विकास करण्याची संधी मिळावी, हे राष्ट्राचे स्वरूप होते.

 भरत खंडातील इतिहास जेव्हापासून उपलब्ध आहे तेव्हापासून तो राजाराजांतील लढायांचा आहे. या राजांची धनसंपदाही रयतेच्या शोषणातून मिळवलेली असणार हे उघड आहे. अगदी मुसलमानी अक्रमणापर्यंत येथील परिस्थितीत फरक असा पडला नव्हता. छोटी छोटी राज्ये, राजाने प्रजेला लुटायचे आणि आसपासच्या राजांशी लढाया करायच्या. दोघांचाही परिणाम एकच प्रत्येकवेळी जुलूम व्हायचा तो शेतकऱ्यांवर. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने राजकिय परिस्थितीचा अर्थ काय होता तर राजवाड्यांनी म्हटल्याप्रमाणे, "हिंदुस्थानात जी देशी व परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी आहे, अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत" झाली.

 शिवाजीराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत एक नव्या प्रकारचे स्वराज्य उभे केले. त्याची उभारणी कोण्या लुटारू मनसबदारांच्या हातमिळवणीतून झाली नाही. स्वराज्य सैनिक उभे राहिले ते गावागावातील शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्यातून. स्वराज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींची, दुःखाची थेट राजाला खबर होती आणि चिंताही होती. शेतकरी आणि राजा यांच्यातले आडपडदा घालणारे मध्यस्थ जरबेखाली आले. गावगन्ना गढ्या बुरूज बांधून आपण जणू सार्वभौम राजेच आहोत अशा

थाटात बेबंद जुलूम आणि अत्याचार करणे त्यांना सोपे राहिले नाही. शिवाजीराजांनी जागवलेल्या महाराष्ट्र धर्माचे खरे स्वरूप हे असे.

 पण या महाराष्ट्र धर्माची ज्योत राजानंतर फार काळ तेवत राहिली नाही. औरंगजेबाच्या स्वारीस तोंड देण्यासाठी शिवाजीराजांनी घालून दिलेल्या अनेक शिस्ती आपद्धर्म म्हणून का होईना सोडून द्याव्या लागल्या. मराठा राज्यात पुन्हा वतनदार निर्माण झाले. सरदार आपापल्या प्रदेशात सत्ता गाजवू लागले. पेशवाईच्या काळापर्यंत महाराष्ट्राची स्थिती पुन्हा एकदा रामदेवरायाच्या काळापेक्षा काही मूलत: वेगळी राहिली नाही. छिन्नभिन्न झालेल्या राष्ट्रावर परकिय सत्ता प्रस्थापित होणे हे क्रमप्राप्तच आहे. रामदेवरायाचा धडा शिकला गेला नाही. म्हणून पुन्हा एकदा परकियांनी देशावर सत्ता बसविली. रामदेवरायच्या काळी आलाउद्दीन उत्तरेतून आला. पेशव्यांच्या काळी इंग्रज सातासमुद्रापलीकडून आला.

 इंग्रजांनी आपला अंमल बसवण्याच्या सुमारास देशांत लढाया, लुटालुटी इतकि माजली होती की इंग्रजांचे राज्य म्हणजे परमेश्वरी देणे आहे अशीच सर्वसामान्य लोकांची समजूत झाली. देशातील सरंजामशाही व्सवस्था या ना त्या मार्गे फोडून काढण्याचा प्रयत्न इंग्रजानीही केला; परंतु १८५७ च्या बंडानंतर इंग्रजांनी धास्ती खाऊन सर्वसामान्य प्रजाजनांना सुखावह होणारी राज्यव्यवस्था तयार करण्याऐवजी धर्मव्यवस्थेत व सामाजिक रचनेत ढवळाढवळ न करण्याचे व्रत घेतलेली व्यवस्था तयार केली. संस्थानिक बनलेले जुने राजे महाराजे, त्यांच्या दरबारी पोसलेले मंत्रीगण, कारकून आणि इतर पांढरपेशे यांनी नवीन अमलात नवीन व्यवस्थेप्रमाणे स्वत:चा उत्कर्ष साधण्याचा खटाटोप चालू केला. इंग्रज येण्यापूर्वी ही दरबारी मंडळी ज्या रयतेला लुटत होती त्या रयतेच्या परिस्थितीत मात्र काहीच बदल झाला नाही. सरदार दरकदार गेले त्या ऐवजी मामलेदार, तलाठी आले. एवढाच काय तो फरक. इंग्रज येण्यापूर्वी दररोजच्या व्यवहारात लिखापढीला फारसे महत्त्व नव्हते. आता कागदोपत्री जे लिहिले असेल तेच सत्य आणि त्याप्रमाणेच न्याय होणार अशी व्यवस्था. लेखणीची मक्तेदारी जुन्या सरदार, पुरोहित, मनसबदारांच्या वंशजाकडे आली. इंग्रजी व्यवस्थित लेखणी ही पूर्वकालीन तलवारीपेक्षाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक भयानक हत्यार ठरले.

 फिरुन एकदा स्वातंत्र्याचा प्रश्न सुरू झाला. त्यात रयतेला असे काही स्थान नव्हते, इंग्रजी अमलात संपत्ती, विद्या आणि प्रतिष्ठा मिळवलेल्या समाजास देशातील साधन सामग्रीचा लाभ घेण्याची आकांक्षा होती. इंग्रज लूट करीत असताना त्यांच्या हातातोंडातून सांडलेल्या उष्ट्यामाष्ट्यावर त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते.

स्वातंत्र्याच्या लढाईची बांधणी शहाजीराजांच्या स्वराज्य संस्थापनेसारखी होती. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या भाग्याशाली असलेल्या समाजाने स्वातंत्र्याचे आंदोलन आपल्या हातात घेतले आणि त्यामुळे इंग्रज निघून गेल्यावर सर्व देशाची राजकीय व आर्थिक सत्ता याच समाजाच्या हाती आली.

 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चाळीस वर्षांत आपण फिरून एकदा रामदेवरायाच्या किंवा सुलतानीच्या अवस्थेत जाऊन पोचलो आहोत. दिल्लीच्या पातहाला पंतप्रधान म्हणतात. राज्याराज्यातील त्यांच्या सुभेदारांना मुख्यमंत्री म्हणतात. जिल्ह्याजिल्ह्यात त्यांचे आमदार, अध्यक्ष, सभापती, संचालक आपापली सत्ता गाजवत आहेत. या सगळ्यांच्या राजकारणाचे सूत्र एकच. दरबारातील मंडळीस आणि जवळपासच्या कील्लेदारास खुश ठेवायचे म्हणजे सार्वभौम राजाप्रमाणे रयतेवर लुटीचा हात मारता येतो. गावपातळीच्या नेतृत्वाचे कसब हे तालुक्यातील सत्ताधाऱ्यांशी बांधिलकि ठेवणे, त्यात बदल होऊ लागला तर जी बाजू जिंकेल त्या बाजूस राहणे, या हिशेबात चूक झाली तर चपळाईने बाजू बदलून घेणे हे ज्याला जमत नाही तो आयुष्यातून उठू शकतो.

 तालुक्याचे राजकारण म्हणजे जिल्ह्याच्या पुढाऱ्यांविषयी अटकळ बांधणे, जिल्ह्याचे राजकारण म्हणजे मुख्यमंत्र्याचा अंदाज बरोबर घेणे आणि राज्य पातळीवर यशस्वी होणे म्हणजे दिल्लीत कुणाची सत्ता चालेल याचे वेध अचूकपणे घेणे. वरच्या लाथा झेलायची तयारी ठेवली की खाली लाथा मारण्याची आपोआपच मुभा मिळते. अशा व्यवस्थेत दिल्लीच्या पातशहाचा होरा बरोबरा मांडणारा पुढारीसुद्धा सहज प्रतिछत्रपती म्हणून निवडून जातो.

 फिरून एकदा रयतेची स्थिती केविलवाणी झाली आहे. लुटारूंच्या फौजा त्यांच्यावर चालून येत नाहीत, त्यांची चिजवस्तू हत्याराच्या बळाने लुटून नेत नाहीत, बायकांची अब्रू डोळ्यादेखत घेत नाहीत आणि सरसहा कत्तल करत नाहीत हे खरे! पण आधुनिक युगातील दीड दांडीचा तराजू हा मध्ययुगातील तलवारीपेक्षा जास्त प्रभावीपणे लुटीचे साधन बनतो. शेतकऱ्यांची लूट होतेच आहे. ते कर्जबाजारी बनतच आहेत. दैन्याने जगतच आहेत. चेअरमन, आमदार लोकांच्या समोर गावागावात पोरीबाळींची अब्रूही काही सुरक्षित नाही. थोडक्यात १८८३ साली हिंदुस्थानात 'एकमय लोक' या अर्थाने राष्ट्र अस्तित्वात नाही असा टाहो जोतिबा फुल्यांनी फोडला होता. ते 'एकमय लोकराष्ट्र' अजूनही तयार झाले नाही.

 रामदेवरायाच्या आधी लुटारू देशी होते नंतर ते यावनी झाले. मग ब्राह्मणी झाले त्यानंतर फिरंगी झाले. विलायती टोपीवाले गेले आणि खादीटोपीवाले आले. राज्यकर्त्यांचे चोरांची टोळी हे स्वरूप मात्र कायमच राहिले.

 शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा रोख हा इतका जूना आहे. तळागाळाशी जाऊन शेतकऱ्यांतून सैनिक तयार करून स्वराज्य तयार करण्याचा प्रयत्न एक शिवाजीराजांनी तयार केला. तो प्रयत्न अल्पजीवी ठरला. कारण शेतकऱ्यांचा असा काळ अजून आलेला नसावा. आज चारशे वर्षांनंरतही शिवाजीराजांनी जो प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला तोच प्रश्न आ वासून उभा आहे. तो सोडविण्याचा मार्ग शिवाजी राजांनी दाखवून दिला. अशी राज्यव्यवस्था तयार करायची की जिचा मुख्य हेतूच रयतेचे सुख हा आहे, जी व्यवस्था शेतीच्या विकासाला मदत करेल आणि त्यातून पूरक व्यापार उद्योगधंदे यांची वाढ घडवून आणेल. राज्यकर्ते इतिहासात सदैव रयतेला लुटणाऱ्यांचे नायक राहिले. रयतेचा पहिला नायक शिवाजीराजा.

 आजही पुन्हा तळागाळात जाऊन नवे येसाजी कंक, तानाजी मालुसरे एकत्र करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या लुटारूंवर जरब सवून 'एकमय लोकराष्ट्र' उभे करायचे आहे. सामान्य रयतेच्या सुखाचा महाराष्ट्र धर्म देशभर न्यायचा आहे. हे काम करण्याकरिता पुन्हा एकदा शिवाजी राजांसारख्या अवतारसदृश पुरुषाचीच गरज आहे. नव्या स्वराज्य संस्थापनेची पूर्वतयारी 'शेतकरी संघटना' करीत आहे. कलियुगात संघटना हीच शक्ती असते. सतराव्या शतकातील धीरोदात्त नायकाचे काम आज शेतकऱ्यांच्या संघटनांकडे आल्याची चिन्हे जागोजाग दिसत आहेत. या वेळी शिवाजी राजे नीट समजून घेतले तर तीन शतकांच्या अवधीनंतर तरी त्यांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता तयार होईल नाहीतर फिरून एकदा शेतकऱ्यांच्या स्वराज्याची आशा मालवून जाण्याचा धोका आहे.