Jump to content

व्यवस्थापनाची मूलतत्त्वे/ व्यवस्थापन नेतृत्वाची गुणवैशिष्ट्ये

विकिस्रोत कडून

प्रकरण २०

व्यवस्थापन नेतृत्वाची गुणवैशिष्टये

व्यवस्थापनातील नेतृत्व फार महत्त्वाचे असते. जेव्हा व्यवस्थापक नेता होतो तेव्हा तो ख-या अर्थाने यशस्वी होतो.

नेतृत्वाची प्रतिमा

 मात्र, 'नेता' हा फार गोंधळ उडविणारा शब्द आहे. मन:चक्षुपुढे या शब्दाने दोन प्रतिमा उभ्या राहातात. पहिली प्रतिमा म्हणजे, घोड्यावर बसलेला हातातील तलवार एका दिशेकडे उंचावून वळविलेल्या अवस्थेतील नेत्याचा कुठला तरी पुतळा-कलकत्त्याच्या श्याम बाजारातील नेताजी बोस यांचा पुतळा, किंवा मुंबईतील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा नागपूरमधील झाशीच्या राणीचा पुतळा. व्यवस्थापकीय परिस्थितीसाठी यासारखे नेतृत्व सयुक्तिक नसते; कारण व्यवस्थापनात घोडेही नसतात आणि तलवारीही नसतात.

 नेतृत्वाची दुसरी एक प्रतिमा मनात येते ती म्हणजे राजकीय नेत्याची. याविषयी लोकांचे विशेष चांगले मत नसते. मागे मला एकाने सांगितलेली गोष्ट आठवते : "एकदा एका गाडीतून तिघेजण प्रवास करीत होते. त्यांनी एकमेकांची ओळख करून घ्यायचे ठरविले. एकजण म्हणाला, “मी स्वत:ची ओळख करून देतो. मी एक राजकीय नेता आहे, माझं लग्न झालंय आणि मला तीन मुलगे आहेत–तिघेही आमच्या शहरात मोठे डॉक्टर आहेत!" दुसरा म्हणाला, “काय योगायोग आहे पाहा! मीसुद्धा एक राजकीय नेता आहे, माझेही लग्न झालंय, मलाही तीन मुलगे आहेत आणि ते आमच्या शहरातील मोठे वकील आहेत!" तिसरा माणूस मात्र गप्प होता. एकाने विचारले, “तुम्ही तुमची ओळख का करून देत नाही?" तो म्हणाला, “मी काय सांगू तुम्हांला? मी नेता नाही. माझं लग्न झालेलं नाही, पण मला तीन मुलगे आहेत आणि ते तिघेही आमच्या शहरातील मोठे राजकीय नेते आहेत!!!"

 लोकांच्या मनात नेतृत्वाविषयी ही एक दुसरी संकल्पना असते.
व्यवस्थापकीय नेत्याची गुणवैशिष्ट्ये

व्यवस्थापनातील नेत्याची काही विशिष्ट अशी गुणवैशिष्ट्ये असतात.
 पहिले गुणवैशिष्ट्य म्हणजे, त्याचा अधिकार. हा त्याच्या पदामुळे येत नसतो तर त्याचा लोकांवरील प्रभाव यांतून येत असतो.

 दुसरे गुणवैशिष्ट्य म्हणजे, त्याला दूरदृष्टी असते—तो भविष्यात काय साध्य करू शकेल याची जाण असते. या दूरदृष्टीचा तो भोवतालच्या इतर लोकांना प्रत्यय देऊ शकतो. याचे एक वैशिष्ट्य असते ते म्हणजे करावयाच्या अनेक गोष्टींची त्यात गर्दी नसते. नजिकच्या भविष्यासाठी त्याची साधारणपणे दोन किंवा तीन उद्दिष्टे असतात - वीस उद्दिष्टे नव्हे - कारण दोन-तीन उद्दिष्टांवरच लक्ष केंद्रित करणे शक्य असते. ही तीन उद्दिष्टांची योजना व्यवस्थापकीय नेत्याचे एक नमुनेदार वैशिष्ट्य असते.

 या नेत्यामध्ये त्याच्यात आणि त्याच्या अनुयायांमध्ये परस्पर निष्ठा निर्माण करायचेही सामर्थ्य असते. या नेत्याची एक दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे त्याचे स्वत:चे मूल्यमापन करायचे सामर्थ्य. तो काय करू शकतो - काय करू शकत नाही ते पाहतो आणि तो जे करू शकत नाही ते निष्णात अशा लोकांकडून करवून घेतो. अॅन्डू कॉर्नेजीने त्याच्या स्वत:च्या थडग्यावर कोरलेल्या शब्दांप्रमाणे :


"येथे विसावला आहे एक माणूस
ज्याला स्वत:पेक्षा चांगली माणसे
कशी कामावर घ्यावी हे माहीत होते."

 व्यवस्थापकीय नेतृत्वाची ही एक महत्त्वाची बाजू आहे.


करिष्मा

मात्र, व्यवस्थापकीय नेतृत्वाची सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे त्यांचा नेता त्याच्या अनुयायांकडून जो विश्वास आणि जी समर्पणभावना मिळवितो ती आहे. या गोष्टीना त्याचा ‘करिष्मा' असे म्हणता येईल. व्यवस्थापक करिष्मा कसा मिळवू शकेल याचा अभ्यास करायला हवा. अभ्यासाअंती असे निदर्शनास आले आहे की करिष्मा तीन प्रकारचे असतात. मात्र या करिष्मा असणाऱ्या नेत्यांमध्ये एक गोष्ट समान असते त्यांच्यामध्ये सळसळते असे चैतन्य असते. इतर जिथे थकूनभागून जातात तिथे नेता मात्र पुढे जात असतो.

 आपल्याला माहीत आहे की गांधीजी जेव्हा दंगलग्रस्त नोआखाली भागातून फिरत

होते तेव्हा त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली होती. नोआखालीचे वातावरण पदभ्रमणासाठी सोयीचे नव्हते; पण ते दररोज कित्येक तास चालत - प्रकृती न बिघडता!

 १९८० मधील एक मजेशीर घटना मला आठवते : मी गोव्याच्या पणजी येथील मांडवी हॉटेलात एक चर्चासत्र घेत होतो. मी लिफ्टजवळ उभा होतो. अचानक लिफ्ट वर आली आणि त्यातून श्रीमती इंदिरा गांधी बाहेर पडल्या. त्यावेळी त्यांचे वय बहुधा ६०च्या वर असावे पण त्या जेमतेम ४० वर्षांहन थोड्या जास्त वयाच्या दिसत होत्या. त्या झटपट चालत कॉन्फरन्सरूमकडे गेल्या-तेथे एक पत्रकार परिषद सुरू होती. लिफ्ट खाली जाऊन पुन्हा वर आली. त्यातून वर्तमानपत्रांचे चार वार्ताहर बाहेर पडले. मी त्यांतील एकाला ओळखत होतो. तो वयाच्या जेमतेम तिशीमध्ये होता - पण पार थकून गेल्यागत दिसत होता. मी त्याला विचारलं, “काय झालंय तुला?" तो म्हणाला, “काय भयंकर बाई आहे हो ही!" मी विचारलं, “कोणती बाई?" तो म्हणाला, “इंदिरा गांधी! त्या वीस तास निवडणुकीची भाषणे देत फिरत असतात. काही वेळा तर तब्बल दिवसाला २० भाषणे देतात! सगळी भाषणे एकसारखीच असतात–पण आम्हांला मात्र ऐकावी लागतात-त्या काही वेगळं म्हणतील तर! त्या जेमतेम दोनतीन तास झोपत असाव्यात असं वाटतंय. त्यामुळे आम्हांला धड झोप मिळत नाही हो. मी यापूर्वीच माझ्या संपादकांना लिहिलंय की मी मुंबईला परत येतो आहे. कारण मी खलास झालो आहे." मी त्याला विचारलं, “केव्हापासून हे चाललंय?" तो म्हणाला, “माझ्यासाठी हे एक महिना चालत आलय. पण त्याच म्हणाल तर हे दोन महिन्यांपासून सुरू आहे. माझ्या अगोदरच्या वार्ताहराला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे." करिष्मा असणाच्या नेत्याची ही उच्च चैतन्य पातळी नेहमीच भयादराची भावना निर्माण करते.

 व्यवस्थापकीय नेत्यांमध्येही आपण हे पाह शकतो. जिथे इतर मंडळी थकून भागून थांबलेली असतात तिथे हे काम पढे सरू ठेवीत असतात. "या निशा अन्य भुतानाम् तस्याम् जागर्ती संयमी" - म्हणजे, इतर झोपी गेले आहेत तेव्हा हे काम करीत असतात. करिष्म्याची ही फार महत्त्वाची बाजू आहे.


महामानव
करिष्मापूर्ण नेतृत्वाचे तीन प्रकार असतात. पहिला : ‘महामानव'. या शब्दावरून कळते की महामानव म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती. त्याचे स्वत:चे नीतिशास्त्र असणे सर्वात मोठे वैशिष्ट्य असते. आपणापैकी बहुतेकांचे नीतिशास्त्र हे समाजाकडून

घेतलेले असते. पण श्रेष्ठ व्यक्ती स्वत:च्या नीतिशास्त्राचे नियम घडवितात - जे समाजाच्या नीतिनियमांहून वेगळे वा भिन्न असण्याची शक्यता असते. गांधीजींचे उदाहरण घ्या. इतर प्रत्येक बाबतीत गांधीजी हे हिंदू सनातनवादी विचारांचे होते; पण हरिजनांच्या बाबतीत मात्र ते नेमके विरुद्ध होते. या प्रकारे एखादी व्यक्ती स्वत:च्या मनाला पटलेल्या बाबींचे स्वत:चे नीतिनियम तयार करते आणि हाताखालील मंडळींना त्याचे हे नीतिनियम त्यांच्या नीतिनियमांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे पटवून देते.

 गांधीजींची शिष्या असलेल्या एका वयोवृद्ध स्त्रीची मला आठवण होते. एकदा तिने गांधीजींना त्यांच्या वाढदिवशी विचारलं, “बापूजी, मला तुम्हांला एक भेट द्यायचीय. मी काय भेट द्यावी तुम्हांला?" ती बाई सनातनी विचारांची आहे हे गांधीजी जाणून होते. ती, तिची सून; किंवा ब्राह्मण यांव्यतिरिक्त अन्य कुणालाही तिच्या स्वयंपाकघरात जायची अनुमती नव्हती. गांधीजी म्हणाले, “खरंच का तुला मला भेट द्यायचीय? तर मग एक हरिजन स्वयंपाकी कामाला ठेव!"

 ती म्हणाली, “बापूजी, आमच्या घरात आम्ही हरिजन स्वयंपाकी कसा काय ठेवणार? आमचं सोवळेओवळं इतकं कडक असतं की अगदी आमची पुरुषमंडळीही स्वयंपाकघरात पाऊल ठेवू शकत नाहीत."

 गांधीजींनी उत्तर दिले, “मला तू फक्त एवढंच करायला हवंय. जर तुला हे करायचे नसेल, तर कृपया एक काम कर. तुला माझ्यासाठी काय करायचंय हे पुन्हा मला विचारू नकोस."

 ती बाई तीन दिवस झोपू शकली नाही. चौथ्या दिवशी ती हरिजन स्वयंपाकी शोधण्यासाठी गेली. प्रत्येकाने तिला विचारलं, “तू हरिजन स्वयंपाकी कसा काय कामावर ठेवू शकतेस? तू तर सनातनवादी आहेस."

ती म्हणाली, “हे पाहा, मला अजूनही हे करायला आवडणार नाही. पण जर बापुजी हे सांगत असतील तर त्यात काहीतरी मला न समजणारे तथ्य असणारच."

 महामानवाचा करिष्मा असतो तो हा असा.


धीरपुरुष
करिष्म्याचा दुसरा प्रकार म्हणजे धीरपुरुषाचा करिष्मा. धीरपुरुषाचे नीतिनियम समाजाच्या नीतिनियमांसारखेच असतात, पण त्याच्या नीतिनियमांसाठी तो त्याग करायला तयार असतो. प्रत्येकाचे नीतिनियम असतात. पण जेव्हा स्वहित नीतिनियम यांच्यात संघर्ष उभा राहतो तेव्हा साधारणपणे नीतिनियम पायदळी तुडविले जातात. पण धीरपुरुषाच्या बाबतीत त्याचे नीतिनियम इतर सगळ्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ

असतात आणि तो त्याची कारकीर्द, भविष्यातील संधी, सगळ्या गोष्टींचा त्याच्या तत्त्वांसाठी त्याग करायला तयार असतो. यामुळे त्याच्या अनुयायांच्या मनात भक्तिभाव निर्माण होतो आणि त्या धीरपुरुषाला करिष्मा प्राप्त होतो.


प्रिन्स

तिस-या प्रकारच्या करिष्मा म्हणजे ‘प्रिन्स' करिष्मा. हे नाव मॅकॅव्हलीच्या 'द प्रिन्स' या पुस्तकावरून आले आहे. मॅकॅव्हली हा एक मध्ययुगीन तत्त्वज्ञ होता. त्याने राजेमहाराजांना सत्ता कशी मिळवावी आणि ‘सत्ताधिकार' कसा टिकवून ठेवावा याचा सल्ला देण्यासाठी एक पुस्तक लिहिले. त्याने सुचविलेले उपाय हे अनैतिक नसले तरी सदाचाराला धरून निश्चितच नाहीत. सत्ताधिकारासाठी सत्ताधिकार मिळविणे इष्ट आहे. त्याने दिलेला खूपसा सल्ला हा विविध राजकीय आणि व्यवस्थापकीय परिस्थितीमध्ये उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कधीही तुमच्या नंतरची म्हणजे 'नंबर दोन'ची व्यक्ती ठेवता कामा नये; कारण नेहमी ही नंबर दोनची व्यक्तीच नंबर एकच्या व्यक्तीला गडगडविते! हाताखालच्या इतर व्यक्तींसाठी संगीत-खुर्चीचा खेळ ठेवावा म्हणजे ते एकत्र येऊन उच्चस्थानावरील व्यक्तीला खाली गडगडवून पाडणार नाहीत. या प्रकारचा सल्ला भयावर आधारित करिष्मा निर्माण करण्यासाठी सहायक ठरतो. लोक प्रिन्सला भिऊन असतात; कारण प्रिन्सला साधारणपणे काही नीतिनियम नसतात. नीतिशून्य असल्याने तो काहीही करू शकतो आणि यामुळे लोक भितात. प्रत्येकाचे स्वत:चे असे एक चिमुकले विश्व असते. त्याचे भवितव्य, त्याचे कुटुंब, त्याची मुलेबाळे. त्याचे हे चिमुकले विश्व त्याला कोणत्याही हल्ल्यापासून सुरक्षित ठेवायचे असते आणि म्हणून प्रिन्सचा करिष्मा स्वीकारायला तो तयार असतो.

 जे लोक स्वतः प्रिन्स असतात ते एकमेकांशी हातमिळवणी करायला तयार असतात. जशास तसे आणि देवाणघेवाण या आधारावर त्याच्याशी व्यवहार करणे अत्यंत सोपे असते - यात तुला काय आहे आणि मला काय आहे!


व्यवस्थापकीय नेते
व्यवस्थापकीय परिस्थितीमध्ये आपण तीनही प्रकारच्या करिष्म्याची उदाहरणे पाहू शकतो. पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजक हा निसर्गत: महामानव असतो. जे १०० लघुउद्योग सुरू होतात त्यातील ९० उद्योग पहिल्या तीन वर्षांत कोसळतात. उरलेल्या पापकी ९ उद्योग कसेबसे फार मोठे यश न मिळविता पाय ओढत वाटचाल करीत

राहातात. शंभरात फक्त एकच उद्योग यशस्वी होतो आणि मध्यम आकाराचा आणि नंतर मोठ्या आकाराचा होतो. अशा उद्योगामागील उद्योजकामध्ये तुम्ही महामानव पाहू शकता. तो केवळ स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारावर स्वत:विषयी निष्ठा निर्माण करू शकतो.

 जेव्हा एखादा विभाग किंवा एखादी कंपनी विपन्नावस्थेत असते तेव्हा आपण व्यवस्थापनात धीरपुरुष पाहू शकतो. कुणीतरी सगळी सूत्रे हाती घेतो आणि काही महिन्यांतच ती कंपनी किंवा तो विभाग चमत्कार झाल्याप्रमाणे पुन्हा उज्ज्वल कामगिरी करू लागतो. या उलथापालथीमध्ये आपण एक धीरपुरुष पाहू शकतो- ज्याच्याकडे उच्च पातळीचे नीतिनियम असतात आणि जो ती कंपनी किंवा तो विभाग सजीव, चैतन्यमय करून विकासाच्या मार्गावर आणणे हे सर्वात महत्त्वाचे काम समजायला तयार असतो आणि या हेतूसाठी सर्व काही त्याग करायला तयार असतो. यामुळे धीरपुरुषाची एक प्रतिमा निर्माण होते.

 प्रिन्स मंडळी भरपूर असते. किंबहुना, मागणीपेक्षा पुरवठाच जास्त असतो. अधिकारसत्ता टिकवून ठेवण्यासाठी हे परिस्थिती लबाडीने हाताळायला तयार असतात. तीनही प्रकारचे हे नेते अनुयायी मिळवायला समर्थ असतात. महामानव नेत्याविषयीची अडचण असते ती म्हणजे त्याची जागा घेणे अवघड असते. संघटनेच्या गरजांसाठी धीरपुरुष नेतेमंडळी सर्वात उत्तम समजली जाते कारण ब-याचदा ते स्वत:च्या प्रतिमेनुसार त्यांचे वारस निर्माण करायला समर्थ असतात. प्रिन्स नेतेमंडळी सर्वात कठीण प्रकारची असते. त्यांचा स्वत:चा लाभ होत असला तरीही कालांतराने त्यांच्या सत्तेखालील संघटना कोसळून पडते.

 व्यवस्थापनात हे तीन प्रकारचे नेते दिसून येतात. साहजिकच महामानव प्रकारचे नेते फारच कमी असतात, विशेषतः व्यवस्थापकीय पदांमध्ये. महामानव हा संघटनेची शिस्त पाळायला तयार नसतो. तो स्वत:ची संघटना सुरू करण्याची अधिक शक्यता असते. तेव्हा आपण धीरपुरुष या प्रकारच्या नेत्याचा शोध घ्यायला हवा आणि अशा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करायला हवे.

 संघटनेकडे असणान्यातील प्रिन्स प्रकारचा नेता हा सर्वात धोकादायक असतो. अनेक संघटना आजारी पड़तात आणि आपण जर त्यांच्या आजारपणाची मूळ कारणे पाहिली तर आपल्याला त्या जागी निश्चित एखादा प्रिन्स प्रकारचा नेता आढळून येता. तो कंपनीचा अशा प्रकारे गैरवापर करायचा प्रयत्न करतो की त्याची अधिकारसत्ता वाढते - पण या प्रक्रियेत तो सांघिककार्य आणि सरतेशेवटी ती संघटनाच नष्टप्राय करून टाकतो.
निष्कर्ष

सारांशाने म्हणायचे तर, नेतृत्व ही व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना असून संघटनेत ज्या प्रकारचे नेते असू शकतात त्यांचा विचार करायलाच हवा.

 नेत्याकडे असायलाच हवी अशी एक गोष्ट म्हणजे करिष्मा (तेजोवलय). हा त्याच्या अनुयायांवर चालणारा अधिकार असतो - म्हणजे, त्याचे अनुयायी त्यांचे निर्णय त्यांच्या नेत्याच्या निर्णयासाठी स्थगित करायला तयार असतात. त्यांचा अधिकार हा संघटनेतील त्याच्या पदस्थानापेक्षा त्याच्या प्रभावातून येतो.

 त्याची दूरदृष्टी स्पष्ट असते. विशिष्ट वेळी अंमलात आणण्यासाठी अशा नेत्याकडे, फार तर तीन किंवा चारच उद्दिष्टांची योजना असते - जेणेकरून संघटनेची सर्व चैतन्यशक्ती काही थोड्या महत्त्वाच्या बाबींवर केंद्रित होते.

 तो स्वतःमध्ये आणि त्याच्या अनुयायांमध्ये परस्पर निष्ठा निर्माण करतो. स्वतःचे मूल्यमापन करायचे त्याचे सामर्थ्य - स्वत:ची कमजोरी शोधणे आणि तिची भरपाई करण्यासाठी माणसे शोधून आवश्यक ती कामे करवून घेणे-ज्या कामांसाठी तो नेता पुरेसा संपन्न नसतो-हे सर्व संघटनांमधील एक महत्त्वाचे सामर्थ्य असते.

 या सर्व हेतूसाठी आपणाला तीन प्रकारचे करिष्मा असणारे नेते मिळू शकतात. महामानव प्रकारचा नेता हा सर्वाधिक प्रभावशाली असतो आणि बहुधा स्वयंनिर्मित असतो. पण अशा नेत्यांचा पुरवठा फारच थोडा असतो-विशेषकरून व्यवस्थापकीय पदांसाठी कारण अशी व्यक्ती व्यवस्थापक असण्याऐवजी उद्योजक असण्याचीच अधिक शक्यता असते. त्याचे स्वत:चे असे नीतिनियम असतात, वागण्याची प्रमाणके असतात आणि व्यक्तिमत्वाच्या सामर्थ्याने तो लोकांना आकर्षित करू शकतो.

 दुसच्या प्रकारची व्यक्ती म्हणजे धीरपुरुष. या प्रकारचा नेता व्यवस्थापकीय कठीण स्थितीत सर्वात यशस्वी ठरू शकतो. त्याचे स्वतःचे असे विशिष्ट नीतिनियम असतात आणि संघटनेची वाढ होऊन ती समद्ध होण्यासाठी तो त्याग करायला तयार असतो. संघटनेविषयीची त्याची समर्पणाची भावना बन्याच वेळा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांच्या मनातही संघटनेविषयी तीच समर्पणाची भावना निर्माण करते. सर्व संघटनांमध्ये व्यवस्थापकीय गटामध्ये या प्रकारचे नेतृत्व सर्वाधिक उपयुक्त असते.

 व्यवस्थापनाला जे नेते मिळायची सर्वाधिक शक्यता असते -जरी ते नेते अकार्यकारक असले तरीही - ते म्हणजे प्रिन्स प्रकारचे नेते - जे भयाच्या माध्यमातून सत्ता गाजावितात. अशा प्रकारचा नेता कालांतराने संघटनेचं नीतिधैर्य खच्ची करून सांघिक कामाची वाताहत करतो; कारण स्वार्थासाठी असलेल्या त्याच्या कुटिल

धोरणांतून फोडा आणि झोडा (फोडा आणि राज्य करा) अशी स्थिती उद्भवते. तो संघटनेत संरचनात्मक समस्या निर्माण करतो आणि ती संघटना कोसळून पडते.
 प्रत्येक व्यवस्थापकाने स्वत:चे मूल्यमापन करणे आणि आपण कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहोत हे जाणणे महत्त्वाचे असते. त्याने धीरपुरुष प्रकारचे नेतृत्व करण्यासाठी स्वयंप्रेरित होणे हाच व्यवस्थापनातील नेतृत्वाच्या समस्येवरील खराखुरा उपाय आहे.

* * *