व्यवस्थापनाची मूलतत्त्वे/मानसिक दडपणांशी सामना

विकिस्रोत कडून

प्रकरण १९

मानसिक दडपणाशी सामना




कार्यकारी अधिका-यांवरील मानसिक दडपण ही नेहमीची बातमी झाली आहे!
 अधिकाधिक व्यवस्थापक मानसिक दडपण आणि रक्तदाबासारखे आनुषंगिक त्रास सोसत आहेत. यामुळे मोठी घबराट उडाली आहे. त्यामुळे कार्यकारी अधिका-यांवरील दडपण हा काय प्रकार आहे आणि दडपणाविरोधी मुकाबला कसा करावा हे आपण समजून घ्यायची वेळ आली आहे. दडपण ही शरीराने मानसिक प्रेरणेला दिलेली प्रतिक्रिया असते. आपले शरीर हे खरोखरीच आजच्या जमान्याला अयोग्य आहे. हे शरीर बहुधा दहा हजार वर्षांपूर्वीच्या मानवासाठी असावे. आपण दहा हजार वर्षांपूर्वी येथे अस्तित्वात आहोत अशी कल्पना करा. आपल्याभोवती साहजिकच शहर किंवा नगर नसेल. आपण जंगलात असू. आपण कुठे डरकाळी ऐकली की लागलीच आपल्याकडे दोन पर्याय असतील : लढा किंवा पळ काढा. या दोन्ही पर्यायांना उच्च रक्तदाब हवा असतो आणि म्हणून तुमचा मेंदू तुमच्या रक्तप्रवाहामध्ये अॅड्रेनेलिन हे संप्रेरक सोडतो आणि रक्तदाब वाढतो. दहा हजार वर्षांपूर्वी लढायला किंवा पळ काढायला आपण रक्तदाबाचा उपयोग केला आणि तो उपयोगी ठरला.

 आजच्या या सुसंस्कृत जगात आपण यांतील काहीएक करू शकत नाही आणि त्यामुळे शरीरात तणावाची स्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ, तुम्ही सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी कार्यालयात कामावर जाता. तुमचं कार्यालय नऊ वाजता सुरू होतं. तुम्हाला तुमच्या टेबलावर एक चिट्ठी सापडते. त्यावर लाल अक्षरात तुमच्या वरिष्ठांच्या नावाची आद्याक्षरे असतात आणि त्याखाली ९ वाजून ५ मिनिटे अशी वेळ लिहिलेली असते. त्याखाली लिहिलेली असते : “कृपया, त्वरित भेटा."

 साहजिकच स्पष्ट आहे की तुमचा वरिष्ठ अधिकारी कधी एकदा तुमच्याहून थोडा आधी आला आहे आणि तुम्ही उशिरा येत असल्याबद्दल गुरगुरतो आहे. तुमचा मेंदू तुमच्या रक्तप्रवाहात अॅड्रेनेलीन संप्रेरक सोडू लागतो; पण या परिस्थितीत तुम्ही लढूही शकत नाही किंवा पळूही शकत नाही. जणू काहीच घडलं नाही अशा आविर्भावात

तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिका-याकडे जाऊन चर्चा सुरू करावी लागते.


पिळवणुकीचा खेळ

ही एक अवघड परिस्थिती असते आणि सुसंस्कृत जगात आपण जे अधिकाधिक दडपण सोसतो त्याचे मूळ कारण हे आहे. विशेषतः व्यवस्थापकीय परिस्थितीमध्ये दडपण अपरिहार्य, अटळ असते. खरं तर, व्यवस्थापकाची नोकरी तणावांनी भरलेली असते. व्यवस्थापकाची भूमिका मालक मंडळींकडून साधनसामग्री मिळविणे, कामगारांकडून काम करवून घेणे आणि त्या साधनसामग्री आणि काम यांचे यशस्वी उत्पादनात रूपान्तर करणे ही असते. हे यश मिळताच, त्याला त्याचा एक भाग मालकाला द्यावा लागतो, एक भाग कामगाराला द्यावा लागतो आणि शक्य तितका भाग संघटनेच्या विस्तारासाठी परत गुंतवावा लागतो.
 ही भूमिका बजावणे सोपे दिसते खरे; पण प्रत्यक्षात हे फार गुंतागुंतीचे असते. याला कारण म्हणजे साधनसामग्री किंवा काम हे आपणहून दिले जात नाही; तर वसूल करावे लागते. जेव्हा व्यवस्थापक मालकाकडे जाऊन काही साधनसामग्रीची मागणी करतो तेव्हा :

 • पहिले उत्तर असते - “नाही,"

 • दुसरे उत्तर असते, “या वर्षी नाही,"

 • तिसरे उत्तर असते, “आता नाही, नंतर केव्हातरी."


 तुम्हांला हवी असते त्याप्रमाणे, साधनसामग्री कधीच दिली जात नाही. वसूल करावी लागते. व्यवस्थापकाला भुणभूण लावावी लागते. सात वेळा, आठ वेळा, नऊ वेळा... त्यानंतर वरिष्ठ म्हणतो, “ठीक आहे! तुम्ही मागणी केली आहे त्याच्या निम्मे घ्या."

 त्याचप्रमाणे कामसुद्धा आपणहून करून दिले जात नाही. तेही मिळवावे लागत. उदाहरणार्थ, तुम्ही कामगार संघटनेशी करार करता की जर कामगाराने १० टक्क्याने उत्पादकता वाढविली तर तुम्ही प्रत्येक कामगाराला दरमहा १०० रुपये जास्त द्याल. पैसे दिले जातील. पण तुम्हांला उत्पादकतावाढ मिळेल की नाही याची शाश्वती नाही! जर व्यवस्थापक त्याच्या केबीनमध्ये बसून असा विचार करीत असेल की कामगारांना १०० रु. जास्त मिळत आहेत तेव्हा ते १० टक्के उत्पादन वाढवतील - तर उत्पादन होणार नाही. त्याला तेथे जावे लागेल, उभे राहून कामगारांकडून काम वसूल के उत्पादन वाढवावे लागेल.

 हे इथेच थांबत नाही. व्यवस्थापकाने साधनसामग्री आणि काम मिळवून त्याचे उत्पादनात यशस्वी रूपान्तर केल्यावर तो स्वतः त्या पिळवणुकीचा बळी ठरतो. मालकवर्ग आणखी चांगल्या यशाची मागणी करतात. तुम्ही जर एखाद्या सर्वसाधारण वार्षिक सभेला (अॅन्युअल जनरल मिटींग) हजर राहिलात तर तुम्हांला हे दिसून येईल. तुम्ही जर १० टक्के लाभांश घोषित केला तर दहा भागधारक ध्वनिक्षेपकाजवळ येऊन म्हणतील, “तुम्ही १५ टक्के लाभांश का जाहीर करीत नाही? आम्ही जर आमचे पैसे कर्जरोख्यांमध्ये, बंधपत्रांमध्ये गुंतविले असते तर आम्हांला १० टक्क्यांहून अधिक लाभांश मिळाला असता!" जर तुम्ही २० टक्के लाभांश घोषित केला तर २० भागधारक ध्वनिक्षेपकाजवळ येऊन म्हणतील, “तुम्ही लाभांश २५ टक्के कधी करणार आहात? तुम्ही अधिलाभांश भाग (बोनस शेअर) कधी जाहीर करणार आहात?" तुमच्या लाक्षात येईल, मालक मंडळी कधीच समाधानी नसते. ते व्यवस्थापक मंडळीकडून अधिकाधिक वसुली करीत राहतात.

 त्याचप्रमाणे, कामगारांना दर तीन वर्षांनी कळते की त्यांची उपासमार होतेय, पिळवणूक होतेय. ते फलक नाचवतात, “गली गली में शोर है, मॅनेजमेंट चोर है।" ते का करतात असे? ती तशी चांगली माणसे असतात. पण दर तीन वर्षांनी ते सुद्धा काहीतरी वसूल करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे खरोखरच व्यवस्थापन हा वसुलीचा, पिळवणुकीचा खेळ आहे_‘रक्तरंजित' खेळ म्हणा हवं तर. 'रक्तरंजित' हा शब्द कबीराच्या एका दोह्यातील आहे. कबीर म्हणतो,


"सहज मिले तो दूध समा
मांगी मिले तो पानी
कहत कबीरा वो खून है।
जमाय खिचातानी."

 (न मागता तुम्हांला मिळते ते दुध; तुम्हांला मागावेच लागत असेल तर ते पाणी, आणि तुम्हांला पिळवणूक करून घ्यायचे असते ते रक्त.)


 त्यामुळे हा सगळा रक्तरंजित खेळ आहे! पण आपल्यावर तणाव असल्याची तक्रार करणाच्या व्यवस्थापकाविषयी माझ्या मनात काडीचीही सहानुभूती नाही. माझ्यासाठी ते एखाद्या परिचारिकेने तक्रार करण्यासारखे आहे,"मला कोणत्याही घाणेरड्या वस्तूला हात लावायचा नाही. मला रुग्णाच्या शौचपात्राला (बेडपॅन) हात लावायचा नाही." मी म्हणेन, “जर तुला रुग्णाच्या शौचपात्राला हात लावायचा नसेल तर शिक्षिका हो. मृग तुला त्या शौचपात्राला हात लावायला कुणीही सांगणार नाही.जर

तुला नर्स व्हायचे असेल तर तुला या भांड्याला हात लावलाच पाहिजे!" त्याचप्रमाणे, जेव्हा एखादा व्यवस्थापक त्याच्या तणावाविषयी तक्रार करतो तेव्हा मी त्याला सांगतो, “जर तुला व्यवस्थापक व्हायचे असेल तर तणाव अपरिहार्य, अटळ आहे. जर तुला तणाव नको असेल, तर सल्लागार (कन्सल्टंट) हो!"


दडपणाची उपयुक्तता

जोवर दडपणाशी कसे जमवून घ्यावे हे तुम्हांला माहीत आहे तोवर दडपण ही समस्या नसते. खरं तर विशिष्ट मर्यादेपर्यंत दडपण दोन कारणांमुळे उपयुक्त असते.
 पहिले कारण म्हणजे, दडपण तुम्हांला उत्पादनक्षम करते. तुमच्यावर दडपण नसेल तर तुम्ही काहीही उत्पादन करणार नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या वडिलांना पत्र लिहायचे ठरविले आहे-गेल्या दोन महिन्यांपासून तुम्ही त्यांना पत्र लिहिलेले नाही. एके रविवारी सकाळी तुम्ही हे पत्र लिहायचे ठरविता. पण रविवार तर असा दिवस असतो की तुम्ही त्या दिवशीची संपूर्ण वर्तमानपत्रे वाचू शकता - सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तुम्ही तुमचं वर्तमानपत्रे वाचणे आणि नास्ता संपवेपर्यंत तुमची आवडती दूरदर्शन मालिका पाहण्याची वेळ झालेली असते. आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाची वेळ होते. त्यानंतर आठवड्याची हक्काची वैध अशी दुपारची झोप घ्यायची वेळ येते. तुम्ही उठता तेव्हा दूरदर्शनवर संध्याकाळचा चित्रपट सुरू झालेला असतो. तो संपेपर्यंत तुमचे रात्रीचे जेवण झालेले असते आणि झोप येऊ लागलेली असते - अगदी दिवसा झोप काढली असली तरीही. याप्रकारे, सोळा तास असूनही तुम्ही एकही पत्र लिहू शकत नाही. पण जर तुमच्यावर दडपण असेल तर तुम्ही एका तासात सोळा पत्रे लिहू शकता. यामुळे तुमची उत्पादकता वाढविण्यासाठी दडपण फार महत्त्वाचे असते. पण एका मर्यादेपलीकडे अधिक दडपण तुमची उत्पादकता खूप तीव्रतेने कमी करते. काम करण्याऐवजी तुम्ही कामाविषयी चिंता करायला लागता. या ठिकाणी मात्र दडपणाचे व्यवस्थापन करावे लागते.

 दुसरे कारण म्हणजे, जर तुम्हांला दडपणाच्या एखाद्या विशिष्ट पातळीची सवय झाली तर त्यापेक्षा दडपण कमीअधिक झाले तर तुम्हांला त्रास होतो. माझ्या अनेक मित्रांच्या बायकांना मोठ्या कष्टाने मुले वाढवावी लागली आहेत. जेव्हा मुले मोठा होऊन लग्न करून गेली, नवरा दिवसाला एकदाच जेवायला लागला आणि घरची कामे इतकी कमी झाली की ती गृहिणी पाठीचा मणका सरकणे, स्पॉन्डीलायसिस, इत्यादी आजाराच्या तक्रारी करू लागली–याला कारण आता दडपण नसते! मग मुलगी बाळंतपणासाठी येते आणि लगेच, सर्व आजार पळून जातात. आजीबाई आता

स्फूर्तीने कामाला लागतात. नातू जन्मल्यावर पुढील काही महिने ती खूप कष्ट उपसत असते. पण तिची प्रकृती पूर्वीप्रमाणेच सुदृढ असते. चार महिन्यांनंतर मुलगी नातवासह सासरी जाते आणि येथे आजीबाईचे आजार परत येऊन बळावतात.

 याप्रकारे, दडपण एका विशिष्ट मर्यादेखाली जाण्याने समस्या होऊ शकते. त्यामुळे दडपणाच्या व्यवस्थापनेत, आपण नेहमी दडपण कमी करीत नाहीत तर ते आरामदायक आणि उत्पादक करण्यासाठी मर्यादेत ठेवतो.

दडपणाशी सामना

जेव्हा दडपण आरामपातळीपेक्षा जास्त होते आणि त्या व्यक्तीला त्रास होऊ लागतो तेव्हा आपण दोन पर्यायांचा विचार करू शकतो. एक : दडपणाशी लढा देऊन त्याच्याशी जमवून घेण्याचं सामर्थ्य वाढविणे, दोन : दडपण कमी करणे.

 वाढते वय आणि अनुभवाबरोबर प्रत्येकाचे दडपणाशी जमवून घ्यायचे सामर्थ्य वाढते. जेव्हा एखादी तरुणी पहिल्यांदा बाळंत होते तेव्हा ती सहजपणे घाबरून जाते. पण दुस-या बाळंतपणावेळी मात्र ती अधिक प्रौढ झालेली असते; म्हणजे दडपणाशी सामना करायचे तिचे सामर्थ्य वाढलेले असते. व्यवस्थापकांचा अनुभव जसजसा वाढत जातो, तसा ते अधिकाधिक दडपणाशी सामना करायला समर्थ होतात.

 जेव्हा जबाबदा-या वाढतात तेव्हा तुम्ही पाह शकाल की दडपणाशी जमवून घ्यायचे सामर्थ्यही वाढते. एखादी तरुण मुलगी लग्न करते किंवा एखादा एअरलाइन्सचा पायलट पंतप्रधान होतो तेव्हा दडपणाशी जमवून घ्यायचे सामर्थ्य वाढल्याचे तुम्ही पाहता. पायलटला ६ तासांच्या ड्यूटीनंतर २४ तासांच्या विश्रांतीची गरज असू शकते; पण पंतप्रधान म्हणून २४ तासांच्या कामानंतर त्याला ६ तासांचीही विश्रांती न मिळण्याची शक्यता असते. उच्च जबाबदारीबरोबर उच्च दडपणाशी सामना करायचेही सामथ्ये मिळते.

 दुसरी बाब म्हणजे दडपण कमी करणे. येथे. पहिली गोष्ट करायची असते ती म्हणजे दडपणाचा उगम शोधणे, मळात दडपणाचे तीन स्रोत किंवा उगम असतात :

 पहिला, 'नोकरीविषयीची संदिग्धता' : जेव्हा तुम्ही सुव्यवस्थित नसलेली नोकरी स्वीकारता तेव्हा तुमच्या भूमिकेविषयी खूप गोंधळ असू शकतो आणि बहुतेक लोकांवर याचे दडपण येऊ शकते. जर कामाची अधिक सुस्पष्ट रचना करता आली तर दडपण कमी होते.

 दुसरा, 'परस्परसंबंधाचे दडपण' . वरिष्ठ अधिकारी, बरोबरीने काम करणारे सहकारी, हाताखाली काम करणारी मंडळी, कामगार नेते, इत्यादीबरोबरच्या

परस्परसंबंधातून दडपण येऊ शकते. परस्परसंबंधांतून निर्माण होणाच्या दडपणाच्या समस्येवर पाच पाय-यांची उपाययोजना करून दडपण कमी करता येते :
 ० पहिली पायरी म्हणजे वाट पाहणे. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, जसाजसा काळ जाईल तसतसे दडपणाशी जमवून घेण्याचे सामर्थ्य वाढू शकेल आणि दडपण खूप आहे असे वाटणार नाही. काळ जाईल तसे परस्परसंबंधही सुधारतील आणि यामुळे दडपण कमी होऊ शकेल.
 ० दुसरी पायरी म्हणजे दडपण निर्माण करणा-या व्यक्तीशी वाटाघाटी करणे. आमनेसामने बसून भविष्यातील संबंधाविषयी काय करता येईल याविषयी वाटाघाटी करणे शक्य आहे. या वाटाघाटीने केलेल्या तोडग्याने दडपण खूपसे कमी होऊ शकते.
 ० जर याने काम होत नसेल तर तिसरी पायरी म्हणजे लढा देणे. तुम्ही संबंधित व्यक्तीला सांगा की समस्या गंभीर आहे आणि तुम्ही ती फार काळ सहन करणार नाही. हा लढा दोन प्रकारे होऊ शकतो - एक तर तुम्ही जिंकाल किंवा हराल. त्यामुळे यावेळी तर तुम्ही पुढल्या पायरीसाठी तयार असायला हवे.
 ० चौथी पायरी आहे सोडून जाणे-म्हणजे तुम्ही ही नोकरी सोडून दुसरी नोकरी शोधायला तयार आहात. असह्य दडपणाखाली जीवन जगण्यात सार नाही.
 ० मात्र, जर तुम्हांला दुसरा कुणीही नोकरी द्यायला तयार नसेल तर स्पष्टच आहे की शेवटची पायरी म्हणजे शरणागती पत्करणे. तुम्ही दडपण स्वीकारता, परस्परसंबंधांतील समस्या स्वीकारता—तुमच्या जीवनाचा एक भाग म्हणून. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट पत्करता तेव्हा दडपण कमी झाल्याचे तुम्हांला आढळून येण्याची शक्यता आहे. भारताच्या अनेक भागात साडेसात वर्षे पिडणा-या ‘साडेसाती'वर लोकांचा विश्वास आहे. जर एखाद्याने ही साडेसात वर्षे मोजून निमूटपणे व्यतीत केली, तर त्या कालावधीतच परस्परसंबंध समस्या नाहीशी होण्याची शक्यता आहे.
 मात्र, सहावा आणि शेवटचा असा दडपणाशी सामना करायचा जो मार्ग आहे तो सर्वाधिक अकार्यकारक ठरू शकतो-हा मार्ग म्हणजे शिव्याशाप देणे. यामुळे दडपण कमी होत नाही. यामुळे होते ते एवढेच की वाढत्या मानसिक तणावाने आणि पेप्टीक अल्सरने आणखी समस्या निर्माण होतात. ही पायरी आपण टाळायला हवी आणि आपण पहिल्या पाच पाय-यांच्याच मार्गाने जावे.
 या पाच पायच्या आहेत :
 ० वाट पाहा.
 ० वाटाघाटी करा.
 ० लढा द्या.
 ० पळ काढा.  ० शरणागती पत्करा.
 परस्परसंबंधांतून निर्माण होणा-या दडपणाचा आपण या मार्गाने मुक़ाबला करू शकतो.
 या दडपण कमी करण्याच्या दीर्घकालीन योजनेबरोबरच आपण दडपण तात्पुरतं कमी करण्यासाठी दोन अल्पकालीन उपाय करू शकतो :
 पहिला उपाय आहे योगसाधना (योगासने, इ.) करणे. दीर्घ श्वसन करण्याने रक्तदाब कमी व्हायला मदत होते. जर तुम्ही विमान सुटण्याची शक्यता असताना विमानतळाकडे जाण्यासाठी टॅक्सीने धाव घेता; त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम गोष्ट करू शकता ती म्हणजे डोळे मिटून दीर्घ श्वसन सुरू करणे. विमानतळापर्यंत पोहोचेपर्यंत तरी तुमच्यावरील दडपण त्याने कमी होते.
 दुसरी एक गोष्ट करू शकता ती म्हणजे काहीतरी फालतू काम करणे - उदाहरणार्थ; पेन्सिलींना टोक काढणे, टेबलाचे खण साफ करून सगळं पुन्हा रचणे. या नेहमीच्या कामांनी आपल्याला काहीतरी काम होतंय अशी जाणीव होऊन दडपण कमी होते. मी माझ्या टेबलावर नेहमी डझनभर पेन्सिली ठेवतो आणि दडपणाच्या स्थितीत असताना एकएक करून पेन्सिलींना टोके काढतो. सगळ्या पेन्सिलीना टोके काढून होईतो दडपणाची जाणीव कमी झालेली असते. (अर्थात पेन्सिलींना टोके काढायचे शार्पनर मात्र चांगले असायला हवे; नाहीतर जर पेन्सिलीचे टोक सारखे मोडत राहील आणि तुमचे दडपण वाढेल!)
 दडपणाचा तिसरा स्रोत म्हणजे तुमच्या वैयक्तिक समस्या : शेवटी कामाच्या ठिकाणी ८ तास आणि कामाच्या ठिकाणाबाहेर १६ तास अशा दोन वेगवेगळ्या भागात माणूस जगत नसतो. व्यक्ती दिवसाचे २४ तास सतत जगत असते आणि एका ठिकाणी जे घडते त्याचा दुस-या ठिकाणी जे घडते त्यावर परिणाम होतो आणि दडपण साचून वाढू शकते. जर दडपण निर्माण करणाच्या काही समस्या घरी असतील; तर ते दडपण कार्यालयातही आणले जाते. विविध वैयक्तिक समस्यांची प्रागतिकरीत्या सोडवणूक करून या प्रकाराचे दडपण कमी करायला हवे.

दडपणाच्या विशेष समस्या

मात्र, अशा दोन विशेष समस्या आहेत ज्याकडे आपण पाहिलेच पाहिजे, पहिल्या समस्येला कार्यकारी अधिका-याची 'मासिक पाळी' बंद व्हायचा काळ' असे म्हणता येईल. कार्यकारी अधिकारी वयाचे पंचेचाळिसावे वर्ष गाठतो तेव्हा त्याला अचानक मोठ्या दडपणाचा अनुभव येऊ लागतो. जर व्यक्ती बुद्धिमान असेल, तर नोकरी सुरू केल्यापासून पंचेचाळिसाव्या वर्षापर्यंत त्याला चार-पाच वेळा बढत्या मिळालेल्या असतात आणि तो खूष असतो. पण जेव्हा तो पुढे पाहतो तेव्हा त्याला आढळतं की तो निवृत्त होईपर्यंत त्याला बढती नाही किंवा जेमतेम एखादीच बढती मिळेल. या कारकिर्दीविषयीच्या दडपणाबरोबरच त्याला घरीही दडपण येऊ लागते. या काळात मुले पालकांवर तणाव, वैफल्य, नैराश्य आणू लागतात. ही सर्व दडपणे एकत्र येतात आणि त्यामुळे हा काळ कार्यकारी अधिका-याच्या जीवनातील कठीण काळ होतो.

 कार्यकारी अधिका-याची ‘मासिक पाळी' बंद होण्याच्या काळाच्या या दडपणाला कमी करण्यासाठी त्या कार्यकारी अधिका-याने ‘जीवनात पर्यायी केंद्र' विकसित करायचा विचार करायला हवा. जर एखाद्या व्यक्तीचा आनंद जर फक्त त्याची नोकरी आणि त्याचे कुटुंब यातून मिळत असेल तर, या दोन्हींतून जर वैफल्य आले तर ते अत्यंत क्लेषकारक, विपत्तीजनक ठरते. मात्र, जर ती व्यक्ती सोशल क्लब, व्यावसायिक संघटना, इत्यादींमध्ये सहभागी होत असेल तर एका भागातील वैफल्याची दुस-या भागातील यशाने भरपाई होऊ शकते. जर कुणी एखादा त्याच्या कंपनीचा अध्यक्ष होऊ शकत नसेल तर तो निदान रोटरी क्लबचा तर अध्यक्ष होऊ शकतो - ते खूप सोपे असते. स्वत:च्या संघटनेत उच्चपदावर न जाण्यातील वैफल्याची या यशाने काही अंशांनी तरी भरपाई होते.

 विशेष दडपणाचा दुसरा वैयक्तिक स्रोत म्हणजे अपेक्षित असलेली निवृत्ती. निवृत्त व्हायचे वय जसजसे जवळ येते, आणि ज्या मंडळींनी निवृत्तीनंतर काय करायचे याचा विचार केलेला नसतो ते खूप मोठ्या दडपणाच्या समस्यांमध्ये सापडतात. जर निवृत्तीनंतर काय करायचे याची योजना नसेल तर हे दडपण निवृत्तीनंतरही येत राहते. याच्याशी सामना करायचा खरा मार्ग म्हणजे निवृत्तीविषयीची योजना आखणे. यात तुम्ही केवळ आर्थिक बाबींचेच नव्हे तर मानसिक बाबींचे आणि वेळेच्या रचनेच नियोजन करता. सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायला हवा ते म्हणजे छंद विकसित करणे - ज्यातून तुम्हांला निर्मिती, सर्जनशीलतेच्या भावनेने गुंतवून ठेवल जाते. अपेक्षित निवृत्तीने येणा-या दडपणाशी सामना करू शकण्याचा हा एकमेव माग असेल.


निष्कर्ष

 • दडपण हा व्यवस्थापकाच्या जीवनाचा एक भाग आहे हे स्वीकारणे.

 • दडपणाने उत्पादकता सुधारू शकते हे जाणणे.

 • दडपणाशी समजूतदारपणे सामना करणे.

 ० परस्परसंबंधातील दडपण कमी करण्यासाठी वाट पाहणे, वाटाघाटी करणे, लढा देणे, पळ काढणे आणि शरणागती पत्करणे; असा हा पाचपायरी मार्ग वापरणे.
 ० छंद विकसित करणे आणि निवृत्तीसाठी योजना आखणे.

* * *