वेदसारशिवस्तवः
पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यम्।
जटाजूट मध्येस्फुद्वाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम् ॥१॥
अर्थ: पशु म्हणजे जीव, त्यांचा पति म्हणजे स्वामी, पापांचा नाश करणारा, हत्तीचे कातडे धारण करणारा, श्रेष्ठ आणि ज्याच्या जटासमूहामध्ये गंगेचा प्रवाह शोभत आहे तसेच मदनाला भस्म करणाऱ्या भगवान शंकराचे मी स्मरण करतो. ॥१॥
महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम् ।
विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम् ॥२॥
अर्थ: महान सत्ताधीश, सर्व देवांचा अधिपती, देवांचे शत्रू जे राक्षस - त्यांचा नाश करणारा, सर्वव्यापी, विश्वनाथ, भस्मामुळे ज्याचे सर्व अंग शोभत आहे व नेत्र विषमसंख्या (तीन) असल्याने ज्याला विरूपाक्ष म्हणतात अशा चन्द्र, सूर्य आणि अग्नि ज्याचे नेत्र आहेत त्या सदानंद प्रभु पंचानन भगवान शंकराची मी स्तुती करतो. ॥२॥
गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गणातीतरूपम् ।
भवं भास्वरं भस्मना भूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम् ॥३॥
अर्थ: जे गिरीश आहेत आणि (प्रथमगणांचे अधिपती असल्याने) गणेशही आहेत, ज्यांचा गळा नीलवर्णी आहे, जे नंदीवर बसलेले आहेत, जे गणांच्या पलीकडचे (अर्थात त्यांचे स्वामी) आहेत, (गुणातीतरूपम् असा पाठ घेतल्यास सत्व, रज, तम ह्या तीन गुणांच्या पलीकडचे) जगाचे आदिकारण असल्याने 'भव' आहेत, देदीप्यमान(प्रकाशरूप) आहेत, ज्यांचे अंग भस्माने भूषित झालेले आहे, भवानी म्हणजे पार्वती ज्यांची पत्नी आहे अशा त्या पंचानन भगवान शंकराची मी भक्ती करतो. ॥३॥
शिवाकान्त शम्भो शशाङ्कार्धमौले महेशान शूलिन् जटाजूटधारिन् ।
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप ॥४॥
अर्थ: हे पार्वतीपते शंकरा! हे शंभो ! (शं म्हणजे कल्याण) मस्तकावर चन्द्रकोर धारण करणारे, थोर सत्ताधीश लोकपालांचेही अधिपती, हातात त्रिशूळ असलेले, मस्तकावर जटांचा भार धारण करणारे, एकमात्र तुम्हीच जगाला व्यापून आहात. विश्वाच्या रूपाने नटलेल्या हे पूर्णरूप प्रभो ! प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. ॥४॥
परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोङ्कारवेद्यम् ।
यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वम् ॥५॥
अर्थ: हे परमेश्वरा ! तुम्हीच एक ह्या सर्व जगाचे बीज म्हणजे आदिकारण आहात. निरीह (निरिच्छ), निराकार, प्रणव (ओंकार) ज्याच्या स्वरूपाचे प्रतिपादन करतो असे म्हणजे ओंकाराने जाणण्यास योग्य, सर्व विश्वाचे निर्माण आणि पालन करणारे, आणि शेवटी स्वतःमध्ये विश्वाचा लय करणाऱ्या प्रभू शंकराला मी भजतो. ॥५॥
न भूमिर्न चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा ।
न ग्रीष्मो न शीतं न देशो न वेषो न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्ति तमीडे ॥६॥
अर्थ: पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश; त्याचप्रमाणे तन्द्रा, निद्रा, ग्रीष्म, वर्षा आणि शीत ह्यांचा ज्याच्याशी सम्बन्ध नाही, ज्याला देश नाही, वेषही नाही परन्तु विश्वकल्याणासाठीं तीन रूपांनी (ब्रम्हा, विष्णू, महेश) जो नटला आहे त्या शंकराची मी स्तुती करतो. ॥६॥
अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानाम् ।
तुरीयं तमःपारमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम् ॥७॥
अर्थ: जो जन्मरहित (अज) आहे, अविनाशी (शाश्वत) आहे, जो कारणाचेही कारण आहे, कल्याण स्वरूप आहे, केवल म्हणजे एकच अद्वितीय आहे, प्रकाशकांचाही प्रकाश आहे, तुरीय म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण अथवा जागृति, स्वप्न, सुषुप्ति ह्या तीनही अवस्थांच्या पलीकडचा आहे, अज्ञानरूपी अन्धकाराच्या पलीकडचा म्हणजे ज्योतिस्वरूप आहे, अशा त्या द्वैतरहित असलेल्या परम पावन, अनादि अनन्त असलेल्या शंकराला मी अनन्य भावाने शरण आलों आहे. ॥७॥
नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते ।
नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्य ॥८॥
अर्थ: हे विभो ! विश्वमूर्ते ! चिदानन्दरूप अशा तुम्हाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. तप, योग आणि वेदज्ञानानेच तुमचे ज्ञान होऊ शकते. अशा तुम्हाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. ॥८॥
प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शम्भो महेश त्रिनेत्र ।
शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्यः ॥९॥
अर्थ: हे प्रभो शूलपाणे ! हे विश्ववव्यापका विश्वनाथा, महादेव शम्भो ! हे महेश ! मदनाच्या शम्भो ! त्रिपुराचा नाश करणाऱ्या पार्वतीवल्लभा, ह्या जगात तुझ्या शिवाय कोणी श्रेष्ठ नाही, कोणीही माननीय नाही आणि कोणीही आदरणीय नाही. ॥९॥
शम्भो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन् ।
काशीपते करुणया जगदेतदेकस्त्वं हंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि ॥१०॥
अर्थ: जीवांच्या संसार पाशांचा नाश करणाऱ्या हे शम्भो, महेशा, करुणाकरा, शूलपाणे ! तुम्ही गौरीपती आहात. हे काशिनाथा ! तुम्ही एकटेच हें जग निर्माण करता, त्याचे पालन करता आणि शेवटी त्याचा विनाशही करता. आपणच महेश्वर आहात. ॥१०॥
त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ ।
त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश लिङ्गात्मकं हर चराचरविश्वरूपिन् ॥११॥
अर्थ: हे देवा ! तुमच्यापासूनच हे जग उत्पन्न होत म्हणून तुम्ही 'भव' आहात. तुमच्या ठिकाणी हे जग आनंदाने राहते. चराचर विश्वरूपाने नटणाऱ्या हे विश्वनाथा ! शेवटी हे जगत तुमच्यातच लीन होत म्हणून ह्या जगाला लिंग (लयं गच्छति इति लिङ्गम्) म्हणतात. हे परमेश्वरा तुम्हाला भक्तिपूर्वक नमस्कार. ॥११॥
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतार ·नारायण | |
वेदांग | |
शिक्षा · चंड | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
इतिहास | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |