विठ्ठलभक्तस्तुति

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

निजजना अमृतें बहु तर्पिती, स्वअनवे - अनवे कर अर्पिती; सतत पूर्ण मुकुंद यशोरसें न, वदना ! वद ना, म्हणती असें. ॥१॥


करिति विठ्ठलभक्त सभामुखें विकसितें नटुनी स्वमहा सुखें; अहिशिरीं करि नृत्य महामना, नटप तो टपतो अवलोकना. ॥२॥


अजित विठ्ठलभक्त यश:कथा करुनि, दाविति मुक्तिमहापथा; रसिकसाधुमुखांबुरुहांप्रती हंसविते सवितेचि नराकृति. ॥३॥


शुकचि विठ्ठलभक्त न हें मृषा. नुरविती रसिकीं दुसरी तृषा. हरियशोरस फ़ार रुचे असा. रसिकता सिकता नुतरे कसा. ॥४॥


करिति विठ्ठलभक्त कथा बरी, सुदृढ बाळहि जीस मनीं धरी; वश जयासि सदा भगवान् हरी, कुतुक या तुकयापरि भूवरी. ॥५॥


सदय विठ्ठलभक्तचि तोडिती त्रिगुणजाळ, जडासहि सोडिती; प्रभुचियाहि सुसंकट जें मतें, उलगडील गडी दुसरा न तें. ॥६॥


न तुकयासमशील, न नामाया, प्रिय मिळे न कळींत अनामया. वरि अभंगसमुल्लसनें रसीं, शुकवचें कवचें नृप तो जसीं. ॥७॥


हरिजनोक्तिसमुल्लसनीं पटु वचन जें वदती न कधीं कटु; त्यजिति, सेवुनि ज्या, अघवासना; बलवती लवती सदुपासना. ॥८॥


सुख तसें सकळांसहि वाटतें, असुख सर्व पळांतचि आटतें; निरखितांचि जसें भवपारदा मुनिजना निजनायक नारदा. ॥९॥


वदति जीं वचनें परितोखदें, भवतमाप्रति होतिच ओखदें; निवविले बहु वंदुनि मागती, भजन ते जन तेथचि जागती. ॥१०॥


कथिति जेथ मुकुंदयश:कथा त्यजुनि विठ्ठलभक्त भवव्यथा; निरखितां करूणामृतवृष्टिचें अजिर तें, जिरतें अघ सृष्टिचें. ॥११॥


सम सदा अमृत प्रभु वर्षतो, निवुनि सर्वहि सेवक हर्षतो; घनचि विठठल, भक्त मयूरसा, समजला मज, लास्य करी तसा. ॥१२॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.