Jump to content

महद्विज्ञापना

विकिस्रोत कडून

श्रीरामभरतलक्ष्मणशत्रुघ्न ! महादयालु हो ! पावा. ओपावा अभयवर प्रणतीं, दीनीं न सुज्ञ कोपावा. ॥१॥ श्रीयाज्ञवल्क्यशिष्यप्रवरमहाराजजनकवरकन्ये ! सदये ! वद, येइल, यश, मानेल प्रभुसि वच तुझें धन्ये ! ॥२॥ प्रभुच्या चरणवियोगें स्वात्मा तुज पोळला सुतनु ! ठावा. माता म्हणेल काय ‘ स्वपदावरि लोळला सुत नुठावा ’ ? ॥३॥ वायुसुता ! आर्जविला त्वां दास्यें राम कंजनाभ वनीं. स्तविली लोकेशांच्या अदितिशिवाशीच अंजना भवनीं. ॥४॥ तारावें दीनातें हे ! सदया मारुते ! मनावरि घे. काय जडाहि प्रेरिल ताराया सागरीं न नाव रिघे ? ॥५॥ तूतें स्वसमसमर्थ प्रख्यात सकृप म्हणोनि आर्यातें चिरजीवी करुनि प्रभु गेला ठेवूनि याचि कार्यातें. ॥६॥ नमितों पाय वसिष्ठा ! शरणागत जामदग्न्य हा बा ! मीं; कामी, क्रोधी, लोभी, सांगुनि शिष्यासि, उद्धरा स्वामी ! ॥७॥ विश्वमित्रा ! तूंही गुरु, कीर्ति तुझीहि होय मुद्धारा; आज्ञा करितांचि, करिल माझ्या श्रीरामचंद्र उद्धारा. ॥८॥ देतात गौतमा ! मज कामक्रोधादि हे खल त्रास. ‘प्रभु उद्धरिल ’ असें म्हण; आला प्रत्यय तुझ्या कलत्रास. ॥९॥ अत्रे ! अनसूये ! मजविषयीं दत्ता सुतासि सांगावें. म्यां होउनि मुक्त सुखें नित्य तुम्हां सदयमानसां गावें. ॥१०॥ भीताभयदानस्वव्रत घटजमुने ! मनांत आठीव, माझ्या उद्धाराचा श्रीरामातें निरोप पाठीव. ॥११॥ बा ! पाव जामदग्न्या ! रामा ! तूं शत्रुमृगकुळीं हरिसा, मज तव गोत्रोत्पन्ना पीडिति कामादि नित्य हे अरि सा. ॥१२॥ न सुचे उपाय; झालें अरिषट्का चित्त वश्य पापा हें सांग सुतासि, मजकडे तूं तरि हो सदय कश्यपा ! पाहें. ॥१३॥ सांग भरद्वाजा ! तूं, प्रभु वंदी तव पदासि सुतसा जो, न करिल काय वचन ? तो पुण्ययशें उभयविश्वनुत साजो. ॥१४॥ माते अरुंधति ! तुवां मद्विषयीं एकदाचि बोलावें, गुरुचें, गुरुपत्नीचें वचन सुशिष्यें समान तोलावें. ॥१५॥ प्रभुचा परम प्रिय तूं बंधु, सखा, सचिव, बहुकृपापात्र; बा ! त्रस्त तुजसमचि मीं ‘ तारावा दीन ’ बोल हें मात्र. ॥१६॥ तुज सर्व साधु म्हणती श्रीरामपदप्रसादपात्रास तूं परम धन्य. नाहीं काळापासुनि तुलाचि बा ! त्रास. ॥१७॥ धन्य प्रह्लाद, बळी असुरांत; निशाचरांत तूं धन्य, अन्य प्रख्यात नसे. तव बंधु ज्येष्ठ पंडितमन्य. ॥१८॥ सुगळासि पांचवा, तुज वदली प्रभुबंधु कविसभा सावा, इतराची काय कथा ? हा धर्मन्याय रविस भासावा. ॥१९॥ लंकेचें राज्य दिलें तुज यावत्काळ चंद्रमातरणी; धरणीं तों रामकथा जोंवरि भवसागरीं महातरणी. ॥२०॥ भगवत्प्रसादभाजन बा ! जन तूं साधु पुण्यपदशील; योग्य तुज प्रणताचा उद्धार; प्रभुसि कां न वदशील ? ॥२१॥ परमयशस्कर कीं हा दीनजनोद्धार तूं करिव, राज्या ! याचि यशातें पावो, प्रभु पावे तारितां करिवरा ज्या. ॥२२॥ भक्त श्रीरामाचा मीं, हा झाला जगांत बोभाट ज्या प्रभुतें जो वर्णी सत्कार्य प्राकृताहि तो भाट. ॥२३॥ जरि न समुद्धरिला, तरि विश्वांत करील भंड हा नीच. प्रभुकीर्तिस होय, परें करितां दासासि दंड, हानीच. ॥२४॥ न धरुनि शंका लंकानाथा ! वद ‘ जरिहि पतित, पाव नता; श्रीरामा ! रुसवावी आदरिली ती न पतितपावनता. ’ ॥२५॥ उद्धरुनि शिळा केला प्रभुदित तो अतितपा वनामाजी; बा ! दुष्करा समुद्धृति काय अशा पतितपावना माजी ? ॥२६॥ सामर्थ्य विश्वविश्रुत, अमित समुद्रांत तारिले दगड, होइल कीर्ति, प्रभुशीं मजविषयीं बा ! बिभीषणा ! झगड. ॥२७॥ अथवा कुबेर, शंकर, नारद, इकडून सूत्र लाव कसा ! तुज जड नसेंचि बा ! मीं, दीनतर खगेश्वरासि लावकसा. ॥२८॥ गुण पुससिल, तरि पढला शास्त्रास न मंद हा, न वेदास; येतें नामाचि; सर्वश्रेष्ठ म्हणुनि ज्यास मानावे दास. ॥२९॥ आहेंचि लहान, तुझ्या, बा ! न म्हणावाचि परि लहान, मनें, कीं गुरुयशस्कर पतित उद्धरिला कोटि करिल हा नमनें. ॥३०॥ मज भागवतांचा, कीं नामाचा भरवसा, न इतरांचा, बा ! अकलंका ! लंकानाथा ! बाळासि जेंवि पितरांचा. ॥३१॥ द्रवलें नाम, तुम्हींही गुरु भागवत द्रवाल, अटकळतें; परमप्रिय नाम तुम्हां; यासि न जें अनुसरेल फ़टकळ तें. ॥३२॥ आदिकवे ! प्रभुचरितीं सुज्ञ, जडहि, पावतो हुरुप, रमतो; श्रीरामचरणकमळीं लाविल जीवांसि जो, गुरु परम तो. ॥३३॥ गातां त्वत्कृति, मानिति पुरवासाहूनि कुशल वनवास. स्मरति, स्मरविति न वपुहि, केवळ तव शिष्य कुश लव, न वास. ॥३४॥ झालासि पढविता प्रभुपुत्रांतें रचुनि तूं सुकाव्यास, देवर्षिवरें जैसें निववाया भागवत शुका व्यास. ॥३५॥ तें आयके स्वयें प्रभु, हयमेधीं सत्सभेसि आयकवी; नायक विद्वांसांचा निवुनि, म्हणे, ‘ रचिल अन्य काय कवी ? ’ ॥३६॥ चरित श्रीरामाचें जें शतकोटिप्रविस्तर, तशातें तूं सुललितप्रबंधें रक्षक सुकविच बलप्रद यशातें. ॥३७॥ त्यजिली वनांत अनघा, ती त्वां प्रतिपाळिली, जसी तातें, उपकारलक्ष विसरे पलहि न रघुराजमति, न सीता तें. ॥३८॥ जनकदशरथांचा तूं प्रियसख, तातचि, न हें किमपि चित्र; गृध्रा जटायुतें प्रभु ‘ तात ’ म्हणे, गुरुचि होय गुरुमित्र. ॥३९॥ भीड तुझी प्रभुला गुरुगाधिसुताची जशी तशी आहे, वाल्मीके ! भगवंता ! माझी विज्ञापना तुला बा ! हे. ॥४०॥ प्रभुसि कथुनि, मज तारीं; विश्व तुझें यश महाकवे ! गाय. धर्मज्ञा ! वाल्मीके ! आली तृषिता न हाकवे गाय. ॥४१॥ ब्रह्मण्य श्रीराम प्रभु, करि राहुनि समोर विप्राज्ञा; वेदचि मूर्त स्ववच; श्रोत्यांचा तूं तमोरवि प्राज्ञा ! ॥४२॥ लिहिलें त्वांचि प्रभुवर, सर्व करुनि उक्त, हर्षवि श्वातें, बा ! तुजचि न, देइल हा जन, होउनि मुक्त, हर्ष विश्वातें. ॥४३॥ ज्यातें त्यातें ‘ तारा, तारा ’ म्हणतों, नमूनि मीं पाय; म्हणसिल मज लुब्रा म्हण. सुब्राह्मणसत्तमा ! करूं काय ? ॥४४॥ अर्थिजनें प्रार्थावे, जेंवि सुमलिनें अयें परिस, दाते फ़ळतीच, आर्जवावे, बहु सोडुनि आळसा, परि सदा ते. ॥४५॥ पसरुनि आनन, मान न धरुनि, वरुनि दासता दरिद्र वदे, अकरुणधनिकजनमनीं लेशहि न प्रार्थना तरि द्रव दे. ॥४६॥ बा ! साधु तुम्हीं, न तसे नतसेवककामकल्पतरु, सावे, पावा मज. न तुम्हांवरि तुमचे गुण ‘ हंत ’ जल्पत रुसावे. ॥४७॥ बोलाना, भेटाना; भ्यालां पापासि ? नारदस्वामी ! काय म्हणेल तुम्हां ? जो म्हणतो ‘ भवसिंधुपारद स्वा मीं. ’ ॥४८॥ बा ! पापिजनोद्धारीं तुजचि सदा परम हर्ष देवर्षे ! देसी प्रणतांसि, जसा मेघ मयूरांसि हर्ष दे वर्षे. ॥४९॥ तुज भामादुर्गांहीं हरिहर दिधले, तुझी खरी सत्ता; न असा अन्य, ब्राह्मणवर भृगु मारी जह्री उरीं लत्ता. ॥५०॥ अघ काय तुजपुढें ? बा ! तें तृणसें, तूं प्रदीप्तपावकसा; देवा ! वाल्मीकिगुरो ! मज तारायास धांव, पाव कसा ! ॥५१॥ बा ! भवदनुग्रहेंचि ध्रुव बाळ ध्रुवपदासि तो पावे. त्वां, तुज ‘ नमोsस्तु ’ म्हणतां, प्रणतां पुरुषार्थ सर्व ओपावे. ॥५२॥ बाळ प्रह्लादहि तो अहितोपद्रबशताब्धिला तरला. तो त्वत्प्रसाद कीं मति झाली स्मरणीं न विष्णुच्या तरला. ॥५३॥ होतांचि तव अनुग्रह, हरिचा होतोचि नारदा ! साचा. प्रभुनें केला आहे बहुमान तुझ्याचि फ़ार दासाचा. ॥५४॥ फ़िरसि सदा, उद्धरिसी प्राणी संसासंकटीं पडला; अडला नुपेक्षिला त्वां. दीनजनोद्धार बहु तुला घडला. ॥५५॥ वदलासि यशें व्हाया सत्यवती जेंवि अदिति हा साजो. फ़ार निवविला तोही त्वांचि, रची सुकवि सदितिहासा जो. ॥५६॥ गातों प्रभुसि यथामति; मजवरि तूं सुप्रसन्न, आइ कसी ! सद्यश वीणारा हो; वीणा राहोचि; कां न आइकसी ? ॥५७॥ अथवा गा तूंचि, जसें गासी ‘ श्रीराम ! कृष्ण ! राम ! हरे ! ’ भागवतमुखेंचि प्रभुनामश्रवणेंचि सर्व काम हरे. ॥५८॥ प्रेमें गातोसि महाभागा बा ! गा तसेंचि नाकर्षे ! भागवतगीतभगवत्सुगुणश्रवणेंचि चित्त आकर्षे. ॥५९॥ प्रभु भक्तगीतनिजगुण ऐके, मग तूंहि कां न आइकसी ? बा ! बाळकवचनातें देती सप्रेम कान आइ कसी ? ॥६०॥ युक्ति शिकिव मज बा ! मीं गाय, नसे वानरा मना माया काय करूं ? बहु माने गायनसेवा न रामनामा या. ॥६१॥ मातें तारावें हें वाटें आलेंहि जह्रि मना काम, प्रभुचें मन सचिवाच्या पाहे, तव संमता तसें नाम. ॥६२॥ भागवत बरा वाटे, माझा उद्धार मानला आहे; नाम मन प्रतिनिधिचें प्रभुच्या अनुमोदना तसें पाहे. ॥६३॥ भगवन्नाम तव मुखीं बा ! वास करो तसा दयालो ! हें पावावा त्वच्चरनस्पर्शमणिवरप्रसाद या लोहें. ॥६४॥ प्रह्लाद व्याळाच्या दिगिभाच्या चुकविना रदास; मज दे सत्व, तसें त्वद्यश हो, हें तूं सुकवि नारदा ! समज. ॥६५॥ प्रह्लादा ! गुरुसि रुचे जी बोले परम लाडिका वाणी, मुनितें विनवुनि चिकटिव तच्चरणीं पर मला डिकावाणी. ॥६६॥ तुज गुरुचें, श्रीहरिचें दर्शन आहेचि सर्वदा साचें, प्रभुनें कथिलेंचि असे पुरवाया इष्ट सर्व दासाचें. ॥६७॥ म्हणतां ‘ माग ’ विनविला त्वां प्रभु, जडजीव उद्धरायातें. व्यासशुकप्रमुखसुकवि गाती यश परम शुद्ध राया ! तें. ॥६८॥ बा ! त्वत्पुत्र विरोचन, याचक सुर विप्रवेष हें कळलें, तरि दे स्वायुष्य सुखें, स्वमनांत म्हणे, ‘ सुपुण्य हें फ़ळलें. ’ ॥६९॥ पुरवी शंकर सांगे जें स्वामीसाचि बाण पणतू तें, धन्यतमा ! वर्णाया आहे कोणास जाणपण तूतें ? ॥७०॥ त्वत्सम अधिकहि वाटे प्रह्लादा ! पौत्र जो तुझा बळि तो, तत्कीर्ति - सुरभि म्हणती, ‘ कवि अन्या कीर्तिधेनु कां बळितो ? ’ ॥७१॥ बळिला विनवूं कैसा ? सोडूनि तुला महाप्रभा वढिला, प्रभु तव वचनें स्तंभीं प्रकटे; झाला न हा प्रभाव ढिला. ॥७२॥ अथवा बळिस विनवितों; वाटे निपटचि लहान हें कार्य, तुजचि कसें मीं सांगों ? जैसा प्रभुवर तसाचि तूं आर्य. ॥७३॥ बा ! बळि ! उद्धरिव कसा, सांगुनि सद्वारपाळका मातें, कार्य निरोपेंचि करिल; न चुके सद्द्वारपाळ कामातें. ॥७४॥ तूं ब्रह्मण्य, ज्ञाता; दीनजनोद्धार हे प्रभुक्रीडा; आयकिलें सुवदान्या ! नाहीं न म्हणोंचि दे तुज व्रीडा. ॥७५॥ आचार्य नकार सिकवि बहुबहु, परि तव मुखास येनाच, गी म्हणती कीर्तिस, ‘ कविवदनीं, द्याया सुखा सये ! नाच. ’ ॥७६॥ जड उपकार न करिल, स्वाधीन असोनि कल्पनग, मोहें; सुज्ञा ! अल्पोद्धारें यश जें, तें होय अल्प न, गमो हें. ॥७७॥ पाणी एकोपंत द्रवुनि विकळ तृषित रासभा पाजी. ‘ तें लक्षविप्रभोजनसम झालें म्हणति साधु बापा ! जी ! ॥७८॥ म्हणशील, ‘ बांधिला जो मानी, केला पदच्युत, छळिला, स्वार्थपरा ! अविवेका ! सांगसि हें कार्य काय त्या बळिला ? ’ ॥७९॥ तरि हें मीं मानीना, त्वांचि छळिला मुकुंद, फ़सवीला. वसवींला प्रभु ! सुतळीं, करुनि निजद्वारपाळ, बसवीला. ॥८०॥ ‘ तूं दीन; दीनबंधुप्रभु; न विनविसी स्वयेंचि कां गा ! या ? ’ म्हणसिल बा ! बळिराज्या ! जरि, सांगसि कां मलाचि सांगाया ? ॥८१॥ तरि बा ! त्वदधीन सदा; द्वार कसें द्वारपाळ सोडील ? मोडील न्याय न, हें आज्ञेनें यश पळांत जोडील. ॥८२॥ स्वाधीन प्रभु असता, दीनजनाचे हरावया कष्ट; हरि ! हरि ! तरि मज इतुकी ग्लानि करावी न लागती स्पष्ट. ॥८३॥ सुज्ञ ! समर्थ ! उग्र कां ? पतितोद्धारीं यशोर्थ मन घाला. प्रभु ! हो ! हेचि प्रभुता, नवल न जरि उद्धराल अनघाला. ॥८४॥ व्यासा ! बा ! साक्षात् तूं नारायण, जडजनासि ताराया, अवतरलासि दयार्ण्व बोधें अज्ञान सर्व साराया. ॥८५॥ कवि म्हणति, ‘ उजळिली त्वां मारीचसखा पराशरा ! वाती. मंगळघटप्रतिष्ठा मोट्याहि न खापरा शरावा ती. ’॥८६॥ वर्णुनि सत्यवतीतें कश्यपसह म्हणति अदिति ‘ हा साधू तीर्था त्रिविक्रम तसा म्हणतो जगदंह सदितिहासा धू. ’ ॥८७॥ तुझिया सूक्तिश्रवणें लेशहि तापत्रयें न बाधावें. बाळें स्तन्यें, अन्यें अमृतरसेंही, असें न बा ! धावें. ॥८८॥ जी शारदी निवविती सर्व चकोरांसि पुनिव, राहो ती. त्वत्सूक्ति सेवित्यांसि न तिळहि पुह्नां ताप मुनिवरा ! होती. ॥८९॥ पळही जसे स्वरूपा, ज्ञाते विसरति न विप्र भागवता; ग्रंथ न असा पर; न दे दर्भत्व वरुनि नवि प्रभा गवता. ॥९०॥ बा ! त्वत्प्रसाद हो या तप्ताच्या एकपळ वितान वरी. मज उद्धरु जो कुंडिननगराजवळूनि पळविता नवरी, ॥९१॥ म्हणसी, ‘ व्हा भागवत, प्रेमें पाहोनि भागवत, नाचा. ’ सर्वांसि सर्व देसी स्वसुख; पिता दे विभाग वतनाचा. ॥९२॥ म्हणसी, ‘ भागवता ! हो मुक्तहि, भगवत्कथापर शुका पी. ’ म्हण मजहि; अरींस तुझा बोध जसा दे व्यथा परशु कापी. ॥९३॥ करुनि कृपा शप्तनृपापरि तारीं तूंचि बा शुका ! मातें. पुरवी साधु नताच्या न तसा कल्पद्रु आशु कामातें. ॥९४॥ राजा रंक सम तुला; त्वां निववावाचि तापला जीव. बा ! वरिवरिच निववित्या चंद्रा, हरुनि त्रिताप, लाजीव. ॥९५॥ सांगे प्रह्लाद गुरुप्राप्त समुपदेश दैत्यतोकांतें; नसतां यश प्रकटिता ज्ञान, जसें चंद्र शैत्य, तो कां तें ? ॥९६॥ कथिलें भागवत तुवां इंद्रप्रस्थाकडील विप्राशी. हे कीर्ति ‘ भक्तमाळा ’ कथिती, जिस सर्व सत्कवि प्राशी. ॥९७॥ श्लोक, श्लोकार्ध मला कीं सांग श्लोकपाद, नव्यास. सर्वगतचि तूं, ऐके काय द्रुमदत्तसाद न व्यास ? ॥९८॥ हो सकृप पुंडरीका ! ज्ञानेशा ! पाव, नामदेवा ! हूं. सांग तुकोबा ! प्रभुच्या चरणीं मन आठ याम दे वाहूं. ॥९९॥ गुरु हो ! पढवुनि जड हरिनाम म्हणायासि जेंवि शुक लावा. हा चिदचिद्भंथि तुम्हीं बाळकगलपाश तेंवि उकलावा. ॥१००॥ मागें झाले, आतां असती, होणार जे पुढें काय, त्या भागवतांचे म्यां भावें साष्टांग वंदिले पाय. ॥१०१॥ नामें चोखामेळा वाटे बहुधन्य तो महार मला; कीं भगवद्भजनींच, त्यजुनि सकळ धामकाम, हा रमला. ॥१०२॥ भागवतज्ञानिसभामान्य सुकवि, जरि कबीर हा यवन; हरिचें म्हणे, न पाहुनि यासि, न वाहुनि अवीर, ‘ हाय ! ’ वन. ॥१०३॥ ज्ञानें काय हरिजना म्हणतात महार, यवन, कुणबी जीं ? उमटे तोचि तरुफ़ळीं, असतो जो काय गुप्त गुण बीजीं. ॥१०४॥ नच वचकति हे भक्त, श्वपच वर म्हणे तया शुका नर कीं; निपट बहिर्दृष्टि असे जे बुडती काय ते फ़ुका नरकीं. ॥१०५॥ म्यां तों तुमचे चरण श्रीहरिजन हो ! सदैव वंदावे. भगवान् प्रसन्न होतो येणें, कलिकालमोह मंदावे. ॥१०६॥ भगवान् भागवतजना ! परमप्रेमें तुला सकळ वळला. बाळा ध्रुवा पहातां, प्रभु, जेंवि पिता मुलास, कळवळला. ॥१०७॥ हरिजन हो ! हरि करितो आंगें तुमचीच बरिक सेवा जी ! धुतले धनंजयाचे केवळ अश्लाध्य परि कसे वाजी ? ॥१०८॥ दामाजीचा होउनि हरि पाडेवार बेदरा गेला. पंडित रागेले, परि नच तत्प्रेमज्ञ बेद रागेला. ॥१०९॥ न करी जपोनि अंगें बळकट घालून काय कछ पर ? त्या नामदेवजीचें श्रीविठ्ठल विश्वनायक छपर. ॥११०॥ एक जनी हरिभक्ता सिंप्याची ‘हरि हरी ’ म्हणे बटिक; तीस दळाया लागे भगवान्; वदतील साधु कां लटिक ? ॥१११॥ कोठें उष्टीं काढी, क्कोठें खटपट करी, भरी पाणी; त्याचा होय गुमास्ता, श्रीरामानंदशिष्य जो वाणी. ॥११२॥ म्हणती, परि न भुलविला राघेनें प्रभुवियोग परिणामीं. युष्मद्भक्तिमुकुंदां स्मरतां, स्मरतोंचि गीतिगरिणां मीं. ॥११३॥ तुमची भक्ति श्रीहुनि, वन्येहुनि जेंवि नागरी, बरवी; भक्तिप्रताप कोठें ? कोठें हा अरितमा गरीब रवी ?॥११४॥ चिंता हृदयींच पुरे, जडहि म्हणे ‘ प्राप्तकाम होचि मणी. ’ प्रभुला किमपि न दुर्घट. भारी गरुडासि काय हो चिमणी ? ॥११५॥ जें चिंतितां तुम्हीं बहु वत्सळ सर्वत्र सर्वदा सम जे, अकथितही सर्वज्ञा देवाधर्मादि सर्वदा समजे. ॥११६॥ निजभक्तोष्टयशस्कर जें कांहीं, तें न सांगतां करितो. परि तोषप्रद केलें न वदे, न मनींहि आठवी हरि तो. ॥११७॥ म्हणुनि स्वमनींच म्हणा ऐसें मज किंकरासि सज्जन हो ! " वत्सा ! देव तुज म्हणो ‘ मत्कीर्तिसुधेंत मज्ज, मज्जन हो. ’ " ॥११८॥ साकेतीं झालां जे श्रीसीतारामभक्तबावाजी, भरत तसे प्रभुवल्लभ, ते मज शरणागरासि पावा जी ! ॥११९॥ मथुरापुरींत झालां जें श्रीमत्कृष्णभत्कबावाजी, देवासमीप वसतां, ते मज शरणागरासि पावा जी ! ॥१२०॥ वृंदावनांत झालां जे राधाकृष्णभक्तबावाजी, श्रीवैकुंठीं वसतां, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२१॥ मायापुरींत झालां जे कोणी विष्णुभक्तबावाजे, दीनाचे बंधु तुम्हीं, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२२॥ वाराणसींत झालां जे हरिहरभक्तराजबावाजी, हरिहारसमीप वसतां, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२३॥ कांचीपुरींत झालां जे सदय मुकुंदभक्तबावाजी, अघहरिते हितकरिते, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२४॥ प्रकट अवंतीमध्यें झालां जे श्रीशभक्तबावाजी, निरुपमगुणरत्नाकर, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२५॥ श्रीद्वारकेंत झालां जे श्रीयदुराजभक्तबावाजी, शुचिकरुणावरुणालय, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२६॥ पुरुषोत्तमसुक्षेत्रीं झालां जे प्रेमसिंधुबावाजी, भक्त जगन्नाथाचे, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२७॥ जे पैठणांत झालां आदिकरुनि एकनाथबावाजी, शांतिनिलय भूतसुहृद्, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२८॥ पंढरपुरांत झालां जे, व्हाल, असाल भक्तबावाजी, श्रीविठ्ठलरूप तुम्ही, ते मज शरणागतासि पावा जी ! ॥१२९॥ जे पूर्वदक्षिणोत्तरपश्चिमदेशांत, मध्यदेशांत, जे ऊर्ध्वाधोदेशीं, जे सुरदितिदनुजमानवेशांत, ॥१३०॥ श्रीहरिहरभक्त सकलतीर्थक्षेत्राचलस्थलवनांत, त्यांच्या, ‘ हा प्रणत तरो, ’ ऐसें येवू सकृत् तरि मनांत. ॥१३१॥ इतरांहीं स्वबागचे, गरलाग्नि तुवांचि शंकरा ! खावा. बा ! उपमन्यु, स्तेन, व्याध तसा हाहि रंक राखावा. ॥१३२॥ जगदंबे ! तूं, प्रभुला प्रार्थुनि, बहु उद्धरीत आलीस. मजविषयीं सांग; नको सांगों सांगावयास आलीस. ॥१३३॥ भगवति ! करुणामयि ! तव दयित वचन तो कधीं न मोडील. जोडील क्षणमात्रें यश, वश पति पतितपाश तोडील. ॥१३४॥ त्या कालकूटपानीं त्वां अनुमोदन दिलें कसें पतितें ? जें मदपराध गिळणें हें दुष्कर कर्म होय कीं सति ! तें ? ॥१३५॥ रेणुस करिल सुमेरु प्रभु, रेणुचि करिल कीं सुमेरूस ? वद; रदबदल नच गणिल जरि, तरि पळमात्र तूं उभे ! रूस. ॥१३६॥ हरिनामा ! तार दहामांजि पदर धरिल हा लघु सलील. अर्थी इष्ट न मिळतां नच सोडिल, करिल हाल, घुसळील. ॥१३७॥ भगवन्नामा ! अपयश होऊं देऊं नको. पतित सारे तरले, एकचि उरतां, कोपेना काय तो पति तसा ? रे ! ॥१३८॥ श्रीहरिहरनामें हो ! जह्रि बहु दोषी असा धुवा दास दीनीं एकींच अदयपण, तें पोषी असाधुवादास. ॥१३९॥ मी दीनबंधु ऐसें मिरविसि विश्वांत सर्वथा नातें. न धरूं देसी जननीसुरभींच्या लेश गर्व थानांतें. ॥१४०॥ बहु भजुनि रामनामा ! वैकुंठीं सर्वथा पतित रमला. बा ! न करु बाज होउनि आपण कळिकाल पाप - तितर मला. ॥१४१॥ चिंतामणिच्या धामा ! विसरविसी स्वर्गतरुकुसुमदामा. आम्हां बाळां आमा रामाचा प्रतिनिधीच तूं नामा ! ॥१४२॥ नामा बा ! माता तों वात्सल्यें त्वां उदंड लाजविली. उद्धरुनि पतित रामप्रभुकीर्तिहुनि स्वकीर्ति साजविली. ॥१४३॥ वसलेंसि पिंगलेच्या जैसें, श्रीनारदादि धीराच्या, रामसुतमयूरमुखीं वस नामा ! वससि जेंवि कीराच्या. ॥१४४॥

उपसंहार ( अनुष्टुभ् वृत्त )

श्रीसद्गुरुप्रसादें हा उपाय हित पाहिला; ‘ महद्विज्ञापना ’ नाम ग्रंथ रामासि वाहिला. ॥१४५॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.