Jump to content

विठ्ठलप्रणिधि

विकिस्रोत कडून

( श्लोक ) वंदेsहं दातुं शं देहं धृतवान्प्रभु: ।

संदेहं हन्तुमुदितो मंदेह योंsशुमानिव ॥ १


( गीतिवृत्त ) प्रल्हादा अन स्पर्शे पीडा स्मरणें असें भले वदले,

गद लेशहि न उरावा भक्तीं कीं नच तुझी कृपा बदले. २


बा परमवत्सला ! तूं उद्धरिता जाहलासि आर्तातें,

जें दे तुला गजाची, प्रिय पुत्राची पुत्या न, वार्ता तें. ३


त्वां अत्युग्रव्यसनीं लीलेनें अंबरीष वांचविला,

पुण्य प्राज्य यशांचा, ध्रुव शिशु रक्षूनि, राशि सांचविला. ४


पुरवुनि अनेक वस्त्रें गौरविली द्रौपदी जळजनाभें,

त्वां अद्भुत प्रतापें दिधलें बहु त्या महाखळजना भें. ५


‘ आत्मकथा भक्तकथा तुज रुचती ’ व्यास-शुक असें कथिती,

‘ नानापापें नानादु:खें नानामहाभयें मथिती. ’ ६


कीर्तन तुज आवडतें, साच कथिति पुंडरीकवरदा ! हें;

कीर्तनकरजनतापें तुज व्हावें दु:ख जेंवि करदाहें. ७


वांचविला जो पावे मरण उपजतांचि करुनि आ बाळ.

तूं माय दीन शिशुची होउं न देसी कदापि आबाळ. ८


कीर्तन नित्य प्रेमें करितां, छाया स्वयें करिसे पदरें,

नामनिरतशबरीचीं त्वां उच्छिष्टेंहि भक्षिलीं बदरें. ९


जेंवि तुकोबा जैसा एकोबा, नामदेव तत्सम हा,

त्वत्कीर्तनरत विठ्ठल ! पावावा जेंवि सुरभिवत्स महा. १०


कां भक्तवत्सला ! वा ! सांप्रत झालासि तूं उदासीन ?

प्रभुची सेवालेशें झाली काय प्रिया कुदासी न ? ११


प्रभु असुनि अशक्त-तसा कां ? हें नच होय उचित महिम्यातें;

सुचवूं नये यशस्कर जें कार्य अवश्य शुचितमहि म्यां तें ? १२


स्वप्रियभक्त असा कां होवूं दिधला जगांत बोभाट ?

रक्षावाचि व्यसनीं प्रभुनें तो प्राकृतेंहि जो भाट. १३


सदय कसा कुरवाळी आर्तातें, काय काम हें भारी ?

विश्वेशा ! ये म्हणतां वधिला धांवूनि कां महेभारी ? १४


पूर्वीं जे उद्धरिले आले ते दास काय कामास ?

गाइल तुज कीं देइल वपु कापुनि लोकनायका मास. १५


दीनातें उद्धरितां मिळतें यश शुद्ध काय हें थोडें ?

यश जोडाया केलीं मानधनांहीं कलेवरेअं रोडें. १६


कुरवाळिल्याविना मृत गोपाळकुमार उठविले क्षिप्र,

अवलोकुनिच तसा त्वां उठवावा हा कृपाकरें विप्र. १७


‘ दासा ! हा मी आलों ’ ऐसी देऊनि हांक हांकेला,

द्यावा धीर दयाळा ! कष्टी सेवक नहाक हा केला. १८


बा विठ्ठला ! तुजविणें परिपाळक कोण सोयरा जीवा ?

जीवन तूं, शोभा तव यश, जेंवि द्युमणि तोय राजीवा. १९


आत्मा गुण, देह फ़णी, स्पष्ट असा बोध यासि अथवा हो,

अभयवर विठ्ठला ! दे, धडक तुझा भक्तिराजपथ वाहो. २०


आबाळवृद्धलोक त्वन्महिम्यानें तसाचि रिझवावा,

जेणें कीर्तनवर्षें श्रोत्यांचा तापदाव विझवावा. २१


विषशिशुनागें रोगें तव जन न करूनि आ बरा खावा,

स्वप्रभुताभक्तींचा उत्साह धरूनि आब राखावा. २२


निजपापकर्म फ़ळ जें म्हणसिल भोगूनि सर्व सारावें,

अघ पूतना अजामिळ बक यांतें तरि कधीं न तारावें. २३


चित्रपटांत लिहविल्या योनि चतुरशीति लक्ष ज्या उक्त,

त्यांवरि शिष्य फ़िरविला, गुरुनें केला भवव्यथामुक्त. २४


विश्वगुरु पांडुरंगा ! तूं तारीं करुनियां असें कांहीं,

किमपि अशक्य तुला बा ! प्रभुवर्या ! भक्तवत्सला ! नाहीं. २५


रंगांत प्रेमभरें ज्याचे त्वत्कीर्तनीं आसु खपावे,

तो विठ्ठलप्रभो ! तव भक्त, कसें वा ! असें असुख पावे ? २६


प्रेमें कीर्तन करितां नित्य घडावा कसा महादोष ?

तोष प्रभुला व्हावा, त्यांत उठावा न सर्वथ रोष. २७


देवा ! तूंचि समर्थ स्वजनाची कीर्तिलाज राखाया,

त्वद्दासाहुनि अन्या लागे व्यसनांत काजरा खाया. २८


ज्याच्या हृदयीं वससी, होऊं देसी तया कसी पीडा ?

व्रीडा बहुत मज जडा होती, पक्षीहि बहु जपे नीडा. २९


देवा ! जनकाचें मन दु:खित देखुनि मुलास कळकळतें,

रदबदल किति करिल जड, करुणासिंधो ! तुला सकळ कळतें. ३०


गुरु वदले, ‘ संकीर्तन मखकर्मचि कलियुगांत भद्र, सिका; ’

होता तसा असावा, याचा अभिमान तुजचि सद्रसिका ! ३१


संकीर्तनयज्ञ घडो येथें जन्मांतरींहि हा काम

पुरवावा त्वां याचा, त्याचाहि जो जपे तुझें नाम. ३२


भक्तोपेक्षा केली ऐसें म्हणतील तुजहि लोक दहा,

वारावाचि उपद्रव दासाचा सर्वसाधुशोकद हा. ३३


व्याकुळ कीर्तनविरहें, त्वद्विरहेंकरुनि बा ! जसा नंद,

करिव कथा, लोक सकळ हो, हो प्रभु तूंहि आज सानंद. ३४


प्रभुच्या पडुनि गळां गे केली रदबदल, विचकिले दंत,

साहित्य मयूराचें प्रभुजवळिं करोत सर्वही संत. ३५


म्यां, ब्रह्मण्य़ प्रभुवर, परमार्त ब्राह्मणार्थ भावानें,

पसरुनि पदर विनविला, ज्याच्या तरतात पतित नांवानें. ३६


या रदबदलश्रवणें करिलचि विठ्ठल दया असें वाटे,

कीं दीनबंधु हा, श्रुत होतां दीनोक्त, गहिंवरें दाटे. ३७


बहुधा इतुके दिवस प्रभुवर आहे समाधिसुखमग्न,

हें जरि नव्हे, तरि न कां बोले पाहे बसे असे नग्न ? ३८


सोडिल समाधि विठठल, भक्तांगीं पाणि पद्म फ़िरवील,

जिरवील क्षणमात्रें दु:ख, यश त्रिभुवनांत मिरवील. ३९


शमवील सर्व पीडा, स्वप्न तसा भुक्तभोग गमवील,

भ्रमवील न भक्तांतें, स्वपदाब्जीं स्वजनभृंग रमवील. ४०


निजपदभजनीं याचा निश्चय निश्चळ सदा कसा आहे ?

पाहे माया पीडा दाखवुनि स्वजनसत्तमा ! या हे. ४१


प्रभु न जडोक्तीस विटे, वृद्ध जनक जेंवि बाळगाळीस,

भक्तमयूरें लिहिल्या आर्या सज्जनसुखार्थ चाळीस. ४२


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.