विठ्ठलस्तुति

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

श्रीमद्विठ्ठलमस्तकीं वसे सर्वदा त्र्यक्ष;

जाणों निधिवरि जागतो पुंडलिलाच्या यक्ष. १


पुंडलिकाचा हेत या होता धनीं प्रभूत;

जाणों ब्राह्मण जाहला उग्र पंचमुख भूत. २


मेधश्यामप्रभुशिरीं धवलनवेंदुवतंस

शोभे विकचेंदीवरीं जाणों बसला हंस. ३


पादोदक घे मस्तकीं, शिरीं त्यासि दे ठाव;

प्रियभूषण निज जनचि, हा विठ्ठल कळवी भाव. ४


कीं शिव शिवस्त हें असें बसला कळवायास,

भोळा नेणे सर्वहर कळिकाळीं हरिदास. ५


काय हरिशिरीं हर नव्हे ? हर ! हर ! पडली भूल,

आलें मुनिरोपितसुकृत - तरुला उज्ज्वल फ़ूल. ६


संतत भवदवदग्घतनु जन भेटति प्रभूत;

करुणामृतकलशासि या आहे ऊत. ७


कीं सर्वस्व न अर्पिता पूजाप्रकार तुच्छ,

पुंडलिकानें वाहिला स्वसुकृतमौक्तिकगुच्छ. ८


पुंडलिका भक्तोत्तमा द्यावा पदार्थ चोक्ष,

म्हणुनि आणिला परि न घे तोचि हरिशिरीं मोक्ष. ९


नवनीतपिंड सुतशिरीं स्वयें यशोदा माय

स्थापी हा, पीडा न हो म्हणुनि कृपेनें काय ? १०


आझुनि चिह्र उरीं असा भृगुचा वंदी पाय

स्वपदोदकधर हर शिरें मिरवे कौतुक काय ? ११


गुरुभक्तचि भवसागरीं तरोनि तारी लोक;

हे कळवाया शिव शिरीं वाहे पुण्यश्लोक. १२


गुरुभक्ता गुरुभक्त बहु मान्य, पराचा वीड,

जाणों श्रीपतिला दिली म्हणुनि बसाया वीट. १३


गुरुभक्तपणें मान, न श्रीमंतपणें मान,

म्हणुनि खशिरीं स्थान दे दगद्गुरुसि भगवान. १४


पूज्य असोनिहि न धरिती पूज्यपणें जे गर्व

गंगाधर-धर सूचवी, ते तारिति जग सर्व. १५


घनश्याम विठ्ठलशिरीं शोभे शंकरलिंग,

घनपरिवृततुहिनाद्रिचें एक अनावृत शिंग. १६


चिठ्ठलमेघश्यामतनुशिरीं गौररुचि सोम

उदयनगावरि उगवला शरत्पर्तपति सोम. १७


एक उभेंचि करी शिरीं एक बैसला नीट, प्रिय भक्तच्छळ सोसितां न ये विठ्ठला वीट. १८


श्वशुरपितामहमूर्धहर तामसपिशाचमित्र,

तोहि चढविला मस्तकीं भक्तप्रेम विचित्र. १९


भक्तांसीं न तुळे हरि,हरहि मुनींचा राय,

विधि अद्यापि पहातसे शोधुनि तिसरा काय ? २०


छळें नागउनि घातला पाताळीं बळिराय,

तत्सख शिवमुनि उगविती उसणें आतां काय ? २१


स्थळ न मिळो बैसावया, परि सुक्षेत्रीं वास

उचित कलियुगीं, कळविती कैलासाब्धिनिवास. २२


पुंडलिकाचें क्षेत्र हें सिद्धिक्षेत्र ख्यात,

म्हणुनि दिगंबर शिष्यगुरु अद्भुत तप करितात. २३


व्रज रक्षी, गिरि धरुनि करीं, कोपे जैं सुरपाळ,

प्रभु धरि शिरीं गिरीश कीं क्षुब्धजगीं कळिकाळ. २४


जगदवनार्थ सुधा त्यजुनि करि हाळहळपान

त्या सदयांच्या गुरुसि दे प्रभु उचितोच्चस्थान. २५


दोहा मुक्ता गुंफ़िल्या प्रेमगुणीं हा हार

विठ्ठलकंठीं अर्पितां शोभा पावे फ़ार. २६


हा पुंडलिकें बसविला निधिवरि दाता धिंग

कीं जो मागतयासि दे अदेयही निजलिंग. २७


सकरुणदाता नामनिष्ठ जो कामांतक आर्य

विठ्ठल म्हणे जगद्गुरुसि तो मजहि शिरोधार्य. २८


मुनिवैद्यें नुरवावया धन्वंतरिचा गर्व,

रचिले एकींएक रस शुद्ध तापहर सर्व. २९


सादर संतीं सिंपिला शुद्ध सत्त्वरस गोड;

फ़ुटला सुखकंदासि या धवळ बळाचा मोड. ३०


सुरभी करि अभिशेक तो दुग्घफ़ेनसुश्वेत,

शिरिं धरि कीं मज वोळखो गोविंदा सच्चेत. ३१


विपदुद्भृत दीनी दिल्हे सदा सदाशीर्वाद,

माथां पुंजीभूत ते मिरवी पावनापाद. ३२


क्षमा करा हो इष्टमन पापा शंकी दोड

गुरुश्रितें धनभवभरें वाटे आला फ़ोड. ३३


अजरामरचि करावया खचरणनत जनमात्र,

सदय विठ्ठलें वाहिलें शिरीं अमृतरसपात्र. ३४


महाराष्ट्र भाषेंत ही दोहारीति नवीच,

रची मरूरेश्वर इला, मनीं धरील कवीच. ३५



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.