पांडुरंगदंडक
श्रितभके मयूरसम, श्रीविठ्ठलदेव तोयदासम हा
अवलोकिता निरुपमा तत्काळचि पात्र होय दास महा. १
विठ्ठलसद्गुणकीर्तन - पुण्यकथासक्त भक्त ते मुक्त
तारावे जड दीन, व्रत हें या दीनबंधुला युक्त. २
श्रुति म्हणति, ‘ वर्णवे जें वात्सल्य तुझें न तें विठो ! कविला
जनमंतुं जेंवि शमनाकरवीं नमितां न तेंवि ठोकविला.’ ३
स्वपदीं नतांसि म्हणतो विठ्ठल कारुण्यतोयराशि ‘ वत्सा ’
याला प्रिय बहु गमतो दीनजन प्रणत सोयरा शिवसा. ४
प्रभु पांडुरंग आहे करित नतांच्या महा शुभा चिर हा
कीं पुंदरीक वदला, ‘ जडतारायासि तूं उभाचि रहा ’. ५
रुचतें फ़ार विठोबा, जे भोळे म्हणति जें ‘ विठाई ’ तें;
प्रेम - कळेतें पाहुनि भुलतो, बालक जसा मिठाईतें. ६
राधा न, रुक्मिणीही, प्रेमाची मोहिती कळा यास
गीतसुखास्तव लागे हा नित्य जनीसवें दळायास. ७
विठ्ठल म्हणतो, ‘ भावें प्राणी हो ! मज नमूनि भेटा रे !
संचितकर्मवह्यांचे तुमचे मी करिन भस्म पेटारे ’. ८
विठठल तेंवि कथेच्या सत्राच्या निकट तो बराडि कसा;
हा तत्काळ प्रेमळजनहृदयीं चिकटतो बरा डिकसा. ९
भोळ्याही निजभक्तीं अतिवत्सल हा कथा पिकवितो कीं
जरि अप्रगल्भ केवळ, सादर असतो तथापि कवि तोकीं. १०
नाचे, गाय, जन जसे, तोडी थाक स्वयें कथाकरिता,
प्रभु बंध तसे तोडी, जाऊं दे एकही न थाक रिता. ११
जरि बोबडें, पित्याचें मोहावें मन तथापि तोकानें;
प्रभु साळ्याभोळ्यांची बहु वात्सल्यें कथा पितो कानें. १२
राधा श्रीतें म्हणती, ‘ देवि ! कसा देव हा पहा भुलला
प्रभुसि कथारंग तसा, मधुपाला बकुलतरु जसा फ़ुलला ’. १३
नारद म्हणतो, ‘ देवा ! केले हे सर्व मम सखे दास
सुखदा त्वद्भक्ति, जसी ज्योत्स्रा नाशूनि तम सखेदास ’. १४
या पुंडरीकवरदें केले निजदास सर्वही धन्य
निजभक्तभजन करितों आपण, न करील मग कसा अन्य ? १५
अतिरंक, दर्शनार्थी, क्षेत्राच्या पावती परिसरा जे;
ते विठ्ठलासि परम प्रिय, बहुमत नच तयांपरिस राजे. १६
निश्वळ उभा निरंतर विठ्ठल निजनामगजर परिसाया
गमतो स्वनामकीर्तननिरत सखा; जो तदन्य अरिसा या. १७
भक्तयश - स्वयशांतें गात्याच्या ठाकतो पुढें मागें
डोलतसे परमसुखें; डोलावें सुखरें जसें नागें. १८
जो जन्मोजन्मींचा सद्भक्त प्रभु तयास दे वारी
निंदक तो यापासुनि पावे जैसा भयास देवारी. १९
सुगति दिली, परि वधिला प्रभुनें भेदूनि दृढहि उर, वाळी
प्रेमळ भक्त बिभीषण शरणागत जो, तयासि कुरवाळी. २०
भीमरथीच्या तीरीं, किंवा भाविक - कथांत वाळवटीं
तो निरखिला जनें जो मार्कंडेयें मनोज्ञ बाळ वटीं. २१
जें प्रेमळकृतकीर्तन, रुचतें या प्रभुसि आठ यामहि तें
म्हणतो, ‘ सज्जन तारिति हे करुनि अभंग पाठ या महितें ’. २२
भक्तचरित्रकथा तों बहुतचि या विठ्ठलासि आवडती
रामेश्वरासि जैसी श्रीगंगेची सदैव कावड ती. २३
सद्रीतें स्वचरित्रें रुचती या पुंडरीकवरदास
सच्चारितें गाती जे प्रभुसि गमति शुकसम प्रवर दास. २४
विठ्ठल सराफ़ साच, प्रिय बहु या दास वाटवासा च
विठ्ठल सराफ़ साच, प्रिय बहु या दास वाटवासा साच २५
तज्ज्ञमुखें आवडतो वहु ललित ग्रंथ वामनाचा या
अर्थोल्लसनें लागे श्रीविठ्ठल पूर्णकाम नाचाया. २६
एकोपंतें रचिलें रामायण पाठ करुनि जो लावी
प्रभु तत्कथेसि आपण ऐकाया सर्व साधु बोलावी. २७
श्रीज्ञानेश्वररचिता टीका ज्ञानेश्वरी, तिच्या ओव्या
विठठल म्हणतो, ‘ मज या वाल्मीकिव्याससूक्तिशा होव्या ’. २८
मुक्तेश्वरकृत भारत आवडतें विठ्ठलासि; कीं पर्व
सर्व श्रवणें हरितें भाषाकविचा अशेषही गर्व. २९
भक्तयशोरत विठ्ठल नित्य अभिनवाचि भक्तमाळा या
श्रवणीं न शके, मूर्तिप्रतिच नमति, दृष्टितेंहि चाळाया ३०
श्रीनामदेव, तुकया, तदभंग प्रभुसि गोड घांस तसे;
गहिंवरतसे परिसतां, नाचतसे पांडुरंग, हांसतसे. ३१
भक्तकवीरप्रमुखप्रिय परम तदुक्ति सुरस दानरता
म्हणतो प्रभु ‘ या प्याया, मागति मज तरिच सुर सदा नरता ’. ३२
शरणागतभयहर्ता, भक्तजनातें क्षणक्षणीं स्मर्ता
सफ़ळमनोरथकर्ता सदय प्रभुवर्य रुक्मिणीभर्ता. ३३
भक्तवश त्यक्तप्रभुभाव नव्ह पांडुरंग देव कसा ?
बारा वर्षें वसला एकोबाच्या गृहांत सेवकसा. ३४
नामें चोखामेळा जो प्रभुभक्ति प्रिया महारा ज्या
श्रीविठ्ठल बहु मानी त्या, जेंवि युधिष्ठिरा महाराजा. ३५
बाळाच्या सर्कारें माता अतिवत्सळा जसी हर्षे,
भक्तांच्या पूजेनें प्रभु आनंदाश्रु हा तसा वर्षे. ३६
श्रुतसेव, विदुर, अर्जुन, उद्धव, अक्रूर हे जसे भक्त,
व्यक्त प्रभुसि तसेचि प्रिय यवनहि, दास जे पदीं सक्त. ३७
आवडि कळतां, एकोपंताचें रूप घेउनि, स्वामी
हा चोखामेळ्याच्या आपण जावूनि जेवला धामीं. ३८
साधुमुखें आयकिलें हें, कीं जो भक्त सांवता माळी,
त्या लागे खुरपाया, हा भक्ता शिशुसि तातसा पाळी. ३९
जो अर्पिला, मुखांतुनि काढुनि, तो या सुधासम ग्रास
याहुनि शबरी न बरी कां भासावी बुधां समग्रांस ? ४०
विठ्ठल भक्तीं जैसा तैसा वित्तीं न लोल, कीनाश
मातेचीही पावे, याची न कधीं अलोलकी नाशे. ४१
जो भक्त पडों देइल त्याचा हा तात कासया विसर ?
त्या बहु करुणा जैसी निववाया चातकास यावि सर. ४२
पुत्रमिषें नारायण म्हणतां, पावे अजामिळाला हो !
परम प्रसाद सहसा, जैसा त्याही गजा मिळाला हो ! ४३
कैसें तरिही ज्याच्या वदनीं निजनाम भव्यपद येतें
विठ्ठल म्हणतो, ‘ योग्यचि हा, यावरि कां करीन न दयेतें ? ’ ४४
तुळसीच्या माळेनें विठ्ठल होतो प्रसन्न, पिष्टातें
देतो भलत्यालाही, जें द्यावें नारदादिशिष्टातें. ४५
झाले धन्य पहातां प्रासादाच्या दुरूनिही शिखरा;
‘ विखरा यांगरि पुष्पें सुर हो ! ’ म्हणतो, दयाब्धि हाचि खरा. ४६
साहे प्रभु, वागवितां अर्जुनवाजी, महाकसाल्याला;
सुयशोभूषा, दासां देउनि ताजीम, हा कसा ल्याला. ४७
बहु मानितसे गातां सुरमुनितें, तेंवि हरि लहानातें
बुध दीनबंधु म्हणती, तें लटिकें काय करिल हा नातें ? ४८
भक्तकथेंत प्रभुची जी ती वर्णीन काय निष्ठा मी ?
वदला, ‘ देवर्षेsहं भक्ता गायन्ति तत्र तिष्ठामि. ’ ४९
दासें समर्पिलें जें, भक्तिरसें, पत्र फ़ळ तोय,
या पुंडरीकवरदा तें परमप्रीतिकर सदा होय. ५०
वदला सुदामदेवा, ‘ लागति बा ! फ़ार गोड मज पोहे. ’
वहिनीच्या नामातें मद्रसना कां सदैव न जपो हे ? ५१
खाय न खीर खळाची, प्रभु विदुराच्याहि जेविलाचि कण्या
आवडतिच्या सुपार्या होती दगड्या - जुन्या, नव्या - चिकण्या. ५२
भक्ताचा अभिमानी करितो दीनाहि मानवा स्तव्य
प्रभुचें भोळ्या भक्तीं, इतरीं चतुरीं, तसें न वास्तव्य. ५३
जो शैव वैष्णवारी; ज्ञाता वैष्णव तसाचि शैवारी;
त्याहुनि इतरां सर्वां भक्तांचा पांडुरंग कैवारी. ५४
न म्हणेचि रुक्मिणीचा पति अधिक, उणे, जुने, नवे दास;
भक्तांसि तसेंचि, जसें तिळहि पडों दे उणें न वेदास. ५५
‘ बा ! पाव पांडुरंगा ! ’ म्हणतां सहसा म्हणोनि ‘ ओ ’ पावे
प्रभु वर देतो जैसे तातें अर्थ द्रवोनि ओपावे. ५६
जो प्राणी ‘ हरि विठ्ठल, हरि हरि विठ्ठल, ’ असे वदे, वदवी,
त्याला प्रभु दाखवितो, जी आत्मप्राप्तिची बरी पदवी. ५७
बहु आपणासि भक्त प्रिय, हें सर्वा जनांसि उमगाया,
शंभु वसविला स्वशिरीं, स्वप्राप्त्यर्थ स्वकीर्ति-धुम गाया. ५८
धांवुनि भक्तांचें भय हरितो, देतोचि हाक हाकेला;
प्रभु, भक्षुनि पत्र, म्हणे, ‘ द्रौपदि ! मुनि हटिक, पाक हा केला ’. ५९
दूर असो, दीन असो, दासाची विठ्ठलासि आठवण
नामचि पुरे, न घ्यावे अष्टांगीं, नमन करुनि, आठ वण. ६०
प्रभुनें पात्र करावा ज्ञानाच्या, भक्तिच्याहि, रंक रसा
आपण बहु मानावा वानावा सज्जनांत शंकरसा. ६१
प्रभुसि जसी भक्ताची कोणाचीही तसी नसे भीड
भक्तप्रेम प्रभुला चालवि, जैसें तरंडका सीड. ६२
भक्तावरि देवाची जैसी इतरीं नसे तसी माया;
दासीं प्रभुवात्सल्य प्राज्य, म्हणति जाणते, ‘ न सीमा या ’. ६३
प्रभुची त्या मारुतिवरि किति किंवा प्रीति किति गुहावरि ती
जें भक्तांला, तें त्यां दुर्लभ जे अद्रिच्या गुहा वरिती. ६४
भक्तासि ख्याति नको, परि आपण पांडुरंग वाढवितो.
प्रेसुनि भक्तयश जगीं, संसारांतूनि जीव काढवितो. ६५
खळ निंदक जे कोणी त्यांचीं सुकृतें समग्रही हरितो.
त्यांमागें दुष्कर्में भक्तांची लावितो असें करितो. ६६
द्वेषी, निजनिंदक जे, त्यांला दंडूनि तारितो स्पष्ट.
भोगवितो नरकांत स्वजनद्वेष्ट्यांसि बहु युगें कष्ट. ६७
प्रभु म्हणविति परि या तों प्रभुचा कोणीहि करिल हा न पण,
थोरपण प्रणताला देतो घेवून हरि लहानपण. ६८
विठ्ठल म्हणतो, ‘ माझ्या मद्भक्तांच्या यशास गा बाळा !
व्रततीर्थतप:प्रमुखा इतरा झटसी कशास गाबाळा ! ? ’ ६९
नाम न घे, अन्य करी, जो प्रभु पाहुनि तशास कळकळतो;
म्हणतो, ‘ वेड्या ! आत्मा गातां माझ्या यशा सकळ कळतो ’. ७०
जो गहिंवरतो, निघतां प्रभुला वंदूनि, भेटतां काय;
‘ हाय ’ प्रभुहि म्हणे हो, कन्येला धाडितां जशी माय. ७१
वीणा, ताल, मृदंग प्रेमें जन जे कथेंत वाजविती,
विठ्ठलदृष्टि, तयांतें आलिंगुनि, योगियांसि लाजविती. ७२
विठ्ठल मनीं असावा, मजसम रत, नच कथेंत पेंगावा;
सर्व श्रोता योगें तीर्थमखमुखें पथें तपें गावा. ७३
गायन, नर्तन, अभिनय करितां मद्भक्तजन न लाजावा;
काय अधिक वैकुंठीं ? प्रेमळ सोडूनि नच मला जावा. ७४
हृदयांत पांडुरंग प्रभुचा हा दंडक लिहिला जावा;
खळ काय, साधुपासुनि पावुनियां दंड कलिहि लाजावा. ७५
श्रीपांडुरंगदंडक आयकिला साधुजनमुखें कवि हो !
हा सर्वरसिकहरिजनहृदयसरोजांसि सर्वदा रवि हो. ७६
स्मरणें, नमनें, स्वयश:श्रवणेम नि:शेष दोष वारावे;
हा पांडुरंगदंडक जीव जड, प्राज्ञ, सर्व तारावे. ७७
हा श्रीविठ्थलदंडक थंड करी हृदय, हरुनि तापातें.
भक्तमयूर नमितसे विश्वाच्या याचि मायबापातें. ७८
हा ग्रंथ पांडुरंगप्रभुच्या चरणींच अर्पिला भावें,
यांत प्रेम प्राज्य, क्षीररसीं जेंवि सर्पि लाभावें. ७९
गातां प्रभुचा दंडक दंड करीनाचि काळ हा नियम.
कर जोडी गात्यातें जो करितो वृद्धबाळहानि यम. ८०
श्रीपांडुरंगदंडक चंडकर स्वांतवर्ति तम हरितो;
हरि तोषे या ग्रंथें, जो भक्तशिव स्वमस्तकीं धरितो. ८१
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |