विज्ञान-प्रणीत समाजरचना/समाजरचनेत आनुवंशाचे महत्त्व

विकिस्रोत कडून

समाज-रचनेत आनुवंशाचे महत्त्व.

 आफ्रिकेतील शिद्दी, निग्रो किंवा हिंदुस्थानांतील कातकरी, वंजारी हा लेनिन्, रुसो, नेहरू, बोस यांच्या बरोबरीचा आहे व त्याची शिद्दीण, निग्रीण, कातकरीण किंवा वंजारीण ही मॅडम कुरी, ग्रेटा गार्बो, अहल्याबाई किंवा नूरजहान यांच्या बरोबरीची आहे असे जगातील एका पंथाचे मत आहे. त्या पंथाच्या प्रणेत्यांच्या डोळ्यांपुढे कदाचित ही उदाहरणे नसतील, असती तर कदाचित् समतावाद त्यांनी सांगितला नसता. त्यांच्या अनुयायांनी त्या समतावादाची अंमलबजावणी करताना मूलतत्त्वांना काही मुरडी घातल्या असतील हे सगळे जरी खरे असले तरी त्या पंथाचे शुद्ध तत्त्वज्ञान जर घेतले तर वरील विधानाप्रत त्यांना घसरावे लागेल यात शंकाच नाही. सर्व मानव, कोणाच्याही प्रांतांतला वंशातला कुलातला स्थितीतला कोणचाही मनुष्य म्हटला की तो येथून तेथून मूल गुणांनी सारखाच असतो. भिन्न परिस्थतीत सापडल्यानेच त्याच्यात उच्चनीच्चता निर्माण होते, असे या पंथाचे मत आहे. फ्रेंच राज्यक्रांतीतून हे समतेचे तत्त्व निघाले. थोड्या निराळ्या स्वरूपात अलिकडच्या काही पंडितांनी तेच सांगितले व त्या तत्त्वावर समाजरचना करण्याचा आज कोठे कोठे जारीने प्रयत्न सुरू आहे.
 याच्या अगदी थेट उलट टोकाला जाणारा दुसरा एक पंथ आहे. कृष्ण मागे एकदा मोठा होऊन गेला म्हणून त्याच्या कुळांत आज कितीही शेळपट, अजागळ मनुष्य झाला असला तरी तो श्रेष्ठ, कितीही हीन कर्म करीत असला तरी ब्राह्मण कुलात देह जन्मला म्हणूनच केवळ तो मनुष्य वंद्य व आपल्या पराक्रमाने श्रेष्ठपद मिळविणारे महादजी, मल्हारराव इतकेच काय पण शिवाजीसुद्धा (काहींच्या मते) हीन जातीत जन्मले म्हणून तो हीन, असे या पक्षाचे म्हणणे आहे. या तऱ्हेचे तत्त्वज्ञान आज हिंदुस्थानात जारी आहे. मोठ्या जातीत जन्मलेला तो मोठा, लहान जातीत जन्मलेला तो लहान, या तत्त्वावर ही समाजरचना आहे. या तत्त्वाचा प्रणेता मनु होय.
 कोठूनही कोणचाही मनुष्य उचलून घेतला तरी त्याच्या अंगी सर्व गुण सुप्त स्थितीत खास असणारच; व संधी मिळताच तो मनुष्य कोणत्याही क्षेत्रात चमकु शकलेच असे एका पक्षाचे म्हणणे आहे व उच्च गुण हे कुळातच सापडणार अन्यत्र सापडणारच नाहीत, असे दुसरा पक्ष म्हणतो.
 Behaviourism या पुस्तकात वॅटसन म्हणतो,- 'Give me a dozen health infants, and my own specified world to bring them up in, and I will guarantee to take any one at random and train him to become any type of specialist I might select-Doctor, Lawyer, Artist, Merchant Chief and yes, even beggar-man and thief, regardless of his talents, peculiarities, abilities and race of his ancestors' (पान ८२) हे तत्त्व गृहीत धरून समतावादी समाजरचना करू पाहातात.
 कोणच्याही कुटुंबात पाहिले तरी साधारणतः वर्ण, स्वभाव, बुद्धिमत्ता यावतीत मुले आईबापांच्या सारखी असतात. सामान्य दृष्टीलासुद्धा हे साम्य पुष्कळ वेळा दिसून येते. पित्याचे गुण पुत्राच्या ठायी उतरण्याचा हा जो सृष्टीचा साधारण नियम दिसतो, त्याला आनुवंश असे म्हणतात. मनु व आपल्याकडचे इतर सर्व स्मृतिकार यांचा या आनुवंशाच्या तत्त्वावर निःसीम विश्वास असून त्या अन्वयेच त्यांनी आपली समाजरचना सांगितली आहे. रूसो, कार्ल मार्क्स वगैरे लोक या तत्त्वाला मुळीच किंमत देत नाहीत.
 गेल्या पन्नाससाठ वर्षात युरोपात जीवनशास्त्राचा व तदंतर्गत आनुवंशाचाही पुष्कळच अभ्यास झाला व तेव्हापासून बायॉलजी हे शास्त्र इतर शास्त्रांच्या तोडीचे किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे असे तिकडील पंडितांना वाटू लागले आहे. आनुवंशाच्या शास्त्राचा मानवाच्या बाबतीत अभ्यास करून त्याचे जोराने प्रवर्तन करणारा पंडित म्हणजे सर फ्रॅन्सिस गाल्टन हा होय. इंग्लंडमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ, सेनापती, वगैरे निरनिराळ्या क्षेत्रातील कर्त्या, थोर पुरुषांच्या कुलांचा अभ्यास करून याने असे सांगितले की थोर व्यक्ती या अनियमितपणे वाटेल त्या कुळात उत्पन्न होत नसून त्या व्यक्तीचे जवळचे आप्तसंबंधीही- पणज्या निपणज्यापर्यंतचे आप्तसंबंधीही- मोठे पुरुष असल्याचे आढळून येते. मानवाच्या मूल कर्तृत्वात फारसा फरक नसून परिस्थितीलाच सर्व महत्त्व आहे हे जे साम्यवाद्याचे म्हणणे ते अगदी भ्रामक असून मनुष्याचे कर्तृत्व बव्हंशी तो कोणच्या कुळात जन्मला, यावर अवलंबून असते, असे मत गाल्टनने आपल्या 'हेरिडिटरी- जीनियस' या पुस्तकात प्रतिपादिले आहे. इतके करूनच तो थांबला नाही; तर ज्या अर्थी थोर कुलांतच थोर व्यक्ती निर्माण होतात असे दिसते, त्या अर्थी त्या थोर कुलांचा हलक्या कुलांशी लग्नसंबंध होणे हे घातुक आहे असे सांगून शंभर वर्षांपूर्वीच निघालेल्या समतेच्या तत्त्वावर त्याने कुऱ्हाड घातली व समाजाच्या प्रत्येक वर्गातील थोर कुले निवडून काढून त्यांचे आपआपसांत विवाह घडवून आणावे व समाजाने त्यांच्या भरणपोषणाची काळजी इतरांपेक्षा जास्त घ्यावी, असे विचार तो पसरवू लागला. प्रथम त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. पण १८९० च्या सुमारास त्याला अनुयायी मिळू लागले; व आनुवंशाचा- पित्याचे गुण पुत्राठायी संक्रांत होतात- या सिद्धान्ताचा सर्वत्र अभ्यास सुरू झाला. याच सुमारास जननशास्त्र, वनपस्पतिशास्त्र संकर, या विषयांतले शोधही पंडितांच्या हाती आले व त्यावरून रक्ताला, आनुवंशाला सर्वस्वी नाही तरी फार मोठी किंमत आहे व हे लक्षात घेऊनच समाजरचना झाली पाहिजे, असे त्यांचे मत बनत चालले व समता, बंधुता, स्वातंत्र्य वगैरे शंभर वर्षे उराशी बाळगलेली तत्त्वे ढासळू लागून सुप्रसिद्ध 'सुप्रजाजनन- शास्त्राचा' उदय झाला.
 आनुवंशाचा हा शोध आमच्याकडे मनु नावाच्या महापंडिताने फार पूर्वीच लावला होता. घराण्याच्या व रक्ताच्या शुद्धतेला फार मोठी किंमत आहे, हे त्याने ओळखले होते. ही आम्हाला फार अभिमानाची गोष्ट आहे पण त्याबरोबर दुःखाची गोष्ट अशी की गाल्टनमागून त्याचा प्रत्येक सिद्धांत तावूनसुलाखून घेऊन त्यांतल्या चुका, अतिशयोक्त्या टाकून देऊन शुद्ध शास्त्र सांगणारे अनेक पंडित त्यांच्याकडे होत आहेत. तशी परंपरा आमच्याकडे मुळीच झाली नाही. तर उलट आजही मनुवचन हे अक्षरशः शास्त्रशुद्ध व अनुकरणीय आहे, असे एकांतिक विधान करणारे रा. गो. म. जोशासारखे लेखक आमच्या समाजात निघतात.
 थोर घराण्यांतच थोर व्यक्ती निर्माण होतात, इतर घराण्यांत होत नाहीत, हा सिद्धांत अत्यंत निराशजनक आहे. तो खरा असल्यास तेथे कोणाचाच इलाज नाही. पण तो तसा नाही व समाजरचनेत त्याचा हिंदूंनी केलेला उपयोग फारच घातुक आहे असे दाखविणे शक्य वाटत असल्यामुळे या लेखांत आनुवंश व त्या अन्वये केलेली समाजरचना यांचा विचार करावा असे ठरविले आहे. पण त्यापूर्वी दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्दाचा विचार करतो.
 जन्मतः सर्व मानव सारखे नसले तरीही अनुवंशाला- घराण्याला- किंमत द्यावयास नको असे म्हणणारा एक पक्ष आहे. त्याचे म्हणणे असे की जरी जन्मतः एक श्रेष्ठ, एक कनिष्ठ, असा भेद असला तरी शिक्षण हे असे अमोघ साधन आहे की त्याच्या साह्याने ही मूळची विषमता आपणास सहज काढून टाकता यईल व एका पिढीत हे साधले नाही तरी अनेक पिढ्यांनी साधेल यात शंकाच नाही.
 पण शास्त्रज्ञ या म्हणण्याचा पाठपुरावा करीत नाहीत. तर शिक्षणाने किंवा इतर संस्कारांनी पिढ्या सुधारणे शक्य नाही, असेच आजच्या जवळ- जवळ सर्व शास्त्रज्ञांचे मत आहे. एक उदाहरण घेऊन त्यांचे म्हणणे स्पष्ट करू.
 समजा 'क' ही व्यक्ती गाण्याच्या घराण्यातील आहे. आनुवंशाच्या नियमाने 'क' च्या अंगी साहजिकच थोडे गाननैपुण्य येणार. आता असे समजू की 'क' ने आपल्या हयातीत अभ्यासाने गायनाखेरीज इतर काही विद्या किंवा गुण (उदा. अचूक निशाण मारणे) हस्तगत केला. शास्त्रज्ञ या दोन गुणांना दोन निरनिराळी नावे देतात. परंपरेने म्हणजे घराण्यांतूनच आलेला गाननैपुण्य हा पिण्डगत गुण होय; व तिरंदाजी हा स्वतः अभ्यासाने मिळविलेला म्हणजे संस्कारप्राप्त गुण होय. असा भेद सांगून शास्त्रज्ञ म्हणतात की 'क' हा आपल्या पुत्राच्या ठायी पिण्डगत गुणच तेवढा संक्रांत करू शकतो. संस्कारप्राप्त गुणाचा त्याच्या पुत्राला लवलेशही मिळणार नाही. अभ्यासाने 'क' चा पुत्र तिरंदाजी कदाचित् साध्य करील. पण गायकाच्या बाबतीत जसे त्याला आधीचे भांडवल मिळेल, तसे तिरंदाजीच्या बाबतीत मिळणार नाही. याचा अर्थ असा की आज समाजांत खालच्या थरात असलेली जात कितीही पिढ्या उच्च शिक्षण घेत राहिली तरी सुधारणे, विशेष सुधारणे, शक्य नाही. कारण एका पिढीवर आपण कितीही संस्कार केले तरी ते पुढील पिढीवर रक्तातून संक्रांत होत नसल्यामुळे पुढल्या पिढीला पुन्हा श्रीगणेशापासूनच सुरुवात करावयास हवी.
 लामार्क नावाचा पंडित संस्कारप्राप्त गुण संक्रांत होतात असे मानीत असे. डार्विनही तसे थोडेसे मानी. पण बेझमानपासून ही परंपरा बदलली व आजमितीला कॅमेरार, डरहॅम वगैरे काही अपवाद सोडून दिले तर बाकीचे सर्व शास्त्रज्ञ पिण्डगत गुणच फक्त संक्रांत होतात, संस्कारप्राप्तगुण संक्रांत होत नाहीत असेच मानतात.
 कित्येक पिढ्याने का होईना पण वंश किंवा जात संस्काराने सुधारता येईल या आशेला शास्त्रज्ञ असा धक्का देत असल्यामुळे मूळच्या निराशेत अधिकच भर पडते. तेव्हा ही निराशा खरोखरीच साधार आहे की काय याचा कसोशीने विचार व्हावयास पाहिजे.
 थोर घराण्यांत थोर व्यक्ती निर्माण होतात व संस्कारप्राप्त गुण संक्रात होत नाहीत, हे दोन सिद्धांत लक्षात घेऊनच आपली चातुर्वर्ण्ययुक्त समाजरचना घडविलेली आहे, असे सांगितले जाते. म्हणून ती समाजरचना कितपत यशस्वी होईल, याचा प्रथम विचार करू.
 विद्यावृद्धी, संरक्षण, वाणिज्य इत्यादी निरनिराळ्या कार्यांसाठी लागणारे निरनिराळे गुण भिन्न भिन्न मानवसमूहांत मनूला दिसुन आले, ते आनुवंशिक आहेत असे त्याने पाहिले व म्हणून त्या त्या समूहावर- वर्णावर— ती ती जबाबदारी मनूने टाकली; व त्यांच्या गुणात बिघाड होऊ नये म्हणून त्यांनी आपआपसांत विवाह करू नयेत असे त्याने ठरवून दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्णाचे उपजीविकेचे साधनही त्याच्या कार्याला योग्य असे सांगून ते इतरांनी घेऊ नये, म्हणजेच एका वर्णाचा धंदा दुसऱ्याने करू नये, असाही निर्बंध त्याने घातला. या दोन निर्बंधांमुळे झालेली रचना तेच चातुर्वण्य, अशी ही कल्पना आहे.
 वरीलप्रमाणे समाजरचना करताना पुढील गोष्टी गृहीत धराव्या लागतात. आरंभी व्यवथा करताना,
 १) ज्या वर्णावर त्याच्या गुणाअन्वये जी जबाबदारी टाकली असेल, ती पार पाडण्यास तो वर्ण कायम- कितीही शतके लोटली तरी तितकाच समर्थ राहील. त्याला कधीही दौर्बल्य येणार नाही.
 २) एका वर्णात मनूने जे गुण पाहिले त्या गुणांखेरीज अन्य गुण त्या वर्णात कधीही दिसणार नाही.
 ३) आरंभी जो मानवसमूह हीन, नाकर्ता, शुद्र म्हणून गणला गेला असेल त्याच्या अंगी पुढे कधीही कर्तृत्व प्रकट होणार नाही.
 मानवांतील जाती निसर्गजन्यच आहेत हे रा. गो. म. जोशी यांचे मत क्षणभर खरे मानले तरीही त्या जातीची व्यवस्था मनुष्यकृत असल्यामुळे वरील तिन्ही गोष्टी गृहीत धराव्याच लागतात. ब्राह्मणाचे उद्योग दुसऱ्या कोणीही करावयाचे नाहीत, असा निर्बंध असल्यामुळे विद्यावृद्धीचे कार्य ब्राह्मण शतकानुशतके सारख्याच जोमाने व यशाने करीत राहील असे गृहीत धरले असलेच पाहिजे. हीच स्थिती इतरांची. त्यामुळे वरील तीन गोष्टी गृहीत धरल्यावांचून चातुर्वर्ण्याची कल्पनाच अशक्य आहे.
 गृहीत धरलेल्या या तीन गोष्टींपैकी प्रत्येक गोष्ट खोटी आहे.
 हिंदुस्थानचाच इतिहास पाहिला, तर असे स्पष्ट दिसून येते की महाराष्ट्र, मद्रास, कनोज हे दोनतीन प्रांत सोडले तर इतर बहुतेक प्रांतात ब्राह्मण हा फार हीन व आपली विद्यावृद्धीची जबाबदारी पार पाडण्यास सर्वस्वी नालायक असाच झालेला आहे. महाराष्ट्र व रजपुताना यांखेरीज अन्य प्रांतातले क्षत्रिय आपली स्वसंरक्षणाची जबाबदारी गेली पाच सातशे वर्षे पार पाडू शकत नाहीत हे तितकेच स्पष्ट आहे, व या दोन प्रांतानाही पूर्ण यश आलेले नाही ते नाहीच. खुद्द महाराष्ट्रातला वणिग्वर्ग कोणच्याही कारणाने का होईना नष्ट झालेला असल्यामुळे व इतरांनी ते कार्य करावयाचे नाही, असा निर्बंध असल्यामुळे येथील लक्ष्मी धुऊन गेली आहे. यावरून असे दिसते की एखादा वर्ण शतकानुशतके एक विशिष्ट जबाबदारी पार पाडण्यास समर्थ राहील, असे मानून त्याच्यावर ते कार्य सोपविणे समाजाला फार घातुक आहे.
 चातुर्वर्ण्यरचनेतला हा दोष तत्त्वतः नव्हे तरी निदान व्यवहारापुरता तरी ओळखून महाराष्ट्रांतील लोकांनी ज्याला वाटेल त्याने तलवार उचलावी व लागेल त्याने परमार्थाचे अध्ययन अध्यापन करावे अशी प्रथा पाडली व त्यामुळेच सर्व जातीतील कर्त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला वाव मिळून महाराष्ट्र तरला. हीच दृष्टी वाणिज्याबद्दल ठेवून या बाबतीतही मराठ्यांनी मनुस्मृतीला जरा बाजूला ठेवली असती तर महाराष्ट्र निर्धन झाला नसता. मोठमोठे सावकार महाराष्ट्रात होऊन गेले; पण वाणिज्याच्या सर्व शाखा त्यांनी व्यापल्या नाहीत एवढे खरे.
 वंशधर्म किंवा जातीधर्म शाश्वत टिकून राहातात, हे मत किती भ्रामक आहे हे इतिहासाकडे पाहिले तर स्पष्टपणे कळून येतेच. पण जीवनशास्त्राचेही म्हणणे तसेच आहे, असेही आपणास दाखविता येईल.
 पुण्यामधले स्वयंमन्य समाजशास्त्रज्ञ रा. गो. म. जोशी हे पाश्चात्य पंडितांचे नाव घेऊन, व बायॉलजीचा आधार सांगून समाजविचारांच्या या प्रांतात आज बरीच वर्षे गोंधळ घालीत आहेत. नवीन निघालेले जीवनशास्त्र आनुवंशाच्या व त्यामुळे चातुर्वर्ण्याच्या सर्वस्वी अनुकूल आहे व मनूचा प्रत्येक शब्द त्या अन्वये खरा कसा ठरतो असे दाखविण्यासाठी त्यांची बरीच सर्कस चालू आहे. तेव्हा पाश्चात्त्य जीवन शास्त्रज्ञ या बाबतीत काय म्हणतात ते पाहणे अगत्याचे आहे.
 'Inequality of man' या पुस्तकात प्रो. हाल्डेन म्हणतो की, Biology does not support the idea that the hereditary principle is a satisfactory method of choosing men or women to fill up a post. (पान १८) मानवावर परिस्थितीचा फार परिणाम होतो, त्याचे गुण कायम टिकत नाहीत म्हणून तो म्हणतो-
 If human beings could be propagated by cutting (कलम करून) like apple trees, aristrorcacy would be biologically sound.
 एच्. एस. जेनिग्ज यानेही असेच मत दिले आहे.
 Biological Basis of Human Nature या पुस्तकात एका प्रकरणांत बाॅयालजीच्या नावावर विकणाऱ्या अनेक भ्रामक समजुतींची त्याने एक यादी दिली आहे. त्यातील दोन भ्रम असे आहेत.
 (1) The fallacy that showing a characteristic to be hereditary proves that it is not alterable by environment. (2) The fallacy that superior individuals must have come from superior parents and that it will continue to happen. (पाने २१४ व १६.)
 थोर पुरुषांचे वाडवडीलही थोर होते, असे दाखविण्याचा चरित्रलेखकाचा जो अट्टाहास असतो, त्याच्या बुडाशी हीच समजूत असते. तसे असणे पूर्णपणे शक्य आहे हे खरे; पण नसणेही तितकेच शक्य आहे हे आता लोकांनी ध्यानात घ्यावयास हरकत नाही.
 एक जात किंवा एक कुल शतकानुशतके सारखे कार्यक्षम राहील, असे मानून तिच्यावर एकादे महत्त्वाचे कार्य कायमचे सोपविणे हे इतिहास व शास्त्र या दोघांनाही कसे संमत नाही हे दाखविले. चातुर्वण्याच्या बुडाशी असलेल्या दुसऱ्या दोन्ही कल्पनाही कशा भ्रामक आहेत ते आता पाहू.
 वर्णव्यवस्था कायमची करून टाकण्यात दुसरे असे गृहीत धरावे लागते की मूळ व्यवस्थेच्या वेळी ब्राह्मण हे बुद्धीसाठी व क्षत्रिय शौर्यासाठी जर निराळं केले तर त्यांच्यांत अनुक्रमे बुद्धी व शौर्य गुणांखेरीज अन्य गुण दिसणार नाही. व नियत कर्माखेरीज अन्य कर्मे त्यांस साधणार नाहीत, असे गृहीत न धरावे तर एक तर आनुवंशाला काहीच किंमत नाही असे होईल. व दुसरे असे की नियत गुणांखेरीज भिन्न गुण त्या वर्णात उत्पन्न होऊ शकतील असे धरूनही मनूने त्यांचा विकास होऊ न देण्याची व्यवस्था केली असे म्हणावे लागेल. पण मनूवर असला आरोप करावा असे मला वाटत नाही. आनुवंशावरील असीम विश्वासामुळे एका वर्णात अन्य गुण निर्माण होऊ शकणार नाहीत असेच त्याला वाटत असावे व म्हणूनच त्याने कायमची व्यवस्था केली असावी. पुढील अनुभवाने ती कल्पना चूक ठरल्यामुळे ती व्यवस्था बदलणे हे पुढीलांचे कर्तव्य होय. यात मनूवर काही दोषारोग करिता येईल असे मला वाटत नाही. पण मनूवर दुष्टपणाचा आरोप करणारे जसे त्याचे शत्रू होत, तसेच आपल्या कल्पना त्याच्यावर लादून त्याचा आधार घेताना हास्यास्पद करून टाकणारे अर्वाचीन सवाजशास्त्राज्ञही त्याचे शत्रुच आहेत असे मला वाटते.
 एक वर्ण एकच गुण दाखवील, अन्य कर्म त्यास साधणार नाही ही कल्पना पहिल्या कल्पनेइतकीच खोटी आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मणवर्ग पहा. कर्तृत्वाची एकही शाखा अशी नाही की ज्यात ब्राह्मण अलौकिक पदाला चढला नाही. भास्कराचार्य, ज्ञानेश्वर, रामदास, रामचंद्रपंत अमात्य, रामशास्त्री प्रभुणे, डॉ. भिसे, रँ. नारळीवर, प्रि. महाजनी, डॉ. कोकटनूर, श्रीमंत कुवलयानंद, नाना फडणीस, आगरकर, डॉ. गोखले (अमेरिका), टिळक, रानडे, राजवाडे, लिमये (निधोन) हे लोक ब्राह्मणांच्या बुद्धिवैभवाची साक्ष देतील. पेशवे, प्रतिनिधि, पटवर्धन, पानसे, गोखले, मेहेंदळे, बिनिवाले, विंचुरकर ही घराणी क्षात्रतेज दाखवितील. रामचंद्र नाईक परांजपे (सावकार) बारामतीकर जोशी, गोखले, गद्रे, किर्लोस्कर, ओगले, टिकेकर हे लोक सरस्वतीप्रमाणेच लक्ष्मीलाही ब्राह्मण प्रसन्न करू शकेल हे सिद्ध करतील. त्रैवर्णिकांची ही त्रिविध विद्या तर ब्राह्मणात दिसतेच; पण ज्या कलांची उपासना ब्राह्मणाने मुळीच करू नये. असे मनूने सांगितले आहे (३-६४) त्याही हस्तगत करून ब्राह्मण तेथेही शिखराला गेला आहे. शिल्पकार करमरकर, फडके, नट गणपतराव जोशी, दाते; गवई पलुस्कर, गंधर्व, बखले; नकलाकार भोंडे या मंडळीनी कलांचे क्षेत्रही व्यापले आहे. अमुक एक वर्ण अमकेच गुण दाखवितो हे समजणे किती चूक आहे व त्या अन्वये त्याला इतर कामे करण्याची मनाई करणे कसे घातुक आहे. हे सिद्ध करण्यास आणखी पुरावा पाहिजे काय?
 आणि पाहिजेच असला तर ज्यू लोकांचा इतिहास पहा. युरोपमध्ये प्रत्येक देशांत यांचा अनन्वित छळ झाला. प्रत्येक ठिकाणाहून त्यांना हाकालण्यात आले. त्यांच्या कत्तलीही झाल्या. समाज त्यांना जवळजवळ अस्पृश्य लेखी व ते अगदी अस्सल कवडीचुंबक व उलट्या काळजांचे सावकार आहेत, असे म्हणून त्यांना अगदी खायला उठे. पण त्यांचा छळ बंद झाल्याबरोबर त्यांनी एवढे अलौकिक बुद्धिवैभव प्रगट केले की, आज जगातल्या प्रत्येक सुशिक्षिताचा श्वासोच्छ्वास ज्यूंनी चालविला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. रिलेटिव्हिटीचा सिद्धांत सांगणारा जगन्मान्य गणिती आइन्स्टाइन्, अंतर्मन- बहिर्मन ही उपपत्ति बसविणारा मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड, एलान- व्हाइटल हे तत्त्व सांगणारा तत्त्ववेत्ता बर्गसन्, व ज्याचे अर्थशास्त्र जग आकंठ पिऊन राहिले आहे, तो कम्युनिझमचा प्रणेता कार्ल मार्क्स हे सर्व ज्यू आहेत. डिझरायलीसारखे राजकारणी यांच्यात होतात. युरोप-अमेरिकेची कित्येक न्यायासने यांनी मंडित केली आहेत. फ्रेड्रिक एञ्जल्स, त्रात्स्की हेही ज्यूच आहेत. राशेल, बर्नहार्ट यांसारख्या नट्यांनी रंगभूमीवरही अलौकिक यश मिळविले आहे. एकीकडे युरोपात ज्यू असे वैभवाला चढत असताना इकडे कोकणात कुलाबा जिल्ह्यांतील आवास गावी त्यांचेच पुष्कळ जातभाई लंगोट्या नेसून तेलाचा धंदा करीत आहेत.
 मूळ विभागणीच्या वेळी जे गुण ज्या वर्णात दिसतात, ते त्यात कायम टिकत नाहीत व त्याशिवाय अन्य गुणांची निपज त्यात होते, या दोन गोष्टींमुळे तर कायमची वर्णव्यवस्था घातुक आहेच; पण या व्यवस्थेवर याहीपेक्षा बलवत्तर आक्षेप येतो तो असा की, त्या विभागणीच्या वेळी ज्या जाती हीन, नाकर्त्या शूद्र असतील त्या पुढे वाटेल तितक्या पराक्रमी होऊ शकतात, ही इतिहाससिद्ध गोष्ट त्या व्यवस्थेत दृष्टीआड केली जाते.
 शतकानुशतके हीन स्थितीत असलेल्या जाती एकदम कसा अतुल पराक्रम करू शकतात, याची उदाहरणे इतिहासात थोडी नाहीत. मोगल व तार्तर लोक कित्येक शतके धनगराचा पेशा पाळून होते; पण त्यांनी एके काळी तलवार उचलून सर्व जगाला त्राहि भगवान् करून सोडले. आरबांचे उदाहरण याहीपेक्षा निर्णायक आहे. तेही असेच धनगर होते. पण महंमद, ने त्यांच्यात जी काही अद्भुत जीवनशक्ती भरली, तिच्या प्रभावाने त्यांनी त्रिखंड जिंकले, एवढेच नव्हे तर आर्य ब्राह्मणांच्या तोडीची विद्वत्ताही प्रगट केली. महंमद बीन जबीर, अरकाझेल, चंद्राच्या विषमगतीचा शोध लावणारा महमद अबूल फीझल, हे ज्योतिर्विद, दृकशास्त्रवेत्ता अल्हाझेन, रसायन शास्त्री गीबर, कायदेपंडित शफी व मलिक हे सर्व पंडित आरब होते. सुप्रसिद्ध हरूण अल् रशीद हा राजा त्यांचाच व जगाला दिव्य मोहिनीने भारणारे अरेबियन नाईटस् त्यांचेच. अरबस्तानात किंवा तुर्कस्तानात मनुस्मृति मसती व त्यांनी ती पाळली असती तर या जातीचा उदयच झाला नसता. असे अनेक वेळा मनात येते को, ज्यांना आम्ही निकृष्ट वर्ग म्हणून ठरवून टाकले आहेत. त्यांच्यातूनही, येथे मनुस्मृतीचे आंधळे अनुयायी नसते तर, आरबांसारखेच पराक्रमी लोक निर्माण झाले असते. बाजीरावाने संधी दिल्याबरोबर धनगरांनी मल्हाररावासारखा वीरमणी निर्माण केलाच ना?
 वंशाचे, वर्णाचे, जातीचे गुण शतकानुशतके कायम टिकतात असे म्हणणारे, वंशधर्म शाश्वत व न बदलणारे आहेत असे मानणारे युरोपांतही काही पंडित आहेत व ते नाचलेले पाहून आपणही नाचणारे रा. गो. म. जोश्यांसारखे आमच्याकडेही लोक आहेत. वंशधर्मामध्ये फरक पडला तर फक्त संकरानेच पडेल असे हे लोक म्हणतात. त्यांना एवढेच सांगावयाचे की, त्यांनी हिंदुस्थानातील नाकरत्या झालेल्या ब्राह्मणजातीत, भिन्न गुण दाखविणाऱ्या कोकणस्थ, देशस्थ वगैरे महाराष्ट्रातील ब्राह्मणात, ज्यू लोकांत, शुद्धत्वातून क्षत्रियत्वास चढणाऱ्या मोगल व तार्तर लोकांत व ब्राह्मणत्वास येणाऱ्या आरब लोकांत संकर झाला आहे असे प्रथम सिद्ध करावे व नंतर संकराने इतक्या उत्कृष्ट प्रजेची निर्मिती होत असल्यास संकराचा निषेध ते का करतात त्यांचा खुलासा करावा.
 चातुर्वर्ण्याच्या बुडाशी असलेल्या पहिल्या गृहीत गोष्टीप्रमाणेच दुसऱ्या व तिसऱ्या गोष्टीही इतिहासविरुद्ध आहेत असे दिसून आले. आता शास्त्र त्या बाबतीत काय म्हणते ते पाहू.
 एका घराण्यात किंवा जातीत अमुक एकच विशिष्ट गुण वाढेल, अन्य वाढणार नाही असे धरून त्या लोकांना अन्य कर्मे करण्याची बंदी करणे हे इतिहासाप्रमाणेच जीवनशास्त्रालाही नामंजूर आहे. जेनिंग्ज म्हणतो-
 Each individual has the possibility of many diverse careers.
 आरंभीच दिलेला वॅटसन् चा उतारा देऊन त्यावर टीका करताना तो म्हणतो की (भिन्न वंशासंबधी हे म्हणणं खरे नसले तरी)
 Such a population identical as to genesis in all its components would realize the situation postulated by Watson.'
 म्हणजे एकाच रक्ताची दहा मले घेतली तर त्यातल्या वाटेल त्याला वकील, डॉक्टर, व्यापारी, शास्ता, भिकारी किंवा चोरसुद्धा करण्याची करामत शक्य आहे.
 गाल्टनने असेच मत दिले आहे. 'Moreover as statistics have shown that the best qualities are largely co-related, the youths who become judges, bishops, statesmen and leaders of progrees could have furnished, formidable athletic teams in their times (Life and letters of Sir Fransis Galton by Karl Pearson Vol. ई PP. 273.)
 एकाच कुलांत धर्म, न्याय, राजकारण, शिल्प, वगैरे अनेक कार्याला लागणारे गुण निर्माण होणे शक्य असतांना त्या कुलावर तुम्ही अमुकच काम करा व इतर गुण वाया घालवा, फार तर आपत्प्रसंगीच वापरा, असा निर्बंध घालणे म्हणजे त्या गुणांचा जाणूनबुजून नाश करण्यासारखे आहे.
 अनेक पिढ्या असे करीत राहिले तर एकच निवडलेला गुण शुद्ध होत जाऊन जास्त प्रबळ होत जाईल असे म्हणणे असेल तर तेही खरे नाही सर्वसामान्य कर्तृत्व वाढत जाईल; पण अमुकच एक गुण वाढत जाईल, हे इतिहासावरून दिसत नाही. ब्राह्मणांच्या कर्तृत्वासंबंधी वर सांगितलेच आहे. अनेक शतकांच्या शुद्धतेने बुद्धी हा एकच गुण शुद्ध झाला असे नसून सर्व कर्तृत्वच वाढले असे दिसते. यावरून वर्णाप्रमाणे श्रमविभाग करणे अत्यंत चुकीचे असून प्रत्येकाला सर्व क्षेत्रे मोकळी ठेवली पाहिजेत, या विधानाबद्दल शंका राहीलसे वाटत नाही.
 एका वेळेला ज्यांच्यांत मुळीच गुण दिसत नाहीत, जे आरब, तार्तार, धनगर यांच्यासारखे अगदी हीन असतात, त्यांच्यांत पुढें कधीही उत्तम गुणांची पैदास होणार नाही, ते उच्च पदाला चढू शकणार नाहीत, म्हणून त्यांना संधी देण्याचे मुळीच कारण नाही, ही जी चातुर्वर्ण्याच्या बुडाशी असलेली तिसरी कल्पना ती इतिहासाला संमत नाही, हे वर आपण पाहिलेच आहे. आता थोडे बायॉलजीत शिरू.
 पित्याप्रमाणेच पुत्र होतो हे जरी सामान्यतः खरे असले तरी पिता- पुत्रांत, किंवा एकाच पित्याच्या अनेक पुत्रांत जमीनअस्मानाचे अंतर असू शकते, हेही खरे आहे. हे अंतर- हा फरक का पडत जातो, याचा विचार करून शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे दिली आहेत.
 (१) परिस्थिति- दोन सख्खे भाऊ, इतकेच नव्हे तर जुळे भाऊही जर भिन्न परिस्थितीत वाढले तर त्यांच्यांत वाटेल तितका फरक पडू शकतो, हे म्यूलर, न्यूमन, वगैरे 'जुळ्याच्या' अभ्यासकांनी सांगितले आहे. (२) संकराने फरक पडतो हे सर्वमान्य आहे. (३) ज्या जीवन गोलकापासून एका पुत्राचा जन्म झाला, त्या जीवन गोलकाच्या रचनेतच एकाद वेळी फरक होऊन दुसऱ्या पुत्राचे गुणधर्म बदलतात. अशी ही तीन कारणे झाली. याहून निराळे व चौथे कारणही शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. व ते (४) म्हणजे जीवन- गोलकांतच अजिबात फरक पडणे हे होय. काहीएक ज्ञात कारण नसताना असे फरक पडतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. फरकांचे वरील तिन्ही प्रकार सांगून Gene Mutation नांवाचा चौथा प्रकार सांगताना सिनॉट अँड्डन आपल्या Principles of Genetics या पुस्तकांत म्हणतात-
 A gene mutation is a sudden change in a restricted region of a chromosome, resulting in the appearance of a new gene while other germinal variations may be due to changes in numbers, arrangement or balance of chromosomes. (आवृति सन १९३५ पान ३२३)
 Evolution of living organism या पुस्तकांत (सन १९१२ पान ४८) E. S Goodrich F. R. S. हा म्हणतो की,- At some period in evolution new factors must have been introduced into the inheritance and the process is presumably still going on.
 ज्यूलियन हक्स्ले व एच्. जी. वेल्स यांनी आपल्या Science of Life या ग्रंथांत (१९३० पान ३६०) या फरकांचा विचार केला आहे. कांही विशिष्ट प्रकारच्या प्रकाशकिरणांनी प्राण्यांच्या जीवनगोलकांत फरक पाडता येतो, असे सिद्ध झाले आहे, असे सांगून ही प्रक्रिया सृष्टीतही चालू असावी असे त्यांनी आपले मत दिले आहे. व हीच उपपत्ती एच्. एस्. जेनिंग्ज् याने आपल्या The Biological Basis of Human Nature या पुस्तकांत मान्य केली आहे. तो म्हणतो-
 There is no reason for doubting that gene mutations occur in man as they do in other organisations. A race of men will in the course of time become heterogenous through occurrence of mutations, quite without mixture with another race. Doubtless much of the variety in human population is due to this cause.
 नसलेले गुण निर्माण होतात असे फार तर म्हणू नये, पण हजारो वर्षे ज्ञात नसलेले गुण एकदम दिसू लागून वंशाचे गुणधर्म बदलतात असे शास्त्रज्ञ स्पष्ट म्हणत आहेत. आणि हजारो वर्षे जे गुण दिसले नाहीत, ते नव्हते असे म्हणण्यास तरी अडचण कोणची. संकर न होता एका शुद्ध वंशात फरक पडत जाईल हे जेनिंग्ज् चे वचन अगदी निःसंदेह आहे. तरी 'आपोआप फरक पडत नाहीत, नसलेले गुण निर्माण होत नाहीत,' अशी वर सांगितलेल्या गो. म. जोशांची भुणभुण चालूच आहे. (हिं. स. शास्त्र पाने ४०३-४) वर सांगितलेला फरक हा एका पिढीपुरता नसून आनुवंशिक होत जातो, असे या सर्व शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. (जेनिंग्ज पान ३०१-३०२).
 वंशाच्या गुणधर्मात कधीच फरक पडत नाहीत हा सिद्धांत हीन जातीना अत्यंत निराश करणारा आहे. व त्यामुळे दैवाला हात लावण्यापलीकडे त्यांना काहीच करता येण्यासारखे नाही असा समज पसरण्याचा संभव आहे. आणि याला जीवनशास्त्राचा आधार आहे, असे काही वेडगळ लोक सांगत फिरू लागल्याने समाजाचे मोठे नुकसान होईल असे वाटते. याबद्दल जेनिंग्ज् म्हणतो-
 The fallacy appears popularly in the notion of inevitableness, the fatality of what is heredity.
पण हा निराशाजनक विचार अगदी निराधार आहे असे त्याने स्पष्ट सांगितले आहे.
 वर्णाच्या बाबतीत जे दिसले तेच कुलांच्याही बाबतीत दिसून येईल. थोर कुलांतच थोर व्यक्ती निर्माण होतात असे नाही आणि थोर कुलात थोर व्यक्ती निर्माण होतातच असेही नाही. पिल्ग्रिम्स प्रोग्रेसचा कर्ता बन्यन हा कल्हईवाल्याचा मुलगा, कोलंबस कोष्ट्याचा, क्रॉमवेल कलालाचा, डेफो खाटकाचा, डेमॉस्थेनीस शिकलगाराचा, होमर शेतकऱ्याचा, शेक्स्पीयर विणकऱ्याचा, वूल्से खाटकाचा, साक्रेटीस पाथरवटाचा, वाशिंग्टन शेतकऱ्याचा मल्हारराव धनगराचा, राणोजी स्वतः पैजार उचलणारा, ही 'अस्पृष्टांच्या प्रश्नांत' माटे यांनी दिलेली यादी पाहिली व त्यांत कोळ्याचा वाल्मिकी, लोहाराचा मुसोलिनी, चांभाराचा स्टॅलिन्, सुताराचा धंदा स्वतः करणारा हिटलर, पाकिटावर पत्ते लिहून पोट भरणारा मॅक्डोनॉल्ड, प्रथम हुजऱ्या असून पुढे फील्ड मार्शल झालेला राबर्टसन् यांची भर घातली म्हणजे 'यस्मिन् कुले त्वमुत्पन्नः गजस्तत्र न हन्यते' हा पशूंचा सिद्धान्त माणसांना लावणे कसे चूक आहे ते ध्यानात येईल. व आनुवंशाचा सिद्धांत काही एका मर्यादेबाहेर खेचणे किती हास्यास्पद आहे ते कळून येईल.
 कॅटेल नावाच्या अभ्यासकाने हेच मत दिले आहे. तो म्हणतो :-
 थोर घराण्यांतच थोर व्यक्ती निर्माण होतात हे खरे असले तर एक उच्च वर्ग समाजात कायमचा निराळा ठेवण्यास ते पुरेसे कारण आहे. आई- बापांच्या पिण्डगत गुणावरून ती व्यक्ती पुढे कशी होईल हे निश्चित ठरवता येईल तर सर्वांना सारखी संधी (Equality of opportunity), शिक्षण, सामाजिक सुधारणा यातल्या कशालाच अर्थ नाही. पण हे एकांतिक मत टिकणे शक्य नाही. उलट वाटेल त्या मुलाला शिक्षण व संस्कार या साधनांनी वाटेल त्या पदाला चढवता येईल, हेही मत तितकेच एकांतिक आहे
 (Study of America's one thousand leading Scientists' families; Popular Science monthly 1915)
 कोणाही समंजस व अनाग्रही माणसाला हे म्हणणे पटेल असे वाटते. आनुवंशाला मुळीच किंमत नाही असे मी म्हणत नाही. त्यामुळे उच्च कुलांना जपू नये असेही नाही. उच्च कुलांना जपणे, त्यांच्या रक्तांत हीन रक्ताची मिसळ न होऊ देणे याबद्दल समाजाने फार खबरदारी घ्यावयास पाहिजे यांत शंकाच नाही; पण एकदा ज्यांना उच्च म्हटले ती कायम उच्च व हीन ही कायम हीन राहतात हा समज चुकीचा आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य ही समाजव्यवस्था चुकीची व घातुक ठरते.
 हिंदुस्थानचा जो अध:पात झालेला दिसतो त्याला चातुर्वर्ण्य व जातिभेद सर्वस्वी जबाबदार आहेत, असेही मला म्हणावयाचे नाही. पण अनेक कारणांपैकी ते एक आहे यात शंकाच नाही. सर्वांच्या गुणविकासाला येथे संधीच न मिळाल्यामुळे येथे गुणांची पैदास फारच थोडी होऊ लागली. ब्राह्मणादि जातीत जास्त कर्ते पुरुष निर्माण होतात हे जरी खरे असले तरी इतरांना ब्रह्मक्षत्रांची कर्मे करू देण्यास काहीच हरकत नाही. ब्रह्मक्षत्रांनी इतके गुण निर्माण केले की आता जास्त पराक्रम झाला तर तोटा होईल, अशी स्थिती खास आलेली नाही. त्यामुळे प्रत्येकास वाटेल त्या क्षेत्रात कर्तृत्व दाखविण्यास मोकळीक असणे व जे घराणे काही पिढ्या तसे दाखवील त्याला श्रेष्ठ समजून त्याला जपणे हे समाजरचनेत आद्य तत्त्व असावयास पाहिजे.
 हॉल्डेनने आपल्या Inequality of Man या निबंधाच्या शेवटी हेच सांगितले आहे. 'विषमता दिसून आल्याने 'सर्वांना सारखी संधी' हे तत्त्व कमी तर नव्हेच पण जास्तच जोराने प्रतिपादावयास पाहिजे' असे तो म्हणतो.
 आपला समाज चातुर्वर्ण्य पूर्णपणे पाळण्याइतका वेडगळ कधी होता का नाही ते नक्की सांगता येत नाही. पण महाराष्ट्रांत गेल्या एक हजार वर्षात तरी ते बहुतेक सर्व वर्णांनी व्यवहारांत तरी मोडले आहे.
 तत्त्वतः मोडण्याइतकी बुद्धीची रग आगरकरापर्यंत कोणीच दाखविली नाही ही फारच दुर्दैवाची गोष्ट आहे. पण हे दुर्दैव येथेच संपत नाही. व्यवहारांत ते कोणीच पाळीत नसताना व पाळणे शक्य नाही, वेडेपणाचे आहे, हे स्पष्ट दिसत असताना बहुतेक सर्व सुशिक्षित- अशिक्षित हिंदूंमध्ये चातुर्वर्ण्याचा अभिमान मात्र ओतप्रोत भरलेला आहे. वर्णाश्रमस्वराज्यसंघ ही एक विलक्षण चीज आहे. साठी उलटून गेल्यावरही सावकारी किंवा व्यापार करणारे ब्राह्मण, क्षत्रिय, चातुर्वर्ण्याचा अभिमान सांगताना पाहिले म्हणजे ती चीज खरोखर पहावीशी वाटते. वर्ण व आश्रम या दोहोची कल्पना यांना नसली पाहिजे किंवा हे लोक ढोंगी, लुच्चे असले पाहिजेत, असे प्रथम मनात येते. पण आपली मते पारखून घेऊन ती आपल्या आचरणाशी विसंगत नाहीतना, हे पाहणे हजारांत एकही मनुष्य करीत नसतो, हे ध्यानात आले म्हणजे तो विचार मागे पडतो.
 पण चातुर्वर्ण्याचा हा भ्रम जितक्या लवकर जाईल, तितके समाजाच्या हिताचे आहे. प्रत्येकाच्या गुणविकासाला पूर्ण संधी मिळून कुजत पडलेल्या व पाडलेल्या अनेक जातीचे कर्तृत्व वाढीस लागेल व या मृतप्राय झालेल्या सनातन पुरुषाच्या अंगी थोडे तरी चैतन्य त्यामुळे खेळू लागेल.