विज्ञान-प्रणीत समाजरचना/रक्तसंकर व वृत्तिसंकर

विकिस्रोत कडून

रक्तसंकर व वृत्तिसंकर


 फार पुरातन काळापासून आपल्याकडे संकर हा अत्यंत निंद्य मानला आहे. एकाद्या समाजाला फार भयंकर भीती घालावयाची असली तर वर्णसंकर होईल असे म्हटले की झाले. पुराण कालांत संकर मान्य होता, पण त्याचे दुष्परिणाम दिसल्यामुळे स्मृतिकांरांनी तो निषिद्ध ठरविला व याज्ञवल्क्याच्या काळापर्यंत अनुलोम, प्रतिलोम वगैरे सर्व प्रकारचे विवाह बंद झाले. दोन रक्ताच्या मिश्रणासंबंधी आजही जवळजवळ तीच भावना आपल्याकडे कायम आहे. मिश्रविवाहाची चळवळ चालू असली तरी दोन पोटजातीत विवाह होण्यास हरकत नाही, असे काही सुशिक्षितांचे मत व त्याहूनही थोड्यांची कृती यापलीकडे मजल गेलेली नाही. यावरून आपल्या समाजाला मिश्रविवाहाची अजून भीती वाटते असे दिसते.
 आपल्या पूर्वजाप्रमाणे आज जर्मन लोकांनीही रक्तशुद्धीची चळवळ सुरू केली आहे. जाती, पोटजाती, उपपोटजाती पाडण्याचा हिटलरचा विचार आहे की नाही, ते अजून कळले नाही. पण आर्यन् रक्त सोवळे ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत एवढे खास. पण त्या आर्यन रक्तांत हिंदूंची तो गणना करीत नाही; एवढेच नव्हे तर फ्रेंच किंवा इंग्रज हेही त्यांत तो धरीत नाही.
 'रायव्हलस ऑफ व्हाईट मॅन' या निबंधांत डीन इंग याने म्हटले आहे की, 'सर्व समाज एका पातळीवर आणूं पाहाणाऱ्या साम्यवादापेक्षा किंवा लोकशाहीपेक्षा युरोपात परवापर्यंत असलेली जातिसंस्थाच समाजाचे तारण करू शकेल, असे वाटते. मात्र ती जातिसंस्था हिंदुस्थानांतल्याप्रमाणे कडक असावी असे मला वाटत नाही. (औटस्पोकन एसेज पान २३०) या लेखकाने आपल्या या मताची चर्चा कोठेच केलेली नाही. वर सर्व निबंधात जातिसंस्थेचा कोठे उल्लेखही नाही. पुढील निबंधात रक्तसंकर हितावह आहे असे यानेच सांगितले आहे. तरी पण 'A modified caste system may have a greater survival value than either democracy or socialism' असे त्याने म्हटले आहे हे खरे.
 बट्रांड रसेल याने आपल्या सायंटिफिक औटलुक या ग्रंथात असेच म्हटले आहे, असे रा. गो. म. जोशी यांचे म्हणणे आहे व स्वतः जोशी यांनी आपल्या हिंदूसमाजरचनाशास्त्रांत तर देशस्थ, कोकणस्थ या पोटजातीत सुद्धा विवाह होणे अनिष्ट आहे, असे जोराने प्रतिपादले आहे (पान २३१)
 येणेप्रमाणे या पंडितांनी निंद्य, निषिद्ध व भयावह मानलेला जो रक्तसंकर त्याबद्दल म्हणजे तो घडवून आणणे हितावह आहे की विनाशक आहे, याबद्दल या निबंधांत विचार करावयाचा आहे.
 संकराचा विचार करू लागताच संकर म्हणजे काय असा प्रश्न पुढे येतो. दोन भिन्न रक्तांच्या घराण्यांतील स्त्रीपुरुषांचा विवाह असे उत्तर चटकन् देता येईल. पण भिन्न रक्त म्हणजे काय हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे. भिन्न रक्त दाखवावयाचे म्हणजे ज्या दोन जाती किंवा वंश यांच्याबद्दल आपण बोलत असू, त्यांच्यामध्ये शरीराची ठेवण, मनाचे कल व बुद्धीची ऐपत ही एकमेकांहून फार निराळी आहे, असे दाखविले पाहिजे व असे दाखविता आले तरी, पुढे त्या दोन रक्तांचे मिश्रण झाले तर पुढील संतती हीन प्रकारची होईल हे सिद्ध करता आले पाहिजे. नाहीतर वरील तिन्ही गोष्टी दाखविता आल्या तरी त्यावरून त्या दोन जातींमध्ये रक्तसंकर अनिष्टच आहे असे निश्चयाने म्हणता यावयाचे नाही.
 काही रक्ते म्हणजे काही वंश परस्परांपासून अगदी भिन्न आहेत, हे साध्या डोळ्यालाही दिसते. इंग्रज व शिद्दी यांच्यामध्ये शरीर, मन व बुद्धी यांत कोणच्याही प्रकारचे साम्य नाही व त्या दोघांमध्ये मिश्रण व्हावे, असे कोणीही मनुष्य म्हणत नाही. इंग्रज व निग्रो किंवा आफ्रिकेतल्या इतर जाती, किंवा स्पॅनिश व दक्षिण अमेरिकेतल्या जाती, किंवा ब्राह्मण व हिंदुस्थानांतल्या अस्पृष्ट जाती, यांच्यामध्ये विवाह घडवून आणावे की काय, असा प्रश्न आज कोणी नेटाने उपस्थित करीत नाही. त्याचाही विचार करावयाचा आहेच. पण तो प्रश्न जरा गौण आहे. या प्रश्नाला फार महत्त्व येते ते इंग्रज, फ्रेंच, जर्मन ग्रीक, इटालियन वगैरे युरोपांतले गट किंवा देशस्थ, कोंकणस्थ, कऱ्हाडे, सारस्वत, प्रभू, क्षत्रिय, मराठे हे महाराष्ट्रीय गट यांच्यामध्येही रक्तमिश्रण होऊ नये असे सांगतात त्यावेळी. संस्कृति, रूप, गुण, परंपरा या बाबतीत या दोन संघांतील गटांमध्ये बरेच साम्य आहे. यांचे मिश्रविवाह निषिद्ध म्हणून सांगितले म्हणजे यांचीही रक्ते भिन्न आहेत काय व असल्यास ती कशावरून असा प्रश्न निर्माण होतो.
 हिंदुस्थानात रक्ते भिन्न आहेत याचा एक ढोबळ अर्थ तरी सांगता येईल. येथे ज्या दोनचार हजार जाती आहेत, त्यांच्यामध्ये आज दोन अडीच हजार वर्षे लग्ने होत नाहीत. आणि म्हणूनच त्यांची रक्ते भिन्न आहेत असे म्हणावे असे कोणी म्हणतात. एकाच रक्ताच्या लोकांचे दोन गट केले व एकमेकांत लग्ने न करता ते गट बरीच वर्षे राहिले तर त्यांच्यात काही वैशिष्ट्य निर्माण होते, त्यांच्या रक्तांत भिन्नपणा येतो, असे गेट्सने म्हटले आहे. (हेरीटिटी व युजेनिक्स) व त्याच्याच आधाराने गो. म. जोशी यांनी पण म्हटले आहे. पण गेट्सने याचा अर्थ कोठेच स्पष्ट केलेला नाही. व जोशांनी फक्त करता येईल असे म्हटले आहे. (पान ८९) एके ठिकाणी (पान २३१) त्यांनी कोकणस्थ व देशस्थ यांच्यातील वैशिष्ट्ये दाखवावयाचा प्रयत्न केला आहे. तो क्षणभर खरा मानला तरी दोन हजार जातींपैकी निदान सातआठशे जातीची तरी वैशिष्ट्ये म्हणजे इतरात नाहीत. असे त्यांच्या ठायी स्पष्टपणे आढळून येणारे गुण दाखविल्यावाचून ही इतकी रक्ते भिन्न आहेत असे म्हणता येणार नाही.
 निसर्गातच रक्ते भिन्न करण्याची प्रवृत्ति आहे. असे जोशांनी आपल्या पुस्तकांत म्हटले आहे. गेट्सच्या पुस्तकांतून त्यांनी एक उदाहरण घेतले आहे. सेवल बेटांत प्रोर्तुगिजांनी काही घोडे नेले. तेथे ते जंगलांत वाढले. पुढे तीनशे वर्षांनी गिल्पिन नावाचा प्रवासी तेथे गेला. त्याला असे आढळले की त्या घोड्यांची संतति सदा भिन्न गटात राहते. व त्यांना एकत्र हाकून आणले तरी ते घोडे फिरून सहा ठिकाणी विभक्त होतात. इतके सांगून जोशांनी मुळांत नसतांना 'ते घोडे सहभोजन व सहविवाह करण्यास तयार नव्हते' असे खोटेच वाक्य अवतरण चिन्ह देऊन त्याच्या तोंडी घातले आहे. गिल्पिन किंवा गेट्स कोणीही तसे म्हणत नाही. मुळांत नसतांना अवतरणांत वाक्य घालणे हे चूक आहे व गणितागत पद्धतीच्या चाहत्यांनी एकाच उदाहरणावरून स्वतंत्रपणे आपणच अनुमान काढणे अशास्त्रीय आहे.
 निसर्गातच रक्त भिन्न करण्याची योजना आहे, म्हणजे एकदा एक असलेली रक्ते भिन्न करण्याची योजना आहे असे कोणी सिद्ध केलेले नाही व हिंदुस्थानांत बेटीबंद जातिभेद असला तरी त्या जातीची रक्ते भिन्न म्हणजे काय, हेही कोणी सांगितले नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे हिंदुस्थानांत रक्ते भिन्न आहेत, या बोलण्याला, भाषेच्या सोयीपुरता तरी अर्थ आहे. युरोपांत तर यापेक्षाही गोंधळ आहे. युरोपांत नॉर्डिक, मेडिटरेनियन, डिनॅरिक, अल्पाइन व ईस्ट वाल्टिक असे पांच भिन्न वंश आहेत असे म्हणतात त्या सर्वांचे भिन्न गुणही, म्हणजे गुणही म्हणजे तोंडवळा, केस, उंची, स्वभाव, बुद्धी हे गुणही गूंथुर याने रेशल एलेमेंटस् इन युरोपियन हिस्टरी या पुस्तकात दिले आहेत.
 रक्ताचे हे विशिष्ट गुणधर्म सांगून त्यानेच पुढे म्हटले आहे की, इतिहासपूर्वकालापासून या सर्वांचे सारखे मिश्रण होत आहे. तरी पण मौज अशी की, युरोपांत कोणच्या देशात कोणचे रक्त प्रबळ आहे हे सांगण्याची त्याला हौस आहेच. डीन इंग, मॅक डुगल, गेट्स वगैरे आणखी अनेक पंडितांनी याचा विचार केला आहे. मिश्रण सारखे अगदी अनिर्बंध चालू आहे याबद्दल फारसा कोणाचा वाद नाही; पण तरीसुद्धा आमच्या देशात अमुक रक्त प्रबळ आहे हे सांगण्यासाठी त्यांचा अट्टाहास आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यांच्यात मुळीच एकवाक्यता नाही. ब्रह्म मुळीच दिसत नसल्यामुळे ते त्रिकोणी, चौकोनी की वाटोळे याबद्दल वाद होणे साहजिक आहे. पण मोजमापे, फोटो, कर्तृत्वाचा इतिहास इतकी सामुग्री पुढे घेऊन बसल्यानंतर ज्याला एक नार्डिक म्हणतो, त्यालाच जर दुसरा अल्पाइन म्हणू लागला तर त्या फरक सांगण्यात काही जीव नाही हे उघड आहे. नॉर्डिक हा वंश या पांचांमध्ये श्रेष्ठ आहे, याबद्दल सर्वांचे एक मत आहे. जगात जथे कोठे पराक्रम झाला असेल तेथले लोक मुळांत नॉर्डिकच असले पाहिजेत, हा गुंथुरच सिद्धांतच आहे. हिंदु हे मुळांत नॉर्डिकच होते, असे तो म्हणतो आणि असा हा प्रभावशाली नॉर्डिक वंश त्याच्या मते आज मुख्यत्वेकरून जर्मनीत आहे. तो अगदी शुद्ध आहे असे नव्हे. पण जर्मन रक्तांत मोठे प्रमाण नॉर्डिक रक्ताचे एवढे खास. डीन. इंगच्या मते इंग्लंमध्ये नार्डिक रक्ताचे प्रमाण फारच मोठे आहे. व वाटोळ्या डोक्याची अगदी कनिष्ठ जात जी अल्पाइन त्या जातीचे जर्मन लोक आहेत, याबद्दल त्याला संदेहच नाही. (औट स्पोकन एसेज पान ८३) मॅक डुगलच्या मताने इंग्रजांत शे. ७० नार्डिक व ३० मेडिटरेनियन रक्त आहे. फ्रेंचात नार्डिक २५ अल्पाइन ४० व मेडिटरेनियन ३५ असे प्रमाण आहे. व जर्मन लोक अगदी अल्पाइन (नॅशनल वेलफेअर अँड डिके पान १५१) अल्पाइन लोकांत विभतीपूजा फार, ते लोकशाहीला नालायक असे मॅक डुगल म्हणतो; व कैसर आणि हिटलर यांच्या सत्तेची उदाहरणे देतो. पण इंग्लंडांत सॅक्सन लोक जर्मनीतूनच आले असल्यामुळे त्या दोघांच्या म्हणजे इंग्रज व जर्मन, यांच्या प्रवृत्तासारख्या आहेत असे इतर कांही जणांचे म्हणणे आहे. ज्या नॉर्मन लोकांचा प्रभाव इंग्लंडमध्ये फार आहे, असे म्हणतात, ते नॉर्मनच मुळात मिश्र रक्ताचे होते व त्यांचा वुइल्यम हा अकुलीन बाईचा मुलगा होता असे हॅवेलाक् एलिसने सांगितले आहे. या सर्व माहितीवरून रक्ते भिन्न आहेत व अमक्या रक्ताचे अमके वैशिष्टय हे कितपत निश्चयाने सांगता येईल, याचा वाचकांनीच विचार करावा. युजेनिक्स रिव्ह्यू या मासिकाच्या १९३५ च्याजानेवारीच्या अकात या वादावर एकाने फार सुंदर टीका केली आहे. तो म्हणतो, ऑस्ट्रियामध्ये गुंथरने शे. ३५-३५ नार्डिक रक्त आहे असे मागे लिहिले होते; पण तेव्हा जर्मनी व ऑस्ट्रिया यांचे भांडण झाले नव्हते. आता बहुतेक हे प्रमाण कमी होईल.
 वर सांगितलेच की युरोपात रक्ताचे मिश्रण चालू आहे, याबद्दल वाद मुळीच नाही. तरी पण प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य टिकून आहे असे सगळे म्हणतात. काही शतके गट निराळे राहिले तर वैशिष्ट्य वाढत जाते, असे म्हणणाऱ्या गेटसलाही मिश्रविवाहाने वैशिष्ट्य नाहीसे होते असे वाटत नाही. तो म्हणतो आज एक हजार वर्षे सारखे रक्तमिश्रण चालू असूनही इंग्रजात भिन्नभिन्न वांशिक गुण अजूनही दिसून येतात. (हेरिटिटी व युजेनिक्स पान २३२)
 या सर्व विवेचनावरून निघणारा निर्णय, मला वाटते, अगदी स्पष्ट आहे. युरोपात पांची वंशांचे मिश्रण सारखे चालू आहे. अमुक एक वंश अमक्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे, असे निश्चयाने सांगता येत नाही. अमक्या वंशाचा अमुक गुण याबद्दलही एकमत नाही. आणि इंग्रज, फ्रेंच, जर्मन, इटालियन यांच्यात स्वभावाचे भिन्न कल असले तरी रक्तमिश्रणाचा व त्याचा काही एक संबंध नाही. रक्ते मिसळली तरी विशिष्ट गुण टिकून राहू शकतात. भिन्न गुण असलेच तर परिस्थितीमुळे असतील, परंपरेमुळे, किंवा संस्कारामुळे असतील ते रक्तामुळे आहेत. या म्हणण्याला पुरावा नाही. मिश्र विवाह झाल्यास वाईट असे म्हणण्याला तर अगदीच नाही. म्हणूनच इंग्रज, फ्रेंच वगैरे लोकात आपापसात विवाह करू नये असे कोणचाही पंडित किंवा शास्त्रज्ञ सांगत नाही. रक्तशुद्धीची चळवळ आज युरोपात जोराने सुरू झाली आहे हे खरे; पण ती रक्तशुद्धी वरील प्रकारची नाही. ती फक्त कुळापुरती आहे. अमक्या जातीत किंवा वर्गात लग्न करणे निषिद्ध आहे, असे जर्मन लोकांखेरीज कोणी म्हणत नाही; त्याचे विवेचन पुढे येणारच आहे.
 आतापर्यंत असे दिसले की, आर्य, मंगोल, शिद्दी वगैरे अगदी साध्या डोळयाला स्पष्टपणे भिन्न दिसणारे वंश घेतले तर त्यांच्यापुरतं रक्त भिन्न म्हणजे काय हे सांगता येते. पण इंग्रज- फ्रेंचादी किंवा कोकणस्थ देशस्थादी जवळजवळचे समूह घेतले तर, म्हणजे बाह्यतः संस्कृतीने व रूपगुणांनी साधारण सारखे दिसणारे समूह जर घेतले तर त्यांच्यामध्ये रक्ते भिन्न आहेत म्हणजे काय, हे निश्चयाने सांगता येत नाही.
 पण हे जरी सांगता येत नसले तरी कोणच्याही कारणामुळे का होईना, जे समूह निरनिराळे वर्ग म्हणून किंवा जाती म्हणून किंवा वंश म्हणून आज मानले गेले आहेत, त्यांच्यामध्ये रक्तसंकर होणे कितपत इष्टानिष्ट आहे याचा आपण विचार करू. प्रथमतः डोळ्याना स्पष्टपणे दिसत असल्यामुळे जे वंश अगदी भिन्न मानले गेले आहेत त्यांचा संकर झाला तर काय होईल ते पाहू.
 संकर वाईट असे म्हणणारे असे सांगतात की १ संकराने निर्वंश होतो. २ संकरज प्रजा नाकर्ती होते. ३ व संकरप्रजेच्या अंगी विशिष्ट तऱ्हेचे दुर्गुण निर्माण होतात. अत्यंत भिन्न वंशात संकर झाला तर वरील वरील अनिष्ट परिणाम घडून येतात की काय, हे त्या क्षेत्रातल्या अभ्यासकांच्या म्हणण्यावरून ठरवू.
 ए.डी. काट्री फेजेस याने ह्यूमन स्पेसीज (सन १८७९) या पुस्तकात मेक्सिको, पेरू, आफ्रिकेतले प्रांत या ठिकाणी कित्येक वर्षे राहून आलेल्या प्रवाशांचे अनुभव दिले आहेत. यावरून या प्रश्नावर बराच प्रकाश पडेल. वेस्ट इंडीज, मेक्सिको व पेरू या देशांत आज ३०० वर्षे युरोपीय व तद्देशीय यांच्यामध्ये संकर चालू आहे. तरी १८७९ साली तेथील प्रजा एक कोटी ऐशी लक्ष होती (पान २६१) केप कॉलनीमध्ये डच व हाटेटाट यांच्यात व मॅनिला येथे चिनी व स्पॅनिश यांच्यात संकर चालू आहे. प्रजा कमी नाही. ली व्हॅलियंट या प्रवाशाच्या तपासाअन्वये हाटेंटाट व युरोपी यांच्या संकरापासून मूळ हाटेंटाट व हाटेंटाट यांच्यातल्या विवाहापेक्षा जास्तच सतति होते. हॅबोर्नने ब्राझीलाबद्दल असेच सांगितले आहे. वाईट रोग, मुद्दाम केलेला संहार या आपत्ती नसतील तर जगांतला कोणचाही संकर निष्प्रज होत नाही असे कॅसलने म्हटले आहे. (जेनेटिक्स व युजेनिक्स सन १९२७ पान ३३) वर्क, वेल्थ व हॅपिनेस या पुस्तकात एच. जी. वेल्सनेही हेच मत प्रकट केले आहे. म्हणजे असे दिसते की, संकराने निर्वंश होतो असे कोणीच म्हणत नाही.
 अमक्या अमक्याच्या संकरापासून अमुक एक गुणाची प्रजा निर्माण होते, असे सांगण्याचा मनूचा प्रयत्न आहे व तो बरोबर आहे असे जोशी म्हणतात. व बुगलचा आधार घेतात. ब्राझीलमध्ये संकरापासून झालेले लोक कोणी चित्रकार, कोणी बजवय्ये, कोणी वैद्य असे होतात असे बुगलनं सांगितले आहे. अमक्या अमक्यापासून झाला तर तो चित्रकार, दुसऱ्या अमक्या दोघांमध्ये संकर झाला तर तो वैद्य अशी विभागणी बुगल करीत नाही. आणि कोणीच करीत नाही. 'गायनेझेस लोक व पोर्तुगीज यांचा ब्राझीलमध्ये संकर होतो. व ती संकरप्रजा सर्व बौद्धिक व नैतिक क्षेत्रांत पुष्कळच उन्नतीला गेलेली दिसते. कलेप्रमाणेच राजकारण व शास्त्र या क्षेत्रातही त्या लोकांची प्रगती झालेली दिसते. असे लॅगस या प्रवाशाचे मत ह्यूमन स्पेसीज या पुस्तकांत लेखकाने उध्दृत केले आहे. पण याहूनही स्पष्ट मुद्दा असा की वैद्यकी, चित्रकला, गायनवादन, वक्तृत्व हे गुण असंकरज प्रजेमध्येसुद्धां दिसतात. तेव्हा ते संकरज प्रजेचे वैशिष्ट्ये असे सांगण्यांत काय अर्थ आहे? जातिधर्म याचा पिंडगत गुण असा अर्थ मनूच्या मनात असेलच तर अमक्या संकर जातीचा अमका नैसर्गिक गुण हे त्याचे विवेचन सर्वस्वी चूक आहे असं दिसते.
 अत्यंत भिन्न वंशातील संकराची प्रजा नाकर्ती होते की काय याबद्दल फारसा वाद नाही. वरील प्रवाशांची वचने पाहिली तर ती तशी होत नाही असे त्यांचे मत आहे, असं दिसते. पण या बाबतीत बहुतेक सर्व पंडित असा संकर होऊ नये असे म्हणणारे आहेत. स्पॅनिश x चिनी, फ्रेंच x तांबडे इंडियन, नार्डिक x मंगोल हे संकर अगदी अनिष्ट असे गेटसने सांगितले आहे. स्पॅनिश लोकाचा अधःपात अशाच संकरामुळे झाला असे हेक्रॅफ्ट म्हणतो. मॅकडुगलने व इतर अनेक पंडितांनी शुद्ध युरोपी प्रजा व युरोपी x निग्रो यांची प्र॒जा यात तुलना करून संकरज लोक फार हीन प्रतीचे असतात, असे दाखविले आहे. कॅसल व डीन इंग यांनीही फार मित्र वंशांत संकर होऊ नये असेच सांगितले आहे. एवंच संकर प्रजेचा निर्वंश होतो किंवा तिच्यात विशिष्ट गुणधर्म येतात हे जरी कोणास मान्य नसले तरी अत्यंत भिन्न वंशातले संकर हीन प्रतीचे होतात व त्यामुळे ते अगदी अनिष्ट आहेत, असे सर्वांचे मत आहे.
 या ठिकाणी विचारासाठी एक मुद्दा सुचवावासा वाटतो. भिन्न वंशांतील संकर प्रजा नाकर्ती होते असे जे या पंडितांनी अनुमान काढले ते काढतांना त्यांनी अवलोकनासाठी जे वंश घेतले होते ते परस्परांपासून अत्यंत भिन्न होते हे खरे, पण जसे ते रक्ताने भिन्न होते तसेच संस्कृतीनं व दर्जानेही अत्यंत भिन्न होते. युरोपी हा संस्कृतीच्या व कर्तृत्वाच्या शिखरावर पोचलेला मनुष्य व अमेरिका आणि आफ्रिका येथील मूळचे लोक पायथ्यापर्यंतही न आलेले. यामुळे संकरप्रजा हीन व्हावी हे ठीकच आहे. पण जेथे संस्कृतीने व पराक्रमाने दोन्ही वंश सारखे, पण रक्ताने मात्र अत्यंत भिन्न अशा वंशांत जर संकर झाला तर त्यांची प्रजा निश्चयाने हीन होईलच, असे म्हणण्याइतका पुरेसा पुरावा पुढे आला आहे असे वाटत नाही. हिंदुस्थानच्या इतिहासात जो थोडासा पुरावा मिळतो तो या संकराला अनुकूलच आहे. आपल्याकडे तुर्क, अफगाण, व मोगल याचे रक्त रजपूत रक्ताशी वारंवार मिसळलेले आहे व त्याचे परिणाम वाईट तर नाहीच, पण बहु अंशी चांगलेच दिसून आलेले आहेत. अकबर, सेलीम, शहाजहान व अवरंगजेब या चारी मोगलांच्या स्त्रिया रजपूत होत्या. व सेलीम, खुश्रू कामबक्ष यांच्यासारखे त्यांचे मुलगे पराक्रमी होते. यूसफ आदिलशाहाची बायको मुकुंदराव म्हणून त्याचा मंत्री होता त्याची बहिण. त्यांचा मुलगा इस्माइल हा न्यायी, दूरदर्शी, रसिक व विद्वान होता असे इतिहासांत आहे. लोदी बहुलोल याची बायको एका सोनाराची मुलगी होती त्यांचाही मुलगा असाच होता. येथे अफगाण व मराठी रक्ताचे मिश्रण आहे. काश्मीरचे राज्य व राणी बळकावणारा शम्सुद्दिन व ती राणी कवलदेवी यांचे पांची पुत्र पराक्रमी होते. संबंध तुघ्लख वंश हा तर तुर्क व रजपूत यांच्या मिश्रणानेच झाला होता. बाबर हा तुर्क व मोगल यांच्या संकरापासून झालेल्या वंशांत जन्मला होता. बाजीराव-मस्तानी यांचा मुलगा समशेर बहाद्दर व त्याचा मुलगा अलिझाबहाद्दर हेही पराक्रमी होते. समुद्रगुप्त हा चंद्रगुप्त व शूद्रकुळांतली लिच्छवी घराण्यांतली कुमारदेवी यांचा मुलगा. सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे व्यासांचे. सर्व जगाला वंद्य झालेला हा पुरुष ब्राह्मण पिता व कोळीण माता यांच्यापासून झालेला आहे. या थोड्याशा उदाहरणावरून अगदी निर्णायक असे जरी काही सांगता येत नसले तरी संस्कृति व कर्तृत्व सारखे असताना अत्यंत भिन्न वंशातला संकर वाईट आहेच, असे म्हणण्यापूर्वी बराच विचार करावा लागेल एवढे तरी निदान वाटते. जेनिंग्ज ने म्हटले आहे की संकर निंद्य समजला गेल्यामुळे संकरज मुलाला वाईट वागविण्यात येते व त्यामुळे तो हीन ठरतो. त्याला जर चांगली संधी मिळाली तर तोही मोठ्या पदाला जाणे शक्य आहे. (बायॉलॉजिकल बेसीस ऑफ ह्यूमन नेचर; पांन २८७)
 हा विचार अत्यंत भिन्न रक्तासंबंधी झाला. त्यांचा संकर तज्ज्ञांना अमान्य आहे असे धरून आता जवळच्या रक्तामध्ये व जास्त निश्चित बोलावयाचे म्हणजे कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, सारस्वत, प्रभु, क्षत्रिय, मराठे, इतर प्रांतातले ब्राह्मण, क्षत्रिय यांच्यामध्ये विवाह होण्यास या शास्त्रज्ञांची काही हरकत आहे काय ते पाहू.
 या विषयाचा विचार गाल्टन, एलिस, फ्रीमन, मॅकडुगल, इंग, कॅसल, डेव्हनपोर्ट या अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे व जवळजवळच्या रक्तामध्ये संकर होणे अनिष्ट तर नाहीच पण ते समाजाला अत्यंत हितावह व आवश्यक आहे असे यांनी प्रतिपादले आहे. जेव्हा जेव्हा हे रक्तशुद्धीबद्दल बोलतात तेव्हा ते फक्त कुलाबद्दल बोलत असतात. म्हणजे एकदा फार भिन्न वंश सोडून दिले म्हणजे मग जात, वर्ग वगैरे विभाग ते मुळीच करीत नाहीत. फक्त ज्या कुलांतली मुलगी तुम्ही करीत असाल किंवा जेथे देत असाल, त्या कुलांत आनुवंशिक रोग मनोदौर्बल्य, वेडेपणा, काही दुष्ट प्रवृत्ती या नाहीत ना एवढे पहा, असे त्यांना सांगावयाचे आहे. अशी कुले चांगल्या कुलांचा नाश करतात. म्हणून जी चांगली कुले असतील त्यांनी विवाह करताना अत्यंत कळजी घेतली पाहिजे. पण हा उपदेश ते लोक कोकणस्थ किंवा देशस्थ, यांचे आपआपल्या जातीत जरी विवाह चालले असले तरी त्यांना सुद्धा करतील. त्यांचा कटाक्ष कुलापुरता आहे. समान संस्कृती, समान रूपगुण, समान कर्तृत्व असे दिसेल व कुळांमध्ये इतर काही दोष नसेल तर कोणाच्याही दोन कुलांनी जात किंवा वर्ग यांचा विचार न करता आपापसांत विवाह करण्यास हरकत नाही, असे त्यांचे मत आहे.
 (१) औट स्पोकन एसेज (पान १६१) यामध्ये डीन इंगने असेच मत दिले आहे. Continued inbreeding in a small society is certainly prejudicial. Probably alternate periods of fusion with immigrants and stabilising the results, give a nation the best chance of producing a fine type of men and women (कायम आपल्या जातीत विवाह करणे हा दुराग्रह आहे. मधून मधून बाह्यांशी विवाह करावे, ते रक्त चांगले मिसळू द्यावे व मग पुन्हा मिश्रण करावे. अशाने देशांत तेजस्वी स्त्री-पुरुष निर्माण होण्याचा जास्त संभव आहे)
 (२) कॅसलने हेच मत जेनेटिक्स व युजेनिक्स या ग्रंथात दिले आहे. (पान २७२). The mixtur of elements not too dissimilar provided the social heritage is not unduly disturbed, is on the whole beneficial. It results in the increase of vigour and energy in the offspring. सामाजिक पीठिका मोडत असल्या तर विवाह करू नये हा मुद्दा कॅसलने चांगला सांगितला आहे पण हा सोईचा प्रश्न आहे. एरवी असल्या संकराने पुढील प्रजा जास्त कर्ती व तेजस्वी होते असेच तो म्हणतो
 (३) आपल्या देशांत (अमेरिकेत) हीन प्रतीचे लोक येऊ देऊ नये, हे सांगून कोणाला बंदी करावी हे सांगतांना डेव्हन पोर्ट म्हणतो. In fact no race is dangerous and none undesirable; but only those individuals whose germinal determiners are, from the stand point of life, bad. In other words immigrants are desirable who are of good blood and undesirable who are of bad blood. (हेरिडिटी इन् रिलेशन् टु युजेनिक्स पान २२१) येथे डेव्हन पोर्टने अमुक व्यक्ती त्याज्य असे म्हटले आहे. जात त्याज्य असे सांगितले नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. रक्तशुद्धी त्यास हवी आहे; पण त्यासाठी कुले तपा सावी, अमेरिकेत युरोपात एजंट नेमावे व जे कोणी अमेरिकेत येण्यासाठी अर्ज करतील, त्यांच्या कुलांचे इतिहास तपासावे व चांगले असल्यास मगच त्यांना प्रवेश द्यावा असे त्यांचे म्हणणे आहे. (पान २२४.)
 (४) गट बेटीबंद राहिले तर त्याच्यांत विशिष्ट गुणांची वाढ होते असे सांगणारा गेट्स सुद्धा मिश्रविवाहाला अनुकूलच आहे. Intermarriage of diverse strains is important, both from point of view mentioned above, and on account of the increased vigour resulting from the heterozygous condition, but there are important limitations to the width of crosses which are desirable. (हेरिडिटी व युजेनिक्स पान २२२) रक्ताच्या भिन्नतेला मर्यादा असाव्या हा गेट्सचा इषारा आहे; पण त्या मर्यादा पाळल्यानंतर भिन्न जातीत किंवा वर्गात मिश्रविवाह अगदी इष्ट आहे असेच त्याचे मत आहे.
 मॅक डुगल, माल्टन, फ्रीमन या सर्वांचे मत हेच आहे. सम संस्कृतीच्या व सारख्या रूपगुणांच्या कुलांत विवाह अवश्य घडवून आणले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मतांनी समाजात जाती दोनच एक कर्त्या कुळाची व एक नाकर्त्यांची; व त्यासुद्धा कायम नाहीत. परीक्षण सदोदित चालू ठेवावयाचे व वरच्यापैकी कोणी हीन प्रवृत्ति दाखवू लागले तर त्यांना बाहेर घालवून खालच्यापैकी कोणी कर्तृत्व दाखविले तर त्यांना वर घ्यावयाचे. अशी त्यांच्या मते समाजरचना असावी. हा क्रम कायमचा चालू ठेवावयाचा असल्यामुळे समाजात कायमच्या जाती राहाणारच नाहीत.
 [५] समाज जगण्यासाठी त्यांत संघ व उपसंघ असलेच पाहिजेत ही जोशांची कल्पना या शास्त्रज्ञांना मान्य नाही. वर सांगितलेली कल्पना मँक डुगलने एथिक्स आणि सम् वर्ल्ड प्रॉब्लेम्स या पुस्तकात सांगितली आहे. नॅशनल वेल्फेअर आणि डिके या पुस्तकाच्या प्रस्तावनेत संवादरूपाने हाच विचार त्याने मांडला आहे उत्कृष्टांची जी जात तयार करावयाची तींत नवी माणसे घेताना त्यांचा कुलेतिहास पहिला जाईल. एकदा निवडलेल्या घराण्यातील मुलेसुद्धा परीक्षेवाचून श्रेष्ठ वर्गांत घेतली जाणार नाहीत. जास्त संधी त्यांना मिळेल यांत शंकाच नाही. पण सर्व कसोट्या उतरल्यानंतर जगतल्या कोणच्याही व्यक्तीला त्यांत मज्जाव नाही. (Admitting new members. selected from the whole world) असे त्यांचे म्हणणे अगदी निःसंदेह आहे.
 [६] समाजांतील प्रत्येक थरांतून चांगली माणसे निवडून काढावी व त्यांची आपापसात लग्ने घडवून आणून त्यांची एक जात तयार करावी अशी स्वप्ने गाल्टनला नेहमी पडत, असे त्याच्या चरित्रांत पिअरसनने म्हटले आहे. [विभाग २ पान १२१, विभाग ३ पान २३४]
 हेरिडिटरी जीनियस या पुस्तकांत गाल्टनने एके ठिकाणी ३१ न्यायाधीशांच्या घराण्यांची माहिती दिली आहे. लक्षाधिशांच्या एकुलत्या एक मुलींशी यांतील पुष्कळांनी लग्ने केल्यामुळे व काही अविवाहित राहिल्यामुळे या घराण्यांचा नाश झाला असे सांगितले आहे. या नाशाची मीमांसा करतांना तो म्हणतो श्रीमंत एकुलत्या एक मुलींशी विवाह केल्यामुळे ही घराणी नाश पावली. आईच्या व मुलीच्या प्रसव-शक्तींत आनुवंशिक संबंध असतो. आईला मुलगा नाही म्हणून मुलीलाही झाला नाही. या विवेचनांत जातीचा, वर्गाचा किंवा भिन्न रक्तांचा मुळीच संबंध नसतांना जोशांनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गाल्टनच्या तोंडी अवतरणे देऊन 'अशा तऱ्हेने असवर्ण विवाह हे निर्वंशाला म्हणजे नाशाला कारण झाले.' असे खोटेच वाक्य घातले आहे. गाल्टनचे तसे मत मुळीच नाही. आणि जी मीसांसा त्याने दिली आहे, व जी दुसऱ्या एका ठिकाणी याच पुस्तकात जोशांनी पत्करली आहे, तीही चूक आहे. असे कार्ल पिअरसनचे मत आहे. आईच्या व मुलीच्या प्रसवशक्तीत आनुवंशिक संबंध नाही असे सांगून नैतिक दुराचरणामुळे असल्या घराण्यांचा नाश होतो, हे इरॅसमस डार्विनचे मत त्याने मान्य केले आहे.
 [७] हॅवेलॉक् एलिसची जोशांनी गाल्टन प्रमाणेच मौज केली आहे. ए स्टडी ऑफ ब्रिटिश जीनियस या पुस्तकात त्याने हजार कर्त्या पुरुषांच्या घराण्याचा अभ्यास केला आहे. त्यात आयरिश X इंग्लिश व वेल्श X इंग्लिश या दोन संकरांपासून ज्या प्रमाणात कर्ते पुरुष निर्माण झाले त्या प्रमाणात स्कॉच हे जवळचे असूनही त्यांच्या व इंग्रजांच्या संकरांतून झाले नाहीत असे त्याला दिसले म्हणून तो म्हणाला की, 'The Irish and the welsh are much better adopted for crossing with the English than the more closely related scotch' (२३) संकर प्रजा नाकर्ती होते असे त्याने मुळीच अनुमान काढलेले नाही. जोशांनी ते खोटे लिहिले आहे. (हिंदू स. शास्त्र पान २२५)
 [८] समाजाच्या सर्व थरांतून चांगली कुले निवडून काढून त्याची एक जात करावी व तिच्यात सारखी भर घालीत जावे, याचा विचारी इंग्रज लोकांना ध्यासच लागलेला दिसतो. गाल्टन, मॅकडुगल यांचे विचार वर सांगितलेच आहेत. ऑस्टिन फ्रीमनचीही तशीच कल्पना आहे. मात्र ती जी एक जात होणार तिच्यात एक राष्ट्रीयत्व राहण्यासाठी इंग्रजाखेरीज बाहेरचा कोणी घेऊ नये, असे त्याने सांगितले आहे. पण एकदा या मर्यादा पाळल्यानंतर बाकी विचार फक्त कुलशुद्धाचा 'No restrictions in respect of class or caste would be entertained' (सोशल डिके आणि रिजनरेशन पान ३१८) वर्ग किंवा जात यांची बंधने मुळीच पाळावयास नको, वाटेल त्या वर्गातील घराणे चालेल.
 सम संस्कृतीच्या दोन समूहांमध्ये मिश्रविवाह निषिद्ध तर नाहीच पण अतिशय इष्ट आहे. पुढील पिढीचा जोम व कर्तृत्व त्यामुळे वाढते असे या पंडितांचे स्पष्ट मत असल्याबद्दल वरील उतारे वाचल्यानंतर कोणासही संशय राहील असे वाटत नाही. गेटस् ने एक पाऊल पुढे जाऊन या मर्यादित संकराचा आणखी एक फायदा सांगितला आहे. पर्ल व लिटूल या दोघांनी केलेल्या अभ्यासाच्या आधाराने त्याने असे सांगितले आहे की इंग्रज, आयरिश, रशियन, इटालियन, जर्मन, ग्रीक यांचे मिश्रविवाह पाहिले तर त्यांच्यात निदान पहिल्या पिढीला तरी पुत्रसंततीचे प्रमाण पुष्कळच वाढलेले दिसते. शुद्ध संतती व मिश्र संतती यांतील मुली व मुलगे यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे शुद्ध:- मुली १०० मुलगे १०६.२७. मिश्रः - मूली १०० मुलगे १२१.५६ In crosses between European races there is a higher ratio of male births at least in first generation (हेरिडिटी व युजेनिक्स पान २३०) संकराचा हा फारच मोठा फायदा आहे हे सनातन्यांनी तरी मान्य केले पाहिजे.
 संकराने प्रजा नाकर्ती होत नाही, तिचा नाश होत नाही व तिच्यात दुर्गुणही येत नाहीत. इतकेच नव्हे तर संकर हा समाजाला अत्यंत हितावह असून त्याने कर्तृत्व व जोम ही वाढून शिवाय पुत्रसंततीचे प्रमाणही वाढते असे आपण पाहिले. संकरविरोधी लोक आणखी एक मुद्दा पुढे आणीत असतात. त्यांचे मत असे की 'क' या समूहात एकादा विशिष्ट गुण वास करीत असला व त्याच्या रक्ताशी 'ख' या समूहाच्या रक्ताचे मिश्रण झाले तर त्याचा तो विशिष्ट गुण नाहीसा होईल. व 'क' ला जर आपला विशिष्ट गुण राखून ठेवावयाचा असेल तर त्याने आपल्या समूहांतलीच मुलगी केली पाहिजे.
 आनुवंशा संबंधीच्या चुकीच्या कल्पनांनी हे वरच्यासारखे समज निर्माण होत असतात. एक विशिष्ट कर्तृत्वशाली मानवसमूह घेतला तर त्याची पुढली पिढी किती कर्ती होईल एवढेच सांगता येईल. अमक्याच तऱ्हेने तिचे कर्तृत्व प्रगट होईल, असे सांगता येणार नाही. पिढ्यान्पिढ्या एकाद्या समूहात एकाच प्रकारचे कर्तृत्व राहाणार नाही असे नाही. पण परंपरेमुळे व परिस्थितीमुळे राहते. पारशांचे तसे उदाहरण आहे. पण ब्राह्मण, आरब, ज्यू यांची उदाहरणे अगदी निराळी आहेत. परिस्थिती बदलली की, निरनिराळ्या प्रकारचे कर्तृत्व तोच समाज दाखवू शकतो. आणि तरच त्याला पराक्रमी म्हणता येईल. म्हणजे एकाच समूहात मूलतःच अनेक प्रकारचे कर्तृत्व असते. म्हणून दुसऱ्या समूहाशी त्याचा संकर झाला तर त्याला आपले विशिष्ट कर्तृत्व जाईल ही भीती बाळगण्याचे मुळीच कारण नाही. कुलांच्या बाबतीत असेच आहे. एका कुलांत अनेक प्रकारचे कर्तृत्व असू शकते म्हणून त्यांतील लोकांनी कोणच्याही क्षेत्रांतल्या पण वरच्या दर्जाच्या कुळांशी विवाहसंबंध घडवून आणले म्हणजे झाले. अर्थात् रूपगुणसंस्कृती ही बंधने आहेतच हे केव्हाही विसरून चालणार नाही. व्यक्तीच्या बाबतीत या बाबतीतल्या मर्यादा आकुंचित होतात हे खरे. म्हणजे पुष्कळ वेळा गवयाचा मुलगा उत्तम गवई होतो. पण तो नियमाने होतोच असे नसल्यामुळे त्यांची जात करण्याइतके महत्त्व या विचाराला मुळीच नाही. म्हणून शरीर, मन व बुद्धि या दृष्टीने सुदृढ कुलाशी संबंध करावयाचा एवढी सावधगिरी बाळगली की, मग कोणच्याही कुळांत लग्न केले तरी गुणांचा लोप होईल ही भीती बाळगण्याचे कारण नाही.
 रक्तसंकराचा असा विचार झाला. आता वृत्ति संकराचाही थोडक्यात विचार करू. तोही रक्तसंकराप्रमाणेच हितावह आहे असे दाखवून देऊ. म्हणजे चातुर्वर्ण्याच्या बुडाशी असलेल्या दोन्ही कल्पना कशा फोल आहेत ते दिसेल एका जातीने दुसऱ्या जातीचा धंदा करणे याचे नांव वृत्तिसंकर. रक्तसंकराइतकी याची कोणी निंदा करीत नसले तरी वृत्तिसंकर अगदी निषिद्ध मानला आहे ह्यांत शंका नाही.
 ब्राह्मणांनी वैद्यविद्या, शिल्प, व्याजबट्टा, पशुविक्रय व राजसेवा ही करू नये असे मनूने एके ठिकाणी सांगितले आहे. (३-६४,६५) गायन वादन करू नये असेही सांगितले आहे. (४-१५) व्यापार करावा; पण तीन वर्षाचा धान्याचा पुरवठा करण्या इतकाच करावा (४-६) अशी परवानगी दिली आहे. राजसेवा करू नये असे वर म्हटले आहे. पण उलट राजाचा मंत्री ब्राह्मण असावा. (७-५८-५९) न्यायाधीश ब्राह्मण असावा (८-११) असेही मनूने सांगितले आहे.
 मनुस्मृतीत असे परस्परविरोध पुष्कळच आहेत. मला वाटते मनूचा आनुवंशाचा शोध हा मनुस्मृतीतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते तत्त्व व्यवहारात आणताना मनू किंवा बहुशः मनूचे शिष्य अगदी एकांतिक झाले आहेत कोणच्याही नवीन तत्त्वाचा उत्पादक एकांतिकच असतो असे आपणास कार्ल मार्क्स, रूसो यांच्या उदाहरणांवरून दिसते. आनुवंशाचा इंग्रज प्रणेता सर फ्रॅन्सिस गाल्टन हाही असाच होता याची पुष्कळशी मते अगदी न पटणारी आहेत. त्याच्या ग्रंथाबद्दल कार्ल पिअरसनने जे म्हटले आहे तेच आपणांस मनुस्मृती बद्दल म्हणता येईल Hereditary Genius is one of the greatest books of the world, not so much by what it proves but by what it suggests. हेरिडिटरी जोनियस हा जगातला एक फार मोठा ग्रंथ आहे. त्यांतला प्रत्येक सिद्धांत खरा आहे म्हणून त्याला महत्त्व आले असे नसून त्याने सुचविलेल्या तत्त्वाला सर्व महत्त्व आहे.
 पण हा सुविचार देऊन वृत्तिसंकर हा अत्यंत निंद्य होय, याने कुलांचा समूळ नाश होतो. वगैरे जे मनूचे म्हणणे आहे ते अगदी अक्षरशः खरे आहे असे कांही लोक सांगत सुटले आहेत. त्याचा आता विचार करावयाचा आहे.
 वृत्तिसंकर केला म्हणजे एका जातीने दुसऱ्या जातीचा धंदा केला तर त्या लोकांचा निर्वंश होतो असे गो. म. जोशी सांगतात. पेशव्यांनी ब्राह्मण्य सोडलं व क्षात्रवृत्ती धरली. त्यामुळे त्यांचे कुल पांचव्याच पिढीला नष्ट झाले, हे उदाहरण त्यांनी घेतले आहे. (पान १६१) व असा कुलाचा नाश होतो म्हणून ब्राह्मणांनी समाजसुधारणा, राजकारण, वगैरे करू नये (पृ. २३६) त्यांनी क्षत्रियाचा धंदा करू नये (पृ. २५१) इ. उपदेश केला आहे.
 रा गो. म. जोशींच्या वेडगळ बडबडीचा एरवी कोणी विचारही यांच्या केला नसता पण युरोपी पंडितांचा आपल्या सांगण्याला आधार आहे, असे ते भासवीत असल्यामुळे व त्या पंडिताच्या शब्दाला वजन असल्यामुळे आपल्या लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून, जोशांच्या लिखाणाचा विचार करण्याचे मी योजिले आहे
 आज युरोपीय समाजावर एक मोठे संकट येऊ पहात आहे. उच्च राहणीचे मान फार वाढल्यामुळे महत्वाकांक्षी कर्त्या पुरुषांना लवकर लग्ने करता येत नाहीत. व उशीरा केल्यानंतरही राहाणी हीन होईल, या भीतीने त्यांना अपत्यांच्या संख्येवर नियमन ठेवावे लागते. उलट गरिबांना मदत करणाऱ्या नाना प्रकारच्या संस्था, इस्पितळे ही परोपकारबुद्धीने समाजाने चालविली असल्यामुळे दीन-दुबळयांना चांगला आश्रय मिळतो व त्याची प्रजा भराभर वाढत जाते. अशा रीतीने कर्त्या माणसांना प्रजा कमी व दुबळ्यांना जास्त असा विपरीत प्रकार सुरू होऊन आज त्यांच्या समाजात कर्त्या पुरुषांचे प्रमाण घटत चालले आहे. या संकटाचा विचार आज जवळ जवळ प्रत्येक विद्वान् मनुष्य करीत आहे. हॅवलॉक एलिस व मॅक् डुगल हे त्यांच्यापैकी पुष्कळ श्रेष्ठ दर्जाचं पंडित आहेत. त्यांनी अनुक्रमे 'टास्क ऑफ सोशल हायजीन' व 'नॅशनल वेलफेअर ॲंड डिके' या प्रश्नाचा पुष्कळ विचार केला आहे.
 मॅक् डुगलने म्हटले आहे की, खालच्या वर्गातील पुरुष महत्त्वाकांक्षी होतो. वर चढतो, तेथे तो कर्तृत्व दाखविता; पण तेथे त्यांच्या फार पिढ्या टिकत नाहीत लवकरच त्याचा निर्वंश होतो या विधानावर जोशीबुवांनी उडी मारली व त्यांनी सांगितले की, पहा. वर्णांतर, वर्गांतर, जात्यंतर हे हानिकारक आहे असे इंग्रज पंडितही म्हणतात; पण खालच्या वर्गातला मनुष्य वरच्या वर्गात गेला म्हणून त्याचा नाश झाला असे मॅक् डुगलला मुळीच म्हणावयाचे नाही. आपल्या समाजत कर्त्या महत्त्वाकांक्षी पुरुषांचाच नेमका कसा वंश-नाश होतो ते त्याला दाखवावयाचे आहे. वरच्या थरांतल्या कर्त्या पुरुषांचा वंश-नाश तर चालूच आहे. त्याबरोबर खालच्या थरातले लोक वर आले व कर्तृत्व दाखवू लागले म्हणजे त्यांचाही नाश होतो, असे त्याला सांगावयाचे आहे. जात्यंतर, वर्णांतर, वृत्तिसंकर यांचा येथे काही एक संबंध नाही. तर उच्च पदाला जो जातो तो- मग तो कोणच्याही थरातला असो- नाश पावतो, त्याच्या फार पिढ्या टिकत नाहीत असे हे मत आहे. त्यांतही महत्त्वाकांक्षेमुळे व मोठेपणामुळे वंशनाश असा कार्यकारण संबंध नाही तर महत्त्वाकांक्षेमुळे उशीरा विवाह, उशीरा विवाहामुळे कमी संतती च कमी संततीमुळे पुढे वंशनाश असा हा परिस्थितीमुळे, व आर्थिक अडचणीमुळे निर्माण झालेला संबंध आहे (पान १५५). येथे आनुवंशाचा संबंध नाही. वर्णांतराचा नाही. तसा असता तर खालच्यांना वर चढू देऊ नये असे त्याने सांगितले असते. पण तो तर उलट खालच्यांना वर चढविण्याची ही सोपानपरंपरा (Social ladder) समाजाच्या प्रगतीला फार आवश्यक आहे असे सांगतो. संस्कृती कशी नाश पावते हे सांगतांना कोणच्या क्रमाने नाश होतो, एवढेच फक्त त्याने सांगितले, त्यात वरील वाक्य आले. व प्रथम वरच्या थरांतले व मग खालच्याही थरांतले कर्तृत्व एकच कारणामुळे नाश पावते असे त्यांचे विधान आहे. आणि त्या नाशाचे कारण आर्थिक आहे, जीवनशास्त्रीय नाही.
 हॅवेलॉक एलिसचे हेच म्हणणे आहे. त्याची कारणमीमांसा मात्र जरा निराळी आहे. तो म्हणतो समाजांत जी जबाबदारीची फार मोठी कामे आहेत, ती कोणीही, कोणच्याही वर्गातल्या माणसाने केली तरी त्याच्या घराण्याचा लवकरच केवळ जास्त दगदगगीमुळे नाश होतो. 'As a family attains highest culture and refinement which civilization can yield that family tends to die out at all events in the male line.' येथे घराणे असे त्याने म्हटले आहे. अमुक जातीतील घराणे असे नाही. व ते नाश पावते ते दगदगीमुळे अती ताण पडल्यामुळे. (Increased work for nervous system) वर्णांतरामुळे नव्हे, जो कोणी हे दगदगीचे काम करील तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही असो, तो नाश पावेल, म्हणजे त्यांचे घराणे लवकर निपुत्रिक होईल असे तो म्हणतो; पण म्हणून वरच्या वर्गाचे काम खालच्या वर्गातील घराण्यांनी करू नये, असे तो कोठेचे सांगत नाही. उलट शेक्सपीयरगटे यांच्यासारखे होऊन तीन पिढ्यांत नष्ट झालेले पुरवले, पण सालमन मासा होऊन युगानुयुगे जगणे नको असेच तो सांगतो. (पान २०) प्रत्येक वर्गाला त्याचे एक विशिष्ट गुरुत्व असते व त्यातच तो जगू शकतो असे त्याने म्हटले आहे खरे पण मला त्याचा नेमका बोध झाला नाही. त्यानेही ते कोठे स्पष्ट केले नाही. जोशांनी अर्थातच धंदा बदलणे म्हणजे विशिष्ट गुरुत्व घालविणे असा अर्थ केला आहे तसेच एकदा खालच्या वर्गातला मनुष्य वरच्या वर्गात चढतो तेथे तो लग्न करतो. त्याची भरभराटही होते, पण दोन तीन पिढ्यांतच त्याचे घराणे नाश पावते असेही त्याच पानावर टीपेत त्याने म्हटले आहे. पण असे कधी कधी घडते असे त्याने सांगितले आहे. म्हणून त्याचा विचार करण्याचे कारण नाही. जोशांनी मात्र Occassionally it happens याचे 'कित्येक वेळा असे घडते की' असे खोटे भाषांतर करून तो आधार जुळतासा करून घेतला आहे.
 इतिहासकार सरदेसाई यानी 'मराठेशाहीत एकंदरीत पाहता ब्राह्मणांचा नाश फार झाला' असे म्हटले आहे. पण तेथेही ब्रह्मणांची कामे ज्यांनी सोडली त्यांचा झाला. व मनुस्मृतीत जी ब्राह्मणांची कामे म्हणून सांगितली आहेत ती ज्यांनी सोडली नाही त्यांचा झाला नाही असे काही एक सांगितलेले नाही. अर्थात वर्गांतराशी त्याचा काही एक संबंध नाही. पण जोशी हाही आधार आपल्या बाजूला घेत असतात.
 सायंटिफिक औक लुक म्हणून बट्रांड रसेलचे एक पुस्तक आहे. त्यांत एक ध्येय डोळ्यापुढे ठेवून ते साधण्याच्या धोरणाने ज्याची रचना केली असेल, तो शास्त्रशद्ध समाज' (सायंटिफिक सोसायटी) अशी त्याने व्याख्या केली आहे; त्या समाजाचे वर्णन त्याने एकंदर सहा प्रकरणांत केले आहे. त्यांत जाती असाव्या, प्रत्येकाला आपल्या खुषीप्रमाणे धंदा करता येणार नाही, उच्च वर्गाने ज्ञान गुप्त ठेवावे, खालच्या वर्गाला बोलण्याचा हक्क नसावा, अशी जोशांनी उद्धृत केलेली वाक्ये आहेत. पण त्याच्या पुढच्याच प्रकरणांत त्याने सांगितले आहे की, सायन्स सायन्स करून हृदय व भावना यांना विसरून जाणाऱ्या लोकांच्या समाजांचे कसे विकृत स्वरूप होईल ते मी मागल्या प्रकरणांत दाखविले आहे. ते कोणीही परमार्थाने मानू नये. समाजाची ती काळी बाजू आहे. पण पुढची ही सूचना गाळून टाकून जोशांनी मधलीच वाक्ये रसेलची मते म्हणून उचलून घेऊन मनुस्मृतीला आधार घेतला आहे.
 हे युरोपांत झाले. आपल्याकडे अगदी बेटीबंद जाती आहेत. आपल्याकडे कदाचित मनूचे म्हणणे खरे असेल असे पुष्कळांना वाटण्याचा संभव आहे. यांच्यासाठी पुढील विवेचन केले आहे. मनुप्रणीत धंदे कायम ठेवले तरी ज्यांचे वंश टिकले नाहीत व मनुप्रणीत धंदे सोडले तरी ज्यांचे वंश हयात आहेत, अशा सुमारे तीस घराण्यांचे इतिहास एका कोष्टकांत मी बसविले आहेत. ते कोष्टक जरा बोधप्रद होईल. कोष्टकांत जेथे अमुक पिढया जगल्या असे म्हटले आहे तेथे दत्तक न घेता जगल्या असा अर्थ आहे. दत्तक घेऊन जगलेली घराणी जमेस धरली नाहीत.
 घराणे किती पिढया जगले म्हणजे ते जगले म्हणावयाचे, वर्णांतर केल्यानंतर किती पिढ्यांनी नाश झाला तर तो वर्णांतर झाला, असे मानावयाचे याचा खुलासा जोशीबुवांनी केलेला नाही. एके ठिकाणी 'जातीय संकराने समाजाचा नाश, हा जो सृष्टीचा नियम तो काही प्रभावी झाल्यावाचून राहणार नाही. मग तो होण्याला किती पिढ्या लागतील त्या लागोत (पान १७७) असे एक वेडगळ वाक्य त्यांनी लिहून ठेवले आहे. त्यांनी नक्की सांगितले असते तर. त्याच्या उलट उदाहरणे वाटेल तितकी देता आली असती.
 ज्यांनी मनुप्रणीत धंदे कायम ठेवले तरी घराण्याचा नाश झाला, त्यांची यादी पुढे दिली आहे. घराण्याच्या नावांपुढे दिलेले धंदे मनुप्रणीत आहेत:
 (पुढील माहिती परांजपे, बरवे, गोखले वगैरे घराण्यांचे इतिहास, सरदारांच्या कैफियती वंशावळी, पेशवे दप्तर, रिसायती यांवरून घेतली आहे.)

घराण्याचे नाव व जात. धंदा किती पिढ्याटिकल्या
त्रिंबकराव दाभाडे मराठा क्षत्रिय सेनापती मुलगा नाही, पिढी १
नाना फडणीस ब्राह्मण मंत्री मुलगा नाही १
भास्कराचार्य ब्राह्मण शास्रज्ञ मुलगा नाही १
बापूभट परांजपे ब्राह्मण वैदिक व याज्ञिक नातू नाही २
जयपूरचे घराणे क्षत्रिय राजे नातू नाही २
हरी धोंडदेव परांजपे ब्राह्मण दशग्रंथी नातू नाही २
कागलकर घाटगे क्षत्रिय योद्धे, कारभारी ३ पिढ्या
बाळकृष्ण नारायण दीक्षित पाटणकर ब्राह्मण अग्निहोत्री आज वंश नाही
न्या. रानडे ब्राह्मण न्यायाधीश मुलगा नाही १
१० रामशास्त्री प्रमुख ब्राह्मण " आज वंश नाही
११ रामचंद्रपंत आमात्य ब्राह्मण मंत्री ६ पिढया आज दत्तक
१२ साळुंखे पाटणकर क्षत्रिय लढवय्ये सरदार ६ पिढयानंतर एक शाखा सोडून सर्व निर्वंश
१३ डफळे सटवाजीराव क्षत्रिय लढवय्ये सरदार नातू नाही २ पिढ्या
१४ गायकवाड क्षत्रिय राजे ५ पिढ्या आज दत्तक
१५ मोरया गोसावी ब्राह्मण संत ८ पिढ्या
 ज्यांनी आपले मनुप्रणीत धंदे सोडले तरी त्यांचा वंश टिकला अशांची उदाहरणे पुढे दिली आहेत. यांतल्या प्रत्येक घराण्यांतले वंशज आज आहेत.
x टीप- यांचे बंधुयांनी ब्राह्मण्य सोडून सरदेशमुखी घेतली. त्यांचा वंश आहे.

घराण्याचे नाव व जात धंदा हे मनुप्रणित धंदे नाहीत किती पिढ्या टिकल्या
बाळाजी आबाजी चिटणीस क्षत्रिय लेखणी ९ पिढ्या
बारामतीकर जोशी ब्राह्मण सावकार १० पिढ्या
मेहेंदळे ब्राह्मण सरदारकी सुमारे ८ पिढ्या
पटवर्धन ब्राह्मण " सुमारे १० पिढ्या
खांडेकर ब्राह्मण ओरिसाचे सुभेदार ७ पिढ्या
रामचंद्र गणेश कानडे ब्राह्मण लढवय्ये [सरदार ७ पिढ्या
रामचंद्र नाईक परांजपे " सावकार ७ पिढ्या
केशव भास्कर परांजपे " कापडाचा व्यापार ११ पिढ्या
परांजपे कुलांतील १५ वे घराणे " सावकार [देशमुख १० पिढ्या
१० बाळाजी महादेव परांजपे " वसईच्या किल्यावर ७ पिढ्या
११ गोखले " आदिलशाहीपासून सावकारी पुढे पेशवाईत सरदारकी सुमारे २० पिढ्या
१२ बरवे घराणे " सरदारकी व सावकारी पुष्कळ शाखा ९ पिढ्या
१३ पानसे " शिवाजीच्या वेळेपासून सरदार सुमारे १२ पिढ्या वंश चालू आहे.
१४ पुंडे " [सावकारी [चालू ३३ पिढ्या
१५ मावळकर सरदेसाई " सरदेशमुख अनेक शाखा
 वरील कोष्टक पाहून असे ध्यानात येईल की, वृत्तिसंकर व वंशनाश यांचा काहीएक संबंध नाही.
 [ येथे गणितागत पद्धतीबद्दल थोडासा खुलासा केला पाहिजे. मला ती मुळीच येत नाही. पण ज्यांनी त्या पद्धतीने अभ्यास केला आहे, त्यांचेच आधार मी घेतले आहेत. आपल्याकडे हा शब्द गो. म. जोशी बराच वेळ म्हणतात. त्यांना त्यांत काही समजते असा पुरावा अजून कोठेच उपलब्ध नाही. त्यांच्या ग्रंथांत 'शक्य तर हा हिशेब परिशिष्टांत देऊ' असे अनेक वेळा त्यांनी नुसतेच म्हटले आहे. दिला नाही. व्याख्यानांतही ग्राफ, कोइफिशंट वगैरे शब्द सांगण्यापलीकडे त्यांनी अजून जास्त पुरावा दिलेला नाही. वर दिलेल्या कोष्टकावरून एकदम काही निर्णय करावा असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण गणितागत पद्धतीच्या नुसत्या बडबडीपेक्षा हा पुरावा जास्त निर्णायक आहे यांत शंकाच नाही शिवाय मी घेतलेला प्रत्येक आधार गणितागत पद्ध- अभ्यास करणाऱ्या पंडिताचाच घेतला आहे हे वर सांगितलेच आहे. ]
 वाटेल त्याने वाटेल तो धंदा करावा, व आपले कर्तृत्व दाखवून मोठ्या पदाला चढण्यास समाजाने त्याला अवश्य संधी द्यावी, यामुळेच समाजाची उन्नति होईल. त्याचप्रमाणे समस्संकृति व कर्तृत्व पाहून वाटेल त्या सुदृढ कुळांशी विवादसंवंध करावे. त्यायोगाहे समाजाची पुढील पिढी जास्त तेजस्वी होईल असा या दोन बाबतीत आपल्याला वरील विवेचनावरून निर्णय करावयास हरकत साही; रक्तशुद्धि व वृत्तिशुद्धि आजपर्यंत आपण पुष्कळ केली. पण हिंदूंचे साम्राज्य बाह्य प्रदेशावर तर नाहीच पण त्याच्या देशावरही अविच्छिन्न असे. गेल्या दीड हजार वर्षांत नाही. महाराष्ट्रापुरतेच बोलावयाचे तर कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, सारस्वत, प्रभू, मराठे वगैरे जाती जर रक्ताने एक झाल्या, तर साठ सत्तर लाख लोकांचा एक बलवान समूह या देशांत तयार होईल व मग आज जो अनेक कारणांनी सामर्थ्याचा व्यय होत आहे तो थांबून या देशाचा भाग्योदय होईल असे वाटते.
 [ या प्रकरणांत train, Germinal determiners यांसारखे काही पारिभाषिक शब्द आलेले आहेत. त्यांचा अर्थ अगदी नेमका निश्चित करणे कठीण असते. माझा अर्थ कोठे चुकला आहे असे मला आढळलेले नाही. पण क्वचित् तसे होणे शक्य आहे. पण तेवढ्यावरून सर्व प्रतिपादन लटके पडेल असे नाही. तसे म्हणण्याचा एकाने प्रयत्न केल्याचे मला आढळले आहे. म्हणून खुलासा करून ठेवला आहे. ]