वाहत्या वाऱ्यासंगे/आकाशमोगरी

विकिस्रोत कडून

आकाशमोगरी



 आकाशमोगरीचे फूल पाहिले आहे कुणी? आ..का..श..मो..ग..री ! काऽही आठवत नाही ना? बटमोगरी..दुधीमोगरा. .बत्तीसमोगरा..हजारीमोगरा..मदनबाण, सारे मोगऱ्यांचे बहर नजरेसमोरून तरळून जातात. पण आकाशमोगरी काही आठवत - नाही.
 "मग अजरणीची किंवा बुचाची फुलं पाहिली आहेत? सगळेजण अगदी मोठा होऽ लांबवाल .अर्थात मनातल्या मनात! मग ऐका तर, याच फुलांना म्हणतात आकाशमोगरी. सांगलीमिरज भागात या फुलांना अजरणीची फुलं म्हणतात. तर खानदेशमराठवाड्यात बुचाची फुलं म्हणतात.
 श्रावणझडी ओसरतात. भादव्यातली संतत धार थांबते. आकाश कसे निरभ्र होते! कधीकधी नजर चुकवून एखादे ढगांचे पिल्लू भटकायला निघाले तरच दिसायचे. झाडांचे तरतरीत शेंडे न्हाऊनमाखून, ऊन खात, चकाट्या पिटीत बसतात. पूर ओसरतात. पाणथळी जिरतात. सारे कसे शांत शांत होते. एका अश्विनी पहाटेला उमलत्या थंडीची बोटे झाडापानांवर, कळीपाकळीवर गुदगुल्या करीत फिरू लागतात . या गारेगार स्पर्शाने पहिली जाग येते आकाशमोगरीला.
 आकाशाचा ध्यास घेतलेल्या या उंचच उंच झाडांवर आषाढ कोसळून जातो. श्रावण झिमझिमून जातो. भादवा बरसून जातो. पण ही झाडे रिती ती रितीच! आकाशाकडे एकटक नजर लावून बसण्याचं वेड काही कमी होत नाही यांचे. दिवाळीची जंतरमंतरं हवा येते. रेंगाळत्या सरी आश्विनमाळांसोबत बरसून जातात. अन् याचे खोड जागून उठते. पान न् पान तरारून जाते . पहाटे धुकं दाटतं. बुचाच्या झाडात पसरतं. फांद्यांच्या टोकांशी, डहाळांच्या शेंड्यांशी देठदार कळ्यांचे झुबके धरतात. बाळाच्या नखुल्याएवढ्या असणाऱ्या या कळ्या थंडीच्या कुशीत सटासट वाढू लागतात. आठचार दिवसांत , लांबचलांब पुंगळीदार देठांच्या टोकाशी शुभ्रकळी टप्पोरते.अगदी मोगरीच्या कळीसारखी! कळ्यांच्या अनिवार भाराने फांद्या जमिनीकडे झुकतात. आकाशाचा ध्यास घेणारी नजर मातीच्या सावळेपणालाही भुलते. एका आश्विनपहाटेला पायतळी सांइते पांढऱ्याशुभ्र फुलांची तरतरीत नक्षी.
 आमच्या शाळेत ही बुचाची झाडं अगदी चिक्कार . पण एवढ्या पाचशे पोरींच्या केसांवर माळण्याइतकी फुलं कशी ढाळणार ती ? मग फुलांसाठी आमच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. झिंज्यांची ओढतोड. या नादात परकराच्या नाहीतर झग्याच्या ओच्यात गोळा केलेली फुलं मातीत सांडायची. मातकटून जायची .
 मी अगदी छोटी होते तेव्हापासून या फुलांचं मला वेड . मनात येई, इतक्या टवटवीत सुंदर फुलाला हे अडाणी नाव कसं? बुचाची फुलं नाहीतर अजरणी! मी मनातल्या मनात बहुधा सुरेखशा नावाचा शोधही घेत असेन . कविवर्य बा.भ.बोरकरांनी या फुलांना दिलेले आकाशमोगरी हे नाव वाचण्यात आले नि माझ्या मनाचा शोध थांबला. तेव्हापासून अगदी हौसेने हेच नाव. वापरते मी!
 आकाशमोगरी. मोगरीसारखे राजहंसी. फुलांचा बांधा उभार , पण टोक वरी घेरदार कळी , मोगरीच्या कळीसारखी कबुतरी! घुमारलेली रंगही शुभ्र , किंचित लालच झांक असलेला . पाकळ्या रेखीव , एकाला एक जोडलेल्या , दाटीवाटी नाही. जिथल्या तिथे फुललेल्या. पाकळी नितळ , तरीही काश्मिरी गालिच्यासारखी दडस . दोन बोटांत धरून चिरमळायची आणि फूऽफू करून फुगवायची.. छान फुगा फुगतो. लगेच कुणाच्या तरी कपाळावर टचकन फोडायचा. नुकत्या फुललेल्या चारपाच फुलांची देठं शाईच्या दौतीत खोचून द्यायची . झाली ऐटदार फुलदाणी तयार. किंवा कानाच्या भोकातून देठ अडकवून फुलांच्या कुड्या घालायच्या. शाळेतल्या बाकांवर अशा फुलदाण्या ऐटीत मिरवायच्या आणि पोरींच्या कानातल्या सुगंधी कुड्या खऱ्या मोत्यांपेक्षा झगमगत. बुचाच्या फुलांतला, मध देठाच्या पुंगळीतून चोखताना मज्जा यायची. लांबच लांब देठातून सुक सुक असा आवाज करीत मध ओढायचा. जेमतेम. जिभेवर उतरेल इतकाच थेंब. पण स्ट्रॉमधून कोकाकोला पिण्यापेक्षाही त्याची लज्जत न्यारीच!
 बुचाच्या पुंगळीदार , रेशमी देठांना एकमेकांत गुंतवून केलेल्या वेण्या किती देखण्या दिसतात! वरच्या बाजूला नेटकेपणानी जडलेली फुलांची रांग ,खालच्या बाजूला हारीने उभारलेली देठं आणि दोहोना सांधणारी तीनपदरी साखळी . एकेरी दुहेरी वेणी. पैंजणवेणी. एक ना दोन , नाना प्रकार या वेण्यांचे . आई वेण्या करायला शिकवायची. शिकण्यात निम्मीशिम्मी फुले देठापासून तुटून पडत . शिवाय देठांची मिठी सैल होऊन वेणी निखळायला वेळ नाही. मग घरभर फुलांचा पसारा.
 बहरलेल्या आकाशमोगरी झाडांचा गंध शंभर हातांवरून श्वासांना जाणवतो. सोनचाफ्यासारखा गडद गंध नाही की जुईकळ्यासारखा हळवा गंध नाही. पण तरीही अतीव मधुर, थंडीचा शिडकावा असलेला , श्वासाश्वासांत रेंगाळणारा. मला या गंधात मातीच्या खमंग गंधाची एक मात्रा मिसळली आहे असे वाटते . बकुळीचा सडा पायतळी सांडतो . पारिजाताचाही . बकुळीला एक उदास कोमजलेपण असते . पारिजाताची फुले पहाता पहाता कोमेजतात . पण बुचाच्या फुलांचा गालिचा पहाटेसारखा ताजातवाना ! जणू शुभ्र पहाट झाडाखाली विसावलीय. उन्हं चढत जातात तसतसा मातकट रंग पाकळयांवर चढत जातो.
 बुचाचे झाड तसे विलायतीच . देव्हाऱ्यात समर्पण करण्याचे भाग्य या फुलांना लाभत नाही . दारात वा अंगणात हौशीने हे झाड क्वचितच लावले जाते. संस्कृत कवींनी रानीवनीच्या बहारांचे वर्णन मोठ्या रसिक नजरेने केले आहे. त्याकाळी हा वृक्ष नसावा. एरवी आकाशमोगरीचे मिनारी सौंदर्य त्यांच्या नजरेतून खासच निसटले नसते. आकाशाला नजरेत घेणारी आकाशमोग़री. आकाशमोगरीचे खोड, उंच बांध्याचे असते. निबोणी खोडाचा अडबूखडवूपणाही नाही किंवा चाफ्याच्या खोडाचा नितळ मऊपणाही नाही. पानेही सुरेख नसतात . मातकट हिरवी आणि डिक्षांची. लिंबाच्या पानांसारखी मोहरेदार .हे झाड कळ्याफुलांच्या झुबक्यांनी गच्च लखडते तेव्हा मोठे देखणे दिसते . रात्रीच्या अंधारात फुलांनी लखलखलेले हे झाड .जणू आकाशगंगाच झाडावर उतरलीय.
 आश्विनातली पहाट असावी . आकाश नितळ निरभ्र असावे . आकाशमोगरीच्या पायतळी सांडलेले चांदणे ओंजळीत साठवावे. धुंद गंध श्वासावासांत भरून घ्यावा आणि आपणही आकाशमोगरी व्हावे!

܀܀܀