वाहत्या वाऱ्यासंगे/अधुऱ्या स्वप्नांची अक्षय वेल

विकिस्रोत कडून

अधुऱ्या स्वप्नांची अक्षय वेल



 माझ्या मनातल्या अश्विनाला पांढऱ्या बूच फुलांचा घनदाट गंध आहे. पंचवीसतीस वर्षांपूर्वीचा तों उंचउंच बूचवृक्ष आज हयात असेल का? कदाचित नसेलही. आणि त्या वृक्षाशेजारीच असलेलं राजलक्ष्मी नायरचं ते छोटंसं घरही नसेल. त्यावेळीच ते घर मोडकळीला आलेलं होतं. राजूच्या अम्मीचा हात घरावर फिरल्यानं सुबक आणि नेटकं वाटत असे.
 दर वर्षी आश्विन येतो. बूचफुलांचे गालिचे पायतळी पसरून , बुचाचे उंच झाड आभाळात डोके खुपसून विरक्तपणे उभे असते. त्या देठदार फुलांच्या वेण्या मुलीच्या लांड्या केसांत माळता माळता माझं मन मागे ... मागे जाते.
 मला आठवते राजू. राजलक्ष्मी नय्यर. सावळ्या कृष्णतुळशीच्या रंगाची. न्हालेल्या केसांवर खोबरेल तेलाची तकाकी पसरलेली. बुचाच्या फुलांची दुपदरी वेणी केसात माळलेली. उंच कपाळावर चमकीची टिकली. भांगात हळदशेंदूराचा ठिपका. कपाळावर भस्माची आडवी चिरी .डोळ्यात काजळाची रेघ. काहीशी बाहेर डोकावणारी. पायांत मुके पैंजण.
 राजूचं घर खिस्ती आणि मुसलमानांच्या वस्तीत होतं. घराशेजारीच ख्रिस्ती लोकांचं स्मशान होतं. मोकळ्या जागेत राजूचं दुमजली घर. खाली स्वैपाकघर आणि पडवी. वरती झोपायची खोली . पडवीची अर्धी भिंत बांधलेली . आणि त्यावर लाकडी पट्ट्यांची जाळी बसवलेली . त्या जाळीला लगटून गारवेल थेट वरपर्यंत चढलेला. समोर चिमणसं अंगण. अंगणात एक नारळाचं झाड , बुचाचं झाड नि बाकी झिपरी शेवंती. त्या घरात राजू आणि राजूची आई रहात असे. त्या एकाकी घराभोवती गूढ वलय होते . राजू कधीच कुणाला घरी नेत नसे किंवा आमच्यातही मिसळत नसे.
 आम्ही आठवीत होतो तेव्हाची गोष्ट. त्या वर्षी कसे कुणास ठाऊक, पण सारेच ऋतू आम्हांला खूप काही देऊन गेले. सातवीपर्यंन्त शाळेचे पटांगण दणाणून सोडणाऱ्या आम्ही काहीशा संथ झालो होतो. मधल्या सुटीत गरुडबागेतली बकुळीची फुलं वेचण्यासाठी भरारा धावणाऱ्या आम्ही किंवा सोनसाखळी नाहीतर शिवणापाणी खेळण्यासाठी भरारणाऱ्या आम्ही , चक्क कोंडाळं करून खुसूखुसू गप्पा मारू लागलो. कशाच्या बरं असायच्या त्या गप्पा?
 ... कोणीतरी कोणालातरी दगडाला बांधून पत्र पाठवलेले असायचे. किंवा कोणीतरी कुणाचातरी रोज येताना पाठलाग करीत असायचा. मग अय्या, इश्श, वगैरे, आम्ही वेगळ्या वळणाने वाढू लागलो. आणि राजूच्या घराभोवतीचे धुके अधिकच गूढ होऊ लागले.
 मला राजूबद्दल एक विचित्र ओढ वाटे. तिला मुली दूर का ठेवतात? तिच्याशी तुटक का वागतात, हे कळत नसे!
 माझं घर काळाच्या वेगाने धावणारं होतं. घरात शेकडोंची ऊठबस असे. स्वैपाकघरात कोणीही जाऊन पाणी पिऊन येई .मला मुलगी म्हणून वेगळ्या रीतीभाती आवर्जून शिकवल्याच नाहीत. त्याचा परिणाम असेल. मी राजूला माझ्या शेजारी जागा देई. पण पठ्ठीनं घरी म्हणून कधी नेलं नाही.
 एक दिवस दुपारी खेळताना राजूचा वेगळेपणा मला जाणवला. मी तिच्या कानांत कुजबुजले. ती दुसऱ्याच क्षणी कावरीबावरी झाली. अनुभवी आणि शहाण्या चिमणीसारखा मी तिला धीर दिला, आणि मधल्या सुटीत दप्तर घेऊन तिला तिच्या घरी नेऊन पोचवले. त्या दिवशी तिचं घर जवळून पाहिलं. तिच्या आईने माझ्या पाठीवरून हात फिरवला. खोबऱ्याचा लाडू खायला दिला, आणि सांगितले राजूशी खेळायला येत जा . मला राजूची आई खूप आवडली. राजलक्ष्मीसारखीच सावळी. पांढऱ्या खड्याची नाकातली चमकी तिला शोभून दिसे.
 एकदा राजू खूप नटूनथटून आली होती. मला खुशीत येऊन तिने सांगितले की तिचे वडील आले आहेत. ही बातमी मी अख्ख्या वर्गात अक्षरशः सगळ्यांना सांगितली. राजूला वडील आहेत हा केवढा दिलासा वाटला होता मला ! आज इतक्या वर्षांनी मला स्वच्छ जाणवतेय ती भावना , जणू माझ्याच माथ्यावरचं मळभ दूर झालं होतं, अन् लख्ख ऊन पडलं होतं. कारण एकदा नव्हे तर चारचारदा पुष्पी , कमळीनं मला बाजूला नेऊन हलक्या आवाजात विचारलं होतं, राजूच्या घरी एक भलामोठा सोनेरी पलंग आहे म्हणे! तू पाहिलास का ग? आणि राजूची आई कशी आहे? खूप नटते म्हणे ! हे विचारताना खाजगी सल्ला दिला होता तिच्याकडे जात जाऊ नकोस . आमच्या घरात मुळीच आवडत नाही.
 राजूचे बाबाही सर्वांच्या बाबांसारखे नाहीत तर पपांसारखे प्रेमळ गृहस्थ होते. वयस्कर , टक्कल असलेले, मोठमोठ्या मिशा . मला राजूने खास जेवायला बोलावले होते. राजूची आई खूप हसरी आणि मनमोकळी बनली होती. राजूच्या बाबांची बदली मुंबई नागपूर लाईनवर झाल्याने ते अधून मधून घरी येत. आई नि बाबा असे दोघेही घरात असल्याने घरही जणू रुणझुणायला लागले होते.
 दिवस जात होते. आम्ही अकरावीला गेलो. अभ्यासात आकंठ वुडालो राजू लागोपाठ चार दिवस आली नाही. म्हणून घरी गेले तर काय? घरावर अवकळा पसरलेली. अम्मी आणि राजूचे डोळे रडून सुकले होते. घरात राजूचे मामामामी आले होते . सामानाची बांधबांध सुरू होती.
 राजूच्या वडिलांची बदली मिलॉन एक्सप्रेसवर झाली होती. अपघातात ते दगावले होते. तब्बल पंधरा दिवसांनी त्यांना बातमी मिळाली होती. ती तिच्या मामाने आणली होती.
 राजूच्या आईचे घर केरळमध्ये आहे . त्रिवेंद्रमजवळच्या लहानशा खेड्यात . तिथल्या घरात तिच्या मावश्या , आज्या, मामा असे सगळे रहातात. खूप मोठा परिवार. घरातल्या मुली लग्नानंतर नवऱ्याकडे जात नाहीत . नवराच अधूनमधून पाहुण्यासारखा येतो. राजूची आई त्रिवेंद्रमच्या एका दवाखान्यात नर्स होती. तिथेच तिची आणि राजूच्या वडलांची ओळख झाली . अम्मीला तिच्या घरातले वातावरण आवडत नसे. ती हुशार होती. डॉक्टरही झाली असती . पण भावाने विरोध केला. शेवंटी ती नर्स झाली . राजूचे बाबा केरळांतलेच. पण जातीने वेगळे . अम्मीला स्वतःच स्वतंत्र घर हवं होतं. खेड्यातल्या घरात मुक्कामाला येणारे मेहुणे , मावसे यांची वर्दळ तिला आवडत नसे. आई वडील, मुले यांचे घर तिला हवं होतं. घरातल्या कुबट वातावरणाला कंटाळून तिने धारवाडच्या भिंती ओलांडल्या . ती राजूच्या बाबांबरोबर मुंबईत आली. पण तिथेही तिच्या स्वप्नांना तडा गेला . मुंबईत राजूच्या वडिलांची पहिली पत्नी व तीन मुले होती. त्यावेळी राजूचे वडील धुळे- चाळीसगाव लाईनीवर कामावर होते. त्यांनी अम्मीला धुळ्याला आणून ठेवले. तिथेच राजूचा जन्म झाला.
 राजूच्या अम्मीला स्वतःचे घर हवे होते. फक्त आपलाच असणारा जोडीदार हवा होता. प्रतिष्ठा हवी होती. पण आयुष्यभर ती एकाकीच राहिली. अफवांना पचवीत राहिली. एकच आशा मनात होती. ती राजूला खूप शिकवणार होती. तिच्यासाठी तिचं हक्काचं घर आणि जोडीदार शोधणार होती. तिला न मिळालेली प्रतिष्ठा राजलक्ष्मीला मिळवून देणार होती. पण त्या आघाताने सारी स्वप्ने पुन्हा एकदा उखडली गेली.
 राजूचे मॅट्रिकचे वर्ष पूर्ण होईपर्यंत तरी धुळ्यात रहावे अशी अम्मीची इच्छा होती. पण मामा कोणाचेच ऐकायला तयार नव्हता.
 राजू वयाच्या पंधराव्या वर्षीच आपल्या आईचं मन कळण्याइतकी प्रौढ झाली . शेवटच्या आमच्या भेटीत राजूने माझे हात हातात घट्ट धरून आश्वासन दिले होते.
 ... मन्नू, त्या घराच्या भिंती मी नक्की फोडून बाहेर येईन आणि तुला पत्र पाठवीन . अगदी दहापंधरा वर्षांनीसुद्धा ! तू उत्तर पाठवशील ना मला? विसरणार नाहीस ना?
 आज मी मॅट्रिक पास होऊन बत्तीस वर्षे झाली आहेत. मी राजूच्या पत्राची वाट पाहिली . काही वर्षे उत्कंठतेने वाट पाहिली. पण ते आलेच नाही. या उलटणाऱ्या वर्षांचे भान मधूनच येते आणि राजूच्या न आलेल्या पत्राची आठवण येऊन मनाची उलघाल होते.
 आश्विन येतो . पांढऱ्या संगमरवरी फुलांच्या झुबक्यांनी बहरलेली उंचउंच सावळी बुचाची झाडे पाहून मला राजलक्ष्मी नायरची याद येते.
 कुठे असेल ती? तिला त्या भिंती ओलांडता आल्या असतील का? तिच्या अम्मीला हवं असलेलं घर राजूला, मिळालं असेल का? की राजूही तिच्या लाडक्या चिमणीला मोकळ्या खिडक्या असणारं घर मिळवून देण्याचं स्वप्न पहात असेल ? राजूचं स्वप्न तरी पूर्ण होईल का?
 अधुऱ्या स्वप्नांची ही वेल! खुरटलेल्या कळ्यांना जोपाशीत किती दिवस जगणार आहोत आम्ही?

܀܀܀