वाटचाल/माझे मामा : रामचंद्रराव नांदापूरकर

विकिस्रोत कडून



माझे मामा : रामचंद्रराव नांदापूरकर



' सीताराम' हे, माझ्या मामी सीताबाई नांदापूरकर यांनी छोटेसे आत्मवृत्त लिहिलेले आहे. माझे मधले मामा रामचंद्रराव यांच्या निधनानंतर सीतामामींनी विरंगुळा म्हणून हे लिखाण केले आहे. पती, जावई आणि मुलगी असे एकापाठोपाठ एक दुःखाचे आघात त्यांच्यावर कोसळले असूनसुद्धा त्यांनी मोठ्या जिद्दीने व चिकाटीने हे आत्मवृत्त पूर्ण केले. माझ्या अगदी थोरल्या मामी यांना लिहिता वाचता येत नव्हते. रुपयाचे सुटेही त्या मोठ्या कष्टानेच मोजीत. सीताबाई या माझ्या मधल्या मामी. त्यांचे शालेय शिक्षण असे कधी झालेच नाही. पण त्या स्वतःच्या जिद्दीने लिहायला, वाचायला शिकल्या. त्यांनी मोकळया मनाने लिहिलेली ही आत्मकथा आम्ही पुनरुक्ती गाळून

जशीच्या तशी छापली आहे. या आत्मकथेत घटनांचे क्रम थोडे मागेपुढे झाले तरी ते तसेच राहू दिलेले आहेत. पृष्ठ २३ वर निजामचा प्रधान कासीमरझवी असा उल्लेख झालेला आहे. तोही तसाच राहू दिलेला आहे. एका असामान्य बुद्धीच्या, कर्तृत्वाच्या आणि असामान्य दिलदार मनोवृत्तीच्या पुरुषाबरोबर मोठ्या जिद्दीने व चिकाटीने संसार केलेल्या स्त्रीची ही कहाणी तिच्या शब्दांत, तिच्या समजुती नुसारच लिहिली गेली आहे. या कहाणीत असणारे अव्याज सौंदर्य उगीच काटेकोर शब्दरचना करून मी विघडवलेले नाही.
माझे आजोळ म्हणजे नांदापूर. नांदापूरचे गोविंदराव देशपांडे,ज्यांना सर्वजण रावसाहेब म्हणत, ज्यांचा या लिखाणात 'प्रेमळ सासरे' म्हणून उल्लेख आलेला आहे, ते म्हणजे खाऊनपिऊन सुखी असणाऱ्या बऱ्यापैकी मध्यम धरातले गृहस्थ होते. माझे आजोबा अतिशय शांत, प्रेमळ व समजूतदार होते. त्यांनी सर्वांच्यावर माया केली. कुणाशी भांडणे त्यांच्या स्वभावात नव्हते. सुनेनेसुद्धा मोठ्या जिव्हाळ्याने व आपुलकीने उल्लेख करावा असे त्यांचे ऋजू व्यक्तिमत्त्व होते. हे आमचे बऱ्यापैकी खाऊन पिऊन सुखी असणारे घर आणि या घरी असणारे माझे अल्पशिक्षित कारकुनी करणारे आजोबा यांचा मामींनी ' सधन श्रीमंत सासर' म्हणून उल्लेख केलेला आहे. ही सधनता व श्रीमंती खाऊन पिऊन सुखी असण्याइतकीच होती. आजी कृष्णाबाई ही मात्र कर्तबगार स्त्री होती. अतिशय कष्टाळ, व्यवहारी, पण तितकीच रागीट, भांडणारी, संतापी अशी ती सुभेदाराची लेक होती. माझ्या आजीच्या स्वभावात जिद्द, कष्टाळूपणा आणि प्रेमळपणा तर होताच; पण त्याबरोबर तेढेपणा आणि भांडकुदळपणासुद्धा होता. सामान्यपणे आजीचे नातवांच्यावर प्रेम असते आणि ते भोळेभाबडे असते असे म्हणतात. पण माझी आजी माझ्या धाकट्या बहिणीशी म्हणजे स्वतःहून साठ वर्षे लहान असणाऱ्या नातीशीसुद्धा भांडली, रुसली आहे. ही आजी करारी आणि हिंमतवान होती. संकटांना डगमगणारी नव्हती. स्वभावाने तिखट होती. सगळ्याच सुनांना तिच्या या स्वभावाचा त्रास झालेला आहे. माझ्या मामी जुन्या वळणाच्या. सासूशी प्रत्यक्ष त्या भांडल्या, पण सासूच्या माघारी त्यांनी आपल्या सासूविषयी फार संयमाने उल्लेख केला आहे. शेवटी सासू म्हणजे आपल्या नवऱ्याची आई. माघारी तिच्याविषयीचा उल्लेख जपून व संयमाने करावा, ही जुन्या वळणात वाढलेल्या स्त्रीची स्वाभाविक पद्धत मामींनी पाळलेली आहे.
 या माझ्या आजोळी, पहिला अतिशय कर्तबगार माणूस म्हणून माझे वडील मामा नारायणराव नांदापूरकर यांचा उल्लेख केला पाहिजे. परभणीला आमच्या आजोबांनी, आपल्या वडील मुलाला कसेबसे सातवीपर्यंत शिकविले. नंतर त्यांनी आपल्या मुलाला हे समजावून सांगितले की, आता तुला कमावते होणे आवश्यक आहे. या वेळी माझे मोठे मामा पंधरा वर्षांचे होते. त्यांचे लग्न होऊन पाच वर्षे झालेली होती. हे माझे मामा परभणीहून हैद्राबादला आले. काबाडकष्ट करीत कधी वार लावून जेवत, कधी नानाविध उद्योग करीत, असे ते मॅट्रिक झाले. याहीपुढे नोकरी करीतच ते शिकले आणि मराठी आणि संस्कृतचे एम. ए. झाले. ते मराठवाड्यातील मराठीचे पहिले पीएच्. डी. होत. ते, मराठीचे सर्वत्र मान्यता पावलेले विद्वान, निवृत्त होताना उस्मानिया विद्यापीठात मराठी विभाग-प्रमुख होते. नांदापूरकरांचे नाव घेऊनच मराठवाड्यातील मराठी साहित्याची उपासना आधुनिक काळात समृद्ध झाली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती वास्तुला त्यांचेच नाव आहे. मराठवाड्यातील मराठीचे सर्व अभ्यासक कै. डॉ. नारायणराव नांदापूरकर यांना आपले आद्य अभिमानकेन्द्र मानत आलेले आहेत. हे माझे मोठे मामा अतिशय देखणे, गोरेपान, हजारांत सुंदर अशा व्यक्तिमत्त्वाचे होते. ते विद्वान होते तसे व्यायामपटूही होते. आमच्या मोठ्या मामी दिसण्यातही साधारण होत्या. शरीर प्रकृतीनेही अशक्त होत्या. पण मामांनी मोठ्या प्रेमाने व निष्ठेने त्यांच्याशी संसार केला. या आत्मवृत्तात माझे ' मोठे दीर' म्हणून उल्लेखिलेले ते हे मामा होत. या माझ्या मामांनी आपल्या घरी आईच्या बहिणीची मुले, बापाच्या बहिणीची मुले, स्वतःच्या बहिणीची मुले अशा सर्वांचे शिक्षण केले. भावांची शिक्षणे तर त्यांनीच केली. या मोठ्या मामांनी सगळे घरच पुढे आणले. उरलेल्यांनीसुद्धा कधी त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. आवडो न आवडो आमच्या मोठ्या मामांचा शब्द कधी खुषीने तर कधी कुरकुरत प्रमाण मानला.
 माझे मधले मामा रामचंद्रराव नांदापूरकर. यांना घरची वडील माणसे 'रामा' म्हणत. आणि सर्व धाकटी माणसे 'दादा' म्हणत. तीन नांदापूरकर भावांच्यामध्ये हे माझे मधले मामा सर्वात बुद्धिमान, सर्वांत रागीट आणि चिडखोर, सर्वांत दिलदार आणि उदार, सर्वांत कर्तबगार असे होते. वडील मामा नसते तर दादांचे शिक्षण झाले नसते. कुठे तरी एक रागीट, भांडकुदळ कारकून म्हणून त्यांचे आयुष्य गेले असते. ही गोष्ट खोटी नाही. मोठे मामा होते म्हणून दादा शिकू शकले हे खरेच आहे. पण मोठे मामा फार तर शिकण्याची सोय करणार. बुद्धिमत्ता मोठे मामा कुठून आणणार? बुद्धिमत्ता आणि हट्टीपणा हे दादांचे अंगभूत गुण होते. दादा शालेय जीवनातही अतिशय बुद्धिमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या त्या वेळच्या बुद्धिमत्तेची वाखाणणी आजतागायत त्यांचे वर्गमित्र करीत आले आहेत. दादा विज्ञानाचे विद्यार्थी होते; पण वाङमय, तत्त्वज्ञान आणि काव्य यांविषयी त्यांना रुचीही भरपूर होती. त्यांचे वाचनही चौरस असे, वक्तृत्वही फार चांगले होते. मी दादांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि चौफेर अभ्यासाची पद्धत पाहिलेली आहे. पण त्यांचे ऐन तारुण्यातले बहारदार फुललेले वक्तृत्व माझ्या प्रत्यक्ष ऐकीवात आले नाही. पण मोठे मामा सांगत, दादा ' नीतीचे स्वरूप ' या विषयावर एकदा बोलले होते. आदल्या दिवशी तरुणांची सभा होती, दुसऱ्या दिवशी याच विषयावर वामन मल्हार जोशींचे हैद्राबादला व्याख्यान होते. मोठे मामा सांगत, " अरे, वामन मल्हारांचे अर्धे व्याख्यान रामाच्या भाषाशैलीची, त्यांच्या बुद्धीची आणि व्यासंगाची स्तुती करण्यातच संपले." वामन मल्हार तरुणांचे कौतुक करणारे, हे तर खरेच. पण माझे मामाही तसे कौतुक करण्याजोगे असणार, यात वाद नाही. दादांचे मी जे वक्तृत्व ऐकले त्यात बुद्धी, व्यासंग, तर्ककठोरपणा हे गुण होते. प्रौढपणे, प्रत्येक प्रश्नावर जबाबदारीने बोलायचे, हे बंधन आल्यामुळे त्या वक्तृत्वाचा आवेशपूर्ण फुलोरा आम्हाला पाहायला मिळाला नाही. दादा नुसते बुद्धिमान नव्हते. एखादा विषय चटकन त्यांची बुद्धी आकलन करीत असे. सूक्ष्म गुंतागंत अतिशय व्यवस्थित रीतीने उलगडीत ते प्रश्नांच्या गाभ्यापर्यंत जात. वकिलीच्या व्यवसायात ते शिरले. तिथे त्यांनी नाव कमावले. पैसाही भरपूर मिळविला. पण ही वकिली उच्च न्यायालयातली होती. त्यामुळे कायद्याचा बारीक सारीक कीस काढण्याला महत्त्व असे. दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही क्षेत्रांत ते यशस्वी होते. आयुष्याच्या शेवटच्या काळात ते वेस्टर्न इंडिया बार असोसिएशनचे अध्यक्षही राहिलेले होते. दादा वकिली न करता प्राध्यापक झाले असते तर विविध विषयांवर विपुल ग्रंथरचना करणारे चौरस विचारवंत म्हणून महाराष्ट्रात गाजले असते.
 मोठे मामा अतिशय रसिक आणि अभ्यासू होते. समतोल आणि कष्टाळू असे मराठी भाषेचे व वाङमयाचे ते उपासक होते. दादांना अविषय नव्हता. वाङमय, धर्म, नीती, तत्त्वज्ञान, विज्ञान, कायदा, अशी सर्वसंचारी त्यांची बुद्धी होती. दादा पक्के जडवादी, नास्तिक आणि मार्क्सवादी होते. मी त्यांची मार्क्सवादावरील व्याख्याने ऐकलेली आहेत. त्याबरोबरच भारतीय संविधानावरील व्याख्यानेही ऐकलेली आहेत. अभिरूप न्यायालयात ' नागकन्या' या कादंबरीच्या निमित्ताने चर्चा चाललेली असताना, कायदा बाजूला ठेवून वाङमयनिर्मिती व आस्वाद या चर्चेला प्राधान्य देऊन 'नागकन्या' कादंबरीच्या अकल्पिकतेची त्यांनी केलेली मीमांसाही ऐकलेली आहे. आमच्या सीतामामींना आपला नवरा म्हणजे अतिशय हुशार व बुद्धिमान असे नेहमीच वाटत आले. हा नुसता पत्नीला वाटणारा पतीचा अभिमान नाही, ते सत्यही आहे. म्हणूनच माझे मत असे आहे की, तिघेही भाऊ बुद्धिमान, अभ्यासू व हुशार, पण मधल्या मामांची बुद्धिमत्ता ही काही निराळीच होती. अतिशय मोठी अशी त्यांच्या विचाराची झेप होती.
 दादा अतिशय बुद्धिमान होते, कर्तबगार होते; त्यांनी खूप पैसा मिळविला हे खरेच आहे, पण यापेक्षा मला अतिशय आवडणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे पैशाच्या बाबत ते नेहमीच निर्मोही होते. द्रव्याबाबत उदार आणि उदासीन, पण तरीही व्यवहार जाणणारी आणि तत्पर अशी जी माणसे माझ्या पाहण्यात आहेत, त्यांन दादांच्या व्यक्तिमत्वामुळे मी नेहमीच प्रभावित झालो आहे. तसे दादा काही गर्भश्रीमंत नव्हते. मोठ्या मामांच्याप्रमाणे त्यांना वार लावून शिकावे लागले नाही. पण प्रतिकूल परिस्थिती त्यांनीही खूपच अनुभवली. वडील भावाचे जुने कपडे दीर्घकाळ त्यांनी वापरले. दहाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पण ते अठ्ठावीस वर्षांचे होईपावेतो त्यांना कधी पत्नीला घेऊन घरसंसार करण्याची संधी आली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात टंचाई नेहमीच असे. थोडा धंद्यात जम बसावा तो नव्या जेलयात्रेची तयारी होई, सगळी मांडलेली घडी विस्कटून जाई. पण पैशाची फिकीर त्यांनी कधी केली नाही. वेगवेगळ्या अर्थाने माझे मोठे मामा आणि मधले मामा पैशाच्या बाबतीत अव्यवहारी राहिले. मोठया मामांना आपला पगारही पुरला नाही, वडिलांची इस्टेटही पुरली नाही, भावांनी केलेली मदतही पुरली नाही. तेव्हा आर्थिक दृष्टीने ते उदार होते, पण सदैव पैशाच्या चिंतेत असत. दादा याहून निराळे होते.
 आपल्या मोठ्या भावाने आपले शिक्षण केले. त्याच्यामुळे आपण वाढलो, मोठे झालो असे मानून दादांनी स्वतःचा नवा संसार मांडताना प्रथम दोन गोष्टी केल्या. त्यांनी वडील भावाच्या डोक्यावर त्या दिवशी असणारे सर्व कर्ज आपल्या उत्पन्नातून फेडले. वडील भावाला कर्जमुक्त करून वडील भावजयीला सोन्याच्या बांगड्या करून मगच त्यांनी आपला संसार मांडला. आपण असे तुरुंगयात्री, बायकामुलांचा विचार करावा असे दादांनी कधी मानले नाही. मधून मधून धाकटया भावाच्या शिक्षणाचाही पैसा दिला, बहिणीच्या लग्नाला पैसा दिला आणि बापाची स्वतःच्या वाट्याला आलेली सर्व इस्टेट वडील भावाच्या हवाली त्यांनी करून टाकली. बापाची जायदाद तुम्हाला देतो आणि तुमचे कर्ज डोक्यावर घेतो, असा दिलदारपणा दादांच्यामध्ये होता. त्यांनी घर बांधताना वडील भावासाठी आठ हजाराला जागा घेतली, पण वडील मामा म्हणाले, " मजजवळ पैसे सहाच हजार आहेत." उरलेले पैसे स्वत: भरले. दादांनी आपल्या मित्रांना किती मदत केली, याचा तर हिशोबच नाही. त्यांचे एक मित्र असे होते की, दादांनी दरवेळी आपले पैसे खर्चुन त्याचा धंदा काढून द्यावा आगि मित्राने कर्तबगारीने तो बुडवावा. या आपल्या एका प्रिय मित्रासाठी दादा पंधरा-सोळा हजाराला तरी बुडले असतील. राजकीय खटले मोफत, नातेवाईकांना दिलेला पैसा बुडाल्याची तक्रार नाही. मित्रांसाठी किती वूड सोसली याचा पत्ता नाही. असे अनेक बाजूंनी त्यांनी गोळा केलेले धन वाहून गेले. पैशाच्या मागे ते कधी लागलेच नव्हते. त्यामुळे फुकटचे खटले अनेक असत. तरीसुद्धा त्यांना इतके मिळत गेले की, वारा वाटा वाहून गेल्यानंतर जे शिल्लक राहिले त्यात बायकामुलांना खाण्या-पिण्याची ददात कोणतीही नाही. असे यश त्यांच्या हाताला होते.
 इतरांची गोष्ट सोडा, मलाच एकदा ते म्हणाले, " अरे, तू घर बांधतोयस म्हणे." मी म्हणालो, “ तुमचा आशीर्वाद असावा." दादा म्हणाले, " हे पहा, घर बांधताना खर्च नेहमी ठरल्यापेक्षा जास्तच होत असतो. तुला ऐनवेळी पैसे कमी पडतील. मी काही श्रीमंत माणूस नाही, पण तुझ्यासाठी पाच हजार रुपये काढून ठेवतो. गरज पडेल तर मागून घे." हे बोलणे झाले ते त्यांना माहीत की मला माहीत. इतर कुणाला कळणार नव्हते. दादांनी पैसे देण्याचा योग आलाच असता तर मी पैसे घेतले, हेही कळले नसते. ते फेडले की बुडवले हेही कुणाला कळले नसते. दातृत्वाचे प्रदर्शन करून इतरांचे दैन्य उघडे करणे, त्यांच्या स्वभावात नव्हते. खोन्यांनी पैसा मिळवावा आणि ओंजळी भरून तो पैसा उधळावा, तरीही काही कमी पडू नये, असे यश त्यांच्या हाताला होते. अतिशय चिडखोर आणि रागीट, खूपच हट्टी, पण अतिशय दिलदार, फार मोठा मित्रांचा मेळावा उभा करणारे, हजारोंना आधार वाटणारे असे दादा होते.
 दादांचे घर हा राजकारणाचा एक अड्डा असे. इ. स. १९३८, इ. स. १९४२ आणि इ. स. १९४७ असे तीनदा ते तुरुंगात होते. पहिल्या वेळी नऊ महिने, दुसऱ्या वेळी चौदा महिने, तिसऱ्या वेळी साडेपाच महिने ते तुरुंगात होते. उरलेल्या वेळी म्हणजे जवळजवळ साडेआठ महिने ते भूमिगत सशस्त्र आंदोलनाचे एक प्रमुख नेते होते. हैद्राबादच्या संस्थानी काँग्रेसमध्ये मार्क्सवादी विचाराचा जो जहाल समाजवादी गट असे त्यांचे दीर्घकाळ दादा एक प्रमुख नेते होते. हैद्राबाद संस्थानात हैद्राबाद शहरकाँग्रेसचे ते दीर्घकाळ उपाध्यक्ष होते. वकिलीची परीक्षा पास झाल्याच्या नंतर पहिली तुरुंगयात्रा करून येईपावेतो त्यांचा संसार असा नव्हताच. एकोणचाळीस सालापासून जे थोडेफार मांडले ते बेचाळीस साली विस्कटून गेले. जे चव्वेचाळीस सालापासून मांडले ते सत्तेचाळीसला विस्कटून गेले. त्यांच्या आयुष्याला स्थैर्य पोलिस ॲक्शन झाल्याच्या नंतरच आले. त्यात आरंभी ४९ ते ५६ ह्या काळात हैद्राबादला निष्णात वकील म्हणून ते गाजले. ५६ नंतर मुंबईत त्यांच्या मृत्यूपर्यंत यशस्वी वकील म्हणून त्यांचा लौकिक होता. दादा जरी जहाल समाजवादी आणि मार्क्सवादी असले तरी हैद्राबादच्या लढयातील सगळीच माणसे त्यांच्याकडे गप्पागोष्टीसाठी येत. सरकारदरबारी वजन असणाऱ्या सरकारपक्षीय हिंदूंचे नेते जुन्या हैद्राबाद संस्थानात वेंगल व्यंकट रामारेड्डी, आर्वामदु अय्यंगार इत्यादी लोक होते. दादा अय्यंगाराचे ज्युनिअर म्हणून ती मंडळी येत. काँग्रेसमधील मवाळांचे नेते त्यांच्याकडे येतच. मार्क्सवादी नसणारे जहाल येत. गोविंदभाई, आदी समाजवादी जहाल येतच. काँग्रेस सोशॅलिस्ट मंडळी येत. काँग्रेसमधून बाहेर पडलेले कम्युनिस्टही येत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्गमित्र म्हणून इत्तेहादु मुसलमानचे तरुण नेते जे पुढे निजामच्या मंत्रिमंडळात गेले, ते म्हणजे रऊफ महमद आणि यामिन जुवेरी हेही येत. यामुळे दादांचे घर हा राजकीय अड्डा होता. पिछाडीच्या अनेक गोष्टी या बैठकीत चर्चिल्या जात. अनेक मुद्दे या बैठकीतून बाहेर पडत. आमच्या मामी जर शिकलेल्या आणि राजकारणाच्या अभ्यासू असत्या तर हैद्राबादच्या राजकारणाचा अर्धा इतिहास त्यांनी या घरात बसून नोंदविला असता. स्वातंत्र्योत्तर काळातल्या राजकारणात दादांनी कधी रस घेतला नाही. स्वातंत्र्यासाठी ज्या पिढीने किंमत मोजली, पण पुढच्या सत्तेविषयी जे उदासीन राहिले त्या पिढीचे दादा भाग होते.
 अशा या लोकविलक्षण पुरुषाची पत्नी होण्याचे भाग्य आमच्या सीतामामींच्या वाटयाला आले. हट्टीपणा, रागीटपणा, चिडखोरपणा हे जे दादांचे स्वभावगुण, त्याचा सर्वांत मोठा त्रास झाला असेल तर तो सीतामामींना ! लहानपणी आठव्या वर्षी लग्न झाले. त्यानंतर नवरा शिकण्यासाठी औरंगाबादला, वडील-भावाकडे. पती-पत्नींची भेट व्हायची म्हणजे अशीच सुट्टीत. नवऱ्याचे शिक्षण झाले, आता आपण संसार मांडू ही स्वप्ने पाहावीत तो नवरा सत्याग्रह करून तुरुंगात. संसार थोडासा मांडावा, थोडी स्थिरता यावी तो नवरा पुन्हा तुरुंगात. या पतीच्या ध्येयवादाचा सर्वात मोठा त्रास झाला असेल तर तो पुन्हा सीतामामींनाच. असल्या प्रकारचे आयुष्य मोठ्या कष्टाने व जिद्दीने सीतामामींनीच रेटले. पण त्यांच्या चरित्रात पाहावे तो सगळी नवऱ्याविषयीची भक्ति भावनाच ओसंडून वाहताना दिसेल. या एवढ्या मोठ्या प्रेम आणि भक्तीची काही ठळक महत्त्वाची कारणे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. तशा मामी देवाधर्मावर श्रद्धा असणान्या धार्मिक. दादा वजा जाता आमचे सगळे आजोळच श्रद्धावान स्त्री-पुरुषांनी भरलेले आहे. सीतामामीही या श्रद्धाळू आणि धार्मिक पिढीतल्याच म्हटल्या पाहिजेत.
 आपण अलीकडे 'पती-पत्नी प्रेम' असा शब्द वापरतो. या शब्दप्रयोगात पतीला पत्नी आवडणे, पत्नीला पती आवडणे, त्या दोघांचे मनोमीलन होणे इत्यादी बाबी गृहीत धरलेल्या असतात. जुन्या पिढीतल्या स्त्रीसमोर असा कोणता प्रश्न नसे. आठ-नऊ वर्षांची होताच तिचे लग्न होऊन जाई. तारुण्यउदयाच्या काळी तिचा पती, प्रियकर ठरलेला असे. हा पती नुसत्या प्रेमाचे स्थान घेत नसून तो भक्तीचे व निष्ठेचे स्थान घेत असतो. ही भक्ती व निष्ठा सांभाळणे हेच कुलवंत स्त्रीचे काम आहे, ते तिचे कर्तव्य आहे, अशी संस्कृतीची मनात रुजलेली जाणीव असे. तो मनाचा धर्म असे. पती रागावला तरी तो आपलाच आहे. चूक आपली असो, की त्याची असो, मनधरणी करणे आपले कामच आहे, असे गृहीत धरूनच या पिढीतल्या स्त्रिया वागत. पतीविषयी काही वावगा विचार आपल्या मनात येणे हेसुद्धा पाप मानले जाई. हा पती जर विद्वान, बुद्धिमान आणि कर्तबगार असला, तर मग त्याच्याबरोबर कोणतेही कष्ट सहन करणे यात कधीच त्या पिढीतल्या स्त्रीला कशाची फिकीर वाटली नाही. मी नवऱ्याची आहे आणि नवरा माझा आहे या एका जाणिवेसमोर सर्व दुःखे थिटी होत असत. रामाच्याबरोबर सगळे सोडून सुखाने वनवासाला निघणारी रामायणाची नायिका सीता, ही काही नुसती कल्पनेतली नाही. नवऱ्याचे चारित्र्य आणि त्याचा भलेपणा याची खात्री असणान्या जुन्या पिढीतल्या शेकडो, हजारो बायका अशाच राहत आल्या. त्यात आपण काही मुलुखावेगळे विलक्षण वागतो आहोत असे त्यांना कधी वाटले नाही.
 आमच्या मामी म्हणजे कुटुंबवत्सल स्त्री. मी, माझा नवरा आणि माझी मुलेबाळे यांच्यासह सुखाने संसार करावा एवढी माफक अपेक्षा बाळगणारे त्यांचे मन. पण जुनी बाई कधी नुसती आपल्या नवऱ्याची बायको होत नसे. ती सगळया कुटुंबातली एक व्हायची. सासू-सासरे, दीर-भाचे, नणंदा-जावा आणि नवऱ्याचे सगळेच नातेवाईक हे आपले भावकी आहेत. ते आपले गणगोत आहे. कोणी तिऱ्हाईत, परके नाहीत, या जाणिवेने आपोआपच माणसे कुटुंबवत्सल होतात. पतीच्या सहवासात मामी हळहळू देशाविषयी विचार करायला शिकल्या. आपणही स्वातंत्र्यासाठी काही केले पाहिजे अशी त्यांच्या मनाची तयारी झाली. दादांनी इच्छा व्यक्त करताच त्या सत्याग्रहालासुद्धा तयार झाल्या. या सत्याग्रहाच्या तयारीत आणि प्रत्यक्ष सत्याग्रह करण्यात सध्या पीपल्स कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका असणाऱ्या सौ. ताराबाई परांजपे यांचाही भाग फार मोठा होता. दादांनी इच्छा व्यक्त केली होती. मामींचीही सत्याग्रह करण्याची इच्छा होती, पण ही कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरवायची म्हणजे अनेक अडचणी होत्या. माझ्या मोठ्या मामांना सत्याग्रहाची कल्पना अजिबात मान्य नव्हती. सत्याग्रहाची जागा व वेळ ठरवावयाची आणि मोठ्या दिराला पत्ता लागू न देता सत्याग्रह करायचा ही अवघड गोष्ट होती. शिवाय सत्याग्रह करायचा म्हणजे घरची काही सोय करायला हवी. सोनेदागिने, भांडी यांची व्यवस्था करायला हवी. आपला एक मुलगा आणि दोन मुली यांना कूठे सोडावयाचे ? शेवटी मुले-बाळे दिराकडे सोपवावी लागणार. या मुलाबाळांना समजावून सांगावे लागत असते. मुलांच्या मनाची तयारी करायची ती पुन्हा वडीलदिराला चोरूनच करावी लागते. या सगळ्याच उद्योगात ताराबाई परांजपे यांचा वाटा मोठा राहिला. मामींनी सत्याग्रह केला ही त्यांची जेलयात्रा त्यांना सुखाचीच ठरली.
 पूर्वी व्हायचे काय, की, दादा जेलमध्ये जायचे आणि मामी उपास-तापास करीत नवरा परत कधी येतो याची वाट पाहत थांबायच्या. या वेळी असे नव्हते. या वेळी तुरुंगात पती-पत्नी दोन-तीन महिने एकत्र होते. राजकारणाचा डाव म्हणून नोव्हेंबरअखेर काही ज्येष्ठ राजकीय नेते सुटले. त्या वेळी दादांच्याबरोबर मामीही सुटल्या. पण आता त्या कार्यकर्त्या झालेल्या होत्या. त्यामुळे भूमिगत आंदोलनाचे नेतत्व करण्यासाठी दादा बाहेर गेले. त्यांच्यावरोवर मामीही गेल्या. जानेवारीपासून पुढे काही महिने मामी सशस्त्र आंदोलनातल्या कार्यकर्त्या होत्या. याही वेळेला या सर्व भूमिगत, सशस्त्र आंदोलनाच्या कार्यात ताराबाई परांजपे मामींच्या बरोबर होत्याच. पोलिस ॲक्शन होईपावेतो हे राजकीय जीवन टिकले. यानंतर दादांनीच राजकारण सोडले, मामींनीही सोडले.
 रामाची सीता म्हणून त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. रामाची सीता म्हणूनच त्यांनी आपल्या जीवनातील सर्व सुखदुःखे व वनवास भोगला. हा आपला विलक्षण पती, त्याच्या सर्व इच्छा व लहरी सांभाळून आपल्याकडून तो फुलासारखा जपत रहायचे; मनाने, इच्छेने त्याचे होऊन रहायचे; असेच मामींचे जीवन गेले. दादा बुद्धिमान, कर्तबगार आणि ध्येयवेडे होते. मामींना फक्त रामाची सावली होती. या सीतेने प्रांजळपणे आपल्याला जसे जाणवले तसे आपल्या संसाराचे वृत्त नोंदविलेले आहे. सीतेने आपल्या व रामाच्या जीवनाची केलेली नोंद म्हणून या आठवणींचे नाव 'सीताराम ' ठेवले आहे. बरोबरीच्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला जे रामचंद्रराव नांदापूरकर माहिती आहेत, त्यांचे हे दर्शन नाही. हे सीताबाईला घडलेले रामाचे दर्शन आहे.