वाटचाल/अभिवादन

विकिस्रोत कडून





अभिवादन


कै. नारायण गोविंद नांदापुरकर हे माझे सर्वांत वडील मामा. पण मामा आणि भाचा असे आमचे संबंध कधीच राहिले नाहीत. आम्ही त्यांना घरी सारेजण 'अण्णा' म्हणत असू. अण्णांच्या स्वभावातील एक मुख्य वैशिष्ट्य असे होते की, ते वडीलकीच्या नात्याने पण बरोवरीच्यांशी वोलावे अशा पद्धतीने सर्वांना उपदेश करीत. पैकी उपदेशाचा भाग आमच्या डोक्यात फारसा कधी शिरायचा नाही. त्यांनी मनाच्या मोठेपणाने आम्हाला बरोबरीच्या नात्याने वागविले म्हणजे आम्हीही त्यांच्याशी स्वातंत्र्य घेऊन बरोबरीच्या नात्याने वागत असू. अण्णांच्या बाबतीत माझी पहिली आठवण अगदी लहानपणची आहे. मी चार अगर पाच वर्षांचा असेन. त्या

वेळी अण्णा औरंगाबादला होते. मामाकडे म्हणून आई बरोबर औरंगाबादला गेलो होतो. माडीच्या पायऱ्यां वरून जो गडगडत मी खाली आलो तो अण्णांनी अलगद मला वरच्यावर झेलले,अशी ती आठवण आहे. पण त्या भेटीतले आता फारसे काही आठवत नाही. नववे वर्ष मला लागले आणि मी अण्णांच्याकडे शिकण्यासाठी म्हणून येऊन दाखल झालो. तिथपासूनच्या पुढच्या सर्व स्मृती मात्र आजही अगदी ताज्या आहेत. माझे आजोबा परभणीला कारकून होते. अण्णा ज्या वेळी सातवी ास पझाले त्या वेळी आजोवांनी अण्णांना केलेला उपदेश पुढे आम्हांला माहीत झाला. आजोबा म्हणाले, "बघ नारायण, आता तू मोठा झालास. देवदयेने तुझे लग्नही झाले आहे. आता तुझे लहानपण संपले पाहिजे. थोडे घरसंसाराकडे लक्ष दिले पाहिजे." या वेळी अण्णांचे वय १४-१५ वर्षांचे असेल. स्वाभाविकच बापाची इच्छा मुलाने ' उमेदवार' व्हावे; अहलेकार, पेशकार अशा क्रमाने चढत जावे; पेन्शनीच्या जवळपास नायब तहशीलदारी मिळाली म्हणजे स्वर्गाला हात टेकले; अशी असावी. मला आजोबा चांगले आठवतात. मी त्यांना पाहिले, त्या वेळी ते खूपच थकलेले होते. आपली मुले शिकून मोठी झाली याची त्यांना नेहमी धन्यता वाटत असे. पण याचे श्रेय खरे तर अण्णांच्या जिद्दीला दिले पाहिजे. शिकण्याच्या जिद्दीमुळे अण्णा हैद्राबादला आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, कधी वार लावून, कधी इतरांच्याकडे राहून, शिकवण्या- नोकऱ्या करीत, त्यांनी मॅट्रिक तर एकदाचे काढले. उस्मानिया विद्यापीठ त्या वेळेला नुकतेच सुरू झालेले होते. कॉलेज शिक्षणासाठी अण्णा या विद्यापीठात प्रविष्ट झाले. व्यायामाची त्यांना दांडगी हौस असे. सकाळी ते जोर मारीत. संध्याकाळी कुस्त्याही खेळत. त्यांच्या भाषेत सांगायचे तर दोन वेळेला रगडून जेवत. दोन-अडीच भाकरी, चांगल्या जाड, हातावरच्या, आणि मग पोटभर पोळ्या. वर्गात वसले की, त्यांना झोप येई. एक-दोनदा अण्णा मला म्हणाले, " माझ्या कॉलेज जीवनात सतत पन्नास मिनिटे मी वर्गात जागा राहिलो असा प्रसंग फक्त एकदाच आला. त्या वेळी सतत दोन दिवस मला कुठे जेवणासच मिळाले नाही." कसेबसे दिवस काढीत अण्णा बी. ए. झाले व नंतर औरंगाबादला शिक्षक झाले. त्या काळच्या पिढीत अण्णांच्याजवळ शिक्षणाची जिद्द फार मोठी होती. ते स्वतः शिकले. आपल्या भावांना शिकवले. आपल्या नातेवाइकांचा एक मोठा मेळावा त्यांनी घरी गोळा केला आणि अण्णा सर्वांना शिकवीत बसले. वयाच्या नवव्या वर्षी बहिणीचा पोर म्हणून त्यांच्या घरी जेव्हा मी दाखल झालो त्या वेळी सगळे मिळून अण्णांच्या घरी आम्ही चौदाजण होतो. अण्णांना पैशाचा व्यवहार कधीच जुळला नाही. फारसा पैसा आयुष्याच्या अखेरपर्यंत कधी त्यांच्या हाती आला नाही. जो आला त्यात टापटिपीने कधी संसार बसला नाही. आपण, आपली बायको, आपली मुले-बाळे असे अण्णा राहिले असते तर अडचणीचे कारण नव्हते. पण त्यांनी सारे नातेवाईक गोळा केले. याच्या परिणामी अण्णांचा संसार नेहमी ओढघस्तीचा राहिला. वयाच्या नवव्या वर्षी मी मामाच्या घरी आलो आणि माझे पहिले मत असे बनले की, अण्णा कमालीचे कंजूष व चिक्कू गृहस्थ आहेत. कारण ते नेहमी खर्चावर तक्रार करावयाचे. अण्णांना पान-तंबाखूचे चांगलेच व्यसन होते. गोविंदराव पानवाल्याकडून आम्ही पान आणीत असू. एका वेळी तीन-चार विडे आम्ही आणीत असू. कित्येकदा अण्णा तोंडात विडा घालायचे व मामी आतून सांगायच्या 'चला जेवायला. वाढलेले आहे.' अण्णांना अशा वेळी अत्यंत दुःख होत असे. तीन पैशाच्या पानातील एक पैसा वसूल झाला. आता पान थुकावे लागणार, दोन पैसे वाया गेले यामुळे ते एकदम चिडत, हळहळत. आम्हांला पैशाचे महत्त्व सांगत. दोन पैसे ही रक्कम लहानसान नव्हे, हे तत्त्व जो जो पोटतिडकीने अण्णा सांगत तो तो आम्हाला वाटे, हा माणूस अत्यंत कंजूष आहे. जसजसा पुढे मी मोठा झालो, व्यवहाराची अक्कल आली, तसतसे माझे मन अण्णांच्या विषयीच्या आदराने भरून गेले. आजही अण्णांची आठवण झाली म्हणजे मन उचंबळून येते. या माणसाने जन्मभर पैशाची चिंता केली. आपण फाटके नेसला. मुलांना फाटके नेसवले.आपल्या हौशी मारल्या. बायकोच्या हौशी मारल्या. आयुष्यभर ही झीज सहन करीत संसार केला. पण आईकडच्या, बापाकडच्या, किंबहुना मित्रांच्या व गावाकडच्या शक्य त्या सर्वांचे, त्यांना आपल्या घरी आणून शिक्षण केले. या शिकून गेलेल्या मंडळींच्याकडून अण्णांना कधीही पैची अपेक्षा नव्हती. अण्णा मनाने उदार होते. कृतीने उदार होते. भाषेने मात्र अत्यंत चिक्कू माणसासारखे सदैव ते बोलत.
 माझ्यावर अण्णांची विलक्षण माया होती. माझ्या जीवनाच्या अपयशाने ते व्याकुळ होत. यशाने उल्हसित होत. कासवीच्या डोळ्यांत अमृतकळा असते असे म्हणतात तसे कहीतरी अण्णांच्या नजरेत होते. त्या सावलीत आम्ही वाढलो. मी दहाअकरा वर्षांचा होतो, त्या वेळी अण्णांचा प्रबंध लिहिणे चालू होते. मुक्तेश्वर आणि मोरोपंत या विषयांचा त्यांचा गहन अभ्यास, पण ते माझ्याशी चर्चा करीत, आपले मत कसे बरोबर आहे हे मला पटवून देण्याचा प्रयत्न करीत. सातवी-आठवी उर्दू माध्यमातून शिकणारा मी मला मोरोपंत काय कळणार? मोरोपंतांच्या क्लिष्ट भाषाशैलीमुळे त्याचे इतर सर्व गुण रद्द होत, असे मी म्हणे; कारण आम्हांला मोरोपंत समजतच नसे. पण अण्णा तळमळीने मुद्दा पटवून देत. या प्रबंधाचा अतिशय बारीक परिचय त्यामुळे झाला. अण्णा विलक्षण जिद्दीचे होते. त्यांना टाइप करता येत नसे. पण दोन बोटांनी अक्षरे हुडकून टाइप करीत. हा प्रचंड प्रबंध त्यांनी टाइप केला. याआधी अगर यानंतर टाइप करताना ते कधी दिसले नाहीत. पृष्ठाला बारा आणे देणे त्यांना परवडणारे नव्हते. पगार २५० रुपये असला तरी खाणारी तोंडे १३-१४ होती. मग परिस्थितीवर मात करणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे अण्णांची जिद्द. ही जिद्द अण्णांचा लक्षणीय विशेष होता. आणि माझ्यावरचे अलोट प्रेम हा त्यांच्या जीवनातला अतिशय दुबळा बिंदू होता. मी फार मोठे व्हावे असे त्यांना वाटे. इतरांना परिचय करून देताना माझा उल्लेख ते नेहमी ' आचार्य' असाच करीत. पण शेवटी आम्ही मोठे होणार होणार म्हणजे किती होणार ? मुळातच जिथे आवाका बेतास बात आहे तिथे फार उंच उडी घेणार कुठून ? काहीतरी नेत्रदीपक माझ्याकडून घडावे असे त्यांना फार वाटे.
 अण्णांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. या प्रेमापोटी विलक्षण हळवेपणा त्यांच्यात आलेला होता. पण ते बोलत अतिशय तीव्र आणि तुटक. त्यामुळे त्यांचा स्वभाव कधी कधी प्रेमशून्य, निर्दय असा वाटे. माझे सासरे एकदा घरी आले. अण्णांचा लाडका कुत्रा अंगणात हुंदडत होता. तो माझ्या सासऱ्यांना कडाडून चावला. 'अरे अरे' म्हणत अण्णा पुढे गेले आणि नंतर म्हणाले, " मूर्ख आहेस, बेटया, कमावलेल्या शरीराचा चावा घेऊ नये. तुझे दात दुखावतील !" माझे सासरे अण्णांचे बालमित्र होते. त्यांना त्याचे काही वाटले नाही. इतर कुणी असता तर म्हणाला असता, 'काय निर्दय माणूस हो ! चावऱ्या कुत्र्याच्या दातास दुःख होईल याचीच हा काळजी करतो. याच्या तोंडून सहानुभूतीचा एक शब्दही बाहेर पडत नाही.' पण हे दिसणारे अण्णांचे चित्र खरे नव्हते. अण्णा तोडून बोलत, कुचकेनासके, वाकडे-तिकडे बोलत. माझ्या एका मित्राने ऐच्छिक उर्दू घेतले. ते अण्णांना अजिबात पटले नाही. ते म्हणाले, " वाऽऽ ! आपल्या पितरांचे चांगले पांग फेडलेस. तुमच्या बेचाळीस पिढया जन्नतमध्ये तृप्त झाल्या असतील." माझ्या मित्राने उर्दू सोडले व मुकाट्याने मराठी घेतले. या बाबी अण्णांना ओळखणारी सर्व माणसे सांगतील. प्रत्येकाला ते असे तोडून बोलत. मी एकूण बारा वर्षे त्यांच्या घरी काढली. आठवड्यातून किमान दोन-तीनदा तरी ते मला सांगत, अगदी आवर्जून मलाच सांगत, " बाबा रे ! पाचजण कृतघ्न असतात, अशी परंपरा आहे. पहिला जावई, दुसरा साप, तिसरा अग्नी, चौथा दुष्ट आणि पाचवा सर्वश्रेष्ठ कृतघ्न म्हणजे बहिणीचा मुलगा." हे ऐकता ऐकता आम्हांला सवय होऊन गेली. अण्णांच्या रागीटपणाच्या, वाकड्या बोलण्याच्या आठवणी सर्वांना आहेत. पण अण्णांच्यावर विद्यार्थ्यांनी अलोट माया केली. विद्यार्थ्यांचे प्रेम प्रचंड प्रमाणात संपादन करणारे ते भाग्यशाली प्राध्यापक होते. एक-दोन वेळेला सर्वांना राग येई, हळूहळू या बोलण्याची सवय होई आणि त्यांच्या वत्सल मायेत सर्वजण मनसोक्त स्नान करीत. आमच्यासारखे काही धटिंगण तर त्यांचीही चेष्टा करीत. अण्णांच्याइतका वत्सल माणूस पाहण्यास क्वचित मिळतो. कुणाचेही दुःख पाहून ते व्याकुळ होऊन जात. आपल्या विद्यार्थ्यांवर त्यांची विलक्षण माया असे. कहाळेकरांना अगर भगवंत देशमुखांना अण्णा सदैव वाकडे बोलत. पण इतर कुणी थोडेही कमी-जास्त बोललेले त्यांना सहन होत नसे. स्वतःसाठी कधीही दीन न झालेले ताठर आणि अहंकारी नांदापूरकर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अतिशय दीन व गरीब होऊन प्रयत्न करताना मी पाहिले आहेत. साधे आम्ही सिनेमाला गेलो तर परत येईपर्यंत त्यांना झोप येत नसे. आमची आजारीपणेही त्यांनीच सोसली आहेत. तीन-तीन चार-चार दिवस जाग्रणे करीत ते आमच्या उशाशी बसत; प्रकृती चांगली झाल्यावर सूड घेऊ म्हणून आम्हांला शिव्या देत. दिसायला अण्णा देखणे होते. अतिशय गोरेपान नाकी-डोळी धरधरीत, आरोग्यसंपन्न व रूबाबदार असा त्यांचा चेहरा दिसे. थोडा
 बा...२ फार चेहऱ्यावर कठोरपणाचा छापही होता. त्यांचा देखणेपणा त्यांच्या एकाही चित्रात दिसत नाही. अण्णांचा फोटो असा का येतो याविषयी मला नेहमी आश्चर्य वाटे. मी एकदा त्यांना विचारले, " अण्णा, आमचे फोटो आम्ही आहोत त्यापेक्षा कितीतरी चांगले येतात." अण्णा म्हणाले, " सज्जनांचा फोटो कॅमेऱ्यात बिघडतो."
 अण्णांच्या स्वभावात श्रद्धा आणि चिकित्सा, सनातनित्व आणि सुधारणावाद यांचे मोठे चमत्कारिक मिश्रण होते. निदान तीन तरी प्रेमप्रकरणे अण्णांच्या छायेखाली घडली आहेत. एके वेळी मुलगा यजुर्वेदीय आणि धाकटा होता. मुलगी ऋग्वेदी, कऱ्हाडी, वयाने वडील होती. आपली शाखा सोडून लग्न करणे या गोष्टीचा अण्णांना भयंकर राग येई. त्यामुळे हे प्रेम त्यांना मनातून पटत नसे. ते आम्हांला सांगत, हे बरोबर नाही. तुम्ही दोघांचीही समजूत घातली पाहिजे. आणि परंपरा पाळण्यास मंडळीला शिकवले पाहिजे. आम्ही उत्तर देत नसू. आम्ही एकदा त्यांना सांगितले, या दोघांना बोलत बोलत घरी जावयाचे असते. मुलीला घरापर्यंत सोडण्याला निमित्त मिळावे म्हणून तुम्ही सहाला शिकवयाला बसा. साडेसातला शिकवणे बंद करा. अण्णा त्या प्रेमी जीवांना संधी मिळावी म्हणून पुष्कळदा शिकण्यासाठी पाचलाच घरी बोलवीत. व मग 'मी थोड्या वेळाने शिकवतो, तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या कोठडीत बोलत बसा' म्हणून सांगत. शिकवणे संपल्यावर जाताना मुलाला आज्ञा देत, “ तसाच बेजबाबदारपणे सरळसोट घरी जाऊ नकोस. हिला सांभाळून घरापर्यंत सोड. रात्रीबेरात्री बाईने एकटे जाऊ नये." मंडळी बाहेर गेली म्हणजे मला बोलवून फैलावर घेत व जे घडते आहे ते कसे बरोबर नाही हे विस्ताराने समजावून सांगत. अण्णांचे एक विद्यार्थी तर मराठा होते. त्यांच्या प्रेयसीच्या बापाने त्यांना घरी न येण्यास बजावले होते. ते अण्णांकडे येत, पायाशी बसत व हळूच डोळे पुसत. अण्णा या आपल्या लाडक्या विद्यार्थ्याला दोनचार शिव्या देत. शेवटी वह्या तपासण्यासाठी या प्रेयसीला स्वतःच्या घरी बोलवीत. नंतर दोघांनाही समोर बसवून प्रेम करणे कसे बरोबर नाही, हे समजावून देत. अण्णा मनाने सनातनीच होते. पण प्रेमी जीवांना धर्मासाठी प्रेम सोडा, परंपरेसाठी जीवनातले माधुर्य गमवा हे सांगण्याची त्यांची इच्छा नव्हती. ते आमच्यावर कुरकुरत. माणसाची निष्ठा, त्याची उत्कटता, त्याचा प्रामाणिकपणा अण्णांना तेवढ्यापुरते पुरोगामी करी. कारण अण्णा हळवे होते. दिसेल त्या देवाला नमस्कार करण्याइतके ते श्रद्धाळू होते. लोणीच्या सखाराम महाराजांवर त्यांची श्रद्धा होती. दर शनिवारी ते मारुतीला जात. देवपूजा रोज करीतच. दरमहा घरी सत्यनारायण असे. दर शुक्रवारी उपवास करीत. दरमहा चतुर्थी असे. शिवाय मोठया एकादशा, श्रावणी सोमवार हेही करीत. श्रावणी न चुकता करीत. ईश्वरावर त्यांची श्रद्धा होती. भारताच्या सहवासात त्यांच्या जीवनातील पंचवीस वर्षे गेली, पण अंघोळ न करता पारोशाने ते कधी भारताच्या पोथीला शिवले नाहीत. या मुद्दयावर त्यांनी एकदा मला घरातून बाहेर काढले होते. लहानपणापासून मी धार्मिकतेची चेष्टा करणारा जडवादी होतो. अण्णा म्हणाले, "जा, रे नरहरी, चप्पल घेऊन ये. पट्टे लाल आण. इतर रंगाचे नकोत." मी गेलो. त्यांच्यासाठी चप्पल विकत आणली. पट्टे मात्र काळ्या रंगाचे आणले. ते मला म्हणाले, " आचार्य, नांदापूरला या रंगाला काळा म्हणतात. कुरुंद्याला हाच रंग लाल म्हणतात काय ?" मी सांगितले, " चपलांचा रंग काळा आहे, पण तो मुद्दामच तसा आणला आहे." अण्णा म्हणाले, “मला लाल रंग हवा.” मी म्हणालो, "लाल चप्पल आणणार नाही. तुम्ही लाल पाहिले की हात जोडता, पाया पडता. तुम्हांला लाल म्हटले की देव वाटतो." अण्णा भयंकर रागावले. "माझ्या धार्मिकतेची, श्रद्धेची चेष्टा करतोस- हो माझ्या घराच्या बाहेर " असे ते म्हणाले. मी म्हटले, " ठीक आहे." आणि मी घराबाहेर जाऊन उभा राहिलो. अण्णांनी सर्वांना ताकीद देऊन बजावले, " त्याला घराबाहेर काढले आहे, पुन्हा या घरात तो दिसला न पाहिजे." पंधरा एक मिनिटे मी घराबाहेर होतो. पुढे तेच घराबाहेर येऊन मला म्हणाले, " मूर्खा, उन्हात काय उभा राहतोस ? तुला चांदणे आणि ऊन यातील फरक कळत नाही? तुझ्यापेक्षा गाढव बरे. चल, आत हो." पण शेवटी चप्पल काळी राहिली. लाल चपलेचा हट्ट अण्णांनी सोडला. यात जय माझा झाला असे त्या वेळी मला वाटले. खरा जय अण्णांच्या गाढ वत्सलतेचा होता असे आज वाटते. अण्णांनी सखाराम महाराजांवर आरत्या व अष्टके रचली आहेत. सकाळी उठून ते या आरत्या कधी कधी म्हणत. पण त्यांच्या वाङ्मयात या श्रद्धाळूपणाचा मागमूसही नाही. आपल्या प्रबंधात महाभारताची जी कठोर तर्कशुद्ध चर्चा त्यांनी केली आहे ती पाहताना हा माणूस श्रद्धाळू असेल असे म्हणावेसे वाटत नाही. भारताचा अभ्यास करताना नेहमीचा प्रश्न द्रौपदी पाचांची पत्नी झाली हा येतो. द्रौपदी इंद्राणीचा अवतार होती. सर्व पांडव इंद्राचे अंश होते. म्हणून ती पाचांची पत्नी झाल्यासारखी दिसते तरी खरोखरी ती एकाचीच होती. ही भूमिका अण्णांनी उत्तरकालीन प्रक्षेप मानली आहे. आदल्या जन्मी शंकराने पाच वेळा द्रौपदीला 'तथास्तु' म्हटले; म्हणून तिला पाच पती झाले अगर कुंतीने " ती पाचात वाटून घ्या" म्हटले; म्हणून ती पाचांची पत्नी झाली या भूमिका, अण्णांना प्रक्षिप्त वाटत. ते म्हणत, "द्रौपदीला पाहून धर्मासकट सर्वांचे मन तिच्या सौंदर्यामुळे विचलित झाले होते. द्रौपदी कुणाही एकाची झाली असती तर पाचांची एकजूट मोडली असती. पाचांची पत्नी झाल्यामुळे द्रौपदी हे पांडवांच्या एकजुटीचे महत्त्वाचे कारण व साधन ठरले." महाभारतातील हा आशय सांगणारे स्पष्टीकरण मूळचे आहे असे त्यांना वाटे. अण्णा एकदा अभ्यासात शिरले, म्हणजे अत्यंत शिस्तशीर व चिकित्सक असत. प्रत्येक गोष्ट मोजून पाहण्याची त्यांची जिद्द असे. त्यांचा सारा प्रबंध या मोजून पाहण्याच्या जिद्दीचा एक नमुना आहे. विद्वान म्हणत, “ मोरोपंत हा अधिक संस्कृतप्रचुर आहे." अण्णांनी एकूण पाच पर्वातील एकूण शब्द मोजले. मुक्तेश्वरात तत्सम शब्दांचे प्रमाण त्यांना मोरोपंतांपेक्षा अधिक आढळले. त्यांनी मुक्तेश्वर हा शैलीच्या दृष्टीने अधिक संस्कृतप्रचुर आहे ही गोष्ट निश्चितपणे सिद्ध केली आहे. प्रबंधात सगळी मिळून ही चर्चा आठ-दहा ओळींत आटोपते. पण यासाठी महिनोगणती अण्णा मोजदाद करीत होते. शिस्तशीर, बारीक, तपशीलवार विश्लेषण व त्याची अतिशय अनाग्रही चिकित्सा हे अण्णांच्या प्रबंधाचे महत्त्वाचे गुण होते. पण एकदा अभ्यास संपला आणि अण्णा त्यांच्या ज्ञानक्षेत्राच्या वर्तुळातून बाहेर आले म्हणजे त्यांच्याइतका सश्रद्ध कोणी नसे. आम्ही परीक्षा पास व्हावी म्हणून ते नवससुद्धा करीत. चिकित्सकपणा आणि श्रद्धाळूपणा, सनातनीत्व आणि औदार्य, जिद्द, ताठरपणा, आक्रमकपणा आणि हळवेपणा, अत्यंत तुसडी भाषाशैली, कुचकेपणा आणि गाढ वात्सल्य या परस्परविरोधी गुणांचे नांदापूरकर हे चमत्कारिक मिश्रण होते. हीच गोष्ट त्यांच्या वाचनात होती. अण्णांना रांगडेपणा आवडे. रांगड्या मराठवाडी बोलीत ठाशीवपणे ते बोलत. ग्रांथिक भाषा त्यांच्या तोंडी नव्हती. मराठवाडी बोलीलाच ते शुद्ध मराठी मानीत. कोल्हापुरी चप्पल घालून रप्प रप्प आवाज करीत ते वेगाने चालत. आमच्या चालण्याला 'दिल्ली चाल' म्हणत. तरुणपणी ते कुस्त्या खेळले होते. म्हातारपणापर्यंत किंबहुना मरेपर्यंत कुस्त्या पाहण्याचा त्यांना शौक होता. ते डिटेक्टिव्ह कादंबऱ्यांचे, गुप्तहेर कथांचे, चाहते वाचक होते. शेकड्यांनी गुप्तहेरकथा त्यांनी वाचल्या असतील. पण त्यांच्या मते नाजूकपणा हेच वाङमयाचे खरे सौंदर्य आहे. सूक्ष्म, भावूक, नाजूक, उदात्त, भव्य यांवर ते वाङ्मयात लुब्ध होत. कर्कश, भडक त्यांना आवडत नसे. केशवसुतांपेक्षा त्यांना तांबे आवडत. बालकवी तर फारच आवडत. टागोर आणि खलिल जिब्रान यांच्यावर त्यांची माया होती. स्त्रियांच्या ओवी-वाङ्मयात जीवनाच्या शेवटच्या काळात ते पूर्णपणे बुडून गेले होते. या स्त्रीगीतांतील नाजूक भावाविष्कारावर ते पूर्णपणे लुब्ध होते. महाभारत आणि त्याची भव्यता, जात्यावरच्या ओव्या आणि त्यांचा नाजकपणा या गोष्टीत रमणान्या माणसाला कुस्त्या आणि गुप्तहेरकथा यांचे विलक्षण आकर्षण असावे हा एक पुन्हा विरोधाभासच होता.
 मराठीवर त्याचे अतिशय ज्वलंत प्रेम होते. त्यांच्या कवितांच्या स्फूट संग्रहातील तेहतिसाव्या पानावरील कविता अगर ४५ व्या पानावरील कविता या केवळ कविता नाहीत. अगदी आरंभीची कविता तर आता मराठी गीत म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व कार्यक्रमात वापरली जाते. या कवितांतून व्यक्त झालेला अभिमान नांदापूरकर प्रत्यक्ष जगत होते. मराठीच्या या अभिमानापुढे त्यांना संस्कृतचीही मातब्वरी वाटत नसे. संस्कृत भाषा राष्ट्रभाषा व्हावी हा विचार स्वप्नातही त्यांना पटला नसता. वस्तुतः ते मराठीसह संस्कृतचेही एम. ए. होते. उलट आधी संस्कृतचे एम. ए. झाले, नंतर मराठीचे. महाभारताशी ते दीर्घकाल मैत्रीने जगत होते; पण राष्ट्रभाषा म्हणजे हिंदी आणि महाराष्ट्रात सर्वत्र मराठी हा त्यांचा आग्रह सुटला नाही. अण्णांचे एक मित्र कानडी होते. त्यांची पत्नी महाराष्ट्रीय होती. तिच्या मुलांची मातृभाषा मराठीच असणे रास्त आहे असे अण्णांना वाटे आणि जर पत्नी कानडी असती आणि पती महाराष्ट्रीय असता तरीही मुलांची भाषा मराठीच राहिली पाहिजे असा आग्रह अण्णांचा राहिला असता. मराठीवरच्या या उदंड प्रेमातून व अभिमानातून त्यांनी 'मायबोलीची कहाणी' लिहिली. जात्यावरील ओव्या गोळा करण्यात काव्याची ओढ प्रभावी होती. पण त्यापेक्षा मराठीची माया अधिक प्रभावी होती ही गोष्ट मान्य केली पाहिजे. मराठ्यांच्या इतिहासाविषयी त्यांना असाच अभिमान होता. पुन्हा एकवार भीमथडीच्या घोड्यांनी अटकेचे पाणी प्यावे, काबूलचा हुरडा परसात भाजला जावा असे त्यांना मनापासून वाटत होते. पण मराठ्यांच्या इतिहासापेक्षा अधिक अभिमान त्यांना मराठी संतांचा व मराठी भाषेचा वाटे.
 अण्णा कुणी परमेश्वर होते असे खासच आम्हाला वाटत नाही. त्यांचा सनातनीपणा, त्यांचा श्रद्धाळूपणा, त्यांची शैली, त्यांची मते पुष्कळदा आम्हाला उघड चुकीची वाटत. मुक्तेश्वर-मोरोपंतांच्या तुलनेत कल्पनाविलासातसुद्धा मोरोपंत वरचढ आहेत हे त्यांचे मत मला कधीच पटले नाही. परळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना 'शिवपूजा मुळात सूर्यपूजा असावी' असे मत त्यांनी दिले आहे. त्याही वेळी मला ते चुकीचे वाटले, आजही चुकीचे वाटते. अण्णांच्या मर्यादा, त्यांच्या उणिवा यांकडे डोळेझाक करण्याइतके आम्ही त्यांचे अंधभक्त कधीच नव्हतो. पण शेवटी त्यांच्या समोर मराठवाड्यातल्या सर्वांचा माथा नम्र होई. त्यांच्या जबर व्यासंगामुळे, विद्वत्तेमुळे आम्ही भारावलेले होतो. अजूनही भारावलेले आहोत. पण यापेक्षा महत्त्वाचे असे स्थान नांदापूरकरांचे मराठवाड्यात मी मानतो, ते स्थान म्हणजे मराठवाड्यातील साऱ्या मराठी चळवळीचे प्रचंड उगमस्थल अण्णा होते. अण्णांचा प्रचंड शिष्यसंभार केवळ अण्णांचाच विद्यार्थी नव्हता. त्यांना नांदापुरकरांखेरीज इतरही प्राध्यापक शिकवत असतील, पण अभिमानाने सारेजण परंपरा नांदापूरकरांची सांगतात. पोलिस ॲक्शननंतर मराठवाडा साहित्य परिषद तर अक्षरशः नांदापूरकरमय झाली. परिषदेच्या सर्वच लहानमोठ्या कार्यकर्त्यांचे अण्णा साक्षात गुरुवर्य होते. आणि ज्यांचे ते गुरू नव्हते तेही त्यांना गुरुस्थानीच मानीत. माढेकर, पोहनेरकर ही मंडळी दुसऱ्या प्रकारची मानली तर कहाळेकर, भगवंत देशमुख, कानिटकर ही मंडळी पहिल्या प्रकारची मानावी लागते. अण्णा हे मराठवाड्यात मराठीचे प्रचंड प्रेरणास्थान होते. मराठवाड्यातील तरुण पिढीच्या सर्व मराठी अभ्यासकांचे ते श्रद्धास्थान होते. त्यांनी ओव्या गोळा करण्याचा ध्यास घेतला तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी शिष्यमंडळींनी लाखो ओव्या गोळा केल्या. अण्णांच्या संग्रहात पुनरुक्ती वजा जाता लाखावर ओव्या होत्या. या ओव्या सर्व मराठवाड्यातून, सर्व थरांतून व बहुतेक सर्व जातीजमातींतून आलेल्या होत्या. माझी आठवण बरोबर असेल तर सर्व ओव्या एकूण १३८ जाती-पोटजातींच्या बायकांचे धन होत्या. सर्वांनीच हे काम काही ओव्यांच्या प्रेमाखातर केलेले नाही. ते बहुशः अण्णांच्या प्रेमाखातर केलेले आहे. एवढे मोठे श्रद्धास्थान व एवढे मोठे प्रेरकत्व त्यांच्याजवळ होते. या त्यांच्या विराट दर्शनापुढे आम्ही नतमस्तक होतो. मग अण्णांचे सारे दोष, त्यांच्या साऱ्या उणिवा व त्यांनी प्रसंगी दिलेल्या शिव्यासुद्धा मधुर होऊन मनात तरंगतात. क्षणभर माझा बुद्धिवाद कोपऱ्यात पडतो व मी रोमांचित होतो.
 अण्णांच्या कवितासंग्रहाला प्रास्तविक लिहिताना काव्याविषयी फारसे काही मी बोललोच नाही. कारण कवी म्हणून अण्णांचे मूल्यमापन करणे मला शक्य नाही. मराठवाडयात अगर अधिक नेमकेपणाने सांगायचे तर जुन्या हैद्राबाद राज्यात दोन माणसे अशी होती की, ज्यांचे वाङमयीन मूल्यमापन आम्हाला कधी करावेसे वाटले नाही. पैकी एक अण्णा होते. दुसरे रावसाहेब र. लु. जोशी होते. कवी म्हणून अण्णांची कविता चांगली असेल. मला स्वतःला ती कविता आवडते. कदाचित अण्णांची कविता अगदीच सामान्य असेल. अनेकांना ती आवडणार नाही. काही अधिक चिकित्सक या कवितेवर बालकवींचे (पृष्ठ ३, ५, १२), विनायकांचे (पृष्ठ ९, ९९), टागोरांचे (पृ.१४, १६) खलिल जिब्रानचे (पृष्ठ ६८), तांब्यांचे (पृष्ठ ३६, ४२) ठसे दाखवू शकतील. रविकिरण मंडळातील जानपदगीतांचे, सुनीतांचे अगर ओवी-वाङमयाचे ठसेसुद्धा दाखवणे कठीण नाही. पण असे ठसे दाखविले म्हणजे काम संपत नाही. हे ठसे असूनही काव्य आवडू शकते. " लेकी चंद्र ज्योति । तुझ्या रूपाचा अस्करा । वेला लावून वाफ्यात । जाई शेजारी मोगरा" || या ओळी वाचताना ओवी- वाङमयाची आठवण होतेच होते. पण अशी आठवण होते म्हणून या ओळींची गोडी संपत नाही. सारेचजण काही एकूण वाङमयप्रकाराला आपल्या पृथगात्मतेने नवे वळण लावणारे युगप्रवर्तक कवी नसतात. तसे नांदापूरकर होते असा माझा दावा नाही. ते तसे नव्हते याबद्दल फारसे वाईटही वाटत नाही. मुळात अण्णांची कविता चांगली आहे की वाईट आहे हा प्रश्नच मला अप्रस्तुत वाटतो. ज्या दिवशी वाङमय-विवेचन करण्यासाठी मी उभा राहीन त्या दिवशी ममत्वाचे पट डोळ्यांवर येऊ न देता मूल्यमापन करावे लागेल. तसे करण्याची माझी तयारी आहे, किंबहुना, अशा मूल्यमापनाचे मोकळेपणाने स्वागत करण्याइतके मन उदारही आहे. पण हा संग्रह छापताना प्रकाशकांची भूमिका चांगला काव्य ग्रंथ छापण्याची नाही. ऋणमुक्तीची आहे. या पुस्तकाचे वाङमयीन मूल्यमापन कसेही होवो- आणि तेही अनुकूलच होईल असे मला वाटते-पण कसेही होवो- नांदापूरकरांचा चाहतावर्ग या संग्रहाचे स्वागत करील. अशा या संग्रहाच्या प्रारंभी, नांदापूरकरांच्या परंपरेचा एक छोटासा पाईक म्हणून, अभिवादन करताना अण्णांचे दर्शन घेणे, त्यांचे गुणसंकीर्तन करणे व हे करण्यास संधी मिळाल्याबद्दल स्वतःस धन्य मानणे मला अधिक महत्त्वाचे वाटेल.