वाटचाल/असेही दिवस-

विकिस्रोत कडून



असेही दिवस-



ऑक्टोबर १९५३ ते ऑगस्ट १९५५ हा सुमारे पावणेदोन वर्षांचा काळ माझ्या जीवनात चिंतेचा, अस्वस्थपणाचा व अस्थिरतेचा असा काळ आहे. माझ्या पुढील जीवनाची दिशा ह्या काळातच ठरली. आज इतक्या वर्षांनंतर ह्या काळाकडे जेव्हा मी पाहतो त्या वेळी माझे मलाच समाधान वाटू लागते. माणूस ज्या वेळी अस्थिर होतो, अडचणीत येतो, त्याचे अस्तित्वच अस्थिर होते, त्याच वेळी तो मनातून कोसळण्याची व भलत्या तडजोडी करण्याची शक्यता असते. या कोंडीत सापडण्याच्या अवधीतच तो हताश झाला म्हणजे आतताई, अतिरेकी होतो. हे दोन्ही प्रकार माझ्या बाबतीत घडले नाहीत. आपण कोंडीत सापडलो आहोत आणि बाहेर पडण्यास मार्ग दिसत नाही,

हे चित्र समोर असतानासुद्धा माझ्या हातून गैर काही घडले नाही. फार तर अहंतेला उपकारक असा उद्धटपणा, खोडकरपणाच घडला, याचे मला समाधान आहे. तो काळ पुन्हा वाट्याला येणार नाही हे खरे. पण जर आलाच तर किरकोळ तपशील वगळता मी जसा वागलो तसाच पुन्हा वागेन, असे मला वाटते.
माझ्या अस्वस्थपणाचा आरंभ माझ्या एका निर्णयामुळे झाला. राजकारण संपलेले होते; राजकारणात भोवताली पूर्ण पराभव पसरलेला होता; शिक्षणावरून लक्ष उडालेले होते; मग उगीच हैद्राबादला राहायचे कशाला, असा विचार करून हैद्राबाद कायमचे सोडायचे असे मी ठरवले. पदवी नव्हती, पण अभ्यासू तरुण आणि वक्ता म्हणून थोडीफार कीर्ती होती. शिकण्यावरील लक्षच उडाले होते. तेव्हा पदवी नाही ही खंत नव्हती. हैद्राबाद सोडायचे हे ठरले, पण पुढे काय याचा विचारच अजून केलेला नव्हता. हैद्राबादला मला बांधून ठेवणारा एक प्रबळ धागा होता. तेव्हा हा धागा तोडला म्हणजे मग मी मोकळा होणार होतो. या प्रबळ धाग्याचे नाव प्रभावती दुसंगे असे होते. स्वतःभोवती मित्रांचा फार मोठा परिवार सतत सांभाळणारा असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मित्र-मैत्रिणींचे फार मोठे कोंडाळे माझ्या भोवती नेहमीच असे. पण ज्या मुलीशी लग्न करावे असे मला आयुष्यात पहिल्यांदा वाटले ती ही मुलगी. मी तिच्या घरी जात-येत असे. त्या वेळी महिन्या दोन महिन्याला एखादे औपचारिक वाक्य बोलणे याहून त्या मुलीशी जास्त संभाषण नव्हते. तिचे मला पत्र नव्हते. माझे तिला पत्र नव्हते. कधी घराबाहेर गाठीभेटी नव्हत्या. दुरून जी नजरभेट होई तो मुख्य परिचय. अशी चार वर्षे आराधना चालू होती. हा धागा तोडल्याशिवाय हैद्राबाद सोडणे शक्य नव्हते. हा धागा तोडण्याचा जो प्रयत्न मी इ. स. १९५३ ऑक्टोबरमध्ये केला त्यामुळे सगळे जीवनच पालटून गेले.
 हैद्राबाद सोडायचेच होते. या मुलीला कधी भेटलेलो नव्हतो. कोणताही शब्द कधी दिला-घेतला नव्हता. म्हणून फसवणूक कोणाचीच नव्हती. शांतपणे हैद्राबाद ऑक्टोबर ५३ ला सोडले असते तर मग सगळे जीवनच बदलून गेले असते. आज जे दिसते त्यापैकी काहीच घडले नसते. मी नोकरीही केली नसती. पुढे परीक्षाही दिल्या नसत्या. कदाचित व्याख्याने दिली असती. एखादा लेखही लिहिला असता, पण तो कोणी वाचला नसता. पण हे घडायचे नव्हते. ज्या मुलीत आपले मन इतके गुंतलेले आहे तिचा स्पष्ट नकार घेतल्याशिवाय हैद्राबाद सोडण्याची कल्पनाच त्या वेळी मनाला पटेना. ज्या मुलीने प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष, स्पष्ट अगर अस्पष्ट, असा कोणता होकारच दिलेला नाही, तिचा स्पष्ट नकार मिळवण्याचा आग्रह हा वेडगळपणाचा प्रकारच म्हटला पाहिजे. पण हा वेडगळपणा माझ्या स्वभावाचा न बदलणारा भाग आहे.
 पण मी ठरवले ते हे की आजवर या मुलीला आपण भेटलो नाही, आता भेटायचे, स्पष्टपणे तिचा नकार घ्यायचा आणि मग हैद्राबाद सोडायचे. आपल्यासारख्या भणंग माणसाचे मन चार वर्षे ज्या मुलीने काही न बोलता बांधून ठेवले तिचेही मन आपल्यात गुंतले असेलच, याचे भान काही त्या वेळी आले नाही.
 ऑक्टोबर १९५३ चा शेवटचा आठवडा चालू होता. मंगळवारचा दिवस होता. भर दुपारी दोन अडीचच्या सुमारास मी प्रभावती दुसंगे यांना सडकेवर एकटे गाठले. मी म्हटले, " थांब, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे." ती जणू एक दिवस हा प्रसंग येणार हे गृहीत धरूनच होती. जणू या प्रसंगाची वाटच पाहत होती. ती थोडीशी थांबली. मी म्हटले, " मी हैद्राबादचा कायमचा निरोप घेतो आहे. यापुढे मी हैद्राबादला येणार नाही. हैद्राबाद सोडण्यापूर्वी एक कर्तव्य पार पाडणे भाग आहे ते म्हणजे तुला विचारण्याचे. तू माझ्याशी लग्न करणार काय ? तू एकदा स्पष्टपणे नकार दिला, म्हणजे हे गाव सोडण्यास मी मोकळा होईन." माझी अशी अपेक्षा होती की " मला असला फाजिलपणा मान्य नाही," असे म्हणून ती झटक्यात घरी जाईल. तिचे भाऊ माझा शोध घेण्यास येईपावेतो मी हैद्राबाद सोडले असते. एक धोका होता. तिथे सडकेवरच तिने काही आरडाओरडा केला असता तर सडकेवर मार खाण्याचा धोका होता. तो मी पत्करलेला होता. प्रभावती दुसंगे क्षणभर गोंधळली, कावरीबावरी झाली आणि मग शांतपणे म्हणाली, "मला थोडा अवधी द्या. मी येत्या शुक्रवारी या प्रश्नाचे नक्की उत्तर देईन." गेली २५-२६ वर्षे सर्व अनपेक्षित संकटांत तितकेच धीमेपणाने ती तोंड देत आली आहे. अत्यंत शांत व थंड पण नि:संदिग्ध वागण्याची जी तिची शक्ती आहे तिला मी अजनही वचकून असतो.
 हट छट करीत झुरळ झटकल्याप्रमाणे मला झटकून जर ही मुलगी पुढे गेली असती तर काय झाले असते ? मी हैद्राबाद सोडून बाहेर पडलो असतो. त्या काळी फक्त हाफ पँट व शर्ट हे दोनच कपडे मी वापरी. डोक्यावर लांब शेंडी असे. केस नसतच. आईवडिलांना वाटे, पोरगा हातातून चालला. आता हा शिकणारही नाही आणि लग्न करून संसारही करणार नाही. मी दीर्घकाळ लग्न केले नसते हे खरे. परीक्षा दिल्याच नसत्या म्हणून पुढे प्राध्यापक इत्यादीही झालो नसतो. व्याख्याने कदाचित दिली असती पण फारसे लिहिले नसते. अधिक मोकळा व कमी जबाबदार झालो असतो. काय झाले असते याचा विस्तार करण्यात अर्थ नाही. कारण ते झाले नाही. बरोबर शुक्रवारी प्रभावतीबाई अचूकपणे आल्या. ती त्या वेळी फक्त सतरा वर्षांची होती. पण वागणे आजच्यासारखेच आत्मविश्वासपूर्ण होते. तिने सांगितले, "मी विवाहाला माझ्या वडिलांची संमती मिळवलेली आहे. त्यांनी तुला भेटण्यास बोलाविलेले आहे." म्हणजे मधल्या तीन दिवसांत घरचा विरोध संपवून सारे ठरवनूच ती आली होती. मी भावी सासऱ्याकडे जाऊन होकार नक्की करून आलो.
 या क्षणापासून पुढची पावणेदोन वर्षे अतिशय चिंतेची अशी होती. तसा लग्नाला विरोध कुणाचा नव्हताच. एक तांत्रिक बाब म्हणून प्रत्येकाने कसाबसा एक दिवस विरोध दाखविला. खरे म्हणजे मी लग्नाला तयार झालो या आनंदात आई-वडील होते. माझ्या वडिलांनी तक्रार न करता हौसेने, मुलीचे लग्न करावे तसे मोठ्या थाटाने माझे लग्न लावून दिले. चिंतेत मी होतो. ज्या प्रश्नांचा आजवर कधी विचार केला नव्हता ते प्रश्न एकदम समोर उभे राहिले. मी मॅट्रिक-बेकार. मी लग्न ठरवतो आहे. पत्नीलाही नोकरी नाही. आम्ही जगणार कसे ? वडिलांच्या आधारावर परोपजीवी म्हणून कुठवर राहणार ? वडील बोलले काहीच नाहीत. पण घरचे पैसे खर्च करून लग्न करायचे व पुन्हा मुलगा व सून यांचा चरितार्थ चालवावयाचा हे त्यांनी काय म्हणून करावे ? हे सारे प्रश्न माझ्यासमोर होते.
 मनाला पटलेली मुलगी मिळाली. काव्यमय भाषेत सांगायचे तर प्रेम सफल झाले. त्यामुळे अतिशय गोंधळून व बावरून गेलो होतो. लग्नानंतर शक्यतो लवकर नोकरीस लागणे भाग आहे हे मला जाणवू लागले. एक पुढची योजना म्हणून मी भावी पत्नीसमोर कल्पना अशी मांडली की, आपण दोघेही नोकरी करू. माझ्या पत्नीने प्रथम सांगितले, " आपण ह्याचा विचार लग्नानंतर करू." आणि मनमोकळं बोलताना तिने तिचा मुद्दा समजावून सांगितला. थोडक्यात तिच्या बोलण्याचा आशय असा की तिला नोकरी लागली म्हणजे संसार सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर पडेल व मग समाजसेवा करण्यासाठी मी मोकळा राहीन हे तिला मान्य नाही. संसार नीट चालायचा असेल तर दारिद्रयाला काहीच हरकत नाही, गरिबीची तिला सवय आहे आणि गरिबीतच जन्म काढायची तिची तयारी आहे. पण नवरा घराला घट्ट बांधला पाहिजे यामुळे ती नोकरी कधीच करणार नाही. विवाहानंतर माझ्या आईवडिलांनी म्हणजे तिच्या सासूसासऱ्यांनी सुनेच्या म्हणण्याला भक्कम पाठिंबा तर दिलाच पण सूनबाई अतिशय हुशार व कर्तबगार म्हणून तिचे कौतुकही केले. आपण व आपणच नोकरी केली पाहिजे, एकजण कमावता व तोही मट्रिक, म्हणजे गरिबीत जन्म काढला पाहिजे यालाही मी मनाने तयार झालो. पण नोकरी मिळण्यास तयार नव्हती. खरे म्हणजे मला नोकरी मिळण्यास अडचण पडू नये. हैद्राबादेतील फार मोठमोठ्या माणसांचे माझ्यावर प्रेम होते. कै. स्वामी रामानंद तीर्थांचे तर विशेष वात्सल्य होते. पण 'मला नोकरी द्या,' म्हणून या थोरांच्यापैकी कुणाकडे जाण्याची माझी तयारी नव्हती. दीड वर्ष नोकरीसाठी मी भटकत होतो आणि ती मला लागत नव्हती. पण मी कोणाच्या शिफारशीसाठी प्रयत्न केला नाही. दीड वर्षाच्या वाट पाहण्यानंतर एकदा देव प्रसन्न झाले आणि एकदम दोन नोकऱ्या लागल्या. त्यांतील अधिक पगाराची नोकरी नांदेडची म्हणजे दरमहा ५६ रु. ७ आणे एकूण पगाराची होती.
 नोकरीसाठी नांदेडला मी निघालो तेव्हा वडील म्हणाले, "हे बघ, पगार कमी आहे याची चिंता करू नकोस. लागतील तसे पैसे मला माग, मी पाठवीन आणि नोकरी आवडली नाही तर सरळ सोडून दे व परत ये." पत्नीने सांगितले, "हे पहा, पगार कमी याची चिंता करू नका. उगीच जास्त पैसे मिळवण्याच्या नादी लाग नका. फक्त नोकरी टिकवा. मी तितक्याच पैशात नीट संसार मांडीन। दोघांचेही उपदेश ऐकून मी नोकरीवर रुजू झालो. जुलै १९५५ च्या शेवटी सेवेला आरंभ झाला. ऑगस्टमध्ये मुख्याध्यापकांनी मला सांगितले, " तांत्रिक बाबी विसरा. तुम्ही नोकर नाही, शाळा तुमची आहे, मी तुमचा आहे." आणि मी एकदम चिंतामुक्त होऊन स्थिरावलो. सर्व निश्चिंतपणाचा आधार तसे पाहिले तर द. म. ५६ रु. ७ आणेच होता. पण तेव्हापासून आजवर पुन्हा नांदेड नगराने मला कधी चिंता पडू दिली नाही.