Jump to content

वाटचाल/तो प्रसंग आठवला की-

विकिस्रोत कडून


तो प्रसंग आठवला की-



माझी स्मरणशक्ती तशी बरी आहे. फार चांगली नाही, पण कामापुरती आहे. मला नववे वर्ष चालू होते त्या वेळी या गोष्टीला आरंभ होतो आणि नववे वर्ष संपत आले तेव्हा या गोष्टीचा शेवट होतो. गोष्ट अर्थात माझ्या लहानपणची. तिच्या आरंभी, एका विद्वानाचा खूप राग आणि तिच्या शेवटी, दुसऱ्या विद्वानाने केलेले कौतुक. माझ्या बालमित्रांना ही गोष्ट आवडेल, अशी नाही. पण करणार काय? ती सांगणे भाग आहे. हैद्राबादला एक विद्यापीठ आहे. त्याचे नाव उस्मानिया विद्यापीठ. तिथे मराठीचे एक प्रसिद्ध विद्वान, मराठीचे मुख्य होते. त्यांचे नाव काकासाहेब जोशी. निजामचे संस्थान फार मोठे. त्यात परभणी जिल्हा, त्यात वसमत तालुका. तिथे माझे आई-वडील आज आहेत, तेव्हाही होते. माझा गाव कुरुंदा या तालुक्यातच आहे. मी चौथीत होतो आणि काकासाहेब जोशी आमच्या घरी पाहुणे म्हणून आले. कोणत्याही बापाला आपल्या मुलाचे कौतुक वाटतेच. माझ्या वडिलांना तर माझे कौतुक फारच फार. काका साहेब जोशी यांच्यासमोर वडिलांनी माझे कौतुक सांगितले, "काकासाहेब, आमचा नरहरी सतत काही तरी वाचतो आणि शंकेखोर फार." काकासाहेबांनी माझे कौतुक केले. मी त्यांच्या पाया पडलो. रात्री जेवणे झाली तोवर सगळे ठीक झाले आणि मग हात दाखवून अवलक्षण करण्याचा योग काकासाहेबांना आला. काकासाहेव जोशी मला म्हणाले, "बाळ, मी तुला एक गोष्ट सांगतो. मी गोष्ट सांगीन, तू तात्पर्य सांग." मी म्हटले, " ठीक आहे." त्यांनी मला समुद्रमंथनाची गोष्ट सांगितली. महाभारतातील गोष्ट. तुम्हाला माहीत आहे का ती? एकदा काय झाले, देव आणि राक्षस जमले. समुद्र घुसळायचा, असे ठरले. मग मंदराचल पर्वताची केली रवी. वासुकी सर्पाचा केला दोर. देव सापाला शेपटाकडून व राक्षस त्या सापाला डोक्याकडून आणि मग समुद्र घुसळायला झाला आरंभ. त्या समुद्रमंथनातून क्रमाने रत्ने निघू लागली. चंद्र, धन्वंतरी, सात तोंडांचा उच्चैःश्रवा नावाचा घोडा, अशी बारा रत्ने निघाली. ती देवाने घेतली. मग हलाहल निघाले; ते शंकराने प्राशन केले. मग अमृत. अशी ती सगळी कहाणी आहे... काकासाहेबांनी ती मला नीट घोळून रंगवून सांगितली. मी ऐकली... ते म्हणाले, “बाळ नरहरी, आता या गोष्टीचे तात्पर्य सांग बरे."
 मी म्हणालो, " तात्पर्य फार सोपे आहे. देव लबाड असतात, म्हणून त्यांचा फायदा होतो. तात्पर्य, राक्षसाप्रमाणे भोळे नसावे, नुकसान होते ; देवाप्रमाणे लबाड असावे. फायदा होतो."
 काकासाहेब जोशी भयंकर रागावले ! ते म्हणाले, " असे असते काय तात्पर्य ? मूर्ख नाही तर ! चल, ऊठ इथून !" मी म्हटले, "हे पहा जोशीसाहेब, मला मूर्ख म्हणण्याआधी तुम्ही दुसरे चांगले तात्पर्य सांगा. माझी चूक सांगा!" पण जोशीबुवांना रागच फार फार आला होता. ते म्हणाले, " असे पापी विचार मनात येणाऱ्या मुलाशी बोलायला मला वेळ नाही."
 माझ्या वडिलांना यातले काहीच माहीत नव्हते. काकासाहेब बोलले नाहीत. मीही बोललो नाही. माझे मामा नारायणराव नांदापूरकर हे काकासाहेबांचे विद्यार्थी. तेही मोठे धार्मिक होते. काकासाहेबांनी माझी तक्रार मामांच्याजवळ केली.
 दोन-तीन महिन्यांनी मी चौथी पास झालो आणि पाचवी शिकण्यासाठी मामांच्याकडे हैद्राबादला आलो. मामाही मोठे विद्वान. महाभारताचे अभ्यासू व प्रोफेसर होते. मी शिकायला हैद्राबादला आलो व चार-पाच दिवसांनी मामांनी मला समोर बसविले. ते म्हणाले, " नरहरी, मी तुला आता गोष्ट सांगतो. तू तात्पर्य सांग." मी म्हटले, "ठीक आहे." काकासाहेबांनी काय तक्रार केली, ते मामांचे गुरू, इत्यादी त्या वेळी मला माहीत नव्हते. मामांनी गोष्ट काळजीपूर्वक निवडली होती... काश्यप मुनी होते. त्यांना बायका दोन. एक होती सरळसाधी. तिचे नाव विनता. दुसरी होती आतल्या गाठीची व लबाड. तिचे नाव कद्रू. सर्प आणि गरुडाची ही कहाणी आहे. या कहाणीत लबाड कद्रूचा आरंभी विजय होतो; पण शेवटी गरूड आपल्या आईला गुलामगिरीतून सोडवतो आणि लबाड कद्रूचा पराभव होतो... अशी ही गोष्ट. मामांची अपेक्षा होती की, मी तात्पर्य सांगावे : लबाडीचा जय पचत नाही: सत्याचा शेवटी जय होतो. मी नेमके हेच टाळले. मी फक्त हसलो. मामा म्हणाले, " अरे, हसतोय काय ? तात्पर्य सांग की." मी मराठीतून महाभारत वाचलेले होते. मी म्हटले, “ अण्णामामा, (आम्ही नांदापूरकरांना अण्णामामा म्हणत असू.) ही गोष्ट कलियुगातली कीं त्या आधीची ?" ते म्हणाले, " अरे, ही गोष्ट फार जुनी, सत्ययुगातली." मी म्हटले, "मग तात्पर्य फार सोपे आहे. सत्ययुगातही माणसे आपल्याइतकीच लबाड होती, भांडखोर होती, हे तात्पर्य !!
 अण्णामामा म्हणाले, " चांडाळा ! तू नक्की नरकात जाणार ! काकासाहेबांना तू तात्पर्य सांगितलेस, तेव्हा मला शंका होती. म्हटले न जाणो खरेच याला असे तात्पर्य वाटले असेल. पण आता खात्री पटली. तात्पर्य वगैरे काही नाही. तू आहेस लबाड आणि खोडसाळ, तू बरोवर वाकड्यात शिरणार!"
 पण मग मामा म्हणायचे, "मी नरहरीबरोवर नरकात गेलो, तर मला वाईट वाटणार नाही." तेव्हापासून मामा मला आचार्य म्हणू लागले.
 मीही माझ्या मुलांना गोष्टी सांगतो. मग मीच तात्पर्य सांगतो, कधी मुलांना तात्पर्य विचारत नाही. तात्पर्य सांगण्याची वेळ आली की मला रागीट काकासाहेब जोशी आठवतात, माझे प्रेमळ मामा आठवतात, माझा लहानपणचा खोडसाळपणाही आठवतो. माझ्यासारखी खोडसाळ मुले मला फार दिसत नाहीत; ती फार हवीत, असे वाटते.