Jump to content

वाटचाल/माझी आई

विकिस्रोत कडून



माझी आई


माझ्या आईचे माहेरचे नाव वेणू. परभणी जिल्ह्यातील नांदापूर हे तिचे माहेर. नांदापूरकर देशपांडे हे मध्यमवर्गीय कुटुंब होते. खाणेपिणे, दूधदुभते पुरेसे. हाती पैसा मात्र नाही. अशा घरात तिचा जन्म झाला. तिला वडील, दोन भाऊ व दोन वहिणी. धाकटा एक भाऊ व एक बहीण. इतर नातेवाईकांचा परिवारही मोठा. माझे आजोबा परभणीला कारकून होते.
आईच्या लग्नाआधी तिच्या दोन्ही बहीणभावांची लग्ने झालेली होती. विशेषतः आईच्या मोठया दोन्ही बहिणींची लग्ने त्या वेळच्या समजुतीनुसार अयशस्वी झालेली होती. एक लग्नानंतर दोन-तीन वर्षांत विधवा झाली, दीड वर्ष वैधव्य भोगून वारली; दुसरी लग्नानंतर पाच-सहा वर्षांत प्रथम

प्रसूतीच्या वेळी वारली. यामुळे आजीचे मन थोडेसे बावरलेले होते. या वेणूचे भवितव्य काय, अशी चिंता होती. म्हणून त्या काळच्या मानाने तिचे लग्न थोडेसे उशिराच झाले, असे मानावयास हरकत नाही.
माझ्या आईचा जन्म इ. स. १९१५ च्या आसपास एखादे वर्ष मागेपुढे. तिचे नाव वेणू का ठेवले ते समजत नाही. डोळ्यांसमोर संत वेणाबाई नसावी. कृष्णाची बासरी समोर असावी. माझे मोठे मामा डॉ. नारायणराव नांदापूरकर अनेकदा मला हे नाव कसे काव्यमय आहे हे सांगत. त्या काळच्या पद्धती नुसार दहाव्या-अकराव्या वर्षी लग्ने होत. माझ्या आईचे लग्न झाले तेव्हा तिला १४ वे वर्ष लागले होते. हे लग्न कुठेतरी १९२८ साली झाले. माझे वडील परभणी जिल्ह्यातील कुरुंदा या गावचे कुलकर्णी. फक्त उपनावापुरते कुलकर्णी होत. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांपैकीच होते. वीजवरही होते. माझी आई ही त्यांची दुसरी पत्नी.
 वडील वकिलीची परीक्षा पास झालेले होते. नांदेडला साहाय्यक वकील म्हणून काम करीत होते. त्यांची प्रथम पत्नी वारली तेव्हा ते २१ वर्षांचे होते. माझ्या मामांच्या सांगण्याप्रमाणे मुलगा अगदी तरुण. घर खातेपिते. मागे पाश नाही. त्यांच्या भाषेतच सांगायचे तर 'पहिल्या लग्नाजोगा कोवळा पोरगा. फक्त आधीच्या लग्नाचा डाग होता.' हा मुलगा पूर्णा स्टेशनवर रात्रीच्या अंधारात मामांनी ओझरता पाहिला आणि बहीण याला देण्याचा निश्चय केला.
 मुलाने अगर मुलाच्या आईवडिलांनी मुलगी पाहिलीच नव्हती. " त्यात पाहण्याजोगे काय आहे ? मुलीसारखी मुलगी. व्यंग कोणतेही नाही. दहाजणींसारखी आहे." असे मध्यस्थाचे म्हणणे. ते मुलाच्या वडिलांना मान्य होते. मुलीने, तिच्या आई-वडिलांनी मुलगा पाहिला नव्हता. मामांनी ओझरता पाहिला होता. मध्यस्थ उभय बाजूचे नातेवाईकच होते. ते म्हणाले, “ स्थळ गमावू नका. मुलगा चांगला आहे." आणि लग्न ठरले.
 आई या लग्नाची हकीकत सांगते ती अशी : लग्न म्हणजे काय हे तिला फारसे कळत नाही. ताशे-वाजंत्री, नवे कपडे, गोड खाणे आणि सर्व घरभर उत्साह, गडवड इतकेच तिला कळले. ती ह्या सर्व धावपळ-उत्साहात सहभागी झाली. लग्नापूर्वी दोन-तीन दिवस घरचे सर्व वातावरण एकाएकी उदास व विषण्ण झाले. बातमी अशी आली की, नवरा मुलगा चांगला ४० वर्षांचा असून त्याला कोड फुटलेले आहे. पोरीचे नशीब फुटले म्हणून आजी दोन दिवस रडत होती. लग्नाची तयारी आणि डोळे पुसणे असा तिचा कार्यक्रम चालू होता. मोठे मामा सांगत, " सगळेजण मला विचारू लागले. मी तरी काय सांगणार ? अंगात कपडे होते. डोक्यावर टोपी उपरणे होते. रात्र होती. उजेड मंद होता. मला नक्की वय काय कळणार ! मी दुरून मुलगा पाहिला होता. मी म्हटले, थांबा. दोन दिवसांनी वऱ्हाड येईल, मग कळेलच." पण कुणी खात्री करण्यासाठी कुरुंद्यास गेले नाही. फुकट २-३ रुपयांचा खर्च कोण करणार? एकदा ठरलेले लग्न मोडता थोडेच येते ? ते घराण्याच्या प्रतिष्ठेला कसे शोभणार ? आणि देवाने ठरविलेले नशीव कसे बदलणार? बरे झाले तर आनंद मानावा. देवाची दया समजावी. वाईट झाले तर रडावे. आपले नशीब फुटके आहे, असे समजावे. यापेक्षा माणसाच्या हाती काय आहे ! या मुद्दयावर आजोबा, आजी, मोठे मामा, यांचे एकमतच होते. मग निष्कारण खर्च कोण करणार ! आई आज सांगत नाही, पण तीसुद्धा दोन दिवस अतिशय सचिंत, घाबरलेली व दुःखी असणार, असे मला वाटते.  लग्नाच्या आदल्या दिवशीच वऱ्हाड आले आणि मग सर्वांनाच हे कळले की, बातमी काही खरी नाही. मुलगा अगदीच तरुण आहे. कोड वगैरे काही नाही. आता मुलगा काळा आहे हे खरे, पण काळेपणा हा काही मुलाच्या बाबतीत दोष थोडाच आहे ? " मुलगा मोठा तेजदार आहे. थोडा सावळा रंग गडद आहे, पण त्यात वाईट काय ? ती सगळी देवाची करणी. माणसाचा दोष असला तर माणसाला बोल लावावा." असे आजीचे म्हणणे. माझ्या आईला आपला नवरा काळा आहे असे वाटतच नाही. ती सावळा म्हणते. आणि मला तर माझी आई चक्क निमगोरा मानते. माया ही नेहमी अशी थोडी अंधच असते.
 आई सांगते, तिने नवरा अंतरपाट दूर करून गळयात माळ घालण्यापूर्वी आदल्या दिवशीच माडीवरून चोरून पाहिला होता. " अरे, बापा नरहरी, आमच्या वेळी प्रेम कुठे होते आणि आम्हाला कळत तरी काय होते ? भातुकली खेळण्याचे वय. तेव्हा मी प्रेम कसे करणार? ते तुमच्या वेळी आले. आता तुम्ही प्रेम करा. आम्हांला आनंद आहे. आम्ही आपला हौसेने संसार केला आणि देवाच्या दयेने काही कमी पडले नाही." आपल्या नवऱ्यावर आपले प्रेम आहे किंवा नवऱ्याचे आपल्यावर प्रेम आहे ही कल्पना तिला आवडत नाही. प्रेम हा शब्दच तिला आवडत नाही. " ब्रह्मदेवाने स्वर्गात सातजन्माच्या गाठी बांधल्या, त्याप्रमाणे नवरा वाट्याला आला. माझे नशीब चांगले, नवरा चांगला निघाला. म्हातारपणापर्यंत सुखाचा संसार झाला. आता प्रेम आहे काय आणि नाही काय, सगळ्याच बाबी फालतूपणाच्या." अशी आईची अस्सल सनातनी भूमिका आहे. प्रेम शब्दाच्या मानाने माया शब्द तिला आवडतो." पण तुझी तुझ्या नवऱ्यावर माया आहे का?" हा प्रश्न तिला आवडत नाही. हा प्रश्न कुणी विचारणे म्हणजे आपला अपमान करणे, असे तिला वाटते. काय हा आचरट प्रश्न ? माया आहे म्हणजे काय ? नवरा म्हटल्यावर माया असतेच. जन्मोजन्मीचा नवरा. तो काही एका जन्मापुरता नाही. मागोमाग हाच नवरा म्हटल्यावर माया कशी असणार नाही ?"
 एकूण आईच्या मते हा सात जन्मांचा हिशेब आहे. यांपैकी किती जन्म मागे झाले याबाबत तिचा थोडासा गोंधळ, घोटाळा आहे. माझे वडील वेदान्ताचे अभ्यासक. त्यांची चारित्र्याबद्दल ख्याती. गाववाले त्यांना पुण्यवान व अर्धा साधूच मानतात. तेव्हा या जन्मी वडिलांना मोक्ष-जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटका. आणि वडिलांना मोक्ष म्हणजे आपल्यालाही निश्चित मोक्ष. तेव्हा हा जन्म सातवा, असे तिला वाटत असते. पण खात्री नाही. कदाचित हा जन्म सहावा असेल व अजून एक जन्म घ्यावा लागेल. खात्रीलायक बाबी फक्त दोन आहेत. एक म्हणजे मागचे जन्म असोत वा पुढचे, जन्मोजन्मी नवरा हाच आहे. दुसरी म्हणजे, बाबांना मोक्ष मिळाला की, तिला आपोआप मिळणार आहे. आणि पुढच्या जन्माबद्दल तिची तक्रार नाही. फक्त एक प्रश्न तिच्या भावना दुखावू नयेत म्हणून मी तिला कधी विचारला नाही, विचारणारही नाही. तो म्हणजे, सात जन्म ती दुसरी पत्नीच असणार काय? आई ही बाबांची दुसरी पत्नी. आपल्या मृत सवतीविषयी तिच्या मनात खूपशी आपुलकी आणि थोडीशी धास्ती आहे. या सवतीची आशा संसारात असणारच. ते स्वाभाविक आहे. वर्षाला अविधवानवमीला तिला पाचारण केलेच पाहिजे. सर्व लग्नकार्य व शुभप्रसंगी तिची आठवण ठेवलीच पाहिजे. तिच्या नावे प्रथेनुसार खण, लुगडे चालूच असते. आईचे मत असे की, तिची सवत मानी व हट्टी आहे. तिला थोडे जरी विसरले तरी ती त्रास देते. म्हणून तिला विसरू नये. तशी ती फार समजूतदार व शहाणी आहे. न विसरता लग्नकार्यात लुगडे, एरवी खण, इतकीच तर तिची मागणी असते. आई म्हणते, " तुम्ही लग्नात हजारो रुपये खचिता, मला शंभराचे लुगडे घेता, मग तिला विसरून कसे चालेल ? तिला वीस-पंचविसाचे तरी लुगडे घेतले पाहिजे." आपली मृत सवत अधाशी, हपापलेली नसून समजूतदार आहे, असे आईचे मत. तीही आपल्या मुलाचे कल्याण इच्छिणारीच आहे, मत्सरी नाही. आता माणूस एखाद्या वेळी चुकतो, तशी सवतही चुकते. मग आई तिला वाकडेतिकडे बोलते. मग ही सवत पुन्हा चूक करीत नाही. आईसुद्धा तिच्या ह्या चुकीकडे क्षमेच्या नजरेने पाहते.
 माझी बहीण प्रसूत झाली तिथे सवतीने खण मागावा काय ? लेकीच्या बाळंतपणात कुठे आईने खण मागावा ? पण या सवतीने मागितला. आईने खण दिला. पण ही रीत नाही, हे वागणे चुकले, हे बजावून सांगितले. बहुतेक हे तिच्या सवतीला पटलेले दिसते. कारण ती पुन्हा चुकली नाही. आता ही सुमारे ५२ वर्षांपूर्वी, वयाच्या १६ व्या वर्षी मेलेली आमची सावत्र आई. पण तिचे अस्तित्व माझ्या आईच्या लेखी अजून चालू आहे. सवतीच्या नावे ब्राह्मण सुवासिनीला साडी, खण, रुपया, नारळ हे तर चालतेच, पण लग्नकार्यांत आई बांगड्या भरण्यापूर्वी सवतीला बांगड्या भरते. त्या सवतीच्या इच्छा आईला कशा कळतात व आईचे रागावणे तिला कसे कळते, हा मला अगम्य विषय आहे. पण पन्नास वर्षे हे अखंड चालू आहे. ह्या सवतीची आठवण तिला अखंड असते. छायारूपाने वावरणारी, माझ्या जन्मापूर्वी ४ वर्षे मृत झालेली ही आमची सावत्र आई, अर्धा जन्म सख्ख्या आईसह माझी सोबत करीत आली आहे.
 माझी आई नाकी-डोळी सरळ, अंगाने थोडी शेलाटी व मध्यम उंचीची आहे. चाळिशीच्या नंतर थोडेसे मांस तिच्या अंगावर आले, पण लठ्ठ अगर स्थूल ती कधीच नव्हती. आता होणारही नाही. तिचा रंग गोरेपणाकडे झुकलेला. तिची सर्व बहीणभावंडे गोरी. मोठे मामा तर गोरेपान व देखणे होते.
 नांदापूरकर मंडळीत ती सावळी. आम्ही कुरुंदकर मंडळी गडद सावळी. आमच्याकडच्या मानाने आई गोरीच म्हणायला पाहिजे. तशी रंग-रूपाने ती बऱ्यापैकी. अगदी हजारजणींत देखणी नसली तरी दहाजणींत उठून दिसणारी. पण आपण रूपाने सुंदर आहो, बरे आहो, सामान्य आहो, असा स्वतःच्या रूपाविषयी तिने कधीही कोणता उल्लेख केलेला मला आठवत नाही. आपल्या रूपाचा अभिमानही तिच्यात मला दिसला नाही. अगर आपण फारशा रूपवान नाही, ही खंतही तिला वाटली नाही.
 आई ही नेहमी कामाची म्हणून प्रसिद्ध असे. अतिशय कामसू म्हणून सर्वजण तिला वाखाणीत. या कामसूपणाबरोबर असणारा तिचा न संपणारा उत्साह आणि उल्हास मात्र कुणाच्या ध्यानी येत नसे. खूप मोठा होईतो माझ्याही कधी ध्यानी आला नाही. माझ्या लहानपणापासून भांडी घासणे व घर सारवणे यासाठी घरी मजुरीण असे. पण आंगण, ओसरी झाडणे, सडा टाकणे, ही कामे तीच करी. दोन्ही वेळचा स्वयंपाक असेच. त्या काळी नळ नव्हते, त्यामुळे २५-३० घागरी पाणी शेंदणे असेच. नेहमी लहान मूल असेच. त्याचेही सगळे तीच करी. रात्री अंथरुणे टाकणे तीच करी. सकाळी पाचपासून रात्री दहापर्यंत हे काम सतत चालू. आणि शिवाय देवपूजेची भांडी, पिण्याच्या पाण्याचा वंब, घागर तीच घासत असे. सणावारी सोवळ्याचा स्वयंपाक असे. विटाळशीपणी ज्वारी निवडणे, डाळी सडणे, तांदूळ सडणे, हे उद्योग असायचे. धुणे तीच धूत असे. बाळंतपणीसुद्धा स्वेटर विणणे, पडदे विणणे असे विणकाम, भरतकाम चालायचे. खरे म्हणजे, इतके शरीरकष्टाचे तिला कारण नसे. घरी शिकण्यासाठी मुले असत. त्यांनी मुले सांभाळली असती, पाणी भरले असते, अंथरुणे टाकली असती. भांडयासह धुणे मजुरणीकडे देता आले असते. पण तिला कामाचा उरकही खूप, हौसही खूप. इतके काम केल्यानंतर सुद्धा अनेक लोणची, चटण्या यांना वेळ असे. शेजारच्या बायकांकडे गप्पा मारण्यास वेळ असे. कामामुळे ती वैतागली आहे असे कधी घडायचे नाही. आणि मूल दुसऱ्याच्या अंगावरचे होणे तिला पटायचे नाही. दिवाळीत तर आम्हांला तेल लावून स्नान घालणे व मध्येच फटाके उडविणे असे दुहेरी काम तिचे चाले. श्रम करण्याची तिची अफाट शक्ती व हौस याचे नेहमीच मला आश्चर्य वाटत आले आहे. अलीकडे नवरा मूल सांभाळतो व पत्नी स्वयंपाक करते हे जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला गंमत वाटते. नवऱ्याने घरकाम करावे याला माझी हरकत नाही. उलट पत्नीला मदत केलीच पाहिजे, असे मला वाटते. पूर्वीही सगळ्याच स्त्रिया माझ्या आई इतक्या कामाच्या व हौशी नसणार. आमच्याकडेही पुरुषमाणसे काम करीत. कामाची लाज त्या काळच्या मध्यमवर्गात नसे. पण मूल लहान आहे म्हणून कुणीतरी ते सांभाळल्याशिवाय कसा स्वयंपाक करणार ? हा रडकेपणा आमच्या घरी आईच्या वेळीही नव्हता. माझ्या पिढीतही नव्हता. माझ्या आईचा जेव्हा मी मानसशास्त्रदृष्टया विचार करतो तेव्हा मला असे वाटते की, स्वत:लाही नकळत कोणत्यातरी उल्हास-उत्साहाने ती झपाटलेली असावी. दोन्ही वडील बहिणी संसारात विफलच ठरलेल्या होत्या. आपणास संसार करण्याचे हे भाग्य मिळाले, हा आनंद मनसोक्त भोगावा, असे काहीतरी तिला वाटत असणार. तिच्या व्यक्तित्वाची संगती 'कष्टाळू' या कल्पनेत नीट सामावत नाही. कारण कष्टाची इतकी गरज नव्हती. हौस, उत्साह यांचा कुठेतरी उलगडा करता यायला हवा. आजच्या तरुण पिढीविषयी आई म्हणते, " या पोरी तरुणपणीच म्हाताऱ्या झालेल्या दिसतात. आम्ही कशा विंचवासारख्या तरतर पळत होतो." तिच्यापुरते हे म्हणणे खरे आहे. सगळ्या पिढीविषयी मात्र मला शंका आहे.
 खरे म्हणजे, आईच्या वाट्याला कमी दुःख आलेले नाही. तिला एकूण अकरा अपत्ये झाली. सहा मुले, पाच मुली. यांपैकी आम्ही तिघे, म्हणजे मी, एक भाऊ व बहीण तेवढी हयात आहोत. आठ अपत्यांचा मृत्यू तिने बघितला आहे. यांतील एकजण तर तीन-चार वर्षांचा होऊन वारला. अपत्यांचे लागोपाठ मृत्यू होत गेले. माझ्या आधी एक मुलगी झाली ती जन्मतः वारली. वडील दोन बहिणींचे मरण तिने पाहिले होतेच. पण हा अपत्यमृत्यू तिला अधिक जाणवला असणार. मी दुसरा. माझ्या पाठोपाठ चार अपत्ये क्रमाने गेली. बहीण आहे ती अनेक नवसांची व अनेक व्रतांची. ती व्रते आई जन्मभर पाळणार. त्याबद्दल तिची तक्रार नाही. शेवटची तीनही अपत्ये वारली. एवढ्या मोठया दुःखाची चव तिने पचविली. मूल आजारी असताना अमाप खस्ता ती खात असेलच. मूल वारल्यावर दोन-चार दिवस शोकाचे जात. पण मृताच्या चिंतनात ती कधी गढली नाही. देवाने जी अपत्ये वाचविली त्यात ती तृप्त आहे. अपत्यमत्यखेरीज इतरही दुःखे असतातच. ती अपरिहार्य असतात. माझे आजोबा, आजी, दोन मामा, माम्या, माझा मावसा, असेही मरणाचे चक्र आहे. पण कोणत्याही दुःखाने ती खचली आहे, कोमेजून गेली आहे, असे कधी घडले नाही. कष्ट करण्याची अफाट शक्ती तशी दुःख पचविण्याचीही अफाट शक्ती तिच्यात देवाने तिला दिली आहे. आमच्या घरात दुःख उगाळण्याची सवय कुणालाच नाही.
 तिच्या अभिमानाचा मुख्य स्रोत म्हणजे आमचे बाबा. जुन्या काळी स्त्रीच्या सर्व सुख, आनंदाचे निधान तिचा पती असे. आईचेही तसेच आहे. पती सदोष असला तरी बायका त्याचा अभिमान ठेवतात. इथे तर पती गुणवान होता. नवरा चारित्र्यसंपन्न, कर्ता व निर्व्यसनी आहे; त्याच्या आधारे आपण निर्धास्त आहोत: आपल्याला काही कमी नाही; तो आपल्या मोह प्रेमात आहे ; आपण त्याला आवडतो; ही मुख्य जाणीव, आणि मुलगा आहे, मुलगी आहे, ही दुसरी जाणीव. या दोन सुखांत ती अशी पोहत राहिली की सर्व दुःखे तिने पचवून टाकली. माझी आई कष्टाळू म्हणून जशी प्रसिद्ध, तशीच रागीट व भांडखोर म्हणूनही प्रसिद्ध आहे. आईचे सासरचे नाव गंगा. " गंगाबाई म्हणजे आग रे, बाबा." असे म्हणताना मी अनेकांना ऐकले आहे. आमच्या बाबांशी ती कमी भांडली नाही. बाबांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे 'इंजिन सुरू होते.' तोंडाचा पट्टा आणि कामाचा झपाटा एकसाथ चालू होता.
 पण या भांडकुदळपणाबाबत मला दोन-तीन आश्चर्ये आढळली. प्रथम म्हणजे ती गल्लीत अतिशय लोकप्रिय आहे. दोन वेळा तर खूप मते घेऊन ती नगरपालिकेत निवडूनसुद्धा आली. गल्लीतील स्त्रिया तिला चाहतात, मानतात. ती काही शिकलेली नाही. राजकारणात तिला काही कळत नाही. पण बाबा राजकीय नेते होते. ही नगरपालिकेत गेली. इतकी भांडखोर बाई इतकी लोकप्रिय कशी, हा आश्चर्याचा भाग आहे. मी तिला भांडताना पाहिले आहे. पण भांडण बाहेरच्याशी फार कमी; म्हणजे पाचसहा वर्षातून एखादे वेळी व्हायचे. घरी मात्र अधून मधून ती बाबांशी सतत भांडे. या भांडणांचा बाबांना कधी राग आलेला नाही. ते म्हणत, " तिच्या भांडणाला कारणे दोन. एकतर तिला अन्याय सहन होत नाही. दुसरे म्हणजे प्रेम. आणि प्रेम मुले, नवरा यांविषयी. बरे तिची बाजू बरोबर असते. मग ती भांडणार." म्हणजे ज्यांच्याशी तिला भांडताना आम्ही नेहमी पाहिले ते गृहस्थ तिचे तरफदार !
 मला लग्नानंतर एक लहानशी चिंता होती. माझी पत्नीही स्वभावाने रागीट. आईही रागीट. या दोघींचे जमणार कसे ? पण तेही एक आश्चर्य आहे. सासू-सुना गेल्या पंचवीस वर्षांत कधीही भांडल्या नाहीत. तरीही माझ्या आईची प्रसिद्धी भांडखोर म्हणून आहे. आई म्हणते, "अरे, कोण कोणाशी उगीच भांडतो? मी जर भांडखोर असते तर इतकी माणसे कशी जोडली असती? कानफाटया नाव पडले म्हणजे पडले." कधी कधी ती म्हणते, " कोण रे, तो मला भांडखोर म्हणणारा ? आण बरे माझ्यासमोर. आत्ता त्याची खोड मोडते." आणि मग ती खळखळून हसते. माझ्या आईचे हसणे मोठे प्रसन्न, मनमोकळे आहे. तिला विनोदही चांगला कळतो. मला तिचे हसणे फार आवडते. सर्व दुःखे पचवून आपली प्रसन्नता टिकविणाऱ्या एका कर्तबगार माणसाचे ते हसणे आहे.
 आईच्या काही कल्पना मोठ्या मजेदार आहेत. म्हणूनच मी तिच्या प्रेमळपणाविषयी बोलत नाही. सगळया स्त्रिया प्रसूत होतात. त्यांना मुले होतातच. मुलांना सर्वजणीच पाजतात, जेवू घालतात. सर्वच स्त्रियांना मुलांची दुखणी निस्तरावी लागतात. यांत प्रेम प्रेम ते काय असते ? सगळ्याजणी करतात तेच मी केले, तर त्यात मुद्दाम सांगावे असे तरी काय ? आणि कौतुक करावे असे तरी काय ? आई प्रेमळ आहे या कल्पनेचे तिला कौतुक वाटत नाही. आईने प्रेम करावे, मुलाचे हजार अपराध पोटात घालून क्षमा करावी, त्याच्या सर्व दोषांवर पांघरूण घालावे या बाबी, माझ्या आईला वारा वाहतो, अग्नी पोळतो, माणसाला भूक लागत यासारख्या स्वाभाविक वाटतात. आपल्या मुलांवर आपण प्रेम करतो हा मुद्दा तिच्या बोलण्यावागण्यात येत नाही. प्रेम ह्या शब्दापेक्षा कर्तव्य हा शब्द तिला परवडतो. प्रेस हास्यास्पद वाटते. मुलगा शिकण्यासाठी परगावी पाठवत नाही असे म्हणणारी आई, मुलाच्या अकल्याणाचे काही त्याच्या हट्टाखातर करणारी, मुक्या हट्टाला बळी पडणारी आई, या सर्व स्त्रिया प्रेमळ आहेत असे न मानता लेकराच्या दुश्मन आहेत, असे तिला वाटते.
 मी वयाच्या नवव्या वर्षापासून मामांच्याकडे वाढलो. मी सुट्टीत घरी आलो की तिचा उत्साह उचंबळून येई. माझ्याभोवती मित्रांचे कोंडाळे असायचे. या मित्रांचेही फराळपाणी, जेवणखाण ती करायची. पण पुन्हा शिकण्यासाठी मी निघालो की ती हसतमुखाने निरोप देई. रात्रंदिवस माझ्या आठवणीने ती बेचैन असणार. तिची अनेक मुले वारली तेव्हा सर्व मायेचा आधार मीच होतो. पण ते कधी ती दाखविणार नाही. तिचे डोळे पुसणे, पाणी गाळणे आमच्या नजरेमाघारी असे. तशी ती फार हळवी आहे. आपली मुलगी सासरी पाठविताना तर सोडाच, पण गल्लीतील मुलगी सासरी निघाली तरी तिचे डोळे पाणवतात. पण ते सारे थोडक्यात आवरणार. कधी कधी अनपेक्षितपणे एखादे वाक्य ती बोलते, तेव्हा सगळा हळवेपणा उघड होतो. मध्येच ती म्हणते, " अरे, तीन लेकरांचे काय ? सर्वांना पोटभर होईल इतकी माया माझ्याजवळ होती." कधी मध्येच ती म्हणते. " खूप सोसले बाळा, आता लेकरांनी गवताची काडी मोडू नये असे वाटते." पण असे प्रसंग फार विरळ. सामान्यपणे ती प्रसन्न असते.
 आईचे म्हणणे असे की, स्त्रिया करावी म्हणून मुलांच्यावर माया करीत नाहीत, तर त्यांना माया केल्याविना राहवतच नाही. आपल्याला राहवत नाही. आपण माया करतो. मुले मोठी होतात. माया पुढे धावते. पाणी खोलगटपणाकडेच धावणार. मुले आपल्या मुलावरच प्रेम करणार. माय-बापाविषयी थोडी लोकलाज, थोडी कृतज्ञता, थोडे कर्तव्य. पण प्रेम अपेक्षू नये. न मिळाल्याची कुरकुर करू नये.
 तिची काही व्यावहारिक गणिते आहेत. तुझे नवऱ्यावर प्रेम आहे का? नवऱ्याचे तुझ्यावर प्रेम आहे का? असे फालतू प्रश्न ती कुणा स्त्रीला विचारणार नाही. ती विचारते, घरच्या किल्ल्या तुजजवळ आहेत ना? खाण्यापिण्याबद्दल तर काही तक्रार नाही ? नवरा कपडेलत्ते नीट घेतो ना? नवरा मागितलेले पैसे देतो ना ? रोज झोपायला घरी येतो ना? नवरा जर इतके करीत असेल तर मग सारे काही ठीक आहे, असे ती मानते. नवरा भांडतो, नवरा बोलत नाही, नवरा उशिरा घरी येतो या तिच्या मते फालतू गोष्टी आहेत. नवशिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या आधुनिकाला तिचे हे अडाणीपण फार खटकत असे. आता मीही प्रौढ झालो आहे. आइच्या प्रश्नांत तथ्य आहे, असे मला वाटू लागले आहे. मध्यमवर्गीय संसारात व्यसन असो वा बाहेरख्यालीपणा असो, तो खर्च परवडत नाही. मग घरच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होते आणि घरची सारी कर्तव्ये नीट सांभाळणारांना बाहेरचे नाद परवडत नाहीत. नवरा दोन्ही वेळ कुरकुर न करता नीट पोटभर जेवत असेल व बिनचूक घरी झोपत असेल तर संसार सुरळीत आहे, असे आता मलाही दिसू लागले आहे. आईची व्यावहारिक गणिते, परंपरेने आलेले व अनुभवाने पारखलेले ज्ञान सांगतात. आमची सगळी मते व ती मांडण्याच्या पद्धती अतिशय पुस्तकी आहेत.
 माझी आई पक्की आस्तिक, धर्मश्रद्ध आणि सनातनी. सगळ्या भाकडकथांवर तिचा पक्का आणि प्रामाणिक विश्वास आहे. तो आता बदलणार नाही. नारळात पाणी देव घालतो असे तिचे पक्के मत आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ तिची समजूत घालू शकत नाही. पण इतकी धर्मश्रद्धा असूनही ती कर्मठ नाही. व्यापक समंजसपणा तिच्यात उपजत आहे. आम्ही मुले लहान होतो. तिच्या सोवळ्याच्या स्वयंपाकातच आम्ही वावरत असू. नागड्या मुलाला विटाळ नाही, असे तिचे म्हणणे असे. पुढे आम्ही मोठे झालो, आणि नैवेद्यापूर्वीच खाण्यास मागू लागलो. ती नैवेद्य वाढून ठेवी आणि आम्हास वाढी. लेकराचे हट्ट माणसाला कळतात, मग देवाला का कळणार नाहीत, असे तिचे म्हणणे असे. नंतर आम्ही तरुण झालो. सोवळेओवळे पाळीनासे झालो. तिचे म्हणणे असे की, पटणाऱ्याने पाळावे, न पटणाऱ्याने पाळू नये. सर्व व्रते, कुलाचार यांतून आम्हाला हवी ती सूट मिळते. तिचे सनातनत्व बदलत नाही. आम्हांला त्याचा त्रासही नसतो. उलट तिची मर्जी सांभाळण्यासाठी आम्ही थोडेसे तिच्या कलाने वागलो तरी ते कौतुकाला पुरते. हा नाइलाज नाही. अगतिकता नाही. कारण अजून ती स्वामिनी आहे. मानी व रागीट तर आहेच. हा समंजसपणा आहे.
 मी प्रेमविवाह केला. मुलगी वेगळया पोटशाखेची. मुलगी अगदी गरीब घरची. तेव्हा लग्न मुलाच्या बापाने घरचे पैसे खर्च करून केले. आई सर्व लग्नात उत्साहाने हौसेने वावरत होती. मुलाचे सुख म्हणजे आपले सुख. त्याने आपली बायको निवडली तर निवडली. सुखाने नांदा म्हणजे झाले. माझ्या लग्नाच्या वेळी मी बेकार व फक्त मॅट्रिक होतो. लग्नानंतर क्रमाने पदवीधरही झालो. पगारदार प्राचार्यही झालो. आईला त्याचे कौतुक आहेच. पण ते सांगण्याची पद्धत अशी की, माझी सून मोठी भाग्याची. सगळा पायगुण तिचा आहे. माझ्या पत्नीप्रमाणेच आईचेही मत असे आहे की, सून व्यवहारी, चतुर, शहाणी म्हणून संसार चालतो. " नाहीतर हा. ह्याला व्यवहार काही कळत नाही. नेसूचे फेडून दान करायचे व उघड्या मांड्यांचा अभिमान धरायचा." यांपैकी तिची खरी मते किती, सुनेला बरे वाटावे म्हणून सांगितलेली किती आणि कौतुकाची मान्य शैली किती, हे कळणे सोपे नाही.
 आईच्या समंजसपणाचे खरे नवल ती अध:पतितांना सावरण्याची धडपड करते तेव्हा दिसते. आमच्या घरी एक स्वयंपाकीण होती. तारुण्यात विधवा झालेली. अनेकदा वाकडे पाऊल पडलेली. अनाचाराची चटक लागलेली. अशी ही विधवा. आपल्या घरी अशी स्वयंपाकीण ठेवायची म्हणजे पदरात निखाराच बांधून घ्यायचा की! पण आईने तिला ठेवून घेतले. वर्षानुवर्ष ठेवले. ती म्हणायची, " अरे, खरा गुन्हा वयस्काला तरणी पोर देणारांनी केला. भोग घेऊन पळणारे लबाड सगळे पुरुष, ते साव म्हणून सुटले. आणि भोळी फसत राहिली. हिला नाही आधार दिला तर वाहवत जाईल." नाव कौसल्या पण वाण गणिकेचा असणारी ही स्त्री वर्षानुवर्षे आमच्या घरी राहिली. आईने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. माणूस चुकत असतो तो सावरून वळणावर आणावा हे पुण्य आहे; त्याचे पाप चवीने चघळत बसावे व त्याला सावरणे अशक्य करावे हे बरोबर नाही; याचे तिला उपजत ज्ञान आहे.
 संकटाच्या वेळी तिचे धैर्य उफाळून येते. घरी कुणी आजारी पडले तर अनेक नवससायास करणारी माझी आई हैद्राबाद मुक्ती आंदोलनात बाबा जेलमध्ये गेले तेव्हा धैर्याने उभी राहिली. परवा आणीबाणीत माझा धाकटा भाऊ अठरा महिने तुरुंगात होता. पण तिने नवरा सुटावा म्हणून अगर मुलगा सुटावा म्हणून कधी देवाला नवस केला नाही- तेव्हाही आणि आताही. सन्मानाला तडा जाऊन सुटणे तिला मान्य नाही. क्षमा मागून सुटण्यापेक्षा तिने मुलगा कायम तुरुंगात राहणे मान्य केले असते. अशा वेळी ती एकदम ताठ असते.
 ही अशी माझी आई. मी तिला सनातनी आणि उदार, रागीट आणि समंजस, हळवी आणि कठोर असे म्हणतो आहे यात विसंवाद नाही का? असेल. पण माझी आई आहे ती अशी आहे. आणि यातच सारे सौंदर्य आहे. तिचा धाक आणि जिव्हाळा मला एकत्रपणे नेहमी जाणवतो, यात तरी विसंवाद नाही असे कुणी म्हणावे ?