Jump to content

वाटचाल/प्रभावती कुरुंदकर

विकिस्रोत कडून

प्रभावती कुरुंदकर



स्वत:च्या पत्नीवर ती हयात असताना लिहिणे अतिशय कठीण आहे. हे लिखाण ती वाचणारच हे माहीत असताना लिहिणे तर अधिकच कठीण आहे. शॉ ने एके ठिकाणी असे मत दिले आहे की, पत्नी हयात असताना खरे बोलणे शक्य नाही. आणि खोटे बोलण्याची इच्छा नाही, म्हणून मी पत्नीवर लिहीत नाही. सत्याचा एक अंश हा आहे. पुरुषजातीची ही शुद्ध लबाडी आहे. कारण बायकोमाघारी काहीही लिहिले तर खोटे काय हे सांगण्यास ती बिचारी नसते. वाटेल ते लिहिण्यास पुरुष मोकळा, असे सौ. प्रभावतीवाई कुरुंदकर यांचे मत आहे. सत्याचा अजून एक अंश हा आहे. 'ललित'च्या संपादकांचे पत्र जेव्हा मी बाईसाहेबांना दाखवले तेव्हा

त्यांची आद्य प्रतिक्रिया अशी, "नाही म्हणून सांगा. आता पोरे मोठे झाली. जावई आले. आपलेच प्रेम चघळीत जगासमोर ठेवण्याची वेळ आहे का हीं ? संपादकाला पोच नसतो. तुम्ही थोडे शुद्धीवर रहा." सत्याचा एक अंश हाही आहे. तरीही मी तिला चोरून महाविद्यालयात बसून हे लिहीत आहे. तेव्हा सांगेन ते खरे सांगेन, खोटे सांगणार नाही, पण सगळेच सांगणार नाही, हे सूत्र समोर ठेवतो.
सौ. प्रभावतीबाई कुरुंदकर यांना आमच्याकडे मी सोडून सर्वजण प्रभा म्हणतात. मी फक्त 'अग' म्हणतो. या पोरीची माझी पहिली भेट तिच्या राहत्या घरी खिडकीत उभी असताना झाली. माझे शिक्षण मामांच्याकडे हैद्राबाद येथे झाले. डॉ. नारायणराव नांदापूरकर हे मराठवाड्यातील विद्वान प्रस्थ होते. ते माझे मामा. त्यांचे जिवलग मित्र रामचंद्रराव दुसंगे हे मॅट्रिक ट्रेंड शिक्षक. त्यामुळे दोन्ही घरची सर्व मंडळी सतत एकमेकांकडे जात-येत असत. प्रभा ही दुसंगे यांची क्रमांक दोनची मुलगी. माझ्या आईच्या आठवणीप्रमाणे मी पाच-सहा वर्षांचा असताना आई भावाकडे माहेरवासासाठी आली होती. त्या वेळी प्रभाला तिने कडेवर घेऊन खेळवले होते. त्या वेळी ती दीड दोन वर्षांची होती. सासू-सुनेची भेट अशी जुनी आहे. मी वयाच्या नवव्या वर्षापासून मामांच्याकडे होतो. दुसंगे यांच्या घरी अनेकदा जात-येत असे. पण मला या खिडकीतील भेटीपूर्वी तिला कधी पाहिल्याचे आठवत नाही. पहिली ठळक आणि पुसली न जाणारी भेट जांवाच्या वाड्यातील खिडकीमधली. आश्चर्य हे की तिलाही यापूर्वी कधी मला पाहिल्याचे आठवत नाही. या पहिल्या भेटीच्या वेळी मी अठरा वर्षांचा होतो. प्रभा चौदा वर्षांची होती. दोघांचेही वाढदिवस एकाच दिवशी येतात.
 लहानपणापासून मी मित्रमैत्रिणींच्या मेळाव्यात वावरणारा माणूस. आजही हा घोळका भोवती आहेच. प्रभा माझी विवाहापूर्वीची मैत्रीण नव्हे, पण जिच्याशी लग्न करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली ती ही पहिली मुलगी. या इच्छेनुसार लग्न झाले. या घटनेला पंचवीसहून अधिक वर्षे उलटून गेली, पण या मुलीशी आपण लग्न केले, याचा अजून पश्चात्ताप झालेला नाही. उद्याची हमी कोण देणार? ('अहो, त्यांना कशाला पश्चात्ताप होईल ? भोगावे लागते मला. मला विचारा!' ही सौ. ची प्रतिक्रिया असते.)
 या प्रथम भेटीच्या वेळी मी कसा होतो? इंटर नापास. नुकताच कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून चौदा दिवस कच्ची कैद भोगून आलेला. हैद्राबाद मुक्तीआंदोलनातील विद्यार्थी नेता. नवोदित राजकीय कार्यकर्ता म्हणून व वक्ता म्हणून मी ओळखला जाई. प्रियकराचे चित्र फारसे चांगले नव्हते. पायांत वहाण नसे म्हणून धूळ भरलेले पाय. डोके तुळतुळीत. केस नसत. लांब नाकाच्या शेंड्यापर्यंत येणारी प्रिय शेंडी, हाफ पँट आणि एक शर्ट. या जगात माझ्या आईखेरीज मला कुणी गोरा म्हटलेले नाही. स्वभाव रागीट, उग्र, वावदूक. प्रियकराचे हे चित्र आकर्षक नाही हे मला कळते, पण सत्य हेच आहे. प्रभावती सातव्या वर्गात होती. शाळेला जाताना परकर असे. घरी भावांचे शर्ट व हाफ पँट असे. प्रथम भेटीच्या वेळी ती हाफपँटमध्येच होती. 'प्रभा गोरी व नाजूक आहे,' असे आमच्याकडील सर्वाचे मत आहे. मात्र हे गोरेपण देशस्थांचे. कोकणस्थांचे नव्हे. पहिल्या भेटीतच ती मला आवडली. मीही तिला आवडलो. ह्याला प्रथमदर्शनी प्रेम म्हणायचे असेल तर माझी हरकत नाही. आम्ही एकमेकांना आवडलो याचा पुरावा काय ? मी हसलो, ती हसली. ती एक कच्चा पेरू खात होती. मी खुणेने तो मागितला. तिने खिडकीतून पेरू फेकला. मी गच्चीत उभा होतो. मी तो पेरू झेलला. प्रथम भेट ही अशी. (दाता मी होते. याचक तू होतास. जन्मभर हेच चालणार, हे मला तरी कुठे कळले ? वय लहान होते ना? इति. सौ.)
 हे आवडणे पुढे सतत चार वर्षे चालू होते. ती मला पाहून हसे. मी तिला पाहून हसे. भेटीचे ठिकाण : वाहता रस्ता. वेळ : ती शाळेला जाताना. शाळेतून परतताना. रस्त्याच्या एका कडेने ती मैत्रिणींसह जाई. दुसऱ्या कडेला मी. याहून वेगळ्या गाठीभेटी नव्हत्या. पत्र अगर चिठ्ठी नव्हती. बोलणे नव्हते. आणि तरी एक दिवस धाडस करून मी विचारले आणि लग्न ठरले. पहिली भेट होताच आकर्षण पक्के. पहिले बोलणेच हे की, तू माझ्याशी लग्न करशील का ? आणि मग ठाशीव होकार. यामुळे गप्पा, भेटी, परस्परांना समजून घेणे इ. बाबींना आरंभ लग्न ठरल्यावर झाला. (ह्या घटनेवर सौ. प्रभावतीबाई तीन प्रतिक्रिया देत आल्या. त्यांना सोय असेल ती त्या वेळची ठाम मते. 'काय मेली जीवघेणी प्रतीक्षा. साधा मुद्दा कळायला चार वर्षे लागली आणि हा म्हणे शहाणा.' 'तुम्हीच हात जोडून आला होता. मी काही मागणी घातली नव्हती.' ' वाट पाहता येत नाही त्याने या वाटेने जाऊ नये.' )
 सर्व आयुष्यात जाणीवपूर्वक आणि निर्धाराने ती माझ्या इच्छेविरुद्ध एकदाच वागली. त्या निर्णायक महत्त्वाच्या जागी तिने माझा पूर्ण पराभव केला. पंचवीस वर्षे तो पराभव डाचतो आहे. मधून मधून क्रोध-संतापातून तो व्यक्त होतो. पण प्रभावतीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. होण्याचा संभव दिसत नाही. पत्नी आपल्याला मुळीच भीत नाही, तीवर आपला दाब नाही, उलट आपण तिला भितो हे कबूल करणे माझ्या पुरुषी अहंकाराला आवडत नाही. पण सत्य नोंदविणे भाग आहे.
 माझी इच्छा ही की, तिने मॅट्रिक व्हावे. नोकरीला लागावे. स्वतंत्र स्वावलंबी असावे. संसाराची जबाबदारी घ्यावी. म्हणजे समाजसेवेला मी मोकळा राहीन. विवाह ठरला त्या वेळी ती मॅट्रिकला बसत होती. मीही मॅट्रिकच होतो. कुणालाच नोकरी नव्हती. आम्ही स्त्रीस्वातंत्र्यवादी सेवादलवाले. आम्ही सर्व नेते व अनुयायी मंडळीत नोकरी, कमाई व संसार यांची जबाबदारी गळ्यात घेऊन पत्नीने स्वतंत्र व्हावे व फक्त खर्च, व्याख्याने, गप्पा अशी समाजाची बांधिलकी आपण घ्यावी अशी रूढीपरंपरा मान्य आहे. जे सर्वमान्य आहे तेच मी तिला सांगत होतो. प्रभा बोलली काहीच नाही, पण ती मॅट्रिक नापास झाली. आजवर ती कधी नापास झाली नव्हती. वुद्धी अतिशय चांगली, पण या वेळी ती नापास झाली. मला आश्चर्य वाटले. पण प्रकाश पडला नाही. स्त्रीच्या मनातले आपल्याला लवकर कळत नाही असा माझा नित्याचा अनुभव आहे, मी पत्नीला पुरवणी परीक्षेला वसविण्याच्या तयारीस लागलो. एक दिवस प्रभा व तिची मैत्रीण बोलत होत्या. मी शेजारच्या खोलीत आहे याची तिला कल्पना नव्हती. मैत्रिणीने विचारले, "काय ग प्रभा, कधी नापास न होणारी तू. या वेळी नापास कशी झालीस ?" शत्रुपक्ष वयाने फार लहान आणि चतुरपणात फार ज्येष्ठ होता. बाईसाहेबांनी उत्तर दिले, " अग, तीच तर गंमत आहे. तो मला नोकरीत अडकवून स्वतः मोकळा राहू इच्छितो. माझा संसार धड व्हायचा तर त्याला बांधणे आवश्यक आहे. मी यापुढे कधीही मॅट्रिक पास होणार नाही. पेपर लिहिणे तर माझ्या हाती आहे.' ताबडतोब माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यानंतर समजावणी, दरडावणी, विनवणी, भांडण, वैताग असे सर्व प्रकार झाले. 'तुला नोकरी करण्यास कधीही सांगणार नाही' अशा प्रतिज्ञा झाल्या. पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती मॅट्रिक नापासच आहे. माझ्याकडे येणारी अतिशहाणी मंडळी अनेकदा इंग्रजीतून बोलतात. त्यांची समजूत अशी की, तिला इंग्रजी येत नाही. प्रभा मॅट्रिक नाही. पण तिचे इंग्रजी जवळजवळ माझ्याबरोबरीचे आहे. मुद्दा बुद्धी असण्या-नसण्याचा नव्हता. मुद्दा मला नोकरीत पूर्ण गुंतविण्याचा होता. ती पूर्ण यशस्वी झाली. माझा पूर्ण पराभव झाला.
 मला मुली तीन, मुलगा एक, चौघेही जण तिच्या बाजूचे. त्यामुळे सर्व भांडणांत, मतभेदांत आई व मुले मिळून शत्रुपक्षाची मते पाच होतात. आणि मी एकटा. 'तुम्ही लोकशाहीवादी ना, मग आपण प्रश्न मतदानाने सोडवू,' असे आव्हान ती मला नेहमी देते. यामुळे मी नित्य पराभूतच असतो. अल्पमतातील विरोधी पक्षनेत्याकडे खेळ म्हणून ज्याप्रमाणे प्रधानमंत्री पाहतो ती तिच्या वागण्याची पद्धत आहे. इंदिरा गांधी पंतप्रधानपदावरून खाली उतरल्या त्या आठवड्यात जेवताना मी गप्पांच्या ओघात म्हटले, " चला, इंदिरा गांधी खाली उतरल्या, मलाही आता मुक्ततेची आशा निर्माण झाली आहे. मुलांना अशा वेळी हसू येते. " अजून याला मुक्ततेची आशा आहे" हा त्यांना विनोद वाटतो. प्रभा म्हणाली, " हे पहा, मी सत्तेतून खाली उतरेन तेव्हा तुम्हांला आग्रहाने कुणी जेवू घालणार नाही."
 मी प्रथम नोकरीला लागलो तेव्हा माझा पगार दरमहा छपन्न रुपये सात आणे होता. आजच्या मानाने त्या वेळी स्वस्ताई होती. आम्ही राहतही गरिबीनेच होतो. तरीही घरखर्चाला दरमहा ७५ रु. लागत. दीड खोलीचे घर. त्यात मी, माझा एक ब्रह्मचारी मित्र व पत्नी असे तिघेजण राहत होतो. पती-पत्नींना खाजगी बोलण्याची सोयही नव्हती. आणि हळू आवाजात खाजगी बोलण्याची मला सवयही नव्हती. तिलाही अशा खाजगी प्रेमकूजितांची गरज वाटली नाही. 'प्रायव्हसीं' नाही अशी तक्रार तिने कधी केली नाही. " लग्न जाहीर, बाळंतपण जाहीर, आता गुप्त काय राहिले ?" असा तिचा ठाशीव मुद्दा असे. वृथा खर्च नको म्हणून या काळात मी दीड महिन्याला न्हाव्याकडे जाई. त्यामुळे दाढी दीड महिन्याला होई, यावर तिची तक्रार नव्हती. फाटकी धोतरे मी घरी नेसे त्यावरही तक्रार नव्हती. विवाहानंतर तिने क्रमाने काही बदल केले. प्रथम म्हणजे माझी हाफ पँट गेली व धोतर आले. दुसरे म्हणजे शेंडी गेली डोक्यावर केस आले. शर्टखाली बनियन प्राध्यापक झाल्यानंतर आले. तिला केस ठेवणे आवडते. मी ठेवतो. मात्र मी याला पराभव समजत नाही. हा भाग तडजोडीचा.
 समोर बसलेल्या विद्यार्थ्याला आकंठ तृप्त होईतो शिकवायचे हा माझा जन्मभराचा आनंद आहे. समोरच्या विद्यार्थ्याने घेताना थकावे इतके मी ओतणार. नोकरीच्या आरंभकाळी संसार चालण्यास पैसे कमी पडत म्हणून मला नाइलाजाने शिकवण्या कराव्या लागत. शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला 'दर' सांगावा ही गोष्ट मला अतीव यातनेची होती. पण माझा नाइलाज होता. मला शिकवणीचे पैसे बरे मिळत. नोकरीचा पगार ५६ रु. ७ आणे, पण शिकवणीवर दरमहा शंभर रुपये मिळत. मुले पैसे आणुन देत तो माझा शोकदिन असे. मध्येच एखादा विद्यार्थी म्हणे, “ गुरुजी, या महिन्यात माझा हात तंग आहे. पैसे पुढच्या महिन्यात देतो." मग तर मला जेवण सुचायचे नाही. झोप यायची नाही. प्रभावती हे सारे गप्प बसून पाहत होती. तिने कधी या विषयावर चर्चा करून माझी समजूत घातली नाही. नोकरीचे नवे वर्ष उजाडले. आणि माझा पगार ७८ रु. १४ आणे झाला. बाईसाहेब म्हणाल्या, “ हे पहा, आजपासून शिकवणीचे पैसे घेणे बंद. पैसे नको, तुमचे तडफडणे नको.७५ रु. संसाराला पुरेत. दरमहा ३ रु. १४ आणे तुम्ही मोकळे. पणाने चैनीसाठी खर्च करा." त्या दिवसापासून हे घर विद्यार्थ्यांना मोकळे आहे. या, पोटभर शिकून जा. आणि मोफत शिका. मीही यातनामुक्त आहे.
 पैशाचा मोह मला कधीच नव्हता. खूप पैसा मिळवावा असे मला कधीही वाटले नाही. पैसा जतन करावा असेही मला वाटले नाही. बरे, माझा योग असा की, मला पैसा कधी कमीही पडला नाही. प्रभावतीलाही पैशाचा मोह नाही. दागिन्यांची आवड नाही, नटणे नाही. जाहीर तर सोडा, एकांतातही ' मला हे हवे, ते हवे' अशी भाषा नाही. त्यामुळे आम्हा दोघांत पैसा हा कधी भांडणाचा विषय नव्हता. दारिद्र्य हा कधी तिच्यासाठी खंतीचा विषय नव्हता. स्वेच्छेने दारिद्र्य स्वीकारणाऱ्यांच्या वागण्यात जशी दारिद्र्याची मस्ती आणि द्रव्य व द्रव्यवान यांच्याबाबत तुच्छता असते तशी तिची वागणूक आहे. तिची काव्यशून्य सुभाषिते नोंदवितो. " सीता राज्य सोडून रामासह गेली, यात कौतुक करण्याजोगे काय आहे ? हजारो बाया नवन्यासाठी दरिद्री झाल्या, त्या हजारांत एक सीता." " गरजेपुरता पैसा लागतोच. तो मिळवावा. त्यापेक्षा अधिक पैशाची इच्छा असेल तर लग्न करू नये. दुकान मांडावे." " जपलेला पैसा शिळा होतो. शिळ्याचा मोह धरू नये." तिच्या मनाचा एक कोपराच बैरागी आणि फकिराचा आहे. जगात जणू कुणाशी तिचा संबंध नाही. माहेरीसुद्धा ती कधी फारशी जात नाही. माहेरी तिचे मन रमत नाही. या पंचविसाहून अधिक वर्षांत एक अपवाद सोडला तर ती कधी सलगपणे आठवडाभर माहेरी राहिलेली नाही. लोक म्हणतात, " तिला नवरा सोडून करमत नाही." ती म्हणते, " इथे तरी नवरा कुठे असतो? गावी असला तर घराबाहेर. घरी असला तर घोळका भोवती. अन् गावी नसला तर मग आनंदच सगळा." पण ती माहेरी रमत नाही. अपवाद फक्त एक. प्रसूतीसाठी एकदा माहेरी गेली होती, त्या वेळचा. त्याही वेळी तीन आठवड्यांत बाळंतपण आटोपून परतली. मग इथे येऊन दोन महिने विश्रांती. माहेर असो वा सासर, ती सर्वांशी गोड बोलते. कर्तव्याला चुकत नाही. मी सोडून कुणाशी भांडत नाही. पण लिप्तपणा कुठेच नाही. कदाचित थोडा लिप्तपणा माझ्यात असावा. गावातही कुणाशी फार मैत्री नाही, भांडण नाही, जवळचे मित्र नाहीत. मैत्रिणी नाहीत. आपण, मुले, घरकाम, सततचे कष्ट हा तिच्या सवयीचा भाग आहे. आणि चेहरा नेहमी थोडा गंभीर पण प्रसन्न असतो. तो चर्येचा भाग आहे.
 आज मी प्राचार्य आहे. पण पत्नी घर झाडते, स्वयंपाक करते, पाणी भरते, धुणे धुते, बाजारहाट करते. सततचे न संपणारे काम तिचे चालू असते. या कामाविषयी कुरकूर नाही. पैसा आला याचा फार आनंद नाही. गेला याचे दुःख नाही कर्जाची खंत नाही. गरजेपुरते मिळाले यात ती तृप्त आहे. ती माझ्याशी फार कमी बोलते. याची स्पष्टीकरणे तिनेच दिलेली दोन आहेत. " सारेच जण वेळ खातात. मीही तेच करू लागले तर वाचावे केव्हा?" हा खुलासा मला आवडतो. " अडाण्याशी काय बोलावे? त्याला व्यवहारात कळतेच काय ?" हा मला आवडत नाही. पण इलाज नाही. ऐकून घेणे भाग आहे. व्यसन एकच आहे. सिनेमा पाहण्याचे. दर आठवड्यास सिनेमा पाहते. पूर्वी आठ आण्यात बसे. आता वरिष्ठ तिकिटावर बसते.
 पतीवर अपार विश्वास आहे, असा तिचा दावा आहे. तो खरा असू शकतो. पण ते सोंगही असू शकते. मी सर्व महाराष्ट्रभर हिंडत असतो. ती माझ्यासह नसते. माझ्याभोवती मित्रमैत्रिणी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व चाहते यांचा घोळका सदैव राहिला. पण स्त्रीवरून कधी आमचे भांडण झाले नाही. मुंबई मराठी साहित्य संघाच्या संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. त्या वेळी मात्र ती आली होती. ज्या 'मुंबईसाहित्यसंघा'ने मला पदवी नसताना, वयही फार नसताना, नावावर पुस्तक नसताना, व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते (इ. स. १९५७) त्यांच्या संमेलनास जाणे तिला कर्तव्य वाटले. त्या आरंभीच्या काळी मंगेश पाडगावकरांनी मला घरी जेवणास बोलाविले होते. याही वेळी तिने सांगितले, पाडगावकरांच्याकडे आपण जेवणास जाऊ. तिथे आम्ही मिळून गेलो. तिला हे कर्तव्य वाटले. व्यासपीठावरही ती बसली. पण त्यात माझ्या कौतुकाचा भाव फार अल्प. ती स्वतःचे कर्तत्वकौतुक पाहण्यात दंग होती. मुंबई शहर तिला आवडले नाही. 'वर्दळ फार आहे' असे तिचे मत आहे. आपल्याला न आवडणारी मुंबई महाराष्ट्राची आहे असे तिचे ठाम मत आहे. मी विचारले, "पुरावा?" ती म्हणाली, "माझा विश्वास हाच सर्वांत मोठा पुरावा आहे." प्रभावतीबाईशी चर्चा करणे कठीण का, याचा बोध यावरून व्हावा.
 तिची काही ठाम मते आहेत. त्यांपैकी काही मते मला अतिशय अप्रिय आहेत. पण ती आहेत. तिचे एक ठाम मत असे की, ती भाग्यवान आहे. दगड्या, धोंड्या, कचऱ्याशी जरी तिचे लग्न झाले असते तरी तो वक्ता, प्राध्यापक, लेखक झाला असता, त्याला पैसा व मान मिळाला असता. मी विवाहाच्या वेळी बेकार होतो. इंटर, बी. ए., एम. ए. नंतर झालो. नोकरी नंतर लागली. प्राध्यापक, प्राचार्य नंतर झालो. माझा पहिला लेखसुद्धा विवाह ठरल्यावर प्रकाशित झाला. हा तिचा पुरावा आहे. या सर्व घडामोडींचा माझ्या लायकीशी अल्पही संबंध नाही. हे सारे फळ ती भाग्यवान असल्याचे आहे. कुणालाही जर तिने नवरा म्हणून निवडले असते तर हेच झाले असते, असे तिचे ठाम मत आहे. हे मत खोडून काढण्याचा मी प्रयत्न करून पाहिला, पण त्यात थोडेही यश आलेले नाही. “जे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे त्यावर चर्चा काय करणार?" असे तिचे म्हणणे. हे तिचे मत मला उत्साहदायी नाही. आनंददायक तर मुळीच नाही. अधिक दुःखाची गोष्ट ही आहे की, हे आमच्या मायधार्जिण्या मुलांचेच मत नसून प्रभाच्या सासू-सासऱ्यांचेही मत ती भाग्यवान आहे, असेच आहे.
 तिच्या मनाचा एक कोपरा अतिशय जुनाट आहे. घरातील कोणतेही काम मी करायचे नाही. जेवणासाठी पाणी घेणे मान्य नाही मग अंथरूण टाकणे, काढणे तर फारच दूर. सकाळचे उरलेले सायंकाळी मी खाणे तिला मान्य नाही. माझ्याआधी ती जेवत नाही. चारदोन महिन्यांत एखादा अपवादात्मक दिवस असा उजाडतो की, मी दिवसा जेवण करून झोपतो. तो तास अर्धा तास ती दारात उभी असते. इतरांना हाक मारू देत नाही. कावळे ओरडू नयेत म्हणून ती त्यांना खडे मारते. एकदा मी दिल्लीला गेलो. तिथे थैली विसरलो. पुढील प्रवासात मजजवळ पांघरूण नव्हते. माझी गैरसोय काहीच झाली नाही. दरगावी मला उत्तम पांघरूण मिळे. माझी चूक एकच झाली. हे मी तिला पत्राने लिहून कळविले. त्यानंतर मी घरी परतेपयंत ती राहत्या घरी थंडीत पांघरुणाविणा झोपली. " पत्रात काय लिहावे हे, बाबा, तुम्हाला कळत नाही," असा दोष मुलीने मला दिला. “जाऊ दे ग, त्यांना कधीच काही कळले नाही," असा समारोप पत्नीने केला. अशी ती ठार वेडी आणि कर्मठ आहे.  तिच्या मनाचा एक कोपरा चैनी आणि विलासीसुद्धा आहे. दर एक-दोन वर्षाला एकदा आम्ही एकत्र सिनेमाला जातो. त्या दिवशी तिची सर्व उधळपट्टी चालते. मग खर्चाचा धरबंध नाही. रिक्षाने जाणार. फुलांची वेणी घेणार, सर्वोच्च तिकिटावर बसणार, पान खाणार, असा सगळा थाट. त्या दिवशी तिला अत्तरही चालते. पण हा योग फार दुर्मीळ.
 अजून एक मुद्दा सांगणे आवश्यक आहे. तो म्हणजे आम्ही खूप भांडतो. सामान्यपणे सकाळी व संध्याकाळी अशी दररोज दोन भांडणे होतात. तास दीड तास असे दीर्घ अबोलेही असतात. भांडणात प्रायः बोलण्याचे काम मी करतो. प्रभावतीबाईंवर कशाचाही परिणाम होत नाही. भांडणाचे कारण पैसा नाही. अन्य स्त्री नाही. मग भांडणे का होतात? हा संशोधनाचा विषय आहे. प्रभावती मुद्देसूद व निर्णायक असे बोलते. ती माझे ऐकतही नाही. तिला रागही येत नाही. तिचे चुकले असे तर तिला वाटतच नाही. सगळा आविर्भाव, चूक तुमची पण आम्ही क्षमा करू, असा असतो. भांडणाचा अतिशय उद्धट समारोप ती करते. उदा० "पुरे, आता जेवा.", " आता उठा, हात धुवा.", " आता झोपा.", "उरलेले भांडण उद्या." इ०
 अशा स्त्रीच्या सहवासात गेली सत्तावीस वर्षे मी आहे. आता तिचेही केस पांढरे होऊ लागले आहेत. पण पूर्वी माझे व तिचे केस काळेच होते. दोघेही संसारी होतो. त्या काळातली एक गोष्ट सांगून मी थांबणार आहे. माझे मित्र (कै.) हमीद दलवाई एकदा नांदेडला माझ्या घरी आले. वेळ रात्रीची होती. आणि गप्पा रंगल्या. रात्रीचे बारा वाजले. तेव्हा पत्नीने दोघांच्या समोर चहा ठेवला. दलवाई म्हणाले, " वहिनी, आता उशीर झाला. आता मी निघतोच." चहा पिऊन पुन्हा आम्ही गप्पा मारू लागलो. रात्र संपत आली. पहाटे चारला पत्नीने पुन्हा चहा आणून समोर ठेवला. दलवाई म्हणाले, " वहिनी, काय हा त्रास तुम्हाला! मी म्हणजे काय शुद्धीवर नसतोच मुळी !" प्रभावतीबाई म्हणाल्या, "शुद्धीवर नसणाऱ्यांचेच हे घर आहे. शुद्धीवर असणाऱ्यांना इथे वावच नाही!"
 दलवाई नंतर मला म्हणाले, " गड्या, धार फार तिखट आहे !"