लोकहितवादींची शतपत्रे/लोकहितवादी - अल्पचरित्र
Appearance
लोकहितवादी - अल्पचरित्र
लोकहितवादी यांचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म १८- २- १८२३ या दिवशी झाला. त्यांच्या कुळाचे मूळ नाव 'सिधये' असे होते. देशमुख हे नाव वतनावरून पडले. त्यांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे सरसेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. गोपाळराव तेरा वर्षांचे असतानाच ते वारले आणि लगोलग ब्रिटिश सरकारने त्यांचा सरंजाम खालसा केला. तो परत मिळावा म्हणून गोपाळरावांचे बंधू चिंतामणराव यांनी पुष्कळ खटपट केली पण उपयोग झाला नाही. फक्त त्यांच्या मातुश्रींना सालीना रु. ६०० व तिघा भावांना सालीना रु. २०० तनखा देण्याचा ठराव झाला.
इ.स. १८४१ साली गोपाळराव इंग्रजी शाळेत दाखल झाले. तेथील अभ्यासक्रम त्यांनी तीन वर्षांत पुरा केला. पण त्या आधीच त्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध या ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्या काळच्या रीतीप्रमाणे पोहणे, घोड्यावर बसणे, नेम मारणे यांतही ते तरबेज झाले होते. पुढील थोड्याच काळात संस्कृत, गुजराथी, फारशी या भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. इतिहासाची तर त्यांना लहानपणापासूनच गोडी होती. ही त्यांची पूर्ववयातील तपश्चर्याच त्यांना ग्रंथरचनेच्या कामी उपयोगी आली.
इ. स. १८४३ साली त्यांना दक्षिणेतील सरदारांच्या एजंटाच्या कचेरीत ट्रान्सलेटरची जागा मिळाली. तेथून सरकारी नोकरीत ते सारखेच उत्कर्ष पावत गेले. १८४६ साली त्यांनी मुनसफीची परीक्षा दिली. १८५२ साली वाई येथे त्यांची 'फर्स्टक्लास मुनसफ' म्हणून नेमणूक झाली. १८५६ साली 'सब असिस्टंट इनामकमिशनर' म्हणून त्यांची नेमणूक झाली. या कामावर ते असताना त्यांच्याविषयी लोकापवाद फार उठले होते, अनेकांची इनामे खालसा करण्याची, त्यांनी सरकारी धोरणान्वये शिफारस केली. यात त्यांनी बराच पक्षपात केला असा लोकापवाद होता, पण लोकापवादाला नेहमी आधार असतोच असे नाही. १८६२ च्या सुमारास अहमदाबादेस 'असिस्टंट जज्ज' म्हणून त्यांची नेमणूक झाली व १८६६ साली तेथेच 'ॲक्टिंग स्मॉलकॉज जज्ज' ही जागा त्यांना मिळाली. तेथे ते दहा वर्ष होते. त्यानंतर नाशिकला 'जॉइन्ट सेशन्स जज्ज' म्हणून त्यांना नेमण्यात आले. तेथूनच १८७९ साली ते निवृत्त झाले. १८८० साली त्यांना सरकारने मुंबईत विधिमंडळाचे सभासद नेमले. १८८१ मध्ये 'फर्स्टक्लास सरदार' ही प्रतिष्ठा त्यांना प्राप्त झाली. पुढे रतलाम सस्थानात दिवाण म्हणूनही त्यांनी वर्षभर काम केले. इ. स. १८९२ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्याला त्यांचे देहावसान झाले.
लोकहितवादी हे फार मोठे लेखक होते. १८४८ साली त्यांनी आपल्या लेखनास शतपत्रांपासून प्रारंभ केला आणि समाजाच्या मार्गदर्शनाचे हे कार्य त्यांनी आमरण चालविले. 'ज्ञान हे सर्व सन्मानांचे, पराक्रमाचे, बलाचे व ऐश्वर्याचे मूळ आहे.' अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. म्हणून स्वजनांना शहाणे करून सोडण्यासाठी त्यांनी इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, संस्कृतविद्या इ. अनेक विषयांवर लेखन केले. निवृत्तीनंतर १८८२ साली त्यांनी 'लोकहितवादी' हे मासिक सुरू केले होते. त्यात लोकांना बहुविध विषयांचा प्रौढ लेखांच्याद्वारे परिचय करून देणे हाच हेतू होता. 'स्थानिक स्वराज्यव्यवस्था', 'ग्रामरचना', 'पृथ्वीराज चव्हाण', 'दयानंदांचे चरित्र' ही पुस्तके त्यांनी याच मासिकातून प्रसिद्ध केली. नंतर १८८३ साली त्यांनी ऐतिहासिक विषयाला वाहिलेले असे स्वतंत्र त्रैमासिक चालू केले. त्याचेही नाव 'लोकहितवादी' हेच होते.
लोकहितवादींचे बरेचसे लेखन भाषांतर, रूपांतर या स्वरूपाचे आहे. त्यांची 'शतपत्रे', 'प्रभाकर' या साप्ताहिकातून १८४८ ते १८५० या दरम्यान प्रसिद्ध झाली. यानंतर इतर वृत्तपत्रांतून त्यांनी बरेच लेखन लिहिले. त्या सर्वांचा संग्रह व 'स्थानिक स्वराज्यव्यवस्था' व 'पृथ्वीराज चव्हाण' एवढेच त्यांचे स्वतंत्र लेखन आहे. इतर लेखन इंग्रजी ग्रंथांच्या आधाराने केलेले आहे किंवा सरळ भाषांतरच आहे. या सर्व लेखसंभारापैकी शतपत्रांनीच त्यांची खरी कीर्ती झाली व आजही 'शतपत्रां'चे लेखक म्हणूनच महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांचे सर्व क्रांतिकारक मूलगामी विचार प्रामुख्याने शतपत्रांतच आले आहेत. त्यामुळे समाजाने त्यांना दिलेली ही मान्यता वाजवीच आहे.
लोकहितवादींच्यावर त्यांच्या हयातीतच टीकेचा भडिमार झाला. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी त्यांच्यावर फारच कडक टीका केली आणि शास्त्रीबोवांच्या लेखणीचे तेज फार प्रखर असल्यामुळे काही काळ लोकहितवादींच्या कार्याची उपेक्षा झाली. प्रा. गं. बा. सरदार यांनी 'महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी' या आपल्या पुस्तकात त्यांचा समावेश केला आहे तो याच अभिप्रायाने त्यांच्या व त्यांच्यासारख्याच इतर पंडितांच्या प्रयत्नाने लोकहितवादींच्या कार्याचे खरे स्वरूप आज आपणास कळून येत आहे. ही सुदैवाची गोष्ट आहे. नाहीतर हे 'जुने ठेवणे' आपल्याला आकळले नसते. आज महाराष्ट्रात विष्णुशास्त्री पक्ष व लोकहितवादी पक्ष असे दोन पक्ष दिसतात. त्यांच्यात या दोघांच्या कार्याविषयी तीव्र मतभेद आहेत. प्रत्येक पक्षाची दुसऱ्याच्या कार्याला शून्य लेखावे अशी वृत्ती दिसते. आपणच दोन्ही एकांतिक मते त्याज्य मानून दोघांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यास शिकले पाहिजे.
लोकहितवादींचे विचारधन
'लोकहितवादींचे विचारधन' या विभागात लोकहितवादींचे भिन्न विषयांवरचे विचार संकलित करून मांडले आहेत. शतपत्रांमध्ये लोकहितवादींनी १०८ पत्रे लिहिली आहेत. त्यांत धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, इंग्रजीविद्या, संस्कृत विद्या इ. अनेक विषयांवरचे त्यांचे विचार आले आहेत. हे लेखन प्रासंगिक असल्यामुळे त्यात वरील विषयांवरचे विचार विखरून असे आलेले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून त्याचे वर्गीकरण करून भौतिक विद्या, धर्मशास्त्र, जातिभेद, स्त्रीजीवन, इंग्रज आणि राज्यसुधारणा आणि आर्थिक विचारसरणी अशा विभागांत त्या त्या विषयावर विचार संकलित केले आहेत. असे करताना शक्यतो लोकहितवादींच्या शब्दांतच ते देण्याचा प्रयत्न केला आहे, पण विस्तारभयास्तव काही ठिकाणी संक्षेप करावा लागला, काही ठिकाणी दोन-तीन पत्रांतील विचार मांडताना मध्ये निराळी वाक्ये घालून जोडणी करावी लागली. त्या ठिकाणी संपादकीय भाषा आलेली आहे. लोकहितवादींची मूळ भाषा असेल तेथे त्यांचे उद्गार अवतरणात दिले आहेत. पण त्यातही काटछाट करताना कोठे कोठे भाषा बदलली आहे, पण मूळ विचारसरणीला कोठे धक्का लागणार नाही हे धोरण कटाक्षाने संभाळलेले आहे. याशिवाय मधून मधून संपादकीय विवरण आले आहे ते लोकहितवादींच्या विचारधनाचे स्वरूप नीट कळावे म्हणून. लोकहितवादींच्या आधीच्या काळचे मतप्रवाह, पन्नास वर्षांनंतरचे मतप्रवाह, त्यांच्या काळची परिस्थिती, हे सर्व उद्बोधनासाठी आलेले. संपादनातील हे धोरण ध्यानात ठेवूनच विद्यार्थ्यांनी शतपत्रांचा अभ्यास करावा.
नवभारताची निर्मिती- इ. स. १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला. मराठ्यांचे साम्राज्य बुडाले. याला आता जवळजवळ दीडशे वर्षं होत आली. या दीड शतकाच्या काळात भारतात एक अभूतपूर्व क्रांती घडून येऊन नवभारताचा जन्म झाला आहे. त्याच्या आधीच्या हजार दीड हजार वर्षांत एवढे मोठे परिवर्तन भारतात कधीच झाले नव्हते. मुसलमानी आक्रमण, पाश्चात्त्यांमधील डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांचे आक्रमण याच काळात झाले. इंग्रजही याच काळात येथे व्यापार करीत होते व मुलूख आक्रमीत होते. या आक्रमणामुळे भारतातील प्रत्येक प्रदेशाला, तेथील राज्यव्यवस्थेला, समाजरचनेला, अर्थव्यवस्थेला सारखे हादरे बसत होते. तरी एकंदर समाजव्यवस्थेच्या तत्त्वात फारसा फरक पडला नव्हता. श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माने बद्ध असे जे त्याचे स्वरूप या आक्रमणांच्या आधी होते ते बव्हंशी तसेच कायम होते. पण पेशवाई बुडाली आणि त्यानंतर जी पाश्चात्त्य विद्या येथे प्रसृत होऊ लागली, तिच्या प्रभावाने हा समाज शंभर वर्षांत इतका पालटला की, तत्पूर्वीच्या व या समाजात काही नातेच नसावे असे पाहणाऱ्याला वाटावे. ही जी क्रांती झाली ती भारताला अत्यंत हितावह अशीच झाली. आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात भारताला सतत पाण्यात पडून राहिलेल्या लाकडाचे व हाडकाचे रूप प्राप्त झाले होते. त्याच्यात चैतन्य असे कसलेच राहिलेले नव्हते. त्याचे चलनवलन सर्व थांबले होते. या जुनाट पुरुषाच्या देहात रुधिराभिसरण होतच नव्हते. पण पाश्चात्त्य विद्येमुळे नवी दृष्टी येथल्या धुरीणांना प्राप्त होताच हा समाज पुन्हा जिवंत होऊ लागला. आणि एका शतकाच्या आतच त्याचा कायाकल्प झाला; या सनातन भूमीत नवभारताची निर्मिती झाली.
या नवनिर्मितीचे महाकार्य करणारे जे थोर पुरुष गेल्या काही शतकांत महाराष्ट्रात होऊन गेले त्यात लोकहितवादी तथा गोपाळ हरी देशमुख यांचे स्थान फार मोठे आहे. दादाभाई, रानडे, विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक हे नवभारताचे व नव्या महाराष्ट्राचे प्रमुख शिल्पकार होत हे खरे आहे, पण भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, ज्योतिबा फुले व लोकहितवादी यांनी त्यांच्या आधी क्रांतीची जी पूर्वतयारी करून ठेवली होती तिलाही त्यांच्या कार्याइतकेच महत्त्व आहे हे विसरून चालणार नाही. कोणत्याही क्रांतीला नव्या तत्त्वज्ञानाची, समाजरचनेच्या नव्या मूलतत्त्वांची आवश्यकता असते. त्या तत्त्वांचा मनाशी निश्चय करून समाजात त्यांच्या प्रसाराचे काम धैर्याने, दृढनिश्चयाने व फार चिकाटीने अखंड करावे लागते; तेव्हाच नव्या निर्मितीचा पाया भरला जातो. या पायाभरणीच्या कार्याचे श्रेय बव्हंशी लोकहितवादींना व त्यांच्या शतपत्रांनाच द्यावे लागेल. अर्वाचीन महाराष्ट्राच्या जीवनात 'शतपत्रां'ना असे अनन्यसाधारण स्थान आहे.
इंग्रजांचे राज्य येथे प्रस्थापित झाले त्या वेळी येथल्या समाजाचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते ते लोक म्हणजे ब्राह्मण व सरदार, जहागीरदार हे होत. त्यांना त्या प्रारंभीच्या अव्वल इंग्रजी काळात फार वाईट दिवस आले होते. त्यांची सत्ता, त्यांचे वर्चस्व व त्यांची प्रतिष्ठा ही तर नष्ट झालीच होती, पण त्यांच्यातील बहुतेकांना दारिद्र्य, दैन्य प्राप्त झाले होते. पण हे सर्व काय घडत आहे, कशामुळे घडत आहे याची खरी कारणमीमांसा करण्याचे सामर्थ्य त्यांच्या बुद्धीला नव्हते. कलियुगामुळे, पापाचरणामुळे, ईश्वरी क्षोभामुळे हे झाले आहे, असे त्यांना वाटत होते. आणि पूर्वी रावण माजला होता पण रामाने त्याचा नाश केला, यादव माजले होते त्यांचा ब्राह्मणशापाने संहार झाला तसाच आताही होईल, असाच कोणी अवतारी पुरुष जन्माला येऊन साधूंचा प्रतिपाळ करील व दुष्कृत्यांचा विनाश करील, अशी भाबडी श्रद्धा मनात बाळगून ते बसले होते. इतिहासाच्या अभ्यासाने, तर्काने, बुद्धीने या घटनांची चिकित्सा करावी, समाजाच्या उत्कर्षापकर्षाच्या नियमांच्या आधारे या अवदशेचे विवेचन करावे, भौतिक दृष्टीने कार्यकारणभावाचा विचार करून आपल्यावर आलेल्या या घोर संकटाचे स्वरूप निश्चित करावे ही ऐपतच त्या नेत्यांना नव्हती. कारण तशी परंपराच या देशात नव्हती. त्यांची सर्व मीमांसापद्धती पौराणिक होती, आध्यात्मिक होती. लोकहितवादींचे असामान्यत्व हे की त्यांनी भौतिक कार्यकारणभावाच्या दृष्टीने प्राप्त परिस्थितीचे निदान करण्याची नवी परंपरा या देशात सुरू केली. एखाद्या अत्यंत विद्वान, निष्णात, अनुभवी, आपल्या विद्येत पारंगत असलेल्या वैद्यराजाने अंथरुणाला खिळून गेलेल्या रोग्याची तपासणी करावी व सूक्ष्म चिकित्सा करून रोगनिदान करावे आणि मग त्याला रोगमुक्त करण्यासाठी प्रभावी औषधयोजना करावी त्याचप्रमाणे रुग्ण अशा भारतपुरुषाच्या बाबतीत लोकहितवादींनी केले. त्यांनी शतपत्रे लिहिली त्या वेळी ते अवघे २५ वर्षांचे होते, पण त्या वयातही समाजाच्या आयुर्वेदात ते पारंगत झाले होते. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थकारण, यांच्या अभ्यासानेच त्यांना ही पारंगतता प्राप्त झाली होती आणि या अपूर्व विद्येच्या साह्यानेच त्यांनी आपल्या समाजाची नाडी पाहून, त्याच्या शरीरातील नसन् नस तपासून त्याच्या रोगाबरोबर निदान केले आणि तितकीच अचूक उपाययोजनाही सांगून टाकली. ते रोगनिदान व ती उपाययोजना हाच 'शतपत्रां'चा विषय आहे.
१. भौतिक विद्या
१. अज्ञान- थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राच्या देहाची तपासणी करताना तो देह अनेक व्याधींनी ग्रस्त झाला आहे, असे लोकहितवादींच्या ध्यानात आले. त्यातील पहिली व्याधी, महाव्याधी म्हणजे 'अज्ञान' ही होय. प्राचीनकाळी विद्येचे माहेर, सरस्वतीचे मंदिर अशी या भूमीची कीर्ती होती, पण आज अज्ञानाच्या महारोगाने ती जर्जर झाली होती. हे अज्ञान अत्यंत केविलवाणे होते, घृणास्पद होते; करुणास्पद होते. त्याचे स्वरूप पाहता आजही शिसारी येते. मग प्रत्यक्ष त्यातच वावरणाऱ्या लोकहितवादींना काय होत असेल याची सहज कल्पना येईल. येथल्या ब्राह्मणांना, शास्त्रीपंडितांना ही शुद्ध जनावरे आहेत, बैल आहेत, हे टोणपे आहेत असे पत्रोपत्री त्यांनी म्हटले आहे. पण त्या वेळच्या या पंडितांच्या अज्ञानाची आपल्याला जर कल्पना आली तर लोकहितवादींच्या या तीव्र संतापाचे आपल्याला नवल वाटणार नाही.
इंग्रज येथे आल्याला शे-दीडशे वर्षं त्या वेळी होऊन गेली होती, पण हे लोक कोण, ते कोठून आले, त्यांची राज्यव्यवस्था काय, त्यांची शस्त्रास्त्रे काय, त्यांची विद्या काय याचे लवमात्र ज्ञान हिंदु लोकांना- ब्राह्मणांना किंवा सरदारांना नव्हते. लोकहितवादी म्हणतात, 'कोणास खोटे वाटेल तर त्याने स्वदेशीय राजधानीतील लोकांकडे पहावे आणि त्यास पुसावे की, "इंग्रज हिंदुस्थानात कोठे कोठे राज्य करतात ?" ते म्हणतील की, "छी! इंग्रज कोठे आहेत ? आमचे संस्थानात तो एक ताम्रमुखी मात्र असतो." याचप्रमाणे पेशवाईत अवस्था होती. (पत्र क्रमांक ४८)' 'ब्राह्मणांना अजूनही वाटते की पृथ्वी शेषावर आहे, ग्रहणात राहू चंद्रास ग्रासतो. हिंदुस्थानाएवढीच पृथ्वी. पलीकडे गतीच नाही. ब्राह्मण सर्व जगात श्रेष्ठ, वेदांचा अर्थ करू नये.' (पत्र क्रमांक ६२). 'कोणी म्हणतो पेशव्यांचे राज्य कसे बुडाले हो?' दुसरा उत्तर करतो, 'अहो, ते अवतारी पुरुष होऊन गेले. जे होणार ते झाले. त्यास उपाय काय ? सद्दी फिरली म्हणजे क्षण लागत नाही. देव देणार त्याला देतो. त्याचे मनात आले म्हणजे पाहिजे तसे घडते.' (पत्र क्र. ५५) 'ज्ञान म्हणजे काय हेच लोकांस ठाऊक नाही. इंग्लंडातील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस यांची राज्यक्रांती, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती. लोकसत्ताक राज्य, या शब्दांचा अर्थही बहुत हिंदु मनुष्यांस ठाऊक नसेल. पृथ्वीवर काय आहे व लोक कसे आहेत, याविषयी त्यांस काही कळत नाही. पुराणिक एक पोथी सोडून बसला म्हणजे सर्व आनंदाने डोलतात. व रावणास दहा डोकी, सहस्रार्जुनास हजार हात, दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र इ. गोष्टी ऐकल्या की बायका फार खूष होतात व पुरुष म्हणतात आम्ही आज फार मोठे ज्ञान संपादन केले. हे पहिले जुने लोक आहेत ते शुद्ध बैल आहेत. त्यांस खाण्यापिण्याचे मात्र ज्ञान आहे व ते जनावरासारखे कर्म करतात.' (पत्र क्र. ३०) 'हे शास्त्री, भट व संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टींचे भरात आहेत. त्यांस अजून सांप्रतचे काही सुचत नाही. त्यामुळे कित्येक लाक पोरासारखे बोलतात की, विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे. कोणी म्हणतो टोपकर हे पाण्यातले राहणारे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. इंग्रजांस राज्य करू लागण्यास दोनशे वर्षे झाली आणि या लोकांच्या डोकीवरचे केसदेखील त्यांनी मोजले. पण या लोकांस त्यांचे डोळेही ठाऊक नाहीत.' (पत्र क्र. ३४)
२. अज्ञानातच भूषण- या अज्ञानाचा तर लोकहितवादींना उद्वेग येत असेच; पण आपण अज्ञानी लोक आहो हे जाणून नव्या ज्ञानाच्या अभ्यासा उद्युक्त व्हावे यासाठी ब्राह्मणांची व शास्त्रीपंडितांची तयारी नव्हती, याचे त्यांना पराकाष्ठेचे दुःख होत असे. 'पुण्यात लायब्ररीची स्थापना' या पत्रात ते म्हणतात की, 'आपले लोक ज्ञान संपादन करणे हे लहान मुलांचे काम असे समजतात आणि शिकत नाहीत. ते केवळ अडणीवरचे किंवा सांबापुढचे असून विद्येस तुच्छ मानतात व थोडे खावयास मिळू लागले म्हणजे आपली अप्रतिष्ठा होईल असे समजून वाचणे व अभ्यास करणे सोडून देतात. याबद्दल वाईट वाटून त्यांचा फार राग येतो. ज्याच्याजवळ द्रव्य आहे ते मदान्ध त्यांस वाटते विद्या काय आहे ? विद्येचे सार जे द्रव्य ते आम्हाजवळ आहे, असे त्यांस वाटते व ते आपल्याला चंद्रसूर्याइतके उंच समजतात.' (पत्र क्र. ३). ' सांप्रत कोणत्याही ब्राह्मणास पुसा की, इंग्रज शहाणे आहेत काय ? तर ते म्हणतील की, छी छी, शहाणे कशाने ? त्यांस काय येत आहे ? त्यांची विद्या, शास्त्रे व ज्ञाने सर्व आमच्याहून कमी आहेत. ब्राह्मणांना आपलेहून वरिष्ठ कोणीच वाटत नाही. कोणाचाही ग्रंथ त्यांचे हातात द्याल तर ते म्हणतील की, 'दगड आहे यात ?' नावदेखील वाचून पाहावयाचे नाहीत. तसेच शास्त्री- पंडित यांस सर्व तुच्छ वाटते. आपले ठिकाणी गर्व करून ते बसतात. अलीकडे नवे ग्रंथ बहुत झाले आहेत, रसायनशास्त्र, यंत्रज्ञान, शिल्प इत्यादिक. परंतु त्यांतील गोष्ट कोणी एकही पहात नाही.' (पत्र क्र. ९५). 'लोकांमध्ये समजूत अशी आहे की ज्ञान मिळणे हे संसारसुख आहे. याजकरिता किती एक जण इंग्रजी शिकतात. त्यांस लोक पुसतात की, तुम्हांस रोजगार लागला. आता विद्या शिकता कशाला ? शहाणपण व ज्ञान म्हणजे काय याचा अर्थच त्यांस कळत नाही.' (पत्र क्र. ६९).
३. पाठांतर हीच विद्या- स्वतः असे अडाणी असूनही ब्राह्मणांना गर्व कशाचा वाटत असे ? तर त्यांच्या संस्कृत विद्येचा. पण संस्कृत विद्येत ते पारंगत होते असेही नाही, तर त्यांस जुने संस्कृत ग्रंथ पाठ येत असत आणि या पाठांतरासच ते 'विद्या', 'ज्ञान' असे मानत असत. 'विद्या' याचा अर्थ असा व्हावा याची लोकहितवादींना अगदी चीड येत असे. ते म्हणतात, 'अहो, पाठ म्हणणे ही विद्या केली कोणी ? यात फळ काय ? हा मूर्खपणा उत्पन्न कसा झाला असेल तो असो. परंतु एवढा मूर्खपणा कधी कोणत्याही देशात झाला नसेल.' (पत्र क्र. ७७). लोकहितवादींच्या मते व्याकरण ग्रंथ केवळ पाठ म्हणून दाखविणे ही विद्याच नव्हे. मनुष्यास लाकडे तोडण्याचे कसब शिकविले तरी बरे. परंतु ही पाठांतरी विद्या नको, असे ते स्पष्ट म्हणतात, 'जांस अर्थ परिज्ञान नाही, नुसती अक्षरे वाचून पाठ म्हणतात त्यांचे ते शब्द जसे जनावरांचे ध्वनी तद्वत् आहेत. बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या घातल्या तर त्याला जसा त्याचा उपयोग नाही, तद्वत् ब्राह्मणांनी पुष्कळ पाठ केले, पण अर्थ ठाऊक नाही व ज्ञान नाही; तर काही उपयोग नाही.' (पत्र क्र. २०). याप्रमाणे केवळ अज्ञान नव्हे तर विपरीत ज्ञान हे भारताच्या अधःपाताचे पहिले कारण होय असे लोकहितवादी यांस दिसून आले.
४. पुराणांचे वर्चस्व- भट, ब्राह्मण व शास्त्रीपंडित यांची अशी विपरीत बुद्धी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पुराणग्रंथ हे होय, असे लोकहितवादींचे मत होते. भारतामध्ये आज हजारो वर्षे लोक पुराणश्रवण करीत आहेत. या कारणाने जगाचे सत्य ज्ञान करून घेण्याचे त्यांच्या ठायीचे सामर्थ्यच नष्ठ झाले आहे. 'पुराणातील सर्व गोष्टी प्रारब्धावर व देवाचे सामर्थ्यावर रचल्या आहेत. गजेंद्रास शाप होता म्हणून नक्र झाला. अहिल्येस वर होता म्हणून उद्धरली. रावणास वानरांनी मारला, दुर्योधनास मारून भूभार कमी करावा म्हणून (श्रीकृष्णाने) युद्ध केले, हिरण्यकश्यपूस मारावयास खांबातून देव निघाला. वामनाने पायातळी बळीस पाताळी घातला. या गोष्टी व अस्त्रयुद्ध, रथवाहन, धर्मयुद्ध, प्रतिज्ञा, शाप, वरदान, तत्काळ ईश्वराची प्राप्ती या गोष्टी आता लागू करणे यांसारखा मूर्खपणा कोठे आहे ?' (पत्र क्र. ५५). 'कोणास म्हटले की, लंकेत कोलंबो शहर आहे तर तो म्हणतो की, लंका कोणास सापडावयाची नाही, तिच्या भोवती सुदर्शन फिरत आहे. त्यास विचारले की, तापी नदीचा उगम कोठे आहे तर म्हणतो की, ती यमाची बहीण असे पुराणांत लिहिलेच आहे. याप्रमाणे पुराणे वाचून त्याचे मनात अनेक कल्पित कादंबऱ्या भरून त्याला हल्ली सृष्टी आहे त्याहून वेगळी दिसते. संक्रान्त हे सूर्याचे राशिक्रमण आहे हे तो जाणतच नाही. ती रेड्यावर बसून दक्षिणेस जाते, ती दीडशे कोस लांब आहे. तिचे मागे किंक्रान्त आहे असेच तो मानतो. त्यास वाटते की हे अलौकिक ज्ञान जे कोणास ठाऊक नाही ते मला पुराणामुळे ठाऊक झाले. या अभिमानात तो असतो. वास्तविक पाहिले तर त्याचे ज्ञान एक कपर्दिकेच्या किंमतीचे नसून त्याचे व इतर लोकांच्या नाशास कारण झाले.' (पत्र क्र. ८४).
५. नव्या भौतिक विद्या- हिंदू लोकांची सुधारणा व्हावयाची तर त्यांना मुख्य म्हणजे विद्या हव्या होत्या, पण त्या विद्या पुराणातल्या नव्हे तर सत्यप्रतिपादक! 'ज्या नव्या विद्या त्या काळी प्रकट झाल्या होत्या, ज्या वास्तविक व्यवहार व जग यांच्या दर्शक होत्या' त्या विद्या हव्या होत्या. लोकहितवादींच्या मते संस्कृत विद्या अगदी उपयोगी नव्हती, कारण त्यात असत्य फार भरले होते. मुलांना अठराही पुराणे शिकविली तरी त्यांना ज्ञान काय प्राप्त होणार ? तर दूध, तूप, मध यांचे समुद्र आहेत. स्त्रिया या कपटी, मूर्ख, निर्दय अशा असतात. ब्राह्मणांच्या पायाचे तीर्थ नित्य प्यावे, असल्या विद्या जितक्या वाढतील तितके अज्ञान दृढ होईल व हा देश मग कधीही सुधारणार नाही, असे त्यांचे निश्चित मत होते.
६. शब्दप्रामाण्य- त्या वेळी लोकांत, शास्त्रीपंडितांतही अत्यंत गाढ, घोर अज्ञान पसरले होते. त्यांचे मुख्य कारण म्हणजे पुराणश्रवण हेच होय, हे आपले मत लोकहितवादींनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. या पुराणांमुळे भारताला आणखी एक रोग जडला व तो म्हणजे शब्दप्रामाण्याचा. वेदात, पुराणात व इतर कोणत्याही ग्रंथात जे लिहिले असेल ते आंधळेपणाने खरे मानावयाचे ही जी प्रामाण्यबुद्धी ती या समाजाच्या अधःपाताला कारण झाली होती. स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याचे या समाजाला, त्यातील भटभिक्षुकांना, शास्त्रीपंडितांना वावडेच होते. ते फार मोठे पातक होय असे त्यांना वाटत असे. प्रत्येक ठिकाणी शास्त्र हे प्रमाण मानलेच पाहिजे, अशी त्यांची श्रद्धा होती. लोकहितवादींनी या शब्दप्रामाण्यावर, शास्त्रावरील या अंधनिष्ठेवर फार प्रखर टीका केली आहे. ही अंधश्रद्धा म्हणजे समाजाच्या पायातली बेडीच होय असे ते म्हणतात. 'अलीकडे किती एक मूर्खपणाचे समजुतीमुळे लोक कैदेत आहेत. म्हणजे त्यांच्या पायात बेड्या आहेत. त्यास इकडचे तिकडे हलवत नाही. जागच्या जागी श्रमी होतात आणि बेड्या तोडावयाजोग्या असूनही ते स्वस्थ दुःख भोगतात हे आश्चर्य आहे.' (पत्र क्र. २४). आज स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार पुन: पुन्हा मांडत आहेत. रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी इ. सप्तशृंखला हिंदू लोकांच्या पायात आहेत व त्या तोडल्यावाचून भारताला स्वातंत्र्य मिळावयाचे नाही व मिळाले तरी ते टिकविता येणार नाही, असे आपले मत त्यांनी 'जात्युच्छेदक' निबंधातून मांडले आहे. साठ-पासष्ठ वर्षांपूर्वी आगरकरांनी या शृंखलांवर घणाचे घाव घातले होते. पण त्यांच्याही आधी पन्नास वर्षे लोकहितवादींनी याच कार्याला प्रारंभ केला होता, यातच त्यांचे असामान्य मनोधैर्य दिसून येते, 'मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचेही असो. ब्रह्मदेवाचे का असेना; 'बुद्धिरेव बलीयसी' असे आहे. तुम्ही उघड जे पाहता त्याचा बंदोबस्त, शास्त्रात नाही, म्हणून करीत नाही, हे योग्य नाही. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पहा.' असा उपदेश त्यांनी पुनर्विवाहाचा पुरस्कार करताना केला आहे. (पत्र क्र. ७०). परदेशगमनाविषयी लिहितानाही त्यांनी हाच विचार सांगितला आहे. 'दुसरे मुलखात जाऊ नये असा शास्त्राचा अर्थ नसेल असे वाटते आणि जर कदाचित् असला तर ती शास्त्राज्ञा मानण्याची जरूर नाही' असे निर्भयपणे त्यांनी सांगितले आहे. (पत्र क्र. १९). 'चांगली व्यवस्था होईल तो नियम करावा; आणि जे पूर्वी शास्त्र लिहिले तेच सर्व काळ चालले पाहिजे असे म्हणणे मूर्खपणा आहे.' (पत्र क्र. १०६). 'शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरता रीत घातली आहे, त्यातून जर विपरीत काही असेल तर ते एकीकडे ठेविल्यास चिंता काय ? शास्त्र असो की नसो परंतु हित जाणून शास्त्र एकीकडे ठेवून ही रूढी (पुनर्विवाहाची) घालावी.' (पत्र क्र. १०७). असे विचार त्यांनी ठायी ठायी प्रगट केले आहेत.
२. धर्मशास्त्र
१. धर्म समाजासाठी आहे- ही सर्वस्वी नवी अशी दृष्टी आहे. इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनाने लोकहितवादींना ती प्राप्त झाली होती, हे महाराष्ट्राचे मोठे सुदैव समजले पाहिजे. धर्म हा समाजासाठी असतो, समाज धर्मासाठी नसतो हा विचार उदारमतवादी जगात आत सर्वमान्य झाला आहे. पण भारतात इंग्रजांपूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात लोकांना त्याचा गंधही नव्हता. समाजाचे काहीही होवो, धर्माज्ञा पाळल्याच पाहिजेत. अशीच त्या वेळी शास्त्री- पंडितांची वृत्ती होती. आणि समाज अंधपणे त्यांच्या मागून चालला होता. ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनापूर्वी युरोपात धर्मधुरीणांची व समाजाची हीच श्रद्धा होती. धर्मनियम दुर्लंघ्य आहेत, समाजाच्या उत्कर्षापकर्षावरून त्यांची पारख करणे हे पातक होय. कारण धर्मनियम म्हणजे परमेश्वराची निःश्वसिते होत, असे मत तेथे रूढ होते. जो समाज धर्मनियमांकडे या दृष्टीने पाहतो त्याचा अधःपात झाल्यावाचून राहत नाही. महाभारतकाळी भारतात असली अधोगामी विपरीत दृष्टी नव्हती. समाजाच्या उत्कर्षासाठीच धर्मनियम केले आहेत, ज्याने उत्कर्ष साधतो त्यालाच धर्म म्हणावे, लोकांचेसाठीच धर्म आहे; अशी अनेक व्यासवचने, श्रीकृष्णवचने महाभारतात आहेत. पण या वचनांचा भारताला विसर पडला. म्हणूनच सर्व प्रकारची संकटे त्यावर ओढवली. नवी दृष्टी प्राप्त होताच लोकहितवादींनी समाजाच्या नेमक्या याच व्याधीवर बोट ठेविले आणि 'बुद्धिरेव बलीयसी' असे मानणे हा त्यावर उपाय सांगितला. 'नियमन मनुजासाठी, मानव नसे नियमांसाठी जाणा' अशी पद्यपंक्ती रचून केशवसुतांनी धर्मविषयक हाच विचार भावनेच्या माध्यमातून लोकमानसात रूढ करण्याचा प्रयत्न केला होता.
२. कर्मकांड हा रोग :- समाजाचा उत्कर्ष, त्याची धारणा, त्याची प्रगती, त्याचे वैभव हा खरा धर्माचा हेतू. याचा एकदा विसर पडला म्हणजे धर्माला केवळ कर्मकांडाचे रूप येते आणि भारतीय महाराष्ट्रीय समाजाला जडलेला सर्वांत भयंकर रोग हाच होय असे लोकहितवादींचे मत होते. ते म्हणतात, 'सांप्रत काळचे लोक इतके मूर्ख आहेत की, त्यांस 'चाल' म्हणजे काय असे कोणी पुसले तर ते म्हणतात, अरे, चाल म्हणजे धर्म. परंतु त्यांस कळत नाही की, धर्म, चाल व शास्त्र ही वेगवेगळी आहेत. परंतु हे लोक विद्वान असते तर मूर्खपणाने स्वतःचे घातास का प्रवर्तक होते?' (पत्र क्र. १६) 'हिंदू लोकांत सांप्रत आचार फार माजला आहे. म्हणजे किरकोळ निरर्थक कर्मे आणि ढोंगे फार होऊन, त्यातील बीजरूप जी नीती ती भ्रष्ट झाली आहे. ब्राह्मणांचे घरात जाऊन पाहिले तर आचार किती दिसतात. पिठास पाणी लागले म्हणजे ओवळे झाले, खरकटे, शिळे व उष्टे यांविषयी हजारो नेम आहेत.' असे सांगून मुकटा, धाबळ, भाजके, कच्चे, उष्टे, विटाळ, पन्नास वेळा हात धुणे, याचे तपशीलवार वर्णन लोकहितवादींनी केले आहे. आणि यालाच लोक धर्म समजतात याबद्दल खेद व्यक्त केला आहे. (पत्र क्र. ५८) ते म्हणतात, 'घरात लहान मुलामुलींना सदाचार शिकवावा, नीती शिकवावी, ते न करता पोरींना वाती लावाव्या, निरांजन लावून तूप जाळावे, तीळतांदूळ वहावे, नाना प्रकारची मूर्खपणाची व्रते करावी, याबाबतच्या कहाण्या तिला शिकवितात. नीती व सदाचरण याविषयी लोक अगदी आंधळे आहेत. पुरुषांत जे लाचखाऊ, चोर, इंद्रियभ्रष्ट, पण त्यांचे सोवळे सर्वांहून अधिक, जेवताना बोलत नाहीत, त्यांना लोक मान देतात. त्यांचे आचरण पहात नाहीत.' (पत्र क्र. ५८) यावरून लोकहितवादी रीत, चाल, आचार कशाला म्हणतात ते ध्यानात येईल. नीती, परोपकार, भूतदया, क्षमा, शांती, ज्ञानदान, मनोनिग्रह याला ते खरा धर्म मानतात. "कोणी म्हणतो की, मी कार्तिकमासी निरांजने दिली, कोणी म्हणतो की, मी वैशाखात मडकी दिली, आवळे दिले. हा धर्म कशाचा? हा मूर्खपणा आहे." मग धर्म कोणता? "आंधळ्यास जेवावयास घातले काय ? दीन, गरिबांना (ब्राह्मणांस नव्हे) वस्त्रे दिली काय ? अज्ञानांस ज्ञानी केले काय ? दुर्जनांस सुजन केले काय ? कोणता परोपकार आपले लोकांमध्ये त्यांनी केला ? धर्म त्यावरून ठरतो." (पत्र क्र. ३५)
व्रतवैकल्ये :- व्रतवैकल्यांचा, उपास-तापासांचा, मंत्रतंत्राचा हा धर्म पुराणांनी प्रसृत केला असा लोकहितवादींचा आक्षेप आहे. 'अज्ञान फार वाढले व त्यांस साधन मुख्य पुराणे आणि महात्म्ये लिहावयास हाच पंडितांचा रोजगार होता' असे ते म्हणतात. 'कोणी कावेरीमाहात्म्य, कोणी नाशिकमाहात्म्य, कोणी करवीर माहात्म्य, कोणी गणपतिपुराण अशी लिहिली, प्रत्येकात हेतू हाच की, ब्राह्मणास पैसा मिळण्याची तजवीज पहावी. वर्षात तीनशे साठ दिवस व त्याहून अधिक व्रते आहेत. पुराणात नित्यकर्म पाहिले तर सगळा एक दिवस पुरणार नाही. इतके धर्म त्यात आहेत पण त्यात काही नीती आहे असेही नाही. कासोटा कसा घालावा, गंध कसे लावावे, शौचास अमुक कोस जावे, हेच फार आहे. लोकांचे सुख व ज्ञान वाढवावयाची त्यात एकदेखील गोष्ट नाही. मूर्खपणा वाढवावयाच्या गोष्टी आहेत. अज्ञान्यांस अजरामर करण्याकरिता या पोथ्या आहेत असे मला वाटते. हे सर्व सोडून दिल्याखेरीज यांची बरी गत मला दिसत नाही. मग ईश्वराची इच्छा!' (पत्र क्र. ६१)
४. खरा धर्म :- रूढ धर्मावर याप्रमाणे प्रखर टीका केल्यावर काही पत्रांतून लोकहितवादींनी आपल्या मते खरा धर्म कोणता त्याचे विवेचन केले आहे. 'नीतिप्रशंसा' या पत्रात ते म्हणतात, 'आता जो धर्म चालला आहे हा धर्म नव्हे. हा बेबंद गोंधळ आहे. यात काही नाही. नीती नाहीशी झाली व धर्म बुडाला. मला तर धर्म कोठे दिसत नाही. म्हणून धर्माची स्थापना करण्याचा माझा प्रयत्न आहे.' (पत्र क्र. ६५). धर्मस्थापनेच्या ह्या प्रयत्नाचे स्वरूप त्यांनी 'धर्म सुधारणा' या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते हे कार्य एकट्या-दुकट्याने न करता ज्यांच्या मनात देशाचे कल्याण आहे त्यांनी एकत्र येऊन करावे. असे केल्याने भीतीचे कारण राहणार नाही. 'चार टोणपे शास्त्री या लोकांना फार तर जातीबाहेर ठेवतील, पण एकट्या दुकटयाला बहिष्काराची भीती असते. मोठा समुदाय झाला की त्यास भीती नाही. त्याचीच जात होते. मग बहिष्काराचे त्याला भय कसले ?' असे सांगून नंतर या पत्रात त्यांनी धर्मसुधारणेची अनेक कलमे दिली आहेत; 'सर्वांनी ईश्वराचे भजन अंतःकरणपूर्वक करावे, जे कर्म करणे ते स्वभाषेत अर्थ समजेल असे करावे, भजन, पूजन, संस्कार सर्व ज्याचे त्याचे भाषेत करावे. प्रत्येकास आपले विचाराप्रमाणे आचार करण्याची व बोलण्या-लिहिण्याची मोकळीक असावी. त्यास प्रतिबंध असू नये. स्त्रीपुरुषांचे अधिकार धर्मसंबंधी कामात व संसारात एकसारखे असावेत. म्हणजे जे रयतेच्या हिताचे फायदे आहेत ते सरकारशी भांडून घेत जावे, विद्यावृद्धीकरता सर्वांनी मेहनत करावी, शेवटचे कलम असे आहे की, सत्याने सर्वांशी चालावे."
हा लोकहितवादीप्रणीत 'धर्म' पाहिला तर प्राचीन काळचा व्यासभीष्मश्रीकृष्णप्रणीत धर्म व हा धर्म यांत काही फरक नाही. असे आपल्या ध्यानात येईल. धर्म हा समाजाच्या हितासाठी आहे व तो बुद्धिप्रणीत असला पाहिजे हा आग्रह दोन्हीकडे सारखाच आहे. या धर्माचं स्वरूप अत्यंत व्यापक असे आहे. मानवी जीवनाचे कोणतेही अंग त्याच्या दृष्टीतून सुटलेले नाही. स्वभाषेचा, देशाचा अभिमान, स्त्रीपुरुषसमता, गुणनिष्ठ जातिभेद, रयतेचे सरकारहून श्रेष्ठत्व इ. अर्वाचीन काळातील राजकारण, समाजकारण या विषयांतील सर्व नवे विचार त्यात आले आहेत, हे पाहिल्यावर हिंदुलोकांचे या धर्मानेच कल्याण होईल, या लोकहितवादींच्या म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही हे कोणालाही पटेल.
अज्ञान, दुरभिमान, शब्दप्रामाण्य, कर्मकांड, धर्माविषयी विपरीत कल्पना या हिंदुसमाजाच्या व्याधींचा विचार झाल्यावर लोकहितवादींनी त्यावर उपाय म्हणून या धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न आरंभिला होता. त्या धर्मात वर म्हटल्याप्रमाणे विद्योपासना, बुद्धिप्रामाण्य, राष्ट्राभिमान, समता, व्यक्तिस्वातंत्र्य या अर्वाचीन समाजरचनेच्या सर्वच मूलभूत तत्त्वांचा अंतर्भाव झालेला आहे. लोकहितवादींच्या बुद्धीचा व्याप केवढा मोठा होता, समाजाच्या उत्कर्षापकर्षाचा ते कसा सर्वांगीण विचार करीत असत. एकही समाजांग त्यांच्या दृष्टीतून कसे सुटले नव्हते. हे यावरून दिसून येईल. आज शंभर वर्षांनी ज्या ज्या सुधारणा आपल्या देशात व्हाव्या असे आपण म्हणतो, त्या सर्वांचे प्रतिपादन लोकहितवादींनी केलेले आहे, आणि आपली प्रगती इतकी मंद आहे की अजून शंभर वर्षे तरी त्यांनी प्रतिपादलेली तत्त्वेच आपणास पुरत राहतील. असे असल्यामुळे त्यांनी सांगितलेली ही सुधारणेची तत्त्वे कोणती ते पाहणे अगत्याचे आहे.
५. इंग्रजी विद्या :- अज्ञान ही जर आपली पहिली व्याधी आहे तर विद्येची उपासना, ज्ञानासाठी तपश्चर्या हा त्यावर पहिला उपाय होय, हे ओघानेच आले; मात्र ज्या विद्येची उपासना, करावयाची ती विद्या म्हणजे लोकहितवादींच्या मते इंग्रजी विद्या होय. त्यांच्या मते त्या काळी जुन्या संस्कृत विद्येचा कसलाही उपयोग नव्हता. 'याप्रमाणे कोणतेही भागात जरी पाहिले तरी संस्कृत विद्या निरुपयोगी व नाना प्रकारचे कुतर्क उत्पन्न करणारी व संसारावरील चित्त उडवून आळशी करणारी व निरुपयोगी कर्मे करणारी आहे. सांप्रत काळी जे ज्ञान पाहिजे ते त्यात मुळीच नाही. सांप्रत काळचे देश, तेथील राज्ये व फौजा व व्यापार, इत्यादिकांची माहिती, यंत्राची उत्पत्ती, कायदेकानू कसे असावेत, गैरचाली कोणत्या आहेत, टाकाव्या कोणत्या, ठेवाव्या कोणत्या हे त्यांस माहीत नसते.' असे त्या विद्येविषयी त्यांनी आपले मत अनेक ठिकाणी सांगितले आहे. (पत्रे क्र. ७७, ८२, ८४) आणि आज इंग्रजी विद्याच आपल्याला सर्वतोपरी तारक होईल हे मत अत्यंत हिरीरीने मांडले आहे.
ते म्हणतात, 'आमचे काळी इंग्रजांसारखे शहाणे, पराक्रमी, ऐश्वर्यवान व विद्वान कोठे नाहीत व त्यांच्या विद्या हिंदूस अश्रुत आहेत. याजकरिता सर्वांनी त्यातील ज्ञान घ्यावे व त्याचा धिक्कार करू नये. सांप्रत इंग्रजीत ज्या विद्या, भूभोल, खगोल, राज्यनीती, इत्यादिक आहेत, त्यांचा विचार करावा, म्हणजे तुम्हास फार संतोष होईल. असे केल्याशिवाय लोकांस कोणतेही कार्य नीट करता येणार नाही.' (पत्र क्र. ६९). लोकहितवादींचे हे मत पुढे सर्वमान्य झाले हे आपण पाहतोच आहोत. त्यांच्यावर प्रखर टीका करणारे विष्णुशास्त्री यांनी तर इंग्रजी विद्येस वाघिणीचे दूध म्हटले आहे आणि 'आमच्या देशाची स्थिती' या आपल्या निबंधाचा समारोप करताना 'ज्ञानसाधना' हा आपल्या देशाला एकच तरणोपाय आहे असे सांगितले आहे. अखिल भारतात पुढच्या पन्नाससाठ वर्षांत अत्यंत निष्ठेने सर्व प्रांतात लोकांनी सर्व मतभेद विसरून जर एकच कोणते कार्य केले असेल तर ते म्हणजे इंग्रजी विद्येच्या प्रसाराचे. शाळा, महाविद्यालये व वृत्तपत्रे ही साधनत्रयी त्यांनी या कार्यासाठी वापरली आणि भावी उत्कर्षाचा पाया घातला. गेल्या शंभर वर्षांतले या देशातील सर्व क्षेत्रांतील थोर पुरुष, नेते, तत्त्ववेत्ते, राजकारणी, वक्ते, धर्मप्रवक्ते, इतिहासकार, गणिती, कवी, कादंबरीकार, कलाकार हे बहुतेक सर्व इंग्रजी विद्याविभूषित होते. त्यावाचून त्यांना या पदाला जाणे शक्यच नव्हते, ही एकच गोष्ट आपण ध्यानात घेतली तरी इंग्रजी विद्येचा इतक्या तळमळीने पुरस्कार केल्याबद्दल लोकहितवादींना आपण शतशः धन्यवाद देऊ. आणि त्यांच्या लेखनातील अत्युक्ती मनाला बोचू न देता तिचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू.
'इंग्रजी विद्या' या आपल्या पत्रात लोकहितवादी म्हणतात, 'आम्हास ठाऊक आहे की, एक इंग्रजीतील विद्वान् आणि शंभर संस्कृतमधील पंडित आणि एक लक्ष कारकून व दोन लक्ष भट हे सारखेच कदाचित होणार नाहीत. ज्याने चार शास्त्रे अध्ययन केली आहेत त्यांचीदेखील योग्यता इंग्रजीतील पंडितांशी बरोबर नाही; कारण की, आधी संस्कृत भाषेत ग्रंथ किती आहेत ! ग्रंथांच्या संख्येवरून विद्येची तुलना होते हा नेम आहे. इंग्रजीमध्ये कोट्यवधी ग्रंथ आहेत. त्यात अनेक विद्या आहेत, तितक्या संस्कृतांत नाहीत. जसे हिंदू लोक व्यासांचे वेळी विद्याप्रविण होते तद्वत् इंग्रज आज आहेत. त्यांचे चित्त विद्येवर फार व ते ज्ञानी बहुत झाले.'
६. ग्रंथमाहात्म्य :- ग्रंथ लिहिणे ही लोकहितवादी विद्वत्तेची खरी कसोटी मानतात व ती अगदी योग्य आहे याविषयी दुमत होईल असे वाटत नाही. पाश्चात्त्य देशात एकेका ग्रंथाने समाजात क्रांती करून टाकली आहे व शंभर शंभर वर्षे लोकांवर आपली सत्ता चालविली आहे हे विद्वानांना ठाऊक आहेच. बेकन, गॅलिलिओ, देकार्त, कोपरनिकस, केप्लर यांना अर्वाचीन युरोपचे जनक म्हणतात. हे सर्व ग्रंथकार होते. लोकहितवादींना असलेच ग्रंथकार मनात अभिप्रेत आहेत. दीर्घ अवलोकन करून, संशोधन करून, जे या भौतिक सृष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेतात व त्यावरून निघणारे सिद्धान्त निर्भयपणे जगापुढे मांडतात तेच खरे ग्रंथकार होत. 'छापण्याची कला' या पत्रात लोकहितवादी म्हणतात, 'वृत्तपत्रे म्हणजे बृहत्तर जिव्हा असे समजले पाहिजे. याचा उपयोग इंग्रज लोक जसा करतात तसा आपले लोक करून शहाणपणा वाढवितील तर फार चांगले होईल. आणि हा समय असा आहे की, आत आपले मनातील गोष्ट उघडपणे व निर्भयपणे सांगता व कळवता येते असे पूर्वी नव्हते.' (पत्र क्र. ७). असा निर्भय माणूसच ग्रंथकार होऊ शकतो. आज आपण व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य या नावांनी याच विचारांचा उद्घोष करतो. या नव्या सामर्थ्याची महती लोकहितवादींनी शंभर वर्षांपूर्वीच ओळखली हा त्यांचा विशेष. प्रत्येक इंगजी ग्रंथामध्ये त्यांना या सामर्थ्याची प्रतीती येत होती. म्हणून आपल्या लोकांनी ग्रंथ लिहावे असे त्यांनी सारखा उपदेश चालविला होता. आणि अनेक ग्रंथ रचून आपल्या उपदेशाला कृतीची भक्कम साथ दिली होती. इंग्रज विद्वानांचा गौरव करताना लोकहितवादी म्हणतात, 'त्यांची योग्यता अशी आहे की, त्यांस कोणताही विषय सांगा, त्या दिवशी तो ग्रंथ लिहू शकेल. कोणत्याही विषयावर बोलू शकेल. जे जे या पृथ्वीवर आणि आकाशात आहे ते सर्व त्यास ठाकठीक दिसते. आणि चंद्र फिरतो याचे त्यास आश्चर्य वाटत नाही. दगड वरती उडविला म्हणजे खाली पडतो याचेदेखील कारण त्यास माहीत आहे. तात्पर्य त्यास कोणत्याही विषयी आश्चर्य वाटत नाही.' हे शेवटचे वाक्य फारच मार्मिक आहे. पाश्चात्त्य व पौर्वात्य जगातला भेद लोकहितवादींनी या एका वाक्यात फार सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. भारतीयांना सृष्टिघटनांचे ज्ञान मुळीच नव्हते. त्यामुळे त्यांना त्या घटना म्हणजे सर्व चमत्कार वाटत. ईश्वरी करणी वाटत, म्हणूनच त्यांना त्याचे आश्चर्य वाटे. या ज्ञानाच्या बळावरच त्यांनी आगगाडी, तारायंत्रे इ. शोध लावले होते. पण भारतीयांना त्या सर्व ईश्वरी करणी वाटत. चमत्कार वाटत. म्हणून ते ती यंत्रे पाहून आश्चर्यमूढ होऊन गेले होते. माणूस आश्चर्यमूढ झाला की तो हतबल झालाच म्हणून समजावे. लोकहितवादींच्या त्या वाक्यात एवढा अर्थ सामावलेला आहे. ग्रंथांचे महत्त्व त्यांना का वाटत होते, ते आता स्पष्ट होईल. ग्रंथ जसजसे निर्माण होतील, तसतसे आपण आश्चर्यमुक्त होऊ व म्हणूनच समर्थ होऊ.
७. संस्कृतातले प्राचीन ग्रंथ :- संस्कृत विद्येवर लोकहितवादींचा आक्षेप हाच होता की, तीत ग्रंथ नाहीत. त्यांच्या मते प्राचीन काळी, व्यासांच्या काळी या भूमीत असे ग्रंथ होत असत. 'प्राचीन काळी म्हणजे तीन हजार वर्षांपूर्वी मोठे मोठे ऋषिवर्य विचारशील होते. त्यांनी रानात बसून ग्रंथ लिहिले. आकाशात नक्षत्रे पाहून त्यांचे नियम लक्षात आणले. रानातील औषधे शोधून त्यांचे गुण लक्षात आणले. आणि त्याविषयी शेकडो ग्रंथ लिहिले. या प्रकारे नाना प्रकारचे ग्रंथ पूर्वी नवीन बुद्धिबळाने उत्पन्न झाले. त्यानंतर या लोकांस पुढे अवदशेचा पाया येणार म्हणून अशी समजूत पडली की, पहिले ऋषी ज्यांनी हे ग्रंथ लिहिले ते सर्व देवअवतारच होते व त्यांनी केले तसे मनुष्य जातीच्याने होणार नाही. आपला धर्म इतकाच की, पूर्वीज्यांनी जे करून ठेविले तितके मात्र शिकावे. त्याजवर काही नवीन कल्पना काढू नये. काढली तर देवाचा अपमान होतो व जे काय आहे ते त्यात आहे, अशी समजूत पडून लोक अगदी मूर्ख झाले.' (पत्र क्र. ८२).
८. संशोधन संपले :- संस्कृत विद्येला अवकळा येण्याचे लोकहितवादींच्या मते हे मुख्य कारण आहे. त्यामुळे आजच्या संस्कृत विद्येतील सर्व ज्ञान मृतावस्थेत आहे. पाच हजार वर्षांपूर्वीचे वैद्यकशास्त्र आज कसे चालणार ? त्यात नित्य संशोधन झाले पाहिजे तरच ती विद्या जिवंत राहील, पण शब्दप्रामाण्य असल्यामुळे संशोधन थांबले आणि सर्व विद्या साचलेल्या पाण्यासारख्या होऊन बसल्या. 'धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ही सर्व प्राचीन काळी लिहिली गेली, आणि सांप्रत कालास फरक पडला आहे, त्यामुळे आज प्रत्यक्षात व शास्त्रात मेळ पडत नाही. प्रत्येक वेळी लोकस्थिती पाहून धर्मशास्त्रात परिवर्तन केले पाहिजे. पण असे न झाल्यामुळे आमचे धर्मशास्त्र व त्याचबरोबर इतर शास्त्रे अगदी निरुपयोगी झाली आहेत.' (पत्र क्र. ३०, ५९) आणि हे फक्त मोठ्या शास्त्रग्रंथांत झाले असे नाही तर सर्व जीवनातच हा प्रकार घडला. 'सर्व कसबी लोक, लोहार, सुतार, तांबट हे बापाच्या विद्येच्या पलीकडे जातच नाहीत. त्यामुळे त्यांची कारागिरीसुद्धा तीन हजार वर्षांपूर्वी जशी होती तशीच आज आहे. तीत अणुमात्र प्रगती झालेली दिसत नाही. नवीन कल्पना त्यांना सुचतच नाहीत. तांबट पूर्वी जसा तांब्या करीत होते तसाच आजही करतात. पोथी जशी पूर्वी लिहीत होते तशीच आता लिहितात. छापणे, यंत्रे करणे ही विद्या येथे आलीच नाही. नवीन गणित नाही, भूगोल नाही, नवीन कायदा नाही. फार काय ज्या वस्तऱ्याने आज हजामत करतात तो पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. काही अधिक कल्पना कोणी चालविली नाही. (पत्र क्र ८२). हे सांगून लोकहितवादी म्हरतात की, प्राचीन काळाविरुद्ध अशी टीका केली की त्यास अधर्म म्हणतात !
९. भ्रांत संस्कृत विद्या :- संस्कृतातल्या प्राचीन विद्या जुनाट, जीण झाल्या, त्यामुळे त्यांचा उपयोग नाही आणि आर्वाचीन काळात काल्पनिक भ्रांतिष्ट लिखाणाखेरीज तिच्यात दुसरे काही झालेच नाही. 'संस्कृतात इतिहास नाही. भारतात राज्ये किती होती, कोणाची होती, ती बुडाली केव्हा, कशामुळ बुडाली, मुसलमान केव्हा आले, पाश्चात्त्य केव्हा आले याविषयी संस्कृत पंडितांचे ज्ञान, नांगरहाक्याइतकेच असते. कलियुगास पाच हजार वर्षे होत आली असे सांगतात. तर त्याचा इतिहास कोठे आहे ? याचे उत्तर पंडित काय देणार ? दुसरे, संस्कृतात भूगोल नाही. रूस कोठे आहे, अरबस्थान कोठे आहे, हिंदुस्थानचे क्षेत्रफळ काय, हे संस्कृत पंडित सांगू शकतील काय ? त्यांना एवढेच माहीत आहे की, मेरूपर्वत भूमीच्या मध्ये आहे. तो लक्ष योजने उंच आहे. स्वर्गाची वाट हिमालयातून आहे. गंगा, यमुना या देवता आहेत. संस्कृतात यंत्रज्ञान तर मुळीच नाही. कोण्या पंडिताने कधी यंत्र केले आहे काय ? यंत्राची सुधारणा तरी केली आहे काय ? जे जाते व्यासांचे वेळेत होते तेच आत आहे. पंडितांनी कागद कधी केला आहे काय ? रामराज्यापासून ताडपत्रावर लिहितात तसेच अजून लिहितात.' संस्कृत विद्येची अशी स्थिती असल्यामुळे लोकहितवादी निक्षून सांगतात की, 'संस्कृतचा इतकाच उपयोग आहे की, लोकांमध्ये भ्रांती उत्पन्न व्हावी. जो जो मनुष्य त्यात प्रवीण होतो तो तो अज्ञानसमुद्रात तो खोल खोल जात असतो. (पत्र क्र. १०१). म्हणून ज्ञानप्राप्ती करून घ्यावयाची असेल तर इंग्रजी विद्येचाच आश्रय केला पाहिजे आणि त्या भाषेतल्याप्रमाणे मराठीत ग्रंथ लिहिले पाहिजेत. याच अर्थाने लोकहितवादींनी म्हटले आहे की, 'इंग्रजी विद्वान पूर्वी हिंदुस्थानात एक असता तर राज्य न जाते ? याचा भावार्थ हाच की ती विद्या येथे असती तर आम्ही इतिहास, भूगोल, गणित, रसायन, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांत प्रवीण झालो असतो आणि मग आम्ही पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर गेल्या शंभर वर्षांत जसे संघटित व समर्थ झालो, तसे आधीच झालो असतो व मग अर्थातच आपले राज्य गेले नसते. पण हे भट, कारकून, मूर्ख जमा झाले म्हणूनच राज्य बुडाले. जर विद्या पहिल्यासारखी असती तर हिंदू लोकांची अशी अवस्था न होती. परंतु ही जनावरे पाहिजे तेथे दोरीने बांधावी अशी गरीब, म्हणून असे झाले. पुढे जरी हिंदू लोकांचे कल्याण झाले, तर इंग्रजी पंडितांचे हातून होईल, यात संशय नाही. कारकून व भट हे क्षीण झाले म्हणजे व इंग्रजी विद्या वृद्धिंगत झाली म्हणजे हिंदू लोकांना पूर्वस्थितीवर येण्यास उशीर लागणार नाही.' (पत्र क्र. ३१). लोकहितवादींची ही भविष्यवाणी आज अक्षरशः खरी ठरली आहे. गेल्या शंभर वर्षांत भारताचे यच्चयावत सर्व नेते, रानडे, विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, महात्मा गांधी, पंडित नेहरू हे, इंग्रजी पंडित- पाश्चात्त्यविद्याविभूषित- होते. शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, इतिहासतज्ज्ञ, अर्थवेत्ते, धर्मशास्त्रवेत्ते सर्व इंग्रजी पंडित होते. त्यांनी आपल्या रसनेने व लेखणीने या देशात राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, विज्ञाननिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी पाश्चात्त्य समाजरचनेची मूलतत्त्वे रुजविली. त्यामुळेच हा समाज संघटित होऊन स्वातंत्र्यप्राप्तीला समर्थ झाला.
३. जातिभेद
अज्ञान हा ज्याप्रमाणे हिंदू समाजाचा एक रोग आहे, त्याचप्रमाणे जातिभेद हा दुसरा तितकाच घातक व चिकट रोग होय हे लोकहितवादींनी जाणले होते. त्या विषयावरचे आपले विचारही तितक्याच निर्भयपणे त्यांनी शतपत्रांतून मांडले आहेत. फार प्राचीन काळापासून हिंदू समाजात चातुर्वर्ण्यव्यवस्था रूढ झालेली आहे. उत्तर काळात या चार वर्णांतूनच अनेक जाती, पोटजाती निर्माण झाल्या व त्या सर्व जन्मनिष्ठ व बेटीबंद अशा झाल्या. त्यामुळे या समाजाची शकले होऊन तो दुबळा झाला. समाज असे रूप त्याला राहिलेच नाही. लोकहितवादी म्हणतात की, 'यास उत्तम मार्ग हाच की, कर्मे करून जातीचा आणि वर्णाचा निश्चय करावा. ब्राह्मण असून नीच कर्म करील तर ब्राह्मण नव्हे. तसेच क्षत्रियाने ब्राह्मणकर्म केले तर तो ब्राह्मण व्हावा. असे केले नाही तर कित्येक अयोग्य लोक ब्राह्मणाचे नावाने मिरवतील आणि कित्येक वास्तविक ब्राह्मण शूद्राचे नावाने आच्छादित राहतील. आज जर कोणी राजाने नियम केला की, आजचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांचे अधिकार वंशपरंपरा चालवावयाचे तर जोपर्यंत हे अधिकारी आहेत तोपर्यंत कामे ठीक चालतील. पण त्यांची मुले मूर्ख निघतील. कारण बापाप्रमाणे मुलगा निघतो असा निश्चय नाही. यास्तव ज्याचे त्याचे स्वयमेव गुण पाहून त्याची योजना करावी हा उत्तम पक्ष.' (पत्र क्र. २२).
१. प्राचीन काळी वर्ण गुणनिष्ठ :- लोकहितवादींच्या मते प्राचीन काळी अशीच व्यवस्था असली पाहिजे. शास्त्रात सर्व वर्ण कुळपरंपरा चालावे असे लिहिले आहे. जो ब्राह्मण त्याचा वंशही ब्राह्मणच. जो शूद्र त्याचा वंशही शूद्रच. असा नियम धर्मशास्त्रात आहे हे खरे, पण प्रत्यक्ष व्यवहारात असे घडत नसावे असे लोकहितवादी म्हणतात व आपल्या या अनुमानाला पुढीलप्रमाणे आधार देतात. 'वाल्मिकी हा प्रथम कोळी होता व नंतर ऋषी झाला. तो अर्थातच आपल्या पुण्यकर्मामुळे झाला. गाधिराजा प्रथम क्षत्रिय होता, पण तपश्चर्या करून तो ब्राह्मण झाला. पराशर ऋषीने शूद्र स्त्री केली. (मत्स्यगंधा. तिचाच मुलगा व्यास) हरिश्चंद्राने काशीस जाऊन महाराचे कर्म पत्करले. त्या काळी कित्येक राजे क्षत्रिय असता ब्राह्मण होत व कित्येक ब्राह्मण असता क्षत्रिय होत. पुराणात अशी वर्णने विपुल आहेत. तेव्हा त्या काळी गुणकर्मावरून वर्ण किंवा जाती ठरवाव्या अशीच चाल असेल. त्या काळचा इतिहास लिहिलेला नाही म्हणून पक्के सांगता येत नाही. पण विचार करून तशी चाल पुष्कळ होती, असे सिद्ध होते. तेव्हा आपणही तोच मार्ग अनुसरावा हे हितावह होय.' (पत्र क्र. २२).
२. इतर देशांत वर्ण गुणनिष्ठ :- हिंदुस्थानात समाजात भेद आहे तसे इतर देशांतही आहेत. प्रत्येक मुलखात चार वर्ण आहेतच. पंडित, शिपाई, सावकार आणि चाकर असे भेद सर्वत्र आहेत आणि त्यावाचून चालावयाचे नाही, पण इतर देशांत हे वर्ण वंशपरंपरा नाहीत. हिंदुस्थानात तसे आहेत, हेच आपल्या अधःपाताचे कारण होय. इतर मुलखात वाण्याचा मुलगा मूर्ख निघाला तर चाकरात जातो, पण हिंदुस्थानात त्यांची कुळे वेगळाली झाली आहेत. पण ही चाल अलीकडली असावी. पूर्वी नसावी. रावण ब्राह्मणाचा मुलगा, पण तो महादुष्ट होता म्हणून दैत्य झाला. याजवर कित्येक लोक म्हणतात, की ते मागले युगातले लोक. त्यांची उदाहरणे आता घ्यावयाची नाहीत. लोकहितवादींना हे मान्य नाही. कारण, 'वर्ण, व्यापार, जात हे मागल्या युगात होतेच. देवाचे अवतार झाले तरी ती मनुष्येच होती. प्रत्येक जीव देव नव्हता. सामान्य लोक तेव्हाही आतासारखेच होते. म्हणजे दुष्टही होते, सुष्टही होते. फरक इतकाच की तेव्हा ते विचार करीत असत व काही दोष दिसल्यास तो काढून टाकीत असत. आता विचार करीत नाहीत. बहुधा चालीवरून (रूढीवरून) चालतात.' (पत्र क्र. २२).
३. तत्कालीन ब्राह्मण :- जातिभेदाविषयीचे आपले विचार याप्रमाणे सांगून नंतर लोकहितवादींनी त्यांच्या काळच्या ब्राह्मण व क्षत्रिय या जातींच्या गुणांचा व कर्तृत्वाचा हिशेब घेतला आहे. त्यातही ब्राह्मण समाजाचे त्यांनी अंतर्मुख होऊन फार कठोरपणे परीक्षण केले आहे. तसे करताना ब्राह्मण समाजाचे अत्यंत घृणास्पद असे अनेक दोष दाखवून त्यांनी भट, भिक्षुक, शास्त्री, पंडित यांच्यावर फार प्रखर, अगदी मर्मभेदक अशी टीका केली आहे. त्यासाठी त्या वेळी त्यांच्यावर फार गहजब झाला आजही ही टीका अन्यायमूलक व द्वेषमूलक आहे, असे कोणी म्हणतात, पण अशा प्रखर टीकेवाचून या समाजाला जाग आली असे वाटत नाही. अज्ञान, अनाचार, हेकटपणा, दुराग्रह, अंधता, लाचारी यांमुळे त्या काळी नवविद्येला पारखा असलेला ब्राह्मण समाज अत्यंत अधोगामी झाला होता, आणि तरीही 'वर्णानां ब्राह्मणो गुरुः ।' ही त्याची अहंता कायम होती. काडीचेही ज्ञान नसताना आपण भूदेव, आपण सर्वज्ञ, हा त्याचा मूढ गर्व पाश्चात्त्य विद्याविभूषितांना अत्यंत संतापजनक वाटे. त्या संतापाचाच आविष्कार लोकहितवादींच्या शतपत्रांतून झाला आहे.
४. अर्थशत्रू ब्राह्मण :- लोकहितवादी यांचा ब्राह्मणांवर पहिला आक्षेप हा की, हे ब्राह्मण पाठांतरालाच विद्या समजतात. वैदिक, शास्त्री, पंडित, दशग्रंथी ब्राह्मण कोणीही घ्या, त्यांचे भूषण काय तर त्यांनी अनेक ग्रंथ पाठ केले आहेत. लोकांत ज्ञानशून्यता झाली त्याचे हेच कारण आहे. ब्राह्मण लोक वेद पाठ करतात पण अर्थशत्रू असतात. ही सर्व तोंडाची मजुरी झाली. यात मनाचा उपयोग काहीच नाही. लोकहितवादी म्हणतात, 'सांप्रतचे ब्राह्मण विद्येविषयी केवळ जनावरे आहेत. त्यांस अर्थज्ञान नाही. त्यामुळे धर्मावरील भाव व आस्तिकबुद्धी भ्रष्ट झाली आणि वेद, शास्त्र, पुराणे ही मुलांचा परवचा किंवा लमाणांचे गाणे यांसारखी झाली. देवाचे प्रार्थनेस बसले म्हणजे जी मर्यादा, निष्ठा, मनाची तत्परता असावी ती नाही. कारण हे सर्व गुण ध्वनीपासून येत नाहीत. अर्थज्ञानापासून येतात. पण जे पाठ म्हणतात ते अर्थ जाणीत नाहीत. त्यासारखे मूर्ख व व्यर्थ आयुष्य घालविणारे पृथ्वीत थोडेच असतील. मागील युगात असे वेडे ब्राह्मण नव्हते. ते सार्थ म्हणत होते. सार्थ म्हणण्याची पद्धती ज्या दिवसापासून बुडाली, तोच दुर्भाग्याचा फेरा या लोकांस खचित आला.' (पत्र क्र. ३३) व्याकरण, ज्योतिष ही खरे म्हणजे शास्त्रे आहेत. ती नुसती पाठ करण्यात काय फायदा ! वेद किंवा पुराणे यांच्या पठणात पुण्य तरी असेल, पण व्याकरणाचे पठण कशाला ? पण शास्त्रीपंडित व्याकरणही पाठ करतात. बारा बारा वर्षं हे पाठांतर चालू असते. ही विद्या काही उपयोगी नाही. म्हणून लोकहितवादी म्हणतात की, 'मनुष्यास लाकडे तोडावयाचे कसब शिकविले तरी बरे. परंतु हे व्याकरण नको. ही केवळ मूर्ख होण्याची विद्या आहे. त्याचप्रमाणे मीमांसा, अलंकार या शास्त्रांची व्यवस्था आहे. (पत्र क्र. ८६). ज्यास अर्थ परिज्ञान नाही, जे नुसती अक्षरे वाचून पाठ म्हणतात, त्यांचे शब्द जशी जनावरांची ध्वनी तद्वत् आहेत. कारण जनावरांची व मनुष्यांची ध्वनी सारखीच आहे. मनुष्यामध्ये जास्ती इतकेच की ते जे ध्वनी करतात तिचा अर्थ समजतात व दुसऱ्यास कळवितात. हे मनुष्याचे लक्षण अलीकडील ब्राह्मणांत दिसत नाही.' (पत्र क्र. १७).
५. पोटभरू विद्या :- केवळ पाठांतराला ज्ञान समजणे ही एक गोष्ट झाली. दुसरी त्यापेक्षा खेदजनक गोष्ट अशी की ब्राह्मणांची सर्व विद्या पोटभरू झाली आहे. लोकांना अज्ञानात ठेवून त्या अज्ञानावर ब्राह्मणवर्ग जगत आहे. लोक आंधळे आहेत, त्यांस डोळे द्यावे, ज्ञान शिकवावे व सुखी होण्याचे मार्ग दाखवावे हे ब्राह्मण मनातदेखील आणीत नाहीत. (पत्र क्र. ९६). लोकहितवादी म्हणतात की, 'मी पंडितास प्रार्थना करून सांगतो की, लोकांचे हित तुमच्याने होणार नाही; कारण त्यांचे हित तुमच्या वतनवृद्धीस विरुद्ध आहे. लोक जितके मूर्खपणात असतील व बायका जितक्या वेड्या असतील तितके तुमचे पीक अधिक. तेव्हा लोकांचे हित तुमचेकडून होईल कसे ? लोक खरा धर्म करू लागले तर तुमची उपजीविका कशी चालेल ?' (पत्र क्र. १०७) 'कोणी गरीब, आंधळे यांना उद्योगास लावण्यास खर्च करू लागला, कोणी शाळा काढू लागला तर ब्राह्मण पंडित त्यास सांगतील की, अरे शाळा कशाला ? तेथे पैसा देऊन काय पुण्य आहे ? ब्राह्मणाचे मुखी घातले तर पुण्य आहे. पुस्तके कशाला ? यातील ज्ञान काय उपयोगी आहे ? ब्राह्मण बोलावून त्यास दाने करावी. केळीचे दान सुवर्णासहित केले म्हणजे पुत्र होतो. ब्राह्मणास भोजन दिले की राज्य चिरकाल टिकते. भट असे सांगतील तरच त्यांचे पोट भरेल.'
६. ब्राह्मण माहात्म्य :- आपली वृत्ती अशी अविच्छिन्न चालावी यासाठीच ब्राह्मणांनी आपले माहात्म्य अतोनात वाढवून ठेवले आहे. आणि दुर्दैव हे की, हिंदुधर्मातील सर्व जातींची त्यावर श्रद्धा आहे. पुराणात म्हटले आहे की, ब्राह्मणाच्या केवळ दर्शनाने अनंत पापे भस्म होतात. त्यांना वंदन करून पूजा केली की मोक्ष प्राप्त होतो. विप्रांच्या चरणांच्या धुळीने आधिव्याधी नष्ट होतात. सागरात जी जी तीर्थे आहेत ती सर्व ब्राह्मणांच्या उजव्या चरणात आहेत. हे सर्व वर्णन खरे मानून लोक ब्राह्मराच्या पायाचे तीर्थ पितात. प्राचीन राजे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण, ब्राह्मणांची सेवा करीत असत, उष्टी काढीत असत, ही उदाहरणे पुराणात आहेतच. वास्तविक खरा धर्म म्हणजे मन शुद्ध पाहिजे. ईश्वर शरीरात पहात नाही, मनास पाहतो. परंतु हल्लीचे ब्राह्मण पैसा काढण्यासाठी हे सांगत नाहीत. फक्त आचार, जेणे करून पैसा मिळवावयाचा, तेच सांगतात. सर्व धर्म आता पैशावर आला आहे. पैसा दिला म्हणजे पाप जाते, प्रायश्चित्त होते, ईश्वर प्रसन्न होतो; असे ब्राह्मण सांगतात पण हे सांगणारे सर्व मूर्ख आहेत. याजवर भरवसा ठेवू नये.' (पत्र क्र. ८८)
७. ब्राह्मण इतरांसारखेच :- लोकहितवादींना हे ब्राह्मणमाहात्म्य मुळीच मान्य नाही. इतर जातीत व ब्राह्मणात ते मुळीच फरक मानीत नाहीत. केव्हा केव्हा इतर जातीचे हीन समजले गेलेले लोकच त्यांच्या मते श्रेष्ठ होत. कारण ब्राह्मणांना विद्या नसून गर्व आहे, म्हणून ते सुधारण्याची आशा नाही. इतर अज्ञ असल्यामुळे सुधारणे तरी शक्य आहे. लोकहितवादी म्हणतात, 'भटांत व अतिशूद्रांत मला इतकेच अंतर दिसते की, एक बोलता राघू व एक न बोलता राघू. परंतु ज्ञान एकच. ब्राह्मण वेद पाठ म्हणतात. पण अर्थज्ञतेविषयी उभयतांची योग्यता समान आहे. अतिशूद्र गरीब. ते आपला लहानपणा जाणतात पण भट मूर्ख असून ज्ञानी समजतात व गर्व करतात. हा त्यामध्ये दुर्गुण अधिक आहे.' (पत्र क्र. ७१). 'मला ब्राह्मणांचे व इतर लोकांमध्ये भिन्नपणा काहीच दिसत नाही. ब्राह्मण मरतात, जन्मतात व हातपाय त्यांस इतरांसारखेच असतात. मग इतरांपेक्षा त्यांमध्ये काय फरक आहे ? व ब्राह्मणाला गर्व कशाकरता असावा ? त्यांचा मुख्य गुण काय ती विद्या. तिचे तर त्यांचेमध्ये शून्य पडून काळे झाले आहे. आणि त्यांचा आचार तरी काय ? कोणी जेवावयास किंवा वसंतपूजेस बोलाविले म्हणजे एका हातात तंबाखू व दुसरे हातात चुना आणि तोंडात वेदपठण. हे तरी उत्तम आहे काय ? तेव्हा असे भ्रष्ट झाले ते ब्राह्मण म्हणावे किंवा त्यास दुसरे काही म्हणावे ?' (पत्र क्र. २०) 'जसे इतर जातीचे सुतार, न्हावी, माळी तसेच हे मूर्ख राघूसारखे पढणारे वेदविक्रय करून पोट भरणारे व निर्लज्जपणे भीक मागून काम न करता खाणारे आहेत. ब्राह्मणांस ब्रह्मदेवाने फुकट खाते, अशी सनद करून दिली आहे काय ? बाजीरावाने ब्राह्मणांस पुष्कळ खावयास दिले, त्याचे ब्राह्मणांच्या आशीर्वादाचे काय झाले ? अन्न मात्र वाया गेले. आणि नाश व्हावयाचा तो झालाच. तर ब्राह्मणाच्याने काही होणार नाही हे मला पक्के ठाऊक आहे.' (पत्र क्र. २१). 'इंग्रजी राज्य झाले हे एक ब्राह्मणांचे महत्त्व नाहीसे होण्यास मूळ झाले आहे यात शंका नाही. ब्राह्मणांनी बहुत वर्षेपर्यंत थोरपणा व अधिकार भोगला. परंतु तो काळ आता गेला. बरे झाले की लोक आता पाहू लागले.' (पत्र क्र. ७७) याप्रमाणे इतर जाती ब्राह्मणांच्या अधोगामी वर्चस्वातून आता सुटणार याचे लोकहितवादींना समाधान वाटत आहे.
८. विपरीत, हीन धर्मबुद्धी :- ब्राह्मणांची, शास्त्रीपंडितांची धर्मबुद्धी अत्यंत विपरीत होती. त्यांच्या धर्मात नीती, सत्य, सदाचार यांना कसलीच किंमत नव्हती. एखादा मनुष्य अत्यंत नीच असला, त्याने अत्यंत हीन व अमंगळ कृत्ये केली असली तरी, तो जर ब्राह्मणांना भरपूर दानधर्म करील, भोजने घालील तर ते ब्राह्मण त्याला धर्मावतार मानण्यास तयार! त्यांची एक-दोन उदाहरणे लोकहितवादींनी दिली आहेत. 'दुसरा बाजीराव पेशवा अत्यंत व्यभिचारी, अधम व अशुचि होता. कसलेही कर्तृत्व त्याचे ठायी नव्हते. पण त्याने पुण्यात ब्राह्मणांचे मनोरथाप्रमाणे दाने केली व बहुत शास्त्रीपंडितांना जवळ बाळगले. त्या वेळी हे पंडित निःस्पृह असते, त्यांना खऱ्या धर्माची चाड असती तर त्यांनी त्याला परखडपणे सांगितले असते की, 'श्रीमंत, तुम्ही नीतिभ्रष्ट, धर्मभ्रष्ट आहात.' पण हे ब्राह्मण त्याची स्तुतीच करीत गेले. महाराज सर्वत्र विजयी होतील असा ते त्याला आशीर्वाद देत. 'आपण ब्राह्मण प्रभू, आपले तेज सर्वांहून अधिक.' असेच ते म्हणत. असा मूर्खपणा त्यांनी केला व शेवटी आपण व तो दोघेही भीक मागत गेले. यास्तव हे पंडित जरी पुष्कळ पढलेले असले तरी ते मूर्ख समजावे. कारण लोकहितकारक ज्ञान त्यांना नाही. त्यांचे ज्ञानापासून मोक्ष व्हावयाचा नाही व इहलोकीही सुखोत्पत्ती व्हावयाची नाही.' (पत्र क्र. ८६). 'बाजीरावाचा भाऊ अमृतराव पेशवा याच्या उदाहरणावरून हेच दिसते. त्याने पुणे शहर लुटले. मुले, बायादेखील ठार मारल्या व कित्येक बायांनी जीव दिले, पैशासाठी त्याने अनेकांना राखेचे तोबरे दिले, धुऱ्या दिल्या, तापल्या तव्यावर माणसांना उभे केले. तेल तापवून पोरांच्या डोक्यावर ओतले. अशा रीतीने अत्यंत हीन, भ्रष्ट, अधर्म्य मार्गांनी पैसा मिळवून तो काशीस गेला. त्या वेळी तेथील धर्मवेड्या ब्राह्मणांनी त्याला काही शासन केले काय ? मुळीच नाही. त्यांनी प्रथम त्याला बहिष्कार घालण्याची धमकी दिली व मागाहून त्यास सांगितले की, तुम्ही जे द्रव्य आणले आहे त्यापैकी निम्मे ब्राह्मणांना धर्मादाय करावे. म्हणजे तुम्ही जातीत याल. त्याप्रमाणे त्याने अन्नछत्रे, ब्राह्मणभोजने, यज्ञयाग सर्व केले. लगेच ब्राह्मणांनी त्यास जातीत घेतले व ते त्याची स्तुती करू लागले. याच्या उलट उदाहरण एक बाबा भिडे यांचे आहे. हा गृहस्थ त्या वेळी प्रिन्सिपाल सदर अमीन या जागेवर होता. पण तो अत्यंत निःस्पृह होता. लाच मुळीच खात नसे, पण तो ब्राह्मणभोजनेही घालीत नसे. तेव्हा ब्राह्मण त्याची निंदा करीत.' (पत्र क्र. ७५). ही ज्या ब्राह्मणांची धर्मबुद्धी त्यांच्यावर लोकहितवादींनी अगदी कटू अशी टीका केली तर त्यात वावगे काय झाले ?
९. ब्राह्मणांचे नेतृत्व हे दुर्भाग्य :- अशा या ब्राह्मणांकडे हिदुसमाजाचे नेतृत्व शतकानुशतके होते, हे हिंदू लोकांचे परम दुर्भाग्य होय, असे लोकहितवादींना वाटते. 'लोक समजतात की, हे धर्मरक्षक आहेत. परंतु हे अधर्म वृद्धी करणारे होत. समाजाचे नेतृत्व करण्यास आवश्यक असा एकही गुण त्यांच्या अंगी नाही. एकास लाथ मारली तर दुसरा का म्हणावयाचा नाही. इतके हे भित्रे, रांड्ये व निर्बल आहेत. यांच्यामध्ये साहस, धैर्य आणि खरेपणा प्रायशः नाहीत. गोड खाण्यास मिळाले की सर्व ब्राह्मण एकत्र डोंगळ्याप्रमाणे जमतात व मग त्यांचे अवधान फार लागते. पण राज्यकारभाराची किंवा ज्ञानवृद्धीची सभा असेल तर हालणार नाहीत.' (पत्र क्र. ४८). 'आमचे लोकांत ब्राह्मण पुढारी झाले याजमुळे फार घात झाला. जर कुळंबी, क्षत्रिय पुढारी असते तर बरे झाले असते. कारण ब्राह्मणांच्या हातापायांत बिड्या आहेत. ते परदेशात जाणार नाहीत, परभाषा शिकून ज्ञान मिळवणार नाहीत. असे ब्राह्मण लोक प्रतिबंधात पडले व त्यांच्यामुळे इतर जातींचे लोक सर्व प्रतिबंधात पडून आंधळे झाले, हे मोठे वाईट झाले.' (पत्र क्र. ९६).
लोकहितवादींनी स्वकालीन ब्राह्मणांवर जी कठोर टीका केली ती त्यांच्या अज्ञान, विपरीत ज्ञान, अहंता, लोक, लाचारी या अवगुणांबद्दल होती आणि ती प्राधान्याने भट, भिक्षुक, शास्त्रीपंडित, वैदिक यांच्यावर होती, पण त्यात जातिद्वेषाचा अंशही नव्हता. कारण गुणसंपन्न, विद्वान ब्राह्मणांबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी आदर व्यक्त केला आहे. प्रशंसोद्गार काढले आहेत. ते म्हणतात, 'ब्राह्मणांचा स्वधर्म असा की आपली सद्-वर्तणूक आणि पवित्रपणा बाळगून विचार करीत अरण्यात स्वस्थ बसावे. म्हणजे तेच ऋषी व मुनी होत, व असे त्यांचे कर्म पवित्र व वागणूक निर्दोष म्हणून राजे त्या ब्राह्मणांस थरथर कापत होते व सर्व लोक त्यांचे भय बाळगीत होते. ते ब्राह्मण आपल्या सत्कर्मे करून सर्वांस सुशिक्षा लावीत होते व धर्मसुधारणेचा व लोकहिताचा विचार करीत होते. पण त्या प्रकारचा एक तरी ब्राह्मण काशीपासून रामेश्वरापर्यंत आता आहे काय ?' (पत्र क्र. २२). याच पत्रात प्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे यांचे उदाहरण देऊन ते म्हणतात, 'पेशवाईत एकच ब्राह्मण होता आणि तो जोपर्यंत होता तोपर्यंत राज्य कृतयुगाप्रमाणे चालले. त्या ब्राह्मणाचे नाव रामशास्त्री. आपले अकलेस आले ते श्रीमंतांसही सांगण्यास त्याने भीड धरली नाही. तोच धन्य !' इतरही अनेक पत्रांत प्राचीन कालच्या ब्राह्मणांविषयी त्यांनी असाच आदर प्रकट केला आहे व पुढील ब्राह्मणांवर टीका केली आहे. 'प्राचीन काळी हिंदू लोकांनी विद्या बहुत केल्या. पुढे ब्राह्मण लोकांनी नवीन विद्या करण्याचे सोडून दिले व वेदपाठ करू लागले. त्यांनी अर्थ सोडून दिला आणि धर्मशास्त्रात असे आहे की, आपला कुलाचार रक्षावा. त्याप्रमाणे जे बापाने केले तेच मुलाने करावे अशी समजूत पडली आणि जो जो हे मूर्ख होत चालले तो तो मागले लोक त्यांस देवासारखे दिसू लागले.' (पत्र क्र. ६१). त्यांच्या मते साधारण शंकराचार्यांच्या काळापर्यंत म्हणजे इसवी सनाच्या सातव्या आठव्या शतकापर्यंत ब्राह्मण खऱ्या विद्येची आराधना करीत, तप करीत. म्हणून त्यांना नेतृत्व करण्याचे सामर्थ्य होते. पुढे विद्योपासना संपली व त्यामुळे त्यांचा व त्यांच्याबरोबर समाजाचाही अधःपात झाला.
१०. जसे ब्राह्मण तसे सरदार:- लोकहितवादींनी ब्राह्मण, शास्त्रीपंडित, भटभिक्षुक यांवर टीका केली तशी सरदार, राजे लोकांच्यावरही शतपत्रांतून प्रखर टीका केली आहे. शास्त्रीपंडितांना विद्येची आवड नव्हती आणि सरदारांना होती असे मुळीच नाही. त्यांना लोकहिताची चिंता नव्हती आणि त्यांना होती असेही नाही. स्वार्थ, लाचारी ब्राह्मणांना सुटली नव्हती तशीच त्यांनाही सुटली नव्हती. त्यामुळे समाजाचे नेतृत्व करण्यास ते तितकेच नालायक होते. लोकहितवादी म्हणतात, 'आमचे राजे किती मूर्ख असतात ते बाजीराव पेशवा, सातारचा राजा व दौलतराव शिंदे यांची उदाहरणे घ्या म्हणजे समजेल. सातारचा राजा एखादे चित्र सजवून न्यावे तसा रेसिडेंटाकडे जातो. काही न्यायकारभार करीत नाही. बसला असता तेथून लोकांनी हात धरून उचलले पाहिजे ही त्याची शक्ती ! राज्यात खबर काय आहे त्यास ठाऊक नाही. रयतेकरवी विद्या करविणे ठाऊक नाही. किती एक सरदार इतके मूर्ख आहेत की, ते साहेबलोकांना म्हणतात, तुम्ही देवांप्रमाणे आम्हांस आहां. तुम्ही जे कराल ते होईल.' (पत्र क्र. ७८). 'पुण्यात लायब्ररी केली पण ग्रंथ वाचावयास सरदार लोक येत नाहीत. त्याविषयी मला असे वाटते की, आम्ही थोर, चार शिपाई, घोडे, अबदागीर, बरोबर घेतल्यावाचून कधी बाहेर पडत नाही. तेव्हा या लायब्ररीतून मुलासारखे शिकावयास जावयाची त्यांस लज्जा वाटत असेल. अज्ञानामुळे व अनश्रुतपणामुळे त्यांची अशी अवस्था झाली. तत्रापि तिचा परिहारोपाय ते ग्रहण करीत नाहीत, हे आश्चर्य आहे.' (पत्र क्र. ३). 'पन्नास कुळंबी गावातील नांगर धरून मेहनत करतात आणि एक जहागीरदार किंवा इनामदार त्यांस फक्त कोंडा ठेवून त्यांचे दाणे घेतो व आपण रेशीमकाठी धोतरे नेसतो व कामकाज काही करीत नाही. एका राजाचे पोर क्षयी असते, परंतु त्याचे सर्व लोक आर्जव करतात आणि त्यास सर्व दौलत देतात व आपण उपाशी मरतात. बरे, त्याने स्वत: काही काम केले आहे काय ? नाही ! तत्रापि लोक आंधळ्यासारखे त्यास बलिष्ठ मानतात !'
४. स्त्रीजीवन
जातिभेद, चातुर्वर्ण्य, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व या सर्वांच्या बुडाशी जी जन्मनिष्ठ उच्चनीचता असते ती समाजाला जशी अत्यंत घातक असते तशीच स्त्रीपुरुषातील विषमताही असते. स्त्रीला समाजात पुरुषासारखी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावाचून तिच्या जीवनाचा विकास होणे शक्य नाही आणि तो समाजही तुलनेने पंगूच राहणार. हे जाणूनच लोकहितवादींनी स्त्रीपुरुष समतेचा सर्व वर्णांच्या व जातींच्या समतेइतकाच आग्रह धरलेला दिसतो. स्त्रीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अतिशय सहानुभूतीची, उदार व आजही अद्ययावत वाटावी अशी आहे, हे शतपत्रे वाचीत असताना पदोपदी प्रत्ययास येत असते.
१. स्त्रीची प्रतिष्ठा :- 'ज्या देशात स्त्रियांचे अधिकार लोक मानीत नाहीत, त्या देशात लोकांची स्थिती वाईट असते.' असे आपले मत लोकहितवादींनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणतात. 'सांप्रत हिंदुलोकांत फारच मूर्खपणा आहे. यास्तव स्त्रियांची दुर्दशा फार आहे. प्राचीन काळी असे नव्हते. मागील काळचे कथेवरून पाहता असे दिसते की, पूर्वी हिंदू लोकांत स्त्रियांचा मान फार होता. पुण्याहवाचन वगैरे धर्मसंबंधी काही एक कर्म स्त्री बरोबर असल्यावाचून होत नाही. राज्याभिषेकातही राणीस फार मान असे. यावरून स्त्रियांचा प्रमुखपणा मानला आहे असे दिसते. पुढे मुसलमानांच्या अनुकरणाने त्यांच्या रानटी चाली हिंदू लोकांस लागल्या. धर्मातही त्यांचे अनुकरण होऊ लागले. हिंदू लोक ताबूत करू लागले, फकीर होऊ लागले, धर्मभ्रष्ट झाले. त्यामुळे हिंदू लोक स्त्रियांचा अपमान करून त्यांस जनावराप्रमाणे मानू लागले. पूर्वी रामाबरोबर सीता सभेत बसत होती. पांडव द्रौपदीसह बसत होते. पण लोकांची मने आता इतकी बिघडली आहेत की, जर त्यांस हे सांगितले तर ते देव होते, असा जबाब देतात. परंतु असे लक्षात आणीत नाहीत की ती माणसेच होती.' (पत्र क्र. ३०).
२. सध्याचा दृष्टिकोन :- 'अशा वृत्तीमुळे सांप्रत काळी ब्राह्मण लोकांत स्त्रियांचे हाल व विपत्ती बहुत होतात. कन्या झाली म्हरजे लोक नाक मुरडतात. त्यांना वाटते की माझे घरात ही अवदसाच शिरली.' (पत्र क्र. १५). 'हे हाल व विपत्ती, ही जनावरासारखी अवस्था, ही ज्ञानशून्यता व पुरुषांची क्रूरता प्राचीन शास्त्राधारे बहुत दिवस चालली. पण आता तरी हा ईश्वरी क्षोभ जावो व जसे पुरुष तशा स्त्रिया आहेत, असे आंधळ्या हिंदू लोकांस समजो. ही माझी अतिशय तीव्र इच्छा आहे; तर जे सुधारक हिंदू असतील त्यांनी या कामास निर्भयपणे प्रारंभ करावा.'(पत्र क्र. १६).
स्त्रियांच्या सुधारणेविषयीची आपली तळमळ लोकहितवादींनी याप्रमाणे अनेक पत्रांत व्यक्त केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या दुःस्थितीच्या कारणांनी, हीन दुष्ट रूढीची चर्चा करून त्यावर उपाययोजनाही सांगितली आहे. सतीची चाल, बालविवाहपद्धती, विधवाविवाहाची बंदी आणि स्त्रीला अज्ञानात ठेवण्याची प्रथा या सर्व रूढींवर व त्यांना आधारभूत असलेल्या शस्त्रांवर लोकहितवादींनी अतिशय कडक टीका केली आहे. ही पत्रे लिहीत असताना स्वतःच्या कन्येविषयीच्या वात्सल्याने उमाळा येऊन लिहावे तसं लोकहितवादींनी लिहिले आहे.
३. बालविवाह :- बालविवाहाच्या चालीने आपल्या समाजाचे सर्व कर्तृत्व मारले गेले आहे व आपला अनेक प्रकारे नाश झाला आहे असे लोकहितवादींचे निश्चित मत झाले होते. शतपत्रांतून त्यांनी ते अनेक ठिकाणी मांडले आहे. 'लोक डोळेझाक करून आपल्या पोरांची व पोरींची त्वरित लग्ने करतात. येणेकरून दोघांचे दुःख वाढते. बापास लहानपणी पोरे व सुना चांगल्या दिसतात परंतु त्याचे पाठीमागे त्यांचे हाल कुत्रा खात नाही. याचा विचार लोक करीत नाहीत व लग्नाची घाई करतात. येणे करून लोक अल्पजीवी, पराक्रमहीन व मूर्ख झाले आहेत. पंधरावीस वर्षांचा मुलगा झाला नाही तोच लोक म्हणतात की, लग्न का झाले नाही ? आणि मग आईबापांचा अगदी प्राण जाऊ लागतो. या मूर्खपणास काय म्हणावे ?' (पत्र क्र. ५३). लोकहितवादी म्हणतात की, 'आईबापांनी मुलांना शहाणे करण्याची फक्त जबाबदारी घ्यावी. पुढे त्यांचे लग्न ती स्वसामर्थ्याने करतील. त्याची काळजी आईबापांनी करू नये. परंतु रोजगारधंदा नाही, शहाणपण नाही व पुढे कसा निघतो याचा अंकूर नाही, तोच त्याचे गळ्यात मुलगी बांधून जोखिमात घालावा व त्याची विद्या, आयुष्य सर्व बुडवावे यात काय लाभ होतो ? लग्न बापाने केले म्हणजे त्यात काय मोक्षसाधन आहे ? ज्याचा तो आपले पराक्रमाने करील तर फार चांगले.' (पत्र क्र. २) लग्ने आपण करावी असा त्याहीपेक्षा क्रांतिकारक विचार त्यांनी मांडला आहे आणि तोही आगरकरांच्या आधी पन्नास वर्षे. 'लग्नाविषयी विचार' या पत्रात ते म्हणतात, 'मुलीचे लहानपण विद्या शिकविण्यात घालावे व पुढे सरासरी वीस वर्षांचे आत तिला कळू लागले म्हणजे तिचे व आईबापांचे संमतीने लग्न करावे. येणेकरून बहुत फायदे होतील.' यापुढे बालावृद्धविवाहाचा निषेध करून ते विचारतात, 'जर स्त्रियांना स्वसत्तेत लग्न करून दिले तर, अशा प्रेतरूप पुरुषास त्या वरतील काय ? तेव्हा या चालीचे फार वाईट वाटले होते. जे विद्या करण्याचे वय ते सासऱ्यास राहण्यात व हाल सोसण्यात जाते व लवकरच लग्नाचा संबंध झाल्यामुळे कोणतेही प्रकारे सुखावह होत नाही.' (पत्र क्र. १५)
विवाहाचे स्वातंत्र्य फक्त पुरुषांनाच असावे असे नाही, तर लोकहितवादींच्या मते ते स्त्रियांनाही असावे. आज आपण स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाची भाषा बोलतो. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र स्वयंपूर्ण आहे, दुसऱ्या कोणाच्या सुखाच्या अपेक्षेने तिने जगावे असे नसून तिचे व्यक्तित्व हे अंतिम मूल्य आहे, हे मत आज सर्वमान्य झाले आहे. लोकहितवादींनी आजचे शब्द, आजची भाषा वापरली नसली तरी त्यांचा आशय तोच आहे, हे वरील पत्रांवरून व पुढे दिलेल्या अनेक उताऱ्यांवरून ध्यानात येईल.
४. विधवाविवाह :- स्त्रियांच्या पुनर्विवाहासंबंधी लिहिताना लोकहितवादी अंतर्बाह्य संतप्त झालेले दिसतात. स्त्रियांवरील घोर अन्याय पाहून त्यांचे काळीज तिळतिळ तुटते व तो घोर अन्याय करणाऱ्या शास्त्रकारांना, ब्राह्मणांना कोणतीही शिक्षा केली तरी ती अपुरीच आहे असे त्यांना वाटते. ते म्हणतात, 'सांप्रत आपले लोकांमध्ये हा केवढा अनर्थ आहे की, स्त्रियांस पती वारल्यानंतर पुनरपि लग्ने करू देत नाहीत ! ईश्वराने स्त्री व पुरुष सारखे उत्पन्न केले व उभयतांचे अधिकार समसमान आहेत; असे असता पुरुषांस पुन्हा विवाहाची आज्ञा, स्त्रियांस मात्र मनाई, हा केवढा जुलूम आहे? 'जे शास्त्री, दशग्रंथी ब्राह्मण विधवाविवाहास विरोध करतात ते विद्वान कशाचे ?' जे गृहस्थ आपल्या कन्यांच्या पुनर्विवाहास संमती देत नाहीत त्यांना लोकहितवादी मांग, खाटीक, कन्यांचे वध करणारे अशा शब्दांनी संबोधितात. त्यांच्या मते हे कलियुगातील राक्षसच होत. त्यांना माणसे खाणारेच समजावे. 'जेव्हा पूर्वी हिंदू लोक भोळसर होते व पंडितांचे ऐकणारे होते, तेव्हा त्यांनी विधवांनी सती जावे म्हणून सांगितले व तेच लोकांनी कबूल करून आपल्या सुना, मुली, बहिणी जिवंत जाळल्या. हे राक्षस नव्हेत तर काय ?' (पत्र क्र. १०२)
५. अनाथ विधवा :- 'ब्राह्मण लोकांत लग्नाची घाई फार करतात. त्यामुळे कित्येक मुलामुलींची लग्ने आठव्या वर्षाच्या आतच होतात. आणि पुढे दोनचार वर्षांत विपरीत गोष्ट घडून भर्ता निधन पावतो. त्या काळी वास्तविक पाहिले तर त्या मुलीस आपली जाती किंवा नाते कळत नाही. केवळ बाला, अज्ञान आणि परस्वाधीन अशी अवस्था तिची असते. परंतु पुनरपि तिचा विवाह करीत नाहीत. आणि मायबाप आपले मन क्रूर, निर्दय करून तिची विपत्ती पाहतात. ती विपत्ती एक पर्यायाची नाही. परंतु अनेक पर्याय त्यात असतात.' (पत्र क्र. ९९). 'सासू-सासरे म्हणतात ही करंटी अवदसा नवऱ्यास मारून आम्हास तोंड कशास दाखविते?' माहेरी भाऊ-बहिणी म्हणतात, 'आमचे घरी तुझे काय आहे ? इथे कशास येतेस ?' बरे, रस्त्यात फिरले तर लोक म्हणतात, 'बोडकी पुढे आली, पाऊल कसे टाकावे ? बरे, कोणाचा आश्रय करावा तर तेथे टीका होते की, रंडकी मुंडकीस तूप-दही कशास हवे? गादी निजावयास कशाला हवी? तेव्हा तिला बैराग्यासारखे संसारात राहून दिवस काढावे लागतात. याप्रमाणे खाटकाचे घरी मेंढराचीही दुर्दशा होत नाही. तो त्यास एक वेळ सुरी लावतो त्या वेळेस मात्र काय दुःख होत असेल तेवढेच !' (पत्र क्र. ९०)
६. वपन :- ही एवढीच आपत्ती नाही. याच्या भरीला वपन ही घोर आपत्ती आहे. ती मनात येताच लोकहितवादींचा तर तोल अगदी सुटतो. ते म्हणतात, 'प्रत्येक ब्राह्मणाच्या घरात विधवा नाही असे नाही. आणि कित्येकांच्या कन्या अशा लहानपणी विधवा झालेल्या की त्यास नवरा म्हणजे काय ते ठाऊकदेखील नाही. आणि त्यांचे पुन्हा लग्न नाही; हा केवढा जुलूम आहे ! यामुळे किती पोरी व्यभिचारी बनतात, पोरे मारतात ! हजारे जीव मरतात आणि दुःखी होतात. म्हणून मुलगी विधवा झाली की तिला विद्रूप करून टाकावयाची. जरी तारुण्य व लावण्य असेल तरी बळेच वेडेविदरे स्वरूप करून बसतात आणि शास्त्रीपंडित म्हणतात की, त्या बाईने पूर्वजन्मी वाईट तपश्चर्या केली म्हणून हे फळ प्राप्त झाले. ईश्वराने उन्हात उभी केली. हे पूर्वजन्माचे दुष्कृत्याचे फळ. म्हणून आता ते करा आणि आमचे पोट जाळा. म्हणजे सुकृत होऊन सात जन्म वैधव्य प्राप्त होणार नाही. असे म्हणून गरीब व भोळे जिवास फसवितात.' (पत्र क्र. १०४).
७. मनू जर ईश्वर असता :- विधवाविवाहाच्या निषेधाचे समर्थन करताना शास्त्रीपंडित म्हणतात, की असे शास्त्र आहे व मनूने असे स्मृतीत लिहिले आहे. त्यावर लोकहितवादी विचारतात की, 'मनू हा जर ईश्वरांश होता तर त्याने अशीही सत्ता पृथ्वीवर का प्रकट केली नाही की जर आपण शास्त्र केले तर असेही करु की कोणे एकेही ब्राह्मण स्त्रीचा नवरा मरणार नाही. प्रथम स्त्री मरावी, नंतर नवरा मरावा. असा क्रम जर पृथ्वीवर घातला असता तर मी म्हटले असते की, मनू हा ईश्वर होता व ब्राह्मण हे ठीक करतात. पण स्त्रियांवरील या आपत्तीचा बंदोबस्त मनूच्याने होत नाही तर त्याचे शास्त्र फिरविण्यास काय चिंता आहे ?' (पत्र क्र. १५). मनूप्रमाणेच लोकहितवादींनी शंकराचार्यांचीही याच पत्रात संभावना केली आहे. 'वंशवृद्धी व्हावयाची तिचा नाश व किती एक जिवांस दुःख, याचे कारण कोणाचे लक्षात न येऊन शंकराचार्यांस मोठे धर्माचे अध्यक्ष म्हणवितात.'
८. धर्मपरिवर्तन अवश्य :- भावार्थ असा की ज्यांना स्त्रियांच्या आपत्तीचा विचार करावयाचा आहे, त्यांनी शास्त्राची गुलामगिरी प्रथम नष्ट केली पाहिजे व आपल्या बुद्धीने विचार केला पाहिजे. 'पुनर्विवाहाची चाल पाडणे हे शास्त्राविरुद्ध म्हणतात. परंतु लोकांचे हिताकरिता करावे, हेच माझे म्हणणे आहे. चांगली व्यवस्था होईल तो नियम करावा. जे पूर्वी शास्त्र लिहिले तेच सर्व काळ चालले पाहिजे असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. जसे पूर्वीचे वैद्यक होते; परंतु त्यात आता जी सुधारणा झाली असेल ती घेतली पाहिजे. तसेच ज्योतिष, तसेच धर्मशास्त्र यात फेरफार केले पाहिजेत व त्यातील नियम सुधारले पाहिजेत. जे सुखास आडवे येईल ते दूर करावे. लग्नाचा नियम हा धर्म नव्हे, ही रीत आहे. लोकांमध्ये व्यवस्था होण्याकरिता ती केली. ती जर वाईट असेल तर दुसरे नियम करण्यास चिंता नाही. ज्या काळी ऋषींनी लिहिले त्या काळी त्यांचे सर्व नियम लोकांचे सुखवृद्धीकरता व व्यवस्थेकरता लिहिले. त्यांनी लोकांचे घात व्हावे, असे जाणून लिहिले नाही. परंतु पुनर्विवाहाचा दुष्ट परिणाम सर्वांस समजला आहे तरी अंधपरंपरेस सर्व भितात इतकेच. यास्तव जितकी त्वरा होईल तितकी अशा समयी करावी, कारण एक घटका उशीर झाला तर हजारे स्त्रियांस समुद्रात लोटून दिल्याचे पातक डोकीवर बसते.'
९. सुधारणेसाठी कटाव करावा :- विधवांच्या पुनर्विवाहाची प्रथा रूढ करण्यास उपाय सांगताना लोकहितवादी सांगतात की, 'या कामी एकट्यादुकट्याने खर्ची पडू नये. या सुधारणेला संमती देणाऱ्या लोकांचा एक गट करावा म्हणजे ही गोष्ट सुलभ होईल. त्यांच्या मते असे होते की, प्रथम सभा घेतली तर चारपाचशे संमती सहज पडतील आणि इतके लोक एकत्र आल्यावर त्यास प्रतिबंध करणार कोण ? येऊन जाऊन शास्त्रीपंडितांच्या बहिष्काराचे भय. पण हजार दोन हजार लोक एकत्र झाले की ती एक प्रजाच होईल. एवढ्यांना जातीबाहेर टाकले तरी काय चिंता आहे ? ब्राह्मणांनी इंग्रजांना जातीबाहेर ठेवले तर त्यांचे काय कमी झाले ?' यावरून लोकहितवादी म्हणतात की, 'सुधारणा सामुदायिकरीत्या केली की शास्त्रीपंडितांच्या बहिष्काराचे भय नाही आणि अशा रीतीने, धिटाईने एका मोठ्या गटाने पायंडा पाडला की ज्या हिंदू गृहस्थाला सुधारणा करण्याची इच्छा होईल तो त्यांच्यात येईल आणि मग हळूहळू सर्व हिंदू लोक पुन्हा एकत्र येतील.' (पत्र क्र. १६). पुढे 'पुनर्विवाह' या पत्रात ब्राह्मणांनी एक कटाव करावा असे लोकहितवादींनी म्हटले आहे. त्याचा अर्थ हाच. 'परंतु मला असे वाटते की, सर्व ब्राह्मण जातीने निश्चय करून पुनर्विवाह चालू करण्याचा शिरस्ता घालावा व पंडितांचे ऐकू नये. दोन-चारशे लोकांनी असा एक कटाव केला म्हणजे पंडित उगीच राहतील किंवा सामील होतील. परंतु त्यांच्याने द्वेष होणार नाही व काही उपद्रव होणार नाही. पंडितांस सामर्थ्यहीन करण्यास एक कटाव मात्र पाहिजे.' (पत्र क्र. ९९). चाळीस वर्षांनी टिळकांनी सुधारणा करण्यास 'मंडळ स्थापणे' हाच उपाय सांगितला व तो अंमलात आणण्याचा काहीसा प्रयत्नही केला.
१०. स्त्रीशिक्षण हा उपाय :- स्त्रियांवरील आपत्तीचे निवारण करण्यासाठी रूढींच्या जाचातून त्यांची मुक्तता करण्यासाठी पुरुषांच्या दयाबुद्धीला आवाहन, शास्त्रीपंडितांनीची निर्भर्त्सना, सुधारकांचे मंडळ स्थापणे, इत्यादी उपाय लोकहितवादींनी सांगितले, पण त्यांच्या मते खरा उपाय म्हणजे शिक्षण देऊन स्त्रियांना शहाण्या करणे हा होय. हा उपाय जितका प्रभावी होईल तितका दुसरा कोणताच होणार नाही. ते म्हणतात, 'नवरा मरणे ही प्रारब्धाची गोष्ट आहे. व तत्संबंधी जुलूम फक्त हिंदू लोकांच्या अज्ञानी व गरीब बायकांनीच सोसला आहे. जेव्हा या स्त्रिया विद्वान होतील तेव्हा या पंडितास चरणसंपुष्टांनी पूजा अर्पण करतील यात संशय नाही. परंतु याच कारणास्तव ब्राह्मण लोक स्त्रियांस शहाण्या करण्यास असे प्रतिकूल आहेत. जुलमाने शास्त्र जेथे चालू आहे तेथे जरूरच आहे की, बायका जनावरांप्रमाणे नीच अवस्थेत राखल्या पाहिजेत. स्त्रिया सुशिक्षित होतील तेव्हा आपला अधिकार स्थापतील आणि संसारसुखास हानी करणारे पंडितांपासून असा तहनामाच करून घेतील. परंतु सांप्रत बायका अगदी जनावरे पडल्या म्हणून पंडितांस संधी सापडली आहे.' (पत्र क्र. १०५) दुसऱ्या एका पत्रात आपद्ग्रस्त स्त्रियांच्या आप्तजनांस आवाहन करून ते म्हणतात, 'तुम्ही शहाणे, विचार करणारे असून एवढा तुमच्या घरातील अनर्थ तुमच्याने दूर कसा होत नाही. तुम्ही आपल्या स्त्रिया व कन्या मूर्खपणाचे अवस्थेत जन्मापासून बाळगल्या आहेत. म्हणूनच हा जुलूम त्यांजवर चालतो व त्या सोसतात. जर त्यास थोडे ज्ञान असते, तर त्यांनी त्याचा विचार काढून जे पुनर्विवाह करू नये म्हणतात त्यांचे श्रीमुखात दिली असती, यात शंका नाही. परंतु अज्ञान व भोळसटपणामुळेच सर्वत्र जुलूम चालतो असा नेम आहे. त्याचप्रमाणे हे झाले आहेत. जर आपल्या देशात दहा स्त्रिया विद्वान असल्या आणि त्या जर विधवा झाल्या असत्या तर त्यांनी आपला पुनर्विवाह करण्याचे ठरविले असते. आणि दुष्ट ब्राम्हणांचे तंत्रात त्या कधी राहिल्या नसत्या, यात संशय नाही.' (पत्र क्र. १०)
या पत्रातील 'अज्ञान व भोळसटपणामुळे सर्वत्र जुलूम चालतो असा नेम आहे.' हे वाक्य रत्नाच्या मोलाचे आहे. भारताच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासाचे हे सूत्र आहे. येथे अस्पृश्यांवर, शूद्रांवर, स्त्रियांवर जुलूम झाला त्याला कारण हेच अज्ञान! या भूमीवर सारखी आक्रमणे झाली. त्यांना आपल्याला तोंड देता आले नाही. याला कारण तेच- ब्रिटिशांचे राज्य येथे दीर्घकाल टिकले यालाही हेच कारण. लोकहितवादींनी शंभर वर्षांपूर्वी हे जाणले यातच त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. समाजाच्या उन्नति- अवनतीचे सर्व रहस्यच त्यांनी या एका वाक्यात सांगितले आहे.
सतीच्या चालीविषयी लिहिताना लोकहितवादींनी हेच लिहिले आहे. आमच्या बायका अंधारात. त्यांस जसे सांगितले तसे वर्ततात. याजमुळे सती जाण्याचा पाठ पडला. जर बायका शहाण्या असत्या व त्यांस विद्या वगैरे शिकविण्याची चाल असती तर ज्यांनी त्यास प्रथम सती जाण्यास सांगितले त्यांच्या त्यांनी शेंड्या उपटून टाकल्या असत्या. अजूनही जर स्त्रियांस विद्या शिकविल्या तर त्या आपला पुनर्विवाह करतील आणि शास्त्री वगैरे जे आडवे येतील त्यांस पुसतील की, पुरुषांनी पाहिजे तितकी लग्ने करावी मग स्त्रीने नवरा मेल्यावरही दुसरा नवरा का करू नये ? आणि आपणच शास्त्रार्थ देऊन चालू करतील.' (पत्र क्र. ५५)
लोकहितवादींची विद्येच्या सामर्थ्यावर अशी नितान्त श्रद्धा असल्यामुळेच स्त्रियांचे दु:ख निवारण्यासाठी त्यांनी हा उपाय आग्रहाने आपल्या लोकांना सांगितला आहे. 'स्त्रियांस विद्या शिकविण्याचा लोकांनी जरूर विचार करावा. स्त्रिया वाईट, असे पुष्कळ लोक म्हणतात. कोणी म्हणतात, 'स्त्रीबुद्धी प्रलयं गत:' परंतु यांसारखे शतमूर्ख पृथ्वीत नाहीत. जसे पुरुष तशाच बायका स्वभावाने व बुद्धीने आहेत. जे लोक स्त्रियांना वाईट म्हणतात त्यांनी पक्के समजावे की ही मूर्खपणाची समजूत आहे.'
५. इंग्रज आणि राज्यसुधारणा
हिंदूच्या धर्मशास्त्रात, समाजरचनेत, त्यांच्या विद्येमध्ये आणि त्यांच्या जीवनाच्या इतर अंगोपांगांमध्ये कोणते दोष आहेत, वैगुण्ये आहेत ते सांगून लोकहितवादींनी त्यावर काही उपाययोजनाही सांगितली. शब्दप्रामाण्य जाऊन येथे बुद्धिप्रामाण्य आले पाहिजे, ब्राह्मणांचे व पुराणांचे वर्चस्व नष्ट झाले पाहिजे, धर्मकल्पना बदलल्या पाहिजेत, जातीजातींत व स्त्रीपुरुषांत समता प्रस्थापिली पाहिजे, स्त्रियांना व सर्व जातींना विद्या सुलभ करून दिली पाहिजे, इत्यादी अनेक उपाय त्यांनी सांगितले. पण त्या काळी एक मोठा प्रश्न होता. हे सर्व कोणी घडवून आणावयाचे? धर्मसुधारणा झाली पाहिजे. समाजसुधारणा झाली पाहिजे. हिंदू समाजात आमूलाग्र परिवर्तन झाले पाहिजे. सगळे खरे, पण हे कोणी करवयाचे ? समाजाचे नेतृत्व ब्राह्मणांकडे व सरदार लोकांकडे. त्यांच्या कर्तृत्वाचा व विद्येचा हिशेब वर दिलाच आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच तर या समाजाचा नाश झाला. त्यांचे नेतृत्व हे मोठे दुर्भाग्य ठरले ! मग या समाजाचे आता नेतृत्व कोणी करावयाचे ?
१. इंग्रज उद्धारकर्ते :- हे नेतृत्व इंग्रजांनी करावयाचे, तेच या देशाचा उद्धार करण्यास समर्थ आहेत असे लोकहितवादींचे या प्रश्नास उत्तर आहे. इंग्रज लोक हे हिंदू लोकांपेक्षा शतपट शहाणे आहेत, कर्तबगार आहेत, प्रामाणिक आहेत, राज्यकर्त्यांत जे गुण असावयास हवेत ते त्यांचे ठायी आहेत. पूर्वी पेशवाईत अगदी मोठा शहाणा म्हणजे नाना फडणीस. पण आता इंग्रजांमध्ये नानापेक्षा सहस्रशः शहाणे असे अनेक लोक आहेत. त्यांच्यातील कारभारी यांची बुद्धी विशाल, मसलत खोल, अनेक देशींचे वृत्तान्त त्यास माहीत व त्यांचे आपसांत एकमत. इंग्रजांत एक मेला की दुसरा तयार असतो. हा क्रम मराठी राज्यात नव्हता. तेव्हा आपली सध्याची दुरवस्था नष्ट करून आपली उन्नती साधण्याचे कार्य पार पाडण्यास इंग्रज हेच लायक आहेत, असे लोकहितवादींचे निश्चित मत होते. (पत्र. क्र. ३८, ४१)
२. ईश्वरी योजना :- आपला उद्धार इंग्रजांच्या हातून होईल असे लोकहितवादींचे नुसते मत होते असे नाही. तशी ईश्वरी योजनाच आहे अशी त्यांची श्रद्धा होती. ते म्हणतात, 'ईश्वर सर्वज्ञ आहे. तो असा की जसे जसे योजावयाचे तसे तो योजतो. त्याने क्षुधा केली आहे तर अन्नही तो योजतो. म्हणून एक राज्य जाते व दुसरे होते. अशा मोठाल्या घालमेली होतात त्या भगवंताचे प्रेरणेशिवाय घडत नाहीत. तेव्हा हिंदू लोकांचे मूळचे राज्य मुसलमानांनी घेतले व त्याजकडे चारपाचशे वर्षे राहून आता सर्व भरतखंड इंग्रजांचे अंमलात गेले. या गोष्टी ईश्वराने चांगलेपणाकरिताच योजिल्या आहेत असे मला वाटते. पूर्वी हिंदू लोक शहाणे होते. आता त्यांचे शहाणपण नाहीसे झाले आहे. ते शहाणपण हिंदू लोकांस पुन्हा प्राप्त व्हावे एतदर्थ ईश्वराने हा मुलूख इंग्रजांचे ताब्यात दिला आहे. कारण सांप्रत इंग्रज लोक हिंदूंपेक्षा शंभरपट शहाणे झाले आहेत.' (पत्र क्र. १२) 'इंग्लिश राज्याची आवश्यकता' या पत्रात पुन्हा हाच विचार त्यांनी मांडला आहे. 'इंग्रज लोक याणी इकडे राज्य संपादन केले याचे कारण काय ? याचा विचार करता असे दिसते की, हिंदू लोकांमध्ये मूर्खपणा फार वाढला, तो दूर होण्याकरिताच गुरू दूर देशातून इकडे ईश्वराने पाठविले आहेत. हिंदू लोकांस आता जागृती आली, पृथ्वीवर कोठे काय आहे हे कळू लागले. हे सर्व इंग्रजांमुळे झाले. ईश्वराने ही शहाणपणानेच योजना केली आहे. लोकांची झोप जाण्यास दुसरा इलाज नव्हता. सती जाणे, पोरे मारणे, जगन्नाथाचा रथ उरावर घेणे, इत्यादी अघोरी व लज्जास्पद चालींमुळे ईश्वराचा क्षोभ अत्यंत जहाला. तेव्हा दुष्ट लोकांस ताळ्यावर आणण्यास ईश्वराने इंग्रज सरकारची योजना केली.' (पत्र क्र. ४६) 'मुख्य आमचे बोलण्याचा येथून प्रारंभ आहे की, ज्या गोष्टी ईश्वर घडवून आणतो त्या वाईटाकरिता नसतात. मनुष्याचे ज्ञान थोडे म्हणून त्या वाईट, असा प्रथम भास होतो. तरी शेवटी त्यापासून मोठा उपयोग असतो. हिंदुस्थानचे लोक हे फार मूर्ख व धर्मकर्म सोडून अनाचारास प्रवर्तले. यास्तव ईश्वराने या देशात इंग्रजांची प्रेरणा केली आहे.' (पत्र क्र. ५४)
३. पूर्वीच्या राज्याशी तुलना (इंग्रजी राज्यापासून लाभ) :- त्या काळी पुष्कळ शास्त्री- पंडित त्याप्रमाणे ब्राह्मण व मराठा सरदार आपले राज्य गेले व इंग्रजांचे राज्य आले, म्हणून हळहळत असत, संतापत असत. परमेश्वराने अवतार घेऊन पूर्वी रावणास, दुर्योधनस, जरासंधास जसे मारिले तसेच आता व्हावे, अशी इच्छा व्यक्त करीत असत. आपले राज्य पुन्हा आले तर आपण सुखी होऊ असे त्यांस वाटत असे. त्यांचा हा भ्रम नाहीसा व्हावा म्हणून लोकहितवादींनी पूर्वीच्या राज्यांचे वर्णन करून तेथे कशी अंदाधुंदी होती, पेंढारशाही होती, तशी राज्ये पुन्हा झाली, तर काय अनर्थ घडतील, ते अनेक पत्रांतून तपशिलाने सांगितले आहे व परोपरीने इंग्रजांचे राज्यच या देशात आज कसे हितावह आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 'इंग्रज सरकार या देशात आहेत याविषयी, लोक उघड नाही तरी मनातले मनात कुरकूर पुष्कळ करतात, व मुख्यत्वेकरून भट, पंडित, शास्त्री हे तर फार हैराण आहेत; परंतु माझे मत असे आहे की, या देशास हेच सरकार ठीक आहे. मागले सरकार वाईट व मूर्ख होते. जिकडे तिकडे जुलूम होता. त्याने देशाची सुधारणा व विद्यावृद्धी काहीच केली नाही. फक्त भट, वैदिक व मूर्ख लोकांचे पोषण करून रक्षिले. तसेच पेंढारी, रामोशी, ठक, डाकवदे इत्यादी लोकांस रक्षिले आणि देशात लूट, सांड पुष्कळ करीत असत. हल्ली आमचे लोकांस राज्य मिळाले तर तीच अवस्था करतील.' (पत्र क्र. ९४). 'जेव्हा मराठे लोक शिंदे, होळकर, परमुलखात (म्हणजे त्यांचे समजुतीप्रमाणे परमुलख- परंतु वास्तविक पाहिले तर मुलूख एकच.) गेले तेव्हा त्यांची वर्तणूक कशी होती ? ते किती गावं जाळीत होते ? शहरे व सावकार किती लुटीत होते ? या गोष्टीचे स्मरण ठेविले तर इंग्रज बरे आहेत हे लक्षात येईल. इथले लोक सुधारून मूर्खपणाचे शृंखलेपासून मुक्त व्हावे, याजकरिता त्यांचा उद्योग बहुत चालला आहे. शिंदे, होळकर लक्ष्मीचे अंधकारात होते तेव्हा त्यांनी ५०,००० पेंढारी लुटावयाचे कामावर ठेवले होते. त्यांचे निर्मूळ इंग्रजांनी केले. जे राज्य करतात तेच लुटारू लोकांस बाळगतात, हे कधी कोणी ऐकले होते काय ? जे राजे चोरांचे रक्षण करतात आणि लुटारू लोकांस बाळगतात, त्यांचे वर्णन काय करावे ! किती काळ ब्राह्मणी राज्य चालते तरी सती बंद होती ना. पेंढार मोडते ना, व बालहत्या बुडती ना. त्या वेळी कोणी स्त्रियांस जाळून टाकीत, कोणी जिवंत पुरत, कोणी गळ्यात दगड बांधून बुडवीत. हे सर्व मूर्खपण कधी तरी हिंदू लोकांच्याने बंद करवले असते काय ? नाही.' (पत्र क्र. ३८) 'तेव्हा इंग्रजांचा अंमल हा हंगाम बरा आहे. पेशव्याचे राज्यात कोणी काही सुख भोगिले. परंतु विचार केला नाही, खाल्ले मात्र, शेवटी दुसऱ्याने तोंडात मारून नेले, तेव्हा डोळे उघडले. तस्मात् इंग्रजांचे अंमलाचा परिणाम चांगला, पण लोक शहाणे होण्यास खुशी नाहीत. तरी ईश्वर जबरीने करवितो आहे. तुम्ही नको म्हणाल तरी तो ऐकणार नाही. ही त्याची दया मानावी. ईश्वर दयाळू आहे.' (पत्र क्र. १२). पूर्वीची राज्ये अशी लुटारू होती पण आता आमच्या लोकांत सुधारणा झाली आहे. असे कोणी म्हणेल तर त्यांना लोकहितवादी सांगतात, 'अजूनही राज्यकर्त्यांचे गुण आमच्या ठायी नाहीत. स्वदेशीय राज्ये हल्ली आहेत. त्यात काय गर्दी आहे ती पाहावी म्हणजे बाजीरावाचे मूर्तिमंत राज्य डोळ्यांपुढे उभे राहते. मामलेदार मक्ते चढ करून रयत लुटतात. जमा येते ती रांडा, गोंधळी, भट, आर्जवी, ढोंगी वगैरे खाऊन जातात. हेच बाजीरावाने केले व अद्याप मराठी राज्यात हेच आहे. उजाडले किंवा मावळले, याची त्यास ख़बर नसते. फक्त जनावराप्रमाणे खाणे, निजणे एवढ्यापुरती काळजी.' (पत्र क्र. ४६). अशी सर्व तुलना करून लोकहितवादी आपल्या लोकांस विनवून सांगतात की, 'हिंदू लोकांनी याचा विचार पाहावा. या साक्षात् शहाणे लोकांची गाठ पडून हिंदू लोकांच्या वाईट चाली बहुत सुटल्या व आणखीही किती एक सुटतील आणि त्यांची मने शुद्ध होऊन त्यास राज्यकारभार, व्यापारधंदा कसा करावा हे ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणात होत नाही. तीस पुष्कळ विलंब लागतो. लहान मुलास हुशार होण्यास दहावीस वर्षं लागतात; मग देश चांगला होण्यास अर्थातच दोनशे-चारशे वर्षं लागतील. तापर्यंत या लोकांस दुःख आहे. परंतु त्यास उपाय नाही. जशी शाळेमध्ये मुलांनी शिक्षा घेतली पाहिजे, तद्वत् हे आहे. याचे उत्तम फळ पुढे येईल.' (पत्र क्र. ५४) .
४. राज्यसुधारणेस २०० वर्षे लागतील :- इंग्रजांचे हाताखाली शिक्षण घेतल्यावर आपण शहाणे होणार, पण यास किती काल लागेल ? लोकहितवादींच्या मते सुमारे दोनशे वर्षे लागतील. वरील पत्रात त्यांनी दोनशे-चारशे वर्षं म्हटले आहे. अन्यत्र एके ठिकाणी ५०० वर्षं म्हटले आहे. पण या वरील पत्रातच शेवटी समारोप करताना यास दोनशे वर्षे तरी पाहिजे असे म्हटले आहे. त्यांचे मत असे की, आपल्या लोकांच्या पायातील शृंखला तुटल्या की ते शहाणे होतील, त्यांना राज्यकारभाराचे कर्तृत्व लाभेल. व्यापारात, नव्या विद्येत ते निपुण होतील व मग आपणच इंग्रजांस सांगतील की, आता तुम्ही आपले देशास जावे. आता आम्हास तुमचे गुरुत्व नको. तुम्ही पाहिजे तर व्यापारापुरते इकडे येत जा. आमचे प्रजेचे आम्ही रक्षण करतो तसे तुमचेही करू. परंतु तुमचे वर्चस्व नको. याप्रमाणे या देशाची गती होईल आणि नवीन राज्यस्थिती चांगले रीतीची होईल. पण यास दोनशे वर्षे तरी पाहिजेत. (पत्र क्र. ५४). 'आपले लोक इंग्रजांस आपण जावे म्हणून सांगतील.' असे या पत्रात म्हटले आहे. दुसऱ्या एका पत्रात 'हिंदू लोकांचा मूर्खपणा जाईल तेव्हा ईश्वर इंग्रजांस या देशातून जाण्याची आज्ञा करील.' असे म्हटले आहे. तेव्हा 'ईश्वरी योजना' या कल्पनेचा पगडा त्यांच्या मनावर बराच होता असे दिसते.
५. देश ही मातोश्री :- इंग्रजांच्या राज्यात, त्यांच्या शिक्षेखाली आपण राहिलो म्हणजे आपले अज्ञान, आपला मूर्खपणा सर्व नाहीसा होऊन आपण आपला राज्यकारभार करण्यास समर्थ होऊ, असे अनेक वार सांगून इंग्रजांचे हाताखाली आपण कोणते शिक्षण घ्यावयाचे, त्याचे स्वरूपही लोकहितवादींनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रनिष्ठा व लोकशाही या पाश्चात्त्य देशातील महाशक्ती होत. त्यांच्या बळावरच ती राष्ट्रे उन्नत झाली, समर्थ झाली, हे इतिहास तज्ज्ञांस माहीत आहेच. लोकहितवादींनी नेमक्या याच शक्तीची उपासना करण्यास आपल्या लोकांना सांगितले आहे. नव्या परिस्थितीचे त्यांना किती अचूक आकलन झाले होते ते यावरून दिसून येते. 'स्वदेशप्रीती' या पत्रात ते म्हणतात, 'जसे आपण मातोश्रींस वंद्य मानतो व तिच्या पोटी जे आले ते सर्व बंधुप्रीतीने वागतात, तद्वत् या जमिनीवर जे आपण आहोत ते सर्व एकमेकांचे बंधू आहोत व हा देश आपणा सर्वांची मातोश्री आहे. याजकरिता कोणी सुखी व द्रव्यवान असतील, त्यांनी बहुत लोक उपाशी मरतात व दरिद्री आहेत त्यांचे रक्षणाचा प्रयत्न करावा. आपण सर्वांनी आज दोन हजार वर्षेपर्यंत यथेच्छ सुखाने झोप घेतली व काही उद्योग केला नाही म्हणून आता तरी जागृत होऊन काय आहे ते पाहू व बुद्धीचा उपयोग करू.' 'स्वदेशाचे हितास झटावे,' हीच लोकहितवादींच्या मते मुख्य धर्मसुधारणा आहे. (पत्र क्र. ६७). युरोप याच सुधारणेमुळे उन्नत झाला हे सांगताना ते म्हणतात, 'आपले देशाचे हित करावे हा मुख्य धर्म युरोपात समजतात.' (पत्र क्र. १४).
६. भारतात राजा विष्णूचा अवतार :- राजनिष्ठा ही जशी एक शक्ती तशीच लोकशाही ही दुसरी शक्ती होय. 'हिंदू लोक मूर्ख आहेत. राज्यसुधारण म्हणजे काय हे त्यांस कळत नाही. कारण राजसत्तेवाचून दुसरी सत्ता त्यास माहीत नाही. एशिया खंडातील देशात बहुधा एक राजा असून स्वैर अंमल करतो. त्याची रयत त्याचे गुलामाप्रमाणे व तिचा नाश-नफा करण्याविषयी संपूर्ण मुखत्यारी राजास असते. युरोपात जर काही अपाय किंवा वाईट वर्तणूक राजाकडून किंवा त्याचे प्रधानाकडून होईल तर लोक त्यास बडतर्फ करतात. ही गोष्ट आपले इकडील लोकांस फार अशक्य व चमत्कारिक वाटेल. कारण की इकडील लोकांस राजा म्हणजे विष्णूचा अवतार व प्रधान म्हणजे ब्रह्मदेव वाटतो. त्यांनी अन्याय केला तरी म्हणतात की, राजाने सर्वस्व लुटले तर तेथे दुःख करून काय करावयाचे ? तेव्हा या लोकांस सुधारणा माहीत नाही. मी जाणतो की लोक मूर्ख आहेत, त्यांस विचार करण्यास शक्ती नाही. तत्राप मला एक उपाय सुचला आहे तो मी लिहून प्रगट करतो.' (पत्रे क्र. १४ व २५). अशी सर्व प्रस्तावना करून लोकहितवादींनी आपली पार्लमेंट किंवा लोकसभा याबद्दलची कल्पना मांडली आहे, ती अशी :
७. लोकांची सभा :- हल्ली येथे कंपनीसरकारचे राज्य आहे. त्यात लोकांस काही अखत्यार नाही. इंग्रजांचे स्वदेशी राज्यात तसे नाही. तेथील लोकांस राज्यात हात घालण्याचा व कायदे करण्याचा अधिकार आहे. तेथील राजा जडजाचे नाझराप्रमाणे आहे. लोकांची सभा म्हणजे पार्लमेंट हे कायदे फर्मावतात व राजा त्याबरहुकूम वहिवाट करतो. येणे करून लोकांस पाहिजे तसे राज्य चालते. एक राजा स्व-इच्छेने राज्य करतो त्यापेक्षा ही युक्ती खरी आहे व याप्रमाणे हिंदुस्थानात राज्य चालेल तर फार चांगले होईल. जे सूज्ञ लोक असतील, त्यास मोठे जाग्यावर व अधिकारावर नेमता येईल, असे इकडे राज्य असावे.
१८३४ साली ईस्ट इंडिया कंपनीला इंग्रज सरकारने हिंदुस्थानात २० वर्षे राज्य करण्याची सनद दिली होती. तिची मुदत १८५४ साली भरणार होती. त्या वेळी विलायतेतील राणीसाहेबांस आमचे देशात पार्लमेंट ठेवावे असा अर्ज करावा, असे या पत्रात लोकहितवादींनी सुचविले होते. १८३४ साली काही इंग्लिश लोकांनी इंग्लंडच्या पद्धतीने हिंदुस्थानात राज्य चालविले, म्हणजे लोकांना स्वायत्तता द्यावी अशी सूचना केली होती. पण कंपनी सरकारने ते नाकारले. कारण कंपनीच्या मते हिंदू लोक स्वायत्त कारभाराला अगदी नालायक होते. तसे केल्यास हिंदुस्थानात बखेडा होईल. सर्वत्र बेबंद होईल, असे कंपनीने सांगितले. लोकहितवादी म्हणतात की, या गोष्टीला आता १८ वर्षे झाली. (हे पत्र १८४८ सालचे आहे.) व सनद पुन्हा देण्यास अजून सहा वर्षे अवधी आहे. इतक्या अवधीत कित्येक लोक शहाणे होतील व आपला कारभार करण्यास लायक होतील म्हणून राणीसाहेबांकडे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही.
८. पार्लमेंटचे स्वरूप :- लोकहितवादी म्हणतात, 'त्या अर्जात लिहावे की, हल्ली राज्यपद्धती आहे तीपासून आमचा फायदा नाही व आमचे राज्यासंबंधी हक्क चालत नाहीत व हिंदू लोक जसे तसे इंग्रज लोक मनुष्ये आहेत. याकरता इन्साफ बरोबर होण्याकरिता इंग्रज व नेटिव यांत सांप्रत जो भेद आहे तो मोडून एकसारखे होण्याकरिता हिंदुस्थानचे देशात पार्लमेंट ठेवावी व ही सभा मुंबईस भरवावी. या सभेत दर शहरातून एक व दर जिल्हयातून दोन अशी माणसे बसवावी. हे लोक सर्व जातीतील सारखे असावे. त्यात भट, गृहस्थ, शास्त्री, परभू, कुळंबी, मुसलमान, इंग्रज इत्यादी जे शहाणे असतील ते नेमावे व त्यांनी राज्य चालवावे. म्हणजे लोकांचा फार फायदा होईल. यास्तव लोकांचे हित पाहणारे आहेत त्यांनी हा बेत केला पाहिजे.' (पत्र क्र. २५).
लोकहितवादींनी त्यांच्या मनातील लोकसभेचे जे रूप वर्णिले ते थेट आजच्या लोकसभेसारखे आहे हे पाहून मन विस्मित होते. लोकांनी आपले मुखत्यार नेमावयाचे ! ते सर्व जातींतून निवडायचे, सर्व धर्माचे लोकांना अधिकार द्यावयाचा व त्यांनी राज्य चालवावयाचे ! ते सर्व लोक शहाणे असले पाहिजेत ही जी लोकहितवादींनी अट घातली आहे तेवढीच फक्त आज नाही.
९. या पद्धतीचे फायदे :- 'या पद्धतीने राज्य चालले म्हणजे दारिद्रय वगैरे बोभाट लोक सांगतात. हे त्वरित दूर होतील आणि इंग्रज लोक इकडील लोकांस मूर्ख समजतात, ते मत मोडेल आणि राज्याची उत्तम सुधारणा होऊन एके राजाचे अंमलात सुख काय व लोकसत्तात्मक राज्यात सुख काय, हे सहज दृष्टोत्पत्तीस येईल आणि मग शिंद्यांचे किंवा हैद्राबादचे राज्य चांगले की काय ते त्वरित ध्यानात येऊन राज्य चालविण्याचे रीतीची लोकांना माहितगारी होईल व एका राजाचे ताब्यात राहून त्याचा जुलूम सोसावयाची हिंदू लोकांस खोड लागली आहे ती ते विसरून जातील. त्याचप्रमाणे राज्य करण्यास गरीब व मातबर, नीच जातीचे व उच्च जातीचे लोक समान मानावे हे सर्वांस कळू लागेल. मात्र अशा सभेस जातीवर निवड होऊ नये. जे फार विद्वान व चांगले चालीचे लोक आहेत तेच नेमले पाहिजेत. मग त्यांची जात कोणतीही असो.' (पत्र क्र. २५)
१०. क्रान्ती (रिवोल्यूशन) :- देशप्रीती, लोकसभा यांच्याप्रमाणेच एका पत्रात लोकहितवादींनी राज्यसुधारणा, किंवा रिवोल्यूशन किंवा क्रांती याविषयी आपले विचार मांडले आहेत. त्या वेळी फ्रान्समध्ये १८४८ ची क्रांती झाली होती. तिच्या बातम्या इकडे आल्या होत्या. त्या अनुरोधाने हे पत्र (पत्र क्र. १४ - राज्यसुधारणा) त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या मते दंगा, बंड म्हणजे रिवोल्यूशन किंवा राज्यसुधारणा नव्हे. राज्यात बंदोबस्त कमी असला म्हणजे ठगपेंढाऱ्यांसारखे लोक जमा होतात व गरीब रयतेस लुटण्याकरता जागोजाग हल्ले करतात. त्यांचे नाव बंड. तोतया, चतुरसिंग, राघुभराऱ्या, पेंढारी यांनी दंगे केले त्यास बंडे म्हणावे, परंतु राज्यसुधारणा हे या रीतीचे बंड नव्हे. ज्या देशात लोक शहाणे व ज्ञानी व एकमेकांचे सहोदर बंधूंप्रमाणे हित पाहणारे असे आहेत, त्या देशात मात्र अशी राज्यसुधारणा होते. हिंदुस्थानसारख्या देशात ती व्हावयाची नाही. सांप्रत टोपकर लोक शहाणे आहेत व त्यांच्यामध्ये कित्येक चांगल्या व हितावह गोष्टी आहेत. त्या आपले लोकास अद्याप माहीत नाहीत. इंग्लंडात जॉन राजाकडून अन्याय झाले. तेव्हा सर्व रयतेने उठून त्याजकडून करार करून घेतला. तो करार म्हणजे तिकडील सर्व कायद्यांचे मूळ असून तो हल्लीपर्यंत चालू आहे. पुढे चार्लस राजाने पुनरपि अन्याय केले. तेव्हा लोकांनी न्यायसभा भरवून त्याचा गुन्हा शाबीत केला व त्यास शिरच्छेदाची सजा दिली. अशा गोष्टी तिकडे घडतात. त्या इकडे अनश्रुत आहेत.
लोकहितवादींच्या मते हिंदुस्थानच्या इतिहासात अशी राज्यसुधारणा- जिला रिवोल्यूशन म्हणता येईल अशी- पूर्वी कधी झाली नाही. मात्र अपवाद त्यांनी केला आहे. तो म्हणजे शिवाजीराजाचा. मराठ्यांचे व सर्व हिंदू लोकांचे राज्यासंबंधी माहात्म्य सरकारी पाचशे वर्षेपर्यंत मुसलमानांनी बळकाविले होते ते पुनरपि हिंदू लोकांचे हिंदू लोकांकडे शिवाजीचे कृत्यामुळे आले, तस्मात ती राज्यसुधारणा होय. शिवाजीचे मागे तसा सद्बुद्धिमान पुरुष झाला नाही. त्यामुळे ते कार्य तसेच राहिले. पण शिवाजी राज्यसुधारक म्हणावयास योग्य आहे, यात शंका नाही.
पण ही गोष्ट लोकहितवादींच्या मते अपवादात्मक होय. एकंदरीत पाहता हिंदू लोकांना राज्यसुधारणेचे सामर्थ्य नाही. यासाठी ईश्वराने इंग्रजांची योजना केली आहे. असे त्यांचे मत होते.
६. आर्थिक विचारसरणी
१. बंगाली पंडित व लोकहितवादी :- अगदी प्रारंभी म्हटले आहे की एखाद्या निष्णात वैद्याने रोग्याची परीक्षा करून अचूक निदान करावे व औषधयोजना करावी त्याप्रमाणे भारतीय राष्ट्रपुरुषाच्या बाबतीत लोकहितवादींनी केले. अज्ञान, शब्दप्रामाण्य, धर्मशास्त्र, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व, जातिभेद, स्त्रीजीवन, राजकारण या क्षेत्रात त्यांनी जी चिकित्सा केली तिचा ऊहापोह येथवर केला. आर्थिक क्षेत्राकडे आपण पाहिले तरी लोकहितवादींची प्रज्ञा तेथेही अशीच अकुंठित होती असे दिसून येईल. इंग्रजांचे सर्व वैभव हे त्यांचा व्यापार व त्यांची कारखानदारी आणि याच्या जोडीला त्यांचा विश्वसंचार, साहसी वृत्ती, उद्योगशीलता यांवर अवलंबून आहे हे लोकहितवादींनी जाणले होते. आज ती गोष्ट अगदी नित्याची झाली आहे. शाळकरी मुलांनासुद्धा या गोष्टी पाठ असतात. पण शंभर वर्षांपूर्वीचा काळ ध्यानी आणावा. त्या वेळी सर्व लोक सामान्य रयत, शास्त्रीपंडित व सरदार लोक इंग्रजांच्या अपूर्व वैभवाने, त्यांच्या पराक्रमाने, कर्तबगारीने विस्मित होऊन गेले होते व दिङ्मूढ झाले होते. आपला पराभव का झाला, पारतंत्र्य का आले, इंग्रज विजयी का झाले, याची काडीमात्र कल्पना त्यांना नव्हती. हे सर्व परमेश्वरी कृपेचे किंवा प्रारब्धाचे खेळ आहेत असे त्यास वाटत होते. आर्थिक व्यवहाराची, व्यापार, भांडवलसंचय, कारखानदारी, याची त्यांना कसलीही कल्पना नव्हती. पाश्चात्त्य विद्या नसणाऱ्या, अज्ञ व जुनाट जगात राहणाऱ्या लोकांचीच अशी स्थिती होती असे नव्हे, तर बंगालमधील राम मोहन रॉय यांच्यासारख्या नवविद्याविभूषित महाप्रज्ञावंतांचीही या आर्थिक उलाढालींच्या बाबतीत दिशाभूल झाली होती. ब्रिटिश भांडवलवाले, मळेवाले, इकडे येतात त्यामुळे आपला देश हळूहळू सधन होत आहे अशी त्यांची भ्रांत समजूत होती. मजुराला पूर्वी दरमहा दोन रुपये मिळत त्या ठिकाणी आता चार रुपये मिळू लागले, याचेच त्यांना कौतुक वाटत असे. युरोपातील व्यापाऱ्यांना येथे अनिर्बंधपणे येऊ द्यावे, ते व्यापारी व भांडवलदार सर्व देशभर पसरावे, त्यामुळे येथील कनिष्ठ व मध्यमवर्गाची स्थिती सुधारेल, असे राम मोहन रॉय व इतर बंगाली पुढारी यांना वाटत असे. पगारदार मध्यमवर्गाची स्थिती थोडी सुधारली होती. बाजारात कापड पूर्वपिक्षा बरेच स्वस्त मिळू लागले होते हे खरे, पण यावरून सर्व देश सधन सुखी होत आहे, असा भ्रामक निष्कर्ष बंगाली नेत्यांनी केला होता, तो भ्रांत होता. आचार्य शं. द. जावडेकर यांनी आपल्या 'आधुनिक भारत' या ग्रंथात बंगाली पुढाऱ्यांच्या या भ्रामक मतांचे विवेचन करून पुढे म्हटले आहे की, बंगालमधील तत्कालीन (१८२८) पुढाऱ्यांनी ही अर्थशास्त्रीय मते वाचली असता यानंतर वीस वर्षांच्या आतच स्वदेशी बहिष्काराचा पुकार करणाऱ्या लोकहितवादींच्या राष्ट्राभिमानाचे व दूरदर्शी व आर्थिक विचारसरणीचे कौतुक वाटू लागते. हिंदुस्थान सधन होत आहे. हे १८३० च्या सुमाराचे बंगाली पुढाऱ्यांचे मत आणि हिंदुस्थान निर्धन व बेकार होत आहे अशी लोकहितवादींनी प्रतिपादलेली विचारसरणी यांतील अंतर बऱ्याच दृष्टींनी बोधप्रत आहे, असे आम्हास वाटते. (आधुनिक भारत- पृष्ठ क्र. ६४-६८), लोकहितवादींच्या आर्थिक विचारसरणीचे महत्त्व कसे अनन्यसामान्य आहे, ते वरील उताऱ्यावरून ध्यानात येईल.२. स्वदेशी व बहिष्कार :- हिंदू लोक दरिद्री का झाले याची कारणे सांगताना ते म्हणतात की, या लोकांना उद्योग करावयास नको. ते पराकाष्ठेचे आळशी आहेत. अनेक भट लोकांना त्यांनी सांगून पाहिले की, तुम्ही नुसती कारकुनी करता किंवा जेवण्यासाठी आगंतुकी करता त्यापेक्षा दुसरा काही व्यापार करावा. त्यावर ते म्हणाले की, पेशवाईत आमचे यथास्थित चालले होते. आता चालत नाही. हे इंग्रजांचे पायगुणाने झाले. या सर्व मूर्खपणाची लोकहितवादींना चीड येत असे. म्हणून आपल्या लोकांना ते तळमळून उपदेश करीत असत. 'हिंदू लोकांनी काय करावे ?' या पत्रात ते म्हणतात, 'तूर्त दरिद्र मोडण्यास उपाय असा की, ब्राह्मण लोकांनी आपल्या मूर्खपणाच्या समजुती सोडाव्या व केवळ कारकून आणि भट हे दोनच रोजगार आम्ही करू असे म्हणू नये. मग कोणते रोजगार करावे म्हणाल तर कांच, कापड, सुरी, कात्री, लाकडी सामान, घड्याळे, चाबूक, यंत्रे इत्यादी पुष्कळ इंग्रज इकडे खपवतात. ही सर्व आपले लोकांनी करावयास शिकावे व येथे जो माल खपणार नाही तो दुसऱ्या देशास घेऊन जावा आणि तेथे विकावा. पुष्कळ देश आहेत; या गोष्टीचा शोध करावा व इंग्रजांचे देशचे सामान बंद करावे. किंबहुना आपले सामान त्यास द्यावे, परंतु त्यांचे आपण घेऊ नये. यास्तव आपल्यास जाडी, मोठी, कापडे नेसावयास लागली तर काय चिंता आहे ? परंतु आपले देशाचे रक्षण करावे. असे झाले म्हणजे बहुत रोजगार राहतील.' (पत्र क्र. ६०)
या शतकाच्या आरंभी राजकीय चळवळीत स्वदेशी व बहिष्कार (विलायती मालावरील बहिष्कार) यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. कारण इंग्रजांच्या राज्याचे लक्षण म्हरजे आर्थिक शोषण, धनाची लूट हे होय, हे त्या वेळच्या नेत्यांनी जाणले होते. हे जाणून त्याप्रमाणे चळवळ केल्याबद्दल आपण आज त्यांना धन्यवाद देतो. मग त्यांच्या आधी पन्नाससाठ वर्षे तोच विचार, जवळजवळ त्याच शब्दात, लोकहितवादींनी मांडला यासाठी त्यांना किती धन्यवाद द्यावेत !
३. व्यापार बुडाला :- 'स्वदेशी बहिष्कारा 'विषयीचा हाच विचार 'हिंदू लोकांचा व्यापार' या पत्रात त्यांनी जास्त स्पष्टपणे मांडला आहे. 'सांप्रत हिंदू लोक फार भिकारी होत चालले आहेत, व त्यांस रोजगार धंदा नाही. याचे कारण मला असे दिसते की, या लोकांचा व्यापार अगदी बुडला. इंग्रज व दुसऱ्या देशाचे लोक फार शहाणे होऊन या लोकांस सर्व जिनसा पुरवितात. आणि हे मुकाटयाने स्वस्ताईमुळे खरेदी करतात. म्हणून आपले लोकांनी कट करावा की, दुसरे मुलखाचा जिन्नस घ्यावयाचा नाही. आपले देशात पिकेल तेवढाच माल घ्यावा. आपले लोक कापडे जाडी करतात, परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करतात त्याच घ्याव्या म्हणजे या लोकांत व्यापार राहून इकडे सुख होईल. परंतु हे लोक असे करीत नाहीत. आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात. अजून दाणे (धान्य) परदेशातील येऊ लागले नाहीत. बाकी सर्व पाहावे ते परदेशाचे आहे. आमचे कपडे, आमची छत्री, आमची चाकू-कात्री, आमचे घड्याळ, आमची गाडी, आमची बुके, सर्व परदेशातील आहेत. यामुळे व्यापार बुडाला. उदमी, मजूर, कसबी, कारागीर घरी बसले. याजकरिता सर्वांनी कट करावा की, जे आपल्या देशात पिकेल तेच नेसू, तेच वापरू. ते कसेही असो आणि तितक्याच चांगल्या विद्या व जिन्नस उत्कृष्ट करावयाच्या विद्या शिकू. कापूस विणकरांनी असा बेत करावा की इंग्रजास इकडे तयार केलेली कापडे द्यावी, परंतु कापूस देऊ नये. मग हजारो खंडी कापूस (कच्चा माल) इकडून विलायतेस कशास जाईल ? असे झाले म्हणजे हे लोक सुखी होतील. सध्या परदेशाच्या भुलावणीने हाहाःकार झाला आहे. जो तो शेत करू लागला. दुसरा व्यापार नाही. पैसा दुसऱ्या देशात चालला. लाखोपती आहेत ते विलायती जिनसा घेतात. ते धान्य घेतात त्याची किंमत फक्त येथल्या रयतेकडे जाते. बाकी हजारो रुपये थेट विलायतेस जातात. याप्रमाणे हमेशा चालले आहे. तेव्हा कसा कट करणे वगैरे उपयोगी गोष्टी आहेत त्या पुराणिक, हरदास यांनी लोकांस सांगाव्या, त्या टाकून दुसऱ्या गोष्टी सांगतात आणि यांजकडे लक्ष देत नाहीत.' (पत्र क्र. ५७).
४. द्रव्याचा योग्य उपयोग :- व्यापार, कारखानदारी, स्वदेशी, बहिष्कार यांचे विवरण लोकहितवादींनी केले आहेच. पण याही पलीकडे जाऊन, अगदी मूलगामी चिंतन करून हिंदू लोकांच्या मनःप्रवृत्तीच याला कशाविरोधी आहेत त्याचेही विवेचन ते करतात. ते म्हणतात, 'मागील पत्रात विद्येचा उपयोग या देशात विद्वान लोक करीत नाहीत म्हणून लिहिले. आता एक गोष्ट आम्हास सुचली आहे की, द्रव्यवान लोक द्रव्याचाही उपयोग करीत नाहीत. द्रव्य कोणत्या दुर्भाग्याचा होय. त्या शास्त्राने भारताच्या वैभवाचा नाश केला आहे. इसवीसनाच्या आठव्या नवव्या शतकापर्यंत हिंदु लोक धर्मप्रसारासाठी, साम्राज्यासाठी व व्यापारासाठी त्रिखंडात संचार करीत होते आणि या तीनही क्षेत्रांतले आपले वैभव त्यांनी अगदी कळसाला नेले होते. (संस्कृती-संगम, द. के. केळकर, प्रकरण ७ वे व ९ वे पाहा.) असे असून पुढे जातिभेदाची बंधने कडक झाल्यामुळे परदेशगमन करील त्याला लोक वाळीत टाकू लागले, तो जातिबहिष्कृत होऊ लागला आणि धर्माच्या या विपरीत व अमंगळ कल्पनेमुळे आपला विश्वसंचार थांबला व त्याबरोबरच धर्मप्रसार, साम्राज्यविस्तार व व्यापारही थांबला. हे सर्व सोवळ्यामुळे झाले, यालाच उद्देशून सावरकरांनी म्हटले आहे की, 'आम्ही मुकट्यासाठी मुकुट घालविले.' हाच विचार लोकहितवादींनी वरील पत्रांतून मांडला आहे.
हिंदूंनी परदेशगमन केले, युरोपातील अर्थव्यवस्था पाहिली तर द्रव्याचा उपयोग भांडवलासाठी करावा हे त्यांना कळेल. त्यांना प्रयत्नवादाचे महत्त्व समजून येईल आणि मग ते व्यापार, कारखानदारी या क्षेत्रात लक्ष घालू लागतील. असे झाले तरच हिंदुस्थानचे दारिद्र्य नष्ट होईल असा लोकहितवादींच्या आर्थिक विचारसरणीचा सारार्थ आहे.
७. मूल्यमापन
लोकहितवादींच्या विचारधनाचे स्वरूप येथवर आपण पाहिले. धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था, इंग्रजीविद्या, संस्कृतविद्या, परदेशगमन इत्यादी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र चिंतन करून आपले मूलगामी विचार शतपत्रांतून मांडले आहेत. 'शतपत्रे' हे त्यांचे अगदी आरंभीचे लेखन. त्या वेळी त्यांचे वय केवळ २५ वर्षांचे होते. एवढ्या वयात समाजजीवनाच्या सर्व अंगोपांगाचे एवढे आकलन व्हावे, पाश्चात्त्य व पौर्वात्य संस्कृतीतील भेद इतक्या स्पष्टपणे कळावा आणि त्यावर उपाययोजना काय करावी हेही स्पष्टपणे ध्यानात यावे इतकी भेदक प्रज्ञा लोकहितवादींना लाभली होती. त्यांचे लेखन वाचीत असताना त्यांचे वय लक्षात येऊन पदोपदी वाचकाला विस्मय वाटत असतो.१. शतपत्रांनंतरचं लेखन :- पुढल्या काळातही लोकहितवादींनी आपले समाजाच्या मार्गदर्शनाचे कार्य अखंड चालू ठेवले होते. १८७६ साली त्यांनी 'हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणे' हे पुस्तक प्रसिद्ध केले. दादाभाई नौरोजी यांच्या 'पाव्हर्टी इन इंडिया' या निबंधाच्या आधारे त्यांनी 'इंदुप्रकाश' या पत्रात आठ लेख लिहिले. तेच या पुस्तकात एकत्र छापलेले आहेत. लॉर्ड रिपन यांनी हिंदुस्थानात स्थानिक स्वराज्याची स्थापना केल्यानंतर याविषयी लोकांना माहितगारी करून देण्यासाठी 'स्थानिक राज्यव्यवस्था' हा एक छोटासा प्रबंध लोकहितवादींनी १८८३ साली लिहिला. त्यात त्यांनी शासनसंस्थेच्या स्वरूपाचे दिग्दर्शन करून प्रजेच्या मूलभूत हक्कांचे विवेचन केले आहे. १८८३ साली त्यांनी 'ग्रामरचना, त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती' या विषयावर एक निबंध लिहिला. 'प्रभाकर' या पत्रात त्यांनी शतपत्रे लिहिली. त्याचप्रमाणे 'वृत्तवैभवा'त अनेक निबंध लिहिले. या सर्व लेखांचा एक संग्रह 'निबंध संग्रह' या नावाने त्यांनी १८६६ साली प्रसिद्ध केला. हा सुमारे १,१०० पृष्ठांचा ग्रंथ आहे. या ग्रंथावरून आपल्या समाजाच्या भवितव्याची लोकहितवादी कशी अखंड चिंता करीत असत ते ध्यानी येते. इतिहास हा तर लोकहितवादींचा अत्यंत आवडीचा विषय होता. भारतीयांची प्राचीन काळापासूनची या महत्त्वाच्या विषयासंबंधीची अनास्था पाहून त्यांना फार खेद वाटे. १८५१ सालीच त्यांनी 'भरतखंड पर्व' या नावाने हिंदुस्थानचा एक संक्षिप्त इतिहास लिहून इतिहासलेखनाची परंपरा महाराष्ट्रात सुरू केली. आणि त्यानंतर सुराष्ट्र, गुजराथ, राजस्थान, लंका या देशांच्या इतिहासांची मराठीत भाषांतरे केली. हे सर्व ग्रंथ पाहता 'आमच्या देशाच्या माहितीच्या संबंधाने लोकहितवादी हे केवळ समुद्र आहेत ही त्यांच्याविषयीची उक्ती सार्थ आहे असेच कोणाचेही मत होईल.'
२. टीकांचा परामर्श :- लोकहितवादींचे बुद्धिवैभव; त्यांचा व्यासंग, त्यांची स्वदेशहिताविषयीची कळकळ, वार्धक्यातही त्यांच्या ठायी तरुणांना लाजवील असा दिसणारा उत्साह या सर्व गोष्टी आज वादातीत आहेत. असे असताना त्यांच्यावर त्या काळी अनेक पंडितांनी फार कडक टीका केली, यांचे कारण काय याचा विचार केला पाहिजे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेत लेखावर लेख लिहून लोकहितवादींवर फार भयंकर टीका केली आणि लोकांच्या डोळ्यांपुढे प्रामुख्याने तीच टीका आहे, पण त्यांच्यावर फक्त शास्त्रीबुवांनीच अशी टीका केली असे नव्हे. 'इंदुप्रकाश', 'नेटिव्ह ओपिनियन', 'विविध ज्ञानविस्तार' अशांसारख्या इतरही अत्यंत जबाबदार व भारदस्त पत्रांनी त्यांच्यावर इतकीच, क्वचित जास्तच कडक टीका केलेली आहे. म्हणून या टीकांचा थोडा परामर्श घेणे अवश्य आहे.
३. उपदेश व कृती यांतील विसंगती :- लोकहितवादींवर टीका प्रामुख्याने झाली ती त्यांचे लेखन व त्यांचे आचरण यांतील विसंगतीमुळे. विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी किती हिरीरीने पुरस्कार केला होता, ते वर आपण पाहिलेच आहे. जे या सुधारणेस विरोधी होते त्यांना ते मांग, खाटीक, कसाई असे म्हणत. असे असून प्रत्यक्षात १८६९ साली एक विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहास पाठिंबा देण्याचा प्रसंग आला तेव्हा लोकहितवादींनी पळ काढला. या विवाहाला पाठिंबा द्यावा अशा आशयाचे जे पत्रक निघाले होते त्यावर लोकहितवादींनी सही केली होती. या विवाहसमारंभास कुटुंबासह उपस्थित राहावे; वधूवरांबरोबर अन्नव्यवहार करावा किंवा निदान ज्यांनी अन्नव्यवहार केला त्यांना आपल्या पंगतीला घ्यावे व अशा रीतीने आपला पाठिंबा सक्रिय व्यक्त करावा असे लोकांना त्यांनीच प्रार्थिले होते, तरी स्वत: लोकहितवादींनी यातले काहीच केले नाही. त्यामुळेच हे नामर्द आहेत, दंगेखोर आहेत अशी टीका त्यांच्यावर 'इंदुप्रकाश'ने केली. 'लोकहितवादींनी आपला जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात केवळ राजकीय भांडवलबाजी केली.' असे 'नेटिव्ह ओपिनियन' या पत्राने म्हटले. 'विविधज्ञानविस्तार'नेही तीन लेख लिहून त्यांचा दंभस्फोट केला.
परदेशगमनाच्या बाबतीत हाच प्रकार झाला :- हिंदुस्थानची उन्नती होण्यास तो एक प्रमुख उपाय आहे. सिंधुबंदीची ही चाल मूर्खपणाची आहे अशी मते लोकहितवादींनी मांडलेली होती, पण त्यांचे चिरंजीव कृष्णराव विलायतेहून बॅरिस्टर होऊन परत आले तेव्हा त्यांनी त्यांना घरी उतरवून न घेता त्यांची निराळ्या बंगल्यात राहण्याची सोय केली व मग रीतसर प्रायश्चित्त देऊन त्यांना पावन करून घेतले. पुढे पार्लमेंटरी फायनॉन्स कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी सरकारने त्यांना विलायतेस धाडण्याचा विचार केला तेव्हा 'धर्माच्या व जातीच्या अडचणीमुळे मला विलायतेस जाणे शक्य नाही' असे त्यांनी जाहीर रीतीने उत्तर दिले.
मूर्तिपूजेवर लोकहितवादींचा मुळीच विश्वास नव्हता :- मूर्तिपूजेच्या रूढीवर त्यांनी शतपत्रांतून टीका केली आहे. पण अहमदाबादेस सेशन्स जज्ज असताना नदीकाठच्या प्रत्येक देवालयात जाऊन दर्शन, पूजन करीत, देवाला गंधफुले वाहात आणि हे सर्व मुलाबाळांना घेऊन करीत. ब्राह्मणांच्या कर्मकांडावर त्यांनी शतपत्रांतून अगदी भडिमार केला आहे. पण स्वतः स्नानसंध्यादी सर्व कर्मठपणा ते रोज आचरीत तो इतका की कृष्णभट पुराणिक हे पुण्याचे वेदविद्यासंपन्न वैदिक ब्राह्मण त्यांना एकदा म्हणालेसुद्धा की, 'अरे गोपाळराव, तुला रे कोण सुधारक म्हणतात ? असे म्हणणारे शतमूर्ख आहेत. त्यांनी आधी येऊन तुझे पाय धरावे अशीच तुझी योग्यता आहे.' 'दंभासाठी करी उपदेश लोकां' अशी टीका मराठी वृत्तपत्रांनी केली ती यामुळेच.
४. ईश्वरी योजना आक्षेपार्ह :- यापेक्षाही जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची इंग्रजांच्या राज्याविषयीची मते. त्यातील दोन मते कोणत्याही दृष्टीने पाहिली तरी आजही आक्षेपार्ह वाटतील अशी आहेत. 'इंग्रजांचे राज्य येथे आले ते परमेश्वरी योजनेने आले.' असे लोकहितवादींनी अनेक ठिकाणी म्हटले आहे, ही गोष्ट अत्यंत विस्मयकारक होय. सर्व घटनांची कार्यकारणभावाच्या दृष्टीने मीमांसा करणाऱ्या या इतिहासपंडिताने 'ईश्वरी योजने'चा विचार मांडावा हे फार खेदजनक आहे. पण जुन्या शास्त्रीपंडितांवर, भटभिक्षुकांवर एवढा गहजब करण्याचे काय कारण होते ? तेही हेच म्हणत होते. 'रावण मत्त झाला तेव्हा परमेश्वराने त्याचा नाश केला. तसेच आता होईल.' ही त्यांची श्रद्धा व 'हिंदू लोकांना ज्ञान देण्यासाठी व शहाणे करण्यासाठी परमेश्वराने इंग्रजांना धाडले व येथले कार्य झाल्यावर तो त्यांना जाण्याची आज्ञा देईल.' ही लोकहितवादींची श्रद्धा यात मुळीच फरक नाही. हिंदू लोकांना शहाणे करावे, असे परमेश्वराच्या मनात होते तर त्याने त्यांनाच बुद्धी का दिली नाही ? इंग्रजांना येथे आणण्याची काय गरज होती, असा प्रश्न कोणाही सुबुद्ध माणसाच्या मनात आला असता, पण लोकहितवादींच्या मनात तो आला नाही, अशा स्थितीत समकालीनांच्या मनात त्यांच्याविषयी शंका येणे अगदी साहजिक होते.
५. इंग्रज न्यायी, सत्यप्रिय :- यापेक्षाही आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे इंग्रजांनी हिंदुस्थानचे राज्य न्यायाने घेतले असे त्यांनी त्या राज्याचे केलेले समर्थन ही होय. भारतातील इंग्रजांच्या राज्याच्या प्रस्थापनेचा इतिहास अन्याय, जुलूम, अत्याचार, खोटेपणा, लूटमार, दरोडेखोरी यांनी भरलेला आहे हे आज लहान पोरालाही माहीत आहे. लोकहितवादी त्या काळचे इतिहासपंडित ! आणि त्या राज्यस्थापनेचा इतिहास पाहूनच इंग्रजांनी यथान्याय राज्य घेतले आणि ईश्वराने हे राज्य त्यास अशा प्रकाराने दिले की त्यास कोणी दोष ठेवणार नाही, असे माझे मत झाले आहे.' असे ते सांगू शकतात. (पत्र क्र. ४६) . हे पाहिल्यावर कोणालाही खेद वाटल्यावाचून राहणार नाही. इतिहासाचा अभ्यास करून हे मत दिल्यावर समकालीन पंडितांनी त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी सुद्धा शंका घेतली तर त्यांना दोष कसा देता येईल ? इकडील देशाचे लोकांत वचनाचा प्रामाणिकपणा, खरेपणा, शूरत्व कमी, द्रव्याचा लोभ फार म्हणून इंग्रजांना हे राज्य ताब्यात घ्यावे लागले, असे लोकहितवादी म्हणतात. वॉरन हेस्टिंग्ज, क्लाईव्ह यांची चरित्रे या माहितीच्या समुद्राने वाचली नव्हती काय ? अप्रामाणिकपणा, वचनभंग, पिसाट लोभ यांनी ती चरित्रे बरबटलेली आहेत हे लोकहितवादींना माहीत नव्हते काय ? आणि माहीत असूनही त्यांनी जर इंग्रजांची अनन्वित स्तुती केली असेल व त्यांना 'ईश्वरी योजनेत' बसविले असेल तर त्याचा अर्थ काय करावयाचा ?
६. शिवराळ भाषा :- लोकहितवादींची शतपत्रांतील भाषा हीही लोकांना चीड येण्यास कारणीभूत झाली. मूर्ख, टोणपे, बैल, जनावरे, पोळ अशा शिव्या त्यांनी ब्राह्मणांना व एकंदर हिंदू समाजाला प्रत्येक पत्रात दिल्या आहेत. काही ठिकाणी तर ग्राम्य शिव्याही दिल्या आहेत. भाषेतला हा प्रखरपणा, हे धैर्य त्यांनी प्रत्यक्ष कृतीत दाखविले असते तर लोकांनी ही भाषा खपवून घेतली असती. कधी कधी तिचे कौतुकही केले असते. पण कृतीची वेळ येताच प्रत्येक आघाडीवर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे या प्रखर भाषेने लोकांना चेतना मिळण्याऐवजी त्यांचा तेजोभंग मात्र झाला. आणि आधीच पराभूत झालेल्या समाजाचा तेजोभंग करणे हे फार मोठे पाप होय. विष्णुशास्त्री यांनी त्यांच्यावर भयंकर भडिमार केला तो या कारणासाठी.
७. दूषण वगळूनी :- पण आज शंभर वर्षांनी मूल्यमापन करताना आपण हे सर्व दोष दृष्टीआड केले पाहिजेत. 'दूषण वगळुनि भूषण घेऊनि प्रभुपूजन करि काळ असे' असे गोविंदाग्रजांनी म्हटले आहे, तेच खरे आहे आणि अशा वृत्तीने आपण लोकहितवादींच्या कार्याकडे पाहू लागलो, त्यांचे लेख वाचू लागलो, की आपण त्यांचे शतशः ऋणी आहोत आणि अनेक पिढ्या असेच ऋणी राहू याविषयी दुमत होणार नाही. समाजाचा सर्वांगीण विचार करून प्रत्येक क्षेत्रातले दोष आकळून नव्या युगाचे मार्गदर्शन करणे हे सामान्य प्रतिभेचे काम नाही. लोकहितवादींनी चाळीस वर्षे हे कार्य सतत चालविले आणि त्यामुळेच महाराष्ट्र समाजात आमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचे पुढील नेत्यांचे काम जास्त सुकर झाले, यात शंका नाही.
वर त्यांच्या इतर ग्रंथांचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी सांगितलेले विचार पाहिले म्हणजे तर आपल्या मनात याविषयी कसलीच शंका राहणार नाही. त्यांच्याविषयी समकालीन लोक साशंक होणे साहजिक आहे असे वर म्हटले आहे, पण नंतरचे त्यांचे निबंध-प्रबंध आपण वाचले म्हणजे मग तसल्या शंकांना आपल्या मनात मुळीच थारा मिळणार नाही.
८. इंग्रज लुटारू :- 'हिंदुस्थानास दरिद्र येण्याची कारणे' या आपल्या पुस्तकात ज्या ब्रिटिश राज्यपद्धतींचे त्यांनी शतपत्रात गोडवे गाईले आहेत तिच्यावर अगदी प्रखर टीका केली आहे. 'अदालतीचे कर लुटारूसारखे आहेत', 'या देशातील लक्ष्मी वाढण्याचा यत्न सरकार करीत नाही', 'भाड्याचा उंट, त्याजवर लादता लादता नाळी पडल्या तरी कोणी मनास आणीत नाही. एकतर्फी काम चालते', 'दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा कारभार पाहतो, तसे इंग्रज सरकार या देशाचे राज्य चालवीत आहे.' अशा तऱ्हेचे कडवट विचार या पुस्तकात अनेक ठिकाणी आढळतात. "इंग्रजांनी राज्य बलात्काराने घेतले असे क्षणभर मान्य केले तरी व्यापार तर बलात्काराने घेतला नाही ना ? मग तो येथल्या लोकांना ताब्यात घेण्यास काय हरकत आहे ?" असे एका पत्रात त्यांनी म्हटले आहे. पण व्यापार बलात्काराने घेतला नाही, हे मत भ्रामक आहे हे त्यांच्याच पुढे ध्यानात आले. 'येथील उदीम वाढवावे व येथे खाणी काढाव्या ते एकीकडे राहून जकातीचा कायदा ठरविण्याचे वेळी होपसाहेबांनी जे भाषण केले त्यावरून तेथील उद्योग कमी व्हावा व सुताचे कारखान्यावर कर घालून त्यास जेर करावे, उंच प्रतीचा कापूस येऊ देऊ नये. बारीक कापड येथे करतील त्यास अडचणी घालाव्या, असेच सरकारी धोरण सरकारने अवलंबिले आहे असे दिसते.' असे त्यांनी वरील पुस्तकात म्हटले आहे व 'हे धोरण सर्वथैव अयोग्य आहे. परिणामी विषासारखे आहे. लोभामुळे अशी बुद्धी धरण्यात काही फायदा नाही.' असा सरकारला इशाराही दिला आहे.
९. ग्रामीण जनता :- 'ग्रामरचना' ह्या निबंधात लोकहितवादींच्या मूलगामी दृष्टीचा वारंवार प्रत्यय येतो. हिंदुस्थान हा खरा खेड्यांतच आहे व त्याचे दुःखही खेड्यात आहे, हे त्यांनी जाणले होते. गरीब, कष्टाळू जनतेच्या जीवनाशी ते समरस होऊ शकत होते, हे या निबंधावरून सहज ध्यानात येते.
"रयतेला दुसरा धंदा व दुसऱ्या कोणाचे रक्षण नसल्यामुळे सुनेला ज्याप्रमाणे कशीही सासू द्राष्ट व खाष्ट असली तरी तिच्या हाताखालीच नांदावे लागते, तद्वत् सरकारने कसेही वागविले व तरवारीच्या धारेवर धरले तरी खाली मान घालून सरकारचा अधिकार व कबजा रयतेला मानावा लागतो, पण रयत नादान व सर्वांशी परावलंबी झाली म्हणून तिच्या सौख्याकडे इतके दुर्लक्ष करणे किंवा तिच्या ओरडण्याकडे इतके उदासीनतेने पाहणे चांगले नाही. रयत जी आज गांजल्यासारखी व त्रस्त झाली आहे याचे कारण आहे की, सारे, धारे व करपट्टया यांचे ओझे रयतेला उचलेना इतके जड झाले असल्यामुळे ती त्या ओझ्याखालीच गारद होत आहे." या उद्गारावरून जनतेचे दु:ख त्यांच्या किती जिव्हारी लागले होते हे कळून येईल.
इंग्रजी सत्ताधाऱ्यांची लुटारू वृत्ती, येथला व्यापार, येथली कारखानदारी नष्ट करून हा देश स्मशानवत करून टाकण्याचे सरकारी धोरण व खेड्यांतही जनतेची इंग्रजांनी चालविलेली पिळवणूक, ही जनतेच्या ध्यानी आणून देऊन तिच्या ठायी भयंकर असंतोष निर्माण करावयाचा हे धोरण अवलंबूनच विष्णुशास्त्री, टिळक यांच्या राष्ट्रीय पक्षाने स्वातंत्र्याच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोविली होती. लोकहितवादी आपल्या उत्तरवयात का होईना कृतीने नाही पण निदान विचाराने तरी याच राष्ट्रीय वृत्तीशी येऊन ठेपले होते हे त्यांच्या या प्रबंधावरून दिसून येते. (हा प्रबंध त्यांनी १८८३ साली लिहिला. लोकमान्य टिळकांनी हे विचार सांगण्यास १८८१ सालीच प्रारंभ केला होता.)
सारार्थ
लोकहितवादी यांच्या समाजजीवनाच्या भिन्न अंगांविषयीच्या मतांचा येथवर परामर्श घेतला. त्यांच्या सर्व तत्त्वज्ञानाचा सारार्थ आता सांगावयाचा, पण तो त्यांनीच एका पत्रात मांडवा आहे. तेव्हा तोच येथे देणे सयुक्तिक होईल. 'हिंदुस्थानच्या पराधीनतेची कारणे' या पत्रात त्यांनी त्याविषयीची आपली मते मांडली आहेत. आणि त्याला 'हिंदुनाशाष्टक' असे नाव दिले आहे.हिंदुनाशाष्टक :- त्यांच्या मते पांडवांच्या काळी हिंदू लोक फार ऐश्वर्यास चढले होते. अनेक विद्या, कला त्यांनी हस्तगत केल्या होत्या. त्या समाजात व्यास, वाल्मीकी, कपिल, नारद, अर्जुन यांसारखे थोर पुरुष उदयास आले होते. त्या काळी संपूर्ण जगतात ऐश्वर्यवान असा देश एवढाच होता. पण पुढल्या काळात या ऐश्वर्यामुळेच लोक आळशी झाले आणि त्यांनी विद्येची उपासना सोडून दिली. त्यामुळे संस्कृत भाषाही मागे पडली. प्राकृत भाषा उदयास आल्या. (१) पण या प्राकृत भाषांत संस्कृतसारखे ग्रंथ नाहीत, आणि हेच हिंदू लोकांच्या नाशाचे पाहिले कारण होय. (२) दुसरे कारण असे की कालेकरून लोकांत असा समज रूढ झाला की, ज्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिले ते देव होते आणि तसे ग्रंथ लिहिणे हे मनुष्याचे काम नव्हे. (३) तिसरे कारण असे की ब्राह्मणत्व हे विद्येवर न ठरता कुळावर ठरू लागले. त्यामुळे ब्राह्मणांच्या कुळात जन्मला त्याला, विद्या केली नाही तर नीचत्व येईल, हे भय राहिले नाही. जन्म ब्राह्मणकुळात झाला तेव्हा विद्या शिकलो न शिकलो तरी सारखेच असे त्याला वाटू लागले. इतर जातीचे लोक कुळामुळेच मला पूज्य मानून माझ्या पायाचे तीर्थ घेतील. (४) चवथे कारण म्हणजे परदेशगमनाचा निषेध. देशातच राहिले पाहिजे, बाह्यदेशी जाऊ नये असा प्रतिबंध पूर्वीच्या लोकांनी काही कारणांनी घातला असेल, पण त्याचा हेतू न समजून पुढचे लोक त्यालाच धर्म समजू लागले. (५) पाचवे कारण म्हणजे कलियुग कल्पना. या कलियुगात समाजाचा नाशच व्हावयाचा. दुर्गुण प्रवृत्ती वाढावयाचीच. ईश्वरी संकेत तसाच आहे, असे भय शास्त्रकारांनी घातले व ते खरे मानून लोक हाय खाऊन बसले. (६) सहावे कारण म्हणजे प्रारब्धवाद किंवा दैववाद हे होय. परमेश्वर प्रत्येकाचे नशीब त्याच्या जन्माबरोबर लिहून ठेवतो. काही केले तरी ते फिरावयाचे नाही, अशीच लोकांची बुद्धी होऊन बसली. त्यामुळे उद्योगाचा उत्साह नष्ट झाला. (७) सातवे कारण असे की पूर्वीचे शास्त्रकार हे देव असल्यामुळे त्यांनी लिहिलेले प्रमाण मानले पाहिजे असा समज रूढ झाला. त्यामुळे नवीन मार्ग निघेनासा झाला. (८) धर्माविषयी विपरीत कल्पना हे आठवे कारण होय. चालरीत यालाच लोक धर्म समजू लागले. ईश्वरभक्ती हाही धर्म आणि पागोटे, अंगरखा, धोतर हाही धर्मच.
या कारणामुळे हिंदू लोकांतील जागृती नष्ट झाली. आपल्या देशावर राज्य कोण करतो याचीही खबर त्यांस नसे. त्यामुळे मुसलमानांनी हा देश जिंकला आणि शास्त्री, पंडित, भट हे त्यांचीच खुशामत करून पोट भरू लागले. ब्राह्मण लोक घरात पुष्कळ सोवळे करतात. यवनांचा विटाळ मानतात, पण त्यांना राज्य करावयास त्यांनी हरकत केली नाही. उलट राज्य करणे, पराक्रम करणे हे काम मुसलमानांचेच होय, हिंदूंना ते जमणार नाही असे ते म्हणू लागले. घरात त्यांनी सोवळे केले पण देश सोवळा राखावयालाच ते विसरले. जो तो आपला स्वार्थ पाहू लागला. अशामुळे मुसलमानांचे राज्य चालले. त्यानंतर इंग्रज आले, पण ते कोठले कोण याचा अजूनही या लोकांस पत्ता नाही. अशा विपरीत बुद्धीमुळे या समाजाचा नाश झाला यात नवल काय? (पत्र क्र. ४५) या सारखेच विचार लोकहितवादींनी 'जुन्या समजुती' (पत्र क्र. ८) व 'स्वदेशप्रीती' (पत्र क्र. ६७) या पत्रात मांडले आहेत. यात हिंदूंच्या अवनतीची कारणे त्यांनी मांडली आहेत. आणि 'ज्ञान हाच पराक्रम' (पत्र क्र. ८५). 'नवीन ग्रंथांची आवश्यकता' (पत्र क्र. ९३), 'धर्म सुधारणा' (पत्र क्र. ६४), 'लग्नाविषयी विचार' (पत्र क्र. १५), 'राज्यसुधारणा' (पत्र क्र. २५), 'हिंदू लोकांनी काय करावे (पत्र क्र. ६०) या पत्रात ही अवनती थांबवून या समाजाची सुधारणा करण्याचे जे उपाय ते त्यांनी सांगितले आहेत.
लोकहितवादींच्या विचारधनाचा प्रपंच येथवर केला. आता त्यांच्या लेखनशैलीचा विचार करून हे प्रदीर्घ विवेचन संपवू.
लोकहितवादींची लेखनशैली
१. स्वतंत्र चिंतन करण्याचे सामर्थ्य :- लोकहितवादींची शतपत्रे सहज वरवर चाळली तरी भारतात कित्येक शतके दुर्मिळ असलेले स्वतंत्र चिंतन करण्याचे सामर्थ्य त्यांना लाभले होते, हे दिसून येते. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे हिंदू लोक शतकानुशतके एक प्रकारच्या बौद्धिक कैदेत होते. स्वातंत्र्य गेले, नाना देशचे लोक येथे राज्य करू लागले, व्यापार हातचा गेला, देश दरिद्री झाला, धर्माला ग्लानी आली, लक्षावधी लोक परधर्मात गेले तरी या काय घटना घडत आहेत, याचा अन्वयार्थ काय, यातून निष्पन्न काय होणार याविषयी विचार करण्याची व देशाच्या परिस्थितीचे निदान करण्याची ऐपतच येथे कोणाच्या बुद्धीला नव्हती. सद्दी, नशीब, परमेश्वरी क्षोभ यापलीकडे या अवनतीला काही कारणे असू शकतील हे कोणाच्या स्वप्नातही आले नाही. लोकहितवादींना परिस्थितीचे नव्या दृष्टीने आकलन करताआले याचे कारण म्हणजे त्यांनी उपासिलेली इंग्रजी विद्या हे होय. ती सरस्वती प्रसन्न होताच त्यांच्या बुद्धीवरच्या शृंखला तुटून पडल्या व प्रत्येक गोष्टीकडे भौतिक कार्यकारणाच्या दृष्टीने ते पाहू लागले आणि राजसत्ता ही देशाला घातक आहे, लोकांची सत्ता ही उपकारक आहे, आपला उत्कर्ष तिच्यामुळेच होईल, चातुर्वर्ण्य, जातिभेद यामागील तत्त्वे भ्रामक असून इतर जातींनी विद्या केल्यास त्यांची योग्यता ब्राह्मणांइतकीच ठरेल. विद्या ही सर्वांना हक्काने मिळाली पाहिजे, एकट्या ब्राह्मणांचीच ती मक्तेदारी असता कामा नये, स्त्रियांची प्रतिष्ठा संसारातल्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाइतकीच मानली पाहिजे, जे लोक स्त्रियांना शहाण्या करीत नाहीत त्यांचा अधःपात होतो इत्यादी अनेक क्रांतिकारक विचार त्यांच्या मनात येऊ लागले. आपल्या देशाचा अधःपात झाला तो शब्दप्रामाण्यामुळे, धर्माविषयीच्या विपरीत कल्पनांमुळे, जातीय विषमतेमुळे, उद्योगहीनतेमुळे अशी स्वतंत्र मीमांसा ते करू शकले, यातच त्यांचे स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य दिसून येते.२. निर्भय प्रतिपादन :- याच्या जोडीला हे स्वतंत्र विचार निर्भयपणे मांडण्याचे मनोधैर्य त्यांच्याजवळ होते, हे आपण आपले मोठे भाग्य मानले पाहिजे. आपल्या विचाराप्रमाणे कृती करण्याचे धैर्य त्यांच्या ठायी नव्हते. त्यामुळे त्यांचे नवे विचार अत्यंत हितकारक असूनही त्यांची उपेक्षा होऊन समाजाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे ते विचार लोकांपुढे मांडण्याचे धैर्यही त्यांनी दाखविले नसते तर एवढ्या क्रांतिकारक विचारधनाला समाज मुकला असता, पण तसे झाले नाही. तो निर्भयपणा लोकहितवादींच्या ठायी होता त्यामुळेच वेद, पुराणे, स्मृती यांचे प्रामाण्य झुगारून द्या व स्वतः विचार करा असा उपदेश ते समाजाला करू शकले. बालविवाह, पुनर्विवाह, अस्पृश्यता, परदेशगमन असल्या विषयांवर त्यांनी रूढीच्या सर्वस्वी विरुद्ध असे विचार मांडले आहेत. 'शास्त्रार्थ हा लोकांच्या हिताच्या विरुद्ध असला तर शास्त्राज्ञा मानण्याची जरुरी नाही. शास्त्र म्हरजे लोकांस सुख होण्याकरिता रीत घातली आहे. त्यातून जर काही विपरीत असेल तर एकीकडे ठेवल्यास चिंता नाही, साक्षात ब्रह्मदेव विरुद्ध असला तरी डगमगू नये' असे अत्यंत नास्तिक वाटणारे विचार त्यांनी अनेक पत्रांतून मांडले आहेत. ब्राह्मणांची विद्या म्हणजे केवळ तोंडाची मजुरी आहे. ब्राह्मणांना दान देण्यापेक्षा चार मजूर लावून लाकडे तोडून घ्यावी, ते बरे. त्यांची विद्या ही अज्ञान अमर करण्यासाठीच निघालेली आहे, अशी मते शंभर वर्षांपूर्वी मांडणे फार कठीण होते. पण लोकहितवादी ती मांडताना कचरले नाहीत. शास्त्रीपंडितांची निंदा, त्यांच्यावरची प्रखर टीका एक वेळ खपून गेली असती, पण त्याबरोबरच महाराची योग्यता असेल तर त्यालादेखील नमस्कार करावा, कैकाडी, कातोडी यांनाही लोकसभेत स्थान द्यावे, असे सांगितल्यामुळे त्या काळी सवर्ण समाजाचा किती संताप झाला असेल याची आपल्याला सहज कल्पना येईल. आज कायद्याने अस्पृश्यता नष्ट झालेली असतानाही अस्पृश्यांची कोठलीच तक्रार निर्मूलन झालेली नाही इतका त्या रूढीचा प्रभाव आहे. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी तो याच्या शतपट सहज असेल. पण लोकहितवादींनी त्याला भीक घातली नाही व साहसीपणाने आपले त्या विषयावरचे विचार मांडले हे आपले मोठे सुदैव होय.
३. गाढ व्यासंग :- स्वतंत्र चिंतन करण्याचे सामर्थ्य व त्या चिंतनातून निघणारे निष्कर्ष समाजापुढे मांडण्याचे नीतिधैर्य लोकहितवादींना प्राप्त झाले ते त्यांच्या गाढ व्यासंगामुळेच होय. अशा तऱ्हेची विद्येची अभिरुची हीही त्या काळी आपल्या समाजात दुर्मिळ होती. विष्णुशास्त्री यांनीसुद्धा म्हटले आहे की, जुन्या काळच्या पंडितांस विद्येची अभिरुची म्हणजे काय याची कल्पनाच नव्हती. पण लोकहितवादी इंग्रजी पंडित होते. जगातील घडामोडींविषयीची, त्यांच्या मागल्या कारणपरंपरेविषयीची, तत्त्वज्ञानाविषयीची तीव्र जिज्ञासा लोकहितवादींच्या ठायी होती. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, संस्कृत विद्या इत्यादी विषयांचा त्यांनी फार सखोल अभ्यास केला होता. कोणत्याही विषयावर मत देण्यापूर्वी ते त्याचा सांगोपांग अभ्यास करीत असत. आणि इतिहास, अर्थशास्त्रादी शास्त्रे, थोरांची चरित्रे यांच्या आधारेच स्वमताची मांडणी करीत असत. इंग्रज पूर्व काळी रानटी अवस्थेत होते, रूम देशात त्यांना गुलाम म्हणून फुकट घेण्यासही कोणी तयार नसत, अशी स्थिती असताना आज ज्ञानाच्या व उद्योगाच्या बलावर ते एवढया उन्नत दशेस येऊन पोचले, हे सांगताना त्या देशाच्या इतिहासाचा समग्र चित्रपट त्यांच्या डोळ्यांसमोर उभा असलाच पाहिजे. आपल्याकडील प्राचीन इतिहासाचा आढावाही ते असाच सहज दोन-चार वाक्यांत घेतात. पांडवांच्या काळी हा देश ऐश्वर्यसंपन्न होता असे त्यांचे मत होते. त्यानंतर विद्येची अभिरुची लोपत चालली व सर्व अंधार झाला, हे सांगताना हे कसकसे घडत आले याचे त्यांनी जे वर्णन केले आहे ते त्यांच्या या विषयाच्या अभ्यासाची साक्ष देईल. अर्थशास्त्राविषयीचा त्यांचा अभ्यास तर फारच सूक्ष्म होता. त्यांच्या आधीच्या बंगाली पंडितांनाही ब्रिटिश भांडवलशाहीचे जे भयाण रक्तशोषक रूप कळले नव्हते ते यांनी बरोबर आकळले होते आणि स्वदेशी व बहिष्कार हाच त्यावर उपाय आहे हेही बरोबर जाणले होते. युरोपीय देशांतील गेल्या शतकातील आर्थिक घडामोडींचे सूक्ष्म ज्ञान आल्यावाचून असे अचूक निष्कर्ष काढणे कोणालाच शक्य झाले नसते. संस्कृत विद्येची त्यांनी फारच हेटाळणी केली आहे. पण ती उत्तर काळच्या संस्कृत विद्येची. प्राचीन काळची संस्कृत विद्या कशी जिवंत होती, ज्योतिष, वैद्यक, गणित, धर्म, इत्यादी शास्त्रांत त्यावेळी मौलिक संशोधन कसे चालत असे त्याचे यथायोग्य मूल्यमापन लोकहितवादींनी केलेले आहे. त्यावरून त्या विद्येच्या अभ्यासाची त्यांनी हेळसांड मुळीच केली नव्हती, हे स्पष्ट दिसून येते.
४. मतपरिवर्तनाचा मार्ग :- लोकहितवादींची मते अत्यंत क्रांतिकारक अशी होती. प्रत्येक क्षेत्रात रूढ मतात व त्यांच्या मतात दोन ध्रुवांइतके अंतर होते, तरी लोकांची सुधारणा करावयाची ती लोकांच्या मनाची खात्री करून देऊन, त्यांचे मतपरिवर्तन घडवून करावयाची, हेच धोरण, यांना मान्य होते, आणि तेच त्यांनी अवलंबिले होते, हे शतपत्रांतील पानापानांवर दिसून येते. ते म्हणतात, 'केवळ जबरदस्तीने लोकांकडून पूर्वीपासून चालत आलेली चाल मोडवून नवी रीत काढणे हे योग्य नाही. अशा गोष्टी लोकांच्या समजुतीने मोडाव्या हे बरे. कोणी म्हणतील की, हिंदू लोक इतके शहाणे नाहीत. तरी काय चिंता आहे ? आजचे उद्या होईल, पण आणखी आणखी सरकारचे हातात जाणे (कायद्याने सरकारी साह्याने सुधारणा घडविणे) हे त्या उशिरापेक्षा वाईट व जे जबरीने चालू झाले त्याचा खचितपणा नाही. ज्या काळी जबरी एकीकडे होईल तेव्हा लोक पुन्हा पूर्वीप्रमाणेच करू लागतील. तेव्हा उत्तम मार्ग हाच की ही गोष्ट लोकांच्या मनात अनेक तऱ्हेने भरवून द्यावी. स्वसंतोषाने लोक समजू लागले म्हणजे पहिली चाल मोडून नवी करतील. हे काम समंजस पंडित आहेत त्यांचे आहे.' (पत्र क्र. ७). सुधारणा करण्याचे काम सरकारचे नव्हे, पंडितांचे आहे, ही जाणीव ठेवूनच लोकहितवादींनी 'शतपत्रे' लिहिली आहेत. या पत्रांत ते इतिहासाच्या आधारे बोलतात. तर्कबुद्धीला आवाहन करतात. लोकांच्या भावनांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हात जोडून विनवितात आणि फारच उद्वेग आला तर त्यांना शिव्याशापांची लाखोली वाहतात, पण सुधारणा दंडबलाने घडवून आणाव्या असे त्यांनी चुकूनसुद्धा कोठे म्हटलेले नाही. या देशात पार्लमेंट हवे, येथला कारभार लोकांच्या संमतीने चालावा व तो लोकांनीच जास्तीत जास्त अंगावर घ्यावा, अशी मते त्यांनी अन्यत्र मांडली आहेत; त्यांशी सुसंगत अशाच मतपरिवर्तनाच्या मार्गाचा त्यांनीही आपल्या लेखनात अवलंब केला आहे.
५. प्रखर, जहरी, कडवट भाषा :- असे लेखन करीत असताना अनेक ठिकाणी त्यांनी अत्यंत जहरी व प्रखर भाषा वापरली आहे हे खरे. ब्राह्मण म्हणजे शुद्ध बैल आहेत. शास्त्रीपंडित, भटभिक्षुक ही केवळ जनावरे आहेत, हिंदू लोक अगदी मूर्ख, भेकड आहेत, सरदार हे मोकाट सोडलेल्या पोळासारखे आहेत, असे दर पत्रात ते लिहितात. स्वकालीन ब्राह्मणांबद्दल लिहिताना किती खालच्या पातळीवर जाऊन लिहावे याचा त्यांना सुमारच राहात नाही. हे शास्त्री- पंडित सर्व मेल्यावाचून समाजाची सुधारणा होणार नाही, असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. ते पोटभरू आहेत, बहुरूपी सोंगाडी आहेत, चित्रकथी त्याहून बरे, हिंदू लोकांचे दुर्भाग्य म्हणून ते शास्त्रीपंडित यांचे पुढारी झाले, लोकांत भ्रांती उत्पन्न करावी एवढाच त्याचा उद्योग, या तर नित्याच्याच शिव्या आहेत. लोकहितवादींच्या विचारधनाची पातळी इतकी उंच आहे की, त्याचा आविष्कार करताना त्यांनी या तऱ्हेची भाषा वापरावयास नको होती, असे शतपत्रे वाचताना वारंवार मनात येते. काही ठिकाणी त्यांनी जे अगदी ग्राम्य शब्द वापरले आहेत ते तर अगदी निषेधार्ह वाटतात. पर समाजाच्या उन्नतीची त्यांना जी तळमळ वाटत होती, तीच त्याच्या बुडाशी आहे हे जाणून आपण हा दोष दृष्टीआड केला पाहिजे. केव्हा केव्हा असेही वाटते की असे मर्माघाती वाग्बाण लोकहितवादींनी सोडले ते अवश्यच होते. त्यावाचून अजगरासारखा घोर निद्रेत पडलेला हा समाज जागा झाला नसता; पण असा मर्माघात करणाऱ्या मनुष्याच्या लेखनाला जी प्रतिष्ठा प्राप्त व्हावयाची ती लोकहितवादींनी कृतीचा प्रसंग येताच जी माघार घेतली तिच्यामुळे झाली नाही. नाहीतर त्यांच्या याच लेखनाला एक भास्करदीप्ती येऊन समाजाने त्यांची प्रशंसा केली असती.
६. तळमळ :- पण लोकहितवादींचे हे लेखन समाजाविषयीच्या तळमळीतून निर्माण झालेले आहे हे मात्र आपण क्षणमात्रही विसरू शकत नाही. बालविवाह, विधवाविवाहबंदी, सती या दुष्ट रूढींनी गांजून गेलेल्या स्त्रीवर्गाविषयी त्यांना जी अपार सहानुभूती वाटते, वैधव्याच्या खाईत जन्म काढणाऱ्या दीन कन्यकांविषयी त्यांच्या चित्तात जे वात्सल्य ओसंडून येते ते याविषयीच्या प्रत्येक पत्रात व्यक्त होते. विधवांचे ते नरकसम जिणे पाहून ते अगदी आक्रोश करून सांगतात की, 'अहो, लोकांनो, तुम्ही आपल्या कन्यांचे वध करणारे आहेत. तुमची ही कृती खाटकासारखी आहे. आपल्या लहान, अर्भक बालाविषयी तुम्ही आपल्या मनात निष्ठुरपणा का आणता ? स्त्रियांना ज्ञान असते तर त्यांनी या शास्त्रीपंडितांच्या श्रीमुखात दिली असती. सती जावयास सांगणाऱ्यांच्या त्यांनी शेंड्याच उपटल्या असत्या. पूर्वी दैत्य व राक्षस होते ते असेच असतील!' स्त्रियांचे हाल पाहून त्यांना संताप येतो आणि मग ते शंकराचार्यांनाही भीत नाहीत की मनूचीही प्रतिष्ठा ठेवीत नाहीत. 'मनू जर ईश्वरांश असता तर स्त्रीचा नवरा तिच्या तरुणपणी मरू नये अशी व्यवस्था त्याने का केली नाही ?' असा प्रश्न ते विचारतात. व्यापार, उद्योगधंदे, कारागिरी हे सर्व नष्ट झाल्यामुळे या देशातील जनतेला जे दैन्य आले, ते पाहूनही त्यांचे हृदय तिळतिळ तुटते. येथे इंग्रजी राज्यच काही काळ राहावे, येथल्या लोकांचे राज्य लवकर होऊ नये, असे ते म्हणतात त्यामागे हीच भावना आहे. येथल्या राजांचे, सरदारांचे राज्य झाले की, ते पुन्हा गरीब रयतेचे काळ होतील. ठग, पेंढारी बाळगून तिला लुटतील हीच भीती त्यांना वाटे. इंग्रजांनी ही पेंढारशाही नष्ट केली होती. अंदाधुंदी मोडून काढली होती. म्हणून त्यांचे राज्य हितावह असे त्यांना वाटे. लोक शहाणे होऊन राज्यकारभार करण्यास लायक झाले म्हणजे तेच इंग्रजांस जावयास सांगतील व तेव्हा ते न गेले तर येथे क्रांती होईल असे लोकहितवादींनी बजाविले आहे. तेव्हा लोकांच्या, दीनदलितांच्या, गरीब रयतेच्या, हतभागी स्त्रियांच्या उन्नतीची चिंता हीच त्यांच्या 'शतपत्रां'च्या मागची प्रेरणा आहेत, याबद्दल शंका घेण्यास जागा नाही.
७. पहिले निबंधकार :- या सर्व दृष्टींनी पाहता मराठीतले पहिले निबंधकार हे मानाचे पद लोकहितवादींना द्यावे असेच कोणालाही वाटेल. आणि भौतिक कार्यकारणमीमांसा, तर्कशुद्ध प्रतिपादन, इतिहास, चरित्र व इतर शास्त्रे यांतून आधार प्रमाणे देण्याची वृत्ती, लोकशिक्षणास अवश्य तो आत्मविश्वास, सर्व गुण असल्यामुळे निबंधकार ही पदवी त्यांना द्यावयास पाहिजे यात शंका नाही; पण यात एक न्यून आहे आणि ते फार मोठे आहे. ते म्हणजे शतपत्रांतील त्यांचे पुष्कळसे लेखन सूत्ररूपाचे, त्रुटित स्वरूपाचे आहे. विषयाचा विस्तार करावा, त्याचा सर्वागीण प्रपंच करावा, शाखापल्लवांनी, पुष्पफळांनी वृक्ष डवरतो तसा विचार डंवरून आणावा; तुलना, खंडन, मंडन, आक्षेपनिरसन, नाना प्रकारचे कोटिक्रम, भिन्न दृष्टिकोनांतून एकाच विचाराकडे पाहणे, तो पिंजून काढणे यांनी निबंध खरा सिद्ध होत असतो. तो प्रकार शतपत्रांत अगदी अपवादाने दिसतो. विधान करणे, सिद्धान्त मांडणे व फार तर स्पष्टीकरण करणे यापलीकडे लोकहितवादी जात नाहीत. विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, राजवाडे यांनी विषयाचा जो प्रपंच केलेल आहे तसा शतपत्रांत मुळीच दिसत नाही. म्हणून पहिले निबंधकार ही पदवी विष्णुशास्त्र्यांना देतात, लोकहितवादींना देत नाहीत. निबंधवाङ्मयाची सर्व बीजे त्यांच्या लेखनात आहेत, पण बीज रुजून त्यातील गुणांचा भव्य आविष्कार झाल्यावाचून त्याला वृक्ष म्हणत नाहीत.
या आविष्कारात भाषेच्या वैभवालाही महत्त्वाचे स्थान आहे. शुद्ध, प्रौढ, पल्लेदार, प्रवाही, ओघवती भाषा हे निबंधाचे मोठे वैभव असते. लोकहितवादींच्या शतपत्रांत त्याची फार उणीव आहे आणि ती पदोपदी भासते. व्याकरणशुद्ध भाषा लिहिण्याचीसुद्धा ते कसोशी करीत नाहीत. कर्ता- कर्म- क्रियापदाचा मेळ घालण्याचीही ते फारशी काळजी घेत नाहीत. मग एका मागोमाग एक प्रौढ, पल्लेदार वाक्ये फेकून वाचकाला त्याच्या मोहिनीत पकडून आपल्या मताच्या पायाशी आणून उभे करणे हे त्यांना कसे जमणार ? व्याजोक्ती, वक्रोक्ती, उपहास, विनोद, व्यंजना, समर्पक उपमा, दृष्टांतादी अलंकार, यांनी प्रतिपादनाची शोभा वाढविण्याचे व त्यातील तर्काची पकड घट्ट करण्याचे सामर्थ्य लोकहितवादींच्या ठायी नाही. मनातला अर्थ सरासरी व्यक्त करावा एवढाच त्यांच्या शतपत्रांतील भाषेचा मगदूर आहे. त्यामुळे मराठीतील आद्य निबंधकार ही प्रतिष्ठा त्यांना दिली जात नाही. पण नवयुगप्रवर्तनाच्या कार्यात पुढील थोर तत्त्ववेत्त्यांचे हे जसे पूर्वगामी आहेत त्याचप्रमाणे निबंधरचनेच्या कार्यातही आहेत यात शंका मात्र नाही.