Jump to content

लाट/शेरणं

विकिस्रोत कडून

शेरणं

 हसनखानची शादी होऊन दहा वरसं झाली, अजून त्याला अवलाद होत नव्हती. त्याच्या विसाव्या उमरीत बापानं त्याची शादी करून दिली; आणि तीन वर्षांनी हसनखानची अवलाद न बघताच तो इन्तेकाल झाला. आणि मग उरलेल्या सात वर्षांत अवलाद होण्यासाठी करायचे ते सारे उपाय हसनखान करून चुकला. बायकोला त्यानं नाना प्रकारची दवा खावविली. तिनं बिचारीनं हकिमाची पूड खाल्ली, वैद्याचं चाटण चाटलं, कैक पीर आणि वैद लोकांचे गंडे-दोरे गळ्यात बांधले आणि एका हकिमानं दिलेली तावीजही कमरेला बांधून ठेवली. पण इतकं करूनही हसनखानला मूल झालं नाही. मग मात्र हसनखान नाराज झाला. सदानकदा दुःखीकष्टी दिसू लागला. स्वत:च्या आणि बायकोच्या कर्माला बोल लावू लागला. चारचौघांत ऊठ-बस करणं तो टाळू लागला. हिरमुसला होऊन तसबी-जपमाळ घेऊन पडवीतल्या फलाटीवर गमभीन होऊन बसू लागला.
 त्याची ही हालत बघून चारचौघांना वाईट वाटे. पण उपाय कुणाच्याच हाती नव्हता. अवलाद झाल्याशिवाय हसनखान ताळ्यावर येणार नाही हे सगळ्यांनाच कळून चुकलं, तेव्हा एक दिवस गावातला रहीमखान येऊन त्याला म्हणाला, "एक गोष्ट आता मला तुला सांगायची हाय."
 सचिंत हसनखान सावरून बसत म्हणाला, "काय बाबा?"
 "लेकरू हवा म्हणून तू किती लटपटी केल्योस! आता माजा ऐक."
 "काय?" हसनखानने सावध चित्ताने विचारले.
 "गावच्या लक्सुमीबायला अवंदा शिमग्यात शेरणा घाल. शेरणा निघू दे. अवलाद झाल्याबिगर ऱ्हायची नाय-"
 हसनखाननं कुतूहलानं विचारलं, "पन बोलू काय?"
 रहीमखान उत्तरला, "हां. बोल, हे लक्सुमीबाय, मना लेकरू होवंदे. शेरणा निघताच मी तुज्या नावावर बोकड सोडीन. अनी मूल व्हताच तुला अरपन करीन."
 "बरा!" हसनखान उद्गारला. हातातली तसबीर त्यानं फलाटीवर ठेवली. दोन्ही हात जोडले आणि तो म्हणाला, “हे परवरदिगार, माझी आरजू आता तरी पुरी कर!" आणि मग आपले दोन्ही हात त्यानं तोंडावरून फिरवले. काही तरी पुटपुटत तो आपल्याशीच हसला. त्याच वेळी शेरणं घालण्याचा बेत त्यानं पक्का केला.
 महालक्ष्मी ही गावची देवी. शिमग्यात देवीच्या पालखीची मिरवणूक निघते. वाजतगाजत चिपळूणच्या बाजारात जाते. तिथं रात्रभर इतर पालख्यांबरोबर शहरभर फिरते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ठाणकावर परतते. याच वेळी देवीला शेरणी घालण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांत कैक शेरणी देवीनं हुडकून काढली होती. अनेकांना देवी प्रसन्न झाली होती. त्यांचं मंगल तिनं केलं होतं.
 शिमगा आला तसे ठाणकावर ढोल बडवले जाऊ लागले. नाच्येपोरे येऊन गावात नाचून गेले. रात्ररात्र तमाशाचे फड होऊ लागले. आणि मग एक दिवस देवीची पालखी ढोलांच्या तालात आणि सनईच्या सुरात नाचत, उडत, वाजतगाजत चिपळूणच्या बाजारात गेली.
 आणि इकडे हसनखाननं रात्रीच्या काळोखात आपल्या गड्याला-विश्राम निवात्यालाबरोबर घेऊन पालखीच्या मार्गातल्या एका चोंडक्यात शेरण्याचा नारळ पुरला आणि तो मोठ्या उत्कंठेनं दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागला.
 रात्रीचा मुक्काम संपवून दुसऱ्या दिवशी पालखी ठाणकाकडे येण्यास निघाली आणि सायंकाळची, चारच्या सुमाराला गावच्या वेशीवर येऊन थडकली.
 हसनखान तिथं उभा होता. बरोबर पुष्कळसे लोकही होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते देवीची पालखी पाहायला आले होते. पालखी पुढे पुढे येत होती. गुलाल उधळला जात होता. तेवढ्यात कुणीतरी पुढे येऊन हसनखानच्या अंगावर गुलाल उधळला. गुलालानं माखलेला हसनखान बरोबरच्या लोकांसह पालखीमागोमाग गावाकडे चालू लागला.
 थोड्याच वेळात गावची शाळा लागली. पुढचा रस्ता खाचरातून नि चोंडक्यातून जात होता. पालखी रस्ता सोडून चोंडक्यात उतरली. हसनखानही मागोमाग जाऊ लागला.
 दोन-तीन चोंडके ओलांडून झाले आणि एकदम काय झालं कुणास ठाऊक! पालखीला खांदा दिलेले जवान मटकन खाली बसले. ढोलांचा नाद बंद झाला. सनईचे सूर मंदावले. धडपडत ते जवान उठले. पण पालखी एकाएकी फार जड झाली! विलक्षण जड झाली. पुढं जाईना! जवान गडी पुन्हा सरसे मटकन खाली बसले. आणि मग ते एकदम उठून उभे राहिले. 'ठिच्योऽऽ बा ठिऽऽ च्योऽऽ'चा एकच गजर झाला. 'ढपाँव ढपाँव' करत ढोल दमदमू लागले. पालखी एकदम वर उडाली आणि पुन्हा जवानांच्या हातावर येऊन चक्राकार घुमू लागली.
 थोडा वेळ हे असं चाललं आणि मग गड्यांनी पालखी खांद्यांवर घेतली. ढोल पुन्हा पहिल्या तालात वाजू लागले. सनईचे सूर बदलले आणि त्यांच्या तालावर पालखीला घेऊन गडी संथ गतीनं साऱ्या चोंडक्यात नाचू लागले.
 बरोबरच्या मंडळीत एकच बोंब उठली. कुणीतरी शेरणं पुरलं आहे. देवीला उमगलं आहे म्हणून ती पुढं जात नाही. आता शेरणं निघाल्याबिगर देवी पुढे ठाणकावर जाणार नाही.
 सगळा जीव डोळ्यांत एकवटून हसनखान हे पाहत होता; ऐकत होता. देवीला ते शेरणं उमगलं आहे हे समजताच बेहोष झाल्यागत तो पालखीच्या घुमण्याकडे पाहू लागला.  सबंध चोंडक्यात झंझावाताप्रमाणे पालखी फिरत गेली. मध्येच जणू काय ती थबके आणि कुठे तरी एकदम घुसे. गड्यांवर गडी धडाधड कोसळत. अन् निराशेने सावकाश पालखी जागची उठे. “होऽऽच्या होऽऽ'चा गजर मोठा होई. ढोलांचे आवाज द्रुतगतीनं घुमू लागत. सनयांचे सूर त्यात मिसळत. गुलाल उधळला जाई. पालखी वर्तुळाकार घुमू लागे. देवीची शांत मूर्ती गदगद हलू लागे. पुन्हा पालखी खाली खांद्यावर येऊन संथपणे डुलू लागे.
 हे असं कैक घटका चाललं होतं. जमलेली मंडळी आणि हसनखानही हतबुद्ध झाला. शेरणं कुठं कुचंबलंय कुणाला कळेना आणि पालखीही शेरणं ओलांडून पुढे जाईना. नेण्याचा प्रयत्न करताच विलक्षण जड होई. जवानांचे खांदे तुटून पडत. पाय जणू भुईला चिकटून बसत.
 सांज झाली. काळोख पडत चालला तरी शेरणं निघेना. पालखी नुसती साऱ्या चोंडक्यात घुमत होती आणि तिला घुमवता घुमवता जवानांच्या तोंडाला फेस येऊ लागला. खांदे मोडून पडले. पोटऱ्या वळू लागल्या. खांदा द्यायची शामत उरली नाही, असं म्हणत म्हणत जवान जवान गडी खांदा सोडून धापकन बांधावर बसून दम घालू लागले. बघता बघता रात्र पडली. कुणी तरी गॅसबत्त्या आणल्या आणि त्या उजेडात शेरणं काढायचं काम चालू राहिलं.
 हे सारं बघून हसनखानाचा जीव उडून गेला. अखेरीस इतकं होऊन शेरण निघणार की नाही? त्याच्या नशिबात अवलाद आहे की नाही? त्यानं हात जोडले आणि तो आपल्याशीच पुटपुटू लागला, "हे लक्सुमीबाय, माजा शेरणा काढ-माजा शेरणा काढ, मी तुज्या नावावर बोकड सोडीन. अवलाद झाल्याबराबर त्याला तुला अरपन करीन-"
 आणि इतक्यात पालखी एकाएकी हुंदाडली. आकाशात एकदम उंच उडाली. गड्यांच्या खांद्यांवर येऊन अलगद बसली. पुन्हा ढोलांचा धडाका सुरू झाला. पुन्हा सनईचे सूर घुमू लागले. पुन्हा गुलाल उधळला गेला. पालखी स्वत:भोवतीच एकदम गरगर फिरली आणि तिचा दांडा चोंडक्यात एके ठिकाणी घुसला; पुन्हा मागे आला आणि पुन्हा अधिक वेगाने आदळला! त्या दणक्याने देवीची मूर्ती कोपायमान झाल्यागत जागच्या जागी हलू लागली. गड्यांचे खांदे विलक्षण रीतीने घसपटून निघाले. घटकाभराच्या या प्रकारानंतर, डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच एक नारळ बांधातून अलगद बाहेर पडला. 'महालक्ष्मी होऽ च्योऽऽ'चा गजर झाला! शेरणं निघालं. देवीनं शेरणं काढलं.
 हसनखान बेहोषीत पुढं थांबला. पालखीपुढे जाऊन त्यानं लोटांगण घातलं. सर्वांग गुलालानं माखून घेतलं. त्या खुशीत तिथं तो जमिनीवर पडून गडबडा लोळला.
 पालखी ठाणकावर पोचली तेव्हा दहा वाजले. गडीमाणसं घरोघर परतू लागली. पालखीला खांदा देऊन थकलाभागलेला विश्राम निवाते काळोखात ठेचाळत आपल्या खोपटाकडे निघाला. तेवढ्यात त्याला विसू बामनानं हाक मारली. विसूपाशी कंदील होता. विश्राम थांबला आणि विसू येताच त्याच्याबरोबर चालू लागला.
 वाटेत विसूनं विचारलं, “आज शेरणे निघायला देवीला लईसा वेळ लागला?"
 "व्हय!" विश्राम उत्तरला, 'तसा मला अंदाज होताच कुठं पुरलेलं हाय त्येचा? पण येळेवर आठवेना. तेवढा आठवल्यापरीस देवीला येळ लागायचाच. आपन तरी काय सांगनार देवदेवतांबाबत?"
 तेवढ्यात विसूचं घर आलं. तो निघून गेला आणि विश्राम काळोखात आपल्या घराकडे चालायला लागला.

 या गोष्टीला पाच वर्षे होऊन गेली आहेत. हसनखाननं देवीच्या नावावर सोडलेला बोकड भारी माजला आहे. साऱ्या गावचं खाऊन माजोर झाला आहे. गावाचं निसंतान करतो आहे. देवीचा बोकड असल्यामुळे त्याला कुणी हात लावायलाही धजत नाही.
 आणि पस्तिशी उलटलेला पोक्त हसनखान आपल्या फलाटीवर बसून, कोणा आल्यागेल्याला, आपल्याला अवलाद झाली की तो बोकड देवाला 'अरपन' करण्याच्या गोष्टी सांगतोच आहे!