लाट/तळपट

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


तळपट


 रात्र पडली आणि गावात घरोघर फाणस लटकले. मग लोकांची जेवणं झाली. काही वेळानं गावात गस्त घालणारी पोरं घराघरांतून बाहेर पडून एकत्र जमली. टोळक्याटोळक्यांनी वाडीवाडीवर पांगली. घराघरांतून पेटलेले फाणस थोड्या वेळाने विझले. गाव काळोखात बुडाला. मशिदीतली बत्ती तेवढी तेवताना दिसत होती.
 दहा वाजता मुसलमान वस्तीत एकदम जाळ पसरलेला शाळेपाशी गस्त घालत असलेल्या मुलांना दिसला. थोड्याच वेळात काळसर धूर आकाशात वर वर चढताना दिसू लागला. आणि काही क्षणातच आगीचा भडका उडाला. लोळच्या लोळ दिसू लागले. त्याबरोबर मोठा आरडाओरडा सुरू झाला. रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. मोठा गलका झाला. सारा गाव गडबडून जागा झाला. विझलेले फाणस पुन्हा घरोघर पेटले. आगीच्या दिशेने गाव लोटला.
 आहमद खोताच्या पेंढ्यांच्या उडवीला आग लागली होती. उडवी धडाधड आगीनं जळत होती. आगीच्या गरम धापानं जवळ जमलेल्या लोकांचं अंग शेकून निघत होतं. हसनखानचं पायबळ सूटन गेलं होतं. तो रडत होता; ओरडत होता. गावचे लोक त्याला समजावीत होते.
 जमलेल्या लोकांनी लगेच धावपळ केली, आणि खालच्या विहिरीला उपसा लावला. पाण्याचा मारा सुरू झाला. तमाम गाव आग विझवण्यासाठी धडपडू लागला. कधी घराबाहेर न पडलेल्या खोतांच्या बायकादेखील हंडे भरभरून पाणी आणून उडवीत ओतू लागल्या. गावातला जवान आणि जवान आगीशी झुंज खेळू लागला.
 बऱ्याच वेळानं आग आटोक्यात आली. हळूहळू वर येणारा धूरही मंदावला. जळका पेंढा उडवीपासून दूर सारण्यात आला. जमलेल्या सर्व लोकांनी आहमद खोताला दिलासा दिला. ते तिथंच उभे राहिले आणि झालेल्या प्रकाराबद्दल आपसांत कुजबुजू लागले. आग लागली कशी? कोणी लावली? असे तर्क सुरू झाले. अनेकांच्या अनेक शंका सुरू झाल्या. तेवढ्यात कुणीतरी ओरडून म्हणालं, "याची चवकशी होया हवी." पण बाकीच्या लोकांनी त्याला गप्प केलं. गस्त घालणारी तिथं जमलेली पोरं भयभीत पण सावध चित्तानं पुन्हा गस्त घालण्यासाठी निघून गेली. जागा झालेला, तिथं गोळा झालेला गावही हळूहळू पांगला, आपआपल्या घरी गेला. पुन्हा गाव सामसूम झाला.  दुसऱ्या दिवशी सकाळी मुसलमानवाडी जागी झाली ती रात्रीच्या आगीच्या प्रसंगानं भेदरलेली! उजाडताच उडवीपाशी पुन्हा लोकांचा घोळका जमला. दिवसाच्या उजेडात जळक्या उडवीचं, पेंढ्यांचं दृश्य भकास दिसत होतं. लोक रात्रीसारखेच तिथे कुजबुजत उभे राहिले. मग त्यातले चार लोक निघाले आणि कासमखानकडे गेले.
 कासमखान गावचे सरपंच. महिन्यापूर्वी महाडला दंगे झाल्यापासून गावात गस्त घालण्याची तजवीज त्यांनीच केली होती. कारण गावातलंही वातावरण विनाकारणच बिघडलं होतं. गावच्या एका बाजूस असलेल्या एखाद्याच्या घरी क्वचित दगड पडू लागले. दारं गदगदा हालवली जाऊ लागली. गंमत अशी की, गावातल्या कुठल्याही घरी हा प्रकार होऊ लागला. घरातली बायकापोरं रात्री-अपरात्री बोंबलत उठू लागली. महाडच्या दंगलीचा फायदा घेऊन गावात गुंडगिरी करण्याचा काही उपद्व्यापी लोकांचा हा बेत असावा, असं ठरवून गाववाल्यांनी एकजुटीनं रात्रीची गस्त घालण्याचं ठरवलं.
 या गोष्टीला महिना होऊन गेला. दगड पडायचे बंद झाले. बायकामुलांत पसरलेली भीतीही कमी झाली. जवान मुलं उत्साहानं, एकजुटीनं गस्त घालताना दिसू लागली. पण आज ही आग कशी लागली? सहज, चुकीनं लागली असेल काय? की कोणी जाणूनबुजून लावली? बाहेरून कुणी येऊन लावली काय? पण बाहेरून गावात येणाऱ्या दरोबस्त वाटांवर तर गस्तवाले जवान संध्याकाळपासून खडे होते-मग आग लागली कशी? कुणी गाववाल्यानं तर लावली नसेल?...
 अशा प्रकारे लोकांत कुजबूज चालली होती. सकाळपासून नाना अफवा उठत होत्या. अनेकांची नावं घेतली जात होती. विनाकारण नसते संशय लोकांना यायला लागले होते. म्हणून हे लोक कासमखानांकडे आले होते. आगीचा छडा त्यांनी लावावा, गुन्हेगार त्यांनी हुडकून काढावा, म्हणून त्यांना सांगण्यासाठी आले होते.
 त्यांचं हे बोलून झालं आणि मग काही वेळ स्तब्ध राहून कासमखानांनी विचारलं, “आहमदचा कुणाशी भांडनटंटा होता काय?"
 यावर सगळ्यांनी 'नाही' म्हणून माना डोलावल्या. कदाचित या गढूळ वातावरणाचा फायदा घेऊन एखादा वैरी आपलं वैर साधण्याची सहज शक्यता होती. पण या साध्या नि सरळ माणसाचं कुणाशी आणि कसलं वैर असणार होतं?
 त्यांनी 'नाही' म्हणताच कासमखान सचिंत झाले, त्यांनाही काही तर्क करता येईना. खरं म्हणजे तर्क करणं हे त्यांच्या हिशेबातच नव्हतं. असं काही असलं की कुणीतरी आपला तर्क बोलून दाखवायचा आणि त्यावर त्यांच्या पाठिंब्याचं शिक्कामोर्तब करायचं अशी गावांतली नेहमीची रीत होती.
 म्हणून त्यांनीच आलेल्या लोकांना विचारलं की, त्यांचा काय समज आहे? ह्या आगीच्या प्रकाराबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे?
 यावर प्रत्येकाने आपापले तर्क बोलून दाखवले. अखेरीस हैदर बोलला आणि त्यानं अण्णा बामणाचं नाव उच्चारलं.
 त्याबरोबर सगळे जण चपापून हैदरकडे बघू लागले. त्यानं सांगितलेला हा तर्क खरा असेल का, याची आपापल्या मनाशी ते शहानिशा करू लागले.
 रात्री आपण आणि सखारामराव असे दोघे बामणवाडीवरच पहाऱ्यावर होतो, रात्रीच्या दहाच्या सुमारास अण्णा हातात काठी घेऊन खोकत खोकत दुकानाच्या दिशेनं गेला-असं हैदरनं पुढं सांगितलं.
 आणि सखारामरावांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, “आपुनसुद्धा अन्नाच्या खोकन्याचा आवाज वळखला."
 कासमखान हळूहळू विचार करू लागले. हळूहळू मागच्या काही गोष्टी त्यांना आठवल्या. गावातल्या हिंदू मुलांसाठी वेगळी, स्वतंत्र शाळा असावी म्हणून अण्णा काही महिन्यांपूर्वी खटपट करीत होता. गावातली शाळा मुसलमानांची होती म्हणजे मुसलमानांनी आपल्या खर्चाने बांधून काढली होती. पण सगळी गावातली मुलं त्याच शाळेत शिकत होती. अण्णाला हे नको होतं की काय?
 याहून दुसरी एक गोष्ट कासमखानांना अधिक महत्त्वाची वाटली. गावात दगड पडायला लागल्यावर रात्रीचा पहारा करण्याची सूचना कामसखानांनी केली, तेव्हाही अण्णानंच त्यांना विरोध केला होता. त्याचं म्हणणं असं होतं की, सबंध गावचा पहारा करण्याची काय जरुरी आहे? दरोबस्त वाडीवरल्या गड्यांनी आपापल्या वाडीच्या पहायचा बंदोबस्त करावा म्हणजे झालं.
 कासमखानांच्या मनात आलं, 'अण्णा खरोखर असा आहे काय? आग लावण्याच्या थराला तो जाईल काय?...कुणी सांगावं? धामधुमीचा, गडबडीचा वखत आहे-कुणाचाच भरंवसा देता येणार नाही...त्यातल्या त्यात या बामनाच्या जातीचा तर बिलकूल देता येणार नाही.'
 आलेल्या लोकांना त्यांनी विचारलं, "मग काय करावा म्हनताव?"
 यावर सगळ्यांच्या विचारानं असं ठरलं की, आज रात्री गावकीची बैठक घ्यावीच. गावातल्या रात्री पहाऱ्यावर नसलेल्या सगळ्या लोकांना आग तुम्ही लावलीत का म्हणून विचारावं, त्यांना शपथ घ्यायला लावावी. कसमा खायला सांगावं. अण्णा तिथं येईलच. तो शपथ घेतो की नाही, यावरून खरं-खोटं काय ते कळेलच.
 सगळ्यांना ही युक्ती पसंत पडली. कासमखानांच्या नावानं रात्री शाळेत बैठक घेण्याचं ठरलं. मग ते लोक निघून गेले.
 रात्रीच्या प्रकाराची घरोघर चर्चा चाललेली होतीच. अल्पावधीत कसं कुणास ठाऊक, त्या प्रकाराशी संबंधित म्हणून अण्णाचं नाव सर्वतोमुखी झालं.
 अण्णा नेहमी सकाळच्या प्रहरी मुसलमानवाडीवरून आपल्या शेतावर जात असे. परतताना वाटेतल्या कादिर खोताच्या दुकानावर तो थोडा वेळ बसे आणि मग घरी जाई. पण त्या दिवशी सकाळी अण्णा शेतावर गेलेला कुणाला दिसला नाही. ही गोष्टदेखील संशयास्पद ठरली. यावरून रात्रीच्या बैठकीत अण्णाची कारवाई उघडकीस येणार असंच सगळ्यांना वाटू लागलं.
 संध्याकाळचा म्हारकीचा म्हार गावभर ओरडत गेला, “आज रातरी गावकीची बैठक सालंमंदी बसायची हाय होऽ..."
 रात्रीची जेवणं झाल्यावर दरोबस्त घरांतील पुरुषमंडळी शाळेकडे निघाली. रात्रीचे पहाऱ्यावर असलेले निवडक जवान मात्र गस्त घालण्यासाठी निघून गेले. बाकीचे शाळेपाशी जमा झाले. दोन गॅसबत्त्या शाळेत भकभकू लागल्या. आपल्यावर काही तोहमत येते की काय म्हणून चिंतातुर झालेले म्हार कोंडाळं करून एका बाजूला बसले. जमावानं आलेली कुळवाडी मंडळी दुसऱ्या बाजूला बसली. राव मंडळीही येऊन बसली. ब्राह्मण नि मुसलमानही जमा झाले. कासमखान हातातली काठी टेकीत आले आणि बैठकीत मध्येच बसले.
 ते येऊन बसले तेव्हा कोणी तरी येऊन त्यांच्या कानाला लागून म्हणाला, "अन्ना अजून नाय अयलो तो?"
 "हो. तो येयालाच व्होवा. नाय तर एवरा करून फुकट व्हायाचा.” असं म्हणून कासमखानांनी म्हारकीच्या म्हाराला अण्णाला बोलवायला पाठवलं. म्हाराला त्यांनी सांगितलं, “अन्नाला म्हनावं, तुज्यामुलं बैठक खोटी हायली हाय."
 म्हार काही वेळानंच परत आला. अण्णानं सांगितलं होतं की, “मला बरं नाही. आज खोकला जास्तच करतोय. मी यायला हवा का? तसं असल्यास पुन्हा येऊन कळव म्हणजे येतो."
 म्हारानं हा निरोप येऊन सांगताच कासमखान मनातल्या मनात हादरले. अण्णा शंभर टक्के गुन्हेगार आहे असं त्यांचं मन त्यांना सांगू लागलं. ते जोरानं किंचाळले, “यायलाच हवा म्हंजे काय? यायलाच पायजे! हा बामण आमाला फसवायला बगतो काय?"
 म्हार पुन्हा अण्णाला बोलावण्यासाठी गेला आणि इकडे बैठकीत कुजबूज सुरू झाली. अण्णा का येत नाही? तो घरी तरी नक्की आहे का? सकाळपासून तो दिसला का नाही?
 तेवढ्यात कासमखानांनी एकेकाला शपथा घ्यायला सांगितल्यामुळे गलका कमी झाला. अण्णा न आल्यामुळे त्याच्या शपथेला एवढं महत्त्व आलं की, बाकीच्या लोकांच्या शपथांत कुणाला फारसा रस उरला नाही. इतरांच्या शपथांचा फार्स चटकन उरकला गेला.
 आणि मग अण्णा आला. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणं त्यानं मफलर गुंडाळला होता. त्याच्या हातात कंदील आणि काठी होती. त्याचे तीक्ष्ण घारे डोळे क्षीणपणे सगळ्या बैठकीवरून फिरले. शाळेच्या पडवीच्या भिंतीला असलेल्या खुंटीला हातातला कंदील टांगून त्यानं त्याची वात कमी केली. मग खोकून खोकून त्यानं बेडका बाहेर टाकला आणि खाकरत खाकरत आत येऊन तो कासमखानांच्या बाजूला येऊन बसला.
 त्याबरोबर सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या गेल्या. गोंधळ कमी झाला. लोक एकदम शांत झाले. अण्णानं संथपणे एकदा साऱ्यांवरून आपली दृष्टी फिरवली आणि तो विडी पेटवून तिचे झुरके मारू लागला. एक प्रकारची उत्सुकता, विचित्र कुतूहल सगळ्यांच्या मनात एव्हाना निर्माण झालं होतं. आता पुढे काय होणार याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. तोच कासमखान अण्णाला म्हणाले, "अन्ना, सगल्यांच्या शपता घेऊन झाल्या. आता तुजी होऊ दे."
 पण इतरांप्रमाणे अण्णाला सरळ शपथ घ्यायला लावायची हा बेत हैदरला पसंत पडला नाही. तो एकदम ओरडला, “नाय-तसा नाय! जरा थांबा मामू. माजा तुमाला अपोज हाय!"
 आपल्या बोलण्यात मधून मधून इंग्रजी शब्द आणण्यासाठी हैदर नेहमी धडपडत असे आणि असलं काही तरी बोलून जात असे. आधी "सपोर्ट'ला तो “सपोज' म्हणत असे, आणि सपोज नि अपोज या शब्दांची अशी उलटापालट करून टाकीत असे. त्यामुळे त्याला काय म्हणायचे आहे ते अनेकदा ऐकल्यामुळे लोकांना कळून चुकलं आणि गंभीर होत गेलेल्या त्या बैठकीतली काही पोरं खदखदा हसली!
 त्यांना दरडावून कासमखानांनी हैदरला विचारलं, “काय म्हनना हाय तुजा?"
 जमलेल्या मंडळीकडे तोंड करून हैदरनं आपल्या 'सुद्ध' भाषेत, अण्णाला आपण रात्री कुठं नि कसं पाहिलं ते सांगितलं. बैठक आता अधिकच गंभीर झाली.
 आणि हे ऐकून अण्णा मात्र दचक्यानं काळाठिक्कर पडला! आपल्यावर सरळ सरळ असा कोणी आरोप घेईल अशी त्याला सुतरामदेखील कल्पना नसावी. हैदरचं बोलणं संपताच तो उठून उभा राहिला. संतापाने तो थरथर कापू लागला. आपल्या सवयीप्रमाणे आधी तो खोक खोक खोकला. मग बाहेर जाऊन त्याने पचकन बेडका टाकला आणि आत येऊन खोकत आणि खाकरत तो ओरडला, "रांडेच्यांनो! माझ्यावर खोटे आळ घेता काय? रात्री मी घराबाहेर पडलो होतो खरा, पण माझ्या कामाला मी बाहेर पडलो होतो. पावट्यात रात्रीची कुणाची तरी गुरं येतात म्हणून मी शेतावर खेप टाकली होती.”
 स्तब्ध झालेले लोक अण्णाचं बोलणं ऐकत होते. हैदरला यावर काही उत्तर देता आलं नाही. त्याला उत्तर देण्याची जरुरीच नव्हती. अण्णा रात्री घराबाहेर पडला होता, आपल्या शेतावर गेला होता, ही गोष्ट त्याच्याच तोंडून शाबीत झाली होती. आणि त्याच्या शेतावर जाण्याची वाट आहमद खोताच्या पेंढ्यांच्या उडवीजवळूनच जात होती.
 तेवढ्यात सखारामराव उठून म्हणाले, "पण अन्नाला शप्पत घेयास सांगावी."
 "हो. शप्पत होवंद्या. अन्नाची शप्पत होवंद्या!" असा सगळ्या मुसलमान खोतांनी गलका केला.
 ते बघून अण्णा उभ्या उभ्याच बोलला, "सगळ्यांच्याबरोबर आग विझवायला मी पण होतो. मला बरं नव्हतं तरी मी जातीनं खपलो. त्यानं मला त्रास झाला. आज सकाळी उठवेना, म्हणून मी कुठं बाहेरही पडलो नाही. पण तुम्हाला माझाच संशय असेल तर मी शपथ घेतो. हो! कर नाही त्याला डर कशाला?"
 "आम्हाला बारा गोष्टी नको सांगूस! शप्पत घे! पयल्यानं शप्पत घे!" असं पुन्हा सगळे मुसलमान खोत ओरडले. तेव्हा अण्णानं कासमखानांच्या पुढ्यातला नारळ उचलून हातात घेतला आणि उभ्याउभ्याच तो मोठ्यानं म्हणू लागला,  "लक्ष्मीबायची शपथ घेऊन मी सांगतो की, आहमद खोताच्या उडवीला मी आग लावली नाही. जर मी आग लावली असेन आणि खोटी शपथ घेत असेन तर वर्ष, सहा महिन्यांच्या आत माझं पुरतं तळपट होऊन जाईल!"
 अण्णाचं हे बोलणं ऐकून गोंधळ शांत झाला होता. अण्णाचा शब्द नि शब्द सगळ्यांना स्पष्टपणे ऐकू गेला होता.
 शपथ घेऊन होताच अण्णा कासमखानांकडे वळून “येतो मी-" असं म्हणाला. झाल्या प्रकाराची चीड त्याच्या मुखावर दिसू लागली होती. बाहेर पडून त्यानं खुंटीवरला कंदील उचलला आणि वात मोठी करून खोकत खोकत तो घराच्या दिशेनं निघून गेला.
 बैठकीत मात्र तो गेल्यावर एकच गोंधळ उडाला. आग लावली कुणी ते कळलं नाही ते नाहीच! एवढे केलेले खटाटोप फुकट गेलेले पाहून मुसलमानांपैकी काही लोकांना घुस्सा आला आणि ते कासमखानांवर उखडले. त्यांची समजूत करीत कासमखान त्यांना म्हणाले, “आरडावरड अनी भांडनटंटा कशाला करायचा? कुनी आग लावली ती आज उद्या कवा तरी कलेलच. अन्नानं लावली असली तर त्याचा तलपट होयाला वेळ लागल काय?".
 कासमखानांनी असे सांगितल्यावर त्यांच्यापुढं कोणी काही बोललं नाही. परंतु मनातून प्रत्येकाला वाटत होतं की अण्णा गुन्हेगार आहे, त्याच्याबद्दल काही तरी व्हायला पाहिजे होतं. निदान त्याला गावकीनं दंड तरी ठोकायला हवा होता. पण आता या बोलण्याचाही काही उपयोग नव्हता. सगळ्या गोष्टी महालक्षुमीवर सोपविण्यात आल्या होत्या. वर्ष-सहा महिने तरी वाट पाहायला हवी होती. स्वत:चं असं जो तो समाधान करू लागला आणि बैठक समाप्त झाली. लोक घरोघर परतले.
 पुष्कळ दिवसानंतर मग गाव शांत झाला. काही दिवस आगीचं रहस्य कळावं अशी लोकांना उत्सुकता वाटत होती. हळूहळू तीही कमी झाली. काही दिवसांनी लोक बहुतेक सारं विसरून गेले. काही दिवस जे संशयाचं वातावरण होतं तेही नष्ट झालं. आगीचा प्रसंग लोकांच्या स्मृतिआड झाला. महाडकडचे वातावरण निवळल्याच्या बातम्या आल्या, तसं गस्त घालणंही बंद झालं आणि गावातल्या लोकांचे व्यवहार सुरळीतपणे चालू लागले. व्यवहारात जोडलेली गावातली माणसं, हा मधला काळ सोडला तर, पुन्हा जोडली गेली.
 आणि मग एक दिवस अण्णा मरण पावला. खोकून खोकून आणि झिजून झिजून मरण पावला. अण्णा मेल्याची बातमी कासमखानांना आहमद शफीनं सांगितली. कासमखानांनी ती शांतपणे ऐकून घेतली आणि मग एकदम त्यांना मागच्या गोष्टीचं स्मरण झालं. चटकन उसळून ते म्हणाले, “मेलो? मला वाटलाच होता!"
 आहमद शफीला त्याचं बोलणं आकलन झालं नाही. त्यानं विस्मयानं विचारलं, 'का? तो शीग होतो त्यावरना?"
 कासमखान आवेशाने उत्तरले, 'छे:, छे:! शीग असलो म्हणून काय झायला? शप्पत! शप्पत नडली! म्हालक्सुमीची शप्पत घेतलान ना खोटी? तलपट व्होयाला वेल लागलो काय?"