लाट/बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट

विकिस्रोत कडून

बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट

 ज्या दिवशी माझ्यापाशी पैसा असतो (मग तो एक आण्यापासून एक रुपयापर्यंत असो) त्या दिवशी मी थोडाफार दुःखी होतो. हे ऐकून तुम्ही मला वेड्यात काढाल हे मला माहीत आहे. पण माझ्या दुःखाचं कारण वेगळं आहे. पैसा नाही हे गृहीत धरून मी जो माझा निष्क्रिय जीवनक्रम आखलेला असतो तो नेस्तनाबूद होतो म्हणून मला दु:ख होतं. पैसा नसूनही पैशाचं सुख भोगण्याची जी काल्पनिक तृप्ती एरवी आणता येते, ती त्या दिवसापुरती तरी नष्ट होते. खरोखर पैसा असलेल्या माणसासारखं मला त्या दिवशी वागावं लागतं. ठेवणीतले कपडे काढावे लागतात. गबाळेपणा टाकून व्यवस्थितपणा धारण करावा लागतो आणि चार बड्या लोकांच्या घरचे उंबरठे झिजवण्यासाठी बाहेर पडावं लागतं.
 मग सकाळचे नऊ वाजले असताना त्या लोकांना साखरझोपेतून उठवावं लागतं. यामुळे 'ते अर्थातच माझ्यावर चिडतात व संतापून विचारतात, "तुम्हाला काही काळवेळ कळते की नाही? आधी बाहेर व्हा बघू!" मी शरमून बाहेर जाऊन उभा राहतो. काही वेळाने हे महाशय हात-तोंड धुऊन बाहेर येतात व मला आत बोलावतात.
 मी बावळटपणे हसत पुन्हा आत प्रवेश करतो. आपला अपमान झाला आहे असे जे उगाचच वाटत असते ते विसरण्याचा प्रयत्न करतो. अपमानाच्या जखमेवर त्यांच्या नंतरच्या स्वागताची मलमपट्टी लावतो. एवढ्यात ते विचारतात, "बोला. काय काम आहे?".
 इथं मी खरं पाहता गोंधळतो. माझ्या कामाची त्यांना आधीच कल्पना असते. पुन्हा आठवण देण्यासाठी किंवा काम झालेलं असलं अथवा होणारं असलं तर विचारण्यासाठी म्हणून मी आलेला असतो. लाचारीच्या स्वरात मी बोलू लागतो, “नोकरीच्या कामासाठी-"
 पुढचं मला ते बोलूच देत नाहीत. हल्ली नोकऱ्या मिळणं किती कठीण झालंय ते मला रसभरित वर्णन करून ऐकवतात. 'टायपिंग येतं का? शॉर्टहँडचा क्लास तरी जॉईन करा! निदान एखादी ॲडीशनल क्वॉलिफिकेशन असली तरी बरं पडतं.' इत्यादी वाक्यांची फैर झडते. आमच्या क्वॉलिफिकेशनचा इथं उपयोग होणार नसल्यामुळे मी तिचा मुद्दामच उल्लेख करीत नाही. मग आजच्या तरुण पिढीच्या अकार्यक्षमतेवर हल्ला चढतो. 'बघू जमलं तर.' असं मोघम आश्वासन मिळतं. पुन्हा वर एक कप चहा! यापेक्षा आणखीन काय हवं? मी खूष होतो. त्या महान माणसाविषयीच्या आदरानं माझं अंत:करण भरून येतं! आता थोड्याच दिवसांनी आपण नोकरीला लागणार असा विश्वास-वेडा विश्वास-वाटू लागतो!
 आणि चालत निघालो की वाटेतच मी नोकरीला लागलेला असतो. माझ्या खिशात सारखे पैसे खुळखुळत असतात. शनिवारी दुपारी ऑफीस सुटल्यावर मी तडक घरी न येता एखादं इंग्लिश पिक्चर पाहायला जातो. मी एकटा नव्हे. मी व माझी मित्रमंडळी! त्यांची तिकिटंदेखील मीच काढलेली असतात. आणि एव्हाना माझं लग्नदेखील झालेलं असतं. माझी बायको मोठ्या उत्कंठतेनं माझी वाट पाहत असल्याची आठवण येऊन पिक्चर संपल्यावर घाईनं मी घरी येतो. ती दारातच उभी असते. मला पाहताच ती मला सांगते, "तुमची कथा त्या *** मासिकानं स्वीकारल्याचं पत्र आलंय हं." मी उत्तरतो! मी उत्तरतो!...
 छे:मी काहीच उत्तरत नाही! मोटारीच्या कर्णकर्कश कर्णयानं मी दचकून भानावर येतो. रस्त्याच्या कडेला होतो. आता कुठं जायचं या विचारात पडतो. तोच एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला जाण्याची आठवण येते. तिथं जाऊन माझं रजिस्ट्रेशन कार्ड रिन्यू करून घेतो. उगाचच दुसऱ्या खोलीत डोकावण्यासाठी धडपडतो. नोकरीची एखादी ऑर्डर आलेली असेल तर आपला नंबर लागेल अशी आशा वाटू लागते, म्हणून अधिक पुढं घुसण्याचा यत्न करतो. पण एवढ्यात तेथल्या पट्टेवाल्याचं लक्ष माझ्याकडे वेधतं. तो येऊन मला बाहेर हुसकून लावतो. तिरमिरी येऊन मी बाहेर कोलमडतो. मनाला एक विचित्र उद्वेग वाटू लागतो. पण एवढी सहनशीलता धारण करायलाच हवी असं वाटू लागतं. त्यानं कमरेत लाथ का घातली नाही याचं आश्चर्य वाटतं. त्याबद्दल मनातल्या मनात समाधान मानून मी बाहेर पडतो.
 मग पुन्हा एका बड्या माणसाची आठवण येते! अ० रझाक बोहरी या बड्या असामीची. धावपळ करीत त्याच्या बंगल्यावर थडकतो. बंगल्यात खाली पेढी नि वर त्याचे निवासस्थान आहे. मी खालीच थांबतो. रझाकसाहेब जेवायला वर गेलेले असतात. नेमकी याच वेळी मला भूक लागली असल्याची जाणीव होते. हात खिशात जातो. पण त्यात फक्त पाचसात आणे शिल्लक उरलेले असल्यानं पुन्हा निराशेनं बाहेर येतो. वाटतं, समोरच्या हॉटेलात चहा-पाव खाऊन यावं. पण एवढ्यात त्यांचा गडी येऊन सांगतो, "शेठनी तुम्हाला वर बोलावलं आहे."
 कसल्या तरी अपेक्षेनं मी वर जातो. दारातून डोकावतो. रझाकसाहेब दिवाणखान्यात जेवायला बसलेले असतात. मला पाहून म्हणतात, "अरे आव, अंदर आव." मी संकोचानं आत जातो. तिथल्या खुर्चीवर अवघडून बसतो. मग भुकेनं वखवखलेल्या नजरेनं शेठजींच्या ताटातल्या पदार्थांकडे पाहतो. मुरगी-चावल, पुलाव, कबाब, कटलेस...असल्या नमुनेदार पदार्थांवरून माझी दृष्टी सरकत अखेर शेठजींच्या जबड्यावर स्थिर होते. त्यांच्या हाताच्या हालचालींनी पुन्हा अस्थिर होते. त्या हालचालीबरहुकूम जबड्यापासून ताटापर्यंत लंबकाप्रमाणं हलू लागते!
 ते जेवता जेवता म्हणतात, "खानेको आव."
 मी उत्तरतो, “बिसमिल्ला, आप खाइये."
 ते पुन्हा आग्रह करतील असं मला वाटतं. त्या अपेक्षेनं मी त्यांच्याकडे पाहतो. पण ते पुन्हा आग्रह करण्याच्या फंदात पडत नाहीत. आपले खातच राहतात. या गृहस्थांना जेवल्याबरोबर चहा घेण्याची सवय असल्यानं आपल्याला आता फक्त चहाच मिळणार हे एव्हाना मला कळून चुकलेलं असतं. मग मी ते कसं जेवतात हेच पाहत राहतो आणि त्यांच्या मुखावरील तृप्ती न्याहाळता न्याहाळता मला माझंच पोट भरल्यासारखं वाटू लागतं. त्यांच्या मुखावरील तृप्ती मला तृप्त करते. अतृप्त तृप्तीनं मी समाधान पावतो!
 काही वेळानं त्यांची मुलगी (वय वर्षे अदमासे अठरा) चहाचे दोन कप घेऊन येते. तिनं काही खायला आणलं असेल असं वाटतं, तेही व्यर्थच ठरतं. एका हातानं चहाचा कप घेत दुसऱ्या हातानं मी माझी कथा असलेल्या मासिकाचा अंक तिच्या पुढं करतो. तिला जेमतेम का होईना, मराठी वाचता येत असल्यामुळे ती भराभर माझी कथा आणि नाव वाचते. मग हलकेच आपल्या डोकीवरील पदर मागं सारीत मला विचारते, “तुम्ही एवढं हे मराठीत कसं हो लिहिता?"
 'हातानं!' असं उत्तर माझ्या ओठावर आलेलं असतं. पण तिच्या मुखावर माझ्याबद्दल चमकत असलेला अभिमान मला तसं उत्तर देऊ देत नाही. मोठ्या प्रयासानं मी ते दाबून दुसरं काहीतरी देतो. तिच्याकडे पाहत राहतो. शेठजी खाकरतात तसा दचकतो. तीही दचकते अन् अंक टाकून आत पळते!
 मग मी मूळ विषयाला हात घालतो. नोकरीसाठी त्यांची विनवणी करू लागतो. "कुठंही द्या. कसलीही द्या. मात्र जास्त त्रासाची नको. माझी ही प्रकृती अशी म्हणून!" अशा प्रकारे बराच वेळ आळवणी केल्यावर ते सावकाश उत्तर देतात, "आजकाल आपल्या लोकांना (म्हणजे मुसलमानांना) नोकऱ्या मिळणं फारच कठीण झालंय. सगळीकडे आपले दुष्मन भरलेले आहेत. शब्द तरी कुणाला टाकायचा?"
 मी अडखळत म्हणतो, “पूर्वीचं मुसलमानांचं परसेंटेज होतं ते आता कमी झालंय फाळणीनंतर. त्यामुळे..."
 “गप्प बसा तुम्ही!" ते माझ्यावर खेकसून म्हणतात, “तुम्ही लोकांनीच सगळी घाण केली आहे. त्यांच्यात नाचता, त्यांच्या जबानमध्ये लिहिता. मग ते का नाही दाद घेत तुमची?"
 'ते गेले झक मारीत! तुम्ही आमचे म्हणवता तर तुम्ही घ्या ना आमची दाद!' असं मी मनातल्या मनात म्हणतो आणि मग त्यांच्याशी बोलतो, "अहो, पण सगळीकडेच मंदी आली आहे. उद्योगधंदे चालत नाहीत पूर्वीसारखे!"
 “का मंदी आली आहे?" ते मला सवाल टाकतात. “पाकिस्तानात बघ. तिथं माझी बरान्च कशी झक्क चाललीय!"
 मला अर्थकारण कळत नसल्यामुळे त्यांच्या मंदीच्या सवालाला मी उत्तर देऊ शकत नाही. पण पाकिस्तानची हालत दिवसेंदिवस बिकट होत असूनही त्यांचा लुंग्यांचा धंदा तिथं बरकतीत चालावा यात नवल नाही, एवढं अर्थशास्त्र मला कळतं. वाटतं, त्यांना देऊ का उत्तर, 'मग जा ना आपलं चंबुगबाळं आटोपून पाकिस्तानात आणि इथला धंदा माझ्या हवाली करा.' पण मला कुठलं असं उत्तर देणं जमायला? आणि पुन्हा विचार येतो, 'ते चिडून खरोखरीच गेले म्हणजे? एवढा व्याप, एवढा पैसा! माझ्याच्यानं काय होणार? तो कोण संभाळणार? मला आपली एकशे-वीस रुपयांची नोकरी पुरे!' हे सगळे सुविचार माझ्या डोक्यात आल्यामुळे मी त्यांना म्हणतो, “दुसऱ्या कुठं नाही तर नाही, पण तुमचे एवढे धंदे चाललेत, त्यात काही द्या ना काम?"
 ते तिरस्काराच्या स्वरात मला विचारतात, “तुमच्यानं काय होणार आहे काम? एकदा माणूस हे असं लिहायला लागलं की फुकट गेलंच म्हणून समजा. आमच्या धंद्याची आम्हाला ट्रॅजेडी करून घ्यायची नाही!" आणि ते मोठमोठ्याने हसू लागतात.
 मला ते ऐकू येत असतं. आणि तरीही त्यांच्या छोकरीच्या घरातल्या विलोभनीय हालचालींकडे मी पाहत असतो. आणि एकदम माझं मन हलकेच पुटपुटू लागतं, 'ही छोकरी तर तुझ्यावर फिदा झालेली आहे. तिच्या हालचाली बघ कशा तुझं लक्ष वेधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत! तिच्या रूपानं तुझं नशीब आज तुला साद घालीत आहे. मग बिचकतोस कशाला? दिरंगाई कसली? उचल तिला! पळव! उडव! काय हवं ते कर? रझाक साहेबांच्या अफाट संपत्तीचा वारस होण्याची ही आयती चालून आलेली संधी आहे. मग का दवडतोयस? निदान नशिबाचा हा डाव खेळायला तरी काय हरकत आहे? लागला लग्गा तर ठीक; नाही तर मग आहेच नेहमीचं वणवण भटकणं...'
 पण माझं दुसरं मन त्याला उत्तर देतं, 'मूर्खच आहेस! अरे, ती कुठं, तू कुठं? ही सगाई तुला सहजासहजी पचनी पडेल काय? का उगाच नसत्या फंदात पडतोयस बाबा? तुला काही इज्जत, अब्रू आहे का नाही? लेखक म्हणून तुला थोडीफार कीर्ती मिळत आहे. एका प्रतिष्ठित घराण्यातला तू युवक आहेस. तुला ही पळवापळवी शोभेल काय? बेहत्तर आहे हालात दिवस काढावे लागले तरी!'
 दोन मनांच्या या सुंदोपसुंदीकडे मी लक्षच देत नाही आणि देतो तेव्हा दुसऱ्याचीच बाजू मला पटू लागते. मी सभ्य असल्याची मला जाणीव होते आणि सगळेच सभ्य लोक लाचारीतदेखील आपला सभ्यपणा सोडीत नसल्यानं त्या लाचारीला म्हणजेच पर्यायानं सभ्यतेला मी चिकटून राहण्याचा निर्णय घेतो. शेठजींच्या छोकरीच्या हालचालींकडे सभ्यपणे कानाडोळा करतो. एवढ्यात ते उठून जायला निघतात आणि मीही माझ्या नोकरीचा प्रश्न तसाच अर्धवट टाकून चालायला लागतो.
 एव्हाना दुपार टळलेली असते. भुकेनं माझा जीव जायला आलेला असतो. विलक्षण थकवा वाटू लागतो. मग वाटतं, महंमदकडेच जावं. महंमद माझा मित्र. एका शेठजींचा छोकरा! त्याच्याकडे अंधेरीला येतो. पण तो कुठं बाहेर गेलेला असतो. मी बसतो. एकदा मध्येच त्याच्या सैंपाकघरात उगाचच चक्कर टाकतो.  काही वेळानं महंमद येतो. त्याचा आचारी दोन कप चहा घेऊन येतो. तो चहा बघून मला मळमळल्यासारखं वाटतं. महंमदला मग दिवसाचा रिपोर्ट सांगतो. तो जेवायला थांबण्याचा आग्रह करतो. जेवायचं म्हणजे आणखी दोन तास थांबायला हवं. ते शक्य नसतं. मी घरी परततो.
 दिवे लुकलुकत असतात. थोरला भाऊ कामावरून परत आलेला असतो. त्याच्या नजरेला न येईल अशा बेतानं घरात शिरतो. कपडे बदलतो. म्हातारी चूलती विचारते, "काय रे? झालं काम?" मी मानेनंच 'नाही' म्हणून उत्तर देतो.
 मग आम्ही सगळे जेवायला बसतो. जेवताना थोरला भाऊ विचारतो, “नाही ना जमत?" मी उत्तरतो, “नाही." मान खाली घालतो. जेवायला लागतो-पण का कुणास ठाऊक, घास घशातल्या घशात अडखळू लागतो. अन्नाची चव विचित्र वाटू लागते. एक तीव्र हुंदका येतो. मोठ्या प्रयासानं मी तो दाबतो. पण माझं मन अनावर होतं. कसेबसे दोन घास खाऊन उठतो. हात धुतो. त्या पाण्यात डोळ्यांतलं पाणी मिसळून जातं.


 खिशातला पैसा संपलेला असतो. दुसऱ्या दिवसापासून निष्क्रिय दिनक्रम सुरू होतो. घरातच बसून राहायचं. आळशासारखं लोळायचं. जेवायच्या वेळी सगळ्यांच्या आधी हजर व्हायचं आणि मन लागलं की देहभान विसरून लिहू लागायचं!
 मग रविवार येतो. रविवारचं अगत्य मला नाही. माझा प्रत्येक दिवस हा रविवारच असतो. पण त्या दिवशी चार लोक घरी असतात. वेळ बरा जातो. त्यांचे रेल्वेपास वापरायला मिळतात. भटकता येतं.
 म्हणून मी रविवारी फिरायला जाणंच पसंत करतो. असेल त्या वेशात सरळ गाडीत जाऊन बसतो. एकदा वाटतं जुहूला जावं. पण स्टेशनपासून पुढं बसनं जायला पैसा नसतो आणि माझा वेषही तिथं जायला तितकासा धड नसतो. म्हणून मी चौपाटीवरच जातो.
 चौपाटी माणसांनी फुललेलीच असते. आपल्या अंगावर समाजातल्या सगळ्या थरांना खेळवीत असते. भेळवाले आणि काळाबाजारवाले, वाळकेश्वरवाले आणि गिरणगाववाले, मुंबईवाले आणि सबर्बनवाले! अठरापगड जाती तिथं गोळा झालेल्या असतात. रंगीबेरंगी पाखरं भिरभिरू लागतात. मादक वातावरण निर्माण होतं आणि विचित्र मन:स्थितीत मी ते सगळं पाहू शकतो-फुकट पाहू शकतो!
 इतक्यात मला मारलेली हाक ऐकू येते. "हमीद-ए-हमीद!' मी दचकून मागं पाहतो आणि निश्चिंत होतो. मेघा हाक मारीत असते. तिच्याबरोबर तिची छोटी चुलत बहीणही असते. दोघी येऊन माझ्या शेजारी बसतात.
 मेघा माझी वर्गमैत्रीण. दोन वर्षांपूर्वी आम्ही एकत्र शाळेत होतो. पण मध्यंतरीच्या तिच्या अस्तित्वाची मला काहीच कल्पना नव्हती. डिसेंबर महिन्याच्या एका दिवशी तारापोरवाला अॅक्विरियममध्ये मला ती अवचित भेटली. आजच्यासारखी तिनं हाक मारली आणि आजच्यासारखाच तेव्हा मी दचकलो होतो. तिच्या हातात डिसेंबर महिन्याचा माझी कथा असलेला एका मासिकाचा अंक होता. 'नाही तरी तुझा पत्ता या संपादकाकडून काढणारच होते. आणि कितीरे अश्लील लिहितोस?' तिनं मला स्पष्ट सुनावलं होतं!
 त्या आठवणीतून मी भानावर येतो. तिच्याशी बोल लागतो. "तुला हल्ली ऐकायला येत नाही काय? कित्ती वेळ हाका मारीत होते? अन् असा एकदम दचकतोस काय?" ती मला म्हणते. मी उत्तरतो, "त्याचं असं आहे. ओळखीचं कोणी भेटू नये अशी इच्छा असते. त्यांना चहा द्यायला माझ्यापाशी पैसा नसतो; बरे, भेटल्यावर त्याला चहाचा आग्रह न करता पुढे सटकलो की माझी मलाच रुखरुख लागून राहते."
 "हं!" ती एक उसासा टाकते. मग आपली चिमुकली पर्स उघडते आणि एकेक रुपयाच्या पाच कोऱ्या करकरीत नोटा काढून माझ्यापुढं करते. मी म्हणतो, "राहू दे."
 ती केविलवाणा चेहरा करून म्हणते, “घे ना!"
 "मला नकोत. खरंच नकोत."
 "असं काय? घे ना. बघ!"
 माझा नाइलाज होतो. ते पैसे मी मुकाट्यानं घेतो आणि खिशात टाकतो. तिचे पैसे घेऊ नयेत ही तीव्र इच्छा असते. पण माझ्या परिस्थितीमुळे ती कधीच सफल होत नाही. महंमदही मला पाच रुपये देतो. लेखनाचा पैसा अद्याप कोणीच देत नाही!...
 काल एक तारीख होती. मला मग आठवण येते. मेघाचा पगार झालेला असणार. घरी भिक्षुक बाप आहे. त्याला तिला ठरावीक पैसे पाठवावे लागतात. इथं चुलत्याकडे राहते. पण तो पैसेवाला असूनही एवढा कंजूष आहे की, जेवणाचेदेखील पैसे तिच्याकडून घेतो. बाकीचे पैसे तिला खर्च होतात; म्हणजे कॉलेजच्या टर्म्सकरता आणि थोडे स्वत:ला. त्यातही माझा पाचाचा वाटा!...
 "आपल्यापैकी कोणीच सुखी नाही हे बघून खरंच मला दु:ख होतं." मी म्हणू लागतो, "महंमदलादेखील कॉलेज सोडावं लागणारसं दिसतंय!"
 “परमेश्वराची इच्छा!" ती हताशपणे उद्गारते.
 मी उसळतो, पण तिला काहीच बोलता येत नाही. 'जाऊ दे' एवढंच पुटपुटतो. माझी नास्तिक मतं तिला माहीत आहेत. पण एका चित्पावनाच्या त्या मुलीवर झालेले संस्कार एवढे प्रबळ आहेत की त्या वादात ती माझ्यावरच संतापते!
 "तुझी प्रकृती कशी आहे?" ती मला विचारते.
 “काय धाड भरलीय मला?" मी म्हणतो, "तुझं कॉलेज कसं चाललंय?"
 "यंदाचं अखेरचंच वर्ष बाबा! मी कॉलेज सोडतेय."
 तिचं कॉलेज सोडण्याचं कारण मला माहीत आहे. पैसा नाही, नोकरी अन् कॉलेज असे श्रम तिला झेपत नाहीत म्हणून तिनं हा निर्णय घेतला आहे. मीही यावर अधिक बोलत नाही. कोपऱ्यावरील इराण्याच्या हॉटेलात तिथून उठून जातो. पावडरचा चहा गटागटा पितो. एका सिनेमाचा पास मिळाल्याची मला आठवण येते. मी मेघाला सांगतो, “तुला सिनेमाला जायचं होतं ना? माझा पास घे हवा तर."  तिची धाकटी चुलत बहीण मध्येच बोलते, “बेबीताईनी सीऽनीमा बघितला बरं काऽ!'
 "होऽय काऽ?" मीही तिला वेडावतो. पण तेवढ्यावरच गप्प बसणारी ती मुलगी नव्हे! हातवारे करीत ती पुढं विचारते, “काहो हमीदभाई? तुमची दाऽढी का वाढली आहे? पैशे नाऽयत होऽय?'
 मला संताप येतो. "मूर्ख आहेस!" मी ओरडतो. पण मेघा मला आवरते, 'गप रे! नाही तर उगाच गळ्यात यायचं..."
 अंधार पडायच्या आधी आम्ही उठतो. त्या गिरगावात जातात. मी जोगेश्वरीला परततो.


 मेघानं दिलेले पैसे संपायला वेळ लागत नाही. फारतर दहा-बारा दिवसच निघतात. पुन्हा निष्क्रिय दिनक्रमाचं चक्र सुरू होतं. आणि तेच खरं सुखकारक ठरतं. कुठं जायला-यायला नको. कुणाला भेटायला नको. लाथा आणि शिव्या खायला नकोत. कोणी आगंतुकपणे भेटण्याची धास्ती करायला नको.
 आणि अगदीच बसणं असह्य वाटू लागलं की, थोरल्या भावाजवळ पैसे मागण्याचा मी बेत करू लागतो. तो पक्का ठरायला दोन दिवस जातात आणि मागण्याइतपत मानसिक तयारी व्हायला आणखीन दोन दिवस! अशा रीतीनं चार दिवसांनी मी मागतो, "मला दोन रुपये हवेत."
 तो काही न बोलता पाचाची नोट पुढं करतो. मी भकास मुद्रा करून बावळट हसतो आणि तिथून उठतो...
 मग दिनचक्र बदलतं. पुन्हा एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज! अ० रझाक बोहल्याचं संदर निवासस्थान! त्याची तिरस्कारपूर्ण दृष्टी आणि त्याच्या पोरीची प्रेमात नजर! आणि दोघांची दृष्टी चुकवण्याचा माझ्या दृष्टीचा विचित्र लपंडाव सुरू होतो. त्याच्या शिव्या आणि तिचं लाघवी बोलणं सारख्याच मन:स्थितीत मी ऐकून घेतो.
 महंमद मग एखादं पिक्चर दाखवतो. त्यातले ते उत्तान प्रणयप्रसंग पाहून माझं डोकं फिरू लागतं. मी मध्येच त्याला म्हणतो, "पुरे झालं, चल घरी जाऊ!"
 तो माझ्यावर उखडतो. "तुझं आताशा मन ताळ्यावर नाही. तुला होतंय तरी काय?"
 "काही नाही! या जीवनात काहीच अर्थ नाही असं मला वाटू लागलंय!"
 "गाढव आहेस!" तो म्हणतो, "तुझ्यासारख्या माणसाला ही असली विफलता शोभत नाही!"
 "जिंदगी तल्ख हुवी! जीनेसे बेजार हुवे!" मी मध्येच कुठल्या तरी गाण्याचा चरण झोकून देतो!
 "अरे! सगळ्यांचंच जीवन असं भग्न झालेलं आहे! आपण सारेच एका संक्रमणकाळाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जनी श्रद्धा पार धुळीस मिळाली आहे. विलक्षण गंभीर आर्थिक परिस्थितीनं सगळीच गांगरून गेली आहेत. एक विचित्र, भयानक पोकळी अवघ्या जीवनात निर्माण झाली आहे. अशा वेळी समाजाला, राष्ट्राला, नवीन श्रद्धा, नवा धीर तुम्ही द्यायचा! तुमच्या लेखणीनं! तुमच्या कलेनं! ते सोडून, तुम्हीच रखडत बसता हे आश्चर्य आहे!"
 महंमद ज्वलंत आशावादाचा नमुना आहे. मला त्याचं म्हणणं कळतं. मी त्याला समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे.
 मेघाही भेटतेच आहे. एकदा चौपाटीवर मला भेळ खायचा तिनं आग्रह केला. भेळ, भजी असलं मी खात नाही. क्षयासारख्या चिवट रोगाबरोबर सामना देताना असल्या पथ्याची आयुधं बाळगायला हवीतच. पण ती म्हणते, "तुझ्या लिहायच्या रोगाला हे फार चांगलं टॉनिक आहे हं! थोडंसं खा म्हणजे लिहायला बघ कशी स्फूर्ती येईल ती!"
 "मला माझी प्रकृती संभाळायला हवी. एका रोगाचं जे टॉनिक तेच दुसऱ्या रोगाचं पथ्य आहे, त्याला काय करू?"
 तिच्या आग्रहाखातर थोडी भेळ खातो. ती हसून विचारते, “हा लिहायचा रोग तुला आधी लागला की क्षय आधी झाला?"
 "कुणास ठाऊक? साहित्याचा रोग लागल्यावर क्षय झाला असेल किंवा क्षय झाल्यामुळेदेखील साहित्याचा रोग लागला असेल! बाकी या दोन रोगांचा एकमेकांशी दाट संबंध आहे खरा! तरी बेहत्तर, आणखीन एक रोग अद्याप लागलेला नाही म्हणून! चौपाटीवरील भेळीशी त्याचा दाट संबंध!"
 माझ्या बोलण्यावर ती तोंड भरून हसते आणि एकदम दचकते. कोणीतरी ओळखीचा माणूस अचानक प्रकटतो. ती सावरून त्या माणसाचं स्वागत करते. माझी ओळख करून देते. लेखक-उदयोन्मुख लेखक म्हणून! तो नाक मुरडून विचारतो, "काय करता?"
 मी काळवंडून जातो. मेघाच मग मला सावरते, त्याला आर्जवानं म्हणते, “यांच्यासाठी कुठं काम बघा ना."
 तो उपेक्षेने हसून उत्तरतो, “यांना काय करायचं आहे काम? बसायचं आणि लिहायचं! घरबसल्या पैसा कमवायचा. बरंय येतो. नमस्कार!” आणि तो निघून जातो. गर्दीत अदृश्य होतो.
 मेघा मला सांगत असते, "हे आपल्याकडचे जोशी. मुंबईत यांचे चार बंगले आहेत. बडी असामी आहे हो!"
 एवढा वेळ आवरून धरलेला माझा संताप अनावर होतो. उसळून येतो. मी देहभान विसरतो. सभोवतालची माणसं जणू नाहीशी होतात. शेजारची मेघाही अदृश्य होते आणि जोरजोरात ओरडतो, “आग लाव त्या चार बंगल्यांना! आम्हाला नको काही काम! नको पैसा! आम्ही उपाशी राहू, आमच्या इच्छा-आकांक्षा मारून जगू, पण जगू! महंमद म्हणतो ते खरं! यापुढं नुसते जगणार नाही! इतरांनाही कसं जगायचं ते शिकवू. तुम्ही राहा ऐषआरामात. दौलत कमवा! जग खरेदी करा! पण पुढं काय? पृथ्वीवरचे चार तुकडे तुमच्या मालकीचे असतील! पण हे अवघं विश्व आमचं आहे. त्यातल्या त्या चमकणाऱ्या दूरदूरच्या चांदण्या अन् तारे हे आमच्या प्रतिभेचे खेळ आहेत. अनंत काणेकरांनी कुणालासं उत्तर दिलं होतं, 'आम्ही सुखदुःखांचे कारखानदार आहोत!' तेच खरं! आम्ही तुमच्या सुखदु:खांचे कारखानदार आहोत! होय! सुखदु:खांचे कारखानदार!!"
 मेघा हलवते तेव्हा मी भानावर येतो. सभोवतालची चार माणसं माझ्याकडे टक लावून पाहत असतात. मी शरमतो. मेघा हळूच पुटपुटते, “मला लाजल्यासारखं झालं. हा मध्येच झटका कुठनं आला तुला?"
 “भेळ खाल्ल्याचा परिणाम!" मी हसून उत्तरतो, "आमच्या महंमद पैगंबरला जेव्हा ईश्वरी संदेश येत तेव्हा म्हणे असाच बेशुद्धीचा झटका येई. परमेश्वर त्याच्या तोंडून कुराण वदवी! इतर लोक ते मग काळजीपूर्वक टिपून घेत. मी आता जे बडबडलो ते तू लिहून नाही घ्यायचं?"
 ती मोठ्यानं हसते, मग मी कडवट स्वरात तिला विचारतो, “तू काय म्हणालीस मघाशी? तुला लाज वाटली, नाही का! पण मी असाच वागणार! माझ्या दुर्दशेला कंटाळून कित्येकांनी माझी संगत सोडली. आता तुम्ही दोघं-तिघं राहिलात. तुम्हीही मला नाही हाक मारलीत तरी हरकत नाही. मी एकटा राहीन. एकाकी या परिस्थितीशी लढेन!"
 तिला ते ऐकून अत्यंत वाईट वाटतं. मला ती समजावण्याचा प्रयत्न करते, "असं काय बोलतोस? तुझ्याविषयी मला आदर वाटतो. अभिमान वाटतो. माझ्या वर्गातला तू! माझ्या गावचा! तू मोठं व्हावंस! खूप मोठं व्हावंस! मोठ्ठा लेखक व्हावास असं वाटतं. तुला खोटं वाटतं माझं म्हणणं?" आणि तिचं बोलणं संपल्यावर मी जेव्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा तिचे डोळे पाण्यानं तरारलेले मला दिसतात.
 मेघा फारच हळवी आहे. पण माझी वर्गमैत्रीण आहे. तिचा स्वभाव आता माझ्या अंगवळणी पडला आहे. हा दोष सोडला तर तिच्या गुणांना मोल नाही. तिचं भलं होवो, असं मी मन:पूर्वक इच्छितो.
 मी तिची मग समजूत घालू लागतो. माझा आवाज चढू लागतो आणि ती माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकू लागते, "कधी कधी मला ही नामुष्की सहन होत नाही मेघा, मग मी चिडतो. आतल्या आत धुमसू लागतो. मनात नाना विचार येतात आणि त्यांनी पेटून निघतो. स्वत:च्या दुबळ्या मनोवृत्तीची लाज वाटू लागते. अग, काय आपला हा मध्यमवर्गाचा अध:पात! एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या पट्टेवाल्यानंदेखील आम्हाला दरडवावं आणि आम्ही मुकाट्यानं बाजूस सरावं! त्या पट्टेवाल्यावरही कदाचित अशी अवस्था येईल याची त्याला जाणीव देऊ नये? आमच्यावरील अन्यायाची आम्हाला अगदीच कशी ग चाड नाही? कशाला आमचे हे लोक राज्य करताहेत? राष्ट्रातली कर्तृत्ववान पिढी अशी विफलतेनं भारावली गेली आहे. तिला कार्यप्रवृत्त करण्याचं ज्यांना त्राण नाही ते राज्य करायला नालायक आहेत! पण आम्ही स्वस्थ का? आम्ही जनजागृती का करीत नाही? समाजाला आशा, धीर का देत नाही? आम्ही कलावंत ना? केवढी प्रचंड जबाबदारी आहे आमच्यावर? विफलतेने ग्रासलेल्या हजारो लोकांच्या कर्तृत्वाचा साठा झाला, आमच्या ज्वलंत साहित्याचं सरपण त्याला मिळालं तर केवढा प्रचंड स्फोट होईल! प्रचलित समाजव्यवस्था कोसळून पडेल. नवी...नवी... समाजव्यवस्था निर्माण होईल! नवी समाजव्यवस्था!..."
 मला बोलता बोलता दम लागतो आणि थांबून मी मेघाकडे पाहतो. तिला विचारतो, "तुला आता लाजल्यासारखं झालं काय?"
 ती खुदकन हसते अन् म्हणते, “छे: तू असा बोलू लागल्यावर मी भारावून जाते. मला ऐकत राहावंसं वाटतं. पण काय रे, मोठा झाल्यावर तुला माझी आठवण राहील?"
 ती असं बोलली की मला भडभडून येतं. जी ठरावीक माणसं आज माझ्या सान्निध्यात आहेत, त्यांना मी कधीतरी विसरणं शक्य आहे काय? पण ही पुढचं कशाला बोलते आहे? कशाला स्वप्नाचे इमले उभे करीत आहे?
 मी 'चुकचुक' करतो! तिला म्हणतो, “Trust no future however pleasant! कशाला उगाच शब्द उधळतेस!"
 तिला ते पटतं, अंधार पडू लागलेला असतो. आम्ही उठतो. एकमेकांचा निरोप घेतो.


 काळाचा ओघ विलक्षण वेगानं सरत असतो. ऋतुचक्राचा फेरा फिरतो आणि त्याच्या दात्याला अडकलेलं दिनचक्र फिरू लागतं. ते पूर्वीचे दिवस सरतात, स्मृतिरूप होतात. पावसाळा येतो. थंडगार हवा! थबथबणाऱ्या पागोळ्या! जीर्ण काळोखे दिवस! उदासवाण्या भेसूर रात्री! विमनस्क संध्याकाळच्या भिववत्या सावल्या...
 माझ्याजवळ छत्री नसते. मी सहसा बाहेरही पडत नाही. जुना रेनकोट काढतो. पण त्याचं कापड ठिकठिकाणी फाटलेलं असतं. एकदा घालून गेलो तर पाण्यानं भिजून त्याला कसलीशी घाण येऊ लागली. मी तो वापरणं सोडून दिलं. बाकी मुंबईचा पाऊस दिलदार खरा! उगाच सारखा कुणाला त्रास देत नाही. कधी फोर्टमध्ये गेलो असताना पाऊस आलाच तर मेघाच्या ऑफीसचा आश्रय घेतो. तिच्याच चिमुकल्या छत्रीत सायंकाळचा चर्चगेटपर्यंत येतो.
 घरी येईपर्यंत कपडे ओलेचिंब झालेले असतात. रात्री अंथरुणावर पडलो की, छातीत विलक्षण कळा मारू लागतात. क्षयासारखा रोग उलटणार तर नाही ना या कल्पनेनं धास्तावतो. कावून जातो. उपडा होतो. छातीवर हात दाबून धरतो आणि तशाच अवस्थेत कधीतरी झोपी जातो...
 दिवस पुन्हा बदलले आहेत. नुकताच प्रताप नावाचा एक मित्र भेटला. फारा दिवसांनी आमची भेट झाली. म्हणाला, "मला जरा शॉपिंगला जायचंय. थोडं कापड खरेदी करायचंय!" माझ्या अंगातल्या फाटक्या शर्टकडे एकवार दृष्टी टाकून मी उठून त्याचेबरोबर जातो. तो कापड घेत असताना मी म्हणतो, “मलाही घ्यायचं होतं चार शर्टांंचं कापड! पैसे आणायला पण विसरलो!"
 तो म्हणतो, "मग घे ना. मी देतो आता. मागाहून दे मला!"
 "अच्छा!" मी म्हणतो. कापड महंमदच्या शिंप्याजवळ देतो. महंमदच्या बिलात बिल तयार होतं. पेढीवरून शिलाईचं बिल भरलं जातं. त्याला निदान एवढी सोय आहे हे नशीब! त्यामुळे आमचीदेखील अशी सोय होते!...
 दोन कथा आणखीन प्रसिद्ध होताहेत. मोबदला नाहीच. आमच्यासारख्यांची अपेक्षाच वेडेपणाची. एका मासिकात काम मिळण्यासाठीही धडपडलो. जमलं नाही!...
 हल्ली कुठं जावं-यावंसंदेखील वाटत नाही. कुठं बसायला, गप्पा मारायलादेखील जात नाही!...
 शेजारचा सदानंद खिशातल्या चार आण्यांचा खुळखुळाट ऐकून म्हणतो, “आज बरेच पैसे खुळखुळताहेत!"
 चार आणे काढून दाखवल्यावर मी म्हणतो, “आज कुठले पैसे बाबा? आज तर वीस तारीख!"
 तो उपहासानं हसून विचारतो, "तारखेशी तुमचा काय संबंध?"
 “आमचा नाहीच! तो कधी काळी येईल असंदेखील आता वाटत नाही. पण ज्यांचा आहे, त्यांच्याशी आमचा संबंध आहे ना?"
 मेघाची पहिली तारीख! प्रतापच्या वडिलांची तीनशे रुपयांची मनीऑर्डर! महंमदचे पाच रुपये! चौपाटीवरची भेळ अन् भजी! अंधेरीची चिक्की अन् केळी! रझाकसाहेबांच्या शिव्या अन् त्यांच्या छोकरीची दर्दभरी साद...भेडसावणारा भयाण भविष्यकाळ! पुढं काय? खरंच, पुढं काय...
 पुढं काय व्हायचं असेल ते होवो! आता तर मी चर्चगेट स्टेशनच्या बाहेरच्या आवारात उभा आहे. माणसांच्या लाटांवर लाटा स्टेशनात येऊन थडकत आहेत, गाड्यांत विरून जात आहेत. माझी दाढी अन् केस भरमसाट वाढले आहेत. मनातून हा वर्षभराचा चित्रपट सरकत आहे. आणि एका विवंचनेनं या क्षणी मला बेजार केलं आहे. माझ्या खिशात पैसा नाही. घरी कसं जायचं? निदान या चर्चगेट स्टेशनातल्या बंदिस्त दरवाजातून आत घुसण्यासाठी काय करावं? घुसावं का असंच आत? की एक आण्याचं मरीन लाइन्सचं तिकीट काढावं? पुढं कोण चेक करतोय म्हणा? पण आणा कुठला आणू? महंमद, प्रताप इथं थोडेच भेटणार आहेत? हो! मेघाचं ऑफीस सुटायची वेळ झाली आहे. जावंच तिच्या ऑफिसात आणि म्हणावं, “एक आणा दे बघू घरी जायला! माझ्या डोक्यात एक सुंदर कथा घोळते आहे, जातो आणि लिहायला बसतो!"