Jump to content

लाट/पराभूत

विकिस्रोत कडून

पराभूत


 अलीखान कमरुद्दीनखान मुस्तफा या नावाचा आणि मुस्तफाखान या नावाने ओळखला जाणारा एक सव्वीस वर्षांचा हाडकुळा तरुण त्या गावात राहत होता. गावाच्या एका कोपऱ्यात असलेल्या आपल्या घरातले त्याचे अस्तित्व तसे गावात कुणाला जाणवतही नव्हते. त्याचा बाप कमरुद्दीनखान गावातल्या मसूदखान या खोताकडे नांगरकी करीत असे. आपल्या मुलाने खोताच्या मुलांसारखे शिकावे असे त्याला खूप वाटत असे. त्याने मुस्तफाखानला दापोलीच्या अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये शिकायला पाठवला होता. पण नांगरकी करीत असताना कमरुद्दीनखानच्या पायात एकदा नांगराचा फाळ घुसला आणि त्याचे सेप्टिक होऊन तो एकाएकी मरण पावला.
 मुस्तफाखानच्या शिक्षणाचा ग्रंथ अशा रीतीने आकस्मिकपणे संपुष्टात आला. तेव्हापासून शाळा सोडून तो घरी येऊन राहिला होता.
 तो गावात कायमचा राहायला आल्यापासून सहसा बाहेर पडला नाही आणि कुणाकडे गेला नाही. कुणात मिसळला नाही अथवा कोणाशी आपणहून बोलायच्यादेखील फंदात पडला नाही. त्याने काही कामधंदाही केला नाही. आपल्या घरात तो नुसताच बसून राहू लागला. भुतासारखा रात्रंदिवस त्या घरात वावरू लागला.
 एकदोनदा जेव्हा कधी मसूदखान मुंबईतल्या आपल्या व्यापारातून चार-आठ दिवसांचा घरी आला तेव्हा मुस्तफाखान त्याच्याकडे गेला आणि त्याने काही पैशांची त्याच्याकडे मागणी केली. त्याचा बाप आपली नांगरकी करण्यात मृत्यू पावला या गोष्टीची फारशी जाणीव मसूदखानाला राहिली नव्हती. परंतु त्याला सारे कायदेकानू माहीत होते आणि मुस्तफाखानला कुणी चेतवला तर आपल्यावर नुकसानभरपाईचा दावा करून तो काही शेकड्यांनी पैसे घेऊ शकेल, अशी त्याला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने एकदोनदा मुस्तफाखानला थोडे पैसे देऊन वाटेस लावले.
 मसूदखान फार हुषार मनुष्य होता. तो खूप श्रीमंतही होता. तो सतत मुंबईला व्यापारी उलाढाली करण्यात मग्न राहिला होता. तथापि त्याच्यामागेदेखील त्याच्या घरची आणि शेतीची कामे यंत्रासारखी बिनबोभाट चालत होती. एवढी त्याची जरब होती.
 त्याने अद्यापपर्यंत अनेक बायका केल्या होत्या. वर्षभर संसार करून या ना त्या निमित्ताने अखेर त्याने प्रत्येकीला घटस्फोट दिला होता; आणि सध्याच्या बायकोला घटस्फोट द्यावयाला तो निघालेला होता.
 मुस्तफाखामला हे सारे माहीत होते. मसूदखानला भेटायला जायचा विचारदेखील त्याला आवडत नव्हता. आपल्याकडे तो तुच्छतेने पाहतो, आपल्या नोकराचा मुलगा म्हणून आपल्याला वागवतो हे तर त्याच्या केव्हाच लक्षात येऊन चुकले होते. परंतु त्याचा इलाज चालत नव्हता. तो लाचार बनत होता आणि दर वेळी लाचारीने मान खाली घालून मसूदखानपाशी पैशांची मागणी त्याने केली होती.
 पण मसूदखान त्याला सतत असा पैसा देत राहणे अशक्य होते. तिसऱ्या वेळी जेव्हा मुस्तफाखान त्याच्याकडे जाऊन उभा राहिला तेव्हा त्याने तोंड उघडण्यापूर्वीच मसूदखानने त्याच्यावर तोंड सोडले. त्याच्या आईबापांचा उद्धार केला. आणि त्याला गचांडी मारून घालवून दिले.
 त्यानंतर पुन्हा म्हणून मुस्तफाखान मसूदखानकडे कधी गेला नाही. अवमानित झाल्याचे त्याला एवढे दुःख झाले की, घराबाहेर पडायचीदेखील त्याला लाज वाटू लागली. भकास मुद्रेने तो आपल्या घराच्या पडवीत सतत बसून राहू लागला.
 अशा रीतीने घरी बसून दु:ख करीत असताना हळूहळू त्याच्या मनात मसूदखानविषयी अढी निर्माण झाली. हळूहळू त्याच्याविषयीचा तिरस्कार त्याच्या मनात दाटू लागला. हळूहळू तो मसूदखानचा द्वेष करू लागला.
 आणि अजूनपर्यंत न जाणवलेली मसूदखानची अनेक कृष्णकृत्ये त्याला आठवू लागली. आपल्या बापाच्या हकनाक मृत्यूला तो जबाबदार असल्याची त्याच्या मनाची आता खात्री पटली. त्याने केलेली असंख्य लग्ने त्याला सलू लागली. त्याच्या अवाढव्य कमाईमागे काहीतरी काळेबेरे असले पाहिजे, असे त्याच्या मनाने घेतले.
 पण त्याला आपण जाब विचारू शकत नाही, आपल्या बापाच्या मृत्यूबद्दलदेखील त्याला कोर्टात खेचू शकत नाही या विचाराने मुस्तफाखान हतबल झाला. एवढा मोठा अन्याय मुकाट्याने गिळण्याखेरीज आपल्यापुढे काहीच पर्याय नाही याची त्याला जाणीव होऊन चुकली आणि तो आतल्या आत तडफडू लागला. स्वत:च्या क्षुद्रतेची कल्पना येताच तो अधिकच विकल बनला. मसूदखानचा तो अधिकाधिक तिरस्कार करू लागला.
 मसूदखान आपल्या बायकोला तलाक देणार असल्याचे गावात अनेक दिवस बोलले जात होते. एक दिवस त्याने खरोखरच बायकोला तलाक दिला. त्याची बायको आपल्या बापाकडे राहावयास गेली. गावात काही दिवस हा विषय चर्चिला गेला आणि मग विसरला गेला. काहीच झाले नाही अशा रीतीने लोक पुन्हा वागू लागले.
 पण काही दिवसांनी मसूदखानची दुसरी (खरे म्हणजे नवी) बायको घरात असल्याचे वृत्त पसरले आणि ते खरेही ठरले. मसूदखानने पुन्हा एक लग्न केले.
 पण या वेळी साराच मामला वेगळा होता. नेहमीसारखी त्याची बायको गावातली अगर जवळपासची नव्हती. ती मुंबईची होती आणि हे लग्नही परभारे मुंबईतच झाले होते. लग्नाची दावतदेखील गावात कुणाला दिली गेली नव्हती.
 मसूदखानच्या तलाकचे आणि नव्या लग्नाचे वृत्त आपल्या घरात भुतासारख्या वावरणाऱ्या मुस्तफाखानपर्यंत कसे तरी जाऊन पोहोचले तेव्हा त्याच्या अंगाचा भडका उडाला. एखाद्या रुळासारखे अजस्र सामर्थ्य असलेला तो माणूस या जगातले हवे ते विकत घ्यायला निघाला आहे असे त्याला वाटू लागले. हा रूळ थांबविण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही याची त्याला त्या क्षणी पुन्हा खंत वाटू लागली.
 घरातल्या घरात येरझारा घालीत असताना मसूदखानच्या नरडीचा घोट घेण्याचा विचार त्याच्या मनात डोकावला. आपल्या मनात हा विचार यावा याचे त्याला आश्चर्य वाटले. मसूदखानला रोखण्याची, त्याचा अन्याय वेशीवर टांगण्याची आपल्याला इच्छा झाली याचे त्याला नवल वाटू लागले.
 पण तसे झाले खरे! वेड्यासारखा तो विचार त्याच्या मस्तकात घुसला आणि ठाण मांडून बसला. त्या क्षणी मसूदखान गावात हजर असता तर तो नक्कीच त्याच्या नरडीचा घोट घ्यावयास गेला असता! पण त्याच्या दुर्दैवाने मसूदखान मुंबईत मधुचंद्र साजरा करीत होता. आपल्या नव्या बायकोचे सौख्य अनुभवीत होता. मेजवान्या झोडीत होता.
 मुस्तफाखानला त्याच्या या नव्या बायकोबद्दल अनुकंपा वाटू लागली. मसूदखानने आजवर तलाक दिलेल्या साऱ्या बायका त्याच्या नजरेसमोर उभ्या राहिल्या तेव्हा या नव्या बायकोचे भवितव्यदेखील वेगळे नाही, हा विचार त्याच्या मनात आला. त्या सोडून दिलेल्या बायकांबद्दल त्याला जशी दया वाटू लागली, तशीच त्याला या नव्या बायकोबद्दलदेखील वाटू लागली. त्या सोडल्या गेल्या म्हणून आणि ही कधी तरी सोडून देण्यासाठी आणली गेली म्हणून! पण या साऱ्या बायका त्याने पाहिल्या होत्या. अगदी मसूदखानने त्यांच्याशी लग्ने करण्याच्या आधीपासून तो त्यांना ओळखत होता. त्यांच्या सुखदु:खांशी, आकांक्षांशी, नवऱ्याबद्दलच्या त्यांच्या किमान सुखाच्या कल्पनांशी तो परिचित झाला होता. पण ही मुंबईची बायको त्याने पाहिली नव्हती आणि जे तिच्याविषयी त्याने ऐकले होते, त्यावरून गावातल्या या सामान्य स्त्रियांहून ती खचित वेगळी असल्याचे अनुमान त्याने काढले होते.
 हैदराबादच्या कुठल्या तरी नबाबाची ती मुलगी असल्याचे त्याने ऐकले होते. ती चांगली शिकलेली, सुसंस्कृत मुलगी आहे असेही त्याला माहीत झाले होते. आणि मसूदखानशी तिचा प्रेमविवाह झाला असल्याचीही अफवा त्याच्यापर्यंत पोहोचली होती. मसूदखानसारख्या दुष्ट मनुष्याला निवडणाऱ्या त्या मुलीबद्दल त्याला करुणा वाटू लागली. अशा मोठ्या घराण्यातल्या चांगल्या मुलीने त्याला कशी माळ घातली हे कोडे विचार करूनदेखील त्याच्याने उलगडेनासे झाले.
 त्याला तिच्याविषयी विलक्षण कुतूहल मात्र निर्माण झाले. तिला बघावेसे त्याला वाट लागले. तिला शक्य तर भेटावे आणि तिचे हृद्गत समजावून घ्यावे असला विचित्र विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला.
 एक दिवस मसूदखान तिला घेऊन गावात आल्याचे कळताच तो विलक्षण अस्वस्थ झाला. ती येणार असल्याचे कळले तेव्हा तो रस्त्यावर जाऊन उभा राहिला. इतर गोळा झालेल्या लोकांत मिसळला आणि मोटारीतून उतरणाऱ्या एकेक आकृतीकडे आतुरलेल्या नजरेने पाहत राहिला. मसूदखानबरोबर मोफत यायला मिळाले म्हणून त्याच्या गाडीतून आलेली गावातली फालतूक माणसे एकामागोमाग आधी त्या मोटारीतून उतरली. त्यानंतर मसूदखान उतरला. आता त्याची बायको उतरणार या अपेक्षेने डोळे किलकिले करून तो मोटारीच्या दिशेने पाहू लागला. पण तेवढ्यात मसूदखानच्या गड्यांनी एक डोली आणली आणि नेमकी मोटारीच्या दरवाजासमोर उभी केली. मसूदखानची बायको आत जाऊन केव्हा बसली त्याला कळलेदेखील नाही. डोली उचलली गेली आणि मागून लोक चालू लागले, तिथून निघून गेले.
 आणि अशा रीतीने मसूदखानच्या बायकोला पाहायची त्याची एक संधी हुकली गेली. पाहायलाच जी मिळाली नाही तिच्याशी बोलणार तरी कसे? पण या एका अनुभवाने तो निराश झाला नाही. ती आपल्या दृष्टीस पडावी म्हणून तो आटोकाट प्रयत्न करू लागला. ती नवी नवरी असल्याने गावात कुठे तरी जायला म्हणून बाहेर पडेल या अपेक्षेने ठरावीक रस्त्यावर तो रेंगाळत उभा राहू लागला. मसूदखानच्या घराभोवताली रस्त्याने जाण्यायेण्याच्या मिषाने आणि कुणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा बेताने तो फिरू लागला. त्याच्या घराच्या ठरावीक खिडक्यांसमोर जाऊन डोकावू लागला.
 पण मसूदखानच्या बायकोचे त्याला दर्शन झाले नाही. ती घराबाहेर पडली नाही. कुणाकडे गेली नाही. कधी चुकूनदेखील कुठल्या खिडकीत उभी राहिली नाही. एवढी शिकलेली, सुसंस्कृत मुलगी त्या घराच्या चार भिंतीतच अडकून पडलेली पाहून त्याचे अंत:करण शतशः विदीर्ण होऊन गेले. ती मसूदखानच्या मोहजालात फसली जावी याचे त्याला अतोनात दु:ख होऊ लागले आणि मसूदखानचा त्याला अधिकच द्वेष वाट लागला.
 काही दिवसांनी मसूदखान एकटाच मुंबईला निघून गेला. त्याची बायको मात्र त्याच्या कुटुंबीयात तिथेच राहिली. त्याने असे एकटे मुंबईला निघून जाणे मुस्तफाखानला खटकले. त्याच्या या कृत्यातदेखील त्याला वेगळा, विचित्र अर्थ भरलेला दिसू लागला. आपल्या स्वैराचाराला तिचे बंधन राहू नये म्हणून त्याने योजलेली ही युक्ती असल्याचे मुस्तफाखानला वाटले.
 त्याला वाटले, तिला भेटावे आणि मसूदखानविषयी सारे सांगून टाकावे. त्याने आजपर्यंत केलेली असंख्य लग्ने, त्याने आपल्या बायकांना दिलेली क्रूर वागणूक, त्याचा बदफैलीपणा, पैसे कमावण्याचे त्याचे वाममार्ग, आपल्या बापाचा त्याने घेतलेला बळी, मुस्तफाखानपाशी सांगण्यासारख्या कितीतरी कथा होत्या. पण तीच भेटत नव्हती. तिचे त्याला दर्शनदेखील होत नव्हते. तिचे नखदेखील त्याच्या नजरेस पडत नव्हते.
 पण अखेर एक दिवस त्याला विलक्षण अनपेक्षितपणे मसूदखानच्या बायकोचे दर्शन झाले. पहाटेच्या वेळी आपल्या पडवीतल्या खाटेवर तो जाग येऊन पडला असताना एका स्त्रीची आकृती रस्त्याने समुद्राच्या दिशेने चालत गेलेली त्याने पाहिली आणि त्याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच वेळी पुन्हा ती आकृती प्रगट झाली. तशीच सावकाश चालत समुद्राच्या दिशेने जाऊ लागली. आणि मग रोज नियमित जाताना त्याला ती दिसू लागली.
 तिच्या केवळ चालण्याच्या ढबीवरून ती मसूदखानची बायको असली पाहिजे हे त्याने ओळखले. एवढी संथ चाल गावातल्या अडाणी बायकांची असणे शक्यच नाही, असे त्याला वाटले. गावातली कोणी स्त्री पहाटेच्या वेळी एकटी फिरायला जाणेही शक्य नाही, याचीही त्याला जाणीव झाली.
 तिच्या मागोमाग तो रस्त्याने चालू लागला. थोडे अंतर ठेवून तो ती कुठे जाते ते पाहू लागला. चालता चालता समुद्राच्या अवाढव्य पसरलेल्या किनाऱ्यावर येऊन थडकला. थबकून तो जागच्या जागीच उभा राहिला.
 मसूदखानची बायको संथ पावले टाकीत थोडी पुढे गेली आणि त्या किनाऱ्यावर एके ठिकाणी समुद्राकडे तोंड करून उभी राहिली. काही क्षण उभी राहून ती तिथेच खाली बसली.
 मुस्तफाखान सावकाश पावले टाकीत तिच्याजवळ गेला आणि तिला न दिसेल अशा बेताने उभा राहिला. तिच्याकडे पाहू लागला. ती आपले पाय पसरून आणि आपल्या शरीराचा भार आपल्या दोन्ही हातांवर मागे टाकून बसली असल्याचे त्याच्या लक्षात आले. पहाटेच्या त्या खाऱ्या, मतलई वाऱ्याने बेभान, रोमांचित झाल्यासारखी ती समुद्राच्या दिशेने पाहत असल्याचे त्याला जाणवले. बसायची ती पद्धतही त्याला वेगळी, अनोखी वाटली. आणि तिची वस्त्रे, ती नेसायची पद्धत, सारेच त्याला वेगळे असल्याचे जाणवले. तिच्या सुसंस्कृतपणाविषयी, नबाबी घराण्याविषयी जे जे काही त्याने ऐकले होते ते ते सारे खरे असल्याचा त्याला पडताळा आला. आणि मसूदखानविषयीचा त्याचा तिरस्कार पुन्हा उफाळून आला. मसूदखानच्या मोहजालात ती फसली जावी या विचाराने तो कासाविस झाला. ती सुंदर, नाजूक स्त्री आपल्या संथ गतीने मसूदखानच्या बाहुपाशात कशी ओढली जात असेल याचे चित्र मनात उभे राहताच तो शहारून गेला.
 त्याला मग तिथे अधिक वेळ थांबणे शक्यच झाले नाही. तो भराभर चालत तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्याला पाहून ती चपापून व्यवस्थित बसली. आपले पसरलेले पाय तिने आखडून घेतले आणि आदबीने ती त्याच्याकडे पाहू लागली.
 “अशा आश्चर्याने पाहू नका.” तो तिला म्हणाला, “माझे नाव मुस्तफाखान. या गावातच मी राहतो. पहाटे नेहमी फिरायला येतो. तुम्हांला इथं बसलेल्या पाहून सहज पुढे आलो."
 ती नुसतीच हसली आणि लागलीच गंभीर झाली. त्याच्या बोलण्यावर तिने पुरेसा विश्वास ठेवला नाहीसे त्याला तिच्या चर्येवरून वाटू लागले.
 “आपण मसूदखानच्या पत्नी वाटते?"
 "होय." ती कशीबशी एकच शब्द बोलली.
 "मला वाटलंच!" तो पुन्हा म्हणाला, “आमच्या गावात बाहेरगावची तुमच्याशिवाय दुसरी कोणीच स्त्री नाही. शिवाय, अशी पहाटे एकटीच फिरायला कोणी येणंही शक्य नाही."
 ती पुन्हा हसली. पण या वेळी मात्र लागलीच गंभीर झाली. पुष्कळ वेळ हसरा चेहरा करून त्याच्याकडे पाहत राहिली.
 त्याला अधिक काय बोलावे ते कळेनासे झाले. तिचे हृद्गत कसे समजून घ्यावे? मसूदखानविषयी तिला एकदम कसे सावध करावे? विषयाला सुरुवात तरी कशी करावी?
 ती एव्हाना त्याच्याकडे पाहायची बंद झाली होती. पहाटेचा अस्पष्ट प्रकाश मिसळलेल्या काळोखाच्या आवरणाखाली पसरलेल्या अथांग समुद्राकडे ती अनिमिषपणे पाहत होती. समुद्राचे त्या वेळचे दर्शन त्यालाही वेगळे, विलोभनीय वाटले. वाहणारा तो वारा वेगळा वाटला. न दिसणाऱ्या लाटांचा नाद आगळा भासला. आणि सागराची अथांगता केवळ त्या नादानेच जाणवली. तिच्यासारखाच तोही मंत्रमुग्ध बनला. काही न बोलता तो तिथून बाजूला झाला. जरा दूर जाऊन बसला. ती उठून निघून जाईपर्यंत बसून राहिला.
 मग रोज पहाटे तो तिच्या यायच्या वेळी समुद्रावर येऊ लागला. आधी दूर उभा राहून जणू अचानक ती दृष्टीस पडल्याचे तिला भासवू लागला. आणि सहज चार गोष्टी बोलत बसू लागला. तो रोजच असा भेटू लागल्यानंतर तीही त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली, पण ते बोलणे सारे अघळपघळ होते. ते समुद्राबद्दल होते. पहाटेच्या त्या खाऱ्या, मतलई वाऱ्याबद्दल होते. न दिसणाऱ्या लाटांच्या गुंजारवाबद्दल होते, बोलण्यातून त्याला तिचे गूढत्वच प्रतीत झाले होते. ती एखाद्या रहस्यमय कथानकाची नायिका भासली होती. स्वप्नरंजनात दंग होणारी आणि निष्पाप, अशी त्याच्या मनावर बिंबली होती. त्यामुळे तिच्याविषयी अनुकंपा आणि मसूदखानविषयीचा तिरस्कार अधिकाधिक वाढला होता.
 मग एक दिवस त्याने तिच्याशी बोलता बोलता सरळच विचारले, "तुमचा प्रेमविवाह झाला काय?"
 तिने आश्चर्याने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तिच्या ओठांच्या पाकळ्या विस्फारल्या गेल्या. डोळ्यांत अनेक भाव प्रकटून नाहीसे झाले. ते सारे पकडता आले असते तर केवढे चांगले झाले असते, असे त्याला वाटले.
 "होय." ती काही वेळाने म्हणाली आणि हसली. नेहमीसारखी हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तिचा चेहरा गोंधळल्यासारखा झाला. त्याला नेमके काय विचारायचे आहे हे तिच्या लक्षात आले नाही.
 "कसा झाला?" त्याने पुन्हा प्रश्न केला, "तुमची हरकत नसेल आणि काही विपरीत . वाटून घेणार नसाल तर ते सारे तुमच्या तोंडून ऐकायची माझी इच्छा आहे."
 ते ऐकून ती आपल्या हातावर रेलली आणि आकाशातल्या पहाटे लुप्त होणाऱ्या ताऱ्यांकडे पाहू लागली. त्या आठवणींनीच ती रोमांचित झाली. त्याचे अस्तित्व जणू विसरली. आपले पाय तिने नकळत पुढे पसरले आणि तिच्या तोंडून शब्द उमटू लागले...
 ते ऐकताना शब्दांचा रूढ अर्थ त्याला गमावल्यासारखे वाटू लागले. कुठल्या तरी संगीताच्या सुरांसारखा तिचा तो आवाज त्याच्या कानांत घुमू लागला. त्यातल्या घटनांपेक्षा तिच्या भावनांची उत्कटता तेवढी त्याच्या हृदयापर्यंत जाऊन भिडत होती. मसूदखानच्या प्रेमाने ओलीचिंब होऊन विवस्त्र अवस्थेत ती शहारत असल्याचे दृश्य त्या शब्दांतून त्याच्या मनात प्रकट झाले.
 त्या विचाराने तो शरमिंदा झाला. आणि मग तिच्या प्रेमाबद्दल सांगितलेली कथा त्याला आकलन झाली. मसूदखान व्यापाराच्या निमित्ताने नेहमीच तिच्या घरी जात-येत होता. त्याने तिला पाहिली होती आणि तिच्याशी ओळख होताच तिला मागणी घातली होती. यात वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण काहीच नव्हते. फक्त तीच वेगळी होती, वैशिष्ट्यपूर्ण होती. आणि त्या सामान्य माणसाच्या तकलुपी प्रेमाने अगदीच सामान्य रीतीने बळी पडली होती.
 "हे अगदीच सामान्य झाले!" तो उपरोधाच्या सुरात उत्तरला, “अशी लग्ने नेहमीच घडतात. आश्चर्य वाटते ते तुमच्याबद्दल! तुम्ही कशा तयार झालात?"
 "का बरे?" तिने विचारले. “माझी लग्नाला संमती होती. ते मला आवडले होते. त्यांच्याशी लग्न न करण्यासारखे काहीच कारण नव्हते."
 "काहीच कारण नव्हते?"
 “काहीच नव्हते. निदान माझ्या दृष्टीने तरी मला आक्षेपार्ह वाटणारे त्यांच्यात काहीच आढळले नाही."
 “तुमच्या दृष्टीनं?" तो जोरात म्हणाला आणि हसला. खदखदून हसला.
 "का? त्यात हसायला काय झाले?" तिने चमकून विचारले.
 “तुमच्या दृष्टीने म्हणालात ना, म्हणून हसलो. तुमची दृष्टी निष्पाप आहे, भाबडी आहे, भोळी आहे. अशा दृष्टीला समोरचा मनुष्य वेगळा कसा दिसेल? तुम्हांला त्याआधी मसूदखानची कितीशी माहिती होती?"
 "काहीच नाही!" ती उद्गारली. आणि आपण अनावश्यकरीत्या त्याच्याशी युक्तिवाद करण्यात गुंतून जात असल्याचे तिला जाणवले. त्यातून अंग काढून घेण्याच्या इच्छेने ती म्हणाली, "आणि माहीत असण्याची काही आवश्यकताही मला वाटली नाही."
 “असे कसे?" आपले बोलणे अट्टहासाने चालवीत तो म्हणाला, “ज्याच्याबरोबर आयुष्य काढावयाचे त्याची थोडीफार तरी माहिती-"
 "जाऊ द्या हो." ती चटकन त्याला थांबवीत म्हणाली, "तुम्ही उगाचच हा विषय घोळवताहात!"
 "तुम्हांला आवडत नाही का?"
 "तो प्रश्न नाही. आवडत नाहीही. पण शिवाय तुमच्याशी मी तो चर्चीत बसावे असे काही मला वाटत नाही."
 आणि मग तो गप्प बसला. त्या दिवशी तो विषय तसाच वाढवण्याची उकळी त्याने मनातल्या मनात दाबली. गळ्यापर्यंत आलेले मसूदखानविषयीचे तिरस्काराचे शब्द त्याने आतल्या आत गिळले. त्याने आपला पवित्रा बदलला आणि लागलीच चेहराही बदलून टाकला. अजीजीच्या सुरात तो म्हणाला, "तुम्हाला दुखावण्याची माझी इच्छा नव्हती."
 "खरे आहे. मी तसे कुठे समजले?" ती उत्तरली, “पण एवढे मात्र कळून चुकले की, तुमचे माझ्या नवऱ्याबद्दल काही चांगले मत नाही."
 "होय. नाही. किंबहुना फार वाईट मत आहे."
 "होय का? पण त्याचे कारण कोणते?"
 "खास असे कोणतेच कारण नाही. वाईट माणसाबद्दल माणसाचे मत वाईटच होत असते."
 "अर्थात तो वाईट अथवा चांगला असणे हे आपल्या वाटण्यावर अवलंबून असते."
 यावर त्याला पुन्हा गप्प बसावे लागले. तिला उत्तर द्यायचे त्याला यावेळीही जमले नाही. त्याला ती अधिकच गूढ, रहस्यमय वाटू लागली. आणि मग रोज रोज भेटू लागल्यानंतर तिचे वागणे त्याला अधिकच बुचकळ्यात टाकू लागले.
 एक दिवस त्याने तिला विचारले, "तुम्ही पहाटेच्या फिरायला का येता?"
 त्याच्या विचारण्यात काही तरी खोल अर्थ आहे असा तिला तात्काळ संशय आला. ती मिस्किलपणे उत्तरली, “पहाटेची वेळ फिरायला चांगली असते म्हणून."
 "हे एक कारण झाले. दुसरे?"
 "यावेळी सहसा कोणी मला पाह्यचा संभव नसतो म्हणून!"
 "असं? म्हणजे तुम्हाला बाहेर पडलेले कुणी पाहू नये, अशी तुमची इच्छा असते तर!"
 "नाही नाही, असं बिलकूल नाही. तुम्ही मला रोजच पाहता की! तुमच्यांशी मी मोकळेपणानं बोलते. मुंबईला मी एकट्यानं बाहेर पडते. पण या तुमच्या गावात फिरायला असं बाहेर पडणं कुणाला आवडणार नाही."
 "मग काय झाले? लोकांच्या आवडीनुसार तुम्हांला वागायचे काही कारण नाही."
 "होय, पण माझ्या नवऱ्यालाही ते आवडत नाही."
 "असं? म्हणजे तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला दिवसा बाहेर पडायची बंदी केली आहे."
 “असा काही माझ्या म्हणण्याचा अर्थ होत नाही. त्यांना जे आवडत नाही ते मी करीत नाही."
 "तुम्हाला आवडत असले तरी?"
 "हो! मला आवडत असले तरी."
 "पण हा शुद्ध जुलूम झाला!"
 "असे तुमचे म्हणणे! मला तसे वाटत नाही."
 या क्षणी त्याचा संताप अनावर झाला. मसदखानविषयीचा सारा त्वेष त्याच्या मस्तकात भिनला. त्याच्या तिरस्काराने तो वेडापिसा झाला. तो दातओठ खात म्हणाला, "तुम्हांला तुमच्या नवऱ्याबद्दल काहीच माहिती नाही. मी काय सांगतो ते ऐका! तुमचा नवरा हा एक बदफैली माणूस आहे, हे तुम्हांला माहीत आहे? त्याने आजवर अनेक लग्ने करून अनेकींच्या आयुष्याची राखरांगोळी केल्याची तुम्हाला कल्पना आहे? आपल्या बायकांशी तो अत्यंत क्रूरपणे वागतो याची तुम्हाला अद्याप जाणीव झाली आहे? पैशापलीकडे त्याला कसलीच मातबरी वाटत नाही हे तुम्हाला माहीत आहे? स्त्री आणि धन कुठल्याही वाममार्गाने मिळवण्याची त्याची तयारी असते, याचा तुम्हाला अनुभव आला आहे? म्हणूनच तो तुम्हाला दिवसा फिरायला पाठवू इच्छित नाही. आपल्या बायकोने चार लोकांत मिसळावे, बाहेर पडावे असे त्याला वाटत नाही, वाटणार नाही. तिने आपल्यासारखेच बनावे म्हणून तो प्रयत्न करीत राहणार, आपली मते तुमच्यावर लादणार. स्वत:सारखे तुम्हाला वागायला लावणार! तुमच्या स्वतंत्र व्यक्तित्वाला तिलांजली द्यायला लावणार!..."
 पुढे काय बोलावे त्याला कळेना. आपण केलेला प्रहार तिला कितपत जाणवला हेही त्याला आकलन होईना. जोवर तो बोलत होता तोवर तिच्या प्रतिक्रिया जाणणे त्याला शक्य झाले नाही. पण तो बोलायचा थांबला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
 ती हसत होती. नेहमीसारखीच हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती. एखाद्या लहान मुलाच्या बडबडण्याने मोठ्या माणसांची जशी करमणूक होते तशी तिची झाल्याचे तिचा चेहरा आणि डोळे त्याला सांगत होते.
 त्या हास्याने तो दुखावला! ते निर्मळ, निष्पाप हसणे त्याच्या जिव्हारी लागले. आपले सारे बोलणे असे सहजासहजी हसून तिने उडवून लावावे याचे त्याला दु:ख झाले. त्याला वाटले, तिला आपले बोलणे खरे वाटत नसावे.
 "तुम्हाला हे सारे खोटे वाटते?"
 "छे: छे:!" ती म्हणाली, "कदाचित खरेही असेल; पण मला खऱ्याखोट्याचा पडताळा कुठे घ्यायचा आहे?"
 "मग तुम्ही हसलात का?"
 पुन्हा तशीच हसत ती उत्तरली, “मी इथे आल्यापासून मला अनेकांनी माझ्या नवऱ्याबद्दल जे सांगितले, तेच तुम्ही मला ऐकवले. मी ते ऐकून केव्हाच कंटाळून गेले आहे. मग हसू नको तर काय करू? जे मला आधीच माहीत होते ते ऐकण्यात स्वारस्य तरी कसे येणार?"
 ती पुढे म्हणाली, "पण इतरांपेक्षा तुमचे सांगणे मला जरा वेगळे वाटते खरे! लोकांचा उद्देश माझे त्यांच्याविषयी मत कलुषित करणे हा होता. तुमचा तसा दिसत नाही. तुम्हाला ते खरोखरच भयंकर वाटतात. वाईट वाटतात. आणि अशा वाईट माणसापासून मी दर राहावे या अपेक्षेने तुम्ही सारं मला सांगताहात! तुम्हाला ते वाईट दिसले असतील, कदाचित तुमच्याशीही ते वाईट वागले असतील. पण मला ते चांगले वाटतात! खरंच, चांगले वाटतात."
 तो उपरोधाने हसून म्हणाला, "त्याने तलाक दिलेल्या साऱ्या बायकांना असेच वाटत होते. त्याच्याविषयी त्यांच्या अशाच भावना होत्या. पण अखेर त्यांचे काय झाले? तुम्हालाही अखेर तोच अनुभव येईल-"
 “अशक्य!" ती म्हणाली. पण या वेळी नेहमीसारखा तोल ठेवणे तिला शक्य झाले नाही. तिचा आवाज फार वेगळा, विचित्र निघाला. तिचा चेहरा पार बदलून गेला. जणू आपले सर्वस्वच लुटले जात आहे या भावनेने ती कासाविस बनून गेली. "हे शक्य नाही. कधीच शक्य नाही!" ती पुन्हा म्हणाली. तिचा गळा आता दाटून आला आणि डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
 तो बोलायचा बंद झाला. तिच्या त्या प्रेमाच्या दीप्तीने दिपल्यासारखा तिच्याकडे पाहू लागला. हळूहळू तिची आसवे गालांवर ओघळू लागल्याचे त्याच्या ध्यानात आले आणि तो व्यथित झाला. कासाविस झाला. तिला आपण अशा यातना द्यायला नको होत्या, असे त्याला वाटू लागले. तो म्हणाला, 'आय अॅम सॉरी. तुम्हाला दुःख देण्याची माझी इच्छा नव्हती."
 ती काहीच म्हणाली नाही. तशीच समुद्राकडे पाहत बसून राहिली. हळूहळू तिच्या गालांवरील आसवे सकून गेली. डोळे कोरडे झाले. चेहरा सौम्य, हसरा झाला आणि मग त्याला बरे वाटले. खूप बरे वाटले. मसूदखानबद्दल कितीही तिरस्कार वाटत असला तरी तिला दुःख व्हावे असे तो स्वप्नातदेखील कल्पीत नव्हता. किंबहुना तिने आनंदी राहावे म्हणून तर त्याची ही सारी धडपड चालली होती.
 त्या दिवशी ती तिथून उठून गेली तेव्हा यापुढे ती फिरायला येणार नाही आणि आलीच तरी आपल्याशी एक शब्ददेखील बोलणार नाही असे मात्र त्याला वाटले. परंतु ती नेहमीसारखी दुसऱ्या दिवशी तर आलीच, पण त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली. इतकेच नव्हे तर तिने त्याला पाहताच हसून विचारले, “आज कुठल्या इराद्याने आला आहात?"
 "कुठल्याही नव्हे. तुमचे मन:स्वास्थ्य बिघडवण्याचा माझा बिलकूल इरादा नाही."
 "शुक्रिया!" ती हसून उत्तरली. पण त्या दिवशी तिलाच तो विषय काढण्यावाचून चैन पडले नाही. तिने विचारले, "तुम्ही असे सतत माझ्या नवऱ्याविरुद्ध का बरे बोलत असता?"
 "मग काय करू? आमच्यासारखी सामान्य माणसे बोलण्यापलीकडे अधिक काही करू शकत नाहीत. पण निदान आम्हाला बोलता येते हेही काही कमी महत्त्वाचे नव्हे! अर्थात बोलायचे तर त्याकरिता योग्य ते माणूस मिळाले पाहिजे. सुदैवाने तेही मला तुमच्या रूपाने लाभले. म्हणून मी तुमच्यापाशी बोलत असतो. शिवाय तुमच्याशी बोलायला अधिक अर्थ आहे. तो मनुष्य कसा आहे हे तुम्हाला कळणे अधिक आवश्यक आहे."
 "पण मला ते कळून घ्यायचे नसेल तर?"
 "नका घेऊ, त्यामुळे काही बिघडले नाही. पण मी बोलत राहणार! सतत ऐकवत राहणार. कारण एक दिवस केव्हा तरी मी माझे म्हणणे तुम्हाला पटवू शकेन याचा मला विश्वास आहे."
 "तुमची कल्पना चुकीची आहे. साफ चुकीची!"
 पण तिच्या या उत्तराने तो काही बोलायचा बंद झाला नाही. त्याचा हिरमोड झाला नाही. किंबहुना आता तो अधिक हिरीरीने तिच्याशी युक्तिवाद करू लागला. नवऱ्याविषयीची तिची मते आपण बदलू शकू असे त्याला उगाचच वाटू लागले. तो दिवसागणिक तिच्यापाशी मसूदखानच्या चारित्र्यावर, त्याच्या एकूण वागण्यावर प्रखर हल्ले चढवू लागला. त्याची सरळ निंदा करू लागला आणि तिची उघड उघड स्तुती त्याने आरंभली.
 तो तिला म्हणाला, "तो तुमच्या लायक नाही, बिलकूल लायक नाही. तुमचा नवरा होण्याच्या बिलकूल पात्रतेचा नाही."
 "का बरे?"
 "का? कारण उघडच आहे. तुम्ही वेगळ्या आहात. फार चांगल्या आहात. निष्पाप मनाच्या आहात. स्वप्नातसुद्धा तुम्ही कुणाला दुखवले नसेल, फसवले नसेल. अशा स्त्रीचा नवरा व्हायची त्याची कशी लायकी असणार? पण त्याने तुमची पात्रता ओळखलेली नाही. म्हणून तर घराच्या चार भिंतीत तुम्हाला त्याने बंदिस्त होण्याची आज्ञा केली. पण तुमची पात्रता मी ओळखली आहे. तुमची योग्यता मी जाणली आहे."
 "तुम्ही ?"
 "होय.”
 "पण तुम्ही जाणून उपयोग काय?" ती हसून उत्तरली, “मला तुमच्याशी काहीच कर्तव्य नाही. माझ्या नवऱ्याने माझी पात्रता ओळखणे मी अधिक महत्त्वाचे समजते. त्याच्याच मतांना किंमत देते-दुसऱ्या कुणाच्या नव्हे!"
  तिच्या या युक्तिवादाने पुन्हा त्याला त्या क्षणी चीत केले. तात्पुरते नामोहरम करून टाकले. पुन्हा तो त्या दिवशी स्वस्थ बसला. पुन्हा दोघांत तात्पुरता अबोला निर्माण झाला. सागराचा आवाज तेवढा ऐकू येत राहिला. झाडांची सळसळ तेवढी जाणवत राहिली. आणि एकमेकांचे अस्तित्व तेवढे त्यांना सलत राहिले.
 पण एवढे होऊनदेखील ती येत राहिली आणि त्याच्याशी नेहमीसारखी बोलत राहिली. यातच तो मग स्वत:ला धन्य समजू लागला. तिच्या नवऱ्याविषयीच्या प्रेमाने भरलेला उत्कट स्वर त्याला तसाच सतत ऐकू येत राहिला. तिचे निरागस हास्य तसेच त्याच्या दृष्टीस पडू लागले. आणि तो तिच्या नवऱ्यावर आग ओकीत राहिला. सततची आग!
 परंतु एक दिवस त्या विस्तीर्ण किनाऱ्यावर एका कोपऱ्यात वाळूवर रेलती बसलेली तिची आकृती त्याला दिसायची बंद झाली. कायमचीच बंद झाली. तो तिला वेड्यासारखा सर्वत्र शोधू लागला. अनेक दिवस ती येत नाही हे माहीत असूनदेखील वेड्या आशेने तो पहाटे किनाऱ्यावर येऊ लागला आणि तिला धुंडाळत बसू लागला. पण त्याला ती पुन्हा कधीच दिसली नाही.
 काही दिवसांतच मसूदखान गावात आला असल्याचे त्याला माहीत झाले व तिच्या न येण्यामागचा अर्थ त्याच्या ध्यानात आला. अजूनपर्यंत पहाटे फिरायला जायचे जे स्वातंत्र्य तिला त्याने बहाल केले होते, तेही आता त्याने छिनावून घेतले असले पाहिजे, असे त्याला वाटले.
 त्याला वाटले आता पुरे झाले! स्वत:शीच मसूदखानचा तिरस्कार करीत राहणे पुरे झाले! त्याच्या बायकोला वळवणेही आता पुरे! प्रत्यक्ष त्यालाच आता जाब विचारावा! प्रहार प्रत्यक्ष त्याच्यावरच करावा! जी काय शब्दांची आग ओकायची ती प्रत्यक्ष त्याच्यावरच ओकावी! आणि त्या विचाराने एक दिवस भडकला गेल्यासारखा दुपारच्या भर उन्हात तो मसूदखानच्या घरी जाऊन धडकला.
 मसूदखान तेव्हा उघडाबोडका आपल्या घराच्या पडवीत बसला होता. त्याचे घामाने डबडबलेले आणि केसाळ शरीर फार ओंगळ दिसत होते. पूर्वीपेक्षा त्याचे पोट अधिक सटले होते आणि पोटऱ्या थलथलीत झाल्या होत्या. घामाने हैराण होऊन तो हातातल्या पंख्याने सारखा वारा घेत होता. मुस्तफाखानला अंगणात आलेला पाहताच त्याने बसल्या जागेवरूनच गुर्मीत विचारले, "काय आहे?"
 पहिल्या प्रथमच मुस्तफाखानने करारीपणाने मसूदखानच्या नजरेस नजर दिली. तो त्याच्याजवळ जाऊन भिडला आणि म्हणाला, "मला तुमच्याशी काही बोलायचे आहे."
 "काय आहे?" मसूदखानने पुन्हा दरडावल्यासारखे विचारले.
 "मला तुमच्या बायकोबद्दल काही बोलायचे आहे.”
 "काय म्हणालास?" मसूदखान ओरडला. त्याचा सारा नूर बदलला. तो संतापून गेला. मुस्तफाखानच्या अंगावर धावून गेला. त्याचा दंड पकडून पुन्हा ओरडला, "आधी इथून चालता हो बघू. नाही तर एक लाथ मारून बाहेर फेकेन."
 "ते मला माहीत आहे." मुस्तफाखान निर्भयपणे उच्चारला, “परंतु मला जे काही बोलायचे आहे ते बोलल्याखेरीज मी इथून जाणार नाही. मला बाहेर फेकलेस तरी तिथून मी ओरडेन. माझे बोलणे संपवीन आणि मगच निघून जाईन-
 "तू एक अत्यंत नीच मनुष्य आहेस. तुला खरे म्हणजे मनुष्य का म्हणावे असाही मला कधी कधी प्रश्न पडला आहे. कारण तू शुद्ध पशू आहेस. आजवर अनेक स्त्रियांशी लग्ने लावून तू त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केलीस आणि आता या नव्या बायकोची करणार आहेस. त्या शिकलेल्या, सुसंस्कृत मुलीला तू या घराच्या चार भिंतीत बंदिस्त करून ठेवली आहेस. तिला बाहेर पडायची, चार लोकांशी बोलायचीदेखील मोकळीक ठेवलेली नाहीस. कारण ती आपले खरे स्वरूप ओळखील अशी तुला भीती वाटते.
 "रोज पहाटे ती फिरायला येत होती. आणि तिला काही गोष्टी कळू लागल्या होत्या. मी तिला सारे सांगत होतो. तिला तुझे सत्य स्वरूप कळावे म्हणून धडपडत होती. परंतु तिला पहाटे बाहेर पडायचीदेखील तू बंदी केलीस आणि कधीतरी तिने जे तुला सांगितले असते ते सांगायची पाळी माझ्यावर आणलीस!
 "तू किती निगरगट्ट आहेस हे मला माहीत आहे, मी तुझे काहीच वाकडे करू शकत नाही हेही मला कळते. पण मी तुझ्या तोंडावर तुझ्याविषयी माझी खरी मते व्यक्त करू शकतो यातच मला आनंद वाटत आहे. त्यामुळे मला फार समाधान लाभले आहे. आणि माझ्या या कृतीचा परिणाम तुझ्या बायकोचे भले होण्यात होणार आहे अशी माझी खात्री आहे..."
 एवढे सारे एका दमात बोलून झाल्यावर मुस्तफाखानला अतोनात दम लागला. आपल्या मनगटावरील मसूदखानची पकड त्याला जाणवेनाशी झाली. मसूदखानचा चेहरा त्याला विचारमग्न झालेला दिसला. आपल्या सत्य बोलण्याचा झालेला परिणाम पाहून त्याचे हृदय आनंदाने भरून आले.
 विचारमग्न मसूदखानने तेवढ्यात आपल्या बायकोला साद घातली आणि क्षणार्धात ती दरवाजात येऊन उभी राहिली. मुस्तफाखानने चटकन तिच्याकडे नजर वळवली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचेच हास्य पसरले असल्याचे त्याला दिसून आले. मसूदखानने तिला विचारले, "याला तू ओळखतेस?"
 ती हसून उत्तरली, "त्याला ना? ओळखते ना. समुद्रावर हा नेहमी फिरायला यायचा आणि तुमच्याविरुद्ध काही ना काही मला सांगत राह्यचा. पण तुम्ही काय त्याच्या नादी लागता? मी त्याच्या बडबडण्याकडे लक्ष दिले नाही. तुम्हीही देऊ नका. त्याला सोडा. आत या-घरात या-"
 ती अशी बोलता बोलता दरवाजातून पुढे आली आणि मसूदखानचा दंड धरून त्याला घेऊन जाऊ लागली. तेव्हा मुस्तफाखानचे लक्ष तिच्या शरीरयष्टीकडे वेधले. पहाटेच्या अस्पष्ट प्रकाशात पाहिलेल्या तिच्या देहाहून हा देह त्याला वेगळा किंचित जाड भासला. तिच्या शरीरातल्या बदलाने त्याला आश्चर्यचकित केले. तिच्या पोटाचा पुढे आलेला भाग त्याच्या डोळ्यांत खुपू लागला.
 आपल्याला हे आधीच कसे जाणवले नाही, दिसू शकले नाही? तिचे अश्रू आपल्याला दिसले. डोळ्यांतले मिस्किल भाव आपल्यापर्यंत भिडले होते. तिच्या यातना आणि दुःख आपल्या नजरेने टिपले आणि नवऱ्याविषयीची चेहऱ्यावर प्रकटणारी प्रीती हुडकली. मग हे एवढे कसे डोळ्यांना दिसले नाही?
 पण ते आता दिसताच त्याचा सारा आवेश गळून गेल्यासारखे त्याला वाटू लागले. आता अधिक काही बोलण्यात स्वारस्य उरले नाही, तिथे अधिक थांबण्यातही अर्थ नाही असा विचार त्याच्या मनात आला. मसूदखानने गचांडी मारल्याने एके काळी झालेल्या त्याच्या अवमानित स्थितीहून त्या क्षणी त्याला अधिक अवमानित झाल्यासारखे वाटू लागले. कसातरी तो तिथून बाहेर पडला आणि भडकलेल्या उन्हात घरचा रस्ता चालू लागला.