Jump to content

लाट/ओअॅसिस

विकिस्रोत कडून




ओअॅसिस


 एका लग्नसमारंभासाठी ती मुंबईहून त्या इवल्याशा गावात आली होती. पण त्या गावातील आडदांड माणसे आणि तिथले नागडेउघडे जीवन तिच्या शहरी मनाला घृणास्पद वाटू लागले. त्यांच्यात मिसळून जाणे, कुणाशी मुक्तपणे बोलणे आणि वावरणे तिच्या प्रकृतीला पेलले नाही. तिथला क्षण नि क्षण त्यामुळे तिला जीवघेणा वाटू लागला. तिथे घालवावे लागणारे दोन दिवस तिला युगासारखे भासू लागले. आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून ती कॉटवर पडून राहू लागली; विमनस्क होऊन गेली. पहिल्या दिवशी संध्याकाळची, अगदीच कंटाळा आला म्हणून ती खोलीबाहेर पडली. त्या ओसाड, भकास ठिकाणी पाहण्यासारखेही काही नव्हते. धुळीने माखलेल्या रस्त्याने त्या दिवशी ती सरळ चालू लागली. अंधार पडेपर्यंत चालत राहिली आणि मग परत फिरली.
 दुसऱ्या दिवशी तिने जरा अधिक मजल मारायचे ठरवले. आदल्या दिवसापेक्षा अधिक लवकर, प्रखर उन्हात ती रस्त्याला लागली. माथ्यावर तप्तता झेलीत आणि कडेच्या जळत्या शेतातून निघालेला, वातावरणात दाटून राहिलेला धूर नाकातोंडात घेत ती चालू लागली. रस्त्याने दोन्ही बाजूंनी उघड्याबोडक्या डोंगरांच्या रांगा आणि उजाड शेते मागे पळू लागली. गरम सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यांनी उडणारा धुरळा तिला लपेटू लागला. रस्त्यावर उभ्या असलेल्या जीर्ण, वठलेल्या वृक्षावरील पिकली पाने भरारा उडत तिच्या अंगावर येऊ लागली. ती चालत राहिली आणि तो धूर, ते डोंगर, ती शेते, तो धुरळा आणि पिकली पाने जणू तिचा पाठलाग करीत राहिली. तिच्या सोबतच चालत राहिली. न बदलणाऱ्या सततच्या त्या दृश्याने पुढे जायची तिला अनावर ओढ निर्माण झाली. ती अधिक भराभर चालू लागली.
 असा बराच वेळ चालत राहिल्यानंतर तिचे पाय भरून आले, दुखू लागले. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. उन्हाने डोके ठणकू लागले. धुराने कोंडमारा होऊ लागला. पण तिची पावले तशीच पुढे पडू लागली.
 त्या डोंगरांच्या रांगा आता मागे पडल्या. भकास वाटणारा प्रदेश अदृश्य होऊन हिरवी झाडे आसमंतात डोकावू लागली. रस्त्याची नागमोडी वळणे लयाला गेली आणि तो सरळ धावू लागला. माळरानावर वरवर चढू लागला. धापा टाकीत ती चढण चढून गेली आणि तिथेच थबकून उभी राहिली.
 त्या माळरानाच्या उतरत्या पाठीवर, रस्त्याच्या बाजूला लहान इवल्याइवल्या शेतांचे पाचूसारखे तुकडे कोरले गेले होते. सपाटशा दिसणाऱ्या त्या विस्तीर्ण तुकतुकीत माळरानाच्या पाठीवर मध्येच तिने त्या शेताची हिरवी शाल पांघरलेली होती. माळरानाच्या प्रचंड भालप्रदेशावर तेवढाच एक हिरवा पट्टा ओढला गेला होता.
 त्या ओसाड प्रदेशात मध्येच ते हिरवे पाचूचे बेट उगवताच तिचे भान हरखून गेले. विमनस्कता तिच्या मनात खोल बुडून गेली आणि चैतन्याचे तुषार पृष्ठावर उडू लागले. तिच्या वृत्तीवर त्या दृश्यासारखे हिरवे गहिरे रंग चढू लागले. चेटूक झाल्यासारखी ती त्या शेताकडे पाहू लागली, त्याच्याकडे खेचली गेली. रस्ता सोडून माळरानाच्या पायवाटेने ती चालू लागली, त्या शेताच्या जवळ जाऊ लागली.
 उन्हाची प्रखरता आता कमी झाली होती. वाऱ्याचा जोर मंदावला होता आणि त्यांना शीतळाई येऊ लागली होती. घाम अंगातच जिरू लागला होता. निळ्या रंगाची झिलई तिथल्या वातावरणात झगमगत होती. धूर उरला नव्हता. धुरळा उडत नव्हता. त्या धरित्रीच्या सान्निध्याने अवघ्या विश्वाचे रंगरूप बदलून गेले होते. त्या शेतात काम करणारी माणसेही वेगळी भासत होती आणि आपल्या कामात पुरती गढून गेली होती.
 ती त्यांच्या जवळ जवळ जात चालली आणि तिला ती स्पष्ट दिसू लागली. त्यांचे चेहरेमोहरे, अवयव, आकार तिच्या डोळ्यांसमोर प्रकट झाले. एकरभर पसरलेल्या त्या हिरव्या गालिच्यावर जणू काही पऱ्या आणि देवदूत स्वच्छंदपणे बागडत होती, आपल्याच नादात गर्क होऊन राहिली होती.
 ती जवळ जाताच त्यांना तिची चाहूल लागली. कवायत केल्यासारखी ती माना वर करून तिच्याकडे जिज्ञासेने पाहू लागली. तिचे पाय अडखळले. चालता चालता ती मध्येच उभी राहिली.
 त्यांची जिज्ञासा क्षणार्धात ओसरत गेली. त्यांच्या माना पुन्हा खाली वळल्या. आपल्या कामात ती पुन्हा मग्न झाली. आपल्या शरीराच्या आकर्षक हालचाली करू लागली. स्वत:चे अस्तित्व विसरून त्यांना पाहत राहावे असे तिला वाटू लागले. ती तशीच उभी राहून त्यांच्याकडे बघू लागली.
 पण तिच्या डोळ्यांसमोर लग्नमंडपात पाहिलेला एक चेहरा डोकावला आणि समोरचे दृश्य विस्कटून जाऊ लागले. तिच्या मनावर दाटलेले गहिरे रंग उडून जाऊ लागले. तळाशी बुडी मारून बसलेली विमनस्कता पृष्ठावर आली. धरित्री तिला अवकळा आल्यासारखी पुन्हा ओसाड, उजाड भासू लागली.
 पऱ्यांच्या नाचात राक्षसाने मध्येच येऊन त्यांची दाणादाण उडवून द्यावी तसा तो पुरुष चेहरा मध्येच डोकावला. त्याबरोबर कमरेत लवलेली ती माणसे भीतीने बाजूला झाली. वाकलेल्या अवस्थेतच त्याच्याकडे पाहू लागली. त्यांना तो उभ्या उभ्या जोराने काही सांगू लागला. त्याची नजर तिच्याकडे वळली नाही तोवर तिने त्याला पुरते पाहून घेतले.
 त्याचा चेहरा सारखा हालत होता. त्याचा जबडा खूप मोठा आणि कपाळ त्या माळरानासारखे केवढे तरी विस्तीर्ण होते. त्याचे सारे शरीरच भव्य, थोराड होते. वाकलेली ती माणसे त्याच्या मानाने कितीतरी लहान, क्षुद्र, खुजी भासत होती. त्याच्या लांब पसरलेल्या सावलीत ती लपेटून गेली होती.
 त्याचे लक्ष तिच्याकडे वेधले. तिच्याकडे आश्चर्याने तो पाहू लागला, तेव्हा तिने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि त्या अफाट भासणाऱ्या माळरानावर स्थिरावली. तो आपल्याला कसा न्याहाळीत असेल हे तिला जाणवू लागले. आपली ओढणी, सलवार, केस, नखे, हात-या साऱ्यांवर त्याची नजर बुभुक्षितपणे फिरत असेल. ती नजर आपला वेष बाजूला सारून त्वचेवर फिरू लागल्याचे आणि त्वचेची तिने चाळण करून टाकल्याचे तिला वाटू लागले. पण त्वचेच्या असंख्य छिद्रांतून तिची नजर त्याच्याकडे डोकावून पाहू लागली. त्याच्या नजरेला नजर देऊ लागली. आपल्या विचारांची तिला इतकी भीती वाटली की, तिने आपली दृष्टी माळरानावरून त्याच्यावर नेऊन स्थिर केली.
 त्याच्या नजरेतले आश्चर्य ओसंडून गेल्याचे तिला दिसून आले. आपला जबडा खुशाल उघडा ठेवून तो आता हसत होता. तिने आपल्याकडे पाहण्याची संधी शोधण्यासाठी तो तिच्यावर नजर रोखूनच उभा राहिला होता. तिची दृष्टी वळताच त्याने आपला हात हवेत उंच उडवला आणि तिच्या रोखाने तो चालू लागला.
 तिच्या मनातली भीती उडून गेली. त्याचे आपल्यासमोरचे अस्तित्व तेवढे तिला जाणवत राहिले.
 क्षणार्धात तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या केसाळ छातीवरून ओघळणारा घाम तिच्या डोळ्यांसमोर उन्हात चकाकू लागला. तो इतक्या जवळ येऊन उभा राहिला की, त्याची केसाळ छाती तेवढी तिला दिसत राहिली.
 “मिस जबीन! या, या ना!' तो तोंड उघडे ठेवून हसत म्हणाला.
 “थँक्स!" ती सफाईदार इंग्रजीत उत्तरली. तो पाठमोरा होऊन चालू लागताच मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे ती त्याच्यामागून चालू लागली. त्याची लांबच लांब सावली तिला लपेटून घेऊ लागली. त्याच्या शेतात काम करणाऱ्या त्या माणसांच्या नजरा विस्मयाने तिच्यावर फिरल्या. अस्मानातली कोणी परी अलगद या धरित्रीवर उतरल्याचा भास त्यांच्या नजरेत प्रकटला.
 तिला त्याने एका शेतात चार खांबांवर उंच उभ्या केलेल्या खोपटात नेऊन बसवले. त्याच्या पाठोपाठ शिडी चढून ती त्या गवताने शाकारलेल्या खोपटात शिरली. आत बसताच खालचे गवत तिला टोचू लागले आणि त्याच्या नजरेच्या तरवारीची धार तिला पाहवेनाशी झाली. त्याच्याकडे पाहण्याचे टाळून ती बाहेर पाहू लागली. काम करीत असलेल्या शेतातल्या माणसांच्या लयबद्ध हालचाली निरखू लागली.
 "यह है मेरी जन्नत!" तो उद्गारला. “ह्या जमिनीचा एकरभर तुकडा हेच माझे सर्वस्व! मी दिवसरात्र इथेच राहतो. इथेच खातो आणि इथेच पडून राहतो. कष्ट इथे करतो आणि त्याचे सुखही इथेच भोगतो! धिस इज माय हेवन!"  त्याच्या जड आवाजाने तिच्या मनावर फार विलक्षण जादू केली. तिचे मन भारल्यासारखे झाले. तिने आपली दृष्टी त्याच्यावर रोखली आणि हसून ती मोकळ्या सुरात ओरडली, “इट इज अॅन ओअॅसिस...ओअॅसिस इन द डेझर्ट!"
 "होय. जन्नत म्हणजे तरी काय, ओअॅसिसच!"
 पण जन्नत आणि ओअॅसिस तिला एकच वाटली नाहीत. त्यातला फरक तिच्या मनात स्पष्टपणे उभा राहिला.
 "असे कसे? जन्नत ओअॅसिस कसे असेल?" तिने विचारले.
 "नसायला काय झाले? कुराणातले ओअॅसिस जन्नतसारखेच आहे."
 तिने अनेकदा कुराण वाचले होते. पण त्यातले जन्नतचे वर्णन तिला काही ओअॅसिसप्रमाणे वाटले नव्हते. पण आता ती ते आठवण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिला ते नीट आठवेनासे झाले.
 तिच्यासमोर स्वर्ग प्रगट होऊ लागला; जन्नत उभी राहू लागली. नितळ पाण्याचा एक झरा, हिरवे गवत, खजुराचे झाड आणि झऱ्याच्या काठावर बसलेल्या पऱ्या. तिचे अंग परीसारखे हलके होऊ लागले. तिला पंख फुटू लागले. . .
 मग हा कोण? हा दणकट अडाण्यासारखा दिसणारा, पण शहरी रीतिरिवाजाला . सरावलेला माणूस कोण? त्याचे आणि आपले नाते काय? या जन्नतीतला देवदूत? जिब्रईल? काही क्षणापूर्वीच आपल्याला तो राक्षसासारखा भासला याचा तिला विसर पडून गेला. तिला तो आता देवदूतच वाटू लागला.
 "या जळत्या उन्हात इकडे कशा काय आलात?" त्याने विचारले....
 तिचे पंख हवेत पसरले गेले. भराऱ्या मारीत तिच्या तोंडून शब्द ओघळू लागले. "खोलीत बसून बसून कंटाळा आला. आज एकटीच रस्त्याने चालू लागले. चालत चालत इथवर आले."
 "अच्छा. किती दिवस राहणार आहात इथे?"
 "दिवस कसले? आज संध्याकाळपर्यंतच! मी उद्या जाणार आहे!"
 त्याने पूर्वीसारखे "अच्छा" म्हटले. जणू ती राहिली आणि गेली याचे त्याला कसलेच सोयरसुतक नव्हते. त्याचे 'अच्छा' कानावर आदळताच तिचे पंख मिटू लागले. भिरक्या घेत ती पुन्हा जमिनीवर उतरू लागली.
 बोलता बोलता त्यांची नजर शेतात दूरवर फिरू लागली. एका शेतातल्या शेत नांगरणाऱ्या माणसाच्या आकृतीवर जाऊन स्थिर झाली. त्याचे नांगरणे त्याला चूकीचे वाट लागले, काही तरी त्याला खटकू लागले. तो तिच्याकडे वळून दिलगिरीच्या सुरात म्हणाला, "माफ करा हं. तुम्ही थोडा वेळ बसून राहा. मी आत्ता येतो."
 तिच्या मान हलवण्याकडे न पाहता तो भराभर शिडी उतरून खाली गेला. त्या माणसाच्या हातातून त्याने नांगर आपल्या हातात घेतला आणि तो स्वत: चालवू लागला.
 तिची नजर त्याच्या शेत नांगरणाऱ्या आकृतीवर जाऊन झेपावली. त्याच्या दणकट भव्य आकृतीच्या हालचालींवर ती मोहित झाली. आपले दोन्ही हात त्याने नांगरावर असे जोराने दाबून धरले की, नांगराच्या दोन्ही बैलांची शक्ती त्याच्यापुढे लुळी पडली. ते चालता चालता धडपडले. नांगराचा फाळ खोलवर जमिनीत रुतून बसला. बैलांनी आपल्या सर्व सामर्थ्यानिशी जेव्हा नांगर पुढे ओढला तेव्हा मातीची प्रचंड ढेकळे जमिनीतून वर येऊन पडू लागली. त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर त्यांची धूळ उडू लागली.
 त्याच्या बळकट दबलेल्या खांद्यांकडे ती बघत राहिली. त्याच्या प्रचंड शक्तीच्या आविष्काराने विद्ध होऊन गेली. त्या सामर्थ्याने आपले जीवन व्यापून टाकले आहे असे तिला वाटले. आजवर जगलेले, भोगलेले जीवन कळाहीन वाटू लागले. आपले पंख पसरून ती त्याच्याकडे झेपावू लागली.
 पण तो दूर होता. फार दूर होता. त्याच्याजवळ जावे, फार जवळ जावे, असे तिला वाटू लागले. त्याक्षणी त्याच्या सान्निध्याचा तिच्या मनाने ध्यास घेतला. ती त्या खोपटात उभी राहिली आणि आपले सारे सामर्थ्य एकवटून ओरडली, "स्प्लेंडिड! स्प्लेंडिड!"
 तिचे वाऱ्याबरोबर थरथरत गेलेले शब्द त्याच्या कानावर आदळले. त्याने तिच्याकडे पाहिले. हसून आपला हात हवेत उडवला आणि पुन्हा तो पाहू लागला-आपल्या नांगर हाकण्याच्या कामात गढून गेला.
 पण त्या 'स्प्लेंडिड'वर संतुष्ट राहण्याची आता तिची तयारी नव्हती. ती पुन्हा तितक्या जोराने ओरडली, "मी येऊ काय? तुम्हाला येऊन मदत करू?"
 तिची वाक्ये कानावर पडताच त्याचे खांदे ढिले पडले. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आश्चर्य प्रकटले. नांगर जागच्या जागी थबकून उभा राहिला. ढेकळे उडायची राहिली आणि धुरळा त्याच्या अंगावर येईनासा झाला, शेतातली माणसे हातातले काम थांबवून माना वर करून तिच्याकडे पाहू लागली.
 त्याचा चेहरा पुन्हा पूर्ववत दिसू लागला. त्याने हसून नकारार्थी मान हलवली. नांगर पुन्हा चालू केला. त्याचे खांदे पुन्हा दबून गेले. ढेकळे उडू लागली, धुरळ्यात तो माखला जाऊ लागला. त्या माणसांनी माना खाली घालून पुन्हा आपले काम सुरू केले.
 ती घामाघूम होऊन मटकन खाली बसली. क्षणभर हरवलेले तिचे अस्तित्व तिला पुन्हा येऊन बिलगले. स्वत:च्या वागण्याने आणि त्याच्या थंड उदासीन प्रतिक्रियेने ती शरमून गेली. - त्याने नांगर त्या माणसाच्या हातात दिला आणि तिच्या दिशेने तो चालत येऊ लागला, तेव्हा तिला भीती, विलक्षण भीती वाटू लागली. त्याने आपल्या अधिक निकट येऊ नये, असे तिला वाटू लागले.
 पण तो येऊन खोपटाखालीच उभा राहिला. तिथूनच म्हणाला, "चला, तुम्हाला घरी पोहोचायला वेळ होईल. आता थोड्याच वेळात अंधार पडेल."
 त्याचा आवाज तिला फार दुरून कुठून तरी ऐकू आल्यासारखा वाटला. तिचे मन भीतीमुक्त झाले. झपाझप ती शिडी उतरली आणि त्याच्याबरोबर, त्याच्या मागोमाग, माळरानावरल्या पायवाटेकडे जाऊ लागली.  मूकपणे चालत दोघे पायवाटेला येऊन भिडली, तेव्हा तो चालायचा थांबला. आपला जबडा उघडून हसत तिच्याकडे पाहू लागला. "अच्छा. खुदा हाफिज."
 पश्चिम क्षितिजाला टेकलेल्या सूर्याच्या तांबड्या झगमगत्या गोळ्याकडे पाहत ती थरथरत पुटपुटली, "खुदा हाफिज." आणि चटकन वळून रस्त्याने अडखळल्यासारखी चालू लागली. रस्त्याच्या दिशेने जाऊ लागली. ते चाललेलें अंतर तिला आता फार वाटू लागले; भयंकरपणे जाणवू लागले. चढणीपर्यंतच तिला कितीतरी वेळ लागला.
 त्या चढणीवर जाऊन पोहोचताच तिने मागे वळून पाहिले. तो माळरानाचा प्रदेश आता अंधारात वितळून चालला होता. तीही अंधारात लोटली जात होती. त्याच्या प्रचंड सावलीसारखा तिला तो अंधार भासू लागला. त्या सावलीत गुरफटून गेल्यासारखे तिला वाटले. ती स्वत: त्या अंधारात वितळून जाऊ लागली आणि तिची पावले मात्र पूढेच पड़ लागली.