Jump to content

लाट/कळ

विकिस्रोत कडून



कळ


 तिच्यासंबंधी अनेक अफवा मी रोज ऐकत होतो. तिचा बाप दरिद्री होता आणि ती मात्र थाटात राहत होती. त्याला नेसायला अंगभर वस्त्रदेखील नव्हते आणि ती मात्र रोज नवी पातळे नेसत होती. तिच्या घरची माणसे फार सच्छील होती आणि ती मात्र रोज कुणा ना कुणाबरोबर शहरभर भटकत होती. तिचा एकदा गर्भपात झाल्याचाही उल्लेख अधूनमधून होत होता.

 मी तिला रोजच पाहत होतो. संध्याकाळच्या वेळी मी राहत असलेल्या खोलीच्या कठड्याशी उभा राहिलो की, ती रस्त्याने जाताना मला दिसत असे. रस्त्यावरील लोकांच्या नजरा तिच्याकडे वळत असत.

 काही दिवस मी माझ्या चित्रकाराच्या व्यवसायाला साजेशी स्वतंत्र खोली शोधीत होतो. तिच्या बापाची आणि माझी याच दरम्यान ओळख झाली. अडलेला तो गृहस्थ आपल्या दोनचार खोल्यांपैकी एक खोली मला द्यायला तयार झाला. तो तिचा बाप होता हे मला खोली पाहायला गेलो तेव्हा कळले. त्याने दिलेला पत्ता शोधीत मी जेव्हा त्यांच्या घरात गेलो, तेव्हा तो दारात उभा राहून आशाळभूतपणे माझी वाट पाहत होता. आत नेऊन त्याने मला खोली दाखवली. खोली स्वतंत्र होती. तिला बाहेरून वेगळा दरवाजा होता. आत न्हाणीघर होते आणि एका वेगळ्या दरवाजाने ती इतर खोल्यांना जोडली गेली होती. मी खोली पसंत केली आणि दुसऱ्या दिवशी यायचे ठरवून जायला निघालो. म्हातारा मला दरवाजापर्यंत पोहोचवायला आला.

 त्यावेळी ती कुठून तरी आली. दरवाजातून मी बाहेर पडत असतानाच एकदम ती समोर आली. तिने भडक वेष केला होता. चेहऱ्यावर खूपशी पावडर थापली होती. गालांना रंग लावला होता आणि ओठही रंगवलेले होते. माझ्याकडे तिने पुरते पाहिलेदेखील नाही. मला डावलून ती आत निघून गेली. ती आत जात असताना बापाने काहीशा शरमलेल्या नजरेने पाहिले आणि मला निरोप दिला.

 तिथे राहायला गेल्यानंतर काही दिवस मला तिच्या अस्तित्वाची जाणीवही झाली नाही. सकाळी मी फार लवकर आपल्या उद्योगावर जाई आणि रात्रीचा परभारे जेवून परत येई. मी परतायच्या वेळी ती नेमकी कुठे बाहेर गेलेली असे. दिवसभर उघडा असलेला मधला दरवाजा बंद करून मी येताच पुन्हा माझ्या उद्योगाला लागे. त्या सबंध कुटुंबाशी माझा प्रत्यक्ष संबंध येत नसे.

 परंतु काही गोष्टी टाळणे अशक्य होते. त्यांचे अठराविश्वे दारिद्र्य मधला दरवाजा बंद केल्याने माझ्यापासून लपून राहू शकत नव्हते. माझ्या कसल्या ना कसल्या वस्तूची त्यांना वारंवार गरज लागत असे आणि मी मुकाट्याने त्यांना ती देत असे. मागण्याचे हे काम तो गृहस्थ करीत असे.

 पण एक दिवस बापाऐवजी ती मुलगी माझ्याकडे आली. मी तेव्हा नुकताच परतलो होतो आणि आरामखुर्चीत पडलो होतो. ती दरवाजात येऊन उभी राहिली तेव्हा तिच्याकडे माझे लक्ष गेले.

 त्यावेळी ती नुकतीच बाहेरून आली असावी. आपला वेष तिने अद्याप बदललेला नव्हता. नेहमीसारखे भडक रंगाचे पातळ ती नेसली होती. पावडर, रंग होतेच. शिवाय त्या दिवशी तिने डोळ्यांत काजळही जास्त घातले होते. माझे लक्ष जाताच हळू आवाजात तिने बापाचा निरोप मला सांगितला. त्याने पाच रुपये मागितले होते. मी मुकाट्याने पैसे तिच्यापुढे केले. ते घेताच एक शब्द न बोलता ती निघून गेली.

 आणि नेलेले पैसे परत करायलाही तीच आली. तो रविवार होता. एक चित्र पुरे करण्यात मी दंग झालो होतो. ती सावकाश दार ढकलून आत आली. प्रथम तिच्याकडे मी लक्ष दिले नाही.

 "तुमचे पैसे." ती पुटपुटली.

 "ठेवा तिथे." मी टेबलाकडे बोट दाखवले.

 परंतु पैसे टेबलावर ठेवून ती तशीच उभी राहिली. मला संकोचल्यासारखे वाटू लागले. चित्र काढायचे थांबून मी तिच्याकडे पाहू लागलो.

 ती तेव्हा अगदी साध्या वेषात होती. टवटवीत फुलाप्रमाणे नाजूक आणि प्रसन्न दिसत होती. काही न बोलता तीही माझ्याकडे पाहू लागली. मी म्हणालो, "बसा ना." ती बसली आणि मी पुन्हा चित्र पुरे करू लागलो.

 परंतु ती क्षणभरातच तिथून उठली. कडेलाच माझ्या पुष्कळशा चित्रांचा ढिगारा पडला होता. जवळ जाऊन त्यातले एकेक चित्र ती पाहू लागली.

 मी माझे चित्र पुरे केले आणि आरामखुर्चीवर बसून तिच्या हालचाली पाहू लागलो.

 तिचे माझ्याकडे बरोबर लक्ष असावे. चटकन तिने चित्रे होती तशी ठेवली आणि तीही एका खुर्चीवर बसली.

 "तुम्हाला चित्रकलेची आवड दिसते." मी विचारले.

 "होय. मी जे० जे० स्कूलमध्ये होते. पण पुढं कंटिन्यू करणं जमलं नाही."

 मी काही म्हणालो नाही, तिच्याकडे मी पाहत राहिलो.

 "तुम्ही पूर्वी त्या चौकानजीक राहत होता काय?"

 "हो. तुम्हाला काय माहीत?"  "मी तुम्हाला त्या चाळीत पाहिलं आहे."

 "मीही तुम्हाला पुष्कळदा तिथूनच पाहिलं आहे."

 "मला तुम्ही ओळखत होतात?"

 "हो."

 "मग तसं कधी दाखवलं नाहीत?"

 "मला आवडत नाही."

 आम्ही काही वेळ स्तब्ध बसलो. या सगळ्या संभाषणाच्या वेळी ती माझ्याकडे सारखी टक लावून पाहत होती. तिची नजर सतत माझ्यावर खिळून राहिली होती.

 खोलीत अंधार पडायला आला होता. उठून मी दिवा लावला. मला जेवायला जायचे होते.

 "कुठे निघालात?" मी जायच्या तयारीला लागल्याचे पाहून तिने विचारले.

 "जेवायला."

 "एवढी घाई काय आहे? आता कुठे सात वाजले आहेत."

 मी तसाच खुर्चीवर बसून राहिलो. परंतु काही न बोलता एका मुलीच्या सहवासात बसून राहणे फार बिकट असते. मनाची उगाच उलथापालथ होते. तिची तीच इच्छा होती हे उघड होते. म्हणून मी काहीच बोलू शकलो नाही.

 "तुम्ही काहीच बोलत नाही?"

 मी नुसता हसलो. मला काहीच बोलायचे नव्हते. मला स्वस्थही बसायचे नव्हते. सरळ उठून जेवायला जावे, असा विचार करून मी उभा राहिलो.

 "बसा हो थोडा वेळ."

 मी हसून तिला म्हणालो, “माझी खाणावळ बंद होईल नवाला."

 'एक वेळ नाही जेवलात तर काय होणार आहे?'

 "काही नाही. न जेवल्याने तरी विशेष काय होणार आहे?"

 तिची नजर बदलली. चेहरा उजळला. हसून तिने म्हटले, “आज आमच्याकडे जेवा."

 "नको."

 "का? तुम्हाला हवे तर इथे आणून देते."

 "चालेल."

 थोडा वेळ बसून ती निघून गेली. दिवसभर काम करून मला कंटाळा आला होता. ती जाताच मी खोलीबाहेर पडलो आणि थोड्याच वेळात पुन्हा परतलो.


 मी आलो तेव्हा टेबलावर जेवणाचे ताट झाकून ठेवलेले होते. टेबलावरचा दिवाही तिने जळत ठेवला होता. जेवणाचे ताट ठेवून ती गेली का हे मला कळेना. मी जेवून घेतले आणि आरामखुर्चीवर वाचत पडलो. वाचताना माझे मन तिचा विचार करू लागले. ती येईल असे मला वाटू लागले. ती निदान जेवणाचे ताट नेण्याच्या निमित्ताने तरी...  परंतु बराच वेळ झाला तरी ती आली नाही. कंटाळून मी पुस्तक टेबलावर भिरकावले, दिवा घालवला आणि पलंगावर आडवा झालो.

 तेवढ्यात तिने दारावर टिचक्या मारल्या. दार उघडेच होते. त्या विचारात मी कडी घालायचे विसरून गेलो होतो. लागलीच ते ढकलले गेले. अंधारात तिची आकृती दारात उभी असलेली मला दिसली.

 "तुम्ही झोपलात की काय?" ती दरवाजातूनच पुटपुटली.

 "नाही. नुकताच मी दिवा घालवला."

 ती पुढे आली. येताना तिने दरवाजा हळूच बंद केला. मग टेबलावरचा दिवा लावून ती पलंगावर येऊन बसली.

 मी जागचा हललो नाही. उठावेसे मला वाटले नाही. तिच्याकडे मी पाहू लागलो.

 तिच्या अर्ध्या चेहऱ्यावर दिव्याचा प्रकाश पडला होता आणि माझ्या चेहऱ्यावर तिची छाया पसरली होती. मला दिवा दिसत नव्हता. तीच दिसत होती. ती फार जवळ बसली होती. तिची नजर माझ्यावर रोखलेली होती आणि चेहरा कासाविस झाला होता.

 तिच्या वेणीच्या गोड सुगंधाने मी वेडावून जाऊ लागलो. वेणी कसली होती कुणास ठाऊक? तिने ती नुकतीच केसात घातली होती. मघाशी ती नव्हती-निश्चित नव्हती. हळूहळू मी धुंद होऊ लागलो. तिला जवळ ओढावे असे मला वाटू लागले.

 "तुम्ही बाहेरून केव्हा आलात?" ती कुजबुजली.

 "लगेच."

 "नाही. तुम्ही यायला वेळ केलात हं. मी तुमची वाट बघत होते. कितीतरी वेळ इथे बसून राहिले होते."

 वास्तविक ती खोटे बोलत होती. मी फार लवकर परतलो होतो. मी काहीच उत्तर दिले नाही.

 हळूहळू तिच्या हातांनी माझ्या केसांशी चाळा करायला सुरुवात केली. ती अधिक जवळ सरकली आणि मग सरळ तिने आपले डोके माझ्या छातीवर टेकले.

 "तुम्ही बोलत नाही! काहीच बोलत नाही! कसला विचार करताहात?" ती कुजबुजली. एखाद्या हिस्टेरिया झालेल्या मुलीप्रमाणे ती मला घट्ट बिलगली.

 आणि अखेर मीही तिला जवळ ओढले.

 रात्री ती कधी निघून गेली, ते मला समजले नाही. सकाळी मी जागा झालो तेव्हा अंथरुणात मी एकटा होतो.


 नेहमीसारखा मी कामावर गेलो. त्या दिवशी कामावरून परत यायला मला रात्रीचे दहा वाजले. पण मी आलो तेव्हा ती माझ्या खोलीत येऊन बसली होती. मला पाहताच तिने हसल्यासारखे केले.

 "तू इथे आहेस?"  "हो. मुद्दाम आले."

 मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले.

 "दिवसभर मी फार मनस्ताप सहन केला. मला सारखी चुटपूट लागून राहिली. रात्री मी विचित्र वागले. तुम्हाला माझा राग तर आला नाही? तिरस्कार तर वाटला नाही?

 "तिरस्कार कशासाठी?' मी हसून विचारले.

 "रात्रीच्या प्रकारानंतर तुम्हांला काही वाटलं नाही? मीच तुमच्याकडे आले. तुमची ओळख करून घेतली. तुमच्याशी बोलत बसले. आणि रात्री...कुणाही पुरुषाला वाटेल की, काय भयंकर मुलगी आहे! आपल्या असहायतेचा गैरफायदा घेत आहे! पण तसं नाही. माझा इलाज चालला नाही. मला तुम्ही आवडलात. मला तुम्ही हवे आहात.”

 तिचे म्हणणे ठीक होते. पण माझ्या मनाची प्रतिक्रिया माझी मलाच कळली नव्हती. तिच्या इतक्या उघड बोलण्याने मी थक्क झालो होतो. परंतु माझ्या मनात तिरस्कार निर्माण झाला नाही. तसे असते तर मी तिला केव्हाच खोलीबाहेर घालवले असते. ती समोर बसली होती आणि तिला मी हवा होतो. माझे डोके भणभणू लागले. हातानेच तिला जवळ येण्याची खूण केली.

 अशी रोज ती येऊ लागली. रोज मी तिच्या येण्याची अपेक्षा करू लागलो.

 "मला तुम्ही आवडता. फार आवडता. माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण तुम्ही काहीच बोलत नाही. का? तुम्हाला मी आवडत नाही? मी आवडत नाही तुम्हाला?"

 "आपण का असं वागतो?"

 "कुणास ठाऊक!"

 "का मी तुमच्याकडे आले?"

 "कुणास ठाऊक!"

 "कुणास ठाऊक काय? तुम्हाला चांगलं माहीत आहे."

 "तुम्ही इथं राहायला का आलात?"

 "मला जागा हवी होती."

 "मी इथं राहात असल्याचं तुम्हाला माहीत होतं?"

 "नाही. मागाहून कळलं."

 "शक्य आहे! माहीत असतं तर तुम्ही कदाचित आलाही नसता. आला असतात?"

 "ते मी काय सांगू!”

 "मी फार वाईट आहे. तुम्हाला माहीत झालं ना मी कशी वागते ते? मी फार चमत्कारिक वागते. अगदी लूज वागते."

 "माहीत आहे."

 “आणखी काय माहीत आहे?"

 "काही नाही."

 "खोटं! तुम्ही कशाला लपविता माझ्यापासून? साऱ्यांना ते माहीत आहे. माझा एकदा...एकदा..."

 "तुम्हाला माझ्याविषयी काहीच वाटत नाही?"

 "काही नाही."

 "मग का मला वारंवार बोलावता?"

 "तू येऊ नकोस."

 "माझ्यानं राहवणार नाही. तुम्ही ते ओळखलं आहे. मी अगदी वेड्यासारखी वागते. अगतिक होऊन जाते. एकटी असले की मला लोनली वाटू लागतं. मी चुकते का हो?"

 "मला हे सगळं सोडून द्यावंसं वाटतं. या स्वैर आयुष्याला तिलांजली द्यावीशी वाटते. मी यातून बाहेर पडेन का हो?"

 "मी काय सांगू?"

 "का? इतक्या दिवसांत तुम्हाला माझ्याविषयी काहीच मत बनवता आलं नाही? की तुम्हाला खरं सांगायचं नाही?"

 "असं हे किती दिवस चालणार? किती दिवस आपण एकमेकांना अशी भेटत राहणार? हे बरं नाही. खरंच, बरं नाही. मला येऊ नयेसं वाटतं. पण...मी काय करू मला कळत नाही!"

 "तुमचं माझ्यावर प्रेम नाही?"

 "नाही."

 "कशाला मग मला तुम्ही जवळ घेता?"

 "तुला अनेक लोक जवळ घेतात."

 "पण तुमच्याबद्दल मला जे वाटतं ते त्यांच्याबद्दल वाटत नाही. मी तुमच्याकडे अधिक आकर्षित झाले आहे."

 "कारण त्यांच्यापेक्षा मी तुझ्या अधिक सहवासात असतो. रात्र रात्र आपण एकमेकांच्या मिठीत पडलेलो असतो."

 "मला लग्न करावंसं वाटतं. कुणाशी तरी संसार करावासा वाटतो. पण माझे चारित्र्य आड येतं. त्यामुळे कुठंच जमत नाही. माझं काय होईल हो? हल्ली मला बाहेर पडायचीसुद्धा शरम वाटते. लोक काय हवं ते बोलत असतात. त्यामुळे मी घरातच राहते. आईबाबांच्या ते लक्षात आलं आहे. परवा बाबा आईशी बोलत होते : 'आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं. जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. आपल्या गरजा भागत होत्या म्हणून काही बोललो नाही-'"

 "त्यांना आपला संशय आला आहे?"

 "नाही. मी त्यांना पैसे देत असे. मला अनेकांकडून मिळालेले. ते लाचारीने मागत आणि मी सरळ काढून देई. तुमच्याविषयी त्यांना तसा संशय नाही. आपल्या दारिद्र्याची झळ तुम्हाला लागू नये असे त्यांना वाटते. तुमच्याविषयी त्यांचं मत फार चांगलं आहे."

 एक दिवस तिला यायला फार उशीर झाला. किती तरी वेळ झाला. ती आलीच नाही. आज ती येत नाही असे मला वाटू लागले. परंतु ते मान्य करायला मी तयार झालो नाही. ती न येणे अशक्य होते. कदाचित तिच्या आईबापांना काही कळले असेल म्हणून ती आली नसावी. पण त्यांची पर्वा करण्याचे मला काही कारण नव्हते.

 मी झोपी गेलो नाही. टेबलावरचा दिवा जळत ठेवून मी आरामखुर्चीवर बसून राहिलो. मग काही वेळाने खोलीत येरझारा घालू लागलो.

 ती बदलली असणे शक्य आहे. वारंवार तिने माझ्याकडेच कशाला यावे? तिला कोणी दुसरा सापडला असेल...किंवा ती स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल. पण ते तिला शक्य होणार नाही, हे मला चांगले माहीत होते.

 येरझारा घालताना माझे तोंड दरवाजाच्या दिशेने झाले. आणि मी जागच्या जागी उभा राहिलो. दरवाजा हळूहळू उघडला जात होता. माझे मन काहीसे ताळ्यावर आले. मी पुन्हा आरामखुर्चीवर बसलो.

 तिने नेहमीसारखे दार उघडले. परंतु पुढे न येता ती दारातच, दाराच्या चौकटीत दोन्ही हात ठेवून उभी राहिली. ती विलक्षण प्रसन्न दिसत होती. उत्साहाने नुसती फुलून गेली होती. मी पुटपुटलो, "ये. बस इथे."

 ती घाईने पुढे आली. येताच तिने माझा हात हातात घेतला. तृप्त नजरेने माझ्याकडे पाहू लागली.

 "मी आज आनंदात आहे-फार फार आनंदात आहे."

 "म्हणून इतक्या उशिरा आलीस की काय?"

 "छे! वास्तविक आज मी लवकर यायचं ठरवलं होतं. केव्हापासून येण्यासाठी धडपडत होते, पण यायलाच मिळालं नाही."

 मी किंचित अस्वस्थ झालो.

 "आज मला आईनं खूप उपदेश केला. यापुढं तरी मी व्यवस्थित वागावं अशी तिची अपेक्षा-”

 "यापुढं विशेषसं काय होणार आहे?"

 "तेच सांगायला आले. माझं लग्न ठरतं आहे!"

 बोलायची थांबून ती माझ्याकडे पाहू लागली. तिची नजर माझ्यावर खिळून राहिली. असे टक लावून पाहत राहायची तिला सवय होती. अगदी प्रथम ती माझ्याशी बोलत बसली, तेव्हा याच नजरेने तिने माझा ठाव घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिच्या लग्नाच्या वार्तेची माझ्यावर कोणती प्रतिक्रिया झाली आहे, हे ती अजमावू लागली.

 मला अर्थातच आश्चर्य वाटले. तिचे लग्न होणार नाही असे मी कधी गृहीत धरून चाललो नव्हतो. फक्त ते सहजासहजी होणार नाही, असे मला वाटत होते. मी स्वत:शीच हसलो. परंतु तिच्यापासून ते लपून राहिले नाही.

 "का हसलात?"

 मी उत्तरलो, "तुझ्याशी सहजासहजी लग्न करायला निघालेल्या माणसाचे मला हसू येते आहे."

 "बरोबर आहे! तुम्हाला हसू येणं स्वाभाविक आहे!" ती शांतपणे म्हणाली. तिचा आवाज भारावून गेला. आवंढा गिळून ती पुढे सांगू लागली, “मला आधी खरंच वाटत नव्हतं. माझं लग्न होईल असंही हल्ली मला वाटत नसे. माझ्या भावी आयुष्याची कल्पना मला कधीच करता येत नव्हती. मी जणू एका प्रवाहात सापडले होते. वाहत चालले होते आणि आधार शोधीत होते."

 ती आसुसलेल्या नजरेने अद्याप माझ्याकडे पाहत होती. माझा हात अद्याप तिच्या हातात होता. तिच्या बोलण्याने मी विलक्षण अस्वस्थ झालो. तिचे लग्न होणार होते!

 "त्याने तुला आधार दिला तर!" मी विचारले.

 "होय."

 "कसा दिला? तू त्याला कसं फशी पाडलंस?" मी विचारले. तो कसा फसवला जात आहे हे मला जाणवू लागले. या फसवणुकीच्या धंद्यातला मीही एक भागीदार होतो.

 "मी फसवले नाही काही! यात फसवण्याचा प्रश्नच आलेला नाही! त्याला सारं माहीत आहे. आपणहून त्याने मला स्वीकारण्याचं कबूल केलं आहे!"

 तिच्या हातातला माझा हात एकदम लुळा पडला. "त्याला सारं माहीत आहे?" मी एक आवंढा गिळून विचारले.

 "होय! सारं माहीत आहे."

 "काय?" मी चमकून विचारले.

 "सारं. मी फार वाईट वागले. माझं चारित्र्य चांगले नाही! माझे अनेकांशी अनेक प्रकारचे संबंध आले आहेत. आणि...आणि माझा एकदा...एकदा..."

 "इंपॉसिबल!" मी उद्गारलो! "हे शक्य नाही. तू खरं सांगते आहेस?" माणूस इतका मूर्ख असू शकतो यावर माझा विश्वास बसला नाही.

 “खरं! अगदी खरं! मी खोटं सांगेन तुम्हाला? तो आजच आमच्याकडे आला होता. मला तो पहिल्यापासून ओळखतो. मध्ये काही दिवस तो इथे नव्हता. आज आला तेव्हा घरात मी एकटीच होते. आम्ही बोलत बसलो, तेव्हाच-"

 "तेव्हा काय झालं?"

 "तेव्हा तुमच्याशी नेहमी जे बोलते तेच त्याच्याशी बोलले. मला सगळं असह्य झालं आणि भराभर सारं ओकून टाकलं. 'मी फार वाईट आहे रे! मी फार वाईट वागले! अगदी लूज वागले. त्याचंच प्रायश्चित्त आता भोगते आहे. जन्मभर मला ते भोगावं लागणार आहे.'

 स्वस्थपणे तो हे ऐकत होता. बोलता बोलता मला रडू कोसळलं. मी हुंदके देऊ लागले. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, संथपणे त्यानं विचारलं, 'तू रडतेस कशाला? मी तुझ्याशी लग्न करतो!'

 रडायची थांबून मी त्याच्याकडे पाहू लागले. आश्चर्याने पाहू लागले. माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही. कसा बसावा? मी विचारलं, 'खरंच? खरंच तू माझ्याशी लग्न करशील? अशक्य! साफ अशक्य!'

 'अशक्य का? मी खरं बोलतोय. माझ्यावर विश्वास ठेव. तुला शंका वाटणं स्वाभाविक आहे. तुला काय वाटतं ते मी समजू शकतो. मला ते सारं माहीत आहे. तरीही तुला स्वीकारण्याची माझी तयारी आहे.'

 'पण तुला माहीत आहे? तुला माहीत आहे?' मी अडखळत सांगू लागले.

 'माहीत आहे! माहीत आहे!' त्यानं अडवून म्हटलं, "सगळं माहीत आहे! मी तेही ऐकून चुकलो आहे. तरीही मी तुझ्याशी लग्न करणार आहे. तुझ्या चारित्र्यासकट, तुझ्या दुर्गुणांसकट तुझा स्वीकार करणार आहे. लोकांची पापं झाकावी लागली तरी झाकणार आहे!"

 तिचे पुढचे बोलणे मी ऐकले नाही. ऐकूच शकलो नाही. ऐकण्याच्या मन:स्थितीत राहिलो नाही. मी तिच्याकडे पाहू लागलो...

 "तू फार वाईट वागलीस!' तो म्हणाला, 'अगदी बेजबाबदारपणे वागलीस! तुझ्या आईबापांनी तुझा गैरफायदा घेतला. चार लोकांनी तुझा हवा तसा उपयोग केला. काही माणसं अशीच रास्कल असतात! त्याला काही इलाज नाही. कुणाचाच इलाज नाही!..."

 "पुरे कर!" मी पुटपुटलो.

 "संपलेच आहे." ती उठून म्हणाली, “मी जाते आता! आपला संशय कुणाला येणं बरं नाही!.." तिने खाली वाकून माझे चुंबन घेतले. मग सावकाश ती आतल्या खोलीत गेली. हळूच मधला दरवाजा तिने लावून घेतला.

 मी शून्यपणे आरामखुर्चीवर बसून राहिलो. तिचे बोलणे काही वेळ माझ्या डोक्यात घुमत राहिले. माझ्या मनात एक तीव्र कळ उठली. पलंग आणि चादर आपसांत माझ्याबद्दल कुजबुजू लागली. टेबलावरचा दिवा संथपणे जळता जळता मला हसू लागला.