लाट/कफनचोर

विकिस्रोत कडून




कफनचोर


 सायंकाळच्या वेळी तीसचाळीस लोकांनी जनाजा कबरस्तानात आणला; आणि मरतिकाचे दफन करून ते निघून गेले. जराशा वेळाने अंधार पडला. काही कोल्ह्यांनी कोल्हेकुई करीत कबरस्तानातून खाली तळात उड्या घेतल्या. एक तरस धीमे धीमे आपली फरा ओढीत त्या कबरेपाशी आला आणि कबर खणण्याचा यत्न करून पुढे सटकला. मावळतीच्या चंद्राच्या क्षीण चांदण्याने सारे कबरस्तान धूसरपणे उजळून निघाले. झाडांच्या सावल्या चमत्कारिकपणे पसरल्या. बांधून काढलेल्या कबरी शुभ्र पुतळ्यांप्रमाणे उठून दिसू लागल्या.
 डोंगराच्या बाजूने कुंपणावरून उडी मारून तेवढ्यात रसूलने कबरस्तानात प्रवेश केला. असंख्य कबरीतून आणि मांडीमांडी वाढलेल्या गवतातून न अडखळता चालत तो अचूक मघाशी काढलेल्या कबरीपाशी आला. धूसर चांदण्यात त्याने मघाशीच काढलेली कबर निरखून पाहिली. कबरीच्या शेजारीच बोरीचे झाड होते आणि कबरीवर लावलेली सबज्याची झाडे सुकून एका कडेला झुकली होती. पलीकडच्या कुंपणाआडून सायंकाळी या खुणा त्याने पाहून ठेवल्या होत्या.
 हातातले फावडे आणि टोपली त्याने खाली ठेवली. लुंगी उलटी वर उचलून घट्ट बांधली. मग त्याने सावधगिरीने आजूबाजूला पाहिले. गाडल्या गेलेल्या माणसांखेरीज आता तिथे चिटपाखरूदेखील नव्हते.
 खाली वाकून कबरीच्या उंचवट्यावर ठेवलेले मोठाले धोंडे त्याने आधी बाजूला गवतावर लोटून दिले. सबज्याची लावलेली रोपे उपटून बाजूला फेकली. मग फावडे हातात घेऊन क्षणभर तो निश्चल उभा राहिला. पुन्हा त्याने आजूबाजूस पाहिले आणि मग भराभर तो फावड्याने कबरेवरची माती बाजूला ढकलू लागला. त्याबरोबर फावड्याचा खसखस आवाज त्या विचित्र शांततेत येऊ लागला.
 जमीन अगदी भुसभुशीत होती. भुसभुशीत वाळूची बनलेली होती. ह्या जागेत गावच्या अगदी एका टोकाला कबरस्तान याचसाठी बांधण्यात आलेले होते. या भुसभुशीत वाळूत पुरलेल्या माणसाची, वाळू लागून चार दिवसांत माती होऊन जात होती. यामुळे कोल्हे, तरस यांच्या भयाने कबर फारवर खोल खणण्याची जरुरी लागत नव्हती.  नेहमीच्या सरावाने रसूलने कबरेचा उंचवटा साफ केला. खाली वाकून त्याने कबरेची जागा बरोबर चाचपून पाहिली आणि पुन्हा तो भराभर फावड्याने माती उपसू लागला.
 चौफेर पसरलेले ते कबरस्तान शांत होते. मेलेली माणसे शांतपणे तिथे पडली होती; कायमची झोपी गेली होती. पुष्कळांची कधीच माती होऊन गेली होती. काहींचे सांगाडे शिल्लक उरले होते. त्यांच्यावर सबज्यांचे रान माजले होते. त्यांची क्षीण सावट साऱ्या कबरस्तानात ठिकठिकाणी पसरली होती. क्षीणशा चांदण्याने त्या भयाण वातावरणाला अधिक भयाणता आली होती.
 रसूलचे तिकडे लक्ष नव्हते. तो भराभर माती बाहेर उपसत होता; माती गवतावर पडल्याचा खसखस आवाज ऐकत होता. पण खणता खणता तो एकदम दचकला. खणायचे बंद करून तो कान देऊन ऐकू लागला. जवळच कुणाच्या तरी पायांचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. कोणी तरी चालल्यासारखा गवताचा खसखस आवाज जवळ जवळ येऊ लागला.
 चंद्र आता पश्चिम क्षितिजाजवळ गेला होता. केवळ अस्पष्टशा धूसरतेने अंधाराला फिकटता आलेली होती. भांबावून त्याने चौफेर नजर टाकली. दृष्टीच्या टप्यात मावेल तेवढा कबरस्तानाचा भाग घाईघाईने त्याने नजरेखाली घातला आणि त्याला अगदी जवळच कोणी तरी उभे असल्याचे दिसले.
 कसलीच हालचाल न करता तो काही क्षण पुतळ्यासारखा ताठ उभा राहिला. हातातले फावडे त्याने घट्ट धरून ठेवले. वेळ आलीच तर समोर दिसणाऱ्या माणसाच्या कपाळात ते हाणण्याची त्याने तयारी केली.
 समोर कोणी तरी उभे दिसत असूनही आपल्या मागावर कोणी येईल, असे त्याला वाटेना. गेल्या वर्षीच काही लोकांनी असला उपद्व्याप करून पाहिला होता.
 ...नेहमीप्रमाणे दिवसा काढलेल्या कबरीची जागा गुप्तपणे हेरून रात्री तो कबरस्तानात आला आणि भराभर त्याने कबर खणली. माती उपसल्यावर त्याने लाकडाचे ठेवलेले ओंडके वर टाकले आणि प्रेताचे कफन फर्रकन ओढले. इतक्यात त्याला चाहूल लागली. पाच-दहा लोक लाठ्याकाठ्या आणि कंदील घेऊन कबरस्तानात आले. ते अगदी जवळ येईपर्यंत रसूलला काही जाणवले नाही. त्यामुळे तिथून पळायला संधी मिळाली नाही. पण तो भ्याला नाही. कबरेच्या खड्ड्यात तो काही वेळ लपून राहिला. गारगार मुडद्यावर पाय देऊन तो उभा राहिला. ते लोक जवळ येऊन कबरेत डोकावू लागले. रसूलने कफन डोक्यापासून पायापर्यंत पांघरले आणि दणकन उडी मारून तो बाहेर पडला. कफनात लपेटलेली ती आकृती पाहताच सगळ्यांची एकजात बोबडी वळली. त्यांना घाम फुटला, शुद्ध हरपण्याची वेळ आली. बोंबलत ते गावाकडे पळत सुटले. रसूलने मग सावकाश कबरेवर माती लोटली आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी गावात कोण गोंधळ उडाला. गावच्या एका बाजूला असलेल्या या कबरस्तानात जाऊन खऱ्या-खोट्याची शहानिशा करायलाही कोणी धजावले नाही. त्यातल्या एकाला ताप आला आणि सातआठ दिवसांत तो उलटला!  समोरची आकृती बाजूला सरकल्याचे बघून रसूल भानावर आला. त्याने डोळे फाडफाडून पाहण्याचा प्रयत्न केला. गवत खसखसू लागले आणि पाय ओढीत ती आकृती बाजूस सरकू लागली. तरस-तो तरस होता? रसूलचा किती तरी वेळ त्याने निष्कारण मध्ये फुकट घालविला होता?
 फावडे खाली ठेवून त्याने एक लहानसा दगड उचलला आणि तो तरसाच्या दिशेने भिरकावला. दगड वर्मी लागून तरस केकाटत आणि फरा ओढीत कुंपणापलीकडे होऊन डोंगरावर गेला.
 निश्चिंत मनाने रसूल पुन्हा कबर खणण्याच्या उद्योगाला लागला. आता तो भराभर माती फावड्याने वर फेकू लागला. माती गवतावर पडून तिचा पुन्हा पहिल्यासारखा खसखस आवाज होऊ लागला.
 ढोपरभर कबर आता खणून झाली होती. माती कशी भुसभुशीत आणि कोरडी होती. आणि दफन देताना माती पोकळही राहिली होती. तुडवण्याची लोकांनी फारशी दक्षता घेतलेली दिसत नव्हती. रसूलला त्यामुळे फारसे श्रम पडले नाहीत.
 परंतु कधी त्याला फार श्रम करावे लागत. त्याची दमछाक होऊन जाई. कबर कधी तुडवलेली तरी असायची किंवा मातीच चिकचिकीत असायची. पावसाळ्यात तर फारच त्रास. सगळी ओली माती आणि नुसता चिखल. मिट्ट काळोख. रातकिड्यांची किरकीर सुरू झाली की त्याला नुसते भयाण वाटू लागायचे. कबरस्तानातल्या त्या काळोख्या रात्रीच्या भयाणतेने त्याच्या फत्तर दिलाला कचरवले होते. एकदा मागे फिरवले होते. कधी कधी तो खणायला लागायचा आणि पावसाची झोड सुरू व्हायची. अर्धवट खणलेल्या कबरीत ढोपर ढोपर पाणी साचायचे आणि त्याचे सगळे श्रम वाया जायचे. तशीच माती लोटून त्याला परतावे लागायचे.
 मांडीभर कबर खणून झाली तेव्हा रसूल खणायचा थांबला आणि कबरीच्या कडेवर पाय खाली सोडून बसला. रात्रीच्या गारठ्यातही त्याला श्रमाने घाम सुटला. कपाळावरचा घाम त्याने हाताने पुसून काढला. सावधगिरीने त्याने आजूबाजूला पाहिले. मग वरती चमचमणाऱ्या चांदण्यांकडे पाहिले. वातावरणातल्या गारठ्याची आणि दाटणाऱ्या धुक्याची त्याला जाणीव झाली. कबर खणायचे काम आता संपले होते. अजून पुष्कळ रात्र शिल्लक होती. नुकतीच कुठे मध्यरात्र उलटून गेली होती. लगतच्या रस्त्यावरील बैलगाड्यांची तुरळक वाहतूक आता सुरू झाली होती. त्यांच्या लयबद्ध खडखडाटाने त्या भयाण वातावरणाला थोडी हुशारी आली होती. दोन्ही हात मागे टाकून तो रेलून बसला आणि समोरच्या डोंगराकडे लांबवर बघत राहिला.
 ...तसाच तो बसलेला असताना कधीतरी उजाडून गेले. कफनाचे मातीत बरबटलेले कापड त्याने घरी धूऊन साफ केले. संध्याकाळ झाल्यावर तो ते कापड मारवाड्याकडे घेऊन गेला. मारवाड्याने गुपचूप कापड घेतले आणि त्याच्या हातावर पंचवीस रुपये ठेवले.
 "इतकेच सेठ?' असहाय्यपणे रसूलने विचारले, “एवढ्या मेहनतीचे फक्त पंचवीसच रुपये?"

 मारवाड्याने दहाची एक नोट पुढे केली. नाइलाजाने ते पैसे खिशात टाकून तो तिथून निघाला. अनेक कटकटी त्याला मिटवायच्या होत्या...

 गारवा अंगाला झोंबू लागला तसा तो पुन्हा भानावर आला आणि सावरून बसला. मग त्याने कबरेत उडी घेतली. खाली वाकून त्याने दुल्हादीचे लाकडाचे ओंडके चाचपले. मग एकेक ओंडका त्याने सावकाश वर फेकला. सगळे ओंडके उचलताच कफनाचे सफेत वस्त्र त्या काळोखात त्याच्या दृष्टीस पडले.

 प्रेताशेजारी बसून रसूलने कफन सोडायला सुरुवात केली. प्रेताच्या मस्तकाजवळची दोरी बाजूला केली. मग खाली सरकून मधली आणि खालची हटवली. याचप्रमाणे त्याने गुंडाळलेले कफन अलगद दोन्ही बाजूंनी कडेला केले. एक मृत देह त्याला दिसू लागला. पायांपासून डोक्यापर्यंत त्याने आपली लुकलुकती नजर त्यावर फिरवली आणि डोक्यापाशी स्थिर केली. तो जवळ, डोक्याजवळ सरकला. कलते करून ठेवलेल्या तोंडावरून त्याने सहज हात फिरवला. प्रेताच्या तोंडावरून त्याचा हात फिरू लागला आणि कपाळावरून फिरत केसांवर गेला. त्याने हाताने केस चाचपून पाहिले. लांबसडक केस! स्त्रीचे केस! कोणा तरी स्त्रीचे ते प्रेत होते. कोण होती ही? कोणी कुंवार मुलगी? की एखादी जख्खड म्हातारी?

 धडपडत उठून तो कबरीच्या बाहेर आला आणि आणलेली मेणबत्ती आणि काड्याची पेटी त्याने घेतली. मग आत उतरून त्याने मेणबत्ती पेटवली आणि ती दुल्हादीच्या कडेवर ठेवली.

 मेणबत्तीच्या प्रकाशाने कबरीचा खड्डा उजळून निघाला. मातीची ढेकळे आणि पुंजके यांच्या मधोमध उताणा निजलेला स्त्रीदेह रसूल पाहू लागला. त्याच्या दिशेला कललेल्या तिच्या मुखाकडे त्याने टक लावली.

 सुमारे चौदा-पंधरा वर्षांची ती कोणी तरी एक मुलगी होती. ताज्या फुलासारखी ती टवटवीत होती. तिचे अवयव नुकतेच भरू लागलेले होते. मृत्यूचे चिन्ह तिच्या मुखावर दिसत नव्हते. जणू ती नुकतीच झोपली होती. झोपेतच जणू तिचे केस विस्कटले होते. तिचे डोळे किंचित उघडे राहिले होते. किलकिल्या डोळ्यांनी झोपेतच ती जणू रसूलला पाहत होती.

 तिच्या देहावरची वस्त्रे क्षणार्धात दूर करून रसूल तिचे अवयव नि अवयव निरखून पाहू लागला. तिचे गोरे गोरे तोंड आणि किलकिले डोळे, नाकाचा सरळ शेंडा आणि बारीक गळा, नुकतीच भरू लागलेली तिची छाती आणि मांसल पोटऱ्या! पायांची ताठ बोटे-एका कोवळ्या मुलीचा नग्न देह!

 त्याच्या साऱ्या शरीरातून एक शिणीक निघून गेली. कफन उचलायची त्याने घाई केली नाही. काही वेळ तो त्या स्त्रीदेहाकडे बघत राहिला, नुसता बघत राहिला. मग हलकेच आपल्या उजव्या हाताने त्याने तिच्या नाकाच्या शेंड्याला स्पर्श केला. तिच्या गार नाकाचा त्याच्या हाताला स्पर्श झाला. तिची कानशिले त्याने चाचपली. हात हलवून पाहिले आणि केसांवरून हळुवारपणे हात फिरवला. इतक्या हळुवारपणे की, ती झोपेतून जागी होईल याचे जणू त्याला भय वाटत होते. तिचे तोंड दोन्ही हातांनी त्याने कुरवाळले. तिच्या मस्तकावर तो हळू हळू थोपटू लागला. ते अलगद हलू लागले. जणू काय लाजून ती 'नको-नको' म्हणू लागली. त्याच्याकडे कललेले तिचे डोके त्याने जोरात सरळ केले. परंतु त्याचा हात सुटताच ते गटकन पुन्हा त्याच्या दिशेला कलले.

 त्याच्या साऱ्या अवयवांतून पुन्हा दुसरी शिणीक धावली. काय होते आहे हे त्याला समजेना. कफन घेऊन खड्यावर माती ढकलावी, असे त्याच्या मनात आले. पण तिथून उठायला त्याचे मन राजी होईना. त्याचे हात नेहमीप्रमाणे कफनाकडे न धावता तिच्या गोऱ्या मुखावर फिरू लागले, तिच्या पापण्यांवरून सरकू लागले, तिच्या लांबसडक केसांशी चाळा करू लागले. तो हळूच तिच्या बाजूला सरकून बसला. तिच्या अगदी निकट बसला. तिच्या गारगार शरीराला त्याचे उष्ण शरीर भिडले.

 परंतु तेवढ्यात वाऱ्याचा कसा काय एक झोत आला आणि मेणबत्ती विझून गेली. खड्डयात गडद अंधार पसरला. त्याच्या डोळ्यांसमोर एकदम अंधारी आली. त्याला काहीच दिसेना. शेजारच्या गार स्पर्शाने त्याची संवेदना तेवढी जागृत राहिली होती. त्या स्पर्शाची त्याला एकदम शिसारी आली. चटकन तो बाजूला सरकला. त्याने डोळे गच्च मिटले आणि पुन्हा उघडले. हळूहळू काळोखी मोडली. त्याला किंचित दिसू लागले. तो भांबावल्यासारखा समोर पाहू लागला.

 अवघडल्यासारखे बसून बसून त्याचे हातपाय जड झाले. सगळे अंग भरून आले. गारवा अधिकाधिक अंगाला झोंबू लागला. काय करावे? उठावे? जायला निघावे?...कफन? कफनाचे काय? पण मग...

अवघडलेला पाय त्याने सहज लांब केला आणि नेमका तो तिला लागला. तोच स्पर्श! विचित्र स्पर्श! त्याने पाय काढला नाही, बाजूला घेतला नाही. अभावितपणे तो पुन्हा जवळ सरकला. सरकत सरकत जवळ गेला. तिला खेटून बसला. अगदी खेटून!

 गार अंग! बर्फाचा स्पर्श...नाकाचा शेंडा आणि लांबसडक केस...निमुळती बोटे...ताठ बोटे...गोठलेले रक्त...कलते तोंड...हसरे तोंड...किलकिले डोळे...अर्धवट उघडे डोळे...तो चमत्कारिकपणे शहारला.

 पुढे जावे? अजून? हात...हा काय हात! आणि ही बोटे? बोटांत बोटे गुंफली गेली. कुठे? तिची बोटे तर ताठ आहेत. थंड पडली आहेत. डोके हलते आहे...कलंडले आहे. नाही...काही नाही...थंडगार...नको नको! आणखी पुढे नको...

 किळसवाण्या भीतीच्या एका लाटेने त्याच्या मनाला मागे फेकले. त्याचे डोके बधिर झाले. संवेदना लुप्त होऊ लागल्या. सगळे शरीर जड झाले. तो तसाच बसला-बसून राहिला..

 पहाट होऊ लागली. झुंजुमुंजू झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाड्यांचा खडखडाट बंद झाला. पाखरांची किलबिल सुरू झाली. धुके फार दाटले. गारवा सगळ्या वातावरणात भरून राहिला.

 त्याबरोबर रसूल भानावर आला. पहाट झाल्याचे लक्षात येताच तो दचकला. शेजारच्या स्पर्शाची जाणीव होऊन तो बाजूला सरकला. दूर झाला. धडपडत उठून उभा राहिला. दिवसाची चाहूल लागताच त्याला मारवाड्याची आठवण आली. नव्या दिवसाच्या बोजाखाली त्याचे मन भारून गेले.

 घाबऱ्याघाबऱ्या त्याने सभोवताली पाहिले. कोणीही दिसत नव्हते. मग त्याने चमत्कारिकपणे तिच्याकडे नजर टाकली आणि खाली वाकून घाईघाईने तो कफन ओढू लागला.