लपे करमाची रेखा - लपे करमाची रेखा माझ्या क...
Appearance
लपे करमाची रेखा
माझ्या कुकुवाच्या खालीं
पुशीसनी गेलं कुकू
रेखा उघडी पडली
देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चर्यानं
तयहात रे फाटला
बापा, नको मारूं थापा
असे खर्या असो खोट्या
नहीं नशीब नशीब
तयहाताच्या रेघोट्या
अरे, नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशिबाचे नऊ गिर्हे
ते भी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मांगन
त्यांत आलं रे नशीब
काय सांगे पंचागन
नको नको रे जोतिषा,
नको हात माझा पाहूं
माझं दैव माले कये
माझ्या दारी नको येऊं !
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |