खरा देवा मधी देव - अरे कानोड कानोड सदा रुसत...
Appearance
अरे कानोड कानोड
सदा रुसते फुगते
आंगावरती लेयाले
सर्वे डागीने मांगते
अरे डागिने मांगते
हिची हौस फिटेनाज
अशी कशी नितातेल
तिले गान गाती रोज
माय कानोड कानोड
मानसाची जमे थाप
देखा वाजयी वाजयी
सर्वे फुटले रे डफ
अरे पाह्य जरा पुढें
आली पंढरीची हुडी
पाहीसन झाली कशी
तुझी कानोड कानोडी !
माय कानोड कानोड
काय देवाचं रे सोंग !
खरा देवामधी देव
पंढरीचा पांडुरंग
अरे एकनाथासाठीं
कसा चंदन घासतो
सांवत्याच्या बरोबर
खुर्पे हातांत धरतो
'बोधाल्याच्या, शेतामधी
दाने देतो खंडी खंडी
झाला इठोबा महार
भरे दामाजीची हुंडी
कबीराच्या साठीं कसा
शेले इने झटपट
जनाबाई बरोबर
देव चालये घरोट
कुठे तुझी रे कानोड
कुठे माझा रे इठोबा
कुठे निंबाची निंबोयी
कुठे 'बोरशाचा' आंबा
अरे इठोबा सारखं
देवदेवतं एकज
चला घ्या रे दरसन
निंघा पंढरीले आज !
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |