रूप पालटू शिक्षणाचे/अभिव्यक्ती विकास

विकिस्रोत कडून
अभिव्यक्ती विकास

 अभिव्यक्तीच्या विविध पद्धतींचा सुसंस्कृत अविष्कार म्हणजे शिक्षण. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकसित करणारे योग्य शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन समाजात माणूस म्हणून जगण्याची त्यांच्यात क्षमता निर्माण करणे ही आजची निकड आहे. आवाज, प्रतिकृती, प्रतिमा, हालचाली, साधने किंवा वस्तू तयार करण्याची क्षमता अभिव्यक्तीच्या शिक्षणातून मिळते. या गोष्टी जो चांगल्या प्रकारे करू शकतो, तो उत्तम शिकला असे म्हणता येईल. उदा. चांगले स्वर, शब्द, अवगत केलेला उत्तम बोलतो, उत्तम गायक होतो, उत्तम कवी होतो. आकाराची जाणकारी असलेला चित्रकार, शिल्पकार होऊ शकतो. लयबद्ध हालचाली शिकलेला नर्तक होतो. विचारांची सर्व क्षेत्रे, स्मरण, तर्कशास्त्र, संवेदनशीलता, बुद्धिमत्ता या गोष्टी वरील प्रक्रियेप्रमाणेच आहेत. त्यामुळेच अभिव्यक्तीच्या विविध पद्धतींमध्ये व्यक्तीला कुशल, समृद्ध करणे हा व्यक्तिविकासाचा, शिक्षणाचा महत्त्वाचा पैलू आहे, असे निश्चित म्हणावेसे वाटते. प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाची क्षमता, कुवत जाणून शिक्षण दिले गेले पाहिजे. अभिव्यक्तीच्या पद्धतीनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न म्हणजे मुलांचे वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापन झाले असे म्हणावयास हवे.
मुक्त अभिव्यक्ती
 जन्मल्यापासून लहान मूल काही व्यक्त करायला सुरुवात करते. भोवतीच्या लोकांना स्वत:चे अस्तित्व जाणवून देण्याची एक नैसर्गिक, मूलभूत इच्छा असते. मुलाचे रडणे, हसणे, हावभाव या गोष्टी म्हणजे इतरांबरोबर संपर्क साधण्याची त्याची भाषा असते. मुलांना स्वतःचे मूड, मन:स्थिती व्यक्त करण्याची इच्छा असते. शारीरिक हालचाली आणि मानसिक प्रक्रिया यांनी मुक्तअभिव्यक्ती व्यापलेली असते. क्रीडा' ही मुलांची मुक्त अभिव्यक्ती असते. कारण खेळातून स्वत:ला व्यक्त करणे ही मुलांची अंतरंगातून उमटलेली निखळ उर्मी असते. खेळण्यात उत्स्फूर्तता असते. कलामाध्यमातून या उत्स्फूर्ततेचा अनुभव मुले घेऊ शकतात.
अभिव्यक्तीचा हेतू
 अभिव्यक्त होणे ही मनाची गतिशील प्रक्रिया असते. अभिव्यक्तीचा हेतू कोणता? मुलांना त्यांच्या भावना बाह्यरूपात का व्यक्त कराव्या वाटतात ? एखादी पाहिलेली



रूप पालटू शिक्षणाचे(४१)

वस्त किंवा घेतलेल्या अनुभवाविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठीच केवळ

अभिव्यक्तीची गरज असते, असे म्हणणे पुरेसे नाही. केवळ मनात ठेवून किंवा कल्पनारम्यतेने मुलांचे, प्रौढांचे समाधान का होत नाही ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पेन्सिल हातात घेऊन शारीरिक हालचाल करणे, स्नायूंचा उपयोग करणे, विशिष्ट दिशेने हातपाय हलविणे, एवढा मर्यादित अर्थ 'व्यक्त' होण्यामध्ये असत नाही. तर जी चिह्न, आकार, कृती मुले दाखवू इच्छितात, त्याला त्यांना स्वत:चा अर्थ द्यायचा असतो. म्हणजेच परस्पर संबंध साधण्याचा प्रयत्न अभिव्यक्तीतून केला जातो. मुलांना हा संबंध साधण्याची आवश्यकता का भासते ? इतरांशी जोडले जाणे ही एक सामाजिक कृती असते. व्यक्ती आणि समाज यांच्यातील एकरूपता साधणे ही मानवी प्रवृत्ती असते. समूहाशी अभिव्यक्तीतून संवाद साधला जातो. कोणतीही अभिव्यक्ती केवळ स्वत:साठी नसते तर इतरांकडून स्वत:च्या कृतीला प्रतिसाद मिळावा या प्रेरणेतून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न असतो.
 कलात्मक, प्रतिभाशाली कृती मनाला सांत्वना देतात. वातावरण प्रसन्न करतात. निसर्गाशी असलेले माणसाचे नाते समजावून देतात. संस्कृती व राष्ट्र यांतील एकात्मता जपतात. रवींद्रनाथ टागोरांची 'गीतांजली', उदयशंकरांचा पदन्यास, आर.के. लक्ष्मणांच्या चित्ररेखा, रविशंकरांची सतार, भीमसेन जोशींचे गायन, सत्यजीत रॉय यांचे चित्रपट या कलाअभिव्यक्ती देश-काल यांच्याही पलिकडे जाऊन पोहोचतात.
अभिव्यक्ती उपक्रम
 मुलांच्या उत्स्फूर्त कृतीला योग्य मार्गदर्शनामुळे वळण लागते. त्यातून विशेष क्षमता, तांत्रिक कौशल्य विकसित होते. अभिव्यक्तीच्या शिक्षणातून इतरांच्या अभिव्यक्तीचा, वैयक्तिक कलाविष्काराचा विचार करण्याची व त्यातूनच कलात्मक रसग्रहणाची सवय विद्यार्थ्यांना लागते.
मूळ प्रवृत्ती व अभिव्यक्ती संबंध
 १. सहानुभावाची प्रेरणा: एकमेकांशी संपर्क साधण्याच्या वृत्तीमुळे ऐकण्याची व काही सांगण्याची इच्छा असते. अभिनयाच्या इच्छेमागे नाट्यवृत्ती असते.
 २. सौंदर्यवादी कलात्मक प्रवृत्ती: कलात्मक प्रवृत्तीमुळे रेखाटणे, रंगविणे, शिल्प घडविणे यांची इच्छा होते. गुणगुणणे, गाणे म्हणणे या प्रवृत्तीमुळे नृत्य व संगीताची इच्छा असते.
 ३. शास्त्रीय वृत्ती: कार्यकारणभाव जाणून घेण्याची इच्छा असलेली चौकस बुद्धी, काही तयार करण्याची रचनात्मक प्रवृत्ती यामागे शास्त्रीय वृत्ती असते.

(४२)रूप पालटू शिक्षणाचे
 अभिव्यक्तीच्या या व्यापक स्वरूपामुळेच, शिक्षणात त्याचा योग्य समावेश

करण्याच्या हेतूने १९९०-९१ या शैक्षणिक वर्षापासून 'ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे' येथे अभिव्यक्तीची विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली.
सातवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती
 प्रतिसप्ताह २ तासिकांची (१ ता. ३० मि.) योजना वेळापत्रकात केली. या तासांना विद्यार्थी वर्गश: किंवा पथकश: एकत्र न बसता, त्यांनी निवडलेल्या अभिव्यक्तीच्या उपक्रमानुसार एकत्र बसतात.
 विविध अभिव्यक्तींची माहिती प्रथम विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यानंतर आपापल्या पालकांशी बोलून विद्यार्थी आपली निवड पक्की करतात.
अभिव्यक्तीच्या पुढील विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
 १. इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमधून विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन.
 २. इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमधून नाट्य, वक्तृत्व, गाणी सादर करणे.
 ३. प्रसंगनाट्य, पथनाट्य लिहिणे, सादर करणे.
 ४. शास्त्रीय भाषेत, शास्त्रीय विषयावर परिसंवाद करणे.
 ५. चित्रकला व सुंदर कलात्मक हस्ताक्षर
 ६. भूमिती-शास्त्राधिष्ठित विविध प्रतिकृती बनविणे.
 ७. सुगम व शास्त्रीय संगीत
 ८. हस्तकला, कृत्रिम फुले, खेळणी, बाटीक प्रिंटिंग, बांधणी इ.
 ९. शिल्पकला, सिरॅमिक्स्
 १०. फलक लेखन
 ११. इलेक्ट्रॉनिक्समधील विविध उपकरणे तयार करणे व दुरुस्त करणे.
 १२. संगणकावर खेळ व प्रोग्रॅम्स तयार करणे.
 १३. विविध खाद्यपदार्थ
 १४. नृत्य
 १५. गृहसुशोभन
 १६. शिवणकला
अभिव्यक्ती तासिकांच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप
 अभ्यासक्रम सत्राच्या प्रारंभीच ठरविला जातो. उदा. संगीत, वादनात विविध रागांचा परिचय, चाली, बंदिशी तयार करणे, वैयक्तिक व समूहाने गायन करणे, गायक व त्यांच्या शैलींची वैशिष्ट्ये असे स्वरूप असते. नाट्य अभिव्यक्तीत, विविध

रूप पालटू शिक्षणाचे(४३)

नाट्य खेळांद्वारे निरीक्षण, समयसूचकता, अभिनय, वेळेचे भान इ. प्रशिक्षण दिले

जाते. प्रतिभाशाली लेखनात साधे साधे लेखन विषय (उदा. खुर्ची, चेहरे मोहरे, कॅलेंडर, चिंटू येता घरा) दिले जातात. तसेच स्थान, घटना, पात्रे सांगून कथा रचना करणे, कविता लिहिणे, शब्दांचे खेळ करणे असे स्वरूप असते. चित्रकला विषयात रूप, रंग, रेषांपासून प्रारंभ करून डिझाइन, निसर्ग, स्थिरवस्तू चित्रण, मनुष्याकृती अशा चित्रणांपर्यंत मार्गदर्शन केले जाते.
अभिव्यक्ती शिक्षणाचा उपयोग विद्यार्थी कसा करतात ?
 अभिव्यक्ती विकसन तासिका झाल्यावर विद्यार्थी सर्व विसरतात का ? त्या शिक्षणाचा कसा उपयोग केला जातो ? दैनंदिन जीवनात त्यांची अभिव्यक्ती कशी असते ? असे प्रश्न विचारात घेतले तर काय उत्तर मिळते ?
 अभिव्यक्ती विकसन तासिकांमध्ये शिकलेली कौशल्ये शाळेतील उपक्रम, विविध स्पर्धा, घरगुती समारंभ अशा वेळी विद्यार्थी वापरतात. 'गणेशोत्सव' हा शाळेतील एक मुख्य सांस्कृतिक उपक्रम असतो. या समारंभात अभिव्यक्तीची संधी विद्यार्थी घेतात. गणेशमूर्तीभोवती करण्याची सजावट - यात चित्रकला, हस्तकला अभिव्यक्तीचे विद्यार्थि-विद्यार्थिनी विविध फुले, हार, पताका, थर्मोकोल कार्डशीटच्या साहाय्याने शुभचिह्ने तयार करतात. भौमितिक प्रतिकृती तयार केल्या जातात. रांगोळीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी रांगोळी, गालिचे काढून प्रसंगाचे मांगल्य वाढवितात. गणेश उपासना, आरती, पद्ये यांसाठी संगीत-वादनाचा गट सज्ज असतो. मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यासाठी नृत्य, नाट्य अभिव्यक्तीचे विद्यार्थी पुढे येतात.
 गेली २ वर्षे नागरी वस्त्या व ग्रामीण भागात गणेशोत्सवामध्ये जे रंजन-बोधनाचे कार्यक्रम विद्यार्थी सादर करतात, त्यासाठी प्रतिभाशाली लेखन व नाट्य अभिव्यक्तीच्या विद्यार्थ्यांनी प्रसंग, पथनाट्ये लिहिली. विविध भागांत लावण्यासाठी करण्याची पोस्टर्स, भित्तीपत्रके लिहिण्याचे काम हस्ताक्षर व फलक लेखनाचे विद्यार्थी करतात.
 याशिवाय काव्य, निबंध, कथा, लेखन स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्वरचित कथा, काव्य, वाचन, 'छात्र प्रबोधन', 'यंग एक्स्प्रेशन' सारख्या प्रसिद्ध अंकांमध्ये विद्यार्थ्यांना लेखन, चित्रे देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. मेंदी रेखाटन, गणेश चित्रे स्पर्धा ठेवल्या जातात. वक्तृत्व स्पर्धा, आकाशवाणी, दूरदर्शन कार्यक्रमांसाठी अभिव्यक्तीची संधी विद्यार्थी घेतात.
 विद्यार्थ्यांनी केलेली कृत्रिम फुले, पुष्परचना, सिरॅमिक्स, शिल्प, भौमितिक प्रतिकृती,

(४४)रूप पालटू शिक्षणाचे
शिवण, भरतकाम, कापडावरील रंगकाम,रांगोळ्या यांचे प्रदर्शन भरविले जाते.

मूल्यमापन
 शिकत असताना विद्यार्थ्यांचे काम, शिकलेल्या गोष्टींचे उपयोजन, प्रत्यक्ष सहभाग, विविध प्रतिक्रिया यांच्या निरीक्षण नोंदी अध्यापक करीत असतात. मूल्यमापनात पुढील मुद्दे विचारात घेतले जातात -
 १. नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करणे.
 २. कामातील नेटकेपणा.
 ३. उत्स्फू र्त नवे प्रयत्न.
 ४. दैनंदिन कामातील उपयोग.
 ५. उत्साहपूर्वक सहभाग.
 ६. संवेदनक्षमता व अभिरुची यांत बदल किंवा वाढ झाली का?
विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तींना गुण, श्रेणी, प्रशस्तिपत्रके दिली जातात. बाह्य परीक्षकांकडूनही मूल्यमापन केले जाते.
चित्रकला, संगीत या कलाविषयांचे तास व अभिव्यक्ती विकसन तासिका यांतील फरक
 इ.पाचवी-सहावीकरिता फक्त चित्रकला, संगीत हे विषय आहेत. मात्र संगीत, चित्रकलेसहित, अभिव्यक्तीची विविध माध्यमे इ. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार घेता येतात. एकच अभिव्यक्ती माध्यम सातवी ते दहावीपर्यंत ठेवणारे विद्यार्थी आहेत. परंतु कित्येक विद्यार्थ्यांना विविध कला माध्यमांत गती, शिकण्याची इच्छा, पालकांचे प्रोत्साहन यांमुळे अभिव्यक्ती बदलण्याचेही स्वातंत्र्य असते. तथापि धरसोड न करता किमान कौशल्ये शिकावीत असा आग्रह असतो.
 अभिव्यक्तीच्या तासांना विद्यार्थिसंख्या मर्यादित असते. पूर्ण वर्ग नसतो. विद्यार्थी स्वत:च्या आवडीने अभिव्यक्तीचे माध्यम निवडत असल्यामुळे पूर्वतयारी, गृहपाठ, काही विचार विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असतो. गट छोटा असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता, कौशल्य यांची माहिती अभिव्यक्ती अध्यापकांना असते. स्वतंत्र लक्ष देणे, दुरुस्त्या करून घेणे, सूचना देणे, नव्या कल्पना, विषयाच्या संदर्भात असलेले एखादे प्रदर्शन, लेखन, नाटक, संगीत सभा याबद्दल सांगणे, त्याचे रसग्रहण, आस्वाद याबद्दल चर्चा होऊ शकते.
पाठपुरावा
 जानेवारी ९७ मध्ये एकूण आढावा घेण्याच्या दृष्टीने अभिव्यक्तीचे अध्यापक व

रूप पालटू शिक्षणाचे (४५)

तज्ज्ञ यांचा परिसंवाद झाला. त्यामध्ये 'कलात्मक मनाची मशागत कशी करूया' ह्या

विषयावर परिचर्चा झाली. अभिव्यक्तीची कृती, निरीक्षण, रसग्रहण या तीन गोष्टींचा समावेश कलाशिक्षणात असतो. अभिव्यक्त होण्याचे शिक्षण देणे अवघड असले तरी अशक्य नाही. यासाठी शिक्षकाची भूमिका लक्ष देणाऱ्या मार्गदर्शकाची, प्रेरणा देणारी आणि प्रेमळ परिचारिकेसारखी हवी. रंग, आकार, सूर, शब्द, अभिनय यांबद्दल येणाऱ्या अनुभवांची मुलांमधील तीव्र उत्कटता व अभिव्यक्ती जपणे व त्यातून व्यक्तिमत्त्व विकास करणे ही गोष्ट महत्त्वाची वाटते. हे काम उत्तम शिक्षक करतो. यांसारख्या विचारांची पुनर्मांडणी व चर्चा झाली. उद्दिष्टांची निश्चिती, अडचणी, प्रत्येक माध्यमाचा प्रतिसाद इ. गोष्टी परिसंवादात बोलल्या गेल्या. माजी विद्यार्थी व अभिव्यक्ती शिक्षकांना, अध्ययन-अध्यापनातील घडामोडींच्या उजळणीसाठी एक प्रश्नावली देण्यात आली. त्यातील प्रतिसादानुसार काही सुधारणा, माजी विद्यार्थ्यांना भेटणे, त्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांना सांगणे, वर्तमान स्थितीमधील कलाप्रवाह अभ्यासणे या गोष्टी करणे सुरू आहे.
 सरस्वती पूजनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी पूर्ण दिवस योजला होता. यात वेगवेगळ्या वर्गांमध्ये अभिव्यक्ती तासिकांमध्ये शिकलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले होते. नृत्य, नाट्य, संगीत या अभिव्यक्ती माध्यमांना विद्यार्थी सादर करीत होते.
 १८ सप्टेंबर ९८ ला मा. अलका देव-मारुलकर यांचे गायन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. यातून गायनासाठी घ्यावे लागणारे परिश्रम, सादर करण्याची पद्धत,संगीताचा आनंद व अभिरुची यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर झाले.
निष्कर्ष
 १. अभिव्यक्ती विकसनाच्या तासिकांमुळे विद्यार्थ्यांची रसग्रहण, निरीक्षण क्षमता वाढते आहे.
 २. प्रभावित करणाऱ्या गोष्टींची नोंद करणे, स्मरण वाढविणे, समजलेल्या गोष्टींचे स्पष्टीकरण करणे, प्रतिसाद देणे, व्यवहारात उपयुक्त गोष्टींची निर्मिती करणे असा बहुदिश लाभ विद्यार्थ्यांना मिळतो आहे.
 ३. शाळेत व बाहेर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांची व पारितोषिके मिळविणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
 ४. अभिव्यक्तीच्या तासिकांमध्ये मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी छोटी नाटके, कविता, कथा, लिहून दाखवतात. छान चित्रे काढतात, गाण्याचा

(४६)रूप पालटू शिक्षणाचे
 आनंद घेतात. संगीताचे राग ओळखतात, आकाशदिवे करतात.

 ५. विश्रांती व ताण यांच्यामधील सुखद स्थिती म्हणजे या तासिका.
 ६. स्वत:च्या कलाप्रमाणे, आवडीनुसार अभिव्यक्तीची निवड करण्यास मिळाल्यामुळे विद्यार्थी आनंदी व उत्साही असतात.
 ७. गटात मर्यादित विद्यार्थी असल्यामुळे शिक्षक वैयक्तिक लक्ष देऊ शकतात.
 ८. हात, मन, बुद्धी यांतील एकाग्रता, प्रतिभा विकसित करते.
 ९. जे विद्यार्थी १९९०-९१ या प्रारंभीच्या अभिव्यक्ती गटात शिकले, त्यांना या तासिकांमुळे प्रेरणा मिळाली. त्यांतील काहीजण वास्तुकला, व्यावसायिक चित्रकला, संगीत, गृहसुशोभन, नाट्यक्षेत्र यांचे अभ्यासक्रम घेऊन उच्च शिक्षण घेत आहेत.
अभिव्यक्ती विकसनातील माझे प्रयत्न व प्रयोग : एक अध्यापिकेचे निवेदन
 चित्रकला, फलकलेखन, हस्ताक्षर या माध्यमांविषयीचे मार्गदर्शन मी केले होते. त्याविषयी काही सांगू इच्छिते.
१. तात्त्विक मांडणी :- लहान मूल जेव्हा हातात खडू,पेन्सिल पकडते, तेव्हा काही वेडेवाकडे आकार, रेषांचा गुंता, - पाटी, भिंत, कागद यांवर काढते. तेव्हा काय व कसे काढावे हे तंत्र त्याला माहीत नसते. पण मनातील अस्पष्ट आकार माध्यमाच्या द्वारे स्पष्ट करण्याचा तो प्रयत्न असतो. त्याची ही कृती उत्स्फूर्त असते. प्राथमिक स्थितीत मुलांना त्यांच्या आवडीनुसार, कल्पनेप्रमाणे चित्र काढण्यास मोकळी संधी द्यावी लागते. अभिव्यक्त होण्याची गरज चित्रकलेतून भागत असते. चित्रकला ही मुलांची भाषाच बनते.
२. मनातील जास्तीत जास्त कल्पना मुले चित्रातून स्पष्ट करतात :- मानसतजज्ञांनी लहान मुलांच्या चित्रांचा केलेला अभ्यास अगदी वेगळे निष्कर्ष समोर आणतो. ती चित्रे मुलांच्या विचित्र अभिव्यक्ती दाखवतात. मुलांचे शिक्षण न झाल्याचे चिह्न स्पष्टपणे त्या चित्रांमध्ये दिसते, सुंदर, असुंदर गोष्टींबाबतची अजाणता, हाताचे शैथिल्य, खरे-खोटेपणाबद्दलचे अज्ञान या चित्रातून दिसते. पण असे सुरुवातीचे स्वाभाविक रेखाटन ही मुलांची चित्रकलेतील मुळाक्षरेच असतात.
 चित्रकला हा विषय असा आहे, जो बहुसंख्य मुलांना आवडतो. रेषा व रंग यांची जादू चित्र काढणाऱ्याला चित्रचौकटीत बांधून टाकत असते. मुले कोणत्या विषयावर चित्रे काढतात ? कोणत्याही आणि शिक्षक सांगतील त्या विषयांवर चित्रे काढली जातात. विषय एक असला तरी त्याकडे बघण्याची आणि तो रेखाटण्याची पद्धत

रूप पालटू शिक्षणाचे (४७)

प्रत्येकाची वेगळी असते. उदाहरण पाहायचे तर, 'पतंग उडविणारी मुले' या साध्या

विषयात, खिडकीतून पतंग उडविणाऱ्या मुलापासून ते जंगलात पतंग उडविणारी मुले इथपर्यंत विस्तार असतो. 'काहींचे आकाश मोठे, पतंगाचे ठिपके व मुले लहान' असे चित्र तर काही वेळा 'धागे गुरफटलेले पतंग' असू शकतात. एकदा एकाने तर त्याच्या या विषयात पतंगांकडे बघणारा पाठमोरा हत्ती काढला होता. कारण विचारले तर म्हणाला, 'आवडतो मला हत्ती ! चांगला काढता येतो.' मंदारची चांगली चित्रे पाहून त्याला विचारले, 'तुला कसली चित्रे काढायला आवडतात ?' 'झुरळांची.' 'का रे ?', 'अहो, आमच्या घरात इतकी झुरळे आहेत की, ती डोळ्यांवरूनही फिरतात, झोपलो की ! त्यामुळे ती माझ्या चांगली लक्षात राहतात !' एखाद्या विषयाला चित्ररूप का द्यावे वाटते याचे उत्तर या उदाहरणांमध्ये आहे. एका मुलीने बाजारपेठेचे चित्र काढताना चित्रातील एका पाटीवर लिहिले होते, “येथे फॉल- पिको करून मिळेल.” “तू एवढीच पाटी का लिहिलीस ?" “माझी आई मला फॉल-पिको करून आणायला सांगते ना?"
 एखाद्या प्रसंगाचा, दृश्याचा उमटलेला ठसा, मुलांचे निरीक्षण चित्रातून अभिव्यक्त होते. रंगपेटीतील टवटवीत, गडद, ताजे रंग वापरण्यातून मुलांची नैसर्गिक आवड कळते. रंगांच्या मिश्रणापेक्षा, लाल, पिवळा, निळा हे मूळ रंग वापरण्याकडे मुलांचा कल दिसतो. नदी, डोंगर, धबधबा, गवत यांची चित्रे काढताना पुन्हा प्रत्येकाचा निसर्ग वेगळा असतो. अंतराळ, चांद्रयान, यंत्रमानव असे चित्रविषयही मुले काढतात. वस्तूंचा हुबेहूबपणा, त्रिमिती, छायाप्रकाश, अंतराची योजना हे घटक सराव व तंत्र यामुळे येतात. पण स्वत:च्या कल्पना, विचार चित्रांमधून इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मुले करत असतात. ऐतिहासिक, पौराणिक कथांचा प्रभाव किशोर गटातील मुलांमध्ये असतो. तोही चित्रांमध्ये व्यक्त होत असतो. उत्स्फूर्तता, ताजेपणा व जोम ही मुलांच्या रेखाटनातील मुक्त अभिव्यक्तीची वैशिष्ट्ये असतात.अनुकरण करून हुबेहूब काढलेल्या चित्रांपेक्षा ही वैशिष्ट्ये असलेली रेखाटने नैसर्गिक वाटतात.
३. चित्रकला अभिव्यक्ती विकसन तासिका:- या तासिका घेण्यामध्ये केवळ अभ्यासक्रमातील एक विषय एवढाच माझा हेतू नाही. तर अभिरुची, सौंदर्यदृष्टी वाढविणारे आनंददायी माध्यम म्हणून चित्रकला अभ्यासावी असे वाटते. विद्यार्थ्यांच्या मनातील अनुभव मांडण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांची रंगरेषांची समज, भावनांचा गोंधळ जाणून घेऊन त्यांना चित्रे काढायला लावणे असा प्रयत्न मी करते.


(४८)रूप पालटू शिक्षणाचे
 प्रयोग :- १. गटचित्रे - ऐतिहासिक, पौराणिक, आधुनिक विषय देऊन

त्यांतील १/२ विषयांची निवड ४-५ विद्यार्थ्यांच्या गटाने करून, विषयाला अनुसरून साहित्याचे वाचन करायचे. चित्रबद्ध करण्यासाठी सर्व गटाने कच्ची रेखाटने करायची. त्यातून चित्राची रचना, रंगसंगती ठरवायची. पूर्ण आकाराचा पेपर घेऊन संपूर्ण गटाने एकत्र, एका वेळी चित्र रेखाटणे, रंगविणे इ. काम करायचे. या प्रकारे विद्यार्थ्यांनी शिवाजी, रामायण, कृष्णकथा, भारतीय सण या विषयांची चित्रे काढली. यात स्वत:च्या अभिव्यक्तीबरोबर गटातील प्रत्येकाच्या सहकार्याने चित्रे पूर्ण करण्याचे शिक्षण विद्यार्थी घेऊ शकले. सर्वांच्या एकत्र रेखाटनातून अनेक कल्पना मिळाल्या.
 २. माध्यम– एकच चित्र पेन्सिल,खडू, जलरंग, फेब्रिक पेंट्स यांत काढणे. तसेच कागद, कापड, काच, माती, प्लायवूड अशा पृष्ठभागावर चित्र काढणे, रंगविणे यांतून विविध माध्यमे, पोत यांचा परिचय विद्यार्थ्यांना झाला.
 ३. कोलाज् – रंगीत व वृत्तपत्र कागद, कापड यांच्या तुकड्यांतून चित्रनिर्मिती.
 ४. ग्रीटिंग्ज - विविध प्रसंगांसाठी शुभेच्छा पत्रे.
 ५. गणेश, निसर्ग, प्रसंग चित्रे.
 ६. भित्तीपत्रके, पोस्टर्स, अक्षरचित्रे
यांसारख्या अनेक चित्रप्रयोगातून विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होता यावे असा प्रयत्न असतो.
 ४. चित्रकला अभिव्यक्तीचे महत्त्व :- चित्रकला अभिव्यक्तीतून आकार, रंग, छटा यांविषयीच्या सौंदर्य जाणिवा विकसित होतात. मुक्त व बद्ध रंगरेषांतून एक शिस्त, वळण लागत असते. 'चित्रकला' अत्यंत व्यापक असे कलामाध्यम आहे. दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टी सुबक, देखणेपणाने सादर करण्यासाठी रंगरेषांचे सामर्थ्य ओळखणे आवश्यक आहे. म्हणूनच चित्रकला हा एक तांत्रिक भाग न राहता, मुलांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटतील असा विषय व्हायला हवा. केवळ नक्कल उतरविणे, ठराविक साच्यात बसविणे नको. कल्पना फुलविण्याचे धडे कलेत आले तर ती सार्थ अभिव्यक्ती होईल. पाहणारे डोळे, आज्ञा पाळणारे हात, अनुभव घेणारे मन यांचा एकत्रित विचार चित्रकला अभिव्यक्तीत केला तर आंतरिक दृष्टीला एक स्वस्थता लाभेल असे वाटते.
 शालेय जीवनात जे संस्कार मुलांच्या मनावर ठसविले जातात, अभिव्यक्त होण्याची, स्वत:च्या अनुभवांची मांडणी करण्याची संधी त्यांना जेवढी दिली जाते, तेवढी व्यक्तिमत्त्व विकासाची क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली होतात. विविध

रूप पालटू शिक्षणाचे(४९)

कलामाध्यमातून आस्वादक्षमता व वृत्तीघडणीचे शिक्षण मिळत असते. ज्या गुणांची,

मूल्यांची अपेक्षा केली जाते, त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचे काम अभिव्यक्ती विकसनाच्या उपक्रमातून होईल. अभिव्यक्तीच्या विविध माध्यमांचा शिक्षणात एखाद्या मार्गदर्शकासारखा उपयोग होतो. संगीत, चित्रकला, नाट्य, विविध हस्तकला या विविध कलाविषयांतून सौंदर्यदृष्टी, एकाग्रता, नवनिर्मिती, उत्कृष्टता, नेटकेपणा ही संस्कारबीजे विकसित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तनुमनात रुजवली जातात. म्हणूनच म्हणावे वाटते,
  "करू देत सुरांशी मैत्री,
  झंकारू दे तारा वीणेच्या,
  बोल उमटू दे तालामध्ये,
  रंगरेषांचे हितगुज,
  प्रतिभेची अक्षरफुले उमलू दे काव्यात,
  निर्मिती-कृती होवो अनुभवांची
  अभिव्यक्ती प्रत्येक हृदयात !"




(५०)रूप पालटू शिक्षणाचे