रूप पालटू शिक्षणाचे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
रूप पालटू शिक्षणाचे

ज्ञान प्रबोधिनीतील वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम

 • वर्षारंभ, वर्षांत व साप्ताहिक उपासना
 • सामूहिक गीतगायन
 • क्रीडाशिबिर, क्रीडामहोत्सव
 • स्वातंत्र्यदिन/प्रजासत्ताक दिन व्याख्याने
 • सहाध्याय दिन
 • बर्ची नृत्य (सामूहिक नृत्य)
 • सहली
 • संत वाङ्मय, गीता पाठांतर
 • संकल्प व्याख्यानमाला
 • विक्री-उपक्रम
 • क्रीडा-प्रात्यक्षिके
 • गुणविकास योजना
 • विद्याव्रत संस्कार
 • अग्रणी योजना
 • अभिव्यक्ती विकास
 • देह परिचय
 • अभ्यास शिबिर
 • स्वयंअध्ययन कौशल्ये
 • गटकार्य
 • शंभर दिवसांची शाळा
 • वाचन कौशल्ये
 • प्रकल्प
 • प्रतिभा विकसन
 • मदतकार्य/निधिसंकलन
 • विज्ञान दृष्टी विस्तार कार्यक्रम
 • जोडी कार्य-व्यक्ती कार्य
 • मनोगत लेखन
 • परिस्थिती ज्ञान तासिका
 • पालखी-गणेशोत्सव-स्थानिक उत्सवात सहभाग
  रूप पालटू शिक्षणाचे
(भाग - १)

ज्ञान प्रबोधिनीची शैक्षणिक भूमिका
नमुना उपक्रमांची रूपरेषा

शैक्षेणक उपक्रम संशोधिका - प्रकाशन पाचवे
ज्ञान प्रबोधिनी
५१०, सदाशिव पेठ, पुणे - ३०.

रूप पालटू शिक्षणाचे(१)

रूप पालटू शिक्षणाचे (भाग- १)

* प्रकाशक
वि.शं./सुभाष देशपांडे
कार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी, पुणे.
* मुद्रक
ज्ञान प्रबोधिनी
मुद्रण विभाग, पुणे
* मुखपृष्ठ
श्री. गिरीश सहस्रबुद्धे
* अक्षर जुळणी
छात्र प्रबोधन, पुणे
* स्वामित्व
ज्ञान प्रबोधिनी
५१०, सदाशिव पेठ, पुणे - ३०.
* मूल्य
रुपये ३०/-

* प्रथम आवृत्ती
भारतीय सौर श्रावण २८, शके १९२२
१९ ऑगस्ट २०००

(२) रूप पालटू शिक्षणाचे
।। अनुक्रमणिका ||


* प्रकाशकाचे दोन शब्द
* ज्ञान प्रबोधिनी: शैक्षणिक उपक्रम भूमिका
* शैक्षणिक उपक्रमांची रूपरेषा नमुना उपक्रम
सहाध्यायदिन २०
क्रीडामहोत्सव २७
गुणविकास योजना ३३
अभिव्यक्ती विकास ४१
साखरशाळा प्रकल्पात विद्याथ्र्यांचा सहभाग ५१


रूप पालटू शिक्षणाचे(३)

प्रकाशकाचे दोन शब्द

 ‘मनुष्यघडणीसाठी शिक्षण' ही स्वामी विवेकानंदांची मध्यवर्ती कल्पना आजच्या काळात प्रत्यक्षात उतरविण्याचा ज्ञान प्रबोधिनी प्रयत्न करीत असते. औपचारिक शिक्षणासाठी उभ्या केलेल्या शाळांना कशाकशाची जोड दिली पाहिजे; अध्यापक, पालक आणि समाज यांनी शैक्षणिक प्रक्रियेमध्ये कोणत्या भूमिका बजावण्याची गरज आहे याचा उहापेह करणारे व त्यातील नमुना उपक्रमांची रूपरेषा समोर मांडणारे हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे.
 राष्ट्र घडणीची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात जागवायची असेल, तर शिक्षण प्रक्रियेत व आशयात कोणते परिवर्तन झाले पाहिजे, याविषयी प्रबोधिनीची भूमिका स्पष्ट करणारे विस्तृत विवेचन प्रबोधिनीचे संचालक वाचस्पती मा. गिरीशराव बापट यांनी पुस्तकाच्या प्रारंभी केले आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक विकास म्हणजे काय, तो कसा करता येईल, त्याचे पर्यवसान प्रेरणासंपन्न, राष्ट्राभिमुख व समृद्ध व्यक्तिमत्त्वात कसे होऊ शकेल, याची मांडणी प्रबोधिनीच्या गेल्या ३० वर्षांच्या अनुभवांच्या आधारे यात केली आहे.
 ही शैक्षणिक प्रक्रिया अनेक शाळांनी अनुसरली पाहिजे, असा प्रबोधिनीचा आग्रह असतो. त्यासाठी विविध संस्थाचालक, मुख्याध्यापक, अध्यापक व विद्यार्थी यांची प्रशिक्षण शिबिरे प्रबोधिनीच्या केंद्रांवर चालू असतात. त्या शैक्षणिक पर्यावरणात, शासकीय व्यवस्थेला अथवा स्पर्शोन्मुख समाजाला नावे ठेवण्यात वेळ दवडण्यापेक्षा वेगळे काही प्रत्यक्ष करून कसे दाखविता येईल, याबद्दल नेमकी रूपरेषा या पुस्तकात मांडली आहे. सुमारे ५ वर्षांत ही प्रक्रिया टप्याटप्याने आपापल्या शाळांमध्ये कशी आत्मसात करता येईल, याचे दिग्दर्शन एका आराखड्याद्वारे केले आहे. पाच पायऱ्यांमधील एकेक नमुन्याचा उपक्रम निवडून त्याची कार्यवाही कशी करावयाची, याचे तपशीलवार विवेचन उत्तरार्धात केले आहे. या उपक्रमांना अन्यत्र आवृत्ती करता येईल इतक्या दर्जापर्यंत नेऊन ठेवण्यास आजवरच्या अनेक अध्यापकांनी वेळोवेळी योगदान केले आहे. त्यातील काहींनी आपल्या अनुभवाद्वारे हे चिंतन या पुस्तकासाठी लेखबद्ध केले आहे. या सर्वांना प्रबोधिनीच्या वतीने धन्यवाद !
 ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै.वि.वि. तथा आप्पासाहेब पेंडसे यांच्या सतराव्या स्मृतिदिनी हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण व वर्धिष्णू कार्यरचनेचे हे एक पुढचे पाऊल ठरेल, असा विश्वास वाटतो.राष्ट्रीय सौर २८ श्रावण, शके १९२२
  

वि.शं. सुभाष देशपांडे

१९ ऑगस्ट २०००,
  

कार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी

(४) रूप पालटू शिक्षणाचे
ज्ञान प्रबोधिनी : शैक्षणिक उपक्रम भूमिका

शिक्षणाचे उद्दिष्ट
 स्वामी विवेकानंदांचे शिक्षण आणि धर्मासंबंधीचे उद्गार प्रसिद्ध आहेत. ‘माणसामधील दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे धर्म व माणसामधील पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण' असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. दिव्यत्व आणि पूर्णत्व या कल्पना वेगळ्या करता येण्यासारख्या नाहीत. धर्माचे आचरण प्रत्येकाने स्वत: करायचे असते.म्हणून दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी स्वत: केलेले प्रयत्न म्हणजे धर्म व एकेका व्यक्तीमधील दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी समाजातील इतर व्यक्तींनी केलेले प्रयत्न म्हणजे शिक्षण असे व्यवहाराच्या सोयीसाठी म्हणता येईल.
 व्यक्तीमधील दिव्यत्वाचे किंवा पूर्णत्वाचे प्रकटीकरण करण्यासाठी व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक विकास या प्रकटीकरणाला अनुकूल असा झाला पाहिजे. हा विकास दिव्यत्वाच्या प्रकटीकरणाला अनुकूल होईल असा प्रयत्न करत असताना तो मानवतेच्या आणि समाजाच्या स्थैर्यासाठी आणि सुखासाठी अनुकूल असेल असे देखील बघायला हवे. स्वामी विवेकानंदांनी आत्मनो मोक्षार्थ जगदुहिताय च' असे या प्रयत्नांचे वर्णन यासाठीच केले आहे. समाजाच्या आणि दिव्यत्वाच्या संदर्भात व्यक्तीचा परिपूर्ण विकास करणे हे शिक्षणाचे परम किंवा अंतिम उद्दिष्ट आहे.
आध्यात्मिक वृत्ती आवश्यक आहे
 शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट - दिव्यत्वाचे अधिकाधिक प्रकटीकरण आणि समाजाचे हित - सतत डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचे प्रयत्न यशस्वी व्हावयाचे असतील तर मनाची तशी वृत्ती बनणे आवश्यक आहे. अशी वृत्ती नसताना तात्कालिक व मध्यंतर उद्दिष्टांसाठी केलेल्या प्रयत्नांना कदाचित यश येईल पण ते शरीर-मन-बुद्धीचे प्रशिक्षण (Training) असेल, व्यक्तीचे शिक्षण(Education) होणार नाही. शरीर- मन-बुद्धीचे प्रशिक्षण, आत्मिक विकासाच्या म्हणजेच दिव्यत्वाच्या प्रकटीकरणाच्या व समाजहिताच्या दृष्टीने झाले, तरच ते, शिक्षणाचा भाग होऊ शकेल. या प्रशिक्षणाच्या जोडीने वृत्तिघडण (Attitude formation) आवश्यक आहे. अंतिम उद्दिष्टाकडे सतत लक्ष ठेवण्याचे वळण मनाला लावण्यासाठी उपासनेची आवश्यकता आहे. उपासना म्हणजे मनाला अंतिम उद्दिष्टाच्या चिंतनात गुंतवणे.

रूप पालटू शिक्षणाचे (१)


शिक्षणाच्या तात्कालिक व मध्यंतर उद्दिष्टांसाठी प्रयत्न चालू असताना अंतिम उद्दिष्टाचा विसर पडू नये यासाठी व्यक्तीच्या शिक्षणात उपासनेचे महत्त्वाचे स्थान आहे, असे प्रबोधिनी मानते.
शिक्षणाचे मध्यंतर व तात्कालिक उद्दिष्ट
 अंतिम उद्दिष्ट अनेक पिढ्यांच्या प्रयत्नांची दिशा दाखवणारे असते, तर मध्यंतर उद्दिष्ट एका पिढीच्या प्रयत्नांची दिशा दाखवणारे असते. दिव्यत्वाचे प्रकटीकरण होत असताना समाजहित, मानवतेचे हित यांचा विसर पडता कामा नये. म्हणून समाज, राष्ट्र व मानवतेबद्दल आस्था निर्माण करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणून स्वीकारले पाहिजे. राष्ट्रहिताबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी सर्व बौद्धिक विषयांच्या (पाठ्यक्रमातील विषयांच्या) अभ्यासातून राष्ट्राच्या मध्यवर्ती प्रश्नांची नुसती जाण येणे पुरेसे नाही. हे देशप्रश्न सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याची प्रेरणा शिक्षणातून मिळायला पाहिजे. राष्ट्रहिताविषयी आस्था, राष्ट्रीय प्रश्नांची जाण व ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरणा निर्माण करणे हे शिक्षणाचे मध्यंतर उद्दिष्ट म्हणून प्रबोधिनीने स्वीकारले आहे.
 उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्य शिकणे; कला, शास्त्रे यांचे ज्ञान मिळविणे; मोकळ्या वेळेचा सदुपयोग करायला शिकणे: समाजोपयोगी सवयी बाणविणे ही सर्व अंतिम वे मध्यंतर उद्दिष्टांच्या प्रकाशात बघावयाची तात्कालिक उद्दिष्टे आहेत.
शिक्षणामधील गृहीते व भूमिका
 प्रत्येक व्यक्तीची शरीर संपदा, बुद्धिमत्ता व हृदयगुण यांमध्ये प्रयत्न व सरावाने सुधारणा होऊ शकते हे शिक्षणातले मूलभूत गृहीत आहे. शरीर, मन आणि बुद्धीचा विकास अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये होत असतो. त्यामुळे या विकासाचे प्रयत्न फक्त शाळेत करायचे असतात ही कल्पना अपुरी आहे. घर, शाळा, युवक संघटना आणि उर्वरित सामाजिक पर्यावरण या चारही घटकांद्वारे शिक्षण होत असते अशी प्रबोधिनीची भूमिका आहे. सध्याच्या काळात बौद्धिक शिक्षण मुख्यत: शाळेमध्ये तर शारीरिक, भावनिक व प्रेरणात्मक शिक्षण मुख्यतः युवक संघटनेमध्ये होऊ शकते. परंतु या प्रयत्नांवर घरचा आणि उर्वरित सामाजिक वातावरणाचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे पालक, शिक्षक, युवक संघटनेचे चालक आणि समाजाचे धुरीण या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम म्हणून शिक्षण होत असते.(२) रूप पालटू शिक्षणाचे


 शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट व मध्यंतर उद्दिष्टे एवढी व्यापक आहेत की त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करायला हवेत. निरंतर शिक्षण चालू असणे ही स्थिती सर्वात उत्तम असे प्रबोधिनी मानते. सद्य:स्थितीत औपचारिक शिक्षणाचा कालावधी मोठा होत चालला आहे व उपजीविकेसाठी प्रयत्न सुरू होण्याचा टप्पा लांबणीवर पडतो आहे. परंतु प्राथमिक शिक्षणानंतर उपजीविकेसाठी काम व शिक्षण हे जोडीने चालले तर अधिक उत्तम, अशी प्रबोधिनीतील मांडणी आहे.
अध्यापन पद्धती
 या मांडणीच्या आधारे प्रबोधिनीमध्ये सर्वप्रथम जी अध्यापन पद्धती विकसित होत गेली ती बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी. जवळ जवळ पहिली पंधरा वर्षे ज्ञान प्रबोधिनीतले अध्यापनाचे प्रयोग बुद्धिमान विद्याथ्र्यासाठी झाले. त्यानंतरच्या पाच वर्षांत प्रथम पुण्यातील क्रीडा केंद्रांवर, नंतर शिवापूरसारख्या ग्रामीण भागात व त्यानंतर निगडीसारख्या नवनगरात सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी प्रबोधिनीचे शिक्षणकार्य सुरू झाले. त्यानंतर दहा वर्षांनी सोलापूर व साळुबे या अनुक्रमे शहरी व ग्रामीण भागात त्याचीच आवृत्ती झाली. स्थानिक गरजेप्रमाणे अध्यापनाचा वेग व टप्पे कमी-जास्त झाले तरी औपचारिक शिक्षणामध्ये अध्यापन पद्धती कशी असायला हवी याचा एक वेगळा नमुना प्रबोधिनीमध्ये निश्चित तयार झाला आहे. त्याची सूत्रे विशेष बुद्धीच्या आणि सर्वसामान्य बुद्धीच्या अशा सर्वच विद्याथ्र्यांना लागू आहेत. त्यामुळेच बौद्धिक विकासासाठी औपचारिक शिक्षणाचा विचार करताना प्रबोधिनीतील अध्यापन पद्धती समजून घेण्यासाठी अध्यापनाचा परिणाम काय असला पाहिजे हे आधी निश्चित केले पाहिजे.
अध्यापनाचा परिणाम
 विद्यार्थ्यांना माहितीचे गड्डे करायचे नसून, उपलब्ध माहितीच्या आधारे नवीन ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी, त्यांना सक्षम बनवायचे आहे. हा अध्यापनाचा हेतू मानला तर ज्ञानाचे उपायोजन कसे करायचे व ज्ञानाची निर्मिती कशी करायची हे अध्यापनाचे दिशादर्शक सूत्र मानले पाहिजे. काही माहिती स्वत:बरोबर घेऊन विद्यार्थी वर्गात येतात. वर्गाबाहेर पडताना ते फक्त आणखी माहिती घेऊन बाहेर पडले असे होऊन चालणार नाही. असलेल्या माहितीचा उपयोग करण्याची दृष्टी मिळविण्यासाठी आणि कौशल्ये शिकण्यासाठी ते वर्गात येतात असे मानले पाहिजे. कोणती माहिती अजून मिळवायला हवी हे ओळखण्याचे कौशल्य शिकण्यासाठी ते वर्गात येतात असे मानले पाहिजे. त्यामुळे एका ज्ञानशाखेतील सर्वज्ञता' असाच अध्यापनाचा परिणाम अपेक्षित धरून चालणार नाही. ज्ञानाच्या उपायोजनामध्ये बहुशास्त्रीय (Multi-disciplinary)रूप पालटू शिक्षणाचे (३)


अभ्यासाला स्थान आहे तर ज्ञानाच्या निर्मितीमध्ये आंतरशाखीय (Inter-disciplin- ary) अभ्यासाला स्थान आहे. त्यामुळे अध्यापनातील आशयप्रधानता कमी करून कौशल्ये आणि प्रक्रि यांना प्राधान्य देणारी अध्यापन पद्धती असायला हवी. आशयाशिवाय नुसती कौशल्ये व प्रक्रिया शिकविता येत नाहीत. किमान आशय विद्याथ्र्यांजवळ असणे ही प्रक्रिया-प्रधान अध्यापनाची पूर्व अट आहे.
अध्यापनाची पूर्वतयारी
 प्रक्रिया-प्रधान अध्यापन यशस्वी व्हावयाचे असेल तर विद्यार्थ्याची पूर्वतयारी व्हायला हवी. आशय किंवा माहितीवर प्रभुत्व असलेले विद्यार्थी समोर असले तर प्रक्रिया-प्रधान अध्यापन यशस्वी होईल. खूप माहिती अल्पकालीन स्मरणात साठवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडीशी असली तरी ती माहिती आकलनासह दीर्घकालीन स्मृतीत ठेवणे जास्त उपयुक्त आहे हे सूत्र विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीमध्ये लक्षात घेतले पाहिजे. इतिहास,माहिती, सद्य:स्थिती, प्रसंग, व्यक्तींचे स्वभावविशेष याचे जास्तीतजास्त दर्शन विद्यार्थ्यांना घडणे आवश्यक आहे. ज्ञानाचे उपायोजन व निर्मिती हे उद्दिष्ट समोर नसले तर ब-याच वेळा अध्यापन पूर्वतयारीच्या स्तरालाच रेंगाळते. त्यातही क्रमिक पाठ्यपुस्तकात असलेला इतिहास व माहिती या भोवतीच ते घोटाळते. इच्छाशक्ती, दृष्टी व साधनसंपत्तीच्या अभावामुळे एका ऐवजी अनेक पुस्तके वापरावीत, संदर्भ ग्रंथ वापरावेत हे जमत नाही. खरे तर पूर्वतयारी म्हणूनही माहिती शोधायला शिकवले पाहिजे. परंतु त्याबरोबर सद्य:स्थितीच्या दर्शनासाठी मुलाखती, वृत्तपत्रे, नियतकालिके, प्रसार माध्यमे यांचा वापर, व्यक्तींच्या दर्शनासाठी मुलाखती आणि सहवासात राहून त्यांच्याबरोबर काम करणे, आणि प्रसंगांच्या दर्शनासाठी स्वत: विविध ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत कामाचा अनुभव घेणे, प्रवास करणे हे सगळे केले पाहिजे. आज ब-याच ठिकाणी अध्यापनासाठी अशी विविध दर्शने घडविण्याची पूर्वतयारी करणे ही देखील मोठी सुधारणा होऊ शकेल. परंतु अध्यापनाचा हेतू लक्षात घेऊन ती केली पाहिजे. प्रबोधिनीत देखील अशी उत्तम पूर्वतयारी सर्वकाळ जमते असे नाही. अशी पूर्वतयारी झाल्यानंतर मग वर्गातले अध्यापन कसे वेगळे व्हायला पाहिजे हे। देखील बघायला हवे.
अध्यापनाची सूत्रे
स्वयंअध्ययनाची कौशल्ये जास्तीत जास्त वापरून, अनेक प्रकारे माहिती घेऊन विद्यार्थी वर्गात येऊन बसल्यावर, अशा विद्यार्थ्यांना प्रचलित अध्यापनापेक्षा वेगळ्या(४) रूप पालटू शिक्षणाचे


पद्धतीने शिकवायला लागेल.
 १) “काय ?' आणि 'केव्हा ?' या प्रश्नांपेक्षा का ?’ आणि ‘कसे ?' या प्रश्नांना अधिक महत्त्व असले पाहिजे. नवीन विषयाचे दर्शन झाल्यानंतर त्याविषयी अधिक उत्सुकता आणि गोडी निर्माण झाली तरच, का ? कसे ? हे प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी, नवीन ठिकाणी गेल्यावर जसे निर्हेतुक फिरायला बाहेर पडतो तसे, त्या विषयात मुक्त संचार करायला शिकवले पाहिजे.
 २) मुक्त संचार करून का ? आणि कसे ? हे प्रश्न पडण्यासाठी परीक्षेतील संभाव्य प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेण्याऐवजी स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे. शिकताना तरी प्रत्येकाने स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे. इतरांनी समोर ठेवलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत या भीतीतून करून घेतलेली पूर्वतयारी म्हणजे अध्यापन नाही.
 ३) एका प्रश्नाला एकच बरोबर उत्तर असते, ते लक्षात ठेवून योग्य वेळी ते सांगता आले पाहिजे, हे अध्यापन नाही. त्यात स्मरणशक्तीपेक्षा आकलनाला महत्त्व देणारी थोडी सुधारणा म्हणजे प्रश्नाचे उत्तर दिलेल्या पर्यायांतून निवडायला शिकवणे. या पद्धतीचा थोडा उपयोग निश्चित आहे. परंतु इतरांनी दिलेल्या पर्यायांमधून एक पर्याय निवडण्यापेक्षा एका प्रश्नाला अनेक पर्यायी उत्तरे स्वतः तयार करण्याला व्यवहारामध्ये जास्त महत्त्व आहे. याचे प्रशिक्षण देणे जास्त महत्त्वाचे आहे.
 ४) स्वयंअध्ययनाच्या आधारे निरीक्षण, आकलन, स्मरण ही कौशल्ये साधलेल्या विद्याथ्र्यांना अध्यापकांनी उपयोजन, अभिव्यक्ती, समस्यापरिहार, नवनिर्मिती आणि निर्णयशक्तीचा वापर कसा करायचा हे खरे शिकवायला पाहिजे. पूर्वतयारीतल्या त्रुटी भरून काढता काढता विद्यार्थ्यांना निरीक्षण, आकलन, स्मरण या बाबतीत लवकर स्वावलंबी बनवणे हे बौद्धिक शिक्षणातले पहिले उद्दिष्ट आहे. त्यापुढे त्यांना उपयोजन, अभिव्यक्ती, समस्यापरिहार, नवनिर्मिती आणि निर्णयशक्ती यांचा वापर करण्यास शिकविणे हे अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शिक्षणासाठी अनुकूल वातावरण
 अध्यापनाचा हेतू, अध्यापनासाठी पूर्वतयारी आणि अध्यापनाची सूत्रे पाहिली. अशा विशिष्ट हेतूने, विशिष्ट पद्धतीने, अध्यापन करायचे असेल तर त्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करावी लागते. असे वातावरण केवळ अध्यापनासाठी नाही तर सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी आवश्यक आहे. घरचे संस्कार चांगले होण्यासाठी, शाळेतील औपचारिक अध्यापनासाठी, युवक संघटनेमध्ये गटातील आंतरप्रक्रियांमुळे


रूप पालटू शिक्षणाचे (५)


होणा-या विविध पर्यायांच्या दर्शनासाठी, अनुकूल वातावरणाची गरज आहे.
 नम्रता आणि आत्मविश्वास, आत्मकेंद्रिततेच्या स्पर्शाशिवाय येणारी ध्येयनिष्ठा, लहान-मोठ्या गटांमध्ये नि:स्वार्थीपणे सहकार्याने काम करायची वृत्ती अशा गुणांचे विकसन शिक्षणाच्या चारही माध्यमांमधून व्हायला पाहिजे. सक्षम, प्रेरणासंपन्न आणि सहयोगी वृत्तीने काम करणारे युवक-युवती घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट शाळेमध्येही साध्य करायचे आहे. या सर्व गुणांचा परिपोष होण्यासाठी साचेबंद पद्धती चालणार नाही. पूर्णपणे चाकोरी सोडून विचार करण्याचे स्वातंत्र्य; स्वतंत्रपणे विचार करून विधायक निष्कर्षाप्रत पोहोचण्याचा आग्रह; स्नेह, आत्मीयता आणि निश्चिंतता यांनी युक्त परस्परसंबंध; अशा वागण्यामुळे, अशा धोरणांमुळे निर्माण होणारे वातावरण उत्तम शिक्षणासाठी आवश्यक आहे. असे वातावरण शाळेत निर्माण झाले, अध्यापक व विद्यार्थी यांच्यामध्ये व्यक्तिगत हार्दिक्याचे नाते निर्माण झाले तर प्रगतिशील अध्यापन पद्धतीचा परिणाम अधिक प्रकर्षाने होतो.
शाळेतील शैक्षणिक भूमिका
 वरीलप्रमाणे शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करायचे असेल तर शाळेतील रूढ शैक्षणिक भूमिका बदलायला लागतात. अध्यापन माहिती-प्रधान असण्याऐवजी प्रक्रिया-प्रधान झाले पाहिजे हे पाहिले. पण तसा बदल करायचा झाला तर परीक्षा, मूल्यमापन, बक्षिसे, उत्तेजन या सर्वच भूमिकांमध्ये बदल करावा लागतो. शाळेबाहेरील सामाजिक पर्यावरणाच्या विरोधी असा हा बदल असल्यामुळे तो करण्यातही अडचणी येणार व त्याला यश देखील कमी-अधिक प्रमाणात मिळणार. पण या दिशेने टाकलेले एक-एक पाऊल देखील शिक्षणाचे हेतू साधण्यास उपयोगी पडते.
 माहिती किती ग्रहण केली हे मोजता येते. एखाद्याने प्रक्रिया किती आत्मसात केली हे मोजणे अवघड आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांशी त्याची तुलना करणे अवघड आहे.म्हणून स्पर्धांचे स्वरूप बदलून स्वत:शीच स्पर्धा करणे याला महत्त्व द्यावे लागते. स्वत:च्या आधीच्या उपलब्धींपेक्षा ज्यांनी ज्यांनी प्रगती केली ते सर्व अशा स्वत:शी केलेल्या स्पर्धेत यशस्वी झाले. प्रोत्साहन-बक्षिसे-पुरस्कार देताना निवडक विद्यार्थ्याऐवजी सर्वांच्या यशाची नोंद घेणे आणि सहभागासाठी देखील बक्षीस देणे असे धोरण ठेवावे लागते. सहभाग सर्वांचा, बक्षीस सर्वांना, स्वत:शी स्पर्धा आणि इतरांशी सहकार्य या गोष्टी वाढवणारी योजना सर्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये असायला हवी.

(६) रूप पालटू शिक्षणाचे
अध्यापकांचा संच धोरणानुकूल करणे
 शैक्षणिक भूमिका कितीही प्रागतिक मांडली, उपक्रमांचे नियोजन त्यानुसार कितीही महत्त्वाकांक्षी केले, तरी बरीचशी कार्यवाही अध्यापक करत असतात. अध्यापकांचे शिक्षण या भूमिकेनुसार झालेले नसल्याने त्यांची मनोवृत्ती अशा बदलाला अनुकूल असतेच असे नाही. त्यामुळे या सगळ्या भूमिका व तत्त्वज्ञान अंमलात आणण्यास दीर्घ काळ लागतो. दीर्घ काळ अध्यापकांचे प्रशिक्षण करावे लागते. एखादी योजना एकदा समजावून सांगितली तरी पुन्हा पुन्हा अध्यापकांच्या मनात संशय निर्माण होतात. त्यांचे बौद्धिकदृष्ट्या समाधान केले तरी ते तात्पुरते राहते. या भूमिका प्रचलित भूमिकेपेक्षा जास्त परिणामकारक आहेत याचा साक्षात अनुभव घेतल्यावरच थोडी थोडी अनुकूलता येते. नवीन नवीन उपक्रमांमागचे शैक्षणिक मानसशास्त्र, ते उपक्रम कार्यवाहीत आणण्यासाठी लागणारी नियोजन कौशल्ये व व्यवस्थापन कौशल्ये, औपचारिक शिक्षणातील यशाच्या प्रचलित मापदंडांनुसार यशस्वी अध्यापन करत स्वत:च्या विचारपद्धतीत बदल करत असताना होणारा मानसिक संघर्ष सहन करण्याची युक्ती, या सर्वांचे प्रशिक्षण अध्यापकांना द्यावे लागते. त्याच्या यशावर बाकीचे यश अवलंबून आहे.
प्रचलित शिक्षण-व्यवस्थेतील इतर घटक
 मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक, शासकीय अधिकारी, शासनाचे निर्णय व समाजाच्या अपेक्षा या सर्वांचा परिणाम अध्यापकांच्या अध्यापनावर व विद्याथ्र्यांच्या अध्ययनावर होत असतो. मुख्याध्यापक व संस्थाचालक शिक्षणात प्रयोग करू इच्छिणारे, वेगळे शैक्षणिक धोरण राबवू इच्छिणारे असतील तरच शाळेतील वातावरण व कार्यपद्धतीत काही बदल होऊ शकतो. हे दोन घटक अनुकूल आहेत हे गृहीत धरून व अध्यापकांच्या प्रशिक्षणाला यश येणार आहे असा विश्वास ठेवून शैक्षणिक उपक्रमांची मांडणी या पुस्तिकेत केली आहे. अध्यापक, मुख्याध्यापक, संस्थाचालक हे तीन्ही एकवटले तर विद्यार्थ्याच्या औपचारिक शिक्षणात चांगले बदल दिसायला लागतील. असे चांगले बदल दिसायला लागले तर पालक, समाजातील उर्वरित घटक, शासकीय अधिकारी व सर्वात शेवटी शासकीय धोरण व नियम बदलतील. त्यामुळे या तीन घटकांनी बाकीच्या घटकांशी जुळवून घेणारे न बनता, स्वत: पुढाकार घेऊन या घटकांना वळवून घेणारे बनावे लागेल. अशी इच्छा असणा-यांना प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगांतून व उपक्रमांतून स्वतः काय करता येईल हे सुचू शकेल. हे उपक्रम सर्वांना जसेच्या तसे राबवता येतीलच असे नाही. ज्यांना ज्यांना समाजात काही नवे वळण पाडावे असे वाटते त्यांनी प्रथम तसा विचार व प्रयत्न करण्याचा आपल्याला निसर्गदत्तरूप पालटू शिक्षणाचे(७)


अधिकार आहे हे ओळखावे. मग प्रबोधिनीतील शैक्षणिक उपक्रमांच्या

विस्तारामागचा प्रेरणा-स्रोत त्यांना सापडेल. तो सापडला तर मग उपक्रमांचा विस्तार प्रत्येकाला स्वतंत्रपणे करता येतो. इतरांचे प्रयोग आधारासाठी व संदर्भासाठी घ्यायचे असतात.
जीवनदायी शिक्षण
 शाळांचा विचार करत असताना आज सर्वत्र तात्त्विक पातळीवर सर्वंकष शिक्षणाचा आणि व्यावहारिक पातळीवर पुस्तकी शिक्षणाचा प्राधान्याने विचार होतो. सर्वंकष शिक्षणातील आत्मिक शिक्षण या घटकाचा विचार प्रबोधिनीत प्राधान्याने उपासनेभोवती विकसित झाला आहे. बौद्धिक शिक्षणासाठी पुस्तकांचे औपचारिक अध्यापन या भोवती समाजातील प्रचलित विचार चालतो. त्यापेक्षा प्रबोधिनीची अध्यापनाची वेगळी भूमिका आहे. म्हणून उपासना व अध्यापनाची भूमिका यांचा निर्देश सर्वप्रथम केला आहे. व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक विकास होण्यापूर्वी व्यक्तीचा उदरनिर्वाह नीट चालला असला पाहिजे. त्यामुळे जेवणदायी शिक्षणाचा विचारही सर्वंकष शिक्षणात झाला पाहिजे.
 ग्रामीण भागात पुस्तकी शिक्षणात अयशस्वी झालेल्यांना निव्वळ तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वावलंबी करणे हे प्रबोधिनीने जास्त महत्त्वाचे मानले. तांत्रिक शिक्षणातून उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्ये शिकवली तरी ते प्रबोधिनीला पुरेसे वाटले नाही. ग्रामीण भागातही नोकरीसाठी शिकवणे बरोबर नाही. कौशल्ये असल्यावर नोकरी मिळणे हा भाग मागणी-पुरवठा न्यायाने होणार. स्वयंरोजगार निर्माण करता येणे हे जीवनदायी शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. कुठेतरी रोजगार मिळवणे ही व्यावहारिक तडजोड आहे. स्वयंरोजगार निर्माण करता येण्यासाठी उद्योजकतेचे शिक्षण द्यायला हवे असे प्रबोधिनीने ठरवले. शिवापूर येथील कृषि-तांत्रिक विद्यालयात नवजीवन वर्गामध्ये तांत्रिक शिक्षण व उद्योजकतेचे शिक्षण यांची सांगड घालण्याचा प्रयोग काही वर्ष प्रबोधिनीने करून पाहिला.
 पुढाकार घेणे, संधी हेरणे व संधी पकडणे, चिकाटी, माहिती शोधत राहणे, उत्तमतेची काळजी, शब्द पाळणे, कार्यक्षमता, नियोजन, अडचणींमधून मार्ग काढणे, आत्मविश्वास, इतरांना ठामपणे सामोरे जाणे, इतरांचे मन वळवणे, दक्षता, सहका-यांचा विचार, जोखीम पत्करणे हे सर्व उद्योजकतेसाठी आवश्यक गुण आहेत. उपजीविकेसाठी हस्तकौशल्ये, तांत्रिक कौशल्ये वा बुद्धिकौशल्ये इ. कोणतीही कौशल्ये प्राधान्याने वापरली तरी त्या जोडीने स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी(८) रूप पालटू शिक्षणाचे
उद्योजकतेची कौशल्ये शिकवली पाहिजेत असे प्रबोधिनीला वाटते. यासाठीचे उपक्रम किंवा पद्धती अजून सिद्ध झाल्या नसल्या तरी ग्रामीण भागात तंत्रशिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. तरच त्यापुढे व्यक्तिमत्त्व विकसनाचा पुढचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुला होईल. शहरी भागातही या शिक्षणाचा सार्वत्रिक समावेश होणे उपयुक्त आहे. श्रमप्रतिष्ठा व आत्मविश्वास वाढण्यास याचा उपयोग होईल.
 प्रबोधिनीच्या शैक्षणिक भूमिकेमध्ये जेवणदायी शिक्षणाचा विचार अजून चालू आहे। पण तो पूर्णत्वाला पोचलेला नाही. साळुबे येथील ग्रामीण विद्यालयात त्याचे जाणीवपूर्वक प्रयोग चालू आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे मातीशी असलेले नाते समजावे व पारंपरिक व्यवसायातून आर्थिक समृद्धी मिळविण्यासाठी कष्ट करण्याची सवय त्यांना लागावी असे प्रयत्न तिथे चालू असतात. रोपवाटिका, मधुमक्षिका पालन, गांडूळ खतनिर्मिती, वृक्षसंवर्धन हे विषय तिथे असतातच. त्याचबरोबर तंत्रशिक्षण व पशुपालन शिकविण्याचे प्रयत्न तिथे चालू आहेत.
शाळा आणि शिक्षणसंस्था
 देशाचे रूप पालटू इच्छिणाच्या कार्यकत्र्यांची संघटना अशी प्रबोधिनीची खरी ओळख आहे. कार्यकर्ते विकसित करण्याचे प्रयोगही इथे आग्रहाने व प्राधान्याने चालू आहेत, म्हणून प्रबोधिनीची ओळख समाजाला एक शिक्षणसंस्था म्हणून झाली आहे यातही काही वावगे नाही. पण रूढार्थाने ज्यांना शाळा म्हणतात तशी प्रबोधिनी केवळ शाळा नाही किंवा केवळ शाळा चालवणारी शिक्षणसंस्था नाही. घर, शाळा, युवक संघटना आणि उर्वरित सामाजिक पर्यावरण या शिक्षणाच्या चारही माध्यमांना सर्वंकष शिक्षणाचा एक पर्याय प्रबोधिनी देऊ इच्छिते. शाळा आणि युवक संघटना म्हणून केलेले प्रयोग व सिद्ध केलेले उपक्रम मांडण्यापूर्वी प्रबोधिनीने घर आणि सामाजिक पर्यावरण यांच्यासाठी काय पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे हे मांडले पाहिजे.
 पालकांपर्यंत पोहोचण्याचा शिक्षणसंस्थेकडे असलेला मुख्य मार्ग म्हणजे पालकांच्या बैठकी. पालकांच्या बैठकी व पालकांच्या व्यक्तिशः भेटी तर प्रबोधिनीत होतातच. प्रबोधिनीतील अध्यापनाचे प्रयोग समजावून सांगण्यासाठी व शाळेतील व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी यांचा उपयोग होतो. परंतु हे शाळेच्या कामासाठी घराचे सहकार्य मिळवणे झाले. घराच्या शैक्षणिक कामासाठी शिक्षणसंस्था काय करू शकेल असा विचार प्रबोधिनीत चालतो. हा विचार मुख्यत: संस्कार कार्यक्रमांना कालोचित रूप देऊन त्यांचा प्रसार करण्याने कार्यवाहीत येतो.


रूप पालटू शिक्षणाचे(९)


संस्कार कार्यक्रम

 भारतीय परंपरेमध्ये सोळा संस्कारांची कल्पना आहे. पूर्वी कधीतरी अड्ठेचाळीस होते असे म्हणतात. ते लोप पावून सोळावर संख्या आली. ती संख्याही घटत जाऊन नामकरण, विवाह, अंत्येष्टी अशी तीनावर आली. कुठे या तीनांत चौथ्या उपनयनाचा समावेश आहे तर कुठे या तीनपैकीही काहींना फाटा मिळाला आहे. संस्कार अर्थहीन झाल्यामुळे लोप पावतात. परंतु अप्रत्यक्ष संस्कारांशिवाय जाणीवपूर्वक व समारंभपूर्वक केलेल्या संस्कारांचा उपयोगही जाणवतो. जाणीव कमी होणार नाही व समारंभांचा अतिरेक होणार नाही अशी संस्कार कार्यक्रमांची रचना केली तर आयुष्यातील टप्प्यांचा निर्देश करण्यासाठी व स्वत:ची भूमिका आता बदलायची आहे याची व्यक्तीला जाणीव होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
 प्रबोधिनीने नामकरण, विवाह अंत्येष्टी या कौटुंबिक संस्कारांच्या व उपनयन या कौटुंबिक व शैक्षणिक संस्काराच्या पुनर्रचित पोथ्या तयार केल्या आहेत. सोळा संस्कारांमध्ये नसलेल्या षष्ट्यब्दिपूर्ती व एकोद्दिष्ट श्राद्ध ( मरणोत्तर दहाव्या ते चौदाव्या दिवसांचे विधी ) या पारंपरिक संस्कारांच्या पोथ्या केल्या आहेत. देहदानाच्या आधुनिक पद्धतीसाठी नवी पोथी रचली आहे. या पोथ्या वापरून अनेक कुटुंबांमधून संस्कार व्हायला सुरुवात झाली आहे. सुटसुटीत, कमी खर्चिक अशा व्यावहारिक कारणांसाठी आज याचा जास्त प्रसार होत असला तरी त्या पोथ्यांमधील अर्थवाहीपणा उपस्थितांना जाणवतो. संस्कारांकडे अर्थपूर्ण दृष्टीने पाहणे व घरच्या वातावरणातून होणा-या अप्रत्यक्ष संस्कारांशिवाय परंपरेतील संस्कारांचा जीवनदृष्टी देण्यासाठी घरच्यांनी उपयोग करणे यासाठी पोथी-संशोधनाचे काम प्रबोधिनीने चालवले आहे. प्रबोधिनी-प्रणीत पोथ्याच लोकांनी वापराव्यात असा प्रबोधिनीचा दुराग्रह नाही. पण संस्कारांकडे पाहण्याचा एक योग्य दृष्टिकोण समजून घ्यावा यासाठी प्रबोधिनीप्रणीत पोथ्यांचा प्रयोग करण्याचा आग्रह मात्र असतो. घरच्यांच्या संस्काराच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न शिक्षणसंस्था म्हणून प्रबोधिनी करत असते.
समाजातील विधायक चळवळी
 समाजातील बहुतेक लोक रूढीनुसार किंवा परंपरेनुसार चालणारे असतात. काही थोडे लोक मात्र नवीन करून पाहू इच्छिणारे, नव्या वाटा पाडणारे असतात. एक घटक समाजाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे. दुसरा घटक समाजाच्या प्रगतीसाठी किंवा किमान समाजप्रवाह साकळू नये यासाठी आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक भूमिका रुजवू पाहताना समाजात काही अनुकूल चलन-वलन झाल्याशिवाय ती रुजणे शक्य
(१०) रूप पालटू शिक्षणाचे
नाही.
 सुट्टीच्या काळातील व्यक्तिमत्त्व विकसन शिबिरे प्रबोधिनीनेच सर्वप्रथम पुण्यात सुरू केली. सर्वप्रथम प्रबोधिनीच्या प्रशालेतील मुलांसाठी, नंतर इतर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी व क्रमश: इतर गावांमध्येही प्रबोधिनीने अशी शिबिरे सातत्याने योजली. या शिबिरातले सुटे-सुटे उपक्रम अनेकांनी पूर्वी योजले असले तरी त्यांचे तीन ते सात दिवसांच्या कालावधीसाठी केलेले एकत्रीकरण प्रबोधिनीमध्येच १९७२ साली सर्वप्रथम झाले. तेव्हापासून अव्याहतपणे अशी व्यक्तिमत्त्व विकसन शिबिरे प्रबोधिनीमध्ये चालू असतात. या कल्पनेचा प्रसार प्रबोधिनीच्या प्रयत्नानेच झाला असे म्हणणे कठीण असले तरी अशी शिबिरे उपयुक्त आणि यशस्वी होऊ शकतात असा नमुना प्रबोधिनीने सतत सर्वांसमोर ठेवला.
 गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसमोर शिस्तपूर्ण तरीही जोशपूर्ण बरची-नृत्याचे गट पाठवायला प्रबोधिनीने १९६४-६५ सालापासून सुरुवात केली. सातत्याने अनेक वर्षे आजतागायत असे बरची-नृत्याचे गट मिरवणुकांमध्ये जात असतात. विसर्जन मिरवणुकी हे पुण्याचेच वैशिष्ट्य असल्याने या कल्पनेचा प्रसार पुण्याबाहेर विशेष झालेला नाही. परंतु प्रबोधिनीचे पाहून आणि प्रबोधिनीच्या प्रयत्नाने १९८० नंतर पुण्यात पंधरा-वीस संस्थांचे असेच गट मिरवणुकीत दिसू लागले आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये प्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रानेही असेच प्रयत्न केले आहेत.
 कौटुंबिक संस्कारांची पुनर्रचना जशी प्रबोधिनीने केली तशी सत्यनारायण पूजेसाठी सामाजिक पर्याय म्हणून महापुरुष पूजेची रचना केली. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश प्रतिष्ठापना पोथीची रचना केली. मंडळांनी या सार्थ पोथीचा वापर करावा असा प्रबोधिनीचा आग्रह असतो. ग्रामीण भागात दारूच्या व्यसनापासून मुक्तीसाठी सामूहिक मालाधारण विधीचे प्रयोगही प्रबोधिनीने तीन-चार वेळा करून पाहिले आहेत. ग्रामीण स्त्रियांसाठी सामुदायिक हरितालिका पूजनाचे प्रयोगही खेड-शिवापूर येथे काही वर्षे चालू आहेत. गावाच्या विकास कामांसाठी जमणाच्या गटाने उपासना करून बैठकीला प्रारंभ करणे असा प्रयोगही काही वर्षे दोन गावांमध्ये चालू आहे.
शैक्षणिक चळवळी
 नव्याने रूढ झालेल्या कल्पनेची दोन उदाहरणे वर दिली आहेत. चालू असलेल्या काही इतर उपक्रमांचा उल्लेखही पुढे केला आहे. कल्पनेची मालकी एका व्यक्तीची किंवा संस्थेची न रहाता ती कोणाचीही किंवा सर्वांची झाली की त्या कल्पनेचा प्रसार होतो.
रूप पालटू शिक्षणाचे(११)


कोणत्याही उपक्रमांमधून काही ना काही अनौपचारिक शिक्षण होते. या उपक्रमांच्या

कल्पनेचा अनेक ठिकाणी, शेकडो-हजारो लोकांपर्यंत प्रसार झाला, विविध ठिकाणी त्या उपक्रमांमध्ये स्वत:च्या कल्पनांप्रमाणे बदल करून पाहणे सुरू झाले, एखाद्या सिद्ध झालेल्या तंत्राची आवृत्ती सुरू झाली, त्या कल्पनेमागच्या विचाराची दखल सैद्धान्तिक पातळीवरही घेतली जाऊ लागली की अनौपचारिक शिक्षणाच्या उपक्रमाचे चळवळीत रूपांतर झाले असे म्हणता येईल. शिक्षणसंस्थेने समाजातील शैक्षणिक चळवळींमध्ये सहभागी होणे, नवीन शैक्षणिक चळवळी सुरू करणे हे उर्वरित सामाजिक पर्यावरण शिक्षणानुकूल होण्यासाठी आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे प्रशस्तिपत्रके व प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया' या संकुचित कल्पनेपासून सर्वत्र, सर्वकाळ चालणारे सर्वंकष शिक्षण या व्यापक कल्पनेपर्यंत समाजाचा प्रवास होण्यासाठी शिक्षण-संस्थांना सामाजिक पर्यावरणावर परिणाम घडवण्याच्या हेतूने स्थिर कामाबरोबर चळवळींचा उपयोग करणे आवश्यक आहे.
 चळवळींमध्ये रूपांतर होऊ शकतील असे अनेक उपक्रम प्रबोधिनीमध्ये नित्य चालू असतात. काही प्रयोग कार्यकर्ते व्यक्तिगत जबाबदारीवर करून पाहत असतात; तर काही प्रयोग प्रबोधिनीचे म्हणून सुरू झालेले असतात; इतरांनी केलेले काही प्रयोग किंवा सुरू केलेल्या चळवळी याची आवृत्तीही प्रबोधिनीमध्ये चालू असते. शिक्षणसंस्थेचा जिवंतपणा टिकवण्यासाठी आणि तो व्यक्त होण्यासाठी देखील चळवळींचा उपयोग असतो.
 या पुस्तिकेमध्ये मुख्यत: सिद्ध झालेल्या उपक्रमांची तपशिलात माहिती द्यायची असल्याने प्रायोगिक परंतु चळवळीत रूपांतर होण्याची क्षमता असलेल्या किंवा चळवळ बनलेल्या अनौपचारिक शिक्षणाच्या उपक्रमांचा पुढे केवळ नामोल्लेख केला आहे. पुणे, शिवापूर, वेल्हे, सोलापूर, हराळी, निगडी, साळुुंंब्रे या प्रबोधिनीच्या सर्व केंद्रांवर असे उपक्रम चालू असतात. छात्र प्रबोधन मासिक, साखर शाळा, ग्रामीण प्रज्ञा विकास योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा केंद्र, किशोरी विकास योजना, महिलांचे बचत गट, जिजामाता केंद्र, पाणी समिती, शेती सुधारणा मंडळ, बालविकास केंद्र, बालकामगार शाळा, साक्षरता अभियान, सत्संग केंद्र, स्वास्थ्य केंद्र, आचार्य-कुल, समूहगान स्पर्धा, मुख्याध्यापक प्रशिक्षण, पवनामाई उत्सव असे अनेक उपक्रम प्रयोगाच्या विविध टप्प्यांवर आज चालू आहेत. आपल्या शैक्षणिक भूमिकेला सामाजिक पर्यावरण अनुकूल करून घेण्यासाठी चाललेला प्रबोधिनीचा हा प्रयत्न आहे. परिस्थिती अनुकूल नाही म्हणून अडून बसणे किंवा रडत बसणे विद्यार्थ्यांना शिकवायचे नसेल तर शिक्षणसंस्थांनी आपल्या कृतीने परिस्थितीवर परिणाम घडविण्यासाठी आम्ही प्रयत्न
(१२) रूप पालटू शिक्षणाचे
करत असतो हे विद्यार्थ्यांना दाखवून दिले पाहिजे.
मूल्यांचे शिक्षण
 उपासना आणि अध्यापन, संस्कारांची पुनर्रचना आणि शैक्षणिक चळवळी याबद्दल मांडणी झाली. आता शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक विकासासाठीच्या उपक्रमांची चर्चा सुरू करायची आहे, पण त्यापूर्वी मूल्यशिक्षणाबाबत प्रबोधिनीची भूमिका मांडली पाहिजे. धार्मिक शिक्षण किंवा नैतिक शिक्षण किंवा मूल्यशिक्षण यासाठी वेगळ्या तासांची किंवा वेगळ्या वेळाची किंवा वेगळ्या उपक्रमांची योजना करण्याची प्रबोधिनीची भूमिका नाही. विद्याथ्र्यांचे सर्व शैक्षणिक जीवनच नीती शिकवणारे, मूल्य रुजवणारे झाले पाहिजे. पूर्ण दिनक्रम आणि सारे आयुष्यच समाजधारणेचा विचार करत, इतरांच्या हित-सुखात माझे हित-सुख असा विचार करत घालवायचे आहे अशी प्रबोधिनीची भूमिका आहे.
 विद्यार्थिदशेत शिक्षणसंस्थांनी कोणती मूल्ये विद्यार्थ्यांसमोर ठेवावीत ? मूल्ये आत्मसात केल्याचे उच्चारातून, कृतीतून, भावनांच्या अभिव्यक्तीतून दिसते. त्यासाठी अनुक्रमे ‘सत्यं वद’, ‘धर्म चर’ आणि ‘स्वाध्यायात् मा प्रमदः' व 'मातृ-पितृ-आचार्य देवो भव' हे उपनिषदातील प्राचीन आदेश आजही आवश्यक आहेत. यांच्या बरोबरीने प्रबोधिनीत ‘राष्ट्र देवो भव' हे मूल्य देखील स्वीकारले आहे. ही सर्व आज्ञार्थक वाक्ये आहेत. त्याचा प्रभाव पडायचा असेल तर ही मूल्ये जगणारे मार्गदर्शक विद्यार्थ्यांसमोर पाहिजेत. मनुष्य अपूर्ण असल्यामुळे, स्खलनशील असल्यामुळे, पूर्णत: याप्रमाणे जगणे फारच थोड्यांना साधते. म्हणूनच मार्गदर्शकांमध्ये पारदर्शकता पाहिजे.
   यानि अनवद्यानि कर्माणि तानि त्वया सेवितव्यानि नो इतराणि ।
   यानि अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि ।'
 उपनिषदातील या उद्गारांमध्ये मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना काय सांगायचे ते चांगल्या रीतीने व्यक्त होते. आमची चांगली कामे व चांगली चरित्रे तेवढी तुम्ही घ्या, आमच्यातील उणीवा व दोष घेऊ नका', अशी मार्गदर्शकांची स्पष्टपणे सांगण्याची तयारी हवी. मूल्यशिक्षण म्हणजे मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांकडे मूल्यांचे संक्रमण ! ते सर्व प्रसंगी होऊ शकते. चारित्र्यनिर्मितीसाठी मूल्यशिक्षण हा शिक्षणपद्धतीचा स्थायी भाव असला पाहिजे. मूल्यशिक्षण हा शिक्षणाचा एक तुकडा होऊ शकत नाही. शालेय शिक्षणाचे काम हे जसे औपचारिक पद्धतींनी चालते, तसेच ते सर्वांगीण विकासाच्या तपशीलवार मांडणीमुळे पूर्णतेकडे वाटचाल करते. बौद्धिक, शारीरिक, मानसिक व आत्मिक विकास, सामाजिक विकास आणि राष्ट्रीयत्वाचा विकास, अशी विकासाची

रूप पालटू शिक्षणाचे(१३)

एक बहुभुजाकृती प्रबोधिनीमध्ये आहे.

बौद्धिक विकास
 आजूबाजूच्या परिसराबद्दल व त्या परिसरातील वस्तू, निसर्गनिर्मित व मानवनिर्मित रचना आणि व्यक्ती यांच्याबद्दल जिज्ञासा जागृत होणे ही बौद्धिक विकासामधली आरंभीची पायरी आहे. ग्रंथालयाचा वापर करणे, वाचनाचे महत्त्व कळून त्याची गोडी लागणे, विविध जीवनोपयोगी हत्यारे व अवजारे हाताळणे, वस्तू आणि व्यक्तींचे परस्पर-संबंध कळणे, पदार्थांचे व माहितीचे पृथक्करण करता येणे, भिन्न भिन्न प्रकारच्या माहितीमधली संगती शोधता येणे अशा कौशल्यांच्या वापरातून जिज्ञासा पूर्ण होते व नवीन प्रश्न लक्षात येतात. निरीक्षण, वाचन, चिंतन आणि कृती करण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रयोगशाळेत, वर्गात आणि घरी देखील प्रयोग करणे, लहान-मोठ्या गटांमध्ये व गटांसमोर आपले म्हणणे सांगण्याची संधी देणे, आह्वानात्मक कामे देणे असे उपाय प्रबोधिनीत वापरले जातात. जिज्ञासापूर्ती, समस्यापरिहार आणि नवनिर्मिती यासाठी आवश्यक ती कृती सुचणे व ती करता येणे व गरजेप्रमाणे कृती बदलता येणे यांतून बौद्धिक विकास झाल्याचे लक्षात येत असते. याकरिता स्वत: शिकण्याच्या प्रक्रियेला उत्तेजन आहे. शालान्त वर्ष सोडून आधीच्या इयत्तांमध्ये अभ्यासक्रमात लवचिकपणा आहे. गणित, शास्त्र, भूगोल, इतिहास हे विषय सातवीपर्यंत पाठ्यपुस्तकांशिवाय कसे शिकविता येतील, याचे प्रयोग चालु। आहेत. मुले पाचवीपासून छोटे-मोठे प्रकल्प करतात. त्यातून त्यांची स्वाध्यायकौशल्ये वाढतात. भौतिक विज्ञान व सामाजिक शास्त्र यांतील प्रकल्पांबरोबरच वाङ्मयातील प्रकल्पही काही विद्यार्थी करतात. प्रश्न पडला की न अडता नावीन्यपूर्ण रीतीने मार्ग कसा काढावा याच्या शिक्षणासाठी वेळापत्रकात प्रतिभाविकसनाचे तास आहेत. जलद वाचनासाठी सर्वांनाच विशेष शिक्षण दिले जाते. पाचवी-सहावीपासून वाचनाची कौशल्ये आत्मसात करता आली तर चांगल्या आकलनासह वेग चौपट वाढू शकतो. वेळाची मोठीच बचत होते. विज्ञान शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना स्वत:च्या हातांनी जास्तीत जास्त प्रयोग करायला मिळतील असा प्रयत्न असतो.
शरीर सतेज सुंदर
 कसदार शारीरिक शिक्षणाची एक परंपराचे प्रबोधिनीत तयार झालेली आहे. क्रीडाविषयांचा सुरचित अभ्यासक्रम असतो. आवश्यक तेथे तज्ज्ञ मार्गदर्शकांची योजना असते. हिवाळी शिबिरांमध्ये काही विशेष कौशल्ये शिकविली जातात. त्या

(१४) रूप पालटू शिक्षणाचे

आधारे विवेकानंद जयंतीला देशी-विदेशी खेळांची क्रीडाप्रात्यक्षिके योजली जातात. निगडीच्या विस्तीर्ण क्रीडांगणावर गेली बारा वर्षे उपनगर पातळीवरचा ‘क्रीडामहोत्सव' भरतो.अशा क्रीडास्पर्धाना साहस-सहलींची जोड असते . सह्याद्रीच्या कडेकपारीत इतिहासाचा मागोवा घेत विद्यार्थी हिंडतात.
 सूर्यनमस्कार, योगासने, पोहणे या व्यक्तिगत व्यायामाचेही महत्त्व मोठे आहे. इयत्ता आठवीमध्ये उपनयन म्हणजे विद्याव्रताचा संस्कार योजलेला असतो. तत्पूर्वीच्या व्याख्यानमालेची सुरुवात ‘शरीर सतेज सुंदर' या विषयाने होते. युवक व युवतींसाठी दोन स्वतंत्र व्याख्यानमाला होतात. ब्रह्मचर्याश्रमाचे महत्त्व आणि यमनियम, त्यातील शरीरविज्ञान आणि घ्यावयाची काळजी यांबद्दल त्यात मार्गदर्शन केले जाते. यथाकाल गृहस्थाश्रमात प्रवेश करेपर्यंत आरोग्यपूर्ण, तेजस्वी शरीराची जोपासना कशी करायची, याचे विवेचन व चर्चा होते. आरोग्याचे काही मूलभूत शिक्षण या काळात दिले जाते. तसेच आयुर्वेदातील सोप्या, घरगुती औषधांचा परिचयही विद्याथ्र्यांना या काळात करून दिला जातो. जून १९९८ पासून क्रीडा- कुलाचा अभिनव प्रयोग निगडी येथे सुरू झाला आहे. त्यामध्ये शारीरिक शिक्षण केंद्रबिंदू मानून सगळ्या शिक्षणाची मांडणी करणे चालू आहे.
मन सुदृढ नि पवित्र
 उत्तम शरीराला ‘मन सुदृढ पवित्र.....' याची जोड हवी. मन:स्वास्थ्यासाठी मनाची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जाते. आवश्यक तेथे व्यक्तिगत मार्गदर्शन(कौन्सेलिंग) करण्याची सोय आहे. त्यासाठी मानसशास्त्र संशोधिकेतील तज्ज्ञ उपलब्ध असतातच, परंतु प्रामुख्याने शाळेतील अध्यापकांनी ही जबाबदारी सांभाळावी अशी कल्पना आहे. जिव्हाळ्याचे शिक्षक-विद्यार्थी संबंध हा येथील शिक्षणाचा पाया मानला आहे.
 अभिव्यक्तीसाठी उत्तेजन आहे. संगीत व चित्रकला यांच्या तासिका असतात. संमेलनातून नाट्यगुण व्यक्त होतात. समज जसजशी वाढू लागते तसतशी ही कला देशकार्याच्या प्रेरणेशी कशी जोडायची, याचे दिग्दर्शन केले जाते. उत्तमोत्तम चाली लावलेली आशयघन पद्ये, व्यक्तिगत वा सामूहिक, प्रसंगानुरूप साभिनय अशी म्हटली जातात. ती मोठी स्फूर्तिप्रद असतात. त्यातून एकदिशेने वाटचाल चालू असल्याचा प्रत्ययही येतो. कथाकथने, चरित्रे, गोष्टी यांची निवड या विशिष्ट दृष्टिकोनातून केलेली असते. मनोरंजनातून आवाहनाची गुंफण असते. हसतमुख, आनंदी, मोकळ्या स्वभावाची जडणघडण या प्रक्रियेतून होते. त्याबरोबरीनेच चौरस माहिती, जबाबदारीची जाणीव आणि विचारांची पक्वता वाढत जाते.रूप पालटू शिक्षणाचे(१५)


सामाजिक कौशल्यांचा विकास
 व्यक्तीने समूह आणि समाज यांत कसे वागावयाचे याबद्दलची जाणीव समृद्ध करण्यासाठी अनेक कार्यक्रम असतात. संघटित जीवनाचा अनुभव येण्यासाठी पथकयोजना असते. सहली व शिबिरांमधून सहकार्य व स्पर्धा यांचा समतोल साधला जातो. कार्यसिद्धीची प्रेरणा (अचिव्हमेंट मोटिव्हेशन) व नेतृत्व (लीडरशीप) यांचे प्रशिक्षण कामाच्या मांडणीतच असते. युवक कार्यामध्ये गटनायकापासून युवक सचिवांपर्यंत पदश्रेणी आहे. अशा कामांमध्ये लागणारे लेखी नियोजन, व्यक्तींशी संवाद व समायोजन, आर्थिक हिशेब, प्रतिवृत्त लेखन अशी कौशल्ये बैठकीमधून व कार्यक्रम आखताना शिकविली जातात. चर्चाकौशल्ये, श्रवणकौशल्ये, संधी व आह्वाने स्वीकारण्याची वृत्ती, प्रतिसादी वृत्ती यांचा ऊहापोह होतो. प्रत्येक कार्यक्रमानंतर काय चांगले झाले, काय उणे राहिले असा शोध-बोध होतो. त्या वेळी उपक्रमाचे मर्म स्पष्ट होते. अशा प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. आर्थिक व्यवहार करण्याची संधी त्यांना देण्यासाठी काही विक्री उपक्रम असतात. राख्या, फटाके, तिळगूळ, पेये, तसेच निधिसंकलनासाठी केलेल्या कार्यक्रमांच्या प्रवेशिका, यांच्या विक्रीच्या निमित्ताने विद्यार्थी अनोळखी समाजात जातात, प्रबोधिनीची ओळख धीटपणे करून देतात व ग्राहकांची मने जिंकून उपक्रम यशस्वी करतात.
 समाजात मिसळण्याचे आणखीही मार्ग आहेत. त्यात विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव वाढावी व सेवाभावना त्यांच्या अंगी बाणावी असा उद्देश असतो. दुष्काळग्रस्त प्रदेशाची पाहणी, झोपडपट्टीतील संपर्क, श्रमशिबिरे आणि आपत्कालीन मदतकार्ये ही त्याची निमित्ते असतात. अशा कामांनंतर विद्यार्थ्यांच्या मनावर उमटलेले ठसे ते मनोगत लेखनातून व्यक्त करतात. काही वेळा सर्वांचे एकत्र निवेदनही योजले जाते.
राष्ट्रीय प्रेरणा जागवण्यासाठी योजलेले उपक्रम
 सामाजिक बांधिलकी हे केवळ योजनेतून अंगी मुरणारी गोष्ट नाही. त्यासाठी प्रेरणेचा झरा आतून उत्पन्न व्हावा लागतो. हा देश माझा आहे, हे राष्ट्र वैभवशाली झाले पाहिजे. अशी उत्कट भावना विद्यार्थ्यांनी कधी तरी आतून अनुभवली पाहिजे. इतिहासकथन, पद्ये ही माध्यमे त्यासाठी आहेत. मातृभूमि हे दैवत येथे ...' ही भावना विद्याथ्र्यांच्या मनी रुजवावी, यासाठी विविध प्रकारची रचना असते. पुणे, निगडी व सोलापूर या प्रबोधिनीच्या तीनही केंद्रांमध्ये हिंदुस्थानच्या चित्रमूर्तीची आणि ओंकाराची प्रतिष्ठापना केली आहे ती त्यासाठी ! स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेचे ते मूर्त स्वरूप आहे.
(१६) रूप पालटू शिक्षणाचे
 सामाजिक जाणिवेतून स्वाभाविकरीत्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा विकास होण्यासाठी नुसते प्रेरणा जागरणही पुरत नाही. प्रत्यक्ष प्रश्न काय आहेत, त्यांची उत्तरे कशी शोधली पाहिजेत, याची चर्चा करण्यासाठी परिस्थिती ज्ञानाचे तास योजले जातात. स्वतंत्र वेळात बैठकी होतात. महाविद्यालयीन युवकांसाठी अभ्यास शिबिरे होतात. कोणी सजग युवक-युवती संबंधित प्रांतांमध्ये जाऊन प्रश्न समजावून घेतात. १९८३-८४ च्या दोन पंजाब सद्भाव यात्रा, समाज ऐक्य समितीच्या कामासाठी महाराष्ट्राच्या जिल्ह्यांतून दौरे, गुरखा प्रश्नासंबंधीचा कलकत्ता-दार्जिलिंग दौरा आणि 'सती'प्रश्नासंबंधातील राजस्थान दौरा, ठाण्याच्या वनवासी क्षेत्रात झालेले तीन-चार अभ्यासदौरे, काश्मीर-गुजराथ- विदर्भातील दौरे असे अनेक दौरे नेहमीच जात असतात. या ठिकाणी गेलेल्यांचे अनुभवकथन ऐकणे, लेखन वाचणे ही शालेय विद्यार्थ्यांना मोठी पर्वणी असते.
आध्यात्मिक अधिष्ठानाकडे लक्ष वेधण्यासाठी उपक्रम
 शैक्षणिक वर्षारंभी व वर्षाच्या शेवटी होणा-या उपासनेत परब्रह्म तत्त्वाबद्दल वेद- उपनिषदे यांनी काय सांगितले आहे, गीता-ज्ञानेश्वरी काय सांगते याचा परिचय प्रबोधिनीत विद्यार्थ्यांना होतो. या विचारांची ओळख करून देणा-या सामुदायिक उपासना मराठी अर्थासह काही पुस्तिकांमध्ये मांडलेल्या आहेत. त्यातील श्लोकांना सुमधुर चाली लावलेल्या आहेत. त्यात गद्य संकल्पही आहेत ! विद्याथ्र्यांचा भावनाकोश समृद्ध करण्याचे मोठे सामर्थ्य या उपासनांमध्ये आहे.
 आठवड्यातून एकदा विद्याथ्र्यांची सामुदायिक उपासना असते. स्थिर वृत्तीने आसनमांडी घालून चित्त एकाग्र कसे करावे याचा अभ्यास घेतला जातो. ओंकाराचा उच्चार, त्यानंतर शक्तिमंत्र, विरजामंत्र, मग ध्यान व शेवटी गायत्री मंत्राचे उच्चारण करून ‘अमुच्या बुद्धीला तो (सविता) प्रचोदना देवो' अशी प्रार्थना करावयाची, असा सुमारे वीस मिनिटांचा हा कार्यक्रम असतो. विद्यार्थ्यांनी विद्याव्रत संस्कारानंतर घरीसुद्धा ही उपासना रोज करावी, असे सांगितले जाते. व्यक्तिगत उपासनामार्गाचे प्रत्येकाचे स्वातंत्र्य अबाधित राखलेले आहे. समूहाने विधायक काम करावे ही भावना वाढवण्यासाठी एकत्रित उपासनांचा चांगला लाभ होतो.
 अशा विविधांगी मांडणीमध्ये उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन असते. विचार भिन्नतेचेही स्वागत असते. जसजशा यातील संकल्पना भावत जातात तसतसे, अधिक उंचीचे निश्चय विद्यार्थी करतात. शालेय वयोगटापासून वरिष्ठ प्रौढापर्यंत सर्वजण या शिक्षण प्रक्रियेला हातभार लावत असतात. त्यामुळे दहावीचे शिक्षण झाल्यावरही अनेकजण या कार्याशी निगडित राहातात.रूप पालटू शिक्षणाचे(१७)


शिक्षण-पद्धतीचा परिणाम :- अनुधावन

 ज्ञान प्रबोधिनीने स्वीकारलेल्या शैक्षणिक तत्त्वज्ञानानुसार चाललेल्या उपक्रमांची व्याप्ती आतापर्यंतच्या मांडणीतून लक्षात येईल. बौद्धिक विकासासाठीचे उपक्रम मुख्यत: शाळेत व्हावेत अशी प्रबोधिनीची कल्पना आहे. शारीरिक विकासासाठीचे उपक्रम युवक संघटनेत व्हावेत अशी योजना असते. मानसिक विकासाच्या विविध दिशा स्वतंत्रपणे मांडलेल्या आहेत. सामाजिक जाणीव, गटात काम करण्याची वृत्ती, राष्ट्रीय प्रेरणा आणि भावनाकोश किंवा हृदयगुणांचा परिपोष अशा विविध प्रकारे मानसिक विकसन होणे शक्य आहे. शाळा आणि युवक संघटना अशा दोन्ही माध्यमांतून मानसिक विकसन होऊ शकेल. प्रबोधिनीमध्ये मुख्यतः युवक संघटनेचे हे काम आहे असे मानले आहे. आत्मिक विकासासाठीचे उपक्रम शाळेत योजता येतात.
 प्रबोधिनीमध्ये शाळा व युवक संघटना ही दोन माध्यमे एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे. प्रबोधिनीच्या शाळांमध्ये येणा-या विद्यार्थि-विद्यार्थिनींना दोन्ही माध्यमांच्या उपक्रमांचा लाभ होतो. प्रबोधिनीच्या शाळांमध्ये न येता अन्य शाळांमध्ये जाणा-या किंवा महाविद्यालयातल्या विद्यार्थि-विद्यार्थिनींनाही युवक संघटनेच्या उपक्रमांचा लाभ होतो. प्रबोधिनीतले औपचारिक शिक्षण संपलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनातही युवक संघटनेचे सदस्य म्हणून प्रबोधिनीत येतात. त्या वेळी ते उपक्रमांच्या संयोजनातही भाग घेतात. शालेय वयातील विद्यार्थ्यांशी काही उपक्रमांमध्ये तरी त्यांच्याहून तीन-चार वर्षांनी मोठ्या गट-प्रमुख किंवा मार्गदर्शकांचा संपर्क आला पाहिजे. या संपर्कातून होणा-या आंतरक्रियांचा प्रेरणा वाढण्यास उपयोग होतो. तो करून घेतला पाहिजे अशी प्रबोधिनीची भूमिका आहे. सर्वांगीण शिक्षणपद्धतीच्या मांडणीचा प्रयोग प्रबोधिनीने नेतृत्व विकसनासाठी मांडला आहे. सर्वांगीण विकसनाचा परिपाक म्हणून नेतृत्व विकसन घडले पाहिजे. समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत जे समर्पित वृत्तीने व राष्ट्रीय प्रेरणेने नेतृत्व करतील असे कार्यकर्ते घडविणे हे प्रबोधिनीचे उद्दिष्ट संस्था-स्थापना लेखातच लिहून ठेवले आहे. नेतृत्व विकसनाची संकल्पना प्रबोधिनीत कशी विकसित होत गेली आहे याची मांडणी स्वतंत्र पुस्तिकेत केली आहे.
प्रबोधिनीत रूढ झालेले नवे शैक्षणिक उपक्रम
 भूमिकेमध्ये मांडलेल्या उद्दिष्टांनुसार प्रबोधिनीमध्ये शैक्षणिक उपक्रमांच्या बाबतीत अनेक प्रयोग गेल्या २५-३० वर्षांत झाले. त्यांपैकी सिद्ध होऊन रूढ झालेल्या उपक्रमांची यादी पुढे दिली आहे. एखाद्या शाळेत नव्याने काही उपक्रम सुरू करायचे

(१८) रूप पालटू शिक्षणाचे
झाले, तर ते कोणत्या क्रमाने सुरू करता येतील याचा एक आराखडा, या उपक्रमांची वर्षवार विभागणी करून सुचवला आहे.
 एका वर्षी सुरू झालेले उपक्रम चालू ठेवून पुढील वर्षीचे उपक्रम सुरू व्हावेत अशी अपेक्षा आहे. या क्रमाने गेल्यास शालेय वातावरण शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध होईल.
वर्ष पहिले-  १) वर्षारंभ व वर्षांत उपासना २) सामूहिक गीतगायन
३) क्रीडाशिबिर ४) स्वातंत्र्यदिन /प्रजासत्ताक दिन व्याख्याने ५) सहाध्याय दिन
वर्ष दुसरे -  १) दैनंदिन खेळ २) बर्ची नृत्य (सामूहिक नृत्य) ३) सहली
४) संत वाङ्मय, गीता पाठांतर ५) क्रीडामहोत्सव
वर्ष तिसरे-  १) संकल्प व्याख्यानमाला २) ग्रंथालय नियोजित वापर
३) विक्री-उपक्रम ४) क्रीडा-प्रात्यक्षिके ५) गुणविकास योजना
वर्ष चौथे-  १) विद्याव्रत संस्कार २) साप्ताहिक उपासना ३) अग्रणी योजना ४)
प्रयोगशाळा वापर ५) अभिव्यक्ती विकास
वर्ष पाचवे-  १) देह परिचय २) अभ्यास शिबिर ३) स्वयंअध्ययन कौशल्ये ४)
गटकार्य ५) शंभर दिवसांची शाळा
पाचव्या वर्षानंतर- १) वाचन कौशल्ये २) प्रकल्प ३) कार्यपत्रके
४) प्रतिभा विकसन ५) मदतकार्य/निधिसंकलन ६) विज्ञान दृष्टी विस्तार कार्यक्रम ७)
जोडी कार्य-व्यक्ती कार्य ८) मनोगत लेखन ९) परिस्थिती ज्ञान तासिका १०)
पालखी-गणेशोत्सव-स्थानिक उत्सवात सहभाग
 या उपक्रमांपैकी विद्याव्रत संस्कार आणि प्रकल्प या उपक्रमांवर स्वतंत्र पुस्तके या पूर्वीच प्रकाशित झाली आहेत. विविध इयत्तांमध्ये जी कौशल्ये विशेषत्वाने शिकवली जातात, त्यांपैकी वाचन आणि प्रतिभा विकसन या विषयांवरची स्वतंत्र पुस्तके देखील यापूर्वीच प्रकाशित झालेली आहेत. देह परिचय या उपक्रमासंबंधी पहिला भाग पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. उरलेल्या उपक्रमांपैकी (१)सहाध्याय दिन (२) क्रीडामहोत्सव (३) गुणविकास योजना (इयत्ता सातवी शिष्यवृत्ती) (४) अभिव्यक्ती विकास योजना (५) शंभर दिवसांची शाळा या उपक्रमांवर छोटी टिपणे या पुस्तिकेत समाविष्ट केली आहेत. ही निवड करताना उपक्रमांची जी वर्षवार विभागणी सुचवली आहे. त्यातील प्रत्येक वर्षातील एक उपक्रम निवडला आहे. इतर उपक्रमांवरील टिपणे यापुढे क्रमश: प्रकाशित करण्याचा विचार आहे.
रूप पालटू शिक्षणाचे(१९)

सहाध्यायदिन

 ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षणाचे उद्दिष्ट राष्ट्रघडणीसाठी व्यक्तिविकास' हे आहे. इथे मानवतेबद्दल आस्था निर्माण करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणून मानले आहे. राष्ट्रहिताबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी सर्व बौद्धिक विषयांच्या (पाठ्यक्रमातील विषयांच्या) अभ्यासातून राष्ट्राच्या मध्यवर्ती प्रश्नांची जाण येणे गरजेचे आहे. केवळ जाण येणे पुरेसे नसून हे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याची प्रेरणा शिक्षणातून मिळायला हवी.
 ही प्रेरणा मिळवण्यासाठी पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमाची चौकट ओलांडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात असे नजरेला आणून देणे, शिकण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा या अभ्यासक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. प्रबोधिनीचा विद्यार्थी हा समाजाभिमुख असायला हवा. त्यासाठी प्रत्यक्ष समाजाचे दर्शन होणे गरजेचे आहे. असे दर्शन नैमित्तिक का होईना पण व्हावे म्हणून हा उपक्रम योजला आहे.
हेतू
 विद्याथ्र्यांना विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देणे हा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे, असे म्हणता येईल. परंतु अनेकदा प्रचलित शिक्षणाच्या घट्ट चौकटीत इच्छा असूनही अनेक अनुभव आपण विद्याथ्र्यांना देऊ शकत नाही. शाळेच्या बाहेर, घरी अथवा समाजात वावरताना विद्यार्थी अनेक अनुभवांना कळत-नकळत सामोरे जात असतात. परंतु हे अनुभव त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेले नसतात. अशा अनुभवांचे नंतर विश्लेषण केले जात नाही. त्यामुळे या अनुभवांना पूर्णाशाने अध्ययन अनुभव म्हणता येईलच असे नाही. संवेदनशील मुलांमुलींच्या बाबतीत मात्र असे अनुभव प्रेरणादायी, शिकवणारे असू शकतात.
 शिक्षकाला चौकटीबाहेर जाऊन जर असे अनुभव देण्याची इच्छा असेल तर शाळेच्या वेळापत्रकात त्याला वेळ उपलब्ध असला पाहिजे. या हेतूने प्रबोधिनीत सहाध्यायदिन राखून ठेवले आहेत. शिक्षणातील अनेक उपक्रमांप्रमाणेच हा उपक्रमही स्वाभाविकरीत्या अभ्यासक्रमाचा भाग बनून गेला तर त्यासाठी वेळापत्रकात वेगळी व्यवस्था करण्याचे कारणच उरणार नाही. औपचारिक सहाध्यायदिनाचे अनौपचारिक सहअध्ययनात रूपांतर होणे हा यशस्वी शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा निकष ठरू शकतो.
(२०) रूप पालटू शिक्षणाचे सहाध्यायदिनाचा उपक्रम आखण्यापूर्वी शिक्षकाच्या मनात त्याच्या हेतूंबद्दल स्पष्ट जाणीव असली पाहिजे.
 * सहाध्यायदिनाच्या उपक्रमातून विद्याथ्र्यांना गट म्हणून त्यांच्या सभोवतीच्या वास्तव परिस्थितीशी आंतरक्रिया करण्याची संधी उपलब्ध होत असते.
 १) गटांतर्गत आंतरक्रिया
 २) गट व परिसरातील नैसर्गिक संस्था यांतील आंतरक्रिया
 ३) गट व परिसरातील मानवनिर्मित संस्था (Artificial systems) यांतील आंतरक्रिया
 ४) गट व समाजातील विविध व्यक्तीयांमधील आंतरक्रिया.
अशा अनेक प्रकारच्या आंतरक्रिया प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पातळ्यांवर (बौद्धिक, मानसिक स्तरावरील) मुक्तपणे घडू देणे हा सहाध्यायदिनाचा एक हेतू आहे.
 * विद्यार्थ्यांना अनुभवांना मुक्तपणे सामोरे जाऊ दिले तर त्या अनुभवांची उत्कटता वाढते. त्यामुळे मनाची संवेदनशीलता वाढवणे हाही या उपक्रमामागचा मुख्य हेतू असणे जरूरीचे आहे. यातून जाणीवेची जागृती व विकास यांना सुरुवात होईल.
 * सहाध्यायदिनातून मुलांमुलींना विविध प्रेरणा मिळाव्यात.
 * विद्याथ्र्यांच्या शालेय अभ्यासक्रमात अनेक विषय मर्यादित स्वरूपात अथवा मूलभूत पातळीवर येतात. या विषयांचा व्यावहारिक जगाशी संबंध जोडणे हेही सहाध्यायदिनाच्या निमित्ताने करता येते.
 * एकाच विषयाचा विविधांगी अभ्यास प्रभावीरीत्या करण्यासाठी गटाने अभ्यास करणे हे साधन उपयुक्त ठरते. हा विश्वास निर्माण करणे, अशा अभ्यासाची तंत्रे, पद्धती, यांचा मुलांना परिचय होणे असाही एक हेतू सहाध्यायदिनाच्या उपक्रमातून साध्य होऊ शकतो.
 * गटाशी जुळवून घेता येणे.
सहाध्यायदिन उद्दिष्टे
 वर उल्लेख केलेल्या हेतूंच्या पूर्ततेसाठी सहाध्यायदिनाचा उपक्रम आखला पाहिजे. हा उपक्रम ठरविण्यापूर्वी तो उपक्रम कोणत्या उद्दिष्टांसाठी आखणार आहोत अशी एक अथवा अनेक उद्दिष्टे आधी मांडली पाहिजेत. पुढे काही उद्दिष्टे नमुन्यादाखल दिली आहेत.
 उदा. :- ग्रामीण जीवनाचा परिचय
 १) ग्रामीण अर्थरचनेचा परिचय
 २) ग्रामीण समाजजीवनाचा परिचय

रूप पालटू शिक्षणाचे(२१)

 ३) ग्रामीण साधनसंपत्तीचा परिचय

 ४) ग्रामीण चालीरीतींचा परिचय
अशी नेमकी उद्दिष्टे, उपउद्दिष्टे मांडता येतील. याप्रमाणेच पुढील प्रकाराने उद्दिष्टांचे वर्गीकरण करता येईल. उपउद्दिष्टे मांडता येतील.
 १) औद्योगिक क्षेत्रातील घडामोडींची जाणीव
 २) पर्यावरणातील घटक, समस्या इ. चा परिचय
 ३) नैसर्गिक संपत्तीचा परिचय
 ४) सांस्कृतिक परंपरांचा परिचय
 ५) विकासवाटांचा परिचय
 ६) सामाजिक समस्यांचा परिचय
 ७) सामाजिक कार्यक्रमात सहभाग
 ८) आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव
 ९) इतिहासाचा परिचय
 १०) कलाकृतीचा रसास्वाद
 ११) कलाकृतीची निर्मिती / निर्मिती प्रक्रियेची ओळख
सहाध्यायदिन उपक्रम
 एकदा सहाध्यायदिनाचे प्रधान उद्दिष्ट निश्चित झाले व त्यातील उपउद्दिष्टे मांडून झाली की त्याला समर्पक एक अथवा अनेक उपक्रम शिक्षक आपल्या अनुभवांतून निवडू शकतो. असे काही उपक्रम खाली सुचवले आहेत.
१. संस्था भेटी -(मुख्यत: पुण्याच्या परिसरातील संस्था सुचवल्या आहेत.)
 १) कारखाने - अ) मोठे उद्योग ब) मध्यम उद्योग क) लघुउद्योग ड) शेतीवर आधारित व पूरक उद्योग ई) वीजनिर्मिती
 २) संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था - NCL पाषाण, पुणे विद्यापीठ, BAIF उरळीकांचन, वेधशाळा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी, रेशीम संशोधन संस्था, Automotive Research Institute, ARDE, ERDL, IUCCA, GMRT, MACS, EMRC, FTI, NDA, CWPRS, भारत इतिहास संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेज, भांडारकर प्राच्य संस्था, इंजिनीअरिंग कॉलेज,
 ३) सामाजिक संस्था - ज्ञान प्रबोधिनी, पाणी पंचायत, मुक्तांगण, बालग्राम, वनराई, राळेगणसिद्धी, विज्ञानाश्रम, उद्योगधाम
(२२) रूप पालटू शिक्षणाचे  ४) शासकीय संस्था - जलशुद्धीकरण केंद्र, पुणे महापालिका, जिल्हा परिषद, शासकीय कार्यालये, पोलीस मुख्यालय, न्यायालय, पुणे टेलिफोन, कारागृह, GPO, कृषिउत्पन्न बाजार समिती, रुग्णालये (ससून, जहांगीर इ.)
  ५) संग्रहालये- राजा केळकर संग्रहालय, संधिपाद प्राणी संग्रहालय, सर्पोद्यान, महात्मा फुले संग्रहालय इ.
२. समूह अभ्यास - १) परिसंस्थेचा (Ecosystem) अभ्यास २) धरणे, पाझर तलाव इ. ३) वनस्पती, प्राणी, दगड इ. जमा करणे व त्यांचा अभ्यास करणे ४) स्वत:च्या गावाचा परिचय ५) पक्षीनिरीक्षण ६) आकाशदर्शन ७) नदीच्या पात्राचा । प्रणालीचा अभ्यास
३. समाजाचा अभ्यास- १) ग्रामीण भागाचे सर्वेक्षण २) झोपडपट्टयांचे सर्वेक्षण
३) लघुउद्योगांचे सर्वेक्षण ४) एखाद्या प्रश्नाच्या / विषयाच्या अनुषंगाने सर्वेक्षण
४. व्यक्तींशी संवाद - १) कवी / लेखक / शास्त्रज्ञ / सामाजिक कार्यकर्ते / नेते | प्रशासकीय अधिकारी | खेळाडू यांच्याशी गप्पा व त्यांतून परिस्थितीची जाणीव २) एकत्रितरीत्या गटाने लेखन करणे ३) एखाद्या विषयावर परिसंवाद-चर्चा ४) व्याख्याने ऐकणे व त्यावर चर्चा ५) व्यावसायिकांच्या मुलाखती घेणे ६) अन्य प्रांतीय । अन्य भाषिक यांच्या मुलाखती घेणे.
५. कृतियुक्त उपक्रम - १) हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णसेवा करणे २) शेतात काम करणे, ३) कारखान्यात काम करणे ४) कारागिरांबरोबर काम करणे
५) दिवसभराचे श्रमकार्य करणे ६) पथनाट्ये सादर करणे ७) नव्या भाषेची प्राथमिक कौशल्ये शिकणे ८) नवी कौशल्ये शिकणे.
६. कलाकृतीचा आस्वाद - १) समूहात चित्रपट / नाटक पाहणे व त्यावर चर्चा २) एकत्र पुस्तक वाचणे व चर्चा ३) एकत्र प्रदर्शन पाहणे व चर्चा ४) प्राचीन शिल्प पाहणे, चर्चा व अभ्यास
 वर सुचविलेले अथवा अन्य उपक्रम सहाध्यायदिनासाठी योजता येतील.
सहाध्यायदिन पूर्वतयारी
  सहाध्यायदिनाच्या यशस्वितेत शिक्षक व विद्याथ्र्यांच्या मनापासूनच्या सहभागाचा मोठा वाटा असतो. हा उत्कट सहभाग बौद्धिक, मानसिक व प्रत्यक्ष कृतीच्या रूपाने व्यक्त होत असतो. असा सहभाग वाढण्यासाठी सहाध्यायदिनातील काही भागाचे पूर्वनियोजन चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.रूप पालटू शिक्षणाचे(२३)

 १) शिक्षकाने त्या विषयावरील लेख अथवा पुस्तक वाचलेले असावे किंवा अन्य

मार्गाने त्या विषयावरील पुरेशी माहिती गोळा केलेली असावी.
 २) उपक्रमाशी संबंधित व्यक्तींशी पुरेसा आधी सविस्तर व स्पष्ट पत्रव्यवहार झालेला असावा. या पत्रव्यवहारात सहाध्यायदिनाचे हेतू, उद्दिष्टे व रूपरेषा थोडक्यात मांडल्यास या उपक्रमाच्या वेगळेपणाची जाणीव संबंधित व्यक्तींना होऊन त्यांचे अधिक सहकार्य मिळू शकेल.
 ३) शिक्षकाने अथवा त्या विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीने जर त्या विषयाच्या परिचयाचे एखादे व्याख्यान सहाध्यायदिनाच्या आधी दिले तर मुलांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होतील. हे व्याख्यान मुलाची त्या विषयातील उत्सुकता वाढवेल इतकेच मर्यादित स्वरूपाचे असावे.
 ४) काही विद्यार्थ्यांनी त्या विषयावरील काही थोडे वाचन केलेले असावे. त्यावर वर्गात चर्चा झालेली असावी. या चर्चेत मुख्यत: सहाध्यायदिनाच्या दिवशी आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळवणार आहोत असे काही प्रश्न पुढे यावेत.
 ५) शक्य असेल तर विद्यार्थ्यांच्या वह्यांमधे या प्रश्नांची, शंकांची, मुद्यांची नोंद असावी; ज्यामुळे सहाध्यायदिनाच्या वेळी या चर्चेचा संदर्भ ताजा राहील.
 ६) आवश्यक असेल तर शिक्षकाने हा उपक्रम जेथे योजला आहे त्या जागेस पूर्वी भेट देणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे येऊ शकणाच्या संभाव्य अडचणींची कल्पना येऊ शकेल.
 ७) सहाध्यायदिनाच्या दिवशी जे साहित्य आवश्यक आहे त्याची यादी करून ते साहित्य मुलांच्या मदतीने पुरेसे आधी मिळवून ठेवणे आवश्यक आहे.
 ८) ज्या उपक्रमात मुलाखती घ्यायच्या असतील, सर्वेक्षण करायचे असेल तेथे मुलांकडून प्रश्नावल्या तयार करून घ्याव्या लागतील.
 ९) सहाध्यायदिनाच्या दिवशी जर शिक्षकांच्या जोडीने त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती मुलांबरोबर त्या उपक्रमात सहभागी होऊ शकली तर मुलांना परिपूर्ण माहिती मिळणे शक्य होईल. पण शक्यतो ही भूमिकाही शिक्षकानेच करावी.
 १०) पूर्वतयारीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलांना प्रेरित करणे हाच होय. त्यासाठी वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सहाध्यायदिन उपक्रमासंदर्भात संवाद निर्माण झाला पाहिजे.
 ११) जेथे आवश्यक असेल तेथे वर्गाची छोट्या गटांमधे विभागणी करून गटप्रमुख नेमावेत. त्या त्या गटांना विशिष्ट उद्दिष्टे द्यावीत. पूर्वतयारीच्या कामांची विभागणी करून
(२४) रूप पालटू शिक्षणाचे पूर्वतयारीच्या कामांत मुलांना सहभागी करून घ्यावे.
 १२) सहाध्यायदिनात ज्या विषयाचे अध्ययन झाले असेल त्याचे टिपण वर्गाने सादर करावयाचे आहे अशी पूर्वकल्पना मुलांना देऊन ठेवावी.
सहाध्यायदिनाच्या वेळी
प्रत्यक्ष सहाध्यायदिनाच्या वेळी जर पूर्वतयारी व्यवस्थित झाली असेल तर मुले उपक्रमात बुडून जातात. या वेळी शिक्षकांनी अभ्यासविषयासंदर्भात व विद्यार्थ्यांची निरीक्षणे नोंदवून ठेवावीत. विचार करायाला लावणारे प्रश्न निर्माण करावेत. प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मुले व इतर व्यक्ती यांतील दुवा बनावे.
 या वेळात शिक्षकाने शिक्षकाची भूमिका कमी व प्रेरकाची भूमिका अधिक करावी. शक्य तेथे स्वत: प्रकाशचित्रे काढून ठेवावीत म्हणजे मग नंतर चर्चेच्या वेळी याचा उपयोग होतो.
सहाध्यायदिनानंतर
 सहाध्यायदिनानंतर त्याचे अनुधावन केले नाही तर घेतलेले सर्व श्रम वायाच जातील. त्यामुळे नियोजनातच या मागोव्याची योजना आखलेली असावी. असा मागोवा अनेक पद्धतींनी घेता येईल.
 १) विद्याथ्र्यांनी सहाध्यायदिनाच्या वेळी घेतलेल्या अनुभवांवर मुक्तलेखन करावे.
 २) सहाध्यायदिनाच्या उपक्रमांची जी उद्दिष्टे शिक्षकांनी ठरवली असतील त्याच्या आधारे मुद्दे काढून मुलांनी लेखन करावे.
 ३) उद्दिष्टांच्या आधारे प्रश्नावली तयार करून ती मुलांकडून भरून घ्यावी. व तिचे विश्लेषण करून त्या आधारे वर्गात चर्चा घ्यावी.
 ४) त्या दिवशी घेतलेल्या विशेष अनुभवांवर, जाणवलेल्या प्रश्नांवर, शिकलेल्या कौशल्यांवर, घेतलेल्या माहितीवर वर्गात चर्चा व्हावी, घ्यावी.
 ५) वर्गाची छोट्या गटांत विभागणी करून प्रत्येक गटाला त्या दिवशीच्या अनुभवातील अनुभव वाटून देऊन मग त्या गटाने त्याच्या आधारे छोटे टिपण लिहावे. ह्या टिपणांचे सर्वांसमोर वाचन, निवेदन व्हावे. त्या अनुषंगाने प्रतिक्रिया देत चर्चा व्हावी.
 ६) विद्यार्थ्यांनी जर त्या दिवशी काही प्रश्नावल्या भरून घेतल्या असतील तर त्याचे विश्लेषण करून त्या आधारे निष्कर्ष काढावा. या सा-याचा अहवाल तयार करावा.
 ७) अशा उपक्रमांतून काही नवे उपक्रम सुचले तर ते करण्याचा आग्रह धरावा. त्यासाठी नजीकच्या काळात मुलांना संधी उपलब्ध करून द्यावी.
 ८) काही विद्यार्थ्यांना त्या विषयांतील अधिक वाचण्यासाठी, पाहण्यासाठी प्रेरित करावे.रूप पालटू शिक्षणाचे(२५)

 वरीलपैकी एक किंवा अनेक मार्गांनी हा मागोवा घ्यावा. शिक्षकाने यासंबंधी एक

प्रतिवृत्त लिहावे. त्यांत पुढील मुद्दांचा समावेश असावा.
 १) तांत्रिक माहिती
 २) उद्दिष्टे
 ३) त्या दिवशीचा कार्यक्रम
 ४) शिक्षकाने केलेली विशेष निरीक्षणे
 ५) कोणती उद्दिष्टे साध्य झाली / साध्य झाली नाहीत ? का ?
 ६) नवीन काही प्रश्न जाणवले व मनात आले का ?
 ७) एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा लक्षात आला का ?
 ८) अभ्यासाची एखादी नवी पद्धती, मनुष्य स्वभावाचा नवा पैलू, नवे क्षेत्र, नवी साधने लक्षात आली का ?
 ९) मूळ योजनेत आलेल्या अडचणी, त्यांवर केलेले उपाय
 १०) पुढच्या काळात या प्रकारचा सहाध्यायदिन यशस्वी करण्यासाठीच्या सूचना
 ११) वर्गात घेतलेल्या मागोव्याचा सारांश व मुलांच्या प्रतिक्रिया

(२६) रूप पालटू शिक्षणाचे

क्रीडामहोत्सव
पिंपरी-चिंचवड परिसरातील शालेय स्तरावरील क्रीडाक्षेत्रातील एक चळवळ

 ज्ञान प्रबोधिनी समाजाच्या सर्व क्षेत्रांत विकासाची कामे करीत आहे. क्रीडा क्षेत्रातही गेली बारा वर्षे निगडीच्या नवनगर विद्यालयात काम चालू आहे.
 ‘मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद' या स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसार आपल्या मनगटाची ताकद आजमावण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या कार्यकर्त्यांनी १९८८ सालापासून क्रीडास्पर्धा (Mini Olympics) सुरू केल्या.
 आपण दररोज एखाद्या खेळाचा सराव करीत असलो तरी तो सराव योग्य दिशेने चालू आहे ना ? त्यामुळे आपले नैपुण्य (performance) उंचावते आहे ना ? हे तपासण्यासाठी दुस-या व्यक्तीबरोबर स्पर्धा करणे गरजेचे असते. तसेच ज्याप्रमाणे ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांमध्ये जगातील सर्व राष्ट्रे परस्परांमधील भेदभाव, हेवेदावे विसरून, अत्यंत चुरशीने स्पर्धेत भाग घेतात व नवनवीन विक्रम प्रस्थापित करतात आणि आपले क्रीडाक्षेत्रातील नैपुण्य दाखवून प्रेक्षकांची शाबासकी मिळवितात, त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळांमधील खेळाडूंनी एकत्र येऊन, आपले क्रीडा कौशल्य तपासून बघावे, मैत्रीच्या नात्याने तरीसुद्धा अत्यंत चुरशीने स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, कौशल्यप्राप्त खेळाडूंचा खेळ जवळून बघावा, विचारांची देवाण-घेवाण करावी या हेतूने या स्पर्धाना सुरुवात करण्यात आली.
 पुणे शहराची तुलना करता पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसर हा नव्याने विकसित होणारा परिसर आहे. पुण्याला क्रीडा संस्कृतीची परंपरा लाभलेली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड परिसरात क्रीडा संस्कृतीचे रोपण करावे, ज्यायोगे या भागातील खेळाडूंनासुद्धा विविध संधी उपलब्ध होतील या विचाराने क्रीडास्पर्धाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
उद्दिष्टे

 • पिंपरी-चिंचवड परिसरात क्रीडेचे वातावरण निर्माण करणे.
 • शाळांमधून विविध खेळांचा प्रचार व प्रसार वाढविण्यासाठी चुरशीची

 स्पर्धा उपलब्ध करून देणे.

 • परिसरातील खेळाडू, पंच, क्रीडाशिक्षक, पालक, क्रीडासंघटक,

 क्रीडाप्रशिक्षक, क्रीडाप्रेमींचे संघटन करणे.

 • नि:पक्षपाती, उत्कृष्ट व आदर्श संयोजनाचा नमुना उभारणे.

रूप पालटू शिक्षणाचे(२७)

इतिहास - पाश्र्वभूमी

 सन १९८६ ला सर्वप्रथम नवनगर विद्यालयापुरत्याच, आंतरपथकीय मैदानी स्पर्धा या स्वरूपात या स्पर्धा होत असे. नंतर त्याचे रूपांतर क्रीडामहोत्सवात झाले.
 सन १९८८ पासून प्रथमच या स्पर्धा आंतरशालेय स्तरावर सुरू करण्यात आल्या. पहिल्या वर्षी नवनगर विद्यालय आणि पिंपरी-चिंचवड मूक बधिर विद्यालय अशा दोनच शाळा सहभागी होत्या.
 १९८८ सालापासून १९९८ सालापर्यंत या क्रीडामहोत्सवात किती शाळांनी भाग घेतला व कोणकोणते खेळ समाविष्ट होते याचा गोषवारा खालील प्रमाणे -

वर्ष सहभागी शाळांची संख्या स्पर्धा क्रीडाप्रकार
१९८८-८९ ०२ मैदानी स्पर्धा
१९८९-९० ०४ मैदानी स्पर्धा
१९९०-९१ ०७ मैदानी स्पर्धा, कबड्डी, खो-खो
१९९१-९२ ११ मैदानी स्पर्धा, कबड्डी,

खो-खो, लंगडी, गोल खो-खो, व्हॉलीबॉल, फूटबॉल, पोहणे, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, सूर्यनमस्कार

१९९३-९४ १७ वरीलप्रमाणे+ क्रॉसकंट्री
१९९४-९५ ३२ वरीलप्रमाणे
१९९५-९६ ३५ वरीलप्रमाणे
१९९६-९७ ४२ वरीलप्रमाणे
१९९७-९८ ४४ वरीलप्रमाणे व बुद्धिबळाचा

नव्याने समावेश

१९९८-९९ ५१ वरीलप्रमाणे
१९९९-२००० ३६ वरीलप्रमाणे

 क्रॉसकंट्री ही स्पर्धा १० वर्षांखालील वयोगटापासून ते खुल्या गटापर्यंत घेण्यात
येतात तर बाकी सर्व स्पर्धासाठी इ. पाचवी ते दहावीच्या शालेय विद्याथ्र्यांचा सहभाग
असतो.
 याशिवाय पालक, शिक्षक व रोटेरियन यांच्यासाठी सूर्यनमस्कार, धावणे, संगीत
खुर्ची, बॅडमिंटन, टेबल टेनिस यांचे आयोजन १९९० ते १९९६ सालापर्यंत करण्यात
अरह्मवेक्षणकेसाहन मिळत असे.
रूप पालटू शिक्षणाचे (२८)  १९९२ साली क्रीडावैद्यक तज्ज्ञ डॉ. राजीव शारंगपाणी व क्रीडा मानसतज्ज्ञ डॉ. पं. म. आलेगांवकर यांनी आरोग्य व स्वास्थ्य या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात शिक्षक, पालक,मार्गदर्शक, खेळाडू व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
कार्यवाही
 क्रीडामहोत्सव आयोजन करीत असताना त्यात नेमकेपणा, सुटसुटीतपणा यावा या दृष्टीने दर वर्षी १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर हा कालावधी या क्रीडामहोत्सवासाठी निश्चित केलेला असतो.
 द्वितीय सत्र सुरू झाल्यानंतर प्रथम क्रीडा अध्यापकांची बैठक घेऊन खेळांची व वेळापत्रकाची निश्चिती केली जाते. त्यानंतर स्पर्धेच्या नियमांचे, वेळापत्रकाचे एक परिपत्रक काढून ते परिसरातील शाळांमध्ये पोहचविण्यात येते. दि. २५ नोव्हेंबरपासून सर्व स्पर्धाचे प्रवेश अर्ज विद्यालयात उपलब्ध करून दिले जातात. दि. ७ डिसेंबरपर्यंत आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून स्पर्धक शाळा त्यांचे अर्ज विद्यालयात आणून देतात. सर्व अर्जाची छाननी केली जाते. यासाठी क्रीडाशिक्षक किंवा विषय शिक्षकांची सुद्धा मदत घेतली जाते. सर्व खेळांच्या भाग्यपत्रिका त्या त्या खेळाच्या स्पर्धेच्या आदल्या दिवशी तयार केल्या जातात. १९९४ सालापासून मैदानी स्पर्धासाठी खेळाडूंना क्रमांक देणे, त्यांनी संपादिलेली वेळ-अंतर इत्यादीची नोंद करणे, तसेच मैदानी स्पर्धेत प्राथमिक फे-यांमधून उपत्य व अंतिम फेरीसाठी कोणते खेळाडू निवडले आहेत याची नोंद व माहिती, त्याचप्रमाणे सर्वसाधारण नैपुण्यपदासाठी क्रमांक, विजेतेपद, उपविजेतेपद यांना गुणांकन देऊन निश्चिती करणे इत्यादीसाठी संगणकाचा वापर करण्यात येत आहे.
 क्रीडामहोत्सवासाठी आर्थिक पाठबळाचीसुद्धा नितांत आवश्यकता असते. १९९० मध्ये अनेक पुरस्कर्त्यांपैकी एक असा रोटरी क्लब-निगडी हा होता. एकूणच ज्ञान प्रबोधिनीच्या नीटनेटक्या संयोजनावर समाधान व्यक्त करून १९९१ सालापासून संपूर्ण क्रीडामहोत्सवाची आर्थिक बाजू आजपर्यंत रोटरीने सांभाळली आहे. त्यामुळे ‘ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय आयोजित व रोटरी क्लब ऑफ निगडी प्रायोजित रोटरी क्रीडामहोत्सव' असे या क्रीडास्पर्धाचे नामांतरण करण्यात आले.
 १९९३ सालापासून ‘पप्पू' हे या महोत्सवासाठी बोधचिह्न म्हणून निश्चित केले.
मैदानी स्पर्धा आयोजनासाठी संगणकाचा वापर
 शाळांच्या वाढत्या सहभागाबरोबरच स्पर्धेतील खेळाडूंची संख्या वाढली. मैदानी स्पर्धासाठी ही संख्या एक हजारच्या वर पोहोचली. या खेळाडूंचे ६६ क्रीडा प्रकार, प्रत्येकाचा ३ प्रकारांत सहभाग, या सा-यांचे नीट आयोजन करण्यासाठी संगणकाचा वापर १९९२ पासून क्रमाक्रमाने सुरू करण्यात आला.
रूप पालट शिक्षणाचे(२९)

 आज या स्पर्धांमध्ये शाळांच्या खेळाडूंप्रमाणे याद्या, क्रीडाप्रकारांनुसार खेळाडूंचे

वर्गीकरण, स्पर्धाची निकाल नोंद, मागील उच्चांक, शाळांना त्यानुसार मिळालेले गुण इ. कामे झटपट,स्पर्धा चालू असतानाच (आंतरराष्ट्रीय स्पर्धाप्रमाणे) संगणकाच्या साहाय्याने केली जातात. पारितोषिक विजेत्यांची शाळानिहाय यादी, शाळांनुसार गुणदान, स्पर्धा विक्रम, प्रमाणपत्र लेखन इ. सर्व कामे संगणकाद्वारे केली जातात.
 डिसेंबर १९९९ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी याचा वापर यशस्वीरीत्या करण्यात आला. सर्व प्रशिक्षक, जिल्हा क्रीडाधिकारी तसेच क्रीडा संचालक श्री. अश्विनीकुमार यांनी या सॉफ्टवेअरचे कौतुक केले. आता हे सॉफ्टवेअर राष्ट्रीय स्पर्धाच्यासाठीही वापरण्याची तयारी करण्यात आली आहे.
 या सॉफ्टवेअरमुळे खेळांडूच्या सर्व प्रकारच्या नोंदी, नाव, विभाग, जन्मतारीख, क्रीडाप्रकार यांची बिनचूक नोंद राहाते. पुढील फे-यांसाठीची निवड परस्पर करता येते. स्पर्धा चालू असताना उच्चांक, गुणांकन सतत जाहीर करून स्पर्धेची चुरस वाढते. खेळाडूंचा झशीषीरपलश वाढणे, अधिक यशासाठी नेमकी आकडेवाडी प्राप्त होणे इ. महत्त्वाचे फायदे याच्या वापरामुळे होतात.
आयोजनात अनेकांचा सहभाग
 संपूर्ण सप्ताहामधील विविध स्पर्धाच्या आयोजनामध्ये पुणे जिल्हा कबड्डी संघटना, ईगल्स खो-खो क्लब पुणे, सन्मित्र संघ पुणे, बुद्धिबळ संघटना पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील विद्यानंद भवन, गोदावरी हिंदी विद्यालय, मॉडर्न हायस्कूल, विद्यानिकेतन, टेल्को या शाळांचे क्रीडाशिक्षक, ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील युवक-युवती कार्यकर्ते, तसेच नवनगर विद्यालयातील क्रीडाशिक्षकांच्या बरोबरीनेच पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागांतील सर्व अध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक, युवक-युवती कार्यकर्ते प्रत्यक्ष क्रीडांगणावर किंवा क्रीडांगणाबाहेरील जबाबदारी आनंदाने सांभाळत असतात. ज्ञान प्रबोधिनीमध्ये क्रीडा हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे जणू सर्व क्रीडाप्रेमींचे या स्पर्धाच्या निमित्ताने एक क्रीडासंमेलनच भरलेले असते. प्रत्यक्ष क्रीडांगणावर खेळताना नियमांमधील असलेले बारकावे व त्यांची कार्यवाही लक्षात आल्यानंतर १९९५ साली पिंपरी-चिंचवड परिसरातील क्रीडा शिक्षकांसाठी अॅथलेटिक्स् पंच प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
 १९९६ साली विजेते, उपविजेते संघ तसेच वैयक्तिक क्रीडाप्रकारांमधील प्रथम तीन क्रमांक यांचा एकत्रित विचार करून पहिल्या चौदा शाळांना क्रीडासाहित्याच्या रूपाने पारितोषिके देण्यात आली, ज्यायोगे त्या साहित्याचा वापर अधिकाधिक खेळाडूंना होईल.
या क्रीडामहोत्सवाला सुमारे ५० आजी-माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू,(३०)रूप पालटू शिक्षणाचे क्रीडासंघटक, क्रीडामार्गदर्शक, क्रीडाक्षेत्रातील शासकीय अधिकारी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.
सद्य:स्थिती
 * सलग बारा वर्षे यशस्वी संयोजन
 * पिंपरी-चिंचवड परिसरातील ८०% शाळांचा सहभाग
 * नवनगर विद्यालयातील व परिसरातील शाळांमधील अनेक शिक्षकांना खेळांतील नियमांचे अद्ययावत प्रशिक्षण
 * दर वर्षी पाच हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग
 * क्रीडा विभागातील कार्यकर्त्यांच्या ज्ञान, अनुभव, कल्पकता, कार्यवाही व इतर क्षमतांमध्ये ठोस वाढ
 * क्रीडा क्षेत्रातील पन्नासपेक्षा अधिक तज्ज्ञ व्यक्तींची विद्यालयास भेट व त्यांच्याशी दृढ संबंध प्रस्थापित झाले आहेत.
फलनिष्पत्ती
 पिंपरी-चिंचवडमधील काही शाळांमधून प्रशिक्षित शारीरिक शिक्षण शिक्षक आढळत नाहीत. असे शिक्षक आवर्जून स्पर्धांमध्ये आपले संघ पाठवितात. आपल्या खेळाडूंना कसे प्रशिक्षण द्यावे, स्पर्धांचे संयोजन कसे करावे, क्रीडासाहित्य कोणते वापरावे, ते कसे उपलब्ध होईल, विविध शासकीय क्रीडा अनुदाने कशी मिळवावी, मैदाने कशी तयार करावी, आखणी कशी करावी, इत्यादी माहिती या स्पर्धांच्या निमित्ताने मिळवितात.
 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेसुद्धा या क्रीडामहोत्सवातून प्रेरणा घेऊन महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा विकास प्रकल्प सुरू केला आहे. कला व क्रीडा विकास प्रकल्पातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा आवर्जून आपला सल्ला व मदत घेतात.  या स्पर्धांमधील संयोजनाच्या अनुभवाद्वारे आपण शासकीय स्पर्धासुद्धा तेवढ्याच जबाबदारीने व कुशलतेने घेत असतो. शासनाच्या स्पर्धांमध्येसुद्धा पुणे शहराच्या तुलनेत ८०% खेळाडूंचा सहभाग पिंपरी-चिंचवड परिसरातील खेळाडूंचा असल्यामुळे स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळविण्यात आपल्याला यश मिळाले आहे. गेली ९ वर्षे आपण शासनाच्या तालुका पातळीवरील व गट पातळीवरील अॅथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या स्पर्धांचे आयोजन करतोच पण गेली २ वर्षे कबड्डी व खो-खो च्या जिल्हा पातळीवरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन करीत आहोत.
भावी योजना
 * विविध क्रीडा संघटनांमध्ये आपले शिक्षक, खेळाडू पदाधिकारी म्हणालीरूप पालटू शिक्षणाचे (३१)

कार्यरत होणे.
 • परिसरातील एकेका शाळेत एकेका खेळाचे प्रशिक्षण केंद्र उभारणे.
 • या स्पर्धांमधून पुढे आलेल्या चांगल्या खेळाडूंना पुढील उच्च प्रशिक्षणासाठी

आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे.

 • क्रीडा शिक्षकांचे तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षक होण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण

वर्ग चालविणे.

 • उच्च दर्जाचे खेळाडू तयार करणारी प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करणे.
 • एका वेळी हजारो विद्यार्थी शारीरिक कृती करून आनंद व तंदुरुस्ती मिळवतील

अशा बाबी शोधून, त्यांचे प्रशिक्षण देणे.

 • विविध खेळांचे पंच प्रशिक्षण वर्ग चालविणे.
 • नवनगर विद्यालयातील २०० मी. चा ट्रॅक, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल,

हॅन्डबॉलची स्वतंत्र मैदाने, टेबल-टेनिस, बॅडमिंटन हॉल, जिम्नॅस्टिक्स हॉल, व्यायामशाळा या सर्व सुविधांचा लाभ परिसरातील खेळाडू व नागरकांनी घ्यावा यासाठी प्रयत्न करणे.

 • प्रत्येक तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धांचे संयोजन करणारी

साखळी निर्माण करणे किंवा अशा इच्छुक व्यक्ती व संस्थांना मदत करणे.
(३२)रूप पालटू शिक्षणाचे
गुणविकास योजना
(इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजना)

 'Education is the manifestation of perfection already in man'. अर्थात 'प्रत्येक माणसामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास म्हणजेच शिक्षण'. या स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण सूत्राभोवती ज्ञान प्रबोधिनीची अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गुंफलेली आहे. या प्रकियेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.
 ११ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी नवीन संस्कार व कौशल्ये आत्मसात करण्यास योग्य असतात. हा वयोगट कोणतीही नावीन्यपूर्ण गोष्ट करायला नेहमी उत्सुक असतो. इयत्ता सातवीतील विद्यार्थी ह्याच वयोगटातील असतात. ह्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांच्या विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये एक योजना आखली गेली 'इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजना'. ह्या योजनेमध्ये परीक्षा व गुणांकन पद्धतीचा स्वीकार केला व परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. गेली बारा वर्षे सातत्याने यशस्वीरीत्या ही योजना प्रशालेमध्ये राबविली जात आहे.
 ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असल्यामुळे येथील विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसू शकत नाहीत म्हणूनही या योजनेची आवश्यकता वाटत होती. विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेसाठी अनेक विषय असतात. त्याच बरोबर त्यांना अन्य अनेक विषयांच्या विविध प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. या अनेकविध परीक्षांना सामोरे जाण्याची क्षमता वाढावी म्हणून ह्या योजनेची आवश्यकता होती.
 आजचे शिक्षण म्हणजे नवनवीन माहिती विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबून ती घोकायला लावणे व ती परीक्षेच्या वेळी जशीच्या तशी मांडायला लावणे. फक्त पाठ्यपुस्तकातील ठराविक अभ्यासक्रम आजच्या विद्यार्थ्याला शिकवून भागणार नाही. भावी जीवनात यशस्विता प्राप्त करण्याकरिता सतत नवनवीन ज्ञान त्याला मिळणे आवश्यक आहे. हे ज्ञान मिळविण्यासाठी त्याला वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. विद्यार्थ्याने सतत नवीन ज्ञान कसे मिळवावे, कुठून मिळवावे, त्याचे संकलन व मूल्यमापन कसे करावे याच्या पद्धती व कौशल्यांचा विचार प्रामुख्याने इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजनेच्या वेळी करण्यात आला व

रूप पालटू शिक्षणाचे(३३)

त्यानुसार ह्या योजनेची ३ उद्दिष्टे ठरविण्यात आली -

 १) ठराविक पाठ्यपुस्तकांच्या चौकटीतून मुक्त अशी स्वयंअध्ययनाची कौशल्ये शिकविणे.
 २) विद्यार्थ्यांमधील शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस लावणे.
 ३) विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना शोधून जागृत करणे व त्यांना अभिव्यक्त होण्यास संधी देणे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
 १) शिष्यवृत्ती ज्या गुणांसाठी दिली जाईल त्या गुणांचा उपयोग स्वत:च्या विकासाबरोबरच समाजासाठीही करता येईल असा दृष्टिकोन ठेवून अभ्यासक्रमाची योजना केली आहे.
 २) उपलब्ध असलेला वेळ, परिस्थिती आणि मार्गदर्शनानुसार अभ्यासक्रम लवचिक आहे.
 ३) वाचन, लेखन, पाठांतर इ. कौशल्ये कायमस्वरूपी आहेत.
 ४) एक विषय हा दुसऱ्या विषयाशी संबंधित अथवा अंतर्भूत आहे.
 ५) विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिगत कल्पकतेला वाव आहे.
 ६) अभ्यासक्रमात काय करता (content) याबरोबरच कसे (process) करता यालाही महत्त्व आहे.
 उद्दिष्टांच्या पूर्ततेचा हेतू साध्य होण्यासाठी अभ्यासक्रमाचे खालील भाग केले आहेत.
१. गतिवाचन :- आकलनासहित वाचनाचा वेग (शब्दसंख्या प्रति मिनिट) मोजला जातो. वाचनवेग वाढीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत जुलै महिन्यात ४ ते ५ तासिका मार्गदर्शन केले जाते. प्रबोधिनीमध्ये या संदर्भात 'वाचन कौशल्य-कृती-गती- प्रगती' हे पुस्तक उपलब्ध आहे. वर्षाच्या प्रारंभी व वर्षाच्या शेवटी आकलन व वाचनवेग यांमधील फरक मूल्यमापनासाठी लक्षात घेतला जातो.
२. निवडक पुस्तके वाचणे व टिपणे काढणे :- वर्षारंभी १०० पुस्तकांची यादी दिली जाते. त्यातील कोणतीही ५० पुस्तके वाचायची असतात. त्यांची प्रत्येकी दोन ते अडीच पाने टिपणे काढायची असतात. या पुस्तकांच्या आवश्यकतेप्रमाणे २-३ प्रती ग्रंथालयात उपलब्ध केलेल्या असतात व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनदा पुस्तके बदलायला परवानगी असते. टिपणे कशी काढावीत, पुस्तके वाचताना कशी सुरुवात करावी इ. बाबत भाषा शिक्षक २ ते ३ तासिका मार्गदर्शन करतात. वर्षातून

(३४)रूप पालटू शिक्षणाचे

दोन वेळा टिपणवही तपासली जाते व विद्यार्थ्यांची वाचलेल्या पुस्तकांबाबत तोंडी

परीक्षा घेतली जाते.
३. पाठांतर :- हिंदी, मराठी, इंग्रजी व संस्कृत या भाषांमधील वेचक सुभाषिते, उतारे, कविता, श्लोक, स्तोत्रे इ. जुलैमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. एकूण मिळून ४०० ओळी पाठ करणे अपेक्षित असते. भाषाशिक्षक आपापल्या तासांना प्रारंभी ५ मिनिटे पाठांतरासाठी, ते म्हणवून घेण्यासाठी देतात. अस्खलित पाठांतर, स्पष्ट उच्चार, या आधारे फेब्रुवारीत तोंडी परीक्षा घेतली जाते.
४. प्रतिभाशाली लेखन:- विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रतिभेने कोणत्याही भाषेमध्ये दिलेल्या प्रकारामध्ये (संवाद, कविता, गोष्ट, नाट्य इ.) लेखन करायचे असते. भाषा- शिक्षकांच्या द्वारा वर्षात ६ ते ७ तास याचे प्रशिक्षण दिले जाते. जानेवारी महिन्यात लेखी परीक्षा असते. याच्या प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतर्फे 'प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मांडणी, स्वप्रतिभा, कल्पनेतील नावीन्य, भाषेची जाण, शब्दरचना, शैली इ. गोष्टींचे मूल्यमापन केले जाते.
५. वक्तृत्व :- दिलेल्या विषयांमधील विषय निवडून त्यावर स्वत: ३ मिनिटांच्या वक्तृत्वाची तयारी करणे व संपूर्ण शाळेसमोर ३ मिनिटांचे भाषण करणे असे स्वरूप असते. वक्तृत्व उत्तम असलेल्या शिक्षकांद्वारा ३ ते ४ तास भाषणाची पूर्वतयारी क शी करावी, वक्तृत्वशैली, इ. आधारे मार्गदर्शन केले जाते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रोज प्रार्थनेनंतर तीन विद्यार्थी सर्वांसमोर बोलतात, त्या वेळी त्यांचे मूल्यमापन सभाधीटपणा, उच्चार, शैली, विषयाची समज या आधारे केले जाते.
६. वृत्तपत्र कात्रण संग्रह करणे:- विद्यार्थ्यांना सुमारे ५० विषयांची यादी दिली जाते. त्यातील कोणत्याही एका विषयावर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील किमान ३ ते ४ वृत्तपत्रे-नियतकालिके यांच्यामधून कात्रणे कापून ती एका वहीत चिकटविणे, त्यांचे संदर्भ लिहिणे, त्याला स्वत:ची प्रस्तावना लिहिणे, वही सजविणे असे अपेक्षित असते. शाळेतील अध्यापकांद्वारा ऑक्टोबरमध्ये २ ते ३ तास वृत्तपत्रे- नियतकालिकांचा परिचय, कात्रण संग्रह करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी इ. बाबत मार्गदर्शन केले जाते. डिसेंबर अखेरीस कात्रण संग्रहाचे परीक्षण, प्रस्तावना, कात्रणांची निवड, संख्या, विषयाची व्याप्ती, सजावट इ.च्या आधारे केले जाते. विषयाचे आकलन किती झाले हे समजण्यासाठी तोंडी परीक्षाही घेतली जाते.
७. वैज्ञानिक उपकरण (Working Model) तयार करणे :- वैज्ञानिक तत्त्वांचे उपयोजन करून, कमीत कमी खर्चात, नवीन कल्पना वापरून, दैनंदिन वापरातील यंत्रांमध्ये बदल करून अथवा स्वतंत्रपणे एक कार्यरत प्रतिकृती तयार करायची असते.

रूप पालटू शिक्षणाचे (३५)

शास्त्रशिक्षक २ तास मूलभूत संकल्पनेबाबत मार्गदर्शन करतात. मार्चच्या प्रारंभी

उपकरणाची उपयोगिता, सुबकता, प्रमाणबद्धता, नावीन्य याच्या आधारे परीक्षण केले जाते व तोंडी परीक्षेद्वारा शास्त्रीय तत्त्वाची समज, प्रतिकृती तयार करताना केलेली धडपड इ.च्या आधारे गुणांकन केले जाते.
८. मुलाखत घेणे:- शहरातील विविध क्षेत्रांमधील ८०-९० व्यक्तींच्या नावाच्या चिठ्या केल्या जातात. दोघांनी मिळून एक चिठ्ठी उचलून त्यामध्ये ज्या व्यक्तीचे नाव असेल, त्यांच्याशी संपर्क करून, मुलाखतीची वेळ ठरवून, सविस्तर मुलाखत घ्यायची व ती लिहून सादर करायची असते. अध्यापकांपैकी कोणीतरी प्रश्न कसे काढावेत ? कसे विचारावेत ? इ. बाबत मार्गदर्शन करतात. ज्या व्यक्तीची मुलाखत विद्यार्थी घेतात त्यांना बंद पाकिटातून एक पत्र दिले जाते व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, प्रश्न विचारण्याची शैली, प्रश्नांचा दर्जा, सहजपणा, इ. च्या आधारे मूल्यमापन करून लेखी अभिप्राय देण्याची विनंती त्यांना केली जाते. तसेच मुलांनी लिहिलेल्या मुलाखतीच्या आधारे शिक्षक परीक्षण करतात.
९. जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करणे :- वेगवेगळी, कडधान्ये, डाळी, पिठे यांतील फरक ओळखणे, भात-पिठले, खिचडी-रस्सा, यांपैकी एक पदार्थ करता येणे, एखाद्या भागाचा चिह्न वापरून, प्रमाणबद्ध नकाशा तयार करणे, फ्यूज- ट्यूब बदलणे, नळाचा वॉशर बदलणे, पुस्तकांची बांधणी करणे, रंगकाम करणे, पोस्टाचे-बँकेचे व्यवहार करणे, मूलभूत शिवणकाम करणे, सायकलचे पंक्चर काढणे इ. व्यावहारिक कौशल्यांपैकी (या यादीत स्थानिक गरजेप्रमाणे भर घालता येईल) ५ ते ६ कौशल्ये विद्यार्थ्यांनी करून दाखवायची असतात. त्याशिवाय प्रथमोपचाराबाबतची माहिती सर्वांना आवश्यक मानली आहे. शाळेतील अध्यापक, कर्मचारी सदस्य, पालक यांच्या मदतीने या कौशल्यांबाबत प्राथमिक ज्ञान साधारणपणे ८ ते १० तासिकांमध्ये मिळून दिले जाते. विषयाची जाण, नीटनीटकेपणा, सहजता, सुबकता, स्वच्छता इ. गोष्टींच्या आधारे जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष कृती करायला सांगून परीक्षण केले जाते.
१०. संकीर्ण:- दर वर्षी किंवा २-३ वर्षांनी वेगवेगळ्या कौशल्यांची योजना यामध्ये केली जाते. भाषेतील शब्दज्ञान, दैनंदिनी लेखन, हस्ताक्षर-शुद्धलेखन (श्रुत व अनुलेखन) समस्या परिहार, शास्त्रीय विषयावर परिसंवाद सादर करणे, तोंडी गणिते सोडविणे हे विषय आत्तापर्यंत या योजनेमध्ये घेण्यात आले आहेत. त्या-त्या वर्षी ज्या अध्यापकांकडे या योजनेच्या कार्यवाहीची जबाबदारी असते ते हा दहावा विषय ठरवतात. आधीच्या शिक्षकांचा अनुभवही त्याबाबत विचारात घेतला जातो.रूप पालटू शिक्षणाचे(३६)  वरील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना साधारणपणे आठ महिन्यांचा कालावधी दिला जातो. सर्व कौशल्यांच्या अंतर्गत असलेल्या विविध विषयांचे वर्षभर वेगवेगळ्या वेळी परीक्षण करण्यात येते. वर्षाच्या शेवटी संकलित निर्णयावरून ५ विद्यार्थी व ५ विद्यार्थिनी अशा दहा जणांना इयत्ता दहावी पर्यंत रु.१५/
 प्रतिमास इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याशिवाय प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस दिले जाते. दर वर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्राद्वारे ह्या योजनेची माहिती दिली जाते. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची सोय प्रशालेत केली जाते. या योजनेत सहभागी होणे सक्तीचे नाही. तथापि एकूण ८० विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे ७५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसतात. सर्वसाधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या विषयांची कल्पना, त्या विषयांचा आवाका, विषयांचा अभ्यासक्रम, मूल्यमापनाचे निकष, परीक्षांच्या तारखा इ. गोष्टींबद्दल माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या या संदर्भातील सर्व शंकांचे निरसन केले जाते व प्रत्यक्ष ऑगस्ट महिन्यापासून मार्गदर्शनाला सुरुवात होते.
मार्गदर्शन
 शैक्षणिक वर्षातील ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत मार्गदर्शन केले जाते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिष्यवृत्ती योजनेसाठी खातेप्रमुख व अंतर्भूत विषयांसाठी मार्गदर्शक नियुक्त केले जातात. इयत्ता सातवीला विषय अध्यापन करणाऱ्या अध्यापकांकडेच संबंधित अध्ययन कौशल्याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी दिली जाते. गतिवाचन, वृत्तपत्र कात्रण संग्रह, मुलाखत तंत्र,वक्तृत्व इ. विषयांच्या मार्गदर्शनाची जबाबदारी प्रशिक्षित शिक्षकांकडे दिली जाते.
 इयत्ता सातवीच्या वेळापत्रकात शिष्यवृत्तीसाठी आठवड्याला एक तास राखून ठेवलेला असतो. विद्यार्थ्यांवर अधिक तासिकांचे ओझे नसावे या हेतूने व बहुतेक विषयांना प्रशालेतील अध्यापक मार्गदर्शन करीत असल्यामुळे शिष्यवृत्तीसाठी शाळेआधी किंवा शाळा सुटल्यानंतर जास्तीचे तास घ्यावे लागत नाहीत.
 वृत्तपत्र कात्रण संग्रह करणे, पुस्तके वाचून टिपणे काढणे, वैज्ञानिक उपकरण तयार करणे इ. विषयात स्व-अध्ययनाचा भाग अधिक असल्यामुळे या विषयांना नियमित तासिकांची आवश्यकता भासत नाही. इयत्ता सातवीला अध्यापन करीत नसलेल्या मार्गदर्शकांसाठी आठवड्यातील राखीव तासाचा उपयोग केला जातो. नियोजित तासिकांनंतरही विद्यार्थ्यांना काही शंका, अडचणी असल्यास विद्यार्थी मार्गदर्शकांकडे मदतीसाठी जाऊ शकतात. मार्गदर्शक प्रशालेतीलच असल्यामुळे


रूप पालटू शिक्षणाचे(३७)

विद्यार्थ्यांना त्यांना भेटणे सहज शक्य होते. प्राचार्य, खातेप्रमुख, मार्गदर्शक अध्यापक

यांच्यात कार्यवाहीसंबंधात बैठकीची योजना असते.
परीक्षा आणि मूल्यमापन
 प्रत्येक विषयाची परीक्षा वेगवेगळ्या वेळी घेतली जाते. विषयांनुसार मूल्यमापनाचे निकष निश्चित करून अंतर्गत व बाह्य परीक्षण केले जाते. बाह्य परीक्षकही काही वेळा नियुक्त केले जातात. प्रत्येक विषयासाठी परीक्षा पद्धत व गुणविभाजनासाठी निकष लावले जातात व त्यानुसार त्या विषयाचे मूल्यमापन केले जाते. प्रत्येक विषयासाठी २५ पैकी गुण दिले जातात. पाठांतर, वक्तृत्व, वृत्तपत्र कात्रण संग्रह, पुस्तके वाचून टिपणे काढणे, वैज्ञानिक उपकरण तयार करणे या विषयांची प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते.
निरीक्षण
 शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच्या शालेय पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त वरील सर्व गोष्टींसाठी जास्तीचा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते असे काहींना वाटणे स्वाभाविक आहे. पण आजपर्यंतचा अनुभव/निरीक्षण असे आहे की शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६०% विद्यार्थी त्या-त्या वेळी वर्गात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये होते. वर्गात नेहमी मागे राहणारी मुलेसुद्धा प्रार्थनेनंतरच्या वक्तृत्वाच्या वेळी सर्वांवर छाप पाडणारे भाषण करतात. शास्त्र विषयात कमी गुण मिळविणारे विद्यार्थीसुद्धा उत्तम उपकरण तयार करतात. इ. सातवीच्या विद्यार्थ्यांचा वाचनाचा वेग वाढलेला आढळतो. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचण्याची गोडी त्यांना लागते. असे जरी असले तरी विद्यार्थ्यांना पाठांतर, लेखन, कात्रणं चिकटविणे इ. पेक्षा प्रत्यक्ष हाताने कृती करण्यात जास्त रस वाटतो. उदा. अन्य कौशल्यांमध्ये इ. सातवीची मुले एखाद्या गृहिणीलाही लाजवतील अशा रीतीने भात, पिठले, रस्सा, साबुदाण्याची खिचडी, एखादी उसळ उत्तम रीतीने करतात. केलेला पदार्थ उत्तम रीतीने सजवितात व स्वयंपाकघरातील स्वच्छता पण करतात.
निष्कर्ष
 इयत्ती सातवी शिष्यवृत्तीच्या निमित्ताने शिकलेल्या विविध विषयांचा व कौशल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चितपणे होतो. वाचन, लेखन, पाठांतर इ. मूलभूत अध्ययन कौशल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेत व अन्य स्पर्धांतून होतो. वक्तृत्व व मुलाखत घेणे यांमुळे विद्यार्थ्यांचे मौखिक कौशल्य वाढीस लागते व त्यांच्यामध्ये सभाधीटपणा येण्यास मदत होते.(३८) रूप पालटू शिक्षणाचे
 पाठ्यपुस्तकांखेरीज कमीत कमी ५० अन्य पुस्तकांचे वाचन होते. यामुळे

विद्यार्थ्यांची नवीन शब्द, प्रसंग, विचार यांच्याशी ओळख होते. या सर्वांचा त्यांच्या सर्वांगीण विकासात नक्की उपयोग होतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते, जी त्यांना पुढील आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरते.
 शास्त्रीय उपकरण करताना वेगवेगळ्या शास्त्रीय तत्त्वांचा स्वत: अभ्यास करण्याची सवय लागते. शास्त्रीय तत्त्व समजून घेऊन त्यावर आधारित उपकरण तयार करण्याचा आनंद मिळतो. यातून विद्यार्थ्यांमधील निरीक्षण क्षमता, सातत्य, चिकाटी, कल्पकता इ. सुप्त गुणांचा विकास होण्यास मदत होते.
 वृत्तपत्र कात्रण संग्रह तयार करीत असताना संपूर्ण वृत्तपत्र वाचणे, आपल्या विषयावरील बातम्या, माहिती शोधून काढणे, वेळेवर त्यांची कात्रणे काढणे इ. गोष्टी त्यांना कराव्या लागतात. त्यामुळे वृत्तपत्रातील वेगवेगळ्या विषयांची ओळख होते. आपल्या विषयातील काय उपयुक्त आहे हे ओळखता येऊ लागते.
 वरील सर्व गोष्टी इ. सातवीच्या वर्षाच्या शेवटी किंवा काही मुलांच्या बाबतीत आठवीत जाणवू लागतात. या सर्व मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात या गोष्टींचा उपयोग होतो. उदा. नेहमी सर्वसाधारणगुणांनी उत्तीर्ण होणारी परंतु जिला शिष्यवृत्ती' मिळाली अशी इ. बारावीतील विद्यार्थिनी म्हणते, “मुलाखत घेण्यामुळे धीटपणा आला. शिष्यवृत्ती परीक्षा फक्त लेखी नव्हती, त्यामुळे वेगळे काहीतरी करायला मिळाले व माझा आत्मविश्वास शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे वाढला."
 प्रशालेतील माजी विद्यार्थी अपूर्व म्हणतो, “पुस्तके वाचून टिपणे काढणे या विषयामुळे अनेक पुस्तके वाचली व त्यांची टिपणे काढली. त्याचा उपयोग शालेय अभ्यासातील टिपणे काढताना, एखाद्या कवितेचे रसग्रहण करताना, प्रकल्पाची प्रस्तावना लिहिण्यासाठी झाला."
 सध्या महाविद्यालयात शिकणारा अभिजीत डिंगरे म्हणतो, "निवडणुकीच्या वेळी आमच्या वॉर्डात १००% मतदान व्हावे अशी इच्छा होती. त्यासाठी वॉर्डातील बऱ्याच लोकांना मतदानाचे महत्त्व आत्मविश्वासपूर्वक पटविता आले. याचे बीज कुठेतरी इ. सातवीत रुजले होते."
 प्रशालेतील माजी विद्यार्थिनी अपर्णा कुलकर्णी म्हणते, “कॉलेजमध्ये नोट्स काढताना काहीही अडचण येत नाही. प्रतिभाशाली लेखनामुळे मी आपल्या लेखनात उत्तम शब्दांचा, सुविचारांचा उपयोग करते. त्यामुळे कोणत्याही विषयावर निबंध लिहिताना काहीही अडचण येत नाही. भीती वाटत नाही. प्रतिभाशाली लेखनानेच मला कविता करण्यास प्रेरणा दिली असे वाटते."

रूप पालटू शिक्षणाचे (३९)

 वाचन, लेखन, वक्तृत्व, पाठांतर, नीरक्षीरविवेक इ. गोष्टी भविष्यात विकसित

करण्यात मदत होते. या उपक्रमातून मिळणारी वाचनाची, विश्लेषण करण्याची, वेगवेगळी पुस्तके वाचून परिशीलन करण्याची आणि आपले विचार नेटक्या शब्दांत लोकांसमोर मांडण्याची कौशल्ये अंगी येणार आहेत. ती सर्वच एक आदर्श नागरिक घडविताना उपयोगी पडणार आहेत.
(४०)रूप पालटू शिक्षणाचे
अभिव्यक्ती विकास

 अभिव्यक्तीच्या विविध पद्धतींचा सुसंस्कृत अविष्कार म्हणजे शिक्षण. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकसित करणारे योग्य शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन समाजात माणूस म्हणून जगण्याची त्यांच्यात क्षमता निर्माण करणे ही आजची निकड आहे. आवाज, प्रतिकृती, प्रतिमा, हालचाली, साधने किंवा वस्तू तयार करण्याची क्षमता अभिव्यक्तीच्या शिक्षणातून मिळते. या गोष्टी जो चांगल्या प्रकारे करू शकतो, तो उत्तम शिकला असे म्हणता येईल. उदा. चांगले स्वर, शब्द, अवगत केलेला उत्तम बोलतो, उत्तम गायक होतो, उत्तम कवी होतो. आकाराची जाणकारी असलेला चित्रकार, शिल्पकार होऊ शकतो. लयबद्ध हालचाली शिकलेला नर्तक होतो. विचारांची सर्व क्षेत्रे, स्मरण, तर्कशास्त्र, संवेदनशीलता, बुद्धिमत्ता या गोष्टी वरील प्रक्रियेप्रमाणेच आहेत. त्यामुळेच अभिव्यक्तीच्या विविध पद्धतींमध्ये व्यक्तीला कुशल, समृद्ध करणे हा व्यक्तिविकासाचा, शिक्षणाचा महत्त्वाचा पैलू आहे, असे निश्चित म्हणावेसे वाटते. प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाची क्षमता, कुवत जाणून शिक्षण दिले गेले पाहिजे. अभिव्यक्तीच्या पद्धतीनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न म्हणजे मुलांचे वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापन झाले असे म्हणावयास हवे.
मुक्त अभिव्यक्ती
 जन्मल्यापासून लहान मूल काही व्यक्त करायला सुरुवात करते. भोवतीच्या लोकांना स्वत:चे अस्तित्व जाणवून देण्याची एक नैसर्गिक, मूलभूत इच्छा असते. मुलाचे रडणे, हसणे, हावभाव या गोष्टी म्हणजे इतरांबरोबर संपर्क साधण्याची त्याची भाषा असते. मुलांना स्वतःचे मूड, मन:स्थिती व्यक्त करण्याची इच्छा असते. शारीरिक हालचाली आणि मानसिक प्रक्रिया यांनी मुक्तअभिव्यक्ती व्यापलेली असते. क्रीडा' ही मुलांची मुक्त अभिव्यक्ती असते. कारण खेळातून स्वत:ला व्यक्त करणे ही मुलांची अंतरंगातून उमटलेली निखळ उर्मी असते. खेळण्यात उत्स्फूर्तता असते. कलामाध्यमातून या उत्स्फूर्ततेचा अनुभव मुले घेऊ शकतात.
अभिव्यक्तीचा हेतू
 अभिव्यक्त होणे ही मनाची गतिशील प्रक्रिया असते. अभिव्यक्तीचा हेतू कोणता? मुलांना त्यांच्या भावना बाह्यरूपात का व्यक्त कराव्या वाटतात ? एखादी पाहिलेलीरूप पालटू शिक्षणाचे(४१)

वस्त किंवा घेतलेल्या अनुभवाविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठीच केवळ

अभिव्यक्तीची गरज असते, असे म्हणणे पुरेसे नाही. केवळ मनात ठेवून किंवा कल्पनारम्यतेने मुलांचे, प्रौढांचे समाधान का होत नाही ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पेन्सिल हातात घेऊन शारीरिक हालचाल करणे, स्नायूंचा उपयोग करणे, विशिष्ट दिशेने हातपाय हलविणे, एवढा मर्यादित अर्थ 'व्यक्त' होण्यामध्ये असत नाही. तर जी चिह्न, आकार, कृती मुले दाखवू इच्छितात, त्याला त्यांना स्वत:चा अर्थ द्यायचा असतो. म्हणजेच परस्पर संबंध साधण्याचा प्रयत्न अभिव्यक्तीतून केला जातो. मुलांना हा संबंध साधण्याची आवश्यकता का भासते ? इतरांशी जोडले जाणे ही एक सामाजिक कृती असते. व्यक्ती आणि समाज यांच्यातील एकरूपता साधणे ही मानवी प्रवृत्ती असते. समूहाशी अभिव्यक्तीतून संवाद साधला जातो. कोणतीही अभिव्यक्ती केवळ स्वत:साठी नसते तर इतरांकडून स्वत:च्या कृतीला प्रतिसाद मिळावा या प्रेरणेतून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न असतो.
 कलात्मक, प्रतिभाशाली कृती मनाला सांत्वना देतात. वातावरण प्रसन्न करतात. निसर्गाशी असलेले माणसाचे नाते समजावून देतात. संस्कृती व राष्ट्र यांतील एकात्मता जपतात. रवींद्रनाथ टागोरांची 'गीतांजली', उदयशंकरांचा पदन्यास, आर.के. लक्ष्मणांच्या चित्ररेखा, रविशंकरांची सतार, भीमसेन जोशींचे गायन, सत्यजीत रॉय यांचे चित्रपट या कलाअभिव्यक्ती देश-काल यांच्याही पलिकडे जाऊन पोहोचतात.
अभिव्यक्ती उपक्रम
 मुलांच्या उत्स्फूर्त कृतीला योग्य मार्गदर्शनामुळे वळण लागते. त्यातून विशेष क्षमता, तांत्रिक कौशल्य विकसित होते. अभिव्यक्तीच्या शिक्षणातून इतरांच्या अभिव्यक्तीचा, वैयक्तिक कलाविष्काराचा विचार करण्याची व त्यातूनच कलात्मक रसग्रहणाची सवय विद्यार्थ्यांना लागते.
मूळ प्रवृत्ती व अभिव्यक्ती संबंध
 १. सहानुभावाची प्रेरणा: एकमेकांशी संपर्क साधण्याच्या वृत्तीमुळे ऐकण्याची व काही सांगण्याची इच्छा असते. अभिनयाच्या इच्छेमागे नाट्यवृत्ती असते.
 २. सौंदर्यवादी कलात्मक प्रवृत्ती: कलात्मक प्रवृत्तीमुळे रेखाटणे, रंगविणे, शिल्प घडविणे यांची इच्छा होते. गुणगुणणे, गाणे म्हणणे या प्रवृत्तीमुळे नृत्य व संगीताची इच्छा असते.
 ३. शास्त्रीय वृत्ती: कार्यकारणभाव जाणून घेण्याची इच्छा असलेली चौकस बुद्धी, काही तयार करण्याची रचनात्मक प्रवृत्ती यामागे शास्त्रीय वृत्ती असते.

(४२)रूप पालटू शिक्षणाचे
 अभिव्यक्तीच्या या व्यापक स्वरूपामुळेच, शिक्षणात त्याचा योग्य समावेश

करण्याच्या हेतूने १९९०-९१ या शैक्षणिक वर्षापासून 'ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे' येथे अभिव्यक्तीची विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली.
सातवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती
 प्रतिसप्ताह २ तासिकांची (१ ता. ३० मि.) योजना वेळापत्रकात केली. या तासांना विद्यार्थी वर्गश: किंवा पथकश: एकत्र न बसता, त्यांनी निवडलेल्या अभिव्यक्तीच्या उपक्रमानुसार एकत्र बसतात.
 विविध अभिव्यक्तींची माहिती प्रथम विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यानंतर आपापल्या पालकांशी बोलून विद्यार्थी आपली निवड पक्की करतात.
अभिव्यक्तीच्या पुढील विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
 १. इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमधून विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन.
 २. इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमधून नाट्य, वक्तृत्व, गाणी सादर करणे.
 ३. प्रसंगनाट्य, पथनाट्य लिहिणे, सादर करणे.
 ४. शास्त्रीय भाषेत, शास्त्रीय विषयावर परिसंवाद करणे.
 ५. चित्रकला व सुंदर कलात्मक हस्ताक्षर
 ६. भूमिती-शास्त्राधिष्ठित विविध प्रतिकृती बनविणे.
 ७. सुगम व शास्त्रीय संगीत
 ८. हस्तकला, कृत्रिम फुले, खेळणी, बाटीक प्रिंटिंग, बांधणी इ.
 ९. शिल्पकला, सिरॅमिक्स्
 १०. फलक लेखन
 ११. इलेक्ट्रॉनिक्समधील विविध उपकरणे तयार करणे व दुरुस्त करणे.
 १२. संगणकावर खेळ व प्रोग्रॅम्स तयार करणे.
 १३. विविध खाद्यपदार्थ
 १४. नृत्य
 १५. गृहसुशोभन
 १६. शिवणकला
अभिव्यक्ती तासिकांच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप
 अभ्यासक्रम सत्राच्या प्रारंभीच ठरविला जातो. उदा. संगीत, वादनात विविध रागांचा परिचय, चाली, बंदिशी तयार करणे, वैयक्तिक व समूहाने गायन करणे, गायक व त्यांच्या शैलींची वैशिष्ट्ये असे स्वरूप असते. नाट्य अभिव्यक्तीत, विविध

रूप पालटू शिक्षणाचे(४३)

नाट्य खेळांद्वारे निरीक्षण, समयसूचकता, अभिनय, वेळेचे भान इ. प्रशिक्षण दिले

जाते. प्रतिभाशाली लेखनात साधे साधे लेखन विषय (उदा. खुर्ची, चेहरे मोहरे, कॅलेंडर, चिंटू येता घरा) दिले जातात. तसेच स्थान, घटना, पात्रे सांगून कथा रचना करणे, कविता लिहिणे, शब्दांचे खेळ करणे असे स्वरूप असते. चित्रकला विषयात रूप, रंग, रेषांपासून प्रारंभ करून डिझाइन, निसर्ग, स्थिरवस्तू चित्रण, मनुष्याकृती अशा चित्रणांपर्यंत मार्गदर्शन केले जाते.
अभिव्यक्ती शिक्षणाचा उपयोग विद्यार्थी कसा करतात ?
 अभिव्यक्ती विकसन तासिका झाल्यावर विद्यार्थी सर्व विसरतात का ? त्या शिक्षणाचा कसा उपयोग केला जातो ? दैनंदिन जीवनात त्यांची अभिव्यक्ती कशी असते ? असे प्रश्न विचारात घेतले तर काय उत्तर मिळते ?
 अभिव्यक्ती विकसन तासिकांमध्ये शिकलेली कौशल्ये शाळेतील उपक्रम, विविध स्पर्धा, घरगुती समारंभ अशा वेळी विद्यार्थी वापरतात. 'गणेशोत्सव' हा शाळेतील एक मुख्य सांस्कृतिक उपक्रम असतो. या समारंभात अभिव्यक्तीची संधी विद्यार्थी घेतात. गणेशमूर्तीभोवती करण्याची सजावट - यात चित्रकला, हस्तकला अभिव्यक्तीचे विद्यार्थि-विद्यार्थिनी विविध फुले, हार, पताका, थर्मोकोल कार्डशीटच्या साहाय्याने शुभचिह्ने तयार करतात. भौमितिक प्रतिकृती तयार केल्या जातात. रांगोळीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी रांगोळी, गालिचे काढून प्रसंगाचे मांगल्य वाढवितात. गणेश उपासना, आरती, पद्ये यांसाठी संगीत-वादनाचा गट सज्ज असतो. मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यासाठी नृत्य, नाट्य अभिव्यक्तीचे विद्यार्थी पुढे येतात.
 गेली २ वर्षे नागरी वस्त्या व ग्रामीण भागात गणेशोत्सवामध्ये जे रंजन-बोधनाचे कार्यक्रम विद्यार्थी सादर करतात, त्यासाठी प्रतिभाशाली लेखन व नाट्य अभिव्यक्तीच्या विद्यार्थ्यांनी प्रसंग, पथनाट्ये लिहिली. विविध भागांत लावण्यासाठी करण्याची पोस्टर्स, भित्तीपत्रके लिहिण्याचे काम हस्ताक्षर व फलक लेखनाचे विद्यार्थी करतात.
 याशिवाय काव्य, निबंध, कथा, लेखन स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्वरचित कथा, काव्य, वाचन, 'छात्र प्रबोधन', 'यंग एक्स्प्रेशन' सारख्या प्रसिद्ध अंकांमध्ये विद्यार्थ्यांना लेखन, चित्रे देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. मेंदी रेखाटन, गणेश चित्रे स्पर्धा ठेवल्या जातात. वक्तृत्व स्पर्धा, आकाशवाणी, दूरदर्शन कार्यक्रमांसाठी अभिव्यक्तीची संधी विद्यार्थी घेतात.
 विद्यार्थ्यांनी केलेली कृत्रिम फुले, पुष्परचना, सिरॅमिक्स, शिल्प, भौमितिक प्रतिकृती,

(४४)रूप पालटू शिक्षणाचे
शिवण, भरतकाम, कापडावरील रंगकाम,रांगोळ्या यांचे प्रदर्शन भरविले जाते.

मूल्यमापन
 शिकत असताना विद्यार्थ्यांचे काम, शिकलेल्या गोष्टींचे उपयोजन, प्रत्यक्ष सहभाग, विविध प्रतिक्रिया यांच्या निरीक्षण नोंदी अध्यापक करीत असतात. मूल्यमापनात पुढील मुद्दे विचारात घेतले जातात -
 १. नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करणे.
 २. कामातील नेटकेपणा.
 ३. उत्स्फू र्त नवे प्रयत्न.
 ४. दैनंदिन कामातील उपयोग.
 ५. उत्साहपूर्वक सहभाग.
 ६. संवेदनक्षमता व अभिरुची यांत बदल किंवा वाढ झाली का?
विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तींना गुण, श्रेणी, प्रशस्तिपत्रके दिली जातात. बाह्य परीक्षकांकडूनही मूल्यमापन केले जाते.
चित्रकला, संगीत या कलाविषयांचे तास व अभिव्यक्ती विकसन तासिका यांतील फरक
 इ.पाचवी-सहावीकरिता फक्त चित्रकला, संगीत हे विषय आहेत. मात्र संगीत, चित्रकलेसहित, अभिव्यक्तीची विविध माध्यमे इ. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार घेता येतात. एकच अभिव्यक्ती माध्यम सातवी ते दहावीपर्यंत ठेवणारे विद्यार्थी आहेत. परंतु कित्येक विद्यार्थ्यांना विविध कला माध्यमांत गती, शिकण्याची इच्छा, पालकांचे प्रोत्साहन यांमुळे अभिव्यक्ती बदलण्याचेही स्वातंत्र्य असते. तथापि धरसोड न करता किमान कौशल्ये शिकावीत असा आग्रह असतो.
 अभिव्यक्तीच्या तासांना विद्यार्थिसंख्या मर्यादित असते. पूर्ण वर्ग नसतो. विद्यार्थी स्वत:च्या आवडीने अभिव्यक्तीचे माध्यम निवडत असल्यामुळे पूर्वतयारी, गृहपाठ, काही विचार विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असतो. गट छोटा असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता, कौशल्य यांची माहिती अभिव्यक्ती अध्यापकांना असते. स्वतंत्र लक्ष देणे, दुरुस्त्या करून घेणे, सूचना देणे, नव्या कल्पना, विषयाच्या संदर्भात असलेले एखादे प्रदर्शन, लेखन, नाटक, संगीत सभा याबद्दल सांगणे, त्याचे रसग्रहण, आस्वाद याबद्दल चर्चा होऊ शकते.
पाठपुरावा
 जानेवारी ९७ मध्ये एकूण आढावा घेण्याच्या दृष्टीने अभिव्यक्तीचे अध्यापक व

रूप पालटू शिक्षणाचे (४५)

तज्ज्ञ यांचा परिसंवाद झाला. त्यामध्ये 'कलात्मक मनाची मशागत कशी करूया' ह्या

विषयावर परिचर्चा झाली. अभिव्यक्तीची कृती, निरीक्षण, रसग्रहण या तीन गोष्टींचा समावेश कलाशिक्षणात असतो. अभिव्यक्त होण्याचे शिक्षण देणे अवघड असले तरी अशक्य नाही. यासाठी शिक्षकाची भूमिका लक्ष देणाऱ्या मार्गदर्शकाची, प्रेरणा देणारी आणि प्रेमळ परिचारिकेसारखी हवी. रंग, आकार, सूर, शब्द, अभिनय यांबद्दल येणाऱ्या अनुभवांची मुलांमधील तीव्र उत्कटता व अभिव्यक्ती जपणे व त्यातून व्यक्तिमत्त्व विकास करणे ही गोष्ट महत्त्वाची वाटते. हे काम उत्तम शिक्षक करतो. यांसारख्या विचारांची पुनर्मांडणी व चर्चा झाली. उद्दिष्टांची निश्चिती, अडचणी, प्रत्येक माध्यमाचा प्रतिसाद इ. गोष्टी परिसंवादात बोलल्या गेल्या. माजी विद्यार्थी व अभिव्यक्ती शिक्षकांना, अध्ययन-अध्यापनातील घडामोडींच्या उजळणीसाठी एक प्रश्नावली देण्यात आली. त्यातील प्रतिसादानुसार काही सुधारणा, माजी विद्यार्थ्यांना भेटणे, त्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांना सांगणे, वर्तमान स्थितीमधील कलाप्रवाह अभ्यासणे या गोष्टी करणे सुरू आहे.
 सरस्वती पूजनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी पूर्ण दिवस योजला होता. यात वेगवेगळ्या वर्गांमध्ये अभिव्यक्ती तासिकांमध्ये शिकलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले होते. नृत्य, नाट्य, संगीत या अभिव्यक्ती माध्यमांना विद्यार्थी सादर करीत होते.
 १८ सप्टेंबर ९८ ला मा. अलका देव-मारुलकर यांचे गायन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. यातून गायनासाठी घ्यावे लागणारे परिश्रम, सादर करण्याची पद्धत,संगीताचा आनंद व अभिरुची यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर झाले.
निष्कर्ष
 १. अभिव्यक्ती विकसनाच्या तासिकांमुळे विद्यार्थ्यांची रसग्रहण, निरीक्षण क्षमता वाढते आहे.
 २. प्रभावित करणाऱ्या गोष्टींची नोंद करणे, स्मरण वाढविणे, समजलेल्या गोष्टींचे स्पष्टीकरण करणे, प्रतिसाद देणे, व्यवहारात उपयुक्त गोष्टींची निर्मिती करणे असा बहुदिश लाभ विद्यार्थ्यांना मिळतो आहे.
 ३. शाळेत व बाहेर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांची व पारितोषिके मिळविणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
 ४. अभिव्यक्तीच्या तासिकांमध्ये मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी छोटी नाटके, कविता, कथा, लिहून दाखवतात. छान चित्रे काढतात, गाण्याचा

(४६)रूप पालटू शिक्षणाचे
 आनंद घेतात. संगीताचे राग ओळखतात, आकाशदिवे करतात.

 ५. विश्रांती व ताण यांच्यामधील सुखद स्थिती म्हणजे या तासिका.
 ६. स्वत:च्या कलाप्रमाणे, आवडीनुसार अभिव्यक्तीची निवड करण्यास मिळाल्यामुळे विद्यार्थी आनंदी व उत्साही असतात.
 ७. गटात मर्यादित विद्यार्थी असल्यामुळे शिक्षक वैयक्तिक लक्ष देऊ शकतात.
 ८. हात, मन, बुद्धी यांतील एकाग्रता, प्रतिभा विकसित करते.
 ९. जे विद्यार्थी १९९०-९१ या प्रारंभीच्या अभिव्यक्ती गटात शिकले, त्यांना या तासिकांमुळे प्रेरणा मिळाली. त्यांतील काहीजण वास्तुकला, व्यावसायिक चित्रकला, संगीत, गृहसुशोभन, नाट्यक्षेत्र यांचे अभ्यासक्रम घेऊन उच्च शिक्षण घेत आहेत.
अभिव्यक्ती विकसनातील माझे प्रयत्न व प्रयोग : एक अध्यापिकेचे निवेदन
 चित्रकला, फलकलेखन, हस्ताक्षर या माध्यमांविषयीचे मार्गदर्शन मी केले होते. त्याविषयी काही सांगू इच्छिते.
१. तात्त्विक मांडणी :- लहान मूल जेव्हा हातात खडू,पेन्सिल पकडते, तेव्हा काही वेडेवाकडे आकार, रेषांचा गुंता, - पाटी, भिंत, कागद यांवर काढते. तेव्हा काय व कसे काढावे हे तंत्र त्याला माहीत नसते. पण मनातील अस्पष्ट आकार माध्यमाच्या द्वारे स्पष्ट करण्याचा तो प्रयत्न असतो. त्याची ही कृती उत्स्फूर्त असते. प्राथमिक स्थितीत मुलांना त्यांच्या आवडीनुसार, कल्पनेप्रमाणे चित्र काढण्यास मोकळी संधी द्यावी लागते. अभिव्यक्त होण्याची गरज चित्रकलेतून भागत असते. चित्रकला ही मुलांची भाषाच बनते.
२. मनातील जास्तीत जास्त कल्पना मुले चित्रातून स्पष्ट करतात :- मानसतजज्ञांनी लहान मुलांच्या चित्रांचा केलेला अभ्यास अगदी वेगळे निष्कर्ष समोर आणतो. ती चित्रे मुलांच्या विचित्र अभिव्यक्ती दाखवतात. मुलांचे शिक्षण न झाल्याचे चिह्न स्पष्टपणे त्या चित्रांमध्ये दिसते, सुंदर, असुंदर गोष्टींबाबतची अजाणता, हाताचे शैथिल्य, खरे-खोटेपणाबद्दलचे अज्ञान या चित्रातून दिसते. पण असे सुरुवातीचे स्वाभाविक रेखाटन ही मुलांची चित्रकलेतील मुळाक्षरेच असतात.
 चित्रकला हा विषय असा आहे, जो बहुसंख्य मुलांना आवडतो. रेषा व रंग यांची जादू चित्र काढणाऱ्याला चित्रचौकटीत बांधून टाकत असते. मुले कोणत्या विषयावर चित्रे काढतात ? कोणत्याही आणि शिक्षक सांगतील त्या विषयांवर चित्रे काढली जातात. विषय एक असला तरी त्याकडे बघण्याची आणि तो रेखाटण्याची पद्धत

रूप पालटू शिक्षणाचे (४७)

प्रत्येकाची वेगळी असते. उदाहरण पाहायचे तर, 'पतंग उडविणारी मुले' या साध्या

विषयात, खिडकीतून पतंग उडविणाऱ्या मुलापासून ते जंगलात पतंग उडविणारी मुले इथपर्यंत विस्तार असतो. 'काहींचे आकाश मोठे, पतंगाचे ठिपके व मुले लहान' असे चित्र तर काही वेळा 'धागे गुरफटलेले पतंग' असू शकतात. एकदा एकाने तर त्याच्या या विषयात पतंगांकडे बघणारा पाठमोरा हत्ती काढला होता. कारण विचारले तर म्हणाला, 'आवडतो मला हत्ती ! चांगला काढता येतो.' मंदारची चांगली चित्रे पाहून त्याला विचारले, 'तुला कसली चित्रे काढायला आवडतात ?' 'झुरळांची.' 'का रे ?', 'अहो, आमच्या घरात इतकी झुरळे आहेत की, ती डोळ्यांवरूनही फिरतात, झोपलो की ! त्यामुळे ती माझ्या चांगली लक्षात राहतात !' एखाद्या विषयाला चित्ररूप का द्यावे वाटते याचे उत्तर या उदाहरणांमध्ये आहे. एका मुलीने बाजारपेठेचे चित्र काढताना चित्रातील एका पाटीवर लिहिले होते, “येथे फॉल- पिको करून मिळेल.” “तू एवढीच पाटी का लिहिलीस ?" “माझी आई मला फॉल-पिको करून आणायला सांगते ना?"
 एखाद्या प्रसंगाचा, दृश्याचा उमटलेला ठसा, मुलांचे निरीक्षण चित्रातून अभिव्यक्त होते. रंगपेटीतील टवटवीत, गडद, ताजे रंग वापरण्यातून मुलांची नैसर्गिक आवड कळते. रंगांच्या मिश्रणापेक्षा, लाल, पिवळा, निळा हे मूळ रंग वापरण्याकडे मुलांचा कल दिसतो. नदी, डोंगर, धबधबा, गवत यांची चित्रे काढताना पुन्हा प्रत्येकाचा निसर्ग वेगळा असतो. अंतराळ, चांद्रयान, यंत्रमानव असे चित्रविषयही मुले काढतात. वस्तूंचा हुबेहूबपणा, त्रिमिती, छायाप्रकाश, अंतराची योजना हे घटक सराव व तंत्र यामुळे येतात. पण स्वत:च्या कल्पना, विचार चित्रांमधून इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मुले करत असतात. ऐतिहासिक, पौराणिक कथांचा प्रभाव किशोर गटातील मुलांमध्ये असतो. तोही चित्रांमध्ये व्यक्त होत असतो. उत्स्फूर्तता, ताजेपणा व जोम ही मुलांच्या रेखाटनातील मुक्त अभिव्यक्तीची वैशिष्ट्ये असतात.अनुकरण करून हुबेहूब काढलेल्या चित्रांपेक्षा ही वैशिष्ट्ये असलेली रेखाटने नैसर्गिक वाटतात.
३. चित्रकला अभिव्यक्ती विकसन तासिका:- या तासिका घेण्यामध्ये केवळ अभ्यासक्रमातील एक विषय एवढाच माझा हेतू नाही. तर अभिरुची, सौंदर्यदृष्टी वाढविणारे आनंददायी माध्यम म्हणून चित्रकला अभ्यासावी असे वाटते. विद्यार्थ्यांच्या मनातील अनुभव मांडण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांची रंगरेषांची समज, भावनांचा गोंधळ जाणून घेऊन त्यांना चित्रे काढायला लावणे असा प्रयत्न मी करते.


(४८)रूप पालटू शिक्षणाचे
 प्रयोग :- १. गटचित्रे - ऐतिहासिक, पौराणिक, आधुनिक विषय देऊन

त्यांतील १/२ विषयांची निवड ४-५ विद्यार्थ्यांच्या गटाने करून, विषयाला अनुसरून साहित्याचे वाचन करायचे. चित्रबद्ध करण्यासाठी सर्व गटाने कच्ची रेखाटने करायची. त्यातून चित्राची रचना, रंगसंगती ठरवायची. पूर्ण आकाराचा पेपर घेऊन संपूर्ण गटाने एकत्र, एका वेळी चित्र रेखाटणे, रंगविणे इ. काम करायचे. या प्रकारे विद्यार्थ्यांनी शिवाजी, रामायण, कृष्णकथा, भारतीय सण या विषयांची चित्रे काढली. यात स्वत:च्या अभिव्यक्तीबरोबर गटातील प्रत्येकाच्या सहकार्याने चित्रे पूर्ण करण्याचे शिक्षण विद्यार्थी घेऊ शकले. सर्वांच्या एकत्र रेखाटनातून अनेक कल्पना मिळाल्या.
 २. माध्यम– एकच चित्र पेन्सिल,खडू, जलरंग, फेब्रिक पेंट्स यांत काढणे. तसेच कागद, कापड, काच, माती, प्लायवूड अशा पृष्ठभागावर चित्र काढणे, रंगविणे यांतून विविध माध्यमे, पोत यांचा परिचय विद्यार्थ्यांना झाला.
 ३. कोलाज् – रंगीत व वृत्तपत्र कागद, कापड यांच्या तुकड्यांतून चित्रनिर्मिती.
 ४. ग्रीटिंग्ज - विविध प्रसंगांसाठी शुभेच्छा पत्रे.
 ५. गणेश, निसर्ग, प्रसंग चित्रे.
 ६. भित्तीपत्रके, पोस्टर्स, अक्षरचित्रे
यांसारख्या अनेक चित्रप्रयोगातून विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होता यावे असा प्रयत्न असतो.
 ४. चित्रकला अभिव्यक्तीचे महत्त्व :- चित्रकला अभिव्यक्तीतून आकार, रंग, छटा यांविषयीच्या सौंदर्य जाणिवा विकसित होतात. मुक्त व बद्ध रंगरेषांतून एक शिस्त, वळण लागत असते. 'चित्रकला' अत्यंत व्यापक असे कलामाध्यम आहे. दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टी सुबक, देखणेपणाने सादर करण्यासाठी रंगरेषांचे सामर्थ्य ओळखणे आवश्यक आहे. म्हणूनच चित्रकला हा एक तांत्रिक भाग न राहता, मुलांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटतील असा विषय व्हायला हवा. केवळ नक्कल उतरविणे, ठराविक साच्यात बसविणे नको. कल्पना फुलविण्याचे धडे कलेत आले तर ती सार्थ अभिव्यक्ती होईल. पाहणारे डोळे, आज्ञा पाळणारे हात, अनुभव घेणारे मन यांचा एकत्रित विचार चित्रकला अभिव्यक्तीत केला तर आंतरिक दृष्टीला एक स्वस्थता लाभेल असे वाटते.
 शालेय जीवनात जे संस्कार मुलांच्या मनावर ठसविले जातात, अभिव्यक्त होण्याची, स्वत:च्या अनुभवांची मांडणी करण्याची संधी त्यांना जेवढी दिली जाते, तेवढी व्यक्तिमत्त्व विकासाची क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली होतात. विविध

रूप पालटू शिक्षणाचे(४९)

कलामाध्यमातून आस्वादक्षमता व वृत्तीघडणीचे शिक्षण मिळत असते. ज्या गुणांची,

मूल्यांची अपेक्षा केली जाते, त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचे काम अभिव्यक्ती विकसनाच्या उपक्रमातून होईल. अभिव्यक्तीच्या विविध माध्यमांचा शिक्षणात एखाद्या मार्गदर्शकासारखा उपयोग होतो. संगीत, चित्रकला, नाट्य, विविध हस्तकला या विविध कलाविषयांतून सौंदर्यदृष्टी, एकाग्रता, नवनिर्मिती, उत्कृष्टता, नेटकेपणा ही संस्कारबीजे विकसित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तनुमनात रुजवली जातात. म्हणूनच म्हणावे वाटते,
  "करू देत सुरांशी मैत्री,
  झंकारू दे तारा वीणेच्या,
  बोल उमटू दे तालामध्ये,
  रंगरेषांचे हितगुज,
  प्रतिभेची अक्षरफुले उमलू दे काव्यात,
  निर्मिती-कृती होवो अनुभवांची
  अभिव्यक्ती प्रत्येक हृदयात !"
(५०)रूप पालटू शिक्षणाचे
साखरशाळा प्रकल्पात विद्यार्थ्यांचा सहभाग

 'रूप पालटू देशाचे' या विचाराने कटिबद्ध झालेल्या ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षणाची सुरुवात बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाने झाली. गेली अनेक वर्षे विविध प्रकारचे प्रयोग ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केले जात आहेत. अर्थात हे सर्व प्रयोग तेवढ्याच गटापर्यंत मर्यादित न ठेवता समाजाच्या विविध स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
 १९९० च्या सुमारास पडसरे येथील आदिवासी मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या १०० दिवसांची शाळा' या उपक्रमामध्ये प्रबोधिनीचा सहभाग सुरू झाला. शाळेपासून दूर असणाऱ्या, शिक्षण ही दुर्मिळ गोष्ट वाटणाऱ्या गटासाठी सुरू झालेला हा उपक्रम, ही कल्पना मात्र आता प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी एक ताकदवान प्रयोग म्हणून रुजली आहे.
 दुर्गम आदिवासी भागातील या उत्साहवर्धक अनुभवानंतर १९९२ साली ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी ज्ञान प्रबोधिनीने साखरशाळा सुरू केली.
 महाराष्ट्राच्या समृद्धीचे एक कारण सहकार चळवळीतून उभे राहिलेले साखर कारखाने ! पण या भौतिक शोषणामागचा घटक, ऊसतोडणी कामगार मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे. वर्षातील सात-आठ महिने स्वत:चे गाव सोडून महाराष्ट्र रातील व सीमेवरील विविध साखर कारखान्यांच्या परिसरात हे लोक मजुरीसाठी जातात. या कामावरच त्यांचे पोट अवलंबून असते. अर्थात सर्व कुटुंबाचेच हे स्थलांतर असते. ऊसाच्या पाचटातूनच त्यांनी आपली खोपटी उभारलेली असतात. घरातील सर्वांनाच या कामात हातभार लावावा लागतो. अर्थात हे कामही तसे कौशल्याचे. पण मजुरी मिळते ती दिवसाला ४०-५० रुपये. शिवाय मुकादमांकडून आधीच घेतलेल्या उचलीची परतफेड करण्यात ते संपून जातात. शिक्षण नाही. हिशेबाचे ज्ञान नाही, अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे ही भटकंती सुरूच राहते.
 कुटुंबाबरोबरच अर्थात मुलांचेही स्थलांतर होते. १०-१२ वर्षांहून मोठी मुले- मुली, आई-बापाबरोबर ऊसतोडणीला जातात. पहाटेपासून रात्रीपर्यंत ही ऊस तोडणी-बांधणी-कारखान्यात पोचवणी चालते. अशा वेळी लहान मुले कोप्यांमधूनच असतात. बिनदाराच्या कोपीची राखण करणे, गुरे सांभाळणे, लहान भावंडांची काळजी घेणे, पाणी भरून ठेवणे आणि अन्य वेळात भटकणे हा या छोट्यांचा दिनक्रम. क्वचित प्रसंगी गावातील बाजारात पाणी विकण्याचे किंवा गावात

रूप पालटू शिक्षणाचे(५१)

गोवऱ्या, वाढे विकण्याचे कामही ही मुले करतात. हातात थोडा का होईना पैसा

खेळायला लागतो. भोवतालच्या वातावरणातून कुसंस्कार होण्याचीच शक्यता जास्त ! गावाकडे शिकलेली शाळा काही दिवसांतच विसरली जाते. गावी चौथी-पाचवीत नाव असूनही या मुलांना लिहिता-वाचतासुद्धा येत नसते. पत्ते, जुगार खेळणे, विड्या ओढणे या सवयी लागतात. एक निरक्षर आणि हताश, हतबल ऊसतोडणी कामगार या चक्रामधून घडत असतो.
समस्येची व्याप्ती
 गेली चाळीस वर्षे हे चक्र चालू आहे. लहानपणी आईबापाबरोबर बोट धरून आल्याच्या आठवणी अनेक प्रौढ कामगार सांगतात. महाराष्ट्रातील सुमारे १२५ कारखान्यांमधून सरासरी प्रत्येकी पाच हजार कुटुंबे धरली तरी सुमारे सहा लाख कुटुंबांचे म्हणजे कमीत कमी तीस लाख माणसांचे हे स्थलांतर आहे. एकूण स्थलांतरित लोकांपैकी पन्नास टक्के कामगार बीड जिल्ह्यातील आहेत. शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे तीन लाख इतकी आहे.
प्रबोधिनीची भूमिका
 एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकीकडे शिक्षणापासून वंचित होत आहेत आणि एकीकडे शिक्षणातील विविध प्रयोग केले जात आहेत. ज्ञान प्रबोधिनीत केले जाणारे शिक्षणविषयक प्रयोग समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांतून नेहमीच प्रयत्न केले जातात. शिवाय राष्ट्रीय एकात्मता हा प्रबोधिनीच्या कामाचा महत्त्वाचा विषय असल्याने साहजिकच वंचितांसाठी काम हा प्राधान्याने करत असणाऱ्या कामातील एक भाग.
साखरशाळा उद्दिष्ट व कार्यपद्धती
 १०० दिवस चालणारी अन् साखर कारखान्याच्या परिसरातली ही साखरशाळा प्रामुख्याने बालवाडी ते पाचवी-सातवीपर्यंत चालू असते. वयोगटापेक्षा कोणाला काय येते याची चाचणी घेऊन त्यांची इयत्ता ठरवली जाते. प्रत्येक वेळी ती त्यांना सांगणे अडचणीचे जाते. (दहा वर्षांच्या मुलाला/मुलीला तू पहिलीत आहेस हे सांगितलेले आवडत नाही.) म्हणून निर्वर्ग पद्धतीने त्यांना शाळेत शिकविणे चालू केले जाते.
 साखरशाळेच्या कामाची काही उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. साखरशाळेच्या
(५२) रूप पालटू शिक्षणाचे
विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन, अंकगणित, आरोग्य, स्वच्छता, व्यायाम तर प्रेरक,

प्रबोधक आणि शिक्षक या गटासाठी संस्कार, करमणूक व एकात्मता असा विचार करून त्याप्रमाणे नियोजन व कार्यवाही केली जाते.
 हे विद्यार्थी साखरशाळेत चारच महिने असतात. त्यामुळे शासनमान्य शाळेतील अभ्यासक्रमच त्यांना शिकवावा लागतो. पण अभ्यासेतर अनेक गोष्टींतूनही विद्यार्थी सतत काहीतरी शिकत असतात. प्रकल्प, सहाध्यायदिन, साहस सहली इ. चे नियोजन त्यांच्या वेळापत्रकातच केले जाते. परिसर अभ्यास त्यांना परिसरात फिरूनच शिकविला जातो. शिवाय वक्तृत्व, कथाकथन, नाट्य हे धाडस, आत्मविश्वास मिळवून देणाऱ्या अभिव्यक्तीच्या प्रकारांचे त्यांच्या परिपाठाच्या वेळीच नियोजन केलेले असते. अगदी बालवाडीपासूनचे विद्यार्थी यात सहभागी होत असतात.
शिक्षक रचना
 ह्या सर्व गोष्टी यशस्वीपणे होण्यासाठी, उत्तम होण्यासाठी प्रयत्न करणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शिक्षक. साखरशाळेतील शिक्षक हे स्थानिकच निवडले जातात. ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मिसळायला कुठलीही अडचण येत नाही. हे अध्यापक शिक्षणशास्त्रातले पदवीधर नाहीत. आठवी ते पदवीधर असणाऱ्या या शिक्षकांना प्रबोधिनीत प्रशिक्षित केले जाते. विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाबरोबर, अध्यापन प्रक्रिया, अध्यापन कौशल्ये, मानसशास्त्र या विषयांचा समावेश असतो. बहुतेक शाळा एकशिक्षकी असल्यामुळे बहुवर्गीय व बहुश्रेणी अध्यापन करावे लागते. अशा वेळी अध्ययन व मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना आणखी काही व्यक्तींची आवश्यकता भासते. शिक्षकांच्या मदतीसाठी प्रबोधिनीतून प्रेरक म्हणून महाविद्यालयीन गटातील युवक-युवतींना व इयत्ता आठवी-नववीतील विद्यार्थ्यांना प्रबोधक म्हणून पाठविले जाते.
प्रशालेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
 १०० दिवसांच्या शाळेतही मुलांवरील वेगवेगळ्या संस्कारांचे कार्य दिवसभराच्या कार्यक्रमातून होत असते. मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांच्या बरोबरीने 'प्रेरक आणि प्रबोधक' संस्कार रुजविण्याचे कार्य करत असतात.
 मुलांच्या मानसशास्त्राचा विचार केल्यास शिक्षकांच्या शिकवण्याबरोबरच त्यांना एखाद्या मार्गदर्शकाची व त्यापेक्षा अधिक मित्राची आवश्यकता असते. ही गरज प्रबोधक भरून काढतात.

रूप पालटू शिक्षणाचे(५३)

 सध्या या साखरशाळा महाराष्ट्रात थेऊर, राहुरी, इचलकरंजी व सोलापूर येथील

कारखान्यांच्या परिसरात चालविल्या जातात. त्यांपैकी थेऊर परिसरात सर्वात जास्त म्हणजे १५ शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये शिक्षकांबरोबर प्रबोधक म्हणून ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील इ. आठवी, नववीचे विद्यार्थी गटागटाने जात असतात. विद्यार्थ्यांचे ४-४ चे गट केले जातात. प्रत्येक आठवड्याला २ गट एका पाठोपाठ एक पुण्यापासून २५ ते ३० कि.मी. अंतरावरील साखरशाळांमध्ये शिकविण्यासाठी जातात. सोमवारी सकाळी एक गट जातो तो गुरुवारी संध्याकाळी परत येतो तर दुसरा गट गुरुवारी सकाळी निघून शनिवारी रात्री परत येतो. गरजेप्रमाणे हा गट रविवारीही तिथे राहतो.
 शाळेचा दिनक्रम व प्रेरक-प्रबोधकांची जबाबदारी यांचा एकमेकांशी योग्य समन्वय ठेवून नियोजन केले जाते.

दिनक्रम प्रबोधकांची जबाबदारी
स. ७ ते ७.४५ प्रात:स्मरण, ६वा. उठून आवरणे, वस्तीवर

उपासना,व्यायाम विद्यार्थी गोळा करून उपासना, सूर्यनमस्कार व चेतना व्यायाम शिकवणे.

७.४५ ते ९.०० आंघोळ, परिसर ज्ञान जवळच्या टाकी वा नळकोंडाळ्यावर

मुलांना आंघोळ घालणे. (आठवड्यातून एकदा डेटॉलने) नंतर परिसरात फिरून माहिती देणे.

९.०० ते १०.०० न्याहरी व आवरणे
१०.०० ते १०.३० मुले गोळा करणे वस्तीत फिरून शाळेत

न आलेल्या मुलांना समजावून शाळेत आणणे.

१०.३० ते ११.३० परिपाठ-प्रार्थना मुलांनी शिस्तीने, शांततेने

वागावे यासाठी मदत करणे व स्वत:ही तसे वागणे.(५४)रूप पालटू शिक्षणाचे

११.३० ते १.३० शाळा सत्र १ (भाषा-गणित) भाषाविकासासाठी खेळ घेणे, अंकज्ञान वाढवण्यासाठी साहित्याद्वारे अध्ययन मागे पडणाऱ्या मुलांना मदत करणे.
दु.१.३० ते २.३० भोजन सुट्टी
२.३० ते ३.३० शाळा सत्र २ विज्ञान-अवांतर प्रयोग साहित्य वापरून प्रयोग करून दाखवणे.
३.३० ते ४.३० पद्य, गोष्टी, कोडी, हस्तकला, चित्रकला अन्य विषयांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे व सोपे करून शिकवणे
४.३० ते ५.३० क्रीडादल ठरवलेला क्रीडाप्रकार शिकवणे, कवायत प्रकार घेणे.
सायं. ५.३० ते ६.००   मोकळीक
६.०० ते ७.०० पालक संपर्क त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती घेणे, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवणे. आरोग्य-आहार यांबाबत चर्चा, प्रौढ साक्षरतेसाठी प्रोत्साहित करणे.
७.०० ते ७.३० मोकळीक
७.३० ते ८.३० अभ्यासिका मागे पडणाऱ्या मुलांवर लक्ष देऊन तयारी करवून घेणे.
८.३० ते ९.३० भोजन
९.३० ते १०.०० बैठक निवासी मुख्याध्यापकांना दिवसभरातील घडामोडी, काम,निरीक्षणे, अनुभव यांविषयी सांगणे. दुसऱ्या दिवशीचे नियोजन करणे.

 विद्यार्थ्यांच्या दिवसभरातील कामांमध्ये प्रेरक-प्रबोधकांना स्वतः शिकलेल्या
गोष्टींचे योग्य प्रकारे उपयोजन करावे लागते. त्यांचे गाणी, गोष्टी, नाट्य, हस्तकला,

रूप पालटू शिक्षणाचे(५५)
चित्रकला, खेळ व अभ्यासविषय या सर्वच गोष्टींतील पूर्वज्ञान लक्षात घेऊन त्यांना

योग्य ते प्रशिक्षण दिले जाते, त्यांची तयारी करून घेतली जाते. प्रबोधिनीत प्रबोधकांनी प्रकल्प, सहाध्यायदिन, स्वाध्याय कौशल्ये, गटकार्य इ. अनुभव घेतलेले असतात. हे सर्व अनुभव साखरशाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरक- प्रबोधकांना प्रशिक्षण दिले जाते. वरील सर्व विषयांपैकी जे त्यांना ज्ञात आहेत त्यांचा सराव घेणे, माहीत नसलेल्या विषयांबद्दल प्रशिक्षण देणे इ. चा समावेश असतो.
 अर्थात प्रशिक्षणाबरोबर प्रबोधकांना पूर्वतयारीही करावी लागते. शालेय विषय तर ते समजून घेतातच, शिवाय गाणी, गोष्टी गोळा करणे, वर्गातील जाऊन आलेल्या गटाशी चर्चा करणे इ. ही ते करत असतात. शिवाय विद्यार्थ्यांशी बोलताना, शिकवताना स्वत:चे संभाषण कौशल्य वापरत असतात.
 मुलांना आंघोळी घालताना, वेणीफणी करताना, औषधपाणी करताना, संध्याकाळी खेळताना, कधी भटकायच्या कार्यक्रमात ते मुलांना बोलते करत असतात. त्यांची करमणूक होत आहे याचे भान ठेवून वेगवेगळ्या गोष्टी सुचवतात, माहिती देतात, मुलांमध्ये स्वच्छतेच्या संस्कारापासून राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, समता, बंधुभाव, चांगल्या वाईटाची समज, कृतीप्रवणता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील कल्पनाशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करतात. मुलांची व प्रबोधकांची यातून भावनिक जवळीक साधली जाते. सतत एकत्र राहून, एकाच प्रकारच्या संस्कारांचे ग्रहण करत असताना, सामाजिक एकात्मतेचाही धागा बळकट केला जातो. प्रबोधक व मुलांचा सततचा संपर्क हा शाळेतील यशाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रबोधकांचे मित्रत्व, त्यांचे संपर्क सातत्य आणि निश्चित संस्कार या तीन गोष्टींचे मुलांच्या विकासातील स्थान, पडसरे व साखरशाळा या दोन्ही प्रयोगांतून निश्चित झाले आहे.
हेतू व कार्यपद्धती
 १०० दिवसांच्या शाळेतील मुलांबरोबरच प्रबोधकांच्याही वैयक्तिक विकासासाठी हा सहभाग अत्यंत आवश्यक वाटतो. मुलांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक वाढीमध्ये प्रबोधकांचा जसा फार महत्त्वाचा वाटा असतो तसाच प्रबोधकांच्या सामाजिक जाणीवा वाढण्यासाठी, त्याचे भान राहण्यासाठी या उपक्रमाचाही महत्त्वाचा वाटा आहे.
 प्रबोधिनीमध्ये समाजसेवा ह्या विषयांसाठी वेगळ्या तासिकांची सोय नाही, किंबहुना असे वेगळे तास असण्याची आवश्यकता वाटत नाही. विविध उपक्रमांमधील सहभागातून, ज्येष्ठांच्या संपर्कातून हा 'देशस्थितीचा अभ्यास' चालू असतो.

(५६)रूप पालटू शिक्षणाचे

 दिनक्रमातील प्रत्येक उपक्रमातील सहभाग हा प्रबोधकांच्या प्रशिक्षणाचा अन्

अनुभवाचा भाग असतो. प्रबोधिनीत आपल्यावर होणारे संस्कार इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी जी धडपड करावी लागते ती बरेच काही शिकवून जाते.
 १) गटाचे नेतृत्व करणे- आपल्यापेक्षा छोट्या वयाच्या, इयत्तेच्या मुलांना गोळा करणे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवणे, त्यांच्याकडून करवून घेणे आणि हे करताना मित्रत्वाचे नातेही ठेवणे ही महत्त्वाची गोष्ट प्रबोधक शिकत असतात. संयतपणे वागत गटाचे नेतृत्व करणे यातून नकळत घडत जाते.
 २) निरीक्षण- रोज संध्याकाळी निवासी मुख्याध्यापक, प्रेरक व प्रबोधकांची रात्री एकत्र बैठक असते. दिवसभराच्या एकंदर कामाचा आढावा या बैठकीत घेतला जातो, दुसऱ्या दिवशीचे नियोजनही केले जाते.
 या आढावा व नियोजनासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक निरीक्षणे ठेवणे, त्या निरीक्षणांची लेखी नोंद ठेवणे, त्यावर चर्चा करून दुसऱ्या दिवशी उपाययोजना करणे इ. गोष्टी प्रबोधकांना कराव्या लागतात.
 ३) नियोजन - आपण करणार असलेल्या कामांची माहिती घेणे, पूर्ववाचन करणे, त्या तीन दिवसांमध्ये ते काम पार पाडणे प्रबोधकांना करावे लागते. यासाठी नियोजन असणे गरजेचे असते. हे नियोजन करणे प्रबोधक शिकतात.
परिस्थिती / वातावरण
 आपले बहुतेक सर्व प्रबोधक मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय गटातील असतात. त्यामुळे देशातील अन्य लोकांची परिस्थिती कशी असते हे अनुभवणे खूप महत्त्वाचे असते. गरिबी कशी असते, लोक झोपड्यांमध्ये कसे राहतात, त्यांचे जेवण कसे असते, दिवसभर पालक घरी नसताना मुले कशी राहतात, घरातील सर्व कामे ही छोटी मुले कशी करतात, त्यांच्या आसपासचे वातावरण, त्यांच्यावर होणारे संस्कार हे सगळे प्रत्यक्षात पाहून, अनुभवून, एक वेगळेच विश्व त्यांच्या डोळ्यापुढे येते.
 अभ्यासिकेनंतर संध्याकाळी मुख्याध्यापक जेव्हा पालक संपर्कासाठी जातात तेव्हा प्रबोधकही त्यांच्या बरोबर असतात. पालकांशी गप्पा, विद्यार्थ्यांबरोबर गप्पा यांतून या लोकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वास्तव भान येते. आपली आर्थिक परिस्थिती,उपलब्ध साधने, सोयी-सुविधा, वातावरण या सर्वांची नकळत तुलना सुरू होते.
 साखरशाळेतील आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांची कष्टाळू वृत्ती, जिद्द, कमी आर्थिक परिस्थितीतही समाधान मानण्याची वृत्ती प्रबोधकांना खूप काही शिकवून जाते.रूप पालटू शिक्षणाचे(५७)

 प्रबोधकांची मनोगते

 "इथे येण्यापूर्वी का यायचे, काय करायचे माहीत नव्हते. शाळा खूप मोठी टुमदार असेल असे वाटले होते. शाळा व मुलांच्या झोपड्या पाहून धक्काच बसला.
 गरीबी म्हणजे काय ? हे जवळून न्याहाळता आले. आम्हांला एवढ्या छोट्या, दाटीवाटीच्या घरात राहायची सवय नसल्यामुळे आत गेल्यावर कसेतरीच वाटले. पण या लोकांची गायी-गुरे दाराशीच असतात. या लोकांनी पशुंनाही घरातीलच एक घटक मानले आहे.
 या लोकांनी आमचं खूप आदरातिथ्य केलं. त्यांचं दुसऱ्याला सुख देणारं मन पाहून श्रीमंतांच्या स्वार्थी व तुसड्या स्वभावाचा राग आला. ही मुलं गरीब असली तरी नाजूक मनाची, हळवी, कोवळी, निरागस व खेळकर आहेत."

-अभिजीत डोंगरे


 “आपल्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळेल का ? काल लताने ॐ का घातला असे विचारले. उत्तर काय द्यायचे हे कळतच नव्हते. रूमवर आल्यावर ताईला विचारलं. ताईने व्यवस्थित समजून सांगितल्यावर कळले. सोप्या भाषेत कसं सांगता येईल ते लक्षात आलं.
 लहान मुलांना शिकवताना पेशन्सची गरज असते. आपले शिक्षक आपल्याला कसं शिकवत असतील ? वर्गात त्रास द्यायचं कमी करायला हवं."

- दीप्ती देवधर


 “अंकुश ज्या परिस्थितीत राहतो ते पाहून आपण खूपच आरामात राहतो, उगाच छोट्या गोष्टींसाठी रडतो असे वाटते."

- केतकी बारटक्के


 “या मुलांचा दिनक्रम पाहून धक्काच बसला. मोकळा वेळ माहीतच नाही. सारखे कामच असते. घर आवरणे, पाणी भरणे, मोठ्यांना मदत करणे. शिवाय लहान भावंडे कडेवर असतातच. पुस्तकापेक्षा परिस्थिती खूप काही शिकवते त्यांना. जबाबदारीची व्यवस्थित जाणीव त्यांना आहे."

- रश्मी काळे


निरीक्षणे व परिणाम
 प्रबोधकांच्या मनोगतांवरून त्यांच्या जाणिवा-अनुभव यांत भर पडते हे जरी खरे असले तरी उपक्रमात त्यांना अनेकदा अडचणींनाही सामोरे जावे लागते. कधी या अडचणी छोट्या असतात किंवा मोठ्याही. अर्थात त्याचे छोटे-मोठेपण हे आपल्या(५८)रूप पालटू शिक्षणाचे
दृष्टीने. त्यांच्या दृष्टीने ती अडचण महत्त्वाचीच असते. उदा. - एखाद्या वेळी एखाद्या

मुलाला कित्येक तास समजावून सांगूनही समजून घ्यायचेच नसते अशा वेळी काय करायचे हेच समजत नाही. एखाद्या वेळी कित्येक मैल चालत शाळेत पोहोचल्यावर सगळी मुले ऊसाच्या फडावर गेलीत, शाळेत कुणीच नाही हे पाहून हताश व्हायला होते. कित्येकदा पालक संपर्काला गेल्यानंतर पालक दारू पिऊन आलेले असतात आणि रात्री कितीही समजावून सांगितले तरी पहाटे मुलांना कामाला घेऊन गेलेले असतात. शिवाय कित्येकदा प्रबोधकांचे वय लहान असल्याने पालक त्यांच्या बोलण्याला फारशी किंमतही देत नाहीत. पण एकूण उपक्रमाचे महत्त्व, देशप्रश्न म्हणून त्याचे स्थान, आपले त्यातील स्थान याची जाणीव प्रबोधकांशी वारंवार औपचारिक- अनौपचारिक बोलून करून द्यावी लागते. त्यांच्या चुका हळुवारपणे समजून घेणे, त्यात बदल सुचवताना मार्गदर्शक ह्या त्यांच्या भूमिकेला कुठेही धक्का न लावता त्यांना काही सुचविणे, त्यांच्या चांगल्या कल्पनांना योग्य वेळी दाद देणे - शाबासकीची, कौतुकाची थाप देणे असेही करावे लागते.
 अर्थात पुष्कळदा 'नव्याचे नऊ दिवस' असाही प्रकार आपल्याला अनुभवायला मिळत असतो. पण हा अनुभव जिवंत राहण्यासाठी त्यांच्यामधील संवेदनाशीलता आपणच जागी ठेवणे आवश्यक असते. डोळे उघडे ठेवून जगात वावरणे हे आपणच मुलांना शिकवावे लागते. प्रत्येक ठिकाणी ऊसतोडणी कामगारांची मुले व त्यांच्यासाठीचा साखरशाळेसारखाच उपक्रम असेल असे नाही. परिसरातील प्राथमिक शाळा, रिमांड होम, अनाथालय, बालकामगार, वीट भट्ट्या, रेल्वे स्टेशनवरील मुले, बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांची मुले यांच्यासाठीही काम करणे शक्य आहे. जे शिक्षणातून म्हणजे नेहमीच्या औपचारिक शिक्षणातून मिळत नाही अशा गोष्टींची जोड देता येणे शक्य असते. आपल्या विद्यार्थ्यांमधील अनेक गुणांची जाणीवही यामुळे आपल्याला होऊ शकते. या संदर्भातले एक-दोन अनुभव मला आठवतात की, जे या कामात सतत उत्साह तर देत राहतातच, शिवाय प्रबोधक नुसते जाऊन येतात व विसरतात असे होत नाही.
 १९९३-९४ चे साखरशाळेचे पहिले वर्ष. प्रबोधिनीतील इयत्ता आठवीतील चार विद्यार्थ्यांचा गट साखरशाळेत गेला होता. संध्याकाळी दलानंतर सर्वजण बाहेर बसले होते. बाजूलाच मुकादम कामगारांना पैसे वाटप करीत होता. कमी पैसे हातावर ठेवून जास्त पैशांवर सही घेणे चालू होते. एका विद्यार्थ्याने पुढे जाऊन ताबडतोब त्याला विरोध केला. मुकादमाने परिस्थिती लक्षात घेऊन पैसे व्यवस्थित द्यायला सुरुवात

रूप पालटू शिक्षणाचे(५९)

केली. कुणावर अन्याय होऊ नये म्हणून पुढे व्हायला हवे हे कधीतरी सांगितलेले

त्याने लक्षात तर ठेवलेच, पण आचरणातही आणले.
 दुसऱ्या एका मुलींच्या गटाचा अनुभव तर आणखी वेगळा. प्रबोधिनीत विद्यार्थी प्रकल्प पद्धतीने शिकतात. वेगवेगळ्या विषयांची निवड करून, वाचून, प्रत्यक्ष प्रयोग करून विद्यार्थी त्यातून काहीतरी सिद्धही करत असतात. साखरशाळेत जाऊन आल्यामुळे अशा प्रकारच्या कामांमध्ये आपणही सहभाग वाढवावा असे वाटल्याने विद्यार्थिनींनी जवळपास शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची मुले दिवसभर तिथेच खेळताना दिसली. त्यांनी हाच प्रकल्पाचा विषय निवडला आणि रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर दोन तास या मुलांना शिकवायला सुरुवात केली.
 कुठल्याही शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते ती त्यातील सातत्याची साखळी जोडलेली राहणे. या अनुभवांतून हे सातत्य टिकून आहे हे लक्षात येते अन् कामाचा उत्साह द्विगुणित व्हायला लागतो.


(६०)रूप पालटू शिक्षणाचे
ज्ञान प्रबोधिनीची शैक्षणिक प्रकाशने

१. व्यक्तिविकासासाठी विद्याव्रत रु. ६०
(सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी समग्र मांडणी)
२. नावीन्यपूर्ण प्रकल्प कसे करावेत ? रु. ५०
(प्रकल्पासंबंधी अनुभवातून लिहिलेले पुस्तक)
३. प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास रु. ५०
(ललित लेखन कसे करावे याचा मूलमंत्र देणारे पुस्तक)
४. कल्पक बनू या रु. ६०
(कल्पनाशक्ती वाढविण्याची गुरुकिल्ली सांगणारे पुस्तक)
५. वेध यशाचा रु. ७०
(स्वत:चा अभ्यास स्वत: करण्यासाठी उपयुक्त तंत्रे)
६. असे घटते सुंदर अक्षर रु. १०
(हस्ताक्षर सुधारण्यासाठी कृतिपुस्तिका)
७. हसत खेळत बुद्धिविकास रु. १००
(बुद्धिच्या विविध पैलूंसाठी विविध खेळ)
८. बुद्धीवैभव रु. २०
(बुद्धीचे १२० पैलू उलगडून सांगणारे पुस्तक)
९. प्रज्ञाबोध मालिका-५ पुस्तकांचा संच रु. २००
(राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त-दोन्ही माध्यमांमध्ये)
१०.छंद आकाशदर्शनाचा रु. ६०
(आकाशातील नक्षत्रे-ताऱ्यांचा परिचय)
११.गिर्यारोहणगाथा रु. ४०
(गिर्यारोहणाची प्राथमिक माहिती व प्रेरणा देणारे पुस्तक)
१२.प्रबोधन गीते-भाग२ ध्वनिफीत रु. ४०
(ज्ञान प्रबोधिनीतील स्फूर्तीगीते)
ज्ञान प्रबोधिनीची इतरही अनेक संग्राह्य प्रकाशने उपलब्ध !
नियतकालिके-
१. छात्र प्रबोधन वार्षिक वर्गणी रु. १२५
(कुमारांसाठीचे अभिनव मासिक)
२. प्रशिक्षक वार्षिक वर्गणी रु. ४०
(शिक्षकांसाठी द्वैमासिक)
|संपर्क पत्ता :
छात्र प्रबोधन,ज्ञान प्रबोधिनी, ५१० सदाशिव पेठ,

पुणे ४११०३०, 3 (०२०)४४७७६९१,४४७८०९५