रुणझुणत्या पाखरा/हरवलेला वसंत

विकिस्रोत कडून

 एक दिवस अचानक तो मर्मभेदक मधुर गंध श्वासातून थेट मनाच्या गाभाऱ्यात भिनला. रस्त्यातून मी घरी येत होते. मी चमकून भवताली नजर टाकली. सुशी नाल्याच्या अल्याडच्या शिरिष-वृक्ष, फिक्कटपोपटी हिरव्या, चवरीच्या आकाराच्या गोंडेफुलांनी बहरलाय. दुरून पाहिलं तर पिवळ्या रंगाच्या वाळक्या पट्टाड्या शेंगा अंगावर खुळखुळतांना दिसतात. जवळ जावं तर नाजुक चवऱ्या झुलवीत सुगंधाची पखरण करणारे फुलते झाड. ही चैत्र पाडवा जवळ आल्याची नांदी. घरी आल्यावर पहिल्यांदा आईने कुंडीत लावलेल्या मोगरीच्या वेलीकडे मी धावते. तिथेही टप्पोऱ्या कळ्यांनी वेल लगडली आहे. वसंतातली प्रत्येक सांजवेळ विविध सुगंधी लहरलेली.

मंद मंद मंद वात
मधुर गंध ने जगात
हा वसंत रंग भरित
जगती येतसे पहा
बहरल्या दिशा पहा....

 वसंत बापटांच्या 'अन्नदाता' या शेतकरी जीवनावरच्या नृत्य संगितीकेवर, सेवादल कला पथकात नाचतांना कवितेचा अर्थ वयाच्या दहाव्या वर्षी कळला नव्हता. पण तरुणाईची चाहूल लागताच निसर्गातल्या आणि जीवनातल्या वसंतऋतूचे वेगळेपण जाणवू लागले... अंगणात गुलमोहर बहरु लागला.
 असे आठवणारे अनेक वसंत. पण गेल्या २५/३० वर्षांत हे सुरंगी.. सुगंधी वसंत जणू आयुष्यातून हरवले आहेत. मार्च महिना बसंती रंगाचा. मार्च आला की गेल्या तीस वर्षांपासून आठवतो '०८ मार्च, महिला दिवस.' महिलांनी आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रातील दुय्यम स्थानाला आव्हान देऊन 'बाई' म्हणून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरूद्ध संघटितपणे लढा द्यायला सुरवात केली त्याची 'नांदी' ठरणारा दिवस. अमेरिकेतील, युरोपातील कष्टकरी स्त्रियांनी बाई म्हणून अधिक तास श्रम, पण वेतन मात्र कमी; या वास्तवाला संघटितपणे टक्कर दिली.
 ०८ मार्च १८५७ रोज न्यूयॉर्कच्या कापड गिरण्यांत काम करणाऱ्या महिलांनी गिरणी मालकांकडून होणारी पिळवणुक, श्रम जास्त पण मोबदला कमी या विरुद्ध निदर्शने केली. पोलिसांच्या हल्ल्याला तोंड दिले. नंतर दोन वर्षांनी मार्च मध्ये महिला कामगारांची संघटना बांधली. १९०८ साली पंधरा हजार महिलांनी कामाच्या तासात कपात व्हावी म्हणून मोर्चा काढला.
 १९०८ पासून ०८ मार्च हा दिवस 'महिला दिन' म्हणून पाळला जाऊ लागला. जगातील स्त्रियांच्या समाजातील स्थानाचा, त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करणारे व्यासपीठ निर्माण झाले. १९९० साली पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद कोपन हेगेन येथे पार पडली. गेल्या काही वर्षांपासून भारतातही हा दिवस विविध सामाजिक संस्था, संघटना, स्त्रीच्या समाजातील स्थानाचा गांर्भियाने विचार करण्याचा विशेष दिवस म्हणून पाळतात. स्त्रियांच्यात, एकूण समाजात जाणीव जागृती व्हावी यासाठी योजनांची कार्यक्रमांची आखणी करतात. परंतु अलिकडे हा दिवस खेड्यांपासून ते थेट तालुका जिल्हा - राज्य स्तरावर, शाळा... महाविद्यालये... संस्था आणि शासन यांच्या द्वारे 'साजरा' केला जातो. त्यामागे 'एक विधी पार पाडला' अशी उपरी भावना असण्याचीही शक्यता असते. ही तांत्रिकता येऊ नये याची खबरदारी मात्र जाणीवपूर्वक आपण सर्वांनी घ्यायला हवी.
 गेल्या काही वर्षात महिला सबलीकरणाचा नारा सर्वत्र दिला जातो. या दिवसाच्या निमित्ताने का होईना, समाजातील 'बाई' च्या दर्जाचा विचार वास्तवाचे भान ठेवून आपण शोधतो. का? या 'आपण' मध्ये सुजाण, शिक्षित, राजकीय-आर्थिक- सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्त्री पुरूष आले. स्त्रीचे सबलीकरण हे समाजाच्या सबलीकरणाचा एक भाग आहे. गेल्या दोन हजार वर्षे बाईचा सामाजिक दर्जा तळातला होता. याला जबाबदार सामाजिक... धार्मिक परंपरा, जगण्याचे रीतीरिवाज आहेत. ते कोण्या एका व्यक्तीने वा धर्माने लादलेले नाहीत. समूहाच्या जगण्याच्या चालीरितीतून ते आले आहेत. समाजाने पुरूष हाच 'पूर्ण माणूस' मानल्याने या परंपरा, रीतीरिवाजांची निर्मिती समाजातील पुरुषवर्गाने केली. परंतु आज विज्ञान, सामाजिक न्याय यांमुळे समाजधुरिणांना पटले आहे. की स्त्री ही टाकण्याभोगण्याची 'वस्तू' नाही. ती एक परिपूर्ण व्यक्ती आहे. 'माणूस' आहे. हा विचार शिक्षण... राजकारण... समाजकारण आदि विविध माध्यमांतून समाजात पेरणाऱ्यांची एक साखळी निर्माण व्हायला हवी. आणि हे आव्हान पेलण्यासाठी सुजाण, शिक्षित स्त्रियांनी दोन पावले पुढे रहायला हवे. पुरूषांचे हात हातात हवेतच. तेही परिपूर्ण माणुस आहेत. तरच अनेकींचे हरवलेले, अनेकींच्या जीवनात नव्याने येणारे वसंतऋतू पुन्हा अंगणात बहरतील, आणि खुल्या आवाजात गाता येईल.

हम चलेंगे साथ साथ
डाले हाथो में हाथ
हम होंगे कामयाब एक दिन.

 हरवलेला वसंत पुढील पिढ्यातील लेकीसुनांच्या अंगणात नक्कीच येईल.