रुणझुणत्या पाखरा/दशम्या धपाट्याच्या चवीची वेळा आवस
Appearance
मार्गेसरी संपत येते. मार्गशीर्ष अमावस्येचे... वेळा आवसेचे वेध मराठवाड्यातील विशेष करून बीड, उस्मानाबाद, लातूर परिसरातील सर्वांना लागतात. सर्व जातीचे सर्व धर्माचे सामान्य या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. चार दिवसांपासून धपाटे, चटण्या भाज्यांची चव घरादाराच्या जिभेवर हुळहुळायला लागते. शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब दशम्या, धपाटे, तऱ्हेतऱ्हेच्या चटण्या, दही घेऊन शेतात जाते. एखाद्याला जेमतेम एकर दीड एकर शेत असो वा एखादा पंचवीस एकर पाणभरत शेतीचा बागाईतदार मालक असो. किंवा तो नामदार खासदार असो वा एखादा साधा शिपाई असो. तो शेतात जाऊन, आंब्याच्या सावलीला बसून घरच्यांच्या मित्रांच्या सोबत दशम्या, धपाटे, मिरचीच्या खुड्यासोबत खाणारच! अनेकजण शेतात जाऊन अन्न शिजवतात. ज्यांना शेत नाही त्यांना शेजारपाजारच्या कुटुंबांना शेतात जेवायला येण्याचे आमंत्रण दिले जाते आणि हे आवतन चुलीला असते. या जेवणात दशम्या आणि धपाटे 'अस्से'च. धपाटे मराठवाड्याची खासियत. दूध, किंचित साखर आणि तुपाचे मोहन घालून गव्हाच्या पिठाच्या किंचित जाडसर. वरून तूप लावून केलेल्या पोळ्या म्हणजे दशम्या आणि ज्वारीच्या पिठात थोडे गव्हाचे, डाळीचे पीठ, लसूण, मीठ, मिरची, पालेभाज्या घालून पोळीसारखे लाटल्यावर अधूनमधून भोकं पाडून, वरून तेल सोडून खरपूस भाजून केलेले धपाटे. सुटलं ना तोंडाला पाणी?
वेळा हा 'ईला' या शब्दाचा अपभ्रंश असावा. मराठीत 'व' चा 'अ' किंवा 'अ' चा 'व' होण्याची प्रवृत्ती आहे. ओटी हा शब्द ग्रामीण भाषेत वंटी होतो. या आवसेला ईला आवस असेही म्हणतात. 'इला' म्हणजे धरती, अन्नधान्य, भाजीपाला निर्माण करून माणसाचे भरणपोषण करणाऱ्या, नवनिर्मितीची उर्जा अंगप्रत्यंगात लहरणाऱ्या धरित्रीच्या सन्मानाचा, पूजनाचा हा दिवस. या दिवशी मान आंबिलीचा असतो. थोड्या ज्वारीच्या पिठात लसूण, आद्रक, जिरे, मीठ तिखट घालून ती शिजवतात. त्यात ताक घालून ती घुसळतात. शेतीशी निगडित सर्व विधी आणि सणांमध्ये आंबिल हवीच. पोळा असो वा लक्ष्म्या. आंबिल असतेच. ज्वारी हे मराठवाड्यातील पूर्णान्न आहे.
इला आवसेला, मातीच्या गाडग्याला चुना आणि काव लावून रंगवतात. त्यात पाच पाच सुपाऱ्या, हळकुंड, खारका, खोबऱ्याचे तुकडे घालून मडक्याच्या तोंडावर नागवेलीचे पान ठेवतात. खरिपाची सुगी नुकतीच संपलेली. गहू, हरभरा, करडईची लावणी होऊन महिना उलटलेला असतो. कापलेल्या धान्याच्या कणसांची, तुरकांड्या गुंफून कोप तयार करतात. त्या कोपीत पाच दगडांना चुना लावून त्यांचे पांच पांडव करतात आणि कोपीच्या बाहेर कुंती आणि द्रौपदीचे दगड मांडतात. त्यांच्या मध्यात कोपीसमोर ते रंगवलेले गाडगे. नैवेद्य म्हणून उकडलेले लहान लहान मुटके आणि ज्वारी बाजरीचा खिचडा ठेवतात. दिवा, नैवेद्य कोपीतल्या पांडवांच्या समोरच. या दिवशी मांग समाजाच्या पतीपत्नींना बोलावून सन्मानाने जेवू घालण्याचा रिवाज होता. असे केले तर भूमीत भरपूर धान्य येते. बरकत येते. परभणी भागात हिला इरवण आवस म्हणतात. इरवण म्हणजे विळा. शेतीच्या अवजारांची व धरित्रीची पूजा करतात. कर्नाटकात मार्गशीर्ष पुनवेला धरणी विधवा होते. अशी कल्पना रूढ आहे. तिला 'हौर्त्सुल हुन्नवे' म्हणजे विधवापौर्णिमा म्हणतात. मग इळा अवसेला सौभाग्य - अवस म्हणायचे का?
... आता द्रौपदी कुंती समोर नैवेद्य का नाही? त्या कोपी बाहेरच का? मांग समाजाच्या जोडप्याला सन्मानाने जेवण इळा अवसेलाच का? अमावस्या आणि ती भाग्यदायिनी? अशा अनेक प्रश्नांचे अंकुर विधीव्रते साजरी करताना आमच्या संवेदनशील मनात उगवतात. त्यांची उत्तरे शोधकांनी शोधावीतच. खूप काही हाती येईल.
पण आपण मात्र दशम्या, धपाटे, चटण्यांची चव तनामनात गोंदवून घेत महिनाभरात येणाऱ्या लुसलुसीत हुर्ड्याची, गवऱ्यांच्या आगटीची, लसणीच्या मीठ चटणीची, शेकलेल्या हुळा ओंब्याची नि नव्या गुळाची वाट पाहायची!!
□